Home Blog Page 483

देशाचे संविधान कोणालाही बदलता येणार नाही-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित आठव्या युवा संसदेचे उद्घाटन

पुणे: केवळ राजकीय फायद्यासाठी विरोधकांनी देशाचे संविधान बदलण्यात येणार असल्याचा गैरसमज समाजामध्ये पसरविला. त्याचा काहीसा राजकीय लाभ त्यांना मिळाला आहे, परंतु देशातील लोक अशा अफवांना बळी पडणार नाहीत. देशाचे संविधान कोणालाही बदलता येणार नाही त्यामध्ये केवळ दुरुस्ती करता येते, अशा प्रकारे संविधानामध्ये अनेकदा दुरुस्ती करण्यात आली आहे, असे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे आयोजित आठव्या युवा संसदेचे उद्घाटन नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात झाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते. संस्थेच्या ‘उडान’ या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी खासदार अरविंद सावंत यांना आदर्श खासदार पुरस्कार, सुधीर मुनगंटीवार, सत्यजित देशमुख आणि अमित गोरखे यांना आदर्श आमदार पुरस्कार, विठ्ठल काटे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, सचिन शेलार यांना आदर्श सरपंच पुरस्कार, ॲड. मंगेश ससाणे यांना आदर्श युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केवळ चांगले शिक्षण देत नाही तर एक समृद्ध पिढी घडवत आहे. या संस्थेने कायमच नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तरुण निर्माण केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्यासाठी राज्य सरकार जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देण्याचा विचार करत आहे आणि त्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राजकारणाबद्दल तळागाळामध्ये द्वेष आणि चीड निर्माण झाली आहे. परंतु अशा प्रकारे राजकारणाबद्दल द्वेष का निर्माण झाला आहे याचाही विचार करणे गरजेचे आहे. अनेकजण आज केवळ पैसा मिळवण्यासाठी राजकारणामध्ये येतात हा विचार सर्वसामान्यांमध्ये रुजला आहे, परंतु राजकारण हे समाजकारण करण्याचे एक साधन आहे. ही भावना आजच्या तरुणांमध्ये रुजवली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने समृद्ध भारत घडू शकेल. राजकारणामध्ये तरुणांनी जाऊ नये हा भ्रम दूर केला पाहिजे, तसेच राजकारण म्हणजे केवळ निवडणूक हा गैरसमजही दूर झाला पाहिजे. निवडणूक हे राजकारणामध्ये येण्याचे केवळ एक माध्यम आहे परंतु निवडणूक म्हणजे राजकारण नाही.

भागवत कराड म्हणाले, युवा संसदेच्या माध्यमातून निर्माण झालेले तरुण हे उद्याचा बलशाली भारत घडविणार आहेत. सशक्त भारत घडविण्यासाठी संस्कारक्षम तरुण पिढीची गरज आहे. आज संस्कारक्षम तरुण घडविण्याचे काम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट शिक्षण आणि युवा संसदेच्या माध्यमातून करत आहे. युवकांनी राजकारणामध्ये निश्चितच आले पाहिजे, परंतु राजकारणामध्ये येताना आपण कशासाठी राजकारणामध्ये येणार आहोत हे स्पष्ट पाहिजे. अन्यथा केवळ पैसा आणि सत्तेसाठी राजकारणामध्ये आलात तर त्या ठिकाणी फार काळ टिकू शकत नाही.

अरविंद सावंत म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जात, धर्म, पंथ विसरून समाजासाठी एकत्र यावा, असे आवाहन केले होते. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जात आणि धर्मावरून वाद निर्माण होत आहेत. ही भांडणे लावणारे लोक मात्र सत्तेचा आनंद घेत आहे हे सर्व सामान्य लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. आजचे राजकारण हे सुसंस्कृत राजकारण राहिलेले नाही या राजकारणामधून समाजकारण कधीच दूर गेले आहे. केवळ सत्ता आणि पैसा याचे समीकरण जुळवण्यासाठी आज लोक राजकारणामध्ये येत आहे अशा प्रसंगी सर्वसामान्य माणूस कसा राजकारणामध्ये येऊ शकतो आणि समाजासाठी काम करू शकतो असा प्रश्न निर्माण झाला आहे, परंतु तरीही एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने युवा संसदेच्या माध्यमातून तरुण घडविण्याचे काम केले आहे हे निश्चितच वाखाणण्यासारखे आहे.

सत्यजित देशमुख म्हणाले, राजकारणाविषयी चेतना जागवण्याचे काम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट करत आहे यामधून निश्चितच उद्याचे उज्वल भवितव्य घडणार आहे. मी माझ्या सांगली कार्यक्षेत्रामध्ये ताडोबा अभयारण्याच्या धर्तीवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प उभा केला हा प्रकल्प उभा करण्यासाठी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मला खूप कार्य लागले हा व्याघ्र प्रकल्प जागतिक वारसा लाभलेला व्याघ्र प्रकल्प आहे.

अमित गोरखे म्हणाले सामाजिक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी सातत्य महत्वाचे असते. हेच सातत्य जाधवर ग्रुप इन्स्टिट्यूट ने शैक्षणिक क्षेत्रामध्ये दाखवले आहे. त्यामुळेच जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट निश्चितच काही दिवसात जाधवर अभिमत विद्यापीठ मध्ये रुपांतरीत होऊ शकेल. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा केवळ शैक्षणिक क्षेत्रामध्येच नव्हे तर समाज उभारणीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे.

विठ्ठल काटे म्हणाले, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे एका आदर्श शिक्षण संस्थेचे उदाहरण आहे. या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देऊन नोकरीसाठी तयार केले जात नाही तर उद्याचे उज्वल भविष्य निर्माण करणारे तरुण या इन्स्टिट्यूट मध्ये घडविले जातात या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे कर्तृत्ववान राजकारणी निर्माण होणार आहेत. या राजकारण्यांनी अशा प्रकारच्या युवा संसदेच्या माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्यात निश्चितच सकारात्मक दृष्टिकोन जागृत असेल आणि त्याचा निश्चितच समाजाला आणि देशाला फायदा होईल.

ॲड. शार्दुल जाधवर म्हणाले, आज संस्थेमध्ये भरलेला विद्यार्थ्यांचा मेळावा महत्त्वाचा आहे. कारण हेच विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे. राजकारणा संदर्भात तरुण सुशिक्षित व्हावा त्यांच्या मध्ये राजकारणाविषयी जागृती निर्माण व्हावी, हा या युवा संसद आयोजित करण्याचा मुख्य उद्देश आहे. हा उद्देश निश्चितच सफल होत आहे. या युवा संसदेतील प्रेरणा घेऊन उद्याचे चांगले नेतृत्व निर्माण झाले, तर त्यातूनच सशक्त भारत निर्माण होणार आहे.

१ हजार २९९ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

पुणे, दि. ३०: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना तसेच आदिवासी उपयोजना मिळून एकूण १ हजार २९९ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास व ७५३ कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली.

या बैठकीस राज्याचे सर्व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, दिलीप वळसे पाटील, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पुणे जिल्ह्याच्या पालक सचिव व्ही राधा, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी यावेळी उपस्थित होते.

मान्यता देण्यात आलेल्या आराखड्यात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी सन २०२५- २६ च्या १ हजार ९१ कोटी ४५ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा व ७०० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत १४५ कोटी रुपये, आदिवासी उपयोजनेकरिता ६३ कोटी १३ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा आणि ५३ लाख १ हजार रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करा
पुणे शहर आणि जिल्ह्यात खूप ऐतिहासिक ठिकाणे, धार्मिक महत्त्वाची ठिकाणे, गड किल्ले, स्मारके असून तेथील संवर्धनाचे काम सुरू आहे. ही सर्व ठिकाणे पर्यटन नकाशावर येण्याच्या दृष्टीने जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ते पुढे म्हणाले, या आराखड्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल तसेच कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. राज्याच्या पर्यटन विभागाकडूनही जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही ते म्हणाले.

आदर्श शाळा उपक्रम राबवावा
पुणे जिल्ह्यात पुणे मॉडेल स्कूल अर्थात आदर्श शाळांचा उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील केंद्र शाळा स्तरावर एका मोठ्या शाळेचा भौतिक तसेच दर्जात्मक विकास करण्यात येणार आहे. भौतिक सुविधांसोबतच शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनीही आपल्या शाळांचा अशा पद्धतीने विकास करण्याचा आराखडा तयार करून सादर करावा. या शाळांचा दर्जात्मक विकास करण्यासाठी अशासकीय स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करून घेता येईल, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात राबवायच्या कोणत्याही विकासाच्या योजनांसाठी केंद्र शासनाचा अधिकाधिक निधी आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पुणे आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र
जिल्ह्यात पुणे मॉडेल पीएचसी अर्थात आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमाची चांगल्या प्रमाणे अंमलबजावणी करावी अशाही सूचना त्यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

‘जीबीएस’ आजाराबाबत घेतला आढावा
यावेळी गुलियन बॅरे सिंड्रो अर्थात ‘जीबीएस’ आजाराबाबतही आढावाही श्री. पवार यांनी घेतला. जिल्ह्यात आज अखेर या आजाराचे १२९ रुग्ण असून पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय, पिंपरी चिंचवड मनपाचे यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयासह, काशीबाई नवले रुग्णालय, भारती विद्यापीठ रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आदी या उपचारांची सोय असलेल्या रुग्णालयांशी संपर्कात असल्याचे पुणे मनपा आयुक्तांनी सांगितले.

उपचाराचे अवास्तव दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी आपल्या रुग्णालयात या आजारावरील उपचारासाठीची पुरेशी औषधे उपलब्ध ठेवावीत. उपचारांसाठी अवास्तव दर करणाऱ्या रुग्णालयांकडून उपचारांची देयके कमी करून रुग्णांना दिलासा द्यावा. दराबाबत ऐकत नसलेल्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

केंद्रीय शिष्यवृत्तीचा प्रश्न केंद्रीय स्तरावर सोडविण्याबाबत प्रयत्न सुरू- चंद्रकांत पाटील
विविध शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने शिक्षण संस्थांना येणाऱ्या अडचणींबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्यस्तरावरून मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या १०० टक्के शिष्यवृत्तीबाबतची पद्धती योग्यरीत्या कार्यान्वित करण्यात आली असल्याने त्यामध्ये अडचणी येत नाहीत, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रस्तावित योजना व तरतुदींच्या अनुषंगाने सादरीकरण केले.

यावेळी मंत्री भरणे, राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्यासह खासदार, आमदार यांनी विविध सूचना केल्या.

बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत २०२५- २६ मराठी उपक्षेत्र निहाय प्रस्तावित नियतव्यय पुढील प्रमाणे:
कृषी व संलग्न सेवांसाठी ७१ कोटी २० लाख, ग्रामीण विकास साठी १७५ कोटी, पाटबंधारे व पूर नियंत्रणासाठी २३ कोटी २६ लाख, ऊर्जा विकास साठी ८५ कोटी, उद्योग खाणकाम साठी ७७ कोटी ७६ लाख, परिवहन साठी १८५ कोटी, सामान्य आर्थिक सेवा साठी २९ कोटी, सामाजिक सामूहिक सेवा ३९० कोटी ११ लाख, नाविन्यपूर्ण योजनांसाठी ५५ कोटी १२ लाख याप्रमाणे १ हजार ९१ कोटी ४५ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय ७०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत कृषी व संलग्न सेवांसाठी ३ कोटी ४० लाख, ऊर्जा विकाससाठी १० कोटी १५ लाख, उद्योग साठी १० लाख, परिवहन साठी १० कोटी, सामाजिक सामूहिक सेवांसाठी १९४ कोटी ७ लाख, नाविन्यपूर्ण योजनांसाठी ४ कोटी ३५ लाख रुपये अशा प्रस्तावित नियतव्ययास मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत कृषी व संलग्न सेवांसाठी १४ कोटी १५ लाख, ग्रामीण विकास ४ कोटी ८५ लाख, पाटबंधारे व पूर नियंत्रण १ कोटी ३० लाख, ऊर्जा विकास ३ कोटी ४३ लाख, उद्योग खाणकाम २० लाख, परिवहन ८ कोटी ९७ लाख, सामाजिक सामूहिक सेवा २८ कोटी ९४ लाख, नाविन्यपूर्ण योजना १ कोटी ४५ लाख अशा एकूण ६३ कोटी १३ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यासह ५३ कोटी १ लाख रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली आहे.

बैठकीत सन २०२४-२५ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत डिसेंबर २०२४ पर्यंत झालेल्या खर्चाचा व कामांचाही आढावा घेण्यात आला.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तानाजी प्रभाकर कर्चे यांना अटक- उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड

बारामती, दि.३०: सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी तानाजी प्रभाकर कर्चे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे; या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करीत आहेत.

इंदापूर येथील नारायणदास महाविद्यालयासमोरील गेटवर काही मुले गाड्याच्या पुंगळ्या काढून वाहनाची स्पर्धा लावून गोंधळ घालत आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी ‘डायल ११२ टोल फ्री’ क्रमांकावर केली. या परिसरात बस स्थानक, आय कॉलेज असल्याने मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने स्थळाची तात्काळ पाहणी केली.

या ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या मुलांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणताना सरकारी कामात अडथळा आणत तानाजी प्रभाकर कर्चे, वय २६ वर्षे, रा. कौठळी यांनी पोलिसांसोबत वाद घातला. पोलीस शिपाई महेश साधू रणदिवे यांच्यासोबत अरेरावी भाषेचे वापर करत जातीवाचक शिवीगाळ केली तसेच त्यांना धक्काबुक्कीही केली. याबाबत श्री. कर्चे हे वारंवार आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत होते.

पोलीस शिपाई श्री. रणदिवे घडलेल्या घटनेबाबत यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली. श्री. कर्चे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, नागरी हक्क संरक्षण अधिनियम आदीतील विविध कलमान्वये इंदापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून २८ जानेवारी रोजी अटक करण्यात असून ३१ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राठोड यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी व पडताळणी प्रक्रियेबाबत बैठक संपन्न

पुणे, दि. ३०: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्या अध्यक्षेतखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी (दि.२९) आयोजित बैठकीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी व पडताळणी प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली.

यावेळी उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, मनोज खैरनार, अनिल पवार, रेवणनाथ लबडे, स्वप्नील मोरे, यशवंत माने, निवडणूक शाखा तहसीलदार राहूल सारंग तसेच मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते.

श्रीमती कळसकर म्हणाल्या, जिल्ह्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी व पडताळणीच्या अनुषंगाने एकूण ११ अर्ज संबंधितांकडून प्राप्त झाले होते, त्यापैकी एका उमेदवारांने अर्ज माघारी घेतला आहे. तसेच ७ अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे उर्वरित ३ अर्जावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट तपासणी व पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. न्यायालयीन याचिकेबाबत आदेश प्राप्त झाल्यास त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही श्रीमती कळसकर म्हणाल्या.

यावेळी उमेदवार व प्रतिनिधींच्यावतीने बैठकीत विविध सूचना करण्यात आल्या.

सामाजिक न्याय मंत्री यांनी घेतला समाज कल्याण विभागाचा आढावा

पुणे, : समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

समाज कल्याण आयुक्तालयामध्ये आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे, सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे आदी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागातील विविध योजनांचा आढावा घेऊन मंत्री शिरसाट म्हणाले, अंमलबजावणी यंत्रणेने योजनांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींची माहिती सादर करावी, जेणेकरून त्यावर उपाययोजना करता येतील. जिल्हास्तरावर अनुसूचित जाती उपयोजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी विविध विभागांशी योग्य समन्वय ठेवण्यात यावा. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी आवश्यक त्या शासन निर्णयांमध्ये बदल करण्यात येईल.

सामाजिक न्याय मंत्री पुढे म्हणाले, राज्यामध्ये २५ हजार विद्यार्थ्यांसाठी नव्याने वसतिगृहे सुरु करण्याचा मानस आहे. बैठकीनंतर मंत्री श्री. शिरसाट यांनी सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी, येरवडा पुणे येथील युनिट क्र. ३ व ४ च्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतीची पाहणी करुन सार्वजनिक बांधकाम विभाग व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करणेबाबत आदेश दिले. तसेच हे वसतिगृह सुरु करणेसाठी वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया त्वरित पूर्ण करणेबाबत समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.

यावेळी समाज कल्याण विभागातील कर्मचारी आणि शासकीय वसतिगृतील विद्यार्थी उपस्थित होते.

सरहद, पुणे आयोजित डॉक्टरांचे साहित्य संमेलन उत्साहात : साहित्यनिर्मितीतील अनुभव कथन

पुणे : डॉक्टर हा व्यक्तीच्या अंतरंगात डोकावत असतो. अगदी जन्म होण्यापूर्वीपासून ते मृत्यूपर्यंत विविध व्यक्तीरेखा त्याच्या आयुष्यात येत असतात. रुग्णाकडे तो रोगाच्या पलिकडे जाऊन पाहत असतो. त्याचे रुग्णाच्या कुटुंबियांशीही नाते जोडले जाते. या भावसंबंधातून डॉक्टरच्या मनात कथाबीज फुलावे अशी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन आय. एम. ए.चे महाराष्ट्र प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय महामंडळाच्या दिल्ली येथे होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलनाच्या निमित्ताने आज (दि. 30) सरहद स्कूल, कात्रज येथे डॉक्टरांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. भोंडवे बोलत होते. अध्यक्षस्थानी आय. एम. ए.चे अध्यक्ष डॉ. राजन संचेती होते. डॉ. मधुसूदन झंवर, डॉ. सतीश देसाई, डॉ. अमोल देवळेकर, डॉ. पद्माकर पंडित, डॉ. दाक्षायणी पंडित, डॉ. मिलिंद भोई, डॉ. मिलिंद टोणपे, डॉ. मनिष निकम, डॉ. प्रज्ञावंत देवळेकर सरहद, पुणेचे अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, मनिषा वाडेकर, अनुज नहार, झाहिद भट, मुख्याध्यापिका निर्मला नलावडे आदी उपस्थित होते.
वैद्यकीय व्यवसायाबरोबर साहित्य निर्मिती क्षेत्रातील अनुभव व्यक्त करतानाच सहभागी डॉक्टरांनी कथा, काव्य, कादंबरी लेखन तसेच वाचन याविषयी उपस्थितांना अवगत केले.
डॉ. भोंडवे म्हणाले, डॉक्टर लेखकांनी मान्यताप्राप्त साहित्यिकांमध्ये आपण कुठे आहोत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. डॉक्टर उत्तम पद्धतीने कथाबीज फुलवू शकतो; परंतु दर्जेदार साहित्यनिर्मितीसाठी लिहित्या डॉक्टरांना विविध साहित्य संस्थांमार्फत मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. मधुसुदन झंवर म्हणाले, एका खेळाडू नेत्रतज्ज्ञाला समाजप्रबोधनाच्या कार्यातून लेखक म्हणून घडविले आहे.
डॉक्टर जसे समाजासाठी चांगले कार्य करतात तसेच ते उत्तम साहित्यिक आणि साहित्यप्रेमीदेखील असतात, असे सांगून डॉ. सतीश देसाई म्हणाले, प्रत्येक डॉक्टरच्या मनात एक हळवा कोपरा असतो त्यातून त्याच्या मनामध्ये एखादा विषय रुजतो आणि त्यातून साहित्य फुलविले जाते.
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर म्हणाले, सृष्टीत सर्वत्र विज्ञान आहे. प्रत्येक शोधामागे मानवी भावभावनांचा कल्लोळ असतो, एक कथा असते. त्यातील सुरस, मनोरंजक कथा मानवी मूल्ये, संवेदना आणि सहवेदना जपण्यासाठी माझ्या हातून लिखाण झाले. डॉ. मिलिंद भोई म्हणाले, साहित्य संमेलन म्हणजे, सरस्वतीची पूजा आहे. सरस्वतीचे पूजन केले तर लक्ष्मी प्रसन्न होते.
डॉ. रणजीत घाटगे यांनी ‌‘मेहरू‌’ ही कथा प्रभावीपणे सादर केली. तर डॉ. दाक्षायणी पंडित यांनी ‌‘कथा‌’ नावाची कविता सादर केली. डॉ. मनिष निकम यांनी डॉ. अमरसिंह निकम यांच्यावर केलेली कविता सादर केली तसेच आजच्या तंत्रज्ञानाचे घातक दुष्परिणाम ओळखून आजच्या युगाने पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळावे, असे आग्रही मत प्रदर्शित केले.
‌‘बॉलिवुड खजाना‌’ या आपल्या पुस्तकनिर्मिती विषयी डॉ. मिलिंद टोणपे यांनी अनुभव कथन केले. तर डॉ. अमोल देवळेकर, डॉ. सुनील जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. राजन संचेती यांनी सरहदच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याविषयी कौतुक करून संमेलनाचा आढावा घेतला.
प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, साहित्य संमेलन हे इव्हेंट नसून ही सांस्कृतिक परंपरा आहे. अनेक डॉक्टर हे उत्तम साहित्यिक असतात, चांगले विचार समाजापुढे मांडतात. दिल्लीत होत असलेल्या संमेलनाच्या निमित्ताने डॉक्टरांचे साहित्य संमेलन घेऊन त्यांच्यातील साहित्यिक मूल्ये समाजासमोर आणण्याचा प्रयत्न आहे.
मान्यवरांचे स्वागत संजय नहार, शैलेश वाडेकर, अभय नहार, मनिषा वाडेकर, निर्मला नलावडे, रंजना देशमुख आदींनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. गणेश निंबाळकर यांनी गणेशवंदना सादर केली. सूत्रसंचालन डॉ. निरज जाधव यांनी केले.

शहरे संकुचित करत उपनगरे स्वयंपूर्ण व्हावीत : अरुण फिरोदिया

पर्यावरणास घातक वस्तूंवर जबर कर लावावा : अरुण फिरोदिया
दिलीपराज प्रकाशन प्रकाशित, दीपक शिकारपूर लिखित ‌‘पर्यावरण संरक्षणासाठी आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान‌’ या 60व्या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : पुण्याची ओळख फॅनलेस शहर अशी होती. पण आपणच आपले चोचले वाढवून पर्यावरणाचा ऱ्हास करीत चाललो आहोत. आपल्या पूर्वजांनी पर्यावरण रक्षणासाठी अनेक प्रयोग केले ते यशस्वीही झाले. शहरे संकुचित करत उपनगरे स्वयंपूर्ण करावीत, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे, उर्जा बचत आणि संसाधनांचा पुनर्वापर व्हावा, अशी अपेक्षा कायनेटिक उद्योग समूहाचे अध्यक्ष पद्मश्री अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केली. पर्यावरणास घातक असणाऱ्या वस्तूंवर सरकारने जास्तीत जास्त कर लावावा तर पर्यावरणपूरक वस्तूंवरील कर कमी करावा, अशी सूचना त्यांनी सरकारला केली.

दिलीपराज प्रकाशनतर्फे ‌‘पर्यावरण संरक्षणासाठी आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान‌’ या दीपक शिकारपूर लिखित पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. 30) कायनेटिक उद्योग समूहाचे अध्यक्ष पद्मश्री अरुण फिरोदिया, प्रसिद्ध समाजसेविका व उद्योजिका पद्मश्री लीला पुनावाला, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी फिरोदिया बोलत होते. दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे मंचावर होते. दीपक शिकारपूर यांचे हे 60 वे पुस्तक असून त्यांच्या 60व्या वाढदिवसाचे निमित्त साधून पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन नवलमल फिरोदिया सभागृह, भांडारकर इन्स्टिट्यूट येथे करण्यात आले होते.

पूर्वीच्याकाळी पुन:प्रक्रिया, पुनर्वापर या माध्यमातून उर्जेचा कमीत कमी वापर करून नैसर्गिक स्रोतांची जपणूक केली जात असे, या विषयीची काही उदाहरणे देऊन पद्मश्री अरुण फिरोदिया पुढे म्हणाले, घरांघरांमध्ये पाण्याचा पुनर्वापर व्हावा, शहराला हिरवेगार करण्यासाठी मोठमोठ्या इमारतींवर वेली चढवाव्यात, बांबूचा मोठ्या प्रमाणात वापर व्हावा, त्याचप्रमाणे नागरिकांनी आपल्या निवासस्थानाजवळील शाळा, रुग्णालये, नोकरीच्या जागा यांचा लाभ घेऊन प्रवास कमी करण्यावर भर द्यावा, ज्यायोग प्रदुषणाला आळा बसेल. ते पुढे म्हणाले, इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास हरकत नाही परंतु प्रत्येकाने पायी चालण्यावर भर द्यावा, ज्यायोगे उर्जेची फक्त बचतच होणार नाही तर नागरिकांचे आरोग्यही उत्तम राहिल. औद्योगिक आस्थापनांनी उद्योगक्षेत्राच्या परिसरात कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, मुलांसाठी शाळा, रुग्णालये, मनोरंजानाची माध्यमे यांची सोय करून दिल्यास उपनगरेही स्वयंपूर्ण होतील.

पद्मश्री लीला पुनावाला म्हणाल्या, ‌‘पर्यावरण संरक्षणासाठी आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान‌’ या पुस्तकाचे इंग्रजी भाषेत भाषांतर झाल्यास जागतिक पातळीवर या विषयी प्रचार व प्रसार होईल आणि पर्यावरणविषयक जागतिक समस्येवर विचारमंथन होईल.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, दीपक शिकारपूर यांचे पुस्तक ज्ञानलक्षी साहित्यदालनात लक्षणीय भर घालणारे आहे. भारतीय संस्कृतीत तसेच संतसाहित्यातही निसर्गाचे संवर्धन याविषयी गांभीर्याने विचार केलेला दिसून येतो. आज जगासमोर झपाट्याने बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानासह इंधन, प्रदुषण, तापमानवाढ अशी अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. अशा सामाजिक परिस्थितीत दीपक शिकारपूर यांनी केलेले सूत्रबद्ध नेमकेपणा व नेटकेपणा जपणारे हे पुस्तक समाजासाठी दिशादर्शक ठरेल. या पुस्तकाचे इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांमध्येही भाषांतर व्हावे.

पुस्तक लेखनविषयी बोलताना दीपक शिकारपूर म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण करताना या पुस्तकात दिलेले अनेक उपाय हे साधे-सोपे व सरळ आहेत. आपल्या रोजच्या जीवनात आपण यांचा अवलंब केल्यास उर्जासंवर्धन तसेच खर्चात बचत होईल. 2025 नंतर एन्व्हॉर्यनमेंटल सोशल गर्व्हनन्स या क्षेत्राचा मोठा बोलबाला होणार असून पर्यावरण क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, या करीता युवा पिढीने सजग राहणे आवश्यक आहे.

प्रास्ताविकात मधुर बर्वे म्हणाले, दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित होणारे हे 2930वे पुस्तक आहे.

‌‘पर्यावरण संरक्षणासाठी आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान‌’ या ब्रेल लिपितील पुस्तकाचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते झाले. हे पुस्तक नॅशनल फेडरेशन फॉर ब्लाईंडचे नारायण काकडे यांनी ब्रेल लिपित आणले आहे.

मान्यवरांचे स्वागत दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे व मधुमिता बर्वे यांनी केले. सूत्रसंचालन मधुर बर्वे यांनी केले तर आभार मधुमिता बर्वे यांनी मानले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त‘जय बापू’, ‘जय भीम’, ‘जय संविधान’ रॅलीचे आयोजन.

      पुणे– शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

      त्याचबरोबर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधानाच्या रक्षणार्थ ‘जय बापू’, ‘जय भीम’, ‘जय संविधान अभियान’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदरची रॅली काँग्रेस भवन ते लोकमान्य टिळक पुतळा, म. फुले मंडई पर्यंत काढण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘देशातील सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, सर्व धर्म समभाव आणि सामाजिक समता ही मूल्य संविधानाने आपल्याला दिलेली आहेत. किंबहुना आपले संविधान हेच आपली खरी ओळख आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या या संविधानाची मोडतोड काही धर्मांध शक्ती करू पाहत आहेत मात्र देशातील कष्टकरी, मागासवर्गीय, भटके विमुक्त, गरीब, दलित, अल्पसंख्यांक, महिला, युवक हे सारे या धर्मांध शक्तींचा डाव उधळवून लावतील आणि संविधानाचे रक्षण करतील.

भारतीय संविधान म्हणजे संतविचार-शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा संगम आहे. परंपरा, संस्कृती, भाषा, जात, धार्मिक श्रद्धा, खाद्यपदार्थ इत्यादींमध्ये वेगळेपण असलेल्या ४,००० हून अधिक समुदायांनी भारत देश बनलेला आहे. भारत हा जगातील पहिला देश आहे ज्याने स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच महिलांसह सर्व प्रौढांना मतदानाचा हक्क दिला. काँग्रेस पक्षाच्या वतीने भारताचे संविधान वाचविण्यासाठी रॅलीचे आयोजन केले आहे.’’

यावेळी यावेळी शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे यांच्या सह माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, NSUI चे माजी प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी नगरसेवक अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, मुख्तार शेख, सदानंद शेट्टी, अविनाश साळवे,  कैलास गायकवाड, राज अंबिके, विनोद रणपिसे, सीमा सावंत, प्राची दुधाने, माया डुरे, अनिता धिमधिमे, सुंदर ओव्हाळ, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, संतोष पाटोळे, अक्षय माने, रमेश सोनकांबळे, राजु ठोंबरे, रमेश सकट, अजित जाधव, सेवादलाचे प्रकाश पवार, द. स. पोळेकर, भूषण रानभरे, महेश हराळे, आबा जगताप, देवीदास लोणकर, गणेश शेडगे,  ज्योती परदेशी, हर्षद हांडे, भगवान कडू, नुर शेख, सुरेश नांगरे, वाल्मिकी जगताप, अमित कांबळे, सचिन भोसले, बाळासाहेब बाणखेले, अभिजीत महामुनी,  व इतर सहकारी पदाधिकारी उपस्थित होते.

‘अटल’ विचारांच्या तरुणांची देशाला गरज -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

आधार सोशल फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळातर्फे अटल साधना आणि अटल शक्ती पुरस्कार प्रदान
पुणे: भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यातून त्याग, निष्ठा समर्पण नेतृत्व आणि कर्तृत्व हे गुण समाजाला दिले. आपण आजच्या तरुणांमध्ये हे विचार रुजवले तर निश्चितच संस्कारक्षम पिढी निर्माण होईल. या संस्कारक्षम पिढीच्या जोरावरच आपण समृद्ध महाराष्ट्र घडवू शकतो, अशी भावना महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

माजी पंतप्रधान स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रत्यर्थ आधार सोशल फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळातर्फे सामाजिक कार्यातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी विविध व्यक्तिमत्वांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अटल साधना आणि अटल शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे झाला. ह.भ.प. डॉ. चेतनानंदजी उर्फ पंकज महाराज गावडे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, आधार सोशल फाउंडेशनचे प्रमुख दिलीप काळोखे, सविता काळोखे यावेळी उपस्थित होते.

डॉ. राहुल देशमुख यांना अटल शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ज्ञानेश्वर टाकळकर, अरविंद नाथ गोस्वामी, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, आचार्य शाहीर हेमंत राजे मावळे, प्रसाद खंडागळे, स्नेहल शिंदे साखरे, मारुती तुपे, परशुराम जोशी आदी विविध मान्यवरांना अटल साधना पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, दिलीप काळोखे यांनी आपल्या कार्याच्या झपाट्यातून महत्त्वाचे सामाजिक कार्य निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याची समाजाला निश्चितच गरज आहे अटल साधना आणि अटल शक्ती पुरस्काराच्या माध्यमातून ते केवळ पुरस्कार देत नाहीत तर आजच्या तरुणांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार रुजवण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत अशाच तरुणांची आज समाजाला गरज आहे.

पंकज महाराज गावडे म्हणाले, ज्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोन्याचा नांगर फिरवला त्या पुण्याचे रूप आज विद्रूप झाले आहे. हे विद्रूप झालेले रूप बदलण्यासाठी आजच्या तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे त्यासाठी तरुणांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या गुणांची पायाभरणी आपण करणे गरजेचे आहे.

धीरज घाटे म्हणाले, अटल आणि शक्ती या दोन शब्दांच्या माध्यमातून केवळ एक व्यक्तिमत्व उभे राहिले नाही तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने एक राष्ट्रपुरुष निर्माण झाला. अशा राष्ट्रपुरुषांचे विचार समाजामध्ये रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य दिलीप काळोखे हे करत आहेत. त्यामुळे निश्चितच एक संस्कार क्षम पिढी घडणार आहे.  

डॉ. राहुल देशमुख म्हणाले, अंध व्यक्तीचे अंधत्व हे त्याच्यासमोरील अडचण नाही तर डोळस समाजाचे मानसिक अंधत्व हे मुख्य अडथळा आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे, तरच अशा व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळू शकते.

दिलीप काळोखे म्हणाले, अटल साधना आणि अटल शक्ती या पुरस्काराच्या माध्यमातून श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचावेत हा आमचा उद्देश आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार तरुणांमध्ये रुजवले गेले, तर निश्चितच एक संस्कारक्षम समाज निर्माण होऊ शकतो.

लोकांनी मनसेला मतदान केले, पण ते आपल्यापर्यंत आले नाही:राज ठाकरे यांचे निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह

‘अजित पवारांचे 42 आमदार आणि शरद पवारांचे 10 आमदार हे कसे शक्य आहे?’
मुंबई-मनसे मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीवर रोखठोक भाष्य केले आहे. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर सगळीकडे सन्नाटा होता. शिवाय कुणालाही कळलं नाही असं कसं काय झालं?, ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आला होता त्यांचे ४२ आमदार कसे निवडून आले? लोकसभेनंतर चार महिन्यात लोकांचे मत इतके कसे बदलले, तसेच बाळासाहेब थोरात ७ वेळा निवडून आले होते ते कसे काय पडले? असे सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

राज ठाकरे म्हणाले, ” महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर माझ्याकडे संघाशी संबंधित एक गृहस्थ आले होते. मला त्यांनी एक वाक्य सांगितले. मला म्हणाले इतना सन्नाटा क्यूँ है भाई ? कोई तो जिता होगा. निकालानंतर महाराष्ट्रात जो सन्नाटा पसरला ते कसले द्योतक आहे? आमचे राजू पाटील आज इथे बसले आहेत. त्यांचे एक गाव आहे तिथे त्यांनाच मतदान होते. १४०० लोकांचे गाव आहे ते.

या गावात राजू पाटील यांना किती मते मिळाली असतील? एक पण नाही. कसे काय शक्य आहे? संपूर्ण गावातले एकही मत मिळाले नाही? मराठवाड्यातला आपला एक पदाधिकारी आहे तो नगरसेवक आहे. तो नगरसेवक असताना त्याला साडेपाच हजारांचे मतदान त्याच्या भागातून आहे. यावेळी विधानसभेला उभा असताना त्याला किती मतदान झाले? अडीच हजार मतं. अनेक असे निर्णय आहेत ज्यावर विश्वास बसतच नाही.”

ते पुढे म्हणाले, “निवडून आलेल्यांचा विश्वास नाही, पडलेल्यांचे काय घेऊन बसलोय आपण? निवडून आलेले रोज रात्री बायकोला सांगतात चिमटा काढ म्हणून. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात ७ वेळा आमदार झाले. ते ७ वेळा ७० ते ८० हजार मताधिक्यांनी निवडून यायचे त्यांचा १० हजार मतांनी पराभव झाला. कदाचित अनेक लोकं बोलतील राज ठाकरे पराभूत झाल्याने हे बोलत आहेत, मी नाही संपूर्ण महाराष्ट्र बोलतो आहे. जे निवडून आले आणि सत्तेत आहेत त्यांचे मला अनेकांचे फोन आले त्यांनाही शॉक बसला आहे.भाजपाला १३२ जागा मिळाल्या चला ठीक आहे. २०१४ ला त्यांना १२२ जागा मिळाल्या होत्या, नंतर १०५ आल्या, आता १३२ आल्या समजू शकतो. अजित पवारांचे ४२ आमदार निवडून आले? त्यांचे ४-५ आमदार तरी येतील का? असे सगळ्यांना वाटत होते. कुणाचा तरी विश्वास बसेल का? जे इतके दिवस राज्यात राजकारण करत आले आहेत, ज्यांच्या जिवावर भुजबळ, अजित पवार मोठे झाले त्या शरद पवारांना १० जागा? न समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे.

लोकसभेला एक खासदार निवडून आलेल्या अजित पवारांचे ४२ आमदार आले? काय झाले, कसे झाले? हा संशोधनाचा विषय आहे. मी तुम्हाला सांगायला आलो आहे की मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केले आहे, ते आपल्यापर्यंत आले नाही. लोकांनी मतदान केले, पण ते गायब झाले. अशा प्रकारे निवडणूक लढवायची असेल तर कशाला निवडणूक लढवायची? ही गोष्टही निघून जाईल, कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही”, असे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

शिवाजी महाराज मोगलांना लाच देऊन आग्र्याहून सुटले:अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा वादग्रस्त दावा

ठाकरे गटाच्या किरणे मानेंनी सुनावले खडेबोल
पुणे -छत्रपती शिवाजी महाराज हे मोगलांना लाच देऊन आग्र्याहून सुटले होते. तेव्हा मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते, असा दावा छत्रपती शाहू महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते राहुल सोलापूर यांनी केला. या दाव्यावरून ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेता किरण माने यांनी राहुल सोलापूरकरांचा खरपूस समाचार घेत सुनावले. असल्या टुकारांना शाहु महाराजांच्या भूमिका दिल्या गेल्या, तरी यांच्या मेंदूतले शेण तसेच आहे. अशा शब्दांत किरण माने यांनी ताशेरे ओढले.

अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेबाबत बरेच वादग्रस्त दावे केलेत. औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिल्याचे ते म्हणालेत. सोलापूरकरांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटल्याचे पाहायला मिळाले. अभिनेते किरण माने यांनीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सोलापूरकर यांच्यावर सडेतोड टीका केली.

अशाप्रकारच्या लोकांनी आपली मराठी इंडस्ट्री खच्चून भरलेली आहे! असल्या टुकारांना शाहु महाराजांच्या भूमिका दिल्या गेल्या, तरी यांच्या मेंदूतले शेण तसेच आहे. विनोद म्हणजे शिवरायांची बदनामी करण्याच्या नादात स्वत:ला शिवशाहीर म्हणवून घेणाऱ्या एका इतिहासद्रोह्यालाही याने खोटे ठरवले, असा घणाघातच किरण माने यांनी केला.
अरे, ‘लाच’ दिली होती का नव्हती हे दूरच… पण लाच दिल्याचे कधी पुरावे असतात का? असा सवालही त्यांनी केला. कडेकोट बंदोबस्तात तुरुंगात असताना महाराज पैसे चारतात आणि त्यांना ‘लाच दिली’ असे अधिकृत शिक्क्याचे परवाने मिळतात, असा अनागोंदी कारभार चालायला ते ईव्हिएम घोटाळ्याने सत्तेत आलेले सरकार होते की काय? असाही प्रश्न किरण माने यांनी विचारला.

अभिनेता राहुल सोलापूर यांनी नुकतीच ‘मु.पो. मनोरंजन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी ‘महाराज आग्र्याहून सुटले, तेव्हा मिठाईचे पेटारे वगेरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आले महाराज… आणि त्यासाठी किती हुंडा वठवला, त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली. त्याचे मोहसीन की मोईम खान नाव आहे. त्याच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन महाराज बाहेर पडले. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले, त्याच्या परवान्याची अजुनही खूण सुद्धा आहे.’ असा वादग्रस्त दावा केला.
राहुल सोलापूरकर यांनी पुढे बोलताना ‘गोष्टीरुपात सांगताना लोकांना रंजक करुन सांगावे लागते, मग ती रंजकता आली की, इतिहासाला कुठेतरी छेद मिळतो किंवा इतिहास बाजूला ठेवला जातो.’ असाही दावा केला.

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाने राखले विजेतेपद

‘एमआयटी डब्लूपीयू’ला स्पर्धेत दुसरे तर स.प. महाविद्यालयाला तिसरे स्थान

पुणेः विश्वनाथ स्पोर्ट मीट-२०२५ या राज्यस्थरिय आंतरमहाविद्यालयीन/ आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करताना तब्बल १४ सुवर्ण व १८ रौप्यपदकांसह पदकतालिकेतील वर्चस्वासह आपले विजेतेपद राखले. एमआयटी एडीटी पाठोपाठ एमआयटी डब्लूपीयू संघाने एकूण ११ सुवर्ण व ६ रौप्य पदकांसह दुसरा तर सर परशूराम महाविद्यालय (स.प.) संघाने ६ सुवर्ण व ३ रौप्यपदकांसह स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला. एमआयटी एडीटी विद्यापीठाने गतवर्षीही वर्चस्व गाजविताना विजेतेपद पटकाविले होते.

तब्बल १५ क्रीडा प्रकारांत १४०+ अधिक शिक्षण संस्थांमधील ५००० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागासह झालेल्या या स्पर्धेचे बक्षिस वितरण ब्रिगेडीअर दिलीप पटवर्धन (निवृत्त), महाराष्ट्र सरकारच्या सहाय्यक क्रीडा अधिकारी व छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेत्या सायली तेजस शिंदे, विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, प्रा.पद्माकर फड, डाॅ.सुराज भोयार आदी पाहुण्यांच्या हजेरीत पार पडले. ज्यात विद्यार्थ्यांना १० लाखांपर्यंत रोख पारितोषिके, पदक व करंडक अशी बक्षिसे देण्यात आली.  बॅडमिंटन पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात एमआयटी एडीटीच्या खेळाडूंचा ३-१ असा पराभव करत कोथरूडच्या एमआयटी डब्लूपीयूने सुवर्ण कामगिरी केली. तर महिला गटात विश्वकर्मा इस्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीने अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचा २-० अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. बुद्धिबळाच्या पुरुष गटात आशिष संकलेचाच्या कामगिरीच्या जोरावर व्हीआयटी पुणेने एमआयटी डब्लूपीयूचा तर महिलांत रिया मराठेच्या कामगिरीच्या बळावर एमआयटी डब्लूपीयूने एमआयटी एडीटीचा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. बास्केटबॉल पुरुषांच्या अंतिम सामन्यांत केबीपी सातारा महाविद्यालयाच्या संघाने एमआयटी डब्लूपीयू संघाचा तर महिलांत वारणा विद्यापीठ कोल्हापूरने एमआयटी एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरीची नोंद केली. फुटबॉल स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात इशांत चितळेच्या नेतृत्वाखालील एनडीए खडकवासलाने नेस वाडीय महाविद्यालय, पुणेचा पराभव केला. नेस वाडीया महाविद्यालयाच्या हितेश यादवला सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर महिलांत एमआयटी डब्लूपीयू संघाने एमआयटी एडीटी संघाचा ३-१ अशा फरकाने पराभव केला. तर भाग्यश्री मुखारे ही सर्वोत्तम खेळाडू ठरली.  कबड्डी पुरुष गटात एमआयटी एडीटी विद्यापीठ संघाने भारती विद्यापीठ संघाचा तर महिलांत विद्या प्रतिष्ठान बारामती संघाने एमआयटी एडीटी संघाचा पराभव करताना सुवर्णकामगिरीची नोंद केली. सौरभ रणावरे व तेजश्री चौघुले हे स्पर्धेतील सर्वात्तम खेळाडू ठरले.  अत्यंत रोमांचक ठरलेल्या पुरुष खो-खोच्या अंतिम सामन्यात गणपतराव काळभोर महाविद्यालयाने डी.वाय. पाटील विद्यापीठ आकुर्डीचा तर महिलांत विद्या प्रतिष्ठाण बारामतीने डी.वाय.पाटील अंबीचा पराभव केला. श्रेया गोसावी ही सर्वोत्तम खेळाडू ठरली. टेनिसच्या दोन्ही गटांत एनडीए खडकवासला व एमआयटी डब्ल्यूपीयूने विजेतेपद पटकाविले तर, व्हॉलीबॉलमध्ये टी.सी. काॅलेज बारामती व माॅडर्न महाविद्यालयाने सुवर्णकामगिरी केली. वाॅटर पोलो या खेळांतही एमआयटी शिक्षण समुहांच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले. 

नेस वाडीया महाविद्यालयाकडे क्रिकेट करंडक:स्पर्धेत सर्वांत रोमांचक ठरलेल्या व एकूण ३६ संघांमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद नेस वाडीया महाविद्यालयाने पटकाविले. त्यांनी डी.वाय.पाटील विद्यापीठ आकुर्डीचा पराभव केला. ज्यात तिलक जाधव (२५९ धावा) याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. महिलांत एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या संघाने एमआयटी सोफा संघाचा पराभव केला.
रोईंगमध्ये एमआयटी बोट क्लबचे वर्चस्व:विद्यापीठाच्या बोट क्लबवर पार पडलेल्या विविध गटांच्या इनडोअर रोईंग स्पर्धेच्या पुरुष व महिला सिंगल स्कल प्रकारात योगेश बोराले व साक्षी धमाले यांनी तर डबल स्कल प्रकारात अनिकेत कोलते, यशराज गायकवाड विक्रमी वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर 4ई (५०० मी.) प्रकारात एकंदर एमआयटी एडीटी बोट क्लबच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी करताना वर्चस्व राखले. 

आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील पेन्शन, नियम व अटी शिथिल करा’, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

पत्रकारांचे कायदेशीर प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी कायदा सेवा कक्ष स्थापन करावा- डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, : आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील पेन्शन, नियम व अटी शिथिल करून ज्येष्ठ पत्रकार/ छायाचित्रकार यांना योजनेचा लाभ मिळण्याबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात बैठक झाली. जेष्ठ अधीस्वीकृती पत्रकार कार्ड व आयकर भरावा लागत नाही या दोन कागदपत्रकारांच्या आधारे पेन्शन प्रकरणे मंजूरीचा निर्णय मंत्रालयीन अधिस्वीकृती समितीने घ्यावे असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

राज्य सरकारने सुरू केलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेंतर्गत १८६ पत्रकारांना पेन्शन योजना सुरू आहे. या योजनेकरिता ५० कोटींची तरतुद करण्यात आली असून दरम्यान, जेष्ठ अधिस्वीकृती पत्रकारांना पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याकरिता अनेक अटी, शर्तीतून जावे लागत आहे. याबाबत कोल्हापूर प्रेस क्लबच्या निवेदनातून विविध मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले. पत्रकारांना विशिष्ट आजारांसाठी शासनाच्या योजनांमधून वैद्यकीय मदत मिळत असली तरीही नियमित आजारांसाठी वैद्यकीय मदत प्राप्त व्हावी याकरिता CSR फंडातून निधी प्राप्त करण्याचा प्रयत्न करा, पत्रकारांसाठी कायदा सहाय्य कक्ष तयार करा, जेष्ठ सेवा प्राधिकरणांतर्गत पत्रकारांच्या समस्या दूर करा, असे निर्देशही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माहिती संचनालय विभागाला दिल्या.

जेष्ठ अधिस्वीकृती पत्रकार सन्मान योजनेतील सदस्यांची भविष्यातील वाढती संख्या लक्षात घेता, अधिक निधीचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर करावा असेही सांगण्यात आले. त्याचबरोबर, पेन्शन योजना लागू होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच, कार्यालयीन कर्मचारी असल्याच्या नोंदी ठेवण्याबाबत सर्व संपादकांना पत्र पाठवणार असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

काही पत्रकार ज्या प्रसारमाध्यमात काम करत होते, त्यापैकी काही दैनिक सध्या अस्तित्वात नसल्याने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होऊ शकत नाही, तसेच इतरही अडचणी लक्षात घेता, एक समिती गठित करावी असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

या बैठकीला माहिती संचनालय विभागाचे संचालक दयानंद कांबळे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहार संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, सरचिटणीस प्रवीण पुरो, माजी अध्यक्ष मंदार पारकर, कोल्हापूर प्रेस क्लब अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, संचालक समीर मुजावर, दिपक जाधव, मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर, कोशाध्यक्ष चेतन काशीकर मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया ,कोल्हापुर संस्थापक शेखर धोंगडे उपस्थित होते.

तिसऱ्या विश्व मराठी संमलेनाचे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पुणे येथे आयोजन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धाटन होणार,

पुणे, दि. २९: तिसऱ्या विश्व मराठी संमलेनाचे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत फर्ग्यूसन महाविद्यालय येथे आयोजन करण्यात येणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. संमेलनाचे उद्धाटन होणार आहे. यामध्ये साहित्यरसिकांसाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे उपसभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषेदच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार आदी उपस्थित राहणार आहे.

संमेलनासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंच, प्र.के. अत्रे सभागृह (ॲम्फी थिएटर) तयार करण्यात आले असून या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत.

शुक्रवार ३१ जानेवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्यूसन कॉलेजपर्यंत शोभायात्रा, उद्घाटन समारंभ, परिसंवाद- माझी मराठी भाषा अभिजात झाली, लेखक भास्कर हांडे लिखीत छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिचित्र तसेच बालभारतीच्या अभिजात मराठी विषयावरील ‘किशोर’ या अंकाचे प्रकाशन, मराठी भाषा आणि प्रसार माध्यमे, नव्या-जुन्यांचे कवी संमेलन, मराठीचा झेंडा अटकेपार, महाराष्ट्राची महासंस्कृती, मराठीच्या बोलींच्या सर्वेक्षणाबाबत सादरीकरण, अनुवाद विषयक चर्चासत्र, परिसंवाद कार्यक्रम होणार आहे.

शनिवार, १ फेब्रुवारी रोजी महाराष्ट् माझा-जाखडी, नमन, भारुड, गोंधळ, पोवाडा, पालखी, वाद्यांची जुगलबंदी, प्रशासनातील मराठी भाषा, परिसंवाद-समाज माध्यमांवरील प्रभावी व्यक्तीमत्वे, विज्ञान तंत्रज्ञानातील मराठीचा वापर, बाल साहित्याचा अविष्कार, परिसंवाद- नाटक, चित्रपटातील मराठी भाषा, स्वरसंध्या- अभिजात भावसंगीत, अभंग नाट्यसंगीताची सुरेल मैफिल, कार्यशाळा- व्यंगचित्रांची दुनिया (चिंटू) शालेय विद्यार्थ्यांसाठीचा विशेष कार्यक्रम, बालसाहित्याचा अविष्कार, परिसंवाद-वंदे मातरम : स्वातंत्र्य प्रेरणेची 150 वर्षे, महिला कायदा व महिलांना न्याय मराठी भाषेत, मराठी भाषेत कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर (एआय), कार्यशाळा: माध्यमांची लेखणी, आराधी लोकनृत्य, दिंडी लोकनृत्य, ज्ञानपीठाचे ज्ञानतपस्वी हे कार्यक्रम होणार आहे.

रविवार, २ फेब्रुवारी रोजी अभंगवाणी, मराठी उद्योजकांचे चर्चा सत्र, मराठी भाषा आणि स्त्री साहित्य, ग्रामीण वास्तव आणि मराठी साहित्य, मराठीचे ग्रंथ वैभव, मराठी भाषा आणि युवक, स्वरझंकार- मराठी संगीताचा बहारदार नजराना, बृहन्महाराष्ट्र मंडळ- सादरीकरण, अध्यात्मातील अभिजात मराठी, अभ्यासक्रमातील मराठी भाषा: वाटचाल, मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी, बालगंधर्व रंगमंदीर येथे सागरा प्राण तळमळला, चाणक्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून संमेलनाची सांगता होणार आहे.
0000

सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रयत्न करावेत- पालक सचिव व्ही. राधा

100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत घेतला विविध विभागांच्या कामांचा आढावा

पुणे: पुणे जिल्हा विविध क्षेत्रात अग्रेसर जिल्हा असून प्रचंड क्षमता असलेला जिल्हा आहे. येथील अधिकारी विकासाचा दृष्टीकोन असलेले असून विविध विभागांनी आपल्या ॲप, पोर्टल तसेच ऑनलाईन यंत्रणांचे एकत्रिकरण कसे करता येईल, सर्वसामान्याचे जीवन सुकर होण्यासह त्यांच्या समस्यांवर सहजासहजी तोडगा कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पुणे जिल्ह्याच्या पालक सचिव व्ही. राधा यांनी दिले.

विधानभवन येथे 100 दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रभारी अतिरिक्त आयुक्त समिक्षा चंद्राकार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.

जिल्ह्याला ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेनुसार विकसित कसे करता येईल हा दृष्टीकोन ठेऊन काम करण्याची गरज आहे, असे सांगून श्रीमती राधा म्हणाल्या, विविध विभागातील अधिकाऱ्यांनी समन्वय राखत दूरचा विचार करुन शाश्वत कामे होतील यासाठी प्रयत्न करावेत. हा जिल्हा औद्योगिकदृष्ट्या प्रगत असून अजूनही त्याला मोठी चालना देता येऊ शकते. त्यासाठी केंद्र शासनाचे मार्गदर्शन घ्यावे, इतर देशातील, राज्यातील कार्यप्रणालींचा अभ्यास करण्यात यावा. उद्योगांना हा जिल्हा ‘व्यवसाय स्नेही’ असल्याचा विश्वास अधिक वाढीस लागेल, असे प्रयत्न व्हावेत.

त्या पुढे म्हणाल्या, येथे पर्यटनक्षेत्रांचा चांगला विकास झालेला आहे. तथापि, जिल्ह्यात आलेला पर्यटक विविध पर्यटन स्थळांना भेट देत तीन-चार दिवस जिल्ह्यातच कसा राहील यादृष्टीने सर्वंकष पर्यटन विकास आराखडा करावा, जेणेकरुन महसूलवृद्धीसह स्थानिकांना रोजगारही मिळेल. त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी पर्यटन व्यवसायिकांची बैठक घेऊनही त्यांचा सूचना जाणून घ्याव्यात.

जिल्ह्यातील दोन्ही महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्हा परिषद आदींनी आपल्या सेवा नागरिकांना उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने तसेच आपसात समन्वय राखण्यासाठी एकच व्यासपीठ अर्थात ऑनलाईन यंत्रणा तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्या म्हणाल्या.

केवळ कोणत्याही समस्या न मांडता त्याबाबत उपाययोजना सुचविणे आणि शासनाकडून नेमके काय अपेक्षित आहे हे योग्य तऱ्हेने संबंधित विभागाकडे मांडल्यास समस्या अधिक गतीने सुटतात. पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पाणी बचत, योग्य प्रमाणात वापर, पुनर्प्रकिया करुन वापर आदींवर उपाययोजनांचे आराखडे तयार करावेत. नदी, नाले आदी पाणी संरचना स्वच्छ कशा होतील यासाठीचे आराखडे तयार करुन अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तसेच पश्चिम घाटातील जैवविविधता जपण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी विविध विभागांच्यावतीने चाललेल्या कामकाजाविषयी माहिती दिली. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून तसेच विभागस्तरावर विविध विभागांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत असल्याने कामातील समस्या तातडीने सोडविता येऊन कामे मार्गी लागत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी 100 दिवस कृती आराखड्यानुसार संकेतस्थळांचे अद्ययावतीकरण नागरिकस्नेही करणे, सुकर जीवनमान, गुंतवणुकीस प्रोत्साहन, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निराकरण, कार्यालयीन सोयी व सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी याबाबत आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी डूडी यांनी ई-ऑफीस, महा-महसूल, ई-हक्क, ई-चावडी, दृकश्राव्य माध्यमांद्वारे सुनावणी, सेवादूत मोबाईल ॲप्लिकेशन व प्रणाली, पुनर्वसन संकेतस्थळ, मैत्री ॲप, गुंतवणूकदारांसाठी एक खिडकी प्रणाली, कार्यालयांचे अभिलेख संगणकीकरण, विविध किल्ल्यांचे जतन व संवर्धनाचे काम, युनेस्कोच्या वारसास्थळांमध्ये समावेश आदींबाबत माहिती देऊन जिल्ह्याचा सर्वंकष पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याचे सांगितले.

मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी समान पाणीपुरवठा योजना, शहराशी जोडलेल्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या प्रवेशाच्या ठिकाणी उच्च दर्जाची स्वच्छतागृहे उभारण्याची संकल्पना, वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी विविध पूल, तुटक (मिसींग) रस्त्यांबाबतचा आराखडा, कात्रज कोंढवा रस्त्याचे कामाची प्रगती, पुणे विमानतळ ते राजभवन रस्त्याचे संपूर्ण काँक्रिटीकरण करण्याबाबतचा आराखडा, महत्त्वाच्या खराब झालेल्या रस्त्यांचे मिशन 15 दिवस अंतर्गत संपूर्ण डांबरीकरण पूर्ण करणे, जायका प्रकल्पाची प्रगती, मुळा- मुठा नदीसुधार प्रक्लप आदींबाबत सादरीकरण केले.

मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना, अत्याधुनिक यंत्रणेद्वारे वाहतूक व्यवस्थापन व संनियंत्रण, कचरा गाड्यांचे जीपीएसद्वारे संनियत्रण, नागरिकांना सेवा पुरविणासाठी सारथी प्रणाली, पवना, इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प आदी तसेच भविष्यातील प्रकल्प आदींबाबत सादरीकरण केले.

श्री. म्हसे यांनी आपल्या सादरीकरणात पीएमआरडीएचा मेट्रो प्रकल्प, नियोजित बाह्य वर्तुळ मार्ग, पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक स्थापना आदींबाबत माहिती दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या 303 केंद्रस्तरीय प्राथमिक शाळांचा सर्वंकष विकास करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच पाणशेत प्रमाणेच समूह शाळा प्रकल्पही राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

श्री. बहीर यांनी सार्वजनिक विभागामार्फत जिल्ह्यात बांधकाम करण्यात आलेल्या विविध इमारतींचे, सुरू असलेल्या प्रकल्पांचे तसेच आगामी 100 दिवसाचे नियोजनाबाबत सादरीकरण केले.
0000