Home Blog Page 46

संजय मयेकर यांना पीएच. डी.

पुणे : संजय रविकांत मयेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी नुकतीच जाहीर झाली.

मयेकर यांनी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातून ‘पुणे महानगरपालिका शिक्षण विभागातील योजनांचा अभ्यास’ या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता.

पुणे विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागातील डॉ. गायत्री चौकडे यांनी मार्गदर्शन केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा

पुणे : जगभरातील कोट्यावधी गणेश भक्तांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्राचे वैभव असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा बहाल केला आहे. याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली.

या निर्णयामुळे पुण्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. याबाबत ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी अथक प्रयत्न करून पाठपुरावा केला होता.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दररोज ५० ते ५५ हजार भाविक, दर संकष्टी चतुर्थीला २ ते ३ लाख भाविक आणि गणेशोत्सवात दीड कोटी भाविक दर्शनासाठी येतात. तर, दर महिन्याला जगभरातून तब्बल दोन हजार पर्यटक विविध देशातून मंदिराला भेट देतात.

मंदिराला ‘अ’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे आसपासच्या परिसराचा विकास आणि भाविकांच्या सोयी- सुविधांसाठी सरकारकडून विशेष निधी उपलब्ध होईल. याशिवाय व्हीलचेअर रॅम्प, उत्तम सुरक्षा यंत्रणा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अधिक बळकट केली जाणार आहे.

या ऐतिहासिक निर्णयामुळे आता जागतिक स्तरावर पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, परदेशी पर्यटकांची संख्या वाढण्यास आणखी मदत होणार आहे. तसेच २० ते २५ हजार रोजगार निर्मिती या माध्यमातून पुढील पाच वर्षात होणार आहे , अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी; प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव

पुणे, दि. १७ : शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक संशोधन व नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल तसेच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

कृषी विभागाच्यावतीने कृषी महाविद्यालय येथे आयोजित दुसऱ्या ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा-२०२६’च्या समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर , हेमंत रासने,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून त्यामागे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष योगदान आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी तब्बल १ हजार २९० अर्ज प्राप्त झाले असून विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील चार संशोधन प्रकल्पांचे उत्पादन प्रत्यक्षात सुरू झाले असून आणखी १२ उत्पादने लवकरच बाजारात येणार आहेत.

या स्पर्धेतून केवळ कल्पना मांडल्या जात नाहीत, तर त्या प्रत्यक्ष उत्पादनात उतरून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवतात. यंदाच्या स्पर्धेतील १८ निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत व मार्गदर्शन देण्यात येणार असून त्यापैकी किमान १२ प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.

प्रदर्शनात शेतीतील तंत्रज्ञानाचा प्रभावी वापराबाबत उपयुक्त नवकल्पना आहेत. उपग्रह नकाशांकन आणि मृदा परीक्षणाच्या आधारे जमिनीचे अचूक विश्लेषण करणारे नमुने, शेताच्या रचनेनुसार ओलावा व्यवस्थापन करून आवश्यक तेवढाच पाणीपुरवठा करणारी यंत्रणा, तसेच तण आणि पीक ओळखून स्वतंत्र फवारणी करणारे तंत्रज्ञान अशा विविध संकल्पनांचे मुख्यमंत्री यांनी विशेष कौतुक केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्याची क्षमता या तंत्रज्ञानात असून भविष्यात त्याची अचूकता आणखी वाढेल. पीक विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मानवरहित यंत्रे आणि उपग्रह नकाशांकनाच्या माध्यमातून अचूक अहवाल तयार करणारे तंत्रही उपयुक्त ठरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, बदलते हवामान, पाण्याची कमतरता, खतांची टंचाई, मजुरांची कमतरता आणि बाजारभावातील चढ-उतार या विविध आव्हानांना सामोरे जाताना कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. नवोपक्रमांना चालना देण्यासाठी आणि जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आलेले नऊ विभागांतील विजेते आणि उपविजेते

  • मृदा आरोग्य व व्यवस्थापन
    विजेता : किसान साथी
    उपविजेता : नॅनो वीटा
  • स्मार्ट जल व्यवस्थापन व स्वयंचलन
    विजेता : आयओएच अभियंता समूह
    उपविजेता : फार मोअर
  • कृषी यांत्रिकीकरण (कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव तंत्रज्ञान)
    विजेता : एग्रीटेक नेक्सस
    उपविजेता : टीम व्हीएनएमकेव्ही
  • कृषी प्रक्रिया व मूल्य साखळी
    विजेता : विन विन बाईट्स
    उपविजेता : सिल्कस्कॅन इनोव्हेटर्स
  • अक्षय ऊर्जा व कृषी कचरा व्यवस्थापन
    विजेता : प्रोटो फीड्स
    उपविजेता : इको एक्सट्रॅक्ट
  • पीक संरक्षण व कीड व्यवस्थापन
    विजेता : स्मार्ट बायो डिलिव्हरी
    उपविजेता : कृषी नेत्र
  • हवामान अनुकूल व डिजिटल शेती
    विजेता : डीप अँग बॉट
    उपविजेता : मॉडर्न व्हिलेज फ्यूचर इनोव्हेशन्स
  • भूस्थानिक व भौगोलिक माहिती प्रणाली आधारित पीक सर्वेक्षण व्यवस्था
    विजेता : क्रॉप जेन एआय
    उपविजेता : ग्रीन माइंड्स
  • स्मार्ट कृषी प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
    विजेता : ई-पिक ऑडिट एआय
    उपविजेता : कृषी प्रबंध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रदर्शनाची पाहणी;नवकल्पनांचे कौतुक

पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६ अंतर्गत उभारण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. प्रत्येक स्टॉलवर थांबून त्यांनी संशोधकांशी आणि युवा उद्योजकांशी थेट संवाद साधत त्यांच्या संकल्पना समजून घेतल्या आणि त्यांच्या संशोधनाचे कौतुक करीत प्रोत्साहनही दिले.

कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजना, स्मार्ट सिंचन प्रणाली, ड्रोन तंत्रज्ञान, मृदा परीक्षण, स्वयंचलित उपकरणे तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध संशोधनात्मक प्रकल्पांविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्सुकतेने माहिती घेतली. प्रकल्प सादर करणाऱ्या तरुणांच्या कल्पकतेचे त्यांनी कौतुक करत कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठे परिवर्तन घडवून आणण्याची गरज अधोरेखित केली.

यावेळी त्यांनी विविध उपकरणांची कार्यपद्धती समजून घेत संशोधकांना प्रोत्साहनपर प्रश्न विचारले. अनेक स्टॉलवरील संशोधन प्रत्यक्ष पाहून त्यांनी अशा उपक्रमांमधून राज्यातील युवकांना नवसंशोधनासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे अधोरेखित केले.

मेडिक्लेमच्या अप्रुव्हलसाठी मृतदेह अडवला: हॉस्पिटलचा व्हिडीओ रेकॉर्डिंगलाही प्रतिबंध:नगरसेवक टिंगरे संतापले

पुणे- मेडिक्लेम असताना ५० हजाराचे डीपोझीट घेतले अन अवघ्या १३ तासात एकतीस वर्षे वयाचा तरुण रुग्ण दगावला. अशा अवस्थेत त्याचा मृतदेह मेडिक्लेम कंपनीकडून बिलाचे अप्रुव्हल आल्याशिवाय देणार अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्याचा आरोप करत नगरसेवक सुहास टिंगरे यांनी या रुग्णालयात जाऊन रुग्णालयाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला , धरणे धरली आणि येथे मोबाईलद्वारे आपले रुग्णालय कर्मचाऱ्यांशी होत असलेले बोलणे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले असता त्यांना रेकॉर्डिंगसाठी प्रतिबंध करण्यात आला.

या संदर्भात नगरसेवक टिंगरे यांनी म्हटले आहे कि,’ काल माझा सहकारी स्व. निलेश चंद्रभान चत्तर (वय 31, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी, पुणे) याचे दुःखद निधन झाले. अवघ्या महिनाभरापूर्वी त्याच्या वडिलांचेही निधन झाले होते. घरातील एकुलता एक मुलगा असलेल्या निलेशच्या जाण्याने कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.अशा दुःखाच्या प्रसंगी माणुसकी दाखवण्याऐवजी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा हॉस्पिटलच्या प्रशासनाने अत्यंत असंवेदनशील व संतापजनक वर्तन केले.

निलेशला काल सकाळी 10 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि रात्री 11:05 वाजता त्याची प्राणज्योत मालवली. केवळ 13 तासांत तब्बल ₹3 लाख 25 हजारांचे बिल आकारण्यात आले, विशेष म्हणजे कोणतीही मोठी सर्जरी करण्यात आलेली नव्हती. विमा (Insurance) असतानाही ₹50 हजार डिपॉझिट घेण्यात आले.इतकेच नव्हे तर, “इन्शुरन्स अप्रूव्हल आल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही” अशी भूमिका घेत हॉस्पिटल प्रशासनाने मृतदेह रोखून ठेवला. दुःखात असलेल्या कुटुंबीयांना सकाळपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले. एका धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या हॉस्पिटलकडून अशी अमानुष वागणूक अत्यंत निषेधार्ह आहे.हा प्रकार म्हणजे अक्षरशः “मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणे” आहे.पुण्यातील काही नामांकित हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या या आर्थिक लुटीविरोधात आता आक्रमक भूमिका घेण्याची वेळ आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी आणि अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी लवकरच कायदेशीर लढा उभारण्यात येणार आहे.

मंजुषा पाटील यांच्या गायनातून अनवट रागांची ‘स्वरानुभूती’

ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌तर्फे मैफलीचे आयोजन

पुणे : राग धनाश्री, पूर्वी आणि नंद यांच्या सुमधुर सादरीकरणातून रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते विदुषी मंजुषा पाटील यांच्या गायन मैफलीचे!

ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌तर्फे ‘स्वरानुभूती’ या कार्यक्रमाअंतर्गत आग्रा-ग्वाल्हेर घराण्याच्या प्रख्यात गायिका विदुषी मंजुषा पाटील यांच्या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूडमधील ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ येथे रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मैफल रंगली.

विदुषी मंजुषा पाटील यांनी मैफलीची सुरुवात राग धनाश्रीमधील विलंबित तीन तालातील ‘थे म्हारे राजेंद्र’ या बंदिशीने केली. त्याला जोडून द्रुत तीन तालातील ‘तेरो ध्यान रहत दिन रैन’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली. विदुषी मंजुषा पाटील यांचे गुरू पंडित द. वि. काणेबुवा यांचे गुरू उस्ताद विलायत हुसेन खाँ यांची ही बंदिश होती.

राग पूर्वी सादर करताना विलंबित तालातील तिलवाडामधील ‘पिहरवा बासो तुही’ ही बंदिश सादर करून द्रुत लयीत ‘मथुरा ना जावो मोरा कान्हा’ ही रचना सादर केली. रागाची शुद्धता, क्लिष्ट ताना, भावपूर्ण सादरीकरणातून मैफल बहरत गेली.

राग नंदमधील तीन तालातील दोन बंदिशी सादर करताना विदुषी मंजुषा पाटील यांनी ‘ए बारे सैय्या’ आणि ‘अजहून आये शाम’ या बंदिशी सादर केल्या.

राग-तालावरील प्रभुत्व, सौंदर्यात्मक सादरीकरण आणि कसदार आवाज यांचा संगम साधत साकारलेले गायन रसिकांना विशेष भावले. सलग तीन तास रंगलेल्या या मैफलीची सांगता ‘अब के सावन घर आ’ या ठुमरीने करून रसिकांच्या मनात शब्द-नाद माधुर्याचे स्वर त्यांनी गुंजत ठेवले. प्रशांत पांडव (तबला), श्रीराम हसबनीस (संवादिनी) यांनी संवेदनशील, समर्पक साथसंगत केली. नुपूर देसाई, अनुष्का साने, तनिष्क अरोरा (सहगायन, तानपुरा) संगत केली.

कलाकारांचा सत्कार ऋत्विक फाऊंडेशनाच्या संचालिका चेतना कडले यांनी केला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती पोरवाल यांचे होते.

पुण्याला देशातील एक आधुनिकतम शहर म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री

पुणे, दि.१७: पुणे शहराला देशाचे ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’ म्हणून ओळख मिळत असून ती पुढे नेण्यासाठी मेट्रोचे जाळे, रस्त्यांची सुधारणा, भूमिगत बोगद्यांचे जाळे तयार करणे आदी माध्यमातून उत्तम वाहतुकीची व्यवस्था, चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्तम जीवनशैली सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे शहरात हाती घेतलेले प्रकल्प पुढील ३ ते ४ वर्षात पूर्ण झाल्यानंतर देशातील एक आधुनिकतम शहर म्हणून ओळखले जावे यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.

मोहम्मदवाडी येथील समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याच्या साठवण टाक्यांचे लोकार्पण तसेच मुंढवा येथील महात्मा फुले चौक ते खराडी मेट्रो समवेत दुमजली उड्डाणपुलाचे ऑनलाइन भूमिपूजनासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजननिमित्त रहेजा चौक, दोराबजी मॉल जवळ, मोहम्मद वाडी हडपसर येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार योगेश टिळेकर, चेतन तुपे, भीमराव तापकीर,स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले ,सभागृहनेते गणेश बिडकर , महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम आदी उपस्थित होते.

पुण्याचा नवीन विमानतळ, नवीन रिंग रोड, हडपसर पासून यवतपर्यंत आधुनिक प्रकारचा उन्नत मार्ग आदी सर्व माध्यमातून पुण्याची जोडणी चांगली करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गतवर्षी एकट्या पुण्यात देशातील २५ टक्के जीसीसी तयार झाले आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानंतर पुढील लाट जीसीसीची असून त्यात पुणे पुढे चालले आहे. ते पुढे नेण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. पुण्याला एक आधुनिक शहर म्हणून पुढे नेण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. महात्मा फुले चौक ते खराडी हा मेट्रोसह दुमजली पूल उभारण्यात येत असून त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासह प्रवासातील १५ ते २० वाचणार आहेत. पुण्याला गतिमान करण्याच्या प्रयत्नातील हा एक महत्वाचा पूल आहे. कोंढवा परिसरातील रखडलेल्या कात्रज कोंढवा रस्त्याचे येत्या ६ महिन्यात भूसंपादन होऊन हा रस्ता पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.

राज्यात कॅन्सर ग्रीड तयार करण्याचा प्रयत्न
देशातील पहिले पीपीपी तत्वावर दर्जेदार आरोग्य सेवा उभी करता येते हे या कर्करोग उपचार रुग्णालयाच्या उभारणीवरून दिसून येते. राज्यात मोठ्या प्रमाणात कॅन्सर ग्रीड तयार करण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न सुरू आहे. या ग्रीडच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला कॅन्सरवरील आधुनिक उपचार वेळेत आणि अत्यल्प दरात वा मोफत मिळाला पाहिजे असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये हे रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

या रुग्णालयात अतिशय आधुनिक अशा गामा स्कॅन, पेट स्कॅन आदींसह उपचार सुविधा सामान्य नागरिकांना केंद्र सरकारच्या सीजीएचएस योजनेप्रमाणे अतिशय अल्प दरात मिळणार आहेत. शासनाच्या सर्व योजना या ठिकाणी मिळणार आहेत. कॅन्सर सारखा आजार वेगाने वाढत असताना त्याचे उपचार प्रदीर्घ व खर्चिक होतात. हे पाहता पुणेकरांसाठी हे रुग्णालय एक वरदान ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ते पुढे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे बुधभूषण ग्रंथ लिहित आहेत अशा स्वरूपाचे शिल्प छत्रपती संभाजी उद्यान येथे उभारले आहे. ११ भाषा ज्ञात असलेले छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या १४ व्या वर्षी हा संस्कृत ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ म्हणजे इतिहासाचा प्रत्यक्ष नमुना आहे. या ग्रंथातील १० श्लोकांचा शिल्पात समावेश केला असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शहाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व त्यातून समजण्यास मदत होते.

समान पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात
समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत आज लोकार्पण झालेल्या पाण्याच्या टाक्यांमुळे दोराबजी पॅराडाईज, महंमदवाडी, एनआयबीएम या सर्व भागात समान पाणी पोहोचणार आहे. २०१५ साली पुण्यात वितरण व्यवस्था चांगली झाली पाहिजे असा आम्ही निर्णय घेतला. पुण्यात देशात सर्वाधिक पाणी वापर दिसत होता. त्याचे कारण ४० ते ५० टक्के पाण्याची गळती होत होती. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजना राबवून वितरण व्यवस्था अधिक चांगली करण्याचा निर्णय घेतला. त्यातून पाण्याचा नाश टाळून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाणी पोहोचवता यासाठी २०१७ साली या योजनेला मान्यता दिली. येथील लोकप्रतिनिधींनीही सतत पाठपुरावा केला. ही योजना हळूहळू अंतिम टप्प्यात चालली आहे याचा आनंद आहे, असेही ते म्हणाले.

लोकांना पाणी मिळाले तर जे आशीर्वाद मिळतात त्यापेक्षा मोठे आशीर्वाद कुठलेही नाहीत. उरलेले काम पूर्ण व्हावे यासाठी २ महिन्यात आढावा बैठक घेऊन गती देण्यात येईल. ही योजना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक पुणेकराला ‘रोज पाणी, शाश्वत पाणी, शुद्ध पाणी, सातत्यपूर्ण पाणी’ देऊ शकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वाढलेली लोकसंख्या, नवीन समाविष्ट झालेल्या गावांसाठी पाणी पुरवठ्यासाठी १२ गावांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्यासाठी ८९० कोटी रुपये दिले. तसेच केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज फंड मधूनही निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून खडकवासला, नांदेड, नांदोशी, किरकिटवाडी, धायरी, जांभूळवाडी, भिलारवाडी आदी भागातही मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प स्वराष्ट्राचा अभिमान जागृत करण्याची प्रेरणा देईल- उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, शासन आणि खासगी क्षेत्र एकत्र आल्यानंतर जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळतात हे कर्करोग रुग्णालय हे उदाहरण आहे. आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करत आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचे बुधभूषण ग्रंथ लिहितानाचे शिल्प केवळ पाहण्यासाठी नाही त्यांच्यासारखा कणखर बाणा आणि स्वराष्ट्राचा अभिमान सर्वांमध्ये जागृत करण्यासाठी प्रेरणा देईल, असेही श्रीमती पवार म्हणाल्या.

वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर या नऊ टाक्यामुळे येथील जनतेला पुरेशा दाबाने पाणी मिळेल. पाणी हे जीवन असून पाण्याची बचत करणे महत्वाचे आहे असेही त्या म्हणाल्या. मेट्रोच्या पुलामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून इंधनाची बचत होणार आहे. कामांच्या गुणवत्तेबरोबरच, भविष्यातील विचार करून नियोजन करण्यावर स्व.अजित पवार यांचा भर होता. त्यांच्या भूमिकेनुसार विकास कामे करण्यावर भर दिला जाईल.

प्रास्ताविकात महापौर श्रीमती नागपुरे म्हणाल्या, ‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ या धर्तीवर ‘विकसित पुणे’ या संकल्पनेनुसार पुणे शहराला सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी काम सुरू आहे. समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या पाण्याच्या टाक्या कार्यान्वित झाल्यामुळे ३ लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा होणार आहे. पुणेकरांच्या वाहतुकीला गती आणि वाहतुकीला अत्याधुनिक रूप देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खराडी ते महात्मा फुले चौकदरम्यान मेट्रोसह दुमजली पुलामुळे खराडीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी ‘पुणे प्रथम’ या पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तत्पूर्वी सकाळी प्रभाग क्र. ९ मधील सर्वे क्र. ४७ पी, मारुती चौक, बाणेर येथील पुणे महानगरपालिका व आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण, पुणे महानगरपालिकेच्यावतीने उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यान, जंगली महाराज रोड येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मोहम्मद वाडी येथील कार्यक्रमात प्रभाग क्रमांक ४१ व १९ मोहम्मदवाडी येथील समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत नऊ पाण्याच्या साठवण टाक्यांचे लोकार्पण तसेच मुंढवा येथील महात्मा फुले चौक ते खराडी मेट्रो समवेत दुमजली उड्डाणपुलाचे ऑनलाइन भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
0000

कुटुंबाकडूनच होणारे अत्याचार वेदनादायी; वस्त्यांमध्ये प्रबोधन आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

  • ​लोहगाव, येवलेवाडी पोलीस निरीक्षकांशी साधला संपर्क
  • ​’महिला दक्षता समित्या’ सक्रिय करून समुपदेशन करण्याचे निर्देश

​पुणे दि.१७ मे, २०२६: पुण्यातील लोहगाव आणि येवलेवाडी परिसरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार व विनयभंगाच्या घटनांची शिवसेना नेत्या तथा मा.उपसभापती विधानपरिषद आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तात्काळ दोन्ही पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली आणि आरोपींवर कडक कारवाईचे निर्देश दिले.

​येवलेवाडी येथील घटनेत ९ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत आजोबानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यावर तीव्र दुःख व्यक्त करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींकडूनच असे अत्याचार होत असल्याबद्दल अतिशय खंत वाटत आहे. अशा घटना रोखण्यासाठी संबंधित वस्त्यांमधील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर समुपदेशन आणि प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक आहे.”

वस्त्यांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण तयार करण्यासाठी आणि प्रबोधनासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांमधील ‘महिला दक्षता समित्या’ तातडीने सक्रिय कराव्यात.

​ पीडित कुटुंब मूळचे नेपाळचे असले, तरी त्यांना शासनाच्या ‘मनोधैर्य योजने’च्या माध्यमातून आर्थिक व मानसिक मदत मिळवून देण्यासाठी पोलिसांनी तात्काळ प्रयत्न करावेत.

​गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसेल अशा पद्धतीने तपास करून पीडित चिमुरडीला न्याय द्यावा, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.

“येवलेवाडीत चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा..!!”

पुणे-येवलेवाडी येथे अवघ्या चिमुकल्या मुलीवर तिच्याच आजोबांकडून झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ तसेच पुणे शहरात अल्पवयीन मुलींवरील वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांविरोधात आज शिवसेना पुणे शहराच्या वतीने खडीमशीन चौक, कोंढवा येथे भव्य जनआक्रोश मोर्चा व आंदोलन करण्यात आले. शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला आघाडी, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “आरोपींना फाशी झालीच पाहिजे”, “चिमुकल्यांवरील अत्याचार बंद झालेच पाहिजेत” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

या आंदोलनावेळी उपस्थित महिलांनी संतप्त भावना व्यक्त करत पुणे शहरात चिमुकल्या मुलींवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने वाढत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. नसरापूर, पर्वती आणि आता येवलेवाडी येथे समोर आलेल्या सलग घटनांनी पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विकृत प्रवृत्तींमध्ये कायद्याची भीती उरली आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी अशा नराधम आरोपींवर जलदगती न्यायालयामार्फत कठोरात कठोर कारवाई करून समाजासमोर धडकी भरवणारा संदेश देण्याची मागणी केली.

यानंतर शिवसैनिकांनी खडीमशीन चौकातून येवलेवाडी पोलीस उपायुक्त कार्यालयाकडे मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत पुणे शहरातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विशेष यंत्रणा उभारण्याची मागणी केली. संवेदनशील भागांमध्ये वाढीव पोलिस गस्त, शाळा परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था आणि लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये झिरो टॉलरन्स धोरण राबवण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

यावेळी बोलताना शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले की, पुणे शहरात चिमुकल्या मुलींवरील अत्याचारांच्या घटना ही अत्यंत गंभीर बाब असून समाजमन सुन्न करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. चिमुकल्या मुली स्वतःच्या घरात, नात्यात आणि परिसरात सुरक्षित नसतील तर ही केवळ गुन्हेगारीची बाब नसून समाजाच्या नैतिक अधःपतनाची धोकादायक घंटा आहे. पुणे पोलीस प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये कोणतीही दिरंगाई न करता कठोर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना आणखी तीव्र आंदोलन उभारेल असा इशाराही त्यांनी दिला. आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी येवलेवाडी प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून सर्व पुराव्यांसह गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी दिली. आंदोलनात शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे,माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती टकले, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शन त्रिगुनाईत,माजी नगरसेविका संगीता ठोसर,
उपजिल्हाप्रमुख अमर घुले,पंकज कोद्रे,सुभाष घुले,दत्ता खवळे,सुहास पडवळ,प्रवीण हिलगे, शहर समन्वयक नवनाथ निवंगुणे,संदेश पावसकर,संदीप शिंदे,अभिजित बोराटे, अकबर शेख,अनिकेत सपकाळ,मार्तंडराज धंदुके,सचिन भानगिरे,प्रशांत डाबी,संतोष जाधव,तसेच शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना व विविध अंगीकृत संघटनांचे सदस्य, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

पुणे, दि.१७: पुणे महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे  उभारण्यात आलेल्या बुधभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील,  आमदार डॉ. नीलम गोऱ्हे  सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने,  महापौर मंजुषा नागपुरे, उप महापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेता गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

बुधभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाविषयी..

■ छत्रपती संभाजी महाराज यांचे ‘बुधभूषण’ ग्रंथ रचतानाचे विश्वातील पहिले १० फुट उंचीचे पूर्णाकृती कांस्य शिल्प महाराष्ट्रात प्रथमच पुणे महानगरपालिकेच्यावतीने शिवाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे उभारण्यात आले आहे. या प्रकल्पास एकूण ५ कोटी इतका खर्च झालेला आहे.

■ छत्रपती संभाजी महाराज यांचे ‘बुधभूषण’ ग्रंथातील श्लोक निवडण्याकरिता इतिहास तज्ज्ञ, संस्कृत-मराठी भाषातज्ज्ञ, अभ्यासक यांची इतिहास तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आलेली होती. या समितीमार्फत छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या संस्कृत ‘बुधभूषण’ ग्रंथामधून आवश्यक श्लोक निवडण्यात आलेले आहेत.

■ ‘बुधभूषण’ संस्कृत ग्रंथ रचनाकार छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा व महाराजांनी रचलेल्या ९ निवडक श्लोक मराठी व इंग्रजी अर्थासह तसेच बुधभूषण ग्रंथाची संक्षिप्त माहिती देणाऱ्या प्रस्तावनेसह कोरण्यात आलेले आहेत. याकरिता भव्य १० दगडी भिंती उभारण्यात आलेल्या आहेत. शिल्पाच्या भोवती रंगीत कारंजे,  तसेच संपूर्ण परिसरात विविध शोभीवंत फुलझाडे लावण्यासह विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.

■ अतिशय कठीण कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व जगासमोर आणण्यासाठी महानगर पालिकेच्यावतीने देदीप्यमान शिल्प उभारण्यात आले आहे. यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असून या ठिकाणी भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाला महाराजांच्या गौरवशाली इतिहासापासूनची प्रेरणा मिळणार आहे.

सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. १७ : पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल असून सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून निर्माण झालेले हे केंद्र आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते गणेश बिडकर,महापालिकेतील विरोधी पक्ष नेते निलेश निकम, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्करोगाचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र उपचारात विलंब झाल्यास रुग्णांना दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात आणि त्यासाठी मोठा आर्थिक खर्चही करावा लागतो. हीच बाब लक्षात घेत सर्वसामान्य नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा समावेश केला आहे.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ‘कर्करोग ग्रीड’ तयार करण्यात येत असून या माध्यमातून राज्यातील रुग्णांना अधिक सक्षम आणि सुलभ उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यभरातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि समन्वयित करण्यासाठी हे ग्रीड महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.पुणे महानगरपालिका आणि आपुलकी फाउंडेशनच्या माध्यमातून सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारण्यात आलेल्या या उपक्रमाचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कौतुक केले.स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले की, भारतातील पहिले पीपीपी मॉडेल वरील शासकीय दरात उपचार देणारे हे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी नागपूरमध्ये होते, त्यांची भेट घेऊन त्यांना अशा प्रकारचे हॉस्पिटल उभारत असल्याची माहिती दिली. त्यावेळेस त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना माहिती दिली की श्रीनाथ भिमाले हॉस्पिटल उभारत आहेत त्यांना सहकार्य करा. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव तात्काळ मंजूर झाला. त्यानंतर हॉस्पिटल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. पुणे महापालिकेने कोट्यावधी रुपयांची जमीन यासाठी उपलब्ध करून दिली आपुलकी हेल्थकेअर ने यासाठी तयारी दर्शवली आणि हे हॉस्पिटल आज नागरिकांच्या सेवेसाठी दाखल होत आहे याचा मला आनंद आहे.

कार्यक्रमास महानगपालिकेचे पदाधिकारी, आपुलकी फाउंडेशनचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रुग्णालयाची पाहणी करून विविध उपचार विभाग, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे तसेच रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची माहिती जाणून घेतली.यावेळी महापालिका सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे व आपुलकी हेल्थकेअर लिमिटेडचे सुनील नहार, सचिन नहार व रवी जैन यांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला.पुणे व महाराष्ट्रभरातील नागरिकांना अत्याधुनिक- परवडणारी व जागतिक दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाणेर स्थित हे अत्याधुनिक, १५० खाटांचे कर्करोग आणि हृदयरोग रुग्णालय प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या रूग्णालयातील सर्व क्लिनिकल सेवा सीजीएचएस (शासकीय दरानुसार) दरांवर दिल्या जाणार आहेत. ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रमुख आरोग्य सेवा योजनांची उपलब्धता असणार आहे. ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी समावेशकता आणि प्रवेश योग्यता सुनिश्चित होणार आहे.

“पुणे व महाराष्ट्रभरातील नागरिकांना अत्याधुनिक- परवडणारी व जागतिक दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाणेरमधील हे अत्याधुनिक, १५० खाटांचे कर्करोग प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. हे रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल. या रूग्णालयातील सर्व क्लिनिकल सेवा सीजीएचएस (शासकीय दरानुसार) दरांवर दिल्या जाणार आहेत. ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रमुख आरोग्य सेवा योजनांची उपलब्धता असणार आहे. ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी समावेशकता आणि प्रवेश योग्यता सुनिश्चित होणार आहे.”-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

आपुलकी मेडिकल सेंटरविषयी – आपुलकी मेडिकल सेंटरची रचना अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली आहे, ज्यामध्ये खालील प्रमुख क्षमता आहेत:या उपचार पध्दतीचे दर सी.जी. एच.एस. दरानुसार पुरविण्यात येणार आहे. या उपचार पध्दतीचा गरीब व गरजू रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

लिनियर अ‍ॅक्सिलरेटर – ट्रूबीम, हायपरआर्क (भारतातील कोणत्याही पीपीपी प्रकल्पात अशा प्रकारची प्रथमच ही सेवा उपलब्ध करून दिली जाते आहे.)

डिजिटल पेट स्कॅनर

जीनोम सिक्वेन्सिंग सुविधा, संपूर्ण पॅथॉलॉजी आणि हिस्टोपॅथॉलॉजी सेवा

३ टेस्ला एमआरआय

१६० -स्लाइस सीटी स्कॅनर

तीन मॉड्यूलर ऑपरेटिंग थिएटर (२ मेजर + १ मायनर)

समर्पित २०-बेडेड आयसीयू/सीसीयू

८-बेडेड न्यूक्लियर मेडिसीन विभाग ( देशातील सर्वात मोठ्या विभागांपैकी एक)

२३-बेडेड किमोथेरपी वॉर्डचा व्यापक वापर

खाजगी, अर्ध-खाजगी आणि सामान्य वॉर्डचा समावेश

रूग्णांसाठी सर्व शासकीय वैद्यकीय योजना व अनुदान योजनांची उपलब्धता

खासगी विमा कंपन्यांच्या सेवेची उपलब्धता

कल्याण रेल्वे स्टेशनवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार.. संतापाची उसळली लाट

मुंबई-अहिल्यानगरहून खोपोली येथे आपल्या मामाच्या घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने कल्याण रेल्वे स्थानकावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. नसरापूर अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना ही घटना घडली आहे हे विशेष.यासंबंधीच्या वृत्तानुसार, पीडित मुलगी अहिल्यानगर येथून खोपोली येथे आपल्या मामाच्या गावी जात होती. ती कल्याण रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनची वाट पाहत उभी होती. त्यावेळी आरोपी सौरभ सोनावणे याने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. मुलीने त्याच्याकडे आपला मोबाईल परत मागितला असता त्याने ‘मोबाईल हवा असेल तर माझ्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये चल’ असे सांगितले. त्यानंतर आरोपी मुलीला घेऊन कल्याण रेल्वे यार्डात गेला. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी पीडितेने स्वतःची कशीबशी सुटका करून घेऊन रेल्वे पोलिस ठाणे गाठले.

त्यानंतर पोलिसांना आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. तिची आपबीती ऐकताच पोलिसांनी प्रकरणाचे गांभिर्य ओळखत तातडीने तपासाला सुरूवात केली. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज खंगाळून आरोपी सौरभ सोनावणे याच्या मुसक्या आवळल्या. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांच्या मते, पीडित मुलीला कल्याणहून खोपोली येथे आपल्या मामाच्या घरी जायचे होते. त्यासाठी ती कल्याण रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनची वाट पाहत होती. त्यावेळी आरोपीने तिचा मोबाईल हिसकावून घेत तिला आपल्यासोबत येण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.

उल्लेखनीय बाब म्हणजे कल्याण रेल्वे स्थानकावर 24 तास प्रवाशांची वर्दळ असते. एवढ्या वर्दळीच्या रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडल्यामुळे मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेषतः आरोपी मुलीला त्रास देत होता तेव्हाही तिथे काही प्रवाशी असल्याचेही दिसून येत आहे. पण त्यांची या मुलीला कोणतीही मदत झाली नसल्याचेही दिसून येत आहे. या एकूणच प्रकारामुळे रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आजच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही चालत नाही- गणेश नाईक

देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
मुंबई- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला असतानाच, दुसरीकडे महायुतीचे नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी फडणवीसांची जोरदार पाठराखण केली आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्वसमावेशक भूमिकेचे असतानाही केवळ ते ‘ब्राह्मण’ असल्यामुळेच त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप गणेश नाईक यांनी केला आहे.

मंत्री गणेश नाईक यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतली. देवेंद्र फडणवीस हे समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळावा याच भूमिकेचे आहेत. मात्र, ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला गेला, ज्याला राजकारण समजते त्याला हा सर्व प्रकार सहज लक्षात येईल, अशा शब्दांत नाईकांनी विरोधकांना सुनावले आहे. याचवेळी आजच्या बदलत्या राजकारणावर बोलताना त्यांनी, सध्याच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही चालत नाही. तुम्ही केवळ स्वच्छ विचारसरणीचे आहात म्हणून लोक तुम्हाला निवडून देतील, याची आज शाश्वती राहिलेली नाही, अशी खंतही व्यक्त केली.

दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. आम्ही जेव्हा जेव्हा मुंबईला गेलो, तेव्हा हैदराबादचा जीआर काढून त्याची अंमलबजावणी केली गेली, त्यावेळी आम्ही सरकारचे कौतुकही केले. काही प्रमाणपत्रे वाटली, पण त्यानंतर पुढे काय? असा सवाल जरांगे यांनी केला. सातारा संस्थानचा जीआर एका महिन्यात काढू म्हणेन आठ महिने उलटून गेले, तरीही तो निघालेला नाही. राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन अद्याप हवेतच आहे, ज्यांचे कुणबी रेकॉर्ड सापडले त्यांना व्हॅलिडीटी दिली जात नाही आणि शिंदे समिती आता रेकॉर्ड शोधत नाही, असा पाढाच त्यांनी वाचला.

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, माझे फडणवीसांबद्दल वैयक्तिक वाईट मत नाही. पण माझ्या समाजाचे वाटोळे होणार असेल तर मी तुमच्यापैकी कोणालाच मोजणार नाही. मला मित्र नकोत की मंत्र्यांशी संबंध नकोत, मला फक्त माझ्या समाजाची लेकरं मोठी करायची आहेत. फडणवीस म्हणतात की मंत्र्यांना किंमत नसते, मुख्यमंत्रीच सर्वकाही असतो; मग आमची प्रमाणपत्रे अचानक देणे का बंद झाले? हे सर्व नेमके काय चालले आहे? मराठ्यांनीच तुम्हाला मुख्यमंत्री केले होते हे लक्षात ठेवा. देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल की तेच हुशार आहेत, तर शेतकरी आणि मराठा समाजही तितकाच हुशार आहे. फडणवीस तुम्ही काय, तुमच्या 50 पिढ्या जरी आल्या तरी मी मराठ्यांना धक्का लागू देणार नाही, असा इशारा देत जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. सरकारने येत्या 30 मे पूर्वी सर्वांना कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत, अन्यथा 30 मे पासून आपण पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे

“शहरी कामगार न्याय अभियान” व “मुंबईचा हक्क” अभियानाची मुंबई युवक काँग्रेसकडून घोषणा

0

मुंबई, दि. १६ मे २०२६

देशाची आर्थिक राजधानी मुंबई उभी करणारे लाखो शहरी कामगार आजही असुरक्षित, असंघटित आणि शोषणात्मक परिस्थितीत जीवन जगत आहेत. स्वच्छता कामगार, घरकामगार, ऑटो-रिक्षा चालक, फेरीवाले आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकार मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक जीवनापासून वंचित ठेवत असल्याचा गंभीर आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केला.

मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत झीनत शबरीन, युवक काँग्रेसचे प्रभारी पुनित सिंह परिया व युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांच्या हस्ते “शहरी कामगार न्याय अभियानाची” सुरुवात केली. तसेच “मुंबईचा हक्क” अभियानांतर्गत मुंबईतील भ्रष्ट आणि निष्क्रिय व्यवस्थेविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, शहर उभं करणाऱ्या कामगारांना आजही किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, कायदेशीर संरक्षण आणि सन्मान मिळत नाही. नवीन कामगार कायद्यात घरेलू कामगार, गिग वर्कर्स आणि असंघटित क्षेत्रातील अनेक घटकांना पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले आहे.

कायद्याने बंदी असूनही आजही गटार आणि सेप्टिक टँक साफ करताना सफाई कामगारांचे मृत्यू होत आहेत. त्यांना सुरक्षा साधने दिली जात नाहीत. कामावर मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबांना न्याय आणि नुकसानभरपाई मिळत नाही. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग पूर्णपणे बंद करून सर्व स्वच्छता कामगारांना कायम सरकारी नोकरी, आरोग्य विमा आणि सामाजिक सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

आजही अनेक घरकामगार महिलांना वेगळी लिफ्ट, वेगळे गेट, वेगळे शौचालय अशा आधुनिक अस्पृश्यतेचा सामना करावा लागत असून त्यांना किमान वेतन, साप्ताहिक सुट्टी, मातृत्व लाभ आणि कायदेशीर संरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे, अशी खंत व्यक्त करत झीनत शबरीन यांनी घरकामगारांसाठी स्वतंत्र कायदा, किमान ₹१०० प्रति तास वेतन, आरोग्य विमा, पेन्शन आणि भेदभावाविरोधात कठोर कायद्याची मागणी केली. तसेच ऑटो आणि रिक्षा चालकांना ॲप कंपन्यांकडून होणारी लूट, पोलिसांकडून केला जाणार छळ, आर्थिक भुर्दंड यासह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ, विमा, पेन्शन, गॅस सबसिडी आणि ॲप कमिशनवर मर्यादा घातली पाहिजे. फेरीवाल्यांवर प्रशासनाकडून सुरु असलेल्या कारवाईवर जोरदार टीका करत “सौंदर्याकरणाच्या नावाखाली गरीबांचा रोजगार उद्ध्वस्त केला जात आहे. जप्ती, हप्तेखोरी आणि पोलिसांच्या त्रासामुळे लाखो फेरीवाले असुरक्षित झाले आहेत,” स्ट्रीट वेंडर्स ॲक्टची कठोर अंमलबजावणी, वेंडिंग झोन, व्यवसाय प्रमाणपत्र आणि महिला विक्रेत्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

त्या पुढे म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिकेकडे हजारो कोटी रुपयांचे बजेट असूनही मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते, पूरमुक्त शहर, स्वच्छ हवा, सक्षम सार्वजनिक वाहतूक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत नाहीत. “ट्रिपल इंजिन सरकार”च्या काळात मुंबईत राहणे, काम करणे आणि श्वास घेणेही कठीण झाले आहे. पूर नियंत्रण, गाळ उपसा, नालेसफाई, ड्रेनेज प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. रस्त्यांवर सुरु असलेली विविध कामे, मोठे बांधकाम प्रकल्प आणि धुळीमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत. हवेची गुणवत्ता सातत्याने ढासळत आहे. तसेच लोकल ट्रेन, बेस्ट बस सेवा, महापालिका रुग्णालयातील सेवा कोलमडल्या आहेत. सत्ताधा-यांच्या भ्रष्ट कारभारामुळे मुंबईकरांचे फक्त हाल सुरु आहेत.

“हे अभियान केवळ आंदोलन नाही, तर शहर उभं करणाऱ्या कामगारांच्या सन्मान, समानता आणि संविधानिक हक्कांसाठीचा व्यापक संघर्ष आहे. मुंबईकरांचा अंतर्गत सन्मानाने जगण्याचा हक्क धोक्यात आला असून युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून नागरिकांचा आवाज बुलंद करेल,” असे सांगत सर्व शहरी कामगार व मुंबईकरांनी ९८११८६७४७४ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन झीनत शबरीन आणि पुनित सिंह परिया यांनी केले आहे.

उल्हासनगरमध्ये महिलेचे कपडे फाडून,केस कापून,चपलांचा हार घालून काढली धिंड,मंदिर प्रवेशाच्या वादातून अमानुष कृत्य

0


ठाणे-उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेला बेदम मारहाण करून, तिचे केस कापून आणि चपलांचा हार घालून विवस्त्र अवस्थेत तिची धिंड काढण्यात आली. या अमानुष अत्याचाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत तीन आरोपींना अटक केली आहे. हा सर्व प्रकार मंदिरात प्रवेश करण्याच्या वादातून आणि जुन्या वैमनस्यातून घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून ते वाघरी समुदायातील आहेत. हे दोन्ही पक्ष फुगे विकण्याचे काम करतात आणि त्यांच्यात आधीपासूनच वाद सुरू आहेत. आरोपींचा असा आरोप आहे की, पीडित महिलेने त्यांच्या देवतेबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते, ज्यामुळे त्यांनी तिला मंदिरात प्रवेश न करण्याची ताकीद दिली होती. याच वादाचे पर्यवसान गुरुवारी विठ्ठलवाडी परिसरात या अत्यंत घृणास्पद घटनेत झाले.

उल्हासनगर सेंट्रल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे यांनी सांगितले की, ही घटना गुरुवारी घडली असून व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली. पोलिसांनी शुक्रवारी दोन आणि शनिवारी एका आरोपीला अटक केली आहे. “नातेवाईकांनी महिलेवर देवतेचा अपमान केल्याचा आरोप केला आहे, आम्ही या आरोपांची पडताळणी करत आहोत. या प्रकरणात मारहाण करताना दिसलेल्या तीन जणांना अटक करण्यात आली असून, इतर चार फरार आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत असल्याने, सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत आहोत,” अशी माहिती शंकर आवताडे यांनी दिली.

या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींनी यापूर्वीही या महिलेविरुद्ध एक एफआयआर (FIR) नोंदवला होता. आता पीडित महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८ (२): धोकादायक हत्यारांनी किंवा साधनांनी दुखापत करणे. कलम ११५ (२): स्वेच्छेने दुखापत केल्याबद्दलची शिक्षा. कलम ३५१ (२)(३): गुन्हेगारी धमकी देणे. कलम ३५२: शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून केलेला अपमान. कलम १८९: बेकायदेशीर जमाव जमवणे, या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून फरार आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जातील असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

नागरिकांनी घर सुचीकरण व गृहगणनेच्या कार्यात सहकार्य करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. १६: भारताच्या १६ व्या जनगणनेच्या अनुषंगाने जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेच्या प्रकियेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यात सक्रियपणे सहभाग घेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला जिल्ह्यात १ मे २०२६ पासून सुरुवात करण्यात आली असून १५ मे २०२६ अखेर १ लाख ५३ हजार नागरिकांनी स्व-गणना केली आहे. जनगणनेच्या अनुषंगाने माहिती गोळा करण्यासाठी आजपासून प्रगणक १४ जून २०२६ पर्यंत प्रत्येक घराला भेट देणार आहे. यावेळी प्रगणकांद्वारे गृहगणना करण्यात येणार असून नागरिकांनी आपल्याशी निगडित अचूक माहिती त्यांना द्यावी. आपल्या परिसरातील नागरिकांनाही अद्ययावत माहिती देण्यास प्रोत्साहित करावे.

घरगणनेच्या अनुषंगाने पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसह जिल्ह्यात प्रगणक आणि पर्यवेक्षकांसह सुमारे ३० हजार क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कामासाठी, भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांच्या कार्यालयाने आखून दिलेली संरचित पाच-स्तरीय प्रशिक्षण प्रणाली लागू करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. डुडी यांनी दिली आहे.

जनगणना कायदा १९४८ च्या तरतुदींनुसार राबवला जाणारा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम आहे. प्रभावी धोरण निर्मितीला पूरक ठरणारा आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देणारा विश्वसनीय माहितीचा संग्रह (डेटा) निर्माण करण्यासाठी सक्रिय लोकसहभाग आवश्यक आहे, नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.