Home Blog Page 537

नामवंत शाळेतील नृत्यशिक्षकाने 11 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत केले अश्लील कृत्य;पोलिसांनी केली अटक

पुणे- येथील एका नामवंत शाळेतील डान्स शिक्षकाने 11 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार काल उघडकीस आला आहे.ही घटना पुणे शहरातील कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलीसांनी शिक्षकाला तात्काळ अटक केली आहे. विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरु असताना हा सर्व प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

मंगेश साळवे असे नृत्य शिकविणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना डान्स शिकवणा-या शिक्षकाने हे संतापजनक कृत्य केल्याचे 11 वर्षाच्या विद्यार्थ्याने समुपदेशन सुरु असताना सांगितला. त्यामुळे ही घटना उघडकीस आली.

या अकरा वर्षांच्या विद्यार्थ्याने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना देखील सांगितला नाही. या घटनेची माहिती कळताच त्याच्या आई-वडिलांना देखील मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ वारजे पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मंगेश साळवे या डान्स शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला, त्यानंतर त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतात कल्पकतेला वाव : केन झुकरमन

ऋत्विक फाऊंडेशन, मॉडर्न कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘केन झुकरमन : लाईव्ह इन कॉन्सर्ट‌’
पुणे : संगीत क्षेत्र अमर्याद असून गायन हा संगीताचा आत्मा आहे. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे हे संगीत केवळ नोटेशन पाहून सादर केले जात नाही तर एकाग्र चित्ताने ऐकून त्यात स्वत:च्या कल्पकतेची भर घालत आत्मसात केले जाते. हा विचार माझ्यातील कलाकाराला भावला. गुरूंच्या सान्निध्यात राहून अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतात मी रममाण झालो, अशा भावना स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरोद वादक, ग्रॅमी नामांकनप्राप्त केन झुकरमन यांनी व्यक्त केल्या.
वाद्यसंगीत शिकताना स्वत:ला एकाच वाद्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. मुख्यत: गायन शिका, कारण कुठलेही वाद्य वाजविताना तुम्ही खरे तर मनातून गात असता. संगीत शिकणे व शिकविणे यासाठी वयाचे बंधन नाही. शेवटच्या श्वासापर्यंत संगीत शिकता आणि शिकविताही येऊ शकते. मला वारशातून मिळालेले भारतीय शास्त्रीय संगीत मी शिकवत राहणार आहे, असेही त्यांनी आवजूर्न सांगितले.
ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आणि डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍, मॉर्डन कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘केन झुकरमन : लाईव्ह इन कॉन्सर्ट‌’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील भारतरत्न लता मंगेशकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात पुणेकरांना केन झुकरमन यांचे सरोद वादन आणि त्यांच्या सांगीतिक क्षेत्राविषयीचे अनुभव ऐकावयास मिळाले. केन झुकरमन यांच्याशी पुण्यातील प्रसिद्ध सरोद वादक अनुपम जोशी यांनी संवाद साधला.
भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया गायन शिकल्याने पक्का होतो, असे आपल्या गुरूंचे मत होते असे सांगून झुकरमन म्हणाले, एकाग्र चित्ताने गुरूंकडून ज्ञान ग्रहण करणे गरजेचे आहे, कारण शिष्याने नेहमी एकाग्रचित्त राहून उत्तम श्रोता होणे आवश्यक असते. परंतु आजच्या काळात ही एकाग्रचित्त वृत्ती स्मार्ट फोनच्या अतिवापराने कमी होत चालली आहे. शिष्य कोण आहे, कुठला आहे याला महत्त्व नसून सुजाण पालक व उत्तम गुरू लाभल्यास पुढच्या पिढीतील गायक-वादक निर्माण करणे शक्य आहे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
मला लहानपणापासूनच संगीत क्षेत्राची आवड होती. लहानपणी मी गिटारवादन शिकलो. त्यातही गुरूंनी सांगितलेले साचेबद्ध वादन न करता नाविन्य शोधण्यासाठी सतत प्रयत्नशील होतो. अशातच भारतातील प्रसिद्ध सरोद वादनगुरू उस्ताद अली अकबर खान यांचे वादन ऐकले. त्यातून प्रभावित होऊन मी सुरुवातीस सतार वादनाकडे वळलो. परंतु सरोद हे वाद्य मनाला अधिक भावल्याने गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सरोद वादनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. उस्ताद अली अकबर खान यांच्यातील सांगीतिक दृष्टीकोन आणि कौशल्य मला आवडल्याने मी नेटाने सरोद वादन शिकण्यास सुरुवात केली. नवनिर्मितीच्या ध्यासातून मी सतत सरोद वादनात काही ना काही प्रयोग करीत राहिलो. त्यातूनच पहिल्या वादन मैफलीत जनसंमोहिनी रागाबरोरबच माझी स्वत:ची रचना वाजविण्याचे धाडस केले. गुरूंनी मला योग्य दिशा दाखवत नवनवीन प्रयोग करण्यास प्रोत्साहितच केले, हे मी माझे भाग्य समजतो. भारतीय शास्त्रीय संगीताचा आत्मा जाणून घेताना राग विस्ताराचे स्वातंत्र्य असल्याचे जाणवल्याने भारतीय अभिजात संगीताला मी वाहून घेतले आहे.
मैहर घराण्याच्या सरोद वादनाची वैशिष्ट्यपूर्ण शैली, त्यातील बारकावे सांगताना केन झुकरमन यांनी झमझमा, सिधा झाला, उलटा झाला आदी प्रकार वादनातून ऐकविले. तंत्राची नक्कल करता येते परंतु वादनातील अभिव्यक्ती प्रकट करण्यासाठी कलाकारामध्ये कल्पकता असण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

वादन मैफलती केन झुकरमन यांनी गुरू उस्ताद अली अकबर खान यांचा आवडता बागेश्री कानडा हा पारंपरिक राग अतिशय प्रभावीपणे सादर केला. गुरूंची निर्मिती असलेल्या चंद्रनंदन या सुरेल, सुमधूर रागाच्या निर्मितीमागील कथा उलगडत त्यांनी हा राग ऐकवून रसिकांना अचंबित केले. त्यांना पुण्यातील युवा तबला वादक महेशराज साळुंके यांनी समर्पक साथ केली.
कलाकारांचा सत्कार ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे संस्थापक प्रविण कडले, चेतना कडले आणि मॉडर्न महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे विभाग प्रमुख पुष्कर लेले यांनी केले. सूत्रसंचालन रश्मी वाठारे यांनी केले तर आभार श्रुती पोरवाल यांनी मानले.

आज रिचेबल अजित पवारांच्या भेटीसाठी गर्दी

नागपूर- काल गायब झालेले अजित पवार आज नागपूर विधानभवनाच्या आवारात आले. आज अजित पवार विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी निघाले आहेत.काल तब्बेत बरी नसल्याने ते नॉट रिचेबल झाल्याचे आज सांगण्यात येत होते .त्यामुळे आज अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. आज त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांची भेट घेतली.याप्रसंगी नवनिर्वाचित मंत्री हसन मुश्रीफ, कु. अदिती तटकरे, आ. शेखर निकम, आ. राजकुमार बडोले आणि इतर पदाधिकारी सहकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा त्यांनी केली.

अजित पवार यांची प्रकृती खराब असल्यामुळे ते कोणालाही भेटले नसल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. आज सकाळी मंत्री आदिती तटकरे यांनी अजित पवार यांची निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर आदिती तटकरे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचे सांगितले आहे. यावेळी आदिती तटकरे माध्यमंशी बोलताना म्हणाल्या की, ‘अजित पवार हे नॉट रिचेबल नव्हते. त्यांची आणि आमची सदिच्छा भेट झाली आहे. पुढील कामासाठी आम्ही त्यांच्या शुभेच्छा घेतल्या.’ असे देखील त्यांनी सांगितले.

अहिल्यादेवी ते पद्मावती एका स्टाॅपच्या अंतरात बसमधून लांबविला पावणेतीन लाखाचा ऐवज

पीएमपीएमएल बस मध्ये चोऱ्या वाढल्या -कात्रज ते स्वारगेट ते गाडीतळ हॉट स्पॉट

पुणे-धनकवडी ते पद्मावती परिसरातून पीएमपीएल बसने प्रवास करणार्‍या महिलेचा गर्दीतही पाठलाग करून चोरट्यांनी त्यांच्याकडील २ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी आंबेगाव याठिकाणी राहणार्‍या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धनकवडी ते पद्मावती पीएमपीएल बसप्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतील १० हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे अडीच लाखांचे दागिने असा ऐवज चोरून नेला. काही वेळानंतर महिलेला पिशवीतील ऐवजाची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनतर त्यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विशाल पवार तपास करीत आहेत.

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

खराडी परिसरात राजाराम पाटीलनगर येथे एका मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पुणे गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी मसाज पार्लरच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

लोकेश राजकुमार पुरी (वय -२३, रा. चौधरी वस्ती, खराडी,पुणे ) असे गु्न्हा दाखल केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागातील सहायक फौजदार छाया जाधव यांनी खराडी (चंदननगर) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील राजाराम पाटीलनगर परिसरात एका इमारतीत मसाज पार्लरमध्ये छुपा पद्धतीने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत मसाज पार्लरच्या नावाखाली आरोपी पुरीने तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पुढील तपास करत आहेत.

घरफोडीत पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

घरात शिरून चोरट्यांनी कपाटातील १ लाख ८० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन चोरून नेली. ही घटना वडगाव शेरीतील शिलानंद सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी धाया चव्हाण (वय ४६) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार छाया चव्हाण कुटूंबियासह वडगाव शेरीतील शिलानंद सोसायटीत राहायला आहेत.चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला त्यानंतर त्यानंतर कपाटातील पावणेदोन लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या चैनवर डल्ला मारला. याप्रकरणी उशिरा चोरीची माहिती झाल्यानंतर छायाने तक्रार दाखल केली आहे. पोलिस अमलदार एस आखाडे पुढील तपास करीत आहेत.

चिमुकल्याचा वाढदिवस आणि आग; अग्निशमन दलाकडून पाच महिला व चिमुकल्याची सुटका

पुणे – दिनांक १७ डिसेंबर २०२४ (मंगळवार) रोजी दुपारी ०२•३९ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात कोंढवा खुर्द, भाग्योदय नगर, गल्ली क्रमांक ३४ येथे दुकानामध्ये आग लागल्याची वर्दि मिळताच तातडीने कोंढवा खुर्द व बुद्रुक येथून दोन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती.

सदर घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, जुन्या तीन मजली इमारतीत तळमजल्यावर असणारया कपड्याच्या दोन दुकानामधून आग लागल्याचे दिसून येताच पाण्याचा मारा सुरु करत आग वरील मजल्यावर व इतरञ पसरणार नाही याची दक्षता घेत वरील मजल्यावर रहिवाशी असलेल्या पाच महिला व एक लहान मुलगा वय वर्ष ३ यांना श्वसन यंञ (बी ए सेट) परिधान करीत आग व धुरामधून बाहेर काढले व पुढे सुमारे वीस मिनिटात आग पुर्ण विझवत पुढील धोका दूर केला. आगीमध्ये कपडे, लाकडी सामान, विद्युत उपकरणे, यंञसामुग्री इत्यादी जळाले असून मोठे नुकसान झाले असून आगीचे कारण समजू शकले नाही. आगीमध्ये एका महिलेच्या पायाला व दलाचे जवान यांच्या हाताला किरकोळ स्वरूपात भाजले आहे.

सदर घटनास्थळी आज लहान मुलाचा वाढदिवस असताना त्याची दलाच्या जवानांनी केलेली सुखरुप सुटका याबद्दल स्थानिकांनी जवानांचे आभार मानत कौतुक केले. यावेळी वाहनचालक रविंद्र हिवरकर, सत्यम चौंखडे व जवान रफिक शेख, किशोर मोहिते, योगेश पिसाळ, सागर दळवी, निलेश वानखेडे, कुणाल खोडे, गोविंद गीते,हर्षल येवले, हर्षवर्धन खाडे यांनी सहभाग घेतला.

NPCI तर्फे नागरिकांना‘डिजिटल अरेस्ट’ फ्रॉडपासून वाचविण्यासाठी जागरूकता मोहीम

आता सगळेच जण डिजिटल पेमेंट्सचा वापर करत असून, भारत डिजिटल-फर्स्ट अर्थव्यवस्थेच्या दिशेने जात आहे. डिजिटल पेमेंट्समुळे सुरक्षा आणि सोईस्करपणा मिळतो. मात्र, डिजिटल पेमेंट्स सुरक्षितपणे वापरणे आणि ऑनलाइन स्कॅम्स टाळणे महत्त्वाचे आहे. संभाव्य स्कॅम्स आधीच ओळखण्याने तुम्हाला व प्रियजनांना मदत होऊ शकते. त्यातूनच प्रत्येकासाठी जास्त सुरक्षित, कॅशलेस अर्थव्यवस्था उभारणे शक्य होणार आहे.

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?

ऑनलाइन स्कॅम्स जास्त सफाईदार होत आहेत आणि डिजिटल अरेस्ट स्कॅम्स हे त्याचं प्रमुख उदाहरण म्हणता येईल. या प्रकारच्या स्कॅममध्ये फसविणारे आपण कायदे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना पैसे पाठविण्यासाठी किंवा वैयक्तिक माहिती शेयर करण्यासाठी भाग पाडतात. त्यासाठी संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याविरोधात कायदेशीर केस करण्याची धमकीही दिली जाते. ते फोनद्वारे संपर्क करतात आणि व्हॉट्सअ‍ॅप किंवा स्काइपद्वारे व्हिडीओ कॉल्स करतात. नागरिकांना तथाकथित आर्थिक गैरव्यवहार किंवा इतर कायदेशीर उल्लंघनासाठी डिजिटल अरेस्ट वॉरंटची भीती घालतात. भीतिपोटी कित्येक नागरिक बळी पडतात व त्यांचे आर्थिक नुकसान होते किंवा त्यांची ओळख चोरली (आयडेंटिटी थेफ्ट) जाते.

संभाव्य डिजिटल अरेस्ट स्कॅम कसे ओळखाल –

  • ‘अधिकाऱ्यां’कडून अनपेक्षित संपर्क – पोलिस, सीबीआय, इन्कम टॅक्स अधिकारी किंवा कस्टम एजंट असल्याचा दावा करून कोणी तुम्हाला संपर्क केल्यास सावधान राहा. जर त्यांनी त्वरित कायदेशीर कार्यवाही करण्याची किंवा वॉरंट पाठविण्याचा दावा केला, तर सावध राहा. तुम्ही किंवा तुमच्या घरातील सदस्य पैशांची अफरातफर, कर बुडवेगिरी किंवा ड्रग ट्रॅफिकिंग अशा गंभीर गुन्ह्यांत सहभागी असल्याचा दावा केला जातो.
  • घाबरविणारी भाषा आणि घाई – स्कॅमर्स व्हिडीओ कॉलची विनंती करून पोलिसाचा वेश परिधान करून, सरकारी लोगो वापरून किंवा अधिकृत वाटणारे आवाज पार्श्वभूमीवर वापरून घाबरविण्याचा प्रयत्न करतील. ते बऱ्याचदा कायदेशीर भाषा वापरून अटक करण्याची किंवा तत्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याची धमकी देऊन जलद प्रतिसाद देण्याची मागणी करतात. काही वेळेस ते पोलिस स्टेशन किंवा सरकारी ऑफिसचा देखावा तयार करून सगळं अधिकृत असल्याचं भासवलं जातं.
  • संवेदनशील माहिती किंवा पेमेंट पाठविण्याची विनंती – स्कॅमर्स वैयक्तिक माहिती किंवा मोठ्या रकमेची मागणी करण्याची दाट शक्यता असते. त्याच्या बदल्यात तथाकथित गुन्ह्यातून तुमचं नाव रद्द करण्याचं आश्वास दिले जाते. तपास पूर्ण होईपर्यंत ते तुम्हाला त्यांच्या खात्यात तातडीनं पैसे पाठविण्यासाठी सांगू शकतील. ‘नाव क्लीयर करणं’ किंवा ‘तपासासाठी सहकार्य करणं’ किंवा ‘रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट/एस्क्रो अकाउंट’ अशा शब्दांचा वापर करून ते तुम्हाला विशिष्ट बँक खातं किंवा यूपीआय आयडीवर पैसे पाठविण्यास सांगतील.

सुरक्षित राहाण्यासाठी व्यवहार्य टिप्स

  • थांबा आणि पडताळणी करा – तुम्हाला कायदेशीर समस्येची भीती घालणारे अनपेक्षित कॉल्स किंवा मेसेजेस आले, तर एकक्षण थांबून पडताळणी करा. शांत राहा, कारण स्कॅमर्स भीती आणि गडबडीचा फायदा घेतात. खऱ्या सरकारी संघटना किंवा कायदे सुरक्षा संघटना कधीच पैसे मागणार नाहीत किंवा फोन अथवा व्हिडीओ कॉलद्वारे केसची तपासणी करणार नाहीत. कायम कॉलरची ओळख तपासा आणि कोणतीही कृती करण्याआधी विश्वासार्ह स्रोतांचा सल्ला घ्या.
  • सपोर्ट चॅनेल्सचा वापर करा – संशयी नंबर्स १९३० वर डायल करून राष्ट्रीय सायबरक्राइम हेल्पलाइनला कळवा किंवा दूरसंचार खात्याला माहिती द्या. (https://sancharsaathi.gov.in/sfc/).
  • रेकॉर्ड करा आणि तक्रार करा: मेसेजेस सेव करा, स्क्रीनशॉट घ्या आणि झालेलं संभाषण नोंदवा. यामुळे तुम्हाला केस दाखल करायची झाल्यास खऱ्या अधिकाऱ्यांना मदत होईल.
  • For more information, visit: https://www.npci.org.in/

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. १७: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून जिल्ह्यातील महाविद्यालयात व्यवसायिक, अव्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईनपद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची मुदत १६ डिसेंबर २०२४ अशी देण्यात आली होती, तथापि आता ती वाढवून 31 डिसेंबर 2024 अशी करण्यात आली आहे. ऑनलाईन संकेतस्थळाचे प्रथम वर्ष असल्याने चालू वर्ष सन २०२४-२५ करीता व्यवसायिक अथवा अव्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्ज पोर्टलवरून डाऊनलोड करावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ३१ जुलै २०२४ पूर्वी थेट संबंधित वसतिगृहात ऑफलाईन अर्ज सादर केले असतील त्यांनीदेखील ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर भरावे. या अर्जांची प्रिंट घेऊन संबंधित वसतिगृहात किंवा सहाय्यक आयुक्त कार्यालयास ऑफलाईनरित्या सादर करावे.

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता एकत्रित नव्याने संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशकरीता अर्ज करुनही अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांची गुणवत्तेअभावी निवड न झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज या प्रणालीव्दारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता ग्राह्य धरले जाणार आहेत, अशी माहिती श्री. लोंढे यांनी दिली आहे.

कोकणात एका पत्रकाराची हत्या, महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात 16 जणांचा मृत्यू, बीडमध्ये दंगल सर्व तपास SIT कडे ..पुढे काय झाले ? SIT एक भूलभुलैय्या ..

0

बीड- :कोकणात एका पत्रकाराची हत्या, महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात 16 जणांचा मृत्यू, बीडमध्ये दंगल सर्व तपास SIT कडे ..पुढे काय झाले ? संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी नेमून काही न्याय मिळणार नाही. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. या प्रकरणात आपण कोणत्या मंत्र्याचं नाव घेत नाही तर खंडणी मागणाऱ्या आरोपी वाल्मिक कराडचे नाव घेत आहोत. पोलिसांनी वेळेवर कारवाई केली असती तर ही हत्या झालीच नसती असा आरोप रोहित पवारांनी केला. हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचं गावकरी म्हणतात, मग त्याला अटक झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. आमदार रोहित पवार हे मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांना भेटायला गेले होते.

निर्घृणपणे हत्या करण्यात आलेले बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची रोहित पवार यांनी भेट घेऊन विचारपूस केली आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली

आमदार रोहित पवार म्हणाले की, “संतोष देशमुख यांच्यासोबत अतिशय भीतीदायक आणि अमानवीय घटना 9 तारखेला घडली. या घटनेत अनेक मोठ्या लोकांचा हात आहे. हे सामान्य लोकांना देखील माहीत आहे. वाल्मिक कराड यांच्या विरोधात पवनचक्की प्रकल्पाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यात मास्टर माईंड हा वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराड याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे. त्याचे सर्व फोन कॉल्स तपासले पाहिजेत.”रोहित पवार पुढे म्हणाले की, “पवनचक्की प्रकल्प परिसरात 6 तारखेला वाद झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी साधी तक्रार देखील घेतली नाही. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आता खंडणीप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या खंडणी प्रकरणात जी नावं आहेत तीच नावं ही हत्या प्रकरणात आहेत. त्यामुळे या सर्वांचा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड हाच असून त्याला अटक झाली पाहिजे.”या प्रकरणात एसआयटी तपास करणार आहे असं राज्य सरकारने सांगितलं आहे. पण या आधी कोकणात एका पत्रकाराची हत्या झाली. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात 16 जणांचा मृत्यू झाला होता. बीडमध्ये दंगल झाली होती. या सर्व प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. पण त्याचा अहवाल किंवा त्यावर काय कारवाई झाली याची काही अपडेट आली आहे का? असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला.

परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची रोहित पवार यांनी भेट घेऊन विचारपूस केली आणि सर्वजण या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली.

संतोष देशमुख प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी आणि त्याचा चौकशी अहवाल हा जनतेसमोर मांडण्यात यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली.बीड जिल्ह्यामध्ये एखादा चांगला अधिकारी आला तर त्याला दीड-दोन महिन्यात बाहेर काढलं जातं. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांनी या जिल्ह्याचं पालकत्व घ्यावं आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी संपवावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

परभणीमध्ये भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व विजय वाकोडे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन रोहित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. वाकोडे यांच्या जाण्याने चळवळीचं मोठं नुकसान झालं असून त्यांचं हे बलिदान वाया जाणार नाही असे ते म्हणाले.

सारथी संस्थेमार्फत विविध उपक्रमांचा शुभारंभ

पुणे, दि. 17 : छत्रपती शाहू महाराज संधोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी) पुणे यांच्यावतीने राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा- कुणबी या प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांची कालबद्ध तऱ्हेने व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचा शुभारंभ सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, माजी संचालक मधूकरराव कोकाटे, माजी संचालक नवनाथ पासलकर नव्याने सुरु करण्यात आलेल्या इनक्युबेशन केंद्रांचे पदाधिकारी व अधिकारी तसेच सारथी संस्थेचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
अध्यक्ष श्री. निंबाळकर म्हणाले, आत्तापर्यंत संपूर्ण राज्यात 12 इनक्युबेशन केंद्रांचा समावेश करण्यात आला असून यामधून अनेक यशस्वी उद्योजक तयार होत आहेत. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा गटातील नवोदित उद्योजकांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक तो आत्मविश्वास, ज्ञान आणि आर्थिक पाठबळ मिळणार असल्याचे सांगून लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. तसेच महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार अभ्यासक्रमासाठी महिलांची प्राधान्याने निवड करावी, असेही श्री. निंबाळकर म्हणाले.
श्री. काकडे यांनी प्रास्ताविकात इनक्युबेशन उपक्रमाबाबत माहिती दिली. ते पुढे म्हणाले या नवउद्योजकांना एक वर्षासाठी 25 हजार रुपये प्रति महिना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसाय कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी इनक्युबेशन केंद्रामध्ये मार्गदर्शन, कार्यालयीन जागा, तंत्रज्ञान, प्रशासकीय सहाय्य, सॉफ्टवेअर सुविधा, बैठकीसाठी सभागृह आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार असल्याचे सांगून निवड झालेल्या लाभार्थ्यांनी स्टार्टअपच्या अनोख्या कल्पना सादर कराव्यात, असे आवाहन श्री. काकडे यांनी केले.
यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमांतर्गत पाच नवीन इनक्युबेशन केंद्राद्वारे प्रशिक्षण, सरसेनापती प्रतापराव गुजर सारथी अधिछात्रवृत्ती संशोधन प्रबंध सारथी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे, स्पर्धा प्रशिक्षण, महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत सीओईपी मधील कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. इनक्युबेशन केंद्रांमध्ये एमआयटी, लोणीकाळभोर, आयसर, पुणे, बारामती फाऊंडेशन, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील एफ.एम.सी.आय.आय.आय. इनक्युबेशन केंद्रांचा समावेश आहे.

वेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी लिमिटेडची रु. 16,000 दशलक्षचा प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री (आयपीओ) शुक्रवारपासून सुरू होणार

● दर्शनी मूल्य १ रुपये असलेल्या प्रत्येक शेअरसाठी 610 ते 643 रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. 

●  बिड/इश्यू उघडण्याची तारीख – शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 आणि बिड/इश्यू बंद होण्याची तारीख – मंगळवार, 24 डिसेंबर 2024

●     अँकर तारीख – अँकर गुंतवणूकदारांची बिडिंग तारीख बिड/ऑफर उघडण्याच्या तारखेच्या एक कामकाजाच्या दिवस आधीची आहे, म्हणजेच गुरुवार, 19 डिसेंबर 2024.

●     बोली किमान 23 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 23 इक्विटी शेअर्सच्या पटीत केली जाऊ शकते.

●     कर्मचारी आरक्षण भागात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर ₹30 ची सवलत दिली जात आहे.

●     आरएचपी लिंक: https://jmfl.com/Common/getFile/4220

पुणे-, 17 डिसेंबर 2024: वेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचा (पूर्वीचे नाव आयसीसी रिअॅल्टी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड) (“कंपनी”) इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) बोली/प्रस्ताव शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 रोजी सुरू होणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याची तारीख बोली/प्रस्ताव उघडण्याच्या तारखेच्या एका कामकाजाच्या दिवसापूर्वी म्हणजेच गुरुवार, 19 डिसेंबर 2024 आहे. बोली/प्रस्ताव बंद होण्याची तारीख मंगळवार, 24 डिसेंबर 2024 आहे.**

एकूण प्रस्तावित इक्विटी शेअर्सचा आकार (प्रत्येकाचा दर्शनी मूल्य रु. 1) एकूण रु. 16,000 दशलक्ष इतका आहे, ज्यामध्ये एकूण रु. 16,000 दशलक्ष पर्यंतचा नवीन प्रस्ताव (“एकूण प्रस्ताव आकार”) समाविष्ट आहे.

प्रत्येक शेअरसाठी 610 ते 643 रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.  ( प्राइस बँड).

पात्र कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी आरक्षण भागात (“कर्मचारी आरक्षण भाग सवलत”) बोली लावताना प्रति इक्विटी शेअर रु. 30 ची सवलत दिली जात आहे. बोली किमान 23 इक्विटी शेअर्ससाठी लावता येईल आणि त्यानंतर 23 इक्विटी शेअर्सच्या पटीतच लावता येईल (“बोली लॉट”).

कंपनी नेट उत्पन्नाचा उपयोग मुख्यतः पुढील उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्तावित आहे – कंपनीने घेतलेल्या काही कर्जांची अंशतः किंवा पूर्ण परतफेड/पूर्वतफेड आणि त्यावरील व्याजाच्या देय रकमेचा भरणा.

पंचशील रिअल्टीचे अध्यक्ष आणि व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचे कार्यकारी संचालक अतुल आय. चोरडिया म्हणाले, “व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी लिमिटेडच्या प्रस्तावित आयपीओद्वारे पंचशील आणि ब्लॅकस्टोनसाठी प्रादेशिक आदरातिथ्य क्षेत्रात परिवर्तन घडवण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा साध्य होत आहे.”

ब्लॅकस्टोनच्या भारतातील रिअल इस्टेट विभागाचे प्रमुख तुषार परिख म्हणाले, “आम्हाला आमच्या दीर्घकालीन भागीदार पंचशील रिअल्टीसोबत व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी लिमिटेडच्या आगामी आयपीओसाठी काम करताना आनंद होत आहे. या पोर्टफोलिओमध्ये जागतिक आदरातिथ्य ब्रँडद्वारे चालवले जाणारे प्रीमियम हॉस्पिटॅलिटी मालमत्तांचा समावेश आहे.”

हा SCRR च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अधीन असलेला एक इश्यू आहे. हा इश्यू SEBI ICDR नियम 6(2) नुसार बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून पूर्ण केला जात आहे, ज्यामध्ये SEBI ICDR नियम 32(2) नुसार कमीतकमी 75% नेट इश्यू प्रमाणात पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना (“QIBs” आणि त्या विभागाला “QIB विभाग”) वाटप करण्यासाठी उपलब्ध असेल, हे लक्षात घेतले आहे की, आमच्या कंपनीला BRLMs सह सल्लामसलतीनुसार, QIB विभागाच्या 60% पर्यंतची रक्कम अँकर गुंतवणूकदारांना SEBI ICDR नियमांच्या अधीन, स्वैच्छिक पद्धतीने वाटप करता येईल (“अँकर गुंतवणूकदार विभाग”), ज्यात तिसऱ्या भागाच्या रकमेची राखीव व्यवस्था देशांतर्गत म्युच्युअल फंडसाठी असेल. हे समजले जाते की, देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून योग्य बोली प्राप्त झाल्यास, Anchor Investor Allocation Price किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर. जर अँकर गुंतवणूकदार विभागातील बोली कमी झाली किंवा आवंटन न झाल्यास, उर्वरित समभाग QIB विभागात (Anchor Investor विभाग वगळता) जोडले जातील (“नेट QIB विभाग”).

तसेच नेट QIB विभागाच्या 5% रकमेचे आवंटन फक्त म्युच्युअल फंड्ससाठी प्रमाणानुसार केले जाईल आणि नेट QIB विभागाच्या उर्वरित रकमेचे आवंटन सर्व QIBs (Anchor Investors वगळता) समाविष्ट करून प्रमाणानुसार केले जाईल, ज्यात म्युच्युअल फंड्सही समाविष्ट आहेत, असे मानले जाते की, योग्य बोली इश्यू किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर प्राप्त होईल. तथापि, जर म्युच्युअल फंड्सकडून मिळालेल्या एकत्रित मागणीने शुद्ध QIB विभागाच्या 5% पेक्षा कमी मागणी केली, तर म्युच्युअल फंड विभागात उपलब्ध असलेल्या शिल्लक समभागांना उर्वरित QIB विभागात जोडले जाईल आणि QIBs साठी प्रमाणानुसार आवंटन केले जाईल.

तसेच शुद्ध इश्यूच्या 15% पेक्षा जास्त रक्कम नॉन-इन्स्टिट्युशनल बोलीदारांना (“NIBs”) प्रमाणानुसार आवंटनासाठी उपलब्ध होईल, त्यात (a) एक तृतीयांश भाग ₹200,000 पेक्षा जास्त आणि ₹1,000,000 पर्यंतच्या अर्ज आकार असलेल्या बोलीदारांसाठी राखीव राहील; व (b) दोन-तृतीयांश भाग ₹1,00,0000 पेक्षा जास्त अर्ज आकार असलेल्या बोलीदारांसाठी राखीव राहील, असे मानले जाते की, अशा उपविभागांपैकी कोणत्याही उपविभागात न भरलेली रक्कम NIBs च्या इतर उपविभागात SEBI ICDR नियमांच्या अनुषंगाने वितरित केली जाऊ शकते, तसेच नेट इश्यूच्या 10% पेक्षा जास्त रक्कम रिटेल इंडिव्हिज्युअल बोलीदारांना (“RIBs”) प्रमाणानुसार आवंटनासाठी उपलब्ध होईल. असे मानले जाते की, त्यांच्याकडून योग्य बोली इश्यू किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर प्राप्त होईल.

तसेच कर्मचारी आरक्षण भागात बोली देणाऱ्या पात्र कर्मचा-य़ांना प्रमाणानुसार समभाग वितरित केले जातील, त्यांच्याकडून इश्यू किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर योग्य बोली प्राप्त झाल्यास. सर्व बोलीदार (अँकर इन्व्हेस्टर्स वगळता)ला अनिवार्यपणे अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (“ASBA”) प्रक्रिया वापरावी लागेल, त्यांच्या संबंधित ASBA खात्याचे तपशील आणि UPI आयडी (UPI मेकॅनिझम वापरणाऱ्या UPI बोलीदारांसाठी) प्रदान करणे आवश्यक आहे, याच्या अनुषंगाने संबंधित बोली रक्कम SCSB कडून किंवा UPI मेकॅनिझमअंतर्गत ब्लॉक केली जाईल, तसेच इश्यूमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक असेल. अँकर इन्व्हेस्टर्सना ASBA प्रक्रियेद्वारे इश्यूच्या अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून JM फायनान्शियल लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, HSBC सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, ICICI सिक्युरिटीज लिमिटेड, IIFL सिक्युरिटीज लिमिटेड, कोटक महिंद्र कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि SBI कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे कार्यरत आहेत.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रंगली साहसी एसआरटीएल मॅरेथॉन स्पर्धा…


स्वराज्यच्या सुवर्णमार्गावर धावणाऱ्या चित्ताधारक एसआरटी अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉनमध्ये ४ नवीन रेकॉर्ड

वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा (SRTL) अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉनचे आयोजन

पुणे: छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा (SRTL) किल्ल्यांच्या परिसरात एसआरटीएल अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. यंदाच्या स्पर्धेचे हे सातवे वर्ष होते. सिंहगडाच्या पायथ्यापासून राजगड चढाई ते तोरणा किल्ल्यापर्यंत ते लिंगाणा सुळक्याच्या पायथ्यापर्यंत या मॅरेथॉनचा मार्ग दरवर्षी स्पर्धक पार करतात. भारतासहित साऊथ कोरिया, नॉर्वे, फ्रांस, स्पेन, साऊथ आफ्रिका, कॅनडा, पोलंड या ८ देशातील खेळाडूंसह भारतातील २७ राज्य आणि ५५ शहरातील एकूण ११०० हुन अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते. ही मॅरेथॉन १०० किमी, ५३ किमी, २५ किमी व ११ किमी अशा वेगवेगळ्या विभागात आयोजित केली गेली. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
विजयी स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व विशेष सन्मान चिन्ह दिले गेले. पश्चिम घाटातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या परिसरात ही १०० किमीची मॅरेथॉन स्पर्धा स्पर्धकांसाठी अविस्मरणीय अनुभव देणारी ठरली, तसेच २०२४ हे एक विशेष वर्ष ठरले आहे कारण यावर्षी चारही अंतर श्रेणींमध्ये नवीन विक्रमी वेळांच्या नोंदी झाल्या आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली.

एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन ही सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा किल्ल्यांना जोडणारी प्राचीन मार्गाची एक रोमांचकारी मॅरेथॉन असून स्पर्धेत गोळेवाडी (डोणजे) ते सिंहगड ११ किमी, डोणजे-सिंहगड ते राजगड २५ किमी, डोणजे-तोरणा ५३ किमी आणि डोणजे ते लिंगाणा १०० किमी अशा चार अंतर श्रेणीमध्ये ही स्पर्धा घेतली गेली. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन हे इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसियेशनची म्हणजेच ITRAचे सदस्य आहे. एसआरटी अल्ट्रा ही स्पर्धा वेळेत पुर्ण करणारया स्पर्धकांना फ्रांस मधील UTMB पात्रतेसाठी अवश्यक गूण मिळतात.

छत्रपती शिवरायांच्या व त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सिंहगड, राजगड, तोरणा आणि लिंगाणा गडकिल्ल्यांच्या सानिध्यातील ही स्पर्धा पुर्वीच्या काळी प्रवास,व्यापार शेतीसाठी वापरलेला हा मार्ग ऐतिहासिक पाऊलखुणांची आठवण करून देणारा आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडासा वेळ काढून स्वतःच्या आरोग्यासाठी व आनंदासाठी वेळ काढणे महत्त्वाचे झाले आहे. एसआरटीएल मॅरेथॉन सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आरोग्य अशा तिन्ही बाबींचा समन्वय साधणारी स्पर्धा आहे. महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग तसेच वन विभाग, पर्यटन विभाग, पुणे पोलीस व पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विशेष सहकार्याने हि स्पर्धा दरवर्षी यशस्वी पार पडते.
एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष दिग्विजय जेधे, विश्वस्त अनिल पवार, महेश मालुसरे, मंदार मते, मारूती गोळे, ऍड. राजेश सातपुते, हर्षद राव, अमर धुमाळ, व हवेली, दौंड, मुळशी, वेल्हा व पुण्यातील ५०० स्वयंसेवकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

यावर्षी दार्जिलींग चा हेमंत लिंबू याने १०० किमी अंतर १०ः३२ः३३ या वेळात पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम केला, ते सोम बहाद्दूर थामी याने ५३ किमी ५ः२३ः४३ या वेळात पूर्ण करून विक्रम केला. गुजरात चे इनेश वसवा ने २५ किमी २:१३ः४० या वेळात पूर्ण करून विक्रम केला व अमित शर्माने ११ किमी १ः१५ः१५ वेळात विक्रम नोंदवला. या स्पर्धेसाठी ऍथलीट ट्रेनिंग प्रोग्रॅम घेण्यात आला याचे नैतृत्व कोच योगेश सानप यांनी केले व त्यांना कोच अनंत कचरे व कोच श्यामल मोंडल यांनी सहकार्य केले.

SRT ULTRA 2024 निकाल

* सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा – एसआरटीएल १०० कि.मी. अंतर व ३८७० मी. चढाईमध्ये
पुरूष विजेता –
क्र. १ – हेमंत लिंबू – १०ः३२ः३३ new record

क्र. २ – विशाल वाळवी – १२ः१६ः२१
क्र. ३ – रामदास मेस्त्री – १४ः५६ः३२

महिला विजेता –
क्र. १ – स्नेहल योगिता – १९:५०ः०२
क्र. २ – सुफिया सूफी – २०:४२ः१५
क्र. ३. – शर्वरी खेर- २२ः४४ः३६

* सिंहगड-राजगड-तोरणा – ५३ कि. मी. व २३२० मीटर चढाईमध्ये
पुरूष विजेता –
क्र. १ – सोम बहादूर थामी – ५ः२३ः४३ new record
क्र. २ – अभिनीत सिंग – ८ः०८ः२९
क्र. ३ – साई किरण एस – ८ः१३ः४९

महिला विजेता –
क्र. १ – ऋुतूजा माळवदकर – ८:१३:५६
क्र. २ – सहाना विश्वनाथ – ११:०३:४९
क्र. ३. – हेमा आवळे – ११:४०:४६

* सिंहगड-राजगड – २५ कि. मी. व ११०० मीटर चढाईमध्ये
पुरूष विजेता –
क्र. १ – इनेश वासवा – २:१३ः४० new record
क्र. २ – अनुराग कोणकर – २:१६ः४३
क्र. ३ – विशाल राजभर – २:२७ः४४

महिला विजेता –
क्र. १ – त्रूप्ती भोसले – ३:५३ः२७
क्र. २ – श्रद्धा वास्सा – ४:२१ः०५
क्र. ३. – श्वेता खेराज – ४:३८ः१३

* सिंहगड हाफ व्हर्टीकल कि.मी. – ११ कि. मी. व ७०० मीटर चढाईमध्ये
पुरूष विजेता –
क्र. १ – अमित शर्मा – १ः१५ः१५ new record
क्र. २ – भागवत धुमाळ – १:३०ः०८
क्र. ३ – डॅनियल सेयमोर – १:३७ः१३

महिला विजेता –
क्र. १ – निशा मिश्रा – १:४४ः१३
क्र. २ – शाबू गोसावी – १:४८ः२२
क्र. ३. – सुरभी मेरूकर- १ः५३ः५२

–  वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन.

मनुस्मृती हे वैदिक संविधान- पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती महाराज

पुण्यात तीन दिवसीय दीक्षा व संगोष्टी कार्यक्रम 
पुणे : काळानुसार सनातन सिद्धांताला जगाला मानावेच लागेल. सुसंस्कृत, सुरक्षित, सुशिक्षित, संपन्न हे हिंदू राष्ट्राचे स्वरूप आहे. वैदिक संविधानाचे नाव मनुस्मृती आहे. जीवनाचे सार्थक करण्यासाठी मनू ने जे काही सांगितले त्याचे पालन केले पाहिजे. फक्त पोट आणि परिवारापर्यंत हिंदूंनी मर्यादित राहायला नको. तरच त्यांना योग्य तो सन्मान मिळेल, असे मत पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज यांनी व्यक्त केले.

श्रीमज्जगुरु पुरी शंकराचार्य स्वागत समिती, पुणे तर्फे बी.टी. कवडे रस्त्यावरील मियामी टेरेस येथे पत्रकार संवाद व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यामध्ये  तीन दिवसीय दीक्षा व संगोष्टी कार्यक्रम दि.२० डिसेंबर पर्यंत सकाळी ११.३० ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मियामी टेरेस,  बी.टी. कवडे रस्ता येथे शंकराचार्य महाराज उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. 

स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज म्हणाले,  हिंदू राष्ट्र होणे शक्य आहे. कारण आपले पूर्वज हे सनातनी वैदिक आर्य हिंदू होते. त्यामुळे भारत देशाला हिंदू राष्ट्र बनण्यासाठी कोणतीही अडचण नाही. भारत विश्वगुरू आहे. संयुक्त राष्ट्र सारख्या संघटनाही त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारतात येतात. त्यामुळे भारत हा विश्वगुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

अमर्यादित महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी नरेंद्र मोदींना नितीश आणि नायडू यांच्या कुबड्या घेऊन चालावे लागत आहे. त्यांना आता सांभाळण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. 

लघु उद्योजकांनी जिल्हास्तरीय पुरस्काराकरीता ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. १७: जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील असामान्य कामगिरी करणाऱ्या पात्र लघु उद्योजकांनी जिल्हास्तरीय पुरस्काराकरीता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

राज्य शासनाच्यावतीने लघु उद्योजकाना जिल्हा पुरस्कार २०२३ व जिल्हा पुरस्कार २०२४ देण्यात येणार आहे. जिल्हा पुरस्कार प्रथम क्रमांकास १५ हजार रुपये व व्दितीय पुरस्कार १० हजार व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. जिल्हा पुरस्कारासाठी ज्ञापन पोहोच भाग २, उद्योग आधार, उद्यम रजिस्ट्रेशन हा स्थायी लघु उद्योग म्हणून उद्योग संचालनालयाकडे मागील तीन वर्षे नॉदणीकृत असावा. १ जानेवारी २०२० पूर्वीची नोंदणी उद्योग, आधार,उद्यम रजिस्ट्रेशन तसेच उद्योग घटक मागील दोन वर्षे सलग उत्पादन प्रक्रियेत असलेला असावा. लघु उद्योग कोणत्याही संस्थेचा बँकेचा थकबाकीदार नसावा. जिल्हा पुरस्कारासाठी शासनाने विहित केलेल्या निकषाप्रमाणे लघु उद्योगाची निवड करण्यात येणार आहे.

इच्छुकांसाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर येथे विनामुल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांचे कार्यालय, कृषि महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे (दूरध्वनी क्रमांक ०२०-२५५३९५८७,२५५३७५४१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप….

काँग्रेस, ठाकरे, पवार मला विश्वासात घेत होते:पण राष्ट्रवादीत तिघेच निर्णय घेतात; भुजबळांचा अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरेंवर आरोप

नाशिक/येवला –

वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर आपल्या समर्थकांसमोर त्यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखाच मांडला आहे.येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत येवला-लासलगावचा किल्ला आपण लढवला, तुमचे आभार. भुजबळ साहेब निवडून येणार नाहीत, असे आमच्या राष्ट्रवादीत बोलणे चालले होते. सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत होते. विशेष करून मराठा समाजाचे आभार. या निवडणुकीत मी मोठ्या संख्येने निवडून आलो. देशात जो प्रयोग झाला नाही तो प्रयोग आपण येवल्यात घडवला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील निर्णय प्रक्रियेत केवळ माझा कोणताही हस्तक्षेप नसतो. आमच्या पक्षात केवळ अजित पवार, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे तिघेच निर्णय घेतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी केला. त्यांच्या या आरोपामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे व शरद पवार मला विश्वासात घेत होते, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना स्थान मिळाले होते. यामुळे ते पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलतानाही आपण नाराज असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा त्याचा पुनरुच्चार केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचे की नाही हे कार्यकर्त्यांशी बोलून ठरवणार असल्याचेही संकेत दिले. त्यानंतर आता त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे तिघेच निर्णय घेतात. चर्चेत किंवा निर्णय प्रक्रियेत माझा सहभाग शून्य आहे. आमदारकीचे कुणाला तिकीट द्यायचे हे सुद्धा मला माहिती नसते. खासदारकीची उमेदवारी कुणाला द्यायची? हे ही मला माहिती नाही. मंत्री कुणाला करायचे? हे ही आम्हाला ठावूक नाही. हे केवळ त्या तिघांनाच ठावूक असते. आम्ही या पक्षात आमची सिनिअॅरिटी घेऊनच आलो होतो. यापूर्वी शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आम्हाला विश्वासात घेतले जायचे. पण इकडे असे काहीच होत नाही.

मी माझ्या कार्यकर्त्यांपुढे माझी व्यथा मांडली आहे. नक्की काय झाले हे त्यांना समजले पाहिजे. मी त्यांना सगळा इतिहास सांगितला. पूर्वी काय झाले? आता काय झाले? मागच्या 4-6 महिन्यात काय झाले? व मागील 8-10 दिवसांत काय झाले? हे सर्वकाही सांगितले आहे. त्यानंतर त्यांनीही मला मी घेईल त्या निर्णयामागे खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली आहे, असे छगन भुजबळ म्हणालेत.

छगन भुजबळ यांनी यावेळी आपला उद्धव ठाकरेंसह शरद पवार व त्यांच्या पक्षातील सर्वच नेत्यांशी आपले चांगले संबंध असल्याचेही स्पष्ट केले. मी उद्धव ठाकरे यांच्याशीही बोलतो. मी मागे शरद पवारांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांच्याशीही बोलणे होते. सुप्रिया सुळेंशी कधी – कधी बोलणे होते. त्यात काय आहे? पूर्वी आम्ही एकत्र काम केले आहे. अशा विशिष्ट प्रसंगी एकमेकांना शुभेच्छा देणे सुरू असते, असे ते म्हणाले.

समाजाने नद्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले – विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार

‘शाश्वत नद्या : उगमापासून सागरापर्यंत…’ या वनराईच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन संपन्न

पुणे, प्रतिनिधी – नदीचे महत्व आपण लहानपणापासून पुस्तकांमध्ये वाचले आहे. पुराणांमध्येदेखील नदीचे महत्व विशद केलेलं आहे. आजूबाजूला पर्यावरण क्षेत्रात एवढ्या चांगल्या संस्था आणि व्यक्ती काम करत असताना सुद्धा आपण समाज म्हणून नदीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याची खंत पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केली.
लहानपणी सर्वांनी वाहत्या ओढ्यातील पाणी ओंजळीने पिलेलं आहे, मात्र आता आपण पाण्याची एवढी वाताहात लावलेली आहे की ते पाणी थेट पिण्यायोग्य राहिलेलं नाही. केवळ शासन आणि सरकारी यंत्रणांवर अवलंबून न राहता नदी स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. नद्यांच्या आरोग्यावरच आपले आरोग्य आणि भवितव्य अवलंबून असल्याने नद्यांचे संवर्धन करून त्यांची शाश्वतता राखणे ही काळाची गरज आहे. वनराईच्या ‘शाश्वत नद्या’ या विशेषांकामुळे नद्यांना स्वच्छ आणि प्रवाही ठेवण्याच्या कार्यमोहिमांना बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी डॉ. पुलकुंडवार यांनी व्यक्त केला.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरील पुणे पुस्तक महोत्सवामध्ये ‘शाश्वत नद्या : उगमापासून सागरापर्यंत…’ या वनराईच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते झाले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, वनराईचे विश्वस्त  रोहिदास मोरे, धन्यकुमार चोरडिया, सागर धारिया, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते.
डॉ. पराग काळकर म्हणाले की, दैनंदिन जीवनात रासायनिक घटक असलेले साबण, शाम्पू, टूथपेस्ट, डिटर्जंट, फिनाइल, कीटकनाशके अशा अनेक वस्तू वापरत असतो. याद्वारे नैसर्गिकरित्या विघटन न होऊ शकणारे कित्येक रासायनिक घटक घराघरांतून सांडपाण्याच्या स्वरूपात नद्यांमध्ये मिसळत असतात. त्यामुळे अशी घातक रसायनयुक्त उत्पादने नाकारून त्याऐवजी निसर्गस्नेही व पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर करणे गरजेचे आहे. आपण केलेल्या चुकांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा विशेषांक केवळ संग्रही न ठेवता याचे वाचन, मनन चिंतन आणि कृती केल्यास निश्चितपणे पर्यावरणाचे रक्षक होण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो.

सागर धारिया म्हणाले की, नदी हा आपल्यासाठी केवळ पाण्याचा स्त्रोत नसून आपला इतिहास, भूगोल, वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारा तो एक दुवा आहे. नद्यांवर फक्त धरणे बांधून आपल्याला जलसुरक्षा साधता येणार नाही, तर ‘गाँव का पानी गाँवमें, और खेत का पानी खेतमें’ हा विचार तळागाळामध्ये रुजवून दुष्काळ व पाणी टंचाईसारख्या समस्यांवर मात करता येईल. याच भूमिकेतून गेल्या चार दशकांपासून ग्रामीण भारतामध्ये पाणलोट व्यवस्थापन तंत्राचा वापर करून ‘वनराई’ संस्था नदी संवर्धनासाठी हातभार लावत आहे. 
अमित वाडेकर म्हणाले की, नद्यांच्या शाश्वततेसाठी ‘वनराई’च्या माध्यमातून सर्व स्तरांमध्ये सातत्याने जनजागृती केली जात आहे. ‘शाश्वत नद्या : उगमापासून सागरापर्यंत…’ हा ‘वनराई’ वार्षिक विशेषांकही याचाच एक भाग आहे. या विशेषांकातून नद्यांबाबतच्या समस्या, उपाययोजना, प्रयोग, यशकथा इत्यादींवर समग्र चर्चा घडवून आणण्यात आली आहे. त्यामुळे हा विशेषांक वाचकांना नदी संवर्धनासाठी प्रेरित करेलच. शिवाय दिशादर्शकाचीही भूमिका बजावेल असा आम्हाला विश्वास आहे. या कार्यक्रमाचे आभार रोहिदास मोरे यांनी मानले, तर सुजाता मुळ्ये यांनी सूत्रसंचालन केले.