Home Blog Page 464

तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी समुपदेशनाची सेवा उपलब्ध

पुणे, दि. १० : आगामी इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास त्यांना मार्गदर्शन करणे व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे विभागीय मंडळाच्या कक्षेतील पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे विभागीय सचिव औदुंबर उकिरडे यांनी कळविली आहे.

विद्यार्थी व पालकांना परीक्षेसंदर्भात काही समस्या असल्यास खाली दिलेल्या भ्रमणध्वनीवर सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत समुपदेशकांशी संपर्क साधता येईल. समुपदेशकांची नाव व भ्रमणध्वनी क्रमांक असे : पुणे- स्नेहा सडविलकर (९०११३०२९९७), पूनम पाटील (८२६३८७६८९६), संध्या फळसणकर (८७६७७५३०६९), बारामती- गायत्री वाणी (७३८७४००९७०), सोलापूर- वृषाली आठवले (९८३४०८४५९३), मीनाक्षी हिरेमठ (८३२९२३००२२), संगीता सपकाळ (९५५२९८२११५).

परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत इयत्ता १० वी साठी भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३०४२६२७ व इयत्ता ११ वी साठी ७०३८७५२९७२ हे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध असल्याचेही श्री. उकिरडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

छुपके छुपके प्यार कितने दिन चलेगा:एकदा काय ते शुभमंगल करून टाका, राज ठाकरे-फडणवीस भेटीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

मुंबई-छुपके छुपके प्यार कितने दिन चलेगा:एकदा पोहे खा, पाहून घ्या असे एकदा झाले, दोनदा झाले. एकदा काय ते शुभमंगल करून टाका, असा सल्ला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि मनसेला दिला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाल्यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना दिला आहे. फडणवीस सकाळी अचानक राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले. यावेळी दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. मात्र, विरोधकांकडून या भेटीवर टीका केली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी तिथे नाष्टाही केला. या दोघांच्या भेटीचे राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहेत. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट झाल्यामुळे तिला मोठे महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

एकदा पोहे खा, पाहून घ्या असे एकदा झाले, दोनदा झाले. एकदा काय ते शुभमंगल करून टाका, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिला. चर्चांवर चर्चा होण्यापेक्षा देऊन घेऊन मोकळे होणे परवडले, असा आमचा त्यांना सल्ला असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. छुपके छुपके प्यार कितने दिन चलेगा? जरा खुलके आओ, लोगों को भी पता चलेगा, तुम्हारे प्यार में कितना दम है, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला. महानगर पालिकेचे लग्न सुखरूप पार पाडण्यासाठी या बालकाचा उपयोग होईल तेवढा करावा, अशी इच्छा असावी, अशी टीका भाजपवर केली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करत सत्ताधारी महायुतीचा समाचार घेतला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस हे राज यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या भेटीत फडणवीस यांनी राज ठाकरेंसोबत राजकीय घडामोडींबद्दल चर्चा करत काही प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. यामध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या राजकीय पुनर्वसनाचाही समावेश असल्याचे समजते.

‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा !!

कोल्हापुरच्या शुभम शिदनाळे व अपेक्षा पाटील; हवेलीच्या सुरज चोरघे यांनी पटकावले विजेतेपद !!

पुणे, १० फेब्रुवारीः हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत खुल्या गटामध्ये कोल्हापुरच्या शुभम शिदनाळे याने तर, कुमार गटामध्ये हवेली सुरज चोरघे तसेच महिला गटामध्ये कोल्हापुरच्या अपेक्षा पाटील यांनी विजेतेपद संपादन करून मानाची चांदीची गदा पटकावली.

टिळक रोड येथील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर तयार करण्यात आलेल्या स्व. धनंजय रामचंद्र घाडे क्रीडानगरीमध्ये झालेल्या स्पर्धेच्या खुल्या गटाच्या अंतिम फेरीमध्ये शुभम याने उपांत्य फेरीमध्ये गतवेळचा महाराष्ट्र केसरी याचा सिकंदर शेख याचा ६-२ अशा गुणफरकाने पराभव करून मुळशीच्या तानाजी झुंझुरगे समोर आपले आव्हान निर्माण केले होते. अंतिम सामना हा निकाली कुस्ती घेण्यात येणार असल्याने दोन्ही कुस्तीपटूंनी सुमारे तासभर (५२ मिनिटे) जोरदार खेळ करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर सहा मिनिटांची गुणांची लढत खेळण्याचा निर्णय पंचांनी घेतला. तासभर दमल्यानंतर लढल्या गेलेल्या कुस्तीमध्ये शुभमने आपल्या आडदांड शरीरयष्टीच्या जोरावर तानाजीचा १०-१ अशा गुणफरकाने सहज पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

१७ वर्षाखालील कुमार खुला गटामध्ये हवेलीच्या सुरज चोरघे याने आपलाच संघसहकारी आणि तालिमीतील दोस्त रोहीत दिघे याचा १३-२ असा सहज पराभव केला. विजयानंतर रोहीत याने वेदांत याला आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन स्टेडियमला विजयी प्रदक्षिणा घातली तेव्हा उपस्थित क्रीडाप्रेमींनी रोहीत आणि वेदांत याच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले. महिलांच्या खुल्या गटामध्ये कोल्हापुरच्या अपेक्षा पाटील हिने पिंपरी-चिंचवडच्या प्रगती गायकवाड हिचा ३-२ असा निसटता पराभव करून विजेतेपदाला गवणसी घातली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य नगरविकास, परिवहन, सामनाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री आ. माधुरी सतीश मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, सिनेअभिनेता अंकुश चौधरी, माणिकचंद ऑक्सिरीचच्या कार्यकारी संचालिका मा.सौ. जानव्ही धारीवाल-बालन, स्पर्धेचे आयोजक पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे शहराचे पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार, कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने, तसेच हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.

खुल्या गटातील विजेता शुभम शिदनाळे याला चांदीची गदा, २ लाख ५१ हजार रूपये, महिंद्रा थार मोटारकार आणि स्मृतीचिन्ह तर, उपविजेत्या तानाजी झुंझुरगे याला १ लाख ५१ हजार रूपये आणि स्मृतीचिन्ह तसेच तृतीय क्रमांकाच्या विजेत्या सोलापुरच्या प्रमोद सुळ याला १ लाख ५१ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. खुल्या गटातील महिला विजेता ठरलेल्या कोल्हापुरच्या अपेक्षा पाटील हिला २ लाख ५१ हजार रूपये, ई-बाईक आणि चांदीची गदा, उपविजेता ठरलेल्या प्रगती गायकवाड आणि तृतीय क्रमांच्या वेदीका सासणे यांनना १ लाख आणि ५१ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. कुमार गटातील विजेत्या सुरज चोरघे याला चांदीची गदा आणि १ लाख रूपयांचे पारितोषिक, तसेच १७ आणि १४ वर्षाखालील गटातील विजेत्यांना सायकल आणि २५ हजार रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकालः अंतिम निकालः (प्रथम, व्दितीय, तृतीय या क्रमानुसार)ः
१७ वर्षाखालील कुमार खुला गटः सुरज चोरघे (हवेली); रोहीत दिघे (हवेली); वेदांत झुंझुरके (मुळशी);

महिला गटः
५३ किलोः ज्ञानेश्वरी पायगुडे (पुणे); सुहानी चोरघे (इंदापूर); दिशा पवार (पुणे जि.);
५७ किलोः अहिल्या शिंदे (इंदापूर); वैष्णवी तोरवे (पुणे जि.); सिद्धी ढमढेरे (पुणे जि.);
६२ किलोः आकांक्षा जाधव (पुणे); अनुष्का भालेकर (पिंपरी-चिंचवड); ऋतुजा गाढवे (पुणे जि.);
६५ किलोः रोशनी बोडखे (इंदापूर); विशाखा चव्हाण (पुण जि.); सावनी सातकर (मावळ);
खुला गटः अपेक्षा पाटील (कोल्हापुर); प्रगती गायकवाड (पिंपरी-चिंचवड); वेदीका सासणे (कोल्हापुर);

वरिष्ठ विभागः
५७ किलोः विशाल शिळीमकर (भोर); मिलींद हरनावळ (इंदापूर); यश बुदगुदे (भोर);
६१ किलोः ओमकार निगडे (भोर); अभिषेक लिमण (वेल्हा); अमोल वालगुडे (वेल्हा);
६५ किलोः भालचंद्र कुंभार (हवेली); संग्राम जगताप (पुरंदर); श्रीकृष्ण राऊत (पुणे शहर);
७० किलोः सुरज कोकाटे (इंदापूर); निखील वाडेकर (खेड); शुभम जाधव (दौंड);
७४ किलोः अनिल कचरे (इंदापूर); करण फुलमाळी (पुणे श.); निखील कदम (पुणे श.);
७९ किलोः मयुर दगडे (इंदापूर); रितेश मुळीक (इंदापूर); आकाश डुबे (दौंड);
८६ किलोः शुभम थोरात (पुणे श.); अविनाश गावडे (इंदापूर); अभिषेक गडदे (पुणे श.);
खुला गट ८६ ते १२५ किलोः शुभम शिदनाळे (कोल्हापुर); तानाजी झुंझुरगे (मुळशी); प्रमोद सुळ (सोलापुर);

निवेदिता पोहनकर यांचे दिग्दर्शनात पदार्पण

प्रार्थना हा आत्म्याचा आवाज असतो. जेव्हा प्रार्थना पूर्णत्वास येते तेव्हा तो विश्वास असतो की ती परिस्थिती असते? हे प्रत्येक जण आपापले ठरवतो. अशाच संकल्पनेवर आधारित ”द प्रेयर’ ही हिंदी शॉर्टफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मॅक वर्ल्ड फिल्म्स प्रस्तुत या शॉर्टफिल्मचे निर्माते मकरंद देशपांडे असून ते प्रथमच शॉर्टफिल्मची निर्मिती करत आहेत. निवेदिता पोहनकर लिखित, दिग्दर्शित या शॉर्टफिल्ममध्ये अदिती पोहनकर, मकरंद देशपांडे, स्मिता जयकर, संदीप धाबाळे, सुशांत जाधव, सोहिनी नियोगी, साहिल खान, श्रुती श्रीवास्तव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १४ मिनिटांची ही शॉर्टफिल्म हिंदी आणि इंग्रजी मध्ये प्रदर्शित होणार आहे.

”द प्रेयर’ ही एका हृदयस्पर्शी प्रसंगावर आधारित कथा आहे. प्रार्थना केल्याने गोष्टी सुरळीत होतात का? की परिस्थिती हे सगळे घडवून आणते? हा विचार करायला लावणारी ही शॉर्टफिल्म असून ‘द प्रेयर’मधील संवेदनशील कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने ही शॉर्टफिल्म नक्कीच प्रेक्षकांना भावेल. अमित रॉय या शॉर्टफिल्मचे डिओपी असून दीपा भाटिया आयुष सपरा यांनी संकलन केले आहे. या सगळ्याला पूरक ठरणारे टबी यांचे भावनिकदृष्ट्या प्रभावी संगीत या शॉर्टफिल्मचा प्रभाव अधिकच गडद करते.

निवेदिता पोहनकर म्हणतात, ‘विश्वास ही एक अशी स्थिती आहे. जी असते किंवा नसते. ‘द प्रेयर’ ही मानवी मनाच्या या दोन अवस्था उलगडण्याचा प्रयत्न करणारी शॉर्टफिल्म आहे. जेव्हा एखादी व्यक्ती संकटात सापडते, तेव्हा मन भांबावून जाते, पळ काढते. परंतु ज्या क्षणी मन शांत होते, त्या क्षणी अंतःकरणाचा स्पष्ट, अढळ आवाज आपल्याला योग्य दिशा दाखवतो आणि उचित कृतीसाठी मार्गदर्शन करतो. प्रार्थनेवर केवळ विश्वास असणे गरजेचे आहे. हेच आम्ही या १४ मिनिटे ४९ सेकंदातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.”

निर्माते मकरंद देशपांडे म्हणतात, ” मी प्रथमच शॉर्टफिल्मची निर्मिती करत आहे आणि पहिल्याच वेळी एक उत्तम आणि सखोल आशय असलेल्या कथेचा भाग होणे, हे नक्कीच सुखावह आहे. टीम अप्रतिम आहे. मी निवेदिता पोहनकरचे विशेष कौतुक करेन, तिने एक संवेदनशील, नाजूक विषय अतिशय प्रगल्भतेने हाताळला आहे. ही शॉर्टफिल्म प्रेक्षकांना एक नवीन अनुभव देईल, याची आम्हाला खात्री आहे.”

अमेरिकन अल्बमच्या सुवर्ण महोत्सवी प्रयोगानिमित्त कलाकार-तंत्रज्ञांचा गौरव सोहळा रविवारी

पुणे : रसिकांच्या पसंतीची पावती मिळालेल्या अमेरिकन अल्बम नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग येत्या रविवारी पुण्यात होत असून या निमित्त लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रसिकमोहिनी आणि फ्रेंड्स फॉर एव्हर थिएटर ग्रुपची निर्मिती असलेल्या या नाटकाला पुण्या-मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
अमेरिकन अल्बम या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग आणि गौरव सोहळा रविवार, दि. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे आणि सुप्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रसिकमोहिनीच्या संचालिका, निर्मात्या, अभिनेत्री भाग्यश्री देसाई, निर्माते किशोर देसाई यांनी आज (दि. 10) पत्रकार परिषदेत दिली. या वेळी लेखक राजन मोहाडीकर, नाटकातील कलावंत आशुतोष नेर्लेकर, मोनिका जोशी, चिन्मय पाटणकर, व्यवस्थापक समीर हंपी, धनंजय गाडगीळ, सुरेंद्र गोखले उपस्थित होते. या नाटकाचे दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, प्रकाश व वेशभूषा पुरुषोत्तम बेर्डे यांची आहे.


रसिकमोहिनीच्या सर्व नाटकांचे प्रयोग पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील होत असतात. अमेरिकन अल्बमच्या निमित्ताने मुंबईतील फ्रेंड्स फॉर एव्हर थिएटर ग्रुप (एफ्‌‍ एफ्‌‍ टी जी) या संस्थेने रसिकमोहिनी बरोबर येण्याची इच्छा व्यक्त केली. यातूनच दोन्ही संस्थाच्या समन्वयातून ‌‘अमेरिकन अल्बम‌’ची निर्मिती झाली. या नाटकाने रसिकांची मनमुराद दाद मिळवत सुवर्णमहोत्सवी प्रयोगापर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे. झी नाट्य गौरव, सांस्कृतिक कलादर्पण, आर्यन अवॉर्ड्स आदी संस्थांची दहा नामांकने या नाटकाला आणि त्यातील कलाकारांना प्राप्त आहेत. त्याचप्रमाणे यंदाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा बालगंधर्व पुरस्कार भाग्यश्री देसाई यांना तर उत्कृष्ट लेखकाचा बालगंधर्व पुरस्कार राजन मोहाडीकर यांना प्राप्त झाला आहे.
अल्प कालावधीत ‌‘अमेरिकन अल्बम‌’ या नाटकाचे पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ येथे प्रयोग झाले असून ग्रामीण भागातील नाट्य प्रयोगासही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शासन अनुदानासही हे नाटक पात्र ठरले आहे. देश-परदेशातील आजच्या कौंटुबिक प्रश्नांवर भाष्य करणारे हे नाटक रसिकांच्या मनाला भिडले आहे.
आजच्या घडीला व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी रसिकमोहिनी ही पुण्यातील एकमेव संस्था असून अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती करीत आली आहे. ‌‘चिरंजीव आईस‌’, ‌’जन्मरहस्य‌’, ‌‘ब्लाइंड गेम‌’ अशी उत्तमोत्तम नाटके व्यावसायिक रंगमंचावर आणली आहेत. तसेच ‌‘होतं असं कधी कधी‌’ हा मराठी चित्रपट, मालिका, लघुपटांची निर्मिती रसिकमोहिनी आणि रसिकमोहिनी आर्टस्‌‍च्या माध्यमातून करण्यात आली आहे.
रविवारी आयोजित करण्यात आलेला सुवर्णमहोत्सवी प्रयोगाच्या तिकिट दरात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.

एमआयटी-एडीटीला ‘खेलो इंडिया’साठी ‘साई’ची मान्यता

रोइंग या क्रीडा प्रकारासाठी निवड होणारे राज्यातील एकमेव विद्यापीठ 
पुणेः 
येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाला रोइंग या क्रीडा प्रकारासाठी प्रतिभावान खेळाडूंचा (मुले व मुली) शोध घेणे व त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) कडून खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र (निवासी) म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. अशाप्रकारे, क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘साई’ची मान्यता मिळणारे एमआयटी एडीटी विद्यापीठ हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.एमआयटी एडीटी विद्यापीठातील क्रीडा संकुल हे जागतिक सोईसुविधांनी सुसज्ज आहे. विद्यापीठातील डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी स्पोर्ट्स अकादमीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांकडून रोइंग, बॉक्सिंग व जलतरण या खेळांसाठी अकादमीची स्थापना करत खेळाडूंना प्रशिक्षणाचे काम केले जाते. त्याच्या परिणामतः रोइंग अकादमीतील खेळाडूंनी आजवर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना पदक जिंकूण विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. गतवर्षी विद्यापीठातील स्कूल ऑफ लाॅ’चे प्रा.आदित्य केंदारींनी आशियाई इनडोअर रोइंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकाविले होते.या कामगिरीनंतर विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड म्हणाले, विद्यापीठाच्या रोइंग अकादमीला आता खेलो इंडियासाठी साईची मान्यता मिळाल्याने या क्रीडा प्रकारात रुची असणाऱ्या पुणे व परिसरातील खेळाडूंना या खेळाच्या प्रशिक्षणासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.या यशानंतर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक प्रा.पद्माकर फड यांनी क्रीडा विभागाचे अभिनंदन केले आहे. 
राज्य सरकारच्या लक्ष्य वेधसाठीही निवड
‘साई’सह महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या लक्ष्य वेध योजनेतही रोइंग क्रीडा प्रतिभा विकास प्रकाराचे प्रशिक्षण केंद्र म्हणून डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी स्पोर्ट्स अकादमीची निवड झाली आहे. तसेच, रोइंग खेळाडू म्हणून भाग्यश्री घुले, अनुष्का गर्जे आणि प्रशिक्षक म्हणून सुहास कांबळे यांना मान्यता मिळाली आहे.

सत्ताधा-यांकडून सुरेश धस सारखी बुजगावणी उभी करून जाणीवपूर्वक लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न.

सोमनाथ सुर्यवंशींची हत्या करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करुन गुन्हे दाखल करा, सरपंच हत्येतील गुन्हेगारांवरही कठोर कारवाई करा: नाना पटोले

परभणीत कोंबिंग ऑपरेशनचे आदेश मंत्रालय व पोलिस महासंचालकांच्या कार्यालयातून कोणी दिले त्याची चौकशी करून कारवाई करा

भाजपा सत्तेत असताना महापुरुषांचा सातत्याने अवमान, महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राहुल सोलापुरकर कारवाई करा.

मुंबई/नवी दिल्ली, दि. १० फेब्रुवारी २५
परभणी व बीड प्रकरणी पोलिसांच्या मदतीने लोकांचे जीव घेतले गेले. परभणीतील आंबेडकरी अनुयायी सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांच्या मारहणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सरकारने अजून त्या पोलिसांवर कठोर कारवाई केलेली नाही. संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीत कोंबिंग ऑपरेशन करून निरपराध लोकांना बेदम मारहाण करण्यात आली. या कोंबिंग ऑपरेशनचे आदेश कोणी दिले? मंत्रालय व पोलीस महासंचालक कार्यालयातून आदेश दिले गेले का? याची चौकशी करून कोंबिंग ॲापरेशन करणारे अधिकारी व त्यांना आदेश देणा-यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी या निरपराध सुशिक्षित तरुणाचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळेच झाल्याची पुष्टी शवविच्छेदन अहवालानेही केली असताना राज्य सरकार अद्याप संबंधित पोलिसांना पाठीशी घालत आले आहे. सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाला अशी खोटी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात देऊन सभागृहाची दिशाभूल केली. आता सरकार याच प्रकरणी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करत आहे. सुर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार नाहीत तर मग सरकार त्यांना निलंबित का करत आहे असा प्रश्न विचारून फक्त निलंबित करून चालणार नाही तर त्यांना बडतर्फ केले पाहिजे. विधानसभेत खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस हक्कभंग आणणार आहे, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या या अत्यंत गंभीर घटना आहेत. दोन्ही प्रकरणात सरकार चालढकल करत आहे. बीड प्रकरणात भाजपाचे आमदार सुरेश धस दररोज नवीन सनसनाटी आरोप करत आहेत. पण सरकार काहीच कारवाई करत नाही. यावरून हे सर्व ठरवून सुरु आहे असे दिसते. आता त्यांनी परभणी प्रकरणात पोलिसांना माफ करण्याची भाषा केली आहे. हा दुटप्पीपणा असून तो फक्त सुरेश धस यांचा नसून सरकारचा दुटप्पीपणा आहे. सरकार सुरेश धसांना बुजगावण्यासारखे उभे करून मुळ प्रश्नापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
कृषी विभागातील भ्रष्टाचारावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारच्या काळात कृषी विभागाने भ्रष्टाचाराचे विक्रम केले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी परस्पर गायब केला. कापूस खरेदी पिशव्या असो वा नॅनो युरिया खरेदी असो, शेतकऱ्यांच्या योजना केवळ कागदावर राहिल्या. शेतकऱ्यांच्या योजनांसाठी डीबीटी पद्धतीचा वापर केला जात असताना त्याला बगल देऊन कृषी विभागाने घोटाळे केले. कृषी विभागातील भ्रष्टाचाराला फक्त कृषी विभागातील अधिकारी व कृषी मंत्रीच जबाबदार नाहीत तर तत्कालीन मुख्यमंत्री व राज्य सरकारही तितकेच जबाबदार आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राहुल सोलापुरकरला आवरा !
भारतीय जनता पक्ष महापुरुषांचा निवडणुकीत मतांसाठी वापर करते व सत्तेत आल्यानंतर त्यांचा अवमान करते हे आपण मागील काही वर्षांपासून पहात आलो आहोत. भाजपाचे डझनभर नेते मंत्री यांनी महापुरुषांचा अपमान केला तसेच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही अवमान केला. भाजपा सरकार असताना असे प्रकार होत असतात, आता अभिनेता राहुल सोलापूरकर जाणीवपूर्वक महापुरुषांचा अवमान करत आहे. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मागील आठवड्यातच अपशब्द वापरून सोलापूरकर याने अवमान केला, त्यानंतर त्याने माफी मागितली आणि आता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राहुल सोलापूराने गरळ ओकली आहे आणि माफी मागण्याचे नाटकही केले. राहुल सोलापुरकर याच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी जेणेकरून पुन्हा कोणी महापुरुषांचा अपमान करण्याची हिम्मत करणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांच्या एका शिष्टमंडळाने आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या व व्यथा मांडल्या. संसदेत अंगणवाडी सेविकांचा प्रश्न उपस्थित करून न्याय देण्याची विनंती या शिष्टमंडळाने राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करून न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्नासन राहुल गांधी यांनी दिल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते ११ फेब्रुवारी ला दिल्ली येथील ‘विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण’ कार्यक्रमाचा समारोप

0

राज्यसभेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपराष्ट्रपतींसोबत महत्त्वपूर्ण चर्चा

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी संसद परिसरात विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण (ओरिएंटेशन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यासपीठावर उपस्थित होते.

लोकसभेच्या प्रशिक्षण संस्थान PRIDE द्वारे आयोजित या कार्यक्रमात विधीमंडळीय मसुदा लेखन (लेजिस्लेटिव ड्राफ्टिंग) कौशल्य आणि संसदीय समित्यांच्या कार्यकुशलतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

संसदीय प्रक्रियेतील सक्रीय सहभाग गरजेचा – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वाधिक दिवसांच्या कामकाजाचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्राच्या दोन्ही विधीमंडळ सदस्यांनी शून्य प्रहर, प्रश्नोत्तर तास यांसारख्या संसदीय प्रक्रिया प्रभावीपणे वापराव्यात आणि सभागृहात सक्रीय सहभाग घ्यावा, असा त्यांनी आग्रह व्यक्त केला.

सभागृहातील उपस्थिती शंभर टक्के असावी, संसद व विधीमंडळाच्या जुन्या चर्चांचा (डिबेट्स) अभ्यास करावा, तसेच विषयाचा सखोल अभ्यास करून प्रभावी लोकप्रतिनिधी होण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सुचवले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ४३ आमदार उपस्थित होते, त्यापैकी ४ आमदार विधान परिषदेचे आणि उर्वरित विधानसभेचे होते. तसेच महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे जितेंद्र भोळे (सचिव-१) आणि विलास आठवले (सचिव-२) देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमाचा समारोप उद्या विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे. विशेषतः आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यसभा सभापती व ऊपराष्ट्रपती तसेच ऊपसभापतींशी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत सदिच्छा भेट

कार्यक्रमानंतर राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती मा. श्री. जगदीश धनकड यांची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र विधिमंडळ आणि राज्यसभेतील सहकार्याबाबत महत्त्वाची चर्चा करण्यात आली.

तसेच, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांच्यासोबतही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विशेष चर्चा केली. असंघटित कामगार, सामाजिक न्याय आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या प्रश्नांवर राज्यसभेतून तोडगा कसा काढता येईल, यावर विचारविनिमय झाला.

राज्यसभेकडून महाराष्ट्राला कायम सहकार्य मिळेल, असे हरिवंश सिंह यांनी स्पष्ट आश्वासन दिले. तसेच, राज्यसभेचे कामकाज पाहण्याची संधी मिळाल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा:मंगेश चिवटेंकडे धुरा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या धर्तीवर चालणार कामकाज

0

मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यात उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली आहे. या कक्षामार्फत राज्यभरातील गरजू रुग्णांना मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या धर्तीवर या कक्षाचे कामकाज चालेल असे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांचा रविवारी वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी सोमवारी या कक्षाची माहिती देताना सांगितले की, माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधत काल उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली. या कक्षाच्या अधिकृत लोगोचे अनावरण माझ्या हस्ते करण्यात आले. या कक्षाची जबाबदारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे माजी कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग व महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी हा कक्ष संलग्न असणार आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.

माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अडीच वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांची अखंडपणे सेवा करण्यात आली. या कक्षामधून सुमारे 419 कोटी अर्थसहाय्य वितरित करण्यात आले, ज्यामुळे 51 हजार पेक्षा अधिक दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली. त्यांच्या आयुष्यात निरामय आरोग्याचा प्रकाश आला. गेल्या 8 वर्षांपूर्वी आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करून आरोग्याच्या महायज्ञाला सुरुवात केली. रुग्ण सेवेचा हाच वसा आणि परंपरा उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आम्ही पुढे घेऊन जात आहोत. यासाठी निस्वार्थीपणे सेवा देणाऱ्या सर्व रूग्णसेवकांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.

याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला:अमित ठाकरेंना आमदार करण्याची चर्चा

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाली. फडणवीस सकाळी अचानक राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले. विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. मात्र, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क परिसरात ‘कॅफे’ उघडला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर जात राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. आधी सर्वांसमोर आणि नंतर बंद दाराआड दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. मात्र, या दोघांत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची पुत्र अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेमध्ये घेण्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

आगामी काळात मुंबई महानगरपालिका सह राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये समावेश होईल, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देखील या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे पाहिले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र निर्माण सेना हा पक्ष महायुती सोबत आल्यास मुंबईला महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणे सहज शक्य होईल. यासाठीच या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड:ज्यावेळेस लोकांना माझी गरज नसेल तेव्हा मी घरच्या गादीवर बसेल, पंकजा मुंडे

कोयत्यांना धार देण्यासाठी मी कायम उभी राहील, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या चुकीचा अर्थ घेऊ नका. मी कोणत्या गुंडाला घाबरत नाही. मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. मी कशामुळे नवीन पक्ष स्थापन करेल. दिल्लीमध्ये नरेंद्रजी मोदी यांची सत्ता आहे. राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. मी स्वतः मंत्री आहे असं असताना मी नवीन पक्ष का काढेल? असे पंकजा मुंडे म्हणाल्या.पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मला मंत्री झाले काय नाही झाले काय, काही फरक पडत नाही. एवढे प्रेम तुम्ही करता असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. पण मंत्रिपदामुळे अधिकार येतात असेही त्या म्हणाल्या. 1825 दिवस आहेत माझ्याकडे सत्तेचे. वरचे 225 दिवस असेच जातात. माझ्या 1600 दिवसात राज्यातील प्रत्येक भागात माझ्या विभागाकडून न्याय देण्याचे काम करेल, असे आश्वासन देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना दिले आहे.

बीड-राज्याच्या पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भगवान गडाला भेट दिली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. राजकारणात आणि धर्मकारणात एकमेकांशी नाते असलेच पाहिजे. राजकारणात काम करणाऱ्या माणसाने धर्मकारणात हस्तक्षेप करू नये. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून माहीत आहे की दर वेळी राजसत्ता आणि धर्मसत्ता ही हातात हात घालून चालत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उदाहरण बघा, सगळे जग बघत आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, भगवान बाबा यांच्याविषयी माझ्या मनात काय आहे हे मी शब्दांत कधीच सांगू शकणार नाही. भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला कुठेही जावे लागत नाही. मी डोळे जरी झाकले तरी मला भगवान बाबांचे साक्षात दर्शन होते. त्यांच्या पवित्र स्मृती आहेत. आम्ही त्यांना पहिले नाही. पण त्यांच्या कहाण्या आज आपण ऐकतो. स्वतःला सत्व तत्व इतके पाळले, स्वतःचे सत्व सिद्ध कार्यासाठी त्यांनी एवढा त्याग केला. त्यांच्या मनात कधी सुद्धा स्वार्थ नव्हता. तसेच आमच्या मीराआई साहेब आहेत.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, लोक मला विचारतात तुम्ही जिथे जातात तिथे तुमचेच लोक फुले घेऊन स्वागतासाठी तयार असतात का? काहींना असेही वाटत असते. पण मी म्हणते मलाच माहीत नसते माझ्या स्वागतासाठी कोण एवढी तयारी करतं. मी तर नेहमी म्हणत असते की जेसीबीने फुले नका उधळू. आता मी रागावले म्हणून फटाके फोडणे बंद केले. पर्यावरण मंत्री समोर फटाके उडवून पर्यावरणाची वाट लावता का?, असा मिश्किल सवालही त्यांनी केला.

शिरीष महाराज मोरे यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केलेले 32 लाख रुपयांचे कर्ज फेडले:एकनाथ शिंदे यांची मदत

पुणे- संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी गत आठवड्यात आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती. त्यांच्या डोक्यावर 32 लाख रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेडून महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाचे ओझे कमी केले.संत तुकाराम महाराजाचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी 2 दिवसांपूर्वी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती. त्यांनी पुण्यातील देहू येथील आपल्या निवासस्थानी गळफास घेतला होता. तत्पूर्वी, एका सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्यावर असणाऱ्या कर्जाचा उल्लेख केला होता. त्यांच्या अंगावर सुमारे 32 लाख रुपयांचे कर्ज होते. याच कर्जातून त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवल्याचे उघड झाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेत मोरे कुटुंबीयांवरील 32 लाख रुपयांचे कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती त्यांनी रविवारी एका पत्राद्वारे मोरे कुटुंबीयांना कळवली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार विजय शिवतारे यांच्या माध्यमातून ही मदत त्यांना पोहोचती केली.

शिरीष महाराज यांनी आपल्या पत्रात आपल्या मित्रांना आपले कर्ज फेडून कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत एकनाथ शिंदे यांनी हा मदतीचा हात पुढे केला आहे.

शिरीष महाराज कोरोना महामारीच्या अगोदर व्यवसाय क्षेत्रात उतरले होते. कागदी पिशवी बनवून त्यावर छपाई करून देण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला होता. यासाठी त्यांनी कर्जही घेतले होते. पण कोरोना काळात त्यांचा व्यवसाय बंद पडला. त्यामु्ळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यानंतर अडीच वर्षांपूर्वी त्यांनी हॉटेल व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी नादब्रह्म इडलीची फ्रॅन्चायजी घेतली होती. यासाठी काही लाख रुपये मोजले होते. पिंपरी चिंचवड परिसरात हा व्यवसाय आजही सुरू आहे. आधीचे कर्ज असताना त्यांनी या व्यवसायासाठी पुन्हा हे कर्ज घेतले होते.

शिरीष महाराज यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केल्यानुसार, त्यांच्या अंगावर 32 लाख 35 हजार रुपयांचे कर्ज होते. त्यात मुंबई येथील सिंघवींचे 17 लाख, बचत गटाचे 4 लाख, सोने गहाण ठेवलेल्याचे 1 लाख 30 हजार, वैयक्तिक कर्ज 2 लाख 25 हजार, चारचाकी वाहनाचे 7 लाख कर्ज व किरकोळ देणगी 80 हजार असे एकूण 32 लाख 35 हजार रुपयांचे कर्ज त्यांच्या अंगावर होते. त्यांचे लग्न काही दिवसांवरच आले होते. तत्पूर्वीच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

पुणे-बारामती संघाची दमदार कामगिरी; २१ सुवर्ण, ९ रौप्यपदकांची कमाई

पुणे, दि. १० फेब्रुवारी २०२५: महावितरणच्या २०२४-२५च्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत मागील सलग दोन वर्षांच्या सर्वसाधारण विजेत्या पुणे-बारामती परिमंडल संघाने सांघिक व वैयक्तिक खेळ प्रकारात २१ सुवर्ण व ९ रौप्य पदकांची कमाई केली. मात्र यंदा थोडक्यात सर्वसाधारण विजेतेपद हुकले व या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावले.
बारामती येथील विद्यानगरी प्रतिष्ठानच्या क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेचे शनिवारी (दि. ८) सायंकाळी समारोप झाला. या स्पर्धेत कोल्हापूर संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर पुणे-बारामती संघाने व्हॉलीबॉल (पुरुष), खो-खो (पुरुष), कबड्डी (महिला), बॅडमिंटन (महिला) सांघिक खेळात विजेते आणि दोन वेळा टाय झालेल्या अतितटीच्या खो-खो (महिला) मध्ये उपविजेतेपद मिळवले.
स्पर्धेतील सर्व विजेता व उपविजेत्यांना महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी संचालक सर्वश्री परेश भागवत, दत्तात्रेय पडळकर, मुख्य अभियंते सर्वश्री राजेंद्र पवार (पुणे), धर्मराज पेठकर (बारामती), दत्तात्रय बनसोडे, दिलीप दोडके, पवनकुमार कच्छोट, स्वप्नील काटकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, महाव्यवस्थापक (मासं) राजेंद्र पांडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) व श्री. भुपेंद्र वाघमारे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

वैयक्तिक खेळ प्रकारांमध्ये पुणे-बारामती संघातील विजेते व उपविजेते खेळाडू पुढीलप्रमाणे- १०० मीटर धावणे : गुलाबसिंग वसावे (उपविजेता), २०० मीटर धावणे : पुरुष गट- गुलाबसिंग वसावे (विजेता), महिला गट– संजना शेजल (उपविजेती), ४०० मीटर धावणे : पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (विजेता), ८०० मीटर धावणे : महिला गट–संजना शेजल (उपविजेती), १५०० मीटर धावणे : महिला गट- अर्चना भोंग (उपविजेती), ४ बाय १०० रिले : पुरुष गट – प्रतीक वाईकर, गुलाबसिंग वसावे, अक्षय केंगाळे, सोमनाथ कांतीकर (विजेता) गोळा फेक : पुरुष गट – प्रवीण बोरावके (विजेता), लांब उडी : पुरुष गट– अक्षय केंगाळे (विजेता), महिला गट- माया येळवंडे (उपविजेती), टेनिक्वाईट : महिला दुहेरी– शीतल नाईक व कोमल सुरवसे (उपविजेती), टेबल टेनिस : पुरुष एकेरी – अतुल दंडवते (विजेता), बॅडमिंटन : पुरुष एकेरी– भरत वशिष्ठ (विजेता), पुरुष दुहेरी- भरत वशिष्ठ व सुरेश जाधव (विजेता), महिला एकेरी – वैष्णवी गांगारकर (विजेती), महिला दुहेरी – वैष्णवी गांगारकर व अनिता कुलकर्णी (विजेते), कुस्ती : ५७ किलो– आत्माराम मुंढे (विजेता), ६५ किलो- राजकुमार काळे (विजेता), ७९ किलो– अकिल मुजावर (विजेता), ८६ किलो– महावीर जाधव (विजेता), ९२ किलो– अमोल गवळी (विजेता), ९७ किलो– महेश कोळी (विजेता) आणि १२५ किलो– वैभव पवार (उपविजेता), शरीर सौष्ठव : ६५ किलो– विशाल मोहोळ (उपविजेता), पॉवर लिफ्टींग : ७४ किलो- मनिष कोंड्रा (विजेता).

रस्ते, नाले, स्वच्छता वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध

… तर कोथरुड मधील नागरी समस्या सोडवण्यासाठी महापालिकेला पूरक यंत्रणा उभारु

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्वासन

पुणे : कोथरूड मध्ये वाढत्या पुनर्विकासामुळे नागरिकरण वाढत आहे. त्यामुळे नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तोकडी पडत असेल, तर महापालिकेसोबत पूरक यंत्रणा उभारु, असे आश्वासन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले. तसेच, रस्ते, नाले, स्वच्छता, वाहतूक कोंडी आदी समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दिली.

कोथरुड मतदारसंघातील एरंडवणे भागातील १२ सोसायटींनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या संकुल संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत नागरी समस्यांसंदर्भात बैठक झाली. यावेळी महापालिकेचे वारजे क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभाग अधिकारी राजेश गुर्रम, क्षेत्रीय अधिकारी दीपक राऊत, कोथरुड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, भाजपा सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड दक्षिण अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, माजी नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, प्रभाग १३ च्या अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे यांच्या सह १२ सोसायटीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला नामदार पाटील यांनी भागातील नागरी समस्या जाणून घेतल्या. यात प्रामुख्याने नळ स्टॉप ते कॅनल रोड येथील अतिक्रमणे, एरंडवणे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या भीम ज्योती एसआरए प्रकल्पातील व्यवसायिक दुकांनामुळे होणारी वाहतूक कोंडी; यांसह कचरा, नालेसफाई, आदी समस्या मांडल्या. त्या सोडविण्यामधील प्रशासनाला येणाऱ्या अडचणी ना. पाटील यांनी समजून घेतल्या. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून १५० कोटी निधी मिळणार असून; उर्वरित निधी महापालिकेच्या माध्यमातून खर्च करुन मिसिंग लिंक तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोथरूड मधील नागरिकांनीही आपापल्या भागातील मिसिंग लिंक पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

या बैठकीत नळ स्टॉप ते कॅनल येथे अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याची बाब सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी करुन; समस्या सोडविण्यासाठी मार्ग काढू अशी ग्वाही दिली.‌ तसेच भीम ज्योती झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील व्यवसायिक दुकांनांना वाहतूक विभागाने नोटीस देऊन सदर भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी, असे निर्देश ना. पाटील यांनी वाहतूक निरिक्षकांना दिले‌. तसेच, पार्किंगसाठी साईड पट्टी मार्किंग करणे, प्रत्येक भागाचे सर्वेक्षण करुन पी-वन-पी टू पार्किंग व्यवस्था उभारावी, तसेच, वाहतूक कोंडी होणारे भागांचे सर्वेक्षण करुन वाहतूक नियमनासाठी चौकाचौकात वाहतूक पोलीस अथवा वॉर्डनची नेमणूक करावी, असेही निर्देश दिले.

कोथरुड मध्ये मोठ्या प्रमाणात पुनर्विकास प्रकल्प सुरु असून; नवीन गृहप्रकल्प हा अनेक पटीने मोठा उभा राहत आहे. त्यामुळे कोथरूड मधील नागरीकरण वाढत आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिका तोकडी पडते स्वाभाविक आहे. त्यामुळे सोसायटीच्या अंतर्गत भागातील समस्या सोडविण्यासाठी त्यांनीही काम केले पाहिजे. त्यासोबतच महापालिकेला २५ जणांची पूरक यंत्रणा उभारुन सदर नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न कर, असे आश्वस्त केले.

दरम्यान, गेल्या पाच वर्षांत नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या समोर मांडलेल्या समस्या सोडविल्याबद्द‌ल संकुल संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नामदार पाटील यांचे आभार मानले. त्यावर कृतज्ञता व्यक्त करुन, नागरी समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

कॉलेजचे दिवस म्हणजे आयुष्याचा पाया:ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी

प्रसाद ओक, डॉ. सौरभ गाडगीळ यांना प्राईड ऑफ बीएमसीसी पुरस्कार 
पुणे : बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सने  मला आयुष्यामध्ये पैसा, प्रसिद्धी, कला सर्व काही दिले. या महाविद्यालयाने मला केवळ शिक्षण दिले नाही, तर माझ्यातील माणूस घडवण्यासाठी मदत केली. तरुण विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या जीवनाचा पुरेपूर उपयोग करून आपले आयुष्य घडवावे, कारण कॉलेजचे दिवस म्हणजे आयुष्याचा पाया असतो. हा पाया मजबूत झाला तर तुम्ही अतिशय समृद्ध असे आयुष्य जगू शकता, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी व्यक्त केली.
बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे महाविद्यालयाच्या टाटा सभागृहात आयोजित बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ४० व्या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रातील गुणवंत माजी विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन मोहन जोशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राज्याचे जमाबंदी व भूमी अभिलेख आयुक्त डॉ. सुहास दिवसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश कुचेकर, संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण, सचिव सुहास पटवर्धन, उपाध्यक्ष संजीव साबळे, खजिनदार सुहास धारणे यावेळी उपस्थित होते. अभिनेते प्रसाद ओक आणि उद्योजक डॉ. सौरभ गाडगीळ यांना प्राइड ऑफ बीएमसीसी पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर डॉ. संजय कंदलगावकर आणि डॉ. वसुधा गर्दे यांना गुरुवर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एअर व्हॉइस मार्शल जयंत इनामदार यांना शहीद मेजर कुणाल गोसावी शौर्य पुरस्कार, रायकुमार नहार यांना उद्योग भूषण पुरस्कार, प्रसाद पानसे यांना स्वर्गीय वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार, अथर्व कर्वे यांना सुहास कुलकर्णी नाट्य पुरस्कार, अमृता नातू यांना स्वर्गीय बाळासाहेब सरपोतदार पुरस्कार,  मिहीर तेरणीकर यांना कै. कांता मगर क्रीडा पुरस्कार, वैष्णवी आडकर यांना कै. शिवराम फळणीकर पुरस्कार तर मृगनयनी शिंदे यांना विशेष पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. 
मोहन जोशी म्हणाले, मी माझ्या आयुष्यामध्ये टेम्पो चालवण्यापासून नाटकांपर्यंत विविध प्रकारची कामे केली. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले या प्रसंगी मला धीर देणारे संस्कार हे कॉलेजच्या जीवनात झाले. कॉलेजच्या जीवनाने खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याचा पाया घातला. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या दिवसांचा पुरेपूर उपयोग करून घ्या.
डॉ. सुहास दिवसे म्हणाले, गेल्या ४० वर्षांपासून अविरत बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स माजी विद्यार्थी संघटना कार्यरत आहे. ही देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील दुर्मिळ घटना आहे. माजी विद्यार्थी एकत्र येऊन ज्यावेळी एखादे काम करतात तेव्हा ते केवळ त्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर समाजाला पुढे घेऊन जात असतात.
प्रसाद ओक म्हणाले, हा पुरस्कार घेताना मी अत्यंत भावनिक झालो आहे. या वास्तूचा मी आयुष्यभर ऋणी राहील. राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पेक्षाही माझ्या कॉलेजने मला दिलेला पुरस्कार मला महत्त्वाचा वाटतो. कॉलेजमुळे मला हा दिवस पाहता आला.
डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले परंतु ज्या कॉलेजमध्ये मी घडलो, त्या कॉलेजमध्ये मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी अत्यंत संस्मरणीय आहे. माझ्या स्वतःच्या महाविद्यालयाने एक प्रकारे माझ्या कर्तुत्वाला दिलेली ही शाबासकीची थाप आहे. बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स हे एक प्रकारे माझे दुसरे घर आहे.
डॉ. वसुधा गर्दे म्हणाल्या, ४५ वर्षांहून अधिक काळ मी या महाविद्यालयाशी एक प्राध्यापक म्हणून जोडली गेलेली आहे आयुष्यामध्ये मिळालेला विविध यशाची साक्षीदार हे महाविद्यालय आहे.
डॉ. संजय कंदलगावकर म्हणाले, बीएमसीसी विद्यार्थ्यांसाठी केवळ एक महाविद्यालय नव्हे तर शैक्षणिक मंदिर आहे. या कॉलेजमध्ये येऊन मला ५० वर्षे झाली या महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक म्हणून जसे काम केले, तसेच या ठिकाणी शिक्षणही घेतले म्हणजे एक प्रकारे माझे संपूर्ण आयुष्य घडविण्याचे काम या महाविद्यालयाने केले आहे. 
रायकुमार नहार म्हणाले, या पुरस्कारामुळे माझ्यावरील जबाबदारीची मला जाणीव झाली आहे. गेल्या ४० वर्षांपासून अविरत कार्य करणाऱ्या या संघटनेमुळे विद्यार्थ्यांना पुन्हा महाविद्यालयाशी जोडता येते हे सुद्धा या संघटनेचे यश आहे, असेही त्यांनी सांगितले. अरुण निम्हण यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. सुहास धारणे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. अरुण निम्हण यांनी स्वागत केले.