Home Blog Page 417

भव्यदिव्य सेटवर चित्रीत होणार रहस्यमय ‘घबाडकुंड’

जीवनात शिखरावर पोहोचण्यासाठी कितीही मेहनत घेतली, कष्ट उपसले, खस्ता खाल्ल्या तरी आयुष्यात एकदा तरी एखादं घबाड मिळावं आणि चुटकीसरशी श्रीमंत होता यावं असे प्रत्येकालाच वाटत असतं. अशाच प्रकारच्या घबाडाची आणि त्याचा शोध घेणाऱ्यांची गोष्ट ‘घबाडकुंड‘ या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘घबाड’ म्हणजे अचानक धनप्राप्ती होणे, एखादी लॅाटरी लागणे, नशीबच पालटणे असा घबाडचा अर्थ आहे. ‘कुंड’ म्हणजे विहीर किंवा पाणी जमा होणारी एखादी खोलगट जागा. या दोन्हींचे मिळून ‘घबाडकुंड’ असे सिनेमाचे लक्षवेधी शीर्षक ठेवले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी भव्यदिव्य, अत्यंत खर्चिक, नेत्रदीपक सेट तयार करण्यात आला आहे. मोठ्या पडद्यावर हा सेट प्रेक्षकांची नजर खिळवून ठेवणारा ठरणार आहे.

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील,  निर्माते रसिक कदम आणि सह निर्मात्या स्मिता पायगुडे -अंजुटे यांच्या साथीने सस्पेन्स थ्रिलर जॉनर प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. अ‍ॅक्शन, विनोद, रहस्य असा सगळा भरगच्च मसाला असलेला ‘घबाडकुंड’ चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी ट्रीट असणार आहे. ‘घबाडकुंड’ या चित्रपटाची कथा रहस्यमय असून, यात बऱ्याच चमत्कारीक गोष्टी घडताना दिसणार आहेत. दिग्दर्शक प्रीतम पाटील ‘घबाडकुंड’च्या रूपात आणखी एक उत्कंठावर्धक कथानक असलेला बिगबजेट चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. या चित्रपटासाठी पुण्याजवळील खेड-शिवापूर येथे सिनेमाचा सेट उभारला आहे. १० ते १२ हजार स्क्वेअर फुटांच्या जागेवर भव्य सेट उभारण्यात आला आहे. या सेटवर पाण्याची कुंड, खोलवर गेलेल्या विहिरी, पुरातन मंदिरे, गुहा, त्यातून जाण्या-येण्याचे मार्ग यांचा वापर गूढ निर्माण करणारी रहस्यमय दृश्ये चित्रीत करण्यासाठी केला जाणार आहे. या चित्रपटात देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, साहिल अनलदेवर आदि कलाकारांची  फौज मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.

मराठीत प्रथमच अशाप्रकारे भव्य-दिव्य सेट तयार करण्यात आला असून, विविध माध्यमांद्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे कलाकार या चित्रपटात विविधांगी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात रहस्य, थरार, विनोदाच्या जोडीला नात्यांची गुंतागुंतही पाहायला मिळणार आहे. घबाडाचा शोध घेताना अनाहूतपणे एकमेकांवर दाखवला जाणारा अविश्वास आणि त्यातून निर्माण होणारे संशयी वातावरण उत्सुकता वाढवणार आहे. ‘घबाडकुंड’च्या रूपात शीर्षकापासून सादरीकरणापर्यंत एक दर्जेदार बिगबजेट चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकूणच चित्रपट पाहताना प्रेक्षकांना ‘लार्जर दॅन लाईफ’ असा अनुभव घेता यावा यासाठी ‘घबाडकुंड’ची कलाकार-तंत्रज्ञांची टिम कठोर परिश्रम घेत आहे.

याविषयी  दिग्दर्शक  प्रीतम  एस. के. पाटील म्हणाले की, ‘मराठीतही प्रचंड, भव्य कॅनव्हास असू शकतो हे ‘घबाडकुंड’च्या निमित्ताने दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अप्रतिम सेट डिझाइन, संगीत, छायालेखन, संकलन, अभिनय, कम्प्युटर ग्राफिक्स अशा सर्व तांत्रिक बाजू उत्तम असलेला ‘घबाडकुंड’ गोष्ट आणि सादरीकरण या जोरावर कमालीचा यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सिनेमा अर्थातच खूप खर्चिक असला तरीही सिनेमाचा मूळ मुद्दा गोष्ट आवडण्याचा आणि ती तशी सादर करण्याचा असतो. इथं त्या आघाडीवर  आम्हाला कुठेही कमी पडायचं नव्हतं. वेगवेगळ्या सेक्टर मध्ये  काम करणारी ‘आयकॉन दी स्टाईल’ ही आमची  कंपनी आता ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकत असून आमच्या या वेगळ्या  प्रयत्नांचे स्वागत होईल, याची खात्री निर्माते रसिक कदम आणि सह निर्मात्या स्मिता पायगुडे-अंजुटे यांनी बोलून दाखविली. 

व्हेलेंटिना इंडस्ट्री्ज लि. चे विशेष सहकार्य लाभलेला ‘घबाडकुंड’ चित्रपट मराठी, हिंदी, तेलगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे लेखन संजय नवगिरे, अक्षय धरमपाल यांचे आहे. कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांचे आहे. कार्यकारी निर्माता आकाश जाधव आहेत. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी या चित्रपटासाठी साहसदृश्याची जबाबदारी सांभाळली आहे.  रंगभूषा अभिषेक याची आहे. प्रोडक्शन मॅनेजर सिद्धार्थ आहेत.

अखंड भारताचे स्वप्न हे मोदीजींच्या राज्यात लवकरच सत्यात उतरणार- उज्वल निकम

पुणे १४;- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने विभाजन विभिषिका दिवस पाळला गेला याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा सारसबाग येथून पुरम चौकापर्यंत मुकयात्रा काढण्यात आली यावेळी जेष्ठ विधीज्ञ व राज्यसभा सदस्य श्री उज्वल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी बोलताना श्री निकम म्हणाले उज्जवल निकम म्हणाले
‘भारताला स्वतंत्र १५ रोजी ऑगस्ट निश्चित भारताला आनंद झाला, त्या बरोबरच दि.१४ ऑगस्ट ही तरखी आम भारतीयांना कधी विसरता येणार नाही, कारण या दिवशी आमच्या भारतीयाला काही व्यक्तींनी अतिशय वाईट रित्या व्यवहार केला आहे. आणि ही भावना आज ही आमच्या मनात तेवत आहे. आम्हाला जे स्वतंत्र मिळालं ते थोरस्वावतंत्र सैनिकांच्या अवतीमुळे मिळालेला आहे. हे आम्ही विसरू शकत नाही यामध्ये सावरकरजी असतील असे अनेक थोर सेनानी होऊन गेले. परंतु आम्हाला खात्री आहे की भारता पुन्हा एकदा अखंड होईल. जो भारत आपल्या पासून 14 ऑगस्ट ला दूर गेला तो पूर्ण करण्याचा काम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील असा मला विश्वास आहे.’

या यात्रेमध्ये उज्वल निकम यांच्यासह शहराध्यक्ष धीरज घाटे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आमदार हेमंत रासने पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी रवींद्र साळेगावकर विश्वास ननावरे प्रियांका शेंडगे शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

पॅरा एडिशनमध्ये मनीष नरवालची सुवर्ण कामगिरी..!

  • खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ दिवस चौथा

पुणे : खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ च्या चौथ्या दिवशी हरियाणाच्या मनीष नरवाल यांनी शानदार कामगिरी करत २२९.२ गुण घेत सुवर्णपदक पटकावले. श्री. शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी येथे सुरू असलेल्या खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ च्या चौथ्या दिवशी त्यांनी ही सुवर्ण कामगिरी केली.

मनीष यांनी P4 मिक्स्ड 50 मीटर पिस्तूल SH1 प्रकारात राजस्थानच्या रुद्रांश खंडेलवाल यांचा ०.७ गुणांच्या फरकाने पराभव केला. यामुळे रुद्रांश यांना २२९.२ गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, तर हरियाणाच्या संदीप कुमार यांनी २०८.१ गुणांसह कांस्य पदकाची कमाई केली.

चौथ्या दिवशी खेळण्यात आलेली स्पर्धा अत्यंत चुरशीची राहिली. पहिल्या फेरीपासूनच मनीष नरवाल आणि रुद्रांश खंडेलवाल यांच्यात गुणांची चुरस दिसत होती. अखेरीस मनीष यांनी शेवटच्या सिरीजमध्ये उत्कृष्ट १०.४ पॉईंटची नेमबाजी करत आघाडी घेतली आणि सुवर्णपदक निश्चित केले.

इतर खेळाडूंमध्ये राजस्थानच्या निहाल सिंह यांनी १८६.० गुणांसह चौथा क्रमांक मिळवला. आर्मीच्या आमिर अहमद (१६३.६ गुण) पाचव्या स्थानावर राहिले, तर तामिळनाडूच्या संजय कुमार (१४२.० गुण) सहाव्या, उत्तर प्रदेशच्या आकाश (१२६.६ गुण) सातव्या आणि हरियाणाच्या सिंहराज (१०१.६ गुण) आठव्या क्रमांकावर राहिले.

“’आचार्य अत्रे जीवनगौरव पुरस्कार’ हा संस्कारांचा सन्मान असून माझ्यावर हे संस्कार करणाऱ्या सर्वांना हा सन्मान समर्पित!”- ‘मराठी बाणा’कार अशोक हांडे 

मुंबई, विशेष प्रतिनिधी : आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या कन्या शिरीष पै आणि मीना देशपांडे यांनी स्थापन केलेल्या ‘आत्रेय’ या संस्थेतर्फे दरवर्षी १३ ऑगस्ट या आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनी, “आचार्य अत्रे पुरस्कार” दिला जातो. आचार्य अत्रे यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून यावर्षीचा हा पुरस्कार प्रख्यात गायक, पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक व नाटककार म्हणून लौकिक असलेले रंगकर्मी अशोक किसनराव हांडे यांना जेष्ठ विडंबनकवी वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘आचार्य अत्रे जीवनगौरव पुरस्कार’ स्वीकारल्यावर अशोक हांडे म्हणाले. “उंब्रज गावातील भजने, आईच्या ओव्या, हरिपाठ, रंगारी बदक चाळीतील संस्कार आठवतात. माझ्यावर जे रुजवले त्याचा हा पुरस्कार आहे.” याप्रसंगी व्यासपीठावर हर्षवर्धन देशपांडे, डिंपल प्रकाशनचे प्रकाशक अशोक मुळे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, साहित्यिक महेश केळुस्कर, ॲड. राजेंद्र पै. विक्रम पै उपस्थित होते.

या पुरस्काराला उत्तर देताना पुढे अशोक हांडे म्हणाले, “मराठी संस्कृती, या राज्याचा इतिहास, भूगोल, मर्म आणि धर्म पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज गरज आहे. आचार्य अत्रे यांच्या स्मृत्यर्थ दिला गेलेला पुरस्कार हा मराठी मातीमुळे, इथल्या संस्कारांमुळे आहे,” असे ते म्हणाले.

‘आत्रेय’चा ‘आचार्य अत्रे जीवनगौरव पुरस्कार’ आत्तापर्यंत हा पुरस्कार मंगेश पाडगावकर, बाबासाहेब पुरंदरे, द. मा. मिरासदार,ना. धो. महानोर, डॉ. जयंत नारळीकर, हृदयनाथ मंगेशकर, रामदास फुटाणे, मधुकर भावे, किरण ठाकूर, डॉ. तात्याराव लहाने, अण्णा हजारे, डॉ. जब्बार पटेल, मधु मंगेश कर्णिक अशा दिग्गज  मान्यवरांना हा पुरस्कार दिला गेला आहे. अत्रे यांच्या १२७ व्या जयंती दिनी त्यांच्या नावाचा यंदाचा हा जीवनगौरव पुरस्कार अत्रेंसारखेच मराठी आस्मिता जागवणारे अष्टपैलू रंगकर्मी अशोक हांडे या ‘मराठी बाणा’ आणि ‘मराठी आस्मिता’ जागवणाऱ्या अशोक हांडे यांना प्रदान करताना मनस्वी आनंद होत आहे, हाच आनंद माझी आई शिरीष पै यांनाही झाला असेल असे ‘आत्रेय’चे ॲड. राजेंद्र पै यांनी अत्रे कुटुंबियांच्या वतीने व्यक्त केले.

या सोहळ्याचे विशेष अतिथी प्रख्यात विडंबनकवी वात्रटिकाकार रामदास फुटाणे म्हणाले “हत्तीण आली पाहिजे, कबुतर गेले पाहिजे यांसारखी अतिमहत्वाची कामे सोडून लोक आले असल्याचे म्हणत त्यांनी त्यांच्या मिश्किल शैलीत चिमटा यावेळी काढला. महाराष्ट्रात मराठीवरून सुरू असलेले राजकारण, मराठी संस्कृती जपण्यासाठीचे प्रयत्न, घरांमधून कमी होणारा मराठीतील संवाद, कमी झालेले वाचन, मराठी – अमराठी वाद अशा पार्श्वभूमीवर मराठी टिकवण्याची जबाबदारी गांभीर्याने स्वीकारण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ‘महाराष्ट्रातील अमराठी लोकांना मराठी भाषिक करावे लागेल, ही राज्यकत्यांची जबाबदारीआहे, अशा शब्दांमध्ये फुटाणे यांनी राज्य सरकारला कर्तव्याची जाणीव करून दिली.

‘महाराष्ट्र’ हे नाव अत्रेंमुळे मिळाले, याची आठवण करून देत आज अत्रे हवे होते असे उद्गार  ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी काढले. अत्रे यांचे साहित्य पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेही आवाहन त्यांनी केले.  या सोहळ्यामध्ये ‘झेंडूची फुले’वर आधारित काव्य आणि विडंबनात्मक काव्याचा सांगीतिक कार्यक्रम ॲड. राजेंद्र पै यांनी सादर केला. यामध्ये रामदास फुटाणे आणि डॉ. महेश केळुसकर यांच्यासोबत मैथिली पानसे जोशी, शिवानी गायतोंडे, निनाद आजगांवकर आणि कौशल इनामदार आदी सहभागी झाले होते.

‘झेंडूची फुले’ची शताब्दी आवृत्ती

आचार्य अत्रे यांच्या जयंतीदिनी त्यांनी लिहिलेल्या ‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्यसंग्रहाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने या काव्यसंग्रहाच्या शताब्दी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या शताब्दी संग्रहाचे संपादन कवी डॉ. महेश केळुसकर यांनी केले आहे. डिंपल प्रकाशनाने याचे प्रकाशन केले आहे. या वेळी ‘कऱ्हेचे पाणी’ या अत्रेंच्या आत्मचरित्राचेही पुनर्प्रकाशन करण्यात आले. परचुरे प्रकाशनाच्या माध्यमातून हे प्रकाशन करण्यात आले. मनोरमा प्रकाशनातर्फे ‘अत्रे टोला’ आणि ‘अत्रे प्रहार’ या ग्रंथांचेही यावेळी पुनर्प्रकाशन करण्यात आले.

‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’तर्फे अवयवदान जनजागृती व संकल्पासाठी ‘जिंदगी मिलेगी दोबारा’ अभियान सुरू

पुणे१४ ऑगस्ट २०२५ – देशात लाखो रुग्णांना योग्य ते आवश्यक अवयव उपलब्ध नसल्याने जीव वाचविण्यासाठी अवयव प्रत्यारोपणाची प्रतीक्षा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्रि हॉस्पिटल्सने ‘जिंदगी मिलेगी दोबारा’ हे मोहीम सुरू केली आहे. अवयवदानाबाबत सर्वसामान्यांत जागृती निर्माण करणे आणि नागरिकांना अवयवदानाची शपथ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. भारतामध्ये मृत व्यक्तींच्या अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. देशात अवयवदानाचा दर दशलक्ष लोकसंख्येमागे १ पेक्षा कमी आहे. सन २०२४ मध्ये देशात सुमारे १८,९०० अवयवांचे प्रत्यारोपण झाले असून भारत जागतिक स्तरावर संख्येनुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही, दरवर्षी अंदाजे १.७५ लाख रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असते, तर यकृत, हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी प्रत्येकी सुमारे ५० हजार रुग्ण प्रतीक्षेत असतात. सह्याद्रि हॉस्पिटल्सचे हे अभियान दि. १३ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत, जागतिक अवयवदान दिनापासून सुरू होऊन, पुणे, नाशिक, कराड व अहिल्यानगर येथील सर्व सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये राबवले जाणार आहे. यात सोशल मीडियावरील व्हिडिओ, आवाहने, गैरसमज दूर करणारी माहिती यांचा प्रसार करण्यात येईल, तसेच प्रत्यक्ष लोकसंपर्क साधणाऱ्या उपक्रमांतून नागरिकांना अवयवदानाचा संकल्प करण्यासाठी प्रेरित केले जाईल. समाजातील एखाद्या नागरिकाला तुमच्यामुळे जीवनदान मिळू शकेल, असे आवाहन केले जाईल.

या आठवड्याच्या सुरुवातीला, सह्याद्रि हॉस्पिटल’मध्ये मेंदूमृत घोषित झालेल्या एका २१ वर्षीय दात्याने पुण्यातील पाच गंभीर आजारी रुग्णांचे जीव वाचवले. अपार धैर्य व करुणा दाखवत या दात्याच्या कुटुंबाने जीवनाची अमूल्य भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यकृत, हृदय, फुफ्फुस व मूत्रपिंडाच्या गंभीर आणि जीवघेण्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना प्रत्यारोपण मिळाले. एका छोट्या निर्णयाचा परिणाम किती विलक्षण असू शकतो आणि फक्त संबंधित रुग्णांनाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांना व समाजालाही कसा दिलासा मिळू शकतो, हे अशा घटनांमधून दिसून येते. म्हणूनच अवयवदानाचा संकल्प हा सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे.

या मोहिमेअंतर्गत नागरिक www.ZindagiMilegiDobara.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन संकल्प करू शकतात किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल’च्या विविध युनिट्स, कॉर्पोरेट ऑफिस, मेट्रो स्थानकांवरील अवयवदान केंद्रांमध्ये जाऊन संकल्प नोंदवू शकतात. इच्छुकांना या संपूर्ण प्रक्रियेत प्रशिक्षित स्वयंसेवक मार्गदर्शन करतील.

वेबसाइटद्वारे संकल्प करणे असो, QR कोड स्कॅन करणे असो किंवा प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होणे असो, ही प्रत्येक कृती कोणाचे तरी प्राण वाचवू शकते. अवयवदानाचा संकल्प करून तुम्ही कोणाच्या तरी आयुष्यात नायक बनू शकता — आणि यंदा रुपेरी पडद्याचा नायक, बॉलीवूडचा आयकॉन अनिल कपूर यांना भेटण्याची संधीही मिळवू शकता!

आता संकल्प करा: www.ZindagiMilegiDobara.com

स्कॅन करा आणि संकल्प करा. कुणाच्या तरी जीवनात सुपरस्टार बना.

“महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पदक घोषित.”

महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांना स्वातंत्र्यदिन दिनांक 15 ऑगस्ट 2025 च्या औचित्यावर राष्ट्रपतींकडून गुणवत्तापूर्ण सेवेकरीता पदक जाहीर करण्यात आले असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पदक

1.    श्रीमती राणी राजाराम भोसले, अधीक्षक, ठाणे मध्यवर्ती कारागृह.

2.    श्री राजाराम रावसाहेब भोसले, अतिरिक्त अधीक्षक, ठाणे मध्यवर्ती कारागृह.

3.    श्री गजानन काशिनाथ सरोदे, उपअधीक्षक, मुंबई मध्यवर्ती कारागृह.

4.   श्री संजय गंगाराम शिवगण, सुभेदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह

5.    श्री सुधाकर ओंकार चव्हाण, हवालदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह.

6.    श्री राजेश मधुकर सावंत, हवालदार, भायखळा जिल्हा कारागृह

7.   श्री संजय सदाशिव जाधव, हवालदार, भायखळा जिल्हा कारागृह

8.    श्रीमती विद्या भरत ढेंबरे, कारागृह शिपाई, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह.

उक्त नमूद केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत शासकीय कर्तव्याप्रती दाखविलेली सचोटी व निष्‍ठेचा एक प्रकारे सन्मान झाला आहे. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मा.राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवापदक घोषित झाले आहे त्यांचे कारागृह विभागाचे वतीने सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य व योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांनी अभिनंदन केले.

भिमसैनिकांडून स्मारकाच्या नियोजित जागेवर बाबासाहेबांच्या नावाची कमान

पुणे : मंगळवार पेठ येथील एमएसआरडीसी ची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी अर्थात बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी उपलब्ध व्हावी या मागणीसाठी उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री बहाद्दर भीमसैनिकांनी जागेच्या गेटवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची नियोजित जागा असा फलक लावला आहे. हा फलक लावल्यामुळे आंबेडकरी चळवळीमध्ये चैतन्य उसळले असून उद्याचे आंदोलन अधिक व्यापक व शांततेत होण्याचे स्पष्ट संकेत यातून मिळत आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पुणे व पश्चिम महाराष्ट्रात नसल्याची खंत आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये गेली अनेक वर्ष खदखद आहे. त्या पार्श्वभूमीवर केवळ पुणे शहरच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण असे सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी उभे व्हावे या उद्देशाने या स्मारकाची मागणी करण्यात येत आहे.

उद्याच्या आंदोलनामध्ये किमान 50 हजार भीमसैनिक स्त्री-पुरुष सहभागी होतील असा विश्वास आंदोलकांच्या आयोजकांना असून त्या दृष्टिकोनातून सर्व नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आलेले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता भयमुक्तपणे या वातावरणात सहभागी व्हावे असे अवाहन करण्यात येत आहे.

आंदोलनाची सुरुवात भारतीय राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीता द्वारे करण्यात येणार आहे.

डॉ. सागर तांबेंना ‘बेस्ट प्रेझेंटेशन पेपर पुरस्कार’

दक्षिण कोरियातील परिषदेत एमआयटी एडीटी विद्यापीठाची झळाळी

पुणे/उल्सान (दक्षिण कोरिया) : पुण्यातील एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सागर तांबे यांनी दक्षिण कोरियातील युनिव्हर्सिटी ऑफ उल्सान येथे झालेल्या १७व्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ह्युमन सिस्टम इंटरॅक्शन (IEEE HSI 2025) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी नोंदवली.

एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या इंटरनॅशनल रिलेशन्स सेलचे सदस्य म्हणून डॉ. तांबे यांनी वास्तविक जगात सहाय्यक तंत्रज्ञानाची प्रगती या विषयावर सत्राध्यक्ष म्हणून काम पाहिले तसेच महत्त्वपूर्ण तांत्रिक संशोधन सादर केले. त्यांच्या या सक्रिय सहभागामुळे आणि नेतृत्वगुणांमुळे भारताची शैक्षणिक व तांत्रिक उपस्थिती जागतिक पातळीवर अधोरेखित झाली.

या परिषदेत डॉ. तांबे यांनी विविध देशांतील प्राध्यापक व संशोधकांशी संवाद साधत संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी व प्राध्यापक देवाण-घेवाण कार्यक्रम, उद्योग-विद्यापीठ सहकार्य आणि तांत्रिक हस्तांतरण यांसारख्या संधींसाठी मार्ग मोकळा केला.

डॉ. तांबे यांच्या या आंतरराष्ट्रीय गौरवानंतर विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ. रामचंद्र पुजेरी, संचालक डॉ. विपुल दलाल, अधिष्ठाता डॉ. रजनीकौर सचदेव-बेदी, डॉ. रेखा सुगंधी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

वायरलेस प्रणालींसाठी महत्वपूर्ण संशोधन

डॉ. तांबे यांनी डॉ. जयश्री प्रसाद आणि डॉ. रजनीशकौर सचदेव यांच्या सहलेखनातून सादर केलेल्या वायरलेस बॉडी सेन्सर नेटवर्कचे तुलनात्मक विश्लेषण: ओएमएनईटी++, कॅस्टालीया, एनएस३ए या संशोधनपत्राला परिषदेत ‘बेस्ट प्रेझेंटेशन पेपर पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. या संशोधनात वायरलेस बॉडी सेन्सर नेटवर्क्ससाठी (डब्ल्यूबीएसएनएस) विविध सिम्युलेशन टूल्सचे तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले असून, हे संशोधन मानवी-केंद्रित वायरलेस प्रणालींच्या संशोधक आणि तांत्रिक तज्ज्ञांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

मराठी भाषा म्हणजे संस्कृती; ती शिकणे आणि जपणे गरजेचे — कृपाशंकर सिंह

पुण्यात शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

पुणे : “मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली संस्कृती आहे. आपण ज्या राज्यात राहतो, त्या राज्यातील भाषा जर शिकली नाही, तर त्या भूमीची संस्कृती समजणार नाही. मराठी आपण शिकलीच पाहिजे, जपलीच पाहिजे,” असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी केले.

पुण्यातील उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल गुरुवारी एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी खासदार रजनीताई पाटील, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, बिटीया फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता तिवारी, अभिनेत्री स्मिता गोंदकर, ‘कोहिनूर ग्रुप’चे चेअरमन कृष्णकुमार गोयल, दूरदर्शनचे माजी अतिरिक्त संचालक मुकेश शर्मा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाला.

कृपाशंकर सिंह म्हणाले, “पुण्यात आयोजित शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमधील लघुपट समाजप्रबोधन करणारे आहेत. असा महोत्सव मुंबईतदेखील झाला पाहिजे. तरुणाई समाजासाठी महत्त्वाचे संदेश देत आहे, हे कौतुकास्पद आहे.”

खासदार रजनीताई पाटील म्हणाल्या, “या महोत्सवातील लघुपट हृदयाला भिडणारे आणि समाजाचे डोळे उघडणारे आहेत. ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘बिटीया फाउंडेशन’चे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. असा प्रबोधनपर महोत्सव दिल्लीमध्येही घेण्याचा मानस आहे.” त्यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने ‘पुनीत बालन ग्रुप’ गणेशोत्सव साजरा करीत असल्याचेही नमूद केले.
   प्रास्ताविक संगीता तिवारी यांनी केले. त्यांनी सांगितले की, महोत्सवात ३०० हून अधिक सामाजिक संदेश देणाऱ्या लघुपटांनी सहभाग घेतला होता. तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग हा महोत्सवाचा मुख्य आधार होता. लघुपटांचे परीक्षण सेन दाभोलकर, झहीर दरबार, विशाल गोरे आणि सचिन दानाई यांनी केले. सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले, तर पुनमीत तिवारी यांनी आभार मानले.

पारितोषिक विजेते :

दीड ते तीन मिनिटे गट : पहिले — संदेश वीर, दुसरे — अर्थव शालीग्राम, तिसरे — अक्षय वसकर

तीन ते चार मिनिटे गट : पहिले — तेजस पाटील, दुसरे — अक्षय वसकर, तिसरे — अक्षय भांडवलकर; विशेष — शुभम आणि सांची

पाच ते सात मिनिटे गट : पहिले — स्वप्निल गायकवाड, दुसरे — मेधा गोखले, तिसरे — अभिताभ भवर

रील गट : पहिले व दुसरे — व्यंकटेश सुंभे
विशेष उल्लेख : अक्षय वसकर , अविनाश पिंगळे, मेधा गोखले, अन्वय निरगुडकर

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात ‘तिरंगी’ सजावट

स्वातंत्र्यदिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि संत ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जयंतीनिमित्त प्रतिकृती व पुष्पसजावट
पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्यदिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मंदिरात योगेश्वर श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिकृती व पुष्पसजावट करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विशेष शासन निर्णयानुसार श्री दत्त मंदिरामध्ये सप्त शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तिरंगी सजावट देखील करण्यात आले आहे.

सजावटीचा शुभारंभ निकम दिंडी क्र. १६ चे अध्वर्यू निष्ठावंत ज्येष्ठ वारकरी, समाजभूषण ह.भ.प. शांताराम महाराज निम्हण यांचे हस्ते झाला. यावेळी नवी दिल्ली येथील सेंट्रल गांधी स्मारक निधीचे सचिव संजय सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, कोषाध्यक्ष युवराज गाडवे आदी उपस्थित होते. ट्रस्ट तर्फे त्यांचा महावस्त्र आणि सन्मानचिन्ह देवून यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला.

ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, योगेश्वर श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान सांगितले ते संत ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वसामान्यांसाठो प्राकृत भाषांतर केले. ज्ञानेश्वरीचे गारुड केवळ वारकरी संप्रदायच नाही तर अवघ्या मानव संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ह भ प शांताराम महाराज निम्हण यांनी आपल्या सुश्राव्य स्वरात ज्ञानेश्वर महाराजांची आरती केली. ही सजावट शनिवार, दि.१६ ऑगस्ट पर्यंत खुली असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

स्वातंत्र्यदिनादिवशीच स्वातंत्र्यावर घाला:कुणी काय खावे सरकारने ठरवू नये- राज ठाकरे

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मांसविक्री बंदीच्या निर्णयावरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “मांसविक्री बंदीसारखे निर्णय घेण्याचा अधिकार सरकार किंवा महापालिकेला नाही,” असे सांगत राज यांनी हा लोकांच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप केला. कबुतरखान्यांवरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केले, “हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे, धर्माच्या नावाखाली नियम मोडणे चुकीचे आहे.” राज्यात सरकार जाणीवपूर्वक समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) जोरदार तयारीला लागली आहे. आज, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज ठाकरे म्हणाले, मांसविक्री बंद करण्याचे अधिकार महापालिकेकडे नाहीत. कोण काय खावे आणि काय खाऊ नये हे ठरवणे सरकार किंवा पालिकेचे काम नाही. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच लोकांना खाण्याचे स्वातंत्र्य न देणे हा सरळ विरोधाभास आहे. स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी आणू शकता? कोणाचे काय धर्म आणि सण आहेत, त्याप्रमाणे काय खावे आणि कुणी काय खाऊ नये, ही बाब सरकारने सांगू नये, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.

ते पुढे म्हणाले, याबाबतचा कायदा 1988 साली आणल्याचे मी ऐकले. कायदा कधीही आणला असला, तरी स्वातंत्र्यदिनी आपण लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहोत. कोणत्याही सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे.

कबुतरखाना प्रकरणात धर्माच्या नावाखाली नियमभंग चुकीचालोढा राज्याचे मंत्री, एका समाजाचे नाहीत

राज ठाकरे यांनी कबुतरखान्यांवरून सुरू असलेल्या वादावरही भाष्य केले. हायकोर्टाचा स्पष्ट आदेश आहे आणि त्या आदेशानुसार सर्वांनी वागले पाहिजे. कबुतरांमुळे होणाऱ्या रोगांबद्दल डॉक्टरांनी सांगितले आहे. बंदी असतानाही जर धर्माच्या नावाखाली कबुतरांना खाद्य दिले जात असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. पोलिसांनी त्यावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा एकाचा आदर्श पाहून इतरही तसेच करतील. मग हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाचा अर्थ काय? असे राज ठाकरे म्हणाले.जैन समाजाच्या आंदोलनावेळी पोलिसांनी तत्काळ कारवाई केली पाहिजे होती, असे सांगत ठाकरे म्हणाले, “लोढा यांच्यासारखे लोक या प्रकरणात मध्यस्थी करत आहेत. ते कुठल्या एका समाजाचे नाहीत, तर राज्याचे मंत्री आहेत. महाराष्ट्राचा आणि न्यायालयाचा सन्मान त्यांनी राखायला हवा.”

काल झालेल्या मराठी बांधवांच्या आंदोलनातील घटनांचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “राज्यात नेमके काय सुरू आहे, हेच कळत नाही. सरकारला हवे तरी काय? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार सर्व समाजांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पहिले हिंदीचा विषय आणला, तिथे वातावरण पेटते का ते बघितले. त्यानंतर आता त्यांनी कबुतरांचा विषय आणला. इथून पुढे कोणते प्राणी आणतील ते माहीत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी सरकारवर केली.

मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे मी 2016-2017 सालापासून बोलतोय. बाकीचे आत्ता बोलायला लागलेत, असे राज ठाकरे म्हणाले. मुंबई महानगरपालिकेतील मतदार याद्यांची पुनर्तपासणी झाली पाहिजे. आमची लोक ही मतदार याद्यांची तपासणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिन ‘सौरग्राम दिन’ म्हणून होणार साजरा

ग्रामसभारोड शोचित्ररथ आदींद्वारे सूर्यघर योजनेची जनजागृती

पुणेदि१४ ऑगस्ट२०२५ :- पुणे जिल्ह्यातील १९१९५ हजार वीज ग्राहकांनी ‘पंतप्रधान सूर्यघर-मोफत वीज योजने’चा लाभ घेतला असून, ही योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरणने आता स्वातंत्रदिन ‘सौरग्राम दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. या दिवशी महावितरणचे अभियंते-कर्मचारी प्रत्येक गावात ग्रामसभा व विविध कार्यक्रम घेऊन वीजग्राहकांना या योजनेसाठी प्रोत्साहित करणार आहेत.

देशातील प्रत्येक नागरिकाला विजेच्या बाबतीत स्वावलंबी बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान सूर्यघर- मोफत वीज योजना’ सुरु केली आहे. स्वत:च्या घराच्या छतावर वीज तयार करुन तिचा वापर करणे हा त्याच्या मागील उद्देश आहे. या योजनेच्या अनुदानासाठी केंद्राने  ७५ हजार कोटींची तरतूद केली आहे. राज्यात महावितरणने १००० मेगावॅट वीज क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे. पुणे जिल्ह्यात १९१९५ ग्राहकांनी छतावर सौरप्रकल्प साकारले आहेत. त्याची स्थापित क्षमता ८९ मेगावॅट इतकी आहे.

छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ग्राहकांना थेट अनुदान मिळते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये, दोन किलोवॅटला साठ हजार रुपये तर तीन किलोवॅटला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. गृहनिर्माण संस्थांनाही पाचशे किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट १८ हजार रुपये अनुदान मिळते. छतावर बसविलेल्या सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पातून पुढे २५ वर्षे वीजनिर्मिती होते. या वीजनिर्मितीमुळे ग्राहकाची घरगुती गरज पूर्ण होते व अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते.

ही योजना घरांघरात पोहोचविण्यासाठी स्वातंत्रदिनी ग्रामसभा, रॅली, रोड शो आयोजित करुन सूर्यघर योजनेचे प्रसिद्धीपत्रके वाटून ग्राहकांना त्याचे महत्व पटवून देण्याचे काम केले जाणार आहे. पुणे शहरातील गृहनिर्माण संस्थामध्येही कार्यक्रम आयोजित करुन सूर्यघर योजनेची माहिती दिली जात असून, अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये महावितरणने मोठ्या प्रमाणात मेळावे देखील घेतले असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. 

तुम्ही करा नाही तर आम्ही सकाळी ७ वाजताच सुरु करू विसर्जन मिरवणूक

लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक कोणीही अडवून ठेऊ नये.

पुणे- पुणे -बडी मंडळे उशिरा मिरवणूक सुरु करतात आणि दिवसभर रस्त्यावर राहतात आणि मग त्यांच्या नंतर छोटी म्हटली जाणारी मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी करवून घेतली जातात आणि एकाला एक न्याय , दुसऱ्याला दुसरा न्याय असा दुजाभाव सुरु होतो . अरेरावी आजवर झाली आता पुरे … आम्ही बडी मंडळे जाईपर्यंत का थांबावे .. ? आम्ही आता सकाळी ७ वाजताच लक्ष्मी रस्त्यावर येऊन मिरवणूक सुरु करू . त्यांना जेव्हा यायचे तेव्हा येऊ द्यात ..पण त्यांच्यासाठी आम्ही थांबणार नाही असा निर्णय पुण्यातील ६० गणेश उत्सव मंडळांनी घेत बड्या म्हणविल्या जाणाऱ्या मंडळांना इशारा देत पावित्र्य राखू द्या आणि वेळेत विसर्जन होऊ द्यात ची सूचना केली आहे. ..पहा कोण काय म्हणाले …. #pune#punecity#punekar#puneganeshfestival#punepolitics#politics#punepolice#PuneNews#punerealestate

किश्तवाडमध्ये ढग फुटी, चशोटी गावात धार्मिक यात्रेसाठी जमलेले अनेकजण वाहून गेले; रेस्क्यू ऑपरेशन सुरू


जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यातील पद्दार उपविभागात गुरुवारी दुपारी १२:३० वाजता ढगफुटी झाली. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हा आकडा वाढू शकतो. २५ जण जखमी आहेत. तथापि, प्रशासनाने आतापर्यंत मृतांची संख्या निश्चित केलेली नाही.

पद्दारच्या चाशोटी गावात ढगफुटी झाली. हे ठिकाण माचैल माता मंदिराचे प्रारंभ केंद्र आहे. धार्मिक यात्रेसाठी येथे अनेक लोक जमले होते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. स्थानिक लोक मदत करण्यात गुंतलेले आहेत.

दरवर्षी ऑगस्टमध्ये माचैल माता तीर्थयात्रा होते. हजारो भाविक येथे येतात. हा मार्ग २५ जुलै ते ५ सप्टेंबर पर्यंत चालेल. हा मार्ग जम्मू ते किश्तवार पर्यंत २१० किमी लांबीचा आहे आणि यामध्ये, पद्दार ते चाशोटी पर्यंत १९.५ किमी रस्त्याने वाहने जाऊ शकतात. त्यानंतर माचैल पर्यंत ८.५ किमी पायी प्रवास आहे.

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी X वर पोस्ट केले – “जम्मू आणि काश्मीरचे विरोधी पक्षनेते आणि स्थानिक आमदार सुनील कुमार शर्मा यांचा संदेश मिळाल्यानंतर किश्तवाडचे उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांच्याशी नुकतेच बोललो. चोसिटी भागात ढगफुटी झाली आहे, ज्यामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते. प्रशासनाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे. बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे. आवश्यक बचाव आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था केली जात आहे. माझ्या कार्यालयाला नियमित अपडेट मिळत आहेत, सर्व शक्य मदत पुरवली जाईल.”

धनकवडीतील ज्येष्ठ नागरिकाची 30 लाखांची फसवणूक, सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे -धनकवडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी ३० लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. सहकारनगर पोलिसांनी अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गेल्या वर्षी सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला मोबाइलवर संदेश पाठवला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांनी दाखवले. सुरुवातीला ज्येष्ठांनी काही रक्कम गुंतवली. चोरट्यांनी त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाल्याचे भासवले.

या आमिषाला बळी पडून ज्येष्ठांनी दीड ते दोन महिन्यात वेळोवेळी ३० लाख ४५ हजार रुपये गुंतवले. त्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. चोरट्यांचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे आढळून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.दरम्यान, याच पद्धतीने विमानतळ परिसरात एका तरुणाची ११ लाखांची फसवणूक झाली आहे. ऑनलाइन टास्कच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी १० लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार आणि पोलीस निरीक्षक शरद शेळके दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत.