पुणे:मुठा नदीपात्रात तब्बल ५५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला ओंकरेश्वर मंदिर ते रिद्धेश्वर-सिद्धेश्वर घाटाला जोडणारा जुना पूल (काॅजवे) अखेर पाडण्यात येणार आहे. हा पूल धोकादायक झाला असून, पावसाळ्यात मुठा नदीपात्रातील पाण्याला हा पूल अथडळा ठरत आहे.
या बाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रकल्प विभागाने शहर सुधारणा समितीत ठेवला आहे.
स्थायी समिती आणि मुख्यसभेची मान्यता घेऊन हे काम केले जाणार आहे. या पुलाची लांबी ५० मीटर, तर रुंदी अवघी ४.७ मीटर आहे. या पुलाचा वापर स्थानिक नागरिक नदी ओलांडणे, वाहने धुणे, मासे पकडणे, प्राण्यांची स्वच्छतेसाठी करतात. वाहतुकीसाठी या पुलाचा वापर होत नाही. मात्र, दरवर्षी या पुलामुळे जलपर्णी आणि कचरा अडकला जातो. हा पूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरक्षित नाही. त्यावर वारंवार खड्डे पडत असून त्याच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या पुलाचे आॅडिट केले होते.
त्यात या पुलाची दुरुस्ती केल्यास ३९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. दुरुस्तीनंतर त्याचे आर्युमान केवळ ८ वर्षे वाढणार आहे. मात्र, त्याचा वापर केवळ दुचाकीसाठी होणार आहे. या पुलाच्या बांधकामानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल आणि जयंतराव टिळक पूल बांधण्यात आला. हे दोन्ही पूल वापरत असल्याने तसेच दुरुस्तीनंतर “काॅजवे’चा फारसा वापर होणार नसल्याने हा पूल पाडला जाणार आहे.हा पूल पाडल्यानंतर त्याचा फायदा महापालिकेच्या नदीकाठ विकसन प्रकल्पासह पूरस्थितीच्या काळातही होणार आहे. नदीत सर्वांत कमी उंची असलेल्या या पुलाच्या खांबाला जलपर्णी तसेच कचरा अडकतो. परिणामी, पावसाळयात पाण्याला मार्ग मिळत नाही. त्यामुळे नदीतील अडथळे काढण्यासाठीही पालिका उपाययोजना करत आहे. त्यात या कामाचा फायदा होणार आहे.