Home Blog Page 434

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

“संवेदनशील प्रश्नांवर उपाय शोधताना स्त्री आधार केंद्राची भूमिका उल्लेखनीय – डॉ. पंकज देशमुख”

पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५:
महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली.

सार्वजनिक सणांच्या वेळी महिलांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी स्वयंसेवकांना कायद्याविषयी प्रशिक्षण देण्याचा हा २३ वा उपक्रम होता.
पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश गणेशोत्सवासारख्या गर्दीच्या काळात महिला, मुली आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार, छेडछाड, चोरी किंवा लहान मुलांच्या अपहरणासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी महिला कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे हा होता. या कार्यक्रमात पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी २० पोलीस ठाणे येथील दक्षता समितीच्या महिलांनी सहभाग नोंदवला होता.

यावेळी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख यांनी ‘सण आणि महिला सुरक्षितता: कायदेसंरक्षण यंत्रणा व समाजाची भूमिका’ या विषयावर संवाद साधला. स्त्री आधार केंद्र आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी काम करताना कोणतीही समस्या सोडवणे अधिक परिणामकारक आणि सुलभ होते. त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य आमच्यासाठी नेहमीच अत्यंत उपयुक्त ठरते असे श्री देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमामध्ये बॉम्बस्फोट विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पोपट येले यांनी स्फोटके आणि बॉम्बशोधक पथकाच्या जबाबदारीबद्दल माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षक श्री. विवेक नायडू यांनी शहरी आपत्ती व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.

डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, गणेशोत्सव महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे, मात्र सार्वजनिक गर्दीत महिलांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. स्वयंसेवकांची उपस्थिती महिला, मुली आणि लहान मुलांसाठी खूप आश्वासक असेल. तसेच, सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या प्रत्येक महिला कार्यकर्त्याच्या योगदानाला त्यांनी दाद दिली.

यावेळी, फ्रान्समधील जीझेल पेलिकॉ यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्धच्या लढ्याचे उदाहरण देत, डॉ. गोऱ्हे यांनी प्रत्येक अन्यायग्रस्त महिलेने त्यांचे अनुकरण करावे असे आवाहन केले. या कार्यशाळेमुळे पुणे शहरातील गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक मजबूत सामाजिक यंत्रणा तयार होत आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या प्रशिक्षणाचा अनुभव कार्यकर्त्यांना आगामी काळात काम करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त अपर्णा पाठक यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेमार्फत राज्यभरात महिलांसाठी बचत गट आणि कायदेविषयक प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेतले जातात. प्रशिक्षित स्वयंसेवक गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या वेळी पोलिसांना मदत करतील. गेल्या वर्षी देखील या स्वयंसेवकांनी हरवलेल्या लहान मुलांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात मदत केली होती. गर्दीच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा तयार करणे, छेडछाड थांबवणे, आणि गरजेनुसार मदत पुरवणे अशा अनेक कामांसाठी त्यांना प्रशिक्षित करण्यात आले.

पुण्यात भर चौकात दोन पोलिसांवर चौघांचा हल्ला

पुणे-पुणे येथील मुंबई-पुणे रस्त्यावरील खडकी मधील चर्च चौकात दुचाकी वेडीवाकडी चालवल्याने जाब विचारणाऱ्या पोलिसांना भरचौकात टोळक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यांचा गणवेश फाटला असून खडकी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जुनैद इक्बाल शेख (२७), नफीज नौशाद शेख (२५), युनुस युसुफ शेख (२५) आणि आरिफ अक्रम शेख (२५) यांचा समावेश आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी गोपाल गोठवाल (२८) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी गोठवाल आणि काजळे हे मुंबई-पुणे महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी दोन आरोपी दुचाकीवरून भरधाव वेगाने निघाले होते. पोलिसांनी त्यांना दुचाकी वेडीवाकडी का चालवतात अशी विचारणा केली.आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करून “विचारणा करणारा तू कोण?” असे म्हटले. पोलिसांनी त्यांना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले असता दोघांनी पोलिसांना मारहाण सुरू केली. त्यानंतर आणखी दोन आरोपी दुसऱ्या दुचाकीवरून तेथे आले आणि त्यांनीही पोलिसांना मारहाण केली.

मारहाणीत गोठवाल रस्त्यावर पडले आणि चारही आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचा गणवेश फाटला. काजळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की केली.काजळे यांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती कळवली. गस्त घालणारे पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आणि चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मारहाणीत पोलीस कर्मचारी गोठवाल यांच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली आहे.सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले या प्रकरणाचा तपास करत आहेत.

वैदिक संस्कृतीवर दाही दिशांनी आक्रमणे; जपणुकीची जबाबदारी प्रत्येकाची-डॉ. शंकर अभ्यंकर

: वैदिक संमेलनात ब्रह्मवृंदांचा विशेष सन्मान

पुणे : वसुधैव कुटुंबकम्‌‍ची विचारधारा आपल्या राष्ट्रात नांदते आहे. भारतीय सनातन परंपरा,धर्म अलौकिक व सर्वसमावेशक आहे. विश्वरूपी घराचे देवघर म्हणजे आपले भारतवर्ष आहे. यात अनेक ऋषी, महात्मे, आचार्य, संत यांचे स्थान मोलाचे आहे. आज वैदिक संस्कृतीवर दाही दिशांनी आक्रमणे होत आहेत. त्यामुळे तिचा संकोच झाला आहे. अशावेळी धर्म व संस्कृतीची जपणूक, रक्षण करण्याचे कार्य प्रत्येकाकडून घडावे, अशी अपेक्षा विद्यावाचस्पती प्रा. डॉ. शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केली.

श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम्‌‍, दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्‌‍, शृंगेरी आणि वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वैदिक संमेलनात आज (दि. 2) ब्रह्मवृंदांचा सन्मान श्रीशारदापिठम्‌‍ शृंगेरीचे महाप्रबंधक पी. ए. मुरली यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी प्रा. डॉ. शंकर अभ्यंकर बोलत होते. संमेलन शिवशंकर सभागृह, महर्षिनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. वे. मू. भानुदास नरसिंह जोशी (ऋग्वेद घनपाठी), वे.मू. मंदार नारायण शहरकर (शुक्ल यजु. माध्यं. घनपाठी), वे. मू. राजेश गोविंद जहागिरदार (शुक्ल यजु. काण्व घनपाठी), वे. मू. किरण अरुण गोसावी (अथर्व वेद), वे. शा. सं. विश्वासशास्त्री देशमुख (घोडजकर), विद्यावाचस्पती प्रा. शंकर अभ्यंकर आणि गोसेवक गजानन अवचट यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री शृंगेरी शारदा पीठाचे महाराष्ट्र प्रतिनिधी वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेचे कार्याध्यक्ष भगवंत ठिपसे, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेचे कोषाध्यक्ष श्रीकांत फडके मंचावर होते. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, महावस्त्र, मानधन देऊन ब्रह्मवृंदांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

पुढील पिढीला धर्मसंस्कृतीचे ज्ञान करून देण्याचे उत्तरदायित्व घनपाठींचे आहे, असे सांगून डॉ. शंकर अभ्यंकर पुढे म्हणाले, हिंदू धर्म विरोधात षडयंत्र रचले जात असताना ब्रह्मवृंदांकडून लोकपालन व्हावे. यासाठी समाजात मोठ्या प्रमाणात जागरण होण्याची आवश्यकता आहे. आज हिंदू धर्माचा, वैदिक संस्कृतीचा प्रभाव वाढविण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होऊन राष्ट्र उद्धाराचे काम करत देशाला पुन्हा विश्वगुरू रूप प्राप्त करून द्यावे.

पी. ए. मुरली म्हणाले, अनेक वेदमूर्तींनी आपले संपूर्ण जीवन वेदशास्त्राच्या अभ्यासासाठी व प्रचार आणि प्रसारासाठी समर्पित केले आहे. दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्‌‍, शृंगेरीचा मुख्य उद्देश सनातन धर्माचे पालन, संवर्धन तसेच प्रचार व प्रसार करणे हा आहे. शृंगेरी मठाची जगत्‌‍गुरूंची परंपरा महाराष्ट्राशी जोडली गेलेली आहे, असे सांगून पी. ए. मुरली यांनी महाराष्ट्र आणि दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्‌‍, शृंगेरी यांचा अनुबंध उलगडला.

सत्कारमूर्तींच्या संस्कृत भाषेतील मानपत्राचे लिखाण श्रद्धा परांजपे यांनी केले होते तर वाचन मुक्ता गोखले, प्रथमेश बिवलकर, डॉ. ज्योत्स्ना खरे, अमृता करंबेळकर, श्रद्धा परांजपे, उन्मेष जोशी यांनी केले. प्रास्ताविक वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी केले.

संमेलनानिमित्त आज (दि. 2) सकाळपासून मंत्रजागर, धर्मशास्त्रीय शंकासमाधान, परिसंवाद, प्रवचन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या उत्तुंग कार्याला दिला उजाळा…!

संचालक बिभीषण चवरे यांच्या संकल्पनेतून गर्जना शाहीरांची शानदार सोहळा रंगला

मुंबई- “जग बदल घालून घाव,सांगून गेले भीमराव”असा संदेश देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 1ऑगस्ट रोजी झालेल्या जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाने गर्जना शाहीरांची हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित असा शानदार सांस्कृतिक कार्यक्रमातून उजाळा दिला.
मुंबई येथील गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात आयोजित केलेल्या
या शानदार सोहळ्याला लोकशाहिरांची मंदियाळी पाहून आलेल्या प्रेक्षकांचा उत्साह ओसांडून वाहत होता.
अण्णाभाऊ यांच्या प्रत्येक गीतांना रसिक जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते. प्रेक्षकगृहातून अनेक गाण्यांना ‘वन्स मोर’ मिळत होता.
या कार्यक्रमात लोकशाहीर मधुकर खामकर,दत्ताराम म्हात्रे,निशांत शेख,रामानंद उगले,निलेश जाधव,अविरत साळवी,गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे या सुप्रसिद्ध गायकांनी आपल्या पहाडी आवाजात अण्णाभाऊ यांचा इतिहास जागा केला. त्यांनी लिहिलेल्या रचना गायल्या, विशेष बाबत म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या एका कादंबरीच्या आधारित श्रीनिवास नार्वेकर यांनी कथावाचन केले. अश्विनी कारंडे व गणेश कारंडे यांनी एक छोटीशी नाटीका सादर केले.
आकांक्षा कदम हिने लावणी सादर करून रसिकांची मनं जिंकली.
प्रतिक जाधव यांनी उत्तम सूत्रसंचालन केले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ आणि मिलिंद बिर्जे यांनी आलेल्या सर्व लोकशाहीरांचे अगत्याने स्वागत केले.
अण्णाभाऊ साठे मराठी साहित्य विश्वात नामवंत प्रसिद्ध प्रतिभावंत अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे साहित्यिक होते.आपल्या साहित्यात लोकसंस्कृतीचे सारी अंगे त्यांच्या कथा,कादंबऱ्या,पटकथा,वगनाट्य,पोवाडे,लावण्या,गीत,नाट्य आविष्कृत केली.त्या अण्णाभाऊ साठे यांच्या उत्तुंग कार्याची आठवण ठेवून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी छोटे खानी कार्यक्रमातून उत्कृष्ट उजाळा देण्याचा प्रयत्न केला.

‘मोदी, भागवतांचे नाव घेण्यासाठी मला टॉर्चर केले’: तुरुंगात शारीरिक,मानसिक छळ केला-साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा आरोप

मुंबई-मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपले अनुभव माध्यमांसमोर कथन केले. नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, सुदर्शन, इंद्रेश, रामजी माधव यांच्यासारख्या लोकांची नावे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात होता, असा खळबळजनक दावा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला. तसेच तुरुंगात माझा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला आहे.माझ्यावर इतके अत्याचार झाले की ते शब्दांत मांडता येणार नाहीत. एटीएस अधिकाऱ्यांनी 13 दिवस बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले. या काळात मला ज्या यातना आणि अत्याचार सहन करावे लागले, त्यासाठी शब्द अपुरे आहेत. शब्दांनाही मर्यादा असते, असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह इतर सात आरोपींची निर्दोष मुक्त केले. सरकारी वकिल आरोपीविरुद्धचा खटला सिद्ध करू शकले नाहीत, असे कोर्टाने म्हटले होते. सुमारे 17 हा खटला चालला होता. आज माध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उपरोक्त दावा केला आहे.

साध्वी प्रज्ञा पुढे म्हणाल्या, मला नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, सुदर्शन, इंद्रेश, राम माधव यांची नावे घेण्यास भाग पाडले जात होते. ‘तुम्ही या लोकांची नावे घेतल्यास आम्ही तुम्हाला मारणार नाही’ असे अधिकारी वारंवार म्हणत होते. त्यांचा मुख्य उद्देश मला त्रास देणे हाच होता. मला सर्व काही खोटे बोलण्यास सांगितले जात होते, म्हणून मी कोणाचेही नाव घेतले नाही.

या लोकांनी छळ करून माझ्याकडून खूप काही वदवून घेण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही खोटे बोलणार नाही. देशाला घाबरण्याची गरज नाही. देशभक्त आपल्या देशासाठी जगतात आणि मरतात. अनेक एटीएस अधिकाऱ्यांनी कायद्याच्या नावाखाली बेकायदेशीर कामे केल्याचा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी केला. तुरुंगात मला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला, असेही त्या म्हणाल्या.

न्यायालयाच्या निर्णयावर प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, हा भगव्याचा, धर्माचा आणि सनातन धर्माचा विजय आहे. पण यांना पराभूत करण्याची या लोकांमध्ये हिंमत नाही. या लोकांनी छळ करून भगवा आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा कुत्सित प्रयत्न केला. अशा लोकांना शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. हा संपूर्ण खटला बनावट होता, त्याला कोणताही आधार नव्हता. सत्य नेहमीच समोर येते आणि सिद्ध होते, या प्रकरणातही तेच झाले.

भगवा नको, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा:माजी CM पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मुंबईत मोर्चा

मुंबई–भगव्या दहशतवादाला भगवा दहशतवाद न म्हणता सनातन किंवा हिंदुत्ववादी दहशत वाद म्हणा, असे विधान करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्या वादाला फोडणी दिली आहे. त्यांच्या या विधानाचे देशाच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. विशेषतः मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेने मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी वृत्तसंस्थेशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी विशेष एनआयए कोर्टाने दिलेल्या निर्णयावर भाष्य करताना कथित भगव्या दहशतवादावर भाष्य केले होते. माझी व भाजप व काँग्रेसच्या लोकांना नम्र विनंती आहे की, कृपया भगवा दहशतवाद हा शब्द वापरू नका. कारण, भगवा रंग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचा हा ध्वज (भगवा) आहे. भगवा रंग हा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर व वारकरी पंथाचा रंग आहे. तो महाराष्ट्राला प्रिय आहे. त्याला कुणीही राजकीय लेबल लावू नका. म्हणायचेच असेल तर सनातनी म्हणा, हिंदुत्ववादी म्हणा, पण भगवा म्हणू नका, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचे आता देशाच्या राजकारणात संतप्त पडसाद उमटत आहे. विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी त्यांच्याविरोधात रान पेटवले आहे.

सत्ताधारी शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते शनिवारी या प्रकरणी मुंबईत रस्त्यावर उतरले. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली. एवढेच नाही तर काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चाही काढला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. या मोर्चात शिंदे गटाच्या नेत्या शायना एन सी, मनिषा कायंदे, शितल म्हात्रे यांच्यासह विविध नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली.

शिवसेना नेत्या शायना एन सी यांनी यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. महाविनाश आघाडी केवळ तुष्टीकरणाचे राजकारण करते. हिंदूंचा अपमान करणे हेच त्यांच्या डीएनएमध्ये आहे, असे त्या म्हणाल्या. दुसरीकडे, ठाण्यातही युवा सेनेने आपले कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात या प्रकरणी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांच्या हातात गर्व से कहो हम हिंदू है, चे फलक दिसून आले.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण आमदार रोहित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे. ते आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, ‘भगवा हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा, भावनेचा आणि परंपरेचा विषय असल्याने भगवा शब्दाला दहशतवादाशी कुणीही जोडू नये’ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मांडलेल्या या भूमिकेत चूक काय? योग्य भुमिकेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपा आणि शिंदे साहेबांच्या पक्षातील लोकांनी कोणत्या मुद्द्यांवर आंदोलन करावं याचा आधी अभ्यास केला पाहिजे.

आंदोलन करायचंच असेल तर राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करतायेत.. शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारी, सरकारचा भ्रष्टाचार, बेलगाम सरकारचे बेफाम मंत्री या मुद्द्यांवर आंदोलन करा. शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी त्यांच्या पक्षाच्या गोंधळलेल्या आणि काहीही काम नसलेल्या कार्यकर्त्यांना-नेत्यांना मार्गदर्शन करावं, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या पोस्टमध्ये रोहित पवारांनी बेलगाम सरकार, बेफाम मंत्री, मुद्द्यावर बोला, असे हॅशटॅगही वापरलेत.

…. तर राज ठाकरे तुम्हालाही अटक होईल- फडणवीस /अटक करून दाखवाच, राज ठाकरेंचे आव्हान

मुंबई- अर्बन नक्षली म्हणून अटक करून दाखवाच, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यावरून फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. जो कायद्याने राहतो, त्याला अटक करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, कायदा न वाचता आलेली ही कॉमेंट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तुम्ही अर्बन नक्षली सारखे वागाल तर तुम्हालाही अटक होईल, अशा शब्दात फडणवीसांनी सुनावले आहे.

तुम्ही एखाद्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकते. त्यासाठी तुम्हाला अर्बन नक्षली ठरवण्यात येत आहे. मात्र, मराठी माणसाच्या थडग्यावर तुम्हाला उद्योग उभे करू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा सन्मान ठेवावाच लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. एखाद्याला अर्बन नक्षली म्हणून अटक करून दाखवाच, असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. यावरुन फडणवीस यांनी राज ठाकरे यांना प्रत्यु्त्तर दिले आहे.

राज्य सरकारने नवीन कायदा आणला आहे. तुम्ही कोण तर म्हणे शहरांमध्ये राहणारे नक्षली. तुम्ही जर एखाद्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकते. मात्र, एकदा अटक करून दाखवाच, असे आव्हान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग उभे राहू देणार नाही. उद्योग आणायचे असेल तर मराठी माणसाचा मानसन्मान ठेवूनच ते उद्योग महाराष्ट्रात आणावे लागतील. त्याशिवाय तुम्हाला ते आणता येणार नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांच्या या आव्हानाला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी त्यांना का अटक करू? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे. हा कायदा न वाचता अशी टीका केली जात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तुम्ही जर अर्बन लक्षली सारखे वागत नाही, त्यामुळे तुम्हाला अटक कराण्याचा प्रश्नच येत नाही. जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील, त्यांच्याकरता तो कायदा तयार झाला आहे. आंदोलकांविरुद्ध कायदा नाही. सरकार विरुद्ध बोलायची यामध्ये पूर्णपणे मुभा आहे. त्यामुळे कायदा न वाचता केलेली ही काँमेंट असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

नृत्य-गायनातून साकारले अथर्वशीर्ष

पुणे :

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता सरदार महादेव बळवंत नातू सभागृह (सेनापती बापट रस्ता) येथे सादर झालेला ‘गीत अथर्वशीर्ष’ कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.पारंपरिक गणपती अथर्वशीर्षाच्या पठणाला नवा कलात्मक आयाम देणाऱ्या या कार्यक्रमात, कवी मधुकर जोशी यांच्या अथर्वशीर्षातील ऋचांवरील अर्थगर्भ कवितांना पं. कमलाकर जोशी यांनी सुरेल स्वरबद्धता दिली. मराठी भाषेतील प्रासादिक काव्य, रागदारी संगीत आणि भरतनाट्यम नृत्य यांचा त्रिवेणी संगम रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला.गणेशाची शब्द आणि नृत्यरूपे या कार्यक्रमातून प्रकट झाली आणि रसिक भारावून गेले.

शांती मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली.गायन शुभदा आठवले आणि संपदा थिटे यांनी अत्यंत भावपूर्ण रीतीने सादर केले. डॉ. मीनल कुलकर्णी यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली यशदा, समा, जान्हवी आणि शांभवी यांनी भरतनाट्यम शैलीत सादर केलेले नृत्य नेत्रसुखद होते. स्वराली गोखले यांनी प्रभावी निवेदन केले.संगीताची साथसंगत वेधा पोळ (व्हायोलिन), पवन झोडगे (पखवाज), जयेश शेंबेकर (तबला) आणि प्रवीण ढवळे (टाळ) यांनी केली. केदार अभ्यंकर यांनी कार्यक्रमाचे नेटके व्यवस्थापन पाहिले. श्रेया, ऋचा, प्रज्ञा, नीता आणि केतकी यांनी समूहस्वरातून सादरीकरणात रंग भरले.

हा सांस्कृतिक प्रसार मालिकेतील २५५ वा कार्यक्रम होता.उपस्थित प्रेक्षकांनी संपूर्ण कार्यक्रमास दिलेली भरभरून दाद हेच यशाचे खरे प्रमाण असल्याचे मत भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी व्यक्त केले.भारतीय विद्याभवन च्या पुणे केंद्र समितीचे ज्येष्ठ सदस्य ग्रुप कॅप्टन सुहास फाटक व प्रा. नंदकुमार काकिर्डे यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा प्रमाणपत्र व ज्ञानेश्वरी प्रत देऊन सत्कार करण्यात आला

खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विक्री होत असल्यास तक्रार नोंदवण्याचे आवाहन

पुणे, दि. २: खत कंपन्या शेतकऱ्यांना खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विक्री करत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. अशा प्रकारे विभागातील पुणे, सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यातील खत कंपन्या सक्तीने विक्री करत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

कृषी निवेष्ठांच्या लिंकिंग संबंधी शेतकऱ्यांच्या तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी विभागातील पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी – ९२२५९५५९५५, अहिल्यानगर ७५८८५५६२७९ व सोलापूर- ७२१९२८६९२८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर तक्रार करावी. शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत शहानिशा करून तक्रारीत दोषी आढळून आलेल्या घाऊक किरकोळ विक्रेते यांच्याविरुद्ध खत नियंत्रण आदेश, १९८५ मधील तरतुदीनुसार निलंबन अथवा रद्दची कारवाई करण्यात येईल. तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ चे कलम ३ नुसार पोलीस केस दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल. याची नोंद घेऊन कृषी सेवा केंद्र चालकाने निविष्ठा विक्रीसाठी इतर निविष्ठांची सक्ती (Linking) करु नये, असेही विभागीय कृषी सहसंचालक, पुणे यांनी सूचित केले आहे.

‘रेशीम ग्राम’ संकल्पनेतून ग्रामीण भागाचे आर्थिक सक्षमीकरण- प्रधान सचिव अन्शु सिन्हा

पुणे, दि.२: ‘रेशीम ग्राम’ संकल्पनेच्या माध्यमातून रेशीम शेतीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांकरिता रोजगार निर्मिती आणि त्या माध्यमातून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल, जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी व उद्योजकांनी रेशीम शेती उद्योगात सहभागी व्हावे, असे आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अन्शु सिन्हा यांनी केले.

खेड तालुक्यातील वाकी येथील सिल्कबेरी चाँकी सेंटरला शुक्रवारी (दि. १) दिलेल्या भेटी प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा रेशीम कार्यालय पुण्याचे रेशीम विकास अधिकारी संजय फुले, मंत्रालयीन रेशीम कक्षचे रेशीम विकास अधिकारी विठ्ठल फड, प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहायक मधुकर आगम, सिल्कबेरी चाँकी सेंटरचे संचालक विजय गारगोटे, रेशीम उत्पादक विठ्ठल सुकाळे, शेतकरी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती सिन्हा म्हणाल्या, शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून तुती लागवडीपासून रेशीम वस्त्र निर्मितीपर्यंत अखंड मूल्यवर्धित साखळी तयार केल्यास जिल्ह्यात रेशीम शेती उद्योग वाढीस गती मिळेल. एक एकर तुतीची लागवड केल्यास पाच लोकांना वर्षभर रोजगार मिळवून देण्याची क्षमता यामध्ये आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावून, अर्थचक्र वाढून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे.

रेशीम शेतीतून हमखास व शाश्वत उत्पन्न मिळत असून राज्यातील असंख्य शेतकरी रेशीम शेती उद्योगातून लखपती होत आहे. नव्याने रेशीम शेती उद्योग करू इच्छिणाऱ्या तसेच रेशीम धागा निर्मिती व त्याअनुषंगिक रेशीम पूरक व्यवसायाकरिता शेतकऱ्यांना व उद्योजकांना बँकांनी पतपुरवठा करण्यास पुढे येणे गरजेचे आहे, असेही श्रीमती सिन्हा म्हणाल्या.

रेशीम ग्राम संकल्पना
राज्यात ‘रेशीम ग्राम’ संकल्पना मोठ्या प्रमाणात नावारूपास येण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावामध्ये नव्याने रेशीम शेती करू इच्छिणारे शेतकरी तसेच उद्योजकांना चालना मिळण्यासाठी गावातच तुतीच्या रोप, कोश आणि धागा, रेशीम वस्त्राची निर्मिती, धाग्याला रंग देण्यासह मुलायम करण्याचा अंतर्भाव, रेशीम प्रशिक्षण केंद्र, रेशीम शेती उद्योगासाठी आवश्यक असणारे औषधी व साहित्य विक्री केंद्र, रेशीम पूरक व्यवसाय या रेशीमग्राम संकल्पनेत असणार आहे.

यावेळी श्रीमती सिन्हा यांनी सिल्कबेरी चाँकी सेंटरच्या माध्यमातून पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आदी जिल्ह्यापर्यंत शेतकऱ्यांना चाँकी पुरवठ्यासोबतच रेशीम शेतकऱ्यांना आवश्यक असणारी औषधी, साहित्य, तांत्रिक सल्ला व प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली.
0000

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन रित्या जमा

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

पुणे, दि. २: भविष्यात शेतीला निश्चितच चांगले दिवस येणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कृषी विभागाने लोकाभिमुख पद्धतीने कार्यरत रहावे, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून ऑनलाइन पद्धतीने झाले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून दूरदृष्य प्रणालीद्वारे ते उपस्थित होते. यावेळी घेतलेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कृषी आयुक्त सूरज मांढरे, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सर व्यवस्थापक संजय शितोळे उपस्थित होते.

यावेळी कृषीमंत्री श्री. भरणे यांनी कृषी विभागाची रचना, कृषी विद्यापीठे व त्याअंतर्गत विभाग, संशोधन केंद्रे, महाबीजसह कृषी विभागाच्या अंतर्गत महामंडळे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, वेगवेगळे विभाग आदींची संक्षिप्त माहिती घेतली. पीक विमा योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई), नमो किसान योजना आदी योजनांची माहिती त्यांनी घेतली. विभागाने सर्व योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे सांगितले.

यावेळी आयुक्त श्री. मांढरे यांनी माहिती दिली, ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचे राज्यात नोंदणीकृत १ कोटी २३ लाख ९२ हजार लाभार्थी असून २० व्या हप्त्यासाठी ९६ लाख ५१ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांप्रमाणे एकूण १ हजार ९३० कोटी २३ लाख रुपये रक्कम जमा करण्यात आले आहेत. दरवर्षी तीन हप्त्यात एकूण ६ हजार रुपये जमा करण्यात येतात, असे त्यांनी सांगितले.

‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ लाख ५१ हजार ८५० शेतकऱ्यांच्या खात्यात आज २० व्या हप्त्याचे ९० कोटी ३७ लाख रुपये जमा करण्यात आले.

बलात्कार प्रकरणात माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप,अनेक वेळा बलात्कार,५० हून अधिक महिलांचे लैंगिक छळ

कुणाला उपनिरीक्षक म्हणून, कुणाला तहसीलदार म्हणून तर कुणाला अन्न विभागात नोकरी मिळवून दिली.

म्हैसूर-आज, बंगळुरूमधील एका विशेष न्यायालयाने माजी जेडीएस खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाला मोलकरीण बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रेवण्णाला ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने शुक्रवारी रेवण्णाला दोषी ठरवले. रेवण्णाने आपण काहीही चुकीचे केले नाही असा दावा करत कमी शिक्षेसाठी न्यायालयात अपील केले होते.

रेवण्णाच्या कुटुंबाच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या ४७ वर्षीय महिलेने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. तिने रेवण्णावर २०२१ पासून अनेक वेळा बलात्कार केल्याचा आणि घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता.

न्यायालयाने १८ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली होती. रेवण्णाविरुद्ध बलात्कार, दृश्यमानता, गुन्हेगारी धमकी देणे आणि अश्लील छायाचित्रे लीक करणे यासह अनेक कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध बलात्काराचे एकूण ४ गुन्हे दाखल आहेत. त्याला दोषी ठरवण्यात आलेला हा पहिलाच खटला आहे.

गेल्या वर्षी कर्नाटक सेक्स स्कँडलमध्ये समोर आल्यानंतर प्रज्वल रेवण्णाचे नाव चर्चेत आले. त्याच्यावर ५० हून अधिक महिलांचे लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत त्याच्यावर बलात्कार, छेडछाड, ब्लॅकमेलिंग आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली ४ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी, रेवण्णाच्या सोशल मीडियावर २००० हून अधिक अश्लील व्हिडिओ क्लिप्स समोर आल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रेवण्णाने कर्नाटकच्या हसन लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवली, परंतु त्याला त्याची खासदारकीची जागा वाचवता आली नाही. त्याच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर जेडीएसने त्याला पक्षातून निलंबितही केले.

प्रज्वल रेवण्णा याच्यावर त्याच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. २६ एप्रिल रोजी बंगळुरूमध्ये सार्वजनिक ठिकाणी अनेक पेन ड्राइव्ह आढळून आले.
असा दावा करण्यात आला होता की पेन ड्राइव्हमध्ये ३,००० ते ५,००० व्हिडिओ होते ज्यात प्रज्वल अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करताना दिसला. महिलांचे चेहरेही अस्पष्ट नव्हते.
प्रकरण वाढत गेल्याने राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली. प्रज्वलविरुद्ध बलात्कार, छेडछाड, ब्लॅकमेलिंग आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली तीन एफआयआर दाखल करण्यात आले.
एसआयटीच्या तपासात असे दिसून आले की प्रज्वलने ५० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केले होते. या महिला २२ ते ६१ वयोगटातील होत्या.
५० पैकी १२ महिलांवर बलात्कार करण्यात आले. उर्वरित महिलांना विविध प्रकारचे प्रलोभने देऊन त्यांच्याकडून लैंगिक हितसंबंध मिळवण्यात आले.
प्रज्वलने कुणाला उपनिरीक्षक म्हणून, कुणाला तहसीलदार म्हणून तर कुणाला अन्न विभागात नोकरी मिळवून दिली.

कर्नाटक सेक्स स्कँडलमध्ये नाव येण्यापूर्वी, प्रज्वल रेवण्णा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होता. तो कर्नाटकातील हसन मतदारसंघाचा विद्यमान खासदार होता. तो येथून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही लढत होता. हसन लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी निवडणूक झाली.

दरम्यान, त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले. निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी, २७ एप्रिल रोजी, प्रज्वल देश सोडून जर्मनीला गेला. त्यानंतर ३५ दिवसांनी, ३१ मे रोजी, जेव्हा तो जर्मनीहून भारतात पोहोचला, तेव्हा पोलिसांनी त्याला बंगळुरू विमानतळावरूनच अटक केली.

कर्नाटक सेक्स स्कँडलमधील आरोपी प्रज्वल रेवण्णाने २७ मे २०२४ रोजी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि म्हटले- ‘मी ३१ मे २०२४ रोजी एसआयटीसमोर हजर राहीन. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. मला न्यायालयावर विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की मी न्यायालयाच्या माध्यमातून खोट्या खटल्यांमधून बाहेर पडेन.’

द्विदशकपूर्तीनिमित्त कनेक्टिंग ट्रस्टतर्फे स्वयंसेवकांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन

पुणे: गेल्या २० वर्षांपासून लोकांच्या मानसिक, भावनिक आरोग्यासाठी आणि समाजात होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी कनेक्टिंग ट्रस्ट ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था अविरत कार्य करत आहे. आत्महत्या प्रतिबंधाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कनेक्टिंग ट्रस्ट संस्थेला यंदा २० वर्ष पूर्ण होत आहेत. संस्थेच्या द्विदशकपूर्तीनिमित्त येत्या २३ ऑगस्ट २०२५ रोजी हितचिंतक व स्वयंसेवकांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. यासह इतरही उपक्रम आयोजिले जाणार आहेत, अशी माहिती कनेक्टिंग ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता मडकईकर यांनी दिली.

प्रणिता मडकईकर म्हणाल्या, “कनेक्टिंग ट्रस्टचे सर्व प्रकल्प स्वयंसेवकांमार्फत राबविण्यात येतात. अनेक दानशूर मंडळींच्या, संस्थांच्या आणि कंपन्यांच्या अर्थसहाय्यावर हे काम सुरु आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी बोमन इराणी यांच्या ‘क्लास ऍक्ट’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भावनिक आरोग्य आणि आत्महत्या याविषयी जनजागृती व्हावी आणि आत्महत्येमुळे दगावलेल्याना श्रद्धांजली वाहण्यासाठी ११ ऑक्टोबर २०२५ रोजी कँडल मार्च आयोजिला आहे. २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान आत्महत्या प्रतिबंधातल्या विविध घटकांचा आढावा घेणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद पुण्यात भरवली जाणार असून, आत्महत्या रोखण्याकरीता कार्यरत असलेल्या सामाजिक संस्था, मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक संशोधक आणि विद्यार्थी ह्यामध्ये सहभागी होतील. समाजात घडत असलेल्या आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी कोणकोणते विधायक पावले उचलता येतील, यावर विचारविनिमय केला जाणार आहे.”

श्रीमती अर्नवाज दमानिया यांनी सन २००५ साली कनेक्टिंग ट्रस्टची स्थापना केली. समाजात वाढत चाललेल्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि एक भावनिकरित्या संवेदनशील समुदायाच्या निर्मितीसाठी संस्था चालू केली. गेली २० वर्षे हे काम स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर अव्याहात चालू असून ह्यापुढेही अविरत चालू राहील. मनात आत्महत्येचे विचार येतात आणि जे आत्महत्येमुळे बाधित आहेत, अशाना भावनिक आधार देत जनजागृती करून आणि विद्यार्थ्यांसोबत सातत्याने काम करून आत्महत्या रोखण्याचे काम कनेक्टिंगतर्फे केले जाते. संवेदनशील समाजनिर्मिती आणि आत्महत्यांचे प्रमाण आटोक्यात आणणे हे ट्रस्टचे ध्येय आहे, असे मडकईकर यांनी नमूद केले.

———

आत्महत्या नको; येथे संपर्क करा

आपल्याला कोणता मानसिक ताणतणाव असेल, नैराश्य आले असेल, आत्महत्येचा विचार मनात येत असेल, तर एकदा कॉल करा. तुम्हाला आधार द्यायला आम्ही आहोत. ही सर्व सेवा विनामूल्य आहे. आमचे हेल्पलाईन नंबर मोफत आहेत. तेव्हा ९९२२००४३०५, ९९२२००११२२ या क्रमांकावर रोज १० ते ८ या वेळेत कधीही फोन करा किंवा distressmailsconnecting@gmail.com यावर ईमेल करा.

अधिक मानवीय होण्यासाठी वाचन उपयुक्त : लक्ष्मीकांत देशमुख

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या पुरस्कारांचे वितरण
अभिनव वाचन उपक्रमातील विद्यार्थ्यांचा गौरव

पुणे : वाचनातून घडणारे संस्कार महत्त्वाचे असतात. चारित्र्यवान पिढी घडण्यासाठी बालवयापासून मुलांना वाचनाची गोडी लावणे आवश्यक आहे. वाचन हे मानवनिर्मित कृत्रिम माध्यम असले तरी ती उन्नत मानवी संस्कृती आहे. वाचनातून जिज्ञासा वाढीस लागते आणि त्यातूनच आकलन वाढते. वाचन आपल्या प्रत्येकाच्या प्रगतीचा एक भाग आहे. अधिक मानवीय होण्यासाठी वाचनच उपयुक्त आहे, असे प्रतिपादन ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे सन 2024 वर्षातील राज्यस्तरीय विविध साहित्य पुरस्कारांचे वितरण आज (दि. २) लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी देशमुख ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदर्भ तज्ज्ञ व ग्रंथ प्रसारक प्रसाद भडसावळे होते. संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राजेंद्र झुंजारराव, मॉडर्न महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. निशा भंडारे, संजय ऐलवाड व्यासापीठावर होते. मॉडर्न महाविद्यालयातील मराठी विभागाच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रम महाविद्यालयातील लता मंगेशकर सभागृहात झाला. सन्मानपत्र, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. अभिनव वाचन उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशस्तिपत्र, ग्रंथभेट देऊन करण्यात आला. वाचनासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त करणाऱ्या शिक्षकांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विश्वस्त राजेंद्र कुलकर्णी व कार्यकारिणी सदस्य शिवाजी चाळक, सचिन बेंडभर हे उपस्थित होते.
अवांतर वाचन हे निरंतर, आनंददायी शिक्षणच आहे, असे सांगून देशमुख पुढे म्हणाले, राज्यकर्ते लोकशाही टिकवित नाहीत तर सजग नागरिक ती टिकवितात. सजग नागरिक बनण्यात वाचनाचे मोठे योगदान आहे. लेखक, प्रकाशक, चित्रकार, वाचक आणि ग्रंथालये हे वाचन संस्कृतीचे महत्त्वाचे घटक आहेत. आजच्या बालपिढीचे भावविश्र्व बदलते आणि आव्हानात्मक आहे, त्या भावविश्र्वात बाल साहित्य लेखकाने डोकावले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रसाद भडसावळे म्हणाले, संस्कार ही लादण्याची नव्हे तर अनुकरण करण्याची गोष्ट आहे. मुलांनी काय वाचावे यावर बंधने आणू नयेत; परंतु चांगल्या साहित्यकृती उपलब्ध करून दिल्या तर मुले नक्कीच आवडीने वाचतात. पालक मुलांना वास्तववादी जगात जगण्यासाठी हतबल करत आहेत, त्यांना कल्पनावादी अनुभव घेऊ देत नाहीत. परंतु मुलांचा सर्वांगिण विकास साधायचा असल्यास त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणे आवश्यक आहे आणि तो वाचनातूनच मिळणार आहे.
पुरस्कार प्राप्त लेखकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना कल्पना मलये म्हणाल्या, बालसाहित्यविषयक क्षेत्रात गेली ५० वर्षे कार्य करणाऱ्या मातृसंस्थेकडून पुरस्कार मिळणे ही आनंदाची बाब आहे. बालकांचे भावविश्र्व समजून घेत त्यांच्यासाठी साहित्यकृती निर्माण करणे ही अवघड गोष्ट आहे. शिक्षकांनी अनेक चळवळी, उपक्रमातून विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार करावेत.
प्रास्ताविकात माधव राजगुरू यांनी संस्थेच्या ५० वर्षांच्या वाटचालकीचा आढावा घेत संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कांविषयी अवगत केले. संस्थेच्या माध्यमातून सातारा येथे बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. प्राचार्य प्रा. राजेंद्र झुंजारराव, डॉ. निशा भंडारे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय ऐलवाड यांनी केले.

मार्केट यार्ड (बाजार समिती)चे उत्पन्न 300 पटीने वाढवणे शक्य

शेतकरी हित जपण्याचा फॅक्ट संस्थेचे आवाहन

पुणे:उलाढालीच्या निकषावर कृषी उत्पन्न बाजार समित्या राष्ट्रीय बाजार समित्या घोषित करण्याच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ आणी संवेदनशील व्यवस्थापन अंगीकारले तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती चे उत्पन्न ३०० पटीने वाढणे शक्य आहे, असे म्हणणे फेडरेशन फॉर अॅग्रो, कॉमर्स अँड ट्रेड (फॅक्ट ) या संस्थेने आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मांडले आहे.फेडरेशन फॉर अॅग्रो, कॉमर्स अँड ट्रेड (FACT) चे अध्यक्ष किशोर कुंजीर यांनी आज हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

राज्य शासनाच्या व्हिजन २०४७(Vision 2047) च्या धर्तीवर येत्या काही वर्षांत सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल होणे प्रस्तावित आहे. कृषि हा त्यातील एक महत्वाचा विभाग असेल. सहाजिकच, कृषि पणन नीती, हि शेती आणि संलग्न अर्थव्यवस्थेसाठी अनन्यसाधारण महत्वाची असणार आहे.महाराष्ट्रातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आर्थिक उलाढालीच्या निकषांप्रमाणे प्रथमतः ५ ते ७ बाजार समित्या राष्ट्रीय म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित आहे, नूतन धोरणांप्रमाणे राष्ट्रीय बाजार समित्यांमध्ये २ जागा व्यापारी प्रतिनिधींना आणि १ जागा अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राखीव असण्याची शक्यता आहे. समस्त शेतकरी वर्गाला योग्य बाजारभाव मिळवून देणे हे कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे मुलभूत उद्दिष्ट असल्याबरोबरच ते साध्य करताना बाजार आवारातील सर्व मुलभूत घटक जसे की, आडत्या, व्यापारी, खरेदीवार, कामगार, वाहतूकदार अशा सर्वांना एकत्रित घेऊन शेतीमाल विक्री व्यवस्थापनासाठी योग्य ती पावले उचलणे, बदलत्या व्यापाराच्या गरजांच्या अनुषंगाने कृषि पणन व्यवसाया सापेक्ष अद्ययावत सुविधा पुरविणे, हे संचालक मंडळाचे आद्य कर्तव्य आहे. मात्र, काही अपवाद वगळता आजतागायत संचालक मंडळ अथवा त्या त्या वेळेचे शासन नियुक्त प्रशासक यांना शेतकरी हिताच्या दुष्टिने फार काही विशेष साध्य झाल्याचे दिसून येत नाही,असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

कृषि उत्पन्न बाजार समिती उत्कृष्ट रीत्या कार्यरत असण्यासाठी शेतीसोबतच प्रामुख्याने शेतमाल विपणनाचे सखोल शास्त्रीय ज्ञान, माहिती, अनुभव आणि सर्वंकष जाण जाणीव असणारे अभ्यासू संचालक बाजार समितीवर नसल्याने तसेच समस्त शेतकरी वर्गाची कोणालाही काहीही फिकीर नसल्याने एक अत्यंत महत्त्वाची तसेच जीवनावश्यक वस्तू आणि आवश्यक्तेतील एक समाजोपयोगी संस्था/ प्रभावी माध्यम प्रत्यक्षांत मात्र खात्रीशीर रीत्या शेतकरी हिताविरोधातच कार्यरत असल्याचे दिसते.

पुणे बाजार समितीमध्ये, शेतीमाल नियमन आणि विपणन सोडून अन्य बाबीनाच फक्त आणि फक्त प्राधान्य दिले जात असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. शेतकरी हित आणि व्यवसाय वृद्धी बाजूला राहून सातत्याने संचालक मंडळ आणि प्रशासक यांचा दुर्दैवी खो -खो सुरु असल्याबरोबरच असंवेदनशील संचालकांच्या विळख्यातून बाजार समिती काढून घेऊन व्यावसायिक ज्ञान असणाऱ्या तज्ञ जाणकारांच्या मार्गदर्शनानुसार कामकाज केल्यास, आजही या बाजार समितीचे गत वैभव पुनश्चः एकवार प्रस्थापित होऊन पुणे बाजार समिती ही शेतकरी आणि व्यापाऱ्यांची प्रथम पसंतीची बाजारपेठ असू शकेल,असा विश्वास या पत्रकात व्यक्त केला आहे.

चिंतेची बाब म्हणजे, कदाचित पुणे बाजार समिती हि देशातील एकमात्र बाजार समिती असू शकेल ,जिथे गेल्या पंचवीस वर्षात येधील व्यापार उत्तरोत्तर वाढण्याऐवजी कमी होऊन आजमितीस अक्षरशः २० से २५ टक्के व्यापार राहिला आहे. पर्यायाने, बाजार समितीच्या सदोष व्यवस्थापनामुळे शेतकरी वर्गाचे कधीही भरून न येणारे अपरिमित नुकसान झाले आहे आणि आजतागायत होते आहे. प्रामाणिक आडत्यांव्यतिरिक्त प्रत्यक्षात याबाबत मूलतः संचालक आणि पर्यायाने अधिकारी अशा सर्वांचीच अनास्था आहे. केंद्र शासन प्रस्तावित नीती आयोग निर्देशित व्यवस्थापनासंबंधी नूतन धोरणे निश्चित करताना जर अभ्यासू व्यापारी संचालक तसेच शेतकरी संचालकांची क्षमता आणि योग्यता पारखून नियुक्ती झाल्यास, व्यावसायिक आडाख्यांनुसार बाजार समितीतील सेवा सुविधा सुधारून, कृषि उत्कर्ष साधण्याबरोबरच ‘शेतकरी- आडत्या -व्यापारी यांचा सुनियंत्रित समन्वय’ हा केंद्रबिंदू मानून सद्य आर्थिक स्थिती तसेच भविष्यातील पोषक वित्तीय धोरणांन्वये सर्व पैसा प्रामुख्याने बाजार आवारासाठी आणि अनुषंगिक बाबीसाठीच विवेकबुद्धिने काटेकोरपणे वापरल्यास आजही पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीची उलाढाल किमान ३०० पटीने वाढविणे तसेच बाजार समितीचे उत्पन्नात ३०० कोटीपर्यंत वाढ साध्य होणे लीलया शक्य आहे, असा खात्रीशीर विश्वास फेडरेशन फॉर अॅग्रो, कॉमर्स अँड ट्रेड (FACT) ने व्यक्त केला आहे.

प्राप्त निधी आणि उपलब्ध सोयी सुविधांचे योग्य नियोजन व्यापार समृध्दी साठी केले तरच इतिहासाची पुनरावृत्ती न होता, बळीराजाचे पुणे बाजार समितीला विपणनासाठी प्राधान्य आणि अनमोल आशीर्वाद प्राप्त होणे, शक्य आहे.राष्ट्रीय बाजार समितीच्या प्रक्रियेला सहेतुक विलंब होण्याची वदंता देखील ऐकिवात आहे. परंतु, सुदैवाने सध्या महाराष्ट्राला दूरदर्शी, सर्वसमावेशक असे अभ्यासू मुख्यमंत्री, कृषि विषयक जाणिव असलेले तसेच कोणतेही काम हाती घेतले की जिद्दीने पूर्ण करणारे अशी ख्याती असलेले पालक मंत्री लाभले आहेत त्यामुळे, कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे चे ग्रहण सुटून भाग्योदय होईल, अशी आशा वाटते, असे या पत्रकात म्हटले आहे.