Home Blog Page 433

हिंदूंच्या कथित बदनामी’चा थयथयाट करून युतीकडून सत्तेतील अपयश लपवण्याचा प्रयत्न..!

२०१४ ते १९ स्व-सत्ताकाळात प्रगट का करू शकले नाहीत..काँग्रेस’चे हिंदू बदनामीचे षडयंत्र ..? सरकारी वकील बदलून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता काय..?

नैतिक व संविधानिक Character Less (चारीत्र्य हिन) राजवटीत गुन्हेगार व भ्रष्टाचाऱ्यांना मोकळीक …! काँग्रेस’ची प्रखर टिका
पुणे दि ३ ॲागस्ट २५
मुंबई बॅाम्ब स्फोटा नंतर, मालेगाव बॅाम्ब स्फोटातील हिंदुत्ववादी संघटनेच्या आरोपींना, सन्मानपुर्वक नव्हे तर ‘पुराव्या अभावी’ एनआयए विशेष न्यायालयाने आरोप मुक्त केल्याने ‘सत्तेतील भाजप व शहा प्रायोजक, शिंदे सेनेचा’ काँग्रेसच्या नावे चाललेला थयथयाट हा सत्तेतील अपयश लपवण्याचा प्रयत्न चालल्याची टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, मालेगांव बाँम्ब स्फोटा’चा तपास तत्कालीन एटीएस प्रमुख, कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी म्हणून ख्याती असलेले श्री हेमंत करकरे यांनी केला होता. त्यावेळी संबंधित आरोपीं विरोधातील ॲाडीओ क्लिप्स, इलेक्ट्रॉनिक साहित्य, जबाब इ सक्षम पुरावे देखील समोर आल्याचा सुतोवाच तपास यंत्रणे कडुन झाला होता.
२०१४ नंतर देशात व राज्यात सत्तापालट झाल्यानंतर
सरकारी वकील रोहिणी सालीयान यांनी एनआयए कडून न्यायालयीन कामकाजात दबाव येत असल्याचे स्पष्ट केल्यावर ही, त्यांचे जागी ‘नविन सरकारी वकीलांची नेमणूक’ कोणत्या हेतूने केली (?) असा सवाल ही काँग्रेस ने विचारला.
सप्टेंबर २०११ मध्ये देशातील राज्यांचे पोलीस प्रमुख व आयबी’चे संचालक यांचे बैठकीत तपास यंत्रणेतील गंभीर बाबी पुढे आल्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी गृहमंत्री नात्याने ‘भगवा दहशतवादाचे’ प्रयत्न काही प्रवृत्तीं कडून सुरू असल्याचा सुतोवाच केला. असीमानंद सारख्या आरोपींचा कबुली जवाब ही त्यावेळी पुढे आला होता.
देशाच्या गृहमंत्र्यांचे ‘सकृत दर्शनी परिस्थिती’वरील मत हे पक्षाचे राजकीय मत’ नसते तर तत्कालीन वास्तव परिस्थितीवर असते.
न्यायालयाने आरोपींना पुरावा अभावी निर्दोष निकाल दिल्यानंतरच् भाजप’ने ‘भगवा दहशतवाद’ वक्तव्यावर रान पेटवण्याचा प्रयत्न करणे हे सत्तेतील अपयश लपवण्याचा व जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी सांगीतले.
काँग्रेस’वर षडयंत्राचा आरोप करतांना “२०१४-१९ राज्यात व देशात एक हाती सत्ता असुनही” एक ही एफआयआर नोंदवू शकले नाही वा त्यावर ब्र शब्द ही केला नाही (?) त्यावेळी सरकारी वकील बदलून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता काय..? असा उपरोधिक सवाल काँग्रेस ने केला.
काँग्रेस ‘हिंदू विरोधी’ असल्याचा तथ्यहीन, बालीश आरोप करणारे ‘भारतीय संस्कृतीचा’ इतिहास सांगणाऱ्या ‘रामायण व महाभारत’ मालिका सुमारे ३ वर्षे तत्कालीन पंतप्रधान इंदीराजी व राजीवजी गांधी यांनीच देशात आणलेल्या टीव्ही- दुरदर्शन मुळे दर रविवारी घरोघरी दाखवल्या गेल्याचे सोईस्कर विस्मरणात गेले काय असा खोचक सवाल ही राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विचारला.
महायुती सरकार, न्यायालयाच्या ‘मुंबई बॅाम्ब हल्ला निर्णय’ विरोधात अपील करणार, मात्र मालेगांव स्फोट निर्णय विषयी अपील करणार नाही (?) हे धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस’ला मान्य आहे काय (?)असा ही सवाल त्यांनी अजीतदादा पवारांना केला.
जेंव्हा केंद्रीय तपास यंत्रणेने आरोपीं विरुध्द ‘मृत्यु दंडाची’ मागणी केली होती, तर ‘एनआयए’ची विश्वासार्हता पणास लागली असतांना ‘वरीष्ठ न्यायालयात’ अपील करणे नैसर्गिक न्याय तत्वाने अपेक्षित आहे.
त्यामुळे सरकार अपील बाबत ‘जात व धर्म’ पाहून निर्णय घेऊन, मंत्री पदाच्या शपथे विरोधी भुमिका घेणार काय(?) व निष्पाप नागरिकांच्या हत्ये बाबत न्याय मिळणार काय (?) याकडे देशातील जनतेचे लक्ष असल्याचे काँग्रेस ने म्हंटले आहे.

‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा म्हणजे हिंदू धर्माचा अपमान: नीतेश राणे

आव्हाड यांच्या विधानाशी पवार-सुप्रियाताई सहमत आहेत का?,

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ‘सनातनी दहशतवाद’ या विधानावरून राज्यात नवा राजकीय वाद पेटला आहे. भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी या मुद्द्यावरून आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही भाषा म्हणजे हिंदू धर्माचा अपमान असून, आव्हाडांच्या या भूमिकेशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सहमत आहेत का, असा थेट सवाल राणे यांनी केला आहे.

राणेंची पोस्ट काय?

नीतेश राणे म्हणाले की, ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे. आधी सुशीलकुमार शिंदे मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे सहमत आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचीही भूमिका हीच आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं.

नीतेश राणे म्हणाले की, खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. दहशतवाद हा हिंसेशी जोडलेला असतो, जिचा उद्देश लोकशाही, सहिष्णुता आणि समाजविरोधी कट रचणं असतो. सनातन हिंदू परंपरेचा इतिहास हा प्रश्नौत्तरं, संवाद, वैचारिक संघर्ष आणि लोकशाहीचं दर्शन आहे.
मतदारसंघासाठी महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका

नीतेश राणे म्हणाले की,‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द वापरणं म्हणजे आपल्या इतिहासाची, हिंदू परंपरेची आणि सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची थट्टा करण्याचा प्रकार आहे. इथल्या हिंदू समाजानं तुमच्या ‘बाटग्या’ विचारांना कधी साथ दिली नाही आणि भविष्यातही ते देणार नाहीत. केवळ आपला एक मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका.

सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल !:बुद्ध, फुले, आंबेडकरांचा छळ करणारेच खरे दहशतवादी- जितेंद्र आव्हाड


मुंबई-“सनातनी दहशतवाद” ही संकल्पना आजची नाही, तर प्राचीन काळापासून सुरू आहे. भगवान बुद्ध, संत, समाजसुधारक, महापुरुष यांच्यावर अन्याय करणारे तेव्हाचे आणि आजचेही सनातनी दहशतवादीच आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, तुम्हाला राजे म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असे म्हणत त्यांची हेटाळणी करणारे सनातनी दहशतवादीच होते.शत्रूशी हातमिळवणी करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच होते.

जितेंद्र आव्हाडांची पोस्ट काय?

जितेंद्र आव्हाड यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल ! सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे…भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिख्यूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते. चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते. बसवेश्वरांना मारणारे सनातनी दहशतवादीच होते. संत ज्ञानेश्वरांना छळणारे सनातनी दहशतवादीच होते. संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, तुम्हाला राजे म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असे म्हणत त्यांची हेटाळणी करणारे सनातनी दहशतवादीच होते.शत्रूशी हातमिळवणी करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच होते. त्यांना शत्रूच्या हातात पकडून देणारेही सनातनी दहशतवादीच होते. महात्मा फुलेंवर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांच्या खुनाची सुपारी देऊन मारेकरी घालणारे सनातनी दहशतवादीच होते. स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आद्य शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्यावर शेणगोटे मारणारे सनातनी दहशतवादीच होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांना बदनाम करणारे , त्यांच्या खुनाचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते. एका वर्गाला शूद्र ठरवून त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणारे सनातनी दहशतवादीच होते.
माणसाला माणूस म्हणून जगूच द्यायचे नाही; शूद्रांना पाण्यापासून वंचित ठेवणारे सनातनी दहशतवादीच होते.
आगरकर हे केवळ सनातनी प्रवृत्ती विरोधात होते म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसवणारे आणि ते शिक्षणापासून वंचित कसे राहतील, याचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते. महात्मा गांधी यांच्यावर अनेकदा हल्ले करणारे आणि प्रार्थनेला जाणाऱ्या निशस्त्र महात्म्यावर गोळ्या झाडणारे सनातनी दहशतवादीच होते.
अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी झगडणारे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे सनातनी दहशतवादीच होते.
सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या गोविंद पानसरे यांचा खून करणारे सनातनी दहशतवादीच होते.
कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या समाज सुधारणेच्या कार्याला संपवण्यासाठी त्यांना ठार मारणारे सनातनी दहशतवादीच होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, स्त्रियांना या समाजात स्थानच नाही. त्या केवळ उपभोगाच्या वस्तू आहेत, असे मानणारे सनातनी दहशतवादीच होते. आपली आई उपभोगण्याची वस्तू आहे, असे मानणारे सनातनी दहशतवादीच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान ज्या सनातनी दहशतवादाविरोधात होते, त्या मनु स्मृतीला आपले संविधान मानणारे सनातनी दहशतवादीच होते. या सनातनी दहशतवादाने भारताला जाती-व्यवस्थेत ढकलले अन् सनातन्यांनीच देशात विषमतावादी वर्णव्यवस्था लादली. अशांना सनातनी दहशतवादी म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? ‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द मागील हजारो वर्ष अस्तित्वात होता अन् पुढील हजारो वर्ष अस्तित्वात राहिल. जोपर्यंत जातीव्यवस्था – वर्णव्यवस्था आहे, तोपर्यंत सनातनी दहशतवाद विसरताच येणार नाही.

लष्करी अधिकाऱ्याची स्पाइसजेटच्या 4 कर्मचाऱ्यांना मारहाण:एकाचा पाठीचा कणा तुटला, तर दुसऱ्याचा जबडा; बेशुद्ध कर्मचाऱ्याला लाथा मारत राहिला..

नागरी विमान वाहतूक मंत्रालयालाही पत्र पाठवण्यात आले..७ दिवसानंतर घटना उघडकीस ..

श्रीनगर -जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर विमानतळावर, एका लष्करी अधिकाऱ्याने अतिरिक्त सामानावरून स्पाइसजेटच्या चार कर्मचाऱ्यांना मारहाण केली. एका कर्मचाऱ्याचा पाठीचा कणा तुटला. दुसऱ्याचा जबडा तुटला. तिसऱ्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. तरीही आरोपी त्यांना लाथा मारत राहिला, चौथा कर्मचारी बेशुद्ध पडला.ही घटना २६ जुलै रोजी घडली. हे प्रकरण आता उघडकीस आले आहे. एअरलाइननेही एक निवेदन जारी करून आरोपी लष्करी अधिकाऱ्याला नो-फ्लाइंग लिस्टमध्ये टाकले आहे. लष्करानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि आरोपींवर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.
२६ जुलै रोजी, श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या फ्लाइट SG-386 च्या बोर्डिंग गेटवर एका प्रवाशाने, जो लष्करी अधिकारी असल्याचे सांगितले जाते, त्याने चार कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला.एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, आरोपी अधिकाऱ्याकडे दोन केबिन बॅगा होत्या, ज्यांचे एकूण वजन १६ किलो होते. हे ७ किलोच्या मर्यादेच्या दुप्पट होते. स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला सांगितले की तुमचा सामान निर्धारित मानकांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.आरोपी अधिकाऱ्याने अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर, तो बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण न करता जबरदस्तीने एअरोब्रिजमध्ये घुसला. हे सुरक्षा नियमांचे उल्लंघन होते.

कर्मचाऱ्यांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जवळच ठेवलेल्या स्टँडने त्याने कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यांना लाथा आणि मुक्काही मारले. त्यापैकी काहींना जबड्याला दुखापतही झाली.स्पाइसजेटचा एक कर्मचारी जमिनीवर बेशुद्ध पडला, पण प्रवासी बेशुद्ध कर्मचाऱ्याला लाथ मारत राहिला. बेशुद्ध कर्मचाऱ्याला मदत करण्यासाठी खाली वाकत असताना, दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या जबड्यावर जोरदार लाथ मारली गेली आणि त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येऊ लागले. जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे एअरलाइनने सांगितले. नागरी विमान वाहतूक नियमांनुसार, प्रवाशाला नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.स्पाइसजेटने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून त्यांच्या कर्मचाऱ्यांवरील प्राणघातक हल्ल्याची माहिती दिली आहे आणि योग्य कारवाई करण्याची विनंती केली आहे. एअरलाइनने विमानतळ अधिकाऱ्यांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना सोपवले आहे.

‘सीएसआर’च्या चांगल्या विनियोगासाठी स्वयंसेवी संस्था, कंपन्यांमध्ये समन्वय हवा

डॉ. अनिता मोहिते यांचे प्रतिपादन; उदयकाळ फाउंडेशन, उदयगिरी सोशल फाऊंडेशनतर्फे ‘सीएसआर कॉन्फरन्स २०२५’ 

पुणे: “समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक स्वयंसेवी संस्था धडपड करीत असतात. त्यांच्या या कार्याला व्यापक करण्यासह परिवर्तनशील विकास साकारण्यासाठी निधीची गरज असते. ही गरज भागविण्याचे काम उद्योगांची सामाजिक बांधिलकी (सीएसआर) करते. ‘सीएसआर’चा चांगला विनियोग करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि कंपन्या यांच्यातील समन्वय महत्वपूर्ण ठरतो,” असे प्रतिपादन भारती अभिमत विद्यापीठातील सोशल सायन्स सेंटरच्या प्रभारी संचालिका डॉ. अनिता मोहिते यांनी केले.

उदयकाळ फाऊंडेशन आणि उदयगिरी सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सीएसआर कॉन्फरन्स २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मोहिते  बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात व्हर्टिव कंपनीचे वरिष्ठ संचालक डॉ. प्रशांत शिनगारे, अपिकोअर फार्मास्युटिकल्सचे उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार पाटील, उदयगिरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राम माने, संयोजक व उद्याकाळ फाउंडेशनचे सचिव मयूर बागूल व आरती बागूल आदी उपस्थित होते. 

सामाजिक विकास क्षेत्राची संकल्पना यावर समता शक्ती फाउंडेशनच्या संचालिका अर्चना गोमजे, प्रकल्प प्रस्ताव लेखन व निधीचे स्रोत यावर सिलॅबलच्या संस्थापिका डॉ. समीक्षा नेरुरकर, सीएसआर: कंपनीचा दृष्टीकोन यावर कल्याणी टेक्नोफोर्जचे राहुल सावंत, स्वयंसेवी संस्थांकडून कंपनीच्या अपेक्षा यावर अमडॉक्सच्या सीएसआर मॅनेजर दीप्ती घोणे कांबळे, स्वयंसेवी संस्था आणि सोशल मीडियावर विकास तिवस्कर यांनी विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले.  

डॉ. अनिता मोहिते म्हणाल्या, “स्वयंसेवी संस्थांनी ग्रामीण भागात पोहोचायला हवे. तिथे अनेक कामे करण्याची गरज असून, त्यामध्ये ‘सीएसआर’चे महत्व खूप आहे. विकास प्रकल्पांचे चांगले प्रस्ताव, अहवाल बनवायला पाहिजेत. कंपन्यांपर्यंत आपले काम पोहचले, तर निधी उपलब्ध होऊ शकतो. ‘एमएसडब्ल्यू’ झालेली व्यक्ती सोबत असल्यास हे काम अधिक प्रभावीपणे होऊ शकते.”

डॉ. प्रशांत शिनगारे म्हणाले, “चांगल्या कामांसाठी कंपन्या नेहमीच निधी उपलब्ध करून देतात. समाजोपयोगी उपक्रमांना त्यांनी पाठिंबा दिल्यास शाश्वत बदल घडवता येतो. युवकांनीही पुढाकार घेत सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करावा. हे उपक्रम केवळ समस्या सोडवत नाहीत, तर समाजात आशावाद आणि प्रेरणा निर्माण करतात.”

डॉ. नंदकुमार पाटील म्हणाले, “कंपन्यांनी केवळ व्यवसायिक लाभ न पाहता सामाजिक जबाबदारीही पार पाडली पाहिजे. आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रांत गुंतवणूक केल्यास समाजाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. स्थानिक उपक्रमांना पाठिंबा देणे ही काळाची गरज असून अशा प्रयत्नांतून कंपन्यांची सकारात्मक प्रतिमा निर्माण होते.”

राम माने यांनीही मनोगत व्यक्त केले. मयूर बागुल यांनी स्वागत-प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. केतकी पवार, वर्षा डांगी यांनी सूत्रसंचालन केले. कार्तिक चव्हाण यांनी आभार मानले. वर्षा डांगे, कार्तिक चव्हाण, राहुल माने यांनी परिषद यशस्वी साठी प्रयत्न केले.

गुरुकुल भक्तिवेदांत, उरळी कांचन येथे सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम

उरळी कांचन, – क्विक हील फाउंडेशन आणि एसपी कॉलेज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षण फॉर सायबर सुरक्षा” या उपक्रमांतर्गत गुरुकुल भक्तिवेदांत येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात विद्यार्थ्यांना वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देत सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याच्या विविध पद्धती समजावून सांगण्यात आल्या. विशेषतः सोशल मिडिया, ऑनलाइन गेमिंग, फिशिंग लिंक, पासवर्ड सुरक्षा यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

या सत्राद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे सायबर हल्ल्यांची परिणामकारकता आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यांची जाणीव करून देण्यात आली. तसेच, सायबर सुरक्षिततेसाठी काही महत्त्वपूर्ण टिप्सही दिल्या गेल्या. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभावी ठरला.

पद्मश्री डॉ. शंकर महादेवन यांनी गायलेले “बाप्पा मोरया” गाणं प्रकाशित 

राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि युवा उद्योजक श्री पुनीतदादा बालन यांच्या हस्ते प्रकाशित

पुणे-पद्मश्री डॉ. शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड झालेलं “बाप्पा मोरया” हे गाणं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं.

या गाण्याची निर्मिती अमोल घोडके आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी केली असून, हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक भक्तिपूर्ण सांस्कृतिक भेट ठरेल.

या गाण्याच्या माध्यमातून हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची परंपरा जपणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांचा जयघोष करण्यात आला आहे. पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक संगीताचा संगम साधणाऱ्या या गीतात गणेशोत्सवाचे वैभव प्रभावीपणे उभं राहिलं आहे.

“बाप्पा मोरया” या गाण्याला शंकर महादेवन यांचा सुमधुर स्वर लाभला असून, गीताचे बोल आणि संगीत शैलेश चंद्र लोखंडे यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले आहेत. संगीत संयोजन अवी लोहार यांनी केले असून, रिदम नागेश भोसेकर आणि नितीन शिंदे यांनी केले आहे. गाण्याला भक्तिरसात रंगवण्यासाठी अभिषेक शिंदे, रविराज काळे, समिहान सहस्त्रबुद्धे आणि मनोहर नारवडे यांनी कोरस गायनातून योगदान दिले असून या गीताचे मिक्सिंग अजिंक्य ढापरे यांनी केले आहे.

गाण्याच्या प्रकाशनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुनीत बालन यांनी “बाप्पा मोरया” या गीताला शुभेच्छा दिल्या.

दादा जे. पी. वासवानी यांची १०७ वी जयंती – ‘जागतिक क्षमादिन’ म्हणून साजरी

पुणे-

२ ऑगस्ट २०२५ रोजी पूज्य दादा जे. पी. वासवानी यांची १०७ वी जयंती जगभरात ‘जागतिक क्षमादिन’ म्हणून साजरी करण्यात आली. यंदाच्या वर्षीचा संदेश होता — “सोडून द्या… आणि मोकळं व्हा!”

दादा जे. पी. वासवानी यांनी क्षमाशक्तीच्या रूपांतरकारी सामर्थ्याचा जोरकस प्रचार केला. ते कायम सांगायचे, “क्षमा ही अंतःशांती आणि आत्मिक आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.” त्यांच्या या शिकवणुकीच्या प्रेरणेने दरवर्षी २ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक क्षमादिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दुपारी २ वाजता ‘मोमेंट ऑफ कॅाल्म’ — म्हणजेच ‘शांततेचा क्षण’ पाळला जातो, जो क्षमेला समर्पित असतो.

‘लेट-इट-गो’ बॉक्सचा उद्घाटन नुकतेच साधु वासवानी मिशनच्या प्रमुख दिदी कृष्णा कुमारी यांच्या हस्ते झाले. दादांच्या शिकवणुकीतून प्रेरित होऊन तयार केलेला हा बॉक्स एक प्रतीकात्मक साधन आहे — जे लोकांना त्यांच्या राग, दुःख, भीती यांसारख्या नकारात्मक भावना लिहून त्यात टाकण्यास प्रोत्साहित करतो, जेणेकरून त्या भावना अंतःकरणातून मुक्त होतील. हा उपक्रम हे शिकवतो की अशा नकारात्मक भावनांना दडपणं नव्हे, तर त्यांना पूर्णतः सोडून देणं आवश्यक आहे — ज्यातून मानसिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य प्राप्त करता येतं. असे ४५० हून अधिक बॉक्सेस जगभरातील विविध शहरांमध्ये ठेवण्यात आले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भोपाळच्या कविता यांनी सांगितले की, क्षमा ही रोजच्या सवयीचा भाग बनवल्यामुळे त्यांचे जीवनच पालटले. पूर्वी मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्या भोगत असलेल्या कविता आता अधिक हलकं, शांत आणि अनेक व्याधींपासून मुक्त वाटतात.

या उपक्रमात लायन्स क्लब, मास्टरकार्ड आणि वीवर्क यांसारख्या नामांकित कॉर्पोरेट संस्थांनी सहभाग घेतला. परमार्थ निकेतन, ब्रह्माकुमारीज आणि श्रीमद् राजचंद्र मिशन यांसारख्या आध्यात्मिक संस्थांनी देखील ‘मोमेंट ऑफ कॅाल्म’ पाळून सहभाग दर्शवला. भारतभरातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक ‘लेट-इट-गो’ बॉक्सच्या उपयुक्ततेचे कौतुक करत आहेत. सिंगापूर, बार्सिलोना, लॉस एंजेलिस आणि हाँगकाँग येथील साधु वासवानी केंद्रांनीही हे अभियान राबवलं.

२६ जुलै रोजी दिल्ली, न्यू यॉर्क, पुणे, मुंबई, बेंगळुरू, सिंगापूर, टेनेरिफ (स्पेन) आणि लंडन यांसारख्या शहरांमध्ये वॉकाथॉनसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर येथे “फोर्गिव्ह. रिलीझ. राईझ फ्री.” या शीर्षकाचा विशेष कार्यक्रम पार पडला, ज्याने जागतिक पातळीवर लक्ष वेधून घेतलं.

घराघरांत, कार्यालयांत, मंदिरे आणि वर्गखोल्यांत — सर्वत्र लोकांनी जुने राग, दुःख आणि भावनिक ओझं सोडून देण्यासाठी या उपक्रमात भाग घेतला.

पुणे येथील मिशनच्या मुख्यालयात तीन दिवसांचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये सत्संग, भजन, कीर्तन व दादा वासवानी यांचे प्रवचन सादर करण्यात आले. दिदी कृष्णा यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, आपल्या त्रुटी लपवण्यात काहीही उपयोग नाही. प्रत्येकाने त्या गुरूंच्या चरणी कबूल करून क्षमा आणि आशीर्वाद मागावा, असे त्यांनी आवाहन केले.

मिशनच्या विविध संस्थांमार्फत अनेक व्यापक सेवा उपक्रमही राबवण्यात आले.

क्षमेबद्दल बोलताना दिदी म्हणाल्या, “क्षमेच्या वृत्तीइतका सद्गुणांचा विकास करणारा दुसरा कोणताही मार्ग नाही.”

‘मोमेंट ऑफ कॅाल्म’ ही मोहीम दरवर्षी नव्या लोकांपर्यंत पोहोचत आहे, कारण अधिकाधिक लोकांना समजत आहे की ‘लेट गो’ केल्यामुळे मिळणारी भावनिक आणि आध्यात्मिक मुक्तता किती अमूल्य आहे.

दादा जे. पी. वासवानी हे भारताचे प्रख्यात संत, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि मानवतावादी होते — ज्यांना संपूर्ण जगात प्रेमाचा प्रेषित म्हणून ओळखलं जातं. विज्ञान विषयात उच्च शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य प्रेम, करुणा आणि आध्यात्मिक शहाणपणाच्या सेवेत अर्पण केलं.

एकदा एका विद्यार्थ्याने त्यांना विचारलं, “माझा मित्र वारंवार तीच चूक करतो, मी काय करावं?” त्यावर दादा हसून म्हणाले, “तो चुकत राहो, तू क्षमा करत राहा!” दादा कायम सांगायचे, “क्षमा करत राहा! ज्या प्रमाणात तुम्हाला देवाने क्षमा करावी असं वाटतं, त्याच प्रमाणात तुम्हीही इतरांना क्षमा करायला हवी.”

संविधानाशी सुसंगत बाबासाहेब शिंदे यांचे कार्य : डॉ. श्रीपाल सबनीस

सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सत्कार

पुणे : भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानवकेंद्रीत आहेत. माणूसपण आणि सेवेतून समर्पण या भावनेतून बाबासाहेब शिंदे संविधानाशी सुसंगत भूमिका घेऊन समाजकार्य करीत आहेत, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.

मनोहर कोलते मैत्र संघ, पुणे, नवरत्न ओल्ड एज होम आणि स्नेहछाया परिवार बालकाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 3) महावितरणमधील प्रधान यंत्रचालक बाबासाहेब शिंदे यांचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महावितरण मानव संसाधन विभागाचे संचालक राजेंद्र पवार, मनोहर कोलते, आर. टी. देवकांत, अनिता राकडे, दत्तात्रय इंगळे मंचावर होते. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जगत्‌‍गुरू संत तुकाराम महाराज यांची पगडी, शाल देऊन शिंदे यांचा गौरव करण्यात आला.

डॉ. सबनीस पुढे म्हणाले, शिंदे यांची भूमिका संघर्षाची असली तरी विचार संवादी आहेत. संवेदनेमुळे बोलण्यात आलेले कौशल्य अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले आहे. त्यांच्या सेवाकार्याची साक्ष अनेक उदाहरणांमधून दिसून येत आहे.

राजेंद्र पवार म्हणाले, शिंदे यांनी मैत्रीभाव जपत सहकारी, मित्रांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्यातील विनम्रता हा सहकारी आणि मित्रांमधील खरा दुवा आहे.

पुस्तकांची उपयुक्तता लक्षात घेऊन ज्या शाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले अशा शाळांना, नवरत्न वृद्धाश्रम, स्नेहछाया बालकाश्रमास पुस्तके भेद दिली. वाचनातून मनुष्य घडत जातो त्यामुळे विविध संस्था, शाळांना पुस्तके भेट देत असल्याचे बाबासाहेब शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. आर. टी. देवकांत यांनी मनोगत व्यक्त केले.

सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मनोहर कोलते म्हणाले, शिंदे यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेतली जावी या उद्देशाने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बाबासाहेब शिंदे यांच्या कार्याची माहिती चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत थेटे यांनी केले.

मंगळागौर: स्त्रियांच्या भक्ती आणि संस्कृतीचे आध्यात्मिक माध्यम – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे (३ ऑगस्ट, २०२५): कोथरूड येथील भुसारी कॉलनी परिसरात श्रावण महिन्याच्या निमित्ताने आयोजित ‘श्रावणबहार गीत आणि मंगळागौर’ कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळागौरचे महत्त्व सांगितले. त्या म्हणाल्या की, मंगळागौर हा केवळ स्त्रियांच्या मनोरंजनाचा खेळ नसून, तो भक्ती, सामाजिक एकोपा आणि स्त्रीशक्तीचे दर्शन घडवणारे एक आध्यात्मिक माध्यम आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन सौ. मीनल निलेश धनवटे आणि निलेश धनवटे यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी श्रावण महिन्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले. मंगळागौरच्या खेळांतून स्त्रिया एकमेकांशी नातेसंबंध दृढ करतात आणि आपली सांस्कृतिक परंपरा जपतात, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. गोऱ्हे यांनी पुढे म्हटले की, या परंपरा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत आणि त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. या खेळांमध्ये शारीरिक चपळता, गाणी, फुगड्या, उखाणे आणि समूहभावना यांचा सुंदर संगम दिसून येतो.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कोथरूडमधील महिलांचे डॉ. गोऱ्हे यांनी कौतुक केले. रविवार असूनही वेळात वेळ काढून हिंदू धर्म आणि संस्कृती जपण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी महिलांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे, युवासेना सरचिटणीस अनिकेत जवळकर, शिवसेना शहरप्रमुख (महिला आघाडी) श्रद्धा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. शेवटी, सौ. श्रद्धा शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

शिंदे गटाची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द पुढच्या महिन्यात संपेल:असीम सरोदेंचा दावा, सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा निकाल शक्य

पुणे-महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणाऱ्या शिवसेना फुटीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत वकील असीम सरोदे यांनी एक अत्यंत महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, येत्या महिनाभरात सर्वोच्च न्यायालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द संपुष्टात आणू शकते. सरोदे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

असीम सरोदेंची पोस्ट काय?

वकील असीम सरोदे यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिनाभरात संपवतील. कुणीही, कसेही, मन-मानेल त्या पद्धतीने पक्ष फोडतील, पक्ष पळवतील ही असंविधानिकता आणि पक्ष चोरी चालणार नाही असे प्रस्थापित होणे कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर प्रेम करणारा म्हणून मला महत्वाचे वाटते.असीम सरोदे म्हणाले की, असंवैधानिक प्रक्रियेतून सरकार प्रस्थापित करण्यात राज्यपाल पदावरील व्यक्तीने सक्रिय सहभागी घेणे , केंद्रीय निवडणूक आयोगाने कायदा बाह्य वागणे आणि विधानसभा अध्यक्षांनी कधीच तटस्थ न वागता बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करणे याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते सुद्धा मला बघायचे आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे. मात्र, घटनापीठाची सुनावणी 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत असल्याने शिवसेना प्रकरणावर कोणताही निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता शिवसेना चिन्ह आणि नावाच्या वादावर 15 सप्टेंबर नंतर किंवा ऑक्टोबरमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे.

खडकवासल्यात प्रदेश काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिका-यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा

११ ऑगस्ट पासून प्रदेश काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिका-यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा

प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार

मुंबई दि. ३ ऑगस्ट २०२५
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नविनयुक्त कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता संघटना मजबूतीसाठी पावले उचलायला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पुण्याच्या खडकवासला येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिका-यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

दि. ११ व १२ ऑगस्ट रोजी पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सर्व नवनियुक्त पदाधिका-यांसह राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे १० ऑगस्ट रोजीच या कार्यशाळेसाठी पुण्यात पोहोचणार आहेत.

१० ऑगस्ट रोजी सांयकाळी ६ वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी या कार्यशाळेसाठी निमंत्रीत पदाधिक-यांची नोंदणी होईल. ११ ऑगस्ट रोजी सकाळी, ७ वा. सामुदायिक प्रार्थनेने शिबिराची सुरुवात होईल. त्यानंतर १० वा. प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. नेते आणि वक्त्यांचे मार्गदर्शन, विविध चर्चासत्रेही होणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राजकीय व्यवहार समितीची बैठकही होणार आहे. १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने या कार्यशाळेची समाप्ती होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

ना. चंद्रकांतदादांच्या पाठपुराव्यामुळे राहुल कॅम्पसेक्सचा प्रॅापर्टी कार्डचा प्रश्न मार्गी

कोथरुडकरांचे प्रश्न सोडवण्यास सदैव कटिबद्ध- ना. चंद्रकांतदादा पाटील

माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्याकडून ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे कौतुक

पुणे

कोथरुड मतदारसंघातील पौड रोड येथील राहुल कॅाम्पलेक्सच्या प्रॅापर्टी कार्डचे बरेच वर्षे प्रलंबित होते. त्यामुळे सोसायटीचा पूनर्विकास रखडला होता. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड मधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून राबविलेल्या मोफत कायदेशीर सल्ला कक्षच्या पाठपुराव्याने सदर काम पूर्ण झाले. आज सोसायटीच्या सभासदांना त्यांचे प्रॅापर्टी कार्ड ना. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कोथरुडकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी ना. पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे, माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी ही नामदार पाटील यांचे कौतुक केले.

यावेळी माजी मंत्री शशिकांतभाऊ सुतार, पोस्टल बॅंकेचे स्वतंत्र संचालक तथा सोसायटीचे चेअरमन विनयजी गानू, भाजपा कोथरुड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजप कोथरुड दक्षिण मंडलचे माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उद्योजक प्रवीण बढेकर, माजी नगरसेविका ॲड. वासंती जाधव, मिताली सावळेकर, गिरीश भेलके, नवनाथ जाधव, सागर शेडगे यांच्यासह इतर मान्यवर आणि सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, स्वामी विवेकानंद आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या सर्व सामान्यांचे कल्याण झालं पाहिजे, या शिकवणीतून काम करत असतो. त्यातूनच कोथरुड मतदारसंघात गरजेवर आधारित उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांपैकीच एक असलेल्या मोफत कायदेशीर सल्ला उपक्रमामुळे ३०० सोसायटींचे प्रश्न सोडविण्यात यश आले. राहुल कॅाम्पलेक्सचा देखील प्रश्न सोडवताना अनेकांचे सहकार्य मिळाले, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. कोथरुड मधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यानिमित्ताने दिली.

यावेळी माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी ना. पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोथरुड हा अतिशय झपाट्याने विकसित होतं आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढणार आहे. त्यामुळे याची वेळीच दखल घेऊन कोथरुड मधील मिसिंग लिंकचा प्रश्न हाताळत आहेत, हे अतिशय अभिनंदनीय आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी यावेळी काढले.

रहिवासी प्रयोजनार्थ कुटुंबाना जागा पट्टे वाटपाची कार्यवाही सुरु-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे दि. २: ‘महसूल सप्ताह २०२५’ निमित्ताने जिल्ह्यात शासकीय जागेवर सन २०११ पुर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या पात्र कुटुंबांना नियमित करण्याच्या अनुषंगाने जागांचे पट्टे वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.

जुन्नर तालुक्यात एकूण १२ मंडळ भागातील शासकीय जागेवर २०११ पासून अतिक्रमण असलेली संख्या एकूण ७६४ आहेत, खेड तालुक्यात सर्वेक्षण करणेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

आमदार सुनील शेळके आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत मावळ येथे मौजे शिंदेवस्ती, ठाकर वस्ती, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे येथे वन जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यात आले. अपर तहसील पिंपरी चिंचवड अंतर्गत
देहू नगरपंचायत हद्दीतील मौजे विठ्ठलवाडी येथील सर्वे क्रमांक २ या शासकीय जागेमध्ये रहिवाशी प्रयोजनार्थ ६३४ कुंटुंबाचे अतिक्रमण असल्याचे आढळून आले आहेत.

अप्पर तहसील लोणी काळभोर अंतर्गत
मंडळ अधिकारी थेऊर यांच्यावतीने नायगाव व कदमवाकवस्ती येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करून घरकूल मंजूर करणे, त्याअनुषंगाने प्रस्ताव, आवश्यक कागदपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिरूर तालुक्यातील प्रत्येक मंडल भाग स्तरावर शासकीय जागेवर रहिवासी प्रयोजनार्थ असलेल्या अतिक्रमणाबाबत यादी तयार करण्याचे काम सुरु आहे.

पुरंदर तालुक्यात रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी दोन
लाभार्थ्यांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्यात आले. दौंड तालुक्यातील मौजे दहिटणे वाखारी दापोडी या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे.

महसूल सप्ताहानिमित्त प्रशासनाच्यावतीने गाव पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे, नागरिकांनी सहभागी होऊन विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

अतिरिक्त न्यायदंडाधिकारी बाल न्याय मंडळाच्या इमारतीचे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते उद्घाटन

बाल बंदींमधील ऊर्जेला योग्य वाट देत त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत – न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे

पुणे, दि. २: बाल न्याय मंडळात दाखल होणाऱ्या बालकांना त्यांच्या पूर्वायुष्यात योग्य मार्गदर्शन, साहाय्य न मिळाल्याने अजाणतेपणी गुन्हा घडतो. अशा बाल बंदीच्या समस्या, अडचणी समजून घेऊन त्यांच्यातील ऊर्जेला योग्य वाट देऊन जीवनात यशस्वी होण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी केले.

अतिरिक्त न्याय दंडाधिकारी बाल न्याय मंडळ, येरवडा या न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन होते. याप्रसंगी महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे, प्रमुख न्यायदंडाधिकारी, बाल न्याय मंडळ श्रीमती जी. एन. बागडोरिया, अतिरिक्त न्याय दंडाधिकारी श्रीमती एल. के. सपकाळ, महाराष्ट व गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, सदस्य ॲड. हर्षद निंबाळकर, ए. यु. पठाण, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंजाड आदी या उपस्थित होते.

पुणे येथे मोठ्या प्रमाणात बाल न्याय मंडळाकडे खटले प्रलंबित असल्याने हे नवीन मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगून न्यायमूर्ती श्रीमती मोहिते डेरे म्हणल्या, बाल न्याय मंडळासाठी आवश्यक त्या सर्व बाबी येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. निरीक्षणगृहात या बालबंदींना योग्य मार्गदर्शन, सहाय्य देण्याची यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास ते भविष्यात निश्चितच यशस्वी होतात, त्यादृष्टीने डोंगरी येथील बाल निरीक्षण गृह देशात आदर्श बनविण्यात आले. या बालकांमधील ऊर्जेला वाट करून देण्यासाठी बास्केटबॉल कोर्ट तयार करण्यात आले. व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले. निरीक्षणगृहातील प्रत्येक खोलीला वेगवेगळी रंग संगती देण्यात आल्यामुळे मुलांमध्ये एक सकारात्मक परिणाम दिसू आला. त्यांच्यातील समस्या तपासणीची व्यवस्था, संस्कारक्षम चित्रपट दाखविणे आदी सुविधा निर्माण करण्यात आल्यामुळे त्यातून यशस्वी नागरिक घडले आहेत. या ठिकाणी येऊन इतर बालबंदींना प्रेरणा देत आहेत. याच धर्तीवर राज्यातील सर्व निरीक्षणगृहांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

न्यायाधीश श्री. महाजन म्हणाले, बाल न्याय मंडळाशी संबंधित सर्वाधिक खटले मुंबई, ठाण्याबरोबरच पुणे येथे प्रलंबित आहेत. पुणे येथे जवळपास ५ हजार खटले प्रलंबित असून दरवर्षी नव्याने १२०० दाखल आणि तितकेच निर्गत होतात. आधीचे खटले तसेच प्रलंबित राहत असल्यामुळे अतिरिक्त बाल न्याय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे खटले निकाली निघण्यास वेग येणार आहे. या ठिकाणी ४० बालबंदींना नव्या वस्तूत राहायला मिळणार आहे.

श्रीमती गुंडे म्हणाल्या, महिला व बाल विकास विभागामार्फत प्रलंबित खटले गतीने निकाली व्हावेत यासाठी राज्यातील सहा जिल्ह्यात बाल न्याय मंडळांवर सदस्यांची नेमणूक करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यात लवकरच करण्यात येणार आहे. विभागामार्फत बालकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. दहा हजार बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात आली आहेत २०२३- २५ मध्ये अनाथ आरक्षणाअंतर्गत ७४० मुलांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आले असून ही संख्या वाढत जाणार आहे. बाल संगोपन योजनेअंतर्गत एक लाखापेक्षा अधिक मुलांना २ हजार २५० रुपये इतके दरमहा अनुदान, केंद्र शासनाच्या मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविडमुळे पालक गमावलेल्या ३३ हजार मुलांना ४ हजार रुपये डीबीटीद्वारे दिले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बालकांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी श्री. झंजाड यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमास विविध न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.