Home Blog Page 55

३ दिवसात पोलिसांनी पकडले २५० मद्यपी वाहनचालक

पुणे -शहरपोलीस उपायुक्त कार्यालय वाहतूक शाखेने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहिम हाती घेऊन ३ दिवसात अडीचशे मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांन पकडले आणि त्यांच्यावर कारवाई केली .

पुणे शहर वाहतूक विभागामार्फत दिनांक ७, ८ व ९ नोव्हेंबर २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष कारवाई मोहिम राबविण्यात आली.या कालावधीत वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, मार्ग व गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली. या विशेष मोहिमेत २५० वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे आढळून आले.संबंधित सर्व वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम १८५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, त्यावरील पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि,’मद्यपान केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे वाहन चालवू नये.स्वतःची तसेच इतर नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे.जबाबदार नागरिक म्हणून सुरक्षित वाहतूक संस्कृती जोपासावी.पुणे शहर वाहतूक विभागाकडून अशा विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत, जेणेकरून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि सर्वांसाठी सुरक्षित वाहतूक वातावरण निर्माण व्हावे.

‘वर्षा’ बंगल्यावर धडक…मरीन ड्राईव्हवर रास्ता रोको, गिरगाव चौपाटीवर आंदोलन-डॉ. संपदा मुंडेंना न्याय देण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेस आक्रमक.

मुंबई, दि. १० नोव्हेंबर २०२५

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी युवक काँग्रेसने मुंबईत आज तीव्र आंदोलन केले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर थेट धडक दिली. नरीमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह व वर्षा बंगला अशा तीन ठिकाणी युवक काँग्रेसने आंदोलन करून भाजपा महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व मुंबई युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदन भानू चिब, युवक काँग्रेसचे प्रभारी मनिष शर्मा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा, वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत, युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

गिरगाव चौपाटी येथून सुरु झालेले आंदोलन थेट वर्षा बंगल्यावर पोहचले. युवक काँग्रेसचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी सरकारने पोलिसांच्या मदतीने प्रयत्न केला. अनेक कार्यकर्त्यांना चर्नी रोड स्थानकात अडवून ठेवले. गिरगाव चौपाटी भागातही ठिकठिकाणी बॅरिकेटींग करून कार्यकर्त्यांची धरपकड केली. पण आक्रमक कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियमजवळ मरिन ड्रायव्हवरच रास्ता रोको केला, यामुळे जवळपास अर्धा तास वाहतुक ठप्प झाली होती. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले पण युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तन्वीर अहमद विद्रोही, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रविणकुमार बिराजदार आणि नागपूर ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिथिलेश कान्हेरे यांनी मात्र पोलिसांना गुंगारा देऊन वर्षा बंगल्यावर धडक मारली व जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले.

डॉ. संपदा मुंडे यांना भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व पोलीसांच्या अनन्वित छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असली तरी यामागचा मुख्य सुत्रधार भाजपाचा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर मात्र अद्याप मोकाटच आहे. मुख्यमंत्र्यांनी तर निंबाळकरांना कोणत्याही चौकशी आधीच क्लिन चिट देऊन टाकली आहे. काँग्रेस पक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुंडे कुटुंबियांना दिली आहे. सरकार चौकशीच्या नावाखाली मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण जोपर्यंत संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा हा लढा सुरुच राहील.

लिफ्टमध्ये अडकलेल्या जखमी महिलेला मदत न केल्याने पोलिसांनी मॉल प्रशासनाविरुद्ध केला गुन्हा दाखल

0

पुणे-गणेशखिंड रोडवरील एका मॉलमधील लिफ्टमध्ये अडकलेल्या जखमी महिलेला मदत न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सेंट्रो मॉलच्या प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शिवाजीनगर येथील एका ५५ वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सतप्रित आवस्थी, परवेंदर कुमार, पराग हार्डे, अभिजित कोल्हटकर या मॉलचे प्रशासकीय अधिकारी  व लिफ्टची देखभाल करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सेंट्रो मॉलमध्ये १२ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजेच्या दरम्यान घडला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथे राहणार्‍या महिला त्यांच्या दोन नातेवाईकांसह दिवाळीनिमित्त खरेदीसाठी गणेशखिंड रोडवरील सेंट्रो मॉलमध्ये गेल्या होत्या.  लिफ्टमधून जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली. महिला आणि नातेवाईक लिफ्टमध्ये अडकले. त्यांनी लिफ्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिलेबरोबर असलेल्या एका नातेवाईकाने लिफ्टच्या काचेवर हात मारला. काचेचा तुकडा उडल्याने महिलेच्या कपाळाला जखम झाली. महिला जखमी झाल्यानंतर लिफ्टची देखभाल करणारे कर्मचारी आणि मॉलच्या प्रशासन विभागातील अधिकारी, कर्मचारी तेथे आले नाही, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.निष्काळजीपणा, तसेच हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

शाहू वसाहती’चाआता स्वयंपुनर्विकास होणार !उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून’ एसआरए’ला स्थगिती, नागरिकांना दिलासा

पुणे-
ज्यावेळी नागरीक एकत्र येतात आणि लढा देतात, त्यावेळी यश कसे मिळते याचा प्रत्यय पर्वतीमधील शाहू वसाहतीच्या झोपडपट्टी पुनर्वसनाला थेट उपमुख्यमंत्री व गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिल्याने आला आहे. आता ‘शाहू वसाहती’ची एसआरए रद्द आणि स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया अखिल शाहू वसाहती मार्फत देण्यात आली.

याबाबत अधिक माहिती देताना अखिल शाहू वसाहत बचाव कृती समितीचे कार्तिक ढमढेरे म्हणाले की, पर्वती येथील स. नं. ९२ पैकी फायनल प्लॉट नं. पै. व स. नं. ९३ पैकी फायनल प्लॉट न. ५११ पैकी ५११ अ . पै. ५११ ब पै.येथे गेल्या पन्नास वर्षांहून अधिक नागरिक वास्तव्यास असून येथील घरे ही पक्की स्वरूपाची असून दुमजली आहेत. मात्र एका बिल्डर्ससाठी एसआरए स्कीम राबविण्यासाठी झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररीत्या झोपडपट्टी पुनर्वसन योज़ना राबविण्याचा घाट घातला. त्यासाठी बिल्डर्सचे लोक आणि संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने आम्हा रहिवाशांना धमकाविण्याचे प्रकार वारंवार झाले. आमचा येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला विरोध आहे,आणि आम्ही तसे स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेले असताना अधिकारीवर्ग संबंधित बिल्डर्सचा स्वार्थ आणि टीडीआरमधील भ्रष्टाचारासाठी दहशतीचे वातावरण निर्माण करून आम्हाला येथील एसआरए योजनेत सामील होण्यासाठी भाग पाडण्याचे कारस्थान करीत होते. इतकेच नाहीतर संबंधित बिल्डर्स / विकसक आणि अधिकाऱ्यांनी येथील रहिवाशांचा एसआरए योजनेत समावेशाबाबत खोट्या सह्या दाखविल्या. त्यामुळे अखिल शाहू वसाहतीचे सर्व नागरिकांनी एसआरएला तीव्र विरोध दर्शवत लढा उभारला. सामाजिक कार्यकर्ते हेमंत बागुल यांनी पाठिंबा देत शासनदरबारी दाद मागण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन केले. त्यानुसार उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नागरिकांच्या व्यथा मांडताना दाद मागितली.त्यावर तत्परने सर्व बाबी तपासून शाहू वसाहतीमधील नागरिकांवर अन्याय होणार नसल्याची ग्वाही देत उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ एसआरए’ला स्थगिती दिल्याचे आदेश काढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता आम्हीच ‘शाहू वसाहती’चा स्वयंपुनर्विकास करणार असल्याचे अखिल शाहू वसाहत बचाव समितीने स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून विभागनिहाय प्रभा-यांची नियुक्ती

ज्येष्ठ नेत्यांवर विभागीय प्रभारी म्हणून जबाबदारी

मुंबई दि. १० नोव्हेंबर २०२५

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्येष्ठ नेत्यांची विभागीय प्रभारी म्हणून नियुक्ती आहे.

नागपूर विभागाची जबाबदारी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वड्डेटीवार यांच्याकडे, पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे सोपवली आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र, अॅड. यशोमती ठाकूर यांच्याकडे अमरावती विभागाची, मराठवाडा प्रभारी म्हणून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची तर कोकण विभाग प्रभारी म्हणून माजी मंत्री काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

पार्थ पवार जमीन घोटाळा :हिंमत असेल तर तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात चौकशी करा, नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठित करावी, असे आव्हान कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे.नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी विकास खरगेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आहे. या पद्धतीच्या चौकशीचा आणि कमिटीचा फार्स करून जनतेची जी दिशाभूल चाललेली आहे. महाराष्ट्र रोज लुटण्याचे काम सुरू आहे. तुमच्यात खरोखरच हिंमत असेल आणि दूध का दूध, पाणी का पाणी करायचे असेल तर तुकाराम मुंढेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवा, असे आव्हान केले आहे.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, पार्थ पवारांच्या 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्यात औद्योगिक नवीन धोरण आणायचे आणि स्टॅम्प ड्युटी वाचवण्याचे धोरण ही फक्त एक पद्धत आहे. मुंबई आणि बीकेसी मधील 500 एकर पेक्षा अधिक जमीन, सी लिंकच्या बाजूची जमीन, रस्ते विकास महामंडळाची जमीन, या सगळ्या जमिनी कशा आणि काय भावाने दिल्या? नवी मुंबईचे मार्केट यार्ड होते, ती जमीन मोदीजींच्या मित्रांना आयटी पार्कच्या नावाने देण्यात आली. असे सगळे सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की ही गंभीर बाब आहे.महाराष्ट्रात अशा अनेक प्रकारच्या जमीन घोटाळ्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याची चौकशी बसवण्याची गरज नाही, ते कागदावरच स्पष्ट होते. शासन तुम्ही चालवत आहात, सरकार तुम्ही चालवत आहात, अशा वेळेस चौकशी बसवायची गरजच काय? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील मुंढव्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये लाटण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी असलेली 21 कोटींची स्टँप ड्युटीही भरली नाही. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. यावरून नाना पटोले यांनी टीका केली आहे.

बकवास बंद करा, उत्तर द्या!:आरएसएस रजिस्टर्ड आहे का? निधी कुठून येतो? प्रकाश आंबेडकरांचा संघावर हल्लाबोल

जालना -वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयं सेवक संघावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत संघाला उद्देशून तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. आरएसएस रजिस्टर्ड संस्था आहे का? नसेल, तर इतके फंडिंग कसे काय मिळत आहे? तसेच संघाने भारतीय तिरंगा स्वीकारला नव्हता, हे खरे आहे की खोटे? असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत म्हटले की, इकडची तिकडची बकवास बंद करा आणि माझ्या तीन प्रश्नांचे उत्तर द्या. आरएसएस ही नोंदणीकृत संघटना आहे का? जर ती नोंदणीकृत नसेल, तर तिला कोट्यवधी रुपयांचा निधी कसा मिळत आहे? हे खरे नाही का की आरएसएसने भारतीय ध्वज स्वीकारला नाही? हे खरे नाही का की आरएसएसने अनेक दशकांपासून नागपूर येथील मुख्यालयात तिरंगा फडकवला नाही? हे खरे नाही का की गोळवलकर आणि सावरकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले समतावादी, लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष संविधान नाकारले आणि मनुस्मृतीला संविधान बनवण्याची मागणी केली? असे प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केले आहेत.

वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आता आरएसएस आणि मनुवादी शक्तींना तोंड देण्यासाठी एकत्र आले आहेत. तुम्ही आणि तुमच्या अर्ध्या अंतर्वस्त्रांच्या टोळीने एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, आपला देश मनुस्मृतीने नव्हे तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने चालेल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आज प्रकाश आंबेडकर यांची जालना येथे जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. आज धर्म नव्हे तर ओबीसी धोक्यात आहेत. ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. ओबीसींच्या राजकीय लढ्याला सुरुवात झाली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. जालना येथे जाहीर सभेत ते बोलते होते. जरांगे मुंबईत ठिय्या मांडून बसले आणि कॉंग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे 190 आमदार जरांगेंच्या दर्शनाला गेले. हेच आमदार देवेंद्र फडणवीस यांना भेरले तशी फडणवीस यांची भाषा बदलली, अशी टीका आंबेडकरांनी केली आहे.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, जे आमदार जरांगे यांना भेटले तेच आमदार जरांगे काय म्हणतात ते ऐकण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सल्ला दिला आणि कुणबी प्रमाणपत्राचा जीआर निघाल, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हा जीआर रद्द करणार आहेत का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसींनी मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार जाहीर केले पाहिजेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक तरी ओबीसी मतदार असायला हवा. काही मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव आहेत. काही मतदारसंघ एसटीसाठी राखीव आहेत. एसी आणि एसटी हा वर्ग आरक्षणवादी आहे. हे लक्षात घ्यायला हवे. जे लोक आरक्षणवादी आहेत, त्यांनाच मतदान करायला हवे. आपल मत हे ओबीसीला, आपले मत हे एसटीला असायला हवे, असे आवाहन आंबेडकरांनी केले आहे.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, धर्म नाही तर ओबीसी संकटात आला आहे. ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. ओबीसी नेत्यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये आहेत. कळसूत्री बाहुल्याप्रमाणे हे ओबीसी नेते नाचवले जात आहेत, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींनी राजकारणात उतरावे, असेही आवाहन केले आहे.

रुपाली पाटलांना शिवसेना ठाकरे गटाकडून खुली ऑफर; आम्ही स्वागत करू – सुषमा अंधारे

पुणे-राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्तेपदावरून रूपाली ठोंबरे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून थेट ऑफर आली आहे. रुपाली ठोंबरे यांनी शिवसेनेत यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू, अशी ऑफर सुषमा अंधारे यांनी दिली आहे.सुषमा अंधारे म्हणाल्या, रूपाली ठोंबरे ही माझी चांगली मैत्रीण आहे आणि ती राहील. तिला कोणतीही भीती नाही, ईडी किंवा सीबीआयचा तिला बॅरेज नाही. सर्वार्थाने ती अतिशय क्लीन इमेज असलेली व्यक्ती आहे. अशी महिला कोणत्याही पक्षात येणे कोणालाही आवडेलच. त्यांनी शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त करावी, आम्ही त्याचे स्वागत करू. पण माझ्या पक्षात ती यावी म्हणून तिच्या त्या पक्षात नुकसान व्हावे असा विचार करणारी मी नाही. जर तिच्या पक्षात तिला स्कोप मिळत असेल तर तिने तिथे काम करावे, असा सल्ला देखील अंधारे यांनी दिला आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे यांना वगळण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत वाद सुरू होते. रूपाली चाकणकर आणि रूपाली ठोंबरे पाटील यांच्यात देखील वाद सुरू आहेत. याचाच फटका रूपाली ठोंबरे यांना बसला असल्याचे बोलले जात आहे. तसेच भाजपवर सतत टीका करणाऱ्या अमोल मिटकरी यांना देखील प्रवक्ते पदावरून वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे मारहाण प्रकरणातील सुरज चव्हाण यांना प्रवक्तेपद पुन्हा देण्यात आले आहे.

भाविकांसाठी उत्कृष्ठ दर्जाच्या सेवा – सुविधा तयार करा : : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमंदिर परिसरात अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली विकसित करा

श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा बैठक

मुंबई,दि.१० : राज्यातील ज्योतिर्लिंगाना वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात हे लक्षात घेवून श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा सर्वसमावेशक विकास आराखडा असावा.मंदिर परिसरातील सुरू असलेली कामे गतीने करून प्रस्तावित कामांचे योग्य नियोजन करा.या परिसरात भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली कार्यरत करून भाविकांसाठी उत्कृष्ठ दर्जाच्या सेवा सुविधा तयार करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

वर्षा निवासस्थान येथे पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास सादरीकरणाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग व्ही.राधा,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, .नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी,सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल या बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी येणा-या सध्याची भाविकांची व भविष्यातील संख्यानुसार दर्शन रांगांचे नियोजन, यात्रा उत्सव कालावधी हे लक्षात घेवून मंदिर परिसरात प्रतिक्षा कक्ष,पिण्याच्या पाण्याची सोय, निवासाची व्यवस्था, अंतर्गत रस्ते, परिसर साफसफाई करणे, माहिती फलक, पर्यटक स्वागत कक्ष, पार्कींग व्यवस्थापन, आपत्कालीन यंत्रणा, तिकीट कक्ष, आरोग्य सुविधा, उपहारगृह यासह पर्यटन वाढीला चालना देणारे उपक्रम या भागात प्रामुख्याने राबवा.स्थानिक नागरिक व प्रशासनाला विचारात घेवून येथील कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था काटेकार असावी यासाठी खबरदारी घेण्यात यावी.अत्याधुनिक यंत्रणा तसेच कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने एकात्मिक सुरक्षा प्रणाली विकसित करा.जेणेकरून तात्काळ आपत्कालीन परिस्थीतीत नागरिकांना मदत मिळेल.मंदिर व्यवस्थापनासाठी काटेकोर नियम असणे गरजेचे आहे.पर्यावरण संवर्धन व रोजगार निर्मितीसाठी पर्यटन विभागानेही येथील प्रस्तावित कामे गतीने करावीत.आज सादर झालेल्या आराखड्यांना उच्चस्तरीय समितीकडून मंजूरीनंतर निधी मिळेल.पुरातत्व विभागाकडून घेण्यात येणा-या मंजुरीसाठी केंद्र शासनाच्या अधिका-यांसोबत एक वेगळी बैठक आयोजित करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

राज्यातील ज्योतिर्लिंगाच्या विकास आराखड्याची प्रभावी व तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त असलेले अधिकारी यांनी यावेळी विकास आराखड्यांचे सादरीकरण केले. पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा व श्री क्षेत्र भीमाशकर विकास आराखडा कुंभमेळा २०२७ चे सादरीकरण सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथचे सादरीकरण वित्त विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर विकास आराखडा सादरीकरण अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी केले.

या बैठकीला नियोजन विभागाचे प्रधानसचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के. एच. गोविंदराज, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, वित्त विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, पर्यटन विभागाचे सचिव संजय खंदारे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह,सचिव बांधकामे आबासाहेब नागरगोजे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळाज नाशिक – त्रंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग दूरदृश्यप्रणालीव्दारे नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम,पुणेचे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकात पुलकंडवार,छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर इतर विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळवणुकीस प्रतिबंधासाठी अंतर्गत समिती स्थापन करणे अनिवार्य -जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

पुणे, दि.10: कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी कार्यालयांमध्ये, ज्या ठिकाणी १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, अशा सर्व कार्यालयांमध्ये अंतर्गत समिती (विशाखा समिती) स्थापन करणे बंधनकारक आहे.

अंतर्गत समिती स्थापन न करणाऱ्या संबंधित कार्यालय प्रमुख किंवा मालक यांच्यावर 50,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तसेच संबंधित कार्यालयाचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. महिलांच्या लैंगिक छळवणुकीबाबत online तक्रार नोंदविण्यासाठी भारत सरकारने https://shebox.wcd.gov.in हे संकेतस्थळ सुरु केलेले आहे. या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींवर योग्य कार्यवाही होण्यासाठी सर्व खाजगी आस्थापनांनी त्यांच्या अंतर्गत समित्यांची ऑनलाइन नोंदणी “Private Head Office Registration” या विभागात करणे आवश्यक आहे.

सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांनी त्यांच्या अंतर्गत समिती स्थापन केल्याबाबतच्या आदेशाची प्रत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांना lcpune2021@gmail.com (एल सी पुणे 2021) या ईमेलवर पाठवावी आणि सर्व खाजगी आस्थापणांनी त्यांच्या अंतर्गत समित्यांची SHe-Box Portal वर नोंदणी देखील करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची कार्यवाही सुरळीत सुरु,अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विजयसिंह देशमुख यांचे आवाहन

पुणे, दि. 10 नोव्हेंबर: मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत “महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे, व्याज परतावा थांबविण्यात आला आहे” अशा प्रकारच्या निराधार अफवा काही व्यक्तींकडून सोशल मीडियासह विविध माध्यमांतून पसरवल्या जात आहेत. या अफवांना कोणतेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर रार्व कामकाज सुरळीतपणे सुरु असल्याची माहिती विजयसिंह देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

महामंडळाच्या वेब प्रणालीचे दि. १० ऑक्टोबर पासून अपग्रेडेशनचे काम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये वेब प्रणालीचे Security Audit प्रलंबित होते ते पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत, महामंडळाने स्वतः हुन एलओआय (LOI) व बँक सेक्शन (Bank Sanction) या दोन सेवा अधिसुचित केल्या आहेत. या नुसार या सेवा १५ कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत देण्याचे बंधन महामंडळाने स्वतः वर घालून घेतले आहे. याबाबत आवश्यक ते बदल वेब प्रणालीमध्ये करणे सुरु आहे. एजंटमार्फत लाभार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबावी यासाठी म्हणून महामंडळाने CSC केंद्रांद्वारे फक्त ७० रुपयांत सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी MOU केला आहे. त्यास अनुषंगाने वेबप्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरु आहे. लाभार्थ्यांना महामंडळाच्या सर्व सेवा थेट मोबाईलद्वारे देता याव्यात म्हणून मोबाईल ॲप विकसित होत आहे. यासाठी वेवप्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करणे सुरु आहे. राज्यात विविध ठिकाणी एजंटमार्फत लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने, सद्यस्थितीत नाशिक व अहमदनगरमध्ये संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंद केले गेले आहेत. असे प्रकार घडू नयेत यासाठी वेब प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरु आहे. राष्ट्रीयकृत बँका सोबत बँक API एकत्रीकरण सुरु असून, लाभार्थ्यांना सुरळीत व सहजपणे व्याज परतावा मिळणार आहे. चॅट जीपीटी स्मार्ट बोट (Chat GPT Smart Bot) प्रणाली विकसित करण्यात आली आहे, जी लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजनांबाबत मार्गदर्शन व माहिती देईल. योजनांतर्गत काही असे व्यवसाय निदर्शनास आले आहेत की, त्यामधून अपेक्षित स्वयंरोजगारनिर्मिती होत नाही अशा व्यवसायांबाबतचा अंकेक्षणाबाबत योग्य निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेणे प्रस्तावित आहे. तसेष मराठा समाजातील युवकांसाठी नवीन व्यवसाय कसे निर्माण करता येऊ शकतील? ही बाब विचाराधीन आहे. लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन वेबीनार च्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम देखील सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी व्याज परताव्याकामी लाभार्थ्यांना एका वेळेस कमाल ३ क्लेम सादर करता येत होते. मात्र सद्यस्थितीत लाभार्थ्यांना एका वेळेस कमाल ६ क्लेम सादर करता येत आहेत.

तरी कोणत्याही प्रकारच्या राजकीय, दिशाभूल करणाऱ्या किंवा अफवांवर आधारीत माहितीवर विश्वास ठेवू नये असेही श्री. देशमुख यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

खड्डयामुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

खड्डयामुळे मृत्यू किंवा जखमी झालेल्या पीडितांच्या कुटुंबियांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे भरपाईबाबत दावा दाखल करता येणार-सोनल पाटील

खड्डे किंवा असुरक्षित रस्त्यांबाबत तक्रार दाखल करण्याचे आवाहन

पुणे, दि. ११: मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश डी. पाटील यांच्या खंडपीठाने खड्डयामुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत १३ ऑक्टोबर २०२५ रोजी महत्वपूर्ण निकाल दिला आहे; नागरिकांच्या जीवन आणि सुरक्षिततेच्या अधिकाराचे रक्षण करणाऱ्या ऐतिहासिक निकालामध्ये नागरिकांच्या सुरक्षितेला प्राधान्य दिले असून नागरिकांनी खड्डे किंवा असुरक्षित रस्त्यांबाबतची तात्काळ संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी केले आहे तसेच मृत्यू किंवा जखमी झालेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध उच्च न्यायालयात स्वतःच्या याचिकेवर निकाल देताना भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत रस्ते सुरक्षित स्थितीत ठेवणे ही नागरी आणि रस्ते निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे संवैधानिक कर्तव्य आहे. खड्ड्यामुळे होणारे मृत्यू आणि अपघात, विशेषतः पावसाळ्यात, ‘एक वारंवार होणारी दुर्घटना’ बनली असून जी सहन केली जाऊ शकत नाही. राज्यातील खड्डे, उघडे मॅनहोल आणि असुरक्षित रस्त्यांच्या परिस्थितीमुळे होणाऱ्या मृत्यू आणि दुखापतीसाठी जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी न्यायालयाने पुढीलप्रमाणे व्यापक निर्देश निर्देश दिले आहेत.

पीडितांसाठी भरपाईः खड्डयांमुळे होणारे नागरिकांचे मृत्यू झाल्यास मृतांच्या कायदेशीर वारसांना ६ लाख भरपाई देण्यात यावी. जखमी झाल्यासः दुखापतीच्या तीव्रतेनुसार ५० हजार ते २ लाख ५० हजार रुपयादरम्यान भरपाई द्यावी. सदरची भरपाई दावा केल्यापासून सहा ते आठ आठवड्यांच्या आत देण्यात यावी. दिवाणी किंवा फौजदारी कायद्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही कायदेशीर उपायांव्यतिरिक्त पैसे दिले जातात.

तक्रार कुठे दाखल करावीः कोणताही नागरिक खड्डे, उघडे मॅनहोल किंवा असुरक्षित रस्त्याबाबत संबंधित महानगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकृत ऑनलाईन किंवा हेल्पलाइन तक्रार संकेतस्थळावर (पोर्टल) करावी. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता (रस्ते), तक्रार दाखल करावी तसेच जिल्हा विधी सेवा सेवा प्राधिकरणाकडे पीडितांना किंवा कुटुबिंयाना थेट दावे दाखल केल्यास त्यांना भरपाई किंवा उपाययोजनांचा पाठपुरावा करण्यास मदत करण्यात येईल.

कारवाईकरिता जबाबदार अधिकारी : शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, महामार्ग आणि आतरजिल्हा रस्त्याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ग्रामीण भागातील रसत्याबाबत जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकास विभागातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

देखरेख आणि अनुपालनः प्रत्येक प्राधिकरणाने तक्रारीबाबत त्वरित प्रतिसाद आणि समन्वयासाठी जबाबदार असलेल्या समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. जिल्हाधिकारी जिल्ह्यातील अनुपालनाचे पर्यवेक्षण करणार आहेत तसेच राज्य सरकार उच्च न्यायालयात नियतकालिक अनुपालन अहवाल सादर करणार आहे.

कारवाईचे स्वरूप : खड्डे आणि असुरक्षित रस्त्यांवरील सर्व तक्रारी ४८ तासाच्या आत निकाली काढाव्यात. कारवाई केल्याबाबतचे पुर्वीचे तसेच दुरुस्ती केल्यानंतरच्या कामाचे छायाचित्रित पुरावे सार्वजनिकरित्या अपलोड करावे. सदोष रस्त्याच्या कामासाठी जबाबदार असलेल्या निष्काळजी अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांना पुढील गोष्टींना सामोरे जावे लागेल. यामध्ये विभागीय कारवाई आणि पीडितांना दिलेली भरपाई वसूल करणे आणि निष्काळजीपणामूळे मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास फौजदारी खटला चालविणे, वेळेत भरपाई देण्यास किंवा कृती करण्यास अयशस्वी झाल्यास महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा विभाग प्रमुख वैयक्तिकरित्या जबाबदार असतील.

सोनल पाटील, सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण: ‘मृत्यू किंवा जखमी झाल्याबाबतच भरपाई मिळण्याकरिता साध्या कागदावर दावा दाखल करावा. त्यासोबत वैद्यकीय अहवाल, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्याबाबतचा अहवाल जोडल्यास सुविधा देणे सोईचे होईल. विधी सेवा प्राधिकरणच्या जलदगतीने भरपाई मिळण्याकरिता स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पिडीतांना न्याय आणि मदत सुनिश्चित करण्यासाठी मोफत कायदेशीर मदत करण्यात येईल. खड्ड्यांमुळे किंवा असुरक्षित रस्त्यांमुळे जीव गमावलेल्या किंवा जखमी झालेल्या पीडित किंवा त्यांच्या कुटुबियांना मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय आवार, नवीन इमारत, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे, ईमेल dlsapune2@gmail.com, दूरध्वनी क्र. ०२०-२५५३४८८१, भ्रमणध्वनी क्र-८५९१९०३६१२ येथे संपर्क साधवा.’

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५-काय करावे व काय करु नये मार्गदर्शक सूचना जारी…

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील ४ नोव्हेंबर २०२५ च्या आदेशान्वये पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-२०२५ जाहीर करण्यात आला असून या कालावधीत काय करावे व काय करु नये ? याबाबतची मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केली आहे. काय आहेत मार्गदर्शक सूचना जाणून घेवू या लेखातून…

काय करावे व काय करू नये…

काय करावे… चालू असलेले कार्यक्रम, योजना पुढे सुरु ठेवता येतील. ज्याविषयी शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोग, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण, मान्यता प्राप्त करण्यात यावी. पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील नागरिकाकरिता सहाय्यकारी व पुनर्वसनाच्या उपाययोजना चालू करता येतील आणि यासंदर्भात चालू असलेल्या योजना पुढे सुरु ठेवता येतील.

मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रक्कम किंवा वैद्यकीय सवलती देण्याचे समूचित मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल. मैदानासारख्या सार्वजनिक जागा सर्व पक्षांना, निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना निवडणूक सभा घेण्यासाठी निःपक्षपातीपणे उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व पक्षांना, निवडणुकीस उभे असलेल्या उमेदवारांना हेलिपॅडच्या वापर निःपक्षपातीपणे उपलब्ध करुन दिला पाहिजे. विश्रामगृहे, डाकबंगले व इतर शासकीय निवासस्थाने वगैरे बाबतीत निवडणूक आयोगाने व त्या अनुषंगाने शासनाने काढलेल्या आदेशास संपूर्णतः अधीन राहून सर्व राजकीय पक्षांना व निवडणुकीस उभे असलेल्या सर्व उमेदवारांना समानतेच्या तत्त्वावर उपलब्ध करुन देता येणे अनुज्ञेय असल्यास त्याप्रमाणे देण्यात यावेत.

इतर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर करण्यात देणारी टीका ही त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी, पार पडलेली कामे, केवळ या बाबींशी संबंधित असावी. शांततामय व उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचे पूर्णपणे जतन करण्यात यावे. प्रस्तावित सभेची जागा व वेळ याविषयी स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना पूर्ण माहिती देण्यात यावी आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळविण्यात याव्यात. प्रस्तावित सभेच्या जागी निर्बंधात्मक व प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्यांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास त्याबाबत सवलत मिळण्याविषयी अर्ज केले पाहिजेत व वेळीच अशी सवलत मिळविली पाहिजे. प्रस्तावित सभेसाठी ध्वनिक्षेपक किंवा कोणत्याही इतर अशा सवलतीचा वापर करण्यासाठी योग्य परवानगी मिळविली पाहिजे. सभेमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अव्यवस्था निर्माण करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांचे सहाय्य मिळविण्यात यावे. कोणत्याही मिरवणुकीची प्रारंभीची वेळ व जागा, मिरवणूक ज्या मार्गाने जाईल तो मार्ग व मिरवणुकीची अखेर होईल अशी वेळ व स्थान ही बाब आगाऊ स्वरुपात निश्चितपणे ठरविण्यात यावी व पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी. मिरवणूक ज्या वस्तीमधून जात असेल त्या वस्त्यांबाबत कोणतेही निर्बंधात्मक आदेश जारी केलेले असल्यास त्या विषयी खात्री करुन त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे सर्व वाहतूक नियमांचे व अन्य निर्बंधांचे अनुपालन करण्यात यावे.

मिरवणुकीमुळे वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ देऊ नये. ज्यांचा क्षेपके किंवा हत्यारे म्हणून गैरवापर होऊ शकेल अशा कोणत्याही वस्तू मिरवणुकीत सहभागी असलेल्या व्यक्तींनी बाळगू नयेत. मतदानाचे काम शांतता व सुव्यवस्थेने पार पडावे यासाठी सर्वतोपरी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य देण्यात यावे. उमेदवार व त्याच्या अधिकृत कार्यकत्यांनी विहित परवानगी घेऊन योग्य असे बिल्ले व ओळखपत्रे, निवडणूक प्रशासनाकडून मिळवावीत व ती निवडणुकीचे काम करणाऱ्या व्यक्तींनी ती दर्शनी भागावर लावावीत.

मतदारांना देण्यात येणाऱ्या ओळखचिठ्ठया साध्या (पांढऱ्या कागदावर देण्यात येतील य त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे किंवा पक्षाचे नाव यांचा निर्देश असणार नाही. मतदानाच्या दिवशी वाहनांच्या वापरावरील निर्बंधांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. राज्य निवडणूक आयोगाचे, महानगरपालिका आयुक्त यांचे अथवा जिल्हाधिकाऱ्यांचे किंवा त्यांनी प्रधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने दिलेले वैध प्राधिकारपत्र असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस कोणत्याहीवेळी मतदान कक्षात प्रवेश करता येणार नाही. वरच्या दर्जाच्या कोणत्याही व्यक्तींना (उदा. मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, संसद सदस्य, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य) यांनाही यातून सूट देण्यात आलेली नाही. निवडणूक पार पाडण्याच्या संबंधातील कोणतीही तक्रार किंवा समस्या, निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्र, प्रभाग दंडाधिकारी यांच्या किंवा राज्य निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी. राज्य निवडणूक आयोग, आयुक्त, महानगरपालिका, जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे निवडणुकीच्या विविध पैलूंच्या संबंधातील सर्व बाबींविषयीचे निर्देश, आदेश, अनुदेश यांचे पालन करण्यात यावे.

काय करु नये….

शासकीय वाहने किंवा कर्मचारी वर्ग किंवा यंत्रणा यांचा निवडणूक प्रचारविषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये. शासकीय वाहनात पुढील कार्यालयाच्या वाहनाचा समावेश असेल, केंद्र शासन, राज्य शासन, केंद्र व राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम, मंडळे, महामंडळे, केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगर परिषदा,नगर पंचायती, पणन मंडळ (कोणत्याही नावाचे), सहकारी संस्था, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या, ग्रामपंचायती, ज्यामध्ये सार्वजनिक निधी मग तो एकूण निधीच्या हिश्यातील कितीही अल्पांशाने असो गुंतवण्यात आला आहे अशी कोणतीही संस्था व संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, राज्य शासन, केंद्रीय पोलीस संघटना इत्यादीच्या मालकीची असलेली पुढील वाहने-मालमोटारी, लॉरी, टेंपो, जीपगाड्या, मोटारगाड्या, ऑटोरिक्षा, बसगाड्या, विमाने, हेलिकॉप्टर, जहाजे, बोटी, हॉवर क्रॉफ्ट व इतर सर्व वाहने. सत्तेमध्ये असलेला पक्ष, शासन यांनी साध्य केलेल्या उद्दिष्टांबाबत सरकारी कोषागाराच्या खर्चाने कोणतीही जाहिरात देऊ नये.

कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषणा करणे, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते आदी बांधण्याचे वचन देणे इत्यादी गोष्टी करु नयेत. शासन, सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ नियुक्त्या करु नयेत. मंत्री (राज्यमंत्री व उपमंत्रीसहित) हे उमेदवार असल्याखेरीज किंवा प्राधिकृत प्रतिनिधी असल्याखेरीज किंवा मतदानासाठी मतदार या नात्याने असेल त्याखेरीज मतदान कक्षामध्ये किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाहीत. निवडणूक मोहिम, प्रचार यांच्या जोडीने कोणतेही सरकारी काम पार पाडण्यात येऊ नये.

मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारचे कोणतेही प्रलोभन दाखविण्यात येऊ नये. मतदाराच्या जातीय व धार्मिक भावनांना आवाहन करण्यात येऊ नये. विभिन्न जाती, जमाती यांच्यातील किंवा धार्मिक किंवा भाषिक गटातील मतभेद ज्यामुळे अधिक तीव्र होतील किंवा परस्परातील वैमनस्य वाढेल किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये. इतर पक्षांचे कोणतेही नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक कार्याशी संबंधित नसेल अशा त्यांच्या खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी देण्यात येऊ नये. ज्यांचा खरेखोटेपणा पडताळून पाहिलेला नाही असे आरोप ठेवून किंवा त्यास विकृत स्वरुप देऊन इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर टीका करण्यात येऊ नये. निवडणूक प्रचार तसेच भाषणे, निवडणूक प्रचाराचे फलक, संगीत इत्यादी साठी कोणत्याही प्रार्थनास्थळांचा वापर करण्यात येऊ नये. लाच देणे, आवजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, खोट्या नावाने मतदान करणे, मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविणे व तेथून परत नेणे यासारख्या भ्रष्ट प्रथा किंवा निवडणूक विषयक अपराध करण्यास प्रतिबंध आहेत.

व्यक्तींची मते किंवा कृत्ये याविरुध्द निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने किंवा धरणे धरण्यात येऊ नये. कोणत्याही व्यक्तीला, अन्य कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत आवारभिंत इत्यादींचा वापर त्यांच्या मालकांच्या परवानगीखेरीज करणे, ध्वजदंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटीशी चिकटविणे किंवा घोषणा लिहिणे इत्यादी करता येणार नाही. यामध्ये शासकीय, सार्वजनिक व खाजगी जागांचा समावेश असेल. इतर राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या सार्वजनिक सभांमध्ये किंवा मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात येऊ नये.

एका पक्षाची जेथे सभा चालू असेल अशा जागी दुसऱ्या पक्षाद्वारे मिरवणूक काढण्यात येऊ नये. दुसऱ्या पक्षांनी किंवा उमेदवारांनी लावलेली प्रचारपत्रके, भित्तीपत्रके काढून टाकण्यात येऊ नयेत. मात्र याबाबत काही आक्षेप असल्यास पोलिसांच्या किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणावे. मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठया वितरीत करण्याच्या जागी किंवा मतदान कक्षाजवळ प्रचारपत्रके, पक्षांचे ध्वज, चिन्हे किंवा इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करु नये. ध्वनिक्षेपकांचा मग ते एकाच जागी लावलेले असोत किंवा फिरत्या वाहनांवर बसविलेले असोत, सकाळी 6 वाजण्यापूर्वी किंवा रात्री 10 वाजल्यानंतर आणि संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी घेतलेली असल्याखेरीज वापर करु नये. तसेच याबाबत असलेले The Noise Pollution (Regulation and Control) Rules, 2000 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी असल्याखेरीज सार्वजनिक सभेच्या जागी किंवा मिरवणुकीत किंवा प्रचारफेरीत ध्वनिक्षेपकाचा वापर करु नये. अशा सभा/ प्रचारफेरी रात्री 10 वाजल्यानंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार नाही. याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे तसेच घालून दिलेल्या अटींचे पालन करावे. याखेरीज, ती स्थानिक कायदे, त्या क्षेत्रातील सुरक्षिततेच्या आवश्यकतेचा स्थानिक दृष्टीकोन आणि हवामान, सणासुदीचे दिवस, परिक्षेचा काळ यांच्या अधीनतेने असतील. निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या पैशाचे, मद्याचे, वस्तूंचे वाटप करण्यात येऊ नये.

संकलन:- जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर ठेवले:ब्रीच कँडीचे डॉक्टर म्हणाले- पुढील 72 तास खूप क्रिटिकल, मुलींना अमेरिकेतून बोलावले

0

मुंबई-सोमवारी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. डॉक्टरांचे म्हणणे आहे की पुढील ७२ तास धर्मेंद्र यांच्यासाठी अत्यंत कठीण असतील.धर्मेंद्र यांचे कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित आहेत, तर त्यांच्या मुलींना अमेरिकेतून बोलावण्यात आले आहे.अलिकडेच त्यांच्या आगामी “इक्किस” चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्यामध्ये त्यांनी दमदार अभिनय केला आहे.

आमिर खान यांना बोमन इराणी यांच्या हस्ते पहिला आर. के. लक्ष्मण गौरवास्पद कामगिरी पुरस्कार

0

ए. आर. रहमान लाईव्ह इन कॉन्सर्ट २३ नोव्हेंबर २०२५ रोजी

पुणे – सुप्रसिद्ध संगीतकार–गायक ए.आर. रहमान ‘गहुंजे’ येथील एम. सी.ए स्टेडियममध्ये त्यांचा पहिलावहिला स्टेडियम कॉन्सर्ट घेऊन येत आहेत.ह्या कार्यक्रमात ए.आर. रहमान ह्यांच्या सोबतीला भारतातील सर्वश्रुत  प्रतिष्ठित गायक- हरिहरन, सुखविंदर सिंग आणि चिन्मयी- ह्यांच्या गाण्यांचा रसिक प्रेक्षकांना आनंद घेता येणार आहे.

ह्या कार्यक्रमात यावर्षीपासून सुरू होणारा “आर.के. लक्ष्मण गौरवास्पद कामगिरी पुरस्कार” चा पहिला मान अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आमिर खान ह्यांना त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे.आर. के. लक्ष्मण यांच्या नावाने नव्याने सुरू होणारा हा पुरस्कार म्हणजे, कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींचा केला जाणार गौरव असणार आहे.

तसेच या पुरस्कारामुळे  हे अधोरेखित होणार आहे की, आर के लक्ष्मण यांच्यासारखी सर्जनशीलता, जिद्द, चिकाटी ज्या, कलाकारांमध्ये असणार आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

या पुरस्कारामुळे लक्ष्मण यांचा सन्मान वर्षागणिक वाढत राहणार आहे.

ह्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन आर. के. लक्ष्मण ह्यांच्या कुटुंबाने केलेले आहे.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने कला, संस्कृती आणि संगीत एकत्र येत आहेत.

कार्यक्रमाची माहिती

दिनांक, रविवार,  २३ नोव्हेंबर, २०२५

प्रवेश – दुपारी ३:०० वाजता

कार्यक्रम सुरु – संध्याकाळी ५:०० वाजता

स्थळ – एम सी ए स्टेडियम, गहुंजे, पुणे

तिकीट विक्री – District by Zomato

आयोजक: R.K. IPR Management Pvt. Ltd.