पुणे -क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केन्द्राचे अत्यंत प्रतिष्ठेचे असलेले या वर्षीचे एम.ए. कथक मधील सुवर्णपदक अरुंधती जितेन्द्र अभ्यंकर हिने प्राप्त केले. गेल्या एक तपाहून जास्त काळ अरुंधती कथकचे शास्त्रीय शिक्षण तिची गुरू तेजस्विनी साठे यांच्याकडे घेत आहे. नुकतेच पुणे विद्यापीठाचे एम.ए.चे निकाल जाहीर झाले. त्यात अरुंधतीने प्रथम क्रमांक पटकावला. तिला 9.06 CGPA मिळाले. 9 च्या वर CGPA मिळवणारी या वर्षीच्या संपूर्ण एम.ए. कथकच्या बॅचमधील अरुंधती अभ्यंकर ही एकमेव विद्यार्थिनी आहे.
अरुंधतीचे लहानपणापासून कथकवर असलेले प्रेम, त्यात पारंगत होण्यासाठी तिने केलेली सातत्यपूर्ण मेहनत, तिची गुरूवर असणारी निस्सीम श्रध्दा व आदर, उत्तम गुरूभगिनी व सहनृत्यांगना, या सगळ्याचे तिला मिळालेले हे फळ आहे. अरुंधतीने संस्कृत विषयात पदवी प्राप्त केली असून आजपर्यंत अनेक नृत्यस्पर्धांमधे तिने पारितोषिके मिळवली आहेत.
अरुंधती जितेन्द्र अभ्यंकर सुवर्णपदकाची मानकरी
स्वित्झर्लंडमध्ये आजपासून बुरखा घालण्यावर बंदी:कायदा मोडल्यास 96 हजारांचा दंड
असे करणारा 7वा युरोपीय देश
बर्न-आजपासून स्वित्झर्लंडमध्ये महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब, बुरखा किंवा इतर कोणत्याही साधनाने चेहरा झाकण्यावर बंदी लागू केली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, या कायद्याचे उल्लंघन केल्यास 1000 स्विस फ्रँक्स म्हणजेच अंदाजे 96 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.2021 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या सार्वमतामध्ये 51.21% नागरिकांनी बुरख्यावर बंदी घालण्याच्या बाजूने मतदान केले. यानंतर बुरख्यावरील बंदीबाबत कायदा करण्यात आला, जो आजपासून म्हणजेच 1 जानेवारी 2025 (नवीन वर्ष) पासून सुरू होत आहे.
स्वित्झर्लंडपूर्वी बेल्जियम, फ्रान्स, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, नेदरलँड आणि बल्गेरियामध्येही याबाबत कायदे करण्यात आले आहेत. या कायद्यानंतर सार्वजनिक कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, रेस्टॉरंट, दुकाने आदी सार्वजनिक ठिकाणी महिलांना चेहरा पूर्णपणे झाकता येणार नाही.2022 मध्ये राष्ट्रीय परिषदेने, स्विस संसदेचे कनिष्ठ सभागृह, चेहरा झाकण्यावर बंदी घालण्याच्या कायद्यावर मतदान केले. या कालावधीत 151 सदस्यांनी बाजूने तर 29 सदस्यांनी विरोधात मतदान केले. त्यानंतर याबाबत कायदा करण्यात आला.हा प्रस्ताव उजव्या विचारसरणीच्या स्विस पीपल्स पार्टीने (एसव्हीपी) मांडला होता, तर केंद्र आणि ग्रीन्स पक्ष याच्या विरोधात होते. काही लोकांचे म्हणणे आहे की हा कायदा मुस्लिम महिलांना अन्यायकारकपणे लक्ष्य करतो. या कायद्याचे समर्थन करणारे दावा करतात की, सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक मूल्य आणि सुरक्षिततेसाठी हे एक आवश्यक पाऊल आहे.
शरद पवार आमचे दैवत, त्यांच्याविषयी मनामध्ये आस्था:पवार कुटुंब एकत्र आल्यास गैर नाही, प्रफुल्ल पटेलांच्या विधानाने खळबळ
माझी छाती फाडली तर साहेबच दिसतील – झिरवाळ
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी देखील शरद पवारांबाबत मोठे विधान केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा एकदा त्यांची शरद पवार यांच्यावर असलेली निष्ठा व्यक्त करून दाखवली आहे. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील. तर माझ्या छातीत तुम्हाला शरद पवार साहेबच दिसतील, असे झिरवाळ म्हणाले. आता शरद पवार यांच्यासमोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार, असेही ते म्हणाले. मी पाडुंरंगाच्या शेजारी पवारसाहेबांना पाहतो. साहेब निश्चित विचार करतील, असा विश्वासही झिरवाळ यांनी व्यक्त केला.
मुंबई-शरद पवार आणि अजित पवार आगामी काळात एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण अजित पवारांच्या गटातील अनेक नेत्यांची तशी विधाने समोर येत आहेत. शिवाय अजित पवार यांच्या मातोश्रींनीही देखील पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत भावना व्यक्त केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील याबाबत मोठे विधान केले आहे. पवार कुटुंबीय एकत्र आले, तर त्यात काही गैर नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणालेत.
जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार काही आमदारांना सोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. शरद पवारांच्या वाढदिवसादिवशी अजित पवार हे शरद पवारांच्या घरी पोहोचले होते. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली होती. तेव्हापासून हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा वाढल्या आहेत. त्यात आज प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार हे आमचे दैवत आहेत. काही राजकीय कारणांवरून आम्ही वेगळे जरी झालो असलो तरी मात्र त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये आजही आस्था असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. भविष्यात सुद्धा पवार कुटुंबीय एकत्रच आले, तर यात काही गैर नाही. कारण मी सुद्धा स्वतःलाच पवार कुटुंबाचा एक सदस्य समजतो आणि पवार कुटुंब एकत्र यावे, अशी माझी सुद्धा इच्छा असल्याचे ते म्हणाले.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सुद्धा त्यांना भेटायला गेलो होतो. अनेकांनी राजकीय तर्कवितर्क लावले. त्यांच्या बरोबरचे संबंध आम्हाला आजही टिकवायचे आहेत, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

पवार कुटुंब एकत्रित गुणा गोविंदाने नांदू दे
अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी नवीन वर्षानिमित्त पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा पवार कुटुंब एकत्रित गुणा गोविंदाने नांदू दे, असे साकडे आपण पांडुरंगाला घातले असल्याचे आशा पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आईने देखील काही दिवसांपूर्वी पवार कुटुंबातील वाद मिटण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. कुटुंबातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र राहणे ही काळाची गरज असल्याचे रोहित पवार यांच्या आईने म्हटले होते.
एमआयटी सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवाचा पं. उपेन्द्र भट यांच्या सुमधुर गायनाने समारोप
पुणे, दि. १ जानेवारी : विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे लोणी काळभोर येथील विश्वराज बंधारा, विश्वशांती गुरूकुल, राजबाग येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सावाचा समारोप पं. उपेंद्र भट यांच्या सुमधुर गायनाने झाला.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, प्रा.स्वाती कराड चाटे, डॉ. सुचित्रा कराड नागरे, प्रा. सुनीता कराड, डॉ. संजय उपाध्ये, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा उपस्थित होते.
३१ डिसेबर रोजी झालेल्य‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ च्या समारोप प्रसंगी मध्यरात्री १२ वा. त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्प सारख्या दुर्गुणांची आहुती देण्यात आली. पुढील २०२५ वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” नववर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्यातील अवगुणांची आहुती देऊन उद्यापासून शांतीमय जीवन प्रत्येकाने जगावे. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात श्रेष्ठ संस्कृती आहे. याचे अनुकरण करून आपल्या आयुष्याची वाटचाल करावी. तरुणांनी स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वत्व जागवून खर्या अर्थाने भारतीय अस्मिता जागविण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न करीत आहोत.”
या संगीत महोत्सावात विश्वशांती संगीत कला अकादमीच्या नृत्यशिक्षिका आदिती रिसवाडकर यांनी कथ्थक नृत्य सादर केले. त्यानंतर एमआयटी एडीटीयूच्या विद्यार्थ्यांनी संथाल लोकनृत्य सादर केले. विश्वशांती संगीत कला अकादमीचे विद्यार्थी व प्रा. अंकित गुप्ता यांचा भक्ती संगीत व हिंदी चित्रपटांचे सुवर्णकाळ त्यावर आधारित संगीतमय कार्यक्रम झाला. प्रा. शशांक दिवेकर यांचे सुगम संगीत गायन, वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध गायिका गोदावरीताई मुंडे यांचे गायन झाले. सरतेशेवटी पं. उपेन्द्र भट यांच्या सुमधूर गायनाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.
प्रा. स्वाती कराड चाटे यांनी सर्वांना नव वर्षाच्या शुभेच्छा देऊन आभार मानले.
साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ करणार प्रकाशकांशी चर्चा
पुणे : सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पुण्यातील संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि. 2 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. संपर्क कार्यालय महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड येथे सुरू करण्यात येत आहे. संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार असून प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी तर डॉ. सतिश देसाई पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी मुरलीधर मोहोळ प्रकाशकांचीही भेट घेणार आहेत, अशी माहिती सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
संमेलनाच्या सरकार्यवाहपदी नेमणूक केल्याबद्दलचे पत्र मंत्री मोहोळ यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांच्या हस्ते या वेळी देण्यात येणार आहे. तसेच पुणे शहरातील सांस्कृतिक घडामोडींचे नियमित वृत्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा सत्कार या प्रसंगी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांपुढे 11 कुख्यात नक्षली शरण:8 महिला, 3 पुरुष नक्षल्यांनी टाकली शस्त्रे,कुख्यात भूपतीच्या पत्नी ताराक्काही शरण
सर्वांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी भरघोस आर्थिक मदत–महाराष्ट्रातील माओवाद्यांची भरती पूर्णतः बंद
गडचिरोली -गडचिरोली जिल्ह्यातील 11 कुख्यात नक्षलवाद्यांनी बुधवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. या नक्षलवाद्यांच्या शिरावर लाखोंचे बक्षीस होते. पण आता त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या पुनर्वसनासाठी काही आर्थिक मदतही घोषित केली आहे.
गडचिरोली येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात मागील 38 वर्षांपासून नक्षली चळवळीत सक्रीय असणाऱ्या ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे शस्त्रे टाकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे भारतीय संविधान देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी आज दिवसभर गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. त्यात अनेक महत्त्वाचे कार्यक्रम झाले. सी 60 च्या अधिकाऱ्यांनी सातत्याने विविध चकमकींत शौर्य दाखवत आपले शौर्य दाखवले. त्यांनी अनेक माओवाद्यांना निशस्त्र करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.
पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद संपवण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे. उत्तर गडचिरोली आता माओवाद्यांपासून मुक्त झाली आहे. दक्षिण गडचिरोलीही लवकरच माओवाद्यांपासून मुक्त होईल याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. पोलिसांनी येथे राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे मागील 4-5 वर्षांत येथील एकही तरुण माओवादी संघटनेत भरती झाला नाही. किंबहुना महाराष्ट्रात माओवाद्यांची भरती पूर्णतः संपुष्टात आली आहे. हे सर्वकाही पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून घडले असून, हे एक अत्यंत मोलाचे कार्य आहे.
जनतेचा विश्वास माओवाद्यांवर नाही तर प्रशासनावर, राज्यावर, देशावर व आपल्या संविधानावर वाढत आहे याचे द्योतक आहे. त्यामुळे आता कुणीही संविधान विरोधी चळवळीत जायला तयार नाही हे यातून स्पष्ट होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पोलिसांनी अनेक जहाल माओवाद्यांना कंठस्नान घातले. अनेक नक्षलवादी शरण येत आहेत. त्यामुळे नक्षलवादाचे कंबरडे मोडले आहे. आजही जे आत्मसमर्पण झालेत, त्यात 38 वर्षांपासून नक्षली चळवळीत सक्रीय असणाऱ्या ताराक्काचाही समावेश आहे. ताराक्का या भूपतीच्या पत्नी आहेत. गडचिरोलीत नक्षलवाद रुजवण्यात अग्रणी असणाऱ्या लोक आता पोलिस प्रशासनाला शरण येऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहेत. आज त्यांच्यासह 11 जणांनी आत्मसमर्पण केले.
आज माओवाद हा कोणताही विचार नाही, कोणताही आचार नाही. तो केवळ भारतीय व्यवस्थेवर आमच्या संविधानावर विश्वास नाही अशा प्रकारच्या मंडळींनी अराजकता निर्माण करण्यासाठी हे अभियान उभारले. सुरुवातीच्या काळात काही लोक भरकटले. पण आज जे लोक या चळवळीत सहभागी आहेत, त्यांच्या लक्षात येत आहे की, न्याय हा भारतीय संविधान व त्यातून अस्तित्त्वात आलेल्या संविधानातूनच मिळेल. आज विकास होत आहे, तसतसा माओवादाची पिछेहाट होत आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातून माओवाद पूर्णपणे हद्दपार झाल्याचे दिसून येईल.
2025 च्या पहिल्या दिवशी एक नवीन पहाट उगवली आहे. एक नवीन सूर्य उगवला आहे. हा सूर्य असाच पुढे गेला पाहिजे. आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी आता सन्मार्गावर आलेत. सरकार त्यांचे पूर्ण पुनर्वसन केल्याशिवाय थांबणार नाही. त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांना खरा मार्ग हा भारतीय संविधानाचा असल्याचे पटवून द्यावे. त्यांना संविधान स्वीकारण्यास प्रवृत्त करावे, असेही मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.
बावधन मध्ये उपटपाल कार्यालय सुरु
पुणे- शहरातील बावधन परिसरातील वाढते नागरीकरण व त्या भागातील नागरिकांच्या वाढत्या मागणीस प्रतिसाद देऊन भारतीय टपाल खात्यातर्फे बावधन मध्ये नवीन उपटपाल कार्यालय सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणी गोवा परिमंडळाचे चीफ पोस्टमास्टर जनरल अमिताभसिंग यांच्या हस्ते पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने रिमोटची कळ दाबून बावधन उपटपाल कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी पुणे क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये, डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस सिमरन कौर व पुणे शहर पश्चिम विभागाच्या प्रवराधीक्षक रिप्पन डुल्लेट आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन बावधन उप टपाल कार्यालयाचा पिनकोड ४११०७१ असून बावधन ब्रांच टपाल कार्यालयाचे नवीन बावधन उपटपाल कार्यालयामध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे.
नवीन बावधन उपटपाल कार्यालयात इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते, महिला सम्मान बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजना व इतरही पोस्ट ऑफिस बचत बँकेच्या योजना यांचा लाभ घेता येणार आहे. तसेच स्पीड पोस्ट, ई –बुकिंग, पार्सल इत्यादी बुकिंग सुविधेसह आधार नोंदणी व अद्यतन सेवा ही उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे. या कार्यालयाची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ असून सेव्हिंग बँक व इतर काउंटरच्या कामकाजाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत.
या पूर्वी आर्मामेंट उपटपाल कार्यालयास (४११०२१) जोडलेला भाग म्हणजेच शिंदे नगर, कोकाटे वस्ती, पाटील नगर, गुंडे वस्ती, देशमुख नगर, विज्ञान नगर, आमची कॉलोनी, बांदल ईस्टेट, बावधन बु/खुर्द, डी.एस.के. रानवारा, बालाजी सोलानी सो., बावधन पोलीस चौकी, वैकुंठ भूमी, सूर्यदत्ता कॉलेज, पुराणिक सो., चेलाराम हॉस्पिटल, ई. भाग आता नवीन बावधन टपाल कार्यालयाला जोडण्यात आलेला आहे.
तरी या भागात राहणाऱ्या नागरिकांनी बावधन टपाल कार्यालयास भेट देऊन आपल्या भागाचा पिनकोड तपासून घ्यावा व आपल्या संबंधिताना नवीन पिनकोड कळवावा जेणेकरून नागरिकांना येणारे टपाल विनाविलंब पोहचू शकेल, असे आवाहन करण्यात येत आहे.
टपाल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच बावधन भागातील नागरिक मोठ्या संख्येने बावधन टपाल कार्यालयात उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
सशक्त भारताकरिता सिंहगड रस्त्यावर दारु सोडा, दूध प्या अभियान
जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्, सिंहगड रोड पोलीस स्टेशन तर्फे आयोजन
पुणे : अर्थ आणू जीवनाला, विसरुन जावू मद्यपानाला…मद्य करते बुद्धी भ्रष्ट, का करता जीवन नष्ट…सशक्त भारताचा एकच नारा, मद्यपानाला देऊ नका थारा…अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून सशक्त भारताकरिता दारु सोडा, दूध प्या असा संदेश देण्यात आला. सिंहगड रस्त्यावर पोलीस अधिका-यांसह, महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यसनाधिनतेच्या विळख्यात अडकत चालेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरिता पुढाकार घेत दूध वाटप केले.
सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट्स, सिंहगड रोड पोलीस स्टेशन तर्फे दारु सोडा, दूध प्या अभियान राबविण्यात आले. यावेळी सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दायगडे, हवेली पंचायत समिती माजी सभापती प्रभावती भूमकर, निलेश गिरमे, हरिदास चरवड, श्रीकांत सावंत, सारंग नवले, शिवा पासलकर, राणी डफळ, यशवंत मानखेडकर, एकनाथ भूमकर, सुरेश परकड, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर म्हणाले, तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्या वर्षाचे स्वागत केले पाहिजे. व्यसनांमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत, त्यामुळे याविरोधात जनजागृती करण्यात आली. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यधुंद होऊन व्यसनाच्या विळख्यात अडकतात. मद्यपान करून भरधाव वेगाने गाडी चालविल्यामुळे अनेक अपघात देखील होतात. नव्या वर्षाच्या सुरूवातीला असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारू नको दूध घ्या हा उपक्रम आवश्यक आहे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, देशाची युवा पिढी निरोगी असेल तर देशाचा अधिक विकास होतो. आपल्या देशाला महासत्ता बनवायचे असेल तर तरुणांनी निरोगी असले पाहिजे. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्यावर्षाचे स्वागत केले पाहिजे. नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे, याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.
“कार्यकर्त्यांनी त्यांच्यातला “कार्य” “कर्ता” जिवंत आणि जागता ठेवावा – संदीप खर्डेकर”.
“ग्लोबल ग्रुप आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने दुर्गम भागातील शाळेत जर्किन भेट”

पुणे-कार्यकर्त्यांनी त्यांच्यातला “कार्य” “कर्ता” जिवंत आणि जागता ठेवावा असे आवाहन क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केले आहे. आता काळ बदललाय,सध्या अनेक धनाढ्य व्यक्ती विविध माध्यमातून समाजात मदत कार्य करत आहेत, काही इव्हेन्ट च्या माध्यमातून तर काही जण सी एस आर मधून उपक्रम राबवितात असे सांगतानाच संदीप खर्डेकर म्हणाले की ” ही दानशूरता स्वागतार्ह असली तरी यामुळे समाजात काम करणारे कार्यकर्ते निष्क्रिय होण्याचा धोका दिसतोय.
म्हणून कार्यकर्त्यांनी पूर्वीप्रमाणेच गंगाजळीतून पै पै गोळा करूनच समाजकारण सुरु ठेवावे, पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही अगदी अकरा रुपये ते एकशे एक रुपये गोळा करून गरजूना मदत करायचो, आता कैक पटीने देणारे हात आहेत, पण जुन्या काळातील ही कष्टाने पैसे गोळा करायची सवय मोडू नका, हाच नववर्षाचा संकल्प करा असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
नववर्षाचे स्वागत करताना भोर जवळील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वाढाणे आणि करंदी गावातील येसाजी कंक विद्यालयातील 80 विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रूप च्या वतीने जर्किन भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,शिक्षण समितीच्या अध्यक्षा माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर, सौ. कल्याणी खर्डेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. खटाटे, उत्साहाने शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक कामात पुढाकार घेणार शिक्षक सोपान शिंदे इ उपस्थित होते.
ह्या शाळेत बहुतांश प्रकल्पग्रस्त नागरिकांची मुलं शिकत असून बहुतांश नागरिक हे मुंबईला कुल्फी विक्रीचा व्यवसाय करतात, तरीही जिद्दीने येथे मुलं शिक्षण घेतात म्हणून आम्ही ह्या शाळेला मदत करण्याचा निर्धार केला असे मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.तसेच विद्यार्थ्यांनी आणि विशेष करून मुलींनी कोणत्याही कारणास्तव अर्ध्यावर शिक्षण सोडू नये, त्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपली स्वप्न पूर्ण करावीत, त्यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन सर्वतोपरी मदत करेल असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.ह्यापूर्वी शाळेला कपाटांची मदत केली होती आता येणाऱ्या शैक्षणिक वर्षात छत्र्या आणि बुटांची मदत देखील करू असे ग्लोबल ग्रूप चे संचालक संजीव अरोरा व मनोज हिंगोरानी म्हणाले.
सोपान शिंदे सरांनी सूत्रसंचालन केले तर मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले.
प्रतीक खर्डेकर व कल्याणी खर्डेकर यांनी संयोजन केले.
विशाल भेलके यांनी आभार प्रदर्शन केले.
महापालिका व पीएमपीएमएल ‘निवृत सेवकांना’ ७ व्या आयोग फरकाची रक्कम सत्वर द्या- अन्यथा उपोषण-आंदोलन – इंटक कामगार नेते गोपाळदादा तिवारी
पुणे-मनपा निवृत्त सेवकांना ७ व्या वेतन आयोगाच्या ‘फरकाच्या देणे रकमे पैकी’, तब्बल ३ वर्षात तीन हप्ते मिळाले, मात्र ४था व ५ वा हप्ता मिळणे अद्याप बाकी आहे.वास्तविक शासन आदेश (प्र. क. १८७ / नवि २२ / १६-०९-२०२१) व पुणे मनपा मुख्य सभा ठराव (क्र २५७ – १०-०३-२१) बघीतल्यास.. ‘दोन वर्षात अथवा मनपा आर्थिक स्थिती नुसार वा ३ हप्त्यात’ देणे बाबत निर्देश असतांना ही, वेतन आयोग फरक देण्यात पुणे मनपा प्रशासनाची दिरंगाई का.(?) असा प्रश्न करीत, सेवानिवृत्त सेवकांना तातडीने फरकाची रक्कम देण्याची विनंती वजा मागणी काँग्रेस नेते व इंटक कामगार संघटनेचे सल्लागार गोपाळदादा तिवारी यांनी आयुक्त श्रीराजेंद्र भोसले यांच्कयाडे केली आहे .
अन्यथा कामगार संघटने सह उपोषण – आंदोलन करावे लागेल, असा इशारा ही पत्रकारांसोबत बोलतांना त्यांनी दिला.
या प्रसंगी पुणे मनपा निवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष जयंत (बापू) पवार, कार्याध्यक्ष संजीव मोरे, उपाध्यक्ष राजे भोसले व पदाधिकारी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की,पुणे मनपा निवृत सेवकांनी’ संयमाने व अडचणी सोसून ‘तीन हप्त्या मध्ये’ वेतन फरकाची रक्कम स्वीकारली आहे.ते म्हणाले की, वास्तविक, शासन आदेश व ठराव हे रक्कम देण्यासाठी पृष्टी देणारे असतील तर फरक सत्वर देणे बाबत आयुक्त यांनी आश्वासित ही केले होते.मात्र लेखापालां कडून कार्यालयीन कार्यवाही बाबत दिशाभूल व असह्य दिरंगाई होत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ‘पुणे महानगरपालिके’चे वेगळे स्थान असून सांस्कृतिक राजधानी व ऐतिहासिक शहर म्हणून गणना होते. ‘पुणे मनपा प्रशासनाने कार्यक्षमतेच्या स्पर्धेत विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. स्वाइन फ्लू ,कोरोना साथीच्या काळात पुणे मनपा’च्या सर्व श्रेणीतील अधिकारी ते कनिष्ठ सेवकांनी तसेच पीमपीमएल सेवकांनी जोखीम घेऊन सेवा दिलेली आहे. पीमपीमएल निवृत्त-सेवकांना ही फरकाची रक्कम पूर्ण मिळालेली नसून, ‘पीएमपीएमएल’चे उत्तरदाईत्व देखील मनपा’कडे असल्याने त्यांचे बाबतीत ही सत्वर व सकारात्मक निर्णय बाबत PMPML चे ‘पदसिद्ध संचालक’ नात्याने आयुक्त यांनी लक्ष घालण्याची मागणी केली.
एकीकडे पुणे मनपा’चे महसुली जमा रक्कम सु २०० कोटी हे बँकेत मुदत_ठेव म्हणून ठेवले जातात, मात्र उतार वयात, सेवा-निवृतांना आधार असलेले ‘हक्काचे पैसे’ वेळेत मिळत नाही, हे योग्य नाही, निवृत्ती नंतर ‘फरकाच्या रक्कमे’ची वाट पाहत सुमारे ३५ % सेवकांचे निधन झाले, याकडे ही लक्ष वेधले. सेवानिवृत्तांच्या हयातीत गरजेच्या काळात, ‘हक्काची रक्कम मिळाल्यास, त्याचे महत्व आहे.या बाबत अधिक विलंब झाल्यास मनपा भवन बाहेर उपोषण – आंदोलन करू असा इशारा ही गोपाळदादा तिवारी यांनी दिला आहे.
महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन
पुणे दि. १ जानेवारी २०२५ : पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील वेहेरगाव-कार्ला नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असे हे देवीचे जागृत देवस्थान मानले जाते. आज १ जानेवारी २०२५ नवीन वर्षाची नव्याने सुरूवात करत शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आई एकविरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या भगिनी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी उपस्थित होत्या.
‘हे नवीन वर्ष महाराष्ट्रासह देशाला सुख समाधानाचे, शेतकऱ्यांना न्याय देणारे असावे. त्यासोबतच सर्वांना आरोग्य, सौख्य, यश आणि विजयलक्ष्मी प्राप्त व्हावी’, अशी प्रार्थना यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आई एकवीरा देवीच्या चरणी केली. त्यानंतर, 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे नेत्रदीपक यश महायुतीला मिळाले त्याबद्दल एकविरा मातेचे त्यांनी नवस फेडले आणि श्रीफळ व प्रसाद देऊन त्या नवसाची पूर्तता केली. तसेच डोंगरावरील देवी माता आणि पायथा मंदिर या दोन्ही देवी आईंना साडी-ओटीचा नैवेद्य देखील डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अर्पण केला.
देवी संस्थान असलेले हे पायथ्याशी असणारे एकविरा मातेचे पायथा मंदिर म्हणूनही ओळखले जाते. तिथे आज नवीन वर्षाच्या सुरूवातीला दर्शनासाठी आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी होती. परंतु या सर्व गर्दीमध्ये जनतेने खूप चांगले सहकार्य देऊन अतिशय प्रेमाने डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. लोणावळा पोलिसांनी अगदी चोख व्यवस्था केलेली, असं मतही डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी याठिकाणी व्यक्त केले.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. मधुकर पडवळ, उद्योजक श्री. अशोक पडवळ, पोलीस पाटील श्री. अनिल पडवळ, मंदिर व्यवस्थापक श्री. संतोष देवकर, पुजारी श्री. तेजस तात्या खिरे आणि मा. सरपंच श्री. दत्तात्रय मारुती पडवळ उपस्थित होते.
मोशी येथे रविवारी इंद्रायणी साहित्य संमेलन
श्रीपाल सबनीस उद्घाटक, दादाभाऊ गावडे संमेलनाध्यक्ष तर वंदना आल्हाट स्वागताध्यक्ष
रामदास काकडे यांच्या हस्ते भूमिपुत्र पुरस्कार वितरण सोहळा
पिंपरी, पुणे (दि. १ जानेवारी २०२५) मोशी येथे इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी (दि.५ जानेवारी २०२५) सकाळी आठ वाजता, देहू आळंदी रस्त्यावरील कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी, जय गणेश बँक्वेट हॉल, मोशी येथे होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे संमेलनाध्यक्ष पद भूषवणार आहेत. तर स्वागत अध्यक्ष म्हणून वंदना हिरामण आल्हाट यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, सचिव रामभाऊ सासवडे आणि निमंत्रण अरुण बोऱ्हाडे यांनी दिली.
बुधवारी मोशी नागेश्वर मंदिर, येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष डॉ. सीमा काळभोर, कार्याध्यक्ष सोपान खुडे, सदस्य डॉ. पौर्णिमा कोल्हे, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर व इतर सदस्य उपस्थित होते.
उद्घाटनापूर्वी श्री नागेश्वर महाराज मंदिर ते कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी (संमेलन स्थळ) पर्यंत सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य ॲड. माधवी निगडे यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनास संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. शिवाजीराव मोहिते, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहक सुनिताराजे पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. अरुण दातार, आमदार महेश दादा लांडगे, आमदार बाबाजी काळे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते अक्षर इंद्रायणी या स्मरणिकेचे आणि काल भवताल या कथासंग्रहाचे श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच इंद्रायणी साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार डॉ. श्रीपाल सबनीस यांना प्रदान करण्यात येणार आहे. आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते “स्वातंत्र्यसंग्रामातील समिधा” या क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी दहा वाजता “ज्ञानेश्वरी – काळाची गरज” या परिषदेचे उद्घाटन डॉ. आरती दातार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या परिसंवादात संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक हभप डॉ. नारायण महाराज जाधव, हभप ॲड. यशोधन महाराज साखरे, योगी निरंजनाथ गुरु शांतिनथ, ज्ञानेश्वरीचे ज्येष्ठ अभ्यासक रामदास जैद आदी सहभाग घेणार आहेत. या परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले तर समन्वयक म्हणून डॉ. सीमा काळभोर काम आहे.
दुपारी दोन वाजता संमेलनाध्यक्ष दादाभाऊ जयवंत गावडे यांची ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे प्रकट मुलाखत घेणार आहेत. दुपारी तीन वाजता, डॉ. सदानंद मोरे यांची संदीप तापकीर प्रकट मुलाखत घेणार आहेत. सायंकाळी पाच वाजता “दुर्ग भटकंती” या अरुण बोराडे यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. माधवराव सानप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर समारोप सत्रात ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे यांच्या हस्ते भूमिपुत्र पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड अध्यक्ष राजन लाखे, सूत्रसंचालक श्रीकांत चौगुले आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी वैद्यकीय सेवा डॉ. अनिल कुमार रोडे, प्रशासन सेवा कार्य संजय गोपाळ शिंदे, इतिहास संशोधन दत्तात्रय दगडू फुगे, अग्निशमन सेवा कार्य सुनील तानाजी गिलबिले, प्रशासकीय सेवा परीक्षा स्मिता प्रतीक थोरवे, प्रो कबड्डी खेळाडू अनुज काळूराम गावडे, वैद्यकीय संशोधन कार्य डॉ. मधुरा मल्हारी काळभोर, युवा कीर्तनकार हभप विठ्ठल महाराज गवळी, हभप संग्राम बापू भंडारे, हभप मंगेश महाराज सावंत, साहित्य व समाजसेवा दत्तात्रय विघ्नहर अत्रे, सीए परीक्षा उत्तीर्ण सम्यक राहुल धोका आणि सिद्धांत राहुल धोका आदींना “भूमिपुत्र पुरस्कार २०२४” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सायंकाळी ७:३० वाजता, शिवांजली साहित्य परिषदेचे प्रवर्तक शिवाजीराव चाळक यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, संतोष घुले, समन्वयक डॉ. पौर्णिमा कोल्हे आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
नापीक होणाऱ्या जमिनी वाचवण्यासाठी देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती उपयुक्त
गोसेवा क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन ; देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती तालुका निहाय प्रशिक्षण पुण्यात
पुणे : भारतीय कृषी व्यवस्थेत देशी गोवंशाचे महत्व अनन्यसाधारण आहे. भूमी सोपोषणासाठी देशी गोवंश अत्यंत उपयुक्त असून नैसर्गिक शेती उत्पादक अनेक शेतकरी आपल्याकडे आहेत. त्यांच्यासह सर्वच शेतकरी वर्गापर्यंत देशी गोवंश नैसर्गिक शेती व रासायनिक शेती याचा तुलनात्मक फरक सांगून देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती उपयुक्त असल्याचे मार्गदर्शन गोसेवा क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले.
महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय विशेष उपक्रम अंतर्गत देशी गोवंश आधारित नैसर्गिक (रसायन मुक्त) शेती प्रशिक्षण क्रमांक १ तालुका हवेली – जिल्हा पुणे चे आयोजन शुक्रवार पेठेतील भारत भवन देशपांडे टूटोरियल्स हॉल येथे करण्यात आले होते. यामध्ये ५० हून अधिक शेतकरी व स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
उद्घाटनप्रसंगी गोसेवा आयोग सदस्य डॉ. नितीन मार्कंडेय, विश्व हिंदू परिषद गो रक्षा विभाग प्रांत संयोजक महेंद्र देवी, पशधुन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. प्रकाश काळे, राष्ट्रीय कर्तव्य अभियान महाराष्ट्र मुख्य संयोजक विजय वरुडकर, ग्राम विकास प्रमुख विनय कानडे, कृषी तज्ञ जगन्नाथ तात्या मगर, डॉ. संतोष चव्हाण, विश्व हिंदू परिषद गो रक्षा विभाग सह संयोजक कौस्तुभ देशपांडे, विजया घुले, हेमंत निम्हण, संतोष लाटणेकर, नंदकुमार भोपे, नाना नलगे आदी गो कृषी विषयात काम करणारे अभ्यासक उपस्थित होते.
विजय वरुडकर म्हणाले, जगभरात जमिनी नापीक होत आहेत. त्या वाचवण्यासाठी देशी गोवंश आधारित रसायन मुक्त शेती ची गरज आहे. गो सेवा आयोग व पशु संवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहयोगाने राज्यातील दहा जिल्ह्यात ११७ तालुक्यातून आम्ही देशी गोवंश आधारित रसायन मुक्त शेती प्रशिक्षण आयोजित करत आहोत. ज्यात किमान पाच हजार शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ नितिन मार्कंडेय यांनी सुदृढ देशी गो वंश जतन करण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशी गोवंश आधारित रसायन मुक्त शेती प्रसार व्हावा यासाठी राष्ट्रीय कर्तव्य अभियान द्वारे मोफत गो-कृपाआमृता चे वाटप करण्यात आले. या प्रशिक्षण अंतर्गत, बीज संस्कार पद्धती, भारतीय बीज बँक निर्मिती, माती परीक्षण व पाणी परीक्षण आवश्यकता, गांडूळ खत निर्मिती, नैसर्गिक खत बँक निर्मिती, गो कृपामृत निर्मिती पद्धत, बांधावरची प्रयोग शाळा,अशा अनेक विषयांवर शिबीरात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासकीय योजनांची माहिती देखील देण्यात आली.
या वेळी राष्ट्रीय कर्तव्य अभियान द्वारा आत्मनिर्भर गौ-ग्राम अभियान हा विशेष प्रकल्प सुरु असल्याची माहिती देण्यात आली. ज्ञानेश्वर शिंदे यांनी सूत्र संचालन तर सुनील बेनके यांनी आभार मानले. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहा द्वारे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
1 जानेवारी… एक ऐतिहासिक दिवस …
इतिहासात प्रत्येक दिवसाला एक महत्त्व असते ते त्या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक घटनांमुळे. या ऐतिहासिक घटनांचा परिणाम तत्कालीन समाजावर होतोच शिवाय भविष्यातही त्याची नोंद घेतली जाते. आज नवीन वर्षाचा पहिलाच दिवस. 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगावची लढाई झाली होती. या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला होता. तर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा आजच्या दिवशी सुरू केली होती. जगाच्या इतिहासात अजरामर घटना असलेली क्युबन क्रांतीदेखील आजच्या दिवशी घडली होती.
1664 : सुरतेच्या लुटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुरतमध्ये दाखल
मोगल सरदार शाहिस्तेखान सलग तीन वर्षे महाराष्ट्रात तळ ठोकून होता. त्यादरम्यान मराठा साम्राज्याला मिळणारा महसूल कमी होऊन राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्याला पुण्यातून हुसकावून लावल्यानंतर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी गुजरातमधील सुरत शहर सुरत शहर लुटण्याची योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली. सुरतेतील आर्थिक आणि भोवतीच्या सैनिकी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपला मुख्य हेर बहिर्जी नाईक याची नेमणूक केली. सुरतेची बित्तंबातमी काढून बहिर्जीने शिवाजी महाराजांची भेट घेतली व सुरतेवर हल्ला केला असता मोठा खजिना हातात येईल असे सांगितले. यावर मसलत करून महाराजांनी सुरतेवर चाल करून जाण्याचा बेत रचला. त्यासाठी 1 जानेवारी 1664 रोजी शिवाजी महाराज सुरतमध्ये दाखल झाले. त्यानंतर 5 जानेवारी 1664 रोजी आपल्या घोडदळासह सूरतेत थडकून शिवाजी महाराजांनी आपली मोहीम यशस्वी केली होती.
1818 : कोरेगाव भीमाच्या लढाईत पेशव्यांचा निर्णायक पराभव
महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांमध्ये ही लढाई झाली होती. भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त 500 सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या 25,000 सैन्याचा पराभव केला. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे सुमारे 500 महार जातीचे सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. तर मराठ्यांच्या बाजूने 25 हजाराच्या सुमारास सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करीत होते. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता
कॅप्टन फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या सैन्याने जवळजवळ 12 तास लढाई केली. मोठ्या ब्रिटीश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांच्या सैन्याने शेवटी माघार घेतली. ही लढाई इंग्रज-मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाचा भाग होती. या युद्धाच्या मालिकेने पेशव्यांची राजवट संपली. यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात पसरली गेली.पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महारांना,अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरूद्ध लढले असल्याचे म्हटले जाते. ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारला.
1848 : भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.
महात्मा जोतीबा फुले यांनी अहमदनगरमध्ये ख्रिस्ती मिशनरीं मार्फत चालवल्या जाणाऱ्या मुलींच्या शाळेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. तेव्हापासून भारतातील प्रथम महिला शिक्षिका म्हणून सावित्राबाई फुलेंचे नाव घेतले जाते.मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या या शाळेला सनातनी, कर्मठांनी जोरदार विरोध केला होता. मात्र, या विरोधाला न जुमानता शाळा सुरू राहिली. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40-45 पर्यंत जाऊन पोहोचली.
1862 : भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता लागू करण्यात आली
आजच्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 1862 रोजी भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता लागू करण्यात आली. त्याआधी 6 ऑक्टोबर 1860 रोजी त्याला मान्यता देण्यात आली होती. आयपीसी म्हणून प्रसिद्ध भारतीय दंड संहिता हा भारताचा प्राथमिक गुन्हेगारी कायदा आहे, जो गुन्हेगारी कायद्यातील प्रत्येक भौतिक बाबी विचारात घेतो. 1862 पासून या कायद्यात बर्याच वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. हे देशातील सर्व संभाव्य गुन्हे आणि त्यांच्याशी संबंधित शिक्षेची व्याख्या करते.
भीमा कोरेगाव युद्ध… अत्याचारी पेशवाई नष्ट करण्याचे होते ध्येय
भीमा कोरेगावचे युद्ध जरी पेशवा विरुद्ध इंग्रज असे झाले असले तरी इंग्रजांनी महार सैनिकांच्या बळावर हे युद्ध पुकारले होते. महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रजांच्या सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे साम्राज्य भारतात पसरवण्यासाठी नव्हे तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते, असे काही इतिहासकार म्हणतात. भीमा कोरेगावच्या या लढाईत ‘महार रेजिमेंट’ने इंग्रजांना विजय मिळवून दिला होता. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या लढाईत प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला. कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आहेत. याच स्तंभाला दरवर्षी दलित समाज अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
…डॉ. बाबासाहेबांनी दिली होती विजयस्तंभास भेट–1 जानेवारी 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या क्रांतीस्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली होती. त्या वर्षीचा स्मृतिदिन साजरा केला होता. आंबेडकरांच्या या मानवंदनेनंतर दरवर्षी 1 जानेवारीला मोठ्या संख्येने दलित समाज व आंबेडकर अनुयायी कोरेगावातील या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात. दरवर्षी मोठ्या उत्साहाने अनुयायी या विजस्थंभाला अभिवादनासाठी येत असतात.

पुण्याच्या जवळ असलेले भीमा कोरेगाव येथे दरवर्षी वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला हजारो दलित बांधव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात. 1818 साली झालेल्या युद्धात पेशव्यांवर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून येथे मोठा विजय स्तंभ उभारण्यात आला आहे. त्यावर महार बांधव ज्यांनी आपले बलिदान दिले त्यांची नावे यावर कोरली गेली आहेत. या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने दलित बांधव येथे जमतात.
2018 साली या युद्धाला 200 वर्ष पूर्ण झाली होती त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक येथे जमले होते. मात्र, या कार्यक्रमाला गालबोट लागले आणि हिंसक घटना घडल्या. या घटनांची सुरुवात भीमा कोरेगावजवळ असलेल्या पाबळ आणि शिक्रापूर येथून झाली. या गावांमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आणि यात एका तरुणाचा मृत्यू झाला. याचे पडसाद राज्यभर उमटले. या सगळ्या घटना तर आपल्याला माहीत आहेतच. पण काय आहे या सर्व घटनांमागचा इतिहास? कुठून होते याची सुरुवात?

इंग्रज विरुद्ध पेशवे युद्ध
1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये युद्ध झाले होते. या युद्धात इंग्रजांनी विजय मिळवला होता. इंग्रजांच्या या विजयाचा जल्लोष दलित समाज साजरा करतो, कारण इंग्रजांच्या या सैन्यात मोठ्या संख्येने महार समाजाचे सैनिक होते. त्यांना इंग्रजांनी सैनिकांचा दर्जा दिला होता. त्याकाळी आपल्याकडे महारांना अस्पृश्य मानले जात होते. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना सैन्यात संधी देणे हीच मोठी गोष्ट वाटत होती. समाजात होणारे अत्याचार आणि सवर्णांकडून होणारा रोजचा अपमान याला दलित समाज कंटाळला होता. अखेर इंग्रजांनी त्यांना संधी देत त्यांचा मराठ्यांविरोधात चपखल वापर केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.इंग्रजांनी भारतात आल्यानंतर आपल्याकडे असलेल्या जातीभेदाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. ‘फोड आणि राज्य करा’ हा त्यातूनच त्यांनी मार्ग निवडला होता. नेमके हेच त्यांना मराठा साम्राज्यात सुद्धा दिसून आले. इथे मराठा साम्राज्य असले तरी पेशवाईची राजवट आहे. त्यात दलितांना मान दिला जात नसल्याचे इंग्रजांना समजले. तसेच या पेशव्यांच्या विरोधात त्यांच्याच साम्राज्यात अनेक घटक आहेत, त्यांना एकत्र आणून इंग्रजांच्या सैन्यात भरती करून घेत त्यांच्याच राज्याच्या विरोधात लढाईत उतरवण्याचा मनसुबा इंग्रजांनी आखला आणि तो यशस्वी झाला.

दलित चळवळीच्या इतिहासातील महत्त्वाची लढाई
कोरेगावच्या युद्धात दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वात मराठ्यांचे 28 हजारांचे सैन्य सज्ज करण्यात आले होते. आक्रमणावेळी त्यांच्यासमोर इंग्रज सैन्याची कुमक असलेली तुकडी उभी ठाकली. या तुकडीत 800 सैनिकांचा समावेश होता. पेशव्यांनी कोरेगाव येथे असलेल्या इंग्रजांच्या सैन्यावर आक्रमण करण्यासाठी 2000 सैनिकांचा समावेश असलेली फौज पाठवली. फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वात इंग्रजांच्या सैन्याने 12 तास ही खिंड लढवली आणि पेशव्यांना माघार घेण्यास भाग पाडले. कारण त्याच वेळी जनरल जोसेफ स्मिथ यांच्या नेतृत्वाखालील मोठे सैन्य दाखल झाले तर युद्ध करणे अवघड जाईल म्हणून मराठा सैन्याने परतण्याचा निर्णय घेतला. या लढाईत इंग्रजांच्या सैन्यात भारतीय वंशाचे काही सैनिक होते. यात बहुतांश महार समाजाचे होते. त्यामुळेच ही लढाई दलित समाजाकडून दलित चळवळीच्या इतिहासातील महत्त्वाची मानली जाते.
500 महार सैनिकांनी 25 हजार मराठ्यांना रोखले
‘अ हिस्टरी ऑफ द मराठाज’ या पुस्तकात जेम्स ग्रांट डफ यांनी या लढाईचा उल्लेख केला आहे. रात्रभर चाललेल्या लढाईनंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला सकाळी दहा वाजता ईस्ट इंडिया कंपनीचे अर्थात इंग्रजांचे सैन्य भीमा नदीच्या किनाऱ्यावर पोहचल्याची नोंद आहे. 500 महार सौनिकांनी तिथे 25 हजार मराठ्यांना रोखले होते. इकडे इंग्रजांचे सैन्य नदीच्या दिशेने मार्गक्रमण करत राहिले. ते नदी पार करतील असे पेशव्यांच्या सैन्याला वाटत होते. पण ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीने वाटेतल्या गावावर कब्जा केला.
महारांना रस्त्यावर थुंकण्याचीही परवानगी नव्हती
या लढाईत महार समुदायाने परकीय इंग्रजांना मदत का केली? याचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर पेशवाई सुरू झाली, तेव्हा पेशवाईमध्ये जातीभेद मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात महारांना व इतर मागासवर्गीयांना देखील मानाचे स्थान होते. मात्र पेशव्यांच्या काळात महारांना अस्पृश्य समजत त्यांच्यावर अत्याचार सुरू झाले. हे अत्याचार आणि देण्यात येणारी वागणूक अत्यंत वाईट होती. ‘द ट्राईब्स अँड कास्टस ऑफ द सेन्ट्रल प्राविंसेस ऑफ इंडिया’ (1916) या पुस्तकात आर. व्ही. रसाळ लिहतात की, ‘पेशव्यांच्या राजवटीतील महारांना रस्त्यावर थुंकण्याचीही परवानगी नव्हती. म्हणूनच महारांच्या गळ्यात मटके लटकवले जात होते. रस्त्यातून चालताना पावलांचे ठसे मिटावेत म्हणून त्यांच्या कंबरेला काटेरी झाडाची फांदी बांधली जायची. ज्यामुळे महाराच्या पायांचे चालण्याचे ठसे मिटत असे. ब्राह्मण दिसल्यावर महारांची सावलीही ब्राह्मणावर पडू नये म्हणून त्यांना त्यांच्यापासून काही अंतरावर जमिनीवर तोंड करून झोपावे लागत होते. महार अथवा मांगांची सावली ब्राह्मणावर पडली तर, आंघोळ करून आपली अशुद्धता दूर करेपर्यंत ब्राह्मण अन्न पाणी खात नव्हते.’
महारांनी इंग्रजांच्या सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला
ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्या सैन्यात महार व इतर दलित समाजांना भरती करण्यास सुरू केले होते. सैन्यात भरती होणे ही आपल्या आत्मसन्मानासाठी मोठी गोष्ट असून समाजात आपले स्थान बदलेल या विचाराने महार समाजाने इंग्रजांच्या सैन्यात भरती होण्यास सुरू केले. जशी शिवरायांच्या सुरुवातीची राजवट खालच्या जातीतील रामोशी, महार आणि मांग पायदळाच्या लष्करी नौकेवर बांधली गेली होती, त्याचप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनीने आपली सत्ता स्थापन करण्यासाठी दलितांना सैन्यात भरती करण्यास सुरू केले, असे लेखक कॉंस्टेबल यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. बॉम्बे गॅरिसन सैन्यात मोठ्या संख्येने खालच्या जातीतील लोकांचा समावेश होता. पेशव्यांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी महारांनी इंग्रजांच्या सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला.
साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक ऋषिकेश कांबळे एकेठिकाणी या लढाईबद्दल सांगतात, महार समाजाचा समावेश असलेल्या तुकडीने मराठ्यांना नाही तर ब्राह्मणांना (ब्राह्मण्यवाद) नमवले होते. ब्राह्मणांनी जबरदस्तीने अस्पृश्यता लादल्याने महार समाज नाराज होता. ही अनिष्ठ पद्धत बंद करण्याची विनंती महारांनी ब्राह्मणांना केली. मात्र, त्यांचे कोणीही ऐकले नाही. या कारणांमुळेच महारांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीत सामील होण्याचा निर्णय घेतला.पुढे ऋषिकेश कांबळे सांगतात, ब्रिटिश सैन्याने महार समाजातील व्यक्तींना लष्करी प्रशिक्षण दिले आणि पेशव्यांच्या विरोधात लढण्याची प्रेरणा दिली. मराठा शक्तीच्या नावावर ब्राह्मणांची पेशवाई होती, त्याविरुद्धची ही लढाई होती. महारांनी या लढाईत ब्राह्मणांना हरवले. महार आणि मराठा यांच्यादरम्यान मतभेद किंवा संघर्ष कधीच नव्हता. इतिहासात अशा वादाची उदाहरणही नाहीत. ब्राह्मणांनी अस्पृश्यतेची प्रथा बंद केली असती तर ही लढाई कदाचित झालीच नसती. मराठ्यांचे नाव घेतले जाते कारण मराठ्यांचे राज्य पेशवाईत ब्राह्मणांच्या हाती होते. ही लढाई म्हणजे पेशव्यांची शेवटची मोठी लढाई होती. ब्रिटिशांना त्यांना नमवायचे होते. म्हणूनच ब्रिटिशांनी महार समाजातील व्यक्तींना हाताशी घेतले आणि पेशवाई संपुष्टात आणली.
पेशव्यांच्या काळातील दलितांची अवस्था
18व्या आणि 19व्या शतकात ब्राह्मणवादाचे कट्टर स्वरूप शिखरावर पोहोचले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘जातीचे उच्चाटन’ या पुस्तकात त्यावेळच्या स्थितीचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘पेशव्यांच्या राजवटीत महाराष्ट्रात या अस्पृश्यांना ज्या रस्त्यावरून उच्चवर्णीय हिंदू चालत होते त्या रस्त्यावरून चालण्याची परवानगी नव्हती. हिंदूंनी त्यांना चुकूनही हात लावू नये म्हणून त्यांच्या मनगटात किंवा गळ्यात काळा धागा बांधण्याचा आदेश त्यांना होता. पेशव्यांची राजधानी असलेल्या पुण्यात अस्पृश्यांना कंबरेला झाडू बांधून चालण्याचा आदेश होता, जेणेकरून त्यांच्या पावलांचे ठसे झाडूने पुसले जातील आणि त्यांच्या पावलांच्या ठशांवर पाऊल ठेवून कोणताही हिंदू अपवित्र होणार नाही. अस्पृश्यांना त्यांच्या गळ्यात मटका बांधून फिरावे लागायचे, त्यांना थुंकायचे असेल तर त्यातच त्यांना थुंकावे लागायचे, कारण जमिनीवर त्यांनी थुंकले आणि त्यावर चुकून कुठल्या हिंदुचा पाय पडला तर ते अपवित्र झाले असते.
सावित्रीबाई फुलेंनी पेशव्यांचा लेखणीतून केला विरोध

सावित्रीबाई फुले यांनीही एकेठिकाणी इंग्रज राजवटीचे समर्थन करत पेशवाई वाईट म्हटले असल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी पेशवाईत दलित आणि महिलांना मूलभूत अधिकार नसल्याचा दाखला दिला आहे. सावित्रीबाई त्यांच्या ‘अंग्रेजी मैय्या’ या कवितेत म्हणतात:
अंग्रेजी मैय्या, अंग्रेजी वाणई शूद्रों को उत्कर्ष करने वाली पूरे स्नेह से.
अंग्रेजी मैया, अब नहीं है मुगलाई और नहीं बची है अब पेशवाई, मूर्खशाही.
अंग्रेजी मैया, देती सच्चा ज्ञान शूद्रों को देती है जीवन वह तो प्रेम से.
अंग्रेजी मैया, शूद्रों को पिलाती है दूध पालती पोसती है माँ की ममता से.
अंग्रेजी मैया, तूने तोड़ डाली जंजीर पशुता की और दी है मानवता की भेंट सारे शूद्र लोक को.
सावित्रीबाई फुले पुढे लिहितात:पेशवा ने पांव पसारे उन्होंने सत्ता, राजपाट संभाला,
और अनाचार, शोषण अत्याचार होता देखकर शूद्र हो गए भयभीत,
थूक करे जमा गले में बँधे मटके में और रास्तों पर चलने की पाबंदी,
चले धूल भरी पगडंडी पर, कमर पर बंधे झाड़ू से मिटाते पैरों के निशान.
या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात येते की, पेशव्यांच्या काळात मराठा साम्राज्य विस्तारले, मात्र राज्यातील जातीभेद, अस्पृश्यता, ब्राह्मणवाद या सगळ्या गोष्टींमुळे अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आणि याचे रूपांतर थेट क्रांतीत घडले.
(We do not guarantee or take responsibility for any events, events or information in history. This information is compiled.)
