Home Blog Page 57

एअर इंडिया एक्सप्रेसच्या नेटवर्कमध्ये नागपूरचा समावेश; दिल्ली–अबू धाबी आणि पुणे–अबू धाबी अशी नवीन उड्डाणे सुरू

एअर इंडिया एक्सप्रेस १ December २०२५ पासून नागपूरबेंगळुरूदरम्यान दिवसातून दोन फ्लाइट्स चालवणार आहे. तसेच, २ December २०२५ पासून दिल्ली आणि पुणेहून अबू धाबीला नवीन फ्लाइट्स सुरू करण्यात येणार आहेत.

पुणे-: भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय व्हॅल्यू कॅरिअर एअर इंडिया एक्सप्रेस आपल्या वाढत्या नेटवर्कमध्ये नागपूरचा समावेश करत असल्याची घोषणा केली आहे. गेल्या दोन महिन्यांत एअर इंडिया एक्सप्रेसने 5 नवीन स्टेशनची भर घातली असून, नेटवर्कवरील एकूण गंतव्यस्थानांची संख्या 60 झाली आहे.  01 डिसेंबर 2025 पासून एअर इंडिया एक्सप्रेस नागपूर – बेंगळुरू दरम्यान दिवसातून दोन उड्डाणे सुरू करणार आहे. या नवीन उड्डाणांसाठी बुकिंग्स एअरलाइनच्या पुरस्कारप्राप्त वेबसाइट airindiaexpress.com, अधिकृत मोबाइल अ‍ॅप आणि प्रमुख बुकिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

त्याचबरोबर, एअर इंडिया एक्सप्रेस खाडी नेटवर्कचा विस्तार करत आहे. 02 डिसेंबर 2025 पासून एअरलाइन दिल्ली – अबू धाबी मार्गावर आठवड्यात चार उड्डाणे आणि पुणे – अबू धाबी मार्गावर आठवड्यात तीन उड्डाणे सुरू करणार आहे. यामुळे भारत आणि यूएई दरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखी बळकटी मिळणार आहे.

Schedule effective from December 1, 2025 (all timings are local)
Departure AirportArrival AirportDeparture TimeArrival TimeFrequency
NagpurBengaluru10:00; 21:0512:05; 23:102X Daily
BengaluruNagpur07:25; 18:3009:30; 20:352X Daily
Schedule effective from December 2, 2025 (all timings are local)
DelhiAbu Dhabi10:1012:40Tue, Wed, Thu, Sat
Abu DhabiDelhi13:4019:10Tue, Wed, Thu, Sat
PuneAbu Dhabi20:5022:45Tue, Thu, Sat
Abu DhabiPune23:4504:15Tue, Thu, Sat

नागपूरचा समावेश महाराष्ट्रातील एअर इंडिया एक्सप्रेसची उपस्थिती अधिक मजबूत करतो. सध्या एअरलाइन मुंबईतून आठवड्याला 130 पेक्षा जास्त आणि पुणेतून आठवड्याला 90 पेक्षा जास्त उड्डाणे चालवते. आता एअर इंडिया एक्सप्रेस नवी मुंबई विमानतळावरूनही सेवा सुरू करणार असून, येथून आठवड्याला 35 उड्डाणे बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांकडे चालतील.

नागपूर – बेंगळुरू या नवीन उड्डाणांमुळे एअर इंडिया एक्सप्रेसने अलीकडेच बेंगळुरूहून सुरू केलेल्या मार्गांना पूरक ठरेल. यामध्ये अहमदाबाद, चंदीगड, देहरादून, जोधपूर आणि उदयपूर या शहरांपर्यंतच्या नवीन मार्गांचा समावेश आहे. त्यामुळे बेंगळुरू हे एअर इंडिया एक्सप्रेसच्या जलद वाढणाऱ्या नेटवर्कमधील एक महत्त्वाचे हब म्हणून अधिक बळकट होत आहे. सध्या एअरलाइन बेंगळुरूतून आठवड्याला 530 हून अधिक उड्डाणे चालवते. एअर इंडिया एक्सप्रेसने अलीकडेच बेंगळुरूहून बँकॉक, जेद्दा, कुवैत आणि रियाध या आंतरराष्ट्रीय गंतव्यांपर्यंत थेट उड्डाणे देखील सुरू केली आहेत. दिल्लीहून एअर इंडिया एक्सप्रेस आठवड्याला 400 पेक्षा जास्त उड्डाणे चालवते, ज्याद्वारे 25 देशांतर्गत गंतव्यस्थानांना थेट जोडले जाते. तसेच, अबू धाबी आणि शारजाह (यूएई) आणि मस्कत (ओमान) येथेही फ्लाइट्स उपलब्ध आहेत.

एअर इंडिया एक्सप्रेसने अलीकडेच आपली नवी ब्रँड मोहीम ‘Xplore More, Xpress More’ सादर केली आहे. या मोहिमेचा उद्देश प्रवाशांना स्थानिक संस्कृती अनुभवण्यास, नवीन ठिकाणे शोधण्यास आणि प्रवासातील आनंद वाढवण्यास प्रोत्साहन देणे असा आहे. यासोबतच एअरलाइनने आपल्या Boeing 737-8 विमानाचे नवे इंटिरियर देखील सादर केले आहे. नव्या केबिनमध्ये अधिक मऊ आणि आरामदायी सीट्स, रुंद आर्मरेस्ट्स आणि 29 ते 38 इंच पर्यंत लेगरूम दिली आहे. प्रत्येक सीटमध्ये USB चार्जिंग पोर्ट असून, केबिनमध्ये गरम ‘Gourmair’ जेवणासाठी ओव्हनची सुविधा आहे. नव्या कार्पेट्स, ताजेतवाने इंटिरियर आणि Boeing Sky Interior लाईटिंगमुळे केबिन अधिक आधुनिक, उबदार आणि स्वागतार्ह वाटते — प्रवाशांना आरामदायी आणि स्मरणीय प्रवासाचा अनुभव देण्याच्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे.

एअरलाइनची आणखी एक महत्त्वाची उपक्रम — ‘Tales of India’ — भारताच्या सांस्कृतिक आणि कलात्मक वैविध्याचा उत्सव साजरा करतो. या अंतर्गत विमानांच्या टेल फिन्सवर देशातील विविध प्रांतांची कला दाखवली जाते. यात 50 हून अधिक स्थानिक आणि पारंपरिक कला, 25 राज्यांतील कलाकृतींचा समावेश आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारली चित्रशैली, तसेच अप्रतिम हिमरू आणि पैठणी विणकामाचा देखील समावेश आहे.

भारतीयांचे बुद्धिवैभव आपल्या देशासाठी अधिक वापरले जावे-माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

पुणे: “मूल्यांची जपणूक आणि मूल्यवर्धनास नैतिकता, प्रामाणिकता, तथ्य आणि सत्याची दिली, तर त्यातून चांगल्या संपत्तीची निर्मिती होईल. विविध क्षेत्रांतील विदेशी कंपन्यांसाठी आपले बुद्धीवैभव खर्च होतेच; पण त्यासोबतच या बुद्धीचा वापर आपल्या देशासाठी अधिक प्रमाणात व्हायला हवा,” असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी तरुणाईला दिला. व्यवसाय करताना स्वतःचे छंद जोपासा, ते तुम्हाला ताणतणावांपासून मुक्त ठेवतील, तुमची एकाग्रता वाढेल. जिज्ञासा, सतत शिकण्याची वृत्ती जागी ठेवा, तुमच्यातील विद्यार्थी जागा ठेवा, असे आवाहनही जावडेकर यांनी केले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज, ‘आयसीएआय’ पुणे शाखा व ‘विकासा’ शाखेच्या वतीने सीए विद्यार्थ्यांसाठी आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी प्रकाश जावडेकर बोलत होते. महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजिलेल्या या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेत देशभरातुन २००० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

प्रसंगी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे व सीए संजीवकुमार सिंघल, ज्येष्ठ सनदी लेखापाल डॉ. एस. बी. झावरे, विभागीय समिती सदस्य सीए रेखा धामणकर व सीए अभिषेक धामणे, ‘आयसीएआय’ पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, परिषदेच्या समन्वयिका व ‘विकासा’ चेअरपर्सन सीए प्रज्ञा बंब, उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सचिव सीए निलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके, कार्यकारिणी सदस्य सीए सारिका दिंडोकर, सीए प्रितेश मुनोत, सीए नंदकुमार कदम, ‘विकासा’चे व्हाइस चेअरमन श्रीयस नवले, सचिव संयोगिता कुलकर्णी, खजिनदार वेदांत वेदुआ, सहसचिव प्रांजल देवकर, सहखजिनदार जय येडेपाटील, संपादक वैभव अंभोरे आदी उपस्थित होते.

प्रकाश जावडेकर म्हणाले, “तुम्ही नव्या काळाचे प्रतिनिधी आहात. तुमच्यापुढे अनेक संधी, कर्तृत्वाचे आभाळ खुले आहे. सनदी लेखापाल हा व्यवसाय अंगिकारताना विनम्रता, विश्वासार्हता, खरेपणा, नेमकेपणा आणि व्यावसायिक शिस्तीचे पालन करा. कामाचे क्षेत्र कुठलेही असले, तरी आपण भारताचे प्रतिनिधी आहोत, हे लक्षात ठेवा. नीतिमत्तेवर आधारित उत्तम प्रॅक्टिस ही काळाची गरज आहे.”

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सनदी लेखापाल हे देशाचे आर्थिक क्षेत्रातले लढवय्ये आहेत. तुम्ही जगात कुठेही हा व्यवसाय करू शकता. उच्चतम ध्येय गाठण्याचे स्वप्न ठेवून जागतिक स्तरावरचे काम करण्याचा प्रयत्न करा.”

सीए संजीवकुमार सिंघल म्हणाले, “सीए हे देशाचे ग्रोथ इंजीन आहे, हे लक्षात घेऊन नोकरी मिळवण्यापेक्षा रोजगारनिर्मिती करा. ग्राहकांचा विश्वास मिळवा. तुमची प्रत्येक नवी कृती हे देशासाठी पुढचे पाऊल ठरावे.”

सीए एस. बी. झावरे म्हणाले, “स्वतःला नेहमी काळासोबत अपडेट ठेवा. व्यावसायिक मूल्यांशी तडजोड करू नका. सीए देशाचे आर्थिक विश्वातील वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्ट अशा विविध भूमिका निभावू शकतात.”

सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे यांनीही विद्यार्थ्यांचा प्रोत्साहित केले. सीए सचिन मिणियार यांनी भावी सनदी लेखापालांनी आपल्या युवा उर्जेसह नवकल्पनांचे, आत्मविश्वासाचे योगदान या क्षेत्राला द्यावे, मात्र मानवी चेहेरा जपावा, असे आवाहन केले. 

सीए प्रज्ञा बंब यांनी राष्ट्रीय परिषदेसाठीच्या ‘अग्रिया’ या संकल्पनेचे स्पष्टीकरण केले. सामाजिक दायित्व, सामूहिक जबाबदारीचे भान असणारे आर्थिक नेतृत्व देशाचे भवितव्य घडवण्यात मोलाचे योगदान देणारे ठरावे, असे त्या म्हणाल्या.

ओम केसकर आणि ओवी टोकेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीयश नवले यांनी आभार मानले.
————–
भारतीय ब्रँड उभारा: जावडेकर
आज जगामध्ये डेलाॅइट, अर्नेस्ट अँड यंग, केपीएमजी आणि पीडब्ल्यूसी हे इंटरनॅशनल ब्रँड मल्टी डिसिप्लिनरी सल्लागार संस्था म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतामध्येही अलीकडे अशा मल्टीडिसिप्लिनरी संस्थेला परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतीय चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, वित्तीय व कर सल्लागार, कायदे तज्ञ आणि अन्य लोकांनी एकत्र येऊन या क्षेत्रात भारताचा ब्रँड तयार करावा. जवळपास दोन लाख भारतीय सीए व अन्य प्रोफेशनल्स हे या चार संस्थांमध्ये काम करतात. पण त्याचा फायदा परदेशी कंपन्यांच्या मालकांना होतो. आपल्याला आता ओनरशिप घ्यायला हवी. सीए विश्वातील विदेशी मोठ्या कंपन्यांसाठी राबण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारा आणि नव्याने रोजगारनिर्मिती करण्याचा प्रयत्न करा, असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

मतचोरी विरोधात मुंबई युवक काँग्रेसचे मेट्रो व लोकल मध्ये जनजागृती अभियान.

मुंबई-

देशात निवडणूका निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे पण लोकशाहीच्या या महत्वाच्या स्तंभावर संशयाचे ढग जमा झाले आहेत. भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करत असल्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे. या मतचोरी विरोधात मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्त्वाखाली युवक काँग्रेस पदाधिका-यांनी मुंबई मेट्रो आणि लोकल ट्रेन मध्ये माहिती पत्रके वाटत वोट चोरी विरोधात जनजागृती केली.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन आणि पदाधिकाऱ्यांनी घाटकोपर ते साकीनाका व अंधेरी ते गोरेगाव मार्गावर मेट्रो आणि लोकलमधून प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधत निवडणूक आयोग व भाजपाच्या वोट चोरीची पर्दाफाश केला. याबाबतची माहितीपत्रके वाटून लोकांमध्ये जगजागृती करत त्यांना वोटचोरीची माहिती दिली. लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूक नागरिकांनी या वोटचोरीविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

“लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकशाही व संविधान रक्षणासाठी लढत आहेत. निवडणूक आयोगाचा भ्रष्ट कारभारही त्यांनी पुराव्यासह उघड करून लोकशाहाचा गळा घोटण्याऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. राहुल गांधी यांच्या संघर्षात युवक काँग्रेस पूर्ण ताकदीने उभी असून मतचोरीविरोधी जनजागृती करत आहोत”. असे मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झीनत शबरीन यांनी सांगितले.

कोट्यवधी रुपयांच्या जमिनी बळकावणाऱ्या दलालांचे सुत्रधार मंत्रालयात; भूखंड घोटाळे सामुहिक गुन्हेगारीचे कृत्य.

पुणे व मुंबईतील जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढून हिवाळी अधिवेशनात संपूर्ण एक दिवस चर्चा करा: हर्षवर्धन सपकाळ.

पार्थ पवारांच्या जमीन खरेदीसाठी पैसा आला कुठून? एफआरमध्ये नाव का नाही? चौकशी समिती ही केवळ धुळफेक.

‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीतावरील भाजपाचे प्रेम पुतणा मावशीचे; ‘वंदे मातरम्’ धार्मिक वा जातीय दंगे घडवण्यासाठी नाही.

मुंबई,

भाजपा महायुतीचे सरकार गेंड्याचे कातडीचे असून या सरकारचा कारभार पाहता त्यांनी बेशरमपणाचा कळस गाठला आहे. दररोज एक मोठे प्रकरण उघड होत असून कारवाई मात्र शून्य आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी राज्य लुटण्याचा सपाटा लावला आहे. मुंबई, पुणेसह राज्यात कोट्यवधी रुपयांचे भूखंड कवडीमोल भावाने लाटले जात आहेत. या सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा आणि येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर एक संपूर्ण दिवसभर चर्चा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा महायुती सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी पुण्यातील ४० एकर महार वतनाची जमीन ३०० कोटी रुपयांना खरेदी केली, त्यासाठी केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क रुपये भरले, त्या जागेवर आयटी पार्क उभारण्याचा प्रस्तावही तातडीने मान्य करण्यात आला, दस्तावेजामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आले. हा भ्रष्ट कारभार उघड झाल्यानंतर आता जमीन खरेदी व्यवहार रद्द केला असे सांगितले जात आहे, म्हणजे चोरी केल्याची कबुली देत आहेत, मग कारवाई का करत नाहीत? एफआयआर मध्ये पार्थ पवारांचे नाव का नाही? पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने याआधी पुण्याच्या बोपोडीतील ॲग्रीकल्चर डेअरीची सरकारी जमिन बोगस कागदपत्रे तयार करून हडपली. या सर्व व्यवहारासाठी पैसे कुठून आले तर ते एका साखर कारखान्यातून आले. हे पैसे कोणी दिले? कसे दिले? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. चौकशी समिती नेमून सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे.

भाजपाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात जैन बोर्डिंगची जमीन लाटली होती, तो प्रकार उघड होताच व्यवहार रद्द करण्यात आला हे जाहीर करण्यात आले पण हे प्रकरण संपलेले नाही. याप्रकरणातील धर्मादाय आयुक्त हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यावर काय करवाई झाली? मुंबईत अदानीला शेकडो एकर जमीन फुकटात दिली. भाजपाच्या मुंबईतील कार्यालयासाठी सरकारी जमिनीचा केलेला व्यवहार, देवेंद्र फडणवीस यांनी उभा केलेला नवा शेठ मोहित कंभोजला एसआरएच्या जमिनी दिल्या आहेत. पुण्यात रिंगरोडच्या जमीन अधिग्रहणात मोठा घोटाळा करण्यात आला. समृद्धी महामार्गात कोणाची समृद्धी झाली हेही जनतेला कळाले पाहिजे, यासाठी सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.

‘वंदे मातरम्’ जातीय/धार्मिक दंगे करण्यासाठी नाही..

राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्ष झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्ष देशभरात विविध कार्यक्रम घेत आहे, पण भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘वंदे मातरम्’ला नेहमीच विरोध केला आहे, संघाच्या शाखेत हे गीत कधीच गायले नाही, ‘वंदे मातरम्’ हे स्वातंत्र्य संग्रामात गायले जात, याला मोठा त्याग व बलिदानाचा इतिहास आहे. भाजपने आता इतक्या वर्षांनंतर ते स्वीकारले याचा आम्हाला आनंदच आहे. पण आता भाजपा या गीताचा वापर राजकीय हेतूने करत आहे. हे पवित्र गीत धार्मिक वा जातीय दंगे घडवण्यासाठी तसेच सामाजिक शांतता भंग करण्यासाठी नाही असे बजावून ‘वंदे मातरम्’ गीतावरचे भाजपाचे प्रेम हे पुतणा मावशीचे आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले..

पत्नीचा खून करून ,जाळून, राखेचीही लावली विल्हेवाट: ती बेपत्ता म्हणून दिली फिर्याद पण .. चौकशीच्या फेऱ्यात उलगडली कहाणी

पुणे-पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद देऊन त्याबाबत पाठपुरावा करणाऱ्या पतीनेच तिचा खून करून मृतदेह भट्टीत नष्ट केला नंतर राख आणि अस्थी मुठा नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. वारजे पोलिसांनी कौशल्याने तपास करून या खुनाचा छडा लावत एका गॅरेजचालकाला अटक केली. समीर पंजाबराव जाधव (४२, रा. शिवणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याचे पत्नी अंजली (४०) हिचा निर्घृण खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले. तपासासाठी त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

अनैतिक संबंधांच्या कारणावरून हा खून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली. समीरने पुणे -सातारा रस्त्यावर वारूळवाडी परिसरात पत्र्याची एक शेड भाड्याने घेतली. तेथे त्याने एक लोखंडी बॉक्स नेऊन ठेवला. तसेच, वखारीतून जळणाची लाकडे तेथे नेऊन ठेवली. त्यानंतर, २६ ऑक्टोबर रोजी त्याने अंजलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने कारमधून खेड शिवापूर परिसरात नेले. तेथे घाटात फिरल्यानंतर त्याने भेळ विकत घेतली व नवीन शेड दाखवण्याच्या निमित्ताने अंजलीला शेडमध्ये नेले. तेथे उभयतांनी भेळ खाल्ली. ती पूर्ण बेसावध असताना समीरने अचानक गळा दाबून करुन तिचा मृतदेह शेडमध्ये जाळून टाकला. तिची राख व अस्थीही त्याने नदीत सोडल्या. नंतर, त्याने तो बॉक्सही जाळून टाकून पूर्ण पुरावा नष्ट केला. त्याचवेळी त्याने स्वतः:च पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली.आरोपी समीर याचे वारजे परिसरात गॅरेज आहे. तो पत्नी अंजलीसोबत त्याच परिसरात वास्तव्याला होता. त्याने पत्नी बेपत्ता असल्याची फिर्याद २६ ऑक्टोबर २०२५ ला वारजे पोलिस ठाण्यात नोंदवली. त्याबाबत तो वारंवार पोलिस ठाण्यात जाऊन तक्रारीचा पाठपुरावा करत होता. अंजली ज्या दिवसापासून बेपत्ता झाली, तेव्हापासून तिच्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण पोलिसांनी केले. तसेच, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्याबाबत पोलिसांनी समीर याच्याकडे बारीकसारीक चौकशी केली. त्यामध्ये तो देत असलेल्या माहितीत तफावत आढळल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्यांनी समीरची कसून चौकशी केली. पोलिसांच्या प्रश्नाच्या सरबत्तीपुढे समीरचा निभाव लागला नाही. त्याने आपणच पद्धतशीर कट रचून अंजलीचा खून केल्याची कबुली दिली.

विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरीलही शिक्षण द्या-राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे आवाहन

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ उत्साहात

पुणे : विद्यार्थी हा आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. त्यांना पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीतील सर्वांगिण दृष्टीकोन विकसित करणारे, समाजाप्रती संवेदनशील बनविणारे, मानसिक व शारीरिक आरोग्य अबाधित राखत कायम सकारात्मक दृष्टीकोन देणारे, पुस्तकाबाहेरील शिक्षण द्यायला हवे. कारण, विद्येचे अंतिम उद्दिष्ट केवळ पदवी मिळवणे नव्हे; मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करणे, स्वतःला देशाच्या प्रगतीसाठी समर्पित करणे — हेच खऱ्या शिक्षणाचे यश आहे.

अपयश हे शेवट नसते, तर नव्या प्रवासाची सुरुवात असते. त्यामुळे, अपयशाला यशाची शिडी बनवून तुमच्या ज्ञान, कर्तृत्व आणि संवेदनशीलतेच्या बळावर भारताला जागतिक महासत्ता बनवा, असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.

ते येथे आयोजित एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी-एडीटी), विश्वराजबाग, पुणेच्या ८व्या दीक्षांत समारंभप्रसंगी बोलत होते. या प्रसंगी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मंडीचे संचालक प्रा. डॉ. लक्ष्मीधर बेहरा, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, भारत सरकारच्या तंत्रज्ञान, नवोन्मेष, उष्मायन व उद्यमशीलता क्षेत्रातील राष्ट्रीय तज्ज्ञ सल्लागार परिषदेचे अध्यक्ष श्री. रामानन रामनाथन, ‘ग्लास मॅन ऑफ इंडिया’ म्हणून परिचित ‘गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्रीज’चे चेअरमन श्री. सुभाष त्यागी, एसएसपीएल ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक तथा राष्ट्रीय रिअल इस्टेट विकास परिषदेच्या (नारेडको) राष्ट्रीय अध्यक्षा स्मिता पाटील, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, सौ. ज्योती ढाकणे-कराड, डॉ. विनायक घैसास, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. लक्ष्मीधर बेहरा यावेळी म्हणाले की, भारतीय परंपरेत आनंद स्वतःत शोधला जातो. भगवद्गीता आपल्याला समाधानी राहायला शिकवते, असे सांगताना त्यांनी अनुभवाधारित शिक्षणाद्वारेच भारत आत्मनिर्भर होऊ शकतो, असे मत व्यक्त केले.

रामानन रामनाथन यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने निर्माण केलेले जागतिक स्थान आणि भविष्यातील संशोधनाची गरज यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित केले. स्मिता पाटील यांनी राष्ट्रीय रिअल इस्टेट विकास परिषदेच्या कार्याची माहिती देताना एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला आणि पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

काच उत्पादनात प्रचंड रोजगार निर्मितीची क्षमता – सुभाष त्यागी

मी विद्यार्थी दशेत अभ्यासात हुशार नव्हतो, मात्र माझ्यात मेहनत करण्याची प्रचंड इच्छाशक्ती होती. त्याच इच्छाशक्तीच्या बळावर आज गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्रीजची वार्षिक उलाढाल १० हजार कोटींपेक्षा अधिक झाली असून ४ हजारांहून अधिक लोकांना रोजगार देऊ शकलो. भारतात सध्या दररोज १ लाख टन काचेची गरज भासते, मात्र उत्पादन फक्त २० हजार टन आहे. त्यामुळे काच उत्पादन क्षेत्रात संशोधन आणि रोजगार निर्मितीसाठी प्रचंड वाव आहे, असे मत ‘ग्लास मॅन ऑफ इंडिया’ सुभाष त्यागी यांनी व्यक्त केले. त्यांनी आज मिळालेल्या डी.लिट पदवीमुळे आत्मविश्वास अधिक दृढ झाल्याचेही सांगितले.

“एमआयटी एडीटी विद्यापीठाने कायमच विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण पुरवित कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःला विविध आघाड्यांवर सिद्ध केले आहे. त्याचमुळे विद्यापीठाने नॅक मानांकन, एनआयआरएफ आणि क्यूएस रँकिंगमध्ये ठसा उमटवत जागतिक पातळीवर नाव कमावले आहे. संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयटी एडीटी विद्यापीठ आता आपल्या ‘२.०’ मोहिमेवर असून, त्यातून देशात अव्वल स्थान मिळवत भारताला आत्मनिर्भर करणारे विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न करणार आहे. आज पदवी मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रात नेतृत्व करत भारताला आत्मनिर्भर बनवावे.”
— प्रा. डॉ. मंगेश तु. कराड,
कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती,
एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे
मान्यवरांसह डॉ. मंगेश कराडांचा सन्मान

एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून श्री. रामानन रामनाथन यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (D.Sc.) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. तसेच ‘ग्लास मॅन ऑफ इंडिया’ म्हणून परिचित श्री. सुभाष त्यागी यांना औद्योगिक नेतृत्वाबद्दल ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ (D.Litt.) या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. यासह, डॉ. मंगेश कराड यांना माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ‘उत्कृष्टतेचे शिल्पकार’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

एकूण ३३३४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

राष्ट्रगीत आणि विश्वशांती प्रार्थनेद्वारे सुरू झालेल्या या कार्यक्रमात २१ पीएचडी, २१ सुवर्णपदके आणि १९५ विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते एकूण ३३३४ विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी पालक आणि विद्यार्थ्यांसह देशभरातून ८ हजारांहून अधिक लोकांनी हजेरी लावली. यावेळी राजदंडासह काढण्यात आलेल्या आकर्षक मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘पसायदान’ने सांगता झालेल्या या कार्यक्रमाचे आभार प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. स्नेहा वाघटकर, प्रा. स्वप्निल शिरसाठ आणि डॉ. अशोक घुगे यांनी केले.

महापालिकेचा पेट स्कॅन मशिन, रेडिओ डायग्नोस्टिक व प्रयोगशाळा प्रकल्प लवकरच होणार सुरु

ससून मध्ये पेट स्कॅन प्रकल्प रखडला वर्षाहून अधिक काळ

पुणे- कर्करोगाचा शरीरात किती व कोठे प्रसार झाला आहे याची तपासणी करण्‍यासाठी दीड वर्षापूर्वी आलेली ससून रुग्णालयातील ‘पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी’ (पेट स्कॅन) तपासणी मशीन दिरंगाई च्या कारभारातून आता मुक्त होते आहे तर पुणे महापालिकेचा देखील पेट स्कॅन मशिन, रेडिओ डायग्नोस्टिक व प्रयोगशाळा प्रकल्प याच डिसेम्बर महिन्यात सुरु होणार आहे. सुमारे १५ हजार रुपये या तपासणी साठी खाजगी रुग्णालयात खर्च येतो रुबी हॉल, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि अन्य काही मोजक्या ठिकाणी पेट स्कॅन मशिन आहेत . ससून मध्ये हि मशीन दीड वर्षापूर्वी आणली गेली मात्र पहिले सहा महिने या रुग्णालयात ती धूळ खात पडली नंतर ती बसविली गेली. रोज खाजगी रुग्णालयात ३० ते ४० रुग्णांच्या तपासण्या होतात तर ससून मध्ये मात्र अवघ्या ४ ते ५ तपासण्या सुरु झाल्या होत्या नंतर त्याही बंद झाल्या आणि आता पुन्हा त्या सुरु होत असल्याचे सांगण्यात येते आहे.

दरम्यान पुणे शहरामध्ये कोणत्याही महापालिकेच्या किंवा सरकारी रूग्णालयामध्ये पेट स्कॅनची सुविधा उपलब्ध नाही आणि यामुळे कर्करोग ग्रस्त गरीब रूग्णांना खाजगी रूग्णांलयांवर अवलंबुन रहावे लागते व खाजगी रूग्णालयाचे दर गरीब व गरजू रूग्णांना परवडणारे नसतात. यावर उपाययोजना म्हणुन पुणे महापालिके मार्फत पीपीपी तत्वावर पेट स्कॅन व रेडियो डायग्नोस्टिक प्रकल्प पुणे मनपा मार्फत कार्यान्वित करण्यात येत आहे.
दि.०४/११/२०२५ रोजी महापालिका आयुक्त नवल किशोर राम , आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे,सहा. आरोग्य अधिकारी डॉ. संजीव बावरे, यांनी स्वारगेट हिराबाग आरोग्य कोठी लगत सुरू असलेल्या स्व. वंसतदादा पाटील प्रशिक्षण केंद्राच्या इमारती येथे पेट स्कॅन व रेडियो डायग्नोस्टिक प्रयोगशाळा प्रकल्पाची पाहाणी केली .सध्याच्या काळामध्ये कर्करोगाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठयाप्रमाणावर वाढ होत आहे. कर्करोगाचे निदान करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेले पेटस्कॅनची सुविधा कोणत्याही पुणे मनपाच्या रुग्णालयामध्ये उपलब्ध नाही. पुणे महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका असू शकेल ज्यामध्ये पेटस्कॅनची सुविधा उपलब्ध होणार असून गरीब व गरजू रूग्णांना परवडेल अशा सीजीएचएस दरामध्ये उपलब्ध होणार आहे.पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका पेट स्कॅन व रेडियो डायग्नोस्टिक प्रयोगशाळा सुविधा देणारी ठरेल. यामध्ये पॅथॉलॉजी, बायोकेमीस्ट्री लॅब, एमआरआय, सीटी स्कॅन या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे.महापालिका आयुक्त यांनी सदरच्या प्रकल्पाबाचत कामाचा आढावा घेतला व योग्य त्या सुचना दिल्या आहेत आणि हा प्रकल्प माहे डिसेंबर २०२५ अखेर पर्यंत पुर्ण करून सुरु करण्याचे आदेश देखील दिले आहेत .


 अखेरीस कर आकारणी आणि कर संकलन विभाग प्रमुखपदी रवी पवार

माधव जगतापांना दिले आकाशचिन्ह व परवाना विभाग आणि अग्निशमन विभाग, तर अरविंद माळी यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन तर आशा राऊत यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभाग 

पुणे- कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख पदावरील जोरदार रस्सीखेच होती यात अखेरीस कर आकारणी आणि कर संकलन विभाग प्रमुखपदी रवी पवार यांची नियुक्ती झाली आहे तर माधव जगतापांना आकाशचिन्ह व परवाना विभाग आणि अग्निशमन विभाग देण्यात आले आहे.कर आकारणी बरोबर रवी पवार यांच्याकडे महात्मा फुले वाडा आरक्षित क्षेत्राचे संपादनचे कामकाज आणि क्रीडा विभागही सुपूर्त करण्यात आला आहे. काल महापालिका अधिकाऱ्यांच्या खाते वाटपात काही बदल करण्यात आले यापूर्वी ३१ ऑक्टोबर ला महापालिका आयुक्तांनी खाते वाटप केले होते आता यापुढे पहा कोणत्या बदल झालेल्या अधिकाऱ्याकडे कोणती खाती


प्रसाद काटकर – १) परिमंडळ क्र. ३ विभाग २) निवडणूक विभाग (३) महापालिका आयुक्त यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD)

२) सोमनाथ बनकर – १) अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग

३) प्रशांत ठोंबरे – १) मालमत्ता व व्यवस्थापन विभाग २) दक्षता विभाग

४) विजय लांडगे – १) स्थानिक संस्था कर विभाग २) जनगणना विभाग ३) जनरल रेकॉर्ड

५) किशोरी शिंदे – १) परिमंडळ १ २) उपायुक्त प्रशासन अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ) उप आयुक्त (विशेष) विभाग ४) मुद्रणालय विभाग

६) रवि पवार – १) कर आकारणी व कर संकलन विभाग २) महात्मा फुले वाडा आरक्षित क्षेत्राचे संपादनचे कामकाज ३) क्रीडा विभाग

७) माधव जगताप – १) आकाशचिन्ह व परवाना विभाग २) अग्निशमन विभाग

८) जयंत भोसेकर – १) समाज कल्याण विभाग २) समाज विकास विभाग ३) मागासवर्ग विभाग ४) तक्रार निवारण अधिकारी (दिव्यांग)

९) संदीप खलाटे – १) झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन २) पुणे मनपा वसाहती ( चाळ विभाग)

१०) संदीप कदम – घनकचरा व्यवस्थापन विभाग

११) वसुंधरा बारवे – १) प्राथमिक शिक्षण विभाग २) माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग संनियंत्रण (३) प्रशिक्षण प्रबोधिनी

१२) विजयकुमार थोरात – १) सामान्य प्रशासन विभाग २) तांत्रिक विभाग ३) बीओटी सेल

१३) संतोष वारुळे – १) परिमंडळ क्र. २ विभाग २) सांस्कृतिक केंद्र विभाग

१४) अरविंद माळी – १) परिमंडळ क्र. ४ विभाग २) आपत्ती व्यवस्थापन विभाग

१५) अविनाश सकपाळ- १) मोटार वाहन विभाग २) पर्यावरण विभाग

१६) निखील मोरे – भूसंपादन व व्यवस्थापन विभाग, परिमंडळ क्र ५

१७) राहुल जगताप, ई- प्रशासक ( प्रभारी पदभार ) – माहिती तंत्रज्ञान विभाग

१८) श्री. रमेश शेलार (मुख्य सुरक्षा अधिकारी) – सहाय्यक अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग प्रमुख, उप आयुक्त यांच्या अधिनिस्त कामकाज करणे.

१९) आशा राऊत – १) मध्यवर्ती भांडार विभाग २) सुरक्षा विभाग सनियंत्रण

२०) तुषार बाबर – १) माहिती व जनसंपर्क विभाग २) सोशल मीडिया कक्ष ३) मंडई विभाग

डेअरीच्या जागेवर डल्ला…! पुण्यात आणखी एक १५०० कोटींचा गैरव्यवहार….

डेअरीच्या जागेवर डल्ला…! पुण्यात आणखी एक १५०० कोटींचा गैरव्यवहार, बोपोडी जमीन प्रकरणात एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा….

पुणे : कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. यादरम्यान पुण्यातील बोपोडी येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन बळकावल्याचा आणखी एक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये पुणे शहराचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन करण्यात आहे. येवले यांच्यावर शासकीय जमिनींचा अपहार केल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारने त्यांना निलंबित केले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत या घोटाळ्यासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही सुमारे १ हजार ५०० कोटीची जमीन कशी नावावर करण्यात आली याबद्दल खडसे यांनी मोठे खुलासे केले आहेत.

खडसे म्हणाले की, काल पुणे येथील खडक पोलीस ठाण्यात एक एफआयआर दाखल झाला. हा एफआयआर हेमंत गावंडे, राजेंद्र विद्वांस, ऋषिकेश विद्वांस, मंगल विद्वांस तसेच विद्यानंद पुराणिक, जयश्री संजय एकबोटे, शीतल तेजवानी, दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्याविरोधात झाला. सर्वे नं. ६२, फायनल प्लॉट नं. १४ बोपोडी १४ या गट नंबरसंबंधी आहे. हा गट नंबर १५ एकरचा आहे. या सर्वांनी बनवट कागदपत्रे तयार करून त्यांनी ही जमीन आपल्या नावावर करून घेतल्याचा गुन्हा आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

२०१४ च्या सुमारास याच्यावर टीडीआर मिळावा म्हणून त्यांनी पुणे महापालिकेकडे अर्ज केला. फाइल अंतिमतः टीडीआरचा पैसा देण्याच्या संदर्भात मंजूरीपर्यंत आली, यादरम्यान २०१४ च्या काळात जेव्हा मी विरोधपक्षनेता होतो, तेव्हा हा विषय माझ्या लक्षात आणून देण्यात आला. त्यानंतर मी सरकार आणि आयुक्तांना पत्र लिहिले. ज्यामध्ये या जागेचा टीडीआर मंजूर करू नये अशी सूचना मी सरकारला केली. पण तरीही त्यावर पुढे कारवाई झाली नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यानच्या काळात हा टीडीआरचा प्रस्ताव माझ्याकडे प्रलंबित होती. यावर मी आदेश दिला होता की, ही जमीन आपली आहे आणि ही कोणालाही देता कामा नये. मधल्या काळात त्यांनी ही जमीन आपल्या नावावर लावण्याचा आणि टीडीआर मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी तो मिळवला. ही जमीन त्यांनी २०१५ च्या काळात मिळवली. कृषीमंत्री या नात्याने ही फाइल माझ्याकडे होती, यावर कारवाई होत नव्हती म्हणून मी कृषी महाविद्यालयाच्या डीनला सूचना केल्या की हेमंत गावंडे आणि इतरांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा. तेव्हा माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

१ फेब्रुवारी २०१५ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. आत्ता काल जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये योगायोगाने हेच आरोपी आहेत. हेमंत गावंडे हा क्रिमीनल आहे. याने अनेकांना फसवलं आहे. ही जमीन त्याला न मिळू न दिल्याने त्याने भोसरी प्रकरणात माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला. या लोकांना मी पाठीशी घातलं नाही म्हणून या सर्वांनी भोसरी प्रकरणात माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

ही जमीन फार पूर्वी पेशव्यांची जमीन होती, त्या काळात भट म्हणून एक कुटुंब होतं. त्या कुटुंबाला पेशव्यांनी उदर निर्वाहासाठी ही जमीन दिली होती. त्यामध्ये एक अट होती की, कुटुंबामध्ये जोपर्यंत मुलगा होत राहिल तोपर्यंत राहिल मुलगी जन्माला आली तर हा अधिकार राहाणार नाही. त्या कुटुंबात जोपर्यंत मुलगा होता तोपर्यंत हा अधिकार त्यांच्याकडे राहिला नंतर मुलगी जन्माला आल्यानंतर हा अधिकार संपला. ही जमीन सरकारजमा झाली. नंतर १८८३ पासून ही सरकारी जमीन आहे. १९२० साली ही जमीन कृषी महाविद्यालयासाठी देण्यात आली. तेव्हापासून ही कृषी विभागाकडे आहे. ही जमीन अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे.

शिवाजीनगर परिसरातील या जमीनीला मोठा भाव आहे. आजचा बाजारभावाप्रमाणे याची किंमत पाहिली तर पंधराशे कोटीं रूपयांच्या आसपासची ही जमीन आहे. १५०० कोटी रूपयांची ही जमीन विद्वांस कुटुंबाला हाताशी धरून हेमंत गावंडे, तेजवानी या कंपीनीने आम्ही कूळ आहोत असे कागदपत्रे तयार केले. ही जमीन कृषी महाविद्यालयाच्या अखत्यारीत असताना त्यांनी हा प्रकार २००९ पासून सुरू केला. तेव्हापासून या जमीनीचा पाठपुरावा केला जात होता, असा आरोप एकनाथ खडसे म्हणाले.

पुण्याच्या डीपी प्लॅनमध्ये ही मोकळी जमीन पुणे ट्रान्सपोर्ट विभागाला रिझर्वेशनसाठी दाखवण्यात आली, त्यामुळे ही पडून राहिली. पण तरीही ही जमीन आमची आहे असे दाखवून त्यांनी कागदपत्रे तयार करून सरकारकडे अपील केलं. हेमंत गावंडे यांनी तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडे जमीन परत देण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी ते नाकारलं. त्यानंतर ते आयुक्तांकडे गेले. आयुक्तांनी देखील ही सरकारी जमीन असल्याचा निर्णय दिला. त्या निर्णयाविरोधात त्यांनी मंत्र्यांकडे अपील केलं, त्यांनीही नाकारल्यानंतर ते उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने सरकारला चार आठवड्यात निर्णय घेण्यास सांगितल्यानंतर ती फाइल सरकारकडे आली आणि परत सरकारने ती नाकारली.

दिल्ली विमानतळावर सायबर हल्ल्याचा संशय: 12 तासांसाठी फ्लाइट्स ऑपरेशन बंद होते

नवी दिल्ली-इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उड्डाणांमध्ये अचानक झालेल्या व्यत्ययाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. यामध्ये बाह्य शक्तींचा किंवा सायबर हल्ल्यांचा समावेश होता का याचाही तपास सुरू आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) कार्यालयात एक उच्चस्तरीय बैठक बोलावली, ज्यामध्ये विमानतळ आणि सुरक्षा एजन्सींसह सर्व भागधारकांना बोलावण्यात आले.

बैठकीत फ्लाइट प्लॅन सिस्टीममध्ये अचानक झालेल्या बिघाडाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. सिस्टीम बिघाड बाह्य हस्तक्षेपामुळे झाला की तोडफोडीमुळे झाला हे निश्चित करण्यासाठी हे केले जात आहे. शिवाय, सायबर हल्ल्याची शक्यता देखील तपासली जात आहे.
एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) च्या सूत्रांनी सांगितले की, स्वयंचलित प्रणाली लागू झाल्यापासून इतक्या दीर्घ काळासाठी विमान सेवा बंद पडणे अभूतपूर्व होते. दिल्ली विमानतळावरील विमान वाहतूक सुमारे २४ तास विस्कळीत होती.

ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टम (AMSS) मधील बिघाड हा एक मोठा, समन्वित सायबर हल्ला असल्याचा संशय आहे. एकाच टर्मिनलमधून उद्भवलेल्या या समस्येमुळे संपूर्ण सिस्टम क्रॅश झाली.
एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स (एटीसी) ने दावा केला की ही घटना टाळता आली असती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एटीसी गिल्ड ऑफ इंडियाने म्हटले आहे की, “आम्ही या वर्षी जुलैमध्ये एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) ला विमानतळाच्या ऑटोमेशन सिस्टममधील त्रुटी आणि अपग्रेडची आवश्यकता याबद्दल सतर्क केले होते, परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.”
एटीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एएमएसएस लागू करण्यापूर्वी, विमान कंपन्यांकडून उड्डाण योजना मॅन्युअली प्राप्त होत होत्या. ही प्रणाली सुरू झाल्यानंतर, उड्डाण योजना मेसेजिंगद्वारे प्राप्त होत होत्या आणि एटीसीने त्या आधारे टेकऑफ आणि लँडिंगचे निर्णय घेतले होते. सिस्टम क्रॅश झाल्यानंतर शुक्रवारी विमानतळावर मॅन्युअल ऑपरेशन्स आवश्यक होते.

विमानतळ अधिकाऱ्यांनी प्रवाशांसाठी एक सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की AMSS मध्ये सतत सुधारणा होत आहे परंतु प्रवाशांनी रिअल-टाइम फ्लाइट माहितीसाठी त्यांच्या एअरलाइन्सच्या संपर्कात राहावे.
७ नोव्हेंबरची संपूर्ण हकीकत…

शुक्रवारी दिल्ली विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ऑटोमॅटिक मेसेज स्विच सिस्टम (एएमएसएस) मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे १२ तासांहून अधिक काळ विमान वाहतूक विस्कळीत झाली. ८०० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे उशिराने सुरू झाली आणि २० रद्द करण्यात आली. सिस्टममध्ये बिघाड सकाळी ९ वाजता झाला आणि रात्री ९:३० च्या सुमारास दुरुस्त करण्यात आला.भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) आज संध्याकाळी घोषणा केली की AMSS प्रणाली सक्रिय आहे आणि योग्यरित्या कार्यरत आहे. या प्रणालीतील बिघाडामुळे दिवसभर विमानतळावरील प्रवाशांची गैरसोय झाली होती, बोर्डिंग गेटवर लांब रांगा लागल्या होत्या. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24 नुसार, सर्व उड्डाणे सरासरी 50 मिनिटे उशिराने झाली.दिल्ली विमानतळावरील उड्डाण विलंबाचा परिणाम मुंबई, भोपाळ, चंदीगड आणि अमृतसरसह देशभरातील अनेक विमानतळांवर जाणवला. दिल्लीला येणारी आणि येणारी विमाने देखील उशिराने सुरू झाली. इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, स्पाइसजेट आणि अकासा एअरलाइन्सने दिवसभर उड्डाणांची माहिती दिली.

पार्थ पवार प्रकरणातील शीतल तेजवानीने देश सोडल्याच्या बातमीने खळबळ

0

पुणे-पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमिनीचा गैरव्यवहारप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा थेट सहभाग आढळून आल्याने टीकेची झोड उठली आहे. याप्रकरणी सहजिल्हा निबंधक (वर्ग 1) संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर जमीन विक्रेती शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सह-दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मुंढवा आणि बोपोडी येथील जमीन घोटाळ्यांची सूत्रधार मानली जाणाली शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.शीतलने देश सोडून पलायन केल्याच्या माध्यमातील वृत्ताने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शीतल तेजवानी हिच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झाले असून, तिचा मोबाईल बंद आहे. तसंच पोलिसांनी ती घरीही आढळून आलेली नाही. शीतल ही पतीसह देश सोडून पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे. बावधन पोलीस हे इमिग्रेशन विभागाकडे माहिती मागवून तिच्या परदेश प्रवासाची खात्री करणार आहेत.पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात शितल तेजवानी हे एक महत्त्वाचे पात्र म्हणून समोर आलं आहे. ही जमीन बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती. शितल तेजवानीने ही जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवण्यासाठी आणि विक्रीसाठी 272 मूळ मालकांकडून नाममात्र पैसे देऊन कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी मिळवली. त्यानंतर तिने अमेडिया कंपनीला ही जमीन विकली. अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांची 99 टक्के आणि सुनेत्रा पवार यांचे भाचे दिग्विजय पाटील यांची 1 टक्के भागीदारी आहे. वादग्रस्त शीतल तेजवानीचा इतिहास घोटाळ्यांचा राहिला असून, तिचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी आहे. सागर आणि शितल यांच्यावर 100 कोटी रुपयांहून अधिक कर्ज असल्याचंही समोर आलं आहे.

अलका भुजबळ यांना “रापा” पुरस्कार प्रदान

मुंबई-न्यूज स्टोरी टुडे पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांना “उत्कृष्ठ पोर्टल निर्मात्या”म्हणुन दूरदर्शन निवेदिका तथा चित्रपट निर्मात्या अमृता राव यांच्याहस्ते ” रापा” पुरस्कारदेऊन नुकतेच गौरविण्यात आले. यावेळी जेष्ठ चित्रपट निर्माते _ दिग्दर्शक श्री किरण शांताराम , जेष्ठ चित्रपट तंत्र तज्ञ उज्ज्वल निरगुडकर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख होते.

पुरस्कार स्विकारल्यावर बोलताना, अलका भुजबळ यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी कोरोनाच्या भयंकर परिस्थितीत लोकांना घाबरवून न सोडता धीर, दिलासा देण्यासाठी, स्वतः पत्रकार असलेल्या मुलीने; देवश्रीने हे पोर्टल सुरू केले. ज्या उद्देशाने पोर्टल सुरू करण्यात आले, त्या उद्देशांशी पोर्टल आजतागायत प्रामाणिक राहीले आहे. त्यामुळेच कला, साहित्य, संस्कृती, आरोग्य, विद्यान, यश कथा, पर्यटन विश्व बंधुत्व असा जग भरातील लोकांच्या भल्याचाआशय सचित्र तसेच शक्य असल्यास व्हिडिओ सह प्रसारीत करण्यात येतो.पुरस्कार स्विकारताना, या पोर्टलचे संपादन करणारे, त्यांचे पती देवेंद्र भुजबळ यांना त्यांनी आवर्जून व्यासपीठावर बोलावून घेऊन, त्यांच्यासह पुरस्कार स्विकारला.

यावेळी रेडियो ,टीव्ही ,समाज माध्यमांतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सरिता सेठी आणि ब्रिज मोहन यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच रेडिओ, टीव्ही, क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विविध कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रद्य यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रारंभी रापा चे प्रमुख रत्नाकर तारदाळकर यांनी आपल्या प्रास्ताविकातरापा च्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा सादर केला.पुरस्कार प्रदान करण्याच्यादरम्यान सादर करण्यात आलेल्या विविध मनोरंजन पर कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमास रेडियो, टीव्ही क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ति उपस्थित होत्या.

चुकीला माफी नाही, पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे:- रवींद्र धंगेकर

पुणे– सामान्य माणसांना साधे रेशन कार्ड मिळत नाही. ही संपूर्ण यंत्रणा बोगस आहे माती खात आहे. पार्थ पवारांकडे अजित पवारांचा मुलगा म्हणूनच पाहिले जाते. शेवटी वडिलांची पॉवर मुलगा वापरतच असतो. काल अजित पवारांनी व्यवहार रद्द करतो असे सांगितले. पण आता असे जमणार नाही कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.रवींद्र धंगेकर म्हणाले की, चोरी करायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचे की धरा पैसै असे जमत नाही. कोरेगाव प्रकरणी अजित पवार यांनी व्यवहार रद्द होईल या वक्तव्यावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. तर चूकीला माफी नाही, कारवाई झाली पाहिजे. याच प्रकरणी जैन बोर्डिग प्रकरणी सुद्धा कारवाई झाली पाहिजे. 300 कोटी, 500 कोटी हे पैसै येतात कुठून? याची ईडी मार्फत चौकशी केली गेली पाहिजे.

रवींद्र धंगेकर म्हणाले की, अजित पवार यांचे कोणी ऐकत नाही हे मी या प्रकरणाच्या दोन दिवसांपूर्वीच बोललो. पक्षांमध्येही त्यांचे कुणी ऐकत नाही आणि काल ते बोलले की मुले मोठी झाली ते ऐकत नाही. अजित पवार यांची प्रतिमा खराब होत आहे. जैन बोर्डिंग प्रकरणात गोखलेंकडे ऐवढे पैसै नाहीत हे पैसे नेमके कुणाचे हे शोधले पाहिजे. दोन्ही व्यवहारामध्ये दोषींवर कारवाई झाली पाहिजे.

रवींद्र धंगेकर म्हणाले की, कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमिनीचा विषयामध्ये दोन दिवसांमध्ये इतक्या घडामोडी झाल्या की मला बोलण्याची संधीच मिळाली नाही.मी या प्रकरणी माहिती घेतली तेव्हा मला समजले की शीतल तेजवानी यांना देण्यात आलेले कुलमुक्तार पत्र हेच बोगस होते. जी जीन त्यांच्या नावावरच नाही त्यांना परस्पर कुलमुक्तार पत्र देता येत नाही, कारण सातबाराच नाही. मूळ कागदपत्रावर नाव नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन जणांवर गुन्हे दाखल केले यात पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही हे माहिती नाही. यावर अजित पवारांनी आम्ही व्यवहार रद्द करू असे काल सांगितले. जैन बोर्डिंग आणि हा कोरेगाव पार्क जमिनीचा दोन्ही कांड सारखे आहेत. यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आणि जैन बोर्डिंग प्रकरणी ती कारवाई झाली नाही.

रवींद्र धंगेकर म्हणाले की, या प्रकरणी जर दादांचा मुलगा आहे तर जैन बोर्डिंग प्रकरणी खासदार होते हे सर्व लपवा छपवीचा प्रकार आहे. मग एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा हे नाही होऊ शकत. अजित पवार यांच्या मुलावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. कारण त्यांने चुकीचे केले आहे. चुकीला माफी नाही पण ही महार वतनाची जमीन ती शासनाने ताब्यात घेतली, मग ज्यांच्या नावावर होती त्यांनी कुलमुक्तार पत्र दिले. पहिले कुलमुक्तार पत्र दिले यामध्ये सरकारी यंत्रणेने माती खाली आहे.

वंदे मातरम् संघटनेच्या टीमकडून काश्मीरमधील जवानांना फराळ

पुणे: वंदे मातरम् संघटनेच्या टीमकडून जम्मू-काश्मीरमधील जवानांना फराळ वाटप करण्यात आला. काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौक, हरिसिंग स्ट्रीट, पंचमुखी हनुमान मंदिर यासह सीमेवर तैनात जवानांना दिवाळी फराळ देऊन वंदे मातरम् संघटनेने देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
तसेच कार्तिक पौर्णिमा आणि वैकुंठ चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर येथे कायमस्वरूपी बसवलेल्या गणपतीची विधिवत पूजा व भंडारा संपन्न झाला. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, भारतमाता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी वंदे मातरम् संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सचिन जामगे, आयटी व माहिती अधिकार अध्यक्ष विशाल शिंदे, संपर्क प्रमुख अमोल भुरेवार, मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व जवान तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सूक्ष्म व लघु उद्योगांना जागतिक बाजारपेठेकडे नेणारी परिषद ठरेल प्रभावी माध्यम

पुणे, :
महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आणि इंडिया एस एम इ फोरम (सूक्ष्म उद्योग मंच )यांच्या संयुक्त विद्यमाने, केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ‘रॅम्प’ (सूक्ष्म उद्योग कार्यक्षमता वृद्धी व गती योजना) या उपक्रमांतर्गत राज्यातील द्वितीय आंतरराष्ट्रिय खरेदीदार-विक्रेता परिषद मोठ्या उत्साहात पार पडली.
सदर परिषद विमाननगर, पुणे येथील फोर पॉइंट्स बाय शेरेटन हॉटेलमध्ये ६ व ७ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसांदरम्यान आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या उद्घाटन सत्राला महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विकास पानसरे (भा.प्र.से.), इंडिया सूक्ष्म उद्योग मंचाचे अध्यक्ष श्री. विनोद कुमार, महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती प्रशाली दिघावकर, तसेच मंचाच्या महासंचालिका श्रीमती सुषमा मोरथानिया उपस्थित होत्या.
या परिषदेत १६ देशांतील ४१ परदेशी खरेदीदार तसेच महाराष्ट्रातील ३०० हून अधिक सूक्ष्म व लघु उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले. परिषदेदरम्यान ५०० हून अधिक व्यावसायिक बैठका घेण्यात आल्या. या बैठकींत उद्योगांमधील सहकार्य, निर्यातवृद्धी, उत्पादन गुणवत्ता, तंत्रज्ञान देवाणघेवाण व नव्या व्यावसायिक संधींवर सखोल विचारविनिमय झाला.
महाराष्ट्रातील उद्योजक आणि परदेशी खरेदीदार यांच्यात एकूण ३२ सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे राज्यातील सूक्ष्म व लघु उद्योगांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडले जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या परिषदेत निर्यातविषयक मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय व्यापारातील संधी, निर्यात प्रक्रियेतील अडथळे, गुणवत्तेचे जागतिक निकष, व्यापार प्रोत्साहन धोरणे आणि तांत्रिक सक्षमीकरण या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
समारोप सत्रास भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय रॅम्प विभागाचे उपसंचालक श्री. नरेंद्र जीना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. त्यांनी सहभागी उद्योजकांचे अभिनंदन करताना सूक्ष्म उद्योगांनी जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवकल्पना, गुणवत्ता आणि प्रामाणिकता या तिन्ही अंगांनी सज्ज राहावे, असे आवाहन केले.
या द्वितीय आंतरराष्ट्रिय खरेदीदार-विक्रेता परिषदेच्या यशस्वी आयोजनातून महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे वाटचाल करण्याचा, निर्यात क्षमतेला चालना देण्याचा आणि राज्याच्या औद्योगिक प्रगतीला गती देण्याचा नवा टप्पा गाठला आहे.