मुंबई- मुंबईचा डॉन अशी ओळख असलेल्या अरुण गवळीच्या मुलीचे नुकतेच मुंबईत थाटामाटात लग्न पार पडले. या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व अरुण गवळी यांची भेट झाली. या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
अरुण गवळी यांची धाकटी मुलगी अस्मिता हिचे नुकतेच करण नामक तरुणाशी लग्न झाले. करण हा मुंबईत भाजीचा व्यवसाय करतो. येथील रेडिओ क्लबमध्ये या दोघांचा लग्न समारंभ झाला. या लग्न सोहळ्याला अनेक बड्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर व भाजप नेते आशिष शेलार आदींचा समावेश होता. या निमित्ताने राज ठाकरे व अरुण गवळी यांची भेट झाली. त्याचे काही फोटो व व्हिडिओ समोर आलेत.
यासंबंधीच्या एका व्हिडिओत दिसून येत आहे की, राज ठाकरे लग्न समारंभाला येतात. तिथे अरुण गवळी त्यांचे स्वागत करतात. हे दोघेही व्हिडिओत एकमेकांचे हस्तांदोलन करताना दिसून येत आहेत. यावेळी ते एकमेकांशी हसत संवाद साधतानाही दिसून येत आहेत. या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे अरुण गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी गवळीला 2007 मध्ये अटक झाली होती. त्यानंतर सत्र न्यायालयाने 2002 मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अरुण गवळीची ऑल इंडिया आर्मी नामक राजकीय संघटनाही आहे.
मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचा त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नामक इसमाशी प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. सदाशिव सुर्वेने अरुण गवळीला जामसंडेकर याच्या हत्येची सुपारी दिली. त्यानंतर गवळीने प्रताप गोडसेला या हत्येची जबाबदारी दिली होती. याप्रकरणी आपले नाव येऊ नये यासाठी नवे शूटर्स शोधण्याची सूचना करण्यात आली होती.
त्यामुळे या प्रकरणी श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी व विजयकुमार गिरी यांची निवड केली. या दोघांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे कबुल करण्यात आले. त्याची आगाऊ रक्कम म्हणून त्यांना प्रत्येकी 20 हजार देण्यात आले. अखेर विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वालच्या मदतीने जवळपास 15 दिवस जामसंडेकरवर पाळत ठेवली आणि 2 मार्च 2007 रोजी संधी मिळताच त्याची त्याच्या राहत्या घरी गोळ्या घालून हत्या केली.