Home Blog Page 490

1,500 कोटी रु.च्या हॉरिझॉन्टल टाउनशिप प्रकल्पासह अरविंद स्मार्टस्पेसेसचा मुंबई महानगर क्षेत्र (MMR) मध्ये प्रवेश

मुंबई 3.0 मध्ये 92 एकर क्षेत्रातील संयुक्त विकास प्रकल्प
सच डेव्हलपर्स या प्रकल्पासाठी जमीन भागीदार आहेत.

मुंबई२४ जानेवारी, २०२५: भारतातील आघाडीची रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी अरविंद स्मार्टस्पेसेस लिमिटेड (ASL) कंपनीने मुंबई महानगर क्षेत्र (MMR) मध्ये सुमारे ~92 एकर एकूण क्षेत्रफळ असलेल्या आणि सुमारे 1,500 कोटी रु. च्या टॉप-लाइन क्षमतेच्या मोठ्या हॉरिझॉन्टल मल्टीयूज प्रकल्पासाठी करार केला असल्याचे आज जाहीर केले. हा प्रकल्प खोपोली, मुंबई 3.0 जवळ आहे आणि हा कंपनीचा MMR प्रदेशातील पहिला प्रकल्प आहे. हा प्रकल्प संयुक्त विकास मॉडेल (70.5% महसूल वाटा) अंतर्गत असून त्यायोगे कमी भांडवली तीव्रता आणि उच्च परतावा मिळतो.

मुंबई 3.0 हे हॉरिझॉन्टल विकासासाठी, विशेषतः प्लॉट्स आणि व्हिलांसाठी प्रमुख स्थळ म्हणून उदयास येत आहे. अटल सेतू आणि JNPT पोर्टसारख्या परिवर्तनशील पायाभूत प्रकल्पांनी याला आणखी चालना मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राचे (MMR) स्वरूप बदलत आहे. याशिवाय, आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर, मुंबई-पुणे-MTHL इंटरचेंज आणि इतर महत्त्वाचे पायाभूत सुधारणा प्रकल्प हे कनेक्टिव्हिटीला लक्षणीय बळकटी प्रदान करतील. त्यामुळे मुंबई 3.0 ला प्रमुख आर्थिक केंद्रांशी जोडत प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

हा प्रकल्प परिसरातील पहिला मोठ्या प्रमाणातील हॉरिझॉन्टल प्रकल्प म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये गोल्फ कोर्स आणि मोठे क्लबहाउस यासारख्या सुविधा समाविष्ट असतील. आधुनिक, समकालीन हॉरिझॉन्टल विकास स्मार्ट, सुरक्षित आणि आलिशान जीवनशैलीची इच्छा पूर्ण करतो, तसेच सामाजिक सुरक्षितता, एकत्र समुदायाची भावना जोपासतो. या विकासाच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये डिझाइनवर खोलवर लक्ष केंद्रित करणे, आधुनिक सुविधा, कमी गर्दी असलेल्या मनोरंजन सुविधांचे नियोजन, प्रीमियम कस्टमायझेशन्स आणि विस्तीर्ण हरित क्षेत्र असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना उन्नत जीवनशैली अनुभवता येईल.

या विकासावर भाष्य करताना अरविंद स्मार्टस्पेसेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कमल सिंगल म्हणाले, “मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारपेठेमध्ये आमच्या प्रवेशाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. यातून आमच्या विकासाच्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. MMR प्लॉटेड/व्हिला मार्केटमधील मोठ्या संधीबद्दल आम्हाला खात्री असून  आमचा हॉरिझॉन्टल मूल्य प्रस्ताव तिथे सादर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

MMR मध्ये प्रवेश करणे हे गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील संतुलित भौगोलिक विविधतेच्या आमच्या धोरणाला बळकटी देते. डिझाइन, गुणवत्ता आणि मूल्य निर्मिती यांसारख्या आमच्या ब्रँड मूल्यांशी सुसंगत असलेला एक लँडमार्क प्रकल्प मुंबईत वितरित करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. हा प्रकल्प ASL च्या MMR प्रवासात तसेच प्रदेशातील हॉरिझॉन्टल विकासाच्या पटलावर महत्त्वाची भूमिका बजावेल.या संपादनासह, चालू वर्षासाठी एकत्रित नवीन व्यवसाय विकासाच्या टॉपलाइन क्षमतेची किंमत  2,500 कोटी रु. वर पोहोचली आहे. पुढील तिमाहीत, आम्ही MMR आणि अहमदाबाद आणि बंगळुरू यांसह आम्ही निश्चित केलेल्या बाजारपेठांमध्ये अधिकाधिक प्रकल्पांची भर घालण्यासाठी प्रयत्न  करत आहे.”

JLL इंडिया चे पश्चिम व उत्तर प्रदेश भांडवल बाजार प्रमुख निशांत काबरा म्हणाले, “उद्योगातील एकत्रीकरण आणि सुव्यवस्थित नियामक चौकटीच्या संगमामुळे अरविंद स्मार्टस्पेसेससारख्या चांगल्या भांडवलाच्या ब्रँडेड विकसकांसाठी MMR बाजारपेठेमध्ये स्थान मिळविण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.”JLL इंडिया या प्रकल्पासाठी विशेष जमीन व्यवहार सल्लागार होते.

अहिल्याबाई होळकर आणि राणी दुर्गावती यांना मानवंदना देण्यासाठी महिलांचे भव्य पथसंचलन

विश्व हिंदू परिषद मातृशक्ती आणि दुर्गावाहिनीच्या वतीने  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राणी दुर्गावती यांच्या  जयंतीनिमित्त आयोजन
पुणे:  विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी आणि मातृशक्ती यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राणी दुर्गावती यांना मानवंदना देण्यासाठी भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथून पथसंचलनाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती संयोजिका प्रिया रसाळ आणि सोनाली नाथ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी दुर्गावाहिनी शक्ती साधना प्रमुख समृद्धी सराफ यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 प्रिया रसाळ म्हणाल्या, भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या जन्माला तीनशे वर्षे पूर्ण होणार आहेत,त्यांनी आपल्या साठी केलेले कार्य आणि महिला म्हणून समाजकार्यात दिलेले योगदान, मंदिराची,घाटाची स्थापना त्यांनी केली यातून  त्याची धर्माबाबत असणारे प्रेम,आणि त्याच्या हातात असणारे शिवलिंग हे सुध्दा आपल्याला त्यांची श्रध्दा दर्शवते.
यंदाच्याच वर्षी राणी दुर्गावती यांच्या जयंतीला पाचशे वर्षे पूर्ण होणार आहेत. राणी दुर्गावती या गोंडवाना क्षेत्राच्या राणी होत्या. राणी दुर्गादेवी यांचा इतिहास झाशीच्या राणी प्रमाणे आहे . त्या वीर रणांगना होत्या. त्यांनी अनेक वर्ष मुघलांबरोबर लढा दिला अशा या धर्मरक्षक ,शासक, धाडसी, आणि समाजसेवक विरांगना चा आदर्श समोर ठेवून त्याच्या कार्याला उजाळा देण्यासाठी तसेच ते संस्कार आपल्या भावी पिढीवर रुजवण्यासाठी आणि मुलींमध्ये शौर्य निर्माण करण्यासाठी मानवंदना पथसंचलन होणार आहे.

सोनाली नाथ म्हणाल्या, अश्याच प्रकारचे मानवंदना संचलन विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी मातृशक्ती च्या माध्यमातून देश भरात होत आहे. पथसंचलनात सहभागी तरुणींसाठी पांढरा ड्रेस भगवी ओढणी तर महिलांसाठी भगवी साडी असा पोशाख ठरवण्यात आला आहे. राष्ट्रीयत्वाचा मान राखणारा तिरंगा आणि परमपवित्र भगवा ध्वज सोबत घेऊनच हे संचलन पार पडणार आहे. संचलन झाल्यानंतर राष्ट्रीय वक्ता ह.भ.प. कृतिका दीदी  कदम ह्या मार्गदर्शन करणार आहेत. 
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंजपेठ-महात्मा फुले वाडा-मासे आळी-मिठगंज पोलीस चौकी-शितळादेवी चौक-जैन मंदिर चौक-सुभान शहा दर्गा चौक- रांका ज्वेलर्स-कस्तुरे चौक-श्रमदान मारुती मंडळ- क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे तालीम मार्गे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे समारोप असा मानवंदना संचलन मार्ग आहे.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण तसेच अन्य कार्यकारणी, दुर्गावाहिनीच्या दुर्गा, मातृशक्तीच्या मातृ, पुणे पश्चिम आणि पूर्व विभागाचे पदाधिकारी, तसेच शहरातील असंख्य कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. पुणे शहरामध्ये अशा प्रकारचे हे बहुधा पहिलेच संचालन आहे. त्यामुळे स्त्रीशक्तीचा जागर आणि प्रदर्शन अनुभवण्याकरता पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संचलनात सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

क्रीडा अधिकारी पदाबाबत महापालिका सेवा प्रवेश नियमावलीला हरताळ! महापालिका कर्मचाऱ्यांवर अन्याय

पुणे– महापालिकेत गेल्या काही दिवसापासून रितसर सेवा प्रवेश नियम डावलले जात असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी देखील याला कुठलाही विरोध करत नाहीत. यामुळे मात्र महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे चित्र आहे. अशा गोष्टीवर वेळीच तोडगा नाही काढला तर कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत राहील, अशी चर्चा आता महापालिका वर्तुळात सुरू आहे.

असाच प्रकार क्रीडा अधिकारी (वर्ग २) या पदावरून सुरू आहे. महापालिकेत याची दोन पदे रिक्त आहेत. या पदाच्या आकृतीबंध नुसार यातील एक जागा ही सरळसेवा किंवा नामनिर्देशन ने भरणे बंधनकारक आहे. तर एक जागा ही पदोन्नती ने भरणे बंधनकारक आहे. असे असताना देखील या दोन्ही जागा नामनिर्देशन अनुसार भरण्याचा घाट घातला गेला आहे.
राज्य सरकारने महापालिकेला आदेशित केले आहे की, शिवराज राक्षे आणि रेश्मा पुणेकर या दोघांना क्रीडा अधिकारी या पदावर नियुक्ती द्यावी. मात्र याला कर्मचारी निवड समितीने हरकत घेतली होती. नियमानुसार असे करता येणार नाही, त्यामुळे याबाबत राज्य सरकारनचे मार्गदर्शन घ्यावे, अशी शिफारस समितीने केली होती. मात्र प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही शिफारस लक्षात न घेता क्रीडा समिती आणि मुख्य सभेत या बाबतचा प्रस्ताव मान्य करून घेतला आहे.

यामुळे महापालिका कर्मचारी जे पदोन्नती मिळण्याची वाट पाहून आहेत, त्यांच्यावर होणार आहे. त्यांना आता आहे त्याच पदावर काम करावे लागणार आहे. पदोन्नती ची संधी त्यांच्या हातून निसटणार आहे. दरम्यान याबाबत कर्मचारी संघटनेने देखील विरोध केला होता, असे असताना देखील या नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर कर्मचारी नाराज आहेत. कर्मचाऱ्यांनी कोर्टाची पायरी चढण्याची देखील तयारी केली आहे.

लोकशाही रक्षणासाठी नाना पटोले नागपूरमध्ये, पृथ्वीराज चव्हाण मुंबईत, बाळासाहेब थोरात नाशिक तर विजय वडेट्टीवार यवतमाळ मध्ये आंदोलन करणार.

पुण्यात कोण करणार कोणालाच नाही ठाऊक …

मुंबई, दि.२४ जानेवारी २०२५
भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने विधान सभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. भाजपा व निवडणुक आयोगाची ही अभद्र युती लोकशाहीला कलंक लावणारी आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष शनिवारी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजपाने निवडणुक आयोगाच्या मदतीने घोटळा केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५० लाख मतदार कसे वाढले? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर रात्रीच्या अंधारात ७६ लाख मतदान कसे वाढले? याचे पुरावे निवडणूक आयोग देत नाही. राज्यात आलेले सरकार आपल्या मताचे नाही अशी जनभावना निर्माण झाली असून मतदान मतपत्रिकेवरच घ्यावे अशी मागणी जनतेतूनच येत आहे. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभार थांबला पाहिजे, निवडणूका या निष्पक्ष, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पाडल्या पाहिजेत यासाठी काँग्रेस राष्ट्रीय मतदार दिनी दिवशी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.

उद्याच्या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे नेते आमदार खासदार, माजी आमदार खासदार, जिल्हा पदाधिकारी, विभाग व सेलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

नोट- आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रमुख नेत्यांची यादी सोबत जोडली आहे.

मद्य कंपन्यांशी करार करुन महाराष्ट्राला ‘दारुराष्ट्र’ करायचे आहे का ?

‘बुक माय शो’, ‘हिरानंदानी’शी करार करून सरकार काळाबाजारी व गुन्हेगारीला प्रोत्साहन देत आहे का ?

मुंबई, दि. २४ जानेवारी २०२५
दावोसमध्ये ६१ कंपन्यांशी केलेल्या करारातून १५.७० लाख कोटींची गुंतवणूक व १५.९५ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात मोठी गुंतवणूक आली तर त्याचे स्वागतच केले पाहिजे पण केलेले करार व वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. याआधीही असेच मोठे करार झालेले आहेत म्हणून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारने दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्रात आतापर्यंत आणलेली गुंतवणूक व त्यातून निर्माण झालेले रोजगार यावर एक श्वेतपत्रिका काढावी, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

टिळक भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, दावोसमध्ये फडणवीस यांनी करार केलेल्या ६१ कंपन्यांमधील ५१ कंपन्या भारतातीलच आहेत, यातील ४३ कंपन्या मुंबई-पुण्याच्या, तर काही कंपन्यांची कार्यालये मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावरच आहेत फक्त दहा कंपन्या विदेशातील आहेत. सिडको आणि बुक माय शो यांच्या मध्ये दावोस येथे १५०० कोटी रूपयांचा करार करण्यात आला. कोल्ड प्ले च्या तिकीट विक्रीचा काळाबाजार केल्याप्रकरणी बुक माय शो ची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. तर बोगस कागदपत्रे तयार करून पवईतील जयभीम नगरमध्ये तोडक कारवाई केल्याप्रकरणी चौकशी सुरु असलेल्या हिरानंदानी कंपनीसोबतही सरकारने करार केला आहे. तसेच या कंपनीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआय चौकशीही सुरु आहे. गुन्हेगार कंपन्यांसोबत करार करून सरकार त्यांना काळाबाजार करण्याची सूट देत आहे का?

मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार केला त्यात दारु बनवणा-या हेनिकेन या कंपनीसोबत ७५० कोटी रुपयांचा करार केला आहे. तर AB in Bev या दुस-या बियर उत्पादक कंपनीसोबत १५०० कोटी रुपयांचा करार केला आहे. भारतीय संविधानातील राज्याच्या धोरणात्मक तत्त्वांच्या (DPSP) अंतर्गत अनुच्छेद ४७ मध्ये म्हटले आहे की, राज्याने आरोग्यास हानीकारक असलेल्या मादक पेये व औषधांचे वैद्यकीय कारणांशिवाय सेवन प्रतिबंधित करण्यासाठी प्रयत्न करावेत. पण भाजपा सरकार दारुच्या कंपन्यांशी करून करून महाराष्ट्राला आता दारुराष्ट्र बनवायला निघाले आहे, असे पटोले म्हणाले.
जालन्याच्या धनश्री मंधानी यांच्या प्रायम कंपनीसोबत ड्रोन तयार करण्यासाठी करार केला आहे. ही कंपनी ६००० ड्रोनचे उत्पादन करणार आहे असे सांगितले जात आहे. या कंपनीकडे १० हजार स्केवर फुट जागेवर ड्रोन उत्पादन फॅक्टरी असल्याचा दावा केला जात आहे पण प्रत्यक्षात तिथे कोणतीही फॅक्टरी नसून तेथे स्टीलचे उत्पादन केले जाते. ही कंपनी ड्रोनचे उत्पादन करत नाही तर परदेशातून पाडलेल्या ड्रोनचे पार्ट आणून त्याची फक्त असेंब्लींग करते असेही पटोले म्हणाले.
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दावोसमध्ये असताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी मुंबईत येऊन महाराष्ट्रातून ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक छत्तीसगडमध्ये घेऊन गेले हे विशेष. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव पुण्यात येऊन आपल्या राज्यातल्या उद्योजकांना भेटून मध्य प्रदेशात उद्योग घेऊन जात आहेत. सरकारने राज्यात गुंतवणूक आणावी पण दावोसमधील गुंतवणुकीच्या नावाने फसवाफसवी करू नये, असेही नाना पटोले म्हणाले.

भंडारा कंपनीतील स्फोटाची चौकशी करा.
भंडाऱ्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट होऊन ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे अशा भावना व्यक्त करून नाना पटोले यांनी मोदी सरकारच्या काळात संरक्षण क्षेत्रातील कंपन्याही सुरक्षित नाहीत, या कंपनीतील स्फोट हे मोदी सरकारचे अपयश असल्याचे म्हटले आहे. आरडीएक्स बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल या कंपनीत बनवला जातो. ही घटना गंभीर असून सर्वपक्षिय खासदारांच्या समिती मार्फत या स्फोटाची चौकशी करावी अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या घोषणेचे स्वागत..
उद्धव ठाकरेंच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या घोषणेचे स्वागत आहे. ते शिवसेना पक्षाचे प्रमुख आहेत व प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचे धोरण ठरवण्याचा अधिकार आहे त्यानुसार ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, ज्यावेळी या निवडणुका जाहिर होतील त्यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काँग्रेस पक्ष आपला निर्णय घेईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले.

अनेकतेत एकतेचे विलोभनीय दृश्य प्रस्तुत करणा-या भव्य शोभायात्रेने 58व्या निरंकारी संत समागमाचा हर्षोल्लासपूर्ण वातावरणात शुभारंभ

मानवी गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख होयसतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

पिंपरी (पुणे) 24 जानेवारी, 2025 मनुष्य रुपात जन्म प्राप्त केल्यानंतर मानवीय गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख होय असे उद्‌गार सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाध्या शुभारंभ प्रसंगी मानवतेच्या प्रति संदेश देताना व्यक्त केले.

या तीन दिवसीय संत समागमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तगण व प्रभुप्रेमी सज्जनांनी भाग घेतला आहे.सतगुरु माताजी यांनी पुढे सांगितले, की विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे सांसारिक उपलब्धिच्या बाबतीत मानवाने खूपच प्रगती आणि विस्तार केला आहे. जेव्हा सद्‌बुद्धीने युक्त होऊन या उपलब्धिचा वापर केला जातो तेव्हा तो निश्चितच मानवासाठी शांतीसुखाचे कारण बनतो. परंतु जर यांचा सदुपयोग केला नाही तर त्या उपलब्धी मानवासाठी नुकसानकारक ठरतात. ब्रह्मज्ञानाद्वारे जेव्हा परमात्म्याला जीवनात उत्तरविले जाते तेव्हा सहजपणेच मानवाला सुमती प्राप्त होते, त्याच्या मनातील आप पर भाव नाहीसा होतो आणि प्रत्येक मानवासाठी त्याच्या मनात परोपकाराचा भाव उत्पन्न होतो. मानवाने शुद्ध भावनेने या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये स्थान द्यावे ज्यायोगे प्रत्येक मानवाच्या प्रति त्याच्या मनामध्ये प्रेम व सेवेचा भाव उत्पन्न होऊ शकेल .

तत्पूर्वी आज सकाळी मिलिटरी डेअरी फार्मच्या विशाल मैदानांवर सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या दिव्य आगमनाचे औचित्य साधुन श्रद्धालु भक्तांनी एका भव्य शोभायात्रेचे आयोजन केले ज्यामध्ये एका बाजुला भक्तांनी आपल्या हृदयसम्राट सद्गुरुंचे भावपूर्ण स्वागत केले तर दुसऱ्या बाजुला मिशनच्या शिकवणूकीवर आधारित महाराष्ट्र तसेच भारताच्या वेगवेगळ्या संस्कृतींचे अद्‌भूत मिलन दर्शविणान्या चित्ररथ स्वरूप कार्यक्रमांची सुंदर दृश्ये प्रस्तुत केली जी प्रेक्षकांच्या आकर्षणाचे कारण ठरली.

या शोभायात्रेत मिशनची विचारधारा आध्यात्मिकतेचे महत्व, मानव एकता व विश्वबन्धुत्वाच्या भावनेचा विस्तार आदि विषयावर प्रकाश टाकण्यात आला. त्यामध्यें विस्तार अनंताच्या दिशेने सदगुणांचा विस्तार ब्रह्माची प्राप्ति-भ्रमाची समाप्ती, प्रत्येक भाषा, प्रत्येक देशाचे सारे मानव आपलेच असती. सारे मिळून प्रेममय जग बनवुया, आपुलकीची भावना, खेळा आणि हसाही, नर सेवा, नारायण पूजा, स्वच्छ जल स्वच्छ मन इत्यादि प्रेरणादायक ठरले, या प्रस्तुती सादर करणा-यामध्ये महाराष्ट्राच्या पुणे, कोल्हापुर मुंबई, नाशिक, त्तातारा, धुळे, अहिल्या नगर, छत्रपती संभाजी नगर नागपुर, रायगड, सोलापुर तसेच इतर राज्यापैकी हैद्राबाद येथील भक्तगणानी भाग घेतला.

दिव्य युगुलाचे भव्य स्वागत

समागम स्थळावर आगमन होताच सतगुरु माता जी आणि आदरणीय निरंकारी राजपिताजी यांचे समागम समितीच्या सदस्यांनी व मिशनच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी पुष्पमालांनी व पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले. त्यानंतर दिव्य युगुलाला समागम मडपाच्या मधून मुख्य मंचापर्यंत एका फुलांनी सुसज्जित खुल्या वाहनातून नेण्यात आले. यावेळी उपस्थित भक्तगणानी धन निरकारच्या जयघोषानी आपला आनंद व्यक्त करत दिव्य युगुलाचे हात जोडून अभिवादन केले. सतगुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी यानी भाविक भक्तगणांच्या या भावनांचा सहर्ष स्वीकार केला आणि सुहास्य वदनाने त्यांना आपले आशीर्वाद प्रदान केले.

मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेत 110 विद्यार्थी विजयी

समर्थ भारत अभियान व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून आयोजनपुणे ;

पुणे – समर्थ भारत अभियान आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय ’मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा 2025 चे पारितोषिक वितरण नुकतेच संपन्न झाले. या स्पर्धेत 110 विद्यार्थी विजयी झाले.पुण्यातील 28 शाळांमधील साडेचार हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यातून 680 विद्यार्थी अंतिम फेरीसाठी निवडली गेले व त्यामधील 110 विद्यार्थी विजयी झाले. या स्पर्धेत नर्सरी ते दहावी असे गट तयार करण्यात आले होते, यासोबतच शिक्षक आणि पालक यांच्यासाठी देखील ही स्पर्धा होती, या पारितोषक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, समर्थ भारत अभियानाचे डॉ. राजीव नगरकर, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता तोडकर यांनी केले.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात ७ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

0

पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी ७ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही.आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष

  • वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली, अर्जासाठीची प्रक्रिया पेपरलेस.

मुंबई : राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी, अशी सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याचा  शासन निर्णय काढण्यात आला आहे.

या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कामकाज अधिक सुलभ व पेपरलेस करण्यात येत आहे. महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याची माहिती श्री. नाईक यांनी दिली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च टाळता येणार आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत केली जाते. या सेवांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेणे सहज सुलभ व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्यातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षास प्राप्त झालेल्या अर्जांची सद्यस्थिती नागरिकांना उपलब्ध करुन देणे व समस्यांचे निराकरण करणे, कक्षामध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अर्ज भरण्यास सहाय्य करणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाबाबत जनजागृती आणि प्रसिध्दी करणे, जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत अर्थसहाय्य देण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे व अर्थसाहाय्याची रक्कम  नव्याने निर्धारित करणे याकरिता राज्यातील तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामुळे अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असून उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने अर्थसाहाय्याच्या रकमेचा देखील समितीमार्फत आढावा घेण्यात येणार असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.

मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना आर्थिक सहाय्य केले जाते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात. रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली (चॅरिटी पोर्टल) आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली (सीएमआरएफ पोर्टल) एकत्रित जोडण्यात येणार आहेत. सद्याच्या प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा एओ क्रमांक आणि एम क्रमांक एकत्र करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे निधीच्या अर्जाची प्रक्रिया अधिक गतिशील, सोपी होणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने आतापर्यंत राज्यातील हजारो गरजू रुग्णांना जीवनदान दिले आहे. दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत असताना कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुविधांचा गरजू रुग्णांनी अधिकाधिक प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. नाईक यांनी केले आहे.

प्रभादेवी येथे ‘माय मराठी अभिजात मराठी’ कार्यक्रम उत्साहात

मुंबई. दि. २४ : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त प्रभादेवी, मुंबई येथील करिष्मा सभागृहात ‘माय मराठी अभिजात मराठी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रास्तविकात भाषा संचालक विजया डोनीकर यांनी भाषा संचालनालयाची महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच भूमिका व भविष्यातील दिशा त्याचबरोबर यावर्षीच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त भाषा संचालनालय ‘मराठी भाषा : रोजगाराच्या संधी’ हे आशयसूत्र घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर ‘३६ जिल्हे ३६ मार्गदर्शन सत्रे’ हा आगळा-वेगळा उपक्रम राबवीत असल्याचेही सांगितले.

त्यानंतर डॉ.अपर्णा बेडेकर यांनी संत साहित्यातील मराठीचा भाषिक अंगाने मागोवा घेतला. संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीत कलेच्या अंगाने मराठी भाषेच्या संबंधातून भाषिक विकासाचा पट प्रेक्षकांसमोर उलगडला. कवी प्रवीण दवणे यांनी अभिजात मराठीच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. भावगीते व अभंग शार्दुल कवठेकर व संजना अरुण यांनी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री प्रधान यांनी केले.कार्यक्रमाचे सादरीकरण हे उत्तरा मोने यांच्या मिती ग्रुपमार्फत करण्यात आले. सहायक भाषा संचालक संतोष गोसावी यांनी आभार मानले.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षेच्या भविष्याचा आराखडा तयार करण्यासाठी टास्कफोर्स स्थापन – माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

  • भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात

मुंबई : ‘विकसित भारत २०४७’ मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या $५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे महाराष्ट्र हे भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करणारे राज्य असेल असे माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.जागतिक शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना माहिती तंत्राज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी म्हटले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील हा प्रकल्प राबवला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीने प्रेरित उद्योग आणि तंत्रज्ञान क्रांतीसाठी विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करणारे हे विद्यापीठ असेल.हे विद्यापीठ अत्याधुनिक संशोधन आणि कौशल्य विकासासाठी केंद्रस्थानी राहील. तसेच हे विद्यापीठ भारतीय तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जागतिक अर्थव्यवस्थेत नेतृत्व करण्यासाठी तयार करेल,” असेही ॲड. शेलार यांनी सांगितले.सरकार लवकरच देशातील पहिले राज्यस्तरीय कृत्रिम बुद्धिमत्ता व सायबर धोरण जाहीर करणार असून यासाठी एक विशेष टास्कफोर्स स्थापन करण्यात आले आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्री यांच्याच नेतृत्वाखाली या धोरणाचा आराखडा तयार होईल. तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असेल. आमचे सरकार विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नवसंकल्पनांच्या संधी निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षणात परिवर्तन घडवून, भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने नवीन उद्योजकता योजना तयार कराव्यात – सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने कालबाह्य योजनांचा अभ्यास करून त्या नव्याने तयार करून या योजनांची सांगड शासनाच्या विविध विभागाच्या योजनेशी घालावी. तसेच नवीन उद्योजक तयार करण्यासाठी लोकाभिमुख योजना तयार कराव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची आढावा बैठक झाली. या बैठकीस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लहूराज माळी, महाव्यवस्थापक राकेश बेत, उप महाव्यवस्थापक शरद लोंढे, उप महाव्यवस्थापक वैशाली जाधव, प्रादेशिक व्यवस्थापक शिंदे उपस्थित होते.सामाजिक न्याय राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, प्रशिक्षणासाठी चांगल्या संस्थेची निवड करावी व प्रशिक्षण संस्था दर्जेदार प्रशिक्षण देत असल्याची खात्री करावी. सफाई कामगार यांच्यासाठीच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. महामंडळाच्या लाभार्थी योजनांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यासंदर्भात धोरण ठरविण्यात येत असून लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या महामंडळचा उत्पन्न वाढीसाठीचा प्रस्ताव तयार करावा ज्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देता येईल. मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळाने प्रयत्न करावेत , अशा सूचना सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी दिल्या.यावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातील विविध योजनांचा तसेच लाभार्थ्यांना महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबत आढावा घेण्यात आला.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी एका वर्षासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, :- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवेश घेतलेल्या प्रवेशित परंतु विहित नमुन्यामध्ये EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशास एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात आलेल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) संवर्गातून प्रवेशित झालेल्या १ हजार ६०० विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील EWS प्रमाणपत्राऐवजी केंद्र सरकारच्या नमुन्यातील EWS प्रमाणपत्र सादर केले होते. सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन, केवळ या शैक्षणिक वर्षाकरिता एकवे ळची विशेष बाब विद्यार्थ्यांनी सादर केलेले केंद्र सरकारच्या नमुन्यातील EWS प्रमाणपत्र या प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला दिले आहेत असेही मंत्री श्री. पाटील यांनी यांनी यावेळी सांगितले.

मावळ तालुक्यातील आश्रम शाळेतील बाल लैंगिक अत्याचारची उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

संबंधितांवर कठोर कारवाईच्या दिल्या सूचना

पुणे, : पुणे जिल्ह्यामधील मावळ तालुक्यातील एका निवासी आश्रम शाळेत दोन अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत, अत्याचाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय सचिव, आदिवासी विकास विभाग सचिव, महिला व बालविकास विभाग सचिव, जिल्हाधिकारी पुणे आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना दिले आहेत.

कंत्राटी आरोपी शिक्षक जगदीश गोपाळ घोलप याने दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २१ जानेवारी २०२५ रोजी वडगाव, मावळ पोलीस स्टेशन येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

‘ही बाब अतिशय निंदनीय आहे. हलाखीची परिस्थिती असल्यामुळे शैक्षणिक कारणास्तव निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलांची सुरक्षा धोक्यात असल्याचे यातून निष्पन्न होते. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षे संदर्भात कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन अंमलबजावणी यंत्रणांमार्फत अत्यंत आवश्यक असल्याचे यातून अधोरेखित होते’, असे म्हणत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.

सदर बाल लैंगिक अत्याचाराबाबत सखोल चौकशी करण्यात यावी व यातील दोषींवर पॉक्सो इत्यादी प्रचलित तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर, या प्रकरणातील अल्पवयीन मुलांचे संरक्षण व समुपदेशन योग्य पद्धतीने करण्यात यावे. पुणे जिल्ह्यातील बालकल्याण समितीमार्फत सदर घटनेची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.

या प्रकरणी चार्जशीट मुदतीत दाखल करून अनुभवी व निष्णात सरकारी अभियोक्ता नियुक्त करून आरोपीस कठोर शिक्षा करण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच, राज्यातील निवासी आश्रम शाळांमध्ये गुड टच बॅड टच बाबत मुलांना माहिती दिली जात असल्याची खातरजमा करावी. राज्यातील निवासी आश्रम शाळांमधील बाल लैंगिक अत्याचार विषयक घटना टाळण्यासाठी जिल्हा निहाय बाल कल्याण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत याबाबत खातरजमा करण्यात यावी व त्यांचे योग्य संनियंत्रण करण्यात यावे याबाबत संबंधित विभागांना त्यांनी निर्देश दिले आहेत

शरद पवारांनी फेटाळली एकत्र येण्याची शक्यता:म्हणाले- अजितदादांशी केवळ प्रकल्पावर चर्चा

मुंबई-अजित पवार यांच्याशी केवळ एका प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली आहे. आमच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. या माध्यमातून दोन्ही पवार एकत्र येणार असल्याची शक्यता शरद पवार यांनी फेटाळली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याची उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. तर या संदर्भात सामंजस्याने प्रश्न सुटावा असे आमच्या नेत्यांचे मत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यात शरद पवार आणि अजित पवार यांची काल बंद दाराआड चर्चा झाल्याने याबाबत तर्क लावले जात होते. मात्र ही शक्यताच शरद पवार यांनी फेटाळून लावली. अजित पवार यांच्यासोबत आमची केवळ एका प्रकल्पावर चर्चा झाली असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार आणि मी अनेक संस्थांवर एकत्र काम करत आहोत. त्यामुळे आमच्यात त्या संदर्भात चर्चा झाली असल्याचे देखील ते म्हणाले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा उद्धव ठाकरे यांचे मत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याबाबतही त्यांनी भाष्य केले. दोन्ही मेळाव्यांची तुलना केली तर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला जास्त उपस्थिती होती. असे दिसत असल्याचे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांच्यासोबत एका प्रकल्प बाबत चर्चा झाली असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. आमच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या माध्यमातून दोन्ही पक्ष एकत्र येणार का? या प्रश्नाला त्यांनी फेटाळले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांची खुर्ची सुरुवातीला आजूबाजूला होती. मात्र अजित पवार यांनी ती बाजूला करायला लावली. यावर देखील शरद पवार यांनी स्पष्टिकरण दिले आहे. नवीन सहकार मंत्र्यांनी माझ्या कानावर काही गोष्टी घालायच्या असल्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार अजित पवार यांनी त्यांना माझ्या बाजूला खुर्चीवर बसायला सांगितले, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून अजित पवार यांनी काल दिलेल्या स्पष्टीकरणाला शरद पवार यांनी देखील दुजोरा दिला आहे.