Home Blog Page 551

विरोधी पक्षाच्या आमदारांचा आज शपथ न घेण्याचा निर्णय; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आमदार म्हणून शपथ

मुंबई-महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी आजच्या दिवशी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज आमदारकीची शपथ घेतली नाही . EVM च्या मुद्द्यावर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमदार म्हणून शपथ घेतली आणि सत्ताधारी अन्य आमदारांचाही शपथविधी पार पडतो आहे .

EVM मुद्द्यावर विरोधी आमदारांनी शपथ न घेता सभात्याग केला ;आज ईव्हीएमचा मुद्दा मांडणार आणि नंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवून शपथ घेण्याबाबतचा निर्णय घेतील .प्रथम नाना पटोलेंनी शपथ घेतली नाही त्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांचा सभात्याग केला .महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले. नवीन सरकारच्या स्थापनेनंतर भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी महाराष्ट्र विधानसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून कालच शपथ घेतली. नऊ वेळा आमदार राहिलेल्या कोळंबकर यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राजभवनात शपथ दिली. आता कोळंबकर हे सर्व आमदारांना विधानभवनात शपथ देत आहेत.

तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे,अजित पवार यांनी आपल्या काही समर्थकांच्या सह विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. राज्यात नव्याने स्थापन झालेले महायुतीचे सरकार शिवछत्रपतींच्या विचारांना अभिप्रेत असलेला कारभार करेल असा दृढसंकल्प यावेळी केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाचा जयजयकार करत विजयाचा जल्लोष केला.

प्रत्येक शहरात हिंदुत्ववादी महापौर बसवू – आमदार राणे

मुंबई- माझ्या मतदारसंघातील जनपतेच्या प्रेमातून मी तिसऱ्यांदा निवडून आलो आहे. माझ्या मतदारसंघातील हिंदू समाजाने मला मोठ्या प्रमाणावर मतदान केले. मला एकही मुस्लिम मतदान नाही, असे भाजप आमदार नीतेश राणे यांनी म्हटले आहे.दरम्यान नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, आमच्यासारखे शिवरायाचे मावळे हे 24 तास 365 दिवस लोकांसाठी उपलब्ध असतात. टीका करणारे कावळे हे केवळ निवडणुकीपूरते असतात असा टोला त्यांनी लगावला आहे.नीतेश राणे म्हणाले की, हिंदुत्व आणि विकास या दोन मुद्यांवर मी निवडणूक लढवली आहे. मला पडलेल्या 58 हजार मतदारांपैकी एकही मतदान मुसलमान नाही. हे मी हक्काने सांगू शकतो. माझा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी विचाराचा मतदारसंघ आहे. पुढील 3 वर्षे सत्ताधारी आमदार म्हणून मी विकासाची प्रक्रिया सुरू ठेवणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येत मनसेबाबत निर्णय घेतील:- उदय सामंत

मुंबई-मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने मनसेबाबत महायुतीमधील निर्णय तिन्ही पक्ष एकत्र बसून घेतील. याबाबत शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे फडणवीसांशी बोलतील, आणि त्यानंतर निर्णय होईल, असे वक्तव्य शिवसेना नेते उदय सामंत यांनी केले आहे.दरम्यान गेली अनेक वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सरकार सकारात्मक आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला बरोबर घेऊ शकतात असे दिसते आहे.

उदय सामंत म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती मविआ नेत्यांना राहील. ते देखील सहकार्य करतील. मविआ देखील परंपरा जपण्यास सहकार्य करतील. आम्ही दोघे भाऊ निवडून आलो याचा आनंद आहे. शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून आम्ही काम करु आणि कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी प्रयत्न करु.

उदय सामंत म्हणाले की, महायुतीमध्ये कोणत्याही खात्यावरुन ओढाताण सुरु नाही. एकनाथ शिंदे निर्णय घेतील. आम्ही गृह खाते मागितले, इतर खाती मागितली आहेत, त्याबाबत चर्चा अमित शहा यांच्यासोबत होईल, एकनाथ शिंदे चर्चा करतील. जे काही होईल ते समन्वयाने होईल.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महापालिका निवडणुका कधी होणार, याबाबत उत्सुकता आहे. या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीचे संकेत दिले आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आमचे विचार जुळतात. त्यांना आमच्यासोबत ठेवण्यात आम्हाला रस आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे, तेथे तेथे त्यांच्याशी युती करू.

पुण्यात 11 डिसेंबर रोजी पादचारी दिन:मुख्य बाजारपेठ असलेला लक्ष्मी रस्ता वाहतुकीस राहणार बंद

पुणे-११ डिसेंबर रोजी पादचारी दिनानिमित्त शहरातील मध्यवर्ती भागातील मुख्य बाजारपेठ लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असल्याचे पुणे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. लिंबराज महाराज चौक (नगरकर तालीम चौक) ते गरुड गणपती चौक दरम्यान सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

दरवर्षी प्रमाणे पुणे महापालिकेकडून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, यादिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ११ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती चैाक दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे असे आवाहन करण्यात आले आहे.पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे – लक्ष्मी रस्त्याने नगरकर तालीम चौकातून टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी नगरकर तालीम चौकातून डावीकडे वळून बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. कुमठेकर रस्त्याने लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी शनिपार चौक (चितळे कॉर्नर ) येथून वळून बाजीराव रस्तामार्गे अप्पा बळवंत चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. नारायण पेठेतील लोखंडे तालीम चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी केळकर रस्ता, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

लोक सांगतात की,ईव्हीएम गुजरातमधून आले होते,ईव्हीएम सेट होते हे आधीच माहीत असल्याचाही दावा

राष्ट्रपतींना ईव्हीएमविरुद्ध पाठवली १० हजार पत्रे–निवडणुका मतदान यंत्राद्वारे घेण्याऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने ठाण्यात आंदोलन केले. ईव्हीएम हटाओ… लोकशाही बचाओ असा नारा देत दहा हजार पोस्ट कार्ड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविली. मुख्य रस्त्यावर टेबल, खुर्ची आणि पोस्ट कार्ड ठेवण्यात आली होती. त्याला प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला.

मुंबई-लाडक्या बहिणी, पैसे वाटप आणि धार्मिक ध्रुवीकरणामुळे मविआचा विधानसभेत पराभव झाला, असा दावा शरद पवारांनी केला आहे. लोकांनी मला सांगितले की, ईव्हीएम गुजरातमधून आले होते, असेही ते म्हणाले. ईव्हीएम सेट होते हे आधीच मला माहिती होते, असा दावा त्यांनी यापूर्वीच केला आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला १० जागा मिळाल्या. शरद पवारांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच एवढे मोठे अपयश मिळाले. या विषयी ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेमुळे मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदान केलं. आमच्या विरोधकांनी असा प्रचार केला की जर सत्ता बदल झाला तर आम्ही लोक ही योजना बंद करू. त्यामुळे महिलांना चिंता वाटू लागली. त्यामुळे त्यांनी आमच्या विरोधात मतदान केल्याचं वाटत आहे. याशिवाय राज्यात धार्मिक ध्रुवीकरण केलं गेलं. जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणं लावली गेली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येथे प्रचाराला आले होते. त्यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला. त्यामुळे वेगळं वातावरण राज्यात निर्माण झालं. त्यानंतर एक है तो सेफ है चा नारा दिला. त्यामुळे ही निवडणूक वेगळ्या वळणावर गेली. त्याचा परिणामही मतदारांवर झालेला दिसला. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढे पैशांचे वाटप या झाले. आमच्या कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून ही बाब समोर येत आहे, असेही पवार म्हणाले.

अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती आयकरच्या ताब्यातून पुन्हा अजितदादांना परत

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्ली लवादाने मोठा दिलासा दिला आहे. गुरूवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयकर आयकर विभागाने अजित पवार यांची जप्त केलेली मालमत्ता दिल्लीतील लवादाने ही मालमत्ता परत केली आहे.आयकर विभागाने ऑक्टोबर २०२१ मध्ये छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेली सुमारे १,००० कोटींची संपत्ती जप्त केली होती. अजित पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्या मालमत्तांसह नातेवाइकांशी संबंधित मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्ता जप्त केल्या होत्या. शपथविधीपूर्वी एक दिवस आधी अजित पवार दिल्लीला गेले होते.त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेल्याचे वृत्त पसरले होते परंतु आपण खासगी कामासाठी गेल्याचा खुलासा अजित पवारांनी शपथविधीनंतर केला होता.संबंधित कारवाई 7 ऑक्टोबर 2021 रोजी झाली होती. आयकर विभागाने अजित पवारांच्या विविध मालमत्तेवर छापे टाकले होते. या कारवाईत अजित पवार यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. या कारवाई विरोधात पवार कुटुंबियांनी कोर्टात धाव घेतली होती. अजित पवार कुटुंबियांवरील आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे सांगत ट्रिब्यूनल कोर्टाने अजित पवारांना क्लिन चीट दिली आहे.

अजित पवारांच्या स्पार्कलिंग सॉईल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अॅग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. या कारवाईत महाराष्ट्र आणि मुंबईतील अजित पवार यांच्याशी संबंधित लोकांच्या निवासस्थानांची आणि कार्यालयांची झडती घेतली होती, ज्यामध्ये त्यांचे नातेवाईक, बहिणी आणि जवळचे सहकारी यांचा सहभाग होता.

सातारा येथील जरंडेश्वर साखर कारखाना, मुंबईतील अधिकृत संकुल, दिल्लीतील एक सदनिका, गोव्यातील एक रिसॉर्ट आणि महाराष्ट्रात विविध 27 ठिकाणची जमीनयांचा समावेश आहे. त्याच वर्षी, आयकर विभागाने मुंबईतील दोन रिअल इस्टेट व्यवसायिक कंपन्या आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांशी कथित संबंध असलेल्या काही संस्थांवर छापे टाकल्यानंतर 184 कोटी रुपयांच्या बेहिशोबी उत्पन्न मिळाले होते.

संबंधित कारवाई स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका वारंवार करण्यात आल्या होत्या. यानंतर स्थगितीची ऑर्डर काढण्यात आली होती. पण जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली नव्हती. त्यानंतर आता ट्रिब्यूनल कोर्टाने जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘नथुराम गोडसे को मरना होगा’ नेहरू मेमोरियल सभागृहात रंगणार

‘’ हिंदी नाटकाचे विशेष प्रयोग

मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक आता हिंदी रंगभूंमीवर नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं आहे. यासाठी निर्माते परितोष पेंटर, सेजल दिपक पेंटर, लेखक दिग्दर्शक भरत दाभोळकर यांनी पुढाकार घेतला आहे. परितोष पेंटर प्रस्तुत आणि भरत दाभोळकर लिखित दिग्दर्शित ‘नथुराम गोडसे को मरना होगा’ या हिंदी नाटकाचे दोन विशेष प्रयोग रविवार १५ डिसेंबरला दुपारी २.३० वा. आणि सायं.५.३० वा. पुण्याच्या नेहरू मेमोरियल सभागृहात रंगणार आहे.

प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या मूळ नाटकावर या हिंदी नाटकाचे रूपांतर करण्यात आले आहे. यातील नथुराम गोडसे यांची भूमिका अभिनेता विकास पाटील तर महात्मा गांधी यांची भूमिका अनंत महादेवन यांनी साकारली आहे. या दोघांसोबत भरत दाभोळकर, मोहन आझाद, कौस्तुभ सावरकर, संदीप जंगम, मंगेश देसाई आणि डॉ. दीपा भाजेकर यांनी या नाटकात भूमिका केल्या आहेत. आयडियाज एंटरटेनमेंटच्या ‘नथुराम गोडसे को मरना होगा’ या हिंदी नाटकाच्या निर्मितीची धुरा सेजल दिपक पेंटर यांनी सांभाळली आहे.

‘जे अमराठी प्रेक्षक आहेत त्यांनाही महात्मा गांधींच्या मृत्यूमागचं कारण, नथुराम गोडसे व्यक्ती म्हणून नक्की कशी होती? हे या नाटकामुळे जाणून घेता येईल. ‘गांधीजींना मानणारा ते त्यांचा मारेकरी’ असा नथुराम गोडसे यांचा प्रवास या नाटकाच्या निमित्ताने उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्रस्तुतकर्ते परितोष पेंटर आणि लेखक, दिग्दर्शक भरत दाभोळकर सांगतात.

सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटकडील ४७ कोटीच्या थकबाकी वसुलीसाठी PMC ने केली जप्तीची कारवाई:-५ दिवसात १४ कोटीची वसुली अन एकूण २६ मिळकती जप्त

महापालिकेच्या मिळकत कर विभागाने पाच दिवसात केली १४ कोटी १४ लाख २६ हजार २१२ रुपयांची वसुली .

आणि २६ मिळकती केल्या जप्त

पुणे- सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मिळकत कराच्या ४७ कोटीच्या थकबाकी वसुलीसाठी PMC ने जप्तीची कारवाई केली असल्याची माहिती मिळकत कर प्रमुख माधव जगताप यांनी येथे दिली .सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या एरंडवणे येथील मिळकतीवर थकबाकी रक्कम रु. ४७,४३,१८,३०३/- (सत्तेचाळीस कोटी त्रेचाळीस लाख अठरा हजार तीनशे तीन रुपये फक्त) एवढी असल्याने मिळकतीवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

माधव जगताप यांनी असेही सांगितले कि,’ कर आकारणी व कर संकलन खात्याने सन २०२४-२५ चे उद्दिष्ट पूर्ततेच्या अनुषंगाने थकबाकी वसुली मध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्य केंद्रित केलेले आहे. त्या अनुषंगाने दिनांक २/१२/२०२४ पासून मिळकत कर वसुलीसाठी बँड पथकाचा समावेश असलेले म्वतंत्र वसुली पथके तयार करण्यात आलेली आहेत.
या पथकामार्फत १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील थकबाकी असलेल्या मिळकतीवर थकबाकी वसुलीची कारवाई हाती घेण्यात आलेली आहे. त्यानुसार दिनांक २/१२/२०२४ ते ६/१२/२०२४ या पाच दिवसांच्या काळामध्ये बँड पथकाद्वारे व मध्यवर्ती पथकाद्वारे १६५ इतक्या मिळकतींना भेट देण्यात येवून, रक्कम रु. १४,१४,२६,२१२/- (चौदा कोटी चौदा लाख सव्हीस हजार दोनशे बारा रुपये फक्त) इतक्या रकमेचा कर वसुल करण्यात आलेला आहे. तसेच सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट यांची कोंढवा बु., आंबेगाव बु., एरंडवणे येथे मिळकत असून एरंडवणे येथील मिळकतीवर थकबाकी रक्कम रु. ४७,४३,१८,३०३/- (सत्तेचाळीस कोटी त्रेचाळीस लाख अठरा हजार तीनशे तीन रुपये फक्त) एवढी असल्याने मिळकतीवर जप्तीची कारवाई करण्यात आली. आणि आज दि.०६/१२/२०२४ पर्यंत एकूण २६ इतक्या मिळकती जप्त करण्यात आलेल्या आहेत.
पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुमारे १४ लाख ८० हजार मिळकती असून, त्यापैकी सुमारे ८,७४,५४६ मिळकत धारकांनी त्यांचा मिळकत कर रक्कम रु. १८०४ कोटी इतका जमा केलेला आहे. उर्वरित मिळकत कर थकबाकी धारकांकडे या पुढील कालावधी मध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुली करण्यासाठी वरील पथकांमार्फत मिळकत कर वसुलीचे काम करण्यात येत आहे. तरी ज्या मिळकत धारकांनी अद्यापही कराचा भरणा केलेला नाही, त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.

‘स्टार्स फोरम’च्या  राष्ट्रीय परिषदेचे  उदघाटन: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचा सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वाने करावयाचा वापर ‘ विषयावर चर्चा  

पुणे:

स्टार्स  (स्किल्स ट्रेनिंग फॉर एडव्हान्समेंट इन रुरल सोसायटीज) या फोरम तर्फे  आयोजित  ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचा सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वाने करावयाचा वापर’  या विषयावरील  पंधराव्या   राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन ६ डिसेंबर  रोजी  सकाळी झाले.’एमकेसीएल’ संस्थेचे चीफ मेंटॉर डॉ.विवेक सावंत,स्टार्स फोरम चे संस्थापक सदस्य डॉ.सुधीर प्रभू,अध्यक्ष अशोक कलबाग,बाएफ संस्थेचे  अध्यक्ष डॉ भारत काकडे, विश्वस्त चैतन्य नाडकर्णी ,डॉ.क्षमा म्हेत्रे हे उदघाटन सत्रात उपस्थित होते.
   ‘बाएफ ‘ हि संस्था या परिषदेची सहप्रायोजक आहे .बाएफ ( वारजे, पुणे)  येथे दि.६-७ डिसेंबर २०२४ रोजी होत असलेल्या  या परिषदेला देशविदेशातून सामाजिक,उपजीविका,शिक्षण ,रोजगार ,ग्रामविकास  क्षेत्रातील अनेक संस्थांचे  प्रतिनिधी उपस्थित आहेत.स्टार्स फोरम चे संचालक चैतन्य नाडकर्णी व व्यवस्थापक भक्ती तळवेलकर  यांनी स्वागत केले.कृत्रिम बुद्धिमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजन्स- AI ) विषयक माहिती,प्रत्यक्ष अनुभव,यशकथा,भवितव्य ,सामाजिक क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोजन अशा अनेक मुद्द्यांवर परिषदेत चर्चा होत  आहे.वैयक्तिक,व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले जात  आहे.
६ डिसेंबर रोजी सकाळी ९. ३० वाजता परिषदेचे उद्घाटन झाले. दुपारी आय आय टी ,मुंबई चे प्राध्यापक गणेश रामकृष्णन,माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ राहुल कुलकर्णी,रवी बोटवे  यांनी मार्गदर्शन केले. ७ डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशीच्या सत्रात दीपा चौधरी,डेव्हिड मेनेंजेस,डॉ.योगेश हरिभाऊ कुलकर्णी हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 

 सामाजिक संस्थांसाठी कौशल्य विकासपर प्रशिक्षण
मागील १५ वर्षात स्टार्स फोरमने अनेक राष्ट्रीय परिषदा, औद्योगिक कौशल्य विकासपर प्रशिक्षण कार्यक्रम आयॊजित केले आहेत. सर्व समाजेवी संस्थांना एकाच व्यासपीठावर आणणे  व विविध कौशल्यांची देवाण घेवाण करणे हा  या फोरमचा उद्देश आहे.  आजपर्यंत देशभरातून ३०० हुन अधिक संस्था स्टार्स फोरम शी संलग्न होऊन या प्रयत्नात सहभागी झाल्या आहेत.   
ग्राम विकास व  उपजीविका या क्षेत्रात काम करणा-या संस्थानी, एकत्र प्रयत्न करुन ग्रामीण रोजगार निर्मितीकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच या विषयातील विचार व कल्पना यांची  देवाण- घेवाण  करण्यासाठी  STARS Forum (Skills Training for Advancement in Rural Societies)- स्टार्स फोरम हि संस्था २०१० सालापासून कार्यरत आहे. ग्रामीण व निमशहरी  लोकांमध्ये असलेल्या कौशल्याचा योग्य वापर करून त्यांच्याकरता  उपजीविका निर्माण करणा-या विविध स्वयंसेवी संस्थांना एकत्र आणणे व त्या करता विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे हे  या संस्थेचे  उद्दिष्ट आहे. याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी स्टार्स फोरम आपली पंधरावी  वार्षिक राष्ट्रीय परिषद पुणे येथील  ‘बाएफ’ संस्थेमध्ये ६ व ७ डिसेम्बर रोजी आयोजित करत आहे.

बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसवा!

बाणेर-बालेवाडी भागात चौक्या वाढविण्यासाठी सर्वतोपरी मदत करु!- आमदार चंद्रकांतदादा पाटील

पुणे-बाणेर- बालेवाडी पाषाण सूस भागामध्ये बेदरकारपणे गाडी चालवत दहशत निर्माण करणाऱ्यांना कठोर शासन करुन जरब बसववी, असे निर्देश आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना दिले. तसेच,नव्याने निर्माण झालेल्या बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत चौक्यांचे आणि गस्त वाढवावी, अशा सूचना ही त्यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

बाणेर मध्ये गुरुवारी ग्लॉस्टर गाडी चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत; पाच वाहनांना जोरदार धडक दिली. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आज कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी बाणेर पोलीस स्टेशनला भेट देऊन; सर्व घटनेचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त हिमंत जाधव, खडकी विभागाच्या पोलीस सहायक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने, बाणेर शाखेच्या वाहतूक निरीक्षक श्रीमती सरोदे, बाणेर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर, अनिल केकाण, भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, लहू बालवडकर, सचिन दळवी, यांच्या सह सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनेची सविस्तर माहिती आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना दिली. तसेच, पुढील कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्यावर आ. पाटील यांनी पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई करुन; दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना दिल्या. तसेच, भागाच्या सुरक्षेसाठी बेदरकारपणे गाडी चालवत दहशत निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर शासन करावी असेही निर्देश दिले.

तसेच, पुणे शहरातील टेकड्या व अन्य ब्लॅक स्पॉट सुरक्षित केले जावे यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत. शहरातील 13 पेक्षा अधिक टेकड्या आणि 7 पेक्षा अधिक ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून, संबंधित ठिकाणे सीसीटीव्ही आणि लाईट्स च्या माध्यमातून सुरक्षित केली जाणार आहे. याची कडक अंमलबजावणी करुन टेकड्या सुरक्षित करण्याचे निर्देश दिले.

शहराचा वाढता विस्तार आणि कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने पुणे पोलिस आयुक्तालयात सात नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी सुमारे ६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये बाणेर पोलीस स्टेशनचा ही समावेश असून; ८ कोटी ६० लाखाची तरतूद करण्यात आली आहे. भविष्यातही मनुष्यबळ आणि पोलीस चौक्या वाढविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी दिली.

ईव्हीएम विरोधातील लढाईची दिशा मारकडवाडीने देशाला दिली: अतुल लोंढे

मारकडवाडीतून सुरु झालेली लोकशाही वाचवण्याची लढाई देशभर जाईल, बॅलेटपेपरवर मतदान होईपर्यंत आंदोलन सुरुच राहिल..

मुंबई, दि. ६ डिसेंबर
लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवत देशात अराजक पद्धतीने राजकारण सुरु आहे त्याला विरोध करण्याचा मार्ग मारकडवाडीने देशाला दाखवून दिला आहे. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मारकडवाडीने सुरु केलेल्या आंदोलनाची देशाने दखल घेतली असून आता हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर जाईल व जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळ्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीने बॅलेटपेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन सुरु केले, त्या गावाला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार रामहरी रुपनवर, प्रा. यशवंत भिंगे, सुर्यवंशी, पवार आदींचा समावेश होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकरही उपस्थित होते. माकरडवाडीच्या ग्रामस्थांची भेट घेल्यानंतर अतुल लोंढे म्हणाले की, मारकडवाडीची माती ही फक्त माती नाही तर भारतमाता असून गावकऱ्यांनी भारतमातेची सेवा केली आहे. महात्मा गांधींच्या चंपारण्य आंदोलनापेक्षा मारकडवाडीच्या आंदोलनाचे महत्व जराही कमी नाही. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी मारकडवाडीने खरा मार्ग दाखवला आहे. ईव्हीएम व सर्व सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून मते चोरून लोकशाही संपवण्याचा प्रकार सुरु आहे त्याविरोधात मारकडवाडीने आंदोलन छेडले आहे. आता बॅलेटपेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असेही अतुल लोंढे यांनी आश्वस्त केले.

महापालिकेची सर्व कामे पेपरलेस होणार – शहर अभियंता प्रशांत वाघमारे 

पुणे- विकास कामांमध्ये अधिकाअधिक पारदर्शकता आणून गतीने कामे मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने इंटेलिजन्ट वर्क्स मॅनेजमेन्ट सिस्टिम (आय.डब्ल्यू.एम.एस) सुरू केली असून तिचा वापरही सुरू केला आहे. यामुळे एकाच ठिकाणी विविध विभागांची कामे करताना कामांचे नियोजन करणे, कामाचे डुप्लिकेशन रोखणे यासह डिफेक्ट लायबलिटी पिरियडमध्ये ठेकेदाराकडूनच दुरूस्ती करून घेणे यासारखी कामे एका क्लिकवर समजणार आहेत. त्याचवेळी अगदी कामाच्या एस्टीमेटपासून ते कामाचे बिल अदा करण्यापर्यंतची सर्व कामे पेपरलेस होणार आहे. पुढील महिन्याभरात नागरिकांना त्यांच्या परिसरात सुरू असलेल्या कामांची माहिती ऑनलाईन पाहाता येईल यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणाली तयार करण्यात येईल, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे (Prashant Waghmare) यांनी दिली.महापालिकेकडून शहरात दरवर्षी हजारो कोटींची विकासकामे केली जातात. मात्र, या सर्व कामांची प्रक्रिया कागदोपत्री होते. अनेकदा त्यात चुकाही होतात. ही कामे पारदर्शक होत असल्याचे पडताळण्यासाठी कोणतीही महापालिकेकडे नव्हती. त्यावर प्रशासनाने आता इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात “आयडब्ल्यूएमएस’ प्रणाली विकसित केली आहे.

निविदा प्रक्रियेपासून ते काम पूर्ण होईपर्यंत सर्व टप्प्यांवर आॅनलाइन नोंदणी आणि कामाच्या प्रगती, कामाची माहिती फोटोसह उपलब्ध असेल. मागील तीन वर्षांपासून वेगवेगळ्या विभागांत टप्प्याटप्प्याने ही प्रणाली वापरली जात आहे. त्यामुळे पालिकेच्या कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता वाढल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. या प्रणालीचे सादरीकरण या वेळी करण्यात आले.

निविदांपासून ते थेट बिल तयार होईपर्यंतची सर्व प्रक्रिया या प्रणालीवर केली जाते. त्यासाठी प्रत्येक टप्प्यावरील अधिकाऱ्यांना “ई- सिग्नेचर’ देण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ कामाची माहिती, बजेट कोड आणि मान्यतेची रक्कम संगणक प्रणालीमध्ये भरल्यानंतर कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय निविदा तयार होतात. त्यानंतर त्या स्थायी समिती व मुख्यसभेत मान्यतेसाठी पाठवून नंतर कार्यादेश दिले जातात.

तर, काम पूर्ण झाल्यानंतर त्यासाठीची आवश्यक माहिती भरल्यानंतर कामाची पडताळणी करून बिल तयार होते. त्यामुळे कामाची सर्व माहिती विभाग प्रमुखांना एका क्लिकवर मिळते. या माहितीचा एकत्रित डॅशबोर्ड असून त्याद्वारे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनाही शहरात कोणत्या विभागाची, नेमकी किती, कुठे आणि किती रकमेची कामे सुरू आहेत. किती कामे पूर्ण झालीत, किती कामांची बिले देण्यात आली आहेत अशी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन:, सलग 7 वेळा राहिले आमदार…

वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास-काँग्रेसपासून, राष्ट्रवादी, भाजप असा राजकीय प्रवास
मुंबई-भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मधुकर पिचड 1980 ते 2009 अकोले मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्षनेते भूषविले होते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले. मधुकर पिचड यांनी 1961मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची तर 1993 मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली.

पिचड यांचा जन्म 1 जून 1941 रोजी राजूर येथे झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथून बीए एलएलबीचे शिक्षण घेतले. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1972 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1972 सालीच ते पंचायत समिती अध्यक्ष झाले. त्यांनी 1980 पर्यंत अध्यक्ष म्हणून काम केले.

मधुकर पिचड यांच्या राजकीय प्रवासाला काँग्रेसमधून सुरुवात झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना झाल्यानंतर ते शरद पवार यांच्यासोबत होते. मधुकर पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास, पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली होती.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले. मधुकर पिचड यांनी 2019 ला आपल्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला.

सह्याद्रि हॉस्पिटल्सतर्फे मुख्यमंत्र्यांचे आभार

पुणे, ६ डिसेंबर २०२४: मंत्रिमंडळाच्या पहिल्याच निर्णयात आरोग्य सेवेला प्राधान्य दिल्याबद्दल सह्याद्रि हॉस्पिटल्स माननीय मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानत आहे. सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटी) उपचार घेत असलेल्या रुग्णाला आधार देण्याचा हा दयाळू आणि परिणामकारक निर्णय नागरिकांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांच्या अतूट बांधिलकीचा पुरावा देणार आहे.

सह्याद्रि नगररोड सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल असलेल्या चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे या रुग्णासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपये मंजूर केले आहेत.यावेळी सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्री. अब्रारअली दलाल यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “सह्याद्रि हॉस्पिटल्स आणि संपूर्ण आरोग्य सेवा समुदायाच्या वतीने, मी माननीय मुख्यमंत्र्यांचे, त्यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांच्या दूरदर्शी नेतृत्व आणि आरोग्य सेवेच्या समर्पणाबद्दल आभार मानू इच्छितो. बीएमटी उपचार घेत असलेल्या रुग्णाला वेळेवर आधार देणे हे केवळ रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबासाठी आशादायक ठरत नाही तर सुलभ आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवेचे महत्त्व देखील अधोरेखित करते.”

बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही रक्ताचा कर्करोग आणि अनुवांशिक विकारांसारख्या गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या अनेक रुग्णांसाठी एक जीवदान देणारी प्रक्रिया आहे. अशा गंभीर आरोग्यसेवेच्या गरजा पूर्ण करून मुख्यमंत्र्यांनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दलची सखोल जाण दाखवली आहे.

“गरजू रुग्णांना प्रगत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सरकारसोबत भागीदारी करण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्याकडे उपचारासाठी दाखल होणाऱ्या सर्व रुग्णांची सर्वोत्कृष्ट काळजी घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी धोरणकर्त्यांसोबत हातमिळवणी करून काम करण्यास आम्ही कायमच कटिबद्ध आहोत.” श्री. अब्रारअली दलाल पुढे म्हणाले. 

हा ऐतिहासिक निर्णय अनेकांसाठी आशेचा किरण आहे. आणि राज्यभरातील आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा आणि सेवांना बळकटी देण्याच्या उद्देशाने भविष्यातील उपक्रमांसाठी एक भक्कम आदर्श ठेवणारा आहे.

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणालीद्वारे वाहनावर नजर

पुणे, दि. ६: मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणाली अंतर्गत ५२ ठिकाणी दोन्ही बाजूने कृत्रीम बुद्धीमत्तेवर (एआय) आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रडारतंत्राचा वापर करुन वाहनांचा वेग मोजण्यात येत असून वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्यास अशा वाहनाना ई-चलान देण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मुंबई पुणे महामार्गावर घाट परिसरामध्ये हलके मोटार वाहन (कार) ह्यांची वेग मर्यादा ६० किमी प्रतितास असून उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा ४० किमी प्रतितास आहे. घाट परिसर वगळता इतर ठिकाणी हलके मोटार वाहन (कार) ह्यांची वेग मर्यादा १०० किमी प्रतितास असून उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा ८० किमी प्रतितास आहे.

प्रणाली अंतर्गत बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे सीटबेल्ट परिधान न करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, लेनची शिस्त न पाळणे आदी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांना ई-चलान देण्यात येत आहे. तरी सर्व वाहन धारकांनी वाहतूक करतांना सर्व नियमांचे पालन करावे व वेग मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याबाबत वाहनधारकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000