Home Blog Page 493

पुण्यात ५४ वधू – वरांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न

  • केमिस्टरत्न जगन्नाथ शिंदे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आयोजन

पुणे : सामूहिक लग्न सोहळ्यामुळे गोर-गरिबांच्या पैशांची बचत होते. लग्न कार्यामध्ये होणारा नाहक खर्च कमी होतो. अप्पासाहेब शिंदे यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ५४ जोडप्यांचा केलेला सामूहिक विवाह सोहळा हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे. सामूहिक लग्न सोहळ्यामध्ये हुंड्या सारख्या प्रथा बंद होतात. अनिष्ट प्रथा-परंपरांना त्यामुळे फाटा दिला जातो, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट’चे आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष आणि केमिस्टरत्न जगन्नाथ शिंदे उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’तर्फे कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.

यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, आमदार चेतन तुपे, पृथ्वीराज देशमुख, दत्तात्रय धनकवडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव अनिल बेलकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे अध्यक्ष संदीप पारख, खजिनदार रोहित करपे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शाह, संजय खोपडे आदीनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील ५४ जोडप्यांची लग्नगाठ बांधण्यात आली. पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील गरजू – गरीब जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.

अजित पवार म्हणाले, घरातील लग्नकार्यामुळे आई-वडील कर्जबाजारी झाल्याचे चित्र अनेक घरांमध्ये बघायला मिळते. त्यामुळे अशा सामूहिक विवाह सोहळ्याची समाजाला गरज आहे. हे मानव सेवेचे काम आहे. अप्पासाहेब शिंदे यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ५४ जोडप्यांचा केलेला सामूहिक विवाह सोहळा हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे. केवळ स्वतःच्या आनंदासाठीच नाही तर त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांना आधार आणि आनंद मिळाला आहे.

ते पुढे म्हणाले, अप्पासाहेब शिंदे हे उत्तम संघटन असणारे नेते आहेत. देशभरातील लाखो फार्मासिस्ट संघटना त्यांच्याशी जोडले गेले आहेत. तब्बल ४० वर्षे त्यांनी संघटनेसाठी दिली आणि अत्यंत किचकट तांत्रिक प्रश्न मार्गी लावले. देशात देखील चांगला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोलाचे काम केले आहे. दूरदृष्टी आणि सामाजिक भान जपणारे ते नेते आहेत

चंद्रकांत पाटील म्हणाले, एकाच क्षेत्रात सातत्याने काम करुन अप्पासाहेब शिंदे यांनी यश मिळवले आहे. याच पैशांनी ते समाजासाठी देखील काम करतात आणि अनेकांना मार्गदर्शन देखील करतात. पैसे कमवून आयुष्याच्या शेवटी ते सोबत नेता येत नाहीत, जसे आलो तसेच आपण रिकामेच जात असतो. त्यामुळे आयुष्यात समोर दिसेल ते काम करा आणि अप्पासाहेब शिंदे यांच्यासारखे फक्त पैसे नाही तर माणसे जोडा, असेही त्यांनी सांगितले.

जगन्नाथ शिंदे म्हणाले, माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या वर्गणीवर हा सामूहिक विवाह सोहळा करण्यात आला आहे. आपण काम करताना माणसाला देव मानून समाजाला काही तरी देत जावे आणि त्यांची सेवा करावी, हीच यामागे भावना आहे. गरीब आणि आदिवासी समाजातील अनेक जोडपी येथे विवाहबद्ध झाली. त्यामुळे त्यांचा लग्नसोहळा आमच्या माध्यमातून होतो आहे, ही समाधानाची बाब आहे.

पुणे महानगरपालिकेत थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफीचा प्रस्ताव सादर करावा-राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. 22: पुणे शहर महानगर पालिकेमध्ये नवीन 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महानगर पालिकेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मनपा अंतर्गत नागरिकांवर मालमत्ता कर थकीत आहे. या थकीत मालमत्त करावरील शास्ती माफ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज दिले.

मंत्रालयात पुणे महानगर पालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध विषयांबाबत बैठक राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री बोलत होत्या. बैठकीस नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, एस गोविंदराज, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, नगररचनाकार प्रतिभा भदाणे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, मालमत्ता कराच्या थकबाकीची वसूली करताना निवासी आणि व्यावसायिक असे वर्गीकरण करण्यात यावे. थकीत कर प्रलंबित राहील्यास त्यावर दंडाची रक्कम वाढून जाते. त्यामुळे मालमत्ताधारकांना अधिकचा बोझा बसेल. पुणे शहरात लष्करी छावणीचा भाग आहे. या भागाचा पुणे महानगरपालिका क्षेत्रात सहभाग करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा. लष्करी छावणीचा महानगर पालिकेत समावेश झाल्यास सर्वांगिण विकास करता येईल.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात अत्यावश्यक वैद्यकीय सेवेत एकवट मानधनावर 168 सेवक कार्यरत आहेत. या सेवकांना कायम सेवेत सामावून घेण्यात यावे. अशा सेवकांबाबत काही महानगर पालिकांमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिकेत निर्णय घेण्यात यावा. लाड पागे समितीबात सफाई कामगार वारसा हक्क भरतीवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. याबाबत सामाजिक न्याय विभागाशी चर्चा करून शासन निर्णय काढण्यात यावा.पुणे शहरातील वृक्षांची संख्या किती आहे, किती वृक्ष पाहिजेत, यासाठी पुणे शहरातील वृक्ष गणना करण्यात यावी, अशा सूचनाही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या.

पुणे मनपा व पीएमआरडीएने बांधकाम परवानगी देताना बांधकाम शुल्कातील 50 टक्के हिस्सा संबंधित यंत्रणेला त्याचवेळी मिळण्यासाठी ऑनलाईन पेमेंट व्यवस्थेत बदल करावा. हिलटॉप आणि हिलस्लोप जमिनींच्या आरक्षणाबाबत समिती करण्यात यावी. यामध्ये प्रकरणनिहाय आढावा घेण्यात यावा. पुणे शहरातील प्रकल्प बाधीत नागरिकांना कायम स्वरूपी घरे देण्यात यावी. कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पग्रस्त नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. हिल टॉप, हील स्लोप आणि बी. डी. पी बाबत निर्णय घेण्यात यावा. पर्वती टेकडीच्या लगतची झोपडपट्टी निर्मुलन करण्यासाठी चांगली योजना करण्यात यावी. या भागातील हेरीटेजची अट शिथील करून इमारत उंचीवरील मर्यादा हटविण्यात यावी, अशा सूचनाही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या

बियरच्या बिलाचा वाद: SK बारच्या ८ जणांनी ग्राहकाला जीवे मारण्याचा केला प्रयत्न

पुणे- बियरच्या बिलावरून झालेला वाद पराकोटीला पोहोचला आणि २६ वर्षीय ग्राहकाला एका खोलीत कोंडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न बिबवेवाडीतील एका बार मध्ये झाल्याने हा ग्राहक आता रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतो आहे.

बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील SK बार मध्ये हा प्रकार रात्री १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान घडला.पोलिसांनी या प्रकरणी हॉटेल कर्मचारी आणि चालकासह एकूण ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंके 8888813154 अधिक तपास करत आहेत .

२२ लाखाचे अफिम घेऊन आलेल्या राजस्थानच्या नाथुरामला पकडले..

पुणे- २२ लाखाचे अफिम घेऊन आलेल्या राजस्थानच्या नाथुरामला पुणे पोलिसांनी पकडले आहे.
पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता तसेच अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन जास्तीत जास्त अंमली पदार्थ तस्कर यांचे विरुध्द माहिती काढुन कारवाई करणे बाबत दिलेले सुचना दिल्या होत्या.
त्यासुचनाप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार असे गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना उन्नती धाम सोसायटीच्या बाहेरील सार्वजनिक रोडवर कोढवा पुणे. येथे एक इसम हा त्याचे हातामध्ये लाल रंगाची ट्रॅव्हलबॅग घेवुन संशयित्तरित्या उभा असल्याचे दिसुन आल्याने त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पत्ता नाथुराम जीवणराम जाट, वय ५२ वर्षे, रा. मु/पो असावरी, तेहसील मुंडवा, जि. नागोर, राज्य राजस्थान असे असल्याचे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यामधुन एकुण किं.रु. २१,८०,०००/-रु.चा, ऐवज त्यामध्ये १ किलो ९० ग्रॅम आफिम हा अंमली पदार्थ मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असुन, त्याचे विरुध्द कोढवा पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १७ (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता तो फर्निचर बनवण्याच्या कामासाठी यापुर्वी पुणे शहरामध्ये आल्याचे सांगुन अल्पावधीत पैसे कमावण्याच्या इरादयाने अफिम विक्री करण्यासाठी पुण्यामध्ये आणले असल्याचे सांगितले.
वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त पुणे रंजनकुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पो आयुक्त, गुन्हे १ गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, दयानंद तेलंगे पाटील, संदिप शिर्के, विशाल दळवी, सचिन माळवे प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, ज्ञानेश्वर घोरपडे, योगेश मोहीते, यांनी केली आहे.

ग्रंथालये लोकाभिमुख व्हावीत यासाठी शासनाचे प्रयत्न-ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

कोथरूड येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा शुभारंभ

पुणे, दि. २२ : वाचन संस्कृती वाढविण्यासाठी राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून वाचन संस्कृती ही लोकचळवळ झाली पाहिजे ग्रंथालय लोकाभिमुख व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी, पुणे यांच्यावतीने कोथरुड येथे आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, शासकीय विभागीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुरेश रिद्दीवाडे, लेखिका मंगला गोडबोले, गांधी स्मारक कार्यवाह राजन अनवर, जिल्हा ग्रंथालय संघ कार्यवाह सोपान पवार, ग्रंथमित्र धोंडिबा सुतार आदी उपस्थित होते.
श्री. गाडेकर म्हणाले, पुणे ही शैक्षणिक पंढरी असून ज्ञानाची नगरी आहे. राज्यात वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी शासनाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे व टिकवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. समाजमाध्यमांच्या युगात माध्यम बदलले असले तरी वाचन संस्कृती जोपासली जात आहे. राज्यातील ४३ शासकीय ग्रंथालयांचे ई-ग्रंथालय प्रणाली विकसित करण्यात येत असून आत्तापर्यंत ३८ लाख पुस्तके ई-ग्रंथालयांच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. राज्यातील ३२७ ‘अ’वर्ग ग्रंथालये ई-ग्रंथालय प्रणालीला जोडण्यात येणार आहेत.
ते म्हणाले, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शासन सकारात्मक असून लोकसहभाग महत्त्वाचा आहे. शासनाकडून ग्रंथालयांना वेळोवेळी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. लवकरच ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक ग्रंथालयाला २ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
डॉ. ठाकूर म्हणाले, विद्यार्थ्यांचा ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमात सहभाग वाढवणे आवश्यक आहे. मोबाईलच्या युगात मुलांना वाचनसंस्कृतीचे महत्त्व पटविण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तके वाचण्याची सवय लावणे आवश्यक आहे. समाज माध्यमांमुळे माहिती तर मिळते परंतु वाचनातून आत्मसात केलेले ज्ञान कायमस्वरुपी स्मरणात राहते. आपल्या परिसरातील किमान पाच लोकांना ग्रंथोत्सवाला भेट देण्याबाबत प्रोत्साहित करावे. किमान एक, दोन पुस्तक खरेदी करुन आपल्या घरामध्ये संग्रही ठेवावे. पालकांनी मुलांना मोबाईलच्या वाढत्या सवयीपासून दूर ठेवून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करावी, असे आवाहन श्री. ठाकूर यांनी केले.
श्रीमती गोडबोले आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, शासनाच्या उपक्रमांची पूर्वप्रसिद्धी करावी. त्यामुळे शासनाचे उपक्रम अधिकाधिक यशस्वी होतील. साहित्य अकादमीने छापलेली पुस्तके सर्वांपर्यंत पोहोचवावीत, महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार प्राप्त पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध व्हावीत, राष्ट्रीय पातळीवर गौरविलेल्या पुस्तकांच्या माहितीचे फलक ग्रंथालयात लावण्यात यावेत, असे आवाहन करुन मोबाईलच्या युगातही वाचनसंस्कृती जोपासली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. हा ग्रंथोत्सव २३ जानेवारी २०२५ पर्यंत महात्मा गांधी स्मारक निधी, गांधी भवन, अंध मुलींच्या शाळेजवळ, कोथरुड येथे सुरु असून अधिकाधिक ग्रंथप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा, प्रवाशांनी उड्या मारल्या:दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या ट्रेनने चिरडले; 11 ठार

जळगाव-कर्नाटक एक्सप्रेसने पुष्पक एक्सप्रेसच्या अनेक प्रवाशांना उडवल्याची भयंकर घटना बुधवारी सायंकाळी 4 च्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकालगत घडली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पुष्पक रेल्वेने अचानक ब्रेक लावल्यामुळे तिच्या चाकांमधून ठिणग्या उडल्या होत्या. त्यानंतर रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी जिवाच्या आकांताने खाली उड्या मारल्या. पण त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना उडवले. त्यात 11 जण ठार, तर 40 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी तीव्र वळण होते. परिणामी, दुसऱ्या ट्रॅकवर बसलेल्या प्रवाशांना रेल्वे येत असल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळेच वेगाने येणाऱ्या कर्नाटक संपर्क क्रांतीने इतक्या मोठ्या संख्येने लोक चिरडले गेले. घटनास्थळ मुंबईपासून 400 किमी अंतरावर आहे.

मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील निला म्हणाले, मेडिकल रिलीफ ट्रेन भुसावळहून निघाली आहे. या अपघातात कोणत्याही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती नाही.

ब्रेक लावताना ट्रेनच्या चाकातून धूर निघत होता
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस ही ट्रेन यशवंतपूरहून हजरत निजामुद्दीनला जात होती. तर पुष्पक एक्सप्रेस (12533) लखनौहून मुंबईला जात होती. ब्रेक लावताना पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांमधून धूर निघत होता. त्यामुळेच ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवा पसरल्या आणि प्रवाशांनी घाबरून डब्यातून बाहेर उड्या मारल्या.

आर्थिक सर्वसमावेशकता आणि डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी भीमने (BHIM)केली फिनटेक यात्रा सोबत भागीदारी

डिजिटल पेमेंट जागरूकता आणणाऱ्या ट्रेन-द-ट्रेनर मॉडेल अंतर्गत निवडक एनजीओजमधील
200 हून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण देणे

मुंबई: एनपीसीआय भीम सर्व्हिसेस लि. (NBSL) द्वारे समर्थित भारताचे प्रमुख डिजिटल पेमेंट ॲप भीम हे फिन टेक यात्रा 2025 चे प्रमुख भागीदार म्हणून सहभागी झाले आहेत. फिन टेक यात्रा हा 10,000 किमी लांबीचा मोठा प्रवास आहे, ज्याचा उद्देश देशभरातील विविध वित्तीय सेवांमधील प्रमुख कंपन्यांना ओळखणे, ते समजून घेणे आणि त्याच्या प्रगतीसाठी काम करणे हे आहे. समुदायांचे सक्षमीकरण करून आर्थिक समावेशनाला चालना देत भारताच्या डिजिटल पेमेंट क्रांतीला गती देण्याचे या धोरणात्मक सहकार्याचे उद्दिष्ट आहे.

या सहकार्याचा एक भाग म्हणून, निवडक एनजीओ मधील 200 हून अधिक व्यक्तींना ट्रेन-द-ट्रेनर मॉडेल अंतर्गत प्रशिक्षित केले जाईल. यासोबतच डिजिटल पेमेंट जागरूकता पसरवण्यासाठी त्यांना ज्ञान आणि अन्य साधनाने सुसज्ज केले जाईल. तळागाळातील प्रशिक्षकांना सक्षम बनवत डिजिटल पेमेंटचे हे फायदे देशातील सर्वात दुर्लक्षित आणि दुर्गम भागात पोहोचण्याची खात्री हा उपक्रम करतो.

या भागीदारीबद्दल बोलताना, NBSL चे मुख्य व्यवसाय अधिकारी राहुल हांडा म्हणाले, “भीमची फिनटेक यात्रा 2025 सोबतची भागीदारी डिजिटल अंतर मिटवण्यासाठी तसेच नागरिकांना सुरक्षित आणि कार्यक्षम डिजिटल पेमेंट सोल्यूशन्सबद्दल शिक्षित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा उपक्रम आर्थिकदृष्ट्या सर्वसमावेशक आणि डिजिटली सशक्त भारत निर्माण करण्याच्या आमच्या ध्येयाशी सुसंगत आहे. या भागीदारीमुळे फिनटेक इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी मिळणाऱ्या संधींबद्दल आम्ही उत्साहित आहोत.”

भारताला डिजिटलदृष्ट्या स्वतंत्र बनवण्यासाठी फिनटेक यात्रा 2025 ही एक चळवळ आहे. हे एक व्यासपीठ आहे जे स्टार्ट-अप सारखे नवोपक्रम पुरवणाऱ्या आणि वित्तीय संस्था, भांडवलदार आणि मोठे कॉर्पोरेट्स यांसारख्या नावीन्याची आवड असलेल्या इच्छुकांमध्ये संबंध प्रस्थापित करते. अनेक शहरांना भेटी देऊन, फिनटेक इनोव्हेटर्ससोबत बोलून, आणि BHIM सारख्या प्लॅटफॉर्मसह सहयोग करून, ही अनोखी यात्रा संपूर्ण देशात अखंड आणि सुरक्षित डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्यासाठी तयार आहे.

द फिनटेक मीटअपचे संस्थापक अभिशांत पंत म्हणाले, “भीम सोबतची आमची भागीदारी यंदाच्या या यात्रेतील एक प्रमुख आणि परिवर्तनकारी घटक आहे. UPI इकोसिस्टममध्ये BHIM चे सिद्ध नेतृत्व हे सुनिश्चित करते की आर्थिक समावेशता ही केवळ एक दृष्टी नाही तर देशभरातील लाखो लोकांसाठी वास्तव आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला सक्षम बनवण्याचे आमचे एकत्रित ध्येय आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील फिनटेक संस्थापकांना कल्पना प्रमाणीकरण, नेटवर्क सपोर्ट आणि व्हेंचर कॅपिटलच्या संदर्भात मार्गदर्शन पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरुन वित्तीय सेवांमध्ये अधिक डिजिटल होण्यासाठी ते तयार होतील आणि इतरांनाही तयार करतील.”

अर्थसंकल्पात कर्करोगाच्या उपचारांसाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन महत्त्वाचा-अब्रारअली दलाल

कर्करोगाविषयीचे उपचार आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष द्यायला हवे

पुणे-अर्थसंकल्पात कर्करोगाच्या उपचारांसाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन महत्त्वाचा आहे असे येथे सह्याद्रि हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक अब्रारअली दलाल यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले,’“आपण आता २०२५ च्या अर्थसंकल्पाच्या तयारीला लागलो आहोत. या बजेटच्या पूर्वतयारीच्या चर्चेत देशातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक अत्याधुनिक सुधारणबद्दल आपल्याला जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

यंदाच्या अर्थसंकल्पात कर्करोगाच्या उपचारांसाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन महत्त्वाचा ठरेल. आरोग्य सेवेतील तरतुदींत टायर २ आणि टायर ३ शहरांतील कर्करोगाविषयीचे उपचार आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष द्यायला हवे. कर्करोगाच्या उपचारांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा, व्यापक तपासणी आणि रुग्णांना आवश्यक असलेल्या सर्वतोपरी काळजी आदी घटकांचा विचार केला जावा जेणेकरुन रुग्णांचे जीवनमान आणि रुग्णसेवेचा दर्जा उंचावेल. त्याशिवाय वैद्यकीय उपचारांत अत्याधुनिक सेवा उपलब्ध होण्याकरिता कर्करोग रेडिएशन उपकरणांवरील सीमा शुल्क आणि सर्वसामान्य करप्रणालीत (जीएसटी) घट व्हायला हवी. यामुळे अत्याधुनिक आरोग्य सेवेकरिता भारताचा जगभरात नावलौकिक होण्यास मदत होईल.

रुग्णालयाचा दैनंदिन कारभार सुरळीत चालू राहण्यासाठी आवश्यक असणा-या वस्तू आणि सेवा खरेदीवरील सर्वसामान्य कर (जीएसटी) कमी होईल, ही आम्हां सर्वांना आशा आहे. रुग्णांना आरोग्य सेवांवरील जीएसटी सवलतींचा फायदा मिळतो. मात्र रुग्णालयीन प्रशासनाला रुग्णालयातील आवश्यक खरेदी आणि विक्रेत्यांच्या आर्थिक बिलांवर जीएसटीत सूट मिळत नाही. परिणामी, रुग्णालयांना आर्थिक भार सहन करावा लागतो. जीएसटी खर्चाचा थेट परिणाम रुग्णालयाच्या दैनंदिन कार्यक्षमतेवर होतो. रुग्णालयात आवश्यक असलेले अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण यांसारख्या आवश्यक घटकांवर आम्हांला गुंतवणूक करताना मर्यादा येतात. यामुळे रुग्णालयांसाठी जीएसटी दरात कपात केल्यास आर्थिक ताण नक्कीच कमी होईल आणि आम्हांला रुग्णांना परवडणा-या बजेटमध्ये सर्वोत्कृष्ट उपचार देता येतील.

वैद्यकीय कर्मचा-यांची कमतरता हा देखील एक गहन प्रश्न आहे. सरकारने वैद्यकीय शिक्षणासाठी निधी तसेच स्कॉलरशिप उपलब्ध करुन द्यावी. वैद्यकीय शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन द्यावात तसेच आरोग्य सेवेतील कामकाजांच्या ठिकाणीही सर्व सोयीसुविधा उपलब्ध असाव्यात. टायर २ आणि टायर ३ शहरांत मोबाईल क्लिनिक आणि कम्युनिटी हेल्थ प्रोग्राम सुरु केल्यास आरोग्य सेवा तत्परतेने उपलब्ध तर होईल. त्याशिवाय अनेकांना आरोग्याची निगा राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तपशीलवार माहिती या केंद्रांमधून मिळू शकेल. 

या सर्व घटकांचा विकास करताना वैद्यकीय पर्यटनाची वृद्धी देखील व्हायला हवी. वैद्यकीय पर्यटनाची  भरभराट झाल्यास निश्चितच आर्थिक सुबत्ता येईल. त्याशिवाय भारत जगभरात उत्तम वैद्यकीय सेवा पुरवणारा देश म्हणून उदयास येईल.

जीडीपी उत्तप्पन्नातून मिळणा-या रकमेतून २.५ टक्के गुंतवणूक आरोग्य क्षेत्रात करण्याची बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. या वाढीव तरतुदीमळे आरोग्य क्षेत्रातील विकास साधणे शक्य होणार आहे.

हा अर्थसंकल्प सर्व भारतीयांसाठी मजबूत, सर्वसमावेशक आणि अग्रेषित विचारसरणीच्या आरोग्य सेवा प्रणालीला प्रोत्साहन देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे. शिवाय या बजेटमधून आरोग्यसेवेतील सुलभता आणि समानता वाढवण्याची अनोखी संधी उपलब्ध होईल अशी आशा आहे.”

एयर इंडियातर्फे एआयवर आधारित ईझेड बुकिंग सुविधा लाँच, सफाईदार आणि वेगाने रिझर्व्हेशन करता येणार

·         ग्राहकांना वेबसाइटवर बुकिंगची प्रक्रिया वेगाने पूर्ण करता येणार असून त्यासाठी वेळखाऊ डेटा एंट्री करावी लागणार नाही किंवा वेगवेगळ्या स्क्रीन्स उघडाव्या लागणार नाहीत.

·         पायोनियर एजंटिक एआय इनोव्हेशनमुळे गुंतागुंतीची डिजिटल कामे किमान मानवी हस्तक्षेपासह पूर्ण होणार

गुरुग्राम२२ जानेवारी २०२५ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या जागतिक विमानवाहतूक कंपनीने ईझेड बुकिंग ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (एआय) आधारित सुविधा सुरू केली आहे. या सुविधेच्या मदतीने ग्राहकांना वेबसाइटवरील त्यांची रिझर्व्हेशन्स सध्याच्या तुलनेत कमी स्टेप्समध्ये आणि टेक्स्ट पाठवून किंवा एआय एजंटशी प्रवासाच्या नियोजनबद्दल बोलून करता येणार आहे.

केवळ महाराजा क्लब, एयर इंडियाच्या लॉयल्टी प्रोग्रॅमच्या सदस्यांसाठी ही सुविधा खास उपलब्ध करण्यात आली असून या सुविधेमुळे ग्राहकांना एयर इंडियाच्या airindia.com या वेबसाइटवर तिकिट बुक करता येणार आहे. बुकिंग करताना ग्राहकांना वेगवेगळ्या कमांड्सचे पालन करण्याची किंवा स्क्रीन्समधून नॅव्हिगेट करण्याची गरज भासणार नाही. ईझेड बुकिंग सुविधा एयर इंडियाच्या ग्राहकांना सुधारित व सफाईदार अनुभव देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

ईझेड बुकिंगला बुद्धीमान ‘एजंटिक एआय’ टुल्सचा पाठिंबा लाभला आहे आणि हे टुल ट्रॅव्हल एजंटप्रमाणे ग्राहकाच्या गरजा ऐकून घेत त्यानुसार प्रवासाचे नियोजन करेल. ‘एजंटिक एआय’मुळे युजर्सना गुंतागुंतीचे काम मशिन लर्निंगच्या मदतीने मानवी हस्तक्षेपाशिवाय वेगाने करता येईल, तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्णय घेणे सोपे जाईल.

एयरलाइनच्या ग्राहकांसाठी डिजिटल चॅनेल्सवरील रिझर्व्हेशन करताना पेमेंट करण्यापूर्वी व तिकिट मिळवण्यापूर्वी प्रवासाचे तपशील भरणे, उपलब्ध पर्यायांतून निवड करणे विविध स्क्रीन्समधून नॅव्हिगेशन करणे, प्रवाशांविषयी माहिती भरणे इत्यादींचा समावेश असतो. ईझेड बुकिंगद्वारे ही प्रक्रिया कमीत कमी क्लिक्सद्वारे पूर्ण केली जाईल, शिवाय वेबसाइटवरील मल्टी- स्टेप्स कमी करून पेजेसमधून नॅव्हिगेट करण्याची गरज राहाणार नाही.

ईझेड बुकिंग कशाप्रकारे काम करते –

·         सोप्या आणि कमी स्टेप्स – ग्राहकांना त्यांच्या प्रवासाविषयक गरजा सोप्या, नैसर्गिक भाषेत मांडता येतील. उदा. त्यांना ‘Give me the first flight from Delhi to Mumbai tomorrow’ किंवा ‘I need to go to Chennai from Mumbai next Thursday and return on Friday’ असे प्रवासी एजंटशी बोलल्याप्रमाणे आपल्या गरजा सांगता येतील. ईझेड बुकिंगद्वारे तत्काळ संपूर्ण नियोजन उपलब्ध केले जाईल आणि युजर्सना गरजेप्रमाणे त्यात बदल करता येतील किंवा आहे तसेच मान्य करून तिकिट मिळवण्यासाठी पेमेंट करता येईल.

·         व्हॉइस इनपुट्स: प्रवाशांना टेक्स्ट एंटर करण्याऐवजी ईझेड बुकिंगशी बोलता येईल. यामुळे प्रवासाचा हेतू मांडण्यासाठी आणखी कमी प्रयत्न लागतील आणि मानवी संवाद साधल्यासारखा वाटेल.

·         कमीत कमी कमांड्सह बदल किंवा निवडीचे पर्याय – जर प्रवाशांना त्यांना देण्यात आलेले नियोजन पसंत नसेल, तर त्यांना अतिरिक्त माहिती देऊन सहजपणे त्यात बदल करता येतील व हे बदल टेक्स्ट अथवा व्हॉइस कमांड्सद्वारे सांगता येतील. यामध्ये व्हिज्युअल प्रेझेंटेशन आणि टेक्स्ट किंवा व्हॉइस ड्रिव्हनचे समीकरण साधल्यामुळे रिझर्व्हेशनची प्रक्रिया वेगवान होते. पर्यायाने ग्राहकाला सतत वेगवेगळ्या स्क्रीन्समधून आधी निवडलेले पर्याय परत परत भरत नॅव्हिगेट करावे लागत नाही.

‘ग्राहकांचा अनुभव उंचावण्यासाठी विकसित तंत्रज्ञानाचा लाभ करून देण्यासाठी व त्यांना सफाईदार व इंटेलिजंट डिजिटल इंटरफेज पुरवण्याच्या हेतूने आम्ही आमच्या वेबसाइटवर ईझेड बुकिंग उपलब्ध केले आहे. सुरुवातीला ही सुविधा लॉयल्टी प्रोग्रॅमच्या सदस्यांसाठी असेल. या क्षेत्रात सध्या आघाडीवर असलेल्या या उपक्रमाच्या मदतीने आम्ही आमच्या सर्व डिजिटल चॅनेल्सवर उदयोन्मुख ‘एजंटिक एआय’ क्षमता उपलब्ध करण्याच्या दिशेने प्राथमिक पावले उचलत आहोत. आम्हाला आशा आहे, की प्रवासी या सोप्या, वेगवान आणि सोयीस्कर ईझेड बुकिंग प्रक्रियेचा आनंद घेतील. या सुविधेमुळे आमच्या डिजिटल चॅनेल्सचे अस्तित्व आणखी मजबूत होईल,’ असे एयर इंडियाचे प्रमुख डिजिटल आणि तंत्रज्ञान अधिकारी डॉ. सत्या रामास्वामी म्हणाले.

अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या वापराचा एयर इंडियाला असलेला अनुभव ईझेड बुकिंग प्रक्रिया ग्राहकस्नेही करण्यात महत्त्वाचा ठरत आहे. ईझेड बुकिंग संकल्पनेच्या डिझाइनचे पेटंट प्रलंबित असून त्याला नुकताच ‘रेड डॉट डिझाइन कॉन्सेप्ट’चा पुरस्कार मिळाला असून तो सिंगापूरच्या रेड डॉट डिझाइन म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे.

ईझेड बुकिंगमुळे एयर इंडियाच्या ऑनलाइन ग्राहकांचा अनुभव उंचावणार असून त्यांना मे २०२३ मध्ये लाँच करण्यात आलेल्या एयर इंडियाच्या नाविन्यपूर्ण एआय- ड्रिव्हन चॅटबॉट ‘AI.g’ चा लाभ घेता येणार आहे. जागतिक विमान उद्योगाच्या पहिल्या जनरेटिव्ह एआय चॅटबॉटने ‘AI.g’ ने आतापर्यंत ७ दशलक्ष प्रवाशांच्या शंकांचे निरसन केले आहे. त्यात दररोज वेगवेगळ्या विषयांशी संबंधित ५०,००० प्रश्नांचा समावेश आहे. या चॅटबॉटमध्ये स्वायत्तपणे तब्बल ९७ टक्के प्रश्नांची उत्तरे दिली जातात, तर केवळ ३ टक्के प्रश्न मानवी एजंट्सकडे पाठवली जातात.

प्रवाशांना महाराजा क्लब वेबसाइटवर www.airindia.com लॉग इन केल्यावर टॉप नॅव्हिगेशन बारमध्ये ईझेड बुकिंग सुविधा दिसेल. एयर इंडियातर्फे पुढील काही आठवड्यांत ईझेड बुकिंग सुविधा मोबाइल वेबसाइट आणि मोबाइल अपवरही लाँच केले जाणार आहे.

टाटा टेक्नॉलॉजीजने जनरेटिव्ह एआयवर लक्ष केंद्रित केलेल्या इनोव्हेंट २०२४ च्या विजेत्यांची केली घोषणा

·         जून २०२४ मध्ये सुरू झालेल्या टाटा टेक्नॉलॉजीज इनोव्हेंटने, मायक्रोसॉफ्ट आणि टाटा मोटर्सच्या सहकार्याने, भारतातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना जनरेटिव्ह एआयचा वापर करून उत्पादन मूल्य साखळीत नवीन उपाय शोधण्यासाठी प्रेरित केले.

·         या हॅकॅथॉनमध्ये २६७ महाविद्यालयातील ९,३८९ विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग नोंदवला, ज्यामुळे २,५१६ अद्वितीय प्रकल्पांची निर्मिती झाली. हॅकॅथॉनचा समारोप २२ जानेवारी २०२५ रोजी टाटा टेक्नोलॉजीजच्या हिंजवडी, पुणे कॅम्पसमध्ये आयोजित डेमो डेच्या माध्यमातून संपन्न झाला.

·         पहिल्या तीन संघांना एकूण ४.५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले, तर डेमो डेमध्ये सहभागी झालेल्या ३९ अंतिम स्पर्धकांना करिअरच्या संधी देण्यात आल्या.

·         टाटा टेक्नॉलॉजीज बिझनेस एक्सलन्स टीम आणि एसएमई (विषय तज्ञ) यांनी ११०० तासांहून अधिक जनरेटिव्ह एआय इनोव्हेशन प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची सुविधा दिली जेणेकरून प्रकल्प टीम/टिमला वास्तविक जगातील अनुप्रयोगांसाठी त्यांच्या कल्पनांचा विस्तार करण्यास मदत होईल.

पुणे २२ जानेवारी २०२५:

टाटा टेक्नोलॉजीज, एक जागतिक उत्पाद अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवांची कंपनी, यांनी टाटा टेक्नोलॉजीज इनोवेंट हॅकाथॉनच्या दुसऱ्या पर्वाच्या यशस्वी समारोपाची घोषणा केली. जनरेटिव्ह एआयचा लाभ घेण्यावर लक्ष केंद्रित करून या हॅकाथॉनचे आयोजन मायक्रोसॉफ्ट आणि टाटा मोटर्सच्या सहकार्याने करण्यात आले होते. या हॅकाथॉनचा उद्देश भारतातील तरुण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना एक असे व्यासपीठ प्रदान करणे होता, जिथे ते उत्पादन क्षेत्रातील वा वास्तविक-जगातील आव्हानांना उत्तर देणाऱ्या उपाययोजना सादर करू शकतील. हा उपक्रम शैक्षणिक समुदायासोबतच्या कंपनीच्या सहभागामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो संपूर्ण भारतातील तरुण अभियांत्रिकी प्रतिभांमध्ये नवकल्पना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतो आणि तरुणांसाठी अधिक चांगले करिअर घडवण्यास मदत होते. पहिल्या दहा संघांनी पुण्याच्या हिंजवडी येथील टाटा टेक्नोलॉजीजच्या मुख्यालयात डेमो डे मध्ये सहभाग घेतला, जिथे त्यांनी त्यांचे नाविन्यपूर्ण प्रोटोटाइप सादर केले आणि प्रेक्षकांना प्रभावित केले. अंतिम मूल्यांकन एक प्रतिष्ठित निर्णायक मंडळाने केले, ज्यामध्ये टाटा टेक्नोलॉजीजचे सीईओ आणि एमडी श्री वॉरेन हॅरिस, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री स्वेन पटुश्का, मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक – उत्पादन आणि समूह श्री प्रवीण पंचाग्नुला आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुण्याचे कुलगुरू प्रा. सुनील भिरुद यांचा समावेश होता. टाटा सन्समधील ग्रुप इनोव्हेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. रवी अरोरा यांनी ज्युरींना मार्गदर्शन केले.

चंदीगड विद्यापीठ, मोहाली मधील विजेता संघ, कोडझेफायर, यांना अभियांत्रिकी उत्कृष्टतेसाठी शाश्वत साहित्य एकत्रीकरणासाठी ₹300,000 चे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी पटियाला येथील स्पॅनगिट कोडरला कारमधील सुरक्षित अनुभवासाठी एआयचालित आवाज रद्द करण्यासाठी ₹100,000 रोख बक्षीस मिळाले, आणि दुसरे पारितोषिक मिळाले. ₹50,000 चे तिसरे पारितोषिक प्लुटोला, श्री कृष्णा कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोईम्बतूर कडून त्यांच्या जनरेटिव्ह एआय साठी नेक्स्टजनरेशन इंटरएक्टिव्ह ग्राहक समर्थनासाठी देण्यात आले. मणिपाल युनिव्हर्सिटी जयपूर कडून हॅक्सएस ला त्यांच्या ऑटोमोटिव्ह उत्पादनासाठी एआय –चालित दोष विश्लेषणासाठी विशेष ज्युरी मान्यता प्रदान करण्यात आली. त्यांच्या प्रतिभेला आणि नवोन्मेषाला मान्यता देऊन, टाटा टेक्नॉलॉजीजने टॉप १० टीममधील ३९ टीम सदस्यांना त्यांचे अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर कंपनीसोबत त्यांचे करिअर सुरू करण्याची संधी दिली, तसेच त्यांचे प्रकल्प वाढवत राहण्यासाठी सशुल्क इंटर्नशिपची संधी देखील दिली.

टाटा टेक्नोलॉजीज इनोवेंट डेमो डे सन्मान समारंभात टाटा टेक्नोलॉजीजचे सीईओ आणि एमडीश्री वॉरेन हॅरिस म्हणाले: “टाटा टेक्नोलॉजीजचे दूरदृष्टीकोन ‘इंजीनियरिंगएबेटरवर्ल्ड’ आमच्या संपूर्ण इकोसिस्टमसोबत, ज्यामध्ये शैक्षणिक समुदाय देखील समाविष्ट आहे, सहकार्य करत स्मार्ट आणि शाश्वत ई-मोबिलिटी उपाय विकसित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला प्रतिबिंबित करते. मायक्रोसॉफ्ट आणि टाटा मोटर्ससोबतच्या सहकार्याच्या माध्यमातून, आम्ही विद्यार्थ्यांसाठी वास्तव जगातील आव्हानांची ओळख पटवली, ज्यांना जेनरेटिव एआयचा वापर करून नवीन उपाय विकसित करून सोडवले जाऊ शकते. मी या नवकल्पकांनी या समस्यांसाठी सुलभ आणि किफायतशीर उपाय लागू करण्याच्या पद्धतीने प्रेरित झालो आहे, ज्यामध्ये पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानासह उत्कृष्ट मानवी सर्जनशीलतेचा समावेश आहे. आम्ही शीर्ष टीम्सना त्यांच्या प्रकल्पांना पुढे नेण्यासाठी मदत करू.”

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री स्वेन पटुश्का यांनी इनोवेंट डेमो डेच्या शेवटी आपला उत्साह व्यक्त केला: “मी ऑटोमोटिव व्हॅल्यू चेनमध्ये जेन एआयच्या उदयोन्मुख अनुप्रयोगांमुळे खूप रोमांचित आहे. डेमो डेवर युवा नवकल्पकांनी दाखवलेली सर्जनशीलता विलक्षण प्रेरणादायी आहे. टाटा टेक्नोलॉजीजसोबत, मी या प्रकल्पांपैकी काहींचे वास्तविक जगातील अनुप्रयोगांसाठी समर्थन करण्यासाठी उत्सुक आहे.”

श्रीप्रविण पांचाग्णुलाकार्यकारी संचालक – मॅन्युफॅक्चरिंग आणि कंग्लोमरेट्समायक्रोसॉफ्ट म्हणाले, “टाटा टेक्नॉलॉजीजसोबत, उद्योगात AI-चालित परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी आपल्या अभियांत्रिकी प्रतिभेला सक्षम बनवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. मायक्रोसॉफ्टमध्ये, आम्ही सर्जनशीलता, सहकार्य आणि सातत्यपूर्ण शिक्षणाला महत्त्व देतो. इनोव्हेंट हॅकाथॉनमध्ये तरुण नवोपक्रमकर्त्यांनी जनरेटिव्ह एआय आणि मायक्रोसॉफ्ट अझ्युरच्या सहाय्यक परिसंस्थेचा उपयोग करून उत्पादन क्षेत्रासाठी प्रभावी उपाय तयार करण्याची क्षमता उघडताना पाहणे खरोखरच प्रेरणादायक आहे.”

युवा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रमाची संस्कृती वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, टाटा टेक्नोलॉजीजचे अध्यक्ष आणि मार्केटिंग आणि बिझनेस एक्सलन्सचे जागतिक प्रमुख श्री संतोष सिंह म्हणाले: “आजचे विद्यार्थी आज आणि उद्याच्या आव्हानांवर उपाय शोधतील. टाटा टेक्नोलॉजीजमध्ये, आम्ही नवोपक्रमाची संस्कृती प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणांना जेन एआयसारख्या भविष्यासाठी तयार कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी वचनबद्ध आहोत, ज्यामुळे ते आपले करिअर घडवू शकतील आणि सॉफ्टवेअर-डिफाइंड भविष्याची निर्मिती करू शकतील. या तरुण नवोपक्रमकांनी दाखवलेला उत्साह आणि सर्जनशीलता आमच्या अपेक्षांपेक्षा अधिक होती, ज्यामुळे सर्वांसाठी एक चांगल्या जगाच्या निर्मितीत नवोपक्रमाच्या सामर्थ्यावर आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. आम्हाला आनंद आहे की आम्ही सर्व फायनलिस्टना नोकरीच्या संधी देऊ शकलो आणि भारतातील जेन एआय उत्साही लोकांची संख्या वाढवण्यासाठी मदत करू शकलो.”

टाटा टेक्नोलॉजीज विजेता टीमों को हार्दिक शुभेच्छा देते आणि सर्व सहभागींचे त्यांच्या उल्लेखनीय जनरल एआय नवकल्पनांसाठी आभार व्यक्त करते, ज्यामुळे टाटा टेक्नोलॉजीज इनोवेंट हॅकाथॉनच्या दुसऱ्या संस्करणाला भव्य यश मिळाले.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात लाखाचा टप्पा ओलांडला

मुंबई, दिनांक २२ जानेवारी, २०२५-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने बुधवारी एक लाख घरांचा टप्पा ओलांडला, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून वीज निर्माण केली जाते. घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज महावितरणच्या जाळ्यात पाठवून उत्पन्नही मिळते. छतावर सौर ऊर्जा पॅनेल्स बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन किलोवॅटला 78 हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान मिळते.

घरगुती ग्राहकांच्या मदतीसाठी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही योजना सुरू केली होती. राज्यात दि. 21 जानेवारीअखेर या योजनेत एकूण 1,00,700 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसविले गेले. त्यामध्ये 392 मेगावॅटची क्षमता निर्माण झाली व ग्राहकांना 783 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले. दि. 21 जानेवारी रोजी एका दिवसात 1195 घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले.

राज्यात नागपूर जिल्ह्याने सर्वाधिक 16,949 घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. पुणे (7931 घरे), जळगाव (7514 घरे), छत्रपती संभाजीनगर (7008 घरे), नाशिक (6626 घरे), अमरावती (5795 घरे) आणि कोल्हापूर (5024 घरे) हे जिल्हे योजनेचा लाभ घेण्यात आघाडीवर आहेत.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. या योजनेतील ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. त्यांना केंद्र सरकारकडून एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेसाठी साठ हजार रुपये तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी 78 हजार रुपये थेट अनुदान मिळते.

घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविता यावा यासाठी बँकांकडून माफत व्याजदरात कर्ज उपलब्ध केले जात आहे तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे.

शहरातील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

पुणे, दि. २२: वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील विविध वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

या आदेशानुसार कोथरुड वाहतूक विभागांतर्गत मीनाताई ठाकरे कमान लेनच्या सुरुवातीपासून ते संकल्प व सिद्धी को. ऑप. हौसींग सोसायटीदरम्यानच्या रस्त्यावर १०० मीटर दोन्ही बाजूस ‘नो पार्कीग झोन’ करण्यात येत आहे. माई मंगेशकर मार्गावर मीनल गार्डन सोसायटी मुख्यद्वार ते श्रीकृष्ण सोसायटीदरम्यान दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ‘नो पार्कीग झोन’ करण्यात येत आहे.

बाणेर वाहतूक विभागांतर्गत पॅनकार्ड लेन बालेवाडी कॅनल रस्ता ते हॉटेल स्प्रिंग ओनियन दरम्यान दोन्ही बाजूस पी-१, पी-२ पार्किंग करणेत येत आहे. डेक्कन वाहतूक विभागांतर्गत कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयाच्या बाहेर पडण्याच्या द्वारापासून ते विमलाबाई गरवारे शाळेचे प्रवेशद्वारापर्यंत १०० मीटर पर्यंत नो-पार्कीग झोन करण्यात येत आहे.

भारती विद्यपीठ वाहतूक विभागांतर्गत कदम प्लाझापासून लेक टाऊनकडे (बिबवेवाडी) जाणाऱ्या सेवा रस्त्यावर रामनाथ स्वीट्स समोरील भिंतीपासून ते ग्रीन पार्क बिल्डिंग (पिझ्झा हट समोरील) भिंतीपर्यंत (१७६ मीटर) दोन्ही बाजुस सर्व प्रकारच्या वाहनांना ‘नो पार्कीग झोन’ करण्यात येत आहे.

पार्किंग व्यवस्था बदलाबाबतच्या या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, एअरपोर्ट रोड, पुणे यांच्या कार्यालयात ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुखपदी डॉ. भावार्थ देखणे

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पालखी सोहळा प्रमुखपदी डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांची निवड करण्यात आली आहे. पालखी सोहळाप्रमुखपदी निवड झालेले डॉ. भावार्थ हे सर्वात युवा विश्वस्त आहेत.
आळंदी येथे नुकत्याच झालेल्या संस्था पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉ. देखणे यांची पालखी सोहळाप्रमुखपदी तर योगी निरंजननाथ यांची विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे. डॉ. देखणे आणि योगी निरंजन नाथ यांच्या नावाची घोषणा संस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांनी केली.
डॉ. देखणे, ॲड. उमाप व योगी निरंजन नाथ यांची गत वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या विश्वस्तपदी निवड झाली होती. ॲड. उमाप यांनी प्रमुख विश्वस्त म्हणून तर योगी निरंजन नाथ यांनी पालखी सोहळा प्रमुख म्हणून कार्यरत होते.
योगी निरंजन नाथ आणि डॉ. भावार्थ देखणे यांची नेमणूक झाल्याची माहिती ॲड. उमाप व संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी कळविली आहे. डॉ. देखणे यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. देखणे घराण्याची ओळख म्हणजे भारुड. सुप्रसिद्ध भारुडकार डॉ. रामचंद्र देखणे यांची भारुडाची परंपरा डॉ. भावार्थ देखणे जपत आहेत व पुढे नेत आहेत.
वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार व व्याख्याते म्हणून डॉ. भावार्थ देखणे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. योगी निरंजन नाथ यांनी योगी शांतीनाथ यांच्याकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली आहे. एक साधक म्हणून त्यांनी अनेक वर्षे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात सेवा रुजू केली आहे.

‘शिवदुर्ग संवर्धन मोहिमे’अंतर्गततिकोणा गडावर श्रमदान

पुणे, २२ जानेवारी : ‘श्री. शिवदुर्ग संवर्धन मोहिमे’ अंतर्गत गोखले नगर परिसरातील सुयोग मित्र मंडळ आणि विशाल मित्र मंडळ यांनी तिकोणा गडावर श्रमदान केले.

पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, माती व दगडांमध्ये ताल रचणे आणि बुरुज व पायऱ्यांची साफसफाई अशा प्रकारची श्रमदानाची कामे करण्यात आली.

श्री. शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने सुरक्षिततेसाठी गडावर सौरऊर्जेवर कार्यान्वित होणारा सी. सी. टी. व्ही. पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मुकेश पवार यांनी दिली.

मुकेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश नेलगे, सचिन दगडे, निरंजन बहिरट, आकाश मारणे, आशिष माने, महेंद्र पवार, अविनाश देशमुख यांनी संयोजन केले.

कोथरूडमधील भाग्यश्री अपार्टमेंट सौर ऊर्जेवर;पुणे जिल्ह्यात पहिल्या ‘सौर’ अपार्टमेंटचा मान

• सर्वच फ्लॅट ‘सौर’वर • मासिक वीजबिल शून्यावर

पुणे, दि. २२ जानेवारी २०२५: सर्व घरगुती व कॉमन वीजजोडण्यांसाठी ३० किलोवॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून कोथरूडमधील भाग्यश्री अपार्टमेंटने पुणे परिमंडलात पहिल्या ‘सौर’ अपार्टमेंटचा मान मिळविला आहे. या अपार्टमेंटमधील सर्व वीजग्राहकांचे मासिक बिल शून्यावर आले असून त्यांचा दरमहा ३५ हजार रुपयांचा फायदा होत आहे. सोबतच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून या ग्राहकांना ५ लाख ५४ हजार रुपयांचे अनुदान देखील मिळाले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री ना. श्री. मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते भाग्यश्री अपार्टमेंटचे रहिवासी आनंद देशपांडे, मंदार देशमुख, सतीश आठवले यांचा नुकताच प्रातिनिधिक गौरव करण्यात आला. यावेळी आमदार श्री. सिद्धार्थ शिरोळे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता विजय फुंदे यांची उपस्थिती होती.

       कोथरूडमधील रामबाग कॉलनीत असलेल्या भाग्यश्री अपार्टमेंटमध्ये एकूण १० सदनिका आहेत. दोन वर्षांपूर्वी लिफ्ट, पाण्याचा पम्प आणि दिव्यांसाठी असलेल्या थ्री फेज वीजजोडणीसाठी इमारतीच्या छतावर ११ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पामुळे दरमहा १५ ते १६ हजार रुपयांचे वीजबिल शून्यवत झाले. तर गेल्या ऑगस्टपासून महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. राजेश काळे, शाखा अभियंता श्री. आशुतोष थोरात, जनमित्र कैलास मडावी, कार्यालयीन सहायक विजय त्रिंबके यांनी या अपार्टमेंटमधील प्रत्येक सदनिकेसाठी पीएम सूर्यघर योजनेतून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.

भाग्यश्री अपार्टमेंटकडून प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सौर एजन्सीचे श्री. दीपक कोटकर यांनीही सहकार्य केले. अपार्टमेंटच्या छतावर सौर पॅनेल्सच्या जागेची पाहणी करण्यात आली. यात १० सदनिकांच्या वीजजोडण्यांचा मंजूर वीजभार ८१ किलोवॅट असला तरी छतावरील जागेच्या मर्यादेमुळे १९ किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाची उभारणी शक्य होईल असे दिसून आले. त्यानंतर मासिक वीजवापरानुसार ४ सदनिकांसाठी प्रत्येकी १ किलोवॅट, ३ सदनिकांसाठी प्रत्येकी २ किलोवॅट आणि ३ सदनिकांसाठी प्रत्येकी ३ किलोवॅटचे छतावरील सौर प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे केवळ महिन्याभरात १९ किलोवॅट क्षमतेचे छतावरील १० सौर प्रकल्प उभारण्यात आले.

‘सर्व सदनिकाधारकांच्या सकारात्मक निर्णयामुळे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घेता आला व दरमहा वीजबिल शून्य झाले आहे. या सौर प्रकल्पांसाठी १५ लाख ७१ हजार रुपयांचा खर्च आला. त्यातील ५ लाख ५४ हजार ५२० रुपयांचे अनुदान महिन्याच्या आतच प्राप्त झाले व उर्वरित प्रकल्पाचा खर्च शून्य वीजबिलांमुळे येत्या ४ वर्षांत भरून निघेल याचा आम्हाला आनंद आहे’ असे भाग्यश्री अपार्टमेंटचे श्री. मंदार देशमुख यांनी सांगितले.

श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल– ‘प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी प्राप्त १८ हजार ६४० अर्जांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यापैकी २८.९ मेगावॅटचे ५ हजार ८५३ छतावरील सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहे. हरित उर्जेवरील राज्यात पहिले विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन पुण्यात झाले. तसेच टेकवडी (ता. खेड) गावाने राज्यात दुसरे ‘सौरग्राम’ म्हणून मान मिळवला. आता भाग्यश्री अपार्टमेंटने देखील सर्व वीजजोडण्यांसाठी सौर ऊर्जेचा पर्याय निवडला. हा आदर्श इतरही ग्रामपंचायती, सोसायट्या, अपार्टमेंटमधील वीजग्राहक ठेवतील असा विश्वास आहे’.