Home Blog Page 480

राष्ट्रवादीने भाजपशी लग्न केलेले नाही-माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

: जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे ८ व्या युवा संसदेत २ रा संसद कट्टा अंतर्गत विशेष मुलाखत

पुणे : सन २०१४ मध्ये शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. त्यानंतरही अनेक वर्ष भाजपाला पाठिंबा देण्यासंदर्भात तळ्यात मळ्यात भूमिका होती. अखेर मी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही सध्या राष्ट्रवादी पक्ष म्हणून राजकीय दृष्ट्या भाजपसोबत आहोत. आम्ही भाजपसोबत लग्न केलेले नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित आठव्या युवा संसदेमध्ये २ रा संसद कट्टा अंतर्गत विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या राजकारणाचा पट विद्यार्थ्यांसमोर उलगडला. इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते.

छगन भुजबळ म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे मी सर्वसामान्य भाजी विक्रेत्याचा राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो. त्यानंतर मंडल आयोगाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेसंदर्भात त्यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलो. मी जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर त्याचवेळी राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो. तसेच काँग्रेसमध्ये राहून काम केले असते आणि शरद पवार यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला नसता, तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री होण्याची मला संधी होती. परंतु ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री होण्याच्या दोन संधी सोडून दिल्या. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही तर ओबीसींचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यासाठी मी आजही पद नसताना लढत राहणार आहे.

ते पुढे म्हणाले, तेलगी प्रकरणाशी काहीही संबंध नसताना शरद पवार यांनी माझा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला, परंतु त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये माझ्यावर कोणतेही आरोप झालेले नाहीत व ते सिद्धही झाले नाही त्यामुळे एक प्रकारे शरद पवार यांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून असणारा मी ज्येष्ठ नेता आहे, तरीही अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर आज मला आज मंत्रिपद का मिळाले नाही ? याची खंत वाटते. मला मिळणारे पद महत्त्वाचे नाही, परंतु मानसन्मान जर मिळाला नाही तर माणूस दुःखी होतो, अशी खंतही छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये मी ओबीसींच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे मराठा समाजाच्या मनामध्ये माझ्याबद्दल जी भावना निर्माण झाली त्याचा निश्चितच फटका मला बसला आणि माझे मताधिक्य कमी झाले. परंतु तरीही मी ओबीसींच्या हक्कांसाठी लढत राहणार आहे. जरांगेंच्या आंदोलनामध्ये माझा वापर करून घेतला असे अनेकांना वाटते, परंतु छगन भुजबळ चा कोणीही वापर करू शकत नाही आणि मी माझा वापर कोणालाही करू देत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तुम्ही आता राज्यपाल होणार का? याविषयावर ते पुढे म्हणाले, राज्यपाल हे अतिशय मानाचे पद आहे. त्या पदाचा मी मान राखतो परंतु माझा स्वभाव हा अन्यायाविरोधात बोलण्याचा आणि संघर्ष करण्याचा आहे राज्यपाल होऊन मी सर्वसामान्यांसाठी बोलू शकत नाही, मला राज्यपाल करणे म्हणजे एक प्रकारे छगन भुजबळ च्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. त्यामुळेच मी राज्यपाल पद स्वीकारू शकत नाही असे छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरहद पब्लिक स्कूल आयोजित ‌‘सोहळा आजी आजोबांचा‌’संपन्न


पुणे : ‌‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे‌’, ‌‘प्लॅस्टीकचा वापर करू नका‌’, ‌‘घरचा ओला कचरा घरातच जीरवा‌’ असे संदेश देत मोबाईच्या आधी मुलांना ‌‘रामकृष्णहरी‌’ कळले पाहिजे अशी अपेक्षा सरहद पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित ‌‘सोहळा आजी आजोबांचा‌’ या अभिनव कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांनी व्यक्त केली.
दिल्ली येथे होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने धनकवडीतील सरहद पब्लिक स्कूल येथे आज (दि. 31) आजी-आजोबांचा स्नेहमेळा मोठ्या उत्साहात रंगला. ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले, सौ. गोडबोले, सुरेश मेहता, सरोज मेहता, मनोहर कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती. सरहदच्या सचिव सुषमा नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, विश्वस्त अनुज नहार, गुजरवाडी येथील सरहद शाळेच्या पर्यवेक्षिका मनिषा वाडेकर, मुख्याध्यापिका सुजाता गोळे, लेखापाल विभाग प्रमुख गीता खोत, समन्वयक झाहिद भट उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. त्यांनतर शाळेतील शिक्षकांनी ‌‘हे मराठी बाहू झुंजते राहू‌’ हे संमेलन गीत सादर केले. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन सरहद संस्था करीत असल्याच्या निमित्ताने मराठी भाषा मुलांमध्ये रुजावी, भाषेचे संवर्धन व्हावे, मराठी भाषा पुढील पिढ्यांकडे प्रवाहित व्हावी या करिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आजी-आजोबांसाठी पारंपरिक वेशभूषा, महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती दर्शविणारी पाककला स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची, काव्यवाचन, कथाकथन, असे उपक्रम राबविण्यात आले. विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होत आजी-आजोबांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. पारंपरिक वेशभूषा परिधान करून रेड कार्पेटवर कॅटवॉक करण्याचा अनोखा आनंदही आजी-आजोबांनी लुटला. पाककला स्पर्धेत विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, मराठवाड्यातील खाद्यपदार्थांची ओळख या निमित्ताने झाली.
सरहद शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी उपस्थित आजी-आजोबांसाठी मराठीतील सुप्रसिद्ध गीतांवर नृत्य सादरीकरण करून मोहित केले.
सरहद संस्थेच्या उपक्रमास शुभेच्छा देऊन अविनाश गोडबोले म्हणाले, आज शिक्षणाच्या क्षेत्रात बाजार झालेला आहे. अशा परिस्थितीत सरहद संस्थेतर्फे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केले जाणारे कार्य स्पृहणीय आहे.
सुरेश मेहता म्हणाले, हा समारंभ अतिशय हृद्य झाला आहे. सरहदच्या माध्यमातून नहार व वाडेकर कुटुंबिय देशातील अनेक नातवंडांचे आजी-आजोबापण निभावत आहेत. सरहद शाळा म्हणजे सरस्वतीचे-शिक्षणाचे पवित्र मंदिरच आहे.
मनोहर कोलते म्हणाले, असे उपक्रम प्रत्येक शाळेत झाले पाहिजेत. आजी-आजोबा ज्या घरात असतात तेे घर मंदिर असते. एकत्र कुटुंबाची संस्कृती उपयुक्त असून आजी-आजोबांकडून मिळणारा आनंद, संस्कार महत्त्वाचे असतात. आजी-आजोबा स्नेहाचे, प्रेमाचे संस्कार करून नातवंडांकडे कुटुंबव्यवस्थेचे बाळकडू पोहोचवत आहेत.
सरहद संस्थेच्या कार्याचे आणि शाळेने आयोजित केलेल्या उपक्रमाचे अनेक आजी-आजोबांनी मनोगतातून कौतुक केले.

विश्वशांतीसाठी सर्व राष्ट्रप्रमुख, युनेस्को व यूनो ला करणार आवाहन

पुणे, ३१ जानेवारी: जागतिक शांतता ही एक सापेक्ष संज्ञा आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षितेला चालना देण्यासाठी विसाव्या शतकात अनेक विचारसरणी उदयास आल्या आहेत. परंतू जागतिक शांततेसाठ गांधीवादी मॉडेल हा एक व्यवहार्य पर्याय आहे. हा मुख्य धागा पकडून माईर्स एमआयटी शिक्षण समूह आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे ‘मेल टू महात्मा’ गांधीजी यांना विनंती पत्राचा अभिनव उपक्रम चालविला जाणार आहे. यामध्ये समूहातील २७ हजार विद्यार्थी व ३ हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी युनायटेड नेशन्स, युनेस्को आणि जगभरातील सर्व प्रमुख देश म्हणजेच अमेरिका, चायना, रशिया, जर्मन, जपान या व्यतिरिक्त अन्य  देशातील राष्ट्रप्रमुखांना पत्र लिहिणाच्या संकल्प सोडला आहे.
यामध्ये असे नमूद करण्यात येणार आहे की, म. गांधीजीचे विचार अंमलात आणून, हिंसाचार, रक्तपात, सीमावाद थांबवून शांतता नांदण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी सर्वांना समोर येण्याचे आवाहन माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी व मानवतेचे पुजारी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांनी केले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या ७८ व्या पुण्यतिथी निमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित आदरांजली कार्यक्रमात विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा कराड यांनी हा संकल्प सोडला आहे.
 या वेळी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे, डॉ. संजय उपाध्ये, प्रा. दत्ता दंडगे, डॉ.मिलिंद पात्रे, डॉ. महेश थोरवे आणि एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्टूडेन्ट कॉन्सिलचे अध्यक्ष पृथ्वीराज शिंदे, प्रसाद शिंदे, आर्या दिवान, प्रशांत मानव व शेकडो विद्यार्थी यांच्यासह विद्यार्थी परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले, म. गांधीजींनी सतत आत्मपरीक्षण केले आहे. त्यांचा विचार जीवनात उतरविणे गरजेचे आहे. त्यांच्या तत्वांवर विचार करण्याची वेळ आली आहे. ग्लोबलायझेशनच्या काळात वैज्ञानिक व औद्योगिक प्रगती झाली. त्यातूनच भौतिक सुख, सुविधांची घोडदौड सुरूच आहे. अशा वेळेस अज्ञान, अहंभाव व स्वार्थापोटी अराजकता, आतंकवाद, रक्तपात व अन्य गोष्टींचे थैमानही वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे आपण २१ व्या शतकाचा अंत पाहू शकेल की नाही ही भिती वाटत आहे.
जगप्रसिद्ध संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी ११ व्या शांतता परिषदेच्या निमित्ताने ‘मेल टू महात्मा’ या शीर्षकाखाली लेख लिहिला होता. यातून प्रेरणा घेऊन विश्वशांती दूत महात्मा गांधींच्या ७८ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, महात्मा गांधीजींना अभिवादन करूण शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी आदरांजली वाहिली.

पहिले राज्यस्तरीय ‘काव्यविश्व साहित्य संमेलन’ ९ फेब्रुवारी रोजीअध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका सौ. चंद्रलेखा बेलसरे व स्वागताध्यक्ष समाजसेवक सुरेश कोते

पुणे, दि.३१ जानेवारी: राज्यात प्रथमच कविता विषयाला वाहिलेले पहिले ‘ राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलनाचे’ आयोजन करण्यात येत आहे. हे संमेलन काव्यमित्र संस्था आणि अपेक्षा मासिक परिवार, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ९ फेब्रुवारी रोजी स. ९ ते संध्या. ६ वाजेपर्यंत सदाशिव पेठ येथील उद्यानप्रसाद कार्यालयात होणार आहे. अशी माहिती काव्यमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर आणि अपेक्षा मासिक परिवारचे संस्थापक संपादक दत्तात्रय उभे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या संमेलनाचे उद्घाटन सकाळी ९.३० वा. होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक सुरेश कोते व अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका व उद्योजिका सौ. चंद्रलेखा बेलसरे आहेत. उद्घाटक म्हणून पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिटयुट्सचे संस्थापक/चेअरमन श्री.राजेंद्र बांदल असतील.
तसेच ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज उर्फ बाबुजी, समाजसेवक व कृषीअधिकारी सुरेश लुणावत, मनपा शिक्षण मंडळाच्या निवृत्त केंद्र प्रमुख श्रीमती उज्वला बडदरे, ज्येष्ठ संपादक दिनकर शिलेदार आणि सेवाभावी उद्योजक,सुशिल बियाणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
काव्यमित्र संस्था आणि अपेक्षा मासिक परिवार, पुणे यांच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचे औचित्य साधून हे संमेलन होत आहे. यामध्ये चार सत्रात दोन कविसंमेलने, यामध्ये हास्य कवी संमेलन, कविता किंवा काव्य विश्वावर आधारित परिसंवाद, जीवन गौरव पुरस्कार, साहित्यगौरव पुरस्कार, विशेष कृतज्ञता सन्मान, अपेक्षा मासिक आणि काव्यमित्र संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीविषयी एका स्मरणिकेचे प्रकाशन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे काव्य क्षेत्राच्या प्राचीन ,ऐतिहासिक व वैभवशाली परंपरेचा मागोवा, सद्यःस्थितीतील काव्य विश्वाची वाटचाल, मराठी साहित्य विश्वातील दिग्गज कवींचे महान योगदान अशा
अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होईल. यानिमित्ताने कवींना विशेषत:
नवोदित कवींना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे व काव्यविश्वाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.
दुपारी ११ ते १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या ‘ कवी संमेलनाचे’ अध्यक्षपद ज्येष्ठ कवी व गझलकार डॉ.डी.बी. इंगळे भूषवितील. यामध्ये जवळपास २४ निमंत्रित कवी व कवयित्रींचा सहभाग असणार आहे.
दुपारी २ ते ३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘काव्यविश्व आणि मराठी कवितेची वाटचाल’ या परिसंवादाचे अध्यक्षपद साहित्यिका व नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजा डॉ. शीतल मालुसरे भूषविणार आहेत. या सत्रात सुप्रसिद्ध साहित्यिक, व्याख्याते व समीक्षक प्रा. विजय लोंढे आणि ज्येष्ठ समाजसेविका व साहित्यिका प्रा. अनघा ठोंबरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. युवा कवयित्री व निवेदिका कु. साक्षी सगर या सूत्रसंवादक असतील.
दुपारी ३ ते ४.३० वा. जीवन गौरव व साहित्य गौरव पुरस्कार आणि विशेष कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात येतील. अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. सुरेश वाकचौरे असतील. माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. प्रकाश तुरबतमठ, श्री क्षेत्र म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.मधुरा भेलके आणि प्रसिद्ध सर्जन डॉ. संजय शिवदे उपस्थित राहणार आहेत.
संध्याकाळी ४.३० ते ५.३० वा. हास्य कविसंमेलन होईल. ज्येष्ठ कवी बाळकृष्ण बाचल हे अध्यक्ष असतील. प्रमुख पाहुणे म्हणून एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू व प्रमथेश जंगम असतील. यावेळी गणेश पुंडे, श्रीराम घडे, देवेंद्र गावंडे, आय. के. शेख, शामराव सरकाळे, जयवंत पवार आणि विभिषण पोटरे हे हास्य कविता सादर करतील.
संमेलनाचा समारोप सायं. ५.३० वा. होणार आहे.

मला राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला टाळे ठोकणे. मी राज्यपाल होऊन काय करू? छगन भुजबळ यांचा सवाल

मुंबई-मला राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला टाळे ठोकणे. मी राज्यपाल होऊन काय करू? त्यापेक्षा मी मोकळाच बरा, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्यापुढे राज्यसभेच्या सदस्यत्वासह राज्यपालपदी संधी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

छगन भुजबळ सध्या राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचेही संकेत दिलेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी महायुतीकडून जोरकसपणे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी महायुतीने त्यांच्यापुढे राज्यसभेचे सदस्यत्व किंवा राज्यपालपद स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपरोक्त विधान केले आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, मला राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला टाळे ठोकणे. मी राज्यपाल होऊन काय करू? माझे काम गोरगरिबांच्या अडअडचणी सोडवण्याचे आहे. त्यांच्यासाठी भांडण करण्याचे आहे. राज्यपाल होऊन मी त्या समस्या किंवा अडीअडचणी सोडवू शकणार आहे का? माझी राज्यपालपदाचा अपमान करण्याची इच्छा नाही. पण मी असा मोकळाच ठीक आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी पक्षश्रेष्ठींकडून मला नाशिक येथून तयार करण्यास सांगण्यात आले होते. पण महिना लोटला तरी माझ्या नावाची घोषणा झाली नाही. त्यामुळे मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर राज्यसभा आली. तेव्हा मी राज्यसभेवर जाण्याचा आग्रह धरला. पण पक्षाने सुनेत्रा पवार यांना संधी दिली. त्यानंतर दुसरी राज्यसभा आली. तेव्हा नितीन पाटील यांना करायचे ठरले. खरे सांगायचे तर मी त्या व्यक्तीला ओळखतही नाही.

छगन भुजबळ यांनी यावेळी मनोज जरांगे यांच्या फॅक्टरमुळे आपली लीड कमी झाल्याचेही मान्य केले. विधानसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न आला. पण जरांगे कुठेच आले नाहीत. ते येवल्यात आले आणि लीड कमी झाले. मी 60 हजारांनी निवडून आलो. त्यानंतर मला पक्षश्रेष्ठींनी विधानसभेचा राजीनामा देण्याची सूचना केली गेली. पण मी माझ्या लोकांना वाऱ्यावर कसे सोडणार? मला वाटले माझे नाव मंत्रिपदासाठी येईल. कारण, मी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत आहे. अजित पवारांना पहिला पाठिंबा देणाराही मीच होतो. अजित पवारांचे नेतृत्व चांगले आहे. पण मानसन्मानाला धक्का लागला तर ते अजिबात योग्य नाही, असे भुजबळ म्हणाले.

दुसरीकडे, एकेठिकाणी बोलताना छगन भुजबळ यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी नव्हे तर हाल – हाल करून मारण्याची मागणी केली. संतोष देशमुख यांना अत्यंत अमानुषपणे मारण्यात आले. राक्षसही अशी कृती करणार नाही. परभणीच्या प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना ठार मारले. ते मराठा होते की दलित होते हा प्रश्न नाही. ते दोघेही माणसे होती. त्यांना कशा पद्धतीने तुम्ही मारले. सर्वच घटकांनी त्याचा निषेध केला पाहिजे व लढायला पाहिजे. या प्रकणी एखादा या समाजाचा आहे म्हणून हे करा व तो दुसऱ्या समाजाचा आहे म्हणून विरोध करा हे मला काही पटत नाही. दुसऱ्या समाजावर हल्ला करणे हे काही बरोबर नाही. दुसऱ्या समाजावर ठपका ठेवणेही बरोबर नाही. तुमच्या दुःखामध्ये व रागामध्ये मी सुद्धा सहभागी आहे. त्यांना फासावर नाही असे हाल हाल करून मारा, असे ते म्हणालेत.

फक्त धनंजय मुंडेच नाही तर मंत्रिमंडळात ६५ टक्के मंत्र्यांवर गुन्हे; कलंकीत मंत्र्यांची हकालपट्टी करा:- नाना पटोले.

शेतकऱ्यांना वीज बिल माफ केल्याची घोषणा भाजपा युती सरकारने केली असतानाही वीज बिल का पाठवता?

कुंभमेळ्यातील भाविकांच्या मृत्यूंना जबाबदार कोण? मोहन भागवत मोदी-योगींचा राजीनामा का मागत नाहीत?

मुंबई/ नागपूर, दि. ३१ जानेवारी २०२५
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दररोज गंभीर स्वरुपाचे आरोप होत आहेत पण राज्याच्या मंत्रिमंडळात फक्त धनंजय मुंडे किंवा संजय राठोडच नाही तर तब्बल ६५ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत, भारतीय जनता पक्ष स्वःताला पार्टी विथ डिफरन्स मानते तर त्यांनी या सर्व दागी, गुन्हे दाखल असलेल्या कलंकीत मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणीत सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला, या दोन्ही प्रकरणातील गुन्हेगारांना अशी शिक्षा झाली पाहिजे की राज्यात पुन्हा अशा घटना होणार नाहीत. पण सरकार यावर ठाम भूमिका घेताना दिसत नाही. महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार गुन्हेगारांचे सरकार आहे, अनेक मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मपरिक्षण करावे व राज्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा असे नाना पटोले म्हणाले.

राज्यात भाजपा युतीचे सरकार तुपाशी आणि जनता मात्र उपाशी अशी परिस्थिती आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल आहे, सोयाबिन, धान, कांदा, कापूस कोणत्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे, दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केल्याची घोषणा भाजपा युती सरकारने केली पण शेतकऱ्यांना वीज बिले पाठवली जात आहेत. वीजेचे दर वाढवले आहेत, एसटीचे तिकिटदर वाढवले आहेत. महाराष्ट्रातून २४ लाख विद्यार्थ्यांनी नोकऱ्यांसाठी अर्ज केले आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, महागाई वाढत आहे पण सरकार मात्र त्याकडे लक्ष देत नाही. काँग्रेस पक्ष जनतेला भेडसावणारे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारेल, असे नाना पटोले म्हणाले.

कुंभमेळ्यातील भाविकांच्या मृत्यूंना जबाबदार कोण ?

प्रयागराज येथे महाकुंभ मेळा भरला आहे, हा लोकांच्या श्रद्धेचा, भावनेचा व आस्थेचा विषय आहे पण भाजपा सरकारने महाकुंभ मेळ्याचाही इव्हेंट केला आहे. व्हिआयपी कल्चर आणून मोदी-योगी यांचे मोठे बॅनर्स लावले आहेत. या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना होऊन अनेक भाविकांचा मृत्यू झाला पण भाजपा सरकार कोरोना सारखाच आताही मृतांचा आकडा लपवत आहे, माहिती बाहेर येऊ दिली जात नाही. शंकराचार्यांनी मुख्यमंत्री योगी यांचा राजीनामा मागितला आहे. एवढी मोठी दुर्घटना घडली पण आरएसएस व सरसंघचालक यावर का बोलत नाहीत, सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी-योगी यांचा राजीनामा का मागितला नाही, असा सवालही नाना पटोले यांनी विचारला आहे.

महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृतीसाठी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि एमक्युअरच्या नमिता थापर एकत्र

या व्हिडिओच्या अंताला धोनी यांनी सर्वांना उद्देशून महत्त्वपूर्ण संदेश दिला. ते म्हणाले, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. विश्रांती घ्या, स्वतःला वेळ द्या आणि तुमच्या निरोगी आरोग्यावर गुंतवणूक करा, याचा चांगला फायदा दिसून येईल.

मुंबई, ३१ जानेवारी २०२५ – महिलांच्या आरोग्याला प्राधान्य द्या, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे हा महत्त्वपूर्ण संदेश प्रसिद्ध क्रिकेटपटू एम.एस.धोनी आणि एमक्युअर फार्माच्या कायमस्वरुपी संचालिका नमिता थापर यांनी एकत्रितरित्या दिला.

नुकताच ‘अनकण्डिशनल युअरसेल्फ विथ नमिता’ या नमिता थापर यांच्या पोडकास्ट चॅनलवर महिलांच्या आरोग्याबाबत माहिती देणारा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला होता. महिला घराच्या आधारस्तंभ असतात. बरेचदा त्यांच्या आरोग्याबाबत हेळसांड होते किंवा त्यांच्या आरोग्याबाबत प्राधान्य दिले जात नाही, हा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून थापर यांनी मांडला. महिलांच्या आरोग्याबाबत मोकळेपणाने संवाद व्हावा, विचित्र प्रवृत्तींपासून स्वतःला दूर रहावे, आपल्या आरोग्यबाबत त्या जागरुक राहतील याकरिता प्रोत्साहन देणे आदी मुद्दे दोघांच्या संवादातून व्हिडिओत मांडले गेले.

एमक्युअरच्या अर्थ मोहिमेचा भाग असलेल्या या चर्चेत महिलांना त्यांच्या सामाजिक दृष्टीकोनाबद्दल ज्ञात करण्यात आले, आरोग्याचे महत्त्व समजावण्यात आले. महिलांना निरोगी आरोग्य मिळावे याकरिता आवश्यक शारिरीक कमतरता भरुन निघण्याकरिता अर्थ बाय एमक्युअर हे सप्लिमेंट उपलब्ध आहे. हा पूरक आहार महिलांना सुदृढ आयुष्य ध्यानात ठेवून बनवण्यात आले आहे हे आवर्जून सांगण्यात आले.

या संवादात नमिता थापर यांनी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. गप्पा रंगात आल्यावर नमिता थापर यांनी अचानक धोनी यांना त्यांच्या आणि पत्नी साक्षीच्या शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी विचारुन गुगली टाकली. आपल्याला काहीच माहिती नसल्याचे धोनी यांनी चर्चेदरम्यान मान्य केले. महिला कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत मात्र अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते हा मुद्दा दोघांनीही मान्य केला.

बरेचदा आपल्या आरोग्याबद्दल महिलांनी बोलायला सुरुवात केली की घरातल्या इतर सदस्यांकडून कानाडोळा होतो. महिलांच्या आजारपणाबद्दल गृहित धरले जाते. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांनी या मुद्द्यावर आक्षेप नोंदवला. ही फारशी गंभीर बाब नाही असे सांगत घरातील महिलांना टाळण्याऐवजी तातडीने लक्ष द्या, आवश्यक काळजी घ्या. तुम्हांला घरातील महिलांच्या आरोग्याविषयी माहिती असायलाच हवी, त्यांच्या आरोग्याच्या तक्रारीवर लक्ष द्या, कानाडोळा करु नका, असे आवाहन धोनी यांनी केले. महिलांच्या समस्यांबाबत उपहासात्मक टीका किंवा उदासीनता नको, आपल्या संस्कृतीत स्त्री-पुरुषांना समान वागणूक मिळायला हवी, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली. महिलांना आरोग्याबाबत खुलेआमपणे बोलायला येण्यसाठी आपण त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे जेणेकरुन त्या आपल्या आरोग्याची नियमित तपासणी आणि उपचार घेतील, असेही ते म्हणाले.

महिलांच्या आरोग्याबाबत आग्रही भूमिका घेणा-या नमिता थापर यांनी क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी यांच्या वक्तव्यावर दुजोरा दिला. कदाचित ती महिला मासिकपाळीपूर्वी होणा-या स्वभाव बदलांचा सामना करत असावी किंवा शरीरात हार्मोन्स बदल घडत असावे, या समजुतीने अनेकदा महिलांना बोलण्यापासून प्रवृत्त केले जाते. महिलांच्या आरोग्यासंबंधी तिला पाठिंबा, सहानुभूती द्या. कोणत्याही महिलेचे आरोग्य तिच्या खासगी तसेच व्यावसायिक जीवनात अडथळा ठरत नाही, असेही थापर यांनी आवर्जून सांगितले.

मेट्रो व महापारेषणच्या अत्यावश्यक विद्युत कामांमुळे शिवाजीनगर, डेक्कन भागात शनिवारी वीजपुरवठा बंद राहणार

पुणे, दि. ३१ जानेवारी २०२५ : शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रो व महापारेषणच्या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी महापारेषणच्या तीन अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी महावितरणच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि.१ फेब्रुवारी) सकाळी ८ ते दुपारी उशिरापर्यंत प्रामुख्याने शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

याबाबत माहिती अशी की, शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. या मार्गावरील महापारेषणच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी २२०/१३२ केव्ही गणेशखिंड व चिंचवड अतिउच्चदाब उपकेंद्र आणि कोथरूडमधील जीकेआरएस उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे महावितरणकडून गणेशखिंड, मॉडेल कॉलनी, दीप बंगला परिसर, वडारवाडी, गोखलेनगर, जनता वसाहत, एमआयजी कॉलनी, वैदूवाडी, जनवाडी, वेताळबाबा चौक, मंगलवाडी, सेनापती बापट मार्ग, रमणबाग चौक, न्यू मराठी स्कूल, नारायणपेठ, शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रोड, रोकडोबा मंदिर परिसर, लक्ष्मी रोड, कुमठेकर चौक, पोलीस लाईन वसाहत, घोले रोड, मॉडर्न कॉलेज, विजय टॉकीज, रेवेन्यू कॉलनी, सिमला ऑफीस, आकाशवाणी, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, मेट्रो स्टेशन, संचेती हॉस्पिटल, ठुबे पार्क, औंध गाव, सिद्धार्थ नगर, परिहार चौक, ब्रेमेन चौक, संघवी रोड, ओम सुपर मार्केट, थोरात चौक, वाकडेवाडी, साखर संकुल रोड, चाफेकरनगर, आकाशवाणी कॉलनी, राहुल थिएटर, खैरेवाडी, दळवी हॉस्पिटल, अशोकनगर, रेंज हिल्स रोड, काकडे मॉल, एबीआयएल, मोदीबाग, चव्हाणनगर तसेच आपटे रोड, रुपाली गल्ली, शिरोळे रोड, घोले रोड, पुलाची वाडी, संभाजी गार्डन, एफसी रोड, वैशाली हॉटेल, सुतारदरा, शिवतिर्थनगर, साम्राज्यनगर, शिक्षकनगर, जयभवानीनगर, किष्किंधानगर आदी परिसरातील वीजपुरवठा शनिवारी (दि. १ फेब्रुवारी) सकाळी ८ ते दुपारी उशिरापर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मेट्रो, महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे. महावितरणकडून वीज बंदच्या कालावधीबाबत संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. 

देशभरातील कलाकारांच्या कलाकृतींचे ‘सप्तरंगी कला प्रदर्शन’ सुरू

पुणे : देशभरातील 40 हून अधिक कलाकारांच्या कलाकृती असलेल्या ‘सप्तरंगी’ कला प्रदर्शनाला आज  (शुक्रवार) पासून सुरुवात झाली आहे.  कला, भारतीय संस्कृती आणि पर्यावरणाला समर्पित हिसारच्या टैलेंटिला फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आर्ट गॅलरी येथे या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हे प्रदर्शन 2 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. 

सप्तरंगी कला प्रदर्शनाचे उद्घाटन सहभागी महिला कलाकारांच्या हस्ते करण्यात आले.  या कला प्रदर्शनात देश-विदेशातील प्रसिद्ध कलाकार हरिप्रिया नरसिंहान, सोनल सक्सेना, मोनिता ढींगरा, केदारनाथ भागवत, राखी कुमारी, दत्तात्रय खेळकर, सुधीर करणडे, अर्चना श्रीवास्तव, रचना सिंह, हेरिबेर्टो नोपनी, नरेंद्र गंगाखेडकर, सतीश पोटदार, धात्री थानकी, कारमेला न्यूनेज, संजय उमरानीकर, निहारिका श्रीवास्तव, जयश्री पाटील, क्रेजेंटा कदम, आर्या कुलकर्णी, माधुरी गयावाल, विनय जोशी, हीरालाल गोहिली, प्रीती राऊत, विभावरी देसाई, इशिता रामाप्रसाद, अंजन रॉय, सोलेदाद बुरगालेता,  भाग्यश्री गोडबोले, डॉ बाय एस कुलकर्णी, दत्तात्रेय खेडकर आदींसह 40 कलाकारांच्या चित्रांचा समावेश आहे. 

टैलेंटिला फाउंडेशनच्या संस्थापक आणि संचालक अनुराधा खरे आणि विनीत खरे यांनी सांगितले की, आमच्या संस्थेचे पुण्यातील हे दुसरे कला प्रदर्शन आहे. या कला प्रदर्शनात  विविध प्रकारच्या कलांचे प्रदर्शन करण्यात आले आहे, तसेच देशातील प्रसिद्ध कलाकार संजय उमरानीकर, मोनिता ढींगरा, विभावरी देसाई, केदारनाथ भागवत लाईव्ह आर्ट डेमो देणार आहेत. सहभागी सर्व कलाकारांचा सन्मान समारोप प्रसंगी केला जाणार आहे. ‘सप्तरंगी’ हे प्रदर्शन 2 फेब्रुवारी पर्यंत  दुपारी 12 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार असून  मोफत प्रवेश आहे.

मराठी बोलींच्या सर्वेक्षणातून मराठीचा पहिला भाषिक नकाशा तयार

विश्व मराठी संमेलनाच्या व्यासपीठावर सादरीकरण

पुणे : महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बोलण्यात येणाऱ्या भाषेचा आणि तिच्या वैशिष्ट्यांचा डिजिटल संग्रह तयार करण्याच्या उद्देशाने पुण्यातील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ आणि राज्य मराठी विकास संस्थेने मराठी बोलींचे सर्वेक्षण केले असून, त्यातून पहिला मराठी भाषिक नकाशा तयार केला आहे. विश्व मराठी संमेलनाच्या व्यासपीठावर प्रकल्प प्रमुख डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी यांनी या सर्वेक्षणाची वैशिष्ट्ये आणि मराठी भाषिक नकाशाचे सादरीकरण केले.

‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, त्याच वर्षी होणाऱ्या विश्व मराठी संमेलनात मराठी बोलींचे सर्वेक्षण आणि पहिला मराठी भाषिक नकाशा सादर करण्याची संधी ही आनंदाची बाब आहे,’ असे नमूद करत डॉ. सोनल कुलकर्णी यांनी सर्वेक्षणाची माहिती दिली. ‘डेक्कन कॉलेजचा भाषाशास्त्र विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेने २०१७ ते २०२३ या कालावधीत राज्यातील ३४ जिल्ह्यातील २७७ गावांमध्ये सर्व वयोगट-स्तरांतील नागरिकांच्या मुलाखती घेऊन ‘बोलींचे सर्वेक्षण – प्रतिमांकन व आलेखन’ हा प्रकल्प पूर्ण केला. त्यातून मराठीचा पहिला भाषिक नकाशा तयार झाला आहे,’ असे त्यांनी सांगितले.

मराठी भाषेतील भौगोलिक भेदांचा भाषावैज्ञानिक अभ्यासासाठी उपयुक्त असा डिजिटल डेटाबेस तयार करणे आणि बोलीभेद निश्चित करण्यासाठी निवडक शब्द-व्याकरणाच्या अनुषंगाने विश्लेषण करण्याच्या दृषअटीने हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. शब्द, ध्वनि, व्याकरण आणि प्रादेशिक स्तरावर भेद दर्शविणारे हे विश्लेषण व नकाशे www.sdml.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे,’ असेही डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी यांनी सांगितले.

अभिजात दर्जानंतर मराठीसाठी सर्वांनी काम करणे महत्त्वाचे

पुणे-

मराठीला अभिजात दर्जा पूर्वसंचितामुळे मिळाला आहे. मात्र आता पुढील वाटचाल सर्वांना मिळून करावी लागणार आहे. शिक्षण, तंत्रज्ञानाची कास धरून मराठी भाषेचे भविष्य घडणार असल्याचा सूर ज्येष्ठ साहित्यिकांनी व्यक्त केला.

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित विश्व मराठी संमेलनात ‘माझी मराठी अभिजात झाली’ या विषयावर चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे डॉ. सदानंद मोरे, ज्ञानेश्वर मुळे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सहभाग घेतला. भूषण करंदीकर यांनी संवाद साधला.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता हीदेखील एक भाषाच आहे. मोठ्या कंपन्या एआयसाठी प्रचंड गुंतवणूक करतात. तशी गुंतवणूक झाल्यास मराठीसाठीही काम करता येईल. लोकांच्या मनात प्रमाणभाषेविषयी अढी आहे. ही अढी दूर होत नाही तोपर्यंत मराठीचा विकास होणार नाही. अभिजात भाषेमध्ये भर टाकली पाहिजे. त्यासाठी जागतिक पातळीवर मान्य झालेले इतर भाषांतील शब्द मराठीत स्वीकारणे हा उपाय आहे.

ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, अमेरिका, इस्रायल, इंग्लंड, मॉरिशस या चार देशांमध्ये मराठीची मुद्रा अधिक चांगली आहे. परदेशातील मराठीजन मराठी भाषेविषयी सजग आहेत. परराज्यांतील मराठी लोक तहानलेले आहेत. आता महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र आणि परदेशातील महाराष्ट्राकडे गांभीर्यामे पाहिले पाहिजे. मराठी साहित्याच्या अनुवादासाठी परदेशातील मराठीजन मदत करू शकतात. त्यासाठी सरकारने अनुदान दिले पाहिजे.

डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले, साहित्य भाषेचे वहन करण्याचे माध्यम आहे. मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत. बोलीभाषा, ग्रामीण भाषेतील साहित्य श्रेष्ठ असते. मराठी साहित्याचा अनुवाद इतर भारतीय भाषा, परदेशी भाषांमध्ये होत नाही या बाबतीत मराठी मागे आहे. कसदार साहित्याचा परिघ पुण्यामुंबईकडून उर्वरित महाराष्ट्रात जात आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. शाळा-महाविद्यालयात मराठीच्या शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे मराठीचे अध्यापन खंडित होते. मराठी टिकून राहण्यासाठी सरकारी स्तरावरूनही विचार होण्याची गरज आहे.

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, मराठी ही रोजगाराची भाषा होण्यासाठी ती ज्ञानाची भाषा व्हावी लागेल. आधुनिक ज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान मराठीत आले पाहिजे. मराठीतून उच्च शिक्षण घेण्याचा विचार अनेकांना सहन होत नाही. आता अभियांत्रिकीचे शिक्षण मराठीत मिळू लागले आहे. येत्या काळात अन्य अभ्यासक्रम मराठीत निर्माण होतील. नवे तंत्रज्ञान भाषेसाठी वापरले पाहिजे. तर भाषा तरुणांची होईल. साहित्यिक, तंत्रकुशल लोकांनी भाषेसाठी योगदान दिले पाहिजे. सर्व शाळांमध्ये सक्तीने शिकवण्याच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी होते का, याची तपासणी झाली पाहिजे. तसेच मराठी शाळांमध्ये उत्तम पद्धतीने इंग्रजी शिकवले पाहिजे.

मधु मंगेश कर्णिक म्हणाले, मराठीच्या अडीच हजार वर्षांच्या संचितावर मराठी अभिजात झाली. पण आजच्या व्यवहारातील मराठी अभिजात आहे का, उद्याची मराठी कशी असेल याची भीती वाटते. मराठीविषयी आस्था आहे म्हणून मंत्री भाषेच्या उद्धाराविषयी बोलतात. मराठीच्या विकासाचा समग्रपणे करण्याचा विचार सरकारने केला पाहिजे. सरकार मोठमोठे रस्ते, पूल बांधते. पण मराठी भाषेकडे उरलासुरला निधी देऊ नये. मराठीच्या सरकारी संस्थांना भरभक्कम निधी दिला पाहिजे. सरकारनेही आमच्याबरोबर काम केले पाहिजे. भाषा प्राधिकरण स्थापन केले पाहिजे.

मराठीला ज्ञान भाषेत परावर्तीत करण्याचा प्रयत्न:वादातून मंथन होते, त्याची चिंता नको-देवेंद्र फडणवीस

पुणे‘सध्या आर्टीफिशियलचा जमाना आहे. त्याचा सगळीकडे बोलबाला पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञान घोड्यासारखे असते. त्याला घाबरून चालणार नाही आणि नाकारून सुद्धा चालणार नाही. तंत्रज्ञानावर ठाण मांडून बसायचे आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग प्रसार आणि प्रचारासाठी करून, मराठीला ज्ञान भाषेत परावर्तीत करण्याचा प्रयत्न करतोय,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दरम्यान, पुढच्या पाच वर्षांत एक विश्व मराठी संमेलन परदेशात घेऊन मराठीचा डंक्का वाजविण्यात येईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बापू पठारे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, राजेश पांडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, रंगनाथ पठारे, डॉ. राजा दीक्षित आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

फडणवीस म्हणाले, “आज आपण एआयच्या युगात आहोत. वेबसाइटवर साहित्यिकांचे साहित्य उपलब्ध करून देण्याऐवजी स्मॉल लॅग्वेज मॉडेल तयार करावे. त्यात सर्व साहित्यिकांचे साहित्य टाकले पाहिजे. चॅट जीपीटीला प्रश्न विचारतो, तसा एक प्रश्न या मॉडेला विचारल्यास संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर मिळू शकेल. मराठी भाषा विभागाने हा प्रयोग करावा. एआयचा उपयोग करुन स्मॉल लॅग्वेज मॉडेल तयार करून, त्या माध्यमातून पुढच्या पिढी करता अभिजात साहित्य कसे पुढे घेऊन जाता येईल, याचा विचार करावा लागेल.”

अजित पवार म्हणाले, “मराठी भाषेवर, मराठी साहित्यावर आणि मराठी संस्कृतीवर प्रेम करणारी, महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल स्वाभिमान बाळगणारी माणसे जगाच्या कानाकोपऱ्यातून या संमेलनासाठी आली. परदेशातूनही मराठी प्रेमी येथे आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने मराठी भाषेसाठी योगदान देत असतो.” तसेच, दिल्लीतील मराठी शाळेला महाराष्ट्र सरकारकडून मदत केली जाईल, असे पवार यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, “मराठी भाषेला अडीच वर्षांपूर्वी अभिजात दर्जा मिळाला, हा राज्यातील जनतेच्या अस्मितेचा विषय आहे. आपल्या भाषेत उत्तम साहित्य निर्माण होते, हे आपण दाखवून दिले आहे. आम्ही राजकीय कार्यकर्ते, तसेच भाषेचेही कार्यकर्ते आहोत. आम्ही मराठी भाषेसाठी जे जे काही करता येईल, ते आम्ही सरकारच्या माध्यमातून करू.” मनीषा म्हैसकर यांनी प्रास्ताविक केले.

‘विश्व संमेलनाला मी पुन्हा येईन…’

‘जगच्या पाठीवर एकही असा देश नाही जिथे मराठी माणूस पोहचला नाही. आम्ही दावोसला गेलो, तिथे मराठी माणसे स्वागतासाठी आली होती. यावेळी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गाणे ऐकल्यावर आनंद झाला. मराठी माणूस इतक्या वर्षांपासून बाहेर असला तरीही माय मराठीपासून दुरावलेली नाही. त्यांच्या मनात मराठी असून पुढच्या पिढीपर्यंत भाषा पोहचविण्याचे काम करत आहेत. मी कुठेही गेलो तरी पुन्हा येईन, असे म्हटले जाते. अलिकडच्या काळात याला चांगल्या अर्थाने म्हटले जात आहे. शेवटी एखाद्या शब्द चिकटला, तर काळ आणि वेळेप्रमाणे त्याचे अर्थ बदलत जातात. जेव्हा जेव्हा विश्व संमेलन होईल त्यावेळी तुम्ही सर्वांनी पुन्हा येईल असे म्हणायला हवे,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठी भाषा, माणसाला त्रास दिल्यास कठोर शासन- उदय सामंत

संमेलनाच्या उद्घाटनावेळी उदय सामंत म्हणाले, “सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यात अभिजात दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलन होत आहे. मराठी भाषा विभागाचा कार्यक्रम पुणेकरांनी उचलून धरला आहे. मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार-प्रसार झाला पाहिजे, त्यासाठी मराठी ही शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचली पाहिजे. शोभा यात्रेत सात ते आठ हजार विद्यार्थी सहभागी झाले पाहिजे. युवा पिढीची जबाबदारी आहे, की मराठी टिकविणे आणि आक्रमणाचा आक्रमकतेने प्रतिकार केला पाहिजे. मराठी टिकविणाऱ्यांचा आदर्श हा दीपस्तंभाप्रमाणे ठेवला पाहिजे. पुढील वर्षी मालगुंड गावाला पुस्तकाच्या गावाचा दर्जा दिला जाईल. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. महाराष्ट्रातील अशी गावे शोधली जातील, त्यामध्ये मराठी जतन-संवर्धन करणाऱ्या व्यक्तीचे गाव पुस्तकांचे गाव केले जाईल. महाराष्ट्रात प्रत्येक जाती-धर्माचा माणूस राहतो. प्रत्येक भाषकाचा आदर केला आहे. भाषेचा अनादर केलेला नाही. परंतु काही लोक जाणीवपूर्वक मराठी भाषा, माणसाला त्रास देण्याचे काम करत असतील, तर कठोर कायद्याद्वारे शासन झाले पाहिजे. मराठीचे अस्तित्व, अस्मिता टिकविण्याची कार्यवाही केली पाहिजे.”

प्रत्येक कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती बंधनकारक, अन्यथा ५० हजार दंड – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई दि. ३१ : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध कायद्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालय, आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे आवश्यक आहे. समिती गठीत न केल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल, अशी माहिती मुंबई शहराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

दहा व त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक कार्यालयात समिती गठित करणे आवश्यक आहे. या समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ महिलेची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करावी, तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांमधून सामाजिक कार्याचा अनुभव किंवा कायद्याचे ज्ञान असलेले दोन कर्मचारी सदस्य म्हणून नियुक्त करावेत व महिलांच्या प्रश्नांशी बांधील असलेल्या अशासकीय संघटनेचा एक सदस्य असावा. त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यालयाने अंतर्गत तक्रार समिती गठीत केल्याचा फलक दर्शनी भगात लावणे बंधनकारक आहेत. तसेच या अधिनियमानुसार दर तीन वर्षांनी या समितीची स्थापना किंवा पुनर्रचना करणे आवश्यक आहे. असे या कायद्याच्या अमलबजावणी करून घेणारे जिल्ह्याचे प्रमुख उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) तथा जिल्हा अधिकारी गणेश सांगळे यांनी सांगितले आहे.

या कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठित करणे अनिवार्य

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ संदर्भातील अधिनियमानुसार प्रत्येक शासकीय / निमशासकीय कार्यालय, संघटना, महामंडळे, आस्थापना, संस्था शाखा ज्यांची शासनाने स्थापना केली असेल किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असेल किंवा पूर्ण किंवा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निधी, शासनामार्फत किंवा स्थानिक किंवा शासकिय कंपनी किंवा नगरपरिषद किंवा सरकारी संस्था यांना दिला जातो. अशा सर्व आस्थापना, तसेच कोणतेही खासगी क्षेत्र, संघटना किंवा खाजगी उपक्रम/संस्था, एंटरप्रायजेस, अशासकिय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, प्रवठा, वितरण व विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य इ. सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार, रुग्णालय, शुश्रूषालय, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडा संकुले इ. ठिकाणी किंवा अधिनियमात नमूद केलेल्या कामाच्या शासकीय व खाजगी क्षेत्रातील कार्यालयांच्या ठिकाणी अंतर्गत समिती गठित करणे अनिवार्य असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी म्हटले आहे.

नव्या टर्मिनलवरुन ८ फेब्रुवारीपासून ‘डिजीयात्रा’ सेवा !

पुणे (प्रतिनिधी)

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर येत्या ८ फेब्रुवारीपासून ‘डिजीयात्रा’ ही प्रणाली कार्यान्वित होणार असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या यांच्या उपस्थितीत या सेवेचा प्रारंभ केला जाणार आहे.

डिजीयात्रा ही सेवा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवर कार्यान्वित होती. मात्र नवीन टर्मिनलवर ‘डिजीयात्रा’ची सेवा प्रतिक्षेत होती. या संदर्भातील सर्व परवानग्या आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून ही प्रणाली सेवेसाठी सज्ज होत आहे. देशांतर्गत प्रवाशांसाठी विमानतळ प्रवास सोपा आणि सोयीस्कर करण्यासाठी डिजीयात्रा सुविधा सुरू करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मुरलीधर म्हणाले, ‘पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कायापालट होत असून हे विमानतळ अधिकाधिक अद्ययावत सोईसुविधांयुक्त करण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरु आहे. डिजीयात्रा प्रणाली कार्यान्वित करणे हा त्यापैकीच एक भाग आहे. डिजी यात्रा पूर्णपणे बायोमेट्रिक सेल्फ-बोर्डिंग सिस्टम देते, ज्यामुळे प्रवाशांना प्रवेशद्वारापासून विमानात पोहोचेपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडता येते’

‘देशभरात १ डिसेंबर २०२२ पासून डिजीयात्रा सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रणाली अंतर्गत ८० लाखांहून अधिक उपभोक्ते जोडले गेले आहेत. तसेच ४ कोटींहून अधिक वेळचा प्रवास या सेवेतून झालेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या डिजीयात्राचे वापरकर्ते वाढत आहेत. पुणे विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या डिजीयात्री वापरकर्त्यांची संख्या अधिक असल्याने याचा मोठा फायदा पुणेकरांना विमान प्रवाशांना होणार आहे, असेही केंद्रीय मोहोळ म्हणाले.

ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्टवॉच जिंका!

प्रत्येक उपविभागस्तरावर पाच बक्षिसे;  पुणे विभागात तब्बल २३८५ बक्षिसे

पुणे, दि. ३१ जानेवारी २०२५सलग तीन किंवा किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरु केली आहे. यात प्रत्येक उपविभागस्तरावर ५ बक्षिसे देण्यात येणार असून एकूण तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे प्रादेशिक विभागातील १५९ उपविभागांसाठी एकूण २ हजार ३८५ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

या योजनेमध्ये प्रत्येक उपविभागासाठी प्रथम – एक स्मार्ट फोन, द्वितीय – दोन स्मार्ट फोन आणि तृतीय बक्षिस म्हणून दोन स्मार्ट घड्याळ असे प्रत्येकी पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यासोबतच प्रत्येक बक्षिसासाठी दोन विजेत्याची प्रतीक्षा यादी राहणार आहे. संपर्क करूनही विजेत्यांनी १० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास किंवा थकबाकी व इतर कारणांमुळे अपात्र असल्यास प्रतीक्षा यादीतील ग्राहकांना बक्षिस देण्यात येतील. तसेच ही योजना महावितरणच्या विद्यमान कर्मचाऱ्यांसाठी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पुणे प्रादेशिक विभागात १५९ उपविभाग आहेत. यामध्ये पुणे जिल्हा- ५५, सातारा – २३, सोलापूर- २६, सांगली- २४ आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३१ उपविभाग आहेत. या प्रत्येक उपविभागासाठी ५ बक्षिसे आणि एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांतील लकी ड्रॉ असे मिळून तब्बल २ हजार ३८५ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ग्राहकांना दि. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ पर्यंत सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांत नेटबँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस आदींद्वारे ऑनलाइन वीजबिल भरून योजनेत सहभागी होता येईल. तसेच मागील महिन्याच्या वीजबिलाची १० रुपयांपेक्षा अधिक थकबाकी नसावी. ऑनलाइन व संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार असून योजनेच्या कालावधीत ग्राहक/ ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र राहील.

ज्या लघुदाब वीजग्राहकांनी सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे तसेच दि. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीजबिल किंवा त्याचा ऑनलाइन भरणा केलेला नाही अशा ग्राहकांसाठी ही योजना आहे.

दि. १ जानेवारीपासून सुरु झालेल्या या योजनेत येत्या एप्रिल, मे आणि जून महिन्यात संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्याचा निकाल संबंधित महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात महावितरणच्या वेबसाईटवर जाहीर होईल. तसेच संबंधित विजेत्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बक्षिस जिंकल्याची माहिती देण्यात येईल. किंवा विजेते ग्राहक देखील तीन दिवसांच्या आत जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. लकी डिजिटल ग्राहक योजनेबाबत महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट अधिक माहिती उपलब्ध आहे.