Home Blog Page 488

सृजनसाधक पुरस्काराने रागेश्री वैरागकर-कुलकर्णी यांचा गौरवपरंपरांकडे पुन्हा एकदा वळून बघण्याची गरज : पंडित रघुनंदन पणशीकर


‌‘सृजनसभा‌’ संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे : कलेच्या क्षेत्रात संस्कृतीमुळे अनेक परंपरा आपल्याला लाभलेल्या आहेत याकडे पुन्हा एकदा वळून बघण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांनी केले. विविध कलांच्या क्षेत्रातील सृजन विचार रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‌‘सृजनसभा‌’ उत्तमप्रकारे कार्य करीत आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

शास्त्रोक्त संगीतासाठी समर्पित ‌‘सृजनसभा‌’ संस्थेचा प्रथम वर्धापन दिन आणि सृजनसाधक पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. 22) सायंकाळी शिवाजीनगर येथील घोले रोडवरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. पहिल्या सृजनसाधक पुरस्काराने स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या रागेश्री वैरागकर-कुलकर्णी (नाशिक) यांचा सन्मान पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्कराचे स्वरूप होते. सृजनसभा प्रमुख होनराज मावळे, संस्थेच्या व्यवस्थापन प्रमुख अक्षदा इनामदार मंचावर होते.
पंडित रघुनंदन पणशीकर म्हणाले, सृजनसभेच्या माध्यमातून संस्थाप्रमुख होनराज मावळे विविध कलांच्या क्षेत्रातील विचार रसिकांना उत्तम प्रकारे समजावून सांगत आहेत. कलेच्या क्षेत्रातील संस्थेची वाटचाल दैदिप्यमान असेल.
संस्थेच्या वाटचालीविषयी अध्यक्षपदावरून बोलताना होनराज मावळे म्हणाले, सर्व क्षेत्रातील कलाकारांना एकत्र आणण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. सांगीतिक कार्यक्रमांची निर्मिती करून त्याचे प्रयोग महाराष्ट्रभर सादर करण्यात येत आहेत. संस्कारक्षम पिढी घडण्यासाठी कार्यशाळा घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्काराविषयीची माहिती अक्षदा इनामदार यांनी प्रास्ताविकात सांगितली.
निसर्ग लोहार यांनी साकारलेल्या सृजन गणेशाच्या प्रतिमेचे अनावरण तसेच दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. सन्मानपत्राचे वाचन राधा जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृणालिनी दुसाने यांनी तर आभार प्रदर्शन प्रांजल अक्कलकोटकर यांनी केले.

रागेश्री वैरागकर-कुलकर्णी यांचे बहारदार गायन

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रागेश्री वैरागकर-कुलकर्णी यांचे बहारदार गायन झाले. त्यांनी मैफलीची सुरुवात राग पुरिया कल्याणमधील ‌‘हो वन लागी सांझ‌’ हा बडाख्याल तर ‌‘पिहरवा आजा रे‌’ हा छोटा ख्याल सादर केला. त्यानंतर मिरामधुरा नाटकातील आनंदसुधा हे गीत सादर केले. संत नामदेव रचित, पंडित शंकरराव वैरागकर यांनी संगीतबद्ध केलेले ‌‘जननीये जीवलगे‌’ हे भक्तीगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता संत जनाबाई रचित आणि जगदेव वैरागकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‌‘पंढरीच्या राया‌’ या भैरवीने केली. त्यांना प्रसाद करंबेळकर (तबला), जगदेव वैरागकर (संवादिनी), ऋग्वेद जगताप (पखवाज), गार्गी काळे (टाळ), आर्या ऐगळीकर (तानपुरा) यांनी समर्पक साथसंगत केली.
भारतीय संस्कृती जपण्याचे काम होत असतानाच युवा कलाकारांना स्वरमंच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नही होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे, असे रागेश्री वैरागकर-कुलकर्णी म्हणाल्या.

विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासा बरोबरच कला, खेळात प्राविण्य मिळवावे- आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे मत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती तर्फे १० वी १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न.

पुणे :  विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती 10 वी, 12 वी मध्ये त्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे होते. विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी गुण जास्त कक्षात मिळाले आहेत यापेक्षा आपल्याला चांगले काय समजते, कक्षात अधिक रुचि आहे अशा विषयांची निवड करिअर म्हणून केले तर अधिक चांगले यश मिळते.  विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासा बरोबरच एक कला, एखाद्या खेळात प्राविण्य मिळवावे असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुण्याच्या माजी उपमहापौर  सुनिता परशुराम वाडेकर आणि मित्र परिवार यांच्या वतीने इयत्ता १० वी आणि १२ वी शालांत परीक्षेत नाविन्यपूर्ण यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आणी करिअर मार्गदर्शन सम्यक विहार व विकास केंद्र बोपोडी या ठिकाणी पार पडले.यावेळी आमदार शिरोळे बोलत होते.

या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर,माजी अपर जिल्हाधिकारी शरद जाधव,रोटरी क्लब ऑफ पुना डाऊन टाउन चे अध्यक्ष प्रा.पी.एन.अय्यर, रोटरी क्लब ऑफ पुना डाऊन टाउनच्या वैद्यकीय संचालक डॉ. झिमरा इस्रायल, रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक किरण लोखंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराचे अध्यक्ष संजय सोनवणे, आयोजक माजी उपमहापौर सुनिता वाडेकर आदि मान्यवर उपस्थित होते. 

या प्रसंगी प्रा.पी.एन.अय्यर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना करिअर मार्गदर्शन केले. डॉ. झिमरा इस्रायल यांनी मुलींनी यशस्वी होण्यासाठी घर आणि करिअर यांचा मध्य कसं साधावा याबद्दल मार्गदर्शन  केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम वाडेकर यांनी केले. 

या प्रसंगी बोपोडी परिसरातील विद्यार्थ्यांना  ‘गुणवंत विद्यार्थी पुरस्कार’ तसेच उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपाई शिवाजीनगर उपाध्यक्ष निलेश वाघमारे,रिपाई पुणे शहर उपाध्यक्ष भीमराव वाघमारे, रोहित अडसूळ,सचिन चव्हाण,राजेंद्र शिंदे,सुरेंद्र आण्णा आठवले, बाळू मोरे,रुपेश पिल्ले,संजय पिल्ले,नंदाताई निकाळजे,निर्मला कांबळे, आरती देठे,उषा शेलार,विशाल निकाळजे,विलास जाधव, कैलास कांबळे, सचिन चव्हाण, सादिकभाई शेख आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.ज्ञानेश जावीर यांनी केले तर सुनीता वाडेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

5 विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी:पंजाब, गुजरातच्या विसावदर जागेवर AAP ; केरळमध्ये काँग्रेस तर बंगालमध्ये TMC ला आघाडी


४ राज्यांमधील ५ विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. सर्वप्रथम मतपत्रिकांची मोजणी सुरू आहे. १९ जून रोजी गुजरातमधील विसावदर आणि कडी जागा, पंजाबमधील लुधियाना पश्चिम जागा, केरळमधील निलांबूर जागा आणि पश्चिम बंगालमधील कालीगंज जागा येथे मतदान झाले.
गुजरातमध्ये भाजपची विश्वासार्हता धोक्यात आहे. भाजपने यापूर्वी कडीची जागा जिंकली होती. अशा परिस्थितीत भाजपला कडीची जागा राखावी लागेल. १३ डिसेंबर २०२३ रोजी विसावदरमध्ये आपचे आमदार भूपेंद्रभाई गंडूभाई भयानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते भाजपमध्ये सामील झाले. पक्षाला येथे पुन्हा जिंकायचे आहे.

पश्चिम बंगालमधील कालीगंज तृणमूल काँग्रेसने आणि केरळमधील निलांबूर एलडीएफने ताब्यात घेतला. पंजाबमधील लुधियाना पश्चिमवर आम आदमी पक्षाने (आप) कब्जा केला. आपने लुधियाना पश्चिममधून राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना उमेदवारी दिली आहे.

जर अरोरा आमदार झाले तर त्यांना राज्यसभेची जागा सोडावी लागेल, ज्यामुळे राज्यसभेची जागा रिक्त होईल. आप अरविंद केजरीवाल यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवू शकते अशी अपेक्षा आहे.

‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील ८ हजार पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे किट

६ हजार पुरुष तर २ हजार महिला पोलिसांना होणार लाभ

पुणे : प्रतिनिधी – पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पुनीत बालन ग्रुप’कडून जीवनावश्यक वस्तूंचे आठ हजार कीट देण्यात आले आहेत. यामध्ये ६ हजार पुरुष तर २ हजार महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या किटचा समावेश आहे. या किटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असल्याने वारीच्या बंदोबस्ताच्या कालावधीतील पोलीस बांधवाची गैरसोय टळणार आहे आणि परिणामी त्यांना चांगली सेवा देता येणार आहे.आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संताच्या पालखी समवेत लाखो वारकरी पंढरपुरमध्ये दर्शनासाठी येत असतात. यावर्षी येत्या ६ जुलैला आषाढी वारी सोहळा आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांसह दर्शनासाठी येणार्या महत्वाच्या आणि अति महत्वाच्या व्यक्तींसाठी सहा हजार पुरुष कर्मचारी आणि दोन हजार महिला कर्मचारी असे जवळपास आठ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी असणार आहेत. आषाढी वारी सोहळ्याच्या आठ दिवस हे सर्व अधिकारी कर्मचारी पंढरपुरमध्ये मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे या सर्वांसाठी दैनंदिन वापराच्या जीवनावश्यक वस्तूंचे कीट बॅगेसह उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी पंढरपुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार बालन यांनी तत्काळ हे कीट उपलब्ध करून दिले आहेत. पंढरपूरचे पोलिस उपनिरीक्षक महादेव पिसाळ यांच्याकडे हे कीट सुपूर्त करण्यात आले. गतवर्षीही ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून हे किट देण्यात आले होते.

किटमधील वस्तू
कोलगेट पाऊच, पॅराशूट तेल बॉटल, ओडोमास, ग्लुकोज, डेटॉल साबण, शेंगदाणा चिक्की, मास्क, पाणी बॉटल आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड.

“उन, वारा, पाऊस यांची तमा न करता विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची सुरक्षा व्यवस्था राखण्याचं महत्त्वाचं आणि अत्यंत जोखमीचं काम हे पोलिस बांधव करत असतात. त्यामुळे त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांच्या मागणीनुसार दैनंदिन वस्तूंचे कीट देण्यात आले आहे. या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेचा खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, याचं समाधान आहे.: पुनीत बालन (युवा उद्योजक)

आगाखान पॅलेस येथे जागतिक योग दिन साजरा

जिल्ह्यात विविध भागात आयोजित योग दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि.२२: आयुष मंत्रालय भारत सरकारच्या निर्देशानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण,जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई मंडळ, प्रजापिता ब्रम्हा कुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. २१ जून) वाजता जागतिक योग दिन आगा खान पॅलेस, कल्याणीनगर येथे साजरा करण्यात आला.

यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, वरिष्ठ संरक्षण सहाय्यक गजानन मंडावरे, पुरातत्व विभागाचे अभियंता
मेहेबूब शेख आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, दररोज योगा केल्याने आनंदी जीवन जगता येत असल्याचे योगामुळे रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार टाळता येईल, असेही त्यांनी सांगितले.

उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल, शास्त्रीनगर, येरवडा येथे योग दिन आयोजित करण्यात आला.

यावेळी कैवल्यधाम संस्थेच्या योग प्रशिक्षकांनी विविध योगा प्रात्यक्षिके सादर केली. या प्रसंगी गेनबा मोझे विद्यालय, शास्त्रीनगरचे कर्मचारीवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

किल्ले शिवनेरीवर योग दिन साजरा

जिल्हा प्रशासन, पुणे, पुरातत्व सर्वेक्षण विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर येथील किल्ले शिवनेरी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या आवाहनानुसार जिल्ह्यात महानगरपालिका पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शाळा, वारकरी मुक्कामाच्या ठिकाण तसेच तालुक्यात शाळा, महाविद्यालयात योगा प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

जिल्ह्यात विविध भागात आयोजित योग दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, यावेळी कार्यक्रमात खेळाडू, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते,असे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या प्रसिध्दी पत्रकानव्ये कळविले आहे.

टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरीच्या दिशेने पालख्या …

पुणे-दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालख्या रविवार, 22 जून रोजी पुण्याहून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. दोन्ही पालख्या पुण्यात दाखल झाल्यानंतर शहरात वैष्णवांचा मेळा जमला होता. पुणे आणि आसपासच्या परिसरातील हजारो भाविकांनी या पालख्यांचे दर्शन घेतले. यानंतर दोन्ही पालख्या आता पुण्याहून निघाल्या आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुण्यातील विठोबा मंदिरातून सकाळी 6 वाजता मार्गस्थ झाली.दुपारी हडपसर पासून दोन्ही पालख्यांचे मार्ग वेगळे झाले , संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटात आल्यानंतर नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले.

संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा टाळ-मृदंगाच्या गजरात रविवारी दिवे घाटात पोहोचला. ज्ञानोबा तुकारामांच्या नामघोषात संपूर्ण दिवे घाट मार्ग दुमदुमून गेला होता. चढ-उतारांनी भरलेला, नागमोडी वळणांचा आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला दिवे घाट हा माऊलींच्या वारीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

दिवे घाटातील वारीचे नयनरम्य दृश्य अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक घाटाच्या टेकड्यांवर गर्दी करतात. मात्र यंदा, घाट परिसरात सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे टेकडी परिसरात नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.उंच डोंगर आणि हिरवीगार झाडी यांच्या सान्निध्यातून शेकडो वर्षांची परंपरा जपणाऱ्या या सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पुढे सरकत होते.

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत जगात श्रेष्ठ : पंडित बृज नारायणस्वरमयी

गुरकुल आयोजित मैफलीत पंडित बृज नारायण यांचे सरोद वादन

पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत जगात श्रेष्ठ आहे. ऋतू आणि वेळेच्या प्रहराप्रमाणे शास्त्रीय संगीतातील राग बांधले गेले आहेत. अशी रागदारी जगातील कुठल्याही संगीतात नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध सरोद वादक पंडित बृज नारायण यांनी केले. शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारात रसिकांचेही मोठे योगदान आहे, असे मतही त्यांनी नोंदविले.
डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे रविवारी (दि. 22 जून) जगविख्यात सारंगीवाद पंडित राम नारायण यांचे सुपुत्र व शिष्य पंडित बृज नारायण यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय सरोद वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जंगली महाराज रस्त्यावरील (छत्रपती संभाजी उद्यानासमोर) स्वरमयी गुरुकुल सभागृहात वादनाची मैफल रंगली. त्या वेळी पंडित बृज नारायण यांनी रसिकांशी संवाद साधला.
शास्त्रीय गायन, वादनाविषयी चर्चा व्हावी, अभ्यासकांना मार्गदर्शन व्हावे, कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने स्वरमयी गुरुकुलतर्फे मासिक संगीत सभेचे आयोजन करण्यात येत आहे. आजचे हे २५३वे पुष्प होते.
पंडित बृज नारायण यांनी आपल्या वादनाची सुरुवात रामकली रागाने केली. आलाप, जोड, झाला अप्रतिमरित्या सादर करून रसिकांना मोहित केले. राग अल्हैयाबिलावल सादर केल्यानंतर मैफलीची सांगता अप्रचलित भैरवीने केली. त्यांना पंडित अरविंदकुमार आझाद यांची तबला तर मनिषा पिंपळगावकर यांची तानपुरा साथ लाभली.
डॉ. प्रभा अत्रे यांच्याशी असलेल्या कौटुंबिक नात्याची उकल करून पंडित बृज नारायण म्हणाले, प्रभाताईंच्या गुरुकुलात वादनाची संधी मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे. सांगीतिक प्रवास उलगडताना ते म्हणाले, वडिल आणि गुरू तसेच ज्येष्ठ कलाकारांचे मिळालेले आशीर्वाद यामुळे संगीत क्षेत्रात यश प्राप्त करू शकलो. प्रत्येक वाद्याची भाषा ही वेगळी असते. सादरीकरणातून कलाकाराला आनंद मिळत असतो. शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार अधिक होणे ही काळाची गरज आहे.
कलाकारांचा सत्कार डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. अशोक वळसंगकर यांनी केला तर सूत्रसंचालन डॉ. अश्विनी वळसंगकर यांनी केले.

आयुक्तांचा नागरी संवाद होणार कठीण

आठवड्यातून अवघा दीड तास आयुक्त नागरिकांना भेटणार

पुणे : महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अवघ्या तीन आठवड्यात नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी सुरू असलेल्या अभ्यांगत कक्षाच्या कामकाजात बदल केला आहे. त्यामुळे यापुर्वी आठवड्याच्या प्रत्येक सोमवार आणि गुरूवारी सुरू ठेवण्यात येणारा हा अभ्यांगत कक्ष यापुढे फक्त आठवड्यातून एकदाच अर्थात तोही प्रत्येक सोमवारी दुपारी चार ते साडेपाच या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.महिन्याच्या पहिल्या सोमवारी स्वत: आयुक्त उपस्थित असतील. तर पुढील तीन सोमवारी अतिरिक्त आयुक्त उपस्थित राहाणार आहेत

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. या आदेशानुसार आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी हा अभ्यांगत कक्ष सुरू राहील. दुपारी चार ते साडेपाच या वेळेत नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्यासाठी पावले उचलण्यात येतील. . यापुर्वीच्या तक्रारींच्या अनुभवावरून अतिक्रमण, बांधकाम, पाणी पुरवठा आणि मिळकत कर विभागाचेच अधिकारी या बैठकींना उपस्थित राहाणार आहेत.प्रशासक काळात नागरिकांच्या तक्रारी थेट अधिकार्‍यांकडे येत आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी संबधित खोतप्रमुखांकडून विलंब होत असल्याने नागरिक थेट अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांकडे जातात. यामुळे अति वरिष्ठ अधिकार्‍यांचा बहुतांश वेळ या भेटींसाठी जात असल्याने अन्य नियोजनाच्या बैठका, नेत्यांच्या दौर्‍यांतील उपस्थिती, मंत्रालयातील बैठका अशा अगोदरपासूनच हेव्ही शेड्यूलमधून नागरिकांना वेळ देण्यात दमछाक होत असल्याने तत्कालीन आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अभ्यांगत कक्ष ही संकल्पना पुढे आणली. आठवड्याच्या प्रत्येक सोमवार आणि गुरूवारी दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेउन संबधित विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत समक्ष पाठपुरावा आणि तक्रारींची सोडवणूक करावी, असा यामागील उद्देश होता. या अभ्यांगत कक्षाची जबाबदारी ही उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍याकडे देण्यात आली होती.मागील साधारण पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात बदल करण्याचा निर्णय नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला आहे. त्यामुळे यापुढे फक्त सोमवारी आणि तेही चार ते साडेपाच असा दीड तासच हा अभ्यांगत कक्ष सुरु ठेवण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत प्रादेशिक परिस्थितीवषयी दूरध्वनीवरून चर्चा केली


प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य लवकर पुनर्स्थापित होण्यासाठी युद्ध तत्काळ थांबवणे, संवाद आणि मुत्सद्दीपणा हाच मार्ग  असल्याचे पंतप्रधानांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्राध्यक्ष, महामहीम डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी प्रादेशिक परिस्थिविषयी सविस्तर चर्चा केली.

या संभाषणादरम्यान, पंतप्रधानांनी नुकत्याच वाढलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी संवाद आणि मुत्सद्दीपणाचे महत्त्व अधोरेखित केले. दीर्घकालीन प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी युद्ध थांबवणे आवश्यक असल्याचा आवाहनाचा पुनरुच्चारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

या संदर्भात पंतप्रधानांनी  X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :

इराणचे अध्यक्ष @drpezeshkian यांच्याशी संवाद साधला. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. नुकत्याच वाढलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य लवकर पुनर्स्थापित होण्यासाठी युद्ध तत्काळ थांबवणे, संवाद आणि मुत्सद्दीपणा हाच मार्ग  असल्याचे पुन्हा अधोरेखित केले.

जमिनीपासून 295 फूट खाली बांधलेल्या अणुतळावर बॉम्बस्फोट केला

रविवारी सकाळी अमेरिकेने बी-२ बॉम्बरने इराणच्या तीन अणुतळांवर हल्ला केला. ही ठिकाणे इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथे आहेत.न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, इराणची ही अणुबॉम्ब तळे डोंगर कापून बांधली गेली आहेत. त्यामुळे त्यांना नष्ट करण्यासाठी बी-२ बॉम्बर विमानांची आवश्यकता होती.अहवालानुसार, हल्ल्यापूर्वी, बी-२ बॉम्बर्सनी अमेरिकेतील मिसूरी येथून सुमारे ३७ तास न थांबता उड्डाण केले आणि हवेत अनेकवेळा इंधन भरले.

बी-२ बॉम्बरने फोर्डो साइटवर ३० हजार पौंड वजनाचे ६ जीबीयू-५७ बॉम्ब (बंकर बस्टर) टाकले. तसेच, नतान्झवर दोन बॉम्ब टाकण्यात आले. त्याच वेळी, इस्फहान आणि नतान्झवर ३० टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. हे ४०० मैल अंतरावर असलेल्या अमेरिकन पाणबुड्यांवरून डागण्यात आले.अमेरिकेने युद्धात GBU-57 सारखा बंकर बस्टर बॉम्ब वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

इस्रायल इराणच्या अणुतळांवर सतत हवाई हल्ले करत आहे, ज्यावर इस्रायलचे म्हणणे आहे की, ते इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखू इच्छितात. तथापि, इराणने अणुबॉम्ब बनवल्याचा इन्कार केला आहे.या हल्ल्यांमुळे इराणचे किती नुकसान झाले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, इराणच्या अणुऊर्जा संघटनेने (AEOI) म्हटले आहे की अमेरिकेच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतरही फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानमध्ये रेडिएशन गळती झालेली नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणुतळांना नष्ट केल्याच्या दाव्यांनंतर हे विधान आले आहे.इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाचा आज १० वा दिवस आहे. अमेरिकास्थित मानवाधिकार कार्यकर्ते वृत्तसंस्थेच्या मते, १३ जूनपासून इराणमध्ये ६५७ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि २००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.तथापि, इराणच्या आरोग्य मंत्रालयाने पुष्टी केली आहे की, केवळ ४३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि ३,५०० जखमी झाले आहेत. दरम्यान, इस्रायलमध्ये २१ जूनपर्यंत २४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हाय अलर्ट जारी

अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) ने सांगितले की, त्यांनी इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला केला आहे आणि 14 महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे.त्याच वेळी, इराणने अमेरिकन लष्करी तळ आणि युद्धनौकांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेचे मध्य पूर्वेत ४० हजारांहून अधिक लष्करी तळ आणि युद्धनौका आहेत. त्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, अमेरिकन अधिकाऱ्यांनी न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले की, ते इराणच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास तयार आहेत.

इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य जनरल मोहसेन रेझाई यांनी सरकारी टेलिव्हिजनवर इशारा दिला की पश्चिम आशियातील एक महत्त्वाचा सामुद्रधुनी, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली जाऊ शकते. होर्मुझची सामुद्रधुनी ही पश्चिम आशियातील एक महत्त्वाची सामुद्रधुनी आहे जी पर्शियन आखाताला ओमानच्या आखात आणि अरबी समुद्राशी जोडते.

इस्रायली लष्कराने (IDF) म्हटले आहे की, त्यांच्या हवाई दलाने इराणचे दोन F-5 लढाऊ विमान पाडले आहेत. ही लढाऊ विमाने डेझफुल विमानतळावर तैनात होती. इस्रायली लष्कराने इराणचे 8 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लाँचरही नष्ट केल्याचा दावा केला आहे.

यापैकी ६ क्षेपणास्त्रे इस्रायलवर तात्काळ हल्ला करण्यासाठी सज्ज असल्याचे लष्कराने सांगितले.

अमेरिकेने इराणच्या अणुतळांवर हल्ल्याची माहिती एक दिवस आधीच दिली होती. मध्य पूर्वेतील न्यूज वेबसाइट अमवाज मीडियानुसार, एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने पुष्टी केली आहे की, हल्ल्यापूर्वी अमेरिकेने इराणला आगाऊ सूचना पाठवली होती.

प्रकाश आंबेडकर संतापले; म्हणाले- ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा

निवडणुकीचे फोटो-व्हिडिओ 45 दिवसांत डिलीट होणार!
मुंबई-निवडणूक आयोगाने घेतलेल्या एका निर्णयामुळे मोठा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यानुसार, निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ केवळ 45 दिवसांसाठीच जतन केले जाणार असून, त्यानंतर ते हटवण्यात येणार आहेत. या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. ही कारवाई लोकशाही, पारदर्शकता आणि जनतेच्या विश्वासाविरोधात असून ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेणे ही निवडणूक आयोगाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र त्यांनीच आता पारदर्शकतेच्या विरोधात पाऊल उचलले आहे, हे अतिशय गंभीर चिंतेचे कारण आहे.

आंबेडकरांनी नेमके काय म्हटलंय?

प्रकाश आंबेडकरांनी X वर पोस्ट करत म्हटलंय की, डिसेंबर 2024 मध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक नियम 1961 मध्ये केलेल्या सुधारणेमुळे अनेक निवडणूक संबंधित नोंदींवर सार्वजनिक प्रवेश प्रतिबंधित झाला आहे. या पार्श्वभूमीवर 16 जानेवारी 2025 रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर नेत्यांना पत्र लिहून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 75,97,067 मतांची संध्याकाळी 5 नंतर झालेली वाढ व सुधारित नियमावलीबाबत मी चिंता व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या या सूचनांकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय की, विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 नंतर वाढलेल्या मतदानाच्या संदर्भात चेतन चंद्रकांत अहिरे विरुद्ध भारतीय संघ व इतर या सुरू असलेल्या केसची महत्त्वपूर्ण पुढील सुनावणी सोमवार, 23 जून 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. याप्रकरणी याआधी उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला न्यायालयात उत्तर द्यायला सांगितले होते, असेही त्यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.

कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी येथील अनधिकृत प्लॉटिंग आणि बांधकामाच्या खरेदी करू नका -महापालिकेचे आवाहन

पुणे-कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी येथील अनधिकृत प्लॉटिंग आणि बांधकामा वरून महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाने नागरिकांना आवाहन केले आहे.

शहर अभियंता कार्यालयाच्या निवेदन नुसार, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी, ता. हवेली, जि. पुणे येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्लॉटिंग (भूखंड), जमीन विकसन करून प्लॉटची बेकायदेशीर विक्री केली जात असलेचे निदर्शनास आले आहे. अनधिकृत प्लॉटिंग हिलटॉप / हिलस्लोप आरक्षित जागेवर असल्याने अनधिकृत प्लॉटिंग, अनधिकृत बांधकाम इत्यादींवर बांधकाम विकास विभाग, पुणे महानगरपालिका मार्फत वेळोवेळी कारवाई करण्यात येते. तरी नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत प्लॉटिंगची खरेदी करू नये व त्यामुळे भविष्यात होणारी आपली फसवणूक टाळण्याची खबरदारी घ्यावी. असे जाहीर निवेदनात म्हटले आहे.

“महिला चळवळीच्या व्यापक मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी सदिच्छा भेट

मुंबई, दि. २२ जून २०२५ :
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांची काल मुंबईत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मा. विजया रहाटकर यांच्याशी सदिच्छा भेट झाली.

या सदिच्छा भेटीदरम्यान महिला चळवळीशी निगडित विविध सामाजिक, प्रशासकीय आणि धोरणात्मक मुद्द्यांवर सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली. डॉ. गोऱ्हे यांनी विधानपरिषद उपसभापती या नात्याने महिला विकास विषयक बैठका व कार्यक्रम यांची माहिती दिली. महिलांच्या सबलीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा, सामाजिक संस्था व शासकीय यंत्रणांमधील समन्वय, ग्रामीण व शहरी भागांतील महिलांच्या अडचणी, महिला सुरक्षितता, आरोग्य, रोजगार, शिक्षण आणि नेतृत्व विकास या मुद्द्यांवर चर्चा केंद्रित होती.

डॉ. गोऱ्हे यांनी राज्यस्तरावर तसेच केंद्रस्तरावर महिलांसाठी कार्यरत यंत्रणांमध्ये सहकार्य आणि धोरणात्मक एकवाक्यता वाढवण्याची गरज व्यक्त केली. तर रहाटकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी भाजप कार्यसंघातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत राष्ट्रीय महिला आयोगाच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला.

या सदिच्छा भेटीच्या निमित्ताने महिला विषयक प्रश्नांवर विविध पक्षांतील व विचारप्रवाहांतील नेतृत्व एकत्र येऊन सकारात्मक चर्चा करत असल्याचे सकारात्मक उदाहरण समाजासमोर आले.

सचिन पिळगावकरांनी गब्बर सिंगला डायलॉग शिकवले हे पचनी पडतच नाही: जितेंद्र आव्हाड

अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी अलीकडेच एका मुलाखतीत ‘शोले’ चित्रपटातील “कितने आदमी थे…” हा प्रसिद्ध डायलॉग अमजद खान यांना नीट बोलता येत नव्हता, असा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, अमजद खान जेव्हा हा डायलॉग बोलत होते, तेव्हा त्याचा आवाज पातळ ऐकू येत होता. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी अमजद खान यांना स्टुडिओत नेऊन त्यांच्याच आवाजात पुन्हा हा डायलॉग रेकॉर्ड करून घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सचिन पिळगावकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सचिन पिळगावकर यांना त्यांच्या या मुलाखतीवरून डिवचले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले, शोले हा सिनेमा 1975 साली रिलीज झाला. त्यावेळी सिनेरसिकांनी शोले सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला होता. त्यातील एक-एक डायलॉग त्यावेळच्या पिढीच्या तोंडावर होता. डाकू, दरोडेखोर यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र, शोलेमध्ये अमजद खान यांनी साकारलेला गब्बरसिंग जेवढा गाजला, मला नाही वाटत तेवढा कोणता अभिनेता दरोडेखोराच्या भूमिकेमध्ये गाजला असेल.

गब्बरसिंग अन् अमजद खान ही हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर नावे आहेत. पण, हे काही मनाला पटले नाही की, गब्बरसिंग म्हणजेच अमजद खान यांना डायलॉग फेकण्याचे कौशल्य- आदब हे त्या सिनेमातील बालकलाकार सचिन पिळगावकर याने शिकवली. कारण, अमजद खान यांचे वडील झकारिया खान अर्थात जयंत हेदेखील 1950-60 च्या दशकातील नामांकित अभिनेते होते. म्हणजेच चित्रपटसृष्टीत खानदान असलेल्या अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी, हे पचनी पडतच नाही. आज अमजद खान आपल्यात नाहीत आज ही जो कोणी शोले बघेल तो अमजद खान म्हणजेच गब्बर सिंगला विसरूच शकत नाही.


सचिन पिळगावकर यांनी मुलाखतीत म्हटले होते की, शोले सिनेमा आल्यानंतर अनेकांना असे वाटले की, अमजदचा आवाज हा गब्बर सिंहचा आवाज वाटत नाहीय. तो थोडासा पातळ वाटतोय. त्याला मी माईकसमोर उभे केले आणि आमचे सूद नावाचे तेव्हा रेकॉर्डिस्ट होते, असिस्टंट होते ते मंगेश देसाईंचे. त्यांना सांगितले ट्रेबल एकदम बंद करदो और बेस बढादो. मी अमजदला सांगितले माईकच्या जवळ उभा राहा, आणि वरच्या पट्टीत नको बोलूस खालच्या पट्टीत बोल. कारण माझ्यामागे तो अनुभव होता, जो अमजदच्या मागे नव्हता आणि पहिला डायलॉग “कितने आदमी थे…” आधी त्याने वरच्या पट्टीत ओरडून म्हटलेले. मी त्याला सांगितले नाही, असे नाही. नीचे के सूर मे बोल. पट्टी पुरी नीचे कर. कारण मी गायक सुद्धा आहे. मला ऑक्टिम्स कळतात. त्यामुळे खालच्या सुरात बोल, कितने आदमी थे, असे सचिन पिळगावकर यांनी म्हटले होते.

अमेरिकेने इराणच्या 3 अणुस्थळांवर केला बॉम्बहल्ला:ट्रम्प यांनी केवळ इराणचा नाही तर त्यांच्या स्वतःच्या देशातील लोकांचाही विश्वासघात केला,इराण प्रत्युत्तर देईल..अब्बास अराक्ची म्हणाले

रशिया म्हणाला- जर हीच परिस्थिती राहिली तर ट्रम्प यांना कधीही नोबेल मिळणार नाही
माजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव म्हणाले आहेत की ट्रम्प शांतीचा दूत म्हणून आले होते, परंतु आता त्यांनी अमेरिकेला एका नवीन युद्धात ओढले आहे. त्यांनी टेलिग्रामवर लिहिले आहे की बहुतेक देश इस्रायल आणि अमेरिकेच्या कृतींविरुद्ध आहेत.मेदवेदेव म्हणाले की अमेरिका आता एका नवीन संघर्षात अडकली आहे ज्यामध्ये जमिनीवर युद्ध होण्याची शक्यता आहे. त्यांनी उपहासात्मकपणे म्हटले की, “जर हीच परिस्थिती राहिली तर ट्रम्प कधीही नोबेल शांतता पुरस्कार जिंकू शकणार नाहीत.”

तेहरान -अमेरिकेने इराणमधील ३ अणु तळांवर हल्ला केला आहे. यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान यांचा समावेश आहे. भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे ४:३० वाजता हा हल्ला झाला.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की फोर्डोवर बॉम्बचा संपूर्ण साठा टाकण्यात आला.

ट्रम्प यांनी लिहिले, “सर्व विमाने सुरक्षितपणे घरी परतत आहेत. आमच्या महान अमेरिकन योद्ध्यांचे अभिनंदन. जगात असे दुसरे कोणतेही सैन्य नाही जे हे करू शकले असते. आता शांततेची वेळ आली आहे.”त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे की इराणने आता हे युद्ध संपवण्यास सहमती दर्शवावी. ट्रम्प यांनी रविवारी सकाळी देशाला संबोधित केले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की आता इराणने शांतता करावी. जर त्यांनी असे केले नाही तर त्यांच्यावर आणखी मोठे हल्ले केले जातील.

इराण म्हणाला – अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची म्हणाले की अमेरिका फक्त शक्ती आणि धमकीची भाषा समजते, त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यांची पर्वा नाही. जरी इराणवर हल्ला करून अमेरिका आपल्या उद्देशात यशस्वी होऊ शकली नाही, तरीही आम्ही या हल्ल्याकडे दुर्लक्ष करणार नाही. आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ.अराक्ची म्हणाले की अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ इराणचा विश्वासघात केला नाही तर त्यांच्या स्वतःच्या देशातील लोकांचाही विश्वासघात केला आहे. त्यांनी अशा व्यक्तीचे (नेतान्याहू) ऐकून हल्ला केला आहे जो स्वतःच्या फायद्यासाठी इतर देशांवर हल्ला करतो.

अराक्ची म्हणाले की इराण पूर्वीही पाश्चात्य देशांवर विश्वास ठेवत नव्हता, आता त्यांच्यावर विश्वास न ठेवण्याची आणखी कारणे आहेत.
१३ जूनपासून इराणमध्ये ६५७, इस्रायलमध्ये २४ जणांचा मृत्यू
इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाचा आज १० वा दिवस आहे. १३ जूनपासून इस्रायलने १० इराणी अणुशास्त्रज्ञांना ठार मारले आहे. इस्रायल डिफेन्स फोर्स (IDF) ने शनिवारी इराणी सैन्याचे ३ कमांडर आणि ४ सैनिक मारल्याचा दावाही केला आहे.
अमेरिकास्थित ह्युमन राईट्स अ‍ॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सीनुसार, १३ जूनपासून इराणमध्ये ६५७ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि २००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
तथापि, इराणच्या आरोग्य मंत्रालयाने पुष्टी केली आहे की केवळ ४३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि ३,५०० जखमी झाले आहेत. दरम्यान, इस्रायलमध्ये २४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.