Home Blog Page 490

इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक वेतन सुधारणा,विरोधी युनियन कर्मचा-यांची दिशाभूल करीत आहेत

मुंबई, दि. २१ जून – अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ (युनियन) आणि AGILE व्यवस्थापन यांच्यात झालेल्या ऐतिहासिक वेतन सुधारणा करारामध्ये इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी सर्वात मोठी वेतनवाढ निश्चित करण्यात आली आहे. या करारामुळे सर्व AGILE कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळून दरवर्षी एकूण १२० कोटींचा वाढीव प्रभाव होणार आहे अशी माहिती अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सुहास माटे यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
माटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष व अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर कर्मचा-यांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचा-यांना केंद्र शासनाच्या वेतनमानानुसार वेतनरचना लागू करण्यात आली आहे. एप्रिल २०२५ पासून सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या वेतन संरचनेनुसार वेतन दिले जाणार आहे. यामध्ये कोणत्याही पद किंवा सेवाकाळाचा भेद न ठेवता सर्वांना समान लाभ मिळणार आहे.
त्याचप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना दर सहामाहीला वाढणारा महागाई भत्ता (VDA) यापुढे (एप्रिल व ऑक्टोबर) केंद्र शासनाच्या महागाई भत्त्याचा लाभ मिळणार असून तो वेतनवाढीव्यतिरिक्त असेल. पूर्वी केवळ काही निवडक कर्मचाऱ्यांनाच राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार VDA मिळत होता. युनियनने ही विसंगती दूर करत सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या VDA चा लाभ मिळवून दिला आहे असे स्पष्ट करताना माटे यांनी सांगितले की, VDA वाढीचे प्रमाणपुढील प्रमाणे असेल, अशिक्षित कर्मचाऱ्यांसाठी- रु.५००, उच्च कुशल कर्मचाऱ्यांसाठी- रु. ८००,वार्षिक प्रभाव रु. २१००० ते ११६०० पर्यंत वाढ मिळणार आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट वेतनवाढ करण्यात आली आहे.तसेच विरोधी युनियनने गेल्या वर्षी केवळ ₹६० लाखांची वेतनवाढ मिळवली होती, तर यंदा आमच्या कर्मचारी महासंघाने तब्बल ११.५ कोटींची वाढ यशस्वीरित्या निश्चित केली आह असे सांगतानाच माटे म्हणाले की, विरोधी युनियनने आतापर्यंत कर्मचा-यांवर केलेल्या अन्यायाचे निराकरण आमच्या कर्मचारी महासंघाने केला आहे. विरोधी युनियनने २०२४ ची वेतनवाढ एप्रिलऐवजी ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा मोठा तोटा झाला. आमच्या युनियनने या संदर्भात रचनात्मक संवाद साधून सर्वांसाठी न्याय्य लाभ मिळवून दिला आहे.
कर्मचा-यासांठी परदर्शक आणि न्याय वेतनरचनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे, त्यानुसार ५ वर्षे सेवा असलेल्या ८०४ कर्मचा-यांना रु.४ हजारची अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे, तर ३ वर्षे सेवा असलेल्या १४९५ कर्मचा-यांना रु. ५३०० ते रु. ५५०० ची वाढ देण्यात आली आहे. ३ ते ५ वर्षे सेवा असलेल्या ६९३ कर्मचा-यांना रु. २५०० ते रु. ३००० ची वाढ देण्यात आली असून यामध्ये तीन श्रेणींच्या कर्मचा-यांचा समावेश असल्याची माहितीही माटे यांनी यावेळी दिली.
विशेष म्हणजे या एतिहासिक कराराला प्रादेशिक कामगार आयुक्तांनी अधिकृत मान्यता दिली असून हा आजवरचा सर्वात मोठा वेतन करार असल्याचे माटे यांनी सांगितले.

लाडक्या बहिणींना 0% दराने 1 लाखांचे कर्ज:मुंबई बँक देणार मदतीचा हात

मुंबई-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या मुंबईतील महिलांना शून्य टक्के व्याजराने तब्बल 1 लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय मुंबई बँकेने घेतला आहे. मुंबै बँकेचे अध्यक्ष तथा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी ही माहिती दिली आहे. बँकेने मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचा मोठा लाभ सत्ताधारी महायुतीला मिळण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या आहेत. काही महिलांनी छोटे-मोठे उद्योगधंदेही सुरू केलेत. त्यानंतर आता या योजनेंतर्गत मुंबईतील महिलांना चक्क शून्य टक्के व्याज दराने 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून बाजारात आणण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आम्ही लाडक्या बहिणींना 9 टक्के व्याजदराने करण्यात येणारा कर्जपुरवठा शून्य टक्के दराने करण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.

सद्यस्थितीत सरकारच्या 4 महामंडळाच्या योजनांतून लाभार्थींना 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दिला जातो. उदाहरणार्थ, पर्यटन महामंडळाच्या आई योजनेद्वारे महिलांना 12 टक्क्यांपर्यंत व्याज परतावा दिला जातो. याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्त्यांचे महामंडळ व ओबीसी महामंडळाच्या योजनांमधूनही महिलांना व्याजाचा परतावा दिला जातो. त्यामुळे आम्ही ज्या महिलांना कर्जपुरवठा करत आहोत, त्या लाभार्थी या महिला या योजनेत बसत असतील तर त्यांनाही शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकते, असे प्रवीण दरेकर यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.

प्रवीण दरेकर पुढे म्हणाले, एका महिलेला 1 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. त्यामुळे 5-10 महिला एकत्र येऊन उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला वरील चारही महामंडळांचे संचालक, संबंधित खात्याचे सचिव व अतिरिक्त सचिव होते. या चारही महामंडळांच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याचा शासन निर्णय झाला. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशही दिलेत.

सरकारच्या निर्णयानुसार मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळेल. त्यासाठी व्यवसायाची तपासणी केली जाईल. व्याजाचा परतावा आम्ही महामंडळाकडून मिळवण्याचा प्रयत्न करू. स्वयं-पुनर्विकास हौसिंग योजनेच्या धरतीवर मुंबईतील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.

उल्लेखनीय बाब म्हणजे प्रवीण दरेकर यांनी एका पोस्टद्वारेही मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाची माहिती दिली होती. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लाडक्या बहिणींच्या उद्योग-व्यवसायासाठी आणलेल्या कर्ज धोरणास राज्य सरकारच्या व्याज परतावा योजनेची सांगड घालून शून्य टक्के व्याजदरात कर्ज देऊन महिलांना उद्योग व्यवसायात स्वावलंबी करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवास्थानी झालेल्या बैठकीत घेतला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ व पर्यटन संचलनालय या महामंडळांची व्याज परतावा योजना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न केली जाईल. या निर्णयामुळे मुंबईतील लाखो लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायाचे दालन मोकळे झाले व यामुळे लाडक्या बहिणींचे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान राहील. महिलांच्या उद्योजिका बनण्याच्या स्वप्नांना बळ देणारा हा निर्णय घेतल्या बद्दल मुख्यमंत्री व सरकारचे मनःपूर्वक आभार, असे ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले होते.

ग्रामपंचातींनी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे- ग्रामविकास मंत्री

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते निर्मल दिंडीचा शुभारंभ

महाआवास व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कारांचे वितरण;*महाआवास अभियानात पुणे जिल्हा तर स्वच्छ ग्राम स्पर्धेत शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम

पुणे, दि. २१:महाआवास व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता हे दोन्ही अभियान ग्रामविकासासाठी महत्त्वाची आहेत. स्वच्छ, सुंदर व प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी ग्रामपंचायतीनी महत्त्वाची भूमिका निभवावी व शासनामार्फत लवकरच राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

विभागीत आयुक्त कार्यालयात आयोजित निर्मल वारीचा शुभारंभ तसेच राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महाआवास योजनेतील पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री श्री. गोरे बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अपर आयुक्त नितीन माने, विजय मुळीक उपस्थित होते.

मंत्री श्री. गोरे म्हणाले, ग्रामविकास विभागाने आषाढी वारीच्या अनुषंगाने सर्व व्यवस्था उभ्या केल्या आहेत. पंढरपूरला दर्शनासाठी येणारा प्रत्येकजण व्हीआयपी आहे. त्यामुळे आषाढी एकादशी होईपर्यंत सर्व व्हीआयपी दर्शन बंद केले आहेत. सर्व मंदिर परिसर वाहनमुक्त केला आहे. ३ हजार स्वयंसेवकांच्या माध्यमातून पंढरपूर मध्ये उद्या (२२ जून) महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

ते म्हणाले, आषाढीवारी मध्ये वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला असून पालखी तळ व मार्गावर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. ७ लाख रेनकोटची व्यवस्था करण्यात आली आहे. फिरते दवाखाने, औषधोपचार कीट, महिलांच्या स्नानगृहांची व्यवस्था, पर्यायी मार्ग तसेच यावर्षीपासून वृद्ध वारकऱ्यांसाठी मसाज व्यवस्था करण्यात आली आहे असे सांगून ‘सर्वांसाठी घरे’ या केंद्र सरकारच्या योजनेत एका वर्षात ३० लाख घरांना मान्यता मिळाली आहे. त्यासाठी ६५ हजार कोटी रुपयांना मान्यता मिळाली असून याअंतर्गत एका वर्षात ५० टक्के घरे पूर्ण होतील. या योजनेतही ग्रामविकास विभागातील चांगल्या कामाबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक करुन ग्रामविकास विभागामार्फत यंदाचा वारी सोहळाही सर्वोत्तम होईल असा विश्वास व्यक्त केला.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले,
पंचायत राज व्यवस्था ज्या उद्देशाने स्वीकारली आहे, जे स्वप्न आपल्या राष्ट्रनिर्मात्यांनी पाहिले, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारली आणि प्रत्येक गाव स्वावलंबी व्हावे या उद्देशाने ग्रामपंचायतींनी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले काम उत्कृष्ट आहे. सर्वांसाठी चांगले आरोग्य महत्त्वाचे आहे, त्यासाठी योगसाधनेला पर्याय नाही. ग्रामसभेमध्ये योग साधनेचा प्रसार करावा असा संदेश योग दिनाच्या निमित्ताने त्यांनी दिला.

ते म्हणाले, सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. गावांमध्ये कचरा, प्लास्टिक, टाकाऊ अन्न इतरत्र पसरलेले असते, त्याबाबत जनजागृती आवश्यक आहे. संत गाडगेबाबा स्वच्छतेचे अग्रदूत आहेत. ग्रामविकासाची गीता संत तुकडोजींनी लिहिली. ग्रामगीतेमध्ये आरोग्य,सुंदर गावांची संकल्पना, स्त्री-पुरुष समानता, स्त्री संरक्षण आदी विविध पैलूंवर प्रकाश टाकलेला आहे, असे सांगून सर्वांनी नद्यांचे पावित्र्य जपावे व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करावी. वारकऱ्यांनी हरित वारी, निर्मल वारीसाठी प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन त्यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली.

सन २०२३-२४ महाआवास योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोकृष्ट जिल्हे, तालुके व ग्रामपंचायती तसेच शासकीय जागा उपलब्धता सर्वोकृष्ट कामगिरी करणारे तालुके, वाळू उपलब्धता सर्वोकृष्ट कामगिरी करणारे तालुक्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.

सन २०२२-२०२३ राष्ट्र संत तुकडोजी स्वच्छ ग्राम स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या ग्रामपंचायती : शेळकेवाडी (करवीर, कोल्हापूर), बोरगाव (कवठे महाकाल, सांगली), कवठे ( खंडाळा, सातारा )

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२०२३ अंतर्गत विभागस्तरीय विशेष पुरस्कार:
स्व. वसंतराव नाईक पुरस्कार- दरेवाडी (सातारा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- ग्रामपंचायत सांडगेवाडी (सांगली), स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार- गोयेगाव (सोलापूर)

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभिमान २०२३-२४ जिल्हास्तरीय पुरस्कार: ग्रामपंचायत गावडेवाडी (प्रथम- ६ लाख), मांजरी खु. (द्वितीय- ४ लाख), सदोबाची वाडी (तृतीय- ३ लाख रुपये)

विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती- स्व. वसंतराव नाईक पुरस्कार- चिंचोली (जुन्नर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- ग्रामपंचायत टाकवे खु. (मावळ), स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार- मांजरवाडी (जुन्नर)

यावेळी स्वच्छ सर्वेक्षण लोगोचे, पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेली पालखी सोहळा माहिती पुस्तिका तसेच वारी सुविधा व टॉयलेट सुविधा ॲपचे मंत्री गोरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात निर्मल दिंडी, आरोग्याची वारी पंढरीच्या दारी, मोबाईल व्हॅन, लोककला पथक, संवाद वारी आदी चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला.

पुरस्कार सोहळ्याला पुरस्कार प्राप्त तालुक्याचे गट विकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवाद वारी’ प्रदर्शनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. २१: राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ठळक लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती देणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत आयोजित ‘संवाद वारी’या चित्र प्रदर्शनाचे, एलइडी व्हॅन कलापथक व्हॅन तसेच चित्ररथाचे राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

विधानभवनाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर आदी उपस्थित होते.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हे प्रदर्शन ठेवण्यात येणार असून मुक्काम तळांसोबत संपूर्ण मार्गावर चित्ररथ, कलापथक तसेच एलइडी व्हॅनच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती करणार आहेत.

प्रदर्शनात ३० फ्लेक्स पॅनेलचा समावेश आहे. पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडिट कार्डची सुविधा पशुपालकांना देणे, पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकासाला चालना, बळीराजा शेतकऱ्याच्या उन्नतीसाठीच्या योजना व घेतलेले निर्णय, नागरिकांना भेसळविरहित अन्नधान्य मिळावे यासाठी सुरक्षित अन्न तपासणीच्या सुविधा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, कृषी योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी, ‘महाविस्तार- एआय’ ॲप, सायबर सुरक्षितता, जलसिंचनासाठीचे प्रकल्प, सामाजिक न्यायासाठी मंत्रालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापना, तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणकारी मंडळाची पुनर्रचना, आदिवासींच्या उत्थानासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत ३० लाख घरे मंजूर, पीएम- जनमन, रमाई, शबरी, अटल बांधकाम कामगार वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मोदी आवास योजना आदी योजनांची माहिती देण्यात आली आहे.

याशिवाय पशुसंवर्धन अंतर्गत मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना, राज्य स्तरावर कॉल सेंटरची स्थापना, पशु आरोग्य सेवांसाठी टोल फ्री क्रमांक, सहकार विभागांतर्गत आपले सहकार पोर्टलवर सहकार विभागाच्या ऑनलाईन सेवा उपलब्ध, परिवहन विभागांतर्गत महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना, गोवारी बांधवांच्या विकासासाठी स्वतंत्र योजना, दिव्यांगणसाठी स्वतंत्र विभाग, उच्च व तंत्र शिक्षण अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी आदी माहिती या प्रदर्शनात फ्लेक्स पॅनेलवर प्रदर्शित करण्यात आली आहे.

दिंडी सोहळयात मोबाईल चोरताना रेकॉर्डवरील २ आरोपी पोलिसांच्या अलगद जाळ्यात

पुणे- दिंडी सोहळयात मोबाईल चोरताना रेकॉर्डवरील २ आरोपी पोलिसांच्या अलगद जाळ्यात सापडले
मार्केटयार्ड पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे प्रकाश देवराम परिहार, वय-२९ वर्षे, रा- लोहियानगर, पुणे याने व त्याचा साथीदार नामे मोहम्मद मनान जमाल शेख वय-२५ वर्षे रा. मार्केटयार्ड, गाळा नं.१८१, पुणे यांना मार्केटयार्ड परिसरातील शारदा गजानन मंदीराजवळ आलेल्या दिडीतील फिर्यादी व इतर ०२ इसमांचे चोरीस गेलेले मोबाईल त्यांचे ताब्यात मिळुन आल्याने त्यांना मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे अटक केली आहे.
दिनांक २०/०६/२०२५ रोजी मार्केटयार्ड परिसरात आलेल्या दिडीतील इसम हे मोबाईल चोरीस गेले बाबत तक्रार देणेकामी पोलीस स्टेशन येथे आले असता श्रीमती मनिषा पाटील, वपोनि मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना पुढील कार्यवाहीकरीता आदेश दिले. दिले आदेशाप्रमाणे तपास पथकातील पोलीस अंमलदार थोरात, कौस्तुभ जावध, राऊत व निगराणी पथकातील पोलीस अंमलदार लोणकर तसेच मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील बीट मार्शल वरील पोलीस अंमलदार यांनी मार्केटयार्ड परिसरात पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील आरोपी नामे प्रकाश देवराम परिहार यास ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्यांने व त्याचा साथीदार नामे मोहम्मद मनान जमाल शेख यांनी मोबाईल चोरी केले असल्याचे कबुल केले. त्यांचेकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्यांनी आणखी ०२ मोबाईल चोरी केले असचे कबुल केले असुन सदरचे मोबाईल ताब्यात घेवून त्यांचेवर गु.र.नं.१३६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) तसेच गु.र.नं.१३७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंद करुन आरोपीतांस अटक करणेत आलेली आहे.
सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परि ०५ पुणे शहर, डॉ राजकुमार शिंदे, सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुनिता नवले यांचे आदेशाने तपास पथकातील अंमलदार पोलीस अंमलदार थोरात, कौस्तुभ जावध, राऊत व निगराणी पथकातील अंमलदार लोणकर तसेच मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील बीट मार्शल वरील अंमलदार यांनी केली आहे.

दिंडी सोहळयात हरवलेल्या महिलेस पोलिसांनी दिंडी पर्यंत सुखरूप पोहोचविले

पुणे-दिंडी सोहळयात हरवलेल्या महिलेस पोलिसांनी शोधले अन दिंडीप्रमुख यांच्या पर्यंत सुखरुप पोहोचविले .

दि.२०/०६/२०२५ रोजी दिंडी सोहळ्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे श्रीमती मनिषा पाटील, या अधिनस्त अंमलदार यांचेसह पेट्रोलिंग करत असताना एक महिला घाबरलेल्या स्थितीत दिसुन आल्या. तेव्हा त्यांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्या दिंडीमध्ये आल्या असुन त्या चुकल्या आहेत. तेव्हा श्रीमती मनिषा पाटील, वपोनि, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारणा करता त्यांनी सीता दत्तात्रय ठाकूर वय ५५ वर्षे रा. दसखार, भटआळी असे सांगितले. परंतु त्यांचेकडे कोणाचाही मोबाईल नंबर नसल्याने व त्यांना सविस्तर माहिती देता येत नसल्याने शोध घेणे कठीण होत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील यांनी अधिनस्त अंमलदार यांना उरण पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे सांगितले. उरण पोलीस स्टेशन व्दारे सदर बाबत माहिती घेतली असता सदर महिलेच्या पतीचा व दिंडीमालक यांचा मोबाईल नंबर प्राप्त झाला. मोबाईल नंबर प्राप्त होताच मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करुन सदर बाबत दिंडी मालक यांना माहिती दिली. काही वेळाने दिंडी मालक व इतर दोन इसम मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे आले असता त्यांचेकडे खात्री करुन महिला नामे सीता दत्तात्रय ठाकूर वय ५५ वर्षे रा. दसखार, भटआळी यांना त्यांचे ताब्यात सुखरुप देण्यात आले आहे.

 “ओढ तुझ्या पंढरीची” – पालखी प्रस्थानाच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित

पंढरपूरच्या वारीचा शुभमुहूर्त आणि लाखो भाविकांची विठ्ठलावरची निस्सीम श्रद्धा याला समर्पित असलेलं एक नवं भक्तिगीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे. “ओढ तुझ्या पंढरीची” असं या गाण्याचं नाव असून, हे माऊली म्युझिक कंपनीच्या वतीने प्रकाशित झालेलं त्यांचं पहिलं गाणं आहे. सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या आवाजात हे गीत सादर करण्यात आलं आहे. गाण्याच्या संगीताची धुरा नितीन उगलमुगले यांनी सांभाळली आहे. गीतकार मुकुंद भालेराव यांनी गीतलेखन केलं असून, गाण्याची शीर्षक ओळ अपूर्व राजपूत यांची आहे. गाण्याचं दिग्दर्शन पवन लोणकर यांनी केलं आहे. संगीत संयोजन पद्मनाभ गायकवाड यांचं आहे. या गाण्याचं ध्वनिमुद्रण व मिश्रण विनायक पवार यांचे आहे. तर संकलन (एडिटिंग) धीरज भापकर यांनी केलं आहे.

हे गाणं ३४० व्या पालखी प्रस्थानाच्या दिवशी प्रदर्शित झालं आणि लगेचच प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. सोशल मीडियावर अनेकांनी या गाण्यावर आधारित रील्स आणि व्हिडिओ तयार केले आहेत. आम्ही यामुळे भारावून गेलो आहोत व एक नवी ऊर्जा आम्हाला मिळत आहे.

संगीतकार नितीन उगलमुगले या गाण्यामागच्या प्रवासाविषयी सांगतात, “आम्ही याआधी ‘मायबापा विठ्ठला’ हे गाणं एकत्र केलं होतं, ते खूप गाजलं. त्यातून प्रेरणा घेऊन मी, मुकुंद भालेराव आणि पवन लोणकर – आम्ही तिघांनी मिळून ‘माऊली म्युझिक कंपनी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. आमची पार्श्वभूमी वारकरी संस्कृतीशी जोडलेली असल्याने भक्तिगीत हा आमच्या कामाचा केंद्रबिंदू राहणार आहे. ‘ओढ तुझ्या पंढरीची’ हे आमचं पहिलं गाणं अजयदादांच्या आवाजात सादर झालं आणि त्याला मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी खूपच उत्साहवर्धक आहे.”

पुढे ते सांगतात, ”या गाण्याची संकल्पना पंढरपूरच्या ओढीवर आधारित आहे. वारकऱ्यांच्या मनातील विठ्ठल भेटीची ओढ, चालत्या वारीतील भावभावना आणि साधेपणाने व्यक्त केलेली श्रद्धा – हे सगळं या गीतातून ऐकायला मिळतं. माऊली म्युझिक कंपनी लवकरच आणखी भक्तिगीतं आणि भावस्पर्शी संगीत प्रकल्प घेऊन येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “आमचा उद्देश असा आहे की, भक्ती आणि सांस्कृतिक संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचवावं. नवनवीन कलाकारांना संधी द्यावी आणि पारंपरिक संगीत नव्या स्वरूपात सादर करावं,” असंही त्यांनी नमूद केलं.”

हे गाणं यूट्यूबसह विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर पाहता आणि ऐकता येत आहे. विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जाणाऱ्या प्रत्येकासाठी “ओढ तुझ्या पंढरीची” हे गाणं एक सुंदर अनुभव ठरत आहे.

Link – https://youtu.be/aMU7ewKDsl4?si=dJMTSocZPJm84n4L

वारकऱ्यांची साधू वासवानी मिशनला वार्षिक पारंपारिक भेट

पुणे- 

२१ जून २०२५ रोजी, वारीच्या दरम्यान, वारकऱ्यांनी पुण्यातील साधू वासवानी मिशनला भेट दिली. त्यांनी साधू वासवानी व दादा वासवानी यांच्या पवित्र समाधीस्थळी नतमस्तक होऊन भक्तिपूर्वक वंदन केले. यंदाचा त्यांचा दौरा पवित्र एकादशीच्या दिवशी घडल्याने एक अनोखा, दैवी संयोग अनुभवायला मिळाला.

समाधीस्थळी उभे राहून त्यांनी हृदयस्पर्शी अभंग गायले. काही वारकऱ्यांनी हवनातही सहभाग घेतला. एक कीर्तनकार भावुक होऊन म्हणाले, “साधूजी आमच्यासोबतच गात होते.”

सुधीर नामक एक नियमित वारकरी, म्हणाले, “मी दरवेळी पूर्ण आस्वाद घेतो — प्रत्येक भेट म्हणजे एक नवा आनंद.”

गणेश नामक जेष्ठ वारकरी व गटप्रमुख, अंतर्मुख होऊन म्हणाले, “मिशन जे करतं, तेच खरोखर ईश्वराने शिकवलं आहे — सेवा आणि करुणा. कोविडसारख्या जागतिक संकटातही मिशनची सेवा थांबली नाही, ही गोष्ट खूप बोलकी आहे. वयस्कर लोकांचा, आमच्यासारख्या मित्रांचा सन्मान आणि आपुलकीने केलेले स्वागत मनाला स्पर्शून गेले. आता पुढच्या भेटीची वाट पाहतोय.”

मिशनकडून प्रत्येक वारकऱ्याला प्रेमपूर्वक स्वागत करत, उपवासाच्या दिवशी उपयोगी ठरतील अशी सामग्री—सरबताच्या बाटल्या, टॉवेल, रुमाल, उपवास चिवडा व चिक्की, दोन केळी आणि एक आंबा—कापडी पिशवीत दिली गेली.

ही वार्षिक भेट म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि एकात्मतेचा साक्षात अनुभव होता. वारकरी नवचैतन्याने त्यांच्या यात्रेवर पुढे निघाले आणि मिशनही त्यांच्या भेटीने अध्यात्मिक आनंदाने न्हालं. असं म्हणतात: “भक्ताची सेवा म्हणजेच देवाची सेवा!”

पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयास स्वायत्त दर्जा

पुणे, ता. २१: पुणे विद्यार्थी गृहाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, पुणे या अभियांत्रिकी महाविद्यालयास स्वायत्त दर्जा बहाल करण्यात आला. महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून शैक्षणिक स्वायत्तता लागू करण्यात आली असून यासंदर्भातील अकॅडमिक कौन्सिलची बैठक नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीस महाविद्यालयाचे संचालक सुनील रेडेकर व प्रा. राजेंद्र कडुस्कर, प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे, सर्व विभागप्रमुख, डीन इंडस्ट्री इन्स्टिट्यूट सेल, डीन अकॅडमीक, परीक्षा नियंत्रक, बोर्ड ऑफ स्टडीजचे प्रतिनिधी, शिक्षक प्रतिनिधी तसेच विशेष निमंत्रित सदस्य उपस्थित होते.

यासोबतच, निमंत्रित सदस्य म्हणून आयआयआयटी प्रयागराजचे संचालक डॉ. मुकुल सुतावणे, आयआयटी मुंबईच्या इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक डॉ. विक्रम गद्रे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. अनुपमा कुंभार, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समधील सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे संचालक प्रा. डॉ. गुरुदास नुलकर, एआय आधारित मार्केटिंग कन्सल्टंट व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. अमेय पांगारकर उपस्थित होते.

या बैठकीत प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रम, प्रथम वर्ष व्यवस्थापन अभ्यासक्रम, प्रथम वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रम – इलेक्ट्रिकल आणि प्रिंटिंग विभाग, महाविद्यालयाचे शैक्षणिक व परीक्षा नियम आदी गोष्टीना अधिकृत मान्यता देण्यात आली. ही बैठक संस्थेच्या शैक्षणिक स्वायत्ततेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे, असे संचालक सुनील रेडेकर यांनी नमूद केले.

योग सराव व योग प्रदर्शनीचे पुणे मेट्रोच्या स्थानकात आयोजन

पुणे, 21 जून 2025

अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो, पुणे (महाराष्ट्र-गोवा), प्रादेशिक कार्यालयातर्फे योग सरावाचे आयोजन करण्यात आले होते.

हा योग सराव महामेट्रो पुणे यांच्या सोबत जिल्हा न्यायालय स्थानकामध्ये करण्यात आला; यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह आवर्जून उपस्थित राहिले. केंद्रीय संचार ब्युरो, पुणेचे कार्यालय प्रमुख उपसंचालक निखिल देशमुख आणि इतर अधिकारी-कर्मचारी देखील याप्रसंगी सहभागी होते.

योग सरावाच्या सुरुवातीला केंद्रीय संचार ब्युरोच्या विभागीय आणि नोंदणीकृत कलाकारांनी योग विषयावर आधारित गीतांचे सादरीकरण केले.

पुणे स्थित राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे (आयुष मंत्रालय) तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. कुणाल बगाडे आणि सिक्कीमचे डॉ. यॉंग यावेळी योग प्रात्यक्षिक मार्गदर्शनासाठी उपस्थित होते.

त्यानंतर पुणे मेट्रोच्या स्वारगेट स्थानकावर मांडलेल्या योगासन विषयावर आधारीत प्रदर्शनाचे डॉ. श्रावण हर्डीकर यांनी उद्घाटन केले. 

भारत सरकारच्या प्रकाशन विभागाचा पुस्तक विक्री स्टॉल देखील स्वारगेट स्थानकात मांडण्यात आला आहे, याचे देखील उद्घाटन हर्डीकर यांनी केले.

हे योग प्रदर्शन आणि सवलतीमध्ये पुस्तक विक्री स्वारगेट स्थानकाच्या प्रवेश द्वारपाशी दिनांक 21, 22 आणि 23 जून रोजी सर्व नागरिकांसाठी खुले आहे. सध्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या तसेच वारकरी पुण्यामध्ये मुक्कामास आहेत, स्वारगेट मेट्रो स्थानकात असंख्य वारकरी प्रदर्शन न्याहाळताना आणि त्याचा आनंद घेताना दिसले.

सरकार आपला एकही शब्द फिरवणार नाही:शेतकऱ्यांना योग्यवेळी कर्जमाफी मिळेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आळंदीत कत्तलखाना होणार नाही

पुणे:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा एकदा सरकार योग्यवेळी शेतकरी कर्जमाफीचा आपला शब्द पूर्ण करेल अशी ग्वाही दिली. सरकार दिलेला आपला एकही शब्द फिरवणार नाही. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, असे ते शेतकऱ्यांना आश्वस्त करताना म्हणालेत. यावेळी त्यांनी जगातील पहिल्या 600 विद्यापीठांत नाव आल्याबद्दल पुणे विद्यापीठाचे कौतुकही केले.
देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे आयोजित जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शेतकरी कर्जमाफीसह पुणे विद्यापीठाची यशस्वी घोडदौड, पालखी सोहळा, शेतकरी समस्या आदी विविध मुद्यांवर भाष्य केले. वारी ही महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आहे. विठ्ठल दर्शनासाठी लाखो वारकरी पायी चालत येतात. ते सर्वजण आज पुण्यात थांबलेत. आम्ही या कार्यक्रमाशी जोडून आज योगाभ्यास केला. पुण्यातील महाविद्यालय यात सहभागी झाले. भव्य कार्यक्रम झाला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. आज त्यांच्यामुळेच योग आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

पत्रकारांनी त्यांना पुणे विद्यापीठाचा दर्जा वाढला, पण विभागांची स्थिती फारशी चांगली नाही, प्राध्यापकांचाही तुटवडा आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, सर्वप्रथम मी पुणे विद्यापीठाचे मनापासून अभिनंदन करतो. जगातील पहिल्या 600 विद्यापीठांत आज पुणे विद्यापीठ आहे. मला अपेक्षा आहे की, पुढील वर्षी किंवा 2 वर्षांत पहिल्या 500 विद्यापीठांत आपली विद्यापीठे असतील.

जगातील पहिल्या 500 विद्यापीठांना मान असतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. येथील कुलगुरू व्यवस्थापन परिषद, सिनेटर, प्राध्यापक यांचे कार्य कौतुकास्पद आहे. तुम्ही ज्या तुटवड्याविषयी प्रश्न केला, त्याविषयी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच सर्वप्रकारच्या मान्यता दिल्या आहेत.
आळंदी संस्थानच्या विश्वस्तांनी आज पत्रकारांना हिनकस वागणूक दिली. त्याचे काही व्हिडिओ समोर आलेत. मुख्यमंत्र्यांनी त्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. अनेकदा स्ट्रेस, तणावातून अशा गोष्टी घडतात. पण त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जाईल. अशा संस्थांमधील नियुक्त्या सरकार करत नाही, तर त्या न्यायिक अधिकाऱ्याच्या माध्यमातून होतात, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आळंदीतील कत्तलखान्याच्या प्रश्नावरही भाष्य केले. आळंदीच्या विकास आराखड्यातील एक आरक्षण कत्तलखान्यासाठी दाखवण्यात आले आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करता येणार नाही. मी स्वतः या कत्तलखान्याचे आरक्षण वगळण्याचे आदेश दिलेत. आळंदीत असे कोणतेही कृत्य होणार नाही याची हमी मी वारकरी संप्रदाय व वारकरी नेत्यांना देतो, असे ते म्हणाले.

सरकार शेतकरी कर्जमाफीचे आपले आश्वासन पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. सरकार दिलेला आपला एकही शब्द फिरवणार नाही. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, असे ते म्हणाले. फडणवीस पुढे म्हणाले, सरकारचे सांगली व कोल्हापूरमधील पूरस्थितीवर लक्ष आहे. धरणांतून विसर्ग केव्हा सुरू करायचा व केव्हा बंद करायचा याचे नियोजन करण्यात आले आहे. शेजारच्या राज्यांशीही समन्वय ठेवला जात आहे. त्या राज्यांत आपला एक इंजिनिअर बसला आहे. पावसाळ्यात तो तिथेच असतो. त्याच्या माध्यमातून योग्य तो समन्वय साधला जात आहे. अर्थात निसर्गाचा भरवसा देता येत नाही. पण आपण आपल्या बाजूने पूर्ण नियोजन केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पंढरपूर वारी दरम्यान दोन्ही मार्गांवर केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देत करणार मार्गक्रमण

केंद्रीय संचार ब्युरोचे माहिती-चित्र रथ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते रवाना

पुणे:माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे तर्फे पंढरपूर वारीनिमित्त दोन माहिती-चित्र रथ आज पुण्यातून निघाले. केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या रथांचे उद्घाटन करून मार्गस्थ केले. केंद्र सरकारच्या अकरा वर्षातील विविध योजनांची दृक-श्राव्य माहिती देत हे डिजिटल रथ संपूर्ण वारीत दोन्ही मार्गांवर चालत राहतील. हे डिजिटल रथ पुणे ते पंढरपूर असा प्रवास करतील.

याप्रसंगी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम क्षेत्र महासंचालक, स्मिता वत्स शर्मा देखील उपस्थित होते.

या उद्घाटनाच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले, “आपल्या महाराष्ट्राची शेकडो वर्षांची परंपरा म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी, हा पालखी सोहळा आपल्यासाठी पर्वणी असते. एक वेगळा अनुभव असतो; या वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी, भाविक पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. ही वर्षानुवर्षे जुनी परंपरा वृद्धिंगत होताना आपण पाहत आहोत. गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम या वारीच्या निमित्ताने होणार आहे. त्यासाठी या दोन डिजिटल रथांचे उद्घाटन आज होत आहे; माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्याचे काम हे गावागावापर्यंत पोहचणार आहे.”

“केवळ देशात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील एक शक्तिशाली, सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून आपल्या देशाचे नाव घेतले जात आहे. अकरा वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची, असे म्हटले जाते; सोबत समृद्ध, सशक्त आणि सुरक्षित भारताची अकरा वर्षे असे देखील आपण म्हणू शकतो हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले. देशाची 25 कोटी जनता दारिद्रय रेषेच्या वर आली, देशातील सर्वसामान्य माणसांचा विचार झाला. गरीब कल्याणाच्या असंख्य योजना आणल्या गेल्या. म्हणून ही अकरा वर्ष मला जन कल्याणाची, आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीची आहेत; विकसित भारताचा पाया आहेत, आता कळस बांधण्याकडे आपण चाललो आहोत.” असे विचार त्यांनी यावेळी मांडले.

केंद्रीय संचार ब्युरोच्या विभागीय कलाकारांसोबत नोंदणीकृत लोककलावंतांनी वर आधारीत गीतांचे सादरीकरण केले. यावेळी केंद्रीय संचार ब्युरो, पुणेचे विभागीय कलाकार, गायक-गीतकार-संगीतकार मकरंद मसराम यांनी सादर केलेल्या स्वरचित गीताचे केंद्रीय राज्यमंत्री यांनी कौतुक केले.

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख विविध योजनांचा उल्लेख करून त्यांचा राज्यातील जनतेला लाभ मिळाल्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यावेळी नमूद केले.

एलईडी डिस्प्ले स्क्रीन आणि कलाकारांच्या सादरीकरणानी सुसज्ज असलेले हे रथ लाखो वारकऱ्यांसह यात्रेच्या मार्गावर प्रवास करतील आणि पारंपारिक सांस्कृतिक सादरीकरणे तसेच सरकारी योजनांवरील माहिती पुस्तिकांचे वितरण करून केंद्र सरकारच्या अकरा वर्षांच्या विविध कामगिरीचे दर्शन घडवतील.

एअर इंडिया: पीडित कुटुंबांना दीर्घकालीन साहाय्य पुरवण्यासाठी ‘एआय१७१ ट्रस्ट

विमान आणि पायलट दोन्ही उत्कृष्टच होते..आम्ही तपास अहवालाच्या प्रतीक्षेत तोवर कृपया अंदाज लावू नका

टाटा समूहाच्या अध्यक्षांची एआय१७१ दुर्घटनेवरील प्रतिक्रिया, विमानांच्या संपूर्ण ताफ्यामध्ये अंमलात आणल्या जाणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांची दिली माहिती

एअर इंडियाचे विमान एआय१७१ला, १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या, २७५ जीव ज्यामध्ये गमावले गेले त्या दुर्घटनेनंतर दिलेल्या पहिल्या तपशीलवार सार्वजनिक प्रतिक्रियेमध्ये, टाटा सन्सचे अध्यक्ष श्री एन चंद्रशेखरन यांनी ग्वाही दिली की, टाटा समूह या दुर्घटनेमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी राहील. एअर इंडियाच्या संपूर्ण विमान ताफ्यामध्ये अंमलात आणल्या जाणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

एका टीव्ही मुलाखतीमध्ये श्री चंद्रशेखरन यांनी सांगितले की, हा अपघात ज्या विमानाला झाला त्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाचा मेंटेनन्स रेकॉर्ड खूप चांगला होता आणि एअर इंडियाच्या सर्वात अनुभवी पायलट्सकडे ते सोपवण्यात आले होते.

श्री चंद्रशेखरन म्हणाले, “या विमानाचा इतिहास अतिशय साफ होता.” त्याची याआधीची मोठी तपासणी जून २०२३ मध्ये करण्यात आली होती आणि पुढील तपासणी डिसेंबर २०२५ मध्ये करण्याचे ठरवण्यात आले होते. मार्च २०२५ मध्ये त्याच्या उजव्या इंजिनची दुरुस्ती करण्यात आली, तर एप्रिल २०२५ मध्ये डाव्या इंजिनची तपासणी करण्यात आली होती.” त्यांनी जोर देऊन सांगितले की, “विमान आणि इंजिन दोन्हीचे नियमितपणे निरीक्षण केले जात होते, उड्डाणापूर्वी कोणतीही समस्या दिसून आली नाही.”

एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन यांनी ग्राहकांना उद्देशून केलेल्या एका संबोधनात विमानात तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांविषयी अतिरिक्त तपशील पुरवले. विमानातील कर्मचारी अतिशय अनुभवी होते हे सांगताना त्यांनी नमूद केले आहे की, “विमानाचे नेतृत्व कॅप्टन सुमीत सभरवाल करत होते. ते अतिशय अनुभवी पायलट होते आणि विविध विमाने चालवण्याचा १०,००० पेक्षा जास्त तासांचा अनुभव त्यांच्याकडे होता. फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे ३४०० पेक्षा जास्त तासांचा विमान चालवण्याचा अनुभव होता.”

श्री चंद्रशेखरन म्हणाले, “डीजीसीएने खात्री केली आहे की, आमच्या बोईंग ७८७ ताफ्यामध्ये आणि मेंटेनन्स प्रक्रियांमध्ये सुरक्षा मानकांचे पुरेपूर पालन केले जाते.” तथापि, विल्सन यांनी उल्लेख केल्यानुसार “विश्वास वाढवणारा उपाय” म्हणून, एअर इंडियाने त्यांच्या बोईंग ७८७ आणि बोईंग ७७७ या दोन्ही ताफ्यांवर उड्डाणपूर्व सुरक्षा तपासणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नियामक आवश्यकतांच्या पलीकडे जाऊन अतिरिक्त उपाययोजना करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना, विल्सन यांनी जोर दिला की, “एअर इंडियामध्ये तुमची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असते आणि २०२२ मध्ये आम्ही ही एअरलाईन चालवायला घेतल्यापासून आम्ही या गोष्टीचे काटेकोरपणे पालन करत आलो आहोत.”
दुर्घटनास्थळी दोन्ही ब्लॅक बॉक्सेस सापडले आहेत. भारताचे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो, यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड, बोईंग, जीई एरोस्पेस आणि युकेच्या एअर ऍक्सिडेंट्स इन्वेस्टिगेशन ब्रांचच्या तज्ञांची एक बहुराष्ट्रीय तपासणी टीम सध्या सर्व माहितीचे विश्लेषण करत आहे.

श्री चंद्रशेखरन म्हणाले, “आम्ही आणि संपूर्ण एव्हिएशन उद्योग अधिकृत तपासणी अहवालाची वाट पाहत आहोत, जेणेकरून आम्हाला ही संपूर्ण दुर्घटना अधिक समजून घेता येईल.” अधिकृत अहवाल येण्याच्या आधी दुर्घटनेच्या कारणांबाबत कोणतेही अंदाज लावू नयेत असेही त्यांनी सांगितले.

टाटा समूहाने या दुर्घटनेवर अतिशय तातडीने, सर्वसमावेशक प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये बळी पडलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला १ कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. जखमी झालेल्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च टाटा समूह उचलणार आहे. तसेच मेडिकल हॉस्टेलचे जे नुकसान झाले आहे ते पुन्हा बांधून देण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्याचे देखील त्यांनी वचन दिले आहे. दुर्घटनेच्या पीडित कुटुंबांना दीर्घकालीन साहाय्य पुरवण्यासाठी ‘एआय१७१ ट्रस्ट’ स्थापन करण्याची देखील योजना आहे.

श्री चंद्रशेखरन यांनी ही संपूर्ण घटना आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती “हृदय पिळवटून टाकणारी” असल्याचे सांगितले, ही दुर्घटना टाटा समूहाच्या मालकीच्या एअरलाईनच्या बाबतीत घडली याचे मला स्वतःला खूप जास्त दुःख झाले आहे असेही ते म्हणाले. त्यांनी ग्वाही दिली की, “आम्ही एवढेच वचन देऊ शकतो की, आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि पुढे देखील राहू, मी स्वतः कायम त्यांच्यासोबत राहीन.”

विल्सन यांनी देखील याच भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “प्रभावित झालेल्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते सर्व करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या दुर्दैवी घटनेचे कारण समजून घेण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत.”

हा आणीबाणीचा प्रसंग टाटा समूह ज्या प्रकारे हाताळत आहे त्याला उद्योग-व्यवसायातील दिग्गज आणि प्रसिद्धीमाध्यमांकडून खूप नावाजले जात आहे.

आरपीजी एंटरप्रायजेसचे अध्यक्ष श्री हर्ष गोएंका यांनी इकॉनॉमिक टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात नमूद केले होते की, “अशा प्रसंगी, नेतृत्वाची भूमिका ही फक्त धोरणांपुरती किंवा गुंतवणूकदारांना खुश करण्यापुरती नसते तर, नेतृत्वाने त्यामध्ये जातीने लक्ष घालणे, कर्मचाऱ्यांना धीर देणे, कुटुंबांचे सांत्वन करणे, आपण अपयशी ठरलो हे मान्य करणे, नम्रतेने ऐकणे आणि स्पष्टपणे वागणे महत्त्वाचे असते.”

२०२२ साली जेव्हा सरकारकडून एअर इंडियाचे पुनःसंपादन करण्यात आले तेव्हा त्याचे नेतृत्व श्री चंद्रशेखरन यांनी केले होते. मुलाखतीदरम्यान त्यांनी टाटा समूहाच्या गौरवशाली वारशाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “मी स्वतः टाटा समूहाच्या मार्गदर्शनाखाली इथवर आलो आहे आणि टाटा समूहाच्या मूल्यांसह वाढलो आहे. मी जेआरडी नाही, मी आरएनटी नाही (रतन नवल टाटा) नाही. पण आपण सर्व या मूल्यांनी प्रेरित आहोत आणि आशा करतो की आपण चारित्र्य चांगले ठेवू आणि दृढनिश्चयाने वागू जेणेकरून सर्वांना आपला अभिमान वाटेल.”

एआय१७१ दुर्घटना आणि त्यानंतरच्या घटना टाटा समूहामध्ये आल्यावर एअर इंडियामध्ये जे परिवर्तन सुरु आहे त्यासाठी एक खूप मोठे आव्हान आहेत. संचालनातील व्यत्यय आणि संपूर्ण विमान ताफ्याचे सुरक्षा पुनरावलोकन अशा वेळी आले आहे जेव्हा ही एअरलाइन प्रीमियम जागतिक कॅरियर म्हणून आपले स्थान पुन्हा मिळवण्याच्या उद्देशाने आक्रमक आधुनिकीकरण आणि विस्तार धोरण राबवत आहे. संचालनावर अल्पकालीन परिणामांसह, सुधारित सुरक्षा उपायांप्रती टाटा समूहाची वचनबद्धता व्यावसायिक विचारांपेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची समूहाची भूमिका अधोरेखित करते.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिला मतांवर डोळा:लाडक्या बहिणींना 9 टक्के व्याजाने 1 लाखापर्यंत कर्ज


मुंबई:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांच्या मतपेढीवर डोळा ठेवत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी नवे पाऊल उचलण्यात आले आहे. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून विशेष आर्थिक यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण्यासाठी मुंबई बँक आणि विविध महामंडळाकडून महिलांना ९ टक्के अल्प व्याजदराने कर्जपुरवठा केला जाणार आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महायुती सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यात लाडकी बहीण योजनेचे अडीच कोटी लाभार्थी आहेत. दर महिन्यालालाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर दीड हजार रूपये जमा होत आहेत. लाडकी बहिण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजेारीवर आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. दर महिन्याना लाडक्या बहिणींना लाभ देताना सरकारची दमछाक होत आहे त्यातच विरोधकांकडून लाडकी बहिण योजना बंद होणार असल्याची टीका केली जात आहे, त्यातच आता महिलांच्या स्वयंरोजगारासाठी स्थानिक सहभागातून पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, या पतसंस्था सहकारी संस्था अधिनियम, १९६० आणि नियम १९६१ अंतर्गत नोंदणीकृत असतील. महिला व बालविकास विभागाच्या लाभार्थी यादीच्या आधारे सदस्यता दिली जाणार असून, प्रवर्तकांची पार्श्वभूमी तपासणे व केवायसी पूर्ण करणे अनिवार्य राहील. प्रत्येक संस्थेसाठी सहाय्यक निबंधक पालक अधिकारी म्हणून नेमण्यात येणार आहेत.

राज्यात शहरी व ग्रामीण स्तरावर महिलांच्या सहभागातून पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी विविध स्तरांवर प्राथमिक सभासदांची संख्या व भागभांडवलाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. ते असे.

महिलांच्या उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ, महाराष्ट्र राज्य ओबीसी वित्त महामंडळ यांच्या योजनांचा समावेश करून सुसंगत आर्थिक पायाभूत रचना तयार करण्यात आली आहे. पात्र महिलांना १ लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे कर्ज ९% दराने दिले जाणार आहे. इतर कर्जदारांसाठी हा दर १०.५० ते १३.५० टक्क्यांपर्यंत आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई: किमान १००० सदस्य, १५ लाख भागभांडवल
इतर महानगरपालिका क्षेत्र: ८०० सदस्य, १० लाख
मोठ्या महानगरपालिका क्षेत्र: २००० सदस्य, ३० लाख
नगरपालिका क्षेत्र: ५०० सदस्य, ५ लाख
गाव व तालुका पातळी: २५०–५०० सदस्य, १.५ ते ५लाख
जिल्हास्तरीय संस्था: १५०० सदस्य, १० लाख

अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी सांगितले की, विधानसभेला लाडक्या बहिणींनी महायुतीला भरघोस मतदान केले. त्यानंतर आर्थिक शिस्तीसाठी सरकारने मदतीच्या निकषात बसत नसलेल्या लाखो महिलांना वगळण्यात आले. त्यामुळे सामान्य महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला. त्याच्या भरपाईसाठी ही योजना आहे. अर्थात कर्जाचे वाटप पारदर्शक पद्धतीने कसे होणार. ९ टक्के दराने कर्ज घेणे किती महिला बचत गटांना परवडेल हे मुद्दे योजनेचा पूर्ण आराखडा अभ्यासल्यावरच स्पष्ट होईल. मनपा, जि.प. निवडणुकीत ही योजना प्रभावी ठरू शकते.मुंबई व उपनगरांतील सुमारे १६ लाख महिलांना या नव्या उपक्रमाचा थेट लाभ होण्याची शक्यता आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हाच उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे असले तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना आकर्षित करण्याचाच हा राजकीय डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

पुणे दि.२१: आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे शुक्रवार (२०) रोजी दर्शन घेतले. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली.

मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, गुरु शांतिनाथ, राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे, पुरुषोत्तम पाटील, पालखी विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त प्रमोद बेंगरूट, शिवाजीराव जगदाळे, गोरख भिकुले आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारी निमित्त पालखीसोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी विठ्ठल नामाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे विठ्ठल मंदिरात आगमन झाले. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वारकरी व भक्तगण उपस्थित होते.