Home Blog Page 523

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत  हिंदू महासंघाचे शिक्षणमंत्र्याना निवेदन 

विद्यार्थी हितासाठी आक्रमक होण्याचा इशारा 

पुणे :

 अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत हिंदू महासंघाच्या पालक आघाडीने  शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुंबई निवासस्थानी भेट घेऊन  निवेदन दिले. पालक आघाडीच्या प्रतिनिधींसह हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष  आनंद दवे ,सौ.आदिती जोशी, सौ. तृप्ती तारे, नितीन शुक्ल,अजित जोशी,सौ.तृप्ती वाकडे,अश्विन वाकडे,कविता दोशी आणि आरती जोशी उपस्थित होते.यावेळी ११ वीच्या प्रवेशाच्या जी.आर. मध्ये आवश्यक बदल करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शिक्षण मंत्री  दादा भुसे यांनी पालक आघाडीला सकारात्मक आश्वासन दिले आहे.परंतु ३ जून २०२५ पर्यंतच प्रवेश प्रक्रियेची  मुदत असल्यामुळे पालक आघाडी मागणीबाबत आक्रमक राहणार आहे. सीईटीप्रमाणे प्रवेशप्रक्रिया सुलभ असल्याचे सांगीतले जात  आहे. मात्र प्रत्यक्षात अडचणी येत आहेत.प्रवेश प्रक्रियेतील अर्ज भरण्याकरिता असलेले संकेतस्थळ बिघडते. विद्यार्थ्यांच्या शाळेच्याच असलेल्या महाविद्यालयाचे संकेत स्थळावर दिसतच नाही. रहिवासी असलेल्या ठिकाणापासून जवळ असलेले महाविद्यालय देखील संकेत स्थळावर दिसत नाही. महाविद्यालयात असलेला प्रशासकीय जागा देखील शासकिय जागा शासनाकडे जमा झाल्याने  महाविद्यालयांकडे पर्याय शिल्लक नाही.या सर्व अडचणीमुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालक  चिंताग्रस्त झाले असून संतप्त प्रतिक्रिया सर्व स्तरातून येत आहेत.चांगले गुण असले तरी प्रवेश प्रक्रिये मुळे चांगले महाविद्यालय मिळण्याची खात्री उरलेली नाही.हिंदू महासंघाने या विषयाकडे लक्ष देऊन राज्यभर पालक आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून येत्या काळात न्यायासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

संजय शिरसाटांकडे वेदांत हॉटेलची जागा विकत घेण्यासाठी 67 कोटी आले कुठून? संजय राऊतांचा प्रश्न

मुंबई-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर एका महिलेने केलेले आरोप मागे घेतले असले तरी संजय शिरसाट यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय शिरसाट यांनी आता प्रॉपर्टी खरेदीत घोटाळा केला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील वेदांत हॉटेलची जागा अत्यंत कमी किमतीत बेकायदेशीर लिलाव प्रक्रिया राबवून 76 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. इतकेच नाही तर 76 कोटी रुपये संजय शिरसाट यांच्या मुलाकडे आले कुठून? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

छत्रपती संभाजीनगर मधील हॉटेल वेदांताची जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. ही जागा भ्रष्ट मार्गाने मंत्री शिरसाट यांनी स्वतःच्या ताब्यात घेतली आहे. 67 कोटी रुपयांना ही प्रॉपर्टी घेण्यात आली. हा आकडा देखील कमी नाही. गोरगरिबांना मदत करणाऱ्या खात्याच्या मंत्रांच्या मुलाकडे एवढे पैसे कसे आले? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. वेदांत हॉटेलची प्रॉपर्टी या महाशयाने विकत घेतली आहे. लिलावामध्ये प्रॉपर्टी विकत घेण्यात आली असली तरीही प्रॉपर्टी त्यांनाच मिळावी मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत ही प्रॉपर्टी मिळावी अशी ही लिलाव प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबवण्यात आली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

प्राइम लोकेशनची ही प्रॉपर्टी विकत घेण्यात आली. त्याचे पैसे कुठून आले? त्याचे पैसे एकनाथ शिंदे यांनी दिले की अमित शहा यांनी दिले? की त्यांना मिळालेल्या 50 खोके मधील हा पैसा आहे का? संजय शिरसाट यांना इतर आमदारांपेक्षा जास्त पैसे मिळाले का? असे अनेक प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले. शिरसाट यांचा मुलगा मोठा उद्योजक नाही. तरी त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

एकनाथ शिंदे यांचा स्वतंत्र पक्ष नाही. तो अमित शहा यांचाच पक्ष आहे. त्यामुळे ही एकच थाळी आहे. यात सगळे मिळून खात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील सर्व लुटीचा माल वन विंडो सिस्टीमने एकाच ठिकाणी आणण्यात येतो. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कंपनीचे मालक देखील अमित शहा हेच आहेत. त्यामुळे वाटा-घाटा हे सर्व वरवर चाललेले आहे. शेवटी ते सर्व एकाच ताटातले पदार्थ असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागावाटपावरून महा-युतीत सुरु असलेल्या चर्चेवर राऊत यांनी टीका केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची पदवी ब्रिटिशांनी जप्त केली होती. ती परत मिळवण्याचा सरकार प्रयत्न करत आहेत, ही स्वागतार्ह बाब असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हा आपला ठेवा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील राहते घर ताब्यात घेतले आणि तेथे मेमोरियल उभे केले. आम्ही त्याचे देखील स्वागत केले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. वीर सावरकरांची पदवी, जी ब्रिटिशांनी जप्त केली होती. ती परत आणण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक भूमिका व्यक्त केली आहे. त्याला कोणीही विरोध करण्याचे कारण नाही. वीर सावरकर हे बॅरिस्टर आहेतच. ब्रिटिशांनी तो कागदाचा तुकडा जप्त केला असला तरी देखील आम्ही त्यांना बॅरिस्टर मानतोच. मात्र या देशाची मागणी वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची आहे. या वेळेला तरी सावरकरांना भारतरत्न भेटेल असे आम्हाला वाटत होते. मात्र त्यासाठी आम्ही किती काळ वाट पाहावी? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

पाकिस्तान विरुद्ध दंड थोपटणारे नरेंद्र मोदी यांचे दंड पिचके आहेत का? असा प्रश्न राऊत यांनी नारायण राणे यांना विचारला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दम भरताच भारतीय सैन्यांना परत का बोलावले? हे नारायण राणे यांनी आधी स्पष्ट करावे, अशा शब्दात संजय राऊत यांनी राणे यांच्यावर देखील पलटवार केला आहे. पाक व्याप्त कश्मीर आम्ही ताब्यात घेणार, अशी गर्जना भाजपवाल्यांनी केली होती. त्याचे उत्तर आधी नारायण राणे यांनी द्यावे. आम्ही पाकिस्तान मध्ये गेलो नाही. तर नरेंद्र मोदी हेच नवाज शरीफ यांचा केक कापण्यासाठी गेले होते. हे नारायण राणे विसरलात का? असा प्रश्न त्यांनी केला. नारायण राणे यांनी आता आपल्या वयाचे तरी भान ठेवावे. त्यांच्या टोपाचेही केस आता पिकले आहेत. त्यांनी प्रगल्भ विधाने करावीत. तुम्ही स्वतःचा पक्ष काढून दंडावरचा बेडूक दाखवला असता तर आम्ही तुम्हाला मानले असते. मात्र तुम्ही भाजपचे आश्रित आहात. तर राज ठाकरे यांच्याकडे स्वतःचा पक्ष असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

नैसर्गिक शेती विज्ञान विद्यापीठासाठी कृषीमंत्र्यांना निवेदन

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह महाराष्ट्रच्या वतीने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना निवेदन

पुणे : सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या वतीने राज्यात स्वतंत्र नैसर्गिक शेती विज्ञान विद्यापीठ व्हावे, यासाठी कृषीमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी देखील मागण्या यावेळी करण्यात आल्या. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना निवेदन देण्यात आले

यावेळी कृषी भूषण जगन्नाथ मगर, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे अध्यक्ष  विजय वरुडकर, संचालक ज्ञानेश्वर शिंदे, कृषी भूषण शशिकांत पुदे, चंद्रकांत बागल, खुशालचंद मोरे, संदीप यादव, विजय जवळकर, प्रमोद इंगळे तसेच नैसर्गिक शेती करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैसर्गिक शेती संदर्भात देखील निवेदन यावेळी देण्यात आले.

विजय वरुडकर म्हणाले, केंद्र सरकारने राष्ट्रीय नैसर्गिक शेती योजना सुरू केली आहे. राज्यात २ लाख शेतकरी या विषयी सहभागी व्हावे हे उद्दिष्ट ठरण्यात आले आहे. प्रशासकीय यंत्रणेची मर्यादा पाहता नैसर्गिक शेती उत्पादन व गुणवत्ता पूर्वक नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने स्वयंसेवी संस्था व नैसर्गिक शेती प्रशिक्षक यांना एकत्रित करून योजना अंमलबजावणी करावी. सर्वांनी मिळून नैसर्गिक शेती प्रशिक्षण, माती पाणी परीक्षण, नैसर्गिक शेती प्रमाण पत्र, प्रक्रिया उद्योग, निविष्ठा निर्मिती, बीज बँक निर्मिती, नैसर्गिक खते निर्माण, उत्पादन विक्री यंत्रणा अशा विविध पैलूतुन शेतकऱ्यांच्या बांधावर म्हणजे गावात प्रशिक्षण व सोयी उपलब्ध झाल्यास नैसर्गिक शेतीला प्रतिसाद मिळेल.

ज्ञानेश्वर शिंदे म्हणाले, नैसर्गिक शेतीसाठी आर्थिक प्रोत्साहन आणि अनुदान देण्यात यावे. सेंद्रिय उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमत ठरवण्यात यावा. नैसर्गिक शेती उत्पादन विक्रीसाठी राज्यातील प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वतंत्र विशेष बाजारपेठ साठी जागेची तरतुद करण्यात यावी.

कृषी भूषण जगन्नाथ तात्या मगर यांनी सांगितले की सरकारी खरेदीत सेंद्रिय उत्पादनांना प्राधान्य द्यावे. नैसर्गिक शेती वरील राज्य सरकारच्या वतीने लावण्यात आलेला जीएसटी रद्द करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

ते पुढे म्हणाले, याशिवाय नैसर्गिक  शेतीमध्ये डेटा विश्लेषण, सेन्सर तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा  वापर करून पीक आणि जमिनीचे व्यवस्थापन करण्यात यावे. नैसर्गिक शेतमालाच्या गुणवत्तेची विश्वासार्हता साठी कठोर तपासणी यंत्रणा स्थापित करावी. नैसर्गिक शेतीसाठी प्रशिक्षण व डिजिटल प्लॅटफॉर्म  विकसित करणे. नैसर्गिक शेतीसाठी सुलभ आणि परवडणारे प्रमाणीकरण व प्रमाणीकरण संस्थांना प्रोत्साहन द्यावे. राज्यातील महानगरपालिका, नगर परिषद क्षेत्रात तसेच शासकीय जागेमध्ये  शेतकरी बाजारसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा विविध मागण्या निवेदनात केल्या आहेत.

नैसर्गिक शेती मिशन विषयी सहभागासाठी  ८४४६००४५८० या क्रमांकवर संपर्क साधावा, अशी माहिती कार्यक्रम वेळी करण्यात आली.

मांजरी बुद्रुक पाणी योजनेचा सुधारित आराखडा मंजूर करा..शिवसेनेची आग्रही मागणी…

पुणे-

“समाविष्ट 34 गावांसह प्रामुख्याने मांजरी बुद्रुक येथील नागरिकांना समान व नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाणी योजनेचा सुधारित आराखडा तयार करून आवश्यक तो निधी तातडीने मंजूर करावा”, अशी आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिका आयुक्त तसेच मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शिष्टमंडळामध्ये शहरप्रमुख संजय मोरे, प्रवीण रणदिवे, वर्षा खलसे, संतोष ढोरे, गणेश मरळ, स्वप्निल वसवे, किरण खलसे, अशोक ढेंबरे, रमेश सूर्यवंशी, किरण जाधव, नितीन राखपसरे आदींचा समावेश होता.
तत्कालीन मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीने मांजरी बुद्रुक गावचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी सन 2008 मध्ये लोकसंख्येचा सर्व्हे करून मांजरी करांना पाणी मिळावे यासाठी काम केलेले होते.
त्यानंतर सन 2014 मध्ये हीच लोकसंख्या गृहीत धरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी योजना मंजूर करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव ती पुढे स्थगित करण्यात आली. विशेष म्हणजे प्रशासनाने भविष्यातील वाढत्या नागरीकरणाचा विचार न करता पुन्हा तोच सर्व्हे गृहीत धरून त्यानंतर तब्बल दहा वर्षानंतर म्हणजेच सन 2018 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणी योजना पुन्हा मंजूर झाली.
ही योजना सहा ते सात वर्षानंतर सन 2024 च्या अखेरीस प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात आली. त्या पाण्याचा लाभ मांजरी बुद्रुकमधील केवळ 50 ते 55 % नागरिकांना अपुरा व अनियमित पद्धतीने का होईना होत आहे. उर्वरित जवळपास 45 % मांजरीकर नागरिक अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत याकडेही मोरे यांनी लक्ष वेधले आहे.
प्रामुख्याने रेल्वेगेट परिसर, गोडबोले वस्ती, घावटे वस्ती, रंगीच्या ओढ्याच्या दोन्ही बाजूकडील रहिवासी परिसर, मांजरी – मुंढवा रोड, झेड कॉर्नर पर्यंतचा परिसर, मोरे वस्ती, भापकरमळा, शेवाळवाडी या परिसरात लोकसंख्येच्या प्रमाणात जवळपास 5 ते 6 पाण्याच्या टाक्यांची उभारणी करून त्यासोबतच आवश्यक ते मुख्य व अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे उभे करणेही गरजेचे आहे. अशी प्रमुख मागणीही यावेळी करण्यात आली.
यासोबतच जलवाहिन्यांची कामे होत असताना ती दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने कशी होतील, यासाठी प्रशासनाने त्यावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

पुणे, दि.२७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त शनिवार ३१ मे रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे दुपारी १२.३० वाजता भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश असून सर्व नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि पुण्यश्लोक फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार असणार आहेत. कार्यक्रमाला मुख्यमंत्र्याचे तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे- दुपारी १२.३० ते १.०० वा. स्वागत सत्र, १.०० ते १.३० शाहिरी पोवाडा, १.३० ते २.३० उद्घाटन, मान्यवर सत्कार व मनोगत आणि संध्याकाळी २.३० ते ५.१० वाजता पुण्यश्लोक महानाट्य सादर केले जाईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या केवळ राज्यकर्त्या नव्हत्या तर प्रजाहितदक्ष होत्या. त्यांनी अनेक घाट, मंदिरांचा जिर्णोद्धार, पानपोई, धर्मशाळा आदी अनेक कामे केली आहेत. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यात शाहिरी पोवाडा, भारूड, वासुदेव यांसारखे पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम लोककलाकर सादर करणार आहेत, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित महानाट्य हे विशेष आकर्षण असणार आहे, असे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी कळविले आहे.
0000

खुल्या प्रवर्गातील इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २७: केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिस आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत (एनआयईएलआयटी) या नामांकित प्रशिक्षण संस्थेद्वारे औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासासाठी, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेमार्फत नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरीता खुल्या प्रवर्गातील इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

खुल्या प्रवर्गातील ब्राह्मण, मारवाडी, राजपूत, गुजराती, कम्मा, कायस्थ, बंगाली, कोमटी, आर्य वैश्य, सिंधी, ठाकूर, येलमार, त्यागी, सेनगूथर, बनिया, राजपुरोहित, नायर, आयंगार, नायडू, पाटीदार या जातीतील विद्यार्थ्यांना कोणत्याही शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाहीत, अशांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अर्जदार लक्षित गटातील असावा, महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न आठ लाख रुपयाच्या आत असावे. विद्याथ्यांनी अभियांत्रिकी पदविधारक (आयटी,संगणक विज्ञान, इलेक्ट्रानिक्स, टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रीकल, इन्स्युमेंटेशन अथवा बीएस्सी, बीएसए, बीसीएस, एमएस्सी (संगणक विज्ञान) एमसीए आदी पदवी उत्तीर्ण असावा. अर्जदार अमृतच्या लक्षित गटातिल असावा.

अर्ज करण्याकरीता आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र (वय, राष्ट्रीय आणि रहिवाशी प्रमाणपत्र), अमृत लक्षित गटातील जातीचा उल्लेख असलेला शासकीय पुरावा. ८ लाख रुपयाच्या खालील उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र (२०२५-२६), तसेच शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्राची कागदपत्रांची आवश्यकता आहे.

एनआयईएलआयटी संस्थेच्या संकेतस्थळावर अमृत प्रशिक्षण योजनेसाठी गुगल लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अमृत संस्थेच्या https://mahaamrut.org.in आधार संलग्र मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी. संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील योजना या टॅबमध्ये जाऊन एनआयईएलआयटी प्रशिक्षण योजना हे बटनावर क्लि करून अर्जाची नोंदणी करावी.

टपालाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. जाहिरात रद्द किंवा मुदतवाढीबाबत तसेच अर्ज नाकारणे व स्विकारणे, निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक अमृत, यांचेकडे राहतील. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल. अर्ज भरताना कोणत्याही अडचणी आल्यास info@mahaamrut.org.in या मेल वर अथवा मोवाइल क्र. ९७३०१५१४५० संपर्क करावा, एनआयईएलआयटी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

शिक्षणाचे भवितव्य अध्यापनशैलीत दडलेले-कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस.

 एमआयटी एडीटी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय शिखर संमेलन

पुणे:  भारतासह एकंदर जगातील शिक्षणाचे महत्व आणि परिभाषा बदल आहे. सध्याचे शिक्षण हे विद्यार्थ्यांना कौशल्ये प्रदान करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देते. त्यामुळे, एकंदरशिक्षणाचे भवितव्य हे केवळ तंत्रज्ञानावर नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेणाऱ्या अध्यापनशैलीत दडलेले आहे,” असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. राजेश एस. यांनी मांडले.

ते एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे आणि इंटरनॅशनल सोसायटी फॉर एज्युकेशनल लीडरशिप (आयएलईएल) यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट, लंडन यांच्या सहकार्याने आयोजित ‘ईएलटी समिट २०२५’ या दोन दिवसीय आभासी आंतरराष्ट्रीय शिखर संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.  

विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि आयएलईएलचे अध्यक्ष डॉ. कृष्णमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिखर परिषदेस शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ज्ञांची उपस्थिती लाभली. यावेळी परिषद अध्यक्ष डॉ. तरुण पटेल, संयोजक डॉ. अतुल पाटील यांच्यासह डॉ. क्रिस्टिन हॅन्सन (युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले, अमेरिका), डॉ. हुआहुई झाओ (युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स, यूके), एरिक एच. रोथ, सारा डाविला, डॉ. इल्का कोस्ट्का, रिचर्ड जोन्स (यूएसए) यांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ वक्त्यांनी सहभाग घेतला. यासह, शैक्षणिक प्रकाशन क्षेत्रातील इयान काउले, प्रा. जोआना स्जोक, आणि जोशुआ ग्नानक्कन (केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट) हेही या परिषदेचे विशेष आकर्षण ठरले.

“Linguistics and Poetics as an Antidote to the Virtual” या विषयावर उद्घाटनपर व्याख्यान देताना डॉ. हॅन्सन यांनी साहित्याच्या संवेदनशीलतेचे आणि मानवी मूल्यांचे तंत्रज्ञान युगातील महत्त्व अधोरेखित केले. तसेच, डॉ. झेड. एन. पाटील, माजी अध्यक्ष, ईटीटीएआय पुणे यांना ईएलटी क्षेत्रातील दीर्घकालीन कार्यासाठी ‘आयएसईएल लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ने गौरविण्यात आले.

या समिटमध्ये भारत, अमेरिका, कॅनडा, बांगलादेश, भूतान, फिलीपिन्स व ऑस्ट्रेलिया या देशांमधून आलेल्या १२१ हून अधिक शोधनिबंधांपैकी ८० शोधनिबंध सादरीकरणासाठी निवडण्यात आले होते. एआयचा ब्लेंडेड आणि हायब्रिड क्लासरूममध्ये वापर, चॅटजीपीटी पलिकडील एआय अनुप्रयोग, बहुभाषिक संदर्भात एआयचा उपयोग, आदी विषयांवर सखोल चर्चा झाली.

समारोप समारंभात मॉडर्न कॉलेज ऑफ बिझनेस अँड सायन्स, मस्कत (ओमान) येथील डॉ. आरती मुजुमदार आणि प्रा. पाटील यांनी एआय आणि भाषा अध्यापनातील समकालीन बदल व आव्हानांवर भाष्य केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. अशोक घुगे आणि प्रा. अमिषा जयकर यांनी केले, तर समारोप सत्राचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा वाघटकर आणि डॉ. स्वप्नील शिरसाठ यांनी केले.

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना एकरी २० हजार व हेक्टरी ५० हजारांचे अनुदान तातडीने द्या: हर्षवर्धन सपकाळ.

खरिपासाठी शेतक-यांना मोफत बियाणे व खते द्या!

अमित शाह महाराष्ट्रात असूनही पावसाच्या नुकसानीवर गप्पच, दिल्लीला जाण्यापूर्वी तरी शेतकरी कर्जमाफी जाहीर करा.

पहिल्याच पावसात भाजप, शिंदे, अजित पवारांच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी मंत्रालयात पोहचली, घोटाळेबाजांची चौकशी कधी?

मुंबई, दि. २७ मे २०२५
राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना एकरी २० हजार रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, बळीराजा संकटात आल्यास त्याला तातडीने मदत करण्याचे काम काँग्रेसचे सरकार असताना अनेकदा केले आहे. पिकावर रोग पडला, लाल्या पडल्या, गारपीट झाली, अवकाळी पावसाने नुकसान झाले की सरकारने कशाचीही पर्वा न करता शेतकऱ्याला मदत दिली आहे. आताचे सरकार मात्र शेतकऱ्याला मदत करण्याच्या विचाराचे नाही. केवळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन, कोरडी आश्वासने देऊन चालणार नाही, शेतक-यांना तातडीने मदत पोहचवली पाहिजे. खरिप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमाफी अद्याप जाहीर केलेली नाही, कर्जाचे पुनर्गठन तरी करून द्यावे. सरकारचे खरिपाचे काहीच नियोजन नाही याकडेही लक्ष वेधून अडचणीत आलेल्या शेतक-यांना खरीप हंगामासाठी मोफत बियाणे व खते द्यावीत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मुसळधार पावसाने भाजपा युती सरकारचे सर्व दावे फोल ठरले आहेत. कालवे फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार तसेच मुंबई तुंबल्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी बाहेर पडली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईत जागोजागी पाणी साचले, सर्व व्यवस्था कोलमडली. भुयारी मेट्रो मुंबईत शक्य नसल्याचा एमएमआरडीएचा अहवाल असतानाही काही लोकांच्या हट्टासाठी हा प्रकल्प राबविला त्याचे परिणाम आज दिसत आहेत. रात्रीच्या अंधारात हजारो वृक्षांची कत्तल करून मेट्रोचा अट्टाहास पूर्ण केला आहे. सत्ताधारी पक्षाचा कथित विकास एका पावसानेच उघडा पाडल्यानंतरही हे लोक आधीच्या सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. २५ वर्ष भाजपा शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेत सत्तेत होती, एकनाथ शिंदे सातत्याने नगर विकास खात्याचे मंत्री आहेत मग याकाळात भाजपा व एकनाथ शिंदे यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून सरकारने आरोप प्रत्यारोपाचा खेळ सोडून आत्मपरिक्षण करावे आणि जनतेला मदत करावी.

महाराष्ट्र नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना राज्याचे मंत्रिमंडळ मात्र अमित शाह यांची खुशामत करण्यात मग्न आहे. आपले मंत्रीपद शाबूत रहावे यासाठी मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री धडपड करत आहेत. अमित शाह यांनी निवडणुकीच्या प्रचारात दोन सिलिंडर मोफत देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणार, अशा वल्गणा केल्या, त्याचा आता त्यांना विसर पडलेला दिसत आहे. अमित शाह महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटावर एक शब्दही बोलले नाहीत. आता दिल्लीला जाण्यापूर्वी तरी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून जावी कारण राज्यातील सरकार अमित शाह यांच्या शब्दाशिवाय कामच करत नाही अशी कोपरखळीही हर्षवर्धन सपकाळ यांनी मारली.

या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी व प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उटगींचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

मुंबई, दि. २७ मे २०२५
बँकींग क्षेत्रातील विविध प्रश्नावर मागील ४० वर्ष सातत्याने सरकारला जाब विचारणारे विश्वास उटगी यांनी आज गांधी भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी विश्वास उटगी यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

“केंद्र व राज्यात भाजपा सरकारचा मनमानी कारभार सुरु असून बँकांच्या कामातही हस्तक्षेप वाढला आहे. काही भांडवलदार बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेले आहेत, भाजपा सरकार त्यांच्यावर काही कारवाई करत नाही. आर्थिक पातळीवरही भाजपा सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. भाजपा सरकारच्या बँकींग व आर्थिक क्षेत्रातील मुद्द्यांवर आवाज उठवून सरकारला जागे करण्याचे काम विश्वास उटगी करतील”, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

य़ावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी व प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

पीएमआरडीएचा आपत्कालीन विभाग अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज

पुणे (दि.२७) : अतिवृष्टीसह उद्भवणाऱ्या इतर आपत्कालीन पर‍िस्थ‍ितीला तोंड देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा आपत्कालीन विभाग अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज आहे. नागर‍िकांनीही अशा आपत्कालीन पर‍िस्थ‍ितीत घराबाहेर पडू नये तसेच धोकादायक ठ‍िकाणी जावू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. आपत्तीच्या काळात संबंध‍ितांना वेळेत मदत पोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पीएमआरडीएचे प्र. महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी यंत्रणेला दिले आहेत.

हवामान विभागाकडून वेळोवेळी मान्सूनचा अंदाज वर्तविण्यात येत असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही आहे. अतिवृष्टीसह आपत्कालीन पर‍िस्थ‍ितीचा सामना करण्यासाठी पीएमआरडीए अत्याधुनिक यंत्रणेसह सतर्क आहे. संबंध‍ित अधिकाऱ्यांनी आवशकतेनुसार इतर यंत्रणांच्या संपर्कात राहून आपत्कालीन पर‍िस्थ‍ितीत संबंध‍ितांपर्यंत तातडीने मदतकार्य कसे पोहोचव‍िण्याचे याची काळजी घेण्याचे न‍िर्देश प्र. महानगर आयुक्त यांनी द‍िले आहे. यासह नागर‍िकांनी सुद्धा आपत्कालीन पर‍िस्थ‍ितीत पर्यटनासाठी बाहेर पडू नये, तसेच शासनांच्या सूचनांचे पालन करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संपर्क क्रमांक
पुणे आपत्ती प्रतिसाद पथक (PDRF) : 9545282930
मारुंजी अग्निशमन विभाग : 020 – 67992101, 020 – 67992100, 7066055101
नांदेड सिटी अग्निशमन विभाग : 020 – 67520002, 020 – 67520001
वाघोली अग्निशमन विभाग : 020 – 29518101, 020 – 29519101

शेतजमीन वाटणीपत्राची दस्त नोंदणी फी माफ

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून त्यामध्ये 10 मोठ्या निर्णयावर मोहोर लावण्यात आली आहे. राज्यात यापुढे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. महसूल खात्यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची आपसामध्ये वाटणी करायची असेल तर एकूण रेडीरेकनरच्या एक टक्के किंमत मोजावी लागायची. आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता फक्त 500 रुपयांमध्ये ही वाटणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या आधी शेतीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी मोठी रक्कम मोजावी लागायची.

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
(मंगळवार, दि. २७ मे २०२५)
एकूण निर्णय: १०

• रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्च्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस तसेच,पदांना मान्यता. (दिव्यांग कल्याण विभाग)

•मा. शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकाची पदे निर्माण करण्यास मान्यता.(विधि व न्याय विभाग)

  • इचलकरंजी व जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता. इचलकरंजीला ६५७ कोटी , जालन्याला ३९२ कोटी पाच वर्षांत मिळणार (वित्त विभाग)
  • शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ. (महसूल विभाग)
  • पत्रकार क्लब ऑफ नागपूर, नागपूर यांना देण्यात आलेल्या जमीनीबाबतच्या अटी-शर्तीमध्ये बदल करण्यास मान्यता. (महसूल विभाग)

• फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि. (FDCM Ltd.) मधील १हजार ३५१ पदांच्या सुधारीत आकृतीबंधास मंजूरी (वने विभाग )

• स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारीत धोरणास मान्यता. (शालेय शिक्षण विभाग)

• अशियाई विकास बैंक (ADB) सहाय्यित “महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प” संस्थेवर पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहणार. (पणन विभाग)

• कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक यांच्या पदनामात “उप कृषि अधिकारी” व “सहायक कृषि अधिकारी” असा बदल (कृषि विभाग )

• महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील १९५ कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर (वस्त्रोद्योग विभाग)

देहू-आळंदी रस्त्यावर इंडसइंड बँकेचे ATM फोडण्याचा प्रयत्न:हरियाणा टोळीतील दोन आरोपी ताब्यात, तीन फरार

पुणे-देहू – आळंदी रस्त्यावर देहुगाव मुख्य कमानीच्या पुढे रस्त्यावर थ्री एटीएम नावाने परिचीत असलेल्या इंडसाइंड बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने मंगळवारी मध्यरात्री पावणेदाेन वाजता फाेडण्याचे तयारीत असलेले पाच संशयित गस्त घालणाऱ्या पाेलिसांना दिसून आले हाेते. पाेलिसांनी सदर ठिकाणी जाऊन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, तीन चाेरटे पसार झाले, तर दाेन आराेपींना अटक करण्यात यश आले. पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत संबंधित टाेळी ही हरियाणा राज्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पिंपरी चिंचवड परिमंडळ दाेनचे पाेलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली आहे.

या प्रकरणी मुस्तफा माेबीन खान (वय- ३०),मुस्तकीम माेबीन खान (२५, दाेघे रा. पिनागव्वान, ता.पुन्हाना, जि.नुह, हरियाणा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार सिमा युसूफ खान (४०), वारीस खान (२०) व युसुफचा भाऊ आझाद खान (४५) हे कार मधून पसार झाले. सदर टाेळीचा म्हाेरक्या हा युसुफ खान असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील दाेन महिन्यापूर्वी विठ्ठलवाडी देहूगाव येथील एसबीआय बँकेचे एटीएम फाेडून १६ लाख ८७ हजार रुपये चाेरट्यांनी पळवून नेले हाेते. या एटीएम चाेरी प्रकाराचे अनुषंगाने पाेलिसांनी पुन्हा एटीएम चाेरीचा प्रकार घडू नये याकरिता परिणामकारक रात्रगस्त सुरु केली हाेती.

या दरम्यान देहुगाव बीट मार्शल रात्रगस्त घालताना त्यांना देहुगाव येथे एक पांढऱ्या रंगाची कार अभी असल्याचे दिसून आले. पाेलिस अंमलदार समाधान पटावकर व पाेलिस शिपाई किरण पाटील यांनी सदर गाडीकडे जाऊन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, सदरची कार ही तेथून भरधाव वेगाने आळंदीच्या दिशेने निघून गेली. त्यावेळी सदरच्या कारमध्ये पुढील बाजूस दाेन पुरुष व मागे एक महिला बसल्याचे दिसून आले. बीट मार्शलवरील पाेलिसांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ एटीएमकडे धाव घेतल्यावर इंडसइंड बँकेचे एटीएमचे शटर थाेडे उचकटलेले व त्यातून उजेड बाहेर दिसला.

तसेच आतील बाजूस काहीतरी सामान जमिनीवर पडल्यासारखा आवाज आल्याने त्यांना एटीएम चाेरीचा संशय आला. त्यामुळे पाेलिसांनी सहाय्यक पाेलिस निरीक्षक जाेएब शेख यांना फाेन करुन माहिती देत मदतीसाठी बाेलावले. एटीएमचे शटर उघडून आत प्रवेश केल्यावर दाेनजण गॅस कटरच्या सहाय्याने एटीएमची ताेडफाेड करुन दराेडा टाकताना मिळून आले. पाेलिसांना पाहून त्यांनी जाेरजाेरात आरडाओरड करुन शिवीगाळ करत पाेलिसांच्या दिशेने दगडफेक केली. तसेच त्यांच्याशी झटापटही केली. थाेड्याचवेळात आणखी पाेलिस आल्याने सदर दाेन आराेपींना अटक करण्यात आली. आराेपींवर देहु राेड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळ्याचे शुक्रवारी आयोजन

राज्यातील विविध क्षेत्रातील सोळा यशस्वी युवांचा होणार सन्मान

छत्रपती संभाजीनगर (दि. २७): यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मागील सव्वीस वर्षांपासून राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी विविध क्षेत्रात विधायक, भरीव व विशेष कामगिरी करणाऱ्या युवक-युवतींना हे पुरस्कार देण्यात येतात. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येते.
यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार वितरण सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार दि, ३० मे २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम असतील, तर मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२४-२५ सालचे मानकरी पुढीलप्रमाणे: साहित्य – विनायक होगाडे (कोल्हापूर), मृदगंधा दीक्षित (पुणे), सामाजिक – आकाश टाले (नागपूर), ऋतुजा जेवे (बुलढाणा), इनोव्हेटर – सुश्रुत पाटील (पालघर), पद्मजा राजगुरू (परभणी), क्रीडा – ओजस देवतळे, नागपूर (क्रीडा प्रकार : धनुर्विद्या), हृतिका श्रीराम, सोलापूर (डायव्हिंग), पत्रकारिता – प्रथमेश पाटील (पुणे), ज्योती वाय. एल. (मुंबई), उद्योजक जयेश टोपे (नाशिक) शिवानी सोनवणे (पुणे), तसेच रंगमंचीय कलाविष्कार विभागात कृष्णाई उळेकर, धाराशिव (लोककला), तन्वी पालव, सिंधुदुर्ग (शास्त्रीय नृत्य), ऋतुजा सोनवणे, जळगाव (शास्त्रीय संगीत), कल्पेश समेळ, रायगड (नाट्य) असे एकूण सोळा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील युवकांच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे. २१ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटरचे कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव निलेश राऊत, कार्यकारिणी सदस्य डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. श्रीरंग देशपांडे, डॉ. आशिष गाडेकर, डॉ. रेखा शेळके, डॉ. दासू वैद्य, प्रेरणा दळवी, सुबोध जाधव, रुपेश मोरे, राजेंद्र वाळके, वैशाली बावस्कर, संतोष मेकाळे आदींनी केले आहे.

25 वर्षीय तरुणीची 22 व्या मजल्यावरून उडी:खाली पडताच शरीराचे झाले 2 तुकडे

मुंबई-एका 25 वर्षीय तरुणीने 22 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची भयंकर घटना मुंबईच्या विक्रोळी परिसरात घडली आहे. भयंकर म्हणजे सदर मुलगी इमारतीच्या परिसरात पार्क करण्यात आलेल्या एका दुचाकीवर पडली. यामुळे तिच्या शरीराचे 2 तुकडे होऊन घटनास्थळी अक्षरशः रक्तामांसाचा सडा पडला होता.

यासंबंधीच्या माहितीनुसार, विक्रोळीतील कन्नमवार नगरात सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. हर्षदा तांदोलकर असे मृत तरुणीचे नाव आहे. मुंबईत सोमवारी मुसळधार पाऊस सुरू असताना तिने 22 व्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे स्पष्ट झाले नाही. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय हर्षदा तांदोलकरने इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर घटनास्थळावरील दृश्य अंगाचा थरकाप उडवणारे होते. कन्नमवार नगरातील इमारत क्रमांक 97 मध्ये ही घटना घडली. एवढ्या उंचीवरून उडी मारल्यामुळे तरुणीच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. यामुळे घटनास्थळी रक्तामांसाचा सडा पडला होता. परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हर्षदा तांदोलकरने 22 व्या मजल्यावरून उडी मारून टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण एका पोलिस अधिकाऱ्याने तिने तणावातून हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे. हर्षदाने बहुजमली इमारतीवरून उडी मारली. त्यानंतर ती खाली उभ्या करण्यात आलेल्या एका दुचाकीवर कोसळली. यामुळे तिच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते, असे ते म्हणाले.

अजित दादांनी कारवाई केली आता एकनाथ शिंदेंनी कारवाई करावी

राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट (Siddhant Shirsat) यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. संबंधित महिलेने आरोप केला आहे की, सिद्धांत शिरसाट यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. या प्रकरणात ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या माध्यमातून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून, सिद्धांत शिरसाट यांच्यावर मानसिक व शारीरिक छळ, फसवणूक, धमकी तसेच हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, मला अतिशय शॉक बसला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, सगळे राजकारणी कुठल्या थराला जातायत. याप्रकरणी मुलीचे स्टेटमेंट आहे की, सिद्धांत शिरसाट यांनी खूप धमक्या दिल्यात. स्वतःच्या डोक्याला बंदूक लावून आत्महत्या करेन, ब्लेडने स्वतःला कापून घेईल, असा मानसिक छळ करून तिला लग्नाला लावले. त्यानंतर माझे वडील कॅबिनेट मंत्री होणार आहेत. त्यामुळे तुला घेऊन जाऊ शकत नाही, असे म्हटले. सोबतच तू आमचे काहीही वाकडे करू शकणार नाहीस, अशी धमकी दिली. हे सगळे खूप गंभीर आणि शॉकिंगय. संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन हा विषय मांडावा, असे आवाहनही त्यांनी केले. शिरसाटांनी स्वतः पुढाकार घेतला नाही, तर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा आम्ही त्यांना कारवाई करायला भाग पाडू. मुलीवर दबाव कसा आणला, तिला नांदवायला संभाजीनगरला घेऊन जाऊ शकत नाही, या सगळ्या विषयावर शिंदे आणि शिरसाट या दोघांनी बोलावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारे गुन्हेगारीला प्रोत्साहन दिले जात असेल किंवा लोकप्रतिनिधी अशा प्रकारे सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर लेकीबाळीवर हात टाकत असतील तर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. भाजपने संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी जी तत्परता दाखवली होती. ती शिरसाट यांच्या राजीनाम्यासाठी दाखवली जाणार का? आपल्या बापाच्या सत्तेचा गैरफायदा घेत हे प्रकरण दाबण्याचा आणि त्या महिलेवर अन्याय करण्याची जी ताकद आहे, ती सत्तेतून आली आहे. त्यामुळे फडणवीस ही सत्ता काढून घेण्याची हिंमत दाखवणार का? हा खरा प्रश्न आहे, असे अंधारे यांनी म्हटले आहे. मी पीडितेची भेट घेऊन हा मुद्दा लावून धरणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. एका महिलेवर अन्याय होत असेल आणि तिने तशी तक्रार केली असेल, तर त्यावर रीतसर कारवाई होणे आवश्यक आहे. राजकीय दबावापोटी तक्रारीकडे दुर्लक्ष करून गुन्हा न दाखल करून घेणे हे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणी थेट महिला आयोगावर टीका केली आहे. जलील म्हणाले की, दुर्दैव याचे वाटते की, एका मंत्राच्या मुलाने तिसरे लग्न केले आणि ज्या मुलीशी लग्न केले त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे. मग सगळे लोक गप्प का आहेत? राज्याचा महिला आयोग का गप्प आहे? आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना आमची हात जोडून विनंती आहे की, ताई ती मुलगी मुंबईमध्येच राहते. तिला जाऊन भेटा आणि तिला न्याय द्या.