Home Blog Page 58

अष्टविनायकातील मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथील मंदिरे १० मे ते ९ जूनपर्यंत भाविकांसाठी बंद

पुणे, दि. ८ : अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत तसेच पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जतन, संवर्धन व दुरुस्ती कामांच्या पार्श्वभूमीवर श्री मयुरेश्वर मंदिर, श्री चिंतामणी मंदिर आणि श्री सिद्धिविनायक मंदिर ही मंदिरे दिनांक १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आली आहे.

अष्टविनायकातील मंदिरांचे जतन, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला असून, या कामांसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे शासनाचे आभार मानण्यात आले आहेत. सध्या मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथे मुख्य मंदिर तसेच मंदिर परिसरातील जतन, संवर्धन आणि दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत.

पुरातत्त्व विभागाच्या नियोजनानुसार मंदिरांचा मुख्य गाभारा आणि सभामंडप यांचे पौराणिक स्वरूप जपत सुबक दगडी बांधकामाद्वारे संवर्धन करण्यात येणार आहे. या कामादरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती कामात अडथळा निर्माण करू शकते तसेच कामाचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात पुरातत्त्व विभागाच्या संचालकांनी सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांच्याकडे विनंती अर्ज सादर केला होता. त्यानंतर पुरातत्त्व विभाग, मंदिर प्रशासन, पुजारी वर्ग आणि ग्रामस्थ यांचे म्हणणे ऐकून घेत सह धर्मादाय आयुक्तांनी दि. ७ मे २०२६ रोजी मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सह धर्मादाय आयुक्तांच्या सूचनेनुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळानेही मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्याचा ठराव मंजूर केला आहे. तसेच दि. ८ मे २०२६ रोजी संबंधित ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन मंदिर बंद ठेवण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

या कालावधीत मंदिरांमध्ये नित्य पूजाअर्चा व धार्मिक विधी नियमितपणे सुरू राहतील. मात्र भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. मंदिरांचे पुजारी, बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी, कर्मचारी आणि विश्वस्त यांच्याशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ही विकासकामे मंदिरांची दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक असून ती नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी नागरिकांनी आणि भाविकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दहावी : राज्यात 92.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

  • मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 5.40 ने अधिक
  • कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62 टक्के

पुणे दि. 8 : दहावीच्या निकालाचा क्षण हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल मंडळामार्फत जाहीर करण्यात आला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले. या परीक्षेत ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत, शासन आपल्या पाठिशी आहे, असा विश्वास त्यांनी या विद्यार्थांना दिला.

मंत्री दादाजी भुसे यांनी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीने या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे शिक्षक आणि माता-पिता यांचेही विशेष अभिनंदन केले. विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्याबरोबरच राज्य आणि देश निश्चितच प्रगती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

या परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देताना एका परीक्षेचा निकाल तुमचे संपूर्ण आयुष्य किंवा तुमची बुद्धिमत्ता ठरवू शकत नाही. ही पहिली पायरी आहे. त्यामुळे खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा. शासन तुमच्या पाठीशी आहे. फेरपरीक्षेची संधी उपलब्ध असल्याने तिचा लाभ घ्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

निकालाची वैशिष्ट्ये

या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,55,026 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,42,472 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उतीर्णतेची टक्केवारी 92.09 इतकी आहे.

मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक

दहावीची परीक्षा दिलेल्या एकूण 8,20,427 मुलांपैकी 7,34,814 मुले (89.56 टक्के) तर एकूण 7,22,045 मुलींपैकी 6,85,672 मुली (94.96 टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 5.40 ने अधिक आहे.

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (97.62 टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (88.41 टक्के) आहे. इतर विभागांमध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल 95.47 टक्के, मुंबई- 94.97, पुणे- 94.24, नाशिक- 90.53, अमरावती- 90.50, नागपूर- 89.07 तर लातूर विभागाचा निकाल 88.42 टक्के लागला आहे.

श्रेणीनिहाय निकाल

एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्राविण्यासह प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 27.41 टक्के, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण 31.26 टक्के, द्वितीय श्रेणीमध्ये 24.66 टक्के तर उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 8.75 टक्के इतके आहे.

श्रेणीसुधार/ गुणसुधार योजना

परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत लगतच्या तीन परीक्षांमध्ये पुनःश्च प्रविष्ट होता येईल. फेब्रुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या) जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027, जून-जुलै 2027 च्या दहावीच्या परीक्षेस ‘श्रेणीसुधार/ गुणसुधार’ साठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

सुवेंदू अधिकारी होतील बंगालचे CM, उद्या शपथ:शहा म्हणाले- ममतांच्या राजवटीत गुन्हेगार नेते बनले; काही महिन्यांत हे संपुष्टात येईल

कोलकाता -सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री असतील. कोलकाता येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीनंतर अमित शहा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

सभेला संबोधित करताना शाह म्हणाले की, १९५० मध्ये ज्या विचारसरणीसह आम्ही आपला प्रवास सुरू केला होता—ती म्हणजे श्यामा प्रसाद मुखर्जी यांची विचारसरणी—त्याच विचारसरणीचा परिपाक आज खुद्द त्यांच्याच पक्षाच्या हाती सरकार स्थापन होण्यात झाला आहे.

ममताजींच्या राजवटीत गुन्हेगारच राजकारणी बनले आहेत, ज्यामुळे विकासाला यत्किंचितही वाव उरलेला नाही. अवघ्या काही महिन्यांतच या सर्व गोष्टींचा अंत होईल.

मुख्यमंत्री उद्या सकाळी १० वाजता कोलकाता येथील ‘ब्रिगेड परेड ग्राउंड’वर पदाची शपथ घेतील. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यासह एनडीएचे अनेक प्रमुख नेते या शपथविधी समारंभास उपस्थित राहतील.
सुवेंदू यांनी भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. तसेच, त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातूनही सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली; याच मतदारसंघातून त्यांनी २०२१ मध्ये ममता यांचा पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपने २०७ जागांवर विजय मिळवला आहे.

शहांनी सुवेंदूंना हार घातला, गळाभेट घेतली.
शाह यांच्या भाषणातील ५ प्रमुख ठळक मुद्दे; म्हणाले- “बंगालमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याचे स्वप्न आज साकार झाले आहे”

गंगोत्रीपासून गंगासागरापर्यंत, आज भाजपने सरकार स्थापन केले: गंगोत्रीपासून गंगासागरापर्यंत विस्तारलेल्या १०० वर्षांच्या वैचारिक प्रवासाअंती, भाजपने आज सरकार स्थापन केले आहे. १९५० पासून, आम्ही एका विशिष्ट विचारधारेने प्रेरित होऊन—ती म्हणजे श्यामा प्रसाद मुखर्जी यांची दूरदृष्टी—या मार्गावर वाटचाल सुरू केली होती. आज, जे सरकार स्थापन झाले आहे, ते खुद्द त्यांच्याच पक्षाचे आहे.
बंगालमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याचे स्वप्न साकार झाले: जेव्हा कलम ३७० रद्द करण्यात आले, तेव्हा संपूर्ण देशभरातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, अनेक कार्यकर्त्यांनी असे मत व्यक्त केले की, त्यांची एक प्रलंबित आकांक्षा अजूनही अपूर्ण राहिली आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, बंगालमध्ये भाजपचा झेंडा फडकणे हे अत्यावश्यक आहे. आज, ती आकांक्षा देखील पूर्ण झाली आहे.
भाजपची विधिमंडळातील ताकद ३ वरून २०७ पर्यंत वाढली: आमच्या निवडून आलेल्या आमदारांच्या विजयाचे सरासरी मताधिक्य २८,००० इतके आहे. ३ जागांवरून ७७ जागांपर्यंत, आणि त्यानंतर ७७ वरून २०७ जागांपर्यंत झालेला हा प्रवास खरोखरच अभूतपूर्व आहे. नऊ जिल्ह्यांमध्ये तर टीएमसीला (TMC) आपले खातेही उघडता आले नाही; “दीदी” यांचा पूर्णपणे धुव्वा उडाला आहे.
आम्ही घुसखोरांना एक-एक करून मुळासकट उखडून टाकू: भाजप बंगालच्या जनतेला वचन देते की, आम्ही प्रत्येक घुसखोराला पद्धतशीरपणे शोधून बाहेर काढू—केवळ बंगालमधूनच नव्हे, तर संपूर्ण देशातून. हा काही राजकीय ध्रुवीकरणाचा मुद्दा नाही; तर हा मुळात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असलेला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.
बंगालच्या जनतेप्रती कृतज्ञता: भाजपनेवर विश्वास दर्शवल्याबद्दल आणि निवडणुकीत इतका दणदणीत विजय मिळवून दिल्याबद्दल आम्ही बंगालच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. आम्ही बंगालच्या जनतेला खात्री देतो की, तुम्ही आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, तो पूर्णपणे अढळ राहावा आणि त्यात कधीही, किंचितही उणेपणा येऊ नये, यासाठी आम्ही कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही.

जागतिक मातृ दिनानिमित्त “विद्यार्थी हिताय पालक सुखाय” व्याख्यानमालेचे आयोजन

डॉ. भावेश भाटिया यांचे “रुक् जाना नहीं” प्रेरणादायी व्याख्यान पुण्यात

पुणे, प्रतिनिधी : जागतिक मातृ दिनानिमित्त पुण्यातील यशवंत क्लासेसच्या वतीने “विद्यार्थी हिताय पालक सुखाय” या विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत जागतिक कीर्तीचे अंध उद्योजक, पॅराऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेते आणि सनराईज कँडल्सचे संस्थापक डॉ. भावेश हसुमतीबेन चंदुभाई भाटिया यांचे “रुक् जाना नहीं…” हे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती यशवंत इन्स्टिट्यूटचे संस्थापक शीतल पाटील यांनी दिली.

हा कार्यक्रम रविवार, १० मे रोजी सकाळी ८.३० वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह, सातारा रोड, पुणे येथे होणार आहे. स्वतः अंध असूनही हातगाडी विक्रेत्यापासून तब्बल ३५० कोटी रुपयांची उलाढाल असलेला उद्योग उभारणाऱ्या डॉ. भावेश भाटिया यांनी आपल्या सनराईज कँडल्स या उद्योगाच्या माध्यमातून १० हजारांहून अधिक अंध, दिव्यांग आणि अनाथ व्यक्तींना स्वावलंबनाचा मार्ग दिला आहे.

विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलणारे आणि पालकांना आयुष्यभराची ऊर्जा देणारे हे व्याख्यान प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून ऐकावे, असे आवाहन शीतल पाटील यांनी केले आहे.

यशवंत क्लासेसच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून “मातृनाम प्रथम” शपथ ग्रहण समारंभ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जागतिक मातृ दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामध्ये विद्यार्थी आपल्या नावामध्ये आईचे नाव प्रथम लावण्याची शपथ घेतात. तसेच सोशल मीडियावरील नावांमध्येही बदल करून आईच्या नावाचा सन्मान करतात.

याबाबत बोलताना शीतल पाटील म्हणाले की, “आईला अविस्मरणीय भेट देण्यासाठीचा हा विशेष कार्यक्रम आहे. विद्यार्थी आपल्या आईचे नाव अभिमानाने लावून तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची शपथ घेतात. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये कर्तृत्वाबरोबरच मातृभक्तीची जाणीव निर्माण करणारा आहे.”

या कार्यक्रमासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा सरस्वती धोंडिबा तापकीर, पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय इंदुबाई बबनराव धनकवडे तसेच भूमाता ब्रिगेड आणि फाउंडेशनच्या अध्यक्षा तृप्तीताई संजीवनी प्रशांत देसाई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आणि पालकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन यशवंत क्लासेस आणि राष्ट्रशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

गे डेटींग अॅण्ड चॅट या अॅपद्वारे भुरळ आणि नंतर मारहाण करत लुटमार -दोन भामटे पकडले

पुणे- गे डेटींग अॅण्ड चॅट या अॅपद्वारे लोकांना भुरळ घालून बोलवायचे नंतर मारहाण करत लुटमार करून पळून जायचे अशा पद्धतीची गुन्हेगारी करणारे दोन भामटे गुन्हा दाखल होताच अवघा अर्धा तासात पोलिसांनी पकडले आणि गजाआड केले.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात एक फिराय्द दाखल झाली . यातील फिर्यादीला गे डेटींग अॅण्ड चॅट या अॅपद्वारे चॅटिंग करून बोलावून घेवून त्याला मारहाण करून मोबाईलद्वारे जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर केले आणि त्याची चांदीची चैन हिसकावून घेतल्यामुळे फिर्यादी यांच्या तक्रारीवरून वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर १५३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३५२, ३५१ (२), ३(५) हा जबरी चोरीचा गुन्हा चार अनोळखी इसमांविरुध्द दि. ०८/०५/२०२६ रोजी दाखल केला होता. दाखल गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी तात्काळ तपास पथकाचे प्रभारी संजय नरळे पोलीस उपनिरीक्षक यांना त्यांचे स्टाफ करवी आरोपीचा शोध घेण्याबाबत तोंडी आदेश दिले. लागलीच तपास पथकाचे प्रभारी संजय नरळे, पोलीस उपनिरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे यांनी फिर्यादी यांच्याशी बोलून आरोपींच्याबाबत माहिती घेवून आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच पोलीस अंमलदार बालाजी काटे व महादेव शिंदे यांना त्यांच्या गोपनिय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सदरची जबरी चोरी करणाऱ्यापैकी एक इसम हा अतुलनगर चौकामध्ये थांबला आहे. ही माहिती प्राप्त होताच संजय नरळे, पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या सोबत पोलीस अंमलदार बालाजी काटे, महादेव शिंदे व निखील तांगडे असे माहितीच्या ठिकाणी रवाना होवून तेथून एका आरोपीला ताब्यात घेतले व त्याला विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असून त्याच्या आणखी एका अल्पवयीन साथीदारालासुध्दा ताब्यात घेण्यात आले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे पुणे शहर हे करत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी आव्हान केले आहे की, गे डेटींग अॅण्ड चॅट व इतर अॅपद्वारे लोकांनी अशाप्रकारे फसवणूकीला बळी पडू नये. तसेच कोणाची अशाप्रकारची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तात्काळ वारजे माळवाडी पोलीस ठाणे किंवा आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला जावून तक्रार द्यावी.
कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार,पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग सुजाता तानवडे यांचे सुचनेनुसार व महेश बोळकोटगी,निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार बालाजी काटे, शरद पोळ, निखील खील तांगडे, अमित जाधव, अमित शेलार, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे, महादेव शिंदे, सागर कुंभार, अमोल सुतकर यांनी केलेली आहे.

समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे-सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

सामजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे, दि.८: सामाजिक न्याय विभागाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बदलत आहे, आगामी काळातही कामात सातत्य ठेवून समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी आणखीन चांगले काम करावे; ‘सामाजिक न्याय’ संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहान राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्यवतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लोणावळा येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, सामाजिक न्याय खात्यातील सहसचिव सो.ना. बागुल, उपसचिव वर्षा देशमुख, अवर सचिव सतीश खैरमोडे, राज्यातील प्रादेशिक उपायुक्त, सहायक उपायुक्त उपस्थित होते.

श्री. शिरसाट म्हणाले, विभागाच्यावतीने विद्यार्थी घडविण्याचे फार मोठे काम करण्यात येते. विद्यार्थीच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी वसतिगृहाचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे राज्यात वसतिगृह उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये देण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करुन त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करण्यात यावा.

विभागामध्ये चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे. त्यांनीही विभागात आपल्या कामाच्या माध्यमातून वेगळी छाप निर्माण करावी, राज्याला दिशादर्शक होईल यादृष्टीने नवनवीन उपक्रम राबवावेत, या उपक्रमाचे इतरांनी अनुकरण करण्याची गरज आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता कार्यालयाच्याजवळ निवासस्थान उपलब्ध करण्यासोबतच सोसायटी स्थापन करण्याबाबत नियोजन करावे.

कार्यशाळा ही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण तसेच त्यांच्या अडीअडचणी मांडण्याची व्यासपीठ आहे, त्यामुळे या कार्यशाळेचा आनंद घेत विचाराची देवाण-घेवाण करावी. याठिकाणी झालेले निर्णय, चर्चेच्या अनुषंगाने विभागात प्रभावीपणे अंमलबजावणी करून आगामी सकारात्मक परिणाम दिसले पाहिजे.
राज्याच्या अर्थसंकल्पात विभागासाठी मंजूर झालेला निधी वेळेत खर्च होईल, यादृष्टीने काम करावे, असेही शिरसाट म्हणाले.

प्रधान सचिव डॉ. कांबळे म्हणाले, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. विभागाच्यवतीने समाजातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, नागरिक आदी घटकांसाठी लोक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी काम करावे. येत्या काळात शिक्षण, पायाभूत सुविधा, उद्योजकता, सामजिक सुरक्षा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर या पाच पैलूंवर काम करुन विभागाची धोरण ठरविण्यात येणार आहे, त्यामुळे विभागाने विकसित महाराष्ट्र २०२७ चा दृष्टिकोन समोर ठेवून प्रभावीपणे काम करावे, असेही डॉ. कांबळे म्हणाले.

श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागावतीने येत्या काळात नवनवीन धोरणे, योजना राबविण्याचा मानस आहे. केंद्र सरकारच्या ‘आय-गॉट’ संकेतस्थळाच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा या वर्षी प्रथमच आयोजित करण्यात आल्या, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ऊसतोड कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि तृतीयपंथीयांच्या कल्याकरिता काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, या कार्यशाळेचा विभागाला निश्चित उपयोग होईल, असेही श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या.

यावेळी दिवसभर विविध योजनांच्या संदर्भात प्रादेशिक उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांनी सादरीकरण केले.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार बार्टीचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी केले.

बजाज लाइफकडून सहभागी पॉलिसी धारकांसाठी ₹1939 कोटींचा आतापर्यंतचा सर्वोच्च बोनस जाहीर

·         आर्थिक वर्ष 2026 साठी घोषित बोनसचा लाभ 11.89 लाखांहून अधिक पॉलिसीधारकांना

पुणेमे 08, 2026: भारतातील खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी आघाडीची कंपनी बजाज लाइफ इन्शुरन्सने 2025-26 (FY26) आर्थिक वर्षासाठी ₹1939 कोटी रुपयांचा विक्रमी बोनस जाहीर केला आहेजो आजपर्यंतचा सर्वाधिक आहे. हे आर्थिक वर्ष 25मध्ये घोषित केलेल्या ₹1,833 कोटी बोनसच्या तुलनेत ही वाढ 5.8% एवढी असूनती लक्षणीय आहे. कंपनीच्या सहभागी उत्पादनांमध्ये गुंतवणूक केलेल्या 11.89 लाख पॉलिसीधारकांना या बोनसचा फायदा होईल. सलग २५ वर्षे सातत्याने वार्षिक बोनस जाहीर करून बजाज लाइफने ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा आपला मजबूत वारसा सुरू ठेवला आहे.

31 मार्च 2026 रोजी सध्या ज्या पॉलिसी सुरू आहेत अशा ट्रॅडिशनल पार्टिसिपेटींग पॉलिसी असलेले विमाधारक हा बोनस मिळण्यासाठी पात्र आहेत; हा बोनस सहभागी निधीमधून निर्माण झालेल्या अतिरिक्त नफ्यातून जाहीर केला जातो. ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या एसीई, फ्लेक्सी इन्कम गोल, कॅश गेन, इनव्हेस्ट गेन, स्वर्ण विश्रांती, लाइफटाइम केअर, सुपर सेव्हर आणि इतर अशा अनेक प्रकारच्या सहभागी उत्पादनांची विस्तृत श्रेणी बजाज लाईफ इन्शुरन्स उपलब्ध करून देते. या योजनांचे विमाधारक, इतर लाभांसह, जाहीर करण्यात आलेल्या या बोनसचाही लाभ मिळवण्यास पात्र ठरतात.

याव्यतिरिक्त, फ्लेक्सी इनकम गोल, ACE – इन्कम, लाइफलाँग ॲश्युर आणि कॅश रिच यासारखी निवडक उत्पादने रोख बोनस लाभ देतात. पॉलिसीधारकांना हा बोनस जमा करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असतो. पात्र उत्पादनांसाठी कंपनीने FY2025-26 साठी 6.49% संचय निधी व्याजदर घोषित केला आहे.

या घोषणेवर बजाज लाइफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ तरुण चुग म्हणाले,

आमच्या सहभागी पॉलिसीधारकांसाठी यावर्षी हा बोनस जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या दृष्टिकोनाचे हे सामर्थ्य आहे. तसेच आमच्या ग्राहकांना सातत्यपूर्ण मूल्य वितरीत करण्यावर आमचे सातत्यपूर्ण लक्ष दर्शवते. आमच्या ग्राहकांना त्यांच्या जीवनातील ध्येये आत्मविश्वासाने साध्य करण्यास सक्षम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

प्रत्येक आर्थिक वर्षात घोषित केलेले बोनस पॉलिसीच्या अटींनुसार पॉलिसीच्या मुदतीनुसार किंवा बाहेर पडण्याच्या वेळी वितरित केले जातात. याव्यतिरिक्त, पॉलिसीच्या वर्धापनदिनी रोख बोनस वितरित केला जाऊ शकतो किंवा संबंधित उत्पादन वैशिष्ट्यांमध्ये दर्शविल्याप्रमाणे जमा केला जाऊ शकतो.

क्रेडाईच्या शिफारसीनंतर महापालिका आयुक्तांचा ऐतिहासिक निर्णय, बांधकाम परवान्यांच्या कामाचे विकेंद्रीकरण

बांधकाम परवानग्या आता सुपरफास्ट, प्रकल्पानुसार बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या मंजुरी अधिकारांची पुनर्रचना

महापालिका आयुक्तांचा ऐतिहासिक निर्णय

महापालिकेतील स्थानिक स्तरावर बांधकाम परवानग्या देण्याची जुनी पद्धत आता बंद करण्यात येत आहे. ३० वर्षांपासून चालत आलेल्या काही पद्धतींमुळे शहराची अनियंत्रित वाढ झाली. नवीन पद्धतीचा मुख्य उद्देश शहराचा विकास नियोजित आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा हा आहे.
– नवलकिशोर राम, आयुक्त पुणे महापालिका

मंजुरी अधिकारांच्या विकेंद्रीकरणाचा निर्णय हा पुणे महापालिकेचा एक सकारात्मक प्रशासकीय बदल आहे. प्रकल्पाच्या आकारानुसार अधिकारांचे वाटप केल्याने कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व वाढेल. जर याची डिजिटल ट्रॅकिंगद्वारे प्रभावी अंमलबजावणी झाली, तर याचा फायदा घर खरेदीदार, सोसायट्यांचा पुनर्विकास आणि पुण्याच्या सर्वांगीण नागरी विकासाला होईल.
– कपिल गांधी, व्यवस्थापकीय संचालक सिग्मा वन युनिव्हर्सल आणि जनसंपर्क संयोजक क्रेडाई पुणे

पुणे- बांधकाम परवानग्यांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि वर्षानुवर्षे सुरू असलेल्या स्थानिक स्तरावरील अनियंत्रित मंजुरींना चाप लावण्यासाठी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी धोरणात्मक बदल केला आहे. आयुक्तांनी प्रकल्पाच्या आकारानुसार बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या मंजुरी अधिकारांची पुनर्रचना केली आहे. या निर्णयामुळे लहान आणि मध्यम आकाराच्या प्रस्तावांना गती मिळण्याची अपेक्षा असली, तरी गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेल्या स्थानिक स्तरावरील मंजुरीच्या पद्धतीला आता पूर्णविराम मिळाला आहे.

गुरुवारी जारी केलेल्या आदेशानुसार, महानगरपालिकेने बांधकाम विभागाकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या मंजुरी प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. यापुढे मंजुरीचे अधिकार प्रकल्पाच्या एकूण बांधकामाच्या क्षेत्रावर आधारित असतील. उपअभियंता, कार्यकारी अभियंता किंवा अधीक्षक अभियंता यापैकी कोणत्या स्तरावर कोणता प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्यात आली आहेत.
स्थानिक स्तरावर बांधकाम परवानग्या देण्याच्या जुन्या पद्धतीवर अनेक वर्षांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अनियंत्रित बांधकामे, अतिक्रमणे, नियमबाह्य मंजुरी आणि फायली जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्याच्या तक्रारी सामान्य होत्या. या पार्श्वभूमीवर, आयुक्तांनी जुनी स्थानिक मंजुरी पद्धत थेट मोडीत काढली आहे. आदेशात म्हटले आहे की, “गेल्या ३० वर्षांत विकसित झालेल्या काही पद्धतींमुळे शहरात अनियोजित वाढ आणि अनियमितता वाढली. त्यामुळे मंजुरी प्रक्रियेत अधिकारांचे स्पष्ट वाटप, उत्तरदायित्व आणि वरिष्ठ स्तरावरील नियंत्रण वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

कोणाकडे किती अधिकार असतील?

-२००० चौरस मीटरपर्यंतचे प्रकल्प : उपअभियंता मंजुरी देतील.

-२००० ते १०,००० चौरस मीटरपर्यंतचे प्रकल्प : ले-आउट आणि बांधकाम परवानगी कार्यकारी अभियंत्यांच्या मंजुरीने दिली जाईल.
-१०,००० चौरस मीटरवरील प्रकल्प : मोठे प्रकल्प किंवा ज्यांना भविष्यात पर्यावरण मंजुरी आवश्यक आहे, अशा प्रस्तावांना अधीक्षक अभियंता स्तरावर मंजुरी दिली जाईल.

-दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावरील प्रस्तावांच्या मंजुरीनंतर, संबंधित कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंत्यांच्या स्वाक्षरीने संमती पत्र जारी केले जाईल.

सिंगल विंडोमुळे मंजुरीची प्रक्रिया होणार वेगवान

बांधकाम परवानगी विभाग प्रस्तावांना महिनोनमहीने प्रलंबित ठेवण्यासाठी टीकेचा धनी ठरला होता. अनेक स्तरांवरून फाईल फिरत असल्याने नागरिक, बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारदांना मोठा विलंब सहन करावा लागत असे. प्रशासनाचा दावा आहे की, अधिकारांच्या विकेंद्रीकरणामुळे लहान आणि मध्यम प्रस्तावांवर खालच्या स्तरावर निर्णय घेता येईल, ज्यामुळे मंजुरीची प्रक्रिया वेगवान होईल.

मोठ्या प्रकल्पांवर वरिष्ठांचे नियंत्रण कायम

मोठे प्रकल्प आणि पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता असलेल्या प्रकल्पांसाठी वरिष्ठ स्तरावरील नियंत्रण कायम ठेवण्यात आले आहे. १०,००० चौरस मीटरपेक्षा जास्त असलेल्या प्रकल्पांसाठी अधीक्षक अभियंत्यांची मंजुरी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या प्रकल्पांची तांत्रिक तपासणी आणि पर्यावरणीय पैलूंकडे अधिक लक्ष दिले जाईल याची खात्री केली जाणार आहे.

महाराष्ट्र आता एरोस्पेस उत्पादन आणि पुरवठा साखळीचे एक महत्त्वाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी सज्ज आहे.

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपची मोठी झेपअचूक अभियांत्रिकीच्या जोरावर भारताची एरो इंजिन क्षमता वाढवली

मुंबई,– गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या एरोस्पेस विभागाने भारतातील विमान इंजिन निर्मिती क्षमता भक्कम करण्यास पुढाकार घेतला आहे. अत्याधुनिक इंजिनिअरिंग आणि आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या कामाच्या जोरावर कंपनीने हे यश मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कंपन्यांचा विश्वास प्राप्त झाल्याने गोदरेज या क्षेत्रात आता भरीव कामगिरी करत आहे. गोदरेज एरोस्पेस ही भारतातील विमान इंजिनचे सर्व भाग तयार करणारी एकमेव खासगी कंपनी आहे. यामुळे देशाच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेत कंपनीने मोलाचा वाटा उचलला आहे. ही कामगिरी देशाच्या प्रगत तंत्रज्ञान क्षेत्राला नवी दिशा देत आहे.

१९८० च्या दशकात गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने एरोस्पेस व्यवसायाची स्थापना केली. अगदी स्थापनाकाळापासूनच कंपनीचा हा विभाग देशातील अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून सहभागी झाला आहे. आज हा व्यवसाय जागतिक एरोस्पेस क्षेत्रातील एक प्रमुख नाव म्हणून नावारुपास आला आहे. कंपनी बोईंग, सॅफरन एअरक्राफ्ट इंजिन्स, जीई एरोस्पेस, रोल्स-रॉइस आणि RTX यांसारख्या दिग्गज जागतिक कंपन्यांसोबत काम करत आहे. उच्च दर्ज्याच्या गुणवत्तापूर्वक सेवा प्रदान करताना कामात कोणतीही उणीव दिसून येत नसल्याने गोदरेज एंटरप्रायझेस कंपनीने जागतिक व्यापारातील महत्त्वाच्या कंपन्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आव्हानात्मक यंत्रणांचा पुरवठा करणे ही कंपनीचे खास वैशिष्ट्य मानले जाते. वार्षिक पातळीवर या व्यवसायाने सुमारे २५ टक्के मोठी प्रगती केली आहे. कंपनीच्या निर्यातीत ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जागतिक एरोस्पेस पुरवठा साखळीत या व्यवसामुळे कंपनीने आपला भक्कम पाया रोवला आहे. उत्कृष्ट दर्जा आणि वेळेवर वितरण यामुळे कंपनीचा दबदबाही वाढला आहे.

कंपनीची वाटचाल पाहता भविष्यातील नियोजनांसाठी खास तरतुदी करण्यात आल्या आहेत. पुढील तीन वर्षांत १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, असे कंपनीच्यावतीने जाहीर करण्यात आले. कंपनी आता प्रगत डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानावर भर देणार आहे, याकरिता कंपनीने स्वतःचे संशोधन व विकास केंद्र उभारले आहे. या केंद्रात विमानांच्या यांत्रिक प्रणालींसाठी खास डिझाइन कार्यालयाची सोय करण्यात आली आहे. कंपनीच्या प्रगतीसाठी या केंद्राची स्थापना महत्त्वाची मानली जात आहे. आता कंपनी केवळ दिलेल्या आराखड्यावर काम न करता स्वतःचे खास तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देत आहे. या बदलांमुळे कंपनीचा अभियांत्रिकी क्षमताही मजबूत होईल, असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला. नवोन्मेषावर आधारित विकासासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरेल, परिणामी जागतिक बाजारपेठेत कंपनीचे स्थान उंचावेल, अशी आशाही व्यक्त करण्यात आली.

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या एरोस्पेस व्यवसायाचे बिझनेस प्रमुख माणेक बेहरामकामदिन यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “एरो इंजिन क्षेत्राचा विकास हा सखोल अभियांत्रिकी क्षमता आणि उच्च दर्जाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. यासाठी लवचिक पुरवठा साखली आणि विश्वासार्ह कामगिरी अत्यंत आवश्यक असते. जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, तोच आमच्या प्रवासाचा आधार आहे. महत्त्वाच्या एरोस्पेस प्रणालींचे भारतातच उत्पादन करण्यासाठी आम्ही वचनबद्द आहोत. आम्ही नवनवीन शोध, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ विकासावर सातत्याने गुंतवणूक करत आहोत. भारताचे एरो इंजिन क्षेत्रातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोदरेज सज्ज आहे. जागतिक एरोस्पेस मूल्य साखळीमध्ये आमचे योगदान महत्त्वाचे ठरेल. भविष्यातील प्रगतीसाठी आम्ही पूर्ण ताकदीने करत आहोत.”

गोदरेज एरोस्पेस क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केल्या आहेत. यामध्ये अक्युएटर्स सारख्या क्लिष्ट यंत्रणांचा समावेश आहे. कंपनीसाठी एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. अशा प्रगत प्रणाली तयार कऱण्याची क्षमता असलेल्या मोजक्या भारतीय कंपन्यांमध्ये गोदरेचा समावेश झाला आहे. या यशामुळे कंपनीची ओळख आता बदलली आहे. कंपनी आता केवळ सुटे भाग बनवणारी राहिलेली नाही. त्याऐवजी, ती आता एरोस्पेस क्षेत्रातील एक संपूर्ण डिझाइन आणि इंजिनिअरिंग भागीदार बनली आहे. आता ही कंपनी एकात्मिक एरोस्पेस प्रणाली देण्यास सक्षम आहे. हे परिवर्तन भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे. यामुळे आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाला मोठे बळ मिळणार आहे. ही प्रगती गोदरेजच्या तांत्रिक कौशल्याचा पुरावा आहे.

चौख अभियांत्रिकी, गुणवत्तेची कडक शिस्त आणि दीर्घकालीन क्षमता बांधणमी यांवर गोदरेजने आपला भार दिला आहे. यामुळे एरोस्पेस उत्पादनाच्या क्षेत्रात भारताचे स्थान जागतिक स्तरावर मजबूत होत आहे. गोदरेज आता जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून पुढे येत आहे. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. भारताची औद्योगिक ताकद वाढवण्यासाठी हे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. या उपक्रमांमुळे देशाला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळत आहे. दर्जेदान उत्पादनांमुळे गोदरेजने आपली विश्वासार्हता जपली आहे. भारताला एरोस्पेस क्षेत्रातील प्रमुख केंद्र बनवण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्नशील आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे.

“KFIL’वर्षाचा निव्वळ नफा 376 कोटी रुपये 

पुणेभारत –मे 2026: कास्टिंग्ज आणि पिग आयर्नच्या भारतातील आघाडीच्या उत्पादकांपैकी एकतसेच पोलाद आणि सीमलेस ट्यूब्स क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असलेल्या किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेडने (BSE: 500245, NSE: KIRLFER) आज चौथ्या तिमाहीचे आणि आर्थिक वर्ष 202526 चे आपले आर्थिक निकाल जाहीर केले.

चौथ्या तिमाहीचे (Q4) आणि आर्थिक वर्ष 2026 चे निकाल जाहीर करतानाकेएफआयएलचे व्यवस्थापकीय संचालक आर.व्ही. गुमास्ते म्हणाले, KFIL ने या वर्षाचा समारोप चौथ्या तिमाहीतील अत्यंत दमदार कामगिरीसह केला आहेहे सांगताना मला अत्यंत आनंद  होतो आहे. आमच्या प्रमुख विभागांमधील विक्रीच्या प्रमाणात झालेली भक्कम वाढ आणि सुधारित कार्यक्षमता यामुळे ही कामगिरी आमच्यासाठी खास आहे. वर्षभर प्रतिकूल आर्थिक वातावरणाचा सामना करावा लागला असूनहीआमचा एकत्रित वार्षिक महसूल 5 टक्क्यांनी वाढून 6,889 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेचअपवादात्मक बाबी वगळून करपूर्व नफा (PBT) 25 टक्क्यांनी वाढून 512कोटी रुपयांवर गेला आहेतर वर्षाच्या सुरुवातीपासूनचा निव्वळ नफा (YTD PAT) लक्षणीयरित्या 22 टक्क्यांनी वाढून 358कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

मार्च महिन्याच्या मध्यात सोलापूर एलपीजी पुरवठा खंडित झाल्यावर आम्ही वेगाने दिलेल्या प्रतिसादात आमची लवचिकता दिसून आली. पर्यायी इंधन उपायांचा वेगाने विचार करूनआम्ही केवळ चार दिवसात परिस्थिती पूर्ववत केली आणि आमच्या उत्पादन वेळापत्रकावर तसेच ग्राहकांना दिलेल्या आश्वासन पूर्ततेवर कमीत कमी परिणाम होईलअसा प्रयत्न केला.

भविष्याचा विचार करताआमचे सर्व प्रमुख भांडवली प्रकल्प आणि धोरणात्मक विलीनीकरणे नियोजनानुसार सुरू आहेत. मूल्यनिर्मितीच्या आमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनासाठी आम्ही दृढपणे वचनबद्ध आहोत. यात अधिक समृद्ध उत्पादन मिश्रणावर लक्ष केंद्रित करणेनवीकरणीय ऊर्जेद्वारे खर्चात बचत करणे आणि जागतिक बाजारपेठेत आमचे स्पर्धात्मक स्थान मजबूत करणे यांचा समावेश आहे. ”

चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष 2026 च्या आर्थिक कामगिरीचा स्वतंत्र आढावा:
रुपये (कोटी)Q4 FY 26Q4 FY25वार्षिकYTD FY 26YTD FY25वार्षिक
महसूल1,781.01,736.23%6,783.96,566.33%
ईबीआयटीडीए*225.9198.514%836.0757.910%
ईबीआयटीडीएमार्जिन12.7%11.4% 12.3%11.5% 
पीबीटी#176.7127.738%514.4432.119%
पीएटी130.095.636%375.6317.318%
चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष 2026 च्या आर्थिक कामगिरीचा एकत्रित आढावा:
रुपये (कोटी)Q4 FY 26Q4 FY25वार्षिकYTD FY 26YTD FY25वार्षिक
महसूल1,817.21,737.05%6,888.66,564.25%
ईबीआयटीडीए*224.6201.312%841.7756.211%
ईबीआयटीडीएमार्जिन12.4%11.6% 12.2%11.5% 
पीबीटी#169.8123.737%496.6408.522%
पीएटी123.192.333%357.8294.022%

* इतर उत्पन्न आणि अपवादात्मक बाबी वगळून

सुवेंदू अधिकारी होतील पश्चिम बंगालचे CM:गृह मंत्रालयही त्यांच्याकडेच; रुपा गांगुली DCM, दुसरे DCM पुरूष जे दार्जिलिंगमधून असतील

5 वा. घोषणा
कोलकाता -सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री असतील. राज्यात दोन उपमुख्यमंत्रीही असतील. उपमुख्यमंत्रिपदासाठी रूपा गांगुली यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. दुसरे उपमुख्यमंत्री दार्जिलिंगमधील एक पुरुष आमदार असतील.

सुवेंदू यांच्याकडे गृह मंत्रालयाचा कार्यभार असेल. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर, आज सायंकाळी ५ वाजता या तिघांच्याही नावांची घोषणा केली जाईल.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ९ मे रोजी कोलकाता येथील ‘ब्रिगेड परेड ग्राउंड’वर आपल्या पदाची शपथ घेतील. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यासह एनडीएचे अनेक प्रमुख नेते या शपथविधी समारंभाला उपस्थित राहतील.

सुवेंदू यांनी भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातूनही सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे; याच मतदारसंघातून त्यांनी २०२१ मध्ये ममता यांचा पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपने २०७ जागांवर विजय मिळवला आहे.

4 मे: बंगालमध्ये पहिल्यांदा भाजप जिंकली

4 मे रोजी 293 जागांचे निकाल आले. भाजपला 207 जागा मिळाल्या. टीएमसी फक्त 80 जागांवर मर्यादित राहिली. राज्यात एकूण 294 विधानसभा जागा आहेत, फालता येथील एका जागेवर 21 मे रोजी पुन्हा मतदान होईल. निकाल 24 मे रोजी येईल.

5 मे: ममता म्हणाल्या- राजीनामा देणार नाही

ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले- मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही. आम्ही जनादेशामुळे नाही, तर कटामुळे हरलो आहोत. त्यामुळे राजीनामा देण्यासाठी राजभवनात जाणार नाही. ममता पुढे म्हणाल्या- निवडणूक आयोगाने भाजपसोबत मिळून 100 जागा लुटल्या.

6 मे: सुवेंदुंच्या PA ची गोळ्या झाडून हत्या

कोलकाताजवळ मध्यमग्राम येथे सुवेंदु अधिकारी यांचे PA चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ते स्कॉर्पिओमध्ये होते. एक कार त्यांच्या गाडीसमोर उभी राहिली. याच दरम्यान बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी 6 ते 10 गोळ्या झाडल्या.

7 मे: बंगालच्या राज्यपालांनी विधानसभा विसर्जित केली

बंगालचे राज्यपाल आरएन रवी यांनी विधानसभा विसर्जित केली. गुरुवारी संध्याकाळी लोकभवनातून याची अधिसूचना जारी झाली. याचा अर्थ असा की ममता मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याकडे आता कोणतीही सत्ता राहणार नाही.

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत कुस्ती व खो-खो मध्ये महावितरण संघाला विजेतेपद

पुणेदि मे २०२६: येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने कुस्तीच्या १० वजन गटामध्ये ५ सुवर्ण व २ रौप्य पदकांची कमाई करीत सांघिक विजेतेपद मिळवले. तर महावितरणच्या खो-खो संघाने या स्पर्धेवर एकतर्फी वर्चस्व ठेवत विजेतेपदकाची अपेक्षित कमाई केली. तसेच बास्केटबॉलच्या अंतिम लढतीत पंजाब संघाने विजेतेपद मिळवले.

एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत शुक्रवारी कुस्तीच्या १० वजनगटामध्ये शुक्रवारी (दि. ८) अंतिम सामने झाले. यात विविध वजनगटानुसार अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे. ५७ किलो १) सुदर्शन पाटील (महावितरण) व जर्नेलसिंग (हिमाचल प्रदेश), ६१ किलो अश्विन मोरे (महावितरण) व सुरेश कुमार (हरियाणा), ६५ किलो राजकुमार काळे (महावितरण) व अजय कुमार (हिमाचल प्रदेश), ७० किलो रणवीरसिंग (पंजाब) व आनंद नागरगोजे (महावितरण), ७४ किलो सुखबीरसिंग (हिमाचल प्रदेश) व नरेंदरसिंग (पंजाब), ७९ किलो अखिल मुजावर (महावितरण) व शेरोसिंग (पंजाब), ८६ किलो अजय कुमार (हिमाचल प्रदेश) व दीपक कुमार (राजस्थान), ९२ किलो बलवीरसिंग (हिमाचल प्रदेश) व अरूण गौड (हरियाणा), ९७ किलो अमोल गवळी (महावितरण) व मदन (हरियाणा), १२५ किलो विजेंदरसिंग (हिमाचल प्रदेश) व प्रमोद ढेरे (महावितरण).

यानंतर महावितरण विरुद्ध हरियाणा पॉवर संघामध्ये खो-खोची अंतिम लढत झाली. यात भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह निशिकांत शिंदे, विराज कोटमकर, महेंद्र पाटील यांनी महावितरणच्या आक्रमण व संरक्षणामध्ये आक्रमकता कायम ठेवली आणि हरियाणा पॉवर संघाचा दोन गुण आणि एक डाव राखून एकतर्फी विजय मिळवला. कबड्डीमध्ये महावितरणने अंतिम फेरीत प्रवेश केला असून तुल्यबळ व मागील विजेता हिमाचल प्रदेशशी लढत होणार आहे. महावितरणने बीएसईएस दिल्ली संघाचा ३६  विरुद्ध १० असा एकतर्फी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. तर हिमाचल प्रदेशने हरियाणा पॉवर संघाचा ४८ विरुद्ध २८ असा पराभव करीत अंतिम फेरीमध्ये महावितरणला आव्हान दिले आहे.

बास्केटबॉलच्या अंतिम सामन्यात पंजाब संघाने (४५) हरियाणा संघाला (३०) १५ गुणांनी विजय मिळवत स्पर्धेतील विजेतेपद मिळवले. पंजाबकडून हरप्रित सिंग यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर तृतीय स्थानासाठी अत्यंत चुरशीच्या व शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा निर्माण झालेल्या बास्केटबॉलच्या लढतीत महावितरण संघाने (२३) राजस्थान संघाचा (२१) केवळ २ गुणांनी पराभव केला. महावितरणकडून भारत मराठे यांनी शेवटच्या क्षणाला दोन गुणांची कमाई करीत संघाला विजयी केले. या लढतीत कृष्णा लाड, किशोर सपकाळे यांनीही चमकदार कामगिरी केली.  

अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यथित

0

थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर प्रकरणांत कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक न्यायालयीन सुनावणी आणि पीडित कुटुंबांना तातडीच्या मदतीची मागणी

मुंबई, ७ मे २०२६ : महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यात अल्पवयीन मुली आणि मुलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांना पत्र पाठवून कठोर आणि तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनांचा उल्लेख करत त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा आणि पीडितांना जलद न्याय देण्याची मागणी केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, अल्पवयीन मुलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये जवळचे नातेवाईक आणि शेजारीच आरोपी असल्याने समाजात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. थेऊर येथे ६ वर्षीय मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचाराचा प्रयत्न, लोणावळ्यात वडिलांकडूनच मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, अकोल्यात १० वर्षीय चिमुकलीवर वृद्ध शेजाऱ्याकडून अत्याचार, कोल्हापुरात जन्मदाते वडील व नातेवाईकांकडून १५ वर्षीय मुलीवर पाच वर्षे सुरू असलेले अत्याचार तसेच सोलापुरात ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार या घटनांनी संपूर्ण राज्य हादरले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या सर्व प्रकरणांचा तपास जलदगतीने पूर्ण करून तातडीने चार्जशीट दाखल करावी, आरोपींना जामीन मिळू नये यासाठी कठोर भूमिका घ्यावी आणि सर्व खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना POCSO कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

तसेच प्रत्येक पीडित बालकाच्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेअंतर्गत ५ ते १० लाखांची आर्थिक मदत तत्काळ द्यावी, बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून द्यावा आणि पुनर्वसनासाठी विशेष कृती आराखडा तयार करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. पीडित कुटुंबांना सुरक्षित निवास, आर्थिक उपजीविकेच्या संधी, साक्षीदार संरक्षण आणि आवश्यक शासकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

या अत्यंत संवेदनशील प्रकरणांकडे वैयक्तिक लक्ष देऊन पीडित कुटुंबियांना तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन: आरोपीला तात्काळ बेड्या: २४ तासांचे आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

0

पुणे- खाण्याचे आमीष दाखवुन चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन करणा-या आरोपीला तात्काळ बेड्या ठोकुन त्याचे विरुध्द २४ तासांचे आत न्यायालयात दोषारोपपत्र येथील लोणीकाळभोर पोलिसांनी दाखल केले आहे.
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु र नं. १८६ / २०२६ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ७४ सह बालकाचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण कायदा २०१२ चे कलम ८, १२ प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी महिला यांचे ६ वर्षाच्या चिमुकलीला (निर्भयास) त्यांचेच परिसरात मौजे थेऊर ता. हवेली जि. पुणे गावचे हद्दीत भिमनगर येथे राहणा-या श्रीधर लिंबाजी कांबळे वय ४६ वर्षे रा. भिमनगर थेऊर ता. हवेली जि. पुणे याने निर्भया हिचे अल्पवयाचा गैर फायदा घेवुन, ती खेळत असताना तिला खाण्याचे आमीष दाखवुन, जवळ बोलावुन घेऊन तिचेसोबत लैंगिक गैरकृत्य केल्याबाबत निर्भयाचे आईने तक्रार दाखल केल्याने लोणी काळभोर पोलीसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास तात्काळ अटक केली.
तसेच सदर गुन्हयाचा जलदगतीने २४ तासांच्या आत संपुर्ण तपास पूर्ण करुन आरोपीस जलदगतीने शिक्षा होईल या उद्देशाने त्याचे विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार , पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, ,अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-6 सागर कवडे, सहा. पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग अनुराधा उदमले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंन्द्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) स्मिता पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्नेहल राजे, यांचे मार्गदशनाखाली तपास अधिकारी स.पो.निरीक्षक, कृष्णा बाबर, पोलीस उप. निरीक्षक पुजा माळी, पोलीस उप निरीक्षक रुपाली जाधव, पोलीस अंमलदार सागर जगदाळे, चेतन कुंभार यांचे पथकाने हि कारवाई केली.

दहावीचा निकाल उद्या!:दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार,निकाल कुठे पाहता येणार?

पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. निकालापूर्वी सकाळी 11 वाजता मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालाची अधिकृत घोषणा केली जाईल, ज्यानंतर विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार 8 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्य मंडळाने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली असून, परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा उद्या संपणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवरून आपला निकाल पाहता येईल.

दहावीचा निकाल कुठे पाहता येणार?

https://sscresult.mahahsscboard.in/
https://results.targetpublications.org/
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
https://results.navneet.com

वर दिलेल्या संकेतस्थळांवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीचे निकाल विक्रमी वेळेत जाहीर करण्याची आपली परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. पूर्वी जून महिन्यापर्यंत लांबणीवर पडणारे हे निकाल आता मे महिन्यातच हाती येत असून, बारावीचा निकाल 2 मे रोजी लागल्यानंतर आता दहावीचा निकालही उद्या, 8 मे रोजी जाहीर होत आहे. या तत्परतेमुळे पुढील प्रवेश प्रक्रिया आणि नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात वेळेत होण्यास मोठी मदत होणार असून, दहावीच्या निकालापाठोपाठ आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्गही मोकळा होणार आहे.