Home Blog Page 556

शिक्षण क्षेत्राला प्राधान्य देण्याची गरज- अॅड अभय आपटे 

पुणे : आज भारत आर्थिकदृष्ट्या जागतिक स्तरावर प्रगती करत आहे. मात्र, दुर्दैवाने शिक्षणाला अद्यापही प्राधान्य दिले जात नाही. शासनाच्या विविध योजना जाहीर होतात, पण त्यांची अंमलबजावणी कितपत प्रभावी होते, हे स्पष्ट नाही. शिक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन नसल्याचे जाणवते. एका संस्थेच्या अनेक शाखा सुरू करण्यापेक्षा मोजक्याच शाखांमधून दर्जेदार शिक्षण देणे अधिक महत्त्वाचे आहे. याशिवाय, औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे,  असे मत अॅड. अभय आपटे यांनी व्यक्त केले. 

विद्या महामंडळ संस्थेच्या ६३ व्या वर्धापनदिनी व ‘लोकशिक्षण दिनानिमित्त ‘पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार’ प्रदान सोहळा आपटे रस्त्यावरील संस्थेच्या सभागृहात सोहळा संपन्न झाला. आपटे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी डॉ. वर्षा बापट यांना अॅड अभय आपटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राम रानडे, कार्याध्यक्ष अमोल साने, कार्यवाह लिलाधर गाजरे,  उपाध्यक्षा अपर्णा कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते. मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ, रोख रक्कम अकरा हजार असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. वर्षा बापट म्हणाल्या, आपटे प्रशालेचे वैशिष्ट्य म्हणजे पु. ग. वैद्य सरांनी केलेले प्रयोग. त्यांच्या प्रयोगांमुळे आम्ही दरवेळी काहीतरी नवीन शिकत गेलो. वैद्य सरांनी आणि इथल्या शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांचा आम्हाला आजही उपयोग होत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी शिक्षण क्षेत्रात काम करण्यास प्रेरित झाले, असेही त्यांनी सांगितले.  सुमेधा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लिलाधर गाजरे यांनी प्रास्ताविक केले आणि गौतम मगरे यांनी आभार मानले.

भाजपला 22, राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदे.. शिंदेंना बिनमहत्वाची १२ मंत्रिपदे

मुंबई-महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी होणार असून मुख्यमंत्री पद तसेच खातेवाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर एकनाथ शिंदे गृहमंत्री पदासाठी अडून बसल्याची माहिती आहे. अशातच आता महायुतीच्या खातेवाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. यामध्ये भाजप स्वत:कडे 21 ते 22 खाती ठेवणार असल्याचे समजते आहे. यामध्ये गृह मंत्रालय तसेच सभापतीपद भाजपला मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, अतुल सावे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, अतुल भातखळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे 16 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 11 ते 12 खाती मिळून शकतात. यामध्ये एकनाथ शिंदे, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, संजय राठोड आणि उदय सामंत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.मात्र अगदी बिन महत्वाची आणि सामान्य दर्जाची मानली जाणारी खाती यांच्या गळ्यात मारली जाण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 खाती मिळणार असून अद्यापही कोणाला संधी मिळणार ही माहिती समोर आली नाही. मात्र, अर्थ खाते हे राष्ट्रवादीकडेच जाणार असल्याची माहिती आहे.

भाजपकडे गृह आणि महसूल सारखे खाते कायम राहू शकते. याशिवाय त्यांना सभापती आणि विधान परिषद अध्यक्ष पदही मिळू शकते. राष्ट्रवादीला अर्थ, तर शिंदेंच्या शिवसेनेला शहरी विकास खाते मिळू शकते. याशिवाय इतर खात्यांवर नंतर चर्चा केली जाणार आहे. तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुतीचे तिनही नेते मुंबईत बैठक घेऊन नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करणार आहेत. मात्र, कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अद्यापही खालावलेलीच असल्याने बैठका टळत आहेत.मुख्यमंत्रिपद भाजपकडे गेल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी अडून बसल्याची माहिती होती. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने महायुतीची बैठक झाली नाही. त्यामुळे खातेवाटपाबाबत चर्चा होऊ शकली नाही. पण आता शिंदेंच्या शिवसेनेकडून हालचाली सुरू असून उदय सामंतांनी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली आहे. या भेटीत गुरूवारी होणाऱ्या शपथविधीच्या तयारीवर चर्चा झाली असून उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर शिवसेनेचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे.

मुंबईत मधुमेहाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ: तज्ज्ञांनी संपूर्ण अन्न, वनस्पती-आधारित आहार आणि जीवनशैली बदलांची केली शिफारस

मुंबई, 3 डिसेंबर 2024 : मुंबईत मधुमेहाशी संबंधित मृत्यूंच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, हा रोग एक गंभीर सार्वजनिक आरोग्य संकट बनला आहे. प्रजा फाउंडेशनच्या अलीकडील अहवालानुसार, 2014 ते 2022 दरम्यान मधुमेहामुळे 91,318 जणांचा मृत्यू झाला, ज्यात 2022 मधील 14,207 मृत्यूंचा समावेश आहे. 2014 मध्ये ही संख्या फक्त 2,544 होती, यावरून ही वाढ किती गंभीर आहे, हे दिसून येते.

मधुमेहाचा उद्रेक फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही. द लॅन्सेटच्या अहवालानुसार, 2022 मध्ये जागतिक स्तरावर 828 दशलक्ष प्रौढ मधुमेहाने ग्रस्त होते, ज्यामध्ये भारताचा वाटा 212 दशलक्ष म्हणजेच एक चतुर्थांशहून अधिक होता.

आजारासाठी बहुतेक रुग्ण औषधांवर किंवा इन्सुलिनच्या इंजेक्शनवर अवलंबून असतात.

तथापि, वाढत्या संशोधनातून असे दिसून येते की, संपूर्ण अन्न, वनस्पती-आधारित आहाराचा अवलंब केल्याने प्रकार 1 आणि प्रकार 2 मधुमेह असलेल्या रुग्णांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. प्रकार 1 मधुमेहावरील एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, कॅलरीज किंवा कार्बोहायड्रेटवर कोणतेही निर्बंध न लादता कमी फॅट असलेल्या वनस्पती-आधारित आहाराचे पालन केल्याने रुग्णांची इन्सुलिन संवेदनशीलता 127% ने वाढली.

त्याचप्रमाणे, प्रकार 2 मधुमेहावरील अभ्यासात दिसून आले की, या आहाराचा अवलंब करणाऱ्या रुग्णांनी आजाराच्या लक्षनाथ सुधारणा आणि संभाव्य रेमिशन (आजाराचे लक्षणे अदृश्य होणे) साध्य केले.

डॉ. झीशान अली, पीएच.डी, फिजिशियन्स कमिटी फॉर रिस्पॉन्सिबल मेडिसिन (PCRM) मधील संशोधन कार्यक्रम तज्ज्ञ, यांनी डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडिजमध्ये आयोजित सत्रात या गोष्टीवर भर दिला. 130 हून अधिक पाककला विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, “मुंबईत वाढणारी मधुमेह महामारी केवळ एक आकडेवारी नाही, ती एक धोक्याची घंटा आहे. डॉक्टर, परिचारिका, पोषणतज्ज्ञ आणि भावी शेफ यांना संपूर्ण अन्न, वनस्पती-आधारित आहाराच्या महत्त्वाची जाणीव असणे आवश्यक आहे, कारण ते सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.”

PCRM ही एक ना-नफा संस्था असून, ती प्रतिबंधात्मक वैद्यकशास्त्राचा प्रसार करते आणि पोषण व जीवनशैलीत बदलांच्या माध्यमातून असंसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन करण्याबाबत सक्रियपणे जनजागृती करते.

मुंबईतील वाढत्या मधुमेह संकटावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. वनस्पती-आधारित आहाराचा स्वीकार आणि जीवनशैलीतील काही बदल यामुळे या समस्येवर नियंत्रण मिळविता येईल आणि शहरातील सार्वजनिक आरोग्य परिणामांमध्ये सकारात्मक बदल घडविता येईल.

एचआयव्ही बाधीतांनी त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास चांगले आयुष्य जगणे शक्य – अर्चना शिंदे

नूतन भोसरी रुग्णालयात एचआयव्ही जनजागृती कार्यक्रम

पिंपरी,- एचआयव्ही बाधीत ६० टक्के लोकांना क्षयरोगाचा (टीबी) चा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त असतो. एचआयव्हीची बाधा झाल्यास घाबरून न जाता योग्य औषध उपचार, सकस आहार आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास चांगले आयुष्य जगणे सहज शक्य आहे. या आजारामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते असे मार्गदर्शन नूतन भोसरी रुग्णालयातील आयसीटीसी समुपदेशक अर्चना शिंदे यांनी केले.
नूतन भोसरी रुग्णालय येथे जागतिक एड्स जनजागृती सप्ताह निमित्त आयसीटीसी विभागाच्या वतीने विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिसरातील शाळा व अंगणवाडी शिक्षकांना एचआयव्ही, एड्स, क्षयरोग व गुप्तरोग आजारांविषयी माहिती देण्यात आली. एचआयव्ही बाधित रुग्णांनी अधिक माहितीसाठी १०९७ या टोल फ्री क्रमांक संपर्क साधण्याचे आवाज शिंदे यांनी केले.
भोसरी परिसरात जनजागृती फेरी काढण्यात आली.
अर्चना शिंदे वेळी यांनी सांगितले की, सर्व सरकारी रुग्णालयांतील आयसीटीसी सेंटर मध्ये एचआयव्ही बाधित व्यक्तींसाठी सर्व उपचार, तपासणी, चाचणी, मोफत उपलब्ध आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, नूतन भोसरी रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, डॉ. ऋतुजा लोखंडे, डॉ. सुजाता गायकवाड, डॉ. किरण कांबळे, पीएचएन अनुपम वेले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

२०/२५ वर्षांच्या ३ तरुणांना पकडून २० लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे- पुणे पोलिसांनी तिघांना पकडून एकूण १९,४५,०००/- रू कि.चा ओजीकुश गांजा, एम.डी. व एल.एस.डी. हे अंमली पदार्थ व इतर ऐवज हस्तगत केले .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता तसेच अंमली पदार्थ तस्करांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत दिलेल्या सुचना व आदेशानुसार,
अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील (अति. कार्यभार) पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, व पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांचे मार्गदर्शनाखाली दि.०२/१२/२०२४ रोजी सिंहगडरोड पो.स्टे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना, पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार संदिप शिर्के यांना प्राप्त झालेल्या माहितीचे अनुषंगाने कृष्णा/घोडनदीकर टॉवर बिल्डींग जवळ, श्री लॉज समोर सार्वजनिक रोड लगत, भूमकर चौक, नऱ्हे आंबेगाव पुणे या ठिकाणी सापळा रचुन इसम नागे १) अंशुल संतोष मिश्रा वय २७ वर्षे, रा. सराफ लाईन मिश्रानिवास बुलढाणा २) आर्श उदय व्यास वय २५ वर्षे, रा. १८५/५/८०, त्रिशुल शिवाजी टेक्निकल स्कुल समोर, पंत नगर, घाटकोपर इस्ट मुंबई ३) पियुश शरद इंगळे वय २२ वर्षे, रा. फ्लॅट नं ०८, आदित्य हेरिटेज, स्पाईन रोड, चिखली, चिंचवड पुणे यांना ताब्यात घेतले असता, त्यांचे झडतीमध्ये. १७,४१,०००/- रू. किं. चा, त्यामध्ये २५१ ग्रॅम वजनाचा ओजीकुश गांजा, १५ ग्रॅम वजनाचे एम.डी. व ६२ मि.ग्रॅम वजनाचे एल.एस.डी. असा अंमली पदार्थ व २,०४,०००/-रू. कि.चा इतर ऐवज असा एकूण १९,४५,०००/- रू कि.चा ऐवज हा अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द सिंहगड रोड पोलीस ठाणे, पुणे याठिकाणी एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ), २२ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार,पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १. गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील (अति. कार्यभार) पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व पोलीस निरीक्षक उल्हास कदम सहा. पो. निरीक्षक, अनिकेत पोटे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, सचिन माळवे, विनायक साळवे, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, सुजित वाडेकर, नुतन वारे, रेहाना शेख, विपुल गायकवाड यांनी केली.

तेजज्ञान फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवी सोहळा ८ डिसेंबर रोजी पार पडणार

पद्मभूषण डॉ. विजय भटकर, सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सुद यांची विशेष उपस्थिती राहणार

पुणे – गेल्या २५ वर्षांपासून समाजात अविरतपणे लोकहिताचे काम करणाऱ्या आणि जनसामान्यांच्या मनात सकारात्मक विचार  (हॅपी थॉट्स) रुजवणाऱ्या तेजज्ञान फाउंडेशन रौप्य महोत्सवी वर्ष यंदा साजर करत आहे. या रौप्य महोत्सवी सोहळा येत्या रविवारी ८ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वा. मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडणार असून प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सदरील सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेता व चित्रपट निर्माता सोनू सूद उपस्थित राहणार आहे. सदरील सोहळा सिहंगड रोड येथील नांदोशीगावाजवळील मनन आश्रम येथे पार पडणार आहे. अशी माहिती पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तेजज्ञान फाऊंडेशनच्या विश्वस्त कल्याणी धरणे, वरिष्ठ समन्वयक गोविंद बोंदिया, हेमंत सलामे, शिल्पा भटेवरा यांनी दिली.

तेजज्ञान फाउंडेशनची स्थापना तेजगुरू सरश्री यांनी केली असून त्यांनी आपले जीवन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे.  या महोत्सवात त्यांचे हजारो शिष्य सहभागी होणार होणार आहेत.  या कार्यक्रमासाठी पुणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तेजज्ञान फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

संवादाची भाषा जपली तरच लोकशाही जिवंत राहील – प्रा. अपूर्वानंद.

पुणे (प्रतिनिधी): भारताच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या संमिश्र संस्कृतीचा आढावा आणि मूल्यांचा गौरव, त्यांचं विश्लेषण या सर्वांचा सारांश म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू लिखित “भारताचा शोध” हे पुस्तक असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक, प्रख्यात विद्वान आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. अपूर्वानंद यांनी केले. निमित्त होते लोकायत, ज्ञानभारती प्रतिष्ठान आणि ALERT आयोजित ‘भारत एक खोज’ या व्याख्यानमालेतील नेहरू के रस्ते या पहिल्या व्याख्यानाचे. हे व्याख्यान रविवार, 1 डिसेंबर 2024 रोजी सायं 6 वा. पत्रकार भवन येथे झाले. पुढे ते म्हणाले कि
अठरापगड जाती जमाती, विविध धर्म असून सुद्धा भारताला एकसंध बांधून ठेवलं ते संवादाने हि शिकवन महात्मा गांधी पासून ते जवाहरलाल नेहरू  यांनी आपल्याला दिली आहे संवादाची भाषा जर खऱ्या अर्थाने जपली तरच लोकशाही जिवंत राहील हाच विचार नेहरू यांनी दिला आहे. एकमेकांना जर आपण समजून घेत नसेल तर नवीन समाज निर्माण करू नाही शकणार अशा विचारसरणीमुळेच आंतरराष्ट्रीय जगात नेहरूंची स्वंतत्र ओळख बनली होती
भाषेच्या आनंदासाठी तरी कमीत कमी भारत एक खोज हे नेहरू लिखित पुस्तक सर्वांनी वाचायला पाहिजे असं आवाहन प्रा. अपूर्वानंद यांनी केलं.
भारतातील विविध परंपरा, भाषा, पेहराव, खाद्य नक्की काय होत्या हे आजच्या तरुणाईने समजून घेणं या उद्देशाने या व्याख्यानमालेच आयोजन केलं अस कार्यक्रमाचे समन्वयक नीरज जैन यांनी सांगितले.

सोशल मीडियावर माहिती शेअर केल्याने लवकर झाली आई-मुलाची भेट,हरवलेल्या 3 वर्षाच्या मुलाचा 4 तासात शोध

पुणे-पुणे शहरातील वाघोली परिसरात हरवलेल्या तीन वर्षांच्या मुलाचा शोध पोलिसांनी चार तासात लावला आहे. एका सजग महिलेने संबधित हरवलेला मुलगा मिळून आल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तात्काळ त्याचा पालकांचा शोध घेऊन मुलाला सुखरूप त्यांच्या ताब्यात दिले.

वाघोली भागात बायफ रस्त्यावरील निखार लेडीज शॉपजवळ मनीषा चेतन सोनार यांना एक तीन वर्षांचा मुलगा एकटा दिसला. सोनार यांनी त्याच्याबरोबर कोण आहे का?, याचा शोध घेतला. परंतु, त्याच्या पालकांचा शोध न लागल्याने त्यांनी त्वरीत या घटनेची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलिस कर्मचारी प्रतिक्षा पानसरे, सचिन पवार यांना दिली. त्यांनी संबधित माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना दिली.त्यामुळे पुणे शहरातून बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान मोहीम राबविण्यात येत आहे.

वाघोली भागात तीन वर्षांचा मुलगा मिळाल्याची माहिती फोटोसह पोलिसांनी त्वरीत सोशल मीडियावर प्रसारित केली. पोलिसांनी डोमखेल रस्ता, बायफ रस्ता, दत्तविहार परिसरातील सोसायटी, तसेच मजुरांच्या वसाहतीत शोधमोहीम राबविली. त्यानंतर अक्षय संस्कृती सोसायटीतून एक तीन वर्षांचे मुलगा काही तासापूर्वी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. पोलिसांनी मुलाचे फोटो सोसायटीतील रहिवाशांना दाखविले. मुलाच्या आईने फोटो पाहिले. मुलगा सुखरुप सापडल्याने तिला अश्रू अनावर झाले. पोलिसांनी मुलाचा शोध घेऊन त्याला सुखरुप ताब्यात दिल्याने मुलाच्या आईने पोलिसांचे आभार मानले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, सुहास तांबेकर, कानिफनाथ कारखेले, कीर्ती मांदळे यांनी ही कामगिरी केली आहे.

एकनाथ शिंदे रुग्णालयातून माघारी:ताप, घशाचा संसर्ग अन् पांढऱ्या पेशी घटल्यामुळे चेकअपसाठी गेले होते रुग्णालयात

ठाणे-महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या एका दिवसावर आला असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. ताप, घशाचा संसर्ग अन् पांढऱ्या पेशा घटल्यामुळे मंगळवारी दुपारी ते ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात गेले. तिथे विविध तपासण्या केल्यानंतर ते 3 च्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना झालेत.एकनाथ शिंदे 3 दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील दरेगाव या आपल्या मूळ गावी गेले होते. तिथे त्यांना 105 डिग्री ताप आला होता. त्यांना सलाईनही लावण्यात आली होती. मुंबईत परतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली. पण ताप उतरत नसल्यामुळे आता अखेर त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची वेळ आली होती.रुग्णालयातून माघारी परतल्नंयातर शिंदेंनी पत्रकारांशी संक्षीप्त संवाद साधला. त्यात ते म्हणाले, आता माझी तब्येत बरी आहे. मी चेकअपसाठी येथे आलो होतो.

निवडणूक आयोगाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात: मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याने संशय अधिकच बळावला : नाना पटोले

पोलीसांच्या दडपशाहीने मारकडवाडीच्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाही व संविधानाचा खूनच.

लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी मारकडवाडीने सुरु केलेल्या लढाईला काँग्रेसचा पाठिंबा, हुकूमशाही हरेल व लोकशाहीच विजयी होईल.

मुंबई, दि. ३ डिसेंबर २०२४
विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गावक-यांना मतदान करु दिले नाही. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर मारकडवाडीत मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला प्रशासन का घाबरले? असा सवाल विचारत निवडणूक आयोगाचे बिंग फुटेल म्हणूनच गावकऱ्यांना मतपत्रिकेवर मतदान करु दिले नाही का?, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मारकडवाडीमध्ये प्रशासन अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे वागले, त्यामुळे EVM आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ते अधिक गडद झाले आहे. ‘कर नाही तर डर कशाला?’ याप्रमाणे प्रशासनाने हे मतदान पार पडू द्यायला हवे होते, पण भाजपा सरकारच्या काळात सर्व सरकारी यंत्रणाच दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी त्यांना ‘वरून’ आलेल्या आदेशाची फक्त अंमलबजावणी केली. मारकडवाडीत प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचाच प्रकार झाला आहे आणि हाच लोकशाही व संविधानाचा खून आहे.

विधानसभा निवडणुक प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत. काँग्रेस पक्षानेही सातत्याने निवडणुकीतील गैरप्रकाराच्या तक्रारी केल्या पण निवडणूक आयोग ‘कुंभकर्णी’ झोपेतून जागे झाले नाही. निवडणूक आयोग आता फक्त नावालाच स्वायत्त संस्था उरली असून आज ते भाजपाच्या हाताखालचे कठपुतली बाहुले झाले आहे का? असा प्रश्न जनता विचारत आहे. मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ एका मोठ्या लढ्याची सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्ष या लढाईत मारकडवाडीच्या ग्रामस्थांसोबत आहे. या लढ्याचे आगामी काळात मोठ्या युद्धात रुपांतर होऊन हुकूमशाही हरेल व लोकशाहीचाच विजय होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

सलग 14 तास 11 कलाकारांचे होणार सादरीकरण : गायन, वादन आणि नृत्याची पर्वणी

रौप्य महोत्सवी वि. वि. द. स्मृती संगीत समारोह रविवारी
गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे आयोजन : यंदाची संकल्पना ‌‘भैरव ते भैरवी‌’
पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, पं. विनायकबुवा पटवर्धन आणि पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात येत असलेला यंदाचा रौप्य महोत्सवी (25वा) वि. वि. द. स्मृती संगीत समारोह येत्या रविवारी (दि. 8 डिसेंबर) आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी नव-नव्या संकल्पनेवर आधारित समारोहाचे आयोजन करण्यात येत असून यंदाची संकल्पना ‌‘भैरव ते भैरवी‌’ अशी आहे.
गायन, वादन, नृत्याचा समावेश असलेला यंदाचा समारोह सकाळी 8 ते रात्री 10 असा 14 तास चालणार असून यात 30 ते 40 वयोगटातील 11 कलाकारांचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे आणि उपप्राचार्या परिणीता मराठे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. वि. वि. द. स्मृती संगीत समारोह गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहे. समारोह सर्वांसाठी खुला आहे.
पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी दि. 5 मे 1901 रोजी गांधर्व महाविद्यालयाची लाहोर येथे स्थापना केली. त्यानंतर या संकल्पनेचा प्रसार संपूर्ण भारतात झाला आणि देशाच्या विविध भागात गांधर्व महाविद्यालयांना सुरुवात झाली. पंडित पलुस्कर यांचे पट्टशिष्य पंडित विनायकबुवा पटवर्धन यांनी दि. 8 मे 1932 रोजी गांधर्व महाविद्यालय, पुणेची स्थापना केली. पलुस्कर यांचे चिरंजीव पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांचे सांगीतिक शिक्षण याच संस्थेत झाले. गांधर्व महाविद्यालयाचे तीन महान कलाकार पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, पं. विनायकबुवा पटवर्धन आणि पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या 24 वर्षांपासून म्हणजे 1999 सालापासून वि. वि. द. स्मृती संगीत समारोहाचे आयोजन केले जात आहे. या तीनही महान कलाकारांच्या कार्याचे स्मरण कलाकार आणि रसिकांना असावे या प्रामाणिक हेतूने समारोहाचे आयोजन केले जाते. या समारोहात सहभागी होणारे कलाकार श्रद्धायुक्त भक्तीभावाने आपली कला सादर करत असतात.
यंदाच्या समारोहाची सुरुवात नम्रता गायकवाड यांच्या शहनाई वादनाने होणार आहे. त्यानंतर गायत्री जोशी (गायन), अभिषेक शिनकर (स्वतंत्र संवादिनी वादन), आदित्य मोडक (गायन), जयंत केजकर (गायन), ओजस अढीया (तबला), अभिषेक बोरकर (सरोद), अनन्या गोवित्रीकर (कथक), रमाकांत गायकवाड (गायन), शाकीर खान (सतार), आदित्य खांडवे (गायन) हे आपली कला सादर करणार आहेत. कलाकारांना किशोर कोरडे, आशय कुलकर्णी, अभिजित बारटक्के, रोहित मुजुमदार, प्रणव गुरव तबला साथ करणार असून अमेय बिच्चू, अभिनव रवंदे, अभिषेक शिनकर संवादिनीची साथ करणार आहेत. वि. वि. द. स्मृती संगीत समारोहाचे उद्घाटन सीजीएसटीचे आयुक्त डॉ. रवींद्र डांगे यांच्या हस्ते होणार आहे.
गेल्या 24 वर्षात वि. वि. द. स्मृती संगीत समारोहात पंडित संजीव अभ्यंकर, विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर, पंडित विश्वमोहन भट्ट, पंडित उदय भवाळकर, पंडित भवानीशंकर, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे, पंडित विजय घाटे, पंडित प्रभाकर कारेकर, पंडित उल्हास कशाळकर, पंडित राजन-साजन मिश्रा, पंडित मधुप मुद्गल, विदुषी एन. राजम, पंडित निलाद्रीकुमार, विदुषी मालिनी राजूरकर, विदुषी वीणा सहस्रबुद्धे, उस्ताद सुजात खान, पंडित सुरेश तळवलकर, विदुषी पद्मा तळवलकर, पंडित व्यंकटेशकुमार आदी सुप्रसिद्ध कलाकारांनी आपली सेवा रुजू केली आहे.

एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली:ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात तातडीने केले दाखल

मुंबई–
महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या एका दिवसावर आला असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर घशाच्या संसर्गावर उपचार होणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे 3 दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील दरेगाव या आपल्या मूळ गावी गेले होते. तिथे त्यांना 105 डिग्री ताप आला होता. त्यांना सलाईनही लावण्यात आली होती. मुंबईत परतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली. पण ताप उतरत नसल्यामुळे आता अखेर त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली होती. मात्र, या दोन्ही चाचण्या नेगेटिव्ह आल्या आहेत. मात्र, पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटी बायोटिक औषधे सुरु आहेत.

एकनाथ शिंदे यांची तब्बेत बरी नसल्याने ते कुठेही बाहेर पडत नाहीयेत. तर दुसरीकडे नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आता शिंदेंची शिवसेना सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, संजय शिरसाट यांनी भाजप नेत्यांसोबत आझाद मैदानावर पहाणी केली.

-वेद विद्येचे संरक्षण हे राष्ट्रीय कर्तव्यज्येष्ठ वेद अभ्यासक डाॅ. गणेश थिटे

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ तर्फे वेद पुरस्कार प्रदान
 पुणे: आज वेदाभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे; परंतु माध्यंंदिन शाखेतील शतपथ ब्राह्मण आणि कात्यायन श्रौतसूत्र यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे . हे दोन्ही ग्रंथ कंठस्थ करण्याची खंंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू व्हायला हवी. पूर्वी वेदांचा अभ्यास आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आर्थिक अडचणी होत्या,  परंतु  आजच्या काळात वेद अभ्यासासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. वेद विद्येचे संरक्षण हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे मत ज्येष्ठ वेद अभ्यासक डाॅ. गणेश थिटे यांनी व्यक्त केले.

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ यांच्या वेदविद्या संवर्धन उपक्रमाअंतर्गत सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे मंंळा तर्फे वैदिकांना दिल्या जाणार्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे आणि वेदविद्या संवर्धन समितीचे अध्यक्ष  डॉ. रवींद्र मुळे, संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, कोषाध्यक्ष दिलीप संभूस ,आहिताग्नी सुधाकरपंत कुलकर्णी उपस्थित होते.

वेदाचार्य देवेंद्र रामचंद्र गढीकर यांचा योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वेदमूर्ती भगवान त्र्यंबकराव जोशी यांना आदर्श वेद-अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि २५ हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.

कार्यक्रमात नारायण ज्ञानोबा बराटे यांना ज्ञानेश्वरी प्रदान करण्यात आली तर डॉ. ज्योत्स्ना संजय कुलकर्णी यांना कै. श्रीमती रत्नमाला जोशी यांच्या स्मरणार्थ सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. समर्थ काकडे, अद्वैत काकडे, अथर्व दुषी, विराज जोशी यांना वैदिक छात्र पुरस्कार  प्रदान करण्यात आले.

डाॅ. गणेश थिटे म्हणाले,  काही वर्षांपूर्वी वेदांचा अभ्यास करण्यासाठी छात्र संख्या खूपच कमी असे . मात्र या वर्षी  वेदांच्या परीक्षेसाठी ८०० ते ९००  बसले होते . यावरून वेदाभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे असे दिसते. भारतीयांनी वेदांचे जतन करणे आवश्यक असल्याचेही  त्यांनी सांगितले.

डॉ. रवींद्र मुळे म्हणाले, वेदांचे सामर्थ्य मोठे आहे. ज्ञान आणि भक्तीची जीवनात आवश्यकता आहे. ज्ञानाचा निधी असणारे वेद हे भारतीय संस्कृतीचे आधारभूत ग्रंथ आहेत. वेद कंठस्थ करताना परिश्रम घ्यावे लागतात. एकही शब्द मागेपुढे झाला तरी संपूर्ण अभ्यासाला ग्लानी येते . त्यामुळे वेद विद्येचा अभ्यास करणारे आणि वेद कंठस्थ करणाऱ्यांचा सन्मान व्हायला हवा.

अनघा भावे यांनी सूत्रसंचालन केले. विश्राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत जोशी यांनी आभार मानले.

ईव्हीएममध्ये प्रोग्रामिंग शक्य:माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पुणे : ईव्हीएममध्ये प्रोग्रामिंग शक्य आहे. जगातील प्रगत देशांमध्ये ईव्हीएमवर निवडणुका होत नाहीत. भारतात हट्टाने ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जात आहेत. भारतातील लोकशाही टिकावी, ही जगातील लोकशाही प्रेमी नागरिकांची इच्छा आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत आणि निकालाबाबत सामान्य नागरिकांच्या मनात संशयाचे वातावरण आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारने जनतेमधील संशय दूर केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केले.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा,  श्रीमती सोनीया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार रवींद्र घंगेकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे , माजी नगरसेविका लता राजगुरू, अविनाश बागवे, दत्ता बहिरट , सौरभ अमराळे, सदानंद शेट्टी, कैलास कदम आणि सप्ताहाचे आयोजक व माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यावेळी उपस्थित होते. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या

 पदमजी हॉल येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गर्दीत हा कार्यक्रम पार पडला.

पद असो नसो पण वीस वर्षे हा उपक्रम होत आहे. देशात असा कार्यक्रम होत नाही. याबद्दल मोहन जोशी यांचे अभिनंदन केले पाहिजे, असे उद्गार चव्हाण यांनी काढले. ते म्हणाले, देशातील लोकशाही आणि राज्य घटनेवा गंभीर धोका निर्माण झाला आहे. देशात लोकशाही आहे का , हा मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे. लोकशाही देशात चढ उतार येतात. परंतु, सध्याचा निकाल आश्चर्यकारक आहे. लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली हे सिद्ध करण्याची जबाबदारी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारची आहे. लोकशाहीचा खून झाला तर राज्य घटनेला अर्थ उरणार नाही. सामान्य लोकांचा विश्वास बसेल यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील.

सोनिया गांधींबद्दल ते म्हणाले, सोनियाजींनी पंतप्रधानपदाचा त्याग केला या क्षणाचा मी साक्षीदार आहे. १९९१ ला सोनिया गांधी यांनी केवळ इच्छा व्यक्त केली असती तरी त्या पंतप्रधान झाल्या असत्या. २००४ चा विजय सोनिया गांधींचा होता. त्यांच्या जाहीरनाम्यावर लोकांनी मते दिली. तरीही त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले नाही. माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा , मनरेगा हे कायदे आणि योजना ही सोनिया गांधी यांची दूरदृष्टी आहे. राष्ट्रीय  सल्लागार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम केले आहे.

पवार म्हणाले, सत्तेत बसलेले लोक भारतीय संस्कृतीचे  ठेकेदार नाहीत. सोनिया गांधींनी भारतीय संस्कृती जपली आहे. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर त्या देश सोडून गेल्या नाहीत. त्यांनी भारताची सेवा केली. आज महात्‍मा गांधी, पं. नेहरू , इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव सुरू आहे. त्याविरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे.

जोशी म्हणाले,  सोनियाजी गांधी यांनी पंतप्रधान पदाचा त्याग केला याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २००४ सालपासून सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह काँग्रेसच्या वतीने साजरा करत असून यंदाचे २० वे वर्ष आहे. देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. एकतर्फी निकालामुळे अस्वस्थता असली तरी काँग्रेसचा कार्यकर्ता जिवंत आहे. पुढील निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी तो तयार आहे. प्रथमेश आबनावे यांनी सूत्रसंचालन केले. आभारप्रदर्शन दत्ता बहिरट यांनी केले.

झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र

जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अपूर्वा शाळीग्राम या चित्रपटाच्या डीओपी आहेत. कपाळी चंद्रकोर लावलेली रिंकू या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे.

‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरू आणि झी स्टुडिओज यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. आता या जोडीने पुन्हा एकदा ‘जिजाई’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा निर्धार केला असून हा नवीन चित्रपट लवकरच प्रकारांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर म्हणतात, ‘’झी स्टुडिओजने नेहमीप्रमाणे नवोदितकलाकारांना आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ असते. झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी कायमच दर्जेदार आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर केले आहेत. ‘जिजाई’ हा त्याच परंपरेचा भाग आहे.’’