Home Blog Page 587

लोकशाही व संविधान मान्य नसणाऱ्या भाजपाकडून व्होट जिहादचा नारा देऊन मतदारांचा अपमान: नाना पटोले

मतदान करताना सोयाबीन, कापसाच्या भावाची आठवण ठेवा, मविआचे सरकार आल्यानंतर हमीभावापेक्षा जास्त भाव देऊ.

काँग्रेस मविआचे उमेदवार जितेंद्र मोघेंच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची घाटंजीमध्ये जाहीर सभा.

मुंबई/ यवतमाळ दि. १३ नोव्हेंबर २०२४
भाजपाचे नेते बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ है, व्होट जिहाद यासारख्या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्माच्या आधारावर फूट पाडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत आणि याच महायुतीच्या उमेदवारांमध्ये नवाब मलिकही उमेदवार आहेत, ज्यांच्यावर भाजपाने दाऊदशी संबंध असल्याचे आरोप करुन जेलमध्ये टाकले होते. सत्तेसाठी उद्या भाजपा कुख्यात माफिया दाऊदला निवडणुकीत उभे करेल तर त्याला काय सत्ता जिहाद म्हणायचे का? असा संतप्त सवाल विचारून लोकशाही व संविधान मान्य नसणारा भाजपा ‘व्होट जिहाद’चा नारा देऊन मतदारांचा अपमान करत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस मविआचे उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारासाठी घाटंजी येथे सभा घेतली. अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मंत्री शिवाजीराव मोघे, या सभेला अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्जा, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल मानकर, ख्वाजा बेग, प्रवीण देशमुख, भरतभाऊ राठोड, गणेश मुत्तेमवार, सतीश भोयार, शंकरराव ठाकरे, मनिष डागले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले की, केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु, शेतमालाला हमीभाव देऊ अशी आश्वासने देऊन भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये आहे पण बाजारात ३००० ते ३५०० रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबिनला ६,००० रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले होते. कापसालाही हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहेत, या भावात शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही निघत नाही. भाजपाच्या सुलतानी सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करताना सोयाबीन व कापसाच्या भावाची आठवण करा व मगच मतदान करा. मविआचे सरकार आल्यानंतर सोयाबीन, कापसाला हमीभावापेक्षा जास्त भाव देऊ, असे आश्वासनही नाना पटोले यांनी दिले आहे.

महाराष्ट्राचे रिमोट गुजरातच्या हाती देऊ नका-रमेश बागवे ,प्रशांत जगताप यांना निवडून द्या- इमरान प्रतापगढी

भाजप नेते धर्म जाती, कलम ३७० यावर सतत भाषण करत आहेत पण आघाडी नेते विकासावर भर देत आहे. जनतेला आम्ही विमा कवच, आरोग्य सुविधा, गॅस सिलेंडर देणे अशी आश्वासने दिली आहे. भाजप हा कोणाचा मित्र कधी होऊ शकत नाही, ते धोकेबाज आहे. त्यांनी खोके देऊन मित्र पक्षांना सोबत घेतले आहे. भाजपला मत म्हणजे नफरतला मतदान आहे. त्यामुळे राहुल गांधींना जनतेने साथ द्यावी, असे मत ऑल इंडिया कांग्रेस मायनॉरिटी सेल अध्यक्ष खासदार इमरान प्रतापगढी यांनी गुरवारी व्यक्त केले.

पुणे कॅंटनमेंट मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार ), शिवसेना (उद्धव ठाकरे) व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे तसेच हडपसर मतदार संघातील प्रशांत जगताप यांच्या निवडणूक प्रचारासाठी आले असताना ते बोलत होते. यावेळी रमेश बागवे,अमीन पठाण, मौलाना निजामुद्दीन चिश्ती, डॉ.मौलाना काझमी, अली इनामदार, शफी इनामदार उपस्थित होते.

प्रतापगढी म्हणाले, भाजपने संविधान बदलण्यासाठी लोकसभा निवडणुकीत प्रयत्न केले. पण जनतेने ४०० पार नारा देणाऱ्यांना २४० पर्यंत आणून बसवले. बिहार मधील नितीश कुमार हे केंद्र सरकारसोबत आता असेल, तरी ते कधी सत्तेतून साथ निघून जातील सांगता येत नाही, यासाठी महाराष्ट्र निवडणूक महत्वाची आहे.

भाजप बेटंगे तो कटेंगे नारा देतात. पण आम्ही मोहब्बत राजकारण करतो. महाराष्ट्र हा स्वतःची अस्मिता असलेला प्रदेश असून त्याचे रिमोट गुजरातच्या हाती देऊ नका. देशाला कोणत्या जाती किंवा धर्मा मध्ये विभागले जाऊ नये, तर हा देश एकसंध ठेवावा. संविधान वाचवणे महत्वाचे आहे.

महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार याबाबत केंद्र सरकार काही बोलत नाही किंवा उपाययोजना करत नाही. महिला, मुले सुरक्षित ठेवण्याची ही निवडणूक आहे. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जाणार आहे. कारण काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सरकारला भीती वाटत आहे. संसदेत प्रवेश करताना नरेंद्र मोदी यांनी माथा टेकून संसदेत प्रवेश केला आणि आठ वर्षात संसद बदलून टाकली. आता त्यांनी संविधान विषय काढून त्याबाबत बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या मागील दोन दिवस बॅग जाणीवपूर्वक तपासणी करून त्यांना त्रास दिला जात आहे, जनतेने याचा बदला घ्यावा, असे प्रतापगढी म्हणाले.

विकासासाठी रमेश बागवे यांना आमदार पदावर निवडून द्या. आगामी काळात पुण्यात खासदार देखील काँग्रेसचा होईल. काँग्रेसचे अंतर्गत सर्व्हे नुसार रमेश बागवे यंदा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, सत्ता आल्यावर आम्ही त्यांना पुन्हा मंत्री करू, असेही प्रतापगढी

पक्ष उभा करण्यास अक्कल लागते, फोडण्यास नाही:शरद पवारांचा फडणवीसांना टोला


राहुरी -कोणताही पक्ष उभा करण्यासाठी अक्कल लागते, पण तो फोडण्यासाठी काहीच अक्कल लागत नाही, अशा तिखट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवार यांची आज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे प्रचारसभा झाली. त्यात शरद पवार यांनी राज्यातील फोडाफोडीच्या मु्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30-40 आमदार गोळा केले आणि गुवाहाटीला जाऊन बसले. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. लोकांना त्यांची भूमिका पटली नाही. हे शिंदे स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. उद्धव ठाकरे यांच्याही सरकारमध्ये ते होते. त्यानंतरही त्यांनी बंडखोरी केली.

एखादा पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आपण ही फोडाफोडी केल्याचे मान्य केले आहे. कोणताही पक्ष उभा करण्यासाठी मोठी अक्कल लागते. पण तो फोडण्यासाठी काहीच अक्कल लागत नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मी राहुरीला आलो होतो. त्यानंतर तुम्ही आपला उमेदवार निवडून दिला. त्याबद्दल तुमचे आभार. मागच्या लोकसभेला काँग्रेसचा 1 व आमचे 4 खासदार होते. पण संविधान संकटात सापडल्यामुळे तुम्ही यावेळी आमचे 31 खासदार निवडून दिले. आता राज्यात भाजप व आमच्यातल्या फुटून गेलेल्या काही लोकांचे राज्य आहे, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी यावेळी भाजपला सत्तेत बसण्याचा कोणताही अधिकार नसल्याचेही ठणकावून सांगितले. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही सत्ताधारी एनडीएविरोधात इंडिया आघाडी स्थापन केली. कारण, मोदींनी 400 पारचा नारा देत देशाचे संविधान बदलण्याचा डाव रचला होता. पण तो डाव महाराष्ट्रातील जनतेने हाणून पाडला. त्यांनी आम्हाला राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी सर्वाधिक 31 जागा दिल्या. यामुळे सत्ताधारी महायुतीची चिंता वाढली. यावर उपाय म्हणून त्यांनी नवनवीन योजना आणल्या. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची अंमलबजावणी केली. पण आज महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. अनेक बहिणी बेपत्ता आहेत. त्यानंतरही तुम्ही लाडकी बहीण म्हणता?

महाराष्ट्रात मागील वर्षभरात 1100 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक वाया गेले. यामुळे त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. आता त्यांच्या शेतमालालाही रास्त भाव मिळत नाही. त्यामुळे ते घटाघटा विष पिऊन आत्महत्या करत आहेत. त्यामुळे भाजपला सत्तेत बसण्याचा कोणताही अधिकार नाही, असे ते म्हणाले.

अजित पवार पुन्हा वयावर घसरले अन नात्यावर बरसले

पुणे- लोणी भापकर येथील सभेत शरद पवार यांचे नाव न घेता अजित पवार पुन्हा वयावर घसरले आणि मुलगी झाली तर नातूच काढला .. असे म्हणत अरे मी पण तुमचा पुतण्याच आहे न म्हणत कौटुंबिक भावनिक कार्ड खेळले .

उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची बारामती मतदारसंघात लोणी भापकर येथे सभा झाली यावेळी बोलताना ते म्हणाले की,ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. इतरांचे वय पाहता भविष्यात बारामतीचे सर्वकाही मलाच पाहायचे आहे, असे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत म्हणालेत.मी निवडणूक डोळ्यांपुढे ठेऊन काम करत नाही. मी फुशारक्या मारत नाही. माझे काम बोलते. लोकसभेला जो निर्णय घ्यायचा होता, तो तुम्ही घेतला. पण आताची निवडणूक माझ्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.असेही ते म्हणले.

काल पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. त्यात त्यांनी कुणावरही टीका केली नाही. मागच्यावेळी केली, तर गडबड झाली. पण आता केवळ विकासावर बोलले. समोरचे लोक लोकसभा निवडणुकीत सुप्रियाकडे लक्ष द्या, ही साहेबांची शेवटची निवडणूक आहे असे सांगायचे. पण आता नातवाकडे लक्ष देण्यास सांगत आहेत. हे अवघडच आहे. मी सुद्धा पुतण्या आहे ना? मुलगी झाली की थेट नातूच काढला. मी सुद्धा तुमच्या मुलासारखाच आहे ना?

अजित पवार यांच्या आज लोणी भापकर यांच्यासह जळगाव कडेपठार व मेदड येथेही सभा होणार आहेत. अजित पवार पुढे म्हणाले, बारामतीच्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याला हवा असणारा निर्णय घेतला. पण ही निवडणूक माझ्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यात काही प्रमुख नेते आहेत. त्यात माझे नाव येते. नाव कमवायला वेळ लागतो. 2004 पासून मला लोक सीनिअर म्हणायला लागले. तेव्हापासून मी राज्याच्या राजकारणात लक्ष देत आहे. शरद पवार साहेब राज्यात 30 वर्षे काम केल्यानंतर दिल्लीला गेले.

अजित पवार यांनी यावेळी आपले पुतणे तथा शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनाही टोला हाणला. ते म्हणाले, आपल्या तालुक्यातील तरुण काम करत असतील तर त्याला मलिदा गँग का म्हटले जाते? आज विरोधात बोलण्यासाठी काहीही नसल्यामुळे काहीजण मलिदा गँग म्हणत आहेत. आम्ही काम करताना जात किंवा नात्यागोत्याचा विचार केला नाही. गावातले पुढारी नीट वागत नाहीत. त्याचा राग माझ्यावर निघतो. पण ही निवडणूक झाल्यानंतर मी पक्षातील नव्या चेहऱ्यांना पुढे आणेल.

शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मी तालुक्याला कसा फायदा होईल हे पाहिले. साहेब 1989 मध्ये मी अजितला तिकीट देणार नाही असे म्हणाले होते. त्यानंतर 1991 ला मला तिकीट दिले. आता काही लोकांना काल काम सुरू केले की आज आमदार झाल्याचे स्वप्न पडत आहेत. मला इंग्रजी येते किंवा येत नाही हा प्रश्न नाही. पण त्यानंतरही मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे.

मी साडेसहा लाख कोटींचे बजेट सादर करतो. त्याला साडेसहा लाख कोटीतील एक टिंब काढून दाखवा म्हणावे. तो माझा पुतण्या आहे. मी त्याच्यावर टीका करण्याची गरज नाही. पण लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्राला उभे करण्याची गरज नव्हती, असेही अजित पवार यावेळी बारामतीच्या जनतेला विधानसभा निवडणुकीत आपल्यामागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन करताना म्हणाले.

रवींद्र धंगेकर म्हणाले,महायुती सरकारचा महाराष्ट्रात कोट्यवधींचा भ्रष्टाचार, त्याच पैशांचा निवडणुकीत वापर

पुणे-भाजपने लोकसभा निवडणुकीत पैशाचा बेसुमार वापर करूनही जनतेने त्याला थारा दिला नाही. तीच परिस्थिती आता विधानसभा निवडणुकीत आहे. पुण्यातील मतदार हा स्वाभिमानी असून ते भाजपला निवडणुकीत धडा शिकवतील. हजारो कोटींचे टेंडर भाजपने काढून त्यातून टक्केवारी कमावली आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असून, त्या पैशाचा वापर निवडणुकीत होत आहे, असे मत कसबा विधानसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

धंगेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात जाहीर सभा घेऊन विकासकामे सांगितली. पण पुण्यातील मेट्रो डी पी आर हा काँग्रेस पक्षाने सुरू केला असून देशात प्रथम मेट्रो सुरू करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. पुण्यात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी प्रश्न बिकट होत असून ती सुधारण्यात सरकारला अपयश आले आहे. पुण्यातील वाढते प्रदूषण देखील प्रमुख समस्या आहे. पण त्याकडे लक्ष्य दिले जात नाही. काँग्रेस काळात अनेक राष्ट्रीय संस्था पुण्यात स्थापन झाल्या आहे. त्यामुळे विद्येचे माहेरघर याचा चेहरा मोहरा काँग्रेस काळात बदलला गेला आहे.

पुण्यात पंतप्रधान दरवेळी येऊन केवळ वेगवेगळी आश्वासने देतात, पण त्याची पूर्तता करत नाही हे वास्तव आहे. पुण्यात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे पण केवळ भावनिक मुद्दे समोर करून भाजप राजकारण करत आहे. पुणे ऑटोमोबाईल हब असताना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योग स्थलांतरित होत आहे. जातीयवाद ,धार्मिक मुद्दे समोर केले जात आहे, पण आता जनता सुज्ञ आहे, असेही धंगेकर म्हणाले.

राहुल गांधींची चौथी पिढीही मुस्लिमांना आरक्षण देऊ शकत नाही:इंदिरा गांधी स्वर्गातून आल्या तरी 370 कलम पुन्हा लागू होणार नाही -अमित शहा

धुळे -राहुल गांधी यांनी कान उघडे ठेवून ऐकवे, की तुमची चौथी पिढी आली तरी देखील मुस्लिम समाजाला आरक्षण देता येणार नाही. राहुल गांधीच नाही तर इंदिरा गांधी देखील स्वर्गातून परत आल्या तरी 370 कलम परत आणू शकत नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

धुळे जिल्ह्यातील जाहीर सभेत अमित शहा यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. राज्यातील महाविकास आघाडी केवळ तुष्टीकरण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंची सर्व तत्त्वे विसरले असल्याचा आरोप त्यांनी केला. औरंगाबादच्या नामांतरला विरोध करणारे, राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणारे, कलम 370 हटवण्यास विरोध करणारे, पाकिस्तानविरुद्धच्या सर्जिकल स्ट्राईकवर आक्षेप घेणाऱ्या औरंगजेब फॅन क्लबसोबत उद्धव ठाकरे असल्याचा आरोप त्यांनी केला. तर दुसरीकडे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर यांच्या तत्त्वांनुसार काम करणारे असल्याचे शहा यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी कान उघडे ठेवून ऐकवे, की तुमची चौथी पिढी आली तरी देखील मुस्लिम समाजाला आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर एससी, एसटी, ओबीसी आणि इतर समाजातील आरक्षण कमी करून द्यावे लागणार आहे. मात्र ते होणे शक्य नसल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. देशातील सर्व उलेमांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतली असून त्यांच्याकडे आरक्षणाची मागणी केली असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. या मुद्द्यावरून अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील जोरदार हल्ला चढवला.

जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम वापस आणण्याचा प्रस्ताव काँग्रेसने केला आहे. मात्र राहुल गांधीच नाही तर इंदिरा गांधी देखील स्वर्गातून परत आल्या तरी 370 कलम परत आणू शकत नसल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. कलम 370 आता हटवण्यात आले असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. सुशील कुमार शिंदे गृहमंत्री असताना कश्मीरमधील लाल चौकात जायला भीती वाटत असल्याचे म्हणाले होते. मात्र आता तुम्ही गृहमंत्री नाही तर मी गृहमंत्री आहे. तुमच्या नातवांना घेऊन काश्मीरला जा, तुमच्या केसांना देखील धक्का लागणार नसल्याचे आव्हान यावेळी अमित शहा यांनी सुशीलकुमार शिंदे यांना दिले आहे.

या वेळी अमित शहा म्हणाले की, उद्धवबाबू, तुम्ही कोणासोबत आहात? आज तुम्ही औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणारे, राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणारे, कलम 370 रद्द करण्याला विरोध करणारे आणि पाकिस्तानविरुद्धच्या सर्जिकल स्ट्राईकवर आक्षेप घेणाऱ्यांच्या सोबत आहात. राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.हरियाणा निवडणुकीत देखील काँग्रेस पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करत होता. मात्र, निवडणुकीचा निकाल आला आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा सुपडा साफ झाला असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. महाराष्ट्रात देखील 23 तारखेचा निकाल आल्यानंतर काँग्रेसचा सुपडा साफ झालेला असेल. राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल, असा दावा अमित शहा यांनी केला आहे.

राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला कमळच्या फुलासोबत आणि भारतीय जनता पक्षासोबत असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. आमच्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. मात्र याला सुप्रिया सुळे विरोध करत असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. मात्र त्यांची चिंता तुम्ही करू नका, महायुतीचे सरकार स्थापन करा आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होत राहतील, असे आश्वासन देखील अमित शहा यांनी दिले आहे.

राज्याच्या इतिहासात आजपर्यंत कधीही झाले नाही, अशा सर्वात मोठ्या मताधिक्याने महायुती सरकार स्थापन करेल, असा दावा अमित शहा यांनी केला. आघाडीतील नेते सर्व समुदायाचा विरोध करतात. रामगिरी महाराजांच्या विरोधात इथे वक्तव्य केले जात आहे. सिंदखेड मध्ये दंगली घडवल्या जात आहेत. देश आणि महाराष्ट्रासाठी योग्य नसणाऱ्या लोकांचा सपोर्ट महाविकास आघाडी करत असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला. काँग्रेस पक्ष हा एसटी-एससी आणि विशेष करून मागासवर्गीय नागरिकांचा विरोध करत असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.

100 कोटींच्या वसुली प्रकरणात पवार, ठाकरेंचा हस्तक्षेप:सर्वकाही त्यांच्या सूचनेनुसार होत होते, परमबीर सिंहांकडून चांदिवाल यांच्या दाव्याचे समर्थन

मुंबई-राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात अनेक बाबी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून हे सगळे होत असल्याचे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 100 कोटी रुपयांच्या खंडणी हा विषय उचलून धरला होता, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार चांगलेच अडचणीत आले होते. या प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांनी अनिल देशमुख आणि सचिन वाझे हे फडणवीस यांना गुंतवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणाले होते.

न्यायमूर्ती चांदिवाल यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले होते की, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे हे देवेंद्र फडणवीस यांना गुंतवण्याचा प्रयत्न करत होते. तसेच सचिन वाझेने आपल्याला राजकीय नेत्यांचे नावे घेत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. या सगळ्या प्रकरणात ठाण्याचे डीसीपी लक्ष्मीकांत पाटील लक्ष घालत असल्याचे सांगितले होते. याला माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दुजोरा दिला आहे. चांदिवाल योग्यच सांगत आहेत. लक्ष्मीकांत पाटील बदल्यांच्या प्रकरणात आणि वसूलीच्या प्रकरणात थेट सहभागी होते, असे परमबीर सिंग म्हणाले आहेत.

पुढे बोलताना परमबीर सिंग म्हणाले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरून लक्ष्मीकांत पाटील या प्रकरणात हस्तक्षेप करत होते. साक्षीदारांवर लक्ष्मीकांत पाटील दबाव आणत होते. त्यांनी या प्रकरणात पूर्णपणे हस्तक्षेप केला होता. महाविकास आघाडी सरकार असताना अनिल देशमुख हे सातत्याने पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये ढवळाढवळ करत होते, असा आरोपही परमनबीर सिंग यांनी केला आहे.

परमबीर सिंग म्हणाले, मी चांदिवाल आयोगासमोर माझ्याकडे असणारे पुरावे मेसेजेस आणि इतर अधिकाऱ्यांनी मला जे सांगितले खंडणीची मागणी कशी मागितली होती हे सर्व मी सांगितले होते. मी त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अनिल देशमुख यांचा पोलिसांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप असल्याचे देखील सांगितले होते. याचे सर्व पुरावे मी सीबीआय आणि ईडीला दिले असल्याचे परमबीर सिंग म्हणाले आहेत.

सलग २५ तास ध्यान साधनेवरील कार्यक्रमाचे आयोजन

“अखंड ध्यानाची ज्योत” या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे-रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून तेजज्ञान फाउंडेशनच्या वतीने सलग २५ तास अखंड ध्यान साधनेच्या “अखंड ध्यानाची ज्योत” या कार्यक्रमाचे आयोजन येत्या १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी ते १७ नोव्हेंबर ११ वाजून १२ मिनिटांपर्यंत सिंहगड रोड येथिल, मनन आश्रम या ठिकाणी केले आहे. जीवनात शांतता, आनंदाचा गोडवा, निरोगी आरोग्य, मानसिक संतुलन, तणावमुक्ती, जगात सकारात्मकता आणि जागतिक शांतता यांचा समन्वय प्रस्थापित करायचा असेल, ध्यानाची समज, ध्यानाचा महिमा आणि ध्यानाच्या सोप्या पद्धती माहित असणे गरजेचे आहे.

ध्यानाशी संबंधित या पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी, तेजज्ञानच्या वतीने मनन आश्रम येथे गेल्या काही महिन्यांपासून रौप्य महोत्सवी ध्यान महोत्सव साजरा केला जात आहे. सलग २५ तासांची अखंड ध्यान बैठक. अखंड ध्यानाची ज्योत कशी लावायची यावर थोर अध्यात्मक गुरू व प्रसिद्ध वक्ते सरश्री हे मार्गदर्शन करणार आहे. सदरील कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. तरी जास्तीत जास्त पुणेकरांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन तेजज्ञान फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

दौंड व इंदापूर विधानसभा मतदारसंघात १७ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

पुणे : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागाअंतर्गत दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत एकूण १७ लाख ७१ हजार ८०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली आहे.

गोवा राज्यात निर्मित व विक्रीकरीता असलेल्या मद्याच्या वाहतुकीवर तसेच हातभट्टी दारूच्या वाहतुकीवर धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये दौंड विधानसभा मतदारसंघात दोन चारचाकी वाहने हातभट्टी दारूसह जप्त करून दोघांना अटक केली. तसेच इंदापूर विधानसभा मतदारसंघात वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर पथकाने परराज्यातील (गोवा राज्य निर्मित व फक्त तेथेच विक्रीसाठी असलेल्या) विदेशी मद्याची वाहतूक व विक्री करत असताना एका चारचाकी वाहनासह दोन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण तीन चारचाकी वाहनासह एकूण १७ लाख ७१ हजार ८०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, मयूर गाडे, मनोज होलम सागर साबळे सहभागी होते.

रांगोळी, रॅली आणि ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी पटवून दिले मतदानाचे महत्त्व

पुणे,दि. १३: ‘मतदान करण्यास जाऊया, आपल्या देशाचा विकास करूया’ अशी घोषवाक्य लिहून त्याला अनुरूप रांगोळी रेखाटत तसेच ढोल ताशांच्या गजरात हातात मतदान जनजागृती घोषवाक्यांचे फलक घेऊन आणि ‘जना मनाची पुकार आहे, मतदान आमचा अधिकारी आहे’ अशा विविध घोषणा देत रॅलीच्या माध्यमातून बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगवीतील मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप टीमच्या वतीने सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या सीमा भोसले, स्वीप टीम समन्वय अधिकारी राजीव घुले, प्रिन्स सिंह, गणेश लिंगडे, दिपक एन्नावार, मनोज माचरे, विजय वाघमारे, लोखंडे तसेच बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या सबलीकरणासाठी मतदान करावे असे आवाहन करणाऱ्या रांगोळ्या रेखाटल्या. शिक्षकांनी तसेच पालकांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करुन प्रोत्साहित केले. विद्यार्थी, शिक्षक आणि स्वीप टीमच्या सहभागातून भव्य रॅलीचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ढोल रॅलीत ताशाच्या गजरात आपले मत, आपली ताकद.., आपले मत, आपला हक्क.., उत्सव निवडणूकीचा, अभिमान देशाचा.., चला मंडळी मतदानाला जाऊया अशी घोषवाक्य असलेले फलक हातात घेऊन मतदारांना मतदानाचे महत्व पटवून दिले.

औंध, मॉडेल कॉलनी भागाच्या विकासासाठी सिद्धार्थ शिरोळे यांचा कायमच पुढाकार

पुणे, दि. १३ नोव्हेंबर, २०२४ : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास, हेच ध्येय बाळगून गेल्या पाच वर्षांत मनापासून काम केले. औंध, मॉडेल कॉलनी, बोपोडी अशा विविध भागांतील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याच्या दिशेने भरीव प्रयत्न केले आणि विकासकामांना गती दिली. अशी भावना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केली.

औंध भागात स्मशानभूमीचे सुशोभीकरण, कुटीर रुग्णालयात सोयीसुविधा, जगदीशनगर सोसायटी, इंदिरा वसाहत, कस्तुरबा वसाहत येथे हायमास्ट दिवे, बॉडी गेट पोलिस लाईन, इंदिरा वसाहत येथे विद्युत तारा भूमिगत करणे, औंध गावात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुशोभीकरण, सुलभ शौचालयाच्या दुरुस्तीची कामे अशा विविध कामांचा यामध्ये समावेश आहे, असे शिरोळे यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरोळे मतदार संघात सर्वत्र मतदारांच्या भेटी घेत असून नुकतीच त्यांनी औंध येथील प्रिसम सोसायटी, वेस्टर्न रिव्हर व्ह्यू सोसायटी, सेल्वेन हाईटस सोसायटी, निर्मिती होरिझोन सोसायटी यासोबतच दीप बंगला चौक, मित्र नगर कॉलनी परिसरातील रहिवाशांची भेट घेतली.

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक स्मारक, मॉडेल कॉलनी येथील बर्ड वॉचिंग सेंटरची दुरुस्ती, भोसलेनगर येथे महावितरणचे रिंग मेन युनिट बसविणे, नॉव्हेल्टी हेरिटेज को-ऑप. हौसिंग सोसायटी येथे भूमिगत केबल टाकणे, ही कामेही मार्गी मागील पाच वर्षांत मार्गी लागले आहेत. तसेच गणेश सोसायटी, खाऊ गल्ली लेन, हर्डीकर हॉस्पिटल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आनंद यशोदा हौसिंग सोसायटी, मॉडेल कॉलनी येथील लकाकी तळे रोड व अन्य भागात ड्रेनेज लाईन टाकल्या असून या भागातील नागरिकांचे जीवन आणखी सुखकर करण्यासाठी आणखी खूप काही करायचे असल्याचेही शिरोळे म्हणाले.

या परिसरासाठी येत्या काळात शासकीय संस्थांची मैदाने नागरिकांसाठी खुली करणे व इतर मैदाने सुसज्ज करणे, मेट्रो स्थानकांपर्यंत येण्या-जाण्यासाठी फीडर बस आणि रिक्षासेवेची उपलब्धता, मॉडेल कॉलनी, औंध येथील ‘पीएमपीएल’च्या बसथांब्यांचे नूतनीकरण, औंध आयटीआयचे अद्ययावतीकरण, युपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण केंद्रे, ओपन जिम, जलतरण तलाव, तसेच मॉडेल कॉलनीमध्ये ‘एमएनजीएल’चे नेटवर्क पूर्ण करणे, ही कामे प्रस्तावित असून लवकरात लवकर ती पूर्ण होतील असे आश्वासन शिरोळे यांनी दिले.

सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये दुर्मिळ आणि गुंतागुंतीची मेंदूवरील गाठीची शस्त्रक्रिया यशस्वी

तंत्रज्ञानाच्या मदतीने ५७ वर्षीय महिलेच्या मेंदूतील दुर्मिळ मेनिन्जिओमा गाठीवर उपचार

पुणे, १३ नोव्हेंबर २०२४ – तीव्र डोकेदुखीमुळे आणि चालण्यामुळे देखील असह्य वेदनेने त्रस्त असलेल्या ५७ वर्षीय महिलेवर पुण्यातील हडपसर येथील सह्याद्रि सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करुन तिला जीवनदान दिले. या महिलेला अतिशय दुर्मिळ मेनिन्जिओमा ही मेंदूच्या गाठीचा आजार झाला होता. सततच्या जीवघेण्या वेदनेने ही महिला पुरती कंटाळली होती. तिने अनेक रुग्णालयात उपचार घेतले होते परंतु महिलेच्या वेदना कमी झाल्या नव्हत्या. मेंदूच्या मागील भागांत आणि पाठीच्या कण्यात दोनपेक्षा अधिक गाठ निर्माण झाल्याने ही महिला असह्य यातना भोगत होती. अशी केस मेंदूची गाठ असलेल्या केवळ १ ते १० टक्के रुग्णांमध्ये आढळते.

हडपसर येथील सह्याद्रि सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉ. सिराज बसाडे यांनी शस्त्रक्रियेच्या मदतीने या महिलेच्या मेंदूतील दुर्मिळ मेनिन्जिओमा गाठ यशस्वीरित्या बाहेर काढली. ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक होती. शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी यासाठी डॉक्टरांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली.

शारिरीक वेदना असह्य झाल्याने या  महिला रुग्णाला तिच्या कुटुंबीयांनी सह्याद्रि सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तीव्र डोकेदुखी तसेच अशक्तपणा आणि पायांमध्ये कडकपणा आल्याने ही महिला त्रासलेली होती. रुग्णाची शारिरीक अवस्था पाहून डॉक्टरांनी तातडीने तिची वैद्यकीय तपासणी केली. एमआरआय अहवालात असे आढळून आले की गाठीमुळे रुग्णाला, मेंदूच्या मागच्या बाजूला, लहान मेंदू आणि मज्जारज्जू  यावर खूप दाब निर्माण झाला होता तसेच त्या गाठीमुळे मेंदूतील प्रवाह सुरळीत होत नव्हता. परिणामी तिला असह्य डोकेदुखी जाणवत होती.

डॉक्टरांनी तातडीने रुग्णावर वॅन्ट्रीकुलोपॅरिटोनिअल प्रक्रिया सुरु केली. या उपचारांत महिलेच्या मेंदूतील अतिरिक्त स्त्राव काढला केला. त्यानंतर रुग्णाची डोकेदुखी नियंत्रणात आली. काही दिवसांनी महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर डॉक्टरांनी मेंदूतील गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मेंदूची कवटी मागच्या बाजूने उघडून गाठ काढण्याचे ठरले. या शस्त्रक्रियेला पॉस्टेरिअर फॉस्सा क्रॅनिओटोमी असे संबोधले जाते. ही शस्त्रक्रिया अतिशय जटील आणि गुंतागुंतीची असते. शस्त्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नये म्हणून डॉक्टरांनी मॉनिटरींग मशीनची मदत घेतली. अखेरिस मेंदूतील गाठ यशस्वीरित्या काढण्यात वैद्यकीय पथकास यश आले.

याबद्दल अधिक माहिती देताना ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉ सिराज बसाडे यांनी सांगितले की, “ही केस दुर्मिळ होती कारण या महिलेच्या मेंदूतील ज्या भागात गाठ होती तशी गाठ मेंदूत गाठ निर्माण झालेल्या एक लाख रुग्णांपैकी एकामध्ये आढळून येते. त्यामुळे आम्हांला या गुंतागुंतीच्या शास्त्रक्रियेदरम्यान येणाऱ्या संभाव्य धोकयांची कल्पना होती. म्हणूनच आम्ही शस्त्रक्रिया अचूक होण्यासाठी इंट्रा-ऑपरेटीव्ह मॉनिटरींग मशीन आणि अल्ट्रासाऊण्डची मदत घेतली गेली. आणि या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही मेंदूतील गाठ कोणत्याही अडथळ्याविना यशस्वीरित्या बाहेर काढू शकलो.

शस्त्रक्रिया सुखरुप पार पाडल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत प्रचंड सुधारणा दिसून आल्या. फिजिओथेअरपीच्या मदतीने तिच्या स्नायूंना बळकटीकरण मिळाले आणि काही दिवसातच ही महिला सामान्य माणसांप्रमाणे चालू लागली.

रुग्ण आणि तिच्या कुटुंबियांनी सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील वैद्यकीय पथकाचे त्यांना मिळालेल्या उत्कृष्ट उपचाराबद्दल आभार व्यक्त केले. “आम्ही पुण्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये भेट दिली होतीपरंतु सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये मिळत असलेल्या उपचारांमुळे आम्हाला आशा वाटलीआमच्या आप्ताचे आयुष्य परत मिळवून दिल्याबद्दल डॉ. बसाडे आणि सह्याद्रिचे आम्ही कायमचे आभारी असू,” असे रुग्णाच्या कुटुंबाने म्हटले.

रुग्णांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी आणि त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो हे या केसमध्ये अधोरेखित होते. सह्याद्रि हॉस्पिटल्सची रुग्णसेवेप्रति असलेली तत्परता आणि अचूक शस्त्रक्रियेसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या केसमधून दिसून येतो.

न इवेंट मॅरेथॉन स्पर्धेसाठी १४ व १५ डिसेंबर रोजी सिंहगड घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद

पुणे, दि. १३: सिंपल स्टेप्स फिटनेस या संस्थेतर्फे सिंहगड किल्ला येथे १४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी रन इव्हेंट मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी या दोन दिवशी सिंहगडावर जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केली आहे.

रन इवेंट मॅरेथॉन स्पर्धेमध्ये साधारणपणे ४०० धावपटूंसह मार्गदर्शक, स्वयंसेवक व प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी कळविले आहे. त्यामुळे १४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी सिंहगड घाट रस्ता मार्गात वर्दळ व गर्दी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सिंहगड घाट वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आणि वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पर्यायी मार्ग:
या दोन दिवशी वाहतुकीला पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे असणार आहे. हवेली पोलीस ठाणे हद्दीतून गोळेवाडी मार्ग घाटरस्ता मार्गे खेड-शिवापुर येथे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून ती डोणजे-खडकवासला-वडगाव धायरी मार्गे नवीन कात्रज बोगदा येथून खेड शिवापूर येथे पर्यायी मार्गाने जाईल. राजगड पोलीस ठाणे हद्दीतून कोंढणपूर येथून घाटरस्ता मार्गे सिंहगड किल्ला- गोळेवाडी येथे येणारा रस्ता पूर्णपणे बंद राहणार असून वाहने डोणजे गावाकडे जाण्याकरीता खेड शिवापूर-शिंदेवाडी-नवीन कात्रज बोगदा या पर्यायी मार्गे वडगाव धायरी येथून खडकवासला डोणजे मार्गे गोळेवाडीकडे जातील.

अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही बंदी लागू राहणार नाही, असेही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या आदेशात नमूद केले आहे.

निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदान कामकाजासाठी सोपविलेली जबाबदारी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यथोचितपणे पार पाडावी-निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे

पुणे, दि. १३ : येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम महत्वपूर्ण आणि तितकेच संवेदनशील असते. त्यामुळे आपसात समन्वय ठेवून सोपविलेली जबाबदारी त्यांनी यथोचितपणे पार पाडावी, असे निर्देश आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिले.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ८५९ मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण अवसरी येथील शांताबाई शेळके सभागृहात पार पडले . त्यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. शिंदे बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय नागटिळक, प्रमिला वाळुंज, डॉ. सचिन वाघ आदी उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, येणारी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शकपणे तसेच भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाची भूमीका महत्वपूर्ण आणि जबाबदारीची असते. आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करीत असते. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडणे हे अत्यंत महत्वाचे काम असते. त्यामुळे या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोपविलेल्या जबाबदारीचे व्यवस्थीतपणे आकलन करून घेवून समन्वयाने कामकाज पार पाडावे.

श्री. शिंदे पुढे म्हणाले, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ३४६ मतदान केंद्र असून त्यातील पन्नास टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक घडामोडीवर निवडणूक प्रशासनाचे लक्ष असणार आहे. नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य देण्यात येईल, मिळालेले साहित्य सूचीनुसार बरोबर असल्याची खातरजमा करावी. मतदान केंद्रावर साहित्यासह सुखरूप पोहोचल्याचा अहवाल त्याच दिवशी क्षेत्रीय अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. अभिरूप मतदानाची सर्व प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार पार पाडावी. मतदान केंद्रासाठी असलेल्या सर्व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष मतदान यंत्र आणि व्हिव्हिपॅट हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. क्षेत्रीय अधिकारी, तलाठी व मास्टर ट्रेनर यांनी याबाबतचे प्रशिक्षण दिले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शिंदे यांनी मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र कमिशनिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. कमिशनिंग प्रक्रियेवेळी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

पर्वती विधानसभा मतदारसंघात निवडणूक विषयक दुसरे प्रशिक्षण संपन्न

पुणे, दि. 13 : पर्वती विधानसभा मतदारसंघाअंतर्गत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

पुणे महानगरपालिकेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण सत्रामध्ये मतदान यंत्र आणि व्हिव्हिपॅट बद्दल माहिती देण्यात आली. मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, पारदर्शकता, मतदारांची ओळख तपासणी, गुप्त मतदान प्रक्रिया, मतपेटी हाताळणी आणि ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन करून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची कार्यप्रणालीची माहिती श्री. खैरनार यांनी दिली. कर्मचाऱ्यांना मशीनच्या सुसज्जतेबाबत दक्ष राहण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच मतदान केंद्रांवरील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तंत्रांचा वापर कसा करावा याचेही मार्गदर्शन केले.

मतदानासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय तसेच तांत्रिक बाबींचे सविस्तर माहिती तसेच मतदान यंत्राच्या हाताळणीचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश श्री. खैरनार यांनी यावेळी दिले.