Home Blog Page 558

समाविष्ट गावांमध्ये एकूण ७०,००० एलईडी तंत्रज्ञानावर दिवे लावणार

पुणे – पुणे महानगरपालिका व महात्मा फुले नवीनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मार्य.(महाप्रीत) यांच्या संयुक्त विद्यमान पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत या प्रकल्पांचा आढावा मुंबई (बीकेसी) येथील महाप्रीत कार्यालयात मंगळवारी घेण्यात आला . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास व सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ होत्या.

या बैठकीस महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक माळी, पुणे महानगरपालिकेचे सिटी इंजिनिअर प्रशांत वाघमारे, उपायुक्त महेश पाटील, विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा सेकटकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने तसेच महाप्रीतचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली:

विद्युत दिवे एलईडीमध्ये रूपांतर : नव्याने समाविष्ट गावांमध्ये विद्युत पोलवरील जुने दिवे एलईडी तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक दिव्यांमध्ये बदलण्याचे महत्त्वाकांक्षी काम सुरू असून, एकूण ७०,००० विद्युत दिवे टप्प्याटप्प्याने बदलण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत सुमारे ९,००० दिव्यांचे रूपांतर पूर्ण झाले आहे. यामुळे ऊर्जेची बचत होण्याबरोबरच देखभाल खर्चातही मोठी घट होणार आहे.

सौरऊर्जेचा प्रभावी वापर : स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ५० मेगावॅट क्षमतेच्या सौर विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. याबाबत शासन स्तरावरून प्रकिया सुरू असुन पुढील कालावधीत हा प्रकल्प पुर्ण केला जाणार आहे यासोबतच
इंटरनेट कमांड सेंटर व आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने पुणे शहरात एकात्मिक आदेश व नियंत्रण केंद्र (ICCC) स्थापन करण्यात येणार आहे. सुमारे २८३ कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, सार्वजनिक सुरक्षितता, जल व घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या सेवा एका केंद्रीकृत प्लॅटफॉर्मवर नियंत्रित केल्या जाणार आहेत. यामुळे पुणे शहराचे व्यवस्थापन अधिक वेगवान व कार्यक्षम होणार आहे.

बैठकीत बोलताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कामांची गती वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. “प्रकल्पांची गुणवत्ता अबाधित ठेवत, वेळेचे काटेकोर नियोजन करावे व नागरिकांना वेळेत सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.तसेच, पुणेकरांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि नव्याने समाविष्ट गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महापालिका आणि महाप्रीत यांच्यातील सहकार्यामुळे पुणे शहराचे स्वरूप अधिक विकसित आणि स्मार्ट सिटीच्या दिशेने जलदगतीने पुढे जात आहे, हे या बैठकीतून स्पष्ट झाले.

शिवरायांच्या प्रेरणेतूनच बलशाली भारत घडेल-स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज

विदर्भ महेश असोसिएशन आणि फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना लिहिलेल्या पत्रात ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावा प्रताप श्रीमंतयोगी’ अशा शब्दांत शिवरायांच्या कार्याचे स्मरण ठेवून वाटचाल करण्याचा सल्ला दिला होता. त्याच धर्तीवर आजच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच प्रेरणेतून उद्याचा बलशाली हिंदुस्तान घडेल, असा विश्वास प.पू. स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज यांनी व्यक्त केला.

विदर्भ महेश असोसिएशन, पुणे आणि फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज – एक दृष्टा नेता’ या विषयावरील व्याख्यानात स्वामीजींनी आपले विचार मांडले. या प्रसंगी विनीत राठी, वसंत राठी, राधेश्याम गर्ग, मनोज बेहेडे, दिनेश मुंदडा, स्वप्नील काबरा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सुरेश सोडानी, जुगलकिशोर पुंगलिया, अजय किशोर लड्ढा, अशोक करवा, राधेश्याम गर्ग आणि जगदीश कदम यांचा सन्मान करण्यात आला.

स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले, “रामायण व महाभारत यांतील सदगुणांचे संपूर्ण एकत्रीकरण केले तर त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे अद्वितीय व्यक्तिमत्त्व निर्माण होते. महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा. तथापि, काही काळापूर्वी पर्यंत छत्रपतींच्या इतिहासाचे अपूर्ण आणि अप्रामाणिक चित्रण झाले होते. आजच्या पिढीसमोर त्यांच्या जीवनाचा खरा इतिहास पोहोचविणे ही काळाची गरज आहे.”

ते  पुढे म्हणाले, “आजच्या तरुणांमध्ये स्वाभिमान जागवणे अत्यावश्यक आहे आणि हे स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेशिवाय जागृत होऊ शकत नाही. म्हणूनच मी रामायणातील प्रभू श्रीराम, महाभारतातील श्रीकृष्ण यांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही कथा व्यासपीठावर मांडतो. त्यातून आजच्या तरुणांना प्रेरणा मिळते. तरुण पिढीने स्फुरण पावून चांगल्या कार्यासाठी सज्ज व्हावे आणि बलशाली भारत घडवावा, हेच माझेही स्वप्न आहे.”

याच कार्यक्रमाच्या औचित्याने पुणे चॅप्टरचे अध्यक्ष वसंत राठी यांनी आपले नेतृत्व मनोज बेहेडे यांच्याकडे सुपूर्त केले. प.पू. स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज यांच्या शुभहस्ते मनोज बेहेडे यांना नेतृत्वाची सूत्रे प्रदान करण्यात आली व त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. येथे उल्लेखनीय आहे की, वसंत राठी यांचा कार्यकाळ अत्यंत यशस्वी व ऊर्जावान ठरला. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पुणे चॅप्टरने केवळ प्रगतीच साधली नाही, तर १८० शाळांपासून सुरुवात करून ८०० शाळांपर्यंत आपले कार्यक्षेत्र विस्तारले आणि संघटनेला नव्या उंचीवर नेले.

गवताच्या आगीत ७ वीजवाहिन्या जळाल्या;तळवडे,  देहूगाव परिसरात वीजपुरवठा विस्कळीत

पुणे, दि. २९ एप्रिल २०२५:तळवडे येथे गवताच्या आगीत महावितरणच्या २२ केव्ही व ३३ केव्ही क्षमतेच्या तब्बल ७ वीजवाहिन्या जळाल्या. परिणामी तळवडे पाणीपुरवठा योजनेसह तळवडे एमआयडीसी व इंडस्ट्रीयल परिसरातील सुमारे ४५०० औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. २९) दुपारी ३.४५ सुमारास खंडित झाला. यातील सुमारे १८०० उद्योगांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. तर उर्वरित २७०० उद्योगांसह पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा रात्री १० वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात येत आहे. त्यासाठी महावितरणकडून दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरु आहे.

दरम्यान, या आगीमुळे देहूगाव, चिंचोली गावातील २५०० घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. मात्र पर्यायी व्यवस्थेतून सायंकाळी ६ वाजेपर्यंत या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. आगीमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा गेल्या २ महिन्यांतील हा नववा प्रकार आहे.

याबाबत माहिती अशी की, तळवडे येथील डोंगरावरील वाळलेल्या गवताला मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागली. ही आग सर्वत्र पसरत गेली. डोंगराशेजारी असलेल्या एका ओढ्याच्या कडेपर्यंत ही आग आली. त्याच ठिकाणी असलेल्या महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या ४ आणि ३३ केव्ही क्षमतेच्या ३ वीजवाहिन्या या आगीत जळाल्या. त्यामुळे तळवडे एमआयडीसी, इंडस्ट्रीयल परिसर तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तळवडे पाणीपुरवठा योजनेसह सुमारे ४५०० लघु व उच्चदाब औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. या सर्व परिसराला नियमित वीजपुरवठा करणाऱ्या ४ आणि पर्यायी वीजपुरवठ्यासाठी अतिरिक्त असलेल्या ३ वीजवाहिन्या जळाल्या. त्यामुळे वीजपुरवठ्याची पर्यायी सोय उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र इतर पर्यायी व्यवस्थेतून सुमारे १८०० औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा दोन तासांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला.

भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अतुल देवकर यांनी तीन कंत्राटदार व सहा जॉईंटर यांना  पाचारण करून एकाचवेळी सर्व वीजवाहिन्यांचे दुरुस्ती काम सुरु केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. किरण सरोदे, सहायक अभियंता श्री. ऋषिकेश बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन या कामाला वेग दिला. आज रात्री १० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर उर्वरित २७०० औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येणार आहे. 

पीएमआरडीएचे अधिकारी सोमवार, गुरुवारी नागरिकांना भेटणार

नागर‍िकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगर आयुक्त यांचा न‍िर्णय

पुणे (दि.२९) : नागरिकांना आपल्या अडचणी, समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडता याव्यात, या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सर्व विभागप्रमुख आठवड्यातील दोन दिवस नागरिकांच्या भेटीसाठी पूर्ण वेळ कार्यालयात उपलब्ध असणार आहे. या निर्णयाची गेल्या काही दिवसांपासून पीएमआरडीएमध्ये अंमलबजावणी करण्यात येत असून त्या अनुषंगाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी आदेश काढले आहेत. शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत कार्यालयीन स्तरावर काही न‍िर्णय घेण्यात आले असून नागर‍िकांच्या सोयीसाठी त्यातील हा एक महत्वपुर्ण न‍िर्णय आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात आपल्या कामानिमित्त अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समन्वय राहावा, या उद्देशाने आठवड्यातील पूर्ण दोन दिवस (सोमवार आणि गुरुवार) महानगर आयुक्त यांच्यासह सर्व विभागप्रमुख कार्यालयात नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार आहे. यामुळे नागरिकांना आपल्या अडचणी, समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडण्याची संधी मिळणार आहे.

पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने स्थळ पाहणी तसेच क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्यासाठी बुधवार आणि शुक्रवार निश्चित करण्यात आला आहे. यासह विभागप्रमुखांच्या अध‍िनस्त असलेल्या अधिकारी यांना भेटण्यासाठी मंगळवार, बुधवार आण‍ि शुक्रवारी दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. अध‍िकारी कर्मचारी यांच्या जेवनाची वेळ पण निश्चित केली असून ती दुपारी दीड ते दोन असणार आहे. पीएमआरडीएमध्ये येणाऱ्या नागरिकांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सोमवार किंवा गुरुवारी कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन पीएमआरडीएतर्फे करण्यात आले आहे.

संपर्कासाठी आकुर्डी कार्यालयाचा नंबर : ०२० – २७१६६०००
संपर्कासाठी औंध कार्यालयाचा नंबर : ०२० – २९९९१२७७

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण -न्यायालयाने तपास अधिकाऱ्याच्या कामकाजावर दिली स्थगिती! ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा कोर्टात युक्तिवाद

छत्रपती संभाजीनगर – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सुर्यवंशीच्या आईने राज्य सरकार विरोधात दाखल केलेल्या याचिकेची आज दुसरी सुनावणी पार पडली.यामध्ये न्यायालयात झालेल्या महत्त्वाच्या सुनावणीत, शासनाने नेमलेल्या तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. संबंधित तपास अधिकाऱ्याने २८ आरोपींना नोटीस बजावून, चौकशीत त्यांनी काय बोलले पाहिजे? हे नमूद केल्याची बाब ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली व ही निष्पक्ष चौकशी नसल्याचे मांडले.

यामुळे चौकशी प्रक्रियेत निष्पक्षतेचा अभाव असून, ती दबावाखाली केली जात असल्याची बाब ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयासमोर मांडली.न्यायालयाने ही मागणी मान्य करत, संबंधित तपास अधिकाऱ्याच्या कामावर स्थगिती (Stay) दिली आहे. तसेच, त्यांनी कोणताही निर्णय घेऊ नये वा कोणताही चौकशी अहवाल सादर करू नये, असा स्पष्ट आदेश कोर्टाने दिला आहे.

SIT स्थापन करण्याबाबत निर्णय, न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर काय निर्णय घ्यावा? याबाबत कायद्यात अस्पष्टता आहे. याविषयी देखील पुढील सुनावणीला चर्चा होणार असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.न्यायालयाने सरकारने नियुक्त केलेल्या चौकशीला स्थगिती दिली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला की, ही चौकशी फॉरेन्सिक पोस्टमार्टम अहवालाच्या विरोधी दिशेने चालली आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाला सांगितले की, सरकारने नियुक्त केलेली चौकशी सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत झालेला मृत्यू श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे झाल्याच्या दिशेने नेली जात होती.

ॲड. प्रकाश आंबेडकर चौकशीतील दिशाभूल व पूर्वग्रहदूषित तपास न्यायालयाच्या लक्षात आणून दिला. या प्रकरणी पुढील सूनवाई ८ मे २०२५ होणार आहे.

विजयाबाई सूर्यवंशी (शहिद सोमनाथ सूर्यवंशीच्या आई) ―◆ आम्हाला न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी लढताय. त्यांच्यावरच आमचा विश्वास आहे. मला कायद्यातील काही कळत नसले तरी बाळासाहेब आंबेडकर यांना सर्व कळतं आणि ते जे करताय ते योग्यच आहे.

महाबळेश्वर महापर्यटन धर्तीवर वाहतूक मार्गात बदल

सातारा दि. 29: 2 ते 4 मे या कालावधीत महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव 2025 हा जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विकास महामंडळामार्फत महाबळेश्वर येथे आयोजित करणेत आला आहे. महोत्सव कालावधीत महाबळेश्वर हद्दीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून महोत्सवास महाराष्ट्र राज्यातुन मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता असून व्ही. व्ही. आयपी व व्हीआयपी हे सुध्दा पर्यटन महोत्सव कार्यक्रमास भेट देणार आहेत.

महाबळेश्वर-पांचगणी रोड अतिशय अरुंद असल्याने व घाट रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी व वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने महोत्सव कालावधीत वाई बाजुकडुन पांचगणी-महाबळेश्वरकडे जाणा-या व महाबळेश्वर पाचगणी बाजूकडुन वाई-सातारा बाजूकडे जाणा-या नागरीकांची व वाहनांची गैरसोय होऊ नये म्हणुन 2 ते 4 मे या कालावधीत डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा तथा, प्रभारी पोलीस अधीक्षक, सातारा यांनी वाहनांच्या वाहतुक मार्गात बदल करुन वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्याकरीता अधिसुचना पारित केली आहे.

वाहनांच्या वाहतुक मार्गातील बदलाबाबत वाहतुक मार्गातील बदल पुढीलप्रमाणे करणेत आला आहे.
मुंबई- पुणे- वाई बाजूकडुन येणारी सर्व प्रकारची वाहतुक ही वाई (पसरणी घाट) मार्गे पांचगणी व महाबळेश्वरकडे जाईल. सदरच्या मार्गावर एकेरी वाहतुक राहील. महाबळेश्वर वरून मुंबई- पुणे-वाई बाजूकडे जाणारी सर्वप्रकारची वाहतुक ही महाबळेश्वर-मेढा-कुडाळ-पाचवड वरुन पुणे बैंगलौर महामार्गाकडे जाईल.
महाबळेश्वरवरून भिलार-पाचगणी बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही महाबळेश्वर उदय हॉटेल चौक- आर आर कॉटेज चौक –क्षेत्र महाबळेश्वर नाका मार्गे – अवकाळी अशी जाईल. सदरच्या मार्गावर एकेरी वाहतुक राहील.
महाबळेश्वर वरुन वेण्णा लेककरीता जाणारी वाहतुक ही महाबळेश्वर मार्केट- आर आर कॉटेज चौक –क्षेत्र महाबळेश्वर नाका –नाकिंदा फाटा मार्गे वेण्णालेककडे जाईल. सदरच्या मार्गावर एकेरी वाहतुक राहील
महाबळेश्वर वरून सातारा, सांगली बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही महाबळेश्वर मेढा- सातारामार्गे पुणे –बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून सांगलीकडे जाईल.
वाहतूक बदलाबाबत ठिकाणी दिशा दर्शक फलक व पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरील वाहतुक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

नागरिकांनी आपल्या परिसरात अनधिकृत बाल संस्था सुरु असल्यास महिला व बालविकास विभागास कळवावे-महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे

पुणे, दि. 29: नागरिकांनी आपल्या परिसरात अनधिकृत संस्था सुरु असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किंवा चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ वर संपर्क साधावे; असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशिर बालगृह, वसतीगृह आणि अनाथाश्रम चालविले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत, या संस्थामध्ये बालकांना डांबून ठेवले जात असून त्याचे शारिरीक व मानसिक व लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबींचा विचार करता बालकांवरील अपराधांना प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

याबाबी बालन्याय (मुलांचे काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि सुधारित अधिनियम २०२१ तसेच महाराष्ट्र राज्य बालन्याय (मुलांचे काळजी व संरक्षण) नियम २०१८ मधील तरतुदींचे उल्लघंन करणाऱ्या आहेत. या कायद्यानुसार मान्यता, नोंदणी प्रमाणपत्र नसलेल्या संस्था चालविणाऱ्या व्यक्तीस एक वर्षाचा कारावास आणि एक लाख रुपये किंवा त्याहुन अधिक दंडाची तरतूद आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

मुंबईत होणारी ‘वेव्हज्’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.२९: मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा (वेव्हज्) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या समिटच्या तयारीची पाहणी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

वेव्हज् २०२५ परिषद मुंबईत होतेय हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. जागतिकस्तरावर मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ही परिषद ‘दावोस’ ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दुपारी तीनच्या सुमारास उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिओ वर्ल्ड सेंटरला भेट दिली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री.अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसु आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी परिषदेबाबत सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाला मिळाले ही अभिमानाची बाब असून असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीतू‌न ही परिषद साकार होत आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री श्री. मोदी १ मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत.

भारत जगात आघाडीवर आहे हे सिद्ध करण्यासाठी ही परिषद महत्वाची असून मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे तसेच मिडिया आणि मनोरंजनाचे हे केंद्र असल्याने या परिषदेमुळे मनोरंजन क्षेत्राला तांत्रिकदृष्ट्या नवी ओळख मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या परिषदेमुळे आंतरराष्ट्रीय स्टुडिओज, प्रोडक्शन हाऊसेस, टेक कंपन्यांची भागीदारीची याची दारे खुली होतील असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

मुंबई, दि. 29:- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राज्यात विविध इमारतींची कामे सुरु असून ही कामे पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिल्या. तसेच वक्फ मंडळासमोरील समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

राज्य वक्फ मंडळाशी संबंधित विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन (दूरदृश्य प्रणालीद्वारे), छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी, मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद तसेच विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील मुस्लिम बांधवांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सेवा व इतर आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या गरजा लक्षात घेऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. समाजातील युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण व प्रशिक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील.

या बैठकीत वक्फ मंडळाच्या संपत्ती व्यवस्थापन, निधी वितरण, शिक्षण व इमारत प्रकल्पांशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी सूचना देत वक्फ मंडळाच्या समस्या दूर करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले.

भाजपाच्या कटकारस्थानी राजकारणाला‘ सत्यमेव जयते’ची चपराक– मोहन जोशी


निकालामुळे पुणेकर आनंदित
पुणे -सतत खोटे आरोप करीत विरोधकांचे चारित्र्य हनन करीत सत्ता मिळवणे व अशा अभद्र पद्धतीने मिळवलेली सत्ता टिकवण्यासाठी पुन्हा खोटे बोलत राहणे ही भारतीय जनता पक्षाची कूटनीती आज पूर्णतः उघडी पडली. माजी रेल्वे राज्यमंत्री व पुण्याच्या विकासाला दिशा आणि गती देणारे नेतृत्व पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावरील ईडीने केलेले आरोप आता मागे घेतले व न्यायालयाने देखील ते मान्य केले. या ऐतिहासिक निर्णयामुळे ‘सत्यमेव जयते’ याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी आज केले.


मोहन जोशी म्हणाले की, पुण्याचा भरभक्कम विकास करीत पुण्याच्या विकासाचा सुवर्णकाळ निर्माण करणारे, देशात क्रीडा संस्कृती रुजवणारे आणि विविध उपक्रमांद्वारे पुण्याला आंतरराष्ट्रीय नकाशावर नेणारे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर खोटे आरोप करीत भारतीय जनता पक्षाने नक्की काय साधले? भाजपने माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे राजकीय करिअर, पुण्याचा विकास आणि देशातील ऑलिम्पिक चळवळीचा कटकारस्थाने रचून घात केला हे देश आणि पुणेकर कधीच विसरणार नाहीत व या पापाबद्दल भारतीय जनता पक्षाला क्षमाही करणार नाहीत.
मोहन जोशी पुढे म्हणाले की, साऱ्या देशाला अभिमान असणारे दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर कोळसा खाण संधर्भात खोटे आरोप करायचे, दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसंदर्भात खोटे व बेछूट आरोप करून तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना बदनाम करायचे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोळ्या ठोकत राहायच्या, २G प्रकरणात १ लाख ७6 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टचार झाल्याचे धादांत खोटे बोलत राहायचे. रॉबर्ट वड्रा यांच्यावर असेच बेछूट खोटे आरोप करत राहायचे आणि हे सारे कश्यासाठी? तर भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी! भारतीय संसदीय राजकारणाची नितिमत्ता रसातळाला नेणाऱ्या भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवण्यासाठी जनतेशी द्रोह सातत्याने केला.
आता मात्र ‘सत्यमेव जयते’ या पवित्र युक्तीची चपराक भाजपला बसली. असे सांगून मोहन जोशी म्हणले की, कोळसा खाण, २G, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, रॉबर्ट वड्रा या संदर्भात भ्रष्टचाराचे कोणतेच आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत अर्थात त्याबद्दल भारतीय जनता पक्षाला खोट्या आरोप व प्रचाराबाबत काडीचीही शरम वाटणार नाही. कारण सत्ता मिळवणे हे एकमेव ध्येय त्यांचे होते. भारतीय जनतेला आता त्यांचा सत्ता पिपासूं क्रूर व जनविरोधी चेहरा दिसून आला असून सत्तेमध्ये धुंद राहिलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीने पहलगाम सारख्या ठिकाणी देखील सुरक्षे बाबत ढिलाई व बेफिकिरी का दाखवली हा प्रश्न जनता विचारातच राहणार.
काँग्रेस पक्षाने सदैव नितिमत्ता व साधन सूचिता यांचे पावित्र्य मानले. ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य शिरोधार्य मानले. असे सांगून मोहन जोशी म्हणाले की, गेल्या दशकातील भारतीय जनता पक्षाच्या कुटील कारस्थानी राजवटीला आणि विकृत मानसिकतेला ‘सत्यमेव जयते’ हेच एकमेव उत्तर आहे. सत्याचा विजय हा उशिरा झाला तरी तोच अंतिम असतो हे कटकारस्थानी भारतीय जनता पक्षाच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी लक्षात ठेवावे.

सबसे बडा खिलाडी.. सुरेश कलमाडींना क्लीनचीट

ईडीने तपास बंद करत न्यायालयात सादर केला क्लोजर रिपोर्ट; समर्थकांकडून जल्लोष

पुणे-पुण्याचे माजी खासदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घाेटाळ्यात मनी लाँड्रिग प्रकरणात ईडीने तपास बंद केला आहे. याबाबत ईडीने क्लाेजर रिपाेर्ट दिल्लीतील न्यायालयात सादर केल्याने व ताे स्विकारला गेल्याने कलमाडी यांना क्लीनचीट मिळाली आहे. यामुळे कलामाडी यांचे समर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे कर्वेनगर येथील घराबाहेर घाेषणाबाजी करत फटाके वाजवून व पेढे वाटप करत जल्लाेष व्यक्त केला आहे.

दिल्ली याठिकाणी ३ ते १४ ऑक्टाेबर २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा पार पडली हाेती. या स्पर्धेचे आयाेजनात स्पर्धेचे बजेट जाणीवपूर्वक वाढवले गेले, बनावट करार केले गेले, निकृष्ट पायाभूत सुविधा निर्मिती, बेकायदेशीर लाच अशाप्रकारे माेठ्या प्रमाणात भ्रष्टचार झाल्याचा आणि सरकारचे आर्थिक नुकसान झाल्याचा आराेप करण्यात आला हाेता. तसेच तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व स्पर्धेचे आयाेजक सुरेश कलमाडी यांचे विराेधात मनी लाॅड्रिंगसह वेगवेगळया प्रकारचे गन्हे दाखल झाले हाेते. कलमाडी यांनी याप्रकरणात नऊ महिने तुरुंगवास देखील भाेगला हाेता. सीबीआयने याप्रकरणात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करत कामातील अनियमिततेमुळे आयाेजन समितीचे काट्यवधी रुपयांचे रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले हाेते.

स्पर्धेचे आयाेजक सुरेश कलमाडी, सरचिटणीस ललित भानाेत व इतरांवर अनियमितता केल्याचा आराेप देखील दाखल करण्यात आला. त्याआधारे ईडीने याबाबत मनी लाॅड्रिंग प्रकरणाचा तपास सुरु केला हाेता. परंतु आता या तपासात आराेपी विराेधात काेणताही ठाेस पुरावा मिळून आलेला नाही असे सांगत सीबीआयने क्लाेजर रिपाेर्ट न्यायालयात सादर केला. त्यानंतर आता ईडीने देखील सीबीआयचा तपास थांबवला असल्याचे कारण देत न्यायालयाने ईडीचा कलमाडी यांचे बाबतचा ईडीचा क्लाेजर रिपाेर्ट स्विकारला आहे. त्यामुळे कलमाडी समर्थक कार्यकर्त्यांनी सुरेश कलमाडी यांच्या घराबाहेर एकत्र जमून ‘सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी’ अशी घाेषणाबाजी करत पेढे वाटप करत आंनद व्यक्त केला आहे. सुरेश कलामाडी याप्रकरणात निर्दाेष असताना देखील त्यांच्यावर वेगवेगळे भ्रष्टाचाराचे आराेप करत गुन्हा दाखल झाल्याने काँग्रेसचे एक चांगले नेतृत्व हिरावले गेल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

एयर इंडियाद्वारे टोक्यो हानेडा येथे १५ जून २०२५ पासून दैनंदिन विमानसेवा

·  दिल्ली ते टोक्यो हानेडा विमानसेवेची फ्रीक्वेन्सी चार साप्ताहिक फ्लाइट्सवरून सातवर नेणार

गुरुग्राम२९ एप्रिल २०२५ – एयर इंडिया, या भारताच्या आघाडीच्या जागतिक विमानकंपनीने दिल्ली ते टोक्यो हानेडादरम्यानच्या नॉन- स्टॉप सेवेचा विस्तार करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार आठवड्यातील चार विमानसेवा १५ जून २०२५ पासून रोज सुरू होणार आहेत. यामुळे भारत व जपानमधील कनेक्टिव्हिटी वाढेल, प्रवाशांची जास्त सोय होईल तसेच दोन्ही देशांतील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल.

एयर इंडियाने ३१ मार्च २०२५ रोजी टोक्यो हानेडा विमानतळावर सेवा (नरितावरून) स्थलांतरित केली होती. यामुळे टोक्यो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ अंदाजे ३० मिनिटांनी कमी झाला होता. दैनंदिन विमानसेवा एयर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर एयरक्राफ्टद्वारे दिली जाणार असून त्यामुळे प्रवाशांना मध्य टोक्योला लवकर पोहोचता येईल, कारण हानेडा विमानतळ डाउनटाउन टोक्योपासून केवळ १८ मिनिटांवर आहे.

‘दिल्ली- टोक्यो हानेडा सेवेचा विस्तार करून दैनंदिन सेवा पुरवण्यातून एयर इंडियाची भारत आणि जपानमधील प्रवासाची वाढती मागणी पुरवण्यासाठीची बांधिलकी दिसून येते,’ असे एयर इंडियाचे प्रमुख कमर्शियल अधिकारी निपुण अगरवाल म्हणाले. ‘ही दैनंदिन सेवा आणि सर्व निप्पॉन एयरवेजसह असलेली आमची कोडशेयर भागिदारी यांमुळे प्रवाशांना जपानमध्ये प्रवास करणे तसेच टोक्योखेरीज देशातील इतर ठिकाणी सहजपणे पोहोचणे शक्य होणार आहे.’

एयर इंडियाने स्टार अलायन्स पार्टनर ऑल निप्पॉन एयरवेजसह (एएनए) केलेल्या विस्तारित कोडशेयरमुळे एयर इंडियाच्या प्रवाशांना टोक्यो हानेडापासून सहा प्रमुख जपानी शहरांत – फुकुओका, हिरोशिमा, नागोया, ओकिनावा, ओसाका आणि सपोरो एकाच तिकिटावर आणि प्रवासाच्या अंतिम ठिकाणासाठी बॅगेज चेकसह प्रवास करता येणार आहे.

दैनंदिन विमानसेवेमुळे देशांतर्गत भारतीय ठिकाणी – अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद, कोलकाता आणि पुणे तसेच आशिया व युरोपमधील आंतरराष्ट्रीय मार्गांवर सहजपणे सेवा मिळणार आहे.

१५ जूनपासून लागू होणारे अद्ययावत विमानसेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

  • AI358: दिल्लीपासून निर्गमन (DEL) 2020 वाजता, टोक्यो हानेडा (HND) येथे दुसऱ्या दिवशी 0755 वाजता आगमन (रोज).
  • AI357: टोक्यो हानेडापासून निर्गमन (HND) 1150 वाजता दिल्ली (DEL) येथे 1725 वाजता (daily) आगमन.

एयर इंडियाच्या दिल्ली- टोक्यो हानेडा विमानसेवेचे बुकिंग सर्व चॅनेल्सवर खुले असून त्यात संकेतस्थळ Air India’s website,, मोबाइल अप आणि ट्रॅव्हल एजंट्सचा समावेश आहे.

पुणे काँग्रेस आणि बोपोडी ब्लाॅक काँग्रेसच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न

पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि बोपोडी ब्लाॅक काँग्रेस कमिटीच्या वतीने, मांऊट वर्ड प्रिस्टीन सोसायटी, बोपोडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन साईनाथ हॉस्पिटल यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.या प्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार सौ. दिप्ती चवधरी,माजी नगरसेवक अविनाश बागवे, साईनाथ हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सुहास कांबळे, सोसायटीचे चेअरमन नितीश पंडित, चिटणीस शामुद्दिन मुदलियार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात सोसायटीतील १३७ रहिवाशांची BMD (Bone Mineral Density) तपासणी करण्यात आली. तसेच ब्लड शुगर, बी.पी. (Blood Pressure) तपासणीसह हाडांचे आजार आणि आरोग्य विषयक मार्गदर्शनही करण्यात आले.या उपक्रमाचे आयोजन बोपोडी ब्लाॅक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल जाधव, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, अनिल पवार, शंकर वि. कुमार आणि जोस वर्गीस यांनी केले.यावेळी ज्योती परदेशी, कमल गायकवाड, अरुणा चेमटे, माया मोरे, मनिषा ओव्हाळ, चंदा अंगीर, शोभा आरुडे, रमा भोसले, कविता भागवत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसुधा निरभवणे ,अन्वर शेख, प्रशांत टेके, शशिकांत पांडुळे, सुभाष निमकर, गणेश सारवान, विठ्ठल आरुडे, अजित थेरे, भरत ठाकुर, निलेश मोरे, सुनील केदारी, चेतन भुतडा, राजन निरभवने, अमोल जाधव, लियाकत शेख, निखिल कांबळे, निलेश रूप टक्के, शफिन मणियार, संदीप भिसे, नईम शेख तसेच यांचीही सक्रिय उपस्थिती होती.

या उपक्रमाला मांऊट वर्ड प्रिस्टीन सोसायटीच्या सर्व सदस्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला आणि हा आरोग्य शिबीर अत्यंत यशस्वीपणे पार पडला.या प्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,“सद्याच्या काळात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बोपोडी ब्लाॅक काँग्रेस कमिटीने आयोजित केलेला हा आरोग्य तपासणी शिबिर एक उत्कृष्ट उपक्रम आहे आणि त्यांनी केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. समाजाच्या आरोग्याच्या हितासाठी असे उपक्रम सातत्याने घेतले जावेत.”या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल बोपोडी ब्लाॅक काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

पुणे पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात 3 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुणे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यसरकारने पीएमआरडीएचा डीपी रद्दबातल करत पुणे जिल्हा बकाल करण्याचे ठरवले आहे. हा डीपी रद्द झाल्याने पुणे जिल्हा व परिसरातील नागरिकांचा विकासाचा हक्क राज्य सरकारने हिरावला आहे. यापूर्वी डीपी तयार करत असताना तेव्हाच्या कारभाऱ्यांनी व त्यांच्या मध्यस्थांनी शेतकऱ्यांची व बिल्डरांची माेठी फसवणूक करत तब्बल तीन हजार काेटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.यापूर्वी DP तयार करत असताना कारभाऱ्यांच्या आशीर्वादाने नीलाहर नावाच्या ठेकेदारासह अनेक मध्यस्थांनी शेतकऱ्यांची व बिल्डरांची मोठी फसवणूक करत तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला, या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आज पुणे शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनास स्वाती पोकले, अनिता पवार, दिलशाद अत्तार, आशाताई साने, शेखर धावड़े, फाईम शेख, पप्पु घोलप, योगेश पवार, अजिंक्य पालकर, सचिन कदम, विक्रम जाधव तथा पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सरकार विराेधी घाेषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला हाेता. या आंदाेलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, पीएमआरडीएचा डीपी हा पुणे जिल्ह्याचे सर्व सीमारेषेवर विस्तारीत आहे. महाविकास आघाडी सरकार, एकनाथ शिंदे सरकार यांच्याकाळात संबंधित डीपीबाबत काम झाले. डीपीच्या काळात महायुतीचे मंडळी यांचा एक नीलाहर म्हणून दलाल पुण्याचे वर्तुळात फिरत हाेता. त्याने अमाप शेतकऱ्यांकडून व बिल्डर यांचेकडून जागेवरील आरक्षण बदलण्यासाठी तब्बल तीन हजार काेटी रुपये घेतले आहे असा आमचा आराेप आहे. याबाबतचे पुरावे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टप्प्याटप्प्याने देणार आहे. त्याच बराेबर हा नीलाहर मंत्रालय परिसरातील उच्चभ्रू हाॅटेल मध्ये कंपनीचे नावाने रुम बुक असतात. याठिकाणी महायुतीमधील काही मंत्री, वजनदार आमदार यांची रहाण्याची व खाणेपिण्याची व्यवस्था केली जाते. याबाबत शेतकऱ्यांचे रेकाॅर्डिंग आमच्याकडे आहे. व्यवहार कशाप्रकारे हाेताे याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे आहे. हा भ्रष्टाचार उघड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. निलावर याने ज्यांचे ज्यांचे पैसे घातले ते उघडकीस यावे. हा डीपी रद्द केल्याने पुणेकरांचे पुढील काळात हाल हाेणार आहे. पुढील दहा वर्षात पुन्हा डीपी तयार हाेणार नाही अशी शक्यता आहे. पुण्याचे बकालपणा, अनाधिकृत बांधकामे थांबवली जावीत. निलाहर याचे पूर्ण नाव, ऑफिस पत्ता हा मुख्यमंत्री यांच्यासमाेर ठेवणार असून हा घाेटाळा एकनाथ शिंदे यांचे काळात झाला आहे. मुख्यमंत्री यांना याबाबत चाैकशी करुन शेतकऱ्यांचे पैसे ज्यांनी खाल्ले ते वसुल करावे लागतील. एकरी पैसे घेण्यात आले असून बाणेर परिसरात स्कवेअर फुट मध्ये व्यवहार झाले आहे. एक साधा कागद दाखवून तुमच्या जागेवर आरक्षण पडले असल्याचे दाखवून ते बदलण्यासाठी आमचे सरकार आहे याकामासाठी डीपी जाहीर हाेण्यापूर्वी रक्कम घेण्यात आली असून हा सर्व व्यवहार पुण्यात झाला आहे.

‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि.२९ : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर  विवाह सोहळे आयोजित केले जात असून या मुहूर्तावर बालविवाह मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे.

निर्मल भवन येथे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बालविवाह रोखणेबाबत करावयाच्या कार्यवाही संबंधित बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी दुरदृश्य प्रणालीद्वारे महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, सह आयुक्त राहुल मोरे व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुली आणि २१ वर्षांखालील मुलांचे विवाह करणे बेकायदेशीर आहे. परंतु आजही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होतांना दिसतात. त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी याबाबत कार्यपद्धती ठरवून काम करावे. गावपातळीवर ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस प्रशासन, महिला व बाल विकास अधिकारी यांनी विशेष लक्ष ठेवून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही  राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.बालविवाह रोखणे ही केवळ शासनाची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी असल्याचे सांगून बाल विवाहाबाबत तक्रार आल्यास त्यावेळी  सरपंच, पोलीस पाटील यांना देखील जबाबदार धरण्यात यावे. आदिवासी भागातही बालविवाहाचे प्रमाण अधिक असून त्या भागात कार्यरत अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवावी. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी दर तीन महिन्याला आढावा घ्यावा, असेही राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

परभणी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक दिसून येते त्यामुळे तिथे विशेष मोहीम राबवण्यात यावी,  अशी सूचनाही श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिली.