पुणे : भारतीय सिनेसृष्टीतील द ग्रेटेस्ट शो मॅन राज कपूर यांचा शंभरावा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्यात आला. साईनाथ मित्र मंडळ ट्रस्ट व श्री शिवाजी मित्र मंडळातर्फे शनिवारी (दि. 14) सोमवार पेठेतील आबासाहेब अत्रे प्रशालेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना साईनाथ मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा यांची होती. अत्रे शाळेतील सुमारे 60 विद्यार्थ्यांनी राज कपूर यांचे मुखवटे लावून गायक मुकेश यांच्या आवाजातील गाण्यावर ताल धरला. पृथ्वीराज साळुंखे या बालकलाकाराने राज कपूर यांच्या पेहरावात ‘जीन यहाँ मरना यहाँ’ या गीतावर नृत्य सादर केले. व्हॉईस ऑफ मुकेश अशी ओळख असलेले पपिशकुमार यांनी राज कपूर यांच्यावर चित्रित झालेली आणि मुकेश यांनी गायलेली गीते या प्रसंगी सादर केली. सुरुवातीस पियूष शहा यांनी राज कपूर यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाविषयी माहिती दिली. श्री शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद थोरात, अत्रे शाळेचे मुख्याध्यापक प्रविण सुपे, हरेश पैठणकर, केशव तळेकर, एस. जे. डान्स अकॅडमीच्या श्रद्धा जाधव, ज्येष्ठ गायक उमेश तडवळकर, गंधाली शहा, नरेंद्र व्यास, ऋत्विक अडमुलवार, गणेश गोळे, प्रथमेश अडमुलवार, दाजी चव्हाण, मिलन म्हेत्रे आदी उपस्थित होते.
फोटो : साईनाथ मित्र मंडळ ट्रस्ट व श्री शिवाजी मित्र मंडळातर्फे शनिवारी राज कपूर यांच्या वाढदिवस साजरा केला. अत्रे शाळेतील विद्यार्थ्यांनी राज कपूर यांचे मुखवटे लावून आनंद व्यक्त केला.
शालेय विद्यार्थ्यांनी साजरा केला द ग्रेटेस्ट शो मॅन राज कपूर यांचा वाढदिवस
धायरी गावातील प्रलंबित डीपी रस्त्यांचा प्रश्नांवर कार्यवाही करा : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे राज्य सरकारला आदेश
महिन्यापूर्वी पत्र पण अद्यापही कार्यवाही नाहीच …
पुणे:
धायरी गावातील प्रलंबित डीपी रस्त्यांचा प्रश्नावर तातडीने कार्यवाही करावी असे आदेश राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी राज्य सरकारला केले आहेत त्या संदर्भातले पत्र राष्ट्रपती सचिवालयातील अवर सचिव गौतम कुमार यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठविले आहे. २८ वर्षांपासून रखडलेल्या धायरी गावातील डीपी रस्त्यांना कोणी वाली उरला नाही.पालिका तसेच राज्य शासनाने धायरी गावातील डीपी रस्त्यांकडे दुर्लक्ष केले आहे.अशी तक्रार करणारे पत्र आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर व नागरिकांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना दिले होते. त्याची दखल घेत राष्ट्रपतींनी धायरी गावातील डीपी रस्त्यांच्या समस्येवर योग्य ती कार्यवाही करुन धनंजय बेनकर यांना माहिती द्यावी अशी सुचना राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. याबाबत बेनकर यांनाही राष्ट्रपतींनी पत्र दिले आहे.डीपी रस्त्यांच्या समस्येसंदर्भात पालिका प्रशासन, राज्य शासन तसेच राष्ट्रपती पंतप्रधानांना ७५ वेळा पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने , संतप्त नागरिकांनी उपोषणचा पवित्रा घेतला होता.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी राज्य सरकारला लेखी पत्र दिल्याने डीपी रस्त्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागू शकणार आहे.

बेनकर म्हणाले,’ वर्षानुवर्षे डीपी रस्ते कागदावरच आहेत .पर्यायी रस्ते नसल्यानेधायरी गावासह इतर रस्त्यावर वाहतूक कोंडीची गंभीर बनली आहे.रोजच्या वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल सुरू आहेतसिंहगड रोड ते धायरी सावित्रीगार्डन डी पी रोडसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही हा रस्ता कागदावरच आहे.
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, डिपि आराखड्यातील धायरी येथीलसावित्री गार्डन ते सिंहगड रोड या
रस्त्यावर गेल्या चार पाच वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करूनही मध्यभागी जेमतेम चारशे मीटरचेच काम केले आहे उर्वरित काम प्रलंबित आहे.वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पुरेसे पोलिस, होमगार्ड, वाहतूक वार्डन नसल्याने तसेच सिग्नल बंद असल्याने
वाहतूक कोलमडली आहे.धायरी गाव रस्त्यासह धायरी- नऱ्हे,नांदेड फाट्या पासून नांदेड सिटी गेट ,लगड मळा ते धायरी फाट्या पर्यंतवाहतूक कोंडीची समस्या सर्वात गंभीर बनली आहे.
धनंजय बेनकर म्हणाले की,प्रशासनाने धायरी गावात ४ डीपी रस्त्यांचे नियोजन हे २८ वर्षांपूर्वी केले आहे. मात्र याबाबत कोणतीही हालचाल करण्यात येत नाही.काही ठिकाणी अर्धवट भूसंपादन करण्यातआले आहेत.
धनंजय बेनकर यांच्यासह धायरी गावातील ,सनी रायकर , निलेश दमिष्टे, विकास कामठे,किशोर पोकळे ,सुरेखा दमिष्टे , भाग्यश्री कामठे यशवंत लायगुडे, शिवाजी मते ,अतुल चाकणकर, भाऊसाहेब दमिष्टे,अशोक रायकर , चंद्रकांत रायकर,राजाभाऊ रायकर , निलेश पोकळे ,राजेश पोकळे, आझाद लायगुडे,चिंतामणी पोकळे , बाळासाहेब मंडलिक,शिवराज चव्हाण, माया मते,सुनीता काळे , माधुरी गायकवाड,प्रिया जाधव, प्रीती निकाळजे,ओम दमिष्टे , सुनील ठाकरेसोमनाथ भागवत, सागर जगताप,भीमराव पोकळे , प्रकाश देशपांडेवैजनाथ स्वामी, बाप्पू भिलारेवैभव कामठे, सत्यजित पवारसागर परदेशी, नागेश होमकळसआदी नागरिकांनी आझाद मैदानावर उपोषण केले होते.
कबीर भारतातील महान संत : आचार्य सोनग्रा
एमआयटी डब्ल्यूपीयूत आचार्य रतनलाल सोनग्रा यांचा विशेष सत्कार
‘कबीर वाणी’ पुस्तकाला दिल्लीत मिळाला ‘सदगुरू संत कबीर राष्ट्रीय अवार्ड’
पुणे, दि. १४ डिसेंबर: ,” कबीरांचा समाजावर प्रचंड प्रभाव होता. १५ व्या शतकातील संत कबीरांच्या काळात कोणतिही साधन सामुग्री नसतांना त्यांचे विचार संत तुकारामापर्यंत पोहचणे ही त्यांच्या दोहेची ताकद आहे. डॉ. बाबासाहेबांचे दुसरे गुरू संत कबीर असून डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनाची शेवटची रात्र ही कबीरांचे तत्वज्ञान वाचन घालविले होते. ते भारतातील एक महाना संत होते.” असे विचार प्रसिद्ध लेखक आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या अभिजात मराठीचा महाग्रंथ ‘कबीर वाणी’ ला नुकताच दिल्ली येथे अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीचा ‘सदगुरू संत कबीर राष्ट्रीय अवार्ड’ प्राप्त झाला आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या वतिने डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ देऊन विशेष सम्मान करण्यात आला.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण आणि गिरीश दाते उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, साहित्य क्षेत्राचा समाजावर सकारात्मक परिणाम होत असतो. संत साहित्यामुळे समाजाला योग्य दिशा मिळते. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज आणि कबीर यांचे दोहे हे मानवाच्या सुख, समाधान व कल्याणासाठी आहे.
यानंतर डॉ. एस.एन.पठाण, अरूण खोरे, डॉ. संजय उपाध्ये यांनी विचार मांडले.
पोलीस उपायुक्त आर राजा यांची बदली; DCP तेजस्वी सातपुते यांची शस्त्र निरीक्षण शाखेत नियुक्ती
पुणे :पुणे शहर पोलीस दलातील परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त आर राजा यांची पुण्यात पोलीस दळणवळण , माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभागात पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. तर पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पोलीस अधीक्षक, शस्त्र निरीक्षण शाखा येथे बदली करण्यात आली आहे.
बीडचे पोलीस अधीक्षकअसताना आर राजा यांची एप्रिल २०२२ मध्ये पुणे शहर पोलीस दलात बदली करण्यात आली होती. आर राजा हे इलेक्ट्रीक इंजिनिअर असून ते २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी उस्मानाबाद, नगर जिल्ह्यात सेवा बजावलेली आहे.मुंबई पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली होती. त्याचवेळी ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली करण्यात आली. देशमुख यांच्या जागी पुण्यातील पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची ऐन गणपती मध्ये बदली झाली होती. देशमुख यांनी आपल्या बदलीविरोधात ‘कॅट’मध्ये धाव घेतली. ‘कॅट’ने देशमुख यांच्या बदलीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे संदिपसिंह गिल व तेजस्वी सातपुते यांची बदली होऊनही त्यांना त्यांच्या पदावरुन सोडण्यात आले नव्हते. आता तेजस्वी सातपुते यांची पुण्यातच शस्त्र निरीक्षण शाखेत पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
एफसीआय महाराष्ट्रने खुला बाजार विक्री योजना (देशांतर्गत) अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्रीची केली घोषणा – 18 डिसेंबर 2024 रोजी लिलाव
मुंबई-
भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय ), प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र ने खुली बाजार विक्री योजना (देशांतर्गत [ओएमएसएस (डी)] अंतर्गत ऑगस्ट 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून तांदूळ आणि डिसेंबर 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून गहू विक्रीची घोषणा केली आहे. इच्छुक खरेदीदार गहू आणि तांदूळ साठा खरेदी करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या ई-लिलाव सेवा प्रदाता, “m-Junction Services Limited”(https://www.valuejunction.in/fci/) या पॅनेलमध्ये स्वतः ला समाविष्ट करून ई- लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि बोली लावू शकतात. 72 तासांच्या आत एम्पानेलमेंट प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 18 डिसेंबर 2024 च्या आगामी लिलावासाठी गोवा राज्यातून एकूण 500 मेट्रिक टन तांदूळ साठा देऊ केला जाणार आहे. गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 5000 मेट्रिक टन गव्हाचा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. गव्हासाठी, पीठ गिरण्या/गहू उत्पादनांचे उत्पादक/प्रक्रियाकर्ते /गव्हाचे अंतिम वापरकर्ते आणि तांदळाचे घाऊक व्यापारी /उत्पादक सहभागी होऊ शकतात. तांदूळासाठी किमान मर्यादा 1 मेट्रिक टन आहे आणि प्रति बोलीदार कमाल बोली 2000 मेट्रिक टनपेक्षा जास्त नसावी. गव्हाच्या बाबतीत, एकाच ई-लिलावात एकत्रित ठेवलेल्या सर्व प्रदेशांसाठी किमान 10 मेट्रिक टन आणि कमाल बोली एलटी जोडणी असलेल्या प्रक्रिया युनिट्ससाठी प्रति बोलीदार 25 मेट्रिक टन आणि एचटी जोडणीसह प्रक्रिया युनिटसाठी 100 मेट्रिक टन पेक्षा जास्त नसावी. देशांतर्गत खुली बाजार विक्री योजनेमुळे वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल.
काँग्रेस आमदार व विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांशी,बंडखोरांशी प्रभारी रमेश चेन्नीथला चर्चा करणार.
मंगळवार १७ डिसेंबर रोजी नागपूर येथे आमदार व उमेदवारांची बैठक, बंडखोरांशी हि चर्चा करणार .
मुंबई, दि. १४ डिसेंबर २०२४
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला १७ डिसेंबर २०२४ रोजी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे सर्व उमेदवार यांच्याशी नागपूरमध्ये चर्चा करणार आहेत. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ही चर्चा होणार असून सकाळी ११ वाजता आमदारांशी तर दुपारी १ वाजता विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत.
नागपूर येथे होत असलेल्या या महत्वपूर्ण चर्चेला संबंधित सर्वांनी उपस्थित रहावे असे निर्देश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.
बिश्नोई समाजाच्या बलिदानाची कहाणी असलेला ‘साको 363’ 28 फेब्रुवारीला पडद्यावर..
Sharad Lonkar
अमृता देवी बिश्नोई यांच्या सत्यकथेवर आधारित आगामी ऐतिहासिक नाटक साको 363 आणि पर्यावरण संवर्धनासाठी त्यांच्या समुदायाच्या बलिदानावर आधारित साको 363 चा टीझर राजस्थानमधील एका विशेष बिश्नोई समाजाच्या कार्यक्रमात अनावरण करण्यात आला. हा चित्रपट ३६३ बिश्नोईंच्या विलक्षण धैर्याला श्रद्धांजली अर्पण करतो ज्यांनी झाडांच्या संरक्षणासाठी आपले प्राण दिले, भारतीय आणि जागतिक इतिहासातील एक गहन अध्याय.
18व्या शतकातील राजस्थानमधील साको 363 मध्ये राजा अभय सिंगचे मंत्री गिरधरलाल भंडारी यांच्या विरुद्ध बिश्नोई समाजाच्या संघर्षाचे वर्णन केले आहे, ज्यांनी राजाच्या फ्लॉवर पॅलेसच्या बांधकामासाठी त्यांच्या गावात झाडे तोडण्याचा प्रयत्न केला. स्नेहा उल्लाल यांनी चित्रित केलेली अमृता देवी, लवचिकता आणि निसर्गाच्या भक्तीचे प्रतीक म्हणून उभी राहिली आणि तिच्या समुदायाला पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
जांभेश्वर महाराजांच्या 29 तत्त्वांमध्ये रुजलेले बिश्नोई तत्त्वज्ञान निसर्ग आणि वन्यजीवांचे रक्षण करण्याचे महत्त्व शिकवते. त्याच्या मूळ सिद्धांतांपैकी एक, “जर तुम्हाला झाड वाचवण्यासाठी तुमचे डोके कापावे लागले, तर ही एक स्वस्त डील आहे,” या शक्तिशाली कथनात जिवंत होतो.
चित्रपटात स्नेहा उल्लाल, मिलिंद गुणाजी, साहिल कोहली यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. रामरतन बिश्नोई आणि विक्रम बिश्नोई दिग्दर्शित, मिलन हरीश यांचे संगीत आणि रामरतन बिश्नोई यांच्या गीतांसह, साको 363 भावनिकरित्या भरलेला अनुभव देतो.
के. राजकुमार यांच्या सिनेमॅटोग्राफीने राजस्थानचे रखरखीत सौंदर्य टिपले आहे, ज्यात जुनागढ किल्ला, बिकानेर आणि नागौर सिटी सारख्या शूटिंग लोकेशन्स कथेला सत्यता देतात. हर्षित राठौर आणि अंकित शर्मा यांनी केलेले पार्श्वसंगीत चित्रपटाचे नाट्यमय सार वाढवते, तर विद्या मौर्याचे वेशभूषा डिझाइन 18 व्या शतकातील युग पुन्हा तयार करते.
Saako 363 केवळ भारतीय इतिहासाच्या कमी ज्ञात भागावर प्रकाश टाकत नाही तर पर्यावरण संवर्धनाच्या मूल्याची एक मार्मिक आठवण म्हणूनही काम करते. चित्रपटाची कथा ही बिश्नोई समाजाच्या अतूट बांधिलकीचा पुरावा आहे, जे पिढ्यांना वैयक्तिक फायद्यापेक्षा निसर्ग आणि वन्यजीवांना प्राधान्य देण्यासाठी प्रेरित करते. त्याच्या टीझरने आधीच खळबळ उडवून दिली आहे, साको 363 अमृता देवी आणि तिच्या समुदायाच्या अदम्य आत्म्याला सिनेमॅटिक श्रद्धांजली म्हणून तयार आहे, जे मोठ्या चांगल्यासाठी त्यांचे अतुलनीय बलिदान साजरे करत आहे. श्री जांभेश्वर पर्यावरण एवम जीवरक्ष प्रदेश संस्थेच्या बॅनरखाली निर्मित, साको 363 चित्रपटाची निर्मिती रामरतन बिश्नोई आणि विक्रम विश्नोई यांनी केली असून मनोज सती हे क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. या चित्रपटात गेवी चहल, मिलिंद गुणाजी, फिरोज इराणी, ब्रिज गोपाल, राजेश सिंग, शाजी चौधरी, साहिल कोहली, नटवर पराशर, ब्रिजगोपाल यांच्यासह स्नेहा उल्लाल मुख्य भूमिकेत आहेत. गरिमा अग्रवाल, विमल उनियाल, संजय गधई, तनुज भट्ट, अनामिका शुक्ला, बीके सागर व्यास, नटवर पराशर बेवार, श्यामसुंदर, कमल अवस्थी, अजय गेहलोत, सूर्यवीर सिंग, सूरज बिश्नोई यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 28 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
*केएसबी लिमिटेडच्या कृषी, घरगुती आणि सौर पंपांच्या स्टॉल्सना किसान प्रदर्शनात उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : मोशी येथे 11 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान होणाऱ्या ,किसान प्रदर्शनामध्ये केएसबी लिमिटेडने कृषी, घरगुती आणि सौर पंपांच्या प्रगत तंत्रज्ञानाची झलक सादर केली आहे. भारतातील सर्वात मोठ्या कृषी मेळ्यांपैकी एक असलेल्या या प्रदर्शनात शेतकरी व कृषी व्यवसायातील व्यावसायिकांना एकत्र आणून नवनवीन कृषी उपकरणे व तंत्रज्ञान सादर करण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
केएसबी लिमिटेड, इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव जैन आणि महावीर एंटरप्रायझेसचे मान्यवर डीलर श्री. सचिन चांगेडिया यांनी कृषी आणि घरगुती पंप स्टॉलचे उद्घाटन केले. तसेच श्री. जैन, केएसबी इंस्टॉलर श्री. घनश्याम भुमकर आणि श्री. अक्षय चव्हाण यांनी सौर पंप स्टॉलचे उद्घाटन केले. केएसबी लिमिटेडने प्रदर्शनात दोन स्वतंत्र स्टॉल्स उभारले असून, या स्टॉल्सला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
कृषी आणि घरगुती पंप स्टॉलचे वैशिष्ट्येया स्टॉलमध्ये V6 पंपचे आडवे (horizontal) डेमो प्रदर्शन मुख्य आकर्षण ठरत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष वेधले गेले आहे. याशिवाय, 6″ बोरवेल सबमर्सिबल पंपच्या यशस्वी आडव्या स्थापनेबाबत विद्यमान ग्राहकांनीही आपला अनुभव शेअर केला.या स्टॉलमध्ये सेल्फ-प्राइमिंग अक्वा सिरीज (0.5-1.5HP), ओपनवेल पंप (1PH & 3PH), 4″ बोरवेल सबमर्सिबल पंप, LX+ आणि RLX सिरीज, ऑइल-फिल्ड 4″ बोरवेल सबमर्सिबल पंप UMN सिरीज आणि मल्टिबूस्ट KHM / पेरिबूस्ट पंप्स – प्रेशर बूस्टर सिरीज यांसारखी विविध उत्पादने सादर करण्यात आली आहेत. नियंत्रण पॅनल्स, स्टार्टर आणि फ्लॅट सबमर्सिबल केबल्स यांसारखी अॅक्सेसरीजही प्रदर्शनात आहेत.
याशिवाय, केएसबी बोरवेल पंप्समध्ये सर्वाधिक 4- आणि 5-स्टार रेटेड मॉडेल्स असून, ते उर्जाक्षम आहेत व ग्राहकांचे वीजबिल कमी करण्यात मदत करतात.
सौर पंप स्टॉलचे वैशिष्ट्येसौर पंप स्टॉलमध्ये 7.5HP पर्यंतची सौर सबमर्सिबल आणि सरफेस पंप्सची संपूर्ण श्रेणी उपलब्ध असून, ती MNRE मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारी आहे. 3HP सौर पंपसेट आणि सौर पंप कंट्रोलरचा थेट (लाइव्ह) डेमो देखील येथे पाहायला मिळत आहे.
आम्ही सर्वांना विनंती करतो की या दोन्ही स्टॉल्सना आवर्जून भेट द्या आणि कृषी, घरगुती व सौर पंप तंत्रज्ञानातील नवनवीन प्रगती अनुभवावी. आमच्या टीमसोबत संवाद साधण्याची आणि केएसबी उत्पादनांबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी गमावू नका.
हिंदू सेवा महोत्सवात घडणार हिंदू सेवा व संस्कृती चे दर्शन:हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचा पुढाकार ; देशभरातील मान्यवरांची उपस्थिती
पुणे : हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे. यामध्ये हिंदू संस्कृती, संस्कार आणि सामाजिक सेवा कार्याचे विराट दर्शन पुणेकरांना घडणार आहे. दिनांक १९ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान स.प.महाविद्यालय मैदान येथे हा भव्य महोत्सव होत असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक महत्वपूर्ण देवस्थाने, सामाजिक व धार्मिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आहे, अशी माहिती हिंदू अध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला हिंदू सेवा महोत्सवाचे अध्यक्ष व कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल, चरणजितसिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, प.पू.स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज, इस्कॉन चे गौरांग प्रभू, ज्योतिषरत्न जैन मुनी लाभेश विजय म.सा. यांच्या हस्ते होणार आहे. मठ-मंदिरांच्या सेवाकार्याचे प्रदर्शन, जैन तत्वज्ञानावर आधारित भव्य पॅव्हेलियन, शिव गौरवगाथा महानाट्य, शिख समाजाच्या चार शहजादे बलिदानावर आधारित लाईव्ह शो, १ हजार बालिकांचे कन्यावंदन, १ हजार आचार्य वंदन, १ हजार वादकांद्वारे मृदुंग वादन, १ हजार मातृ-पितृ वंदन, शेकडो महिलांद्वारे अथर्वशीर्ष, श्रीसुक्त पठण, विष्णू सहस्त्रनाम व सौंदर्य लहरी पठण, देशभक्ती जागरण आधारित अनेक कार्यक्रम, वीरमाता व वीरपत्नी सन्मान सोहळा,दगडूशेठ गणपती मंदिरा द्वारे मोफत आरोग्य शिबीर, संत संमेलन असे असंख्य कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवाला देशभरातील साधूसंत, राज्यपाल, केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री यांची उपस्थिती देखील असणार आहे.
गुरुवार, दि.१९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता १ हजार बालिकांचे कन्यावंदन आणि सायंकाळी ७.३० वाजता सफर-ए-शहादत हा पंजाबी कलाकारांचा साऊंड व लाईट शो हे प्रमुख आकर्षण असणार आहे. शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सामूहिक वंदे मातरम कार्यक्रमांतर्गत वीरमाता, वीर पत्नी सन्मान सोहळा होणार आहे. तर, सायंकाळी ७ वाजता शिव गौरव गाथा हे महानाटय सादर होईल.
शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी तब्बल ३ हजार पुणेकरांच्या उपस्थितीत मातृ-पितृ वंदनाचा कार्यक्रम सकाळी १० वाजता होणार आहे. तर, दिवसभरात चेंदा मेलम, केरळी वाद्यवादन, भरतनाट्यम नृत्यप्रकार सादरीकरण कार्यक्रम होईल. शेवटच्या दिवशी रविवार, दि. २२ डिसेंबर रोजी १ हजार वादकांचे मृदुंग वादन हा दुपारी ४ वाजता उपक्रम होणार आहे. तर, सायंकाळी ७ वाजता संत संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
पुण्यातील प्रमुख संस्था, मंदिरे यांसह राज्यातून अनेक संस्था, प्रमुख देवस्थाने, संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. केवळ हिंदू शक्तीचे दर्शन घडविणे हा महोत्सवाचा उद्देश नसून हिंदू संस्कृतीतील संस्कार, सृष्टी संवर्धन, देशभक्ति जागरण, नारी सन्मानमध्ये अभिवृद्धी, पर्यावरण संरक्षण, इकॉलोजी संतुलन याचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचविणे हा आहे.
एकविसाव्या शतकात धार्मिक – सामाजिक संस्थांनी कशा प्रकारे वाटचाल करावी, समाजातील गरजूंसाठी कशा प्रकारे उभे रहावे, याचे मार्गदर्शन देखील महोत्सवात केले जाणार आहे. संत संमेलनासारख्या प्रमुख कार्यक्रमाद्वारे संत महंतांचे विचार ऐकण्याची आणि नाटक व सादरीकरणाद्वारे हिंदू संस्कृतीचा इतिहास जाणून घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. चार दिवसीय महोत्सवाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदू सेवा महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले आहे.
एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप फॉर टु-व्हिलर स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न !!
आज (रविवार) डर्ट-रेसिंगच्या अंतिम फेरीचा थरार रंगणार !!
पुणे, १४ डिसेंबरः फेडरेशन ऑफ मोटर स्पोटर्स क्लब्स ऑफ इंडिया (एफएमएससीआय) मान्यतेखाली होणार्या इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीपुर्वीच्या प्राथमिक फेरी पूर्ण झाली असून आज (रविवारी, १४ डिसेंबर २०२४) होणार्या अंतिम आणि निर्णायक फेरीमध्ये भारतातील अव्वल आणि सर्वोत्तम रायडर्समधून राष्ट्रीय विजेता ठरवणार आहे.
पुण्याजवळील कामशेत येथील नानोली स्पीड-वे फार्म्स येथे आज झालेल्या प्राथमिक फेरीमध्ये देशातील ७० रायडर्सनी सहभाग घेतला आहे. ‘युरोग्रीप’ टायर उत्पादक कंपनीचे विभागीय व्यवस्थापक फराझ शेख यांच्या हस्ते या फेरीचा शुभारंभ करण्यात आला. एफबी मोटरस्पोटर्सचे संचालक तसेच ३ वेळेचा राष्ट्रीय रॅली चॅम्पियन आणि मानांकित ग्रेट डेझर्ट हिमालयन रॅलीजचा विजेता फराद भाथेना आणि चिन्मयी भाथेना उपस्थित होते. या अंतिम फेरीसाठी एकूण १०० हून अधिक प्रवेशिका आल्या आहेत. या अंतिम फेरीमध्ये चैन्नई, बंगलोर, कोईमतुर, भोपाळ, गुवाहाटी, तामिळनाडूमधील ईरोड, त्रिसुर आणि कुर्ग, आसाम, कर्नाटक, केरळमधील एर्नाकुलम, शिमागोज, जयपुर या राज्यांतुन रायडर्स सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्रातील पुण्यामधून किशोर जाधव, मोहन सेठीया, पुरूषोत्तम मते, कुणाल सिंग, नितीश चौधरी, दानेश जोशी, पंकज ठक्कर, आदित्य राजपुत, बारामतीमधून रोहीत शिंदे, सांगलीमधून अजित पाटील, नाशिक मधून दर्शन चावरे, बादल दोशी (नवी मुंबई) असे अव्वल रायडर्स सहभागी झाले आहे. या टु-व्हिलरच्या डर्ट-रेस चा (मातीवरच्या शर्यतीचा) थरार पुणेकरांना अनुभवता येणार आहे. रॅली रेसिंगसाठी कोणतेही प्रवेश-शुल्क आकारण्यात येणार नसून सर्व क्रिडारसिकांना मोफत प्रवेश आहे.
‘युरोग्रीप’ या आघाडीच्या टायर उत्पादक कंपनीने या रॅली चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीसाठी प्रायोजक्त्व दिले असून या स्पर्धेसाठी रायडर्सना टायर कंपनीच्यावतीने देण्यात आले.
या अंतिम फेरीआधी जुन २०२४ पासून या रॅली चॅम्पियनशीपची सुरूवात झाली. चैन्नई येथील मद्रास इंटरनॅशनल सर्किट दक्षिण विभाग अशी पहिली फेरी झाली. २१ जुलै रोजी बंगलौर येथे दक्षिण विभाग दुसरी फेरी, २१ सप्टेंबर रोजी पश्चिम विभाग तिसरी फेरी, ५ ऑक्टोबरमध्ये इंदौर येथे मध्य आणि उत्तर विभाग चौथी आणि पाचवी फेरी २४ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे पुर्व विभाग झाली होती. या सर्व पात्रता फेरीतून प्रत्येक गटातील अव्वल ठरलेले पहिले पाच रायडर्स अंतिम फेरीत पोहचले आहेत आणि अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले रायडर्स आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत ११ क्लास (गट) असणार आहेत. या रॅली स्पर्धेत सांघिक अजिंक्यपद, रायडर्स ग्रुप ए, बी, बुलेट क्लास, स्कूटर क्लास, महिला गट, प्रौढ गट असे एकूण १२ गटाच्या विजेतेपदासाठी रायडर्स रेसिंग करणार आहेत.
नवीन अर्थसंकल्पात मूलभूत नागरी सुविधां साठी जादा तरतूद करावी – संदीप खर्डेकर यांचे मनपा आयुक्तांना आवाहन.
पुणे:
प्रशासकराज ला येत्या फेब्रुवारी महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. शहरातील विविध प्रभागात नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याप्रमाणे अर्थसंकल्प तयार करण्याचे “नगरसेवक” हे माध्यम असते. मात्र गत तीन वर्षे हे माध्यमच अस्तित्वात नसल्याने प्रशासन त्यांच्या सोयीने आणि त्यांच्याकडील विविध खात्यांच्या मागणीनुसार अर्थसंकल्पाची रचना करत आहे असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.
सात आठ हजार कोटींच्या अवाढव्य अर्थसंकल्पात नागरिकांच्या सूचनांना फारसे स्थान नसतेच,
तरी ह्या वर्षीचे अर्थसंकल्प आखताना मूलभूत सुविधांसाठी भरघोस तरतूद करावी अशी आग्रही मागणी संदीप खर्डेकर यांनी मांडली आहे.
मोठे प्रकल्प, कारंजे,शिल्प, ज्येष्ठ नागरिक कट्टे, समाज मंदिर,ठिकठिकाणी व्यायामाचे साहित्य बसविणे – अश्या अनेक प्रकल्पांची शहराला गरज आहेच मात्र किमान एक वर्ष ह्या खर्चाला फाटा देऊन मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी अर्थसंकल्पातील तरतुद वाढवावी अशी मागणी देखील त्यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
क्रिएटिव्ह फाउंडेशन ह्या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयुक्तांना लिहिलेल्या मागणीपत्रात प्रामुख्याने…
1) मुख्य रस्त्यांसह गल्ली बोळातील खड्डेमय रस्ते हे केवळ डागडुजी न करता ( खड्डे बुजविण्याचे सोपस्कार न करता ) शास्त्रोक्त पद्धतीने नव्याने डांबरीकरण करणे.
2) पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचणाऱ्या ठिकाणी पावसाळी लाईन मोठ्या व्यासाची करणे.
3) ड्रेनेज लाईन बाबतीतही हीच स्थिती असून अनेक ठिकाणी लाईन बदलण्याची आवश्यकता लक्षात घेऊन तरतूद करणे.
4) 24×7 पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर पूर्ण करणे व जेथे कमी दाबाने पाणी येते तेथे पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर देणे.
5) डास निर्मूलनासाठी योग्य निधी ची व्यवस्था करणे, कारण गेले वर्षभर पुणेकर विविध आजारांनी ग्रस्त आणि त्रस्त आहेत आणि त्याच्या मुळाशी डास असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
6) जेथे मेट्रो, उड्डाण पूल व अन्य विकास कामांमुळे वाहतूक कोंडी होत आहे अश्या व अन्य वाहतूक कोंडीच्या ठिकाणी काम पूर्ण होईपर्यंत पुणे पोलीस व मेट्रो च्या सहकार्याने तात्पुरते ट्रॅफिक वार्डन ठेवणे व त्यांनी दंडात्मक कारवाई (वसुली ) न करता केवळ वाहतूक नियोजनावर भर द्यावा याची दक्षता घेणे.
7) यासह कचरा निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न करताना जे भाग हरित आहेत तेथे झावळ्या, फ़ांद्या, पानांचा कचरा याच्या संकलन व विल्हेवाटी साठी विशेष तरतूद करणे.
8) भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर दीर्घाकालीन उपाययोजना करणे.
9) अंधार असणाऱ्या अनेक रस्त्यांवर अथवा सार्वजनिक ठिकाणी पुरेश्या विद्युत खांबांची व्यवस्था करणे ( सदर खांब हे Decorative नसावेत तर पुरेसा प्रकाश देणारे असावेत ).
अश्या मागण्यांचा समावेश असून याबाबत आपण मा. खासदार मुरलीधर मोहोळ, शहराचे नेते मा. आ. चंद्रकांतदादा पाटील व सर्व आमदारांशी चर्चा करणार असल्याचे ही खर्डेकर म्हणाले.यासह अनेक प्रलंबित आणि महत्त्वाच्या विषयांचा समावेश करता येईल मात्र तूर्तास वरील कामांना प्राधान्य द्यावे असेही खर्डेकर म्हणाले.
अर्थसंकल्पाची आखणी करताना तत्पूर्वी सर्व संबंधित घटकांची संयुक्त बैठक आयोजित करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत असेही ते म्हणाले.
पुणेकरांचे जीवन सुसह्य करण्यासाठी सर्वजण सहकार्य करतील व
प्रशासन देखील निश्चितपणे यावर सकारात्मक निर्णय घेईल व पुण्याचे वैभव टिकवेल आणि “आपलं पुणं” हे देशातील सर्वोत्तम शहर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल याची खात्री वाटते असेही संदीप खर्डेकर म्हणाले..
वाहन विमा नूतनीकरण आणि दंड वसुली प्रक्रिया संलग्न असाव्यात राज्य शासनाकडे प्रस्ताव : मनोज पाटील यांची माहिती
जितो कॉफी टेबल मिटअंतर्गत पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
पुणे : पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ऑनलाईन प्रणालीद्वारे बजाविण्यात येत असलेल्या दंडाच्या वसुलीचे प्रमाण फारच कमी आहे. वाहनाच्या विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना थकीत दंड वसुली होण्यासाठी या दोन्ही प्रक्रिया संलग्न असाव्यात, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) मनोज पाटील यांनी दिली.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनतर्फे (जितो) सुहाना कॉफी टेबल मिटअंतर्गत मनोज पाटील यांच्या समवेत संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बिबवेवाडी येथील जितोच्या कार्यालयात कार्यक्रम झाला. किशोर ओसवाल, प्रसन्न मेहता यांनी पाटील यांच्याशी संवाद साधला. कॉफी टेबल मिटचे संचालक अभिजित डुंगरवाल यांनी उपक्रमाची माहिती देत सूत्रसंचालन केले.
जितो पुणेचे अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड, दिनेश ओसवाल, राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, इंदर जैन, रवींद्र सांकला, राजेश सांकला, अचल जैन, अजय मेहता, चेतन भंडारी, प्रवीण चोरबेले, संतोष जैन, आनंद कटारिया, संजय जैन, मुकेश छाजेड, अनिल भन्साळी, आनंद मेहता, राजेंद्र ललवाणी, राजेंद्र भाठीया, राहुल संचेती, डॉ, सुमतीलाल लोढा, कल्ेपश जैन, करण जैन, नरेंद्र छाजेड, संजय राठोड, महेंद्र सुंदेचा मुथा, लकीशा मर्लेचा, दक्षा जैन, पूनम ओसवाल, प्रियंका परमार, एकता भन्साळी, दिलीप बिनाकिया आदी उपस्थित होते.
व्यावसायिक तक्रारींचे निवारण कसे करावे, गुन्हेगारी प्रतिबंधात्मक उपययोजना कशा असाव्यात, कायदाची अंमलबजाणी काटेकोरपणे होण्यासाठी नागरिकांचे सहकार्य कसे अपेक्षित आहे, शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेची प्रणाली विकसित करताना धोरणे काय असावीत, वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने जगजागृती मोहीम राबविण्याबाबत तसेच वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेचा अवलंब करताना तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर कसा केला जाईल या विषयीची माहिती पाटील यांनी सविस्तरपणे दिली.
पाटील म्हणाले, पुण्यातील वाहतूक व्यवस्थापनात इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमसह नव्या युगाच्या तंत्रज्ञानातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. पुण्याभोवती रिंगरोड नसल्याने शहारातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची वारंवार कोंडी होताना दिसते. शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसेच पदपथांवरील अतिक्रमणे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सायबर क्राईमबाबत विचारलेल्य प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, या गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले आहे. फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे आहे. अशी काही घटना घडल्यास 1930 या क्रमांकावर तातडीने संपर्क साधून माहिती दिल्यास नुकसान टाळले जाऊ शकते. शहरातील समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जितोची सहकार्याची भूमिका..
वाहतुकीचे नियमन, जनजागृती करण्यासाठी जितोच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल अशी ग्वाही या प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी दिली. काही व्यावसायिकांना गुंडगिरीचा सामना करावा लागातो, अशा तक्रारीही या प्रसंगी करण्यात आल्या.
अल्लू अर्जुनला जामिन मंजूर
मुंबई – तेलंगणा उच्च न्यायालयाने दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा जामिन मंजूर केला आहे.तसेच ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेचा पती भास्करने माध्यमांशी संवाद साधला आहे. माध्यमांशी बोलताना भास्करने सांगितलं की, ‘अल्लू अर्जुनविरोधातील तक्रार मागे घेण्यास मी तयार आहे. चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाल्याची मला कल्पना नाही. चेंगराचेंगरीच्या घटनेशी अल्लू अर्जुनचा काहीही संबंध नाही.
अल्लू अर्जुन सध्या त्याच्या ‘पुष्पा २: द रुल’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबाद येथे या सिनेमाचा प्रीमिअर शो झाला. या प्रीमिअरसाठी अल्लू अर्जुन अचानक थिएटरमध्ये पोहोचल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. चाहत्यांना त्याला जवळून पाहण्याची उत्सुकता होती. त्यामुळे थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसंच तिचा मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच या प्रकरणी अल्लू अर्जुनला आज अटक करण्यात आली आणि त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. या अटकेपासून सुटका मिळवण्यासाठी अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली.
सुप्रीम कोर्ट म्हणाले- न्यायाधीशांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा:साधूसारखं आयुष्य जगावं, न्यायव्यवस्थेत दिखाव्याला जागा नाही
नवी दिल्ली-न्यायाधीशांनी साधूप्रमाणे जगावे आणि घोड्यांसारखे काम करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा. निर्णयांबाबत कोणतेही मत व्यक्त करू नये.
गुरुवारी न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि न्यायमूर्ती एन कोतीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. जून 2023 मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या 6 महिला न्यायाधीशांना निलंबित करण्याच्या प्रकरणावर खंडपीठात सुनावणी सुरू होती.खंडपीठाने म्हटले की, ‘न्यायव्यवस्थेत दिखाऊपणाला जागा नाही. न्यायिक अधिकाऱ्यांनी फेसबुकवर जाऊ नये. त्यांनी निकालांवर भाष्य करू नये, कारण निकाल उद्याचा संदर्भ दिला तर न्यायाधीशांनी आधीच आपले मत कोणत्या ना कोणत्या मार्गाने व्यक्त केले असेल.
खंडपीठाने म्हटले –
फेसबुक हे खुले व्यासपीठ आहे. तुम्हाला (न्यायाधीशांना) साधूसारखे जगावे लागेल, घोड्यासारखे काम करावे लागेल. न्यायिक अधिकाऱ्यांना मोठा त्याग करावा लागतो.
मे 2023 मध्ये मध्य प्रदेश सरकारने 6 महिला न्यायाधीशांना बडतर्फ केले
उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार, मध्य प्रदेशच्या कायदा आणि विधान व्यवहार विभागाने 23 मे 2023 रोजी 6 महिला न्यायाधीशांच्या सेवा समाप्त करण्याचा आदेश जारी केला होता. प्रशासकीय समितीचा निर्णय आणि उच्च न्यायालयाच्या पूर्ण न्यायालयाच्या बैठकीच्या आधारे हा आदेश देण्यात आला आहे.
या महिला न्यायाधीशांची परिवीक्षा कालावधीत कामगिरी खराब असल्याचे कारण काढून सेवा समाप्त करण्याचे कारण देण्यात आले. यासंदर्भातील राज्य शासनाच्या आदेशाची राजपत्र अधिसूचना 9 जून 2023 रोजी जारी करण्यात आली होती. नंतर, सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2024 मध्ये या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली.मध्य प्रदेश सरकारने ज्या सहा महिला न्यायाधीशांच्या सेवा संपुष्टात आणल्या त्यामध्ये सरिता चौधरी, रचना अतुलकर जोशी, प्रिया शर्मा, सोनाक्षी जोशी, अदिती कुमार शर्मा आणि ज्योती बारखेडे यांचा समावेश आहे.
सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदिती कुमार शर्मा आणि सरिता चौधरी वगळता सर्व न्यायाधीशांच्या नोकऱ्या बहाल करण्याचे आदेश दिले होते. आदिती कुमार शर्मा आणि सरिता चौधरी यांची प्रकरणे स्वतंत्रपणे पाहिल्यानंतर हा आदेश देण्यात येईल, असे सांगण्यात आले.
वीजबिल भरण्यासाठी ‘महापॉवर-पे:सहा महिन्यांत वॉलेटद्वारे तब्बल १७७ कोटींचा भरणा
वॉलेटधारकांना मिळाले ८० लाखांचे कमिशन तर वीजग्राहकांनाही सुविधा
पुणे, दि. १३ डिसेंबर २०२४: निमशहरी व ग्रामीण भागात वीजबिल भरणे सोयीचे करणाऱ्या तसेच छोट्या व्यावसायिकांना उत्पन्न मिळवून देणाऱ्या महावितरणच्या ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेटला प्रामुख्याने कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या सहा महिन्यांत १६ लाख ६ हजार ६६२ वीजग्राहकांनी १७७ कोटी ४२ लाख रुपयांच्या वीजबिलांचा वॉलेटद्वारे भरणा केला आहे. तर कमिशनपोटी वॉलेटधारकांनाही ८० लाख ३३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंत ६०१ जणांनी ‘महापॉवर-पे’ वॉलेटच्या माध्यमातून वीजबिल भरणा केंद्र सुरु केले आहे.
ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे यासाठी महावितरणने स्वतःचे ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेट सुरू केले आहे. वयाच्या १८ वर्षावरील कोणीही व्यक्ती तसेच छोटे व्यावसायिक, किराणा, मेडिकल, जनरल स्टोअर्स दुकानदार, बचत गट, विद्यार्थी, महावितरणचे वीजबिल वाटप एजन्सी व मीटर वाचन करणाऱ्या संस्था वॉलेटधारक होऊ शकतात. हे वॉलेट मोबाईल किंवा संगणकाद्वारे वापरले जाते आणि डेबिट, क्रेडिट कार्ड व नेटबॅकिंगने रिचार्ज करण्याची ऑनलाइन सोय आहे. वीजबिल भरण्यासाठी वॉलेटधारकास प्रतिपावती पाच रुपये कमिशन देण्यात येत आहे. ‘महापॉवर-पे’ वॉलेटधारक होण्यासाठी इच्छुकांनी महावितरणच्या विभागीय / उपविभागीय कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.
‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेटमध्ये पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या आकडेवारीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३३२ वॉलेटधारक असून गेल्या सहा महिन्यांत ७ लाख १५ हजार ४६५ ग्राहकांनी वॉलेटमधून ७२ कोटी ९७ लाखांचा वीजबिल भरणा केला आहे. तर वॉलेटधारकांना ३५ लाख ७७ हजारांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यात ५ लाख ८० हजार ९४४ ग्राहकांनी ५८ कोटी ५९ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला असून जिल्ह्यातील ८३ वॉलेटधारकांना २९ लाख ४ हजार रुपयांचे कमिशन मिळाले आहे.
सांगली जिल्ह्यात १ लाख ६ हजार ६० वीजग्राहकांनी वॉलेटच्या माध्यमातून १६ कोटी १५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे. यात ७९ वॉलेटधारकांना ५ लाख ३० हजार रुपयांचे कमिशन देण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात ९१ हजार ८३५ ग्राहकांनी वॉलेटद्वारे १२ कोटी ७६ लाख रुपयांचे वीजबिल भरले. यात ५१ वॉलेटधारकांना ४ लाख ५९ हजार रुपयांचे कमिशन मिळाले आहे. तर पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील १ लाख १२ हजार ३५८ ग्राहकांनी वॉलेटद्वारे १६ कोटी ९६ रुपयांचा भरणा केला. यात संबंधित ५६ वॉलेटधारकांना ५ लाख ६१ हजार रुपयांचे कमिशन देण्यात आले.
आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या अर्जांची पडताळणी करून ‘महापॉवर-पे’ वॉलेटधारक म्हणून मंजूरी दिली जाते. त्यानंतर महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेता येतो. वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर तात्काळ ‘एसएमएस’ दिला जात आहे. एकाच वॉलेटचा बॅलन्स वापरून विविध लॉग-ईनद्वारे वेगवेगळ्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा आहे. अशा प्रकारच्या वसूलीचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जात आहे.
