Home Blog Page 522

उद्यम सहकारी बँकेच्या 2025 सालाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

दिनदर्शिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार घरोघरी पोहोचविणे स्तुत्य – रवींद्र वंजारवाडकर.

पुणे-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात उद्यम विकास सहकारी बँक , पुणे ने “रा.स्व.संघाबद्दल” माहिती देणारी दिनदर्शिका काढली आणि ह्या माध्यमातून संघ विचार घरोघरी पोहोचविण्याचा संकल्प केला हे स्तुत्य असल्याचे गौरवोदगार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी काढले. यावेळी रा.स्व.संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, बँकेचे अध्यक्ष सीए.दिनेश गांधी, उपाध्यक्षा सौ.लीनाताई अनास्कर, माजी अध्यक्ष व संचालक संदीप खर्डेकर, बँकेचे संचालक सर्वश्री सीए अभय शास्त्री,राजाभाऊ पाटील, शैलेश टिळक , मनोज नायर व जयंत काकतकर उपस्थित होते.
दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर संघाची प्रार्थना तिच्या अर्थासहीत व आतील पानांवर आजवरच्या संघाच्या सहा सरसंघचालकांची छायाचित्रे व त्यांची माहिती तर अन्य पानांवर विश्व हिंदू परिषद, राष्ट्रसेविका समिती, सहकार भारती, वनवासी कल्याण आश्रम व आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू संघटनाचे कार्य करणाऱ्या हिंदू स्वयंसेवक संघ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख संघटनांची माहिती दिली असल्याचे बँकेचे अध्यक्ष सीए दिनेश गांधी व संचालक संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
उद्यम विकास सहकारी बँकेच्या संचालक व कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार हे प्रेरणास्रोत असून आम्ही सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सचोटीने व ग्राहकोन्मुख दृष्टिकोनातून बँकेचा व्यवसाय करण्यावर भर देतो असे बँकेचे अध्यक्ष सीए.दिनेश गांधी म्हणाले.

कॉल करणारा बडा नेता कोण?सीआयडीने तात्काळ नावे जाहीर करावे :अंजली दमानिया

बीड – सीआयडी पथकाला स्कॉर्पियो गाडीमधे 2 मोबाईल मिळाले त्यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आहेत. पण, एका बड्या नेत्याचा फोन गेला होता, हे देखील आहे. कोण आहे हा बडा नेता, तात्काळ नाव जाहीर करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीकडून तपास सुरू आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या गुन्हेगारीच्या विरोधात सत्यशोधक आंदोलन सुरू केले आहे. अंजली दमानिया यांनी सातत्याने वाल्मीक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आवाज उठवला असून त्यांना अटक करण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणखी एक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे.

अंजली दमानिया यांनी त्यांचा एक व्हिडिओ ट्विट करत संतोष देशमुख याला मारहाण होताना कोणत्या बड्या नेत्याचा फोन आला होता अशी विचारणा करत तात्काळ नाव जाहीर करण्याची मागणी केली आहे. अंजली दमानिया त्यांच्या व्हिडीओमध्ये म्हणतात, संतोष देशमुख हत्याप्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडी पथकाला स्कॉर्पियो गाडीमधे 2 मोबाईल मिळाले आहेत, त्याचा डेटा रिकव्हर करण्यात येत आहे. त्यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आहेत. पण, एका बड्या नेत्याचा फोन गेला होता, हे देखील आहे. कोण आहे हा बडा नेता, तात्काळ नाव जाहीर करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

अंजली दमानिया यांनी केलेल्या या ट्विटमुळे तपासाला आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. तसेच बीड पोलिस, सीआयडी तसेच राजकीय नेते या बड्या नेत्याचे नाव जाहीर करणार का? तसेच फोन कोणी केला होता याची माहिती पोलिस शोधून काढणार का? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करावी, असे आदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दिले आहेत. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. वाल्मीक कराडची संपत्ती जप्त होणार का? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल:जितेंद्र आव्हाडांविरोधात ट्विट केले

बीड-माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ट्विट केल्याने रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान जितेंद्र आव्हाड यांचा फोटो असलेले चॅट एक्स वर पोस्ट करत आव्हाड कशाप्रकारे समाजा समाजात तेढ निर्माण करतात हे दाखवण्याचा ठोंबरे यांचा प्रयत्न केल्याने रुपाली ठोंबरे यांच्यासह विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण अघाव, आकाश चौरे, सौरभ आघाव यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या चॅटचा एक कथित स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड बीडमधील मोर्चासाठी आपल्या शिवराज नावाच्या कार्यकर्त्याला उद्याचा मसाला रेडी ठेव. मुंडे आणि वाल्मिक कराड विरोधात जे जे असेल ते सर्व गोळा करण्याचे सांगत असल्याचे दिसत आहे.

तर जितेंद्र आव्हाड यांनीही या स्क्रीनशॉट विरोधात आपली भूमिका मांडली आहे. माझ्या आजच्या बीड मधील भाषणाने धनंजय मुंडेचे कार्यकर्ते फार बिथरले, त्यांना सत्य पचेना म्हणून माझ्या नावाचे फेक स्क्रीनशॉट बनवले आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. हा स्क्रीनशॉट कोणी बनवला, त्याची पाळेमुळे शोधून काढा, अशी माझी सायबर पोलिसांकडे तक्रार असल्याचे आव्हाड म्हणाले.

धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून पहिले हाकला. बीडच्या राजकारणाला कधी जातीचा स्पर्श नव्हता. बीडच्या पोलिसांनी आणि पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचे वाटोळे केले, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला.

वाल्मीक कराडचा वाल्या झाल्या आहे. वंजारी समाजाच्या अनेक नेत्यांची हत्या झाली. जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांच्या पुढे काय बोलू शकणार होते. जर अशोक सोनवणे यांची तक्रार घेत गुन्हा दाखल केला असता तर संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती, असेही आव्हाड म्हणाले.

रंजन मुखर्जी सारखा कलेक्टर गायब झाला आणि त्यांची महाराष्ट्रात काहीच चर्चा होत नाही, हे किती अवघड आहे. मंत्रिमंडळात राहुन जर धनंजय मुंडे डोळे दाखवतील आणि चौकशी संपेल. केल्यासारखे करुन चौकशी करायची नाही, त्यापेक्षा चौकशी करुच नका असे त्यांनी म्हटले आहे.

सैफी बुरहानी एक्सपोकडून  गो ग्रीनचा  संदेश देत रॅली संपन्न

 पुणे – पुणे शहर हरित करून प्रदूषण मुक्त करण्याच्या मोहिमेचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्द्देशाने  दाउदी बोहरा समाजाच्या वतीने आयोजित चौथे सैफी बुरहानी एक्सपो पुणे 2025 तर्फे गो ग्रीन पुणेे रॅलीचे रविवार, 29 डिसेंबर 2024  सकाळी 9.30 वाजता  आयोजन करण्यात आली होती . या रॅलीत जानब अब्दली भाईसाब – अमिल साब पुणे, जनब इदरीस भाईसाब, मोइज़ जमाली, हुज़ेफा परदावाला, कुरेश घोडनादिवाला,  फखरुद्दीन चोपड़ावाला, हमजा छत्रिस,
अब्दुल कादिर सद्भावना सह लहान मुलांपासून तर वृद्धांचा समावेश होता. गो ग्रीन पुणे रॅली मध्ये  1२ कार आणि 60 बाइक्ससह ग्रीन पुणे कॅम्पेन आणि एक्स्पोचा प्रचार करणारे पोस्टर्स सह सहभागी झाल्या होत्या. .
सदर गो ग्रीन पुणे रॅली पुणे कॅम्पपासून फ्लॅग दाखून  सुरुवात  करण्यात आली. सदर रॅली पुढे    सोलापूर रोड, हडपसर, फातिमानगर, वानवडी, साळुंके विहार, एनआयबीएम, फाखरी हिल्स, एमजी रोड, लक्ष्मी रोड, डेक्कन, फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे विद्यापीठ रोड, बंड गार्डन रोड, कल्याणी  नगर, विमान नगर, डेक्कन कॉलेज ग्राऊंड करीत पुन्हा कॅम्प येथे संपली .

सैफी बुरहानी एक्सपो पुणे 2025 गेल्या तीन वर्षांपासून करित असून यंदा चौथे वर्ष आहे. सैफी बुरहानी एक्सपो पुणे 2025 येत्या 4  जानेवारी 2025 पासून सुरु होत असून 6 जानेवारी पर्यंत डेक्कन कॉलेज ग्राऊंड येथे चालणार आहे. सैफी बुरहानी एक्सपो पुणे 2025 व हरित पुणे मोहिम चा प्रचार व प्रसार करण्याच्या उ्द्देशाने  गो ग्रीन पुणे रॅली  आयोजित करण्यात आली होती .

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती:यशस्वी कामगिरीमुळे राज्याला केंद्र सरकारकडून २६० कोटी रुपये

0

मुंबई, दिनांक २९ डिसेंबर २०२४-  घरांच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या योजनेत उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याला गेल्या चार वर्षात केंद्र सरकारकडून २६० कोटी ९१ लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेत वीज ग्राहकांना थेट लाभ होत असल्याने योजनेची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे. छतावरील सौर ऊर्जानिर्मितीच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्यासाठी महावितरणला जबाबदारी देण्यात आली आहे.

छतावरील सौर ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत किती घरांवर प्रकल्प बसविले व त्यातून त्यांची वीजनिर्मिती क्षमता किती झाली याबाबतीत केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. आधीच्या वर्षापेक्षा चालू वर्षात किती जास्त कामगिरी झाली यानुसार केंद्र सरकार त्या त्या वीज वितरण कंपनीला यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रोत्साहनपर रक्कम मंजूर करते.

महाराष्ट्र राज्याला छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यातील कामगिरीबद्दल केंद्र सरकारकडून २०१९ – २० व २०२० -२१ या दोन आर्थिक वर्षात अनुक्रमे ५९ व ३७ कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली. २०२१ -२२ या आर्थिक वर्षात राज्याची कामगिरी उंचावल्यामुळे केंद्र सरकारकडून ६९ कोटी ४७ लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम मंजूर झाली. २०२२ – २३ या आर्थिक वर्षासाठी ९४ कोटी ९१ लाख रुपये मंजूर झाले. २०२३ – २४ या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षापेक्षा अधिक चांगली कामगिरी झाल्यामुळे केंद्र सरकारच्या निकषानुसार १३७ कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळणे अपेक्षित आहे.

राज्यामध्ये आतापर्यंत २,३७,६५६ वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले असून त्यांची एकूण क्षमता २७३८ मेगावॅट आहे. यामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या ८१,९३८ ग्राहकांचा व त्यांच्या एकूण ३२३ मेगावॅट क्षमतेचा समावेश आहे. या ग्राहकांना ६४७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घरावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या घरगुती ग्राहकांना केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट क्षमतेसाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते. महावितरणने या योजनेत घरगुती वीज वापरासाठी सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसविणाऱ्या ग्राहकांना मोफत नेट मिटर देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://www.pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करता येते.

शाळेच्या शिक्षिकेकडून दहावीतील विद्यार्थी मुलावर लैंगिक अत्याचार..आरोपी शिक्षिकेस अटक

पुणे-खडक पोलिस ठाण्याचे हद्दीत एका इंग्लिश मिडियम शाळेतील २७ वर्षीय शिक्षिकेने स्वत:ची लैंगिक इच्छा भागविण्यासाठी, दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रेमाच्या जाळयात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षिकेविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर, आरोपी शिक्षिकेस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला या शिक्षिका असून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक पदावर काम करत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची शाळेचे कालावधीत पालकत्वाची शिक्षिक या नात्याने संपूर्ण जबाबदारी आपली असते हे माहिती असताना देखील, त्यांनी १० वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचा अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्याच्या सोबत प्रेमसंबंध जुळवले. तो प्रिलियम परिक्षेस शाळेत हजर असताना, त्यास प्रेमाची भुरळ पाडून शारिरिक संबंधासाठी प्रोत्साहित व उत्तेजीत करुन आपल्या शरीर सुखासाठी त्याचा वापर करुन त्याच्याशी शाळेच्या आवारात शारिरिक संबंध प्रस्थापित करुन अल्पवयीन विद्यार्थ्याची लैंगिक सतावणूक केली. याबाबत खडक पोलिस पुढील तपास करत आहे.

सहकारनगर मधील दोघे दुचाकी चोर पकडले: ८ दुचाक्या हस्तगत

पुणे- सहकारनगर मध्ये राहणारे दोघे चोरटे पकडून त्यांच्याकडून सहकारनगर पोलिसांनी ८ दुचाकी जप्त केल्या . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’
दि.२६/१२/२०२४ सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व सहकारनगर मार्शल असे वाहन चोरी, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिग व गुन्हेगार चेकिग करीत असताना एका यामाहा दुचाकी गाडीवर बसुन दोन इसम भरधाव वेगाने बिकानेर चौकाकडे जाताना दिसले. त्यांचा संशय आल्याने त्यांचा पाठलाग करुन त्यांना थोड्याच अंतरावर गाडीसह थांबवुन ताब्यात घेतले १) अन्वर सलीम शेख वय २१ वर्षे धंदा गॅरेज काम रा. नुर मंहम मस्जिद गल्ली दाते यसस्टॉप सहकारनगर पुणे २) फरीद लालापाशा सय्यद वय १९ वर्षे धंदा गॅरेज काम रा.नुर मंहमद मस्जिद गल्ली दाते बसस्टॉप सहकारनगर पुणे अशी त्यांची नावे आहेत.
त्यांचे ताब्यात एक यामाहा गाडी मिळून आली त्या गाडी बाबत त्याच्याकडे चौकशी करता सदरची गाडी आम्ही दोघांनी साधारण दोन महिन्यापुर्वी दाते बसस्टॉप येथील रोडवरुन चोरली असुन तीचा वापर करुन ती के. के. मार्केट भागात पार्क केली होती. हि गाडी विकण्यासाठी आम्ही गि-हाईक शोधत होतो. असे कबुल केले सदर गाडी बाबत सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३३२/२०२४ भा.न्या.स.२०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीकडे अधिक चौकशी करता त्यांनी आणखी सात दुचाकी वाहने चोरल्याचे सांगितले सदर आरोपी कडुन एकुण २,४०,०००/- रु किं.ची ८ वाहने हस्तगत करण्यात आली असुन सहकारनगर पोलीस ठाण्याकडील एकूण ०६ वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत. या आरोपी वर हत्यार बाळगले बाबत ०१ गुन्हा सहकारनगर पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील पोलीस उपायुक्त परि.-२, श्रीमती स्मार्तना पाटील सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पो उप निरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, विनायक एडके, महेश मंडलिक, अमित पदमाळे, सागर सुतकर, खंडु शिंदे, योगेश ढोले, महेश भगत, अभिमान बागलाने, बबलु भिसे, सचिन येनपुरे, नामदेव केंद्रे यांनी केली आहे.

सारथी मार्फत १ हजार ५०० मराठा व कुणबी तरुणांना वाहन चालक प्रशिक्षण उपक्रम

पुणे, दि.२८: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्यावतीने (सारथी) ‘सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ अंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील १ हजार ५०० तरुणांना वाहन चालक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षित वाहन चालकांची देशात व देशाबाहेर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यानुसार संस्थेने १५०० व्यक्तींना दर वर्षी हलकी मोटार वाहने (लाईट मोटर व्हेईकल) व जड मालवाहू वाहने (हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल) चालविण्याचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या तरुण-तरुणींना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत असलेल्या आय.डी.टी.आर. पुणे या केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत एका महिन्याचे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येईल.

दररोज आठ तासाचे हे प्रशिक्षण राहील. त्यामध्ये वाहनांचे भाग, त्यांची देखभाल, दुरुस्ती तसेच वाहनचालनाच्या भारतातील व परदेशातील नियमांची माहिती देण्यात येईल. तसेच दररोज क्षेत्रीय स्तरावर सराव व प्रशिक्षण देण्यात येईल. या विद्यार्थ्यांना एका प्रशिक्षण महिन्यासाठी रुपये १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल.

सारथीचे अध्यक्ष तथा निवृत्त मुख्य सचिव अजित निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालक मंडळाने १७ डिसेंबर २०२४ रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या योजनेला मान्यता दिली असून हे प्रशिक्षण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहे.

यामुळे राज्यातील ग्रामीण भागात तसेच परदेशात तरुणांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. याकरिता जास्तीत जास्त सारथी लक्षीत गटातील व्यक्तींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची मोशी येथील वसतिगृहाला भेट

चांगले काम करणाऱ्या वसतीगृहाचा राज्यातील इतर वसतीगृहांनी आदर्श घ्यावा- संजय शिरसाट

पुणे, दि.२८: राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोशी, पिंपरी चिंचवड येथील २५० क्षमतेच्या मुलींचे शासकीय वस्तीगृहाची भेट देऊन पाहणी केली. या वसतिगृहाचे काम समाधानकारक असल्याचे सांगून चांगले काम करणाऱ्या वसतीगृहांचा राज्यातील इतर वसतीगृहांनी आदर्श घ्यावा, असेही ते म्हणाले.

यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, सहआयुक्त प्रमोद जाधव, पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे, पुणे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, गृहप्रमुख श्रीमती मीनाक्षी येमले, गृहपाल श्रीमती प्रमिला आमले आदींसह कर्मचारी व वसतीगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

आपल्यासमोर विद्यार्थ्यांच्या हिताला कायम प्राधान्य असल्याचे सांगून त्यादृष्टीकोनातूच राज्यातील विविध शासकीय वसतिगृहांची पाहणी करत असल्याचे श्री. शिरसाट यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थिनींशी चर्चा करत वसतिगृहातील जेवण तसेच देण्यात येणारे शालेय साहित्य, पिण्याचे पाणी, सुरक्षा व्यवस्था आदी सुविधांबाबत त्यांनी मुलींकडून माहिती जाणून घेतली. वसतीगृहात असलेली स्वच्छता व इतर कामकाजाबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी समाजकल्याण विभागाचे अधिकारी तसेच वसतिगृहाच्या गृहप्रमुख, गृहपालांनी मंत्री श्री. शिरसाट यांना वसतिगृहाच्या कामकाजाची माहिती दिली.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा

अभिवादन सोहळ्याकरिता येणाऱ्या अनुयायींना सर्व सुविधा पुरविण्याची चोख व्यवस्था करा-मंत्री संजय शिरसाट

पुणे, दि. २८: पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायींना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने चोख व्यवस्था करा, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. दरवर्षी त्याच-त्याच सुविधा पुन्हा कराव्या लागत असल्याने कायमस्वरुपी सुविधा तयार करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

हवेली तालुक्यातील मोजै पेरणे फाटा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, प्र. समाज कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पुणे शहर पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, पिंपरी चिंचवडचे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण सहआयुक्त सुरेंद्र पवार, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने केलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त करुन मंत्री श्री. शिरसाट म्हणाले, कार्यक्रमासाठी दरवर्षी पार्किंगसाठी खासगी जागा ताब्यात घेणे, सपाटीकरण करणे यावर मोठा खर्च होत असतो. त्यामुळे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शासकीय जागा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत. त्या परिसरात शासकीय दवाखाना, विश्रांतीकक्ष उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. विजयस्तंभाच्या बाजूच्या जागेबाबत न्यायालयीन वाद सुटण्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयात चांगला वकील नेमून प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

श्री. शिरसाट पुढे म्हणाले, विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत होत आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना शासनामार्फत आरोग्य सेवा देतानाच अशासकीय स्वयंसेवी संस्थांचा त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रयत्न करावेत. पोलीस विभागावर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी असल्याने शासनाच्या सर्व विभागांनी त्या ठिकाणी केलेल्या आपल्या सुविधांची व कामाची माहिती पोलीसांना तसेच एकमेकांना उपलब्ध करुन द्यावी. कार्यक्रम अत्यंत सुंदर, चांगल्या रितीने संपन्न होईल यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही ते म्हणाले.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, विजयस्तंभ सोहळ्याचे उत्तम नियोजन करतानाच अनुयायींना कोणतीही गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घ्यावी. येणाऱ्यांपैकी अनेक अनुयायी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे व बलिदानस्थळाचे दर्शनासाठी वढू बुद्रुक व तुळापूरला जात असल्याने त्या ठिकाणी देखील पार्किंग आदी सुविधा निर्माण कराव्यात. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता त्याअनुषंगानेही तयारी करावी, अशा सूचनाही श्रीमती मिसाळ यांनी यावेळी दिल्या.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, कार्यक्रमाच्या ठिकाणी तसेच नदीपात्राच्या बाजूला एनडीआरएफचे पथक नेमण्यात येते. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाचे पथक नेमण्यात येते. ही पथके आवश्यक त्या सर्व सामग्रीसह सज्ज ठेवावीत. पार्किंग स्थळे रात्री चांगली प्रकाशमान राहतील याची काळजी घ्यावी. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी रात्र गस्त वाढविण्यात यावी.

जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती दिली. कायमस्वरुपी पार्किंगसाठी पीएमआरडीएच्या मोकळ्या जागांबाबत पर्याय तपासण्यात येईल. तसेच कार्यक्रमाच्या वेळी पार्किंगसाठी वक्फ बोर्डाच्या जागेबाबतही प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

एमएनजीएलकडून ₹1.10 प्रति किलो सीएनजी दरवाढ

ग्राहकांचा फायदा आणि शाश्वतता कायम
पुणे-जागतिक ऊर्जा बाजारातील चढ-उतारांमुळे महापालिका नैसर्गिक वायू लिमिटेड (MNGL) ने आपल्या मौल्यवान ग्राहकांच्या हिताचा सर्वोच्च विचार करत काळजीपूर्वक निर्णय घेतला आहे. आयातित नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि बाजाराच्या दरावर आधारित वायू पुरवठा यामुळे MNGL समोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. तरीही, MNGL आपल्या ग्राहकांना मूल्य व टिकाऊपणा पुरवण्याच्या वचनबद्धतेत ठाम आहे.
ऑपरेशनल क्षमता आणि ग्राहकांच्या परवडण्याची शक्यता यांचा समतोल राखण्यासाठी, MNGL ने या वाढीचा काही भाग स्वतः काढून घेतला आहे. परिणामी, पुण्यातील संकुचित नैसर्गिक वायू (CNG) च्या दरात ₹१.१० प्रति किलोची किरकोळ वाढ होईल, ज्यात उत्पादन शुल्क आणि राज्य VAT समाविष्ट आहे, जे एकूण वाढीचा सुमारे १५% भाग आहे. या बदलामुळे MNGL च्या ग्राहकांच्या हिताची सर्वोच्च प्राथमिकता आणि वायू पुरवठ्यातील अखंडता कायम राहील, हे स्पष्ट होते.
या किरकोळ वाढीच्या बाबतीत देखील, CNG हे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अद्यापही सर्वात किफायतशीर आणि पर्यावरणपूरक इंधन आहे. पुण्यात, CNG पेट्रोलच्या तुलनेत ४०% पेक्षा जास्त आणि डिझेलच्या तुलनेत २०% पेक्षा जास्त सवलतीत आहे, हे सिद्ध करत आहे की वाहनमालकांसाठी CNG हे पर्यावरणास अनुकूल आणि मूल्य वर्धित इंधन आहे.
ही दरवाढ जागतिक बाजारातील चढ-उतारांचा थेट परिणाम आहे. उदाहरणार्थ, एप्रिल २०२२ मध्ये पुण्यातील CNG ची किंमत ₹९२.०० प्रति किलो होती, जी आता ₹८९.०० प्रति किलो आहे. यामुळे MNGL च्या अत्याधुनिक धोरणाने किमतींमध्ये स्थिरता राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे समर्थन होते.
या वर्षी, MNGL ने पुण्यातील वाढत्या मागणीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत:

  • पुण्यात वायू नेटवर्क उन्नत करण्यासाठी ₹२५५ कोटींचे गुंतवणूक
  • ६ लाख DPNG कनेक्शन्स यशस्वीपणे वितरण, आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत ७ लाख कनेक्शन्सची लक्ष्य
  • ११२ पेक्षा जास्त CNG स्टेशन, आणि या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत १२२ स्टेशनची योजना – राष्ट्रीय पातळीवरील सर्वात जास्त कोणत्याही नगरपालिकेतील संख्या
    तथापि, MNGL ने जरी काही खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी, इतर बाजारातील कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांनी आपले दर कमी केलेले नाहीत. हे दर्शविते की, MNGL ने ग्राहकांच्या कल्याणासाठी असामान्य प्रयत्न केले आहेत, आणि उद्योगाच्या सर्वसाधारण आव्हानांवर मात करण्यासाठी उत्तम काम केले आहे.
    MNGL चे लक्ष ग्राहकांच्या समाधानावर, इन्फ्रास्ट्रक्चरच्या गुणवत्तेवर आणि पर्यावरणाच्या टिकावावर कायम आहे. सतत गुंतवणूक आणि धोरणात्मक नियोजन यांमुळे MNGL पुणे शहराला किफायतशीर, विश्वासार्ह आणि हरित ऊर्जा उपाय प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे.
    MNGL आपल्या ग्राहकांचे विश्वास आणि समजून घेण्याबद्दल धन्यवाद व्यक्त करत आहे आणि जागतिक आव्हानांचा सामोरा जात एक टिकाऊ भविष्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

महात्मा फुलेंच्या नावाने पहिला आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल २ ते ५ जानेवारीला पुण्यात

चार दिवस विविध साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम; महाराष्ट्रासह देशविदेशातून ६०० कवींचा सहभाग२५ फुलेप्रेमी कवींना ‘समाजरत्न पुरस्कार’ पुरस्कार; कवी विजय वडवेराव यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे: देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत पहिल्या आंतरराष्ट्रीय म.फुले फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात सकाळी ९ ते रात्री ९ असा सलग १२ तास, चार दिवस हा फेस्टिव्हल होणार आहे. महाराष्ट्रासह देशविदेशातून ६०० कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती फेस्टिवलचे मुख्य आयोजक, भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. सहकारी अरविंद बनसोडे यावेळी उपस्थित होते.
विजय वडवेराव म्हणाले, “क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरु केली. या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुलेंच्या या कार्यकर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा, हा या फेस्टिवलच्या मुख्य उद्देश आहे. या फेस्टिवलमध्ये देश-विदेशातील सहाशे कवींचा काव्य महोत्सव, भिडेवाडा या विषयावर मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगितिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध उपक्रम या चार दिवसात होणार आहेत.”
“फेस्टिवलमध्ये सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे. दुबईतील कवींच्या हस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन होईल. लंडन, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी आदी देशांतून, तसेच केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तरप्रदेश आदी राज्यातून कवी-कवयित्री सहभागी होत आहेत. सावित्रीमाई, फातिमाबी व महात्मा फुले यांच्या वेशात कवी सहभागी होणार आहेत, हे या फेस्टिव्हलचे आकर्षण असणार आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा त्याग, समर्पण आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान अमूल्य आहे. फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्याबाबतचा जागरही या फेस्टिवलमध्ये केला जाणार आहे. ही एक चळवळ असून, फुले विचार पुढच्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहे,” असे वडवेराव म्हणाले.
भिडेवाडा अभियानात विशेष कार्य करणाऱ्या जगभरातील २५ फुलेप्रेमी कवी, कवयित्री व कार्यकर्त्यांना फेस्टिव्हलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये क्रांती वेंदे (धुळे), पूनम पाटील (जळगाव), नंदा मघाडे (जळगाव), सुधीर महाजन (जळगाव), मुकुंद जाधव (जळगाव), कांचन मून (पुणे), प्रतिभा कीर्तीकर्वे (पुणे), सरिता कलढोणे (पुणे), वनिता जाधव (बारामती), सुनिता नाईक (खेड), बा. ह. मगदूम (सांगली), एम. डी. कदम (सांगली), आनंद चोपडे (बेळगाव कर्नाटक), मनोज भार शंकर (अबुधाबी), अरविंद बनसोडे (पुणे), विशाल बोरे (अकोला), प्रा. माया मुळे (धाराशिव), डॉ. दिलीप नेवसे (सातारा), सुमनताई मनवर (यवतमाळ), संगिता कानिंदे (यवतमाळ), वर्षा शिंदे (पुणे), उमेश शिरगुप्पे (गोवा) यांचा समावेश आहे, असे वडवेराव यांनी नमूद केले.

भारतीय माजी सैनिक संस्थेची रविवारी आकुर्डीत वार्षिक सर्वसाधारण सभा

पिंपरी, पुणे – भारतीय माजी सैनिक संघ, पुणे जिल्हा केंद्राची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, आकुर्डी, मुंबई पुणे महामार्ग खंडोबा मंदिर, सांस्कृतिक भवन येथे रविवारी (दि. २९ डिसेंबर) सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव डी. एच. कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
यावेळी बँक ऑफ बडोदाचे जनरल मॅनेजर कविता सिंग, झोनल ऑफिस, ब्रिगेडियर मधुकर प्रचंड (नि), आजीव अध्यक्ष,आयइएसएल, पीडीसी, ब्रिगेडियर डढीच (नि), व्हीएसएम कर्नल आर. ई. कुलकर्णी (नि), ले. कर्नल व्ही. व्ही. वेसविकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भारतीय माजी सैनिक संघ ही माजी सैनिकांसाठी कार्य करणारी देशातील सर्वात जुनी नोंदणीकृत राष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेचे उद्घाटन १९६४ साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते तसेच जनरल थिमया व फिल्ड मार्शल करिअप्पा यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे करण्यात आले होते. महाराष्ट्रातील कार्यालय मुंबई आझाद मैदान येथे कार्यरत असून पुणे जिल्ह्यातील कार्यालय १९७८ पासून निगडी प्राधिकरण, सेक्टर २८ येथे संत ज्ञानेश्वर उद्यान येथे सुरू आहे. या संस्थेच्या माध्यमातून वृध्द माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा पत्नी, वीर माता-भगिनी तसेच माजी सैनिकांचे कुटुंबीय त्यांची मुले त्याच्या अनेक विविध प्रश्नांचे विनामूल्य निराकारण करण्यात येते. या सभेस भारतीय भूतपूर्व सैनिक, सैनिक तसेच सामान्य नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

डॉ. सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजाघाटावर जागा न देणे हे भाजपाच्या गलिच्छ राजकारणाचे दर्शन.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना प्रदेश काँग्रेस कार्यालयात श्रद्धांजली.

मुंबई, दि. २८ डिसेंबर २०२४
“पंतप्रधान म्हणून मी कमजोर होतो की कणखर हे इतिहास ठरवेल” असे डॉ. मनमोहनस सिंग म्हणाले होते. आज मनमोहन सिंग यांना सर्व जग श्रद्धांजली देत असताना त्याची प्रचिती येत आहे. गरिबीतून सुरुवात करुन बुद्धीमत्तेच्या जोरावर पंतप्रधान होऊन देशाला आर्थिक दिशा व आर्थिक शिस्त लावण्याचे काम डॉ. मनमोहन सिंग यांनी केले ते देश व जग विसरु शकत नाही. असे महान व्यक्तिमत्व आपल्यात नाही याचे दुःख असून देशासाठी त्यांनी केलेले समर्पण देश कधीही विसरणार नाही. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने केवळ काँग्रेस पक्षाचे नाहीतर देशाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय, टिळक भवन येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी आमदार सुभाष चव्हाण, सरचिटणीस राजेश शर्मा, मुनाफ हकीम, प्रदेश प्रवक्ते भरतसिंह, निजामुद्दीन राईन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुष्पहार घालून आदरांजली अर्पण केली.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग हे शेवटच्या माणसापर्यंत विकास कसा पोहचेल याचा विचार करत, आपल्या १० वर्षांच्या काळात त्यांनी देशाला मनरेगा, शिक्षण हक्क, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार कायदा देऊन सर्वसामान्यांचे हितच पाहिले. जगात कच्च्या तेलाचे भाव प्रचंड वाढले असताना त्याची झळ सामान्यांना बसणार नाही यासाठी योग्य नियोजन केले. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर सातत्याने टीका केली गेली पण त्या टीकेची पर्व न करता त्यांनी भारताच्या विकासावर भर दिला. डॉ. महमोहन सिंग यांना कशाचाही गर्व नव्हता, पंतप्रधान असतानाही ते सामान्य व्यक्ती म्हणूनच जगले. सामान्यातून कसे मोठे होता येते हे डॉ. मनमोहन सिंग नवीन पिढीसाठी उत्तम उदाहरण आहेत. डॉ. सिंग हे देशाच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याची क्षमता असलेले नेतृत्व होते. सोनियाजी गांधी यांनी या महान नेत्याची पंतप्रधानपदी निवड करुन देशहितासाठी कोणत्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे हे दाखवून दिले. देशासाठी सर्वकाही ही गांधी कुटुंबाची भुमिका राहिली आहे आणि तीच डॉ. मनमोहनसिंग यांच्या रुपाने देशाने पाहिली.

एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांचे उत्तुंग व्यक्तीमत्व जगाने पाहिले, जगातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख त्यांच्याकडे आदराने पहात, त्यांचा सन्मान करत अशा महान व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी सत्ताधारी पक्षाने राजघाटावर जागा दिली नाही. ज्या व्यक्तीने कधीच भेदभाव केला नाही त्यांच्याबाबतीत सत्ताधारी पक्षाने केलेला भेदभाव चुकीचा असून राजघाटावर जागा न देऊन भाजपाने गलिच्छ राजकारण केले आहे, असे पटोले म्हणाले.

यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर

0

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते होणार प्रदान

छत्रपती संभाजीनगर (दि.२८ डिसेंबर): जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून १५ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका व नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम व महोत्सवाचे मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी केली आहे. पद्मपाणी पुरस्कार निवड समितीने सई परांजपे यांच्या नावाची निवड केली असून या समितीच्या अध्यक्षपदी लतिका पाडगांवकर (पुणे) तर सदस्यपदी चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर व चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप पद्मपाणी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व दोन लक्ष रूपये असे आहे.

पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात १५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता रूक्मीणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तर महोत्सव पुढील पाच दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे.

मागील चार दशकांहून अधिक काळापासून सई परांजपे या भारतीय सिनेजगतात कार्यरत असून त्यांनी दिग्दर्शित केलेल्या हिंदी सिनेमांनी भारतीय सिनेजगताला वेगळी ओळख प्राप्त करून दिली आहे. अतिशय भावस्पर्शी, मानवी नातेसंबंधांवर भाष्य करणारे सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्पर्श (१९८०), चश्मेबद्दूर (१९८१), कथा (१९८३), दिशा (१९९०), चुडिया (१९९३), साज (१९९७) यांचा समावेश आहे. चित्रपट दिग्दर्शनासमवेत परांजपे यांनी अनेक महत्वपूर्ण नाटकांचे व बालनाट्यांचे देखील दिग्दर्शन केलेले आहे. तसेच त्यांनी मराठी साहित्यात विपुल प्रमाणात लेखन केले असून प्रामुख्याने बालसाहित्याचा त्यात समावेश होतो. २००६ साली भारत सरकारने परांजपे यांना त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने गौरविले आहे. तसेच फिल्मफेअर
पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी या केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण संस्थेवर देखील परांजपे यांनी सलग दोनदा अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे.

नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा केंद्रीय सुचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. सॉलीटेअर टॉवर्स, अभ्युदय फाउंडेशन हे या महोत्सवाचे सह आयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे अ‍ॅकॅडमीक पार्टनर आहेत.

छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्‍या या महोत्सवात अधिकाधिक रसिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, सतीश कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, शिव कदम, आकाश कागलीवाल, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. आशिष गाडेकर, डॉ. रेखा शेळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, प्रेरणा दळवी, सुबोध जाधव, अमित पाटील आदींनी केले आहे.