मुंबई.दि.१०: केरळमध्ये नवनिर्वाचित काँग्रेस महिला आमदार यांना पक्षातील ज्येष्ठ नेते चेरियन फिलिप यांनी सार्वजनिक ठिकाणी, पक्षाच्या कार्यालयात मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय, असंस्कृतिक आणि महिलांच्या व्यक्तिगत सीमांचा स्पष्ट भंग करणारा आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “एका महिला आमदाराला, तिने स्पष्ट नकार दिला असताना, हस्तांदोलनासाठी हात पुढे केला असताना देखील जबरदस्तीने गळ्यात हात टाकून जवळ ओढण्याचा प्रयत्न करणे हे केवळ अनैतिक नाही तर राजकीय क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेच्या आणि प्रतिष्ठेच्या प्रश्नावर गंभीर आघात आहे. भर रस्त्यात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात महिलांना अशा प्रकारे स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, तिच्या अस्वस्थतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे हे पुरुषसत्ताक मानसिकतेचे द्योतक आहे. हे चित्रण केरळ काँग्रेसच्या कार्यालयात झाले, जिथे इतर नेते आणि माध्यमे उपस्थित होती, तरीही कोणाला हस्तक्षेप करण्याची गरज वाटली नाही . दोषी व्यक्तीवर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे. कॅांग्रेसचे नमो शक्ती वंदन विधेयक विरोधाचा बुरखा केरळच्या घटनेने फाडला आहे.बुंदसे गई वो हैदोस नहीं आती हे कॅांग्रेसने लक्षात ठेवावे व महिलांनीही कॅांग्रेसचा भेसूर लक्षात ठेवावा. महिलांना समान आदराने वागवा, त्यांच्या सीमांचा आदर करा. हे केवळ कायद्याचे पालन करणे उपयोगाचे नाही तर ही सर्वांचीच नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे असेही डॅा. नीलम गोर्हे म्हणाल्या.
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचा सरकारविरोधात संताप:शासनाने दिलेले पुरस्कार दिघे समाधीस्थळी अर्पण करणार पुणे-मराठी सिनेसृष्टीचे सुवर्णयुग गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी राज्य सरकार आणि प्रशासनाविरोधात अत्यंत आक्रमक आणि वेदनादायी भूमिका मांडली आहे. आपल्या हक्काच्या जमिनीबाबत उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही पुणे महानगरपालिकेने बिल्डरच्या फायद्यासाठी नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “न्याय मिळत नसेल तर या सरकारी सन्मानांचे काय करायचे?” असा संतप्त सवाल विचारत, आपल्याला मिळालेले सर्व राज्य पुरस्कार आणि मानचिन्हे दिवंगत आनंद दिघे साहेबांच्या समाधीस्थळी अर्पण करून निषेध नोंदवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पुण्यातील धनकवडी परिसरात उषा चव्हाण यांची खाजगी मालकीची जमीन आहे. या मालमत्तेचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयाने संबंधित मालमत्ता अद्याप अविभाजित असल्याचे नमूद केले असून, उषा चव्हाण यांचा मुलगा हृदयनाथ कडू देशमुख यांचा कायदेशीर हिस्साही मान्य केला आहे. असे असतानाही, पुणे महानगरपालिकेने संपूर्ण टीडीआर (TDR) ‘गंगा गोयल इंडिया प्रा. लि.’ या बिल्डर कंपनीच्या फायद्यासाठी मंजूर केल्याचा खळबळजनक आरोप उषा चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
उषा चव्हाण यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालय, संबंधित मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय विभागांकडे वारंवार दाद मागितली. मात्र, इतकी मोठी सिनेतारका असूनही त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे सामान्य नागरिकांच्या मालमत्ता हक्कांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उषा चव्हाण यांची प्रेस नोट
उषा चव्हाण यांनी लिहिले की, मी. ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री Usha Chavan, अत्यंत वेदनादायी परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेसमोर माझी भूमिका मांडत आहे.
माझ्या कुटुंबीयांच्या मालकीच्या व न्यायालयीन वादातील संपत्तीबाबत माननीय उच्च न्यायालयाने दिनांक ०४.०३.२०२६ रोजी स्पष्टपणे नमूद केले आहे की सदर मालमत्ता अद्याप अविभाजित (Undivided) असून माझा मुलगा श्री हृदयनाथ कडू देशमुख त्यामध्ये कायदेशीर हिस्सा अस्तित्वात आहे. तसेच दिनांक २०.१०.२०२३ रोजी सुमारे १३,५४६ चौ.मी. टीडीआर संदर्भात माझ्या बाजूचे हक्क मान्य झालेले असताना देखील पुणे महानगरपालिकेने अचानकपणे संपूर्ण १५,०६६ चौ.मी. टीडीआर हे Ganga Goel India Pvt. Ltd. या बिल्डर कंपनीच्या फायद्यासाठी देण्याची कार्यवाही केली आहे.
सदर DRC क्रमांक 006506, 006507 आणि 006508 दिनांक 07/4/2026 हे न्यायालयीन वास्तव. मालकी हक्क, प्रलंबित वाद आणि माझ्या लेखी हरकती पूर्णपणे डावलून जारी करण्यात आले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर, धक्कादायक आणि सामान्य नागरिकांच्या मालमत्ता हक्कांबाबत भय निर्माण करणारी आहे.
मी वारंवार संबंधित अधिकारी, मा. पंतप्रधान कार्यालय, मा. मुख्यमंत्री, नगरविकास विभाग तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी व निवेदने दिली. मात्र माझे म्हणणे, माझे कायदेशीर हक्क आणि न्यायालयीन आदेश दुर्लक्षित करण्यात आले. जर नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या यंत्रणांनीच अशा प्रकारे वर्तन केले, तर सामान्य माणसाने न्यायासाठी कोणाकडे पाहायचे हा प्रश्न आज निर्माण झाला आहे.
एका वयोवृद्ध कलाकार स्त्रीला, जिने संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी दिले, तिलाच स्वतःच्या हक्कासाठी इतकी वेदनादायक लढाई लढावी लागत असेल, तर सामान्य मराठी कुटुंबांची परिस्थिती किती भयानक असेल याचा विचारही करवत नाही.
आज मला अत्यंत दुःखाने सांगावे लागत आहे की, महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसाच्या मालमत्ता हक्कांचे संरक्षण होईल का याबाबतच प्रश्न निर्माण झाला आहे. कडू कुटुंबीयांचा भाग नसलेल्या बिल्डर संस्थेला संपूर्ण विकास हक्क देऊन मूळ मालकांना संघर्ष करायला लावणे हे कोणत्याही न्यायप्रिय समाजाला शोभणारे नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय, स्वाभिमान आणि रयतेच्या हक्कांसाठी संघर्ष केला. आज पुन्हा सामान्य नागरिकांना स्वतःच्या हक्कांसाठी तशाच प्रकारे लढावे लागत आहे का, असा गंभीर प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र शासनाने १९७० पासून माझ्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल मला अनेक पुरस्कार, ट्रॉफीज आणि सन्मान दिले. मात्र जर न्यायालयीन आदेश असूनही माझे हक्क सुरक्षित राहणार नसतील, तर अशा सन्मानांचे माझ्यासाठी काहीही मूल्य उरत नाही.
म्हणून मी महाराष्ट्र शासनाने मला दिलेले पुरस्कार, मानचिन्हे, ट्रॉफीज आणि प्रमाणपत्रे शासनाकडे परत करण्याचा गंभीर निर्णय घेत आहे. आवश्यकता भासल्यास ती स्व. आनंद दिघे साहेबांच्या समाधीस्थळी अर्पण करून माझा निषेध व्यक्त करेन.
हा विषय मा. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास विभागाशी संबंधित वरिष्ठ नेतृत्वाच्या निदर्शनास अनेक वेळा आणून देण्यात आला आहे. अजूनही न्याय मिळाला नाही तर मला कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने मोठा लढा उभारावा लागेल.
पत्रकार बंधू-भगिनींनो, समाजसेवकांनो आणि महाराष्ट्रातील जनतेनो ही केवळ एका अभिनेत्रीची लढाई नाही; हा सामान्य नागरिकाच्या मालमत्ता हक्क, न्याय आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आज जर आवाज उठला नाही, तर उद्या अनेक सामान्य कुटुंबांनाही अशाच संघर्षांना सामोरे जावे लागू शकते.
माझ्याकडे असलेली कागदपत्रे, न्यायालयीन आदेश आणि संबंधित पुरावे जनतेसमोर ठेवण्यास मी तयार आहे.
मी, सी. जोसेफ विजय, भारताच्या संविधानाविषयी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून, मी भारताची एकता आणि अखंडता अबाधित राहीन; तसेच, मी माझ्या कर्तव्यांचे पालन करेन आणि माझ्या सदसद्विवेकबुद्धीनुसार व कायद्याला अनुसरून वागेन. मी कोणालाही घाबरणार नाही, तसेच कोणत्याही एकतर्फी आदेशांपुढे झुकणार नाही. मी न्याय देईन—मी सर्व लोकांना न्याय देईन.
‘तमिळगा वेट्री कझगम’ (TVK) चे प्रमुख आणि अभिनेता-राजकारणी सी. जोसेफ विजय हे तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी तमिळ भाषेत शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यादरम्यान राहुल गांधी देखील उपस्थित होते
शपथ घेत असताना, विजय यांनी ठरवून दिलेल्या मजकुरापलीकडील शब्द उच्चारण्यास सुरुवात केली; त्यावेळी राज्यपाल अर्लेकर यांनी त्यांना थांबवले आणि केवळ लेखी स्वरूपात उपलब्ध करून दिलेला मजकूरच वाचण्याची सूचना दिली.
विजय यांच्यासोबत आणखी नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये एन. आनंद, अधव अर्जुन, डॉ. के.जी. अरुणराज, के.ए. सेनगोट्टैयन, पी. वेंकटरमणन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टी.के. प्रभू आणि सेल्वी एस. कीर्तना यांचा समावेश आहे.
हे सर्व आमदार विजय यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) या पक्षाचे सदस्य आहेत. सद्यस्थितीत, विजय यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात आघाडीतील मित्रपक्षांच्या एकाही आमदाराचा समावेश करण्यात आलेला नाही.मुख्यमंत्री होताच, विजय यांनी तत्काळ कामाला सुरुवात केली आणि कागदपत्रांच्या पहिल्या संचावर स्वाक्षरी केली. या आदेशांमध्ये २०० युनिट्स मोफत वीज, महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आणि अमली पदार्थांविरोधात कारवाई यांसारख्या तरतुदींचा समावेश आहे.
मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी पदाची शपथ घेताच क्षणीच कामाचा धडाका लावला. त्यांनी घरगुती ग्राहकांसाठी २०० युनिट्स मोफत वीज उपलब्ध करून देण्यास अधिकृत करणाऱ्या फाईलवर स्वाक्षरी केली. त्यानंतर, महिलांच्या सुरक्षेसाठी समर्पित असलेल्या एका विशेष दलाच्या निर्मितीला मंजुरी देणाऱ्या फाईलवरही त्यांनी स्वाक्षरी केली.
आपल्या उद्घाटनपर भाषणात मुख्यमंत्री विजय यांनी स्पष्ट केले की, आपला जन्म कोणत्याही राजघराण्यात झालेला नाही; उलट, जनतेनेच स्वतःहून आपले स्वागत केले आणि आपल्याला आपलेसे केले. त्यामुळे, खोट्या आश्वासनांनी जनतेची कधीही फसवणूक करणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली.
मागील द्रमुक (DMK) सरकारने राज्यावर १० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा लादल्याचा आरोप मुख्यमंत्री विजय यांनी केला.
विजय यांचे भाषण: ६ महत्त्वाचे मुद्दे
पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि भविष्यातील प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी राज्याच्या आर्थिक स्थितीवर आधारित एक ‘श्वेतपत्रिका’ (White Paper) प्रकाशित केली जाईल. आमच्या कामाद्वारे आमची क्षमता सिद्ध करण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ द्या. अमली पदार्थांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. जनतेचा एकही पैसा हडप केला जाणार नाही. विजय यांच्याव्यतिरिक्त सत्तेचे दुसरे कोणतेही केंद्र असणार नाही; केवळ विजय हेच सत्तेचे एकमेव केंद्र असतील. शासनाची एक नवी व्यवस्था सुरू केली जात आहे; एक नवे पर्व—जे प्रामाणिकपणा, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचे असेल—आता सुरू होत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आपल्या पक्षाला पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री विजय यांनी काँग्रेस, व्हीसीके (VCK) आणि डाव्या पक्षांचे आभार मानले.
पुणे-वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरांविरोधात रान छेडल्यामुळे शाईफेक हल्ल्याला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांसह पुणे पोलिस आयुक्तांशी फोनवरून संवाद साधून आरोपींवर कारवाई करण्याची केली. तसेच लवांडे यांना कायमस्वरूपी पोलिस संरक्षण देण्याचीही मागणी केली. शरद पवार हा मुद्दा मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीतही मांडणार आहेत.
विकास लवांडे शनिवारी सकाळी आळंदी मातोबा तालुका हवेली येथे प्रवचनासाठी गेले होते. तेथील प्रवचन संपल्यानंतर ते पुण्याला परत जात होते. रस्त्यात 3 गाड्यांमधून आलेल्या संग्राम भंडारे व 10-15 गोरक्षकांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर शाईफेक केली. त्यांना धक्काबुक्की केली. विकास लवांडे यांनी हल्लेखोरांनी आपल्याला पिस्तुल दाखवत जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर ते पळून गेले. या घटनेचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटलेत. या पार्श्वभूमीवर विकास लवांडे यांनी आज सकाळी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
ज्येष्ठ नेते आदरणीय पद्मविभूषण @PawarSpeaks साहेबांनी मला बोलून घेतले होते. पुण्यात मोदी बागेत आज मी सकाळी साहेबांची भेट घेतली माझ्यावर संग्राम भंडारे आणि त्या गुंडांनी केलेल्या हल्ल्या संदर्भातली जी काही घटनाक्रम आहे तो सर्व साहेबांना सांगितला साहेबांनी राज्याचे पोलीस महासंचालक… pic.twitter.com/b7EBla23xG
विकास लवांडे यांनी या भेटीची माहिती देताना सांगितले की, ज्येष्ठ नेते आदरणीय पद्मविभूषण शरद पवार साहेबांनी मला बोलून घेतले होते. पुण्यात मोदी बागेत आज मी सकाळी साहेबांची भेट घेतली माझ्यावर संग्राम भंडारे आणि त्या गुंडांनी केलेल्या हल्ल्या संदर्भातली जी काही घटनाक्रम आहे तो सर्व साहेबांना सांगितला साहेबांनी राज्याचे पोलिस महासंचालक आणि पुणे पोलिस आयुक्तांना फोन करून आरोपींवर कारवाई करण्याची आणि मला कायमस्वरूपी पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली.त्याचबरोबर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठक होणार असून त्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार असल्याचे साहेबांनी मला सांगितले. तसेच हा वैचारिक तात्विक पातळीवरचा लढा असाच सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने चालू ठेवावा विचारांची लढाई विचारांनी आपण लढत राहू असे साहेबांनी मला आशीर्वाद देताना सांगितले, असे ते म्हणाले.
पुणे- ड्रेनेज लाईनमधील बीएसएनएलची कॉपर केबल चोरी करणा-या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करुन ८०,७०,०००/-रु.कि.चा मुद्देमाल पोलिसांनी येथे जप्त केला .यामध्ये ३५ लाखाची केबल आणि अन्य साहित्यात क्रेन, आयशर ट्रक व मोपेड गाडी चा समावेश आहे. पकडलेल्या भामट्यांच्या मध्ये दोघे दिल्लीचे ,एक हरियाणाचा , तिघे उत्तर प्रदेशचे असून तिघेजण हडपसर चे आहेत .
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’ दिनांक ०८/०५/२०२६ रोजी रात्री ११ वा ते दि.०९/०५/२०२६ रोजी पहाटे ०३/०० वा चे पर्यत कोंबिग ऑपरेशन दरम्यान वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख व तपास पथकातील पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी चेक करीत असताना पोलीस अंमलदार अर्शद सय्यद व गोपाळ मदने यांना त्यांचे बोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हनीवेल कंपनीजवळ, आश्रय चहा हॉटेलसमोर हडपसर इंडस्ट्रीयल एरिया हडपसर पुणे येथे काही इसम हे संशयितरित्या ड्रेनेज पाईपलाईनचे झाकन काढुन त्यामधील कॉपरची केबल वायर क्रेनच्या साहाय्याने ओढुन बाहेर काढत असुन त्याचे तुकडे करुन एका आयशर ट्रकमध्ये टाकत आहेत. सदर बातमी पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले. या बातमीच्या अनुषंगाने पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी या ठिकाणी जावुन तपास केला असता काही इसम हे ड्रेनेज पाईपलाईन मधुन कॉपरची केबल वायर क्रेनच्या साहाय्याने ओढुन बाहेर काढुन चोरी करताना मिळुन आले.या सर्वांना ताब्यात घेवुन त्यांना नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अस्लम सगीर खान, वय ३९ वर्षे रा. तिलकनगर, वेस्ट दिल्ली २) आरिफ बुंन्दुखाँ खान, वय ४० वर्षे रा. उत्तरप्रदेश ३) शोहेब हारुण खान वय २५ वर्षे रा. उत्तरप्रदेश ४) सलमान इद्रीस मलीक वय ३३ वर्षे रा. दिल्ली ५) नरेश कुमार श्रीशिवचरण वय ४३ वर्षे रा. हरियाणा ६) नवी मोहम्मद शान मोहम्मद वय ३५ वर्षे रा. उत्तरप्रदेश, ७) अनिस अन्सारी मोहम्मद गियासुद्दीन वय २२ वर्षे, रा. हडपसर पुणे ८) अफाक अन्सारी रफिक अन्सारी वय २२ वर्षे रा. हडपसर पुणे ९) प्रविण दादासाहेब बागुल वय ३३ वर्षे रा.एस. आर.ए. कॉलनी, शिंदेवस्ती, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. या आरोपींना अटक करुन वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२०८/२०२६ भा.न्या.सं.क. ३०३(२),६०,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उप-निरी. अल्फाज शेख करीत आहेत. या आरोपीकडुन ३४,८०,०००/-रु. किं. ची कॉपर वायर, वायर काढण्यासाठी वापरलेली क्रेन, आयशर ट्रक व मोपेड गाडी असा एकुण ८०,७०,०००/-रु.किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
▪️शासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणांतर्गत दीड हजार कोटीचे करार
पुणे, दि. १० मे : ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ येत्या जुलै महिन्यात राज्यात लागू होणार असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या कायद्यामुळे राज्यातील १४ कोटी जनतेची मालमत्ता ही निश्चित प्रॉपर्टी म्हणून गणली जाणार असून जगातील कुठल्याही देशात ती कॅश करता येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भारती विद्यापीठाच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार भीमराव तापकीर, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, कुलगुरू डॉ. विवेक साळवी यांच्यासह विद्यापीठाचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.बावनकुळे म्हणाले, स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्रात उभारलेले कार्य हे महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहे. ‘गल्लीतली शाळा’ ते भारती विद्यापीठाला जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प केला आणि तो पूर्ण करून दाखवला. त्यांच्या विचारांचा प्रकाश आज देश-विदेशात पोहोचत आहे.
ते म्हणाले, शिक्षणाशिवाय विकसित भारताची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही. राज्य शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण राबवून दीड हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसेच दीड लाख विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता ( ए. आय)तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात विद्यापीठांनी तंत्रज्ञान आणि ए.आय. स्वीकारणे अत्यावश्यक आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांसाठी कोणत्याही स्टॅम्प पेपरची आवश्यकता राहिलेली नसून विविध प्रमाणपत्रे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत राज्यातील ३० लाख विद्यार्थ्यांपर्यंत आवश्यक कागदपत्रे मोफत पोहोचविण्याची व्यवस्था उभी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा असल्याचे सांगत सरकारने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, असेही ते म्हणाले. नागपूर येथे भारती विद्यापीठाचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी आवश्यक जागा व शासनस्तरीय सहकार्य देण्याची ग्वाही दिली. तसेच ‘टिटबिट पॉलिसी’च्या माध्यमातून अडचणीत असलेल्या भूखंडांचा मार्ग काढण्याबाबतही सकारात्मक भूमिका मांडली.
यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, “शिक्षणानेच माणसाची प्रगती होऊ शकते” हा संदेश देत पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची चळवळ उभी केली. त्याच ध्येयाने स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण क्षेत्रात वटवृक्ष उभा केला. एका छोट्या खोलीत सुरू झालेल्या शाळेचे आज जागतिक पातळीवरील विद्यापीठात रूपांतर झाले असून हे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी शिक्षणासोबत संस्कार, राष्ट्रभक्ती आणि शिस्तही महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण, सैनिक प्रशिक्षण, विद्यार्थिनींसाठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण, शिक्षकांचे प्रशिक्षण, शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे यांसारख्या उपक्रमांवर शासन भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी शाळांबाबत बोलताना त्यांनी मराठी भाषेबद्दल केवळ भावना व्यक्त न करता प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचे नमूद केले. सामान्य व गरीब विद्यार्थ्यांनाही उच्च दर्जाचे शिक्षण देणारे मॉडेल तयार करण्याचे आवाहन त्यांनी भारती विद्यापीठाला केले.
भारती विद्यापीठाने गेल्या ६२ वर्षांत लाखो विद्यार्थी घडवून देश-विदेशात शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली असून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे कार्य पुढेही सुरू ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ. विश्वजीत कदम यांनी प्रास्ताविकात भारती विद्यापीठाचे मागच्या ६२ वर्षातील कारकिर्द, समाजिक योगदान, शैक्षणिक क्षेत्रात केलेले काम विशद केले.
यावेळी जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दुसरा डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याच बरोबर भारती विद्यापीठातील संशोधक, प्राध्यापक, कर्मचारी यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
पुणे : स्वतःस तथाकथित वारकरी म्हणवणारे हल्लेखोर संग्राम भंडारे याने राष्ट्रवादी काँग्रेस’चे प्रवक्ते आणि प्रवचनकार विकास लंवाडे यांच्यावर केलेला भ्याड शाईफेक हल्ला, हा केवळ विकास लवांडे यांच्या पर्यंतच् मर्यादीत नसुन, देशास दिशा देणाऱ्या, शिव छत्रपती, ‘संतश्रेष्ठ ज्ञानेबा ते जगदगुरु तुकोबारायांच्या सहिष्णू संस्कारांच्या शिकवणुकीवरचाच् हल्ला असून या निंदनीय शाईफेक हल्ल्याचा कॉंग्रेस तीव्र निषेध करत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातुन केले. गोपाळदादा तिवारी पुढे म्हणाले की, तथाकथित वारकरी म्हणवणारे संग्राम भंडारे यांनी या पुर्वीही काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमक्या देत, आपली झुंडशाहीची प्रवृत्ती दर्शवली होती. त्यावर प्रतिक्रिया म्हणून मोठे जनआंदोलन ऊभारून त्या प्रकाराचा निषेध केला गेला होता, याचे किमान स्मरण तरी भंडारे यांनी ठेवायला पाहिजे होते. मात्र देशातील एकमेव असलोल्या ‘महाराष्ट्राच्या संत – वारकरी सहिष्णू परंपरा’, नष्ट करू पाहणाऱ्या अतिरेकी प्रव्रत्तीस सध्या राजाश्रय मिळत असल्याने भंडारे, जगताप, राणे इ प्रवृत्तीचे फावले आहे. यामुळे “महाराष्ट्राच्या सभ्य-सुसंस्कृत, संत संस्काराच्या व सहिष्णूतेच्या सार्थ लौकिकास” धुळीस मिळवण्याचे निंदनीय कृत्य या परंपरा-विघातक प्रवृत्ती करत आहेत, असा थेट आरोपही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केला.
गोपाळदादा तिवारी पुढे म्हणाले की, शारीरिक किंवा शाब्दिक हल्ले सोसत, संतांनी भेदाभेदविरहित समतेची पायाभरणी केली. महाराष्ट्रात मानवी मुल्यांची व समतेची पायाभरणी करणारे श्रीमंत शाहू महाराज, समाजसुधारक व सत्यशोधक समाजाची निर्मिती करू पहाणारे महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांसह बुद्धी प्रामाण्यवादी असलेल्या आगरकर, महर्षी कर्वेंसह कर्मवीर भाऊराव पाटील इ. शिक्षण प्रणेत्यांच्या संस्कार व योगदानातुन आजचा पुरोगामी, विकसीत व प्रगल्भ महाराष्ट्र घडला आहे. पण पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामी महाराष्ट्र बनवण्यासाठी सनातनी प्रवृत्तींनी कंबर कसलेली आहे हे आजच्या महाराष्ट्राचे दुर्दैव होय..! ‘देशास अध्यात्मिक व सामाजिक दिशा देणारा वारकरी संप्रदाय’ हा प्रेम, भक्ती, सहिष्णुता, समतेचा व औदार्याचा मार्ग दाखवतो, मानवी मुल्यांची जोपासना करण्याचे शिकवतो. मात्र भंडारे यांच्या निंद्य कृत्याने, वारकरी संप्रदायात कट्टरतावादी व हिंसक प्रवृतींचा शिरकाव झाल्याचेच् स्पष्ट होते. वारकरी संप्रदाय या अशा अनिष्ट प्रवृत्तीतुन मुक्त करणे आजच्या काळाची गरज आहे असेही गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले. संत ज्ञानोबा व जगदगुरू तुकोबांना छळणाऱ्या फॅसिस्ट प्रवृत्ती आज राजसत्तेत बसल्याने, महायुती मधील ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘पुरोगामी’ म्हणवणारा ‘स्व. अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ कोणत्या मजबूरीतुन(?) हे प्रकार सहन करतोय (?).. हे चिंताजनक असल्याची पुस्ती ही काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी जोडली..!
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित ब्राह्मण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : ब्राह्मण समाजाची वर्षानुवर्षे मूळ भूमिका समाजाचे प्रबोधन करण्याची, दिशा देण्याची आणि नैतिकता जपण्याची राहिली आहे, ती पुढेही सुरू ठेवावी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करून समाजातील नैतिकता टिकायची असेल तर त्याला धर्माचे अधिष्ठान लागते. हे अधिष्ठान ब्राह्मण समाजाकडे असल्याने प्रबोधनाचा अधिकार ब्राह्मण समाजाकडे आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्हा शाखेतर्फे शनिवारी (दि. ९) भव्य ब्राह्मण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ब्राह्मण समाजातील चितळे समूहाच्या सुनिता चितळे, धर्मावत ग्रुपचे देवराज धर्मावत, सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, पंचागकर्ते मोहन दाते, पिंताबरी कंपनीचे परीक्षित प्रभुदेसाई या कर्तृत्ववान व्यक्तींचा विशेष पुरस्कार देऊन चंद्रकांत पाटील, नाशिकच्या काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला. त्या वेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.
गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. मोहिनी पत्की, राष्ट्रीय सरचिटणीस सत्यजित कुलकर्णी, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जोशी, प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, केतकी कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर तसेच ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी मंचावर होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ब्राह्मण समाजातर्फे अनेक विधी केले जातात परंतु त्याचे अर्थ सगळ्यांच समजतात असे नाही. विधींचे अर्थही समजावून सांगितल्यास समाजप्रबोधन होईल.
महंत सुधीरदास महाराज म्हणाले, समाजामध्ये असंख्य घटना घडत असतात त्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम हे पिढ्यान्पिढ्या जो झेलत आला आणि झेलूनसुद्धा टिकला तो ब्राह्मण समाज आहे. धर्म मिटविण्याची कुणाचीही ताकद नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले, देशावर असंख्य आक्रमणे झाली परंतु धर्म टिकविण्यासाठी कुठलीही तडजोड ब्राह्मण समाजाने केली नाही.
सत्काराला उत्तर देताना प्रशांत दामले म्हणाले, जितके कमी बोलशील आणि जास्त ऐकशील तितके शिकशील असे माझ्यावर संस्कार झाले आहेत. हिंदू धर्मात जेवढे श्लोक आहेत त्याला एक सूर, ताल , ठहेराव आहे. प्रत्येक मंत्र म्हटल्यानंतर त्याला ठहेराव आहे. आपला श्वास कसा वापरायचा हे त्या श्लोकामधून समजते. तोच श्वास आपल्याला आचरणात आणायचा असतो.
सुरुवातीस गोविंद कुलकर्णी यांनी महासंघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रास्ताविक मंदार रेडे यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गीतेतील अध्यायावर आधारित ‘संभवामि युगे युगे’ हा नृत्याविष्कार सोनाली करंदीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला.
पुणे- “जैन धर्मिय म्हणजे केवळ राजस्थानी गुजराती नव्हे तर जैन धर्म हा संपूर्ण भारतात पसरलेला आहे. विविध प्रांतात जैनांचे उल्लेखनीय काम आहे. जैनांना जो अल्पसंख्यांक दर्जा आहे तो जर काढून घेतला तर जैनांच्या स्वतंत्र अस्तित्वालाच धोका आहे” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद फडे यांनी केले. अरिहंत जागृती मंच यांच्यातर्फे आयोजित निबंध स्पर्धेच्या पारितोषिक प्रदान कार्यक्रम प्रसंगी फडे बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “निबंध लिहिणे ही एक कला असून जो विचार करतो तोच लिहू शकतो. पूजा अर्चा करून चांगले फळ मिळते असे जैन धर्म मानत नाही तर तुम्हाला तुमच्या कर्माप्रमाणे फळ मिळते असा जैन धर्माचा सिद्धांत आहे.” ‘जैन धर्माच्या अस्तित्वाला धोका – कारणे व उपाय’ या विषयावर अरिहंत जागृती मंचातर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. प्राप्त झालेल्या १८५ निबंधात स्नेहल छाजेड यांच्या निबंधास प्रथम क्रमांक मिळाला. एकंदर १२ निबंधांना पारितोषिके देण्यात आले. परीक्षक म्हणून डॉ. कमलकुमार जैन आणि डॉ. श्रद्धा लुणावत यांनी काम पाहिले. मंचाचे अध्यक्ष राजेंद्र सुराणा यांनी प्रास्ताविक केले तर निबंध स्पर्धा समन्वयक श्रीपाल ललवाणी यांनी विषयाचे प्रयोजन सांगितले. विजय पारख यांनी स्पर्धेतील विजेत्यांची नावे घोषित केली तर प्रदीप फिरोदिया यांनी आभार प्रदर्शन केले. अजय ललवाणी यांनी सूत्रसंचालन केले. जवाहर गुमते, संजय चोरडिया, शांतीलाल नवलाखा, नितीन शहा, संतोष भन्साळी, ईश्वर भुरट, अमित जोगी आदी कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे स्पर्धा यशस्वी झाली. यावेळी अचल जैन, दिलीप मेहता, दिलीप चोरबेले, विठ्ठल साठे, सुरेश लुणावत, दिलीप कांकरिया, गणेश कटारिया, राजश्री मुथा, उषा मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज स्वतःचे SIR (Special Intensive Revision) मॅपिंग आज कोथरुड मध्ये पूर्ण केले. मतदार यादी अद्ययावत करण्याच्या या प्रक्रियेत स्वतः सहभाग नोंदवून, त्यांनी पुणेकर आणि राज्यातील नागरिकांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIR मॅपिंग मोहीम राबवली जात आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून, हे मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण केले. यामुळे त्यांची मतदार यादीतील माहिती आता पूर्णपणे सुरक्षित आणि अद्ययावत झाली आहे.
“लोकशाहीत मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादीत आपले नाव अचूक असणे आवश्यक आहे. मी माझे SIR मॅपिंग पूर्ण केले आहे, आता आपली बारी आहे. दुबार नावे टाळण्यासाठी आणि मतदार यादीतील गोंधळ कायमचा दूर करण्यासाठी सर्व नागरिकांनी तातडीने आपले मॅपिंग पूर्ण करावे.” असे आवाहन ना. पाटील यांनी सर्व मतदार बांधवांना केले.
आरएमसी प्लांट आता रडारवर:जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केली कठोर नियमावली
पुणे-पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमधील हवेच्या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली आहे. शहराच्या विविध भागांत कार्यरत असलेल्या रेडि-मिक्स काँक्रीट प्लँटमुळे होणारी धूळ आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कठोर नियमावली जाहीर केली असून, पुढील तीन आठवड्यांत या उद्योगासाठी नवीन प्रमाणित कार्यप्रणाली लागू करण्यात येणार आहे.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी आणि आरएमसी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत केवळ प्रदूषणावरच नाही, तर शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पीएमआरडीए , दोन्ही महापालिका, पोलीस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ एकत्रितपणे काम करणार आहेत. “आम्हाला विकास थांबवायचा नाही, पण तो करताना लोकांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही,” अशा शब्दांत विभागीय आयुक्त नवल किशोर राम आणि महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
वाढत्या बांधकामांच्या धुराळ्यामुळे पुणेकरांना श्वसनाचे त्रास जाणवत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने उचललेले हे पाऊल पुणे आणि पिंपरी-चिंचवडला पुन्हा एकदा श्वास घेण्यायोग्य बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पुढील २१ दिवसांत नवीन नियमावली जाहीर होणार आहे. आरएमसी मिक्सर गाड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये वाहतुकीला पूर्णतः बंदी घालण्यात येणार आहे.
प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने पुढील ४ ते ६ महिन्यांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रात प्रदूषणमुक्त ‘कोअर झोन’ निश्चित करण्याची योजना आखली आहे. या झोनमध्ये बांधकामामुळे होणाऱ्या प्रदूषणावर अत्यंत कडक निर्बंध असतील. नागरी आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण करतानाच औद्योगिक विकासाचा समतोल राखणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.
वाहतुकीवर मर्यादा: ४ दिवस ‘नो एन्ट्री’सारखे निर्बंध
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आरएमसी वाहनांच्या वेळेत मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार शनिवार, रविवार आणि बुधवारी आरएमसी वाहने नेहमीप्रमाणे धावू शकतील. यामुळे सुट्टीच्या काळात बांधकामाची गती कायम राखता येईल. तर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी ही वाहने केवळ सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेतच चालवता येतील. गर्दीच्या वेळी ही अवजड वाहने रस्त्यावर दिसल्यास कडक कारवाई केली जाईल. केवळ वेळेचे बंधनच नाही, तर या वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि कंपनीची नेमप्लेट असणे अनिवार्य आहे, जेणेकरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा माग काढणे सोपे होईल.
अनधिकृत प्लँटचे धाबे दणाणले–शहरात अनेक ठिकाणी अधिकृत परवानगी न घेता आरएमसी प्लँट उभारण्यात आले आहेत. या प्लँटमुळे मोठ्या प्रमाणात धूळ हवेत मिसळते आणि पाणी प्रदूषणाचे प्रश्नही उद्भवतात. जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जे प्लँट प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन करत नाहीत किंवा जे अनधिकृत आहेत, ते तात्काळ सील केले जातील. केवळ नियमांचे पालन करणाऱ्या अधिकृत केंद्रांनाच नवीन प्रमाणित कार्यप्रणाली लागू होईपर्यंत काम सुरू ठेवता येईल.
‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजन
मुंबई: संरक्षण क्षेत्रातील धोरणात्मक विषयांवर काम करणारी मुंबईतील अग्रगण्य संस्था ‘ब्रह्मा रिसर्च फाउंडेशन’तर्फे सोमवार, ११ मे २०२६ रोजी वांद्रे (पश्चिम) येथील हॉटेल ताज लँड्स एंड येथे ‘संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) संधी’ या विषयावर एका महत्त्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय नौदलाच्या सहकार्याने आयोजित या चर्चासत्राचा मुख्य विषय (Theme) ‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ असा असून, हे चर्चासत्र ‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहे. भारतीय संरक्षण निर्मितीच्या वेगाने विस्तारणाऱ्या परिसंस्थेत एमएसएमईसाठी निर्माण होणाऱ्या अभूतपूर्व संधींवर प्रकाश टाकणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या चर्चासत्रात संरक्षण क्षेत्रातील धोरणकर्ते, वरिष्ठ लष्करी नेतृत्व, सरकारी अधिकारी, जागतिक संरक्षण उत्पादक, वित्तीय संस्था आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज एकत्र येणार आहेत. भारत सरकारच्या ‘संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता’ उपक्रमांतर्गत येणाऱ्या दशकात भारतीय एमएसएमईसाठी सुमारे १० लाख कोटी रुपयांची व्यवसायाची संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे, यावर या कार्यक्रमात सविस्तर चर्चा होईल.
महाराष्ट्राचे आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि एआय (AI) मंत्री अॅड. आशिष शेलार या चर्चासत्राचे उद्घाटन मुख्य अतिथी म्हणून करतील आणि उद्घाटनपर भाषण करतील. याप्रसंगी ‘संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता’ या विषयावरील एका विशेष पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे बीजभाषण चीफ ऑफ इंटिग्रेटेड स्टाफ (IDS) एअर मार्शल आशुतोष दीक्षित (PVSM, AVSM, VM, VSM) करतील. त्यानंतर वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि संरक्षण उद्योगातील दिग्गजांची एक उच्चस्तरीय परिसंवाद (Panel Discussion) पार पडेल. यामध्ये भारताची स्वदेशी संरक्षण परिसंस्था मजबूत करणे आणि भारतीय एमएसएमईंना जागतिक पुरवठा साखळीत (Global Supply Chain) समाविष्ट करणे यावर चर्चा होईल. या पॅनेलमध्ये एअर मार्शल तेजिंदर सिंग (PVSM, AVSM, VM) यांच्यासह एल अँड टी डिफेन्स (L&T Defence), माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, सॅफ्रन इंडिया (Safran India) आणि थायसेनक्रुप मरीन सिस्टम्स (Thyssenkrupp Marine Systems) यांसारख्या कंपन्यांचे वरिष्ठ नेतृत्व सहभागी होईल. (थायसेनक्रुप ही जर्मन पाणबुडी निर्माता कंपनी सध्या भारतीय नौदलाच्या ९०,००० कोटी रुपयांच्या पाणबुडी प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात आहे).
महाराष्ट्राचे उद्योग विकास आयुक्त आणि ‘मित्रा’चे (MITRA) अध्यक्ष दीपेंद्र कुशवाह (IAS), ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत संरक्षण उत्पादन आणि एमएसएमई सहभागासाठी महाराष्ट्राच्या औद्योगिक वाढीचा आणि गुंतवणुकीचा आराखडा सादर करतील. संरक्षण मंत्रालयाचा स्वदेशीकरण आणि स्वावलंबनाचा रोडमॅप व्हॉइस अॅडमिरल अतुल आनंद यांच्याकडून सादर केला जाईल.
चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात भारतीय नौदल, भारतीय लष्कर आणि एल अँड टी डिफेन्स, माझगाव डॉक, सॅफ्रन इंडिया आणि थायसेनक्रुप मरीन सिस्टम्स यांसारख्या जागतिक संरक्षण उत्पादकांकडून सविस्तर सादरीकरण केले जाईल. हे सत्र एमएसएमईंना आगामी १० लाख कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदी संधींची माहिती देईल आणि जागतिक उत्पादकांच्या खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन करेल.
नौदल स्वदेशीकरण आणि नवोपक्रमावरील (Innovation) एका विशेष सत्राचे नेतृत्व व्हॉईस अॅडमिरल अनिल कुमार शर्मा करतील, ज्यांनी नौदलाच्या स्वदेशीकरण मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे सत्र पुढील दशकातील अंदाजे ३ लाख कोटी रुपयांच्या नौदल खरेदी संधींवर लक्ष केंद्रित करेल.
या चर्चासत्राचा समारोप संरक्षण क्षेत्रातील एमएसएमईंसाठी भांडवल आणि वित्तपुरवठा या विषयावरील विशेष सत्राने होईल. यामध्ये अॅडमिरल आर. हरी कुमार आणि एचडीएफसी असेट (HDFC Asset), आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेड आणि वॅलर कॅपिटलचे वरिष्ठ प्रतिनिधी मार्गदर्शन करतील.
भारतीय नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर व्हॉईस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सार्वजनिक व्यासपीठावर उपस्थित राहून विशेष संबोधन करणार आहेत. या चर्चासत्राबद्दल माहिती देताना ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनचे संचालक परेश पागे म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर हे मे २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता’ मोहिमेच्या यशाचे जिवंत उदाहरण आहे. ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे, नागास्त्र लोइटरिंग म्युनिशन्स, आकाशतीर हवाई संरक्षण प्रणाली, प्रगत अँटी-ड्रोन तंत्रज्ञान आणि स्वदेशी लढाऊ विमानांसारख्या प्लॅटफॉर्ममुळे भारताची सामरिक शक्ती सिद्ध झाली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने, हे चर्चासत्र सरकारच्या स्वावलंबनाच्या प्रयत्नांना अधिक बळ देईल आणि भारतीय एमएसएमईंना राष्ट्र उभारणीत महत्त्वाचे भागीदार बनण्याची संधी उपलब्ध करून देईल.”
ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनबद्दल ब्रह्मा रिसर्च फाउंडेशन ही मुंबईस्थित एक अग्रगण्य विचारवंत संस्था (Think Tank) असून ती राष्ट्रीय सुरक्षा, धोरणात्मक व्यवहार आणि हाय-टेक इनोव्हेशन या क्षेत्रांत कार्यरत आहे. ही संस्था शाश्वत राष्ट्रीय विकास आणि स्वावलंबनासाठी प्रगत तंत्रज्ञान, शिक्षण, कृषी आणि हवामान बदल या विषयांवर काम करते.
अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेचा समारोप
पुणे, दि. ९ मे २०२६: एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या वतीने आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महिला पुरुष गटातील कबड्डी व खो-खो तसेच कुस्तीमध्ये महावितरणने तब्बल चार सांघिक विजेतेपद व एक उपविजेतेपद मिळवत एकतर्फी वर्चस्व राखले. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात देशभरातली विद्युत कंपन्यांच्या तीन दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेचा शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी समारोप झाला. दरम्यान, महावितरणच्या कबड्डी पुरुष संघाने बलाढ्य हिमाचल प्रदेश संघाचा अटीतटीच्या अंतिम सामन्यात पराभव करीत १५ वर्षांनंतर विजेतेपदाचा मान मिळवला.
या राष्ट्रीय स्पर्धेतील सर्व सांघिक व वैयक्तिक विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्राने गौरविण्यात आले. बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संचालक (प्रकल्प) श्री. दत्तात्रेय पडळकर (महापारेषण), कोकणचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे (महावितरण), स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष व पुणे प्रादेशिक संचालक श्री. सुनील काकडे (महावितरण), मुख्य अभियंते सर्वश्री अनिल कोलप, दत्तात्रेय बनसोडे, धर्मराज पेठकर, स्वप्निल काटकर, अंकुर कावळे, संजय पाटील, संजय कुऱ्हाडे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके व श्री. पुरुषोत्तम वारजुरकर, विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. जिग्नेश राय, सरचिटणीस श्री. नरेश कुमार, खजीनदार श्री. ललित गायकवाड, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पांडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पाटणी, भक्ती जोशी, सोनाली बाविस्कर, स्वागती सोळंकुरे यांनी केले तर उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भुपेंद्र वाघमारे यांनी मानले. पुढील वर्षापासून कुस्ती स्पर्धेसाठी महिला गटाचा समावेश करण्याचा निर्णय यावेळी नियंत्रण मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आला.
कबड्डीच्या विजेतेपदाचे महावितरणकडून स्वप्न साकार – अत्यंत चुरशीच्या उपांत्य फेरीमध्ये प्रतिस्पर्धी संघावर मात करीत मागील वर्षीचा विजेता हिमाचल प्रदेश विरुद्ध महावितरण संघ यंदाही आमनेसामने आले. दोन्ही संघात राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असल्याने अंतिम सामन्यासाठी क्रीडा प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. सामन्याच्या पहिल्या पाच ते सात मिनिटात हिमाचल प्रदेशने आक्रमक चढाईवर भर देत ६ विरुद्ध २ अशी आघाडी घेतली. सर्व गडी बाद झाल्यानंतर कोर्टात एकमेव असलेल्या महावितरणच्या नीलेश ठाकूर याने आक्रमक चढाईत हिमाचल प्रदेशच्या दोन खेळाडूंना बाद केले. तर लगेचच विरोधी चढाई करणाऱ्या हिमाचल प्रदेशचा मातब्बर रामगोपालला महावितरणच्या तीन बचावपटूंनी बाद केले आणि याच ठिकाणी सामना फिरला.
त्यानंतर हिमाचल प्रदेशने आक्रमक चढाईऐवजी सावध व बचावात्मक पवित्रा स्वीकारला. तोच पवित्रा स्वीकारून महावितरणकडून कर्णधार अमित जाधव, अभिषेक नर, अजय शिंदे, रजत गोमासे, रोहित जिवतोडे, नीतेश पोवार, प्रतिक मुरकुटे, दीपक माने यांनी बचावात्मक फळीला आणखी आक्रमक बनवले. हिमाचल प्रदेशच्या गुरूमीत, अभिनंदन, हेमराज, मनीष कुमार, गुरुविंदर या बलाढ्य चढाईपटूंना बाद करीत सामन्यावर पकड मिळविली. मध्यंतरापर्यंत महावितरण संघ १७ विरुद्ध १३ गुणांनी आघाडीवर होता. अत्यंत चुरशीच्या व रंगतदार सामन्यात अखेर महावितरणने ३४ विरुद्ध २४ गुणांनी बलाढ्य हिमाचल प्रदेशवर मात केली व या राष्ट्रीय स्पर्धेत १५ वर्षांनंतर कबड्डीमध्ये विजेतेपद मिळवले. यात संघाचे प्रशिक्षक नीलेश नाईक व व्यवस्थापक श्री. रामगोपाल अहिर यांचेही योगदान महत्वाचे ठरले. कबड्डीच्या महिला गटात देखील महावितरण विरुद्ध हिमाचल प्रदेश अशी लढत झाली. मात्र हिमाचल प्रदेशने सुरवातीला घेतलेली आघाडी कायम ठेवत महावितरणचा २१ विरुद्ध १२ गुणांनी पराभव केला. त्यामुळे महावितरणच्या महिला कबड्डी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, आधी एफआयआर सार्वजिनक करा.
शिवसेना नेते अंबादास दानवे व मिलिंद नार्वेकर यांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सदिच्छा भेट.
मुंबई, दि. ९ मे २०२६..
राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावरील शाईहल्ला, धक्काबुक्की व शिवीगाळ हा भ्याड हल्ला असून हल्लेखोर वारकरी संप्रदायाच्या विचाराला माननारे नाहीत. या प्रकरणाला भाजपाची चिथावणी असून अशा हल्लेखोरांना भाजपा सरकार संरक्षण देत आले आहे. विकास लवंडे यांच्यावरील हल्ला हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे, या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्याचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे. विकास लवांडे हे वारकरी संप्रदायाचा समता, बुंधता व सामाजिक न्यायाचा विचार पुढे घेऊन जाणारे आहेत. वारकरी संप्रदायात मनुवादी विचार वाढत आहे, ही चिंता त्यांनी व्यक्त केली होती, ती या हल्ल्याने खरी करून दाखवली आहे. मूठभर लोकांच्या हाती धर्मसत्ता व राजसत्ता असावी या विचाराचा मोठा फटका छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनेक साधू संतांनाही बसला आहे. संत तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवणारे, संत ज्ञानेश्वर यांना छळणारे, सावित्रिबाई फुले यांना छळणारा विचार हाच आहे. या मनुवादी विचाराला कंटाळून गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली, महाविरांनी जैन धर्माची स्थापना केली,हीच परंपरा महात्मा बसवेश्वर पुढे घेऊन गेले. हा मनुवादी विचार भाजपा व रा. स्व. संघाचा आहे, याच विचाराने दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांनाही छळले आहे.
नाशिकच्या TCS प्रकरणी निदा खानला अटक केल्याच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या प्रकरणातील एफआयआर अद्याप सार्वजनिक केलेला नाही तो सार्वजनिक करावा. कायद्याने त्यांचे काम करावे पण या प्रकरणाच्या माध्यमातून धार्मिक धृवीकरण करण्याचा खेळ भारतीय जनता पक्ष करत आहे. एवढे दिवस पोलीस झोपा काढत होते का, याचे उत्तर द्यावे. या प्रकरणाला हवा देण्यात सरकारचा काही हात आहे का, हे उघड झाले पाहिजे. मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे करतो हा तमाशा बंद करा, असे सपकाळ म्हणाले..
विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना नेते अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आज गांधी भवन येथे भेट घेऊन काँग्रेस पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. यावेळी महाविकास आघाडीच्या आगामी काळातील राजकीय वाटचालीबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. राज्यातील लोकविरोधी तसेच संविधान आणि लोकशाहीविरोधी भाजप-महायुती सरकारच्या धोरणांविरोधात महाविकास आघाडी एकजुटीने आणि खंबीरपणे संघर्ष करत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत सपकाळ उपस्थित होते.
पुणे-प्रभाग क्रमांक १२, रोकडोबा मंदीर आरोग्य कोठीकडे कंत्राटी पद्धतीत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या श्रीमती सुवर्णा पवारने रात्रपाळीच्या शाळेत प्रवेश घेऊन इयत्ता १० वी च्या बोर्ड परिक्षेत ५५.२०% गुण प्राप्त केले. माहेरकडील नाव सुवर्णा लक्षमण अवघडे या कंत्राटी सफाई सेविकेचा वरिष्ठ आरोग्य निरिक्षक सुनिल कांबळे, पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे जॉईंट सेक्रेटरी वैजीनाथ गायकवाड आरोग्य निरिक्षक राहुल शेळके, श्रीमती संगीता बदामी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच या कार्यक्रम प्रसंगी आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, उदय सणस, निखिल निकम, राजेश रासकर, विनोद सरोदे, महेश जाधव, मोकादम राजू गायकवाड व इतर सर्व सेवक उपस्थित होते. सत्कार समारंभ प्रसंगी सुवर्णा पवार यांनी अशा भावना व्यक्त केल्या की,” सर्व साहेब, मोकादम व सेवक यांच्या पाठिंब्याने व मार्गदर्शनाखाली रात्रपाळीच्या शाळेत प्रवेश घेऊन इयत्ता १० वी च्या बोर्ड परिक्षेत ५५.२०% गुण प्राप्त करून पास झाले ते सर्व श्रेय साहेब व माझ्या सोबत काम करणाऱ्या सेवकांना आहे. सुवर्णा पवार यांची आई विमल व लक्ष्मण अवघडे या मोल मजूरी करणाऱ्या श्रमिक महिला..माहेरी ९ वी पर्यंत शिकलेल्या सुवर्णाचा विवाह मजूरी करणाऱ्या सोमनाथ पवार यांच्याशी झाला. अतिशय हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांना शिकवता आले नाही शिवाय सासरी पण तशीच परिस्थिती असल्याने त्यांना शिक्षण सोडावे लागले.
यावेळी त्या म्हणाल्या ,’ पतीच्या घरी देखील अतिशय आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने १३ वर्षापूर्वी पतीचे अकाली निधन झाले त्यामुळे माझ्यावर खूप मोठे संकट आल्याने संसार कसा चालवावा व पोटाची खळगी कशी भरावी शिवाय मुलीचे शिक्षण कसे करावे असे प्रश्न माझ्यासमोर होते. मी घरात एकटीच असल्याने मुलीला सांभाळण्याची जबाबदारी पर्यायी माझ्यावर आली त्यामुळे माझ्या पोटाची खळगी भरण्यासाठी व मुलीचा सांभाळ करण्यासाठी मला पाठीवर पोतं घेऊन कचरा वेचून धुणी भांडी धुणे, गंवड्याच्या हाताखाली सिंमेट कालवून, डोक्यावर चार ते पाच मजली वाळू व विटा वाहून, पडेल ते काम करून तुटपुंज्या मोलमजूरीतून संसाराचा गाडा चालवत आहे. तसेच पतीच्या निधना नंतर महानगरपालिकेच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात सार्वजनिक स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीमध्ये महिला सफाई कामगार म्हणून कामाला लागले. सफाई कामगार असल्याने पुणे महानगरपालिका कामगार युनियन बरोबर संपर्क आला. युनियनने माझ्यात शिकण्याची जिद्द व उमेद निर्माण केली. म्हणून मला शिक्षण शिकून मला वेगळं काही तरी करायंच आहे शिवाय माझ्या एकूलत्या एका मुलीस पण शिक्षण शिकवणारच आहे तसेच इतर कामगारांनी पण शिक्षण शिकावं अशा भावना व्यक्त केल्या.