Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भाजपने मारून मुटकून विजय प्राप्त केला :त्यामुळे 95 वर्षांच्या कार्यकर्त्याला शिवधनुष्य उचलावे लागते; आढावांच्या भूमिकेवरुन ठाकरे गटाचा हल्ला

Date:

देशावर आलेले ‘ईव्हीएम’चे संकट मोठे आहे. गुलामीचा व दिवाळखोरीचा मार्ग ईव्हीएममधून जातो. त्यामुळे 95 वर्षांच्या बाबा आढावांनी लोकशाही रक्षणासाठी सुरू केलेला आत्मक्लेश देशाला जागे करणारा आहे. अण्णा हजारे झोपले आहेत. बाकी सगळेच विकले आहेत व उरलेले मोदी, शहा, अदानींचे गुलाम बनून ऐयाशी करीत आहेत म्हणून लोकशाहीचा दिवा विझताना पाहायचा काय? आज 95 वर्षांचे बाबा आढाव हाती क्रांतीची मशाल घेऊन उभे ठाकले आहेत. ठिणगी पडली, ठिणगीतून वणवा भडकेल. लोकशाही भट्टीतल्या पोलादाप्रमाणे तावून सुलाखून बाहेर पडेल. बाबा, आम्ही आपले आभारी आहोत. देशात नामर्दानगीची शेपटी तरारत असताना 95 वर्षांच्या बाबांनी एल्गार पुकारला असल्याचे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी दैनिक सामानाच्या माध्यमातून भाजपवर टीका केली आहे.

सामनामधील अग्रलेख

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हीएमविरुद्ध हा आत्मक्लेशाचा एल्गार आहे. बाबा आढाव यांचे वय आज 95 वर्षे आहे. बाबांची सारी हयात वंचित, कष्टकरी समाजाला न्याय मिळवून देण्याच्या लढ्यात गेली. हमाल, रिक्षावाले, मजूर यांच्या चुली पेटाव्यात म्हणून ते लढले. आता लोकशाहीचा दिवा विझत आहे, तो पेटत राहावा म्हणून ते आत्मक्लेश करून घेत आहेत. थंड लोळागोळा होऊन पडलेल्या समाजाला ही चपराक आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निकालाने सगळ्यांचीच झोप उडाली, पण ते सगळेच समाज माध्यमांवर लढे देत आहेत. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्या नेत्यांनी ‘‘ईव्हीएम नकोच’’ अशी भूमिका घेतली, पण विरोधी पक्षाने घेतलेल्या अशा तोंडी भूमिकेला विचारतोय कोण? अदानींचे नाव घेतले तरी लोकसभा व राज्यसभेच्या अध्यक्षांना मिरची लागते व विरोधकांचे माईक बंद पाडतात. संसदेचे कामकाज गुंडाळल्याची घोषणा करतात. लोकशाहीचा हा चुराडा आहे.

भाजपने लोकांना धार्मिक विवादात अडकवून ठेवले

निवडणुका हा एक कळसूत्री खेळ झाला आहे. जोपर्यंत ईव्हीएम आहे, तोपर्यंत मोदी, शहा व अदानी हरणार नाहीत व लोकशाहीचा दिवा शेवटी विझून गेलेला आहे हे दिसेल. महाराष्ट्रातील निकालानंतर सगळय़ांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘‘छे, छे, असे कसे निकाल लागले!’’ अशा शंका व्यक्त केल्या, पण विरोधकांत त्याविरोधात सामुदायिक कृतीचा अभाव दिसतो. महाराष्ट्रात प्रत्येक मतदान केंद्रावर जनतेचा विश्वास व लोकशाहीचा खून
झाला. झालेले मतदान व प्रत्यक्ष मतमोजणीचा मेळ बसतनाही. मतदान संपल्यावर पाच ते साडेअकरा या काळात मतांची टक्केवारी सतत वाढत गेली. हा प्रकार चिंताजनक असल्याचे मत माजी निवडणूक आयुक्त कुरेशी यांनी व्यक्त केले. 76 लाख मते जास्त मोजली व त्यामुळे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष विजयी झाले हे आता नक्की झाले, पण इतके होऊन देशात कोठे हालचाल नाही. मशिदीखाली मंदिरे आहेत यावर उत्तर प्रदेशात दंगली होतात व भाजपने लोकांना त्या धार्मिक विवादात अडकवून ठेवले, पण लोकशाहीचा गळा घोटला यावर कोणी उभे राहत नाही. 95 वर्षांच्या एका लढवय्याला हे सहन झाले नाही व तो शेवटी त्याची थकलेली गात्रे घेऊन मैदानात उतरला.

95 वर्षांच्या कार्यकर्त्याला शिवधनुष्य उचलावे लागते

बाबा आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन ही सुरुवात असेल तर सगळ्यात आधी ठिणगी पुण्यात पडायला हवी. बाबांच्या आंदोलन स्थळी जाऊन समर्थकांसह फोटोगिरी करण्याइतपत हे आंदोलन मर्यादित राहता कामा नये. देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिली देशव्यापी गर्जना पुण्यातूनच निनादली होती. ‘‘होय, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच!’’ असे पुण्यातून लोकमान्यांनी सांगितले व ब्रिटिश सरकारचे सिंहासन हलले. अनेक संकटांच्या छाताडावर पाय रोवून लोकमान्यांसारखे पुढारी ठामपणे उभे राहिले. त्या पुण्यात लोकशाही वाचविण्यासाठी 95 वर्षांच्या कार्यकर्त्याला शिवधनुष्य उचलावे लागते हे लोकशाही व स्वातंत्र्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या निकालात अनेक घोटाळे झाले आहेत. भाजपचा विजय हा मारून मुटकून प्राप्त केलेला विजय आहे. त्यावर जनतेचा विश्वास नाही. जे उमेदवार पराभूत झाले त्यांना एका रांगेत सारखी मते मिळतात व भाजपचे जे विजयी झाले त्यांना दीड लाखाच्या मताधिक्याने सारखेच मतदान होते. ईव्हीएम सेट केल्याचा हा परिणाम.

देशावर आलेले ‘ईव्हीएम’चे संकट मोठ

जगाने लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हीएमचा त्याग केला, पण भारत हा एकमेव देश आहे, जो ईव्हीएमला कवटाळून बसला आहे. ज्याच्या हाती ईव्हीएम तोच लोकशाहीचा मालक अशी स्थिती भारतात निर्माण झाली आहे. स्वातंत्र्याचा हा अपमान आहे. पैशांतून मिळवलेला हा विजय लोकांना गुलाम करणारा आहे. धर्माची अफू पाजून लोकांना गुंगीत ठेवायचे व त्याच गुंगीत हवे तिथे बटणे दाबून घ्यायची. मोदी-शहा खरेच सच्चे व पक्के असतील तर मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यास त्यांचे पाय का लटपटत आहेत? ते का घाबरत आहेत? देशावर आलेले ‘ईव्हीएम’चे संकट मोठे आहे. गुलामीचा व दिवाळखोरीचा मार्ग ईव्हीएममधून जातो. त्यामुळे 95 वर्षांच्या बाबा आढावांनी लोकशाही रक्षणासाठी सुरू केलेला आत्मक्लेश देशाला जागे करणारा आहे. अण्णा हजारे झोपले आहेत. बाकी सगळेच विकले आहेत व उरलेले मोदी, शहा, अदानींचे गुलाम बनून ऐयाशी करीत आहेत म्हणून लोकशाहीचा दिवा विझताना पाहायचा काय? आज 95 वर्षांचे बाबा आढाव हाती क्रांतीची मशाल घेऊन उभे ठाकले आहेत. ठिणगी पडली, ठिणगीतून वणवा भडकेल. लोकशाही भट्टीतल्या पोलादाप्रमाणे तावून सुलाखून बाहेर पडेल. बाबा, आम्ही आपले आभारी आहोत. देशात नामर्दानगीची शेपटी तरारत असताना 95 वर्षांच्या बाबांनी एल्गार पुकारला आहे!

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

56 व्या इफ्फीच्या सुकाणू समितीची पहिली बैठक मुंबईत संपन्न

मुंबई , 18 जुलै, 2025 गोव्यातील 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय...

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

पुणे : सारसबागेजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला त्यांच्या...

सरसकट सर्वच कार्यकर्त्यांना शिक्षा कशासाठी ? रुपाली पाटलांचा सवाल

पुणे- विधिमंडळ परिसरात अधिवेशन काळात सरसकट कार्यकर्त्यांना बंदी...