दमास्कस-सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद देश सोडून पळून गेले आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, असद देश सोडून जात असल्याची पुष्टी लष्कराने केली आणि राष्ट्राध्यक्षांची सत्ता संपुष्टात आल्याचे सांगितले. गेल्या 11 दिवसांपासून बंडखोर गट आणि लष्कर यांच्यात सीरियामध्ये कब्जा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू होता.
दरम्यान, रविवारी सकाळी बंडखोरांनी राजधानी दमास्कसमध्ये प्रवेश केला. असद यांनी देश सोडल्यानंतर सीरियाच्या पंतप्रधानांनी बंडखोरांच्या हाती सत्ता सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पीएम मोहम्मद गाझी अल जलाली यांनी एका रेकॉर्डिंगमध्ये म्हटले आहे की ते देशातच राहतील आणि सीरियातील लोक ज्याला निवडतील त्यांच्यासोबत काम करतील.
CNN च्या रिपोर्टनुसार, गेल्या एका आठवड्यात बंडखोरांनी सीरियातील चार प्रमुख शहरांवर कब्जा केला आहे. यामध्ये अलेप्पो, हमा, होम्स आणि दारा यांचा समावेश आहे.
बंडखोर सैनिकांनी ६ डिसेंबर रोजी ताब्यात घेतलेल्या दारा शहरातून राजधानी दमास्कसमध्ये प्रवेश केला आहे. दारा हे तेच शहर आहे जिथे 2011 मध्ये राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात बंडखोरी सुरू झाली आणि देशभरात युद्ध सुरू झाले. दारा ते राजधानी दमास्कसचे अंतर सुमारे 100 किमी आहे. स्थानिक बंडखोरांनी येथे कब्जा केला आहे.
त्याच वेळी अलेप्पो, हमा आणि होम्स इस्लामिक अतिरेकी गट हयात तहरीर अल-शामच्या ताब्यात आहेत. संघर्षामुळे आतापर्यंत 3.70 लाख लोक विस्थापित झाले आहेत. लोक असद सरकार पडल्याचा आनंद साजरा करत आहेत. लष्कराच्या टँकवर चढून आनंद साजरा करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.