Home Blog Page 489

युवा कलाकारांच्या स्वरवर्षावात रसिक झाले चिंब

विराज जोशी, सिद्धार्थ बेलामनू यांचे बहारदार गायन
श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांगीतिक कार्यक्रम

पुणे : विराज जोशी आणि सिद्धार्थ बेलामनू या आश्वासक युवा कलाकारांच्या सुमधुर आणि बहारदार गायनाने रसिक स्वरावर्षावात चिंब झाले. निमित्त होते विद्यार्थिप्रिय शिक्षक, समाजधुरीण प्रा. श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे.
श्रीराम पुजारी प्रतिष्ठानतर्फे पुण्याई सभागृह, पौड रोड, कोथरूड येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध युवा गायक आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांच्या गायन मैफलीने झाली. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात पूरिया धनाश्री रागातील ‘पार करो, अरज सुनो’ या मध्यलयीतील पारंपरिक बंदिशीने केली. याला जोडून द्रुत लयीत सादर केलेल्या ‘पायलिया झनकार मोरी’ या बंदिशीने रसिकांना मोहित केले. विराज जोशी यांना अभिजित बारटक्के (तबला), अविनाश दिघे (संवादिनी) यांनी समर्पक साथ केली.
यानंतर पंडित विनायक तोरवी यांचे शिष्य सिद्धार्थ बेलामनू आपल्या मैफलीची सुरुवात मियाँ मल्हार रागाच्या सादरीकरणाने केली. ‘सर्वांना सुख दे’ अशा अर्थाची रचना असलेली ‘सुख देहो सबन को’ ही पारंपरिक बंदिश त्यांनी अतिशय बहारदारपणे सादर केली. द्रुत लयीतील ‘बिजुरी चमके, गरजे मेघा’ या रचनेने रसिक सुखावले. सिद्धार्थ बेलामनू यांनी आपल्या मैफलीची सांगता ‘धिम तदियन धिम तदानी’ हा तराणा सादर करून केली. दमदार ताना, तार सप्तकात फिरत असलेल्या सिद्धार्थ बेलामनू यांच्या सुरेल-खुल्या आवाजातील गायन ऐकून रसिक स्वरवर्षावात चिंब झाले. सहकलाकारांबरोबर सूरांची देवाण-घेवाण आणि त्यातून रंगत गेलेली मैफल रसिकांना विशेष भावली. त्यांना प्रणव गुरव (तबला), मिलिंद कुलकण (संवादिनी), स्वप्नील गायकवाड, कबीर शिरपूरकर (तानपुरा) यांनी सुरेल साथसंगत केली.
कार्यक्रमाचा शुभारंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रकाश जोशी, कार्याध्यक्ष डॉ. नवनीत तोष्णीवाल, उमेश लळीत, रोहिणी पटवर्धन, कलापिनी कोमकली, बाळासाहेब जोशी, राम कोल्हटकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला. तर कलाकारांचा डॉ. नवनीत तोष्णीवाल, केशव शिंदे, माजी न्यायमूर्ती उमेश लळीत, ललिता दातार यांनी केला.

डॉ. श्रीनिवास नाटेकर यांनी सोलापूरमधील सांस्कृतिक राजदूत म्हणून ओळख असणाऱ्या प्रा. श्रीराम पुजारी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा कलाकरांशी असलेला स्नेह उलगडून दाखविला. कार्यक्रमात श्रीराम पुजारी यांच्या जीवनप्रवासावरील चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा गाडगीळ यांनी केले.
कार्यक्रमास संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी आवर्जून उपस्थिती लावून प्रा. श्रीराम पुजारी यांच्यांवरील स्नेह दर्शविला.

एक पेड माँ के नाम या मोहिमेमुळे या देशातील निसर्गसंपदा वाढेल – केंद्रीय मंत्री मोहोळ

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन साकारण्यात आलेली एक पेड माँ के नाम या मोहिमेमुळे या देशातील निसर्गसंपदा वाढण्यास मदत होणार आहे. अस मत केंद्रीय सहकार तथा नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले VO – पुण्यातील कोथरुड इथल्या एआयआर परिसरातील म्हातोबा मंंदिराच्या आवारात भाजप कोथरूड मंडल च्या वतीने एक पेड माँ के नाम …या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पहलगाम येथे मृत पावलेल्या कौस्तुभ गनबोटे,संतोष जगदाळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थही झाडे लावण्यात आली .यावेळी कोथरुड परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. या संपुर्ण परिसरात दोनशेहुन अधिक झाडे लावली जाणार आहेत. व्यक्तीच्या नावाने झाडे लावल्याने त्याच्या स्मृती जतन करण्यासोबत वृक्षसंपदा वाढण्यास मदत होणार आहे. आणि निसर्गाची जैवविविधतेची साखळी जपली जाणार असल्याचे मोहोळ यांनी यावेळी सांगितले. पुण्यासारख्या शहराच्या आसपास झाडे लावली गेल्यास शहराचे वाढणारे तापमान कमी होण्यास मदत होईल.तसेच पंतप्र्धान नरेंंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या या मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन झाडे लावुन त्याचे जतन केले पाहिजे अस मत राज्याचे उच्च ,तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

लोकपरंपरा आणि अभिजन परंपरा, या छेदणाऱ्या नसून परस्परपूरकच

0

राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन ‘शिव-शक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा‌’ ग्रंथाचे प्रकाशन

पुणे : अभिजात परंपरा आणि लोकपरंपरा, या एकमेकींना छेद देणाऱ्या नसून, सर्व समाजघटकांना समान धाग्यात गुंफणाऱ्या आहेत. त्या एकमेकींना पूरकच आहेत. आपली संतपरंपरा हा दोन्ही परंपरांना जोडणारा दुवा आहे, याचे प्रमाण डॉ. प्रकाश खांडगे संपादित ग्रंथातून मिळते. त्यामुळे हा ग्रंथ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी येथे केले. संवाद, पुणे आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‌‘शिव-शक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा‌’ या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रकाशित आणि प्रा. डॉ. प्रकाश खांडगे संपादित या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते शनिवारी (दि. २१) झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, संत साहित्य आणि लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे, ज्येष्ठ कवयित्री, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील, संवाद, पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे, महाराष्ट्र कला संस्कृती मंचच्या शैला खांडगे आदी मान्यवर व्यासपीठावर होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. मोरे म्हणाले, आपल्याला प्रदीर्घ अशी परंपरा लाभली आहे. तिचे जतन मौखिक स्वरुपात झाले. कालांतराने तिचे लिखित स्वरूप पुढे आले. वैदिक, अभिजन आणि बहुजनांची संस्कृती, हे पृथक नाहीत, ते एकाच विशाल संस्कृतीचे भाग आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. प्रकाश खांडगे यांच्या ग्रंथाचे महत्त्व आहे. या ग्रंथाचा विषय महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. त्याची व्याप्ती प्रचंड आहे, तो आजच्या भाषेत ‘पॅन इंडियन’ विचार आहे. शिवशक्तीचे आदीरूप हे या विचाराचे तात्त्विक अधिष्ठान आहे. ज्याप्रमाणे ज्ञानदेवांचे तत्त्वदर्शन पुढे संत एकनाथांनी भारुडांच्या – रूपकांच्या माध्यमातून लोकभाषेत आणले, तसेच लोकसंस्कृती व लोकपरंपरांनी ‘कलगीतुरा’ माध्यमातून तात्त्विक विचार लोकभाषेत मांडला आहे. परंपरांची अशी सरमिसळ, हा या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे. आजच्या काळात अशा सामरस्य सांगणाऱ्या ग्रंथाचे लेखन करणे आणि ते प्रकाशित करणे अगत्याचे आहे. डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, लोकपरंपरा हा संस्कृतीचा गाभा असतो. आपल्याकडे हा गाभा मौखिक परंपरेने जपला. आधुनिक काळात आपण या परंपरा नाकारून बुकिश झालो आहोत. शिवशक्ती सामरस्याचा धागा वेगवेगळ्या नावांनी सर्वदूर आहे. त्यांचा वेध प्रकाश खांडगे यांनी बंगाल, राजस्थान, कर्नाटक अशा ठिकाणांहून घेतला आहे. त्यांचे हे कार्य मोलाचे आणि महत्त्वाचे आहे. डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, या ग्रंथाच्या रूपाने विविध ठिकाणी विखुरलेले लोकसंचित एकत्रित आले आहे. लोकपरंपरांचे प्रायोगिक रूप जाणणाऱ्या खांडगे यांनी या ग्रंथाच्या संपादनाच्या निमित्ताने महत्त्वाचे कार्य केले आहे. गंभीर, वैचारिक लेखन प्रकाशित करण्याचे कार्य केल्याबद्दल साहित्य संस्कृती मंडळही अभिनंदनास पात्र आहे. मात्र, लोकसंस्कृतीचे विखुरलेले अभ्यासक, जाणकार, कलाकार यांना एकत्र आणून लोकसंस्कृतीचा सर्वांगीण अभ्यास करणारी प्रबळ संस्थात्मक यंत्रणा आपल्याकडे नाही, याची उणीव जाणवते. अशी यंत्रणा असल्याशिवाय युवा पिढीकडे हा अभ्यासाचा, संशोधनाचा वारसा कसा पोचणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉ. मीनाक्षी पाटील यांनी मंडळासाठी या ग्रंथाचे प्रकाशन हा आनंदाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली. संकल्पनांचे स्पष्टीकरण, मांडणी आणि नंतर संहिता, अशा पद्धतीने केलेले लेखन – संपादन, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे, असेही त्या म्हणाल्या. मनोगत मांडताना संपादक – अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे म्हणाले, ढालगज भारुडाचा विचार करत असताना, हा विषय सुचला. कलगीतुऱ्याची अनेक हस्तलिखिते संग्रही होती, काही नव्याने मिळवली होती. त्या लोकभाषेला दार्शनिक विचारांचे अधिष्ठान हवे, या विचाराने संपादनाकडे वळलो. प्रारंभी संघर्ष मग संवाद आणि अखेरीस सामरस्य, असा त्रिविध प्रवास, अशी मांडणी मला केवळ महाराष्ट्रात नव्हे तर इतरत्रही आढळली. त्यातून शिव-शक्ती गीतांचे व्यापकत्व लक्षात आले. जोगी, बाऊल, कलगीतुरा, यलम्माची गीते… यातून हेच एकत्व दिसते, याची जाणीव झाल्यावर ग्रंथाचे संपादन केले. प्रदीप ढवळ यांनी डॉ. खांडगे यांच्या या ग्रंथाचे मोल तरूण पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यासाठी असे लेखन – संपादन व्यापक स्तरावर नेण्याचा प्रयत्न आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी संवाद संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून लोकसंस्कृती आणि परंपरांचे दस्तऐवजीकरण झाले आहे, असे ते म्हणाले. प्रकाशन समारंभानिमित्त ‌‘भक्तिरंग‌’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे (कीर्तन), सत्यपाल महाराज (सप्तखंजिरी भजन), संध्या साकी (भारूड), शाहीर पृथ्वीराज माळी (गोंधळ) व सहकलाकारांचा सहभाग होता. निकिता मोघे यांनी आभार मानले. स्वप्नील जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

“एक वसुंधरा, एक आरोग्य हा आमचा संकल्प आहे” — सन्मती बाल निकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पुणे : पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित सन्मती बाल निकेतन व तिर्थरूप शैक्षणिक वसतिगृह, मांजरी बु||, पुणे आणि मंगलम योग यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात माई सभागृहात ‘हीच अमुची प्रार्थना’ या सामुदायिक प्रार्थनेने झाली. त्यानंतर माईंच्या प्रतिमेचे पूजन आणि उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. महेश कोटुळे यांनी योग दिनाचे महत्त्व सांगत, योग ही केवळ शरीराची क्रिया नसून ती शिस्त, समतोल आणि समाजाशी नाते जोडणारी शक्ती आहे असे प्रतिपादन केले.

या विशेष दिवशी योग सत्राचे मार्गदर्शन डॉ. हर्षा बोरा आणि कायना काकड या दोघांनी केले. दोन्ही प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये योगाची सुलभ आणि सकारात्मक समज निर्माण करत, विविध योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार आत्मीयतेने शिकवले. योगाची क्रियाशीलता आणि आंतरिक शांतता यांचा सुरेख समन्वय विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवला.

सत्रात “योग म्हणजे काय?” याचे मूलभूत अर्थ उलगडले गेले — युज् म्हणजे एकत्र येणे, मन, शरीर आणि आत्मा यांचे ऐक्य. विद्यार्थ्यांनी केवळ कृती नव्हे, तर त्या मागील भावनाही मनःपूर्वक समजून घेतल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधुताई सपकाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करत, योग हे आजच्या पिढीने आत्मसात करणे किती आवश्यक आहे हे समजावले. त्यांनी योगाच्या माध्यमातून स्वतःची काळजी घेणं, सामाजिक बांधिलकी जपणं आणि पर्यावरणप्रेम या तीन गोष्टींची जाणीव करून दिली, योगाचा समावेश दैनंदिन जीवनात करण्याची सामूहिक प्रतिज्ञा मुलांनी घेतली. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश शेटे यांनी तसेच प्रास्ताविक महेश कोटुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ममता सिंधुताई सपकाळ यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी केले.

“एक वसुंधरा, एक आरोग्य” या संकल्पवाक्याशी समरस होत, या कार्यक्रमातून उपस्थितांनी आत्मशुद्धी, समाजप्रेम आणि पर्यावरण सजगतेची नवी ऊर्जा अनुभवली.

हिंदी भाषा सक्तीबाबत मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस:सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देऊन खोटे बोलल्याचा आरोप

पुणे-
महाराष्ट्राची व मराठी माणसांची फसवणूक करणे, हिंदी भाषा सक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन खोटे बोलणे आणि राज्यपालांनी कलम १६४ (३) नुसार दिलेल्या संविधानिक शपथेचा भंग करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ॲड. असीम सरोदे,ॲड.श्रीया आवले, ॲड. अरहंत धोत्रे व ॲड. रोहीत टिळेकर यांनी कायदेशीर नोटीस पाठविलेली आहे. तामिळनाडू सरकारने त्रिभाषा धोरणाला (हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून लागू करण्याच्या धोरणाला) विरोध करणारी याचिका केली आणि सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारचे ऐकून घेतले नाही. तामिळनाडू सरकारने हिंदी सक्तीला विरोध केला आणि तामिळनाडू सरकारची सर्वोच्च न्यायालायने फेटाळली असे ध्वनित करणारे वक्तव्य करणे हा खोटारडेपणा आहे व त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. कारण तामिळनाडू सरकारने त्रिभाषा धोरणाला विरोध करणारी याचिका म्हणून केलेली नाही. तर तामिळनाडू सरकार त्रिभाषा धोरण राबवित नसल्याने त्यांना केंद्र सरकारच्या इतर योजनांचा निधी, आर्थिक मदत मिळत नाहीये असा त्या याचिकेचा विषय आहे.

नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय घेतला तो चुकीचा असल्याने त्याबद्दल मुख्यमंत्री व शासनाने स्पष्टपणे व शब्द-चलाखी न करता तो निर्णय मागे घेतला असे जाहीर करणे आवश्यक आहे. ‘अनिवार्य’ शब्द काढला असे सांगून इतर जाचक अटींच्या माध्यमातून हिंदीला तिसरी भाषा म्हणून महाराष्ट्रात पहिलीपासून शिकवावेच लागेल अशी सक्ती करण्याच्या जागा तयार करणे हे काही चांगल्या राज्य प्रशासनाचे लक्षण नाही.

मुख्यमंत्र्यांनी काहीही खोटेनाटे न पसरविता महाराष्ट्रातील मराठी शाळा अस्तित्वात राहतील यासाठी प्रयत्न करावेत. राज्यातील मराठी शाळांचा दर्जा, शिक्षणाचा दर्जा, मुलांसाठी शाळांमध्ये पाणी, योग्य स्वच्छतागृह, चांगल्या वर्ग-खोल्या, मुबलक व शुद्ध पोषण आहार याबाबत आपण बोलणे व काम करणे गरजेचे व विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी ते आवश्यक आहे असे असीम सरोदे म्हणाले.

नोटिसीमधून सांगण्यात आले आहे की, सरकारने साधारणतः १० हजार मराठी माध्यमांच्या शाळा बंद केल्या आहेत असे चर्चेत आहे व १७५०० मराठी माध्यमांच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्याबद्दल बोलण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, त्यावर उपाय शोधण्याची हिंमत दाखवावी. न्यायालयाच्या नावाने खोटे बोलणे हे अत्यंत वाईट आहे.

जर राज्यसरकार राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवू इच्छिते मग शिक्षण हक्क कायद्यानुसार महाराष्ट्र सरकारने राज्यातील विविध शाळांना 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्ती रक्कम देणे आहे ती लगेच द्यावी.खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या अक्षम बहुजन समाजातील मुलांना असलेल्या 25 टक्के मुलांना मोफत प्रवेश द्यावा आणि त्या मुलांची फी सरकारने शाळेला द्यावी ही शिक्षण हक्क कायद्यातील तरतूद आहे.

ओढे- नाल्यांचा प्रवाह रोखल्यामुळेच हिंजवडीत पूरस्थिती:PMRDA

संबंधितांवर पीएमआरडीए, एमआयडीसीसह इतर यंत्रणांकडून होणार कारवाई

पिंपरी . : हिंजवडी फेज – १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरात नियमांचा भंग करून ओढे – नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळेच पूर परिस्थिती निर्माण होत आहे. पीएमआरडीएसह एमआयडीसी हद्दीतील १३ ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह परस्पर बदल तसेच रोखणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नुकतीच लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक घेत संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह एमआयडीसी हद्दीतील ओढे – नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह काही कंपन्या, बिल्डर आणि नागरिकांनी परस्पर रोखला तसेच स्थलांतरित केला आहे. काही ठिकाणी मनमर्जीप्रमाणे बांधकामे करण्यात आल्याचे पुढे येत असून संबंधित बांधकामे थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासह प्रशासनाला सहकार्य न करणाऱ्या तसेच नियमबाह्य पद्धतीने बांधकामे करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया आगामी काही दिवसात करण्यात येणार आहे.

हिंजवडीसह परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने पाण्याचा निचरा रस्ते दुरुस्तीसह नागरी सोयी सुविधांच्या अनुषंगाने बहुतांश कामे प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात आली आहे. हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसह मेट्रो मार्गिकेलगतचा राडारोडा हटवणे, गटार व नालेसफाई, खड्डे बुजवणे, अनधिकृत स्टॉल हटवणे यासह इतर आवश्यक ती कामे पूर्ण झाल्याने नागरी समस्या निश्चितच सुटणार आहे. यासह पीएमआरडीए आणि एमआयडीसी हद्दीतील नैसर्गिक ओढे – नाल्यांतील पाण्याचा प्रवाह परस्पर रोखला तसेच स्थलांतरित करण्यात आला, अशी १३ ठिकाणे शोधण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह खुला करावा, अन्यथा त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

या भागात रोखण्यात आला ओढ्या नाल्यांचा प्रवाह
१) ग्लोबल सेझ टेक पार्कजवळ, भोईरवाडी
२) टाटा कन्सल्टन्सीजवळ, भोईरवाडी
३) मेट्रो पोलिस मेट्रो स्टेशनजवळ, मान
४) माण देवी मंदिर -१ मान
५) माण देवी मंदिर, ग्रामपंचायत
६) स्मशान भूमी, मान
७) टेक महिंद्रा आयटी पार्कजवळ, मान
८) क्वाड्रॉन मेट्रो स्टेशन वन विभागाच्या जागेलगत, मान
९) गट नं. २८६ जवळ, मान
१०) गट नं. २८६ जवळ, मान
११) गट नं. २८१ जवळ, मान
१२) गट नं. २७९ जवळ, मान
१३) गट नं. २७१, २७२, २७३ जवळ, मान

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख


शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत सत्कार

पुणे : व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड दिल्याशिवाय व्याकरण समजणार नाही; विद्यार्थ्यांना व्याकरणाची गोडी लागणार नाही, असे मत सुप्रसिद्ध व्याकरणतज्ज्ञ आणि मराठी भाषा, साहित्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रा. यास्मिन शेख यांनी व्यक्त केले.
प्रा. यास्मिन शेख यांनी आज (दि. 21) वयाची शंभरी पार केली. त्या निमित्त प्रा. शेख यांच्या कन्या रूमा बावीस्कर, दिलीप फलटणकर आणि अंर्तनादचे भानू काळे यांनी त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. त्या वेळी प्रा. शेख सत्काराला उत्तर देताना बोलत होत्या. सेनापती बापट रस्त्यावरील महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या कार्यालयात सुहृदांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा झाला.
101व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या प्रा. यास्मिन शेख यांनी आयुष्याचा 100 वर्षांचा पट उलगडून दाखविला. आपल्या वयाच्या 9व्या वर्षी आईचे झालेले निधन, दुसरे लग्न न करता वडिलांनी सात भावंडांचा केलेला सांभाळ, शालेय वयात आलेल्या कडू-गोड आठवणी, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मिळालेल्या संधीचे केलेले सोने याविषयी त्या भरभरून बोलल्या. लहानपणीच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, धर्माने ज्यू असूनही घरात मराठी भाषेतील मुबलक पुस्तके होती. त्यामुळे मराठी भाषेतील साहित्य वाचनाची गोडी लागली. महाविद्यालयीन आयुष्यात माटे, वाटवे यांच्यासारखे शिक्षक मिळाल्याने मराठी भाषा, व्याकरणाची गोडी वाढतच गेली. मराठीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक कधी सोडला नाही.
मुस्लिम मुलाशी विवाह करण्यास वडिलांचा विरोध होता, पण विवाहासाठी सासरच्या लोकांनी पुढाकार घेतला. लग्न झाल्यानंतर आपल्या दोन्ही मुलींचे त्यांनी खूप लाड केले. त्यांना एकदा कडकडून मिठी मारल्यानंतर त्यांचा माझ्यावरील राग गेला. आदर्श पिता म्हणजे काय याचा अनुभव घेतला असल्याने आपल्या आयुष्यातील वडिलांचे स्थान खूप मोठे आहे, असेही त्या म्हणाल्या. वडिल आणि दोन्ही मुलींच्या मिळालेल्या सहकार्यामुळे कृतज्ञ असल्याची भावना प्रा. शेख यांनी व्यक्त केली.
प्रा. यास्मिन शेख यांचा गौरव करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, देहू, आळंदीहून ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने जात असताना महाराष्ट्राची साहित्य पंढरी असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा एक प्रतिनिधी या नात्याने या व्याकरणयोगिनीचा माझ्या हस्ते झालेला सत्कार मला वारीचे पुण्य देणारा आहे. मराठी भाषेच्या उत्कर्षाची आस बाळगून आणि व्याकरणाचा ध्यास घेऊन त्यांनी जे काम केले आहे ते पुढच्या अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरणार आहे. वर्ग आणि अध्यापन एवढ्यापुरते आपले काम मर्यादित न ठेवता त्यांनी आपल्या कामातून समाजाला भाषाभान दिले. व्याकरणासारखा रुक्ष आणि क्लिष्ट वाटणारा विषय त्यांनी ललितरम्य पद्धतीने सर्वांना शिकवला. शतकपूर्ती केलेली ही विदुषी मराठीचे वैभव आहे.
प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, मराठी भाषा, शिक्षणाचा दर्जा खालावत असताना तेथे गुणवत्ता वाढीसाठी प्रचंड प्रयत्न करण्याची गरज असताना त्याकडे लक्ष न देता तिसरी भाषा अनिवार्य केली तर विद्यार्थी तिन्ही भाषांमध्ये मागे पडण्याची भीती वाटते. आज महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणात हिंदीकरण होत आहे. हिंदी सक्तीला आमचा विरोध सांस्कृतिक कारणास्तव आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद पहिलीपासून हिंदी वा अन्य भारतीय भाषांची सक्ती करून शासनाने हिरावून घेतला आहे.
कार्यक्रमाविषयी माहिती भानू काळे यांनी दिली तर प्रास्ताविक दिलीप फलटणकर यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा काळे यांनी केले.

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना

हिंगोली, दि. २१ जून २०२५ : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बनावट खत विक्री प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कृषी विभागाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बोगस खत विक्री हे केवळ आर्थिक फसवणूक नसून शेतकऱ्यांच्या श्रमांवर आणि उत्पादनावर थेट घाला आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यक्षम यंत्रणा निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी २० जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन आपली मागणी मांडली. विभागाने या तक्रारींची दखल घेत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी सूचित केले आहे की, अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्यस्तरावर विशेष चौकशी समिती तातडीने स्थापन करावी. खतांच्या गुणवत्तेचीतपासणी करावी . खत विक्रीसाठी ई-पॉस प्रणाली सक्तीची करून त्यासंदर्भात व्यापाऱ्यांना प्रशिक्षण व जनजागृती करण्यात यावी. बनावट खतामुळे नुकसान झाल्यास अशा शेतकऱ्यांसाठी विशेष नुकसानभरपाई योजना लागू करावी.

तसेच, संशयित खत उत्पादक कंपन्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्यात यावेत व गरज असल्यास त्यांच्यावर फसवणूक आणि सार्वजनिक जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या कलमांखाली गुन्हे दाखल करावेत, असेही त्यांनी सुचवले.

कृषी खात्याने शेतकऱ्यांचा विश्वास जपण्यासाठी पारदर्शकता आणि तत्परता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली

८२४० सफाई कर्मचारी,१६०८ शौचालये,अन् ५०० शाळातून योगा व आरोग्य शिबिरे राबवत महापालिकेने केली वारकऱ्यांची सेवा,२५७ टन कचऱ्याची लावली विल्हेवाट 

पुणे: ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात विठू माऊली ची ओढ लागलेल्या श्री.संत ज्ञानेश्वर महाराज व श्री.संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात काल दाखल झाल्यावर महापालिकेच्या ८२४० सफाई कर्मचारी, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वच्छता,आरोग्य यांची पालखी जणू खांद्यावर घेतली आणि पुण्यातून २५७ टन कचऱ्याची विल्हेवाट लावली.५०० शाळातून वारकऱ्यांसाठी शिबिरे घेतली,पाऊस अस्वच्छता यापासून त्यांच्या रक्षणासाठी महापालिकेने जिवाचे रान केल्याचे दिसले.

आषाढी पालखी सोहळा पुणे मार्गे पंढरपूर येथे मार्गस्थ होत आहे.या दरम्यान दोन्ही पालख्यांचा पुणे शहरात मुक्काम आहे.दि.२० जून रोजी दोन्ही पालख्यांचे पुणे शहरात आगमन झाले. महापालिका आयुक्त नवल किशोर राम,अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी,घनकचरा व व्यवस्थापनचे उपायुक्त संदीप कदम,उपायुक्त माधव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीचे स्वागत करण्यात आले.दोन्ही पालख्यांच्या मुक्कामा दरम्यान पुणे मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छता आणि आरोग्य यावर भर देत कार्यवाही करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व सार्वजनिक रस्त्याचे झाडणकाम, क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता व जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आले. संपूर्ण शहरात दिवसातून तीन वेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्यात आले. क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण पालखी मार्गावर प्रत्येकी ५० मी.अंतरावर कचरा संकलनकरिता बकेटची व्यवस्था करण्यात आली. सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत पालखी कालावधीमध्ये ८० लिटर क्षमतेचे एकूण ६८५ बकेट व ३१ तात्पुरत्या कंटेनर उपलब्ध करून देण्यात आले.

पुणे शहरात येणा-या वारक-यांच्या सोयीसाठी १५ क्षेत्रिय कार्यालयांच्या मागणीनुसार व आवश्यकतेनुसार पोर्टेबल व फिरते शौचालय पुरविण्यात आले. तसेच सदरच्या शौचालयांची मनपा सेवकांमार्फत व सबंधित यंत्रानेद्वारे दिवसातून तीन वेळा स्वच्छता करण्यात आली. प्रत्येकी १६०८ पोर्टेबल शौचालयांची सोय वारक-यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. सार्वजनिक रस्त्यावर,वारकरी मुक्कामी असलेल्या ठिकाणी स्वच्छता राहण्याच्या दृष्टीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत आवश्यकतेनुसार सार्वजनिक ठिकाणी कीटकनाशक,दुर्गंधीनाशक औषध फवारणी करण्यात आली.याकरीता घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागाकडून ६७५० किलो जंतुनाशक पावडर व १००० लिटर जंतुनाशक लिकविड पुरविण्यात आले.पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी व अन्य ठिकाणी जेटिंग मशीनद्वारे सा र्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली.

भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दोनही पालखी मुक्कामाग असल्यामुळे व तेथे वारक-यांची संख्या जास्त असल्यामुळे भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात साफ सफाईचे व स्वच्छतेची कामे होणे करीता अन्य क्षेत्रिय कार्यालयाकडून ६० अतिरिक्त सेवकांची नेमणूक करण्यात आली. वारकरी मुक्कामास असलेल्या शाळांमध्ये तीन पाळ्यांमध्ये महिला वारक-यांसाठी शौचालय व अंघोळीसाठी सोय करण्यात आली.पालखी कालावधीमध्ये पुणे महानगरपालिका व पेंडकेअर संस्थेमार्फत महिलांकरीता एकूण ४५००० सॅनिटरी नॅपकीन्स उपलब्ध करून त्याचे वाटप करण्यात आले.स्त्रीरोग तज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावण्यात आले. ८२४० सफाई कर्मचारी पालखी कालावधीमध्ये शहरातील स्वच्छतेसाठी कार्यरत होते. 21 जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त वारक-यांसाठी शहरातील ५०० विविध शाळा महाविद्यालयांमध्ये योग कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले.या सर्व शाळांमध्ये महानगरपालिकेच्या सफाई कर्मचायांमार्फत स्वच्छता विषयक कामकाज करण्यात आले. दि. २२ जून रोजी पालखी मार्गस्थ झाल्यानंतर मुक्काम असलेल्या सर्व शाळा,धर्मशाळा,मंदिरे व पालखी मार्ग या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. बारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म,जाती,पंथ,लिंग या पलीकडे जाऊन सर्व ममावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे.आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देह आळंदी/ पंढरपूर येथे दाखल होत असतात. या बारकत्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते.या अनुषंगाने मागील तीन वर्षांपासून ‘आरोग्यवारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून आरोग्यवारीच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन त्यानुसार स्थानिक प्रशासन व पोलीस यांच्या मदतीने सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

आरोग्य वारीमध्ये पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.

१) वारी काळात दर दहा ते वीस कि. मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था करण्यात आली.
२) मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध करून ४५००० सॅनिटरी नॅपकीन्सचे वाटप करण्यात आले.
३) स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
४) महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावण्यात आले.
५) पालखी कालावधीमध्ये स्वच्छतेच्या संबंधित पाहणी करण्यागाठी व तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयाकडील आरोग्य निरीक्षक मुकादम व सफाई सेवक यांची QRT टीम तयार करण्यात आली.


संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी निमित्त निवडुंग्या विठोबा मंदिर या ठिकाणी आरोग्य वारीच्या उद्घाटनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आरोग्य वारीच्या कार्यक्रमासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षा दिपा मुधोळ मुंडे, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदिप कदम,माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य आणि अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा

पुणे -जागतिक योग दिनानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने बॅडमिंटन हॉल, श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे आज पुणे शहरातील सर्वात मोठा योग दिन २५०० नागरीकांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात साजरा झाला.

या उपक्रमात तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने करण्यात आली आणि आपल्या आरोग्यासाठी योग करणे किती महत्वाचे आहे, याचे महत्त्व पटवून देण्यात आले. या उपक्रमात बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे परिसरातील व पुणे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

IND Vs ENG पहिली कसोटी- भारत 471 धावांवर सर्वबाद:23 वर्षांनी इंग्लंडमध्ये एका डावात 3 भारतीयांनी शतके ठोकली; पावसामुळे खेळ थांबला

लीड्स-तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा डाव ४७१ धावांवर संपला. संघाने शेवटच्या ७ विकेट्स ४१ धावा करून गमावल्या. शनिवारी, हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, भारतीय संघाने ३५९/३ च्या धावसंख्येने खेळण्यास सुरुवात केली.

कर्णधार शुभमन गिलने 147, ऋषभ पंतने 134 आणि यशस्वी जैस्वालने 101 धावा केल्या. केएल राहुलने ४२ धावांचे योगदान दिले. लंचपूर्वी गिल आणि पंत बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा खालचा मधला क्रम कोसळला. ८ वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या करुण नायरला आपले खातेही उघडता आले नाही. रवींद्र जडेजा ११ धावा काढून बाद झाला आणि शार्दुल एक धाव काढून बाद झाला.

इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स आणि जोश टंग यांनी प्रत्येकी ४ विकेट घेतल्या. ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

India FlagIndia

471

England FlagEngland

(2 ov) 13/1

Day 2 – Session 2: England trail by 458 runs.

Current RR: 6.50

 • Min. Ov. Rem: 60

Test CAREER

BowlersOMRWEcon0s4s6sThis spell
Mohammed Siraj (rf)10909.003201 – 0 – 9 – 0
Jasprit Bumrah (rf)10414.005101 – 0 – 4 – 1
MatWktsBBIAve
371006/1530.83
462066/2719.33

Partnership: 9 Runs, 1 Ov (RR: 9) • Last Bat: Zak Crawley 4 (6b) • FOW: 4/1 (0.6 Ov)

Reviews Remaining: India – 3 of 3, England – 3 of 3

दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान, दहा हजार शबनम बॅग वाटप

पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम आहे. दरवर्षी प्रमाणे पुण्यातील दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांचे यंदाही जोरदार स्वागत करण्यात आले.

या विषयी माहिती देताना गौरव प्रमोद दुगड म्हणाले, दुगड ग्रुप आणि पुष्पा स्टील च्या वतीने मागील 25 वर्षा हून अधिक काळ वारकऱ्यांची सेवा करण्यात येते. कै.माणिकशेठ दुगड यांनी सुरू केलेला सेवेचा वारसा प्रमोद दुगड आणि आता मी व माझी पत्नी मोनल दुगड नेटाने चालवण्याचा प्रयत्न करत आहोत.आज दहा हजार वारकऱ्यांना शबनम बॅग वाटप करण्यात आल्या आहेत, महिला वारकऱ्यांना साड्याही वाटप करण्यात आल्या. याशिवाय दरवर्षी प्रमाणे 500 हून अधिक वारकऱ्यांसाठी पंढरपूर ला जाईपर्यंत पुरेल अशी शिदोरी देण्यात आली आहे, यामध्ये गडू, तांदूळ, साखर, गूळ, शेंगदाणे, साबुदाणा, गुडदाणी, बिस्किट आदिचा समावेश आहे. समाजाचे आपण देणे लागतो आणि वारकऱ्यांच्या रूपाने आपल्या शहरात आलेल्या विठ्ठला चरणी सेवा करण्याची संधी म्हणून आम्ही दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतो असेही दुगड यांनी सांगितले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत योगदिन उत्साहात साजरा.

पुणे : शनिवार दिनांक २१जून २०२५ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकातून ,
“विद्यार्थांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी नियमित योगासने करावी,शरीर व मन बळकट करावे असे आवाहन केले.तसेच मनाचे आणि शरीराचे आरोग्य जपण्यासाठी योगाचे महत्व सांगितले”.
इयत्ता पहिली ते चौथीच्या सुमारे बाराशे पन्नास विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार अनुलोम विलोम, कपालभाती, ताडासन, वृक्षासन, धनुरासन, त्रिकोणासन इत्यादी योगासने केली आणि सूर्यनमस्कार घातले. तसेच नियमित योगासने व व्यायाम करण्याचा संकल्प केला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही योगासने केली. या दिवशी आयोजित केलेल्या पालक सभेतही पंचकोश विकासाच्या दृष्टीने योगासनांचे महत्त्व सांगण्यात आले. या उपक्रमाने प्रेरित होऊन पालकांनीही योगासने केली व त्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले.तसेच नियमित स्वतः योगासने करण्याचा व आपल्या पाल्यांकडून योगासने करून घेण्याचा संकल्प केला. इरा कावरे या इयत्ता
चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने व
शिक्षिका अर्चना देव यांनी योगदिनाची माहिती सांगितली. सुषमा घडशी यांनी सूत्रसंचालन केले.मनीषा कदम यांनी योगगीत सांगितले. शाळेतील शिक्षक वैशाली जाधव, सोनाली मुंढे, अश्विनी राजवाडे, राऊत या शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली.
भाग्यश्री हजारे यांनी आभार मानले.
ज्येष्ठ शिक्षक तनुजा तिकोने, धनंजय तळपे यांनी आयोजन सहाय्य केले.

एन.ई.एम.एस शाळेच्या विद्यार्थ्यांकडून घडली माऊलींची सेवा

पुणे: दि.२१ जून
शनिवार पेठेतील एन. ई. एम.एस शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पंढरपूरला पायी जाणे शक्य झाले नाही, तरी विद्यार्थ्यांनी दिंडी क्रमांक ४३ यांचा मुक्काम असलेल्या हसबनीस बखळ येथील, गाडगीळ शाळेत माऊलींची सेवा केली.
मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगी देशमुख व शिक्षकांच्या समवेत जाऊन वारकऱ्यांना प्रश्न विचारून त्यांचे अनुभव जाणून घेतले व शाळेत स्वतः बनवलेल्या शेंगदाण्याच्या लाडूंचे पर्यावरण पूरक कागदी पिशव्यांमधून वाटप केले.
ह. भ. प गोविंद महाराज केंद्रे आळंदी यांचे उत्तराधिकारी ह.भ.प विष्णु महाराज केंद्रे यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला व त्यांचे आशीर्वाद घेतले.
श्री संतोष नामजोशी यांच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

रमणबाग प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिना प्रित्यर्थ विद्यार्थ्यांची योग प्रात्यक्षिके

पुणे-न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत शनिवार दि.२१जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.योग साधनेच्या माध्यमातून स्वतःचे स्वास्थ्य उत्तम राखले तर सामाजिक स्वास्थ्यही आपोआपच जपले जाते म्हणूनच शाळेत विद्यार्थ्यांना योगासने शिकवण्यात येतात असे शालाप्रमुख मा.चारुता प्रभुदेसाई यांनी प्रास्ताविकातून सांगितले. क्रीडा भारती महाराष्ट्र प्रांत संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत असलेले श्री.दीपक मेहंदळे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. मनाची एकाग्रता योगसाधनेनेच साध्य होते.प्रकृती निरोगी व निकोप राहण्यासाठी योगासने करण्याची योग्य पद्धती व फायदे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. याप्रसंगी ताडासन,त्रिकोणासन,वृक्षासन खलासन,पवनमुक्तासन बालासन ,पद्मासन, इत्यादी योगासनांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी कुशलतेने सादर केली.मनीष चलवादी या विद्यार्थ्याने तर अवघड असे द्विपादग्रीवासन लिलया केले. पुस्तक देऊन मुख्याध्यापकांनी त्याचे विशेष कौतुक केले.पर्यवेक्षिका अंजली गोरे यांनी अतिथींचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक रमेश शेलार यांनी केले तर महेश जोशी यांनी आभार मानले.कार्यक्रमास उपप्रमुख जयंत टोले व पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर यांचे मार्गदर्शन लाभले.