पुणे-केळेवाडीतील साहिल जगतापला पकडून त्याच्या कडून ३ लाख १४ हजाराचा गांजा आणि इतर ऐवज अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे. यापाराक्र्णी पोलिसांनी सांगितले कि,’
दि.१३/१२/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करण्याकरीता अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच लोणीकाळभोर पो रटे कडील सपोनि शिवशांत खोसे व पोलीस अंमलदार लोणीकाळभोर पो. स्टे कार्यक्षेत्रात पेट्रोलींग करीत असताना दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील पोलीस अंमलदार मारुती पारधी यांना प्राप्त झालेल्या माहितीचे अनुषंगाने लोणी टोलनाका जवळ, रेड्डी हॉटेल शेजारी, सार्वजनिक रोडवर, पुणे सोलापुर रोड, पुणे या ठिकाणी सापळा रचुन साहिल विनायक जगताप वय २८ वर्षे, रा. हनुमान नगर, साईबाबा मंदिरा जवळ, केळेवाडी, कोथरुड पुणे यास ताब्यात घेतले असता, त्याची व त्याचे ताब्यातील सॅकबॅगचे झडतीमध्ये कि.रु.३,१३,८४०/- चा १४ किलो १८२ ग्राम गांजा अंमली पदार्थ व इतर ऐवज बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द लोणीकाळभोर पोलीस ठाणे, पुणे याठिकाणी एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर, शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पो आयुक्त, गुन्हे १, गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सपोनि शशिकांत खोसे, तसेच पोलीस अंमलदार मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, सुजित वाडेकर, योगेश मोहिते, बांगर, भगत यांनी केली आहे.
केळेवाडीतील साहिल जगतापला पकडून ३ लाखाचा गांजा हस्तगत:अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेची कारवाई
पुणे ग्रामीण जिल्ह्यात २७ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
पुणे दि. १३: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी २७ डिसेंबर २०२४ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही.
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना १९५१ च्या कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान
पुणे, दि. १३ : जिल्ह्यात पौड, लोणावळा व हवेली पोलीस ठाणे हद्दीत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी तसेच १ जानेवारी २०२५ रोजी विजयस्तंभ पेरणे फाटा येथे मानवंदना देण्यासाठी विविध ठिकाणाहून बहुसंख्य अनुयायी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देखमुख यांनी २५ डिसेंबर रोजी ००.१० वाजेपासून ते ७ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत (२४.०० वा.) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराअंतर्गत सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना अधिकार प्रदान केले आहेत.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी. कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होवू देणे यासाठी योग्य ते आदेश देण्याचे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत.
याशिवाय सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनिपेक्षकाचा (लाऊडस्पीकर) उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देण्याबाबतचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत.
सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देण्याचे अधिकारदेखील प्रदान करण्यात आले आहेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000
मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी अश्विनी भिडे
मुंबई- राज्य सरकारने उच्चपदस्थ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढत त्यांना तत्काळ आपल्या नव्या नियुक्तीचा पदभार सांभाळण्याचे निर्देश दिलेत.आयएसएस अधिकारी अश्विनी भिडे यांच्याकडे सध्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी शुक्रवारी एका विशेष आदेशांद्वारे त्यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्याचे आदेश काढले.
व्ही. राधा यांनी यासंबंधीच्या आदेशात म्हटले आहे की, प्रिय श्रीमती अश्विनी भिडे, शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती मा. मुख्यमंत्री यांचेच प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई या पदावर श्री. ब्रिजेश सिंह, भापोसे यांच्या जागी केली आहे. तरी आपण नवीन पदाचा कार्यभार श्री. ब्रिजेश सिंह, भापोसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा. तसेच पुढील आदेश होईपर्यंत आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभारही आपण धारण करावा.
…अश्विनी भिडे ह्या 1995 च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. त्यांना सनदी सेवेतील जवळपास 25 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत राज्यभर विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विभागीय अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अतिरिक्त आयुक्तपद, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या त्यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी आहे.
EVM व्हेरिफिकेशन: सुप्रीम कोर्ट म्हणाले- याचिका आमच्याकडे का आणली; ज्या खंडपीठाने निर्णय दिला तेच ऐकतील
नवी दिल्ली-
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) पडताळणीसाठी धोरण तयार करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जुन्या खंडपीठाकडे पाठवली, जे या प्रकरणी निर्णय देईल. ही याचिका आमच्याकडे का आणण्यात आली, त्यावर जुन्या खंडपीठाने सुनावणी करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
26 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जुन्या बॅलेट पेपरचा वापर करून निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. कोर्टाने आपल्या निर्णयात ईव्हीएममधील बिघाडाचे आरोप निराधार ठरवत ईव्हीएम सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. यामुळे बूथ कॅप्चरिंग आणि बनावट मतदान थांबले आहे.SC ने निवडणूक निकालांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांना प्रत्येक विधानसभेच्या 5% EVM च्या मायक्रोकंट्रोलर चिप्सची चाचणी घेण्याची परवानगी दिली आहे.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांनी अपीलार्थी, हरियाणाचे माजी मंत्री करणसिंग दलाल आणि पाचवेळा आमदार लखन कुमार सिंगला, गोपाल शंकरनारायणन यांच्या वकीलांना हा आदेश दिला.ते म्हणाले की, कलम 32 अंतर्गत याचिकेत केलेल्या मागणीसाठी 26 एप्रिल रोजी दिलेल्या पूर्वीच्या खंडपीठाच्या निर्णयाची आवश्यकता आहे.
दलाल आणि सिंगला यांना आपापल्या विधानसभांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाली. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपीएटी आणि सिम्बॉल लोडिंग युनिट या ईव्हीएमच्या 4 घटकांची मूळ बर्न मेमरी आणि मायक्रोकंट्रोलर तपासण्यासाठी धोरण तयार करण्याच्या सूचना त्यांनी निवडणूक आयोगाकडे (EC) मागितल्या.ते म्हणाले की, याचिकेत निवडणूक निकालांना आव्हान दिलेले नसून ईव्हीएम तपासण्यासाठी मजबूत यंत्रणा असावी अशी मागणी केली आहे.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक विधानसभेच्या 5 टक्के ईव्हीएमची चाचणी त्या बनवणाऱ्या कंपनीच्या अभियंत्यांनी करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.या निकालाला आव्हान देणाऱ्या स्वतंत्र याचिका पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला आठ आठवड्यात तपास प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.हरियाणामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 90 पैकी 48 जागा जिंकल्या.
कॉंग्रेस पक्षाच्या पराभवाची जबाबदारी नाना पटोलेंचीच, वडेट्टीवार यांनी थेट डागली तोफ
महाविकास आघाडीतील जागा वाटपातील वाटाघाटी आणि काही महत्त्वाच्या जागा मित्र पक्षाला सोडण्यात आल्याने राहुल गांधी यांनी पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. नंतरच्या बैठकांची जबाबदारी पटोले यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली होती.
मुंबई-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उचलबांगडी होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या काँग्रेसच्या गोटात रंगली आहे. नव्या अध्यक्षाची चाचपणी करायला काँग्रेसचे प्रदेश प्रभारी नागपूर येत असल्याचे सांगितले जात आहे. नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले जाईल अशीही चर्चा सुरू आहे. या सर्व घडामोडींवर माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रोखठोक मत व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय प्रदेशाध्यक्षांना देण्यात आले होते. त्यांच्यावरच विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबादार येईल, असे सांगून त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टार्गेट केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले होते. त्याचे सर्व श्रेय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः घेतले होते. त्यामुळे सहाजिकच पराभवाची जबाबदारी त्यांच्यावरच येणार आहे. पराभवाची कारणे, चुका, नेतृत्वा विषयी मत जाणून घेण्यासाठी प्रभारी रमेश चेन्निथाला नागपूरला येणार आहेत. ते सर्वांसोबत चर्चा करतील. या चर्चेतून जो सूर निघेल त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
मात्र चर्चेत कोण सहभागी होतात, काय मत नोंदवतात यावरच सर्व अवलंबून असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेसचे सध्या फक्त १६ आमदार आहेत. त्यांच्या भरोशावर महाराष्ट्रात पुन्हा पक्ष उभारणे, बांधणी करणे मोठे आव्हान आहे. त्यामुळे पक्षाची धुरा कोणाच्या हातात द्यावी याची चाचपणी व चर्चा होणे आवश्यक असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. हे सांगताना वडेट्टीवारांचा सर्व रोख आणि रोष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे होता.
पटोले यांना बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र लोकसभेत मोठे यश मिळाल्याने पटोले यांच्यावरच पक्षश्रेष्ठींनी विश्वास दर्शवला होता. त्यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढण्याचे निर्देशही राहूल गांधी यांनी दिले होते.
अभिनेता अल्लू अर्जुनला 14 दिवसांची कोठडी
चेंगराचेंगरीत मृत्यूप्रकरणी 4 तासांपूर्वी झाली होती अटक, पीडित व्यक्ती खटला परत घेण्यास तयार
पुष्पा-2’च्या प्रीमियरदरम्यान एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी हैदराबाद कोर्टाने अभिनेता अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या अभिनेत्याला शुक्रवारी सकाळी 12 वाजता त्याच्या घरातून अटक करण्यात आली. यानंतर त्याला ४ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले.
अल्लू 4 डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये न कळवता पोहोचल्याचा आरोप आहे. त्यामुळे तेथे जमाव जमा झाला आणि चेंगराचेंगरी झाली. अनेक जण जखमी झाले.या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापन अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, महिलेच्या मृत्यूप्रकरणी दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यासाठी अभिनेत्याने उच्च न्यायालयात अपील केले आहे.
अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमनेही महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला होता. अभिनेत्याने मृत रेवतीच्या कुटुंबाप्रति शोक व्यक्त केला आणि त्यांची भेट घेतली. अभिनेत्याने 25 लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासनही दिले होते.
दरम्यान अल्लू अर्जुनने आपल्या अटकेच्या पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. पोलिसांनी त्याला नाश्ता पूर्ण करू दिला नाही, असा दावा अभिनेत्याने केला आहे. कपडे बदलण्याचीही परवानगी दिली नाही.
एका व्हिडिओमध्ये अभिनेता घरातून खाली येतो आणि पार्किंगमध्ये येतो. तिथे त्याचे सर्व्हंट धावत येतात आणि चहा-पाणी देतात. व्हिडिओमध्ये तो चहा पिताना दिसत आहे. यावेळी त्याची पत्नी स्नेहा रेड्डी दिसत आहे. अल्लू त्याच्या पत्नीला समजावतो. यानंतर पोलीस त्याला सोबत घेऊन जातात.
दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आले पाहिजे- सुनंदा पवार
:सत्तेसोबत जायचे का नाही हे नेते ठरवतील, तरुणांना संघटनेत जबाबदारी द्यावी
पुणे-मूठ घट्ट असली की ताकद रहाते, आपण जर विखुरलेले राहू तर ताकद राहणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले पाहिजे. कुटुंब म्हणून एकत्र राहण्याची गरज आहे, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केले आहे.सुनंदा पवार पुढे बोलताना म्हणाल्या की, अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येण्याबद्दल निर्णय घ्यायला हवा. नवे उमदे जे आमदार निवडून आले आहे, त्यांना जर पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर पक्ष लवकर उभारू शकतो.
सुनंदा पवार म्हणाल्या की, अजित पवारांनी काल जी शरद पवार यांची भेट दिली ती राजकीय नाही तर कौटुंबिक होती. हा केवळ कौटुंबिक प्रसंग आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने ही भेट झाली ते नेहमीच होते, असे मला वाटते. ते केवळ शुभेच्छा देत आशीर्वाद घेण्यासाठी तिथे आले होते.सुनंदा पवार म्हणाल्या की, अजितदादा काही बोलले कुणाला भेटले, कुठे गेले तर त्यांची बातमी होते. पण मला त्या भेटीत बातमी सारखे काही वाटत नाही. कुटुंबामध्ये मतभेद असतात, सर्वच कुटुंबामध्ये मतभेद असतात. मतभेद संपवून पुढे एकत्र येतील असे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे. शरद पवार यांनी 60 वर्षे राजकारण केले आहे. त्यांनी काय करावे यावर मी बोलू शकणार नाही.सुनंदा पवार म्हणाल्या की, जे तरुण आमदार निवडून आले आहे, त्यांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली पाहिजे. त्यांना पक्षात जबाबदारी दिली तर हा पुन्हा चांगल्या प्रकारे उभा राहू शकतो. नव्या चेहऱ्यांना जर संधी दिली तर लवकर पक्ष संघटना मजबूत होण्यासाठी फायदा होईल. रोहित पवारांना काय संधी द्यायची याबाबत सर्व अंतिम निर्णय शरद पवारांचा आहे.
मणिपूरप्रमाणे बांगला देशातील हिंदुवरील अत्याचार 56 इंच छातीच्या विश्र्वगुरूना दिसत नाही काय?
मुंबई- बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर काही तरी भूमिका घ्यावी. भाजपचे हिंदुत्व हे केवळ मतापुरते मर्यादित आहे का?, हिंदूंना घाबरुन मते घ्यायची एवढंच त्यांना जमते. बांगलादेशासह मुंबईतही मंदिर सेफ नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला लगावला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बांगलादेशातील गोर-गरीब हिंदूंवर अत्याचार होत आहे. मुंबईतील दादरमधील हनुमानाचे मंदिर रेल्वे प्रशासन पाडायला निघाले आहेत, आता भाजपचे हिंदुंत्व कुठे गेले? हिंदुंच्या मतावर निवडून आले तर मंदिरे वाचवण्यासाठी काय करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, महायुतीचे केवळ फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. त्यांना अजून किती राक्षसी बहुमत पाहिजे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. सत्तेचा विस्तार हेच भाजपचे स्वप्न आहे का असा सवालही त्यांनी विचारला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असेल तर त्या संघासोबत खेळणं कितपतयोग्य आहे असे आदित्य म्हणाला होता. पण त्यावर उत्तर नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. सत्ताधारी आणि विरोधक देशाच्या दृष्टीने विषय मांडत आहेत. सत्ताधारी उत्तर देत आहे. असं म्हणतात. पण दुर्देवाने असं होत नाही. महत्त्वाच्या विषयांना बगल देऊन चर्चा नको त्या दिशेने भरकटवली जात आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी तमाम हिंदूंतर्फे पंतप्रधान मोदींना विनंती आहे की जसे आपण एका फोनवर युक्रेनचे युद्ध थांबवले होते तसेच बांगलादेशात जे काही हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याबद्दल भूमिका घ्यायला पाहिजे. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. इस्कॉनचे मंदिर जाळण्यात आले. त्यांच्या प्रमुखांना अटक झाली तरीही गप्प आहोत. हिंदूंवर अत्याचार होऊनही गप्प आहोत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, नुसतं इथे बटेंगे, कटेंगे, फटेंगे वगैरे करुन उपयोग नाही. जिथे काही नाही तिथे छाती फुगवून दाखवू नका. जिथे अत्याचार होत आहेत त्यांना धमक दाखवण्याची गरज आहे. आमच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्यांना ती नाकारण्यात आली. मी सांगितले होतं की रितसर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र द्यावे. कारण त्यांच्यामागे खूप व्याप आहेत. जगभरात फिरायचे असते, भाषणे द्यायची असतात. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार त्यांच्या लक्षात आले नसतील. मणिपूरचे अन्याय कळले नाहीत तसंच हिंदूंवरचे अत्याचार कळले नसतील.
अदानींच्या घरी भाजप – पवार गटाच्या नेत्याची बैठक
नवी दिल्ली–शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल भाजप नेते अमित शहा आणि उद्योजक गौतम अदानी यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यानंतर भाजप शरद पवारांना सोबत घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.दरम्यान उद्योजक गौतम अदानी यांच्या घरी भाजपच्या केंद्रीय नेत्याची आणि राष्ट्रवादीचा नेता भेटला अशी बातमी एका मराठी वृत्तवाहिनीने दिली. यामुळे आता या सर्व चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर शरद पवार गटाचे मेहबुब शेख यांनी हे वृत्त निराधार असल्याचे सांगत फेटाळले आहे.
शरद पवार यांना सोबत घेण्यासाठीच महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाहीये अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्ताराप्रकरणी पवारांशी चर्चा केल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी प्रवीण दरेकरांनी शरद पवार गटाचे आमदार-खासदार सत्तेत राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहू शकतात असे म्हटले होते. त्यानंतर आता या चर्चेने जोर धरला आहे.
अजित पवार म्हणाले की, शरद पवारांशी मंत्रिमंडळ विस्तार, परभणीतील अशांतता या विषयांवर चर्चा केली. राजकारणापलिकडील नाती जपण्यासाठी मी आणि माझे सहकारी आलो होतो. तर 13 डिसेंबरला प्रतिभाकाकींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठीही येणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे आज पुन्हा अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी जाणार असल्याने या चर्चांनी जोर धरला आहे.
2014 साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात स्थिर सरकार यावे, असं म्हणत शरद पवार यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यावेळी भाजपला सर्वाधिक 123 जागा तर शिवसेनेला 63, काँग्रेसला 42 आणि राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या होत्या. भाजपला सत्ता स्थापनेसाठी 22 जागा कमी पडत होत्या. यातच भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी मविआतील आमदार-खासदार पुढील राजकीय भवितव्याचा विचार करत हालचाली करत आहेत, असे सूचक वक्तव्य केल्याने शरद पवार स्वत:च भूमिका घेणार आहेत का त्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
देशाच्या अन् राज्याच्या राजकारणात 2029 पर्यंत आता कोणती मोठी निवडणूक होण्याची चिन्हे दिसून येत नाही. कारण महाराष्ट्रात भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत आहे. तर केंद्रातील सरकारही आता बऱ्यापैकी स्थीर असल्याचे दिसून येते. पण लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. बहुमताच्या आकड्यापेक्षा (272) ही संख्या 32 कमी आहे. एनडीएकडे भाजपशिवाय 14 मित्रपक्षांचे 53 खासदार आहेत. सर्वांना मिळून एनडीएने 293 जागा आहेत. यात चंद्राबाबूंचा टीडीपी 16 जागांसह आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि नितीश यांचा जेडीयू 12 जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. या दोन पक्षांच्या पाठिंब्यावर सध्या केंद्र सरकार दिसून येत आहे. यामुळे राज्यात ऑपरेशन लोटस होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशात जर काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही खासदार भाजपसोबत आले तर त्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. यामुळे या चर्चांना बळ आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अनेक आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांना साथ दिली. यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांचे 41 आमदार निवडून देखील आले. तर शरद पवार गटाचे केवळ 10 आमदार निवडून आले आहे. सत्ता नसताना लोकप्रतिनिधी जपण्यासाठी अन् पक्षाच्या भवितव्यासाठी शरद पवार हा निर्णय घेऊ शकतात असे चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत 10 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यापैकी 8 जागांवर त्यांच्या पक्षाने तुतारी या चिन्हावर विजय मिळवला आहे. यात अनेकांनी भाजपच्या दिग्गजांचा पराभव केला आहे. यात बारामतीमधून सुप्रिया सुळे, माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील, दिंडोरीतून भास्कर भगरे, शिरुरमधून अमोल कोल्हे, बीडमध्ये बजरंग सोनावणे, वर्धांचे अमर काळे, अहमदनगरातून नीलेश लंके, भिवंडीतून सुरेश म्हात्रे विजयी झाले.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागांवर उमेदवार उभे करत 8 जागांवर विजय मिळवला होता. मात्र, अवघ्या 6 महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावे लागले. यात प्रदेशाध्यक्ष इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील, तासगावचे रोहित पाटील, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, बीडचे संदीप क्षीरसागर, मुंब्रातून जितेंद्र आव्हाड, वडगाव शेरी बापूसाहेब पठारे, करमाळ्यातून नारायण पाटील, माळशिरसमधून उत्तमराव जानकर, मोहोळचे राजू खरे, माढ्याचे अभिजीत पाटील यांनाच विधिमंडळात जाता आले.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या पक्षाचे नेते अनिल पाटील यांनी दावा केला होता की, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात, 4 महिन्यात रिझल्ट दिसेल, आश्चर्य वाटू देऊ नका, यामुळे तेव्हाही या वक्तव्याची मोठी चर्चा 15 दिवसांपूर्वी झाली होती.
अजित पवार- शरद पवार भेटीविषयी अनेक तर्क लावले जात आहेत. त्यातील काही असे. लोकसभेतील पराभवाची परतफेड अजित पवारांनी विधानसभेत केली. आता त्यांनी डॅमेज कंट्रोलसाठी पावले उचलण्याचे ठरवले असावे. त्याला अर्थातच शरद पवारांची संमती मिळाली आहे.
अजित पवारांनी भाजपला अप्रत्यक्षपणे संदेश दिला आहे की, भविष्यात भाजपने त्यांना सोडले तर ते पुन्हा काकांसोबत जाऊ शकतात.
मविआचे खरे अस्तित्व शरद पवारांमुळेच आहे. या भेटीमुळे उद्धव ठाकरेंना काका-पुतण्याच्या एकत्र येण्याची भीती वाटणार आहे. असे झाल्यास महाविकास आघाडी कमकुवत होऊ शकते.
गरज पडल्यास शरद पवार यांच्याशी थेट राजकीय संवाद साधण्यासाठी अजित पवार यांच्या रूपाने भाजपला मोठा पर्याय मिळाला आहे.
लोकसभा, विधानसभेला पवार कुटुंबात निर्माण झालेली कटुता कमी होईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची दाट शक्यता आहे. कारण या निवडणुकीत महायुतीमध्ये सामील असलेले पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत, असे म्हटले जात आहे.
दरेकर यांचे सूचक विधान
भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, मविआतील आमदार-खासदार पुढील राजकीय भवितव्याचा विचार करत हालचाली करत आहेत. केंद्रात भाजप युतीचे आणि राज्यात भाजपा महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह, विकास या मुद्द्यावर शरद पवारांच्या पक्षातील लोकप्रतिनिधी आमच्यासोबत येण्याचा विचार करू शकतील.
पुण्यात रात्री गोळीबार.. वाघोलीतील आर्यन बार जवळील प्रकार
पुणे: पुण्यात एका तरुणाने दारू चक्क पिऊन हवेत गोळीबार केला आहे. वाघोली परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.महत्त्वाचे म्हणजे या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल कोलते असं या आरोपी तरुणाचे नाव आहे. गुरुवारी त्याचा मित्र संदीप हरगुडे याला रुग्णवाहिकेतून व्यसनमुक्ती केंद्रात नेण्यात येत होते. यावळी विशालने त्याला विरोध केला. त्याला व्यसनमुक्ती केंद्रात नेऊ नये, अशी मागणी त्याने केली.विशालच्या विरोधानंतरही व्यसनमुक्ती केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी संदीपला जबरदस्तीने रुग्णवाहिकेत बसवले. त्यावेळी संतापलेल्या विशालने त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी फायर केली. तसेच दगडाने रुग्णावाहिकेच्या काचाही फोडल्या. अखेर संदीपला रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आलं.
या घटनेनंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपी विशाल कोलते याला ताब्यात घेतले. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच यावेळी संदीप आणि विशाल दोघेही दारु प्यायला होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.दरम्यान, याप्रकरणी आता पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर रुग्णवाहिका पेटवली अशी अफवाही पसरवण्यात आली होती. मात्र, या कोणतीही तथ्य नसल्याने पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
संदीप हरगुडे रा. केसनंद गाव,तालुका हवेली जिल्हा पुणे आणि विशाल कोलते रा. बकोरी गाव. तालुका हवेली जिल्हा पुणे हे दोघे विशाल कोलते याचे आर्यन परमिट बार बकोरी येथे दारू पित असताना त्यांचेमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद होऊन रागात विशाल कोलते याने स्वतः जवळील पिस्टल मधून जमिनीवर फायर केला आहे. कोणतीही जीवित हानी नाही. विशाल कोलते हा सध्या वाघोली पोलिसांचे ताब्यात आहे. अशीही माहिती रात्री पोलीस सूत्रांनी दिली होती.
ओंकरेश्वर मंदिर ते रिद्धेश्वर-सिद्धेश्वर घाटाला जोडणारा जुना पूल (काॅजवे) अखेर पाडणार
पुणे:मुठा नदीपात्रात तब्बल ५५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला ओंकरेश्वर मंदिर ते रिद्धेश्वर-सिद्धेश्वर घाटाला जोडणारा जुना पूल (काॅजवे) अखेर पाडण्यात येणार आहे. हा पूल धोकादायक झाला असून, पावसाळ्यात मुठा नदीपात्रातील पाण्याला हा पूल अथडळा ठरत आहे.
या बाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रकल्प विभागाने शहर सुधारणा समितीत ठेवला आहे.
स्थायी समिती आणि मुख्यसभेची मान्यता घेऊन हे काम केले जाणार आहे. या पुलाची लांबी ५० मीटर, तर रुंदी अवघी ४.७ मीटर आहे. या पुलाचा वापर स्थानिक नागरिक नदी ओलांडणे, वाहने धुणे, मासे पकडणे, प्राण्यांची स्वच्छतेसाठी करतात. वाहतुकीसाठी या पुलाचा वापर होत नाही. मात्र, दरवर्षी या पुलामुळे जलपर्णी आणि कचरा अडकला जातो. हा पूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरक्षित नाही. त्यावर वारंवार खड्डे पडत असून त्याच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या पुलाचे आॅडिट केले होते.
त्यात या पुलाची दुरुस्ती केल्यास ३९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. दुरुस्तीनंतर त्याचे आर्युमान केवळ ८ वर्षे वाढणार आहे. मात्र, त्याचा वापर केवळ दुचाकीसाठी होणार आहे. या पुलाच्या बांधकामानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल आणि जयंतराव टिळक पूल बांधण्यात आला. हे दोन्ही पूल वापरत असल्याने तसेच दुरुस्तीनंतर “काॅजवे’चा फारसा वापर होणार नसल्याने हा पूल पाडला जाणार आहे.हा पूल पाडल्यानंतर त्याचा फायदा महापालिकेच्या नदीकाठ विकसन प्रकल्पासह पूरस्थितीच्या काळातही होणार आहे. नदीत सर्वांत कमी उंची असलेल्या या पुलाच्या खांबाला जलपर्णी तसेच कचरा अडकतो. परिणामी, पावसाळयात पाण्याला मार्ग मिळत नाही. त्यामुळे नदीतील अडथळे काढण्यासाठीही पालिका उपाययोजना करत आहे. त्यात या कामाचा फायदा होणार आहे.
टिपू सुलतान, मौलाना आझाद जयंती आणि संविधान दिनानिमित्त मिरवणूक काढण्यास बंदी घालू शकत नाही ग्रामीण पोलिसांना हायकोर्टाने सुनावले.
पुणे :म्हैसूरचा १८ व्या शतकातील वादग्रस्त शासक टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी घातली आहे का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता हे कोणत्याही मिरवणुकीला (रॅली) परवानगी नाकारण्याचे कारण असू शकत नाही, अशी टिप्पणी करत टिपू जयंतीनिमित्त रॅलीची परवानगी मागणाऱ्या अर्जावर पुणे ग्रामीण पोलिसांनी निर्णय घ्यावा, असेही आदेश दिले.टिपू सुलतान, मौलाना आझाद जयंती आणि संविधान दिनानिमित्त मिरवणूक काढण्यास पुणे ग्रामीण पोलिसांनी नकार दिला. सार्वजनिक ठिकाणी टिपू जयंती साजरी न करता खासगी ठिकाणी उत्सव साजरा करण्यास पोलिसांनी सांगितले होते. त्यामुळे एमआयएमच्या फैय्याज शेख यांनी पोलिसांच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि एस. जी. डिगे यांच्या खंडपीठासमोर एमआयएमचे पुणे विभाग अध्यक्ष फैय्याज शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यावर खंडपीठाने अशी विचारणा केली की, टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यास बंदी आहे का? कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत एखाद्या विशिष्ट भागात रॅलीला परवानगी दिली जाऊ शकत नाही हे आम्हाला समजते. मात्र, पोलिस अर्जदारांना रॅलीचा मार्ग बदलण्यास सांगू शकतात. जर रॅलीत अपमानास्पद भाषा वापरली गेली किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर कायद्यानुसार आवश्यक कारवाई केली जाऊ शकते. तत्पूर्वी अतिरिक्त सरकारी वकील क्रांती हिवराळे यांनी न्यायालयाला सांगितले की, रॅलीला कोणतीही बंदी किंवा मनाई नाही. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशावरून पुण्याचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख व्यक्तीश: हजर झाले. शेख यांनी स्वतः देशमुख यांना भेटून रॅलीचा मार्ग आणि क्षेत्र ठरवावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ डिसेंबर रोजी आहे.
सर्व बँकांनी कर्ज वाटप करून उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे, दि. १२: जिल्ह्याचा एकूण पतपुरवठा ३ लाख १ हजार ६०० कोटीचा असून त्यानुसार सर्व बँकांनी कर्ज वाटप करून जिल्ह्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय पतपुरवठा आढावा समिती बैठकीत ते बोलत होते. या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक डॉ जावेद मोहनवी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक भुषण लगाटे, प्रकल्प संचालक शालीनी कडू, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहप्रबांधक बचेंद्रा मलिक, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाप्रबंधक वृषाली सोने, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक योगेश पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्याचा वार्षिक पत पुरवठा मध्ये मागील वर्षापेक्षा ७४ हजार २८५ कोटींनी वाढवण्यात आला. कृषी पत पुरवठ्यामध्ये मागील वर्षापेक्षा ८७० कोटींची वाढ करण्यात आली तसेच सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी २० हजार कोटींची भरघोस वाढ करण्यात आलेली आहे.
पीक कर्जाचे (किसान क्रेडिट कार्ड) खरीप हंगामाची उद्दिष्ट ४ हजार ४५४ कोटी एवढे असून,किसान क्रेडिट कार्ड (पीक कर्ज) अंतर्गत सप्टेंबर २०२४ अखेर ५ हजार १९० कोटी रुपयांचे कर्जवाटप जिल्ह्यातील विविध बँकांनी करून ११६ टक्के लक्ष गाठले आहे.वार्षिक पिक कर्ज (किसान क्रेडिट कार्ड)उद्दिष्टच्या अनुषंगाने बँकांनी आज तह ५ हजार ७४५ कोटी कर्जाचे वाटप करून ९० टक्के लक्ष पुर्ण आहे त्यासाठी सर्वांचे अभिनंदन ही केले.
राज्य व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या रोजगार योजनेचा आढावा घेत असताना बँकांनी विविध योजनांमध्ये कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही करावी. बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जिल्ह्यातील विभाग प्रमुखांनी बँक स्तरावर आढावा घेवून नामंजूर झालेल्या प्रकरणांचा अहवाल डिसेंबरअखेर सादर करावा, अशा सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.
श्री लघाटे म्हणाले, सरकारी योजने अंतर्गत कर्ज वाटप वेळेवर करावे. आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात बँकांनी मेळावे घ्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
श्री. मोहानवी आणि श्री योगेश पाटील यांनी कर्ज मंजुरीबाबत माहिती दिली.
शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध
पुणे, दि.१२: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.१ व क्र.२ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली असून १६ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत आक्षेप नोंदवावें, असे आवाहन हाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास त्याबाबत परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर परिक्षार्थ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे पाठवता येईल. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने किंवा ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.
विहित मुदतीत ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.
