खामगाव मावळ, पुणे :’आजची बचत म्हणजेच उद्याची समृद्धी असते.’ असे म्हणतात.
याच बचतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच समजावे, आपल्या खाऊच्या पैशातील काही पैसे साठवून त्याचा वापर आपण आपल्या छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी करू शकतो याची जाणीव व्हावी, त्याचबरोबर बँकेतील व्यवहार कशा पद्धतीने चालतात अशा कित्येक गोष्टी मुलांना याच जडणघडणीच्या वयात कळाव्यात या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव मावळ येथे ‘विद्यार्थी बचत बँक खामगाव मावळ’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
बँकेत पैसे भरण्याची व काढण्याची पद्धत काय असते.. बँकेचे पासबुक कसे असते.. चेक कसे वापरतात या आणि अशा कित्येक आर्थिक व्यवहाराशी संबंधित गोष्टी बऱ्याचदा मोठ्या माणसांनाही चटकन लक्षात येत नाहीत. त्यामुळे भविष्यात अशा अडचणींना तोंड देण्याची वेळ येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना अगदी खऱ्या बँकेचा अनुभव देता यावा म्हणून खऱ्याखुऱ्या बँकेत असतात तशाच पैसे काढण्याच्या व भरण्याच्या स्लीप, बँकेचे पासबुक, इत्यादी जशास तशा बाबींचा वापर करून आमची विद्यार्थी बचत बँक सुरू झाली.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमधूनच निवडलेल्या कॅशियर आणि क्लर्क यांना त्यांची कामे समजावून सांगण्यात आली. बँकेचे कामकाज विद्यार्थ्यांनी चालवायचे असून त्यांनी बचत केलेले पैसे त्यांना हवे तेव्हा शालेय वस्तू खरेदीसाठी काढता येणार आहेत. आवश्यक तिथे मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी शिक्षक आहेतच…
विद्यार्थ्यांना भविष्यात जी कर्तव्य पार पाडायची आहे ज्या जबाबदाऱ्या पेलायच्या आहेत त्यांचे जिवंत अनुभव शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना मिळाले तर हेच विद्यार्थी उद्याचे सुजाण आणि जबाबदार नागरिक होतील याची खात्री असे उपक्रम देत राहतात.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. उमेध धावारे, श्रीमती वैशाली कुंभार मॅडम व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.