Home Blog Page 456

“जगातील वाईट शक्ती नष्ट व्हाव्यात आणि जग शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करो”, काशीविश्वेश्वरांकडे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रार्थना

0

वाराणसी: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी १४ फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे पवित्र गंगेत अमृतस्नान केल्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी काशी विश्वेश्वर मंदिरात भक्तीभावाने दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची भगिनी जेहलम जोशी उपस्थित होत्या.

काशीला जाताना त्यांनी गंगेतून बोटीने प्रवास करत भोसले घाट, गणेश मंदिर (पेशवे घाट), सिंधिया घाट आणि पशुपतिनाथ मंदिराचेही दर्शन घेतले. काशी विश्वेश्वराच्या पवित्र दर्शनानंतर त्यांनी कृतज्ञतेने वंदन केले आणि खास मुंबईहून आणलेल्या पुरणपोळ्यांचा नैवेद्य अर्पण केला.

यावेळी त्यांनी श्री अन्नपूर्णा देवी आणि श्री बद्रीनाथजी यांचेही दर्शन घेतले. तसेच ज्ञानवापी मंदिराची झलक पाहण्याचा योगही आला. या संपूर्ण यात्रेदरम्यान त्यांनी आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरणाचा अनुभव घेतला.

याप्रसंगी भावना व्यक्त करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “भारतामध्ये गंगामाता आणि बारा ज्योतिर्लिंगांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पौर्णिमेनंतर वाराणसी येथे काशी विश्वेश्वरांचे दर्शन झाल्याने मनोभावे शांती लाभली. गंगेतील नौकाविहारामुळे ऐतिहासिक वारसा जिवंत झाल्यासारखे वाटले. काशी विश्वेश्वरांकडे मी प्रार्थना केली की, जगातील वाईट शक्ती नष्ट भाव्यात आणि जग शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करो.”

त्यांनी पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी विकास कार्याचे कौतुक करत महाराष्ट्रातील आगामी कुंभमेळ्यासाठी अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचे सांगितले.

ए. आय. नोकऱ्या घालविणारे नव्हे तर देणारे माध्यम : दीपक शिकारपूर

वाचक कट्टा उपक्रमाअंतर्गत पुणे नगर वाचन मंदिरात व्याख्यान

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (ए. आय.) वापरामुळे बेरोजगारी वाढण्याची भीती नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक वापर करून शैक्षणिक क्षेत्र, मार्केट रिसर्च, अभियांत्रिकी, माहिती संकलन, शेती आदी कार्य क्षेत्रांमध्ये अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी, प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर यांनी केले. ए. आय. तंत्रज्ञानाला स्पर्धक समजू नका तर त्याचा मदतनीस म्हणून वापर करा, सजक वापरकर्ते व्हा, असा सल्लाही त्यांनी दिला.

‌‘ए आय आणि संधी‌’ या विषयावर वाचन कट्टा या उपक्रमाअंतर्गत पुणे नगर वाचन मंदिरातर्फे शिकारपूर यांचे आज (दि. 16) व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. सहकार्यवाह प्रसाद जोशी, वाचक कट्टाचे प्रमुख, कार्यकारिणी सदस्य विनायक माने उपस्थित होते. पुणे नगर वाचन मंदिरात व्याख्यान झाले.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील, असे सांगून शिकारपूर पुढे म्हणाले, आजच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर माहिती, संवाद आणि इमेज प्रोसेसिंग या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. वापरकर्ता हाच माहितीचा वाहक असल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सजगतेने होणे आवश्यक आहे. अयोग्य माहिती देणे नीतिमत्तेचे प्रश्न निर्माण करू शकते. या तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर करू नये. म्हणूनच मर्यादित डिजिटल प्रेझेन्स आवश्यक आहे. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, माहितीचा अयोग्य वापर यातून सायबर गुन्हे वाढू शकतात. म्हणूनच युवा पिढीला सायबर संस्कार देणे ही काळाची गरज आहे. सायबर सिक्युरिटीविषयी कायद्याचे मुलभूत ज्ञान प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कितीही मोठ्या प्रमाणात झाला तरी मानवी मेंदूत असलेल्या नॉन डिजिटल अनुभवांपुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचे सामर्थ्य नेहमीच कमी राहणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेविषयक अंधविश्वास न ठेवणे, भावनिक गुंतवणूक न करणे, सततचा वापर योग्य नसून आज डिजिटल उपासाची समाजाला गरज आहे, असेही ते म्हणाले.

दीपक शिकारपूर यांचा परिचय आणि स्वागत सहकार्यवाह प्रसाद जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन विनायक माने यांनी केले. कार्यकारिणी सदस्य राजीव मराठे यांनी आभार मानले.

मंगळवार पेठेतील मोक्याची जागा खाजगी बिल्डरच्या घशात घालण्यास विरोध,पुण्याचे नेते काय घेणार निर्णय ?

पुणे- मंगळवार पेठेतील ससून डेड हाउस च्या अगदी समोरची ,आंबेडकर सांस्कृतिक भवनालगत ची जागा रस्ते विकास महामंडल एका खाजगी बिल्डरच्या घशात अवघ्या ७० कोटीला घालीत असून या कृतीस आता मोठा विरोध होऊ लागला आहे. हा बिल्डर कोण? कशासाठी हि जागा दिली जातेय या सर्व बाबी मात्र कोणीही जाहीर करण्यास उत्सुक असल्याचे दिसत नाही .

दरम्यान या संदर्भात महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर,सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजितदादा पवार,तसेच मंत्री चंद्रकांतदादा पाटील,माधुरी मिसाळ
आणि केंद्रीय मंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना साकडे घालून या संदर्भात काही मागण्या केल्या आहेत .

काय आहेत त्यांच्या मागण्या ते पहा –
१) रस्ते विकास महामंडळाने मंगळवार पेठेतील मोक्याची जागा खाजगी बिल्डरला 70 कोटी रुपयाला लीज वर देण्याचा निर्णय घेतला आहे.हा अव्यावहारिक असून तातडीने तो रद्द करावा .
२) वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार IAS यांनी काल ससून रुग्णालयाची पाहणी केली बैठका घेतल्या त्यावेळेला त्यांनी असे सांगितले पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणेचा प्रस्ताव तयार झाला असून लवकरच तो मंत्रिमंडळ मान्यतेसाठी ठेवणार आहे.
३) ससून हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय, सेंट्रल बिल्डिंग, पा बी जे मेडिकल कॉलेज, फोटो झिंको, पोलीस आयुक्तालय, जिल्हा परिषद इत्यादी महत्त्वाची शासकीय निमशासकीय या जागेच्या जवळ आहेत तसेच या जागेमध्ये भारतरत्न विश्वेश्वरय्या हे स्वतः बसत होते.
४) पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये एकही कर्करोगाचे शासकीय इस्पितळ नाही.
५) आम्ही कर्करोग रुग्णालयाची मागणी केली होती.
६) ससून रुग्णालयाच्या समोर ही जागा आहे अंडरपास अथवा पूल बांधला तर accessible आहे.
आमची आपणास हात जोडून विनंती कृपया या जागेचा व्यवहार थांबवावा आणि ही जागा कर्करोग रुग्णालय काढण्यासाठी वापरावी या रुग्णालयाला भारतरत्न विश्वेश्वरय्या यांचे नाव द्यावे.

कविता म्हणजे काळजाचे गाणे आणि आपण लिहितो हे जिवंतपणाचे लक्षण – कवी सागर काकडे

पुणे:कविता म्हणजे फक्त भावना नसून ती एक देणगी आहे, ज्याला व्यक्त होता आल तो नशीबवान असतो. म्हणुन कविता हे कवीला दृष्टी लाभलेली कला आहे. असे प्रतिपादन कवी सागर काकडे यांनी केले. शाई प्रतिष्ठान द्वारे तारांगण पिंपरी चिंचवड येथे आयोजीत सहित्यकेसरी काव्य करंडक २०२४-२५ या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
शाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून साहित्य केसरी काव्य करंडक ही स्पर्धा आयोजिली जाते. यावर्षी महाराष्ट्रभरातून एकशे पन्नास पेक्षा जास्त स्पर्धकांनी यावेळी स्पर्धेत सहभाग घेतला. तिसऱ्या व अंतिम फेरीसाठी तीस स्पर्धकांची निवड झाली.
दरम्यान या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पी.एस.आय विकास अडसूळ, युवा वक्ते अक्षय इळके, व्याख्याते विवेकानंद पाटील, उद्योजक गणपत शेठ टेमकर आदी मान्यवर उपस्थित होते. परीक्षक म्हणून कवी सागर काकडे व प्रा. अमोल चिने उपस्थित होते. शाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बनसोडे, उपाध्यक्ष महेश होनमाने यांनी स्पर्धकांचे मनोबल वाढविले.
कवी प्रमोद घोरपडे, ऐश्वर्या नेहे, गजानन साबळे, पार्थ भेंडेकर, अक्षय तेलोरे, नवनाथ पाटोळे, गौरव पुंडे, निखील सुक्रे आदींनी परिश्रम घेतले.

विजेत्यांची यादी:
प्रथम क्रमांक –  वैशाली तायडे, बुलढाणा
द्वितीय क्रमांक –  सचिन चव्हान, अहिल्यानगर

तृतीय क्रमांक-  पंकज गवळी, नाशिक

विशेष लक्षवेधी- चैताली कापसे, नाशिक

उत्तेजनार्थ प्रथम –  निलेश तुरके, यवतमाळ

उत्तेजनार्थ द्वितीय – सिद्राम सोळंके, बीड

  • पिपल चॉईस अवार्ड *

प्रथम क्रमांक – कोड क्रमांक – १
विद्या जाधव, पुणे
द्वितीय क्रमांक – कोड क्रमांक – २५
नयन कांबळे, कोल्हापूर
तृतीय क्रमांक – कोड क्रमांक – २२

कर्मयोगिनी पुरस्कार हा आईचा आशीर्वादच : मीरा शिंदे

कै. सौ. तिलोत्तमा प्रकाश निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने मीरा शिंदे यांचा गौरव

पुणे : आई क्षणोक्षणी आपल्या भोवतीच असते. ती शरीर रूपाने आपल्या जवळ नसली तरी तिचे अस्तित्व आपल्या भोवती धुक्यासारखे लपेटलेले असते. सागरासारखी व्याप्ती असलेल्या आईच्या मनाचा तळ शोधणे सोपे नाही. आईचे आईपण आपल्यात ओतप्रोत भरून घेतल्यानंतर आपल्याला आई कळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री, लेखिका मीरा शिंदे यांनी केले. आईच्या आठवांचा जागर पुरस्कार रूपाने करणे ही मोलाची गोष्ट आहे. कर्मयोगिनी पुरस्कार म्हणजे आईचा आशीर्वाद होय, असेही त्या म्हणाल्या.
कै. सौ. तिलोत्तमा प्रकाश निफाडकर यांच्या स्मरणार्थ यंदाच्या कर्मयोगिनी पुरस्काराने मीरा शिंदे यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. पुरस्काराचे वितरण कवयित्री मृणालिनी कानिटकर-जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह ॲड. प्रमोद आडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय विचार साधना सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवयित्री तनुजा चव्हाण यांच्या आईंच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष आहे. नितीन चव्हाण या वेळी मंचावर होते. ज्येष्ठ विचारवंत, महाराष्ट्र राज्य विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित, ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मीरा शिंदे पुढे म्हणाल्या, आईचे आशीर्वाद आणि आठव मनात धरून आपण आयुष्यातील अनेक चढउतारांना सामोरे जाऊ शकतो. या पुरस्काराच्या निमित्ताने आईच्या आईपणाचा जागर होत आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना मृणालिनी कानिटकर-जोशी म्हणाल्या, कर्मयोगिनी पुरस्कारामागील भावना मोलाची आहे. हा पुरस्कार फक्त कवितेचाच नव्हे तर कवयत्रीचा देखील आहे. मीरा शिंदे यांच्या कविता राजस, डौलदार आणि ऋजू असून अंतर्मुख भावनेतून व्यक्त झालेल्या आहेत. निसर्गाने दिलेल्या कवितेच्या दानाची कोमल ऱ्हदयाने काळजी घेत मीरा शिंदे साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत.
ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, तनुजा चव्हाण यांनी आईच्या नावाने दिलेल्या कर्मयोगिनी पुरस्काराने त्यांच्या स्मृती जतन केल्या आहेत. कविता म्हणजे केवळ शब्द नव्हे तर ती तुमच्या गालावरील आसवे पुसते, कधी वार करणारी तलवार बनते. कधी पाठीवर मित्रत्वाचा हात ठेवते. समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटना, मनातील घुसमट, विचारांची गर्दी कवी मन टिपते आणि त्यातून कविता निर्माण होते.
सुरुवातीस तनुजा चव्हाण यांनी पुरस्कारमागील भूमिका विशद केली तर प्रास्ताविक नितीन चव्हाण यांनी केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात भारती पांडे, माधव हुंडेकर, मिलिंद धेंडे, कांचन सावंत, नूतन शेटे, सुजित कदम, ऋचा कर्वे, चंचल काळे, अतुल कुलकर्णी, राहुल शिंदे यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिल्पा देशपांडे यांनी केले.

कात्रज ते येरवडा भुयारी मार्ग:तीन मार्गिकाचे नियोजन-अजित पवार

पुणे : ‘शहरात वाहतुकीचा प्रश्न बिकट होत असून, पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी कात्रज ते येरवडा हा भुयारी मार्ग महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन मार्गिका करण्याचे नियोजन असून, मेट्रोसाठी त्याच्या बाजूने अजून एक मार्ग तयार करता येईल का, याचा अभ्यास केला जात आहे. पुढील पाच वर्षांत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे,’ असे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे महापालिकेच्या अमृतमहोत्सवानिमित्त अजित पवार यांनी पुणे महापालिकेला भेट देऊन पुणेकरांना शुभेच्छा दिल्या. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘पुणे शहराचा विस्तार होत असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. भुयारी मार्ग यावर उपाय आहे. तो करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरातील विविध भागांतील नागरिकांनादेखील या रस्त्याचा उपयोग करता यावा, यासाठी सुरुवातीला केवळ दोन ठिकाणी बाहेर पडण्यासाठी आणि आत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून दिला जाणार होता. मात्र, आता यामध्ये वाढ करावी लागेल.’‘भुयारी मार्ग तयार करताना अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जात असल्याने त्याचा शहरातील दैनंदिन कामांवर काहीही परिणाम होणार नाही. एका वेळी दोन्ही बाजूंनी काम सुरू करून हे काम मार्गी लावता येईल. या रस्त्याचे काम कमी वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी चार ठिकाणांवरून कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. ये-जा करण्यासाठी दोन्ही बाजूंनी तीनपदरी मार्ग केले जाणार आहेत. तसेच, याच्या बाजूनेच मेट्रो प्रकल्पाचा चौथा मार्ग करता येईल का, याचादेखील अभ्यास केला जात आहे,’ असे पवार म्हणाले.

GBS कोंबड्यांचे कच्चे मांस खाणे हे देखील एक कारण

सिंहगड रस्त्यावरील खडकवासला, किरकिटवाडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण वाढण्यामागे दूषित पाणी हे केवळ एक कारण नाही, तर कोंबड्यांचे कच्चे मांस खाणे हे देखील एक कारण आहे,’ अशी माहिती समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीच याबाबत माहिती दिली आहे.‘नागरिकांनी मांस खाताना ते शिजवून खावे. या भागातील कोंबड्या मारू किंवा जाळून टाकू नका. हा आजार अधिक वाढू नये, यासाठी नक्की काय केले पाहिजे, कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याबाबत मार्गदर्शन करणारी माहिती नागरिकांना द्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांसह आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत’.कोंबड्यांचे मांस खाल्याने हा आजार होत असला तरी कोंबड्यांना मारून टाकण्याची किंवा जाळून टाकणं असे करणे आवश्यक नाही. नागरिकांनी कच्चे मांस न खाता ते चांगल्या प्रकारचे शिजवून मगच खावे, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले.


उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडचा विस्तार अधिक होणार असून, २०५४ पर्यंत पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या पुण्यापेक्षा अधिक असेल. या दोन्ही शहरांतील नागरिकांच्या पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन या गरजा भागविण्यासाठी आतापासून नियोजन करावे लागणार आहे. मुळशी धरणातील पाणी पिण्यासाठी वापरण्यास मिळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू आहे.’‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. या निवडणुकींचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात चांगले वकील देऊन हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे. इतर मागासवर्गीयांसह (ओबीसी) सर्व घटकांना आरक्षण देऊन या निवडणुका होण्यासाठी प्रयत्नशील आहे,’ असे अजित पवार यांनी सांगितले.
‘आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची आजारी असल्याने भेट घेतली. माणुसकीच्या नात्याने हे केले असेल, तर त्यात गैर नाही,’ असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, फडणवीस आणि शिंदे यांच्यात कोणतेही शीतयुद्ध सुरू नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. ‘या बातम्या धादांत खोट्या आहेत,’ असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महानगरपालिका अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट

पुणे, दि. १५: पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त महानगरपालिकेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार सुनील तटकरे, आमदार विजय शिवतारे, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्री. पवार यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विविध मान्यवर तसेच महानगरपालिकेतील अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि.१५: राज्य सरकारच्यावतीने पोलीस दलाकरीता नवीन कार्यालये, वाहने, सीसीटिव्ही,अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारची कामगिरी केलेली असून येत्या काळातही सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम राज्यातील पोलीस दल करेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आयोजित ‘तरंग-२०२५’ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, विजय शिवतारे, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील शेळके, हेमंत रासने, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुनीत बालन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, पुणे हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे शहर असून ते राज्याचे उत्पादन व तंत्रज्ञानाचे हब आहे; शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध नागरिक याठिकाणी येत असतात. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राखण्यासोबत वाहतूकीच्या नियमांचे पालन झाले पाहिजे. नागरिकांना उत्तमप्रकारच्या सेवा देवून त्यांना न्याय दिला पाहिजे, अपराध घडल्यानंतर अपराध्यांना शिक्षा झाली पाहिजे या गोष्टीवर प्रचंड भर पुणे पोलिसांच्या माध्यमातून देण्यात येत असतो. पुणे पोलीसांनी गंभीर घटनेच्यावेळी चांगल्या प्रकारे जलद प्रतिसाद देत त्या घटनांचा उलगडा केलेला आहे. त्यामधील आरोपींना जेरबंद करुन शिक्षा मिळत आहे, हे आपल्याकरीता अधिक महत्त्वाचे आहे. यापुढेही पुण्यासारख्या शहरांमध्ये अधिकाधिक घटनेच्या अनुषंगाने पोलिसांचा प्रतिसादाचा वेळ कमीत कमी असला पाहिजे. पोलिसांचा वावर नागरिकांना जाणवला पाहिजे.

पोलीसांच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्यादृष्टीने देशातील सगळयात चांगला सायबर फ्लॅटफॉर्म राज्याने निर्माण केला आहे. केंद्र शासनाने १९४५ हा क्रमांक राज्याकरीता दिला असून तक्रारदाराला २४ तासाच्या आत कारवाई करुन अहवाल देण्यात येत आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगल्या आरोग्यदायी वातावरणात जगता यावे, याकरीता पोलीस कल्याणाच्यामाध्यमातून आरोग्य, निवासस्थाने अशा अनेक गोष्टी राज्यशासनाने अजेंडावर घेवून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.

नागरिकांना उत्सव चांगल्याप्रकारे साजरा करता यावा, याकरीता राज्यातील पोलीस दल २४ तास बंदोबस्त करीत असतात, उत्सवाच्या काळात कुटुंबापासून दूर राहावे लागते, म्हणून अशा पोलिसांना आपल्या परिवारासोबत एखादा उत्सव साजरा करता यावा, याकरीता पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने पोलिसांचा उत्सव म्हणून ‘तरंग’एक अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता सामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये हास्य असले पाहिजे, त्यांना सुखशांती मिळाली पाहिजे, अपराधापासून मुक्ती मिळाली पाहिजे याकरीता पोलीस काम करीत असतात, अशा उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन त्यांचे अभिनंदन करुन यापुढेही अशाच प्रकारचे चांगले काम करतील, अशी अपेक्षा श्री.फडणवीस यांनी व्यक्त केली.

श्री. पवार म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहिले पाहिजे, जातीय सलोखा राहिला पाहिजे, शहरातील वाहतूक कोंडी सुटली पाहिजे, नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ‘कॉप-२४’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्याकरीता पोलीस दलाला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून यापुढेही राज्य सरकार कमी पडणार नाही. नागरिकांनीही आपली जबाबदारी नीटपणे पार पाडावी, असे आवाहन श्री. पवार म्हणाले.

श्री. कुमार म्हणाले, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने मागील एक वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासोबत गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या. यापुढे अधिक जोमाने करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल,असे श्री. कुमार म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कॉप-२४ उपक्रमाअंतर्गत दुचाकी व चारचाकी वाहनांना हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. तसेच कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे पाल्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्याची चित्रफीत दाखविण्यात आली.

एमएमसी, सिंहगड कॉलेजचे विजय 

आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स स्पर्धा ; विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे आयोजन
पुणे : मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एमएमसीओए), सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या संघांनी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित आर्किटेक्चर महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्समधील फुटबॉल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
वानवडी येथील एस. आर. पी. एफ.च्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. मुलांच्या फुटबॉलमध्ये ‘एमएमसी’ने पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली. यात यश कापडीने लढतीच्या २०व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. यानंतर सिंहगड कॉलेजने भारतीय कला प्रशिक्षण संस्था संघाचा ३-१ने पराभव केला. सिंहगड कॉलेजकडून शार्दूल वरपेने हॅट्ट्रिक नोंदवली. त्याने लढतीच्या २८, ३० आणि ३७व्या मिनिटाला गोल केले. भारतीय कला संघाकडून एकमेव गोल प्रसाद काकडेने (३६ मि.) केला. 
यानंतर कोल्हापूरच्या डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाचे आव्हान ४-१ने परतवून लावले. कोल्हापूरच्या संघाकडून आर्यन खवटे (२३ मि.), अनिश पवार (३४ मि.), वेदांत खारशिंगे (३६ मि.) आणि सुजल हळदे (४० मि.) यांनी गोल केले. 
मुलींच्या गटातील फुटबॉल लढतीत सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर या संघांतील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. यानंतर वाशिंक मोरेच्या (१५ मि.) एकमेव गोलच्या जोरावर श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला १-०ने नमविले. यानंतर पिंपरी-चिंचवडच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली. यात विजेत्या संघाकडून समीक्षा पाटीलने (१२ मि.) एकमेव गोल केला.

इतर निकाल : बास्केटबॉल मुले – डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी – २७ वि. वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – १३; डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी – २३ वि. वि. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – १३; ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर – ३२ वि. वि. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – २४.
मुली – भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – १९ वि. वि. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी – ३;मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – २५ वि. वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर -४; भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – १५ वि. वि. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ४.
व्हॉलिबॉल – मुले – मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. आयोजन स्कूल ऑफ डिझाईन २५-२१, २५-९; एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पिंपरी-चिंचवड वि. वि. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, अंबी २५-४, २५-७.
मुली – मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पिंपरी-चिंचवड २५-१४, २५-९; सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २२-२५, २५-१८, १६-१४; डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी वि. वि. श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २५-९, २५-९.

सहकार क्षेत्रात वामनीकॉम संस्थेचे योगदान वाखाणण्याजोगे – मुरलीधर मोहोळ

वामनीकॉमच्या सहकार्यामुळे आंतरराष्ट्रीय सिकटॅब परिषद पार पडली – मुरलीधर मोहोळ

आंतरराष्ट्रीय सिकटॅब परिषदेची सांगता

             पुणे –  सिकटॅब आंतरराष्ट्रीय परिषदेची सांगता भारत सरकारचे सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या प्रसंगी ग्रामीण विकास, कृषी आणि वनीकरण मंत्रालय, लाओ पीडीआरचे उपमहासंचालक अनोसॅक फेंगथिमावोंग,
गांबिया सहकाराचे रजिस्ट्रार जनरल ॲबा जिब्रिल संकरेह, पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट संस्थेचे संचालक प्रा. पार्थ रे, इंस्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट गुजरातचे उमाकांत दास वामनिकॉम व
सिकटॅबच्या संचालक डॉ. हेमा यादव आदी मान्यवर उपस्थित होते. या परिषदेमध्ये मॉरिशस, बँकोक, नेपाल, श्रीलंका, केनिया, भूतान, नामबिया, झांबिया अशा विविध 12 देशातील तसे भारतातील विविध राज्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवर, नेते, धोरणकर्ते आणि सहकारी तज्ञ एकत्र आले होते.

मोहोळ म्हणाले की  २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून त्याची घोषणा झाली आहे. याचेच औचित्य साधून वामनीकॉममध्ये तीन दिवसीय सिकटॅब ही आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेमध्ये बारा देशातून 36 प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. वामनीकॉममध्ये चांगले प्रकारचे परिसंवाद या परिषदेच्या माध्यमातून पार पडले. सहकार क्षेत्रात वामनीकॉम संस्थेचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. ते पुढे म्हणाले की ग्रामीण भागात सहकार क्षेत्रामुळे शाश्वत विकास झाला आहे. सहकारी बँका यांना देखील बळकटीकरण करण्यासाठी भाजप सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत.  

डॉ. हेमा यादव म्हणाल्या कि  वामनिकॉम येथे  तीन दिवसीय चाललेल्या या परिषदेमध्ये सहकार क्षेत्रातील  विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी वामनिकॉम सहकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी विचारांची देवाण घेवाण तसेच सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या परिषदेच्या माध्यमातून भविष्यकाळात भारताबरोबर  आशिया खंडातील देशांना याचा फायदा होणार आहे.  सिकटॅब परिषदेच्या माध्यातून ग्रामीण भागात देखील रोजगाराच्या संधी उपलब्द होणार असून वामनिकॉम संस्थेतील अनेक विध्यार्थीना देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच जगभरात त्यांना सहकार क्षेत्रात रोजगार मिळणार आहे. 

परिषदेचे प्रास्ताविक डॉ. हेमा यादव यांनी केले. तर सूत्रसंचालन सोनल कदम यांनी सूत्रसंचालन केले आणि परिषदेचे आभार डॉ. शंतनू घोष यांनी मानले.

तीन दिवसीय सिकटॅब परिषदेत बारा देशांचा सहभाग

तीन दिवसीय सिकटॅब परिषदेत बारा देशांचा सहभाग होता. या परिषदेमध्ये सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शेती, शेतकरी, शेतविषय धोरणे, अर्थव्यवस्था, सहकार क्षेत्रात आलेली डिजिटल कार्यप्रणाली, यु.पी.आय प्रणाली अशा विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

राज ठाकरे अन् अरुण गवळीची भेट

0

मुंबई- मुंबईचा डॉन अशी ओळख असलेल्या अरुण गवळीच्या मुलीचे नुकतेच मुंबईत थाटामाटात लग्न पार पडले. या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व अरुण गवळी यांची भेट झाली. या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

(व्हायरल व्हिडीओ)

अरुण गवळी यांची धाकटी मुलगी अस्मिता हिचे नुकतेच करण नामक तरुणाशी लग्न झाले. करण हा मुंबईत भाजीचा व्यवसाय करतो. येथील रेडिओ क्लबमध्ये या दोघांचा लग्न समारंभ झाला. या लग्न सोहळ्याला अनेक बड्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर व भाजप नेते आशिष शेलार आदींचा समावेश होता. या निमित्ताने राज ठाकरे व अरुण गवळी यांची भेट झाली. त्याचे काही फोटो व व्हिडिओ समोर आलेत.

यासंबंधीच्या एका व्हिडिओत दिसून येत आहे की, राज ठाकरे लग्न समारंभाला येतात. तिथे अरुण गवळी त्यांचे स्वागत करतात. हे दोघेही व्हिडिओत एकमेकांचे हस्तांदोलन करताना दिसून येत आहेत. यावेळी ते एकमेकांशी हसत संवाद साधतानाही दिसून येत आहेत. या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे अरुण गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी गवळीला 2007 मध्ये अटक झाली होती. त्यानंतर सत्र न्यायालयाने 2002 मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अरुण गवळीची ऑल इंडिया आर्मी नामक राजकीय संघटनाही आहे.

मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचा त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नामक इसमाशी प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. सदाशिव सुर्वेने अरुण गवळीला जामसंडेकर याच्या हत्येची सुपारी दिली. त्यानंतर गवळीने प्रताप गोडसेला या हत्येची जबाबदारी दिली होती. याप्रकरणी आपले नाव येऊ नये यासाठी नवे शूटर्स शोधण्याची सूचना करण्यात आली होती.

त्यामुळे या प्रकरणी श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी व विजयकुमार गिरी यांची निवड केली. या दोघांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे कबुल करण्यात आले. त्याची आगाऊ रक्कम म्हणून त्यांना प्रत्येकी 20 हजार देण्यात आले. अखेर विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वालच्या मदतीने जवळपास 15 दिवस जामसंडेकरवर पाळत ठेवली आणि 2 मार्च 2007 रोजी संधी मिळताच त्याची त्याच्या राहत्या घरी गोळ्या घालून हत्या केली.

महाकुंभात पुन्हा चौथ्यांदा लागली आग, अनेक तंबू जळाले

0

प्रयागराज:आज शनिवारी महाकुंभात पुन्हा आग लागली. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. जत्रेत प्रचंड गर्दी असल्याने वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास अडचण येत आहे. आगीत अनेक तंबू जळाले आहेत. अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यात व्यस्त आहे. गर्दीला घटनास्थळावरून हटवण्यात आले आहे.

महाकुंभात 28 दिवसांत आगीची ही चौथी घटना आहे. 7 फेब्रुवारी रोजी महाकुंभ मेळा परिसरातील सेक्टर-18 मध्ये आग लागली. शंकराचार्य मार्गावर ही दुर्घटना घडली, ज्यामध्ये 22 मंडप जळाले. 19 जानेवारी रोजी सेक्टर 19 मधील गीता प्रेस कॅम्पमध्ये आग लागली. या अपघातात 180 कॉटेज जळून खाक झाल्या.आज महाकुंभाचा 34 वा दिवस आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत 1.08 कोटी लोकांनी स्नान केले होते. 13 जानेवारीपासून 51.19 कोटी भाविकांनी संगमात स्नान केले आहे. ही इतिहासातील सर्वात मोठी घटना होती. 45 दिवस चालणाऱ्या महाकुंभाला अजून 11 दिवस शिल्लक आहेत.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी संगमात स्नान केले.त्याच वेळी, भाजप आमदार हर्षवर्धन वाजपेयी यांना निमलष्करी दलाच्या जवानांनी व्हीआयपी घाटावर जाण्यापासून रोखले. यानंतर आमदारांचा सैनिकांशी वाद झाला. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली, त्यानंतर त्यांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली.

पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान रंगणार ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलन‌’

फिरत्या चाकांवर प्रथमच साहित्य संमेलनाचे आयोजन
विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव तर रेल्वेच्या डब्यांना गडकिल्ल्यांची नावे
अनेक साहित्यिक, लोककलावंत, स्टँडअप कॉमेडियन्स आणि मुख्यत्वे युवक-युवतींचा मोठ्या संख्येने सहभाग
राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत संमेलनाचे स्वागताध्यक्ष, शरद तांदळे अध्यक्ष तर कार्यकारी अध्यक्षपदी वैभव वाघ

पुणे : सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथे होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन भरवावे या संकल्पनेतून ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलन‌’ आयोजित करण्यात आले आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे आणि दिर्घ साहित्य संमेलन असणार आहे.

साहित्यरसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार असून प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत. राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून तेही ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलनात‌’ सहभागी होत रेल्वेतून प्रवास करणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती सरहद, पुणेचे विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, अनुज नहार, महाराष्ट्र साहित्य परिदषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सरहद, पुणेचे अध्यक्ष संजय नहार, शरद तांदळे, वैभव वाघ, शरद गोरे उपस्थित होते.
दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम येथे हे संमेलन होत आहे. या संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली अशी विशेष रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही विशेष रेल्वे दि. 19 रोजी दुपारी पुण्यातून निघणार असून दि. 20 रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे.

‘मराठी साहित्ययात्री संमेलनात‌’ महाराष्ट्रातील विविध गावा-गावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टँडअप कॉमेडियन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच शाहिरी व भजनी मंडळांचा मोठ्या संख्येने समावेश असणार आहे. मोठ्या प्रमाणावर तरुणाईच्या सहभागामुळे हे संमेलन तरुणाईचे संमेलन ठरणार आहे. महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव असलेल्या या विशेष रेल्वेला 16 बोगी असणार असून प्रवासारदम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. युवा साहित्यिक व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलन‌’ भरविण्यात येत आहे.

दि. 19 रोजी असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली जाणार आहे. ‌‘गर्जा महाराष्ट्र माझा‌’ या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून रेल्वे निघणार आहे. तत्पूर्वी पुस्तक दिंडीही काढली जाणार आहे. याच रेल्वे प्रवासात १२०० पेक्षा अधिक साहित्यिक येणार असून पुस्तक -जळगाव आणि ग्वाल्हेर येथे ही विशेष रेल्वे पोहोचल्यानंतर ग्वाल्हेर येथील स्थानिक नागरिक भव्य स्वागत करणार आहेत. रेल्वे दि. 20 रोजी दिल्लीत पोहोचणार असून दिल्ली स्थानकावर पोहोचल्यानंतर पसायदानाच्या गायनाने ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलना‌’ची व पहिल्या टप्प्यातील प्रवासाची सांगता होणार आहे. या वेळी दिल्लीतील मराठीजन मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. परतीच्या प्रवासात देखील हे संमेलन रंगणार असून दि. 25 रोजी पुणे रेल्वे स्थानकावर या अनोख्या संमेलनाची सांगता होईल.

या अभिनव उपक्रमाची संकल्पना सरहद, पुणेचे अध्यक्ष संजय नहार यांची आहे. संमेलनाच्या निमित्ताने स्वतंत्र संयोजन समितीची स्थापना करण्यात आली असून राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. तेही रेल्वेद्वारे प्रवास करणार असून साहित्यिक, कलावंतांशी संवाद साधणार आहेत. रावण आंत्रप्रिन्युअर या पुस्तकांचे लेखक शरद तांदळे यांची संमेलनाध्यक्ष तर वंदेमातरम्‌‍ संघटनेचे अध्यक्ष व व्हायरल माणुसकी या पुस्तकाचे लेखक वैभव वाघ हे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. डॉ. शरद गोरे (कार्याध्यक्ष), सचिन जामगे, (कार्यवाह), ॲड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे (मुख्य समन्वयक), अक्षय बिक्कड, सागर काकडे (निमंत्रक) यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना ‘सीएमडी लीडरशिप’ पुरस्कार प्रदान

0

मुंबई, दि. १५ फेब्रुवारी २०२५ – महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना देशभरातील ऊर्जा कंपन्यांमधून सीएमडी लीडरशिप गटातून सर्वोत्कृष्ट अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून शुक्रवारी मुंबईत गौरविण्यात आले.

गव्हर्नन्स नाऊ या प्रतिष्ठित नियतकालिकाने देशभरातील ऊर्जा कंपन्यांसाठी आयोजित केलेल्या ‘वेस्टेक सिम्पोसियम अँड ॲवॉर्ड २०२५’ सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला. महावितरणला सायबर सुरक्षितता आणि डेटा संरक्षण, नव्या तंत्रज्ञानाचा अंगिकार आणि कौशल्य विकासासाठीचा पुढाकार या तीन प्रवर्गात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आले. महावितरणला मिळालेले पुरस्कार वरिष्ठ अधिकारी दिनेश अगरवाल, अविनाश हावरे, दत्तात्रय बनसोडे, पंकज तगलपल्लीवार आणि मंगेश कोहाट यांनी स्वीकारले. यावेळी अभिनेत्री कांचन अधिकारी आणि अभिनेते महेश ठाकूर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना लोकेश चंद्र यांनी सांगितले की, महावितरणला मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला आणि महावितरणमध्ये काम करणाऱ्या ९० हजार कर्मचाऱ्यांना जाते. राज्यातील तीन कोटीहून अधिक घरगुती, कृषी, औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांना सातत्यपूर्ण आणि दर्जेदार वीज पुरवठा व्हावा यासाठी महावितरण काम करत आहे.

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गेल्या अडीच वर्षात राज्यात ऊर्जा क्षेत्रात परिवर्तनासाठी केलेल्या कार्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना लाभ होत आहे तसेच आपले राज्य पर्यावरणपूरक रिन्युएबल एनर्जीच्या वापराचे उद्दीष्ट गाठणार आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम मार्च २०१६ मध्ये पूर्ण होईल त्यावेळी कृषी क्षेत्राला संपूर्णपणे सौर ऊर्जेचा पुरवठा करण्यात येईल. या कल्पक प्रकल्पामुळे तसेच दृरदृष्टीने केलेल्या किफायतशीर ऊर्जा खरेदी करारांमुळे आगामी काळात महावितरणच्या वीज खरेदी खर्चात मोठी बचत होईल व त्याचा लाभ ग्राहकांना वीजदरातील कपातीच्या स्वरुपात होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० हे महाराष्ट्राने देशासमोर निर्माण केलेले मॉडेल आहे. त्याची प्रशंसा केंद्र सरकारने केली असून इतर राज्यांना अनुकरण करण्याची सूचना केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विजेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. परिणामी उद्योगांवरील वार्षिक १३,५०० कोटी रुपयांचा क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होईल. उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा हटविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

न्यू इंडिया सहकारी बँकेला 53 कोटींचा तोटा,आरबीआयने लादले निर्बंध:हजारो ठेवीदार,खातेदार हवालदिल…

0

१. खातेदारांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत
२. बँकेला नव्याने कर्ज वाटप करता येणार नाही
३. जुन्या कर्जाला मुदतवाढही देता येणार नाही
४. बँकेला कुठेही गुंतवणूक करता येणार नाही

मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह (सहकारी) बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लागू केलेे. याची माहिती मिळताच बँकेतून पैसे काढण्यासाठी व्यापारी आणि ठेवीदारांनी बँकेबाहेर एकच गर्दी उसळली होती. त्यांना पैसे मिळणार नाहीत, असे सांगून परत पाठवण्यात आले. आमचे पैसे कधी मिळणार ? अशीच चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पसरली होती. दर महिन्याचा घरखर्च, शाळेची फी, औषधी, ईएमआयचा खर्च कसा करायचा, असाच सवाल हजारो ग्राहकांनी अश्रूंना वाट करून देत उपस्थित केला.

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजात अनियमितता आढळून आली आहे. बँकेला २०२३ आणि २०२४ या दोन वर्षांत सुमारे ५३ कोटींचा तोटा आला आहे. म्हणून आरबीआयने गुरुवार, १३ फेब्रुवारी २०२५ पासून निर्बंध लागू केले. म्हणून शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासूनच हजारो ठेवीदारांनी बँकेच्या मुंबईतील शाखेबाहेर मोठी गर्दी केली होती. बँकेकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने कर्मचाऱ्यांवर प्रश्नाचा भडिमार करीत संताप व्यक्त केला. अखेर त्यांना लॉकरमधील दागिने वस्तू काढण्याची परवानगी देण्यात आली. कर्मचाऱ्यांचे पगार, बँकेचे भाडे आणि इतर महत्त्वाच्या कामांची बिले दिली जातील. ठेवीदारांना क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून पाच लाख रुपयांपर्यंतचा दावा करता येईल, असे सांगण्यात आले. बँकेच्या मुंबईतील अंधेरी, बांद्रा, बोरिवली, चेंबूर, घाटकोपर, गिरगाव, गोरेगाव, नरिमन पॉइंट, कांदिवली, मालाड, मुलुंड, सांताक्रूज, वर्सोवा तर नवी मुंबईत नेरूळ आणि ठाणे जिल्ह्यात मीरा रोड, माजिवडे पाचपाखाडी, पालघर जिल्ह्यात वसई-विरारमध्ये, पुण्यात बिबवेवाडी येथे शाखा आहेत. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये बँकेला तब्बल ३० कोटी ७५ लाख रुपयांचा तोटा झाला होता, तर आर्थिक वर्ष २०२४ मध्ये बँकेला २२ कोटी ७८ लाख रुपयांचा तोटा झाला आहे.