Home Blog Page 455

आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांशी लढण्यासाठी मास्टर्स इन फायनान्शियल्स अँड इकॉनॉमिक क्राइम्स प्रोग्रॅमविषयी मुंबईत संवादी सत्राचे आयोजन

मुंबई,  – आर्थिक गुन्हेगारीच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी लक्षणीय पाऊल उचलत राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी (RRU) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (IICA) यांनी एकत्रितपणे मास्टर्स इन फायनान्शियल्स अँड इकॉनॉमिक क्राइम्सविषयी (MFEC) जागरूकता निर्माण करण्यासाठी संवादी सत्राचे आयोजन केले होते. नुकतेच पार पडलेले हे सत्र बीकेसीमुंबई येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आले होते.

अभ्यासक्रमाचा आढावा

MFEC ची रचना आर्थिक गुन्हेगारीमुळे निर्माण होत असलेली आव्हाने सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण पद्धतीने हाताळण्यासाठी करण्यात आली आहे. या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमामध्ये कायदा, वित्त, तंत्रज्ञान आणि धोरणे अशा महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला असून त्याद्वारे व्यावसायिकांना आर्थिक गुन्हेगारीशी लढण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकवून सक्षम केले जाते. नोकरदार व्यावसायिकांसाठी खास तयार करण्यात आलेला हा एक वर्षाचा अभ्यासक्रम हायब्रीड पद्धतीने घेतला जाणार आहे.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

या कार्यक्रमात महत्त्वाच्या आर्थिक भागधारकांच्या सहभागाला चालना देण्यात आली. यावेळी डॉ. बिमल पटेल, RRU चे उपकुलगुरू, श्री. रोहित जैन, कार्यकारी संचालक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, श्री. व्ही एस सुंदरसन, कार्यकारी संचालक, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडी, डॉ. नीरज गुप्ता, प्रमुख SoF&M, IICA, उद्योगक्षेत्रातील इतर नामवंतांनी देश तसेच जागतिक आर्थिक सुरक्षेसाठी आर्थिक गुन्हेगारीला प्रतिबंध करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमातून या अभ्यासक्रमाचे रेग्युलेटरी एजन्सीज, कायदा– सुव्यवस्था क्षेत्रातील घटक आणि आर्थिक संस्थांमध्ये सहकार्य करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलेवेगवेगळे परिसंवाद, सादरीकरण, भागधारकांसह संवाद यांच्या माध्यमातून या कार्यक्रमात आर्थिक गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वसमावेशक धोरणाची अतिशय गरज असल्याकडे लक्ष वेधण्यात आलेत्यातूनच सुरक्षित व लवचिक आर्थिक यंत्रणा तयार होईल यावर एकमत झाले.

जागरूकता निर्माण करण्यातील भूमिका

या अभ्यासक्रमाच्या संवादी सत्रादरम्यान आर्थिक गुन्हेगारीचा राष्ट्रीय आणि जागतिक आर्थिक स्थैर्यावर परिणाम होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. नियम पालन, नियामक चौकट आणि जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धती यांविषयी माहितीचे वाटप करून MFEC ने पैशांची मनी लॉन्ड्रिंग, सायबर फसवणूक आणि कॉर्पोरेट गैरव्यवहारांसारख्या विविध प्रकाराच्या गुन्हेगारीशी लढा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

या उपक्रमाद्वारे तज्ज्ञांच्या नव्या वर्गाला प्रशिक्षिण देण्यासाठी RRU आणि IICA बांधील आहेत. हे तज्ज्ञ या महत्त्वाच्या समस्यांविषयी सार्वजनिक व संस्थात्मक जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. या अभ्यासक्रमाद्वारे व्यावसायिकांना विविध टुल्ससह सक्षम केले जाईल, शिवाय आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित धोके कसे कमी करायचे हे सांगण्यात येईल.

भागधारकांमधील संवाद कायदा सुव्यवस्था यंत्रणा, नियामक मंडळे आणि आर्थिक संस्थांमधील भागिदारी वाढवण्यासाठी, त्यांच्यात सहकार्याला व ज्ञानाच्या देवाणघेवाणीस चालना देण्याच्या उद्दिष्टाने तयार करण्यात आला आहे.

धोरण आणि उद्दिष्टे

२०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतात लवचिक आणि दमदार आर्थिक यंत्रणा विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.

त्याशिवाय सरकारी आणि खासगी क्षेत्रातील व्यावसायिकांचा कौशल्य विकास करून त्यांना आर्थिक गुन्हेगारीविरोधात लढण्यासाठी नेतृत्व स्थानांसह सक्षम करण्याचे ध्येय आहे.

जागतिक दृष्टीकोन

या अभ्यासक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय नियमावलीचा समावेश करण्यात आला असून FATF, INTERPOL सारख्या जागतिक संस्थां तसेच एशिया- पॅसिफिक ग्रुपसह सहकार्यावर सीमेपार आर्थिक गुन्हेगारी प्रभावीपणे हाताळण्यासाठी भर देण्यात आला आहे. सुरक्षित आणि समृद्ध आर्थिक भविष्य घडवण्यासाठी या प्रोग्रॅममध्ये आर्थिक भागधारकांमधील सहकार्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

आपण वेगाने गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीकडे जात आहोत आणि MFEC सारखे उपक्रम संस्थांमध्ये सचोटी व नियमपालनाची संस्कृती रूजवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. हा प्रोग्रॅम आपली अर्थव्यवस्था आर्थिक गुन्हेगारीच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सक्रिय प्रयत्न करणारा आहे.

राष्ट्रीय रक्षा युनिर्व्हसिटीमध्ये सुरू करण्यात आलेला मास्टर्स प्रोग्रॅम इन फायनान्शियल अँड इकॉनॉमिक क्राइम्स आर्थिक गुन्हेगारीच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी करण्यात आलेला महत्त्वाचा उपक्रम आहे. भावी व्यावसायिकांना आवश्यक कौशल्यांनी सक्षम करत RRU ने भारताची आर्थिक गुन्हेगारीला लढा देण्याची क्षमता बळकट करण्याचे ध्येय ठेवले आहे.

शिवजयंती सोहळ्याला ९६ स्वराज्यरथांची मानवंदना

शिवजयंती महोत्सव समिती, पुणे आयोजित विश्वातील सर्वांत मोठा सोहळा 
पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे दर वर्षी प्रमाणे शिवजयंतीला बुधवार, दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता लालमहाल येथून “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा” या भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीचे यंदा सलग १३ वे वर्ष आहे. सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल ९६ स्वराज्यरथांचा सहभाग हे या सोहळ्याचे वैशिष्टय असणार आहे, अशी माहिती सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.  
या मिरवणुकीचे उद्घाटन शिवरायांचे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा अमोल झेंडे. पोलीस उपायुक्त विशेष शाखा मिलींद मोहिते, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, हेमंत रासने, माजी आमदार दिलीप मोहिते, संग्राम थोपटे, संजय जगताप, तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप गिल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, जेष्ठ विधीज्ञ प्रताप परदेशी उपस्थित रहाणार आहेत.

समितीच्या जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत ह्या मानाच्या मुख्य स्वराज्यरथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, त्र्यंबकराव नाईक निंवगुणे, सरदार जैताजी नाईक करंजावणे, सरदार चांगोजी कडू, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुर्याजी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, सरसेनापती संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगदगुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, सरदार पिलाजीराव शिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला, धारदेवास महाराष्ट्राचे श्रीमंत पवार घराणे, श्रीमंत गायकवाड सरकार, श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक, शिवरत्न शिवाजी काशीद जीवाजी महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, शुरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, सरदार भोईटे, सरदार मांढरे, स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे, शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे, पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे, स्वराज्याचे निष्ठावंत सरदार दरेकर , स्वराज्याचे शिलेदार कुंजीर, स्वराज्यनिष्ठ शेळके, वीर फडतरे, राजे साळुंखे चालुक्य राजवंश, स्वराज्यनिष्ठ सरदार बाबर, सिंहगड वीर विठोजी कारके, दुर्ग अजिंक्यतारा वीर किल्लेदार मानाजी साबळे, शुरवीर सावंत स्वराज्यघराणे, सहस्त्री सरदार रामजी पांगारे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, सरदार काळे, वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे स्वराज्यरथ आपआपला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी होणार आहेत. 

भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या ५१ रणरागिनींचे औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी “महाराणी ताराराणी शौर्य पथक” मर्दिनी युद्धकला सादर करणार आहेत. नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा पथक, ५१ रणशिंग पथक सहभागी होणार आहे.    

सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नीलेश जेधे, समीर जाधवराव, गोपी पवार, किरण देसाई, प्रवीणभैय्या गायकवाड, मंगेश शिळीमकर, मोहन पासलकर, किरण शितोळे, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी सोहळ्याचे आयोजन केले आहे. पुणेकरांनी मोठया संख्येने या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर सलग १४ व्या वर्षी  हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर सलग १४ व्या वर्षी  हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करुन शिवजयंती महोत्सव समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड मानवंदना देणार आहेत. एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपतींच्या पूणार्कृती पुतळ्यावर सकाळी ११ ते १ या वेळेत ईशान अमित गायकवाड यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून सलग १४ व्या वर्षी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

पुणे पोलिस आणि पुनीत बालन ग्रुपच्यावतीने आयोजित ‘तरंग’ कार्यक्रम जल्लोषात संपन्न

संगीतकार अजय – अतुलने केले पोलिस कुटुंबियांना मंत्रमुग्ध

पुणे :
संगीतकार अजय- अतुल यांच्या जोडीने एकापेक्षा एक बहादार मराठी- हिंदी गाणी सादर करत पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांना अक्षरश मंत्रमुग्ध करून टाकले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह हिंदी- मराठी सिने क्षेत्रातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती, 70 हून अधिक संगीत गायक आणि वाद्यक, फटाक्याची मोहक अतिषबाजी, उपस्थितांनी गाण्यांवर दरलेला ठेका यामुळे पहिल्याच ‘तरंग’ कार्यक्रमाने पोलिसांची मने जिंकली.
पोलिस अधिकारी-कर्मचारी यांना कुटुंबियासोबत उत्सव साजरा करता यावा यासाठी पुणे पोलिस आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने पोलिस कुंटुंबियासांठी गायक व संगीतकार अजय- अतुल यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांच्यासह अनेक राजकिय नेते मं़डळी, कलाकार उपस्थित होते.
शिवाजीनगर येथील पोलिस ग्राऊंड झालेल्या या ‘तरंग’ कार्यक्रमाची सुरवात शर्वरी जेमनीस यांच्या गणेश वंदननेनी झाली. अभिनेत्री मेघना एरंडे यांनी लहान मुलांच्या कार्यक्रमातील आवाज काढून उपस्थित बाल-चमुंची मने जिंकली. त्यानंतर अजय- अतुल यांच्या प्रत्यक्ष संगीत कार्यक्रमाला सुरवात झाली. नटरंग, मल्हारवारी, वाट देसु देघा देवा, मलहिसमा चॉद हे तु.., आई गोंधळाला ये.. सैराटमधील याड लागल ग याड लागल.., भलतच झालय आज.., चंद्रा.., फॅन्ड्रीमधील जीव झाला वेडा पिसा, डॉल्बी वाल्या बोलवाओ माझ्या डिजेला अशी मराठी- हिंदी एकापेक्षा एक सरस गाणी अजय-अतुल यांनी आणि त्यांच्यासह कलाकारांनी सादर करून उपस्थितांना अक्षरश वेड लावले.. सैराटमधील झिंग झिंग झिंग़ांट या गाण्याने तर उपस्थितांनी तर अक्षरश मैदान डोक्यावर घेतले. देवा श्री गणेशा या गाण्याने संगीत मोहत्सवाची सांगता झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्वांनी शेवटपर्यंत उपस्थित राहून कलाकारांना दाद दिली. यावेळी फटाक्यांच्या अतिशबाजी आणि विदयुत रोषणाईने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

  • उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पोलिसांना सन्मान
    ‘तरंग’ कार्यक्रमात शहर पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचाही फडणवीस आणि पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. एक सराफ पेढीतून चोरलेले तब्बल 17 तोळे सोने पुणे पोलिसांनी परत मिळवून न्यायालयीन प्रक्रिया करून अवघ्या तीन महिन्याच्या आत परत मिळविले. या कार्यक्रमातच ते सराफाला परत करण्यात आले.
  • मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तरंग’ कार्यक्रमाचे कौतुक करताना पोलिसांना चांगल्या वातावरणात जगता आले तर ते चांगले काम करू शकतील. पोलिसांच्या कुंटुंब कल्याणाच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाय योजना राबविण्यात येत असून त्यांच्या आरोग्य सुविधा व घरांचा प्रश्न निकाली काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
  • उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
    महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी तरंग 2025 कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
  • पुनीत बालन यांच्या विशेष सत्कार
    पुणे पोलिसांच्या कुटुंबियांसाठी पुनीत बालन यांनी पुढाकार घेऊन पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून ‘तरंग’ या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व घेतल्याने पुणे पोलिसांच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुनीत बालन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
  • हिंदी-मराठी सिने कलाकार, खेळांडुची हजेरी

अभिनेता बोमन इराणी, नागराज मंजुळे, अजिक्य देव, पुष्कर जोग, सिध्दार्थ जाधव, अमृता खानविलकर, पुजा चोप्रा, स्मिता गोंदकर, दिप्ती देवी, मेघा धाडे, तन्मय जका, केदार जाधव, राहुल त्रिपाटी, ऋतुजा भोसले, प्रीत झांगीयाणी, माध्यव अभ्यंकर ,असे कलाकार यावेळी उपस्थित होते.

मागील वर्षभरात लोकसभा – विधान सभा निवडणूक असो की अन्य कायदा व्यवस्था अथवा गुन्हेगारीला आळा घालणे असो ही परिस्थिती अत्यंत मेहनतीने आणि यशस्वीरित्या हाताळले आहे. पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. त्यांच्या मनोरंजनसाठी आणि आभार व्यक्त करण्यासाठी अजय- अतुल यांचा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
– अमितेश कुमार, पुणे पोलीस आयुक्त.

—————————
समाजातील विविध घटकांसाठी नेहमची काम करत असतो. मात्र आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी जे नेहमची तत्पर असतात त्यांना कुटुंबियासमवेत ना उत्सव साजरा करत येत ना कुठे निवांत वेळ घालविता येत नाही. त्यामुळे पोलिस कुटुंबियासाठी आपण अशा पद्धतीचा कार्यक्रम करावा हा विचार मांडला. मा. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यास तत्काळ होकार दिला. हा तरंग कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी त्यांनी स्वतः खुप मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व मला दिले याबद्दल मी पुणे पोलिसांचा आभारी आहे.
– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन.

युवक काँग्रेस तर्फे पुण्यात बेरोजगारी आणि वाढती नशेखोरीच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन

मोदी सरकारने भारताची प्रतिमा खराब केली – उदय भानु चिब

पुणे – महाराष्ट्रात वाढती बेरोजगारी आणि त्यामुळे वाढणारे गुन्हे यावर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने युवक सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना उदय भानु चिब म्हणाले , “आज आपण इथे उपस्थित राहून हे दर्शवले आहे कि भारत मातेच्या भविष्यासाठी हे आंदोलन किती महत्त्वचे आहे. या 10 वर्षात बेरोजगारी, नशा खोरी, ड्रग्ज रॅकेट याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या व्यसनामुळे केवळ तो व्यसन करणारा युवक बरबाद होतं नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब बरबाद होते. आज या मोदी सरकारने भारताची प्रतिमा खराब केली आहे. हे सरकार झोपेचे सोंग घेऊन बसले आहे, असा आरोप ही यावेळी त्यांनी केला. तसेच बेरोजगारी आणि नशेखोरी थांबवण्यासाठी मोदी सरकार ने प्रयत्न करावे अशी मागणी ही केली.

भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राष्ट्रीय युवक काँग्रेस प्रभारी कृष्णा अल्ला वरू, महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा , कार्यअध्यक्ष शिवराज मोरे , महाराष्ट्र युवक काँग्रेस सह प्रभारी एहसान भाई खान, पुणे शहर युवक काँग्रेस शहराअध्यक्ष सौरभ आमराळे,प्रदेश प्रभारी अजय चीकारा, अध्यक्ष कुणाल राऊत, रोहित कुमार, मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, उमेश पवार, कौस्तुभ नवले, अजित सिंग, वैष्णवी किराड, दीपाली ससाणे, प्रथमेष आबनावे,प्रविण बिरादार, श्रीनिवास नालमवार, तारीक बागवान, गणेश उबाळे, आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“नोकरी द्या नशा नको” अशा घोषणा देत काँग्रेस भवन येथून पदयात्रा करीत हल्लाबोल आंदोलन सुरु करण्यात आले. पुढे बालगंधर्व चौकात आंदोलन कर्त्यांना अडविण्यात आले. तर पोलिसांकडून काही आंदोलन करणार्‍या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शिवराज मोरे म्हणाले , “आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला मिळणारे उद्योग, रोजगार आज गुजरातला पळवण्याचे काम मोदी, शहा करत आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डोळे झाकून बसले आहेत. बेरोजगारीमुळे आज महाराष्ट्र काय संपूर्ण देशातले तरुण देशोधडीला लागले आहेत. वाढत्या बेरोजगारीमुळे अनेक तरुणांनी परदेशात पळ काढला आहे. आज महाराष्ट्र उडता पंजाब झाला आहे. एवढेच काय तर आज बीडचा बिहार झाला आहे. आज महाराष्ट्राची प्रतिमा घसरत चाली आहे. या वाढत्या बेरोजगारीमुळे युवकांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही आजची लढाई निवडणुकी पुरता नाही तर युवकांना जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यत ही लढाई चालू राहणार आहे. ड्रग्सचे रॅकेट महाराष्ट्रात थांबवल्या शिवाय आम्ही ही लढाई थांबवणार नाही”.

एहसान भाई खान म्हणाले ,” आज या आंदोलनात तरुणांचा जोश दिसत आहे. यावरून आपल्याला कळते कि आज देशात बेरोजगारीचे प्रमाण किती वाढले आहे. आज केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार या गोष्टीकडे डोळेझाक करत आहे. अशा या सरकारचे आपल्याला या आंदोलनातून डोळे उघडणी करायची आहे.”

सौरभ अमराळे म्हणाले , “आधी पुण्याची ओळख ही विद्येचे माहेर घर म्हणून होती मात्र आता ड्रॅगचे माहेर घर म्हणून ओळखली जात आहे. आज पुण्यात सर्वात जास्त व्यसनाच्या आधीन गेलेले तरुण पाहायला मिळत आहे”.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त गोरेगाव येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन

मुंबई, दि. १६ फेब्रुवारी २०२५: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या जन्मदिनाचे औचित्य साधून गोरेगाव येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव, संपर्क नेते मुंबई सिद्धेश कदम यांनी या शिबिराचे आयोजन केले.

हे शिबिर सन्मित्र क्रीडांगण, गोरेगाव (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले होते. नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. डोळे तपासणी, मोफत चष्मा वाटप, महिलांचे आजार, कर्करोग तपासणी, बालरोग, दंत काळजी, मधुमेह, रक्तदाब आणि हृदयरोग तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, औषधोपचार आणि ईसीजी तपासणी, सीबीसी तपासणी आणि रक्तदान शिबीर अशा विविध आरोग्याशी संबंधित तपासण्या आणि उपचारांचा समावेश होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

या महत्त्वपूर्ण उपक्रमाला माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार प्रकाश सुर्वे, भाऊसाहेब चौधरी, किरण पावसकर, अमेय घोले, शिवसेना नेत्या मीना कांबळी, मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे यांनी उपस्थित राहून या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विशेष मत

याप्रसंगी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले,
“महाआरोग्य शिबिर हा लोककल्याणासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे. आरोग्य हे प्रत्येक नागरिकाच्या जीवनात मूलभूत भूमिका बजावते. अशा उपक्रमांमधून समाजातील गरजू लोकांना मोफत आणि उत्तम वैद्यकीय सेवा मिळणे आवश्यक आहे.”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

“अतिशय चांगला आणि लोककल्याणकारी उपक्रम सन्माननीय नेते रामदासजी कदम यांच्या विचारांबरोबरच सिद्धेश कदम यांनी उत्कृष्ट पद्धतीने आयोजित केला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते. या शिबिरामुळे अनेक नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय मदत मिळाली.” असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

कार्यक्रमाचे विशेष संयोजन

नगरसेवक शंकर हुडारे, दिंडोशी विभागप्रमुख लालसिंग राजपुरोहित, वैभव भराडकर, स्वप्रिल टेंबवलकर, अल्ताफ पेवेकर, ज्ञानेश्वर सावंत, सौ. वैषवी घाग, सौ. प्रियांका आंबोळकर, सौ. शिल्पा वेळे, सौ. विशाखा मोरये, सौ. पूनम वैद्य यांनी या उपक्रमाचे विशेष संयोजन केले.

भारती विद्यापीठ-कोल्हापूरमध्ये अंतिम लढत

आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स स्पर्धा-विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे आयोजन
पुणे : भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि कोल्हापूरच्या डीवायपीसीईटी संघ यांच्यात विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित आर्किटेक्चर महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्समधील फुटबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटाची अंतिम लढत रंगणार आहे.
वानवडी येथील एस. आर. पी. एफ.च्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीत भारती विद्यापीठ संघाने सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर टायब्रेकमध्ये ४-२ने मात केली. निर्धारित वेळेत ही लढत गोलशून्य बरोबरीत सुटली होती. यानंतर टायब्रेकमध्ये भारती विद्यापीठकडून आर्यसेन काळे, ऋतुराज वाडेलकर, दीपक कश्यप, दिव्यांक मोदक यांनी गोल केले, तर सिंहगड कॉलेजकडून आकाश उटे आणि शुभम बडे यांनाच गोल करता आले. 
दुसऱ्या उपांत्य लढतीत सुजल हळदेने (१५ मि.) केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर कोल्हापूरच्या डीवायपीसीईटी संघाने मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली आणि अंतिम फेरी गाठली.
मुलींच्या गटातील उपांत्य फेरीच्या लढतीत समृद्धी शेंडेच्या (२० मि.) एकमेव गोलच्या जोरावर भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली.
निकाल : उपांत्य फेरी – बास्केटबॉल मुले – मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ३३ वि. वि. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी – ३०; सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ३७ वि. वि. ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर – ३२.
मुली – पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – २३ वि. वि. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी – ११.

व्हॉलिबॉल मुले – डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी वि. वि. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पिंपरी-चिंचवड २५-१४, २०-२५, १५-१३; पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २४-१३, २५-१८.
मुली – भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २५-११, २५-१५; सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी २५-२३, २५-१७.

भारताच्या सांस्कृतिक वारशाशी विद्यार्थी जोडले जावेत – हर्षवर्धन पाटील

अद्वितीय उत्साहात पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा ‘अनंतम २०२५’ सांस्कृतिक सोहळा

पिंपरी, पुणे (दि.१६ फेब्रुवारी २०२५) भारताला शिक्षण, कला, क्रीडा, संस्कृतीचा मोठा वारसा आहे. या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी विद्यार्थी जोडले जावेत यासाठी अनंतम सारखे सांस्कृतिक सोहळे झाले पाहिजेत असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे ‘अनंतम २०२५’ हा वार्षिक सांस्कृतिक सोहळा प्रमुख सेलिब्रिटींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दोन दिवस चाललेल्या या वार्षिक सोहळ्यामध्ये कला, संस्कृती आणि राष्ट्रीय ऐक्याचा भव्य उत्सव अनुभवायला मिळाला. या सोहळ्याच्या आयोजनात ७५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तर ३,००० पेक्षा जास्त प्रेक्षकांनी उपस्थिती राहून सहभागी कलाकारांचा उत्साह वाढविला. पहिल्या दिवशी ‘सैराट’ चित्रपटातील मुख्य कलाकार आकाश ठोसर याने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत कार्यक्रमाची रंगत वाढवली. सांस्कृतिक कार्यक्रम हे विद्यार्थी व्यक्तिमत्त्वविकास, आत्मविश्वास आणि सामाजिक कौशल्ये जोपासण्याचे महत्त्वाचे माध्यम असल्याचे आकाश ठोसर याने सांगितले. दुसऱ्या दिवशीची रंगत ‘नटरंग’ मधील अभिनय व ‘अप्सरा आली’ या गाण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. सोनालीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाला वंदन करणारे ‘शिव गर्जना’ सादर करून उपस्थितांना भारावून टाकले. विद्यार्थ्यांसोबत नाच, गाणी आणि मुक्त संवाद साधत या दोन्ही कलाकारांनी उत्सवाला खराखुरा सोहळ्याचा बाज दिला.
पीसीयूने अवघ्या दोन वर्षांत ३,००० हून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षण देऊन शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर भरारी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीबरोबरच समाज आणि राष्ट्राच्या विकासातही मोठे योगदान आहे असे पीसीयूच्या कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी विविध राज्यांतील लोकनृत्ये व संगीताचे सादरीकरण करून भारताच्या संस्कृतीची विविधता सादर केली हे आपल्या देशाच्या बहुरंगी संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. दोन वर्षात पीसीयूला मिळालेली अनेक मानांकने व पुरस्कार अभिमानास्पद आहे असे प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी सांगितले.
अशा जल्लोषपूर्ण वातावरणातून एकोप्याची भावना वृद्धिंगत होते, ज्यामुळे सर्वांनाच दीर्घकालीन यशासाठी प्रेरणा मिळते असे अभिनेत्री सोनारी कुलकर्णी हिने सांगितले.
पिंपरी चिंचवड विद्यापीठ कुलपती हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) अध्यक्ष
ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

शिवजयंती निमित्त २० हजार विद्यार्थ्यांच्या सहभागाने पदयात्रेचे आयोजन

पुणे, दि. १६: राष्ट्रभावना, सामाजिक सलोखा, युवांच्या संकल्पना जाणून घेणे, कला, संस्कृती व परंपरा जतन करणे, स्वच्छता, पर्यावरण याबाबत जागृकता, राष्ट्र निर्माणात मोलाचे योगदान देणा-या व्यक्तिमत्वाच्या कार्याचे आदर्श युवा पिढी पर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने शिवजयंती दिनी ” जय शिवाजी, जय भारत” पदयात्रेचे सकाळी ९.३० वा. ते १२.३० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.

सांस्कृतिक वारसा जतन करणे यासाठी केंद्र शासनाच्या युवा कल्याण व खेळ मंत्रालय व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्र व राज्याच्या शाश्वत विकासात युवांचे मोलाचे योगदान आहे. युवांमध्ये नेतृत्व गुण, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक सेवा भाव, शासकीय उपक्रमांबाबत माहिती व सहयोग यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यामुळे या पदयात्रेत युवा व क्रीडा पुरस्कारार्थी तसेच शहरातील सुमारे १५००० ते २०००० विद्यार्थी व युवा सहभागी होणार आहेत. या पदयात्रेला राज्याचे मुख्यमंत्री, नागरी विमान वाहतूक आणि सहकार केंद्रीय राज्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, क्रीडा व युवक कल्याण व अन्य मंत्री सहभागी होणार आहेत.

पदयात्रेचा सकाळी ९.३० वाजता सी.ओ.ई.पी तंत्रनिकेतेन विद्यापीठ, शिवाजीनगर पुणे येथील क्रीडांगणावरुन प्रारंभ करण्यात येणार आहे. पदयात्रेचा मार्ग सी.ओ.ई.पी. होस्टेल गाऊंड, शिवाजीनगर ते फर्ग्युसन महाविद्यालय असा राहील. सी.ओ.ई.पी. होस्टेल ग्राऊंड, डावीकडे वळून स.गो. बर्वे चौक, डावीकडे वळून एआयएसएसपीएमएस कॉलेज, छ. शिवाजी महाराज पुतळा अभिवादन (हॉल्ट नं. १) उजवीकडे वळून कोर्टासमोरील गेटमधून उजवीकडे वळून छ. शिवाजी महाराज पुतळा चौक, उजवीकडे वळून स.गो. बर्वे चौक, डावीकडे वळून जंगली महाराज रोडने झाशीचीराणी चौक (हॉल्ट नं. २) छ. संभाजी महाराज पुतळा, खंडोजी बाबा चौक यु टर्न करून गुडलक चौक, फर्ग्युसन कॉलेज गेट डावीकडे वळून फर्ग्युसन कॉलेज असा मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागाचे अधिकारी यांचेमार्फत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. पदयात्रेमध्ये शहरातील युवा, युवतींनी, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक युवराज नाईक यांनी केले आहे.

मंगळवार पेठेतील ‘ती’ जागा ४०० कोटीची अन विकली ७० कोटीला, मंत्र्याशी संबधित बिल्डरला केले मालामाल

पुणे- मंगळवार पेठेतील डॉक्टर आंबेडकर भवन लगतची म्हणजे ससून डेड हाउस च्या अगदी समोरची सव्वादोन एकराची जागा जिचे आज बाजार मूल्य ४०० कोटीच्या घरात असल्याचे बोलले जाते ती जागा एका बड्या मंत्र्याशी संबधित असलेल्या बिल्डरला अवघ्या ६० ते ७० कोटीत विकल्याची माहिती पुढे येते आहे. या संदर्भात पुण्यातल्या अनेकांनी चुप्पी साधली असून एवढे मोठे प्रकरण दडपले कसे यावर आश्चर्य व्यक्त होत आहे .

पूर्वी हि जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची होती ती त्यांनी एम एस आर डीसी ला ९९ वर्षाच्या लीजने दिली . आणि MSRDC ने रिंग रोडला भाग भांडवल हवे म्हणून तब्बल ४०० कोटीची हि जागा एका मंत्र्याशी संबधित अशा बिल्डरला अवघ्या ६० ते ७० कोटीत बहाल करून टाकली असे वृत्त येथे समजले आहे. हे सारे कसे चिडीचूप पद्धतीने झाले यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. आंबेडकर भवन ला पार्किंग साठी हि जागा द्यावी , ससून लाच कॅन्सर रुग्णालय उभारण्यासाठी हि जागा द्यावी अशा मागण्या होत असताना सरकारी जागा विकण्याचा हा डाव यशस्वी करण्यात आलाच कसा? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. आणि पुण्यातील नेते मंडळी याबाबत नेमकी काय भूमिका घेणार कि ते सहज पणे दुर्लक्ष करत चुप्पी साधणार हे काळच प्रत्यक्ष दर्शविणार आहे .

जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयांचे उद्घाटन संपन्न

पुणे, दि. १६: पक्षकारांचे जीवन हे वकिलाच्या हातात असते त्यामुळे पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने नवीन वकिलांनी कायम ज्येष्ठ वकिलांकडून न्यायाधिशांसमोर खटला मांडणी, खटला पडताळणीबाबत सतत अध्ययन करीत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी केले. ‘सर्वांसाठी आणि सर्वांपर्यंत न्याय’ या उद्देशाने जिथे जिथे आवश्यक आहे तेथे न्यायालयीन पायाभूत सोयी सुविधा वाढविण्यात येत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरीफ सा. डॉक्टर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे महेंद्र महाजन, आमदार शरद सोनवणे, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जुन्नर एस.एस. नायर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲड. ए. एच. हुसेन, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. अहमद खान पठाण, ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. विठ्ठल कोंडे-देशमुख, ॲड. राजेंद्र उमाप आदी उपस्थित होते.

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे म्हणाल्या, जनतेला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी न्यायिक पायाभूत सोयी सुविधा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. खटल्यांची वाढलेली संख्या, त्यामाध्यमातून जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास याबाबीचा विचार करुन जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा हा देशातील सर्वाधिक मोठा न्यायिक जिल्हा आहे. त्यामुळे आवश्यक तेथे न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.

जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन झाल्यामुळे विविध प्रकारचे खटले दाखल होईल, प्रत्येक खटले पीडित व आरोपीच्यादृष्टीने महत्वाचे आहेत. त्यामुळे न्यायाधिश आणि वकील यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. न्यायालयाचा आपल्यावरील विश्वास गमावू नये यासाठी प्रत्येक खटल्याचा बारकाईने वकिलांनी अभ्यास केला पाहिजे; प्रत्येक खटल्याची पडताळणी केली पाहिजे, लोकांच्या हक्कासाठी त्यांचे रक्षक बनून त्यांचे संरक्षण करावे. खटल्याचा गांभीर्याने विचार करुन वकिलांनी न्यायालयात पुरावे सादर केले पाहिजे. नवोदित वकिलांनी वकिली करताना कठोर परिश्रम करीत राहिले पाहिजे, कायद्याचा परिपूर्ण अभ्यास करून विविध कलमाचा वापर करुन पक्षकारांना वस्तुनिष्ठपद्धतीने न्याय मिळवून दिला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

जुन्न्र येथील न्यायालयात तालुक्यातील खटले वेगाने चालून नागरिकांना वेळेत आणि गतीने न्याय मिळू शकेल. न्यायदानाला लागणारा विलंब हा न्याय नाकारण्यासारखा असतो त्यामुळे हा विलंब होऊ नये यासाठी वकिलांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे पक्षकारांना त्रास होऊ नये यासाठी वकिलांनी वारंवार सुनावणीच्या तारखा मागू नयेत, कौटुंबिक हिंसाचाराच्याबाबतीत वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करावे, याकरीता न्यायाधीशांचीही मदत घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा -उपमुख्यमंत्री अजित पवार

जुन्नर येथील जुन्या न्यायालयाची इमारत सन १८३८ या सालाची असून विविध राजवटीचे कामकाज परिसरातील भुईकोट किल्ला, गढी येथून चालत होते; या ऐतिहासिक वास्तूचा पुनर्विकासाबाबतच्या विविध मागण्या विचारात घेवून न्यायालय, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वकील संघटना तसेच आदींनी मिळून विकास आराखडा तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

आपल्या देशात, राज्यात न्यायव्यवस्थेवर जनतेचा मोठा विश्वास आहे. लोकशाहीच्या रक्षणामध्ये न्यायालयांच खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे राज्यात आवश्यक येथे न्यायालयीन इमारती उभ्या करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जुन्नर येथील न्यायालयीन इमारत परिसर विकास आणि निवासस्थानाबाबत कार्यवाही करण्यात येत असून याकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. आगामी काळात जुन्नरवासियांना अभिमान वाटेल असाप्रकारचा परिसर विकसित करण्यात येईल, असेही श्री. पवार म्हणाले.

न्यायालयीन वास्तू दिमाखदार तसेच सर्व सुविधांनीयुक्त असल्या पाहिजेत आणि त्यामधून नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे, याकरीता जिल्ह्यात टप्प्याने न्यायालयीन इमारतीचा विकास करण्यात येत आहे. जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचे आज उद्घाटन करण्यात आले असून आज जुन्नरवासियांच्या न्यायिक इतिहासात आजचा दिवस एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. या न्यायालयामुळे पक्षकरांना खेड-राजगुरुनगर येथे जाण्या-येण्याची वेळ तसेच इंधनाची बचत होणार असून परिणामी त्रासही कमी होणार आहे.

न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हेगारी खटले, दिवाणी आणि फौजदारी खटले निकाली काढण्यास निकाली काढण्यास मदत होणार आहे. परिसरातील नवोदित वकिलांना सेवा देण्याची संधी उपलब्ध होण्यासोबतच त्यांच्या व्यवसायात वाढ होईल. शिवाजीनगर येथील वकिलांच्या मागणीबाबत सकारात्मक विचार इमारतीला साजेसे असे स्वच्छतागृह आणि परिसराचा विकास करण्यात येईल. मुंबई येथे उच्च न्यायालयासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी बीकेसी येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, देशातील उत्तम वास्तूविशारदाकडून उत्कृष्ट आराखडा उपलब्ध करुन देण्यात यावा. देशातील सर्वात चांगली उच्च न्यायालयाची इमारत मुंबई येथे उभारु, अशा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.

भारतीय संविधानानुसार न्यायालय देशात कायद्याची अंमलबजावणी करण्यासोबतच नागरिकांना न्याय देण्याची भूमिका बजावतात. भारतीय संविधानाने न्यायालयाला स्वातंत्र्य दिले असल्यामुळे ते निर्भयपणे आणि तत्वनिष्ठ काम करीत असतात. न्यायालय एक लोकशाहीचा स्तंभ असून नागरिकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेचे राज्य संकल्पना डोळयासमोर ठेवून वकिलांनी पक्षकाराची बाजू मांडून न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

न्यायमूर्ती श्री. मारणे म्हणाले, पुणे हा देशातील सर्वात मोठा न्यायालयीन जिल्हा असून एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आजच्या घडीला प्रलंबित असलेल्या ५३ लाख खटल्यांपैकी ७ लाख १० हजार खटले एकट्या पुणे जिल्ह्यात प्रलंबित आहेत. हे साठलेले खटले निकाली काढण्यासाठी नवीन न्यायालयीन सोयी सुविधा उभारणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. न्यायालयीन व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास असून तो टिकवण्यासोबतच निकाल वेळेत लावण्याकरीता प्रयत्न करावे. याकरीता वकिलांनी स्वत:चा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

न्यायमूर्ती आरीफ सा. डॉक्टर म्हणाले, जुन्नर येथील न्यायालयीन व्यवस्था बळकट करण्याच्यादृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. परिसरातील सर्वसामान्यांना पारदर्शकपद्धतीने वेळेत न्याय मिळवा यासाठी आपल्याला सामूहिक प्रयत्न करावे लागतील, असेही ते म्हणाले.

न्यायाधीश श्री. महाजन म्हणाले, उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार काम करीत असताना राज्यशासनाची मदत आवश्यक असते. राज्यशासनाच्या सहकार्यामुळे जिल्ह्यात पाच जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. आज जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये सुरू झाले असून परिसरातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे, असे श्री. महाजन म्हणाले.

ॲड. अहमदखान पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुन्नर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवदास तांबे यांनी केले.

यावेळी विधी व न्याय विभागाचे सचिव सतीश वाघोले, सहसचिव विलास गायकवाड,
माजी आमदार बाळासाहेब दांगट, अतुल बेनके, न्यायाधीश, वकील, विविध वकील संघटनांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
0000

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला प्रतिष्ठेचा राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार

मुंबईदि. १६ फेब्रुवारी २०२५ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा म्हणून सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेला ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठेचा स्कोच सुवर्ण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचसोबत महावितरणच्या सौर ग्राम योजनेला स्कोच रजत पुरस्कार मिळाला. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे हे पुरस्कार स्वीकारले.

स्कोच समुहातर्फे दरवर्षी सार्वजनिक क्षेत्रात उपयुक्त ठरलेल्या विविध योजनांसाठी पुरस्कार देण्यात येतात. विविध तज्ज्ञांकडून अत्यंत काटेकोरपणे परीक्षण होऊन ज्युरींच्या मतांच्या आधारे हे पुरस्कार दिले जातात. सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठीचे हे पुरस्कार प्रतिष्ठेचे मानले जातात.

अपर मुख्य सचिव ( ऊर्जा ) आभा शुक्ला यांच्या संयोजनात राज्याचा ऊर्जा विभाग, महावितरण आणि महसूल विभागातर्फे समन्वयाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. या योजनेत विकेंद्रित स्वरुपात सौर ऊर्जा निर्मिती करून त्यावर कृषी पंप चालविण्यात येतात. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एप्रिल २०२३ मध्ये ही योजना सुरू झाल्यानंतर गतीने अंमलबजावणी सुरू आहे. आतापर्यंत ४९ प्रकल्प पूर्ण झाले असून त्यांची क्षमता २०३ मेगावॅट आहे. मार्च २०२६ पर्यंत ही योजना पूर्ण होईल व राज्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर चालविण्याचे स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळे सौर कृषी पंपांसाठी १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जानिर्मिती क्षमता निर्माण होणार आहे. ही जगातील सर्वात मोठी विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती योजना आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे कृषी पंपांना दिवसा व दर्जेदार वीज पुरवठा होईल व शेतकऱ्यांची अनेक दशकांची मागणी पूर्ण होईल. त्यासोबत या योजनेत अत्यंत किफायतशीर दरात वीज उपलब्ध होत असल्याने महावितरणचा वीज खरेदीचा खर्च कमी होऊन उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा दूर करण्यात मदत होत आहे. या योजनेमुळे राज्यात खासगी विकसकांकडून ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून ग्रामीण भागात ७० हजार रोजगार निर्माण होत आहेत. ही ऊर्जा क्षेत्रातील गेम चेंजर योजना आहे.

महावितरण राज्यात सौर ग्राम योजनेत १०० गावे विकसित करत आहे. या योजनेत गावामध्ये छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून सर्व घरांसाठी लागणारी वीज गावातच निर्माण केली जाते. त्यासोबत ग्रामपंचायत कार्यालय, रस्त्यावरील दिवे, जिल्हा परिषदेची शाळा, पाणी पुरवठा योजना अशा सर्वांसाठी सौर ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे गावाचे वीजबिल शून्य होते तसेच पर्यावरण रक्षणाला मदत होते. सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी हे राज्यातील पहिले सौर ग्राम ठरले आहे. आतापर्यंत सहा गावे सौर ग्राम झाली आहेत.

संगीताचा रियाज अभ्यासासाठी उपयुक्त

शास्त्रीय गायिका सानिया पाटणकर यांचे मत

पुणे :- मनाची शांतता, एकाग्रता, व्यक्तिमत्त्वाची जडण घडण, स्वास्थ्य यासाठी संगीत उपकारक आहे. संगीताचा रियाज अभ्यासासाठी ही उपयुक्त ठरतो. म्हणून त्यासाठी वेळ काढला पाहिजे असे मत प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सानिया पाटणकर यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांस्कृतिक समिती आयोजित हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभावेळी
पाटणकर बोलत होत्या.

याप्रसंगी उपाध्यक्ष ऍड.अशोक पलांडे,कार्यवाह डाॅ.आनंद काटिकर,प्राचार्य डाॅ. विजय तिडके सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे उपस्थित होते.

पाटणकर म्हणाल्या, “मी पुण्यातील शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना जाते. परंतु शंभरहून अधिक स्पर्धकांचा समावेश असणारी ही पुण्यातील पहिलीच घटना आहे. इंटरनेटमुळे संगीताचा खूप मारा होतो. बदलत्या काळानुसार काय ऐकायचे ते ठरवावे लागेल.”

शास्त्रीय संगीत हे शाश्वत असून,अभिजात संगीत विषयाची अभिरूची अधिक वाढावी यासाठी संस्थेने शालेय व महाविद्यालयीन स्तरावर ही स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेत १६० विद्यार्थी सहभागी झाल्याचे मिलिंद कांबळे यांनी सांगितले.

उद्घाटन प्रसंगी जेष्ठ शास्त्रीय गायिका माधुरी डोंगरे म्हणाल्या,” संगीत ही अत्यंत श्रेष्ठ कला आहे. ती श्रोत्यांच्या साक्षीनेच सादर करावी लागते. त्यामुळे इतर कलांच्या तुलनेत ती सादर करताना परफेक्शन लागते. संगीताचा अध्यात्माशी जवळचा संबंध आहे त्यातून आत्मचिंतनाचा मार्ग सापडतो.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपाली देशपांडे यांनी केले.आभार प्रा. जगदीश पाटील यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल

शास्त्रीय गायन स्पर्धा

लहान गट
प्रथम
आरोही अद्वैत देवधर
मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय

द्वितीय
प्रज्ञा प्रसाद भुजंग अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स

तृतीय
आनंदी सोमनाथ जायदे
मा.स.गो ळवळकर गुरुजी विद्यालय

उत्तेजनार्थ
युगंधरा विक्रांत दाभाडे न्यू इंग्लिश स्कूल सातारा.

शास्त्रीय गायन स्पर्धा
मोठा गट

प्रथम
विभा केदार हरिश्चंद्रकर
डी. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल

द्वितीय
सृजन सारंग कालेकर
एन.ई. एम.एस
तृतीय
कणाद अद्वैत देवधर
मा.स.गो ळवळकर गुरुजी विद्यालय

शास्त्रीय हार्मोनियम वादन स्पर्धा
लहान गट
प्रथम
संहिता हेरंब फडके
मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय

द्वितीय
तेजस्विनी समर्थ काळोखे
द्रविड हायस्कूल वाई

तृतीय
सृष्टी नितीन भोसले
न्यू इंग्लिश स्कूल सातारा

उत्तेजनार्थ
सत्यन धनराज सावंत
मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय

शास्त्रीय हार्मोनियम वादन स्पर्धा

मोठा गट
प्रथम
पार्थ वैभव जोशी
डी. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल

द्वितीय
दिशा शिरीष सपकाळ
मा.स.गो ळवळकर गुरुजी विद्यालय

तृतीय
विराज सचिन सुतार
न्यू इंग्लिश स्कूल सातारा

शास्त्रीय तबला वादन स्पर्धा
लहान गट
प्रथम
शर्वरी मंगेश दर्भे

द्वितीय विभागून
क्षितिज काटे
डी. ई. एस. इंग्लिश स्कूल
कौस्तुभ धनंजय मावडीकर
एन. ई एम. एस

तृतीय विभागून
गंधार देशपांडे
श्रेया घोडके

मोठा गट

प्रथम
जय प्रवीण झोपे
डी. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल

द्वितीय विभागून
अजितेश सोमनाथ जायदे
मा.स.गो ळवळकर गुरुजी विद्यालय

शैलेश पंडित

तृतीय विभागून
अवनीश पटवर्धन
डी. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल
श्रेयस बर्गे
शास्त्रीय संगीत स्पर्धा गायन व वादन -२०२५
पारितोषिक विजेते विद्यार्थी

महाविद्यालयीन गट –
गायन स्पर्धा –

प्रथम – समिता सांबारे ( विल्गिंडन कॉलेज, सांगली )
द्वितीय- ईश्वरी दुलांगे ( फर्ग्युसन कॉलेज, पुणे.)
तृतीय – स्वराली सांबारे ( चिंतामणराव मॅनेजमेंट कॉलेज,सांगली )

सुर वाद्य स्पर्धा
प्रथम – सिद्धी देशपांडे – फर्ग्युसन कॉलेज,पुणे.
द्वितीय – सिद्धांत कांबळे ( फर्ग्युसन कॉलेज, पुणे.)
तृतीय – सिया निमकर ( नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज,पुणे.)

केळकर संग्रहालयात उमटले सी. रामचंद्र यांचे सूर !

पुणे :

मराठी,हिंदी चित्रपट संगीताच्या दुनियेत ३ दशकांहून अधिक काळ आपल्या सुमधूर संगीताने,रसिकांच्या मनावर राज्य करणारे गायक व संगीतकार स्व.सी.रामचंद्र तथा रामचंद्र नरहर चितळकर यांच्या वापरातील पियानो आता राजा दिनकर केळकर संग्रहालयात देणगी स्वरुपात दाखल झाला आहे.रविवार,दि.१६ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संग्रहालयामध्ये छोटेखानी समारंभामध्ये हा पियानो सुप्रसिद्ध अॅकॉर्डियन वादक इनॉक डॅनियल यांचे हस्ते स्वीकारण्यात आला.

सी.रामचंद्र अण्णांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी बेन यांनी हा पियानो मुंबईस्थित सुरेश यादव यांच्या कुटुंबियांकडे त्याची जपणूक करण्यासाठी सुपूर्द केला होता.पियानोचे सुयोग्य जतन राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये होईल व पुढील पिढ्यांना तो पाहता येईल या स‌द्भावनेने सुरेश यादव यांनी तो संग्रहालयास सुपूर्द करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता.

या छोटेखानी समारंभास सुरेश यादव हे सपत्नीक,त्यांच्या स्नेह्यांसह उपस्थित होते.संग्राहक दिनकर केळकर यांचे पुतणे ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ.श्रीकांत केळकर, संगीत क्षेत्रातील जाणकार अभ्यासक डॉ.प्रकाश कामत ,मेलडी मेकर्सचे सुहासचंद्र कुलकर्णी, मंगेश वाघमारे,श्याम मोटे,नितीन मेणवलीकर,संग्रहालयाचा कर्मचारी वर्ग विशेषकरून उपस्थित होते. राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी स्वागत केले.सुरेश यादव,इनॉक डॅनियल यांनी सी. रामचंद्र यांच्या आठवणी सांगीतल्या, दोघांनीही पियानोवर ‘ भोली सुरत दिल के खोटे’ च्या सुरावटी वाजवून उपस्थितांना संगीताच्या सुवर्णकाळात नेले.

सी.रामचंद्र तथा अण्णांनी अनेक गाणी याच पियानोवर बसून संगीतबद्ध केली होती.१९७५ मध्ये अण्णांनी सुरू केलेल्या ‘मुलाये न बने’ या वाद्यवृंदात श्री.यादव यांनी सॅक्सोफोन वाजविण्यास सुरुवात केली होती. श्री.यादव यांची दोन्ही मुले सुशांत आणि संदेश हेही याच पियानोवर शिकले. संगीत सहाय्यक रचनाकार इनॉक डॅनियल यांनी सी.रामचंद्र यांचेसह इतर विविध संगीतकारांसोबतही अप्रतिम अॅकॉर्डियन वादन केले आहे.आपल्या यशस्वी हिंदी चित्रपट कारकीर्दीत पाश्चिमात्य संगीताचा उत्तम वापर करणारे सी. रामचंद्र हे पहिले संगीतकार होत. सी. रामचंद्र यांनी आपल्या यशस्वी संगीत कारकीर्दीत ११८ हिंदी, ७ मराठी, १ तमीळ व १ तेलगू चित्रपटांना उत्तम संगीत दिले. शहनाई, आशा, अनारकली, अलबेला, आझाद अशा निवडक व लोकप्रिय चित्रपटांचा उल्लेख वानगीदाखल करता येईल.

पुण्याला पुरेसे पाणी पुरवण्यात भाजपची टाळाटाळ

चंद्रकांत पाटील, आता तरी विखे पाटलांना समज देतील का?-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : शहराची वाढती मागणी लक्षात घेता जलसंपदा खात्याने २१ टीएमसी पाण्याचा कोटा तातडीने मंजूर करायला हवा. भाजप सरकार यात टाळाटाळ का करत आहे? त्याचा भुर्दंड पुणेकरांना सोसावा लागत आहे, आता तरी मंत्रीमहोदय चंद्रकांत पाटील हे आपले सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाण्याच्या कोट्याबाबत समज देतील काय? असा सवाल माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे.

पुणे महापालिकेला १४ टीएमसी पाणी कोटा जलसंपदा खात्याने मंजूर केला. परंतु वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा कोटा वाढविण्याची गरज आहे. ही वाढीव मागणी मंजूर न करता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की, ‘महापालिकेला जादा पाणी वापराबद्दल दंड ठोकू’, हे त्यांचे म्हणणे अन्यायकारक आहे. पुणे शहर हे महानगर म्हणून आकार घेत आहे. गेल्या काही वर्षात पुण्याची लोकसंख्या ५० लाखांहून अधिक झाली आहे. याची कल्पना जलसंपदा खात्याच्या मंत्र्यांना नसावी, याचे आश्चर्य वाटते. महापालिकेला दंड ठोकण्याची भाषा करणाऱ्या जलसंपदा मंत्र्यांना कोथरूडचे आमदार आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री अजित पवार हे ही त्यांना माहिती का देत नाहीत? याचेही कोडे आहे. भाजपच्या मंत्र्यांमध्ये विसंवाद आहे. त्याचा परिणाम पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

खडकवासला धरण साखळीतून पुण्याला २१ टीएमसी पाणी मिळावे, अशी मागणी चंद्रकांत पाटील या मंत्री महोदयांनी केली होती. त्यांच्या या मागणीचा त्यांनाच विसर पडला आहे का? याचा उलगडा व्हायला हवा. चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भरभरून मते दिली. निवडणूक काळात मोठमोठी आश्वासनं भाजपने दिली होती. प्रत्यक्षात पाण्याची मूलभूत मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ पूर्ण करू शकत नाहीत. पुणेकरांच्या मागणीबाबत टाळाटाळ चालू आहे. हा प्रकार संतापजनक आहे. पुणेकरांना २१ टीएमसी पाणी मिळण्यासाठी अजून किती काळ वाट पहावी लागणार आहे? हे आता चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करावे आणि जलसंपदा आणि महापालिका यामधील संघर्ष तरी मिटवावा, असे मोहन जोशी यांनी पसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पाण्याचा कोटा वाढवून मागताना पुणे महापालिकेने पाण्याच्या फेरवापराची प्रक्रिया पूर्ण करायला हवी, असा सल्ला जलसंपदा मंत्र्यांनी दिलेला आहे. सांडपाणी फेरवापर प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने अर्थसहाय्य करण्याची गरज आहे. हे सुध्दा चंद्रकांत पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांना सांगायला हवे. महायुती सरकारमधील या मंत्र्यांनी परस्परांमधील श्रेय वाद, शह-काटशह ही स्पर्धा बंद करून, पुणेकरांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचे प्रस्ताव 22 फेब्रुवारीपर्यंत सादर करा

पुणे दि. 16 -: राज्यातील नोंदणीकृत मदरशाच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचे 2024-25 साठीचे प्रस्ताव 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजने अंतर्गत पात्र मदरशांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, या योजने अंतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या मदरशांनी त्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत अल्पसंख्यांक विकास विभागाच्या 11 ऑक्टोबर 2013 च्या शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या निकषानुसार तपासणी करुन पात्र मदरशांची शासनास शिफारस करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येतील.

तसेच राज्यातील नोंदणीकृत शाळांच्या आधुनिकीकरणासाठी धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपरिषद व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2024-25 मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार शासन निर्णय 7 ऑक्टोबर 2015 अन्वये या योजने अंतर्गत पात्र शाळांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. 7 ऑक्टोबर 2024 अन्वये सदर योजनेअंतर्गत पायाभूत सोयीसुविधेसाठी देण्यात येणार्‍या अनुदानाची रक्कम 2 लाखा वरून वाढवून 10 लाख करण्यात आली आहे.

शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या निकषानुसार तपासणी करुन पात्र शाळांची शासनास शिफारस करण्यासाठी इच्छुक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.