Home Blog Page 496

समाज बळकटीकरणासाठी व्यसनाधीनता कमी होणे गरजेचे-ह.भ.प. रोहिणी माने परांजपे

पुणे : मन, मेंदू आणि मनगट बळकट करायचे असेल तर निर्व्यसनी असणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण शरीरात व्यसनाने प्रवेश केला की शरीर नामक यंत्र गंजू लागते. स्वामी विवेकानंद म्हणायचे निर्व्यसनी देहाचे तरुण मला द्या मी देश बदलून दाखवेन. त्यामुळे समाज बळकट होण्यासाठी व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे, असे मत प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. रोहिणी माने परांजपे यांनी व्यक्त केले.

श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ व ॲम्युनिशन फॅक्टरी तसेचसंलग्न संस्थेच्या वतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ॲम्युनिशन फॅक्टरी, खडकी येथे हा महोत्सव सुरु आहे.  महोत्सवात महिलांच्या सामुदायिक हरिपाठचा विशेष कार्यक्रम तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या.  यावेळी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज सदानंद मोरे, ह.भ.प पार्वती चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भोला शेठ वांजळे, गणेश चव्हाण, जेजुरी संस्थानचे विश्वस्त डॉ.राजेंद्र खेडेकर, ॲम्युनिशन फॅक्टरी च्या जनरल मॅनेजर हजारे मॅडम, पेशवाई श्रीमंत च्या संचालिका अश्विनी येमुल, राहुल येमुल, प्रिय येमुल, अमोल येमुल आदी उपस्थित होते.

किर्तन महोत्सवाचे  अध्यक्ष ह.भ.प ज्ञानेश्वर पंढरीनाथ वांजळे, ह.भ.प प्रमोद महाराज रनवरे यांनी तर महिला कार्यक्रमाचे आयोजन गंगा वांजळे, मनीषा वांजळे यांनी केले. ह.भ.प. डॉ. पुनम महाराज जाचक यांचे प्रवचन देखील झाले.

रोहिनी माने- परांजपे म्हणाल्या, भक्तीच्या प्रांतामध्ये केवळ देव भक्ती हाच विचार नसून देवाचे कार्य म्हणजे देशभक्ती, राष्ट्रभक्ती, धर्माभिमान या सर्व गोष्टींचा अंश आपल्या जीवनात असावा. त्यासाठी संत पठण, महापुरूषांच्या जीवनाचा अभ्यास करावा.

त्या पुढे म्हणाल्या, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे मी काहीतरी देणे लागतो. ते समाजऋण, देशऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. मानवी जन्म  मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे परंतु मानवीजन्म घेवून त्या देहाचे सार्थक करणे हे भाग्याचे लक्षण आहे. तोच खरा देवभक्त, राष्ट्रभक्त संतांचा प्रिय भक्त ठरतो,  असेही त्यांनी सांगितले. ह भ प जंगले महाराज यांनी सूत्रसंचालन केले.

सैफ अली खानला 5 दिवसांनंतर डिस्चार्ज:चालत घरी पोहोचला, पण पूर्ण बरा होण्यासाठी लागेल महिना

मुंबई- अभिनेता सैफ अली खानला मंगळवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 16 जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. या हल्ल्यात सैफच्या मानेला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर सैफ ऑटोने लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला. पाच दिवस उपचार झाल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने त्याला घरी घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली. डिस्चार्ज झाल्यानंतर सैफ चालत घरी गेला. आता सैफ अली खानची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सैफला पूर्णपणे ठीक होण्यासाठी 1 महिना लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारीच्या पहाटे त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात घुसून चोरट्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात सैफच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान सैफ अली खानवर दोन गंभीर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.आता सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून, पाच दिवसांच्या उपचारांनंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. सैफ अली खानला सोमवारीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता, परंतु डॉक्टरांनी सैफला आणखी एक किंवा दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आज त्याला घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली.दरम्यान, सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळाला असला, तरी तो पूर्णपणे बरा झालेला नाही. डॉक्टरांनी त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सैफ अली खान आता चालू आणि बोलू शकत असला तरी त्याच्या जखमा अद्याप बऱ्या झालेल्या नाहीत. त्याला पूर्णपणे ठीक होण्यासाठी एक महिना लागू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. जड वस्तू उचलणे, व्यायाम करणे आणि शूटिंग करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. कारण जखमा बऱ्या झाल्या नाहीत तर संसर्गाचा धोका असू शकतो.दरम्यान, लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ त्याच्या वांद्रे येथील सद्गुरू शरण अपार्टमेंटमध्ये जुन्या घरी परत जाणार नाही. तो आता दुसऱ्या घरी शिफ्ट होणार आहे. तो परिवारासह जवळच्या फॉर्च्यून हाइट्स इमारतीत राहणार असून त्याचे सामान देखील हलवण्यात आले आहे. याच इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर त्याचे ऑफीस देखील आहे. सद्गुरू शरण या इमारतीमध्ये घुसून चोराने हल्ला केला होता. त्यामुळे आता त्या घरी सध्या परत न जाण्याचा निर्णय सैफने घेतल्याचे समजते.

स्वारगेट ते कात्रज साडेपाच किलोमीटर अंतरात 5 मेट्रो स्टेशन: माधुरी मिसाळ

पुणे:शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी पुणे मेट्रो कार्यालयात कामकाजाचा आढावा घेतला. स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या साडेपाच किलोमीटर अंतराच्या भूमिगत मेट्रो मार्गावर सध्या मार्केटयार्ड, पदमावती आणि कात्रज अशी तीन स्टेशन्स प्रस्तावित आहेत. मात्र प्रवाशांच्या मागणीनुसार यात बालाजीनगर आणि सहकारनगर-बिबवेवाडी या दोन नवीन स्टेशनचा समावेश करण्याच्या सूचना मिसाळ यांनी दिल्या.या मार्गास केंद्र सरकारने आधीच मंजुरी दिली असून टेंडर प्रक्रिया आणि वर्क ऑर्डर लवकरच काढण्याचे नियोजन आहे. राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, पुणे मेट्रो प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करून वाहतूक कोंडी दूर करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. त्यांनी ‘ट्रान्सपोर्ट मॅपिंग’चा विषय हाती घेतला असून मेट्रो, बस, रेल्वे आणि रिक्षा स्थानकांची एकत्रित माहिती प्रवाशांना उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नकाशा तयार केला जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्यात येणार असून त्याला एसटी स्थानक जोडण्याचा प्रस्ताव पुणे मेट्रोकडून एमएसआरटीसीला सादर करण्यात येणार आहे. याशिवाय शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथेही एसटी स्थानकासह एकत्रित विकास केला जाणार आहे. वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या दोन नवीन मेट्रो मार्गांना केंद्राची मंजुरी लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच खडकवासला ते खराडी आणि माणिकबाग-वारजे-एसएनडीटी या दोन अतिरिक्त मार्गांचे प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहेत.

अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी, घुसखोरांना हाकलणार,फक्त दोनच लिंग , पुरुष आणि महिला..थर्ड जेंडर समाप्त

ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या भाषणात 8 घोषणा केल्या
अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर. बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखण्यासाठी सैन्य तैनात केले जाईल.
रिमेन इन मेक्सिको पॉलिसीच्या अंमलबजावणीची घोषणा.
पकडा आणि सोडा (Catch and Release) पद्धत संपली आहे.
परदेशी दहशतवादी संघटनांना गुन्हेगारी गट घोषित केले जाईल.
अमेरिकेतील परदेशी टोळ्यांना संपवण्यासाठी 1978 चा एलियन एनेमीज अॅक्ट लागू करण्यात आला.
अमेरिकेत थर्ड जेंडर संपले आहे. फक्त दोनच लिंग असतील, पुरुष आणि महिला.
मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून अमेरिकेचे आखात असे केले जाईल.
पनामा कालवा पनामा कडून परत घेतला जाईल.

ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेचा सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे.” या दिवसापासून, आपला देश पुन्हा समृद्ध होईल आणि जगभरात त्याचा आदर केला जाईल. मी अगदी सोप्या भाषेत सांगेन की, अमेरिकेला प्रथम स्थान देईन. आपले सार्वभौमत्व परत मिळवले जाईल. आमची सुरक्षा पुनर्संचयित केली जाईल. न्यायाचे तराजू पुन्हा समतोल केले जातील. न्याय विभाग आणि आपल्या सरकारचे क्रूर, हिंसक आणि अन्याय्य शस्त्रास्त्रीकरण संपेल. आपण अमेरिकेला पुन्हा महान बनवू.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली

डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता आणि भारतीय वेळेनुसार आज रात्री 10.30 वाजता शपथविधी सोहळा पार पडला. यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत ट्रम्प पर्व सुरु झाले आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान, पत्नी मेलानिया बायबल धरून उभ्या होत्या. ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर, कॅपिटल बिल्डिंगच्या रोटुंडामध्ये काही काळ टाळ्यांचा कडकडाट झाला. यापूर्वी, त्यांनी 2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या आधी रिपब्लिकन नेते जेडी व्हॅन्स यांनी अमेरिकेचे 50 वे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रं दिली. डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी युनायटेड स्टेट्स कॅपिटल रोटुंडा येथे पार पडला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक उद्योगपती आणि मोठे नेते उपस्थित होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वी जेडी वन्स यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेण्यासाठी मंचावर उभे राहिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला 700 पाहुणे उपस्थित होते. भारतातून उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हजेरी लावली. याशिवाय इलॉन मस्क, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग आणि टिम कुक, सॅम ऑल्टमन आणि टिकटॉकचे प्रमुख शौ जी च्यु हे देखील यावेळी सहभागी झाले होते.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुलाचे गर्डर्स बसविण्यासाठी तीन दिवस ट्रॉफिक ब्लॉक

पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर कि.मी 58/500 (डोंगरगाव/ कुसगांव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू असून 22, 23 आणि 24 जानेवारी असे तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत या लांबीत ब्लॉक घेण्यात येणार असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या किमी क्रमांक 54/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वरील तिन्ही दिवस दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरू राहणार आहे.द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 या किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून आढावा

पुणे : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ च्या अंमलबजावणीचा तसेच २०२५- २६ च्या प्रारुप आराखड्यातील तरतुदींच्या अनुषंगाने कार्यान्वयन यंत्रणांचा आढावा घेऊन विविध सूचना केल्या. 2025- 26 च्या प्रारुप आराखड्यात जिल्ह्यात पाणीसाठा वाढीसाठी पाझर तलाव दुरुस्ती व गाळ काढण्याबाबतचा सविस्तर आराखडा सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्यासह विविध कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.श्री. डूडी यांनी छोटे पाटबंधारे विभागाचा आढावा घेताना संबंधितांनी सिंचनासाठी नदी, कालवे आदी सुविधा उपलब्ध नसलेल्या गावातील लघु तलाव दुरुस्तीसाठी निधीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत माहिती दिली. त्या अनुषंगाने सविस्तर प्रस्ताव सादर करुन किती तलावांच्या भिंतींची दुरुस्ती व गाळ काढल्यास किती पाणीसाठा निर्माण होईल आणि त्यासाठी खर्चाची आवश्यकता याचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे सांगितले.जिल्ह्यात स्मार्ट प्राथमिक शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र संकल्पनेअंतर्गत ३०५ प्राथमिक शाळा आणि सर्व १०८ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विकास करण्यात येणार आहे. इमारती जुन्या झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती, नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. महाऊर्जाने या सर्व स्मार्ट प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता सौर पॅनेलची योजना राबवून नेट मीटरींग करावे, जेणेकरुन त्यांचे वीजेचा खर्च वाचण्यासह आर्थिक लाभही होऊ शकेल.पर्यावरणीय पर्यटन (इको टुरिझम) विकासाला वन्यजीव वनक्षेत्रात चांगला वाव असून त्याचा प्रस्ताव वनविभागाने सादर करावा. रेशीम विकास विभागाने समूह विकासअंतर्गत मलबेरीच्या लागवडीच्या अनुषंगाने प्रोत्साहन द्यावे. त्यासाठी शेतकरी उत्पादक संघांना रेशीम धागे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचे तसेच किमान ५ हजार शेतकऱ्यांना मलबेरी लागवडीसाठी अर्थसहाय्याचा आराखडा सादर करावा.यावेळी जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी सन २०२४-२५ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजनांच्या भौतिक व आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. विभागांनी वेळेत सर्व प्रशासकीय मान्यता घ्याव्यात. तसेच काही योजनात खर्च होत नसल्यास पुनर्विनियोजनाचे किंवा निधी परत करण्याचे प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.यावेळी श्री. इंदलकर यांनी सन २०२४-२५ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुषंगाने विविध विभागांच्या प्रस्तावांना दिलेली प्रशासकीय मान्यता, वितरीत केलेला निधी या अनुषंगाने सादरीकरण केले. त्याबाबत यंत्रणांच्या प्रमुखांनी खर्चाच्या अनुषंगाने माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री झाल्याने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिलेबी भरवत,फुगडी खेळत, फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला”

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री निवड झाल्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. पुणे शहरातील पक्ष कार्यालय, नारायण पेठ येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जिलेबी वाटत, फटाके फोडून, महिला पदाधिकार्यांनी फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ “एकच वादा,अजित दादा” “अजितदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” “ दादाचा वादा आणि बळ” अशा जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने जिल्ह्याच्या विकासात अजून भर पडणार आहे. पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याने झालेल्या लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीमध्ये जोमाने व प्रामाणिकपणे काम करीत महायुती सरकारला अधिक बळकट केलेलं आहेत. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महामंडळ, विशेष कार्यकारी अधिकारी, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कमिटी यांवर काम करण्याची संधी मिळाल्यास पक्षातील कार्यकर्त्याला न्याय मिळेल व पक्ष वाढीसाठी मदत होईल. महानगरपालिका निवडणूक महायुती मध्ये लढवायची हा निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा घेतील. मात्र आपणही महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. पक्ष वाढीसाठी आपणही रस्त्यावर उतरून पक्ष संघटनेची कामे केली पाहिजेत.

यावेळी प्रदीप देशमुख म्हणाले मागील दीड वर्षात 7 ते 8 वेळा जल्लोष करण्याची संधी मिळाली भविष्यात ही संधी आणखी वाढणार आहे. दादा मुख्यमंत्री हवेत अशा आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे.पद मिळत जातील पण त्यांची तब्येतीची आपण काळजी घेतली पाहिजे स्वतःच्या आरोग्याची परवा न अजितदादा कार्यकर्ते पदाधिकारी यांची काळजी घेतात.आपण त्यांचा कमी वेळ घेऊन त्यांना महाराष्ट्र व देशात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पाचवेळा पुण्याचे पालकमंत्री झालेले आहेत. अनेक वर्षांपासून ते जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत. प्रशासकीय कामात त्यांचा हातखंडा आहे. शहरासह ग्रामीण भागातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न, नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या, कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे याची त्यांना माहिती आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्याने विविध विकासकामांना आणखी गती मिळणार आहे. सदरप्रसंगी शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख,प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे, मा.महापौर दत्ता धनकवडे, सांस्कृतिक प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, मा.विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, मा.नगरसेविका सुषमा निम्हण, शशिकला कुंभार, शुक्राचार्य वांजळे, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, दिव्यांग अध्यक्ष पंकज साठे, माहिती अधिकार अध्यक्ष दिनेश खराडे, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष चंद्रहास शेट्टी, विधानसभा मतदारसंघाचे वडगावशेरी अध्यक्ष सतीश म्हस्के, पर्वती अध्यक्ष संतोष नांगरे, कसबा अध्यक्ष अजय दराडे, खडकवासला ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र पवार, पुणे कँन्टोनमेंट अध्यक्ष नरेश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रेडाईने एसटी महामंडळाची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई – एसटी महामंडळाच्या 1360 हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी क्रेडाई (CREDAI) या संस्थेने आपले योगदान द्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. परिवहन मंत्री श्री.सरनाईक यांनी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज’ने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. त्याप्रसंगी मंत्री बोलत होते.मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाचे राज्यभरात 842 ठिकाणी 1360 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. या जागांचे शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण करण्यात आले आहे. ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ अथवा खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बसस्थानके, आगार आणि आस्थापना कार्यालय संबंधित विकासकाकडून बांधून घेण्यात यावीत. त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी किमान 100 खाटांचे अद्ययावत रुग्णालय, इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर पॅनलसारखे पर्यावरण पूरक प्रकल्प उभारणे अपेक्षित आहे. या बदल्यात संबंधित विकासकाला त्या जमिनीवर त्याच्या सोयीनुसार व्यावसायिक क्षेत्र विकसित करता येईल.यासंदर्भातील सर्वसमावेशक धोरण लवकरच एसटी महामंडळ आणणार असून यासाठी सूचना आणि प्रस्ताव क्रेडाई यासारख्या देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत संस्थेने द्यावेत, असे आवाहनही क्रेडाई मंत्री श्री. सरनाईक यांनी केले. याप्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल व इतर पदाधिकारी, विकासक, वास्तुविशारद उपस्थित होते. एसटी महामंडळातर्फे वास्तुविशारद निलेश लहिवाल यांनी महामंडळाचे सादरीकरण केले.

माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न,राजेवाडी (आर.सी.सी) संघाला विजेतेपद

पुणे – माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त नाना पेठ पुणे अहिल्या आश्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानामध्ये भव्य फुल पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक अविनाश बागवे व डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले होते दोन दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये सुमारे 16 संघांनी सहभागी झाले होते, या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते संपन्न झाले, या क्रिकेट स्पर्धेमध्ये राजेवाडी (आर सी सी) क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकाविला, द्वितीय क्रमांक कसबा वॉरियर संघाने पटकाविला, तृतीय क्रमांक एकता क्रिकेट संघाने पटकाविला, या विजेता संघांना स्मृतिचिन्ह व विजय चषक देऊन त्यांना गौरवण्यात आला, या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पुणे शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस व मातंग एकता आंदोलन राजेवाडी शाखेचे अध्यक्ष अक्षय अवचिते यांनी केले होते, यावेळी माजी नगरसेवक अविनाश बागवे, डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, विठ्ठल थोरात, दयानंद अडागळे, किरण लोंढे, सुरेश अवचिते, विकी भिसे, राजू शेखमेजर, साहिल खान, कौस्तुभ वाघमारे, विशाल पवार, अक्षय पवार, चंद्रकांत वाघमारे, किरण चकाले, आदि यावेळी उपस्थित होते

महाआवास अभियानातील घरकुले शंभर दिवसात पूर्ण करण्यात यावी-ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले

पुणे:- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना या महत्त्वकांक्षी योजनेद्वारे पुणे विभागात २० लाख लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित केले आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी ताळमेळ ठेवून महाआवास अभियानांतील घरकुले शंभर दिवसात पूर्ण करून लाभार्थ्यांना हस्तांतरीत करण्यात यावी, असे निर्देश ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिले. महा आवास अभियान २०२४-२५ अंतर्गत पुणे विभागस्तरीय कार्यशाळा शुभारंभप्रसंगी आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्प डॉ. राजाराम दिघे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे, कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, उपायुक्त (विकास) विजय मुळीक यावेळी उपस्थित होते. तर पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.राजा दायानिधी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद आणि सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.प्रधान सचिव श्री. डवले म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना १०० दिवसाच्या कालावधीत अधिक गतिमान करण्यासाठी महाअवास अभियान राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाची आणि विहित मुदतीत घरकुले उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करताना जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणांनी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील सर्व त्रुटींची तातडीने पूर्तता करून आणि मानवीय दृष्टिकोनातून लाभार्थ्यांना घरकुले हस्तांतरित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे. अकारण त्रुटी काढून कामे रेंगाळणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विविध कायद्यांचा आणि नियमांचा उपयोग हा अडचणी निर्माण करण्यासाठी न करता लोकांसाठी निवारा निर्माण व्हावा यासाठी करावा. यावेळी त्यांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधून योजनेच्यासंबंधी अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर मार्गदर्शन केले. केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या प्रगतीचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार म्हणाले, घरकुलासंबंधी लाभार्थ्यांची नोंदणी करताना त्यांच्या वैयक्तिक नोंदी तसेच आधार क्रमांकाची नोंद यंत्रणांनी अचूकपणे करण्याची दक्षता घ्यावी. तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांशी यासाठी प्रत्यक्ष संवाद साधावा. जिल्हाधिकाऱ्यांनी घरकुल योजनांसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने करावी. त्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग घेण्यात यावा. घरकुलांची उभारणी झालेल्या ठिकाणी संवदेनशिलतेचा, कल्पकतेचा वापर करुन परिसर विकासावर भर द्यावा. वृक्षारोपण, रस्ते, स्ट्रीट लाईटस्, सोलार प्रकल्प उभारावेत. त्यासाठी जिल्हा परिषद आणि महसूल यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशी सूचना विभागीय आयुक्तांनी केली. शंभर दिवसात पूर्ण करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत महा आवास अभियान प्रगतीचा आढावा घेण्यात येणार असल्याने सर्व संबंधितांनी योजनेची काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले.संचालक श्री. दिघे यांनी लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाची घरकुले मिळावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी स्थानिक स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करून अडचणी सोडवाव्या असे सांगितले. उपायुक्त विकास श्री.मुळीक यांनी बैठकीत विविध घरकुल योजनांचे उद्दिष्ट व त्याची पूर्तता याची माहिती दिली. बैठकीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, पारधी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना, मोदी आवास योजना, पीएम जनमन योजना आणि पंडीत दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनांच्या अंमलबजावणीचा विभागस्तरीय आढावा घेण्यात आला. यावेळी महा आवास अभियान २०२४-२५ च्या माहिती पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

देशाला पहिलं खोखो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या भारतीय संघातील महाराष्ट्रीय खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

  • पुण्याचा प्रतिक वाईकर व बीडची प्रियांका इंगळे या कर्णधारांचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन व विशेष कौतुक

मुंबई- नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खोखो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडू तसेच संघ प्रशिक्षकांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व प्रतिक वाईकर आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियांका इंगळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केले. विशेष म्हणजे प्रियांका मूळची बीड आणि सध्या पूणे तर, प्रतिक हा पुणे जिल्ह्यातील आहे.

योगायोग म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद अजितदादांकडेच असून या विश्वविजेत्या दोन्ही कर्णधारांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दमदार खेळ करत नेपाळवर एकतर्फी विजय मिळवला. विश्वविजेत्या भारतीय संघात कर्णधार प्रतीक वाईकर याच्यासह सुयश गरगटे, अनिकेत पोटे, आदित्य गनपुले व रामजी कश्यप या पाच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश होता. तर विश्वविजेत्या महिला संघात कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह कु. अश्विनी शिंदे, कु. रेश्मा राठोड, वैष्णवी पवार या महिला खेळाडू महाराष्ट्राच्या होत्या. या खेळाडूंसह पुरुष संघाचे प्रशिक्षक पुण्याचे शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षक पुण्याच्या प्राचीताई वाईकर तसेच फिजिओथेरेपिस्ट डॉ. अमित रावहाटे यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून भविष्यातील यशस्वी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सशक्त राजकारण, सशक्त भारताकरीता आठवी युवा संसद पुण्यातजाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, पुणे तर्फे आयोजन

  • संसद कट्टा अंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांची मुलाखत

पुणे : युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता तसेच सशक्त युवा, सशक्त राजकारण व सशक्त भारताकरीता तरुणाईने पुढाकार घ्यावा, याकरिता पुण्यामध्ये आठव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, पुणे तर्फे गुरुवार, दिनांक ३० व शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष व संसदेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावर्षी संसद कट्टा अंतर्गत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे मुलाखतीचे सत्र होणार आहे. संसदेत मागील वर्षी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मुलाखत झाली होती. माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, गणराज्य संघाच्या संस्थापक अध्यक्ष सुषमा अंधारे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, भारतीय छात्र संसदेचे अध्यक्ष राहुल कराड, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर हे संसदेच्या कार्यकारिणीमध्ये आहेत.

संसदेत देशभरातील राजकारण, समाजकारण आणि विविध विषयांतील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी महाराष्ट्रातील तरुणांना मिळणार आहे. महाराष्ट्रातून सुमारे १५०० हजार विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी इंटरनॅशनल यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. पुण्यासह सोलापूर, अकोला, कोल्हापूर, मराठवाडा, कोकण यांसह विविध भागांतून विद्यार्थी संसदेकरीता येणार आहेत.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, ग्रामसभा ते लोकसभा, राजकारणातील व समाजकारणातील महिलांचा सहभाग, माध्यमे राजकारण घडवतात?, व्हिजन भारत २०२९, सशक्त युवा सशक्त राजकारण सशक्त भारत या विषयांवर संसदेत सत्र होणार आहेत. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध विषयांवर अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. वयवर्षे १६ ते ४० मधील तरुणांनी संसदेत सहभाग घ्यावा. संसदेत सहभागी होण्याकरीता मोफत प्रवेश असून विद्यार्थीनींची एक दिवसाची पुण्यामध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात येणार आहे.

संसदेच्या माध्यमातून युवकांनी राजकारण आणि समाजकारणातील दिग्गजांसोबत संवाद साधावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. संसदेकरीता प्रवेश विनामूल्य आहे, तरी तरुणाईने मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल, मला या प्रेमातच राहायचे आहे! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वित्झर्लंड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वैश्विक मराठी परिवारातील आपल्या मराठी बंधु-भगिनींशी मनमोकळा संवाद साधला.बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडच्या प्रेमाचे मोल नाही, मला या प्रेमातच राहायचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, आपला महाराष्ट्र भारताचे पॉवर हाऊस असून देश 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर एक ते दोन वर्षांतच महाराष्ट्र पहिली उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल. एआय तंत्रज्ञानात आघाडी घेतलेला महाराष्ट्र भारताचे डेटा सेंटर कॅपिटल असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी तयार करणार असल्याचे सांगितले.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला देव, देश, धर्माकरता लढायला शिकवले, आपल्या संस्कृतीचा, भाषेचा अभिमान बाळगायला शिकवले, ती शिकवण मराठी माणसाने स्वित्झर्लंडमध्येही जपली आणि पुढच्या पिढीलाही दिली, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून मराठीला ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

यासाठी स्वित्झर्लंडसह वैश्विक मराठी परिवारातील मराठी बंधु-भगिनी आमचे राजदूत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.याप्रसंगी बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अमोल सावरकर, सेक्रेटरी किर्तीताई गद्रे, महेश बिरादार व इतर मान्यवर उपस्थित होते.

खो-खो महिला-पुरुष संघाने विश्व चषक जिंकला

  • क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी खेळाडूंचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले अभिनंदन
  • राज्य शासनाने दिलेल्या दहा कोटींच्या निधीबद्दल खेळाडूंनी मानले आभार

मुंबई : खो-खो चा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघांकडून ऐतिहासिक खेळ पहायला मिळाला. भारतीय संघाने नेपाळला हरवून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या विजयानंतर क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे खेळाडूंशी संवाद साधत अभिनंदन केले.खो-खो साठी क्रीडा मंत्री श्री. भरणे यांच्या निर्देशानुसार दहा कोटींचा निधी नुकताच दिला होता. हा निधी दिल्याबद्दल खेळाडूंनी क्रीडा मंत्री श्री. भरणे यांचे आभार मानले. यावेळी मंत्री श्री. भरणे खेळाडूंना म्हणाले, निधी देणं ही आमची जबाबदारी आहे. पण या जनतेच्या पैशाचे खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाने चीज केले आहे. भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. खेळाडूंच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.महाराष्ट्राची कन्या प्रियांका इंगळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. खो-खो वर्ल्डकपवर भारतीय संघाने नाव कोरले आहे. महिला व पुरुष संघाने नवी दिल्ली येथे अंतिम सामन्यात नेपाळचा मोठ्या फरकाने पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून प्रत्येक सामन्यात वर्चस्व राखणाऱ्या दोन्ही संघाने अंतिम फेरीतही चमक दाखवली.