Home Blog Page 542

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिरात वीर पत्नी- मातांच्या उपस्थितीत सैनिकांना सलाम 

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट : नागरी सज्जता सूची ची वितरण
पुणे : कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने देशवासीयांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि सैनिकांना अभिवादन करण्यासाठी वैशाख पौर्णिमा निमित्त श्री दत्त मंदिरात वीर माता -पत्नीच्या हस्ते माध्यान्ह आरती आणि सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. आनंद सराफ, शिरीष मोहिते व वीर पत्नी दिपाली मोरे यांनी यासाठी नियोजन केले.

नयना बेंद्रे व कर्नल नवीन बालकृष्ण बेंद्रे (निवृत्त) यांच्या हस्ते दत्तयाग संपन्न झाला. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते.

विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले की युद्धजन्य संकट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी जागरूक आणि शांत राहावे. संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा. अफवा पसरवू नका. केवळ खात्रीलायक माहितीच शेअर करा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. प्रथमोपचार पेटी, वैद्यकीय आणि ओळखपत्रांची कागदपत्रे तयार ठेवा. प्रत्येकासाठी एक आपत्कालीन बॅग तयार ठेवा. शांत रहा. मनोबल वाढवा. एकमेकांच्या मदतीला धावून जा. सैनिकांबद्दल आदर ठेवा आणि देशासाठी प्रार्थना करा, अशी नागरी सज्जता सूची यावेळी वितरीत करण्यात आली.

ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे म्हणाले, आपले वीर सैनिक आपल्याला सुरक्षितता मिळावी म्हणून लढले. त्यांच्या रक्षणासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सामूहिक प्रार्थना करणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात वीर माता -पत्नीच्या हस्ते आरतीचे आयोजन करण्यात आले होते.

जग युद्धात नाही तर बुद्धात उपाय शोधू शकतो-डॉ. विश्वनाथ दा. कराड

पुणे, दि.१२ मे: ” जगाला युद्धात नाही तर बुद्धात उपाय सापडू शकतो. जगाने बुद्धांच्या शिकवणींपासून शिकून शांतीचा मार्ग अवलंबला पाहिजे. अस्थिरतेने ग्रासलेल्या या पृथ्वी वर भगवान गौतम बुद्धाच्या ज्ञानाच्या मार्गाचे अनुसरण करून जीवन समृद्ध होऊ शकते. ” असे विचार माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कवी डॉ. संजय उपाध्ये, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण,  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, दुरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा, माईर्स एमआयटीचे   कुलसचिव प्रा.डॉ. रत्नदीप जोशी, डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, प्रा.डॉ. दत्ता दंडगे, प्रा. विक्रांत गायकवाड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे अध्ययन प्रमुख प्रा.डॉ. विनोद जाधव उपस्थित होते.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” भगवान गौतम बुद्धांचे पंचशील तत्व आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदान संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकतात. बुद्धांनी जागतिक धर्म, मानवता कल्याण आणि जातीभेदाच्या भिंती ओलांडून संपूर्ण मानवजातीला एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. भारत हा जगभर भगवान बुद्ध आणि महात्मा गांधीसाठी ओळखला जातो.”
डॉ.आर.एम.चिटणीस म्हणाले,”भगवान बुद्धांनी जगाला शांती व अहिंसेचा संदेश दिला. जगाला सत्य, शांती आणि मानवतेचा संदेश देणारे बुद्धांचे पंचशील तत्व मानवी जीवनाला योग्य दिशा देईल.”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,” वर्तमान काळात संपूर्ण देशाला बुद्धांच्या विचारांची गरज आहे. या धर्मामध्ये सर्व धर्मांचे तत्व व वैचारिकतेचा समावेश आहे. पाप पुण्याचा विचार सोडून सदाचाराने व्यवहार करावा.”
प्रा.दत्ता दंडगे म्हणाले,” २५०० वर्षापूर्वी स्थापन झालेला बौद्ध धर्म असून भगवान बुद्धांचे विचार आज ही आहे. हा धर्म पूर्ण तृप्तीतून उद्गम झालेला आहे. ज्ञानातून करूणा निर्माण होते आणि ती करूणा आचरणातून दिसायला हवी.”
या नंतर डॉ. संजय उपाध्ये, डॉ. मुकेश शर्मा, प्रा. गणेश पोकळे व प्रा. विक्रांत गायकवाड  यांनी भगवान गौतम बुद्धांचे विचार सांगितले आणि त्यांच्याकडून शिकण्यास सांगितले.
प्रा.डॉ. विनोदकुमार जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तसेच प्रा.डॉ. विक्रांत गायकवाड यांनी आभार मानले.

संवेदनातूनच बुद्ध विचारांची निर्मिती : राहुल डंबाळे


बौद्ध जयंतीनिमित्‍त शहीद जवानांच्‍या कुटुंबियांसाठी एक लाखांचा धनादेश सुपुर्त
डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि मित्र परिवाराचा उपक्रम

पुणे : प्रतिनिधी

युद्ध नको बुद्ध हवा, हा संदेश जगाला मिळणे आवश्‍यक आहे. युद्धाला अंत नसतो हे युक्रेन आणि रशियाच्‍या युद्धाच्‍या स्‍थितीवरून समजते. संवेदनामधूनच भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले. त्‍यांनी बुद्ध विचारांवर चालत शांततेचा पुरस्‍कार केला. शहीद जवानांच्‍या कुटुंबियांच्‍या संवेदनातूनच कार्यक्रमासाठी येणारा खर्च आर्मी रिलिफ फंडाला देण्याचा उपक्रम स्‍तुत्‍य आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले.

माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि मित्र परिवाराच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन मधील लुंबिनी उद्यानात दरवर्षी बुद्धपौर्णिमेला भीम-बुद्ध गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षी शहीद जवानांना मानवंदना म्हणून हा कार्यक्रम रद्द केला. या कार्यक्रमासाठी येणारा खर्च शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देऊन आपल्या सहवेदना व्यक्त करण्याचा संकल्प डॉ. धेंडे यांनी व्यक्त केला. त्‍यानुसार महार बटालियनच्‍या निवृत्‍त माजी सैनिकांकडे एक लाख रुपयांचा धनादेश आर्मी रिलीफ फंड नावाने सुपुर्द करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात डंबाळे बोलत होते.  

भंते नागघोष, भंते धम्मानंद, भंते प्रियदर्शी, भंते अंकुश माला आदी भिख्खुंनी त्रिसरण, पंचशील आणि धम्‍मदेसना दिली. या वेळी आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, सुवर्णा पवार, यशवंत शिर्के, विजय गायकवाड, विजय कांबळे, गजानन जागडे, नामदेव घाडगे, सोपान लभाणे, सुभाष कांबळे, अनिल ननावरे, मेजर रणपिसे, मालती धीवार, रजनी वाघमारे, कविता घाडगे, मंगला गमरे, महार बटालियनचे कॅप्टन पोळके, सुभेदार वानखेडे आणि सहकारी उपस्‍थिती होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्रिसरन, पंचशील ग्रहण करण्यात आले.  धम्मदेसना घेण्यात आली. या वेळी देशसेवेत भूमिका बजाविणाऱ्या महार बटालियन मधील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. भंते संघाचे स्वागत करण्यात आला.

या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्‍हणाले की, केंद्र आणि राज्‍य सरकारला आवाहन आहे. पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्‍ल्‍यात मृत्‍युमुखी पडलेल्‍या नागरिकांच्‍या कुटुंबियांना सरकारने ५० लाख रुपये मदत म्हणून दिले आहे. मात्र दुसरीकडे देशातील आपल्‍या सैनिकांना युद्धात वीरमरण आले. ते शहीद झाले की त्‍यांच्‍या कुटुंबियांना मात्र तुटपुंजी मदत दिली जाते. त्‍यामुळे शहीद झालेल्‍या वीर जवानांच्‍या कुटुंबियांना देखील ५० लाखांची मदत द्यावी, असे आवाहन डॉ. धेंडे यांनी केले. तसेच शहीद जवानांच्‍या कुटुंबियांची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

या वेळी उपस्‍थित भंतेकडून युद्ध नको बुद्ध हवा हा संदेश देत असताना बुद्धाने शांतता व करुणाची शिकवण दिली आहे. परंतु स्वरक्षण करताना (स्वतःचे किंवा देशाचे) हिंसा करणे यात गैर नसते, हे उदाहरण देऊन तथागत गौतम बुद्धांचा खरा शांततेचा संदेश काय हे समजावून सांगितले.

वाचनाची आवड निर्माण करणाऱ्या पुस्तकांमुळे मानवी जीवन समृद्ध

किशोर कदम यांचे प्रतिपादन; ‘पुस्तकांवरील पुस्तकं’ या विषयावर रंगल्या मनमोकळ्या गप्पा

पुणे: “पुस्तके मानवी जीवन समृद्ध करतात. वाचनाची आवड निर्माण करणारे साहित्य खिळवून ठेवते. मानवी व समाज जीवनाचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न लेखक करीत असतो. साहित्याचा वेध घेणारी पुस्तके निर्माण होणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन कवी व अभिनेते किशोर (सौमित्र) कदम यांनी केले.

कृष्णा पब्लिकेशन्सच्या वतीने ‘द हाऊस ऑफ पेपर’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात किशोर कदम बोलत होते. भांडारकर संशोधन संस्थेच्या सभागृहात आयोजित सोहळ्यात शरद पवार फेलोशिपचे समन्वयक व लेखक नितीन रिंढे, कवी व समीक्षक गणेश विसपुते, साहित्यिक प्रवीण बांदेकर, अनुवादक करुणा गोखले, यशवंतराव चव्हाण सेंटरचे मानद व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, लेखक व संपादक अभिषेक धनगर, प्रकाशक चेतन कोळी, अनिल पवार आदी उपस्थित होते.

किशोर कदम म्हणाले, “चांगल्या पुस्तकांचा शोध घेणे, संग्रह करणे आणि त्याचे वाचन करणे आयुष्याला घडवीत असते. काव्य आपल्याला भावना व्यक्त करण्याचे व्यासपीठ देते. साहित्य हवेहवेसे आणि आनंददायी असावे. पुस्तकांच्या सानिध्यात राहिले, तरी आपल्या आयुष्यात ऊर्जा निर्माण होत राहते.”

नितीन रिंढे म्हणाले, “पुस्तकांवर लिखाण करणे ही एक कला आहे. पुस्तके वाचली जातात की नाही, याची चिंता करण्यापेक्षा पुस्तकांच्या गर्दीत जगणे अतिशय सुंदर असते. पुस्तकांना केंद्रबिंदू मानून मराठीत पुस्तकांवरील पुस्तक येण्याची गरज आहे. पुस्तकांसोबतच पुस्तकांबद्दल मार्गदर्शन करणारा एक तरी मित्र आयुष्यात असावा.”

गणेश विसपुते म्हणाले, “वास्तवाच्या जवळ जाणारी पुस्तके मनाला भिडतात. या पुस्तकात अनेक वास्तविक प्रसंग असून, आपल्याला अचंबित करतात. पुस्तकांचा संग्रह करण्याचे वेड असावे. जगभरातील अनेक चांगली पुस्तके शोधून त्याचा विविध भाषांत अनुवाद झाला, तर सर्व भाषिकांना समृद्ध साहित्य वाचण्याची संधी मिळेल.”

प्रवीण बांदेकर यांनी साहित्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम विशद केला. वाचन माणसाला माणूस बनवते. जीवनाला एक नवी दिशा देते. विचार करायला शिकवते. त्यामुळे आपण सर्वांनी पुस्तकांशी मैत्री करा. वाचनामुळे मी घडलो, वाचनामुळेच माझ्यातील साहित्यिक निर्माण झाला व मला वेगळी ओळख मिळाली, असे त्यांनी सांगितले.

करुणा गोखले, दत्ता बाळसराफ, अभिषेक धनगर यांनीही मनोगत व्यक्त केले. चेतन कोळी यांनी प्रास्ताविक केले. मृदगंधा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. अक्षय शिंपी यांनी पुस्तकातील निवडक उतार्‍यांचे अभिवाचन केले. आभार मृदगंधा दीक्षित यांनी केले.

सफाई कामगार यांना स्वच्छता सैनिकांचा दर्जा द्यावा : डॉ सुधाकर पणीकर

उत्कृष्ट स्वच्छता सैनिकांना शासनाने पुरस्कार द्यावेत : संगीता तिवारी

पुण्यात अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसतर्फे सफाई कामगारांचा झाला विशेष सन्मान

पुणे – देशाच्या सीमेवर लढणारे जवान हे भारतीय नागरिकांचे रक्षण करतात, तर देशांतर्गत कार्यरत स्वच्छता कामगार हे भारतीयांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झटत असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने सफाई कामगार असा उल्लेख करण्याऐवजी त्यांना यापुढे स्वच्छता सैनिक म्हटले गेले पाहिजे. आज स्वच्छता सैनिकांच्या मागण्यांबाबत मनपा प्रशासन व सरकार आडमुठी भूमिका घेते. त्यामुळे आगामी काळात जोरदारपणे संघटित होऊन तीव्र आंदोलन करण्याचा आजच निर्धार करा, असे आवाहन अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री डॉ सुधाकर पणीकर यांनी केले.

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने श्रमिक पत्रकार भवनाच्या सभागृहात सफाई कामगार व त्यांच्या पाल्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, त्या वेळी डॉ सुधाकर पणीकर बोलत होते. सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संगीता तिवारी होत्या.या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश लालबिगे, गणेश भोसले, विकास कुचेकर, अॅड. रशिद सिद्दिकी, गुलाब चव्हाण, मनोहर परमार, प्रमोद कोटियाना,चंद्रकांत चव्हाण, कैलास बिडलान, वनिता घोरपडे, रवी भिंगानिया, परवीन लालबिगे, गणेश लालबिगे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट सफाई कामगार, तसेच कामगार नेत्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला,तसेच याप्रसंगी रुक्मिणीबाई लालबिगे यांचा सर्वोत्कृष्ट माता पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला. याशिवाय कार्यक्रमात सफाई कामगारांच्या दहावी-बारावीतील गुणवंत पाल्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. चिमुकली सर्पमित्र हर्षदा लोहिरे हिचादेखील सत्कार करण्यात आला.

संगीता तिवारी या वेळी म्हणाल्या की, शहरांना सुशोभित ठेवण्यात सफाई कामगारांचे महत्व अनन्यसाधारण आहे. कोरोना महामारीच्या काळात सफाई कामगारांच्या कार्याची महती खऱ्या अर्थाने कळली. तुमच्या कार्याला खरंच आम्ही सॅल्यूट केले पाहिजे, परंतु असे असतानादेखील महापालिका प्रशासन हे सातत्याने सफाई कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आलेले आहे, त्यामुळे आता सर्वांनी संघटित होऊन कायदेशीर मार्गाने लढा देऊन आपल्या मागण्या सोडवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणे गरजेचे आहे.

संस्थापक अध्यक्ष सतीश लालबिगे या वेळी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसच्या झेंड्याखाली कामगारांच्या मागण्यांसाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. मनपा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाच्या विरोधात आगामी काळात सर्व सफाई कामगारांनी संघटित होऊन जोरदार लढा द्यावा. तसेच पुढच्या वर्षीपासून कामगारांच्या सत्कारासह संघटना कामगारांना आर्थिक मदत देणे, संसारोपयोगी वस्तू प्रदान करणे, कामगारांचे आरोग्य तसेच त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने मदत दिली जाईल.

सत्कार सोहळ्यात डॉ सुधाकर पणीकर यांचाही विशेष कर्मवीर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन पुणे महानगर पालिकेचे अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने सचिव सूर्यकांत यादव आणि एमएमजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र वाईकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सफाई कामगार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय वातावरणात रंगली धम्म पहाट

विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने आयोजन

पुणे : बुद्धम् शरणम् गच्छामि….,  साऱ्या विश्वाला बुद्ध हवा…, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले.. , साऱ्या विश्वाला बुद्ध हवा… अशा बुद्ध – धम्म गीतांनी आणि  राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे (माऊली) यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाच्या माध्यमातून बुद्ध – कबीर अन् तुकोबांच्या विचारांचा जागर करत बुद्ध पौर्णिमेची धम्म पहाट मंगलमय वातावरणात रंगली. 

जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने ‘धम्मपहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुध्द्ध-भिम गीतांनी सजलेला हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुणे स्टेशन येथे संपन्न झाला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, महोत्सव समितीचे सरचिटणीस दिपक म्हस्के, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, श्रामणेर, भंते यांच्यासह असंख्य बौद्ध अनुयायी उपस्थित होते. याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. 

सामूहिक बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशील पाठणाने धम्मपहाट कार्यक्रमाला सुरूवात झाली. पहाटेच्या हलक्याशा गारव्यात  राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे (माऊली) यांनी वारकरी आणि बुद्ध विचारांचे नाते उलगडले. वारकरी समाजाचा पाया तथागत गौतम बुद्धाच्या विचारातच असल्याचे सांगताना त्यांनी जगदगुरु संत तुकारांच्या अभंगाचा बुद्ध तत्वज्ञानाशी असलेला संबंध आपल्या ओघवत्या वाणीतून उपस्थितांना सांगितला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला न्याय आणि समतेचा संदेश देणारे बुद्ध तत्वज्ञान व वारकरी संप्रदायातील संताच्या विचारातून आल्याचेही वाबळे महाराजांनी नमूद केले. 

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात “बोलो जय भीम….., सरे रात काळी …….,  भारत भू के  क्रांती सूर्य को प्रणाम.., भीमरायाने किमया ही केली.., माझी आजी म्हणायची..” अशा एकाहून एक सरस बुद्ध – भीम गीतांचे सादरीकरण सा.रे.ग.म.प. फेम प्रसिद्ध पार्श्वगायक कुणाल वराळे, सा.रे.ग.म. फेम अनुष्का शिकतोडे, पार्श्वगायिका स्वप्नजा इंगोले, गायक संविधान खरात, गायक स्वप्निल जाधव आणि त्यांच्या वाद्यवृंदाने  सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 

धम्म पहाट कार्यक्रमाबद्दल बोलताना आयोजक परशुराम वाडेकर म्हणाले, यंदा धम्मपहाट कार्यक्रमाचे 20 वे वर्षे आहे. जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. त्याप्रमाणे पुणे शहारातही आम्ही धम्मपहाट कार्यक्रमाच्या माध्यमातून बुद्ध पौर्णिमा साजरी करीत आहोत. बुद्ध पौर्णिमेच्या काही तास आधी भारत – पाकिस्तान मधील युद्धबंदी चा निर्णय म्हणजे जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध हवा हाच संदेश देणार आहे.

धम्म पहाट कार्यक्रमाची सांगता  पाहेलगाम हल्ल्या तील मृतांना आणि त्यानंतर पाकच्या गोळीबारात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून आणि राष्ट्रगीताने करण्यात आली.  कार्यक्रमाची निर्मिती आणि निवेदन दीपक म्हस्के यांचे होते.

५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान

पुणे :श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्यावेळी गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला. तसेच मंदिरामध्ये गणेशयाग देखील करण्यात आला

वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य बाप्पाला दाखविण्यात आला. श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते. त्यापैकी एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता.दुर्मती राक्षसाने पृथ्वी-पाताळ-स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालविलेला होता त्याचा नित्पात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेशांनी विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध केला त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो

गाभाऱ्यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती.पहाटे गायिका सानिया पाटणकर आणि सहकाऱ्यांनी आपली गायन सेवा गणपती चरणी अर्पण केली श्रीगणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो. या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णुंच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरुपात शंकर-पार्वती यांच्या घरी जन्म घेतात.

वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो. तसेच, दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

गोखले पुलाचे भाजप मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई:शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बीएमसीच्या अकार्यक्षम आणि अस्पष्टतेमुळे प्रकल्प लांबणीवर पडला – आमदार अमीत साटम

मुंबई: गोखले पुलाच्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या भागाचे उद्घाटन रविवारी संध्याकाळी भाजपचे सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आणि अंधेरी (पश्चिम) येथील भाजप आमदार अमीत साटम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यामध्ये आमदार अमीत साटम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी प्रकल्प जलद गतीने पूर्ण होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

याप्रसंगी बोलताना आमदार अमीत साटम यांनी अलिकडच्या काळात बीएमसीने सर्वात जलद गतीने पूर्ण केलेल्या प्रकल्पांपैकी एक म्हणून गोखले ब्रिजचे वर्णन केले. गोखले पूल बंद झाल्यानंतर १५ महिन्यांच्या आत एक बाजू कार्यान्वित करण्यात आली आणि २८ महिन्यांच्या आत पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली. हा एक असाधारण अभियांत्रिकी पराक्रम आहे. कारण एका सक्रिय रेल्वे मार्गावर बांधकामाचा समावेश होता. हा बीएमसचा सर्वात जलद पूर्ण झालेल्या प्रकल्पांपैकी एक आहे, असे आमदार साटम म्हणाले.

गोखले पुलासारखे विक्रमी काम भविष्यात मुंबईत मोठ्या प्रमाणावर होण्याकरता मुंबईकरांना आशीर्वादाची साद आमदार साटम यांनी यावेळी घातली.

यावेळी बोलताना भाजप मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की हा पुल म्हणजे भविष्यात मुंबईच्या गतीने होणाऱ्या विकासाची एक झलक आहे. त्यामुळे पुल- एक यशाची गाथा असे पुस्तक आमदार साटम यांनी लिहावे.

याउलट, ऑगस्ट २०१८ मध्ये काम सुरू झाले असले तरी, पाच वर्षांच्या विलंबानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये डिलाईल पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

आमदार साटम यांनी पुढे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बीएमसीच्या अकार्यक्षम आणि अस्पष्टतेमुळे पुलाचे काम लांबणीवर पडल्याची टीका केली. जुलै २०१८ मध्ये गोखले पुलाचा एक भाग कोसळला होता ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर बीएमसीने कोसळलेल्या भागाच्या पुनर्बांधणीचा विचार सुरू केला. तथापि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बीएमसी प्रशासनाने २० महिन्यांचा विलंबनंतर मार्च २०२० मध्ये कामाचे आदेश जारी केले. तरीही, प्रत्यक्ष काम नोव्हेंबर २०२१ मध्येच सुरू होऊ शकले. त्यातही रेल्वे ट्रॅकवरील भाग रेल्वे किंवा बीएमसी कोण बांधणार याची स्पष्टता नव्हती, असे आमदार साटम यांनी सांगितले.

आमदार साटम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची माहिती देताना ते म्हणाले की नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनी प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रकल्पस्थळाला भेट दिली. त्या भेटीदरम्यान बीएमसीने नियुक्त केलेल्या सल्लागाराने स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर केला. त्यात पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले. स्टीलला मोठ्या प्रमाणात गंज लागला होता आणि कधीही पडू शकत होता, असे समोर आल्याचे आमदार साटम यांनी सांगितले.

त्यानंतर आमदार अमित साटम यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला. चहल त्यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये गोखले पूल बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तत्कालीन मुंबई उपनगरमंत्री मंगल प्रभात लोढा, बीएमसी आणि रेल्वे यांच्यासोबत एक संयुक्त बैठक बोलावण्यात आली आणि त्यात एक व्यापक पुनर्बांधणी रणनीती आखण्यात आली. तेव्हापासून, प्रकल्पाला लक्षणीय गती मिळाली, असे आमदार साटम म्हणाले.

आमदार साटम पुढे म्हणाले की, जुना पूल पाडण्याचे काम जानेवारी २०२३ मध्ये सुरू झाले आणि मार्च २०२३ मध्ये नवीन पुलाचे बांधकाम सुरू झाले. प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आम्ही नियमित प्रकल्पस्थळी भेटी दिल्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहभागाचा या प्रकल्पाला फायदा झाला. त्यांनी या पुलाला दोनदा भेट दिली. या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम २६ फेब्रुवारी २०२४ रोजी पुलाचा एक भाग उघडण्यात झाला – तोही बंद झाल्यानंतर फक्त १५ महिन्यांनी. त्यानंतर दुसऱ्या भागाचे काम आता यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. आज गोखले पुल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, असे आमदार साटम पुढे म्हणाले.

महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी,माजी आमदार मोहन जोशी

0

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे.

हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतीगृहे आणि शाळा चालविल्या जातात. तसेच ग्रामीण भागात गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, अभ्यासिका चालविल्या जातात. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार, प्रसाराचे कार्य हरिजन सेवा संघातर्फे करण्यात येते त्याचा विस्तार आगामी काळात केला जाईल, असे मोहन जोशी यांनी निवडीनंतर सांगितले.

हरिजन सेवक संघाच्या स्थापनेला यंदा ९३ वर्षे झाली आहेत. ही संस्था शताब्दी कडे वाटचाल करत आहे. त्यादृष्टीने सेवक संघात सर्व जाती धर्माच्या युवक, युवतींचा सहभाग वाढावा, त्यादृष्टीने प्रयत्न रहातील आणि युवा वर्गाकडून नवनवीन कल्पना घेऊन कार्याला आधुनिकतेची जोड दिली जाईल, असे मोहन जोशी यांनी निवडीनंतर सांगितले.

गांधीवादी नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांनी महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्षपद अनेक वर्षे भूषविले आणि सेवक संघाच्या महाराष्ट्रातील कार्यात मोलाचे योगदान दिले. हरिजन सेवक संघाचा कारभार आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरला असून, अनेक विचारवंत, संशोधक, सामाजिक आणि राजकीय नेते यात सहभागी आहेत.

कळावे.

आपला,
मोहन जोशी,
माजी आमदार,
उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस.

नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हक्काचे केंद्र -ना. चंद्रकांतदादा पाटील

पाषाण-सुतारवाडीतील नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पुणे:नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे हक्काचे केंद्र असून, कोथरुड मतदारसंघातील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे विविध समस्या सोडविण्यासोबतच; शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ पोहोचवण्याची भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. कोथरुड मतदारसंघातील पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकांसाठी नवीन जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण ना. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजप उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सायकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, उत्तरचे माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, दक्षिणचे माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे हक्काचे केंद्र आहे. मतदारसंघातील विविध जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच; शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या. त्यामुळे या जनसंपर्क कार्यालयाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सुकन्या समृद्धी योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचे कार्ड प्रदान करण्यात आले.

अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या हॉटेल चालकासह 4 जणांवर गुन्हा दाखल

0

पुणे:साळुंखे विहार रस्त्यावर अवैधरित्या तंबाखुजन्य हुक्का पार्लरचा पर्दाफाश करण्यास वानवडी पोलिसांना शनिवारी (ता. 10) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास यश आले आहे. पोलिसांनी या छाप्यात हॉटेल चालकासह 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.तर 3 हजार 215 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नारायण मगर थापा (वय-33 रा. शिवनेरीनगर, लेन नं.15 .कोंढवा, पुणे), चंदनकुमार श्रीतेवन राय (वय 22, रा. दि स्पाईसी फ्लोअर कॅफे अॅण्ड क्लाऊड किचन, सुपर मॉल दुसरा मजला, साळुंखे विहार रोड, वानवडी पुणे), इनायत मजिद सल्ला (वय-52, रा. भाग्योदयनगर, कोंढवा, पुणे) व जावेद मलिक शेख (वय-42 रा. पूना कॉलेज समोरील वस्ती, गोळीबार मैदान, कॅम्प, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरामध्ये अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वेळोवेळी सुचना दिल्या असुन, पुणे शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे होणार नाहीत. यासाठी पाठपुरावा केला जात असुन, अवैध धंदे समुळ नष्ट करण्याचे काम सुरु आहे.

मिळालेल्या आदेशाच्या अनुषंगाने वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे व त्याच्या सहकारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलीस हवालदार अमोल पिलाने व पोलीस अंमलदार अभिजीत चव्हाण यांना दि स्पाईसी फ्लोअर कॅफे अॅण्ड क्लाऊड किचन या हॉटेलमध्ये अवैध हुक्का पार्लर सुरु आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून पर्दापाश केला आहे. याप्रकरणी हॉटेल चालकासह 4 जणांवर सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018 चे कलम 4-अ, 21-अ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे गोविंद जाधव, उपनिरीक्षकधनाजी टोणे, रमेश साबळे, पोलीस हवालदार अमोल पिलाणे, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, बालाजी वाघमारे, गोपाळ मदने, विष्णु सुतार, यतीन भोसले दया शेगर, व सोमनाथ कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट

शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदतीची ग्वाही

नांदेड दि.११ :- देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र, भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. शहीद सचिन यांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार जितेश अंतापूरकर, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे आदिंची यावेळी उपस्थिती होती.

श्री. पवार म्हणाले की, भारतीय लष्करातील जवान सचिन यांचा मृत्यू ही अतिशय दुःखद घटना आहे. सचिन यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या घरकुल योजनेतून घर दिले जाईल. त्यांच्या पत्नी वा भावाला नोकरी दिली जाईल. त्यांच्या मुलीच्या शिक्षण व उज्वल भविष्यासाठी शासनाच्यावतीने तरतूद करण्यात येईल.

त्यांच्या पेन्शनची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतः तहसीलदारांनी लक्ष द्यावे, अशी यावेळी सूचना करून श्री. पवार यांनी शहीद सचिन वनंजे यांना शहिदाचा दर्जा मिळावा यासाठी देखील शासन प्रयत्न करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.


भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अभ्यासक्रमांची घोषणा

पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बीए एलएलबी,बीबीए एलएलबी,एलएलबी,एलएलएम या अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे.अधिक माहिती ९१४५४३००७२ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच https://bvducet.bharatividyapeeth.edu या लिंकवर मिळू शकेल.या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी 

एमएचसीईटी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. मात्र,भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठची सीईटी परीक्षा द्यावी लागेल.

भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ.उज्वला बेंडाळे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.बीए एलएलबी,बीबीए एलएलबीसाठी अर्ज करण्याची मुदत १३ जून २०२५ आहे,तर एलएलबीसाठी अर्ज करण्याची मुदत १२ जून २०२५ आहे.एलएलएमसाठी अर्ज करण्याची मुदत १० जुलै २०२५ आहे.

मिथक कथेतून वास्तवाचा बोध घ्या :प्रा.अशोक राणा

पुणे :, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित’गांधी दर्शन’ शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. रविवार,दि.११ मे २०२५ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत  कोथरूड येथील गांधी भवनच्या  सभागृहात हे शिबीर पार पडले.१९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  अशोक राणायांनी ‘मिथक चिकित्सा’,तर लोकसंस्कृतीच्या अभ्यासक स्नेहा टोम्पे यांनी ‘मातृत्वतत्त्वांची मिथके’ याविषयावर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी शिबिराच्या अध्यक्षस्थानी होते. ‘ गांधी दर्शन’ विषयावरचे हे विसावे शिबीर होते.प्रा. मच्छिन्द्र गोर्डे, अन्वर राजन, विकास लवांडे,अजय भारदे,स्वप्नील तोंडे,संदीप बर्वे, अरुणा तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

प्रा.राणा म्हणाले,’भारत हा पुराणकथात वावरणारा देश आहे.कारण मिथक आणि वास्तव यातील फरक भारतीय जनमानसाला ठाऊक नाही.आपल्या दैनंदिन जीवनात घडणारी मिथके,पुराणकथांशी संबंध जोडून त्यावर आधारित विचारसरणी स्वीकारण्याबद्दल भारतीयांना धन्यता वाटते.त्यातून नीतिबोध घ्यावा,दिशा घ्यावी अशी अपेक्षा असते,पण तसे होत नाही.वास्तवाची दाहकता टाळण्यासाठी कल्पनाविलासाकडे त्याचे मन वळते.चमत्कृतीने नटलेली मिथके जनमानसाचा ठाव घेतात.ही कल्पनांची पुटे बाजूला सारून चिकित्सेला तयार राहिले पाहिजे’.

स्नेहा टोम्पे म्हणाल्या,’भविष्याची बीजे इतिहासात असतात. म्हणून पुराण कथा, मिथक, देवता यावर बोलण्याची गरज असते.पुरातत्विय, राज्यशास्त्रीय, समाजशास्त्रीय दृष्टीकोणातून पाहण्याची गरज आहे.प्रजननक्षमतेमुळे, सृजनक्षमतेमुळे जगभर मातृदेवता निर्माण झाल्या.त्यांची प्रतिके, पूजा सुरु झाली.योनीपूजेमुळे वारूळ, कवडीची पूजा सुरु झाली.नाग, लिंगपूजा हा असाच प्रघात आहे.कुंभ, घट हे गर्भाशयांचे प्रतीक मानले गेले.गुढी देखील सृजनाचे प्रतीक आहे.मिथक ही घडून गेलेल्या घटनांची स्पष्टीकरणे असतात.मिथक समजून घेताना तर्क लावले पाहिजेत. समता निर्माण करण्याचे उद्दिष्ट असले पाहिजे’.

डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले,’ कथातून मिथक पुढे आणली जात आहेत.त्याचे शास्त्र झाले. हा तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे. वर्चस्व कबूल करण्यासाठी, उच्च -नीच श्रेणी निर्माण करण्यासाठी मिथकांचा वापर केला जातो.साहित्य म्हणजे इतिहास नव्हे,हे लक्षात घेतले पाहिजे. दंगे घडविण्यासाठी खोटी मिथके वापरली जातात.युद्धांचा देखील खरे-खोटेपणा इतिहास दाखवला जातो.सत्य समजण्यासाठी सामुदायिक शहाणपण,विवेक असला पाहिजे’.

व्यवसाय वाढतो तेव्हा ती कला राहत नाही तर विज्ञान होते :सौरभ गाडगीळ

0

तुळशीबाग व्यापारी कट्टा अंतर्गत मुलाखत

पुणे:  व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून न बघता आनंद म्हणून बघायला पाहिजे. काहीतरी वेगळे करण्यासाठी जिद्द असावी लागते. पैशांपेक्षा आपण कमावलेले माणसे हा नफा असला पाहिजे. चांगले गिऱ्हाईक, चांगले कारागीर असतील तर व्यवसाय आपोआपच चांगला होतो. व्यवसाय वाढतो तेव्हा ती कला राहत नाही तर व्यवसाय हे विज्ञान होते. व्यवसायात आकडेवारी, माहिती ही फार महत्वाची असते, असे मत पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केले.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५) वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्त  ‘तुळशीबाग व्यापारी कट्टा’ या विशेष मुलाखत सत्रातून पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांचा उद्योग प्रवास उलगडण्यात आला. पूना गेस्ट हाऊस येथे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी गाडगीळ यांची मुलाखत घेतली. यावेळी अध्यक्ष विकास पवार, विनायक कदम उपस्थित होते.

पुणे शहर हे सांस्कृतिक शहर, शिक्षणाचे माहेरघर आणि आता माहिती तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखले जाते परंतु पुणे शहर हे व्यापाऱ्यांचेही शहर असून येथील काही व्यापाऱ्यांनी पुण्यातच नव्हे तर देशात परदेशात आपला नावलौकिक केला आहे. अश्याच  पुण्यातील प्रथितयश व्यापारी  आणि उद्योगपती यांची यशोगाथा तुळशीबाग व्यापारी कट्ट्याच्या माध्यमातून उलगडणार आहे.

दर सोमवारी सदर कट्टा लक्ष्मी रस्त्यावरील ऐतिहासिक पूना गेस्ट हाऊस या वास्तूत सुरु केला आहे. पुण्यातील जगप्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाल्यांचे संजय चितळे यांच्या मुलाखतीने तुळशीबाग व्यापारी कट्टा सुरु झाला. तसेच जयराज बासमती चे राजेश शहा, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, हाॅटेल सुकांता चे विजयकुमार मर्लेचा यांच्या सदर कट्ट्यावर मुलाखती झाल्या असून  व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती सुद्धा होणार आहेत.

सौरभ गाडगीळ म्हणाले, पुण्यातील ग्राहक जितका चोखंदळ आहे. तितकाच तो प्रेम करणारा देखील आहे. इतर शहरातील ग्राहक मनासारखी डिझाइन मिळाली नाही तर इतर दुकानात जातात परंतु पुणेकर ग्राहक हवी ती डिझाइन पीएनजी मध्येच बनवून द्या असे सांगतात. त्यामुळे पुणेकरांसारखे निष्ठावान ग्राहक कुठेच नाहीत. एकूण ग्राहकांपैकी ४५  ते ५० टक्के ग्राहक हे पीएनजीमध्ये कायम येणारे आहेत. मी व्यवसायात येण्यापूर्वी व्यवसाय करण्याचा दृष्टिकोन खूप पारंपरिक होता. नवीन गोष्टी लोकांना दाखविण्यासाठी ब्रॅण्डिंगची गरज असते, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, अडचणी येतात, निर्णय चुकतात, नुकसान होते, पण या सगळ्यातून शिकायला हवे. तरुण उद्योजक आणि आताची पिढी यांच्यासाठी आजच्या काळात खूप गोष्टी सोप्या झालेल्या आहेत, कारण स्टार्टअप संस्कृतीचा उदय झाला आहे. स्वप्न पाहून जर दररोज त्या स्वप्नांसोबत जगायला लागलो, तर ती स्वप्ने पूर्ण होतात. शॉर्टकटचा मार्ग नको, असेही त्यांनी सांगितले.