संदीप देशपांडे यांना दिले प्रत्युत्तर, चांगल्या कामात अडथळे आणण्यासाठी पक्षाबाहेरून यांना कोणी ऑपरेट करतेय ?
मुंबई-राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हिताचा विषय मांडला. त्याला उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद देखील महाराष्ट्राच्या हिताचा होता. मात्र, ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असे काही लोकांना वाटत नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्र हितासाठी दोन भाऊ एकत्र येण्यावर सहमती होत आहे. तर त्यामध्ये वाद करण्यासारखे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या समोर कोणत्याही अटी-शर्ती ठेवलेल्या नसल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र हिताच्या फॉर्मुलामध्ये भारतीय जनता पक्ष बसत नाही. त्यांच्यासोबत असलेले लोक या फॉर्मुलात बसत नाही. त्याला तर कोणी अटी आणि शर्ती म्हणत असतील, तर त्यांनी थोडा विचार करावा. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही महाराष्ट्रासाठी काम करायला तयार आहोत. माझ्यासारखा माणूस देखील त्यासाठी सकारात्मक आहे.
मी अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. मी श्रीकांत ठाकरे सोबत देखील एकत्र काम केले आहे. आता मी आदित्य सोबत देखील काम करत आहे. मात्र महाराष्ट्र हित कशात आहे? मराठी माणसांचा स्वाभिमान कशात आहे? हे आम्हाला माहिती आहे. बाळासाहेबांचे ध्येय महाराष्ट्र आणि मराठी माणूस होता. त्यासाठी दोन भाऊ एकत्र येत असतील तर चांगले आहे. तर आम्ही त्यांचे स्वागतच केले आहे. केवळ महाराष्ट्र द्रोही असलेल्या लोकांना पंगतीला देखील बसू नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले असल्याचे संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरे यांनी जे विधान केले आहे, त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रति विधान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते काय बोलतात, त्यावर मी उत्तर देणार नाही. राज ठाकरे बोलल्यानंतर त्यावर बालू. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य देत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे
महाराष्ट्र द्रोही कोण? हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. आणि ते जर तुम्हाला समजत नसेल, तर राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल. अशा शब्दात संजय राऊत यांनी संदीप देशपांडे यांना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे अत्यंत हुशार नेते आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना देखील महाराष्ट्र द्रोही कोण? हे माहिती आहे. मात्र, काही लोक चांगल्या कामात अडथळे निर्माण करत असतील, तर पक्षाच्या बाहेर राहुन कोणीतरी हे सर्व ऑपरेट करत आहे, हे मी ठामपणे सांगू सांगतो. या माध्यमातून संजय राऊत यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
पुणे-काँग्रेस पक्षात मला सातत्याने डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाच्या राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे अधिकृत जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा 22 एप्रिल रोजी मुंबईत होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षात आपल्याला अनेकदा डावलण्यात आले असल्याचा आरोप संग्राम थोपटे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षात अनेक वर्षांपासून मी आणि माझ्या वडिलांनी देखील काम केले आहे. त्यामुळे दुःख वाटत आहे. मात्र तालुक्याच्या विकासासाठी, तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय आम्ही घेतला असल्याचे संग्राम थोपटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मी कोणाच्याही दबावाला कधी बळी पडलो नाही. लोकसभा निवडणुकीत देखील तुम्ही पाहिले असेल की, भोर तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीत देखील महा विकास आघाडीचे काम आम्ही प्रामाणिकपणे केले होते. महा विकास आघाडीचा धर्म पाळत आम्ही महा विकास आघाडीचे काम केले. आम्ही काम केले म्हणजे कोणावर उपकार केले नाहीत. मात्र, जे केले ते सांगायला काही हरकत नसल्याचे थोपटे यांनी म्हटले आहे. इतरही अनेक जबाबदारी मला पक्षाने दिली. त्या सर्व जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या असल्याचे थोपटे यांनी म्हटले आहे.
सोनिया गांधीचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे संग्राम थोपटे पुत्र आहेत. संग्राम थोपटे यांना वडिलांपासून राजकीय वारसा मिळाला आहे.त्यांच्या वडीलांना कॉंग्रेसनेच मोठे केले.अनंतराव थोपटे सलग 14 वर्ष मंत्री राहिले आहेत. 40 वर्षांपासून भोर विधानसभेवर कॉंग्रेस पक्षामुळे थोपटे कुटुंबियांचे वर्चस्व निर्माण झालेले आहे. सहा वेळा अनंतराव थोपटे आमदार झाले आहेत. 3 वेळा संग्राम थोपटे आमदार म्हणून निवडून आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रमधील काँग्रेसचे मोठे नाव म्हणून थोपटे यांची ओळख आहे.कॉंग्रेसला अनंतराव थोपटे यांनी मोठे केले असे मात्र दिसलेले नाही.मात्र मंत्रिपदासाठी संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या कॉंग्रेस भवनवर हल्ला केला होता आणि मोठ्या प्रमाणात मोडतोड देखील केली होती.तरीही गेल्या नजीकच्या काळात संग्राम यांच्यावर कॉंग्रेसने मोठी जबाबदारी देखील टाकली होती . 2002 मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले होते. 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढवत ते भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत विजयी होत हॅट्रिक केली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी दादा गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या विरोधात संग्राम थोपटे यांना पराभव स्वीकारावा लागला. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष रुजवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मोठे योगदान दिले. सध्याच्या अनेक बड्या नेत्यांना अनंतराव थोपटे यांनी त्यांच्या काळात निवडणूक लढवण्यासाठी पक्षाच तिकीट देऊन संधी दिली होती. त्यामुळे आजही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
श्रीनगर-गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस पडत आहे. रविवारी सकाळी रामबन जिल्ह्यातील सेरी बागना भागात पावसानंतर झालेल्या ढगफुटीत तीन जणांचा मृत्यू झाला. ढगफुटीमुळे अचानक पूर आल्याचे सूत्रांनी सांगितले. डोंगरावरून आलेला ढिगारा गावाकडे आला. सध्या बचावकार्य सुरू आहे.
दुसरीकडे, रामबन जिल्ह्यातील बनिहाल परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. शेकडो वाहने अडकली आहेत. किश्तवार-पद्दर रस्ता देखील बंद आहे. येथे वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. हवामान स्वच्छ झाल्यानंतरच महामार्गावरून प्रवास करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
भूस्खलनाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये डोंगरावरून ढिगारा पडताना दिसत आहे. काही भागात, डोंगराचा ढिगारा रस्ते आणि निवासी भागात पोहोचला आहे. एका व्हिडिओमध्ये तीन-चार टँकर आणि काही इतर वाहने पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गाडलेली दिसत आहेत. याशिवाय, हॉटेल्स आणि घरांनाही ढिगाऱ्यांचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
रामबन जिल्ह्यातील चिनाब नदीजवळील धर्मकुंड गावात भूस्खलन झाले आहे. १० घरे पूर्णपणे खराब झाली, २५-३० घरांचेही नुकसान झाले. धर्मकुंड पोलिसांनी सुमारे ९०-१०० लोकांना सुरक्षितपणे वाचवले.केंद्रीय मंत्री आणि उधमपूरचे भाजप खासदार डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, रामबन आणि आसपासच्या भागात अनेक ठिकाणी मुसळधार गारपीट, जोरदार वारे आणि भूस्खलन झाले आहे. ते म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग सध्या बंद आहे आणि प्रशासन मदत कार्यात गुंतले आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की ते उपायुक्त बसीर-उल-हक चौधरी यांच्याशी सतत संपर्कात आहेत आणि बचाव कार्यासाठी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की सर्वतोपरी मदत केली जात आहे आणि गरज पडल्यास ते वैयक्तिक संसाधनांसह देखील मदत करतील.
विश्व हिंदू परिषद बजरंग दल कसबा जिल्हा यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुणे : ‘पश्चिम बंगाल की गलीया सुनी है, ममता सरकार खुनी है’.. ‘हिंदू वरील अत्याचार थांबलाच पाहिजे’.. अशा घोषणा देत पश्चिम बंगाल येथे हिंदूंवर होत असलेल्या होत अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. पश्चिम बंगाल मध्ये लवकरात लवकर राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात महामहिम राष्ट्रपती यांच्या नावाने देण्यात आले.
विश्व हिंदू परिषद बजरंग दल कसबा जिल्हा यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, लालजी महाराज, बजरंग दल संयोजक नितीन महाजन, विभाग मंत्री धनंजय गायकवाड, केतन घोडके, विभाग सहमंत्री संतोष अनगोळकर, जिल्हा मंत्री विजय कांबळे, बजरंग दल संयोजक विक्रम घुंगुरवाले, मातृ शक्ती संयोजिका सरिता अंबिके यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
किशोर चव्हाण म्हणाले, पश्चिम बंगाल मध्ये होणारे हिंसक आंदोलन थांबवण्यात ममता बॅनर्जी सरकार यांना अपयश आले आहे. त्यांचा मूक पाठिंबा या आंदोलनाला आहे. हिंदू लोकांचा काही संबंध नसताना त्यांना लक्ष्य करण्यात आले, दुकाने जाळली, गाड्या जाळल्या महिलांवर अत्याचार करण्यात आले. हे हिंसक आंदोलन पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या भागात पसरले. हिंदू धर्म, हिंदू समाज आणि पोलिस प्रशासनाला लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल येथे राष्ट्रपती शासन लागू करण्याची गरज आहे. हिंदूंवरील अत्याचारांचा निषेध आंदोलनातून आम्ही करत आहोत. देशभरात आज विविध ठिकाणी आंदोलन होत असून पश्चिम महाराष्ट्र प्रांतात विविध भागात सुमारे ५० पेक्षा अधिक ठिकाणी आंदोलने झाली.
लेखक आनंद माडगूळकर : हटके म्युझिक ग्रुप ‘हटके गीत रामायण’ विश्वविक्रम सोहळा कार्यक्रम पुणे : मराठी माणसाच्या काळजातील एक खास कप्पा ‘गीतरामायण’ने व्यापलेला आहे. वेगवेगळ्या व्यवसायांत कार्यरत असलेली अनेक मंडळी या हटके म्युझिकल ग्रुप द्वारे, आपापल्या मार्गाने या अजरामर काव्याचा प्रसार करण्यासाठी एकत्र येतात,हीएक विलक्षण बाब आहे. ‘गीत रामायण’चा आदरभाव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी हटके म्युझिक या ग्रुप सातत्याने प्रयत्नशील आहेत. या काव्यरचनेला जे महाग्रंथासारखे पावित्र्य लाभले आहे,त्यामागचेखरे कारण म्हणजे अश्या प्रकारच्या निष्ठावंत हटके भक्तांचे अविरत कार्य आणिसमर्पणभाव, अशी भावना लेखक आनंद माडगूळकर यांनी व्यक्त केली.
हटके म्युझिक ग्रुप यांची गीतरामायण सादरीकरणाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये जागतिक विक्रमम्हणून नोंद झाली आहे. यानिमित्त हटके गीत रामायण विश्वविक्रम सोहळा कार्यक्रमाचेआयोजन टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉलमध्ये करण्यात आले होते.यावेळी हटके म्युझिक ग्रुपचे संचालक शिरीष कुलकर्णी, जेष्ठ व्यावसायिक पुष्कराज ग्रुप चे सर्वेसर्वा शैलेन्द्र गोस्वामी, फ्लुइड कंट्रोल्स चे संचालक तानसेन चौधरी आणि श्रेष्ठ गायक आणि हार्मोनिअम वादक अनिल मोटे आदी उपस्थित होते.
यावेळी गीतरामायणातील निवडक गीते सादर करण्यात आली. हटके म्युझिक ग्रुप या विश्वविक्रमाचे सर्व श्रेय – ज्यांनी गीत रामयणाचे लेखन केले ते आधुनिक वाल्मिकी गदिमा आणि ज्यांनी संगीत दिले ते सांगीतिक दिग्गज बाबुजी यांना दिले आणि ते वंशा प्रमाणे सर्व माडगूळकर आणि सर्व फडके कुटुंबीयांना धन्यवाद व्यक्त केले.
हटके म्युझिक ग्रुपच्या संगीत सेवेचे उपक्रम अत्यंत मनोभावे आणि सातत्याने पार पाडले आहेत. दि. २० एप्रिल २०२४ रोजीगीतरामायणातील संपूर्ण ५६ गीतांचे सलग आठ तास सादरीकरण विनामूल्य आणि सेवाभावातून करण्यात आले. त्यानंतर गीतरामायण महायज्ञ ५६ या उपक्रमाअंतर्गत हेच गीतरामायण ५६ वेळा विविध ठिकाणी देवालये, सेवाभावी संस्था, वृद्धाश्रम,आणिसमाजासाठी कार्य करणा-या संस्थांमध्ये सादर करण्याचा संकल्प घेऊन एक वर्षात तोपूर्ण सुद्धा झाला. १० दिवस सलग देवालयात सकाळीनिवडक गीतरामायणातील गीतेसादर करण्याचा संगीत सेवेच्या उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
अनिल मोटे म्हणाले, गीत रामायण हे केवळ एक काव्यसंग्रहनाही, तर त्यातून अनेक गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत. गीतरामायण हे मराठी भाषेच्या, उच्चारशुद्धतेच्या, लय, ताल, रागआणि रसांच्या शिक्षणाचेही एक अद्वितीय माध्यम आहे. शिरीष कुलकर्णी म्हणाले, यापुढेही हटके म्युझिक ग्रुप या माध्यमातूननवनवीन कार्यक्रम देत, सांगीतिक विश्वात तेजी आणून, अविरत संगीत सेवा देण्याचा अविरत प्रयत्न करत राहील.
तरुणांनो, बोलते व्हा, व्यक्त व्हा… टोकाचा निर्णय घेऊ नका!
कनेक्टिंग ट्रस्टची साद; मानसिक तणावमुक्ती व आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी उपक्रम
पुणे: ‘तरुणांनो, टोकाचा निर्णय घेऊ नका. बोलते व्हा, आपले मनमोकळे करा. मनातील नैराश्याचे ओझे दूर करून कणखरपणे उभे राहा,’ अशी साद कनेक्टिंग ट्रस्टने तरुणाईला व समाजात नैराश्य, तणावाने ग्रस्त लोकांना घातली आहे. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यात पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या परिसरात २२४ आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे तरुणांचे असून, १७७ आत्महत्या पुरुषांनी केल्या आहेत. ही आकडेवारी चिंताजनक आहे. तरुण पिढीच्या मानसिक व भावनिक समस्यांकडे अतिशय गंभीरतेने बघायची गरज निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर कनेक्टिंग ट्रस्टने टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन केले आहे. मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंध यासाठी २० वर्षांपासून कनेक्टिंग ट्रस्ट हेल्पलाईनद्वारे काम करीत आहे. तणावाखाली, नैराश्यात असलेल्याना भावनिक आधार देत, त्यांना व्यक्त होण्याची संधी देत आत्महत्येपासून परावृत्त केले जात आहे. यासाठी ९९२२००४३०५ आणि ९९२२००११२२ या दोन विनामूल्य हेल्पलाईन आठवड्यातील सातही दिवस सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत कार्यरत आहेत. कॉलच्या सुविधेसह अपॉइंटमेंटद्वारे प्रत्यक्ष भेटून बोलायची सोयही आहे. विनामूल्य अपॉइंटमेंट ८४८४०३३३१२ ह्या क्रमांकावर फोन, मेसेज करून घेता येते. ईमेलद्वारे व्यक्त व्हायचे असेल, तर distressmailsconnecting@gmail.com यावर बोलता येते. या सर्व सुविधा विनामूल्य आहेत.
कनेक्टिंग ट्रस्टचे प्रकल्प समन्वयक विक्रमसिंह पवार म्हणाले, “गेल्यावर्षी (२०२४) एकूण ९३४० कॉल आले. त्यामध्ये ६५ टक्के पुरुषांचे, तर ३५ टक्के महिलांचे कॉल आले होते. या हेल्पलाईनवर सर्वाधिक कॉल १८ ते ४० वयोगटातील व्यक्तींकडून आल्याचे निरीक्षण आहे. हेल्पलाईनवर कोणतेही सल्ला न देता व कोणतीही वैयक्तिक किंवा नैतिक निकष लावलेले निर्णय न देता केवळ सहृद्ध भावनेने त्यांचे ऐकून घेऊन भावनिक आधार दिला जातो. मन मोकळे होऊन भावनिक ताण कमी होण्यास मदत होते. सध्या ४७ प्रशिक्षित स्वयंसेवक ही हेल्पलाईन चालवत आहेत. या कार्यात नवीन स्वयंसेवकांना जोडण्याची संधी आहे. त्यासाठी जूनमध्ये अडीच महिन्याचे प्रशिक्षण आयोजिले आहे. इच्छुकांनी ९८३४४०६०३३ ह्या क्रमांकावर चौकशी करावी.”
मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता. आम्ही हिंदीची सक्ती कदापि होऊ देणार नाही. आम्ही प्रेमाने सगळ ऐकून घेऊ. पण सक्ती करण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्यासकट उखडून टाकू, असा इशारा त्यांनी या प्रकरणी सरकारला दिला.
उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे आयोजित भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी राज ठाकरे यांच्या युतीचा प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत हिंदीच्या सक्तीवरून केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. वक्फ बोर्ड विधेयकात गैरमुस्लिम व्यक्तीची वक्फ बोर्डावर नियुक्ती करण्याची तरतूद होती. आम्ही त्या तरतुदीला विरोध केला. आम्ही जो प्रश्न विचारला, तोच प्रश्न सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला. बिगर मुस्लिम लोक वक्फ बोर्डावर घेतले गेले, तर मग उद्या मंदिरांमध्ये बिगर हिंदुंच्या नियुक्त्या करणार नाही याची खात्री काय?, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे पुढे हिंदीच्या सक्तीला विरोध करताना म्हणाले, आम्ही कोणत्याही निर्णयाला आंधळेपणाने पाठिंबा देणार नाही. हिंदी बोलली म्हणजे हिंदू नाही. आम्ही कट्टर मराठी बोलणारे आहोत. तुमच्यापेक्षा जास्त देशाभिमानी आहोत. आम्ही प्रेमाने सगळे ऐकून घेऊ. पण सक्ती केली तर तुमच्यासकट सर्वांना उखडून टाकू. हिंदीची सक्ती कशासाठी? महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असताना घेतला याचा मला अभिमान आहे. येथे अमराठी लोक अनेक पिढ्यांपासून राहतात. आम्ही सुरू केलेल्या मराठी शिकण्याच्या वर्गावरही ते येतात. त्यामुळे हिंदीची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही. इथले मीठ खाता आणि मराठीला विरोध करता. आपले सरकार असताना असे धाडस करण्याची कुणाचीही हिमत नव्हती.
घाटकोपरमध्ये मराठीची सक्ती करा -उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला मुंबईच्या गुजरातीबहूल घाटकोपरमध्ये मराठीची सक्ती करून दाखवण्याचेही आव्हान दिले. पण काही नतदृष्ट याविरुद्ध कोर्टात गेले. आपले सरकार गद्दारी करून पाडले. एसंशिने पाडले आणि आता पाय चाटत आहेत. मी सांगतोय इस राज्य मैं रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलना होगा. हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. देवेंद्र फडणवीसांना सांगतो, तुमचे जे कोणी आले होते ना जोशी की माशी… ते घाटकोपरमध्ये बोलले होते, आता त्या घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा. घाटकोपरमध्ये प्रत्येक माणूस मराठी बोलला पाहिजे असे करून दाखवा, असे ते म्हणाले.
मुंबई-राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसाठी पुढे केलेल्या मैत्रीच्या हाताला उद्धव ठाकरे यांनी देखील साद दिली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत, या बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मन की बात सांगितली असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी आता कुठे मन मोकळे केले आहे. त्याबाबत आम्ही सकारात्मक असून सध्या ‘वेट अँड वॉच’ ची आमची भूमिका असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घ्यावी, असे आमचे मत होते. आजही अशा काही शक्ती आहेत, ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात. महाराष्ट्राचे नुकसान व्हावे, मराठी माणसाचे नुकसान व्हावे, यासाठी पडद्या मागून कारस्थान करतात. अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अशी भूमिका सर्वांनीच घेणे गरजेचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे शत्रू विरोधात , छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू यांच्या विरोधात जर कोणी भूमिका घेत असेल तर त्यांचे स्वागत आहे. त्यांनी तशी भूमिका घेतल्यानंतरच आम्ही त्याविषयी बोलणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सध्या महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर आहे. राज्यकर्ते बोलतात एक आणि करतात वेगळे. मात्र आम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आमच्या घरात कधीही थारा देणार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. याचा विचार राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी करणे गरजेचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ज्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचा आहे, अशा वेळेला दोन्ही ठाकरेंनी साथ – प्रतिसाद अशी भूमिका घेतली आहे. तर त्याचे महाराष्ट्र स्वागतच करेल. आता उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर आम्ही प्रतीक्षा करणार आहोत. सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहणार आहोत. मात्र आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सर्व विषयाकडे पाहत आहोत. कारण अखेर हा विषय महाराष्ट्र कल्याणचा आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये त्यावेळेला अनेक विचारसरणीच्या लोकांनी आपले वाद आणि बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. त्याच प्रवाहातले आम्ही देखील कार्यकर्ते असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हिताची भूमिका घेतली असेल तर त्याला नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
पुणे- येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डिपॉझीट अभावी उपचार नाकारल्याने तनिशा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे वृत्त येथे आले आहे. ईश्वरी उर्फ तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यू प्रकरणी उपचारांमध्ये निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केल्याबद्दल भारतीय न्याय संहिता कलम 106 एक नुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर घटनेच्या 22 दिवसानंतर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत प्रियांका पठारे यांनी डॉ. घैसास यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाबाबत सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल सादर झाल्यावर डॉ. सुश्रुत घैसास यांनी रुग्णालयाचे मानद प्रसुती तज्ञ पदाचा राजीनामा दिला आहे. मागील दहा वर्ष ते रुग्णालयात काम करत होते. राजीनामा पत्रा मध्ये त्यांनी सांगितले की, माझ्यावर सध्याच्या परिस्थितीत दबाव निर्माण झाला आहे. मला माझ्या कुटुंबाची चिंता आहे, माझ्या कामावर देखील परिणाम होत आहे, मी रात्री झोपू शकत नाही, रुग्णालयाची देखील बदनामी होत आहे. त्यामुळे मी पदाचा राजीनामा देत आहे, असे सांगितले होते.त्यानंतर विश्वस्त मंडळाने त्यांचा राजीनामा मंजूर केला.
ईश्वरी उर्फ तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात वेगवेगळे चार चौकशी अहवाल पोलिसांना आतापर्यंत प्राप्त झाले आहे. राज्य सरकारने नेमलेल्या आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तसेच भिसे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर देखील दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, ससून रुग्णालयाने केलेल्या चौकशीमध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तसेच डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा या प्रकरणात कोणताही दोष नसल्याचा सहा पानी अहवाल पुणे पोलिसांना सादर केला. त्यानंतर ससून रुग्णालय अहवालावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
ससून रुग्णालयाच्या अहवालानुसार, तनिषा भिसे यांच्या प्रकृतीत इंदिरा आयव्हीएफमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यानंतरही त्यांना 4-5 दिवस दाखल करून घेण्यात आले. ही एक मोठी चूक होती. गरोदर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याची गरज होती. या सर्वात आयव्हीएफ सेंटरची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यांनी रुग्णास लवकर दुसरीकडे पाठवणे गरजेचे होते.
तनिषा भिसे नामक गरोदर महिलेला दीनानाथ रुग्णालयात गंभीर स्थितीत प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना 10 लाखांचे डिपॉझिट भरल्यानंतरच दाखल करून घेण्याची भूमिका घेतली होती. यासंबंधीच्या रिसिप्टवर डॉक्टर सुश्रुत घैसास यांची स्वाक्षरी होती. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली होती. सत्ताधारी महायुतीसह विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या सर्वच घटकपक्षांनी यासंबंधी दीनानाथ रुग्णालयाबाहेर निदर्शने केली होती. पण आता ससून रुग्णालयाच्या अहवालात डॉक्टर घैसास व दीनानाथ रुग्णालयाला क्लीनचिट देण्यात आली आहे.
दिनानाथ चे विश्वस्त मंडळ बरखास्त करा,मंगेशकर कुटुंबाची चुप्पी कर्कश्श
पुणे- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे. डॉक्टर, दीनानाथ रुग्णालय यांना वाचवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत असल्याचा आरोप करत सपकाळ यांनी दिनानाथ चे विश्वस्त मंडळ बरखास्त करा अशी मागणी केली आहे त्याच बरोबर मंगेशकर कुटुंबाची चुप्पी कर्कश्श असल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे.
सपकाळ म्हणाले, रुग्णालयावर आणि डॉ केळकरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे त्या ठिकाणचं विश्वस्त मंडळ आहे. ते नियमावलीला बाजूला सारत आहे. संकेतांना बाजूला सारत आहे. तिथे वारेमाप पैसे लुबाडला जात आहे. हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावं. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्याठिकाणी दुसरं विश्वस्त मंडळ स्थापित करावं. ही आमची असणारी मागणी आहे. मात्र त्यास सरकार वाचवत आहे. आणि दुसरीकडे मंगेशकर परिवाराने जे साधलेली चुप्पी जी आहे ही देखील कर्कश आहे.आम्ही सातत्यानं आरोप करत होतो की सरकारला प्रकरण दडपायचं आहे. आणि कारण नसताना चुकीची बाजू ते घेत आहेत. खऱ्याला खरं म्हणणं चांगल्याला चांगलं म्हणणं हा चांगुलपणा आहे. मात्र या सरकारने हा चांगुलपणा नष्ट केलेला आहे. एक मातृत्वासाठी असलेल्या एका भगिनीचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यूचे जे आरोपी आहेत त्या आरोपींना थेट वाचवलं जातंय. एक जी संस्था आहे रुग्णालय जे आहे मंगेशकर रुग्णालय हे रुग्णांच्या सेवेकरता आहे. मात्र ते त्याठिकाणी धंदा करत आहे. त्याठिकाणी सावकारी सुरू आहे. त्याठिकाणी दरोडा घालून पैसे द्या तरच उपचार करू. अशी असंवेदनशील अमानवीय व अधर्माची बाजू ही त्याठिकाणी लावून धरल्या जात आहे. डॉ घैसास यांच्याकडून वैद्यकीय सेवेचीअपेक्षा आहे. जेव्हा डॉक्टर माणूस होतो. तेव्हा शपथ घेतो की, मी रुग्णांना सेवा प्रदान करेल. मात्र ते लिहून देतात की, दहा लाख रुपये अगोदर जमा करा हे काय लावलंय आणि अशा सगळयांना वाचवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहे. आता आपल्या सगळ्यांसमोर थेट पुरावा आला आहे. ज्यामध्ये तारीख पे तारीख हे आपण ऐकलं होतं. आता रिपोर्ट पे रिपोर्ट सुरु झाले आहे.रिपोर्ट निर्दोष करणार नाही. जोपर्यंत क्लीन चिट देणार नाही तोपर्यंत आम्ही तपासण्या आणि समित्या गठीत करत राहू. असा त्याचा अर्थ आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डिपॉझीट अभावी तनिषा भिसे या गर्भवतीला उपचार सुरु करण्यास असमर्थता दाखविली , किंवा उशीर केला , किंवा टाळाटाळ केली हे साधारणपणे दिसत असताना अन्य रुग्णालयात तिच्या मृत्यूचे गंभीर प्रकरण घडून १५ दिवस उलटून गेले आहेत.चौकशांसाठी चार समित्या नेमल्या गेल्या, त्यांचे अहवालही सादर झाले, मात्र अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात चौकशी समित्या, शासन, पोलिस प्रशासन या सर्व यंत्रणांना अपयश आले आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यात शासन आणि पोलिस यंत्रणा संभ्रमात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणार की नाही, याबाबतचा निर्णय कोण घेणार? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. भिसे कुटुंबीयांना पाठीशी असल्याचे आश्वासित करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत नेमका काय निर्णय घेणार? याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.
मुंबई-महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या मार्गावर दिसू लागले आहेत . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी याबाबतचे संकेत दिले. राज ठाकरे म्हणाले- आपल्यात राजकीय मतभेद आहेत, वाद आहेत, मारामारी आहेत, पण महाराष्ट्रासमोर या सर्व खूप लहान गोष्टी आहेत. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणे ही फार मोठी अडचण नाही.
राज ठाकरे यांनी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब चॅनलवर तसे स्पष्ट संकेत दिले. महेश मांजरेकर यांनी राज यांना उद्धव यांच्याशी युती करण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही मोठ्या ध्येयासमोर आमच्यातील भांडणे लहान आहेत. यावर उद्धव ठाकरे यांचीही प्रतिक्रिया आली आहे, त्यांनी सांगितले की माझ्याकडून कधीही भांडण झाले नाही.
आगामी महापालिका निवडणूक ही दोन्ही ठाकरे बंधुच्या अस्तित्वाचा प्रश्न
राज ठाकरेंनी नुकत्याच महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये युतीसाठी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला.राज ठाकरे म्हणाले, मी युतीसाठी उद्धव ठाकरेंना प्रस्ताव पाठवला आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्यामध्ये काहीच चूक नाही. आमच्यातील भांडणं छोटी आहेत पण महाराष्ट्र खूप मोठा आहे.विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा फटका बसला. मनसेचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक ही दोन्ही ठाकरे बंधुच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली होती.
भाजपच्या हितासाठी पाऊल उचलत असतील तर विरोध– अंबादास दानवे
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी तयार असल्याच्या जरी जाहीर केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, राज ठाकरे भाजपचा विरोध करणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. तर, अंबादास दानवे यांनी म्हटले की, असा प्रसारमाध्यमांमध्ये प्रस्ताव देऊन काही होत नसते. खरच मनात इच्छा असेल तर इतर मार्ग असतात. महाराष्ट्राच्या हितासाठी पाऊल उचलत असतील तर स्वागत केले पाहिजे पण भाजपच्या हितासाठी पाऊल उचलत असतील तर विरोध केला पाहिजे.
…राज ठाकरेंसोबत जाण्यास उद्धव ठाकरे तयार.. म्हणाले, तेव्हाच विरोध केला असता तर आज ते केंद्रात सरकार बसले नसते राज ठाकरेंनी दिलेल्या युतीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी स्पष्टच सांगितले. मी सोबत यायला तयार, पण माझी एक अट आहे. माझ्याकडून सर्व भांडणं मिटली. माझ्यासोबत जाऊन हित आहे की भाजपसोबत जाऊन हित आहे, हे आधी ठरवा, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्याकडून भांडणं नव्हती. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे. पण त्याआधी भाजपसोब हित की माझ्यासोबत हे आधी ठरवा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव यांनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा, असे एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर अट घातली आहे. माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच, मी मिटवून टाकली. एकत्र यायचे असेल तर माझ्यासोबत हित आहे की भाजपसोबत हित आहे, हे आधी ठरवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. मराठी माणसाने मराठीसाठी एकत्र यावे. पण माझी एक अट आहे. लोकसभेला सांगत होतो महाराष्ट्रातून गुजरातमध्ये उद्योग घेऊन जातात, तेव्हाच विरोध केला असता तर आज ते केंद्रात सरकार बसले नसते. महाराष्ट्राच्या हिताचे सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात बसले असते.
राज ठाकरे यांनी मुलाखत दिली अभिनेता , दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकरांना ….या मुलाखतीतून दिले संकेत ..
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 19, 2025
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उद्धव यांच्यासोबत युती करण्याचे सकारात्मक संकेत दिलेत. ‘महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद, भांडणे व इतर गोष्टी फार क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे व एकत्र राहणे यात फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही,’ असे ते म्हणालेत.राज ठाकरे यांनी अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या वॅको सॅनिटी या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्यांवर परखड भाष्य केले. यावेळी महेश मांजरेकर यांनी त्यांना एकेठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचा प्रश्न केला. त्यावर राज यांनी अत्यंत सकारात्मक उत्तर दिले. ते म्हणाले, ‘प्रश्न असा आहे की, कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातील वाद आमच्यातील भांडणे हे अत्यंत किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, वाद व इतर गोष्टी फार क्षुल्लक आहेत. अत्यंत क्षुल्लक आहेत.
त्यामुळे एकत्र येणे व एकत्र राहणे यात फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही. पण प्रश्न फक्त इच्छेचा आहे. हा माझ्या काही एकट्याच्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. मला वाटते आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहिला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांमधील मराठी लोकांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केले पाहिजे असे मला वाटते.’
महेश मांजरेकर यांनी यावेळी राज यांना एकत्र येणे शक्य नसेल तर तुम्ही शिंदे सेना अर्थात शिवसेना टेकओव्हर करण्यास हरकत नव्हती असा प्रश्न केला. त्यावर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ‘मी आयत्या पिठावर रेघोट्या मारत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की, शिंदेंचे बाहेर जाणे किंवा आमदार फुटणे हा राजकारणाचा एक वेगळा भाग झाला. मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा अनेक आमदार, खासदार माझ्याकडे आले होते. मला त्याचवेळी हे शक्य होते. पण माझ्या मनात एकच गोष्ट होती की, मी बाळासाहेब सोडले तर मी कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. त्यावेळची परिस्थिती अशी होती.
परंतु, मी शिवसेनेत होतो तेव्हा मला उद्धव सोबत काम करण्यास काहीही हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का मी त्याच्याबरोबर काम करावे, असे ते म्हणाले. त्यावर मांजरेकर यांनी अशी महाराष्ट्राची इच्छा असल्याचे सांगितले. त्यावर पुन्हा राज ठाकरे यांनी त्यांनी तसे महाराष्ट्राला सांगावे. मी अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये माझा इगो केव्हाच आणत नाही,’ असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी यावेळी मनसे आणि भाजप एकत्र येणे गरजेचे आहे का? या प्रश्नावरही भाष्य केले. ते म्हणाले, ‘मी जे महाराष्ट्राविषयी किंवा मराठी माणसासाठी बोलू शकतो, करू शकतो, ज्या प्रकारचा सापळा तोडू शकतो. भाजपसोबत मी बरोबर येणे हे राजकीय होईल. परंतु सगळ्याच वेव्हलेंथ आमच्या जुळतील असे नाही. पण आता राजकारणात कोणत्या गोष्टी केव्हा घडतील हे काही सांगता येत नाही. उद्या आमच्याशी शेकहँडही केला जाईल. किंवा समोरासमोर येऊन हात जोडलेही जातील. कल्पना नाही. राजकारणात सर्वच गोष्टी बदलत असतात. आता तर इथे सर्वच गोष्टींना एवढा वेग आला आहे की, त्यात कधी कोणती गोष्ट होईल सांगता येत नाही.’
कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचे पुणे रिक्षा चालकांना आवाहन
पुणे:महाराष्ट्र सरकारने टू व्हीलर टॅक्सीला परवानगी दिली आहे, टू व्हीलर वरून प्रवाशी वाहतूक केली जाणार आहे,यामुळे रिक्षा व्यवसाय अडचणी मादे येण्याची शक्यता आहे, 3 रु किलो मीटरने टू व्हीलर टॅक्सी धावणार असे सांगितले जात आहे, मग रिक्षात कोण बसणार असा प्रश्न आहे, टू व्हीलर टॅक्सी मुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत येणार आहे, आपला रिक्षा व्यवसाय वाचविण्यासाठी पुणे शहरातील रिक्षा चालकांनी एकत्र येऊन टू व्हीलर टॅक्सी विरोधामध्ये मोठे आंदोलन उभारले आवश्यक आहे, या साठी पुणे शहरात जन जागृती करून सर्व रिक्षा चालक-मालक व रिक्षा संघटनांना एक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष गोरगरीब कष्टकर यांच्या नेते बाबा कांबळे यांनी दिली,
पुणे मंगळवार पेठ येथील संघटनेच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांचे बैठक आयोजित करण्यात आली होती,
या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष मोहम्मद भाई शेख, कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय शिंदे, प्रवीण शिखरे, सचिव अविनाश वाडेकर, कुठे आहेत, सहसचिव सुभाष बागडे, सर संघटक राजू शेख, फ्रान्सिस अँथोनी, कोंढवा अध्यक्ष फिरोज सेनागो, पुना स्टेशन अध्यक्ष गणेश कांबळे, उपाध्यक्ष मल्लेश कांबळे, विभाग अध्यक्ष रमेश इंगळे, सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
सोमवार दि,21-3- 2025 रोजी, दुपारी 3 वाजता पुणे रेल्वे स्टेशन येथून, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, जनजागृती कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे, पुणे शहरातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कशाला सोमवारी तीन वाजता पुणे स्टेशन येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान देखील यावेळी पुणे शहर अध्यक्ष महंमद भाई शेख यांनी केले आहे,
राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू व एकता व अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू.
आम्ही भारत जोडोवाले, कुटुंब फोडणारे नाही. राज व उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच.
पुणे, दि. १९ एप्रिल २०२५ देशात लोकशाही व संविधानाला धाब्यावर बसवून राज्य कारभार सुरु आहे. आज सर्व समाज घटक दबावाखाली, भितीखाली जगत आहे. सत्तेतील लोक घाबरवण्याचे काम करत आहेत. याला न डगमगता एकता व अखंडतेची मशाल हाती घेऊन पुढे जाऊ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत दिलेल्या ‘डरो मत’ संदेश अंमलात आणू, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुण्यात मायनॉरीटी युथ पार्लमेंट कार्यक्रमात बोलत होते, ते पुढे म्हणाले की, आज संविधान, अल्पसंख्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेतील लोक भिती दाखवत आहोत, घाबरवत आहेत. अल्पसंख्याक समाजात भिती आहे, शेतकऱ्यांमध्ये भिती आहे, बेरोजगार तरुणही भितीत वावरत आहेत, महिला भितीत आहे कारण घराबाहेर पडले तर सुरक्षित राहू शकेन की नाही याची तिला भिती वाटत आहे. गृहिणी भितीत जगत आहेत कारण महागाईने जगणे कठीण करून ठेवले आहे. बहुजन सुद्धा भितीत जगत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही त्यामुळे शिवभक्तांमध्येही भिती आहे. बहुसंख्य समाजाने अल्पसंख्याकांचे रक्षण केले पाहिजे पण देशातील परिस्थिती वेगळी आहे. या परिस्थितीचा सामना करायचा असेल तर एकता व अखंडतेची मशाल घेऊनच आपल्याला पुढे जावे लागणार आहे. असे सकपाळ म्हणाले.
आज सर्वांना सोबत घेऊन जाण्याची गरज आहे. समाजासमोर जे आव्हान उभे ठाकले आहे त्यातून मार्ग काढायचा असेल तर एकत्र आले पाहिजे. आणि आपला विचार बदलला पाहिजे…“नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दिशाओं को बदलो तो किनारे बदल जाते हैं।“ अशा शायरी अंदाजात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भूमिका मांडली.
या कार्यक्रमानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव व राज ठाकरे एकत्र येण्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपा महाराष्ट्राचे नुकसान करत आहे. उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत. भाजपा व महायुती महाराष्ट्राच्या मुळावर उठली आहे असा त्यांचा इशारा असल्याची दाट शक्यता आहे. भाजपा महाराष्ट्र धर्माच्या विरोधात आहे ते महाराष्ट्र धर्माचे नुकसान करत आहेत. शिव, शाहु, फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या राज्यात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची परंपरा आहे पण भाजपा मात्र महाराष्ट्राची भाषा व संस्कृती तोडण्याचे काम करत आहे याला राज ठाकरे यांच्या विचारातून दुजोरा मिळत आहे. आम्ही भारत जोडोवाले आहोत, कुटुंब फोडणारे नाही. दोन परिवार एकत्र येत असतील तर आक्षेप घेण्याची गरज नाही, जोडले जात असतील तर स्वागतच आहे, असेही सपकाळ म्हणाले.
पुणे : राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहानिमित साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामधील 300 विद्यार्थ्यांना आज (दि. १९) आग विझविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहानिमित अग्निशमन विभागातर्फे विविध उपक्रब राबविण्यात येत आहेत. आग कशामुळे लागू शकते, आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास काय-काय उपाययोजना कराव्यात या विषयी कसबा अग्निशमन केंद्रातील प्रभारी अधिकारी कमलेश चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आग विझविण्यासाठी अग्निशमन वाहनात असलेल्या विविध उपकरणांची माहितीही देण्यात आली तसेच या उपकरणांचा वापर कशा पद्धतीने केला जातो याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आग विझविण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थी आणि शिक्षकांकडून करून घेण्यात आले. उपक्रमास शाला समितीचे अध्यक्ष पराग ठाकूर याचे सहकार्य लाभले असून डी. बी. देवरुखकर यांच्या सौजन्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अग्निशमन वाहनामधील अधिकारी कमलेश चौधरी, चालक किरण शिंदे, फायरमन अब्दुल पटेल, हरीश बुंदेले, ज्ञानेश्वर गायकवाड व आतिश नाईकनवरे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे अध्यक्ष पियूष शहा यांनी केले. शहा यांचा हस्ते अग्निशमन दलातील जवानांना मानचिन्ह व स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. पियूष शहा यांनी प्रास्ताविकात अग्निशामन दलातील जवानांच्या कार्याविषयी माहिती देत आभार मानले. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, उपप्राचार्या राजश्री हेंद्रे, उषा जांभळे, भारती कपटकर, माधुरी भामरे, बाजीराव शेरमाळे, विद्या चाकणकर आदी उपस्थित होते. रविवार दि. 20 रोजी नटरंग डान्स अकॅडमीमधील 200 विद्यार्थ्यांकरता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
पुणे : रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष तसेच सामाजिक चळवळीचे नेते राहुल डंबाळे यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने यंदाच्या वर्षीचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार रिपब्लिकन पक्षाचे नेते सुभाष दादा त्रिभुवन यांच्या हस्ते समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला.
सदर प्रसंगी चरण त्रिभुवन, अॅड. प्रवीण पटेकर, किरण सोनवणे, प्रतीक डंबाळे, सेवानिवृत्त शिक्षण संचालक राम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते
भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनाचे नियोजन, आंबेडकरी समुदायातील सामाजिक व राजकीय चळवळीतील योगदान तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांवर देशभर करत असलेल्या कार्याच्या अनुषंगाने डंबाळे यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे त्रिभुवन यांनी सांगितले
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मिळणारा पुरस्कार हा कायम महत्वपूर्ण असल्याची भावना राहुल डंबाळे यांनी व्यक्त केली तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान व देशाची एकता व अखंडता सध्या धोक्यात आणली जात असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्त्यांनी व समुदायाने सर्वच वंचित व उपेक्षित वर्ग सोबत काम करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान याच वेळी वंचित बहुजन आघाडीच्या राज्यप्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांना महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी देखील हा पुरस्कार आपल्या रुपवते कुटुंबीयांनी आजवर केलेल्या समाजसेवेची फलित असल्याने या पुरस्कारामुळे आपली जबाबदारी वाढल्याची भावना व्यक्त केली.