Home Blog Page 559

अग्नी वॉरियर  – 2024 या संयुक्त सरावाची यशस्वी सांगता

0

भारतीय लष्कर आणि सिंगापूरचे सशस्त्र दल यांच्यामधील लष्करी सराव

देवळाली-भारतीय लष्कर आणि सिंगापूरचे सशस्त्र दल यांच्यामधील द्विपक्षीय संयुक्त लष्करी सराव उपक्रमा अंतर्गतच्या अग्नी वॉरियर (XAW – 2024) या तेराव्या पर्वातील सरावाचा आज दि. 30 नोव्हेंबर 2024 रोजी समारोप झाला. महाराष्ट्रात देवळाली इथल्या फील्ड फायरिंग रेंज इथे या सरावाचे आयोजन केले होते.  28 ते 30 नोव्हेंबर 2024 अशा तीन दिवसांच्या कालावधीत हा सराव फार पडला. या सरावात सहभागी झालेल्या सिंगापूरच्या सशस्त्र दलाच्या तुकडीत सिंगापूर तोफखान्याचे  182 जवान आणि भारतीय लष्कराच्या तुकडीत भारतीय तोफखान्याच्या 114 जवानांचा समावेश होता.

संयुक्त राष्ट्रांच्या करारा अंतर्गत बहुराष्ट्रीय दल म्हणून संलग्नता प्राप्त करण्यासाठी  परस्परांची सरावपद्धती आणि कार्यपद्धतींचे जास्तीत जास्त आकलन करून घेणे हे या XAW – 2024 च्या संयुक्त सरावाचे उद्दीष्ट होते. या सरावामध्ये दोन्ही सैन्याच्या तोफखान्यानी संयुक्त मारक क्षमतेचे नियोजन, अंमलबजावणी आणि नवीन पिढीच्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्याबाबतची प्रात्यक्षिके सादर केली.

या संयुक्त  सरावाच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भारतीय तोफखान्याचे  महासंचालक लेफ्टनंट जनरल अदोष कुमार, स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल एनएस सरना आणि सिंगापूर सशस्त्र दलाच्या शस्त्रागाराचे मुख्य अधिकारी कर्नल ओंग चिओ पेरंग उपस्थित होते. या सरावात सहभागी झालेल्या जवानांनी सर्वोत्तम दर्जाची व्यावसायिक तज्ञता आणि कौशल्याचे दर्शन घडवणारी प्रात्यक्षिके सादर केल्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी सहभागी जवानांची प्रशंसा केली.

या सरावामध्ये व्यापक संयुक्त नियोजन आणि तयारी, समन्वय, परस्परांची क्षमता आणि कार्यपद्धती समजून घेणे तसेच भारत आणि सिंगापूरच्या तोफखाना यांच्यात प्रक्रिया विषयक व्यवस्थेतील परस्पर सामायिक इंटरफेस विकास  अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. या सरावाअंतर्गत सिंगापूरच्या सशस्त्र दलाच्या जवानांनी अग्नि शक्ती नियोजनाशी संबंधित जटील आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेशी संबंधीत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून त्याबाबतचे ज्ञान प्राप्त केले. सरावादरम्यान दोन्ही देशांच्या सहभागी जवानांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि संयुक्त प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण केली.

***

राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा:नील मुळ्ये, ईशान खांडेकर, समृद्धी कुलकर्णी,जान्हवी फणसे व नैशा रेवसकर यांच्याकडे पुणे जिल्हा संघांचे नेतृत्व

पुणे दिनांक ३० डिसेंबर
नील मुळ्ये, ईशान खांडेकर, समृद्धी कुलकर्णी,जान्हवी फणसे व नैशा रेवसकर
यांच्याकडे आगामी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे पुण्याच्या वेगवेगळ्या संघांची निवड आज येथे जाहीर करण्यात आली. ही स्पर्धा दोन डिसेंबर पासून पुण्यात आयोजित केली जाणार आहे.

डावखुरा राष्ट्रीय खेळाडू नील मुळ्ये याच्याकडे आगामी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी पुरुष व १९ वर्षाखालील मुले या दोन संघांचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. १७ वर्षाखालील मुलांच्या संघाचे कर्णधारपद ईशान खांडेकर याच्याकडे देण्यात आले आहे. या सर्व संघांचे प्रशिक्षक म्हणून दीपक कदम यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
समृद्धी कुलकर्णी (कर्णधार) हिच्याकडे  महिला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून १९ व १७ वर्षाखालील मुलींच्या संघाचे कर्णधारपदी अनुक्रमे जान्हवी फणसे व नैशा रेवसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व संघांचे प्रशिक्षक म्हणून अमित ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा संघातील खेळाडू याप्रमाणे-
पुरुष अमिष आठवले, नील मुळ्ये (कर्णधार), जय पेंडसे, भार्गव चक्रदेव, शुभंकर रानडे,
१९ वर्षाखालील मुले-नील मुळ्ये (कर्णधार), अमिष आठवले, प्रणव घोलकर, ईशान खांडेकर
१७ वर्षाखालील मुले ईशान खांडेकर (कर्णधार) शौरेन सोमण, कौस्तुभ गिरगावकर प्रणव घोलकर
महिला-समृद्धी कुलकर्णी (कर्णधार),धनश्री पवार, स्वप्नाली नराळे, वैष्णवी देवघडे, तितिक्षा पवार.
 १९ वर्षाखालील मुली- जान्हवी फणसे (कर्णधार), तनया अभ्यंकर, साक्षी पवार, श्रिया शेलार‌
१७ वर्षाखालील मुली- नैशा रेवसकर (कर्णधार), सई कुलकर्णी, तनया अभ्यंकर जान्हवी फणसे.
प्रशिक्षक-अमित ठाकूर

देश निर्मितीसाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची डॉ.फिरोज बख्त अहमद

२९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालाचा समारोप समारंभ

पुणे,दि.३० नोव्हेंबर: ” देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आजद यांनी देशात उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. देश निर्मितीसाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे हे त्यांनी जाणले होते.” असे विचार दिल्ली येथील मौलाना आजाद नॅशनल उर्दु युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू डॉ.फिरोज बख्त अहमद यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या २९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच प्रा.शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. आर.एम.चिटणीस, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, २९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
यावेळी योगाचार्य मारूती पाडेकर गुरूजी आणि प्रा. अतुल कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ.फिरोज बख्त अहमद म्हणाले,” आजाद यांनी हिंदू मुस्लिम एकतेवर अधिक भर दिला. महात्मा गांधी आणि पं.नेहरू यांच्या खांद्याला खांदा लावून देशाला प्रगतीपथावर नेण्यास कार्य केले. धर्मा ने मुस्लिम असून सुद्धा आजाद यांनी सर्वधर्माचे पालन केले. १६ जुलै १९४९ साली देशातील एका वृत्तपत्रात मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या विरोधात एक बातमी प्रकाशित झाली होती. त्यांनी नारळ फोडून एका रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले. त्यामुळे त्यांचा धर्म नष्ट झाला. यावर आजाद यांनी मोहम्मद अली जीना यांना उत्तर पाठविले होते की नारळ आणि घी टाकून माझा धर्म आणखी मजबूत होतो.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ” भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचा संदेश जगभर पसरविण्यासाठी या व्याख्यानमाला महत्वपूर्ण आहे. भारताला विज्ञान आणि ज्ञानाची भूमी म्हणून संपूर्ण जगभर ओळखले जाते. भारतीय संस्कृती समाजात रुजविण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. समाजातील लोकांचे स्वत्व, स्वधर्म आणि स्वाभिमान जागृत करुन शांततामय समाज निर्माण होण्यास मदत होईल. ”
डॉ. एस.एम.पठाण म्हणाले,” देशातील पहिले शिक्षण मंत्री मौलान अबुल कलाम आजाद यांनी शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविला. त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्राला नवा आयाम दिला आहे. भारतीय संस्कृती ही अत्यंत प्राचिन व ऋषिमुनींची आहे.”
यावेळी मारूती पाडेकर गुरूजी यांनी योगासनाचे महत्व सांगून सर्वांना उत्तम आरोग्य ठेवण्याच्या शुभेच्छा दिल्यात.
ड़ॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.

​​​​​​​एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली,105 ताप:मुंबईहून दरे गावी पाठवले गेले डॉक्टर्स

मुंबई-काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 105 अंश सेल्सिअसचा ताप आला आहे. यामुळे ते आज दिवसभर घराबाहेर पडले नाहीत. डॉक्टरांनी त्यांना घरातच सलाईन लावली आहे. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदे यांची प्रकृती बिघडल्यामुळे महायुती सरकारचा प्रस्तावित शपथविधी सोहळा आणखी लांबतो की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन 7 दिवस उलटले आहेत. भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुतीने 288 पैकी 230 जागा जिंकल्या आहेत. मात्र शपथविधीबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली असली तरी ते गृह मंत्रालयावर ठाम आहेत. 29 नोव्हेंबर रोजी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन शिंदे मुंबईत परतले आणि सर्व कार्यक्रम रद्द करून साताऱ्याला त्यांच्या गावी रवाना झाले. आता त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करण्यासाठी साताऱ्याला गेले आहे.

माजी मंत्री दीपक केसरकर हे आज एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी साताऱ्याच्या दरे या त्यांच्या गावी आले होते. पण शिंदेंची प्रकृती ठीक नसल्याचे कळताच त्यांना बंगल्याच्या गेटवरूनच आल्या पावली मुंबईच्या दिशेने माघारी फिरावे लागले.दुसरीकडे, भाजप विधिमंडळ पक्षाची बैठकही 2 दिवस लांबणीवर टाकण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक आता 1 डिसेंबर ऐवजी 3 डिसेंबर रोजी होईल. याच दिवशी दिल्लीहून 2 पर्यवेक्षक येतील. आमदारांशी चर्चा केल्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा करतील.त्यातच भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, संघाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वा. मुंबईच्या आझाद मैदानावर होईल. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत शपथ घेईल.

शारीरिक व मानसिक आरोग्यासह पर्यावरणासाठी पुण्यात रविवारी ‘हार्टफुलनेस रन’चे आयोजन  

पुणे: ग्रॅन्यूल्स ग्रीन हार्टफुलनेस रन या जागतिक उपक्रमाचे आयोजन 1 डिसेंबर 2024 रोजी सकाळी ६ वाजता पुण्यात होणार आहे. वाघोली येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल येथे सुरू होणारी आणि नगर रोडवरून परत येणारी ही स्पर्धा हार्टफुलनेस संस्थेने श्री.कमलेश डी. पटेल (दाजी) यांच्या मार्गदर्शनाखाली युवा व क्रीडा मंत्रालय व फिट इंडिया मूव्हमेंट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. देशभरात ८० ठिकाणी होणारी ही मॅरेथाॅनमध्ये जवळपास ४०,०००+ लोक एकत्र येणार आहेत. या मॅरेथाॅनचा उद्देश शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य वाढवणे तसेच पर्यावरणीय शाश्वतता टिकवणे हा आहे.
या रनमध्ये सहभागी होणाऱ्यांना 1 किमी, 3 किमी, 5 किमी, व 10 किमी या श्रेणीमध्ये सहभागी होण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच, या उपक्रमातून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग 10,000 झाडे लावण्यासाठी करण्यात येईल. या मॅरेथॉनला डॉ. जगन्नाथ दीक्षित, डायबेटीस रिव्हर्सल तज्ज्ञ आणि प्रीती मस्के, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक, यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.
एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी, अदार पूनावाला ग्रुप, जी.एच. रायसोनी कॉलेज, अॅडव्हेंचर आयआयटी, गिरिराज ज्वेलर्स आणि आयव्ही इस्टेट या नामांकित संस्थांनी या अभीनव उपक्रमाला पाठिंबा दर्शविला आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेसाठी एसएनबीपी स्कूलच्या प्राचार्या श्वेता वकील, हार्टफुलनेसचे प्रवक्ते विक्रम मकवाना, प्रतिनिधी सुरभी सहाई, युवा प्रतिनिधी प्रशांत पाटील, एडव्हेंचर आयआयटीचे प्रभज्योत सिंग, गौतम बिरहाडे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी प्रा.चंद्रकांत बोरुडे आदी उपस्थित होते.
मकवाना म्हणाले, “या धावण्याच्या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, मग धावणे असो, जॉगिंग असो किंवा चालणे, हे शाश्वतता आणि सामुदायिक आरोग्यासाठी आहे. हार्टफुलनेसने 2020 पासून 20 लाखांहून अधिक झाडे लावली आहेत आणि 80 हून अधिक दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन केले आहे. या उपक्रमामुळे 1,027 एकर जमीन पुनर्जीवित झाली आहे आणि 25,000 टन कार्बन उत्सर्जनाचे समतोल राखण्यात यश आले आहे.
सुरभी सहाई म्हणाल्या, १६० देशांमध्ये सक्रिय असलेल्या हार्टफुलनेसकडून व्यक्ती, शाळा आणि कॉर्पोरेशनसाठी मोफत ध्यान आणि इतर आरोग्य कार्यक्रम राबविले जातात. त्यामुळे या हरित आणि आरोग्यदायी उपक्रमाचा भाग बनण्यासाठी greenheartfulnessrun.com येथे त्वरित नोंदणी करा,” असे आवाहनही त्यांनी केले.
प्रा. बोरुडे म्हणाले की, “प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सशक्त होण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या दृष्टिकोनाला पूरक उपक्रम म्हणून डॉ. मंगेश कराड यांनी या हार्टफुलनेस मिशनला पाठिंबा दिला आहे.”


आजकाल आपण बहुतेक जण छोट्या कुटुंबांमध्ये राहतो त्यामुळे आपल्याला आधाराची गरज आहे. ही एकत्र उभे राहण्याची, इतरांसाठी विचार करण्याची, आणि दयाळू व करुणामय समाज तयार करण्याची वेळ आहे. आपल्याला चांगुलपणा आणि एकतेचा प्रसार करायचा आहे. प्रत्येक कुटूंबातील व्यक्तीला आधार व मदत देण्यासाठी हार्टफुलनेस समर्पित आहे.
– श्री.कमलेश डी. पटेल (दाजी),
संस्थापक, हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट

EVM हटावो: उद्धव ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बाबा आढाव यांचे उपोषण स्थगित

पुणे-EVM हटावो आणि मत मिळविण्याच्या उद्देशाने पैसे वाटप करणाऱ्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणण्याच्या प्रवृत्तीविरोधात सुरु केलेले आंदोलन सुरूच राहील मात्र उपोषण ९५ वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आज उद्धव ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत स्थगित केले. तत्पूर्वी अजित पवार , शरद पवार यांनीही बाबा आढाव यांच्या भेटी घेतल्या . आणि आपले मत संसदेत , सभागृहात प्रकर्षाने मांडण्याचे त्यांना आश्वासन दिले .

राज्यातील विधानसभा निवडणुकीत EVM आणि पैशांच्या मोठ्या प्रमाणातील वापराविरोधात त्यांनी आंदोलन, उपोषण केलं होतं. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने हे आंदोलन पुढे घेऊन जावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंच्या उपस्थित, त्यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. बाबा आढाव यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रिया दिली. एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं कोणाला वाटत असेल, तर वणवा पेटवायला एक ठिणकी कारणीभूत असते आणि ती ठिणगी आज पडलेली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी या आंदोलनावर भाष्य केलं आहे.
तुम्ही म्हातारपण स्वीकारायला तयार नाहीत, आजही तुम्ही आम्हाला प्रेरणा देता. माझं मत आहे प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी बाबा आढावांबद्दल दिली.पुढे ते म्हणाले, ‘एक सरकारी ताफा आता इथून गेला. महत्त्वाचा मुद्दा हा की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हारलेले सुद्धा इथे येतोय. थोडक्यात या निकालावर ना हारलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे. जिंकले त्यांना धक्का आहे की आम्ही जिंकलो कसे आणि आम्ही हारलो आम्हाला धक्का बसला आहे की आम्ही हरलो कसे. याच कारण स्पष्ट आहे. जे आमच्याकडून वदवून घेतलं, सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालं आहे आणि त्याच्याविरोधात आपण उभे राहिलो आहोत’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीवर तोफ डागली.’आताशी सुरुवात झाली आहे.

पैशांचा अमाप वापर झाला हे आपल्याही कानावर आलं. सर्वांनी विनोद तावडेंचा तो व्हिडिओही बघितला. योजनांचा पडणारा पाऊस पाहिला. थोडक्यात या सरकारने काय केलं आहे, की योजनांचा ऍनेस्थेशिया देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं.”मह्त्तावाचा मुद्दा एक नाहीये, असे अनेक मुद्दे आहेत. त्यापैकी एक ईव्हीएमचा मुद्दा आहे आणि म्हणूनच मी उल्लेख केला, की जिंकलेले सुद्धा हारल्यासारखे येतात आणि हारलेले सुद्धा जिंकल्यासारखे येतात. याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे’, अशा म्हणत उद्धव ठाकरेंनी EVM घोटाळा मुद्दावर भाष्य केलं.

EVM चा मुद्दा सुप्रीम कोर्टावर आणि आयोगावर ढकलून अजित पवार आढावांना भेटून माघारी

पुणे-निवडणुकीच्या तोंडावर आम्ही योजना आणली त्या आम्हाला लाडक्या बहिणींनीच विजयी केले आहे हे मान्य करत EVM चा मुद्दा सुप्रीम कोर्टाच्या आणि आयोगावर ढकलून अजित पवार बाबा आढावांना भेटून माघारी परतले.

बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलेले आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून आल्या. त्यावेळी जनतेने दिलेले जनमत आम्ही मान्य केले. लोकसभा निवडणुकीत मी देखील बारामती मध्ये जो उमेदवार दिला होता त्याचा 48 हजार मतांनी पराभव झाला. तर दुसरीकडे विधानसभेत त्याच लोकांनी मला एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी केले. त्यामुळे जनतेला कोण प्रश्न विचारावे? त्यांनी ठरवले त्याला निवडून दिले असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला असेल तर त्याला आम्ही काय करणार? असा प्रश्न देखील अजित पवार यांनी उपस्थित केला. बाबा आढाव यांनी मांडलेल्या काही गोष्टी या सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहे. तर काही गोष्टी निवडणूक आयोगाच्या संबंधित असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. मात्र, जनतेचा कौल पाच महिन्यात बदलत असेल तर तो मान्य केला पाहिजे, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा या एकत्र एकत्रित झालेल्या निवडणुकीचा दाखला दिला. एकाच मतदान केंद्रावर एका बाजूला शरद पवार यांना लोकसभेसाठी लोकांनी मतदान केले तर विधानसभेसाठी मला मतदान केले होते. मात्र शरद पवार यांची लीड माझ्यापेक्षा पन्नास हजारांनी जास्त होती. त्यावेळी लोकांना वाटले असेल तिथे मला विधानसभेत पाठवू नये. मात्र, त्या वेळी मी देखील असा प्रश्न उपस्थित केला नव्हता. अशी आठवण त्यांनी करुन दिली.

लाडकी बहिण योजनेवर बाबा आढाव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला देखील अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. संजय गांधी निराधार योजनेचे उदाहरण देखील अजित पवार यांनी दिले. साठ रुपयापासून सुरू झालेल्या योजनेचे आता दीड हजार रुपये झाले आहेत. ती योजना देखील चालूच आहे. या माध्यमातून जनतेला मदत करणे हा एकच हेतू असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. आम्ही बहिणींना दीड हजार रुपये दिले तर 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील तीन हजार रुपयांचे प्रलोभण दाखवलेच होते ना? असा प्रश्न देखील अजित पवार यांनी उपस्थित केला. लाभार्थ्यांना लाभ देण्याचे निर्णय आम्ही घेतले तसे मध्य प्रदेश, कर्नाटक मध्ये देखील महिलांसाठी योजना सुरू आहेत. दिल्लीमध्ये देखील अरविंद केजरीव यांनी अनेक योजना मोफत केल्या आहेत. शंभर युनिट पर्यंत वीज देण्याचे आश्वासन त्यांनी पंजाब मध्ये देखील दिले आहे.

विरोधकांच्या बाजूने निकाल लागला तर, ईव्हीएम चांगले आणि विरोधात निकाल लागला की, ईव्हीएम वाईट, असे योग्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. तुमचे काही मुद्दे असतील तर ते मांडण्याची संसदेमध्ये परवानगी द्यावी अशी मागणी आम्ही दिल्लीत संसदीय कामकाज मंत्र्यांडके करणार असल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.

ईव्हीएम, अदानी ते मोदी, अजित पवारांच्या समोरच बाबा आढाव यांनी सरकारचे काढले वाभाडे

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधात पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे गेल्या तीन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शरद पवार यांनी भेट दिली होती. त्यानंतर अजित पवार दुपारी भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी बाबा आढाव यांनी पत्रकार परिषद घेत विनोद तावडे पैसे वाटप प्रकरण, अदानी प्रकरणावरून दादांसमोरच सरकारचे वाभाडे काढले. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाण साधल्याचं पाहायला मिळालं.
महाराष्ट्राच्या १९५२ पासून आजतागयत जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यामधील या निवडणुकीमध्ये पैशांचा धुमाकूळ झाला. निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या तिजारीमधून बहिणींना पैसे देण्यात आले. हा जो प्रकार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला झालेल्या मतदानामध्ये एवढा बदल का झाला. मला मतदान करताना वाटलं होतं की काहीतरी गडबड आहे. बटेंगे तो कटेंगेचे नारे देण्यात आले. यावेळेला ज्या प्रकारचं सरकारी वर्णन दिसलं ते भयंकर आहे. त्यामुळे आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला, कारण मला वेदना झाल्या. अदानी हा फॅक्टर दुर्लक्ष करून चालणार नाही. या प्रकरणाचाही तपास व्हायला पाहिजे. माझ्यासारख्या सुजाण नागरिकाला हे खुपत नाही. केंद्र सरकार लोकशाही हा प्रकार जुमानत नाही. पार्लमेंटमध्ये हजर राहायचं नाही आणि चर्चाही होऊ द्यायची नाही आणि पत्रकारांसोबत बोलायचं नाही. तिकडे विदेशातील लोकांनी सल्ला द्यायचा तो तर भाग वेगळा असल्याचं म्हणत बाबा आढाव यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.आमची मागणी एकच आहे या सगळ्या प्रकरणाचा छडा लागला गेला पाहिजे. तो छडा सरकार लावू देणार नाही. हातातील सत्ता कोण सोडणार आहे, त्यासाठी जनतेमध्ये गेले पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही इथे आलो आणि लोकं याची दखल घेत आहेत. याचं निराकारण झालं पाहिचे, त्यांनी दाबायचा प्रकरण केला जमणार नाही. माझ्यासारखी माणसं प्रसंगी मरण पत्करतील पण हा जाच सहन करणार नाही. बाबासाहेबांनी हे स्वातंत्र्य फुकट मिळालं नाही, त्यासाठी लढावं लागलं. महात्मा गांधी यांनी इंग्रजांना सांगितलं चले जाव, करेंगे या मरेगें, मग इंग्रजांनी हे नाही सांगितलं की हे सांगणारे तुम्ही कोण? त्यांनी थट्टा नाही केली. माझ्या प्रश्नांचं निराकरण झालं नाहीतर मी महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गाने चालणार. मी दगड उचलणार नाही, मला याआधी अटक झाली आहे. पण सत्याग्रहात झालीये. मी एक दोन नाहीतर ५२ वेळा तुरूंगात गेलोय. माझं म्हणणं आहे की जो मार्ग मी आयुष्यात उचलला तो जनतेला सांगेल, असंही बाबा आढाव म्हणाले.

आमदार मेघनाताई बोर्डीकर यांचा मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने बालेवाडीत जाहीर सत्कार संपन्न

पुणे-आज बालेवाडी येथे वास्तव्यास असणार्या सर्व मराठवाड्यातील सर्व बंधु-भगिनिंच्या उपस्थितीत जिंतुर-सेलु मतदार संघातुन प्रचंड बहुमताने आमदार पदी निवडून आल्याबद्दल नगरसेवक अमोल बालवडकर व भाजपा नेते लहुशेठ बालवडकर यांच्या वतीने सौ.मेघनाताई बोर्डीकर यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सौ.आशाताई बालवडकर व समस्त मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने सौ.मेघनाताई बोर्डीकर यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच मराठवाड्यातील बंधू-भगिनींचे आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी आभार मानले.
यावेळी सौ.आशाताई बालवडकर, अनिलतात्या बालवडकर, लहुशेठ बालवडकर, सागर बालवडकर, सुभाष भोळ, सुमित कांबळे, अरविंद सिंग, मराठवाडा सामाजिक फाऊंडेशनचे सभासद तसेच मराठवाड्यातील बंधु-भगिनी व ग्रामस्त उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव मावळ येथे विद्यार्थी बचत बँक सुरू.

खामगाव मावळ, पुणे :’आजची बचत म्हणजेच उद्याची समृद्धी असते.’ असे म्हणतात.
याच बचतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच समजावे, आपल्या खाऊच्या पैशातील काही पैसे साठवून त्याचा वापर आपण आपल्या छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी करू शकतो याची जाणीव व्हावी, त्याचबरोबर बँकेतील व्यवहार कशा पद्धतीने चालतात अशा कित्येक गोष्टी मुलांना याच जडणघडणीच्या वयात कळाव्यात या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव मावळ येथे ‘विद्यार्थी बचत बँक खामगाव मावळ’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
बँकेत पैसे भरण्याची व काढण्याची पद्धत काय असते.. बँकेचे पासबुक कसे असते.. चेक कसे वापरतात या आणि अशा कित्येक आर्थिक व्यवहाराशी संबंधित गोष्टी बऱ्याचदा मोठ्या माणसांनाही चटकन लक्षात येत नाहीत. त्यामुळे भविष्यात अशा अडचणींना तोंड देण्याची वेळ येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना अगदी खऱ्या बँकेचा अनुभव देता यावा म्हणून खऱ्याखुऱ्या बँकेत असतात तशाच पैसे काढण्याच्या व भरण्याच्या स्लीप, बँकेचे पासबुक, इत्यादी जशास तशा बाबींचा वापर करून आमची विद्यार्थी बचत बँक सुरू झाली.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमधूनच निवडलेल्या कॅशियर आणि क्लर्क यांना त्यांची कामे समजावून सांगण्यात आली. बँकेचे कामकाज विद्यार्थ्यांनी चालवायचे असून त्यांनी बचत केलेले पैसे त्यांना हवे तेव्हा शालेय वस्तू खरेदीसाठी काढता येणार आहेत. आवश्यक तिथे मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी शिक्षक आहेतच…
विद्यार्थ्यांना भविष्यात जी कर्तव्य पार पाडायची आहे ज्या जबाबदाऱ्या पेलायच्या आहेत त्यांचे जिवंत अनुभव शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना मिळाले तर हेच विद्यार्थी उद्याचे सुजाण आणि जबाबदार नागरिक होतील याची खात्री असे उपक्रम देत राहतात.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. उमेध धावारे, श्रीमती वैशाली कुंभार मॅडम व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बहुराष्ट्रीय कंपन्यांची ‘रॉयल्टी’च्या नावाखाली लयलूट !

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे ‘सेबी’ या भांडवली बाजाराच्या नियंत्रक संस्थेने भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रॉयल्टी च्या नावाखाली परदेशात पाठवलेल्या रकमांचा अभ्यास केला. गेल्या दहा वर्षात रॉयल्टीच्या नावाखाली त्यांनी केलेली लूट पाहिली तर या कंपन्यांच्या भारतातील भागधारकांवर डोळे उघडण्याची वेळ आली आहे. या लुटीचा घेतलेला वेध.

भारतामध्ये शेकडो बहुराष्ट्रीय कंपन्या अनेक दशके कार्यरत आहेत. या कंपन्या भारतात व्यवसाय, धंदा करण्यासाठी आलेल्या असून प्रचंड नफा कमवत असतात. हा नफा लाभांशांच्या रूपाने सर्व भागधारकांना वाटला जातोच. परंतु त्याशिवाय या कंपन्या परदेशातील ‘ पॅरेंट ‘कंपनीला दरवर्षी रॉयल्टीपोटी प्रचंड रकमा देतात. सेबीने गेल्या दहा वर्षातील म्हणजे 2013-14 ते 2022-23 या दहा वर्षातील 233 शेअर बाजारावर नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांच्या ताळेबंदांचा अभ्यास, संशोधन केले. त्यावेळेला असे लक्षात आले की या कंपन्यांनी त्यांच्या परदेशातील संबंधित कंपन्यांना (ज्याला रिलेटेड पार्टी ही संज्ञा वापरली जाते) रॉयल्टीपोटी प्रचंड रकमा दिल्या आहेत. एका बाजूला या सर्व कंपन्यांना नफ्यातील लाभांशाचे वाटप मोठ्या प्रमाणावर होत असतानाच त्याच्या जोडीला रॉयल्टीच्या नावाखाली त्याच्यापेक्षाही जास्त रकमा दिल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे भारतीय भागधारकांनी याबाबत सतर्क व जागरूक होण्याची वेळ आलेली आहे. त्यादृष्टीने या अहवालाबाबत केलेली चर्चा.

बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या परदेशातील पेरेंट कंपनीला मोठ्या प्रमाणावर रॉयल्टी का देतात या प्रश्नाचे उत्तर असे आहे की या बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आपल्याकडे करतात ( know- how) किंवा तंत्रज्ञान सहकार्य देऊन उत्पादनासाठी मदत करतात. तसेच बौद्धिक संपदा म्हणजे या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे ‘ ट्रेड मार्क’ वापरणे किंवा त्यांचा ‘ब्रँड’ भारतात वापरल्याबद्दल त्या कंपन्या रॉयल्टी वसूल करतात. 2009 पूर्वी भारतीय कंपन्यांनी परदेशात काही रॉयल्टी द्यायची असेल तर त्यासाठी केंद्र सरकारच्या ‘औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने’ आखून दिलेल्या नियमानुसार या रकमा दिल्या जात असत. त्यावेळी ही रक्कम जर 20 लाख डॉलर्स पेक्षा कमी असेल तर ती एक रकमी देण्यास परवानगी होती. त्याचप्रमाणे भारतातील विक्रीच्या पाच टक्क्यांपर्यंत किंवा निर्यातीच्या आठ टक्क्यांपर्यंत ही रक्कम देता येत होती. त्यानंतर 2009 मध्ये केंद्र सरकारने या धोरणाचा फेर आढावा घेतला. सरकारच्या मंजुरी शिवाय रॉयल्टीपोटी रक्कम देण्याचा देण्याची परवानगी दिली मात्र त्यासाठी परकीय चलन व्यवस्थापन नियमांचे बंधन ठेवण्यात आले होते. दरम्यान 2015 मध्ये केंद्रीय वित्त विभागाने याबाबत फेरविचार केला व देशात येणाऱ्या परकीय गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर कोणतेही नियंत्रण ठेवू नये असा निर्णय घेतला. 2017 मध्ये सेबीने या संदर्भात उदय कोटक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने अशी शिफारस केली की ज्या नोंदणीकृत कंपन्यांची रॉयल्टी ची रक्कम एकूण उलाढालीच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त असेल त्यांनी कंपन्यांच्या अल्पमतातील भागधारकांची मंजुरी घेणे आवश्यक आहे. यानंतर याबाबतच्या नियमात सातत्याने थोडेफार बदल होत गेले. मात्र पाच टक्क्यांची मर्यादा ही कायम ठेवण्यात आली होती. 2023 मध्ये केंद्र सरकारने तांत्रिक सेवा व रॉयल्टी यांच्या रकमांवर कर वाढवून तो 10 टक्क्यावरून 20 टक्क्यांवर नेला. काही अनाकलनीय रॉयल्टी रकमांवर 100 टक्क्यांपर्यंत कर वाढवलेला आहे.

मात्र अलीकडे या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी परदेशात रॉयल्टी च्या नावाखाली जाणाऱ्या रकमांचा अभ्यास करण्यात आला व त्यावरून लाभांशापेक्षाही मोठ्या प्रमाणावर या रकमा भारतातून परदेशात जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्ची पडत आहे असे लक्षात आले. उदाहरण द्यायचे झाले तर हिंदुस्तान युनीलिव्हर ही कंपनी त्यांच्या युनिलिव्हर या कंपनीला ‘नॉर’ या ब्रँडपोटी पीठ व सूप यांच्या विक्रीवर रॉयल्टी देते. एखाद्या लोकप्रिय ब्रँड वर जास्त रॉयल्टीही घेतली जाते. उदाहरण द्यायचे झाले तर ‘ अन्नपूर्णा ‘ नावाचा आटा भारतात विकला जातो त्याची रॉयल्टीही परदेशात मोठ्या प्रमाणावर जात असते. यामध्ये परदेशी पाठवलेल्या रकमांबद्दल कोणतीही बहुराष्ट्रीय कंपनी कसलेही वाजवी स्पष्टीकरण देत नाही ही वस्तुस्थिती आहे.

सेबीने नेमलेल्या समितीने या दहा वर्षाच्या कालावधीसाठी एकूण 233 नोंदणीकृत कंपन्यांच्या ताळेबंदांचा अभ्यास केला. या दहा वर्षात या कंपन्यांनी तब्बल 1538 वेळा परदेशात रॉयल्टीपोटी रकमा पाठवलेल्या आहेत. या रकमा देण्यासाठी कंपन्यांची उलाढाल व त्यांना झालेला नफा या दोन रकमांवर आधारित रॉयल्टी देण्यात आलेली आहे. या दहा वर्षात रॉयल्टीपोटी दिलेल्या रकमा जवळजवळ दुप्पट झालेल्या आहेत. 2013-14 या वर्षात ही रक्कम 4955 कोटी रुपये इतकी होती. 2022-23 या वर्षात ही रक्कम दुपटीपेक्षा जास्त होऊन 10 हजार 779 कोटी रुपये इतकी झाली होती. तसेच यामध्ये 42 वेळा असे घडले की त्या नोंदणीकृत कंपनीने त्यांच्या उलाढालीच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम रॉयल्टीपोटी दिली होती. या 1538 घटनांपैकी 1353 वेळा रॉयल्टी रक्कम देण्यात आली त्या सर्व कंपन्यांना उत्तम निव्वळ नफा झालेला होता. मात्र त्यातील घटनांमध्ये कंपनीच्या निव्वळ नफ्यापेक्षा 100 टक्के जास्त रक्कम रॉयल्टीपोटी देण्यात आली. 102 कंपन्यांनी त्यांच्या निव्वळ नफ्याच्या 40 ते 100 टक्के रक्कम रॉयल्टीपोटी दिली होती.

यातील धक्कादायक बाब म्हणजे 40 टकके घटनांमध्ये 315 कंपन्यांनी भारतीय भागधारकांना एक पैशाचाही लाभांश दिलेला नव्हता तर 417 घटनांमध्ये लाभांशापेक्षा जास्त रक्कम रॉयल्टीपोटी परदेशात देण्यात आली. एवढेच नाही तर 233 कंपन्यांपैकी 63 कंपन्यांना निव्वळ तोटा झालेला होता तरीही या कंपन्यांनी या दहा वर्षात तब्बल 1355 कोटी रुपयांची रॉयल्टी परदेशात पाठवली होती. यातील दहा कंपन्यांनी तर सलग पाच वर्षे निव्वळ तोटा केलेला होता आणि तरीही 228 कोटी रुपये इतकी रक्कम रॉयल्टीपोटी परदेशात पाठवली. आणि यातील आणखी गंभीर बाब म्हणजे 97 घटनांमध्ये कंपन्यांना झालेल्या तोट्याच्या 5 टक्क्यापेक्षा जास्त रक्कम रॉयल्टी पोटी देण्यात आली. एवढेच नाही तर एकूण 79 कंपन्यांनी सलग दहा वर्षे रॉयल्टी ची रक्कम वाढवत नेली होती. तसेच 18 कंपन्यांच्या बाबतीत त्यांच्या एकूण उलाढाल व निव्वळ नफा पेक्षा जास्त रक्कम सातत्याने त्यांनी परदेशात रॉयल्टीपोटी पाठवली. तसेच 79 पैकी 11 कंपन्यांनी सलग दहा वर्षे त्यांच्या निव्वळ नफ्याच्या 20 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम परदेशात रॉयल्टीपोटी पाठवली होती.

यामध्ये एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीने त्यांच्या पेरेंट कंपनीला रॉयल्टीपोटी पाच टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम दिली असेल तर त्यासाठी भारतीय भागीदारांची मान्यता घेणे आवश्यक असते. मात्र अनेक प्रकरणांमध्ये या कंपन्या एकापेक्षा जास्त व्यक्तींना पाच टक्क्यांपेक्षा कमी रॉयल्टी रक्कम देतात.एकूण सर्व रॉयल्टी ची रक्कम ही निव्वळ नफ्याच्या कितीतरी पट अधिक असते आणि त्यासाठी कोठेही भागधारकांची मान्यता घेतली जात नाही असे लक्षात आले आहे. एकूणच परदेशातील कंपन्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांना रॉयल्टी देण्याबाबत कोणतेही निकष आपल्याकडे कोणत्याही कायद्याद्वारे निश्चित झालेले नाहीत आणि त्याचा गैरफायदा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या सातत्याने घेऊन परदेशात परकीय चलनाच्या मार्फत पैसा पाठवत असतात. एका बाजूला मुक्त व्यापाराला प्राधान्य देत असताना किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात येण्याची मुभा दिली जात असताना या रॉयल्टीच्या नावाखाली भारतातील पैशांची लूट होत नाही ना यासाठी सर्वांनी जागरूक राहण्याची व विशेषतः भारतीय भागीदारांनी यात गंभीरपणे लक्ष घालून त्यावर वाजवी नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. केंद्र सरकारही या रॉयल्टी पेमेंटच्या संदर्भात काही कर आकारणी करू शकते किंवा कसे याचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही ब्रँड साठी किती टक्के किंवा किती रक्कम रॉयल्टीपोटी द्यायची याचेही निकष ठरले पाहिजेत. आजच्या घडीला याबाबत फारशी पारदर्शकता बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे आढळत नाही. अनेक कंपन्या तोटा होत असताना फक्त रॉयल्टी रकमा देतात तर काही वेळा निव्वळ नफ्याच्या चाळीस ते शंभर टक्के इतके रक्कम रॉयल्टीपोटी देण्यात येते. या अनाकलनीय किंवा बेकायदेशीर रॉयल्टी रकमा देण्याबाबत केंद्र सरकारने ताबडतोब लक्ष घालून योग्य तो निर्णय घेण्याची निश्चित गरज आहे. वाचकांच्या माहितीसाठी या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कोलगेट, ब्रिटानिया, कमिन्स इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर,फायझर,ओरॅकल, एस के एफ इंडिया,वोडाफोन, व्हर्लपूल अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे.

( लेखक -प्रा नंदकुमार काकिर्डे)

(लेखक पुणेस्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून बँक संचालक आहेत)

शरद पवारांचा बाबा आढाव यांच्या EVM विरोधी आंदोलनाला पाठिंबा

निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे. त्यावर निवडणूक आयोगाने कोणताही आक्षेप घेतला नाही, हे अनाकलनीय आहे-बाबा आढाव

पुणे-सरकारी तिजोरीतून लोकांना पैशांचे वाटप करण्यात आले असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केला आहे. बाबा आढाव यांचे तीन दिवसापासून सुरू केले आहे. त्यांच्या उपोषण स्थळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी भेट दिली. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप देखील बाबा आढाव यांनी केला आहे. सरकारी तिजोरीची लूट सुरू असल्याचे यावेळी आढाव म्हणाले. राज्यभरातून या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केले आहे. राज्यघटना आणि लोकशाहीची सध्या थट्टा सुरू असल्याची त्यांनी टीका केली. बाबा आढाव पुणे येथील फुले वाडा येथे आंदोलनाला बसले आहेत. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांनी वयाच्या 95 व्या वर्षी 3 दिवसांचे आत्मक्लेश उपोषण सुरू केले. ईव्हीएमवरील मतदान प्रक्रिया संशयास्पद म्हणत लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू असल्याचे बाबा आढाव यांनी म्हटले आहे.

सरकारला विरोधक नकोच आहेत. त्यांना तुम्ही नकोच असल्याचे बाबा आढाव यांनी शरद पवार यांच्याशी बोलताना सांगितले. तर शरद पवार यांनीही आमचा बाबा आढाव यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचे देखील बाबा आढाव यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर ईव्हीएममध्ये नागरिकांनी टाकलेले हेच खरे मतदान आहे, याचा पुरावा काय? असा प्रश्न बाबा आढाव यांनी या वेळी उपस्थित केला.

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. अदानींच्या विरोधात लोकसभेत बोलू दिले जात नाही. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे याबाबत मी सरकारच्या विरोधात सत्याग्रह करत असल्याचे आढाव यांनी म्हटले आहे. सरकार जर चुकत असेल तर त्यांना वेळीच सांगितले पाहिजे. लोकशाहीतील एक नागरिक म्हणून माझे ते कर्तव्य आहे.

शरद पवार म्हणाले,’अखेरच्या 2 तासांतील टक्केवारी अत्यंत धक्कादायक, जनतेने उठाव करणे आवश्यक

पुणे–निवडणुकीच्या दिवशी अखेरच्या दोन तासांची आकडेवारी आली आहे. ती आकडेवारी अत्यंत धक्कादायक असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. यासंबंधी बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या आरोपावर सखोल चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. एकत्रित बसून इंडिया आघाडीच्या आघाडी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी हा विषय हातात घ्यावा, अशी चर्चा सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. या संदर्भात लवकरच काहीतरी निर्णय होईल, असा दावा देखील शरद पवार यांनी केला आहे.मला जे लोक भेटले त्या सर्वांना जयप्रकाश नारायण यांची आठवण आली. लोकांमधील असलेली अस्वस्थता पाहूनच बाबा आढाव यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे एक प्रकारचा दिलासा मिळाला असल्याचे लोकांना वाटते. राष्ट्रीय कर्तव्य आणि देशाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली. मात्र त्यांनी एकट्याने भूमिका घेणे हे योग्य नाही. या विरोधात जनतेने उठाव करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. असेच सुरू राहिले तर संसदीय पद्धती संपुष्ठात येईल, अशी चर्चा या ठिकाणी आज दिसत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यासंबंधीची अस्वस्थता ती सर्व भागात दिसून येत आहे. या निवडणुकीच्या निकालाबद्दल जनमत हे बाबा आढाव यांनी घेतलेल्या भूमिकेतून व्यक्त होत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर दिसून आला. तो यापूर्वी कधीही बघितला नव्हता. स्थानिक पातळीवरील निवडणूक असतात, त्यामध्ये अशा तक्रारी कुठे न कुठे ऐकायला मिळतात. मात्र संपूर्ण राज्याची आणि देशाची निवडणूक असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सर्व यंत्रणा हातात घ्यायची, असे चित्र यापूर्वी कधीही दिसले नव्हते, असे देखील पवार यांनी म्हटले आहे. असेच काही या निवडणुकीत महाराष्ट्रात घडले आहे आणि त्याचा परिणाम होऊन लोकांची अस्वस्थता वाढली असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

या विरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तर विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. आम्हाला आमचे मुद्दे मागण्यासाठी परवानगी दिली जात नाही. अशी एकही मागणी सत्ताधारी विरोधकांची मान्य करत नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. मागच्या सहा दिवसात संसदेच्या सभागृहात देशाच्या मुद्यावर एकही चर्चा होऊ शकली नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांचा हा देशावर आघात असल्याचा आरोप देखील पवार यांनी केला.

नागरिक जागृत आहेतच मात्र त्यांनी आता उठाव केला पाहिजे. अशी आज आवश्यकता असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्याची सुरुवात बाबा आढाव यांनी केली आहे. याचे पडसाद आगामी काळात दिसून येईल, असा मला विश्वास असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याचा पुरावा माझ्या हातात नाही. मात्र काही लोकांनी तसे दावे केले असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या आधी देखील अशी शंका व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. निवडणूक आयोग एवढ्या मोठ्या प्रमाणात चुकीची भूमिका घेईल असे आम्हाला वाटले नव्हते, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. मात्र निवडणुकीनंतर आता यामध्ये तथ्य असल्याचे दिसते, असे देखील पवार म्हणाले. राज्यभरातील काही उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज केले आहेत. मात्र त्यातून काही पुढे येईल, याबद्दल माझ्या मनात शंका असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यामध्ये सरकार स्थापन झालेले नाही, यावर देखील पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आजच वाचले की पाच तारखेला सरकार तयार होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, लोकांचे मत किंवा बहुमत या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. जे काही सुरू आहे हे राज्यकारभार करणारे ठरवतात, असे देखील पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून सरकार स्थापन झाले नसल्याच्या मुद्द्यावर देखील शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली.

भाजपने मारून मुटकून विजय प्राप्त केला :त्यामुळे 95 वर्षांच्या कार्यकर्त्याला शिवधनुष्य उचलावे लागते; आढावांच्या भूमिकेवरुन ठाकरे गटाचा हल्ला

देशावर आलेले ‘ईव्हीएम’चे संकट मोठे आहे. गुलामीचा व दिवाळखोरीचा मार्ग ईव्हीएममधून जातो. त्यामुळे 95 वर्षांच्या बाबा आढावांनी लोकशाही रक्षणासाठी सुरू केलेला आत्मक्लेश देशाला जागे करणारा आहे. अण्णा हजारे झोपले आहेत. बाकी सगळेच विकले आहेत व उरलेले मोदी, शहा, अदानींचे गुलाम बनून ऐयाशी करीत आहेत म्हणून लोकशाहीचा दिवा विझताना पाहायचा काय? आज 95 वर्षांचे बाबा आढाव हाती क्रांतीची मशाल घेऊन उभे ठाकले आहेत. ठिणगी पडली, ठिणगीतून वणवा भडकेल. लोकशाही भट्टीतल्या पोलादाप्रमाणे तावून सुलाखून बाहेर पडेल. बाबा, आम्ही आपले आभारी आहोत. देशात नामर्दानगीची शेपटी तरारत असताना 95 वर्षांच्या बाबांनी एल्गार पुकारला असल्याचे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी दैनिक सामानाच्या माध्यमातून भाजपवर टीका केली आहे.

सामनामधील अग्रलेख

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हीएमविरुद्ध हा आत्मक्लेशाचा एल्गार आहे. बाबा आढाव यांचे वय आज 95 वर्षे आहे. बाबांची सारी हयात वंचित, कष्टकरी समाजाला न्याय मिळवून देण्याच्या लढ्यात गेली. हमाल, रिक्षावाले, मजूर यांच्या चुली पेटाव्यात म्हणून ते लढले. आता लोकशाहीचा दिवा विझत आहे, तो पेटत राहावा म्हणून ते आत्मक्लेश करून घेत आहेत. थंड लोळागोळा होऊन पडलेल्या समाजाला ही चपराक आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निकालाने सगळ्यांचीच झोप उडाली, पण ते सगळेच समाज माध्यमांवर लढे देत आहेत. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्या नेत्यांनी ‘‘ईव्हीएम नकोच’’ अशी भूमिका घेतली, पण विरोधी पक्षाने घेतलेल्या अशा तोंडी भूमिकेला विचारतोय कोण? अदानींचे नाव घेतले तरी लोकसभा व राज्यसभेच्या अध्यक्षांना मिरची लागते व विरोधकांचे माईक बंद पाडतात. संसदेचे कामकाज गुंडाळल्याची घोषणा करतात. लोकशाहीचा हा चुराडा आहे.

भाजपने लोकांना धार्मिक विवादात अडकवून ठेवले

निवडणुका हा एक कळसूत्री खेळ झाला आहे. जोपर्यंत ईव्हीएम आहे, तोपर्यंत मोदी, शहा व अदानी हरणार नाहीत व लोकशाहीचा दिवा शेवटी विझून गेलेला आहे हे दिसेल. महाराष्ट्रातील निकालानंतर सगळय़ांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘‘छे, छे, असे कसे निकाल लागले!’’ अशा शंका व्यक्त केल्या, पण विरोधकांत त्याविरोधात सामुदायिक कृतीचा अभाव दिसतो. महाराष्ट्रात प्रत्येक मतदान केंद्रावर जनतेचा विश्वास व लोकशाहीचा खून
झाला. झालेले मतदान व प्रत्यक्ष मतमोजणीचा मेळ बसतनाही. मतदान संपल्यावर पाच ते साडेअकरा या काळात मतांची टक्केवारी सतत वाढत गेली. हा प्रकार चिंताजनक असल्याचे मत माजी निवडणूक आयुक्त कुरेशी यांनी व्यक्त केले. 76 लाख मते जास्त मोजली व त्यामुळे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष विजयी झाले हे आता नक्की झाले, पण इतके होऊन देशात कोठे हालचाल नाही. मशिदीखाली मंदिरे आहेत यावर उत्तर प्रदेशात दंगली होतात व भाजपने लोकांना त्या धार्मिक विवादात अडकवून ठेवले, पण लोकशाहीचा गळा घोटला यावर कोणी उभे राहत नाही. 95 वर्षांच्या एका लढवय्याला हे सहन झाले नाही व तो शेवटी त्याची थकलेली गात्रे घेऊन मैदानात उतरला.

95 वर्षांच्या कार्यकर्त्याला शिवधनुष्य उचलावे लागते

बाबा आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन ही सुरुवात असेल तर सगळ्यात आधी ठिणगी पुण्यात पडायला हवी. बाबांच्या आंदोलन स्थळी जाऊन समर्थकांसह फोटोगिरी करण्याइतपत हे आंदोलन मर्यादित राहता कामा नये. देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिली देशव्यापी गर्जना पुण्यातूनच निनादली होती. ‘‘होय, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच!’’ असे पुण्यातून लोकमान्यांनी सांगितले व ब्रिटिश सरकारचे सिंहासन हलले. अनेक संकटांच्या छाताडावर पाय रोवून लोकमान्यांसारखे पुढारी ठामपणे उभे राहिले. त्या पुण्यात लोकशाही वाचविण्यासाठी 95 वर्षांच्या कार्यकर्त्याला शिवधनुष्य उचलावे लागते हे लोकशाही व स्वातंत्र्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या निकालात अनेक घोटाळे झाले आहेत. भाजपचा विजय हा मारून मुटकून प्राप्त केलेला विजय आहे. त्यावर जनतेचा विश्वास नाही. जे उमेदवार पराभूत झाले त्यांना एका रांगेत सारखी मते मिळतात व भाजपचे जे विजयी झाले त्यांना दीड लाखाच्या मताधिक्याने सारखेच मतदान होते. ईव्हीएम सेट केल्याचा हा परिणाम.

देशावर आलेले ‘ईव्हीएम’चे संकट मोठ

जगाने लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हीएमचा त्याग केला, पण भारत हा एकमेव देश आहे, जो ईव्हीएमला कवटाळून बसला आहे. ज्याच्या हाती ईव्हीएम तोच लोकशाहीचा मालक अशी स्थिती भारतात निर्माण झाली आहे. स्वातंत्र्याचा हा अपमान आहे. पैशांतून मिळवलेला हा विजय लोकांना गुलाम करणारा आहे. धर्माची अफू पाजून लोकांना गुंगीत ठेवायचे व त्याच गुंगीत हवे तिथे बटणे दाबून घ्यायची. मोदी-शहा खरेच सच्चे व पक्के असतील तर मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यास त्यांचे पाय का लटपटत आहेत? ते का घाबरत आहेत? देशावर आलेले ‘ईव्हीएम’चे संकट मोठे आहे. गुलामीचा व दिवाळखोरीचा मार्ग ईव्हीएममधून जातो. त्यामुळे 95 वर्षांच्या बाबा आढावांनी लोकशाही रक्षणासाठी सुरू केलेला आत्मक्लेश देशाला जागे करणारा आहे. अण्णा हजारे झोपले आहेत. बाकी सगळेच विकले आहेत व उरलेले मोदी, शहा, अदानींचे गुलाम बनून ऐयाशी करीत आहेत म्हणून लोकशाहीचा दिवा विझताना पाहायचा काय? आज 95 वर्षांचे बाबा आढाव हाती क्रांतीची मशाल घेऊन उभे ठाकले आहेत. ठिणगी पडली, ठिणगीतून वणवा भडकेल. लोकशाही भट्टीतल्या पोलादाप्रमाणे तावून सुलाखून बाहेर पडेल. बाबा, आम्ही आपले आभारी आहोत. देशात नामर्दानगीची शेपटी तरारत असताना 95 वर्षांच्या बाबांनी एल्गार पुकारला आहे!

प्राचार्य डॉ.राजेंद्र झुंजारराव यांच्या वंदन या काव्यसंग्रहाचे प्रकाशन


पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे ५ येथील प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या वंदन या दहाव्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ महाराष्ट्र साहित्य परिषदेत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालभारती,पुणेचे संचालक डॉ. कृष्णकुमार पाटील हे होते. प्रा.माधव राजगुरू हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘कवीची कविता ही उत्स्फूर्त अशी असते पण त्यावर संस्कारही तितकेच महत्त्वाचे असतात’, असे मत प्रा.माधव राजगुरू यांनी मांडले. भारत देशासाठी उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तींच्या कार्यावर आधारित ४० कवितांचा या संग्रहात समावेश आहे.वंदन मधील कविता या विद्यार्थ्यांना आणि सर्वांनाच प्रेरक अशा आहेत, असे मत बालभारतीचे संचालक डॉ.कृष्णकुमार पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉक्टर अंजली सरदेसाई यांनी केले. आभार प्रदर्शन अभिरुची पब्लिकेशनच्या डॉ.वैजयंती जाधव- भोसले यांनी केले.