मेरी राते, मेरी सडके कार्यक्रमात मांडले परखड मत
पुणे,ता.८: कुठल्याही प्रकारचे काम करण्यासाठी शारीरिक ताकदीपेक्षा मानसिकरित्या खंबीर असणं महत्वाचं असतं मग त्यात तुम्ही पुरुष आहेत की महिला हा फरक नगण्य ठरतो असं परखड मत रिक्षा चालक सविता कुंभार यांनी मांडले. महिला जागर समिती आयोजित मेरी रातें, मेरी सड़कें उपक्रमा अंतर्गत चाकोरी तोडणाऱ्या महिलांचा सन्मान या उपक्रमाच्या सातव्या रात्री कुंभार बोलत होत्या. शनिवारी येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे चौकात ‘मेरी राते, मेरी सडके’ हा महिला सन्मानाचा कार्यक्रम झाला.
अतिशय प्रतिकूल परिस्थिती असूनही जिद्दीच्या जोरावर पारंपरिक चौकटीला भेद देत महावितरणमध्ये वायरवूमन बनलेल्या अर्पणा काळे, चहाची टपरी चालवत मुलीला डॉक्टर करणाऱ्या जुलेखा युसुफ शेख, उजनी प्रकल्पग्रस्तांसाठी झटणाऱ्या महिला शेतकरी दीपाली वगरे, योगा शिकविणाऱ्या मालन पवार, पुणे महानगर परिवहन मंडळातील कंडक्टर हेमलता भोये यांचा सन्मान करण्यात आले. यावेळी कोरेगाव पार्कच्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला व जागर समितीचे संयोजक उपस्थित होते. यावेळी रुणाल मुल्ला म्हणाल्या, “समाजाला तोंड देत एखाद्या महिलेने नोकरी करत संसाराची जबाबदारी सांभाळत स्वाभिमानाने जगणं हे खूप आव्हानात्मक असतं हे आव्हान सांभाळण्यासाठी व्यक्तीचं मन खूप मजबूत असावे लागते.”
विविध क्षेत्रात महिला हळूहळू पण हिमतीने आपलं स्थान बळकट करत आहेत अशा चाकोरी तोडणाऱ्या महिलांच्या अनुभवातून, त्यांच्या संघर्षाच्या कहाण्यांतून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी हा या उपक्रमा मागील उद्देश असल्याचे संयोजक ॲड. असुंता पारधे यांनी सांगितले. सीवायडीएच्या युवा कार्यकर्त्यांनी विशेषतः मुलींनी ‘पहाडोसी बन रही है लडकीया‘ हे गाणं घेऊन उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी ओजस्वी बहुउद्देशीय संस्थेच्या प्रियंका रणपिसे, दिशा संस्थेच्या पौर्णिमा गादिया, भटक्या विमुक्तांमध्ये काम करणाऱ्या शारदा खोमणे, निर्भय विद्यार्थी अभियानाच्या सुलभा क्षिरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते अकबर खान, इमाम शेख, अन्वर पठाण, डॅनिअल लांडगे, अजित गंगावणे, जार्ज स्वामी, उद्योजक गणेश बाबर यांनी सहकार्य केले.
नीलिमा तारा सुरेश यांनी सूत्रसंचालन केले तर दिलीप कुऱ्हाडे यांनी आभार मानले.
‘शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक ताकद महत्त्वाची‘ – रिक्षा चालक सविता कुंभार
गायन, वादन, नृत्याच्या त्रिवेणी संगमातून रंगला रौप्य महोत्सवी वि. वि. द. स्मृती समारोह
रौप्य महोत्सवी वि. वि. द. स्मृती संगीत समारोह रसिकांसाठी ठरला पर्वणी
पुणे : शहनाईची परंपरा जोपासणाऱ्या गायकवाड कुटुंबातील युवा कलावंत नम्रता गायकवाड हिच्या सुरेल शहनाई वादनाने सुरू झालेल्या वि. वि. द. स्मृती संगीत समारोहात गायत्री जोशी, आदित्य मोडक, जयंत केजकर, रमाकांत गायकवाड, आदित्य खांडवे यांचे सुमधुर गायन झाले. तर अभिषेक शिनकर यांच्या सुरेल एकल संवादिनी वादनाने आणि अभिषेक बोरकर यांच्या प्रभावी सरोद वादनाने मैफलीची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. ओजस अढीया यांच्या दमदार तबला वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले तसेच अनन्या गोवित्रीकर यांनी विलोभनीय कथक नृत्यप्रस्तुती सादर केली तर शाकीर खान यांचे बहारदार सतारवादन समारोहाचा कळसाध्याय ठरले.
भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे पं. विष्णु दिगंबर पलुस्कर, पं. विनायकबुवा पटवर्धन आणि पं. दत्तात्रय विष्णु पलुस्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविवारी (दि. 8) वि. वि. द. स्मृती संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या रौप्य महोत्सवी (25वा) समारोहाची ‘भैरव ते भैरवी’ अशी संकल्पना होती. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या समारोहाची सांगता रात्री 10 वाजता झाली. गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णु विनायक स्वरमंदिरात या समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. सीजीएसटीचे आयुक्त डॉ. रवींद्र डांगे, सीजीएसटीचे आयुक्त दिनेश भोयर, कस्टम विभागाचे आयुक्त यशोधन वनगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारोहाची सुरुवात सुप्रसिद्ध शहनाईवादक डॉ. प्रमोद गायकवाड यांची ज्येष्ठ कन्या नम्रता गायकवाड यांनी अहिर भैरव राग सादर करून केली. अतिशय दमसास आवश्यक असणाऱ्या या सौंदर्यपूर्ण सुरेल वादनाला किशोर कोरडे यांनी तबला साथ केली तर केदार जाधव यांनी वादन साथ केली.
अनवट रागांवर प्रभुत्व असणाऱ्या गायत्री जोशी यांनी राग ललतने मैफलीस सुरवात केली. त्यानंतर भटियार राग सादर केला. त्यांना अभिनय रवंदे (संवादिनी), आशय कुलकर्णी (तबला) समर्पक साथ केली. संवादिनीवर राग नटभैरव सौंदर्य उलगडून अभिषेक शिनकर यांनी रसिकांची वाहवा मिळविली. आशय कुलकर्णी (तबला) यांनी साथसंगत केली. पहिल्या सत्राची सांगता आदित्य मोडक यांनी गौड सारंग राग तसेच देसी रागातील विलंबित तिलवाडातील रचनेने केली. आदित्य मोडक यांचा खुला आवाज, बहारदार तानांनेी मैफलील सुरेख रंग भरले. त्यांना रोहित मुजुमदार (तबला), अभिनय रवंदे (संवादिनी) यांनी सुरेल साथ केली.
दुसऱ्या सत्राची सुरुवात जयंत केजकर यांनी खुलविलेल्या राग शुद्ध सारंगने झाली. यानंतर त्यांनी राग गावतीमध्ये एक रचना सादर करून समारोहात आपले स्वरपुष्प अर्पण केले. अभिजित बारटक्के (तबला) तर स्वानंद कुलकर्णी (संवादिनी) यांची उत्तम साथ लाभली.
सुमधुर पण आर्त अशा सूरांनी युवा सरोद वादक अभिषेक बोरकर यांनी सरोदचे सूर छेडत राग चारूकेशीमधील विलंबित तीन ताल, रूपक आणि द्रुत ताल सादर करून सरोद या अनवट वाद्य वादनावरील आपली हुकुमत दाखवून दिली. दुसऱ्या सत्राची सांगता ओजस अढीया यांच्या दमदार तबला वादनाने झाली. त्यांनी सुरुवातीस तीनताल सादर केला. गुरू मृदंगराज आणि उस्ताद अल्लारखाँ खान यांच्या रचना त्यांनी प्रभावीपणे सादर केल्या तसेच अजराडा घराण्याच्या वादन शैलीचे सौंदर्यही आपल्या वादनातून उलगडले. रसिकांनी त्यांच्या वादनास टाळ्याच्या गजरात दाद दिली.
युवा कलाकारांनी सादर केलेल्या या संगीतातील त्रिवाधांचे सादरीकरण ऐकून आणि पाहून रसिक नुसतेच मंत्रमुग्ध नव्हे तर विस्मयचकीतही झाले.
उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना डॉ. रवींद्र डांगे यांनी गांधर्व महाविद्यालय आणि पंडित प्रमोद मराठे यांनी आयोजित केलेल्या समारोहाचे कौतुक केले. अंतर्मनाशी संवाद करत जगण्याची कला म्हणजेच भारतीय शास्त्रीय संगीत होय, असे सांगून डांगे म्हणाले, अभिजात संगीत परंपरेचा वारसा जपत त्याला प्रवाहित ठेवले गेले आहे.
दिनेश भोयर म्हणाले, समारोहाच्या माध्यमातून विलक्षण प्रतिभा असलेल्या कलाकारांना ऐकण्याची संधी मिळाली याचा विशेष आनंद आहे. भारतीय शास्त्रीय संगीत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात गांधर्व महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गारही काढले.
मान्यवरांचे स्वागत पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणीता मराठे यांनी केले. समारोहाच्या उद्घाटनप्रसंगी रवींद्र आपटे, डॉ. मोहन उचगांवकर, वसंतराव पलुस्कर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन निरजा आपटे, मंजिरी जोशी आणि मंजिरी धामणकर यांनी केले.
“पुण्याची ओळख जतन करणारा, पर्यावरण व शैक्षणिक वातावरण भिमुख विकास साधण्याची गरज”:काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी
पुणे : देशाची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, क्रीडा नगरी व पेन्शनरांचे ‘शांत – संयमी शहर’ अशी ओळख अंगीकारलेले ‘पुणे’ हे शैक्षणीक केंद्र (एज्युकेशनल हब) बनले आहे. शहरात बाहेरील विद्यार्थ्यांची संख्या दिवसें दिवस वाढत असल्याने, विविध प्रकारे रोजगारात देखील वाढ होत असुन, ‘विद्यार्थी सेवा ही देशाच्या भवितव्याची सेवा’ म्हणून पाहिले पाहिजे. पुणे शहराची मुळ शैक्षणिक व ऐतिहासिक ओळख जोपासत, शहराचा बकालपणा न वाढता शिक्षण पुरक व पर्यावरण पोषक वातावरणात शहराचा विकास होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
नारायण पेठेतील ‘प्रवास यशाचा अभ्यासिके’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी अभ्यासिका केंद्र संचालक श्री देवा आवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी धनंजय भिलारे, ॲड. स्वप्नील जगताप, गणेश शिंदे, राजेश सुतार, ऊदय लेले आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना तिवारी म्हणाले, शहरातील अभ्यासिकांची संख्या वाढणे हे पुणे ‘विद्येचे माहेर घर’ असल्याचे द्योतक आहे, मात्र ‘शैक्षणिक वातावरणास पोषक, संतुलित व पर्यावरणपूरक विकास पुणे शहरा करीता अत्यावश्यक आहे..
नानासाहेब पेशवे यांच्या व्दिशताब्दी जन्मसोहळ्या निमित्त जलकलश यात्रा प्रस्थान
पुणे ते वेणगाव रथयात्रेत रायगड आणि शनिवार वाडा येथील जलकलश ; इतिहास प्रेमी मंडळातर्फे आयोजन ; नानासाहेब पेशवे स्मारक समिती आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्यावतीने वेणगाव येथे भव्य सोहळा
पुणे : भारताच्या इतिहासात १८५७ च्या स्वातंत्र्य समराला विशेष महत्त्व आहे. या अखिल भारतीय संग्रामाचे नियोजन करण्यात सिंहाचा वाटा होता तो नानासाहेब पेशवे यांचा. त्यामुळे त्यांच्या व्दिशताब्दी जन्मसोहळ्या निमित्त पुणे ते वेणगाव अशी रथयात्रा काढण्यात आली. तसेच वेणगाव या त्यांच्या जन्मगावी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
इतिहास प्रेमी मंडळाने पुणे ते वेणगाव अशी नानासाहेब पेशवे रथयात्रा आयोजित केली होती. एसएसपीएमएस (श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन रथयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक रामवंशी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण, लहुजी वस्ताद सेनेचे सुखदेव अडगळे, मंडळाचे अध्यक्ष व इतिहास अभ्यासक मोहन शेटे, शाहीर हेमंत मावळे, कुंदनकुमार साठे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. रायगड व शनिवारवाडा येथील जलकलश पूजन यावेळी करण्यात आले.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, इतिहास पुनरुजीवित झाला की भारताचे पुनरुजीवन होते. आपल्याला आजपर्यंत खोटा इतिहास शिकवला गेला. छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे यांचा सखोल इतिहास शिकविला गेला नाही. त्यांच्या महान कार्याची जाणीव करून दिली गेली नाही. त्यामुळे अशा कार्यक्रमांतून अभिमान जागृतीचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहन शेटे म्हणाले, भारताच्या इतिहासात इंग्रजी साम्राज्या विरुद्ध भारतीयांनी १५० वर्ष केलेला स्वातंत्र्य संग्राम हे अभिमानास्पद पर्व आहे. त्यामध्ये १८५७ च्या स्वातंत्र्य समराला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतात एकाचवेळी विविध समाज घटकांनी उठाव करणे ही अभूतपूर्व घटना होती. त्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई, सेनापती तात्या टोपे, रंगो बापुजी गुप्ते अशा अनेकांनी नेतृत्व केले. मात्र या अखिल भारतीय संग्रामाचे नियोजन करण्यात सिंहाचा वाटा होता तो नानासाहेब पेशवे यांचा. त्यांची दूरदृष्टी, संघटन कौशल्य,धाडस , अविश्रांत परिश्रम करण्याची तयारी व प्रखर राष्ट्रभक्ती या गुणांमुळे हा संग्राम सर्वव्यापी होऊ शकला.
सनातन शास्त्र हे मानसिक विकार बरे करण्याचे शास्त्र-योगी निरंजन नाथ महाराज
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे आणि सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने पुणे कीर्तन महोत्सव : कीर्तन कोविद ह.भ.प. कमलाकरबुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार
पुणे : सनातन धर्मात केवळ माणसाचेच नव्हे तर प्राणीमात्राचेही कल्याण झाले आहे. सनातन धर्म मनुष्याला मनुष्यत्व प्रदान करतो. मानसिकता दृढ असेल, तर देवधर्माची आवश्यकता भासत नाही, कारण खरे संकट हे मानसिक असते. हे मानसिक विकार बरे करण्यासाठीचे जे शास्त्र आहे, ते सनातन शास्त्र आहे, असे मत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ महाराज यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे आणि सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने प.पू. जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभाशीर्वादाने आणि ह.भ.प किसन महाराज साखरे गौरवार्थ पुणे कीर्तन महोत्सवाचे आयोजन ऐतिहासिक लाल महालात करण्यात आले होते. महोत्सवाच्या समारोपात ह.भ.प. वामनबुवा कोल्हटकर यांना योगी निरंजननाथ महाराज यांच्या हस्ते कीर्तन कोविद ह.भ.प. कमलाकरबुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, ह. भ.प. मंगलमूर्ती औरंगाबादकर उपस्थित होते.
योगी निरंजन नाथ महाराज म्हणाले, कीर्तनकार शाहीर हे देवाचे मुख आहेत. लोकपरंपरा पुढे नेण्यासाठी शाहिरांचा जन्म झाला. आपल्या संस्कृतीची माहिती आपल्यालाच नसते आणि इथे हिंदू लोक कमी पडतात. हिंदू धर्म ग्रंथ संस्कृतीची कोणीही दीक्षा दिली नाही. त्यामुळे आपण परदेशी संस्कृतीच्या मागे लागतो, ही खंत आहे. फेसबुक, व्हॉटसअप पॉडकास्ट चे विद्यार्थी बनू नका, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वामन बुवा कोल्हटकर म्हणाले, कीर्तन ही अशी गोष्ट आहे जी लहान मुलांपासून शंभर वर्षांच्या माणसांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे. किर्तन हे सगळ्यांना उपयोगी पडते, हेच कीर्तनाचे वैशिष्ट्य आहे. अभ्यासपूर्ण कीर्तन करणारे कीर्तनकार वाढायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अक्षदा इनामदार यांनी आभार मानले. शाहीर हेमंतराजे मावळे यांनी प्रास्ताविक केले. शिरिष मोहिते यांनी आभार मानले.
निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने बॅलेट पेपरवर मतदानाच्या जनतेच्या मागणीची दखल घ्यावी, EVM थोपवू नये : नाना पटोले
मारकडवाडीप्रमाणे राज्यातील अनेक गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी ग्रामसभेचे ठराव.
मुंबई, दि. ८ डिसेंबर २०२४
राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन संस्थांनी या जनभावनेची दखल घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, माझे मत मी दिलेल्या उमेदवारालाच जाते का, यावर जर मतदारांना शंका असेल तर त्याचे समाधान झाले पाहिजे. मारकडवाडीतील लोकांनी बॅलेटपेपरवरील मतदानासाठी मॉक पोलिंग घेण्याचा निर्धार केला होता पण निवडणूक आयोग, पोलीस प्रशासनाच्या मदतीने सरकारने त्यांची मुस्कटदाबी केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. ७६ लाख मते कशी वाढली, याचे उत्तर निवडणूक आयोगाला द्यावे लागेल पण ते समाधानकारक उत्तर देत नाहीत. मतांची चोरी करणे हा लोकशाहीचा दिवसाढवळ्या केलेला खून आहे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारे असंतोष निर्माण झाला असेल तर त्याची दखल घ्यावीच लागले. विरोधी पक्ष या नात्याने आम्ही सभागृहात व रस्त्यावर जनतेच्या या मागणीसाठी लढू, असे पटोले म्हणाले.
सरकारने विधिमंडळाची परंपरा पाळावी…
विधानसभा अध्यक्षपद बिनविरोध करणे तसेच उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देणे ही महाराष्ट्राच्या विधिमंडळाची परंपरा आहे. दिल्ली विधान सभेत भाजपाचे फक्त तीन सदस्य असतानाही आम आदमी पक्षाने भाजपाला विरोधी पक्षनेतेपद दिले. मविआच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेते पद देण्यासंदर्भात चर्चा केली. सरकार त्यावर सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा आहे, असे नाना पटोले म्हणाले.
राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलीय;राजना सोबत घेतले तर महायुतीचे नुकसानचं होणार – रामदास आठवलेंचं वक्तव्य
मुंबई- लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतमनसेने ‘एकला चलो रे’चा नारा दिला. मात्र, मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणावर एकसारखे आहेत. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेता आले तर आम्ही प्रयत्न करू, असे वक्तव्य केले. यानंतर मनसे महायुतीत सहभागी होणार का? या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना डिवचले आहे.
रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे यांची हवा या निवडणुकीत गेली. आमच्याशिवाय सरकार येणार नाही, असे ते बोलले होते. त्यांच्या सभेला गर्दी होते, पण त्यांच्या जागा निवडून येत नाही. राज ठाकरे युतीत येतील असे मला वाटत नाही. मी आहे तर त्यांची गरज काय? असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
राज ठाकरे यांना सोबत घेणे योग्य ठरणार नाही. मुस्लिम विरोधी भूमिका घेणे योग्य नाही. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी आपले रंग बदलले. त्यांच्या पक्षाच्या झेंड्यात भगवा, निळा, हिरवा रंग होता. त्यांच्या झेंड्याचा रंग आता बदलला आहे. आता त्यांनी भगवा रंग हातात घेतला आहे. भगव्या रंगाचा अर्थ महान आहे. भाजपचा हिंदुत्वाचा नारा मुस्लिम विरोधी नाही. जे मुस्लिम पाकिस्तानला बळ देतात त्याच्या विरोधी आम्ही आहोत. मुस्लिम आपले बांधवच आहेत. योगीजी बोलले होते बटेंगे तो कटेंगे हा अर्थ असा की, मोदींना पाठिंबा देणारे एकत्र या, असेही रामदास आठवले यांनी म्हटले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार असल्याचे बोलले जात आहे. मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सीरियाचे राष्ट्रपती देशातून पळाले, लष्कर म्हणाले- त्यांची सत्ता संपली:लोकांनी राष्ट्रपती भवन लुटले
दमास्कस-सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद देश सोडून पळून गेले आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, असद देश सोडून जात असल्याची पुष्टी लष्कराने केली आणि राष्ट्राध्यक्षांची सत्ता संपुष्टात आल्याचे सांगितले. गेल्या 11 दिवसांपासून बंडखोर गट आणि लष्कर यांच्यात सीरियामध्ये कब्जा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू होता.
दरम्यान, रविवारी सकाळी बंडखोरांनी राजधानी दमास्कसमध्ये प्रवेश केला. असद यांनी देश सोडल्यानंतर सीरियाच्या पंतप्रधानांनी बंडखोरांच्या हाती सत्ता सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पीएम मोहम्मद गाझी अल जलाली यांनी एका रेकॉर्डिंगमध्ये म्हटले आहे की ते देशातच राहतील आणि सीरियातील लोक ज्याला निवडतील त्यांच्यासोबत काम करतील.
CNN च्या रिपोर्टनुसार, गेल्या एका आठवड्यात बंडखोरांनी सीरियातील चार प्रमुख शहरांवर कब्जा केला आहे. यामध्ये अलेप्पो, हमा, होम्स आणि दारा यांचा समावेश आहे.
बंडखोर सैनिकांनी ६ डिसेंबर रोजी ताब्यात घेतलेल्या दारा शहरातून राजधानी दमास्कसमध्ये प्रवेश केला आहे. दारा हे तेच शहर आहे जिथे 2011 मध्ये राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात बंडखोरी सुरू झाली आणि देशभरात युद्ध सुरू झाले. दारा ते राजधानी दमास्कसचे अंतर सुमारे 100 किमी आहे. स्थानिक बंडखोरांनी येथे कब्जा केला आहे.
त्याच वेळी अलेप्पो, हमा आणि होम्स इस्लामिक अतिरेकी गट हयात तहरीर अल-शामच्या ताब्यात आहेत. संघर्षामुळे आतापर्यंत 3.70 लाख लोक विस्थापित झाले आहेत. लोक असद सरकार पडल्याचा आनंद साजरा करत आहेत. लष्कराच्या टँकवर चढून आनंद साजरा करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
‘टोल’धाडी साठी भारतीयांनी मोजले अडीच लाख कोटी ! “टोल धाडी ” च्या कमाईची सुरस कथा
देशभरात सर्वत्र राष्ट्रीय महामार्ग उभारल्यानंतर त्याचा वापर केल्याबद्दल सर्व वाहन चालकांकडून , प्रवाशांकडून टोल वसुली केली जाते. या “”टोलधाडी” च्या माध्यमातून भारतीयांनी आजवर तब्बल 2.40 लाख कोटी रुपये मोजले आहेत. या “टोल धाडी ” च्या कमाईची सुरस कथा.
–लेखक:-प्रा.नंदकुमार काकिर्डे,लेखक पुणेस्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार असून बँक संचालक आहेत.
गेल्या पंचवीस तीस वर्षात विविध राज्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली. त्यांच्या उभारणीची, देखभालीची सर्व जबाबदारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ( एन एच ए आय) यांच्यावर सोपवली आहे. दळणवळणाच्या या महत्वाच्या विकासात्मक कामानंतर त्याचा वापर करणाऱ्या प्रवाशांकडून, वाहन चालकांकडून टोल वसुलीची “इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन” ( ईटीसी) यंत्रणा अनेक वर्षे आपल्याकडे अस्तित्वात आहे. फास्ट टॅग साठी रेडिया फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन ( आरएफआयडी) तंत्रज्ञान वापरले जाते. अर्थात भारतान टोल पद्धती नवीन नाही. 1950 पासून ती अस्तित्वात आहेत. टोलच्या रकमेतून रस्ते बांधणी व देखभाल खर्च उभा करावा अशी मूळ संकल्पना होती. देशात एकूण 599 राष्ट्रीय महामार्ग असून त्यापैकी 523 महामार्गावर टोल प्लाझा उभारलेले असून तेथे ईटीसी यंत्रणा कार्यरत आहे. राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी 1 लाख 32 हजार 500 किलोमीटर आहे. देशातील एकूण रस्त्यांच्या लांबीमध्ये राष्ट्रीय महामार्गाचा वाटा केवळ 2 टक्के आहे. त्यात अनेक द्रुतगती महामार्ग आहेत.आज देशाच्या विविध भागांमध्ये साधारणपणे 1040 पेक्षा जास्त टोल असून हे सर्व टोल अस्तित्वात आल्यापासून या सर्व टोलच्या कंत्राटदारांनी 2.40 लाख कोटी रुपयांची रक्कम टोल द्वारे वसूल केले असल्याचे लोकसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सांगण्यात आले. भारतातील सर्वात जास्त चाळीस पेक्षा जास्त टोल नाके तामिळनाडूत आहेत. टोल नाक्यात जमा होणारा पैसा हा पैसा केंद्र, राज्य व खासगी कंत्राटदार यांना मिळतो.
पूर्वी सर्व टोल नाक्यांवर वाहनांकडून रोख रकमेमध्ये टोल वसुली करण्यामध्ये खूपच वेळ जात असे, त्यात दिरंगाई होत असे, टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा पहावयास मिळत असत. त्यामुळे रोख भरणा करण्याला पर्याय म्हणून केंद्र सरकारने ‘फास्ट टॅग’ स्वयंचलित कार्यक्षम यंत्रणा २०१४ नंतर कार्यान्वित करून प्रत्येक वाहनाला ती अनिवार्य करण्यात आली. यामुळेच टोलचा महसूल दरवर्षी सतत वाढताना दिसत आहे. आजच्या घडीला देशभरात दहा कोटींपेक्षा जास्त ‘फास्ट टॅग’ वाहनांवर लावलेले आहेत.
गेल्या काही वर्षातील टोल धाडीच्या माध्यमातून वसूल केलेल्या रकमांचा आढावा घेतला तर यामध्ये सर्वाधिक टोल वसुलीचा मान हा उत्तर प्रदेशला जातो व त्या खालोखाल राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक टोल वसुली करण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आजच्या घडीला उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक म्हणजे 32 हजार 510 कोटी रुपये इतकी टोल वसुली करण्यात आली आहे. त्या खालोखाल राजस्थानमध्ये 29 हजार 808 कोटी रुपये तर महाराष्ट्र टोल वसुलीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात आजवर 25 हजार 929 कोटी रुपये टोल वसुली झालेली आहे. त्या खालोखाल ,गुजरात, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, तेलंगणा, बिहार, कर्नाटक, ओडिषा, हरियाणा, तमिळनाडू व छत्तीसगड या राज्यांचा क्रमांक लागतो. मात्र दिल्लीमध्ये सर्वात कमी टोल संकलन झाले असून ते आजवर फक्त 263 कोटी रुपयांच्या घरात आहे. राज्यांच्या तुलनेत विविध राष्ट्रीय महामार्गांचा व त्यावरील टोल नाक्यांचा अभ्यास केला असता सर्वाधिक टोलची कमाई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 यांनी केली असून तो सर्वात आघाडीवर आहे. दिल्ली पासून खाली दक्षिणेत चेन्नई पर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग असून त्याच्यावर आजवर 24 हजार 490 कोटी रुपये टोल वसुली झालेली आहे. त्या खालोखाल श्रीनगर ते कन्याकुमारी या मार्गावर असणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 याचा दुसरा क्रमांक लागतो.या महामार्गावर 23 हजार 70 कोटी रुपये टोल वसुली झालेली असून तिसरा क्रमांक कोलकत्ता ते चेन्नई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 चा असून त्यावर आत्तापर्यंत 21 हजार 282 कोटी रुपयांची टोल वसुली झालेली आहे. त्या खालोखाल पोरबंदर ते सिलचर या दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 27 वर 11 हजार 687 कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आला आहे. करोनाच्या काळामध्ये प्रवासावर बंदी होती. तसेच सर्व नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर बंधने लागू केलेली होती. त्यामुळे कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळामध्ये महसूल मोठ्या प्रमाणावर घटलेला होता. चालू आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबर 2024 अखेरपर्यंत अनेक टोल प्लाझांनी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवलेले आहे. या काळात हरयाणातील घरदुंडा ( Ghardunda) येथील टोलनाक्याने तब्बल 256 कोटी रुपयांचा रुपयांची वसुली केलेली आहे. त्या खालोखाल राजस्थानातील शहाजहानपूर येथे 224 कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आला होता. त्या पाठोपाठ गुजरातमधील भारथाना येथील टोल नाक्याचा क्रमांक लागतो. त्यांनी 223 कोटी रुपयांचा टोल जमा केला. पश्चिम बंगाल मधील जलधुलागोरी
(Jaladhulagori) टोल नाक्यावर 217 कोटी रुपयांचे संकलन झाले. त्यानंतर गुजरात मधील चोऱ्यासी ( Choryasi) टोल नाक्यावर 204 कोटी रुपये तर झारखंड मधील बाराजोर ( Barajore ) टोल नाक्यावर 202 कोटी रुपयांची कमाई झाली. 2023-24 या वर्षात सर्व टोलवरील महसूल 65 हजार कोटीच्या घरात जमा झाला. त्या मागील वर्षाच्या तुलनेत त्यात तब्बल 35 टक्के वाढ झालेली आहे. देशांतर्गत वाढत असलेल्या व्यापारी माल वाहतुकी पोटी व टोलच्या रस्त्यांचा झालेला विस्तार याला कारणीभूत ठरला आहे.,2019 नंतरच्या काळात टोल रस्त्यांची लांबी 75 टक्के वाढली असून सध्या 50 हजार किलोमीटर पेक्षा जास्त लांब महामार्ग झालेले आहेत. चालू वर्षात दरमहा सरासरी 6000 कोटी रुपयांचे टोल संकलन होत आहे हे लक्षात घेतले तर चालू आर्थिक वर्षात टोल संकलन 72 ते 75 हजार कोटींच्या घरात जाईल असा अंदाज आहे.
भारतात टोलद्वारे महसुल संकलन जरी अनेक दशके केले जात असले तरी त्यात अनेक गंभीर अडचणी आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महसुलाची गळती हा गंभीर प्रश्न आहे. अनेक वेळा टोल वसुल केलाच जात नाही. त्यामुळे या क्षेत्रात खासगी गुंतवणूक करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत नाही. फास्ट टॅग, ईटीसी सारखी टोल संकलनाची यंत्रणा कार्यान्वित असली तरी बहुतेक सर्व टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा, इंधनाचा जास्त वापर, हवेतील वाढते प्रदुषण, आणि सर्वार महत्वाचे म्हणजे प्रवांशाना प्रवास करताना अनेक वेळा हताश व्हायला होते. अनेक वेळा डिजिटल यंत्रणा न चालणे, कनेक्टिव्हीटीचे प्रश्न निर्माण होत असतात. तसेच प्रत्येक राज्यात टोलचा आकार किती असावा याबाबत कोठेही प्रमाणीकरण नाही. तसेच विविध महामार्गांवरही त्याच्या रचनेत तफावत आढळते. यामुळ अनेकदा प्रवासी वर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण होते तर अनेकदा गैरसोयीला सामोरे जावे लागते.
यामध्ये दरवर्षी 30 ते 35 टक्के वाढ होत असल्याचे दिसत आहे. नजिकच्या भविष्य काळात टोल संकलन बंद केले जाईल असे केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले होते. मात्र त्यादृष्टीने अद्याप काही हालचाल दिसत नाही. मात्र देशभरातील सर्व टोल नाके अत्यंत कार्यक्षम, पारदर्शकपणे व ग्राहकाभिमूख राहून चांगले काम कसे करतील यावर केंद्र सरकारचा भर दिसत आहे. एकंदरीत या ‘टोल धाडीतून”’ जनतेची सध्या तरी सुटका होण्याची चिन्हे नाहीत.
विजय मिळतो, तेव्हा ईव्हीएम चांगला, पराभवानंतर ईव्हीएमवर आरोप- एकनाथ शिंदे
मुंबई- तुम्हाला विजय मिळतो. तुम्हाला जागा जास्त मिळतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो. पराभव होतो. तेव्हा ईव्हीएम खराब असतो. सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत त्यांच्या बाजूने निकाल लागला तर यंत्रणा चांगली. विरोधात निकाल गेला तर कोर्टावरही आरोप केले, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला आहे.एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी झारखंड, कर्नाटकात मतदान झाले. लोकसभेत झाले. प्रियांका गांधीही पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. जेव्हा आपला पराभव होतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचे. जेव्हा जिंकतो तेव्हा बॅलेट पेपरची कोणी मागत नाही. हा दुटप्पीपणा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, घरी बसणाऱ्यांना लोकं मतदान करत नाही. काम करणाऱ्यांना, फिल्डवर असणाऱ्यांना मतदान करतात. लोकसभेत दोन लाखांचा फरक असून त्यांना जागा जास्त असून त्यांचे उमेदवार जास्त आले. विरोधीपक्षाकडे कोणताही मुद्दा राहिला नाही. मी म्हणालो होतो विरोधकांना लाडक्या बहिणी चार महिन्यात चीत करेल आणि तसेच झाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका जनतेने आमचं अडीच वर्षाचं काम पाहिलं. मी पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही वेगाने पूर्ण केले. लाडक्या बहिणीपासून अनेक योजना केल्या. त्याची पोचपावती मिळाली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनाला 73 लाख 67 हजार 673 मते मिळाली. आणि एनसीपीला 58 लाख 51 हजार 166 मते मिळाली. आम्हाला 73 लाख आणि एनसीपीला 58 लाख मते मिळाली. आम्हाला मिळाल्या 7 जागा आणि एनसीपीला मिळाल्या 8 जागा. मग तिथे ईव्हीएम घोटाळा झाला का हा माझा सवाल आहे.
श्रीपाल सबनीस यांच्या लिखाणात माता-पित्याच्या लढाऊ वृत्तीचा वारसा : डॉ. पी. डी. पाटील
वैचारिक लिखाण वाचत नसल्याने उपहास येतो जन्माला : कौतिकराव ठाले पाटील
मराठवाडा समन्वय समिती, पुणेतर्फे डॉ. श्रीपाल सबनीस यांचा अमृतमहोत्सवी सन्मान
पुणे : हैद्राबाद मुक्ती संग्रामात मोलाची भूमिका बजाविणारे आणि निजामाच्या अत्याचाराच्या विरोधात लढा देणारे मोहनराव सबनीस-पाटील यांच्या लढाऊ वृत्तीचा वारसा डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या लिखाणातून दिसून येतो, असे गौरवाद्गार 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी काढले. वैचारिक भूमिका घेऊन लिखाण करणाऱ्या लेखकांना आपण वाचत नाही त्यामुळे उपहास जन्माल येतो, अशी टिप्पणी करीत पुण्याचे साहित्यविश्व मराठवाडा सांभाळत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मराठवाड्याच्या भूमीत जन्माला आलेल्या व्यक्तीला पाठींबा देण्याची जबाबदारी उचलली अशी स्पष्टोक्ती प्रमुख अतिथी प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.
मराठवाडा समन्वय समिती, पुणेतर्फे 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि साहित्यिक विचारवंत प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांचा अमृत महोत्सवी सत्कार आज (दि. 8) डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षपदावरून पाटील बोलत होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाडा समन्वय समितीचे प्रमुख, कार्यक्रमाचे संयोजक राजकुमार धुरगुडे पाटील, ललिता सबनीस, सचिन ईटकर, संदीप तापकीर, डॉ. केशव देशमुख, शमसुद्दीन तांबोळी मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका राजकुमार धुरगुडे पाटील यांनी सुरुवातीस मांडली.
डॉ. सबनीस यांच्या बुलंद व्यक्तीमत्त्वाचा परिचय 89व्या साहित्य संमेलनात झाला असल्याचे सांगून डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, डॉ. सबनीस यांचे साहित्यविश्वासह सामाजिक क्षेत्रात स्थान मोठे आहे. विविध पैलूंवर त्यांनी केलेल्या लिखाणामुळे साहित्य क्षेत्राची समृद्धी वाढली आहे. संत साहित्यापासून ऐतिहासिक, सामाजिक विषयावर लिखाण करताना वर्ज मानला नाही. वैविध्यपूर्ण साहित्यकृतीसाठी प्रस्तावना लिहून त्यांनी नवलेखकांना प्रोत्साहित केले आहे.
प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, डॉ. श्रीपाल सबनीस हे निमाजाविरुद्ध लढा देणाऱ्या शूर माता-पित्याच्या पोटी आलेले असे हे लेखक आहेत. त्यांनी सबनीस-पाटील घराण्याचा इतिहास लिहिला असता तर मराठवाड्याचा इतिहास जगासमोर आला असता. साहित्य क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या साहित्यिकांच्या नावांची जंत्री सांगून पुण्याचे साहित्यविश्व मराठवाड्याच्या खांद्यावर आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर डॉ. सबनीस यांनी आपल्या लिखाणाचा बाज सोडून नवसाहित्यिकांना प्रस्तावनेच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या भूमिकेमुळे साहित्यासह सामाजिक क्षेत्रात त्यांची लोकप्रियता वाढली आहे, असे ठाले पाटील म्हणाले.
साहित्यातील वैचारिक लेखनावर, भूमिकेवर सामान्य माणूस प्रेम करतो याचे मोल माझ्या दृष्टीने खूप आहे, अशी विनम्र भावना व्यक्त करून सत्काराला उत्तर देताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, वैचारिक भूमिकेमुळे सर्व प्रवाहांशी नाळ जोडली गेली आहे. समाजाकडून मिळत असलेल्या प्रेमातून उतराई होणे शक्य नाही. सत्कार सोहळ्याच्या रूपाने ऋण व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. संत-महंत, महापुरूष यांच्या चांगुलपणाच्या बेरजेचा वारस व्हायचे आहे. शुद्ध समाजकारण आणि सत्याच्या पेरणीवर आपला विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. श्रीपाल सबनीस लिखित आणि दिलीपराज प्रकाशन प्रकाशित ‘बहुसांस्कृतिक साहित्य शोध’, ‘माझ्या निवडक संमेलनाध्यक्षीय भाषणाचे संचित’ आणि समकालीन प्रतिभावंतांच्या वाङ्मयाच्या इतिहास’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन याप्रसंगी झाले. या पुस्तकाविषयी डॉ. केशव देशमुख, प्रा. शमसुद्दीन तांबोळी आणि संदीप तापकीर यांनी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांचे स्वागत राजकुमार धुरगुडे पाटील, संदिपान पवार, अलका धुरगुडे पाटील, सुभाष गायकवाड, विलास राऊत, प्रभाकर चेडे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भागवत शेटे यांनी केले.
22 कॅरेड गोल्ड मेडलने डॉ. पाटील यांनी केला सन्मान
पिंपरी येथे झालेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. श्रीपाल सबनीस यांनी भूषविले. या संमेलनाच्या आयोजनाविषयी आणि संमेलनाध्यक्ष या नात्याने डॉ. सबनीस यांनी केलेल्या भाषणाची आठवण आजही होत आहे. याचा गौरवाने उल्लेख करून संमेलनाचे संयोजक डॉ. पी. डी. पाटील यांनी डॉ. सबनीस यांचा 22 कॅरेट गोल्ड मेडल देऊन तर ललिता सबनीस यांचा पैठणी देऊन सत्कार केला.
तुमच्याच गावात तुम्हालाच जमावबंदी, हा कुठला कायदा?ईव्हीएमवर आक्षेप,निवडणूक पद्धतीमध्ये बदल केलाच पाहिजे- शरद पवार
सोलापूर -लोकसभा, राज्यसभेत आम्ही पाहतोय की अनेक खासदार आम्हांला भेटतात आणि तुमच्या गावाची चर्चा करतात. सगळे खासदार आम्हाला विचारतात की हे गाव आहे कुठे. त्यामुळे गावाचे अभिनंदन आहे. ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात काही शंका निर्माण का झाली. तुमच्याच गावात तुम्हालाच जमावबंदी, हा कुठला कायदा? असा सवाल मारकडवाडीमध्ये शरद पवारांचा उपस्थित करत .शरद पवार म्हणाले की, जगातील मोठा देश अमेरिका आहे. अमेरिकेत मत मतपेटीत टाकलं जातं. दुसरा मोठा देश इंग्लंड. तिथेही मत मतपेटीत टाकले जाते. यूरोप खंडातील सर्व देश आपल्या सारखे ईव्हीएमवर जात नाही. अमेरिका आणि काही देशांनी ईव्हीएमचा निर्णय घेतला. पण नंतर त्यांनी बदलला. जग असं आहे. तर भारतातच का. आपल्याकडे संख्या आली. लोक अस्वस्थ आहेत. आत आपणही ही निवडणूक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे.
शरद पवार म्हणाले की, मारकडवाडीच्या आंदोलनामुळे EVM विरोधात देश पेटत आहे. तुम्हा सर्व ग्रामस्थाचे याबद्दल मी अभिनंदन करतो. निवडणुकीसंदर्भात लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. निकालच असे आलेत की लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. ग्रामस्थांना मतदानाच्या आकडेवारीवर शंका आहे. अमेरिकेसारख्या मोठ्या देशात बॅलेट पेपरवर मतदान होते, अनेक देशांनी EVM चा त्याग केला आहे.
शरद पवार म्हणाले की, काही निकालावर शंका व्यक्त केली जात आहे. निवडणूक प्रक्रियेबद्दल लोकांमध्ये शंका निर्माण झाली आहे. ह्या निवडणूक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. या निवडणुकीत काही तक्रारी येतात, कुठे पराभव होतो हे होत आहे. पण संपूर्ण राज्यात याबद्दल शंका निर्माण झाली आहे. काही निकाल असे आले की जनतेच्या मनात शंका निर्माण झाली पाहिजे.
उत्तम जानकर पुढे बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून पत्र घेणार असून येत्या दोन दिवसात मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असे जानकर यांनी मराठी वृत्त वाहिनीसोबत बोलताना म्हटले आहे. तर बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक निवडणूक घ्या, असे विनंती जानकर आयोगाला करणार आहेत. आयोगाने परवानगी दिली नाही, तर सुप्रिम कोर्टात जाणार असल्याचेही जानकरांनी म्हटले आहे.
उत्तम जानकर म्हणाले की, आमच्यावर प्रशासनाने दबाव वाढवला तेव्हा आदल्या दिवशी रात्री गावामध्ये लोकं मंडपात झोपले होते. सकाळी मतदानाच्या दिवाशी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी याबाबत माहिती घ्यायला गावात प्रतिनिधी पाठवले होते. माझ्या शपथेपेक्षा येथील लढाई महत्त्वाची आहे. मी राजीनामा देतो, बॅलेट पेपरवर मतदान घ्या.
राहुल नार्वेकर पुन्हा होणार विधानसभा अध्यक्ष
मुंबई-ठाकरेंच्या शिवसेनेपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेले,राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई असलेले ,कुलाब्यात नगरसेवक राहिलेले सुरेश नार्वेकर यांचे पुत्र विधिमंडळ सदस्य ॲड.राहुल नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.नार्वेकर यांचे संपूर्ण कुटुंब राजकारणाशी संबंधित आहे. भाऊ नगराध्यक्ष आहेत तर वहिनीही कफ परेडमधून भाजप नगरसेवक आहेत. राहुल नार्वेकर यांनी 2014 मध्ये त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली.2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना विधानसभेचे तिकीटही दिले आणि ते पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले.
राहुल नार्वेकर यांना यंदा मंत्रिपदाची आस होती. परंतू त्यांचे वकिली कौशल्य पाहता त्यांची विधीमंडळात सत्ताधारी पक्षाला मोठी गरज लागणार आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदाचा अर्ज भरण्यास सांगण्यात आले. राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपद सांभाळणार आहेत.
महायुतीकडे प्रचंड संख्याबळ असल्याने राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरची निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे. सध्या विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. राहुल नार्वेकर महाराष्ट्रातील कुलाबा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी शनिवारी विधानसभेत मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या काळातही त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली होती.
कुलाब्यात ते मोठ्या फरकाने जिंकले आहेत. त्यांना 81,085 मते मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार हिरा नावजी देवासी यांना 32,504 मते पडली होती. 2019 मध्ये राहुल नार्वेकरांनी काँग्रेसचे बडे नेते भाई जगताप यांचा पराभव केला होता. राहुल नार्वेकरांना 57,420 आणि भाई जगताप यांना 41,225 मते मिळाली होती.
लोकशाहीला संपूर्ण क्रांतीकडे नेले पाहिजे:कुमार प्रशांत
पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात हे शिबीर झाले.गांधी पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच जयप्रकाश नारायण यांचे सहकारी कुमार प्रशांत (जयप्रकाश नारायण व महात्मा गांधी यांचे आंदोलन ),महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी (गांधी आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक), साप्ताहिक ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ (युवकांसमोरील आव्हाने) या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ‘ ‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे १६ वे शिबीर होते.ज्ञानेश्वर मोळक यांनी स्वागत केले.अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले,सचिन पांडुळे यांनी सूत्रसंचालन केले.अजय भारदे, अरुणा तिवारी,तेजस भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
कुमार प्रशांत म्हणाले,’गांधीं बद्दल बोलणे म्हणजे वृद्ध माणसा बद्दल बोलणे, इतिहासाबद्दल बोलणे नव्हे. त्यांचे सर्व पुतळे वृद्धावस्थेतील आहेत.वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी दक्षीण आफ्रिकेत काय केले, तारुण्यात त्यांनी काय केले,हे आजच्या तरुण पिढीला कळले पाहिजे. वयाच्या २४ व्या वर्षी गांधीजीनी दक्षिण आफ्रिकेत जगाला सत्याग्रह हे लढाईचे हत्यार दिले.युध्द आणि बंदुकांच्या काळात त्यांनी सत्याग्रह हे शस्त्र यशस्वी करून दाखवले.अशा गांधींजींचे पुतळे उभारलेले दिसत नाहीत. शेवटपर्यंत लढत राहणे हा गांधीजींचा संदेश आहे. संघर्षातून समाज परिवर्तन हा त्यांच संदेश आहे. भेदभाव संपवणे हे त्यांचे ध्येय आहे. समानता हे ध्येय आहे. त्यामुळे गांधीजींची लढाई संपत नाही. सगळेच देश स्वतंत्र झाले.पण, मानवी मूल्यांचा आग्रह फक्त भारतीय स्वातंत्र्य लढयात धरला गेला.गांधीजींना हे श्रेय जाते.हे गांधी आपण समजून घेतले पाहिजेत.त्यांना आपल्या मनात, जीवनात प्रवेश दिला पाहिजे.
मी स्वतः जयप्रकाश नारायण यांच्यासमवेत कारागृहात गेलो आहे.ते एक विद्यापीठ आहे.आजच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन उभारले. त्यालाच सर्वोदय आंदोलन म्हटले गेले.जयप्रकाश नारायण यांनी लोकांमध्ये राहून लोकांना मजबूत करण्याचे काम केले. लोकतंत्र ला तंत्रलोक होऊ नये यासाठी त्यांनी योगदान दिले.लोकशाहीतून खऱ्या क्रांतीकडे गेले पाहिजे,हे गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनीच शक्य आहे.संपूर्ण क्रांती हे त्यांचे एकमेव उद्दीष्ट होते.लोकांना सक्रिय केले.लोक जागृत झाले पाहिजेत,असेही त्यांनी सांगितले.
भारतातील इलेक्ट्रिक वाहनउद्योग 2030 पर्यंत सुमारे चार कोटी रोजगार निर्मिती करेल- नितीन गडकरी
नागपूर-
भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग हा 2030 पर्यंत सुमारे 4 कोटी रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र राहणार असून लिथियमचे जगातील सुमारे 6 टक्के साठे हे जम्मू मध्ये सापडल्याने हे लिथियम आयन बॅटरीच्या स्वरूपात 60 कोटी इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरण्यात येईल त्याचप्रमाणे लिथियम आयन बॅटरीची किंमत सुद्धा किंमत कमी होईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे दिली . ते आज नागपूरच्या राजनगर स्थित केंद्रीय गृह मंत्रालयात अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय – एनएफएससी येथे ‘इलेक्ट्रिक वाहनातील आगीच्या दुर्घटनेचे व्यवस्थापन’ या विषयावर एका कार्यशाळेला त संबोधित करत होते. याप्रसंगी एनएफएससी नागपूरचे संचालक एन. बी. शिंगणे, उपस्थित होते.
यावेळी त्यांनी माहिती देताना सांगितले की गेल्या 3 वर्षांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांमध्ये 30 आग लागल्याच्या घटना घडल्या असून यामुळे ई व्हेईकलच्या बाजार व्यवस्थेवर परिणाम होत होता. परंतु रक्षा संशोधन विकास संस्था डीआरडीओ तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था – आयआयटी यांच्या तज्ञ कमिटीने बॅटरी सुरक्षा यावर संशोधन केले असून ऑटोमेटिव्ह इंडस्ट्रीज स्टॅंडर्ड अर्थात एआयएस या सुरक्षा मानांकनाने बॅटरी सुरक्षा सुनिश्चित केली असून इलेक्ट्रिक बसेस मध्ये फायर डिटेक्शन अलार्म सुद्धा आपण आता अनिवार्य केला असल्याचे त्यांनी सांगितलं.
ईव्ही बॅटरी वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भातील नियम केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 2022 लाच आखले असून या संदर्भात बॅटरी रिकव्हरी आणि रिसायकलिंग व्यवस्थापनाकरिता बॅटरी उत्पादकांवर हे नियम बंधनकारक केले असल्याचं गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं .हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजी, इलेक्ट्रिक हे भविष्यातील इंधन असून यां इंधनाच्या वापराने किफायतशीर प्रदूषण मुक्त असे इंधन उपलब्ध होऊन यामुळे सुरक्षित परिवहन सुनिश्चित होणार आहे. शेतातील तणस, परळी ऊसाची मळी यापासून बायो सीएनजीच्या निर्मितीचे 400 प्रकल्प मंजूर झाले असून त्यापैकी 60 प्रकल्प सध्या सुरू झाली असून भंडारा जिल्ह्यात सुद्धा राईस हस्क पासून बायो सीएनजीचा प्रकल्प चालू झाला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
सुमारे 30 लाख इलेक्ट्रिक वाहने नोंदणीकृत असून 2023 – 24 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये 45% वाढ झाली असून 2024 मध्ये एकूण बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण हे 6.4% आहे .इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये 56% विक्रीचे प्रमाण हे इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच असल्याचे देखील त्यांनी सांगितलं. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामध्ये 400 हून अधिक जास्त स्टार्टअप निर्माण झाले असून 2025 पर्यंत हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेतील प्रमाण हे 8 टक्के पेक्षा जास्त होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
