पुणे, दि.१८: अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने २० मे २०२६ रोजी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरुन जाऊ नये व आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवत शांतता राखवी, असे आवाहन गि. दि. हुकरे अन्न व औषध प्रशासन, सह आयुक्त (औषधे) पुणे विभाग, यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. तसेच रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे विभागातर्फे विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत.
या बंदमुळे शहर व जिल्ह्यातील बहुतेक औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. तथापि, शासकीय रुग्णालये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहू शकतात. पुणे जिल्हयातील मेडप्लस, अपोलो फार्मसी, वेलनेस फॉरएव्हर तसेच रुग्णालय संलग्न औषध दुकाने व जेनेरिक औषध दुकाने नियमितपणे सुरु राहणार आहेत.
औषध दुकानदारांना परवाने हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत अटी व नियमांच्या अधीन राहून मंजूर करण्यात आलेले आहेत. रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध होणे हा त्यामागील मुख्य उद्देश असून, बंदच्या काळात औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा तसेच इतर लागू कायदे व आदेशांची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व केमिस्ट बांधवांनी बंदमध्ये सहभागी होवू नये, असे आवाहनही अन्न व औषध प्रशासनाचे, सह आयुक्त श्री. गि. दि. हुकरे यांनी केले आहे.
रुग्णांना औषधांची अनुपलब्धता भासल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांनी रु. वि. पोंगळे, सहाय्यक आयुक्त (औषधे), पुणे जिल्हा, भ्रमण्ध्वनी 9730085588, श्रीमती स. कृ. तितर-दातीर, सहाय्यक आयुक्त (औषधे), पुणे जिल्हा, भ्रमण्ध्वनी 8605000460, आ. आ. रासकर, सहाय्यक आयुक्त (औषधे), पुणे जिल्हा, भ्रमण्ध्वनी 8652583525, सं. मा. राठोड, सहाय्यक आयुक्त (औषधे), पुणे जिल्हा, भ्रमण्ध्वनी 9923304650 या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे-लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर धावत्या कारमध्ये बलात्कार झाल्याची संतापजनक घटना पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणातील वेदना कायम असताना ही घटना घडल्यामुळे पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला व आरोपी पुरुषाची रात्री कोरेगाव पार्क परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमधील पार्टीत ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने पीडितेला घरी सोडतो म्हणून कारमध्ये बसवले. त्यानंतर धावत्या कारमध्येच तिच्यावर बलात्कार केला. प्राथमिक तपासात महिलेवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्कसारख्या शहरातील वर्दळीच्या भागात ही घटना घडल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी या घटनेतील गांभिर्य ओळखून तपास सुरू केला आहे. विशेषतः या प्रकरणी पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर आरोपीचा शोध सुरू केला आहे.
हिंदुजा ग्रुप या 111 वर्षे जुन्या बहुराष्ट्रीय उद्योगसमूहाचे प्रतिनिधित्व करणारे संजय आणि धीरज हिंदुजा आणि कुटुंब यांनी 38 अब्ज पाऊंड संपत्तीसह सलग पाचव्या वर्षी संडे टाइम्स रिच लिस्टमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. संडे टाइम्स रिच लिस्ट ही युनायटेड किंगडममध्ये वास्तव्यास असलेल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि कुटुंबांची अधिकृत वार्षिक क्रमवारी यादी आहे. यामध्ये 2026 च्या यादीत सुमारे 350 जणांची नावे आहेत. जागतिक आव्हाने आणि धोरणात्मक बदल होत असूनही हिंदुजा कुटुंबाने उल्लेखनीय व्यावसायिक स्थैर्य आणि जागतिक नेतृत्व सातत्याने प्रदर्शित केले आहे.
शतकाहून अधिक काळ, हिंदुजा ग्रुपचा प्रवास स्वर्गीय श्री. परमानंद दीपचंद हिंदुजा यांच्या “माझा धर्म म्हणजे असे कार्य करणे की ज्यामुळे मला इतरांना देता येईल,” या तत्त्वाच्या आधाराने मार्गक्रमण करत आहे. हे तत्त्व आजही आर्थिक प्रगती, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास आणि विविध बाजारपेठांमधील समुदायांवर सकारात्मक परिणाम यामध्ये योगदान देत व्यवसाय वृद्धीसोबत समतोल राखत समूहाच्या उद्योगधंद्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला आकार देत आहे.
हिंदुजा ग्रुप 38 देशांमध्ये कार्यरत असून दळणवळण, डिजिटल तंत्रज्ञान, बँकिंग आणि वित्तीय सेवा, प्रसारमाध्यमे, प्रकल्प विकास, ल्युब्रिकंट्स आणि स्पेशालिटी केमिकल्स, ऊर्जा, रिअल इस्टेट, ट्रेडिंग आणि आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये समूहाची गुंतवणूक आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात हिंदुजा ग्रुपने भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रावर आपले लक्ष अधिक केंद्रित केले असून वाहन चार्जिंग पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीसह शाश्वतता आणि भविष्याभिमुख नाविन्यपूर्णतेकडे धोरणात्मक वाटचाल दर्शवली आहे.
व्यावसायिक साम्राज्याच्या पलीकडे हिंदुजा कुटुंब हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी देखील कटिबद्ध आहे. हे फाउंडेशन शिक्षण, आरोग्यसेवा, शाश्वत ग्रामीण विकास आणि जलसंधारण क्षेत्रातील परिवर्तनात्मक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते आणि विविध भौगोलिक क्षेत्रांतील समुदायांवर सकारात्मक प्रभाव टाकते.
द संडे टाइम्स रिच लिस्ट 2026 मध्ये समाविष्ट असलेल्या इतर मान्यवर आणि प्रतिष्ठित नावांमध्ये 27.971 अब्ज पाऊंड संपत्तीसह डेव्हिड आणि सायमन रुबेन आणि कुटुंब, 26.852 अब्ज पाऊंड संपत्तीसह सर लिओनार्ड ब्लावातनिक, 24.481 अब्ज पाऊंड संपत्तीसह इदान ओफर, 18.939 अब्ज पाऊंड संपत्तीसह गाय, जॉर्ज, अलाना आणि गॅलेन वेस्टन आणि कुटुंब, 18.177 अब्ज पाऊंड संपत्तीसह ख्रिस्तोफर हार्बोन, 16.411 अब्ज पाऊंड संपत्तीसह निक स्टोरोन्स्की, 16.006 अब्ज पाऊंड संपत्तीसह अॅलेक्स गेर्को, 15.194 अब्ज पाऊंड संपत्तीसह सर जिम रॅटक्लिफ, तसेच 14.26 अब्ज पाऊंड संपत्तीसह इगोर आणि दिमित्री बुखमन यांचा समावेश आहे.
जयश्री श्रोत्रिय लिखित ‘मनाचं आभाळ’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
पुणे : कविता म्हणजे जीवनाच्या अनुभूतीतून आलेला जाणिवांचा उद्गार, अंतरात्म्याचा हुंकार असते. s कविता म्हणजे कवीने स्वत:चा घेतलेला शोध असतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह आणि सुप्रसिद्ध कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी केले.
कवयित्री जयश्री विजय श्रोत्रिय यांच्या ‘मनाचं आभाळ’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी कुलकर्णी बोलत होत्या. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर, विजय श्रोत्रिय, अनिरुद्ध श्रोत्रिय व्यासपीठावर होते. साहित्यदीप प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने टिळक रोडवरील गणेश हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संवेदना प्रकाशनने कविता संग्रह प्रकाशित केला आहे.
अंजली कुलकर्णी पुढे म्हणाल्या, कविता म्हणजे कवीच्या जगण्याचा, अनुभवांचा परीघ असतो. हा परीघ किती खोल असतो त्यानुसार कविता फुलतात. ढोबळपणे स्त्री कवयित्रींच्या बाबतीत तिचे जगणे, अनुभव कवितेत प्रतिबिंबित होते. स्त्री विविध पातळ्यांवर जगत असते, तेच तिच्या कवितेतून आपल्यासमोर येते. निसर्गातील विविध गोष्टी आणि आपल्या आजुबाजूला असलेल्या व्यक्तींचा कवीच्या मनावर परिणाम होतो. त्यातील जाणिवांचा परिणाम किंवा प्रतिबिंब म्हणजे कागदावर उमटणारी कविता असते. अबोध मनात काय दडले आहे हे शोधण्याचा आणि मांडण्याचा ध्यास कवींना असतो.
ज्योस्त्ना चांदगुडे यांनी कवितासंग्रहाचा प्रवास सांगतानाच कवयित्रीचे गुण आणि कविता संग्रहातील बारकावे सांगितले. पुस्तकाची प्रस्तावना आणि काव्य अभिवाचनाची संहिता लिहीताना आपल्याला त्यांच्या कविता जवळून अनुभवता आल्या असेही त्या म्हणाल्या. स्त्री जाणिवेच्या कविता श्रोत्रिय यांच्या संग्रहात अधिक असून कणखर स्त्रीचे घडणारे दर्शन त्यांनी ‘संघर्ष’ ही कविता सादर करत घडवून दिले.
जयश्री श्रोत्रिय म्हणाल्या, कवितेमुळेच वयाच्या ७५व्या वर्षी मी अतिशय आनंदात आहे. साहित्यदीप, कुटुंबीय आणि माझ्या सोबत्यांमुळे मी इथवर पोहोचू शकले.
आईचे शिक्षिका, निवृत्त विंग कमांडरची पत्नी यांपेक्षा कवयित्री हे रूप आपल्याला जास्त भावते असे अनिरुद्ध श्रोत्रिय म्हणाले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निरुपमा महाजन, चिन्मयी चिटणीस, माधव हुंडेकर, धनंजय तडवळकर आणि जयश्री श्रोत्रिय यांनी ‘मनाचं आभाळ’ या नव्या कवितासंग्रहातील कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. धनंजय तडवळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कवयित्री आरती देवगावकर यांनी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले.
मुंबई-पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत आणखी भर पडणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठीची निवडणूक जाहीर झाली आहे. या जागांसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे, एकूण 17 जागांपैकी 16 जागांवर नियमित निवडणूक, तर एका ठिकाणी पोटनिवडणूक होत असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या नागपूर विधान परिषद मतदारसंघासाठी ही पोटनिवडणूक पार पडणार आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे या मतदारसंघांतील आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या, परिणामी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या जागा रिक्त आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्यांपैकी 22 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून दिले जातात आणि नियमानुसार, संबंधित मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येपैकी किमान 75 टक्के मतदारसंख्या उपलब्ध असल्यास ही निवडणूक घेता येते.
जाहीर झालेल्या या निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार, 25 मे रोजी निवडणुकीची अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल, तर उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 1 जून ही शेवटची तारीख असेल. त्यानंतर 2 जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल आणि उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी 4 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडणार असून, अखेर 22 जून रोजी मतमोजणी केली जाईल.
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजी नगर-जालना आणि नागपूर या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये ही निवडणूक पार पडू शकते.
महाराष्ट्राच्या विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या 78 असून, या सभागृहातील सदस्यांची निवड वेगवेगळ्या घटकांमधून केली जाते. या रचनेनुसार, एकूण 78 सदस्यांपैकी 30 सदस्य आमदारांकडून निवडले जातात, 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून, 7 सदस्य पदवीधर मतदारसंघातून आणि 7 सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून येतात, तर उर्वरित 12 सदस्यांची थेट नियुक्ती राज्यपाल करतात.
पुणे- देश आर्थिक संकटात असताना सरकार वास्तवाकडे दुर्लक्ष करत आहे. पंतप्रधान मोदी परदेशात केवळ ‘स्वागत सत्कार’ स्वीकारण्यात मग्न असून त्यांना देशातील सामान्य जनतेच्या प्रश्नांची चिंता नाहीअशा शब्दातमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांच्या मते, जागतिक युद्धजन्य परिस्थितीसोबतच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे देशात ‘आर्थिक आणीबाणी’ सदृश गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
तिवारी यांनी म्हटले की, देशाचे अस्थिर परराष्ट्र धोरण, देशांतर्गत अशांतता, बिघडलेला सामाजिक सलोखा आणि वाढता कट्टरतावाद यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब झाली आहे. अमेरिकेच्या दबावाखाली भारत सरकारला अन्यायकारक ‘ट्रेड डील’ आणि वाढते ‘टॅरिफ दर’ स्वीकारावे लागत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीमुळे २०२६ च्या सुरुवातीपासूनच परकीय गुंतवणूकदारांनी भारतातून गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ तिवारी यांनी ‘फायनान्शिअल टाइम्स’च्या ताज्या अहवालाचा संदर्भ दिला. या अहवालानुसार, भारतातील गुंतवणूकदारांनी सुमारे १ कोटी ८० लाख (परकीय चलन युनिट्समध्ये) गुंतवणूक देशाबाहेर नेली आहे. केवळ परकीय गुंतवणूकदारच नव्हे, तर गेल्या २-३ वर्षांपासून भारतीय गुंतवणूकदार आणि मोठे भांडवलदारही देश सोडून परदेशात नागरिकत्व स्वीकारत आहेत, असे तिवारी यांनी नमूद केले. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे.
या घडामोडींचा भारताच्या परकीय चलन साठ्यावर (परकीय गंगाजळी) अनिष्ट परिणाम होत आहे. यामुळे देशाचा विकास दर मंदावेल, तसेच महागाई आणि बेरोजगारी वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तिवारी यांनी मोदी सरकारवर टीका करताना म्हटले की, देश आर्थिक संकटात असताना सरकार वास्तवाकडे दुर्लक्ष करत आहे. पंतप्रधान मोदी परदेशात केवळ ‘स्वागत सत्कार’ स्वीकारण्यात मग्न असून त्यांना देशातील सामान्य जनतेच्या प्रश्नांची चिंता नाही.
देशातील अनेक राज्ये तीव्र उष्णतेने होरपळत आहेत. उत्तर प्रदेशातील बांदा रविवारी 46.4°C तापमानासह देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. झांसीमध्ये 44.6°C आणि प्रयागराजमध्ये 44.5°C तापमानाची नोंद झाली. राजधानी लखनऊमध्ये 41.6°C तापमान होते, जे सामान्यपेक्षा 1.4 अंश जास्त आहे.बिहारमध्ये दोन प्रकारचे हवामान आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दमट उष्णतेमुळे लोक त्रस्त आहेत, तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. शेखपुरा येथील कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयात शनिवारी संध्याकाळी प्रार्थनेदरम्यान 27 विद्यार्थिनी बेशुद्ध होऊन कोसळल्या. सर्वांना शेखपुरा सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातील 15 आणि राजस्थानमधील 7 शहरांमध्ये तापमान 43°C च्या वर होते. मध्य प्रदेशात खंडवा 44.5°C सह राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजस्थानमध्ये या आठवड्यात तापमान 2 ते 3°C पर्यंत वाढू शकते. काही भागांमध्ये तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचू शकते.
१९ मे:
उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येऊ शकते. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणीही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी येथील काही ठिकाणी 30-40 किलोमीटर प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहतील. झारखंडमधील काही ठिकाणी 50-60 किलोमीटर प्रति तास वेगाने जोरदार वादळ येऊ शकते. अरुणाचल प्रदेशात वीज पडण्याची शक्यता आहे. 20 मे:
उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, तेलंगणा आणि महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, लडाख, केरळ, ओडिशा आणि तामिळनाडूमध्ये 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
नाशिक: केंद्र सरकारने कांद्याची खरेदी प्रतिक्विंटल 1235 रुपये (12 रुपये 35 पैसे प्रतिकिलो) या अत्यंत तोकड्या दराने करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा खरेदी दर अत्यंत अपुरा असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केंद्र सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारवर जोरदार टीका केली आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे लासलगाव येथे दाखल झाले असून ते शेतकऱ्यांशी संवाद साधून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांवर अन्याय सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
रोहित पवार म्हणाले, आज जो शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे तो अन्याय कमी झाला पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे. आज शेतकऱ्यांनी स्वतः कष्टाने पिकवलेला कांदा आहे त्याला कुठे तरी 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये काही शेतकऱ्यांना तर एक रुपया अशा पद्धतीने भाव मिळत असेल आणि उत्पादनाचा खर्च हा कमीत कमी 20 रुपये किलो पेक्षा जास्त आहे. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, असे असताना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की आम्ही साडे 12 रुपयांनी कांदा खरेदी करू तो सुद्धा 2 लाख टन. म्हणजे रब्बीचा कांदा जर आपण पाहिला तर 70 लाख टन कांदा बनतो आणि हे 2 लाख टन तुम्ही घेणार आणि नाफेडकडून घेणार तर घेणार तुम्ही डायरेक्ट दिल्ली आणि मार्केटला जाऊन विकणार. तर उद्या जाऊन जे रेट वाढणार आहेत ते सुद्धा रेट आमच्या शेतकऱ्यांचे वाढणार नाहीत. त्यामुळे इथे आज शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहोत आणि त्यांच्यासोबत चर्चा करून पुढे काय करायचे याचा निर्णय घेणार आहोत. मात्र, आज अतिशय वाईट परिस्थिती आहे.
लासलगाव जे महाराष्ट्रातील ठराविक जे मोठे मार्केट कमिटी आहे त्यातली एक आहे. त्यामुळे इथे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आपला कांदा घेऊन येत असतो. त्यामुळे इथे शेतकरी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधून पुढे काय करायचे हे आम्ही ठरवणार आहोत, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले.
पुणे : ‘नीट’ची परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करावी लागली, ही सरकारची नामुष्की आहे. याबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी. विद्यार्थ्यांना नुकसान सोसावे लागले, त्याची भरपाई सरकारकडून मिळावी, अशी मागणी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी महिला काँग्रेसच्या आंदोलनात बोलताना केली.
‘नीट’ परीक्षा पेपर फुटी प्रकरणी निषेध नोंदविण्यासाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे, उपाध्यक्षा प्राजक्ता जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज (रविवारी) बिबवेवाडी येथे आंदोलन करण्यात आले. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक प्रिया वंदनाजी या आंदोलनात सहभागी झाले होत्या.
वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग झाला. पेपर फुटी प्रकरणी परीक्षा रद्द करावी लागली. गेल्या १० वर्षात पेपर फुटी चे प्रकार ७०हून अधिक वेळा घडले आहेत. सरकारची नामुष्की जनतेपुढे मांडायला हवी आणि शिक्षणमंत्र्यांची हकालपट्टी करायला हवी, असे प्राजक्ता जाधव यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले.
वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ‘नीट’ची परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली. २३ लाख विद्यार्थ्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. त्याचा निषेध करण्यासाठी महिला काँग्रेसने आंदोलन केले, असे स्वाती शिंदे यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले.
या आंदोलनात अनिता मकवाना, अंजली सोलापुरे, अँड. भावना बोराटे, रेखा जैन, अंजली देसाई ज्योती अडागळे, आदी कार्यकर्त्या, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा
पुणे : जगभरातील कोट्यावधी गणेश भक्तांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्राचे वैभव असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा बहाल केला आहे. याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली.
या निर्णयामुळे पुण्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. याबाबत ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी अथक प्रयत्न करून पाठपुरावा केला होता.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दररोज ५० ते ५५ हजार भाविक, दर संकष्टी चतुर्थीला २ ते ३ लाख भाविक आणि गणेशोत्सवात दीड कोटी भाविक दर्शनासाठी येतात. तर, दर महिन्याला जगभरातून तब्बल दोन हजार पर्यटक विविध देशातून मंदिराला भेट देतात.
मंदिराला ‘अ’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे आसपासच्या परिसराचा विकास आणि भाविकांच्या सोयी- सुविधांसाठी सरकारकडून विशेष निधी उपलब्ध होईल. याशिवाय व्हीलचेअर रॅम्प, उत्तम सुरक्षा यंत्रणा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अधिक बळकट केली जाणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे आता जागतिक स्तरावर पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, परदेशी पर्यटकांची संख्या वाढण्यास आणखी मदत होणार आहे. तसेच २० ते २५ हजार रोजगार निर्मिती या माध्यमातून पुढील पाच वर्षात होणार आहे , अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.
▪️ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव
पुणे, दि. १७ : शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक संशोधन व नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल तसेच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
कृषी विभागाच्यावतीने कृषी महाविद्यालय येथे आयोजित दुसऱ्या ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा-२०२६’च्या समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर , हेमंत रासने,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून त्यामागे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष योगदान आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी तब्बल १ हजार २९० अर्ज प्राप्त झाले असून विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील चार संशोधन प्रकल्पांचे उत्पादन प्रत्यक्षात सुरू झाले असून आणखी १२ उत्पादने लवकरच बाजारात येणार आहेत.
या स्पर्धेतून केवळ कल्पना मांडल्या जात नाहीत, तर त्या प्रत्यक्ष उत्पादनात उतरून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवतात. यंदाच्या स्पर्धेतील १८ निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत व मार्गदर्शन देण्यात येणार असून त्यापैकी किमान १२ प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.
प्रदर्शनात शेतीतील तंत्रज्ञानाचा प्रभावी वापराबाबत उपयुक्त नवकल्पना आहेत. उपग्रह नकाशांकन आणि मृदा परीक्षणाच्या आधारे जमिनीचे अचूक विश्लेषण करणारे नमुने, शेताच्या रचनेनुसार ओलावा व्यवस्थापन करून आवश्यक तेवढाच पाणीपुरवठा करणारी यंत्रणा, तसेच तण आणि पीक ओळखून स्वतंत्र फवारणी करणारे तंत्रज्ञान अशा विविध संकल्पनांचे मुख्यमंत्री यांनी विशेष कौतुक केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्याची क्षमता या तंत्रज्ञानात असून भविष्यात त्याची अचूकता आणखी वाढेल. पीक विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मानवरहित यंत्रे आणि उपग्रह नकाशांकनाच्या माध्यमातून अचूक अहवाल तयार करणारे तंत्रही उपयुक्त ठरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, बदलते हवामान, पाण्याची कमतरता, खतांची टंचाई, मजुरांची कमतरता आणि बाजारभावातील चढ-उतार या विविध आव्हानांना सामोरे जाताना कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. नवोपक्रमांना चालना देण्यासाठी आणि जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आलेले नऊ विभागांतील विजेते आणि उपविजेते
मृदा आरोग्य व व्यवस्थापन विजेता : किसान साथी उपविजेता : नॅनो वीटा
स्मार्ट जल व्यवस्थापन व स्वयंचलन विजेता : आयओएच अभियंता समूह उपविजेता : फार मोअर
कृषी यांत्रिकीकरण (कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव तंत्रज्ञान) विजेता : एग्रीटेक नेक्सस उपविजेता : टीम व्हीएनएमकेव्ही
कृषी प्रक्रिया व मूल्य साखळी विजेता : विन विन बाईट्स उपविजेता : सिल्कस्कॅन इनोव्हेटर्स
अक्षय ऊर्जा व कृषी कचरा व्यवस्थापन विजेता : प्रोटो फीड्स उपविजेता : इको एक्सट्रॅक्ट
पीक संरक्षण व कीड व्यवस्थापन विजेता : स्मार्ट बायो डिलिव्हरी उपविजेता : कृषी नेत्र
हवामान अनुकूल व डिजिटल शेती विजेता : डीप अँग बॉट उपविजेता : मॉडर्न व्हिलेज फ्यूचर इनोव्हेशन्स
भूस्थानिक व भौगोलिक माहिती प्रणाली आधारित पीक सर्वेक्षण व्यवस्था विजेता : क्रॉप जेन एआय उपविजेता : ग्रीन माइंड्स
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रदर्शनाची पाहणी;नवकल्पनांचे कौतुक
पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६ अंतर्गत उभारण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. प्रत्येक स्टॉलवर थांबून त्यांनी संशोधकांशी आणि युवा उद्योजकांशी थेट संवाद साधत त्यांच्या संकल्पना समजून घेतल्या आणि त्यांच्या संशोधनाचे कौतुक करीत प्रोत्साहनही दिले.
कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजना, स्मार्ट सिंचन प्रणाली, ड्रोन तंत्रज्ञान, मृदा परीक्षण, स्वयंचलित उपकरणे तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध संशोधनात्मक प्रकल्पांविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्सुकतेने माहिती घेतली. प्रकल्प सादर करणाऱ्या तरुणांच्या कल्पकतेचे त्यांनी कौतुक करत कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठे परिवर्तन घडवून आणण्याची गरज अधोरेखित केली.
यावेळी त्यांनी विविध उपकरणांची कार्यपद्धती समजून घेत संशोधकांना प्रोत्साहनपर प्रश्न विचारले. अनेक स्टॉलवरील संशोधन प्रत्यक्ष पाहून त्यांनी अशा उपक्रमांमधून राज्यातील युवकांना नवसंशोधनासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे अधोरेखित केले.
पुणे- मेडिक्लेम असताना ५० हजाराचे डीपोझीट घेतले अन अवघ्या १३ तासात एकतीस वर्षे वयाचा तरुण रुग्ण दगावला. अशा अवस्थेत त्याचा मृतदेह मेडिक्लेम कंपनीकडून बिलाचे अप्रुव्हल आल्याशिवाय देणार अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्याचा आरोप करत नगरसेवक सुहास टिंगरे यांनी या रुग्णालयात जाऊन रुग्णालयाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला , धरणे धरली आणि येथे मोबाईलद्वारे आपले रुग्णालय कर्मचाऱ्यांशी होत असलेले बोलणे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले असता त्यांना रेकॉर्डिंगसाठी प्रतिबंध करण्यात आला.
या संदर्भात नगरसेवक टिंगरे यांनी म्हटले आहे कि,’ काल माझा सहकारी स्व. निलेश चंद्रभान चत्तर (वय 31, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी, पुणे) याचे दुःखद निधन झाले. अवघ्या महिनाभरापूर्वी त्याच्या वडिलांचेही निधन झाले होते. घरातील एकुलता एक मुलगा असलेल्या निलेशच्या जाण्याने कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.अशा दुःखाच्या प्रसंगी माणुसकी दाखवण्याऐवजी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा हॉस्पिटलच्या प्रशासनाने अत्यंत असंवेदनशील व संतापजनक वर्तन केले.
निलेशला काल सकाळी 10 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि रात्री 11:05 वाजता त्याची प्राणज्योत मालवली. केवळ 13 तासांत तब्बल ₹3 लाख 25 हजारांचे बिल आकारण्यात आले, विशेष म्हणजे कोणतीही मोठी सर्जरी करण्यात आलेली नव्हती. विमा (Insurance) असतानाही ₹50 हजार डिपॉझिट घेण्यात आले.इतकेच नव्हे तर, “इन्शुरन्स अप्रूव्हल आल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही” अशी भूमिका घेत हॉस्पिटल प्रशासनाने मृतदेह रोखून ठेवला. दुःखात असलेल्या कुटुंबीयांना सकाळपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले. एका धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या हॉस्पिटलकडून अशी अमानुष वागणूक अत्यंत निषेधार्ह आहे.हा प्रकार म्हणजे अक्षरशः “मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणे” आहे.पुण्यातील काही नामांकित हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या या आर्थिक लुटीविरोधात आता आक्रमक भूमिका घेण्याची वेळ आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी आणि अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी लवकरच कायदेशीर लढा उभारण्यात येणार आहे.
पुणे : राग धनाश्री, पूर्वी आणि नंद यांच्या सुमधुर सादरीकरणातून रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते विदुषी मंजुषा पाटील यांच्या गायन मैफलीचे!
ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्तर्फे ‘स्वरानुभूती’ या कार्यक्रमाअंतर्गत आग्रा-ग्वाल्हेर घराण्याच्या प्रख्यात गायिका विदुषी मंजुषा पाटील यांच्या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूडमधील ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् येथे रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मैफल रंगली.
विदुषी मंजुषा पाटील यांनी मैफलीची सुरुवात राग धनाश्रीमधील विलंबित तीन तालातील ‘थे म्हारे राजेंद्र’ या बंदिशीने केली. त्याला जोडून द्रुत तीन तालातील ‘तेरो ध्यान रहत दिन रैन’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली. विदुषी मंजुषा पाटील यांचे गुरू पंडित द. वि. काणेबुवा यांचे गुरू उस्ताद विलायत हुसेन खाँ यांची ही बंदिश होती.
राग पूर्वी सादर करताना विलंबित तालातील तिलवाडामधील ‘पिहरवा बासो तुही’ ही बंदिश सादर करून द्रुत लयीत ‘मथुरा ना जावो मोरा कान्हा’ ही रचना सादर केली. रागाची शुद्धता, क्लिष्ट ताना, भावपूर्ण सादरीकरणातून मैफल बहरत गेली.
राग नंदमधील तीन तालातील दोन बंदिशी सादर करताना विदुषी मंजुषा पाटील यांनी ‘ए बारे सैय्या’ आणि ‘अजहून आये शाम’ या बंदिशी सादर केल्या.
राग-तालावरील प्रभुत्व, सौंदर्यात्मक सादरीकरण आणि कसदार आवाज यांचा संगम साधत साकारलेले गायन रसिकांना विशेष भावले. सलग तीन तास रंगलेल्या या मैफलीची सांगता ‘अब के सावन घर आ’ या ठुमरीने करून रसिकांच्या मनात शब्द-नाद माधुर्याचे स्वर त्यांनी गुंजत ठेवले. प्रशांत पांडव (तबला), श्रीराम हसबनीस (संवादिनी) यांनी संवेदनशील, समर्पक साथसंगत केली. नुपूर देसाई, अनुष्का साने, तनिष्क अरोरा (सहगायन, तानपुरा) संगत केली.
कलाकारांचा सत्कार ऋत्विक फाऊंडेशनाच्या संचालिका चेतना कडले यांनी केला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती पोरवाल यांचे होते.
पुणे, दि.१७: पुणे शहराला देशाचे ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’ म्हणून ओळख मिळत असून ती पुढे नेण्यासाठी मेट्रोचे जाळे, रस्त्यांची सुधारणा, भूमिगत बोगद्यांचे जाळे तयार करणे आदी माध्यमातून उत्तम वाहतुकीची व्यवस्था, चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्तम जीवनशैली सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे शहरात हाती घेतलेले प्रकल्प पुढील ३ ते ४ वर्षात पूर्ण झाल्यानंतर देशातील एक आधुनिकतम शहर म्हणून ओळखले जावे यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.
मोहम्मदवाडी येथील समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याच्या साठवण टाक्यांचे लोकार्पण तसेच मुंढवा येथील महात्मा फुले चौक ते खराडी मेट्रो समवेत दुमजली उड्डाणपुलाचे ऑनलाइन भूमिपूजनासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजननिमित्त रहेजा चौक, दोराबजी मॉल जवळ, मोहम्मद वाडी हडपसर येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार योगेश टिळेकर, चेतन तुपे, भीमराव तापकीर,स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले ,सभागृहनेते गणेश बिडकर , महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम आदी उपस्थित होते.
पुण्याचा नवीन विमानतळ, नवीन रिंग रोड, हडपसर पासून यवतपर्यंत आधुनिक प्रकारचा उन्नत मार्ग आदी सर्व माध्यमातून पुण्याची जोडणी चांगली करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गतवर्षी एकट्या पुण्यात देशातील २५ टक्के जीसीसी तयार झाले आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानंतर पुढील लाट जीसीसीची असून त्यात पुणे पुढे चालले आहे. ते पुढे नेण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. पुण्याला एक आधुनिक शहर म्हणून पुढे नेण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. महात्मा फुले चौक ते खराडी हा मेट्रोसह दुमजली पूल उभारण्यात येत असून त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासह प्रवासातील १५ ते २० वाचणार आहेत. पुण्याला गतिमान करण्याच्या प्रयत्नातील हा एक महत्वाचा पूल आहे. कोंढवा परिसरातील रखडलेल्या कात्रज कोंढवा रस्त्याचे येत्या ६ महिन्यात भूसंपादन होऊन हा रस्ता पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.
राज्यात कॅन्सर ग्रीड तयार करण्याचा प्रयत्न देशातील पहिले पीपीपी तत्वावर दर्जेदार आरोग्य सेवा उभी करता येते हे या कर्करोग उपचार रुग्णालयाच्या उभारणीवरून दिसून येते. राज्यात मोठ्या प्रमाणात कॅन्सर ग्रीड तयार करण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न सुरू आहे. या ग्रीडच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला कॅन्सरवरील आधुनिक उपचार वेळेत आणि अत्यल्प दरात वा मोफत मिळाला पाहिजे असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये हे रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
या रुग्णालयात अतिशय आधुनिक अशा गामा स्कॅन, पेट स्कॅन आदींसह उपचार सुविधा सामान्य नागरिकांना केंद्र सरकारच्या सीजीएचएस योजनेप्रमाणे अतिशय अल्प दरात मिळणार आहेत. शासनाच्या सर्व योजना या ठिकाणी मिळणार आहेत. कॅन्सर सारखा आजार वेगाने वाढत असताना त्याचे उपचार प्रदीर्घ व खर्चिक होतात. हे पाहता पुणेकरांसाठी हे रुग्णालय एक वरदान ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ते पुढे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे बुधभूषण ग्रंथ लिहित आहेत अशा स्वरूपाचे शिल्प छत्रपती संभाजी उद्यान येथे उभारले आहे. ११ भाषा ज्ञात असलेले छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या १४ व्या वर्षी हा संस्कृत ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ म्हणजे इतिहासाचा प्रत्यक्ष नमुना आहे. या ग्रंथातील १० श्लोकांचा शिल्पात समावेश केला असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शहाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व त्यातून समजण्यास मदत होते.
समान पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत आज लोकार्पण झालेल्या पाण्याच्या टाक्यांमुळे दोराबजी पॅराडाईज, महंमदवाडी, एनआयबीएम या सर्व भागात समान पाणी पोहोचणार आहे. २०१५ साली पुण्यात वितरण व्यवस्था चांगली झाली पाहिजे असा आम्ही निर्णय घेतला. पुण्यात देशात सर्वाधिक पाणी वापर दिसत होता. त्याचे कारण ४० ते ५० टक्के पाण्याची गळती होत होती. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजना राबवून वितरण व्यवस्था अधिक चांगली करण्याचा निर्णय घेतला. त्यातून पाण्याचा नाश टाळून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाणी पोहोचवता यासाठी २०१७ साली या योजनेला मान्यता दिली. येथील लोकप्रतिनिधींनीही सतत पाठपुरावा केला. ही योजना हळूहळू अंतिम टप्प्यात चालली आहे याचा आनंद आहे, असेही ते म्हणाले.
लोकांना पाणी मिळाले तर जे आशीर्वाद मिळतात त्यापेक्षा मोठे आशीर्वाद कुठलेही नाहीत. उरलेले काम पूर्ण व्हावे यासाठी २ महिन्यात आढावा बैठक घेऊन गती देण्यात येईल. ही योजना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक पुणेकराला ‘रोज पाणी, शाश्वत पाणी, शुद्ध पाणी, सातत्यपूर्ण पाणी’ देऊ शकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वाढलेली लोकसंख्या, नवीन समाविष्ट झालेल्या गावांसाठी पाणी पुरवठ्यासाठी १२ गावांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्यासाठी ८९० कोटी रुपये दिले. तसेच केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज फंड मधूनही निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून खडकवासला, नांदेड, नांदोशी, किरकिटवाडी, धायरी, जांभूळवाडी, भिलारवाडी आदी भागातही मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प स्वराष्ट्राचा अभिमान जागृत करण्याची प्रेरणा देईल- उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, शासन आणि खासगी क्षेत्र एकत्र आल्यानंतर जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळतात हे कर्करोग रुग्णालय हे उदाहरण आहे. आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे बुधभूषण ग्रंथ लिहितानाचे शिल्प केवळ पाहण्यासाठी नाही त्यांच्यासारखा कणखर बाणा आणि स्वराष्ट्राचा अभिमान सर्वांमध्ये जागृत करण्यासाठी प्रेरणा देईल, असेही श्रीमती पवार म्हणाल्या.
वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर या नऊ टाक्यामुळे येथील जनतेला पुरेशा दाबाने पाणी मिळेल. पाणी हे जीवन असून पाण्याची बचत करणे महत्वाचे आहे असेही त्या म्हणाल्या. मेट्रोच्या पुलामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून इंधनाची बचत होणार आहे. कामांच्या गुणवत्तेबरोबरच, भविष्यातील विचार करून नियोजन करण्यावर स्व.अजित पवार यांचा भर होता. त्यांच्या भूमिकेनुसार विकास कामे करण्यावर भर दिला जाईल.
प्रास्ताविकात महापौर श्रीमती नागपुरे म्हणाल्या, ‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ या धर्तीवर ‘विकसित पुणे’ या संकल्पनेनुसार पुणे शहराला सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी काम सुरू आहे. समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या पाण्याच्या टाक्या कार्यान्वित झाल्यामुळे ३ लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा होणार आहे. पुणेकरांच्या वाहतुकीला गती आणि वाहतुकीला अत्याधुनिक रूप देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खराडी ते महात्मा फुले चौकदरम्यान मेट्रोसह दुमजली पुलामुळे खराडीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी ‘पुणे प्रथम’ या पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तत्पूर्वी सकाळी प्रभाग क्र. ९ मधील सर्वे क्र. ४७ पी, मारुती चौक, बाणेर येथील पुणे महानगरपालिका व आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण, पुणे महानगरपालिकेच्यावतीने उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यान, जंगली महाराज रोड येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मोहम्मद वाडी येथील कार्यक्रमात प्रभाग क्रमांक ४१ व १९ मोहम्मदवाडी येथील समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत नऊ पाण्याच्या साठवण टाक्यांचे लोकार्पण तसेच मुंढवा येथील महात्मा फुले चौक ते खराडी मेट्रो समवेत दुमजली उड्डाणपुलाचे ऑनलाइन भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. 0000