Home Blog Page 416

वसंतदादा पाटलांचं सरकार का पाडलं? शरद पवार यांनी उघडपणे सारं काही सांगितलं

पुणे-ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर विरोधकांकडून नेहमी दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडण्यावरुन राजकीय टीका केली जाते. पण त्यावेळी नेमकी राजकीय परिस्थिती काय होती? याबाबत शरद पवार यांनी आज सविस्तर खुलासा केला आहे.काँग्रेस नेते उल्हास पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात पुण्यातील उमेदीचा काळ, काँग्रेसमधील वाटचाल, उल्हास पवारांसारख्या समविचारी कार्यकर्त्यांसोबतचा काळ आणि आठवणींना उजाळा दिला. “काँग्रेसमध्ये आम्ही होतो तेव्हा काँग्रेस वेगळी झाली. निवडणूक झाली, कोणाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यावेळेस काँग्रेसमध्ये एक राग असायचा. तेव्हा आम्ही ठरवलं. दादांचे सरकार घालवायचं आणि मी मुख्यमंत्री झालो. त्या 10 वर्षांनंतर आम्ही परत एकत्र आलो. पण मुख्यमंत्री कोणाला बनवायचं? याची चर्चा झाली. वसंत दादांनी सांगितलं की, आता चर्चा नाही. पक्ष सर्वांचा आहे, म्हणून याचं नेतृत्व शरदकडे द्यायचं, असं वसंत दादा त्या काळात म्हणाले होते”, असं शरद पवार यांनी सविस्तर सांगितलं.

शरद पवारांनी नेमका किस्सा काय सांगितला?
“यशवंतराव चव्हाण यांचं भाषण म्हटलं तर आम्हा लोकांनी ते कधीच सोडलं नाही. नीट विषयावर मंत्रमुग्ध व्हावं, अशा प्रकारचे विचार हे यशवंतराव चव्हाण मांडायचे. विनायकराव पाटील आज हयात नाहीयत. ते पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लोकांना असायचं. वसंतदादाचं देखील आम्हाला मार्गदर्शन असायचं. ही मोठी माणसं आहेत. या सगळ्या लोकांचं अंतकरण फार मोठं होतं. महाराष्ट्र ाच्या नेतृत्वाची फळी या ज्येष्ठ लोकांनी उभी केली आणि वर्षोनुवर्षे महाराष्ट्र एक देशाचं चांगलं राज्य होऊ शकला. त्याला राज्य चालवण्याची ताकद आणि दृष्टी असलेल्या नेतृत्वाची फळी या लोकांनी उभी केली. त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा बदललाय”, असं शरद पवार म्हणाले.”या लोकांचं मन किती मोठं होतं याचे अनेक उदाहरणं सांगता येतील. मला आठवतंय, काँग्रेसमध्ये ज्यावेळी होतो. काँग्रेस विभागली. इंदिरा काँग्रेस वेगळी झाली, एस काँग्रेस वेगळी झाली, आम्ही एस काँग्रेसमध्ये होतो. यशवंतराव चव्हाण होते. आणखी लोक होते आणि निवडणूक झाली. निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं नाही. काँग्रेसला काही जागा, आम्हाला काही जागा. शेवटी आम्ही एकत्र आलो आणि वसंतदादांना मुख्यमंत्री केलं”, असं शरद पवार म्हणाले आणि ते पुढे किस्सा सांगू लागले.”पण आमच्या तरुण लोकांचा त्यावेळेला काँग्रेसवर कायमच राग असायचा. आम्ही सगळे यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे. त्यामुळे आमच्यात एक अंतर होतं. वसंतदादा हे आम्हा लोकांचे नेते. पण शेवटी त्यांनी हे दोघे एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता. त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते, त्यामध्ये मी होतो. परिणाम काय झाला, एक दिवशी ठरवलं, दादांचं सरकार घालवायचं. आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं. आणि मी मुख्यमंत्री झालो. माझ्या हातात सत्ता आली”, असं शरद पवार यांनी सांगितलं.”सांगायचं कारण असं त्यानंतर 10 वर्षानंतर आम्ही परत एकत्र आलो. राज्याचा मुख्यमंत्री कोणाला करायचं याची बैठक होती. त्या बैठकीत अनेक लोक होते. वसंतदादांनी ही बैठक बोलावली. त्या बैठकीत अनेक नावांची चर्चा झाली. दादांनी सांगितलं, आता बाकी कुणाच्या नावाची चर्चा नाही. आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व शरदकडे द्यायचं हा निकाल त्यांनी दिला. ज्या व्यक्तीचं सरकार मी पाडलं ती व्यक्ती पुन्हा गांधी, नेहरुंचे विचार मजबूत करण्यासाठी मी काय केलं ही गोष्ट विसरुन मोठ्या अंतकरणाने पुन्हा एकत्र करण्याची भूमिका मानणारं असं हे नेतृत्व होतं”, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.

ऑप्टिकल फायबरच्या कामादरम्यान तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू:कुटुंबीयांचा आक्रोश

पुणे-बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरचे काम करताना गुदमरून तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना दुपारी निगडी प्राधिकरण सेक्टर क्रमांक २७, प्लॉट क्रमांक ६५ समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या बीएसएनएलच्या चेंबरमध्ये घडली. दरम्यान यांच्यासोबत असलेला चौथा कामगार बालंबाल बचावला.दत्ता होलारे, लखन धावरे (दोघेही रा. गुरुद्वारा चौक, आकुर्डी) आणि साहेबराव गिरसेप (रा. बिजलीनगर) अशी मृत कामगारांची नावे आहेत. हे कामगार मूळचे धाराशिवचे राहणारे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएल आकुर्डी कार्यालयातील तीन कंत्राटी कामगार नेहमीप्रमाणे रोजच्या कामावर गेले होते. चेंबरमधील कामानिमित्ताने ड्रेनेज मध्ये रावसाहेब सर्वात प्रथम उतरले. काही कळण्याआधीच मोठा आवाज झाला आणि ड्रेनज मध्ये साचलेल्या अतिशय दुर्गंधीयुक्त पाण्यात ते कोसळले. लखनने हे पाहिले तसा तोही खाली उतरला. रावसाहेबाला उचलण्यासाठी खाली वाकला आणि तोही कोसळला. हे पाहणाऱ्या दत्ताने एका क्षणाचाही वेळ न लावता ड्रेनज मध्ये उडी घेतली आणि तोही डोळे पांढरे करून आडवा झाला.

यांच्यासोबत आलेला चौथा कामगार चेंबर बाहेर उभा होता. ड्रेनेजमध्ये गॅस असल्याचे त्याच्या लक्षात आले. खाली उतरलेल्या तिघांना वाचवण्यासाठी त्यांनी आरडाओरडा सुरू केला. मात्र तोपर्यंत गुदमरून तिघांचाही मृत्यू झालेला होता अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली.घटनेनंतर परिसरात क्षणात खळबळ उडाली. स्थानिकांनी कामगारांना बाहेर काढण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

दरम्यान, घराबाहेर कामाला गेलेली आपली माणसे आता परत येतील या आशेने वाट पाहणाऱ्या कुटुंबियांना, दुपारपर्यंत त्यांच्या निधनाची दुःखद बातमी कळवण्यात आली. कुणाच्या कपाळावरचे कुंकू पुसले, कुणाच्या डोक्यावरची सावली हिरावली, तर कुणाच्या हातातील कष्टकऱ्याची ऊब कायमची हरपली. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तिन्ही घरांचे दिवे विझल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान तिघांच्या कुटुंबीयांना सायंकाळपर्यंत या घटनेची माहिती मिळालेली नव्हती. पोस्टमार्टम करण्यासाठी वाय सी एम रुग्णालयात मृतदेह आणण्यात आले. त्यावेळी तिघांचे कुटुंबीय तेथे आल्यानंतर एकच आक्रोश पाहायला मिळाला. हे कुटुंबीय धाराशिवचे आहे. रात्री उशिरा या तिघांचे मृतदेह कुटुंबीयांनी त्यांच्या मूळ गावी नेले.

देशातील साखर उद्योगाची सद्यस्थिती चिंताजनक:साखर कारखान्यांच्या खासगीकरणावर शरद पवारांकडून चिंता व्यक्त

पुणे -पुण्यात साथी किशोर पवार जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित परिसंवादात शरद पवार यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. राज्यातील सहकारी साखर कारखानदारीला धोका निर्माण झाला असून खासगी कारखान्यांची संख्या वाढत आहे. साखर कारखान्यांची क्षमता वाढत असली तरी कामगारांची संख्या मात्र झपाट्याने कमी होत आहे.

कारखानदारी आणि साखर कामगार टिकवण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन चर्चा करण्याची आवश्यकता पवार यांनी व्यक्त केली. या प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारलाही सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

साथी किशोर पवार प्रतिष्ठान आणि लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजित या कार्यक्रमात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, साखर कामगार प्रतिनिधी तात्यासाहेब काळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पवार यांनी साथी किशोर पवार यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांचे स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि कामगार चळवळीतील योगदान अधोरेखित केले.

देशातील साखर उद्योगाची सद्यस्थिती चिंताजनक असल्याचे पवार यांनी नमूद केले. कापड गिरण्यांप्रमाणेच साखर कारखान्यांमधील कामगारांची स्थिती बिकट होत चालली आहे. कामगार चळवळीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, कामगारांची पिळवणूक होत असेल तर संघर्ष अपरिहार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आज सहकार क्षेत्रात खासगी कारखाने वाढत आहेत. तर सहकारी कारखाने कमी होत आहेत. पूर्वीही खासगी कारखाने होते. पण, ते महाराष्ट्रातल्या लोकांचे होते. कारखान्यात जो कामगार घाम गाळतो, तो टिकला पाहिजे. पण, सध्या उलटे चित्र बघायला मिळते. कारखान्यांची साईज वाढली. 20 हजार टन क्षमतेचे कारखाने झाले. पण, कामगारांची संख्या 150 ते 200 पर्यंत मर्यादित झाली. हे चिंताजनक आहे. म्हणूनच या प्रश्नावर एकत्र बसून चर्चा करावी लागेल. महाराष्ट्र सरकारला विश्वासात घेऊन यावर मार्ग काढावा लागेल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजे मुक्त दहिहंडीचा थरार

  • ऐतिहासिक लाल महाल चौकात तरुणाईचा जनसागर उधळला
  • ढोल ताशा, बॅन्ड, वरळी बिट्सचे पारंपारिक वाद्यांचा गजर….
  • राधेकृष्ण ग्रुपने दहिहंडी संघाने सात थर रचत फोडली हंडी

पुणे :
गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, ढोल ताशांचा मंगलमय गजर, महाकाल नृत्य आणि मुंबईतील प्रसिद्ध वरळी बिट्स यांच्या पारंपारिक संगीतावर थिरकणार्या तरुणाईचा उसळलेला जनसागर अशा उत्साही वातावरणात पुनीत बालन ग्रुप आयोजित २६ सार्वजनिक मंडळांची संयुक्त अशा दहीहंडीचा थरार पुणेकरांनी अनुभवला. ऐतिहासिक लाल महाल चौकात तुडुंब गर्दीसमोर राधेकृष्ण ग्रुपने सात थर रचत ही संयुक्त दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळवला. महाराष्ट्रातील पहिली डीजे मुक्त दहिहंडी साजरा करीत एक नवा आदर्श यानिमित्ताने पुनीत बालन ग्रुपने मांडला.
शहरातील २६ सार्वजनिक मंडळांनी एकत्र येऊन पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून संयुक्त दहिहंडी उत्सव सुरू केला आहे. यावर्षीची संयुक्त दहीहंडी डिजे मुक्त साजरी करण्याची घोषणा पुनीत बालन केली होती. त्यामुळे या डीजे मुक्त दहीहंडीला पुणेकर कसा प्रतिसाद देणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, ढोल ताशाचा गजर आणि वरळी बिटसने वाजविलेल्या संगीतावर हजारो पुणेकरांनी ठेका धरला आणि डीजे मुक्त दहिहंडीचा प्रयोग यशस्वी करत एक नवीन पायंडा पाडला. प्रभात बॅन्डच्या सुमधुर वादनाने या दहीहंडी कार्यक्रमाची सुरवात झाली. युवा वाद्य पथक, समर्थ पथक, रमणबाग आणि शिवमुद्रा या ढोल पथकांच्या जोरदार वादनाने या कार्यक्रमाची रंगत वाढविली आणि वरळी बिट्सच्या बॅंडने केलेल्या वादनाने अवघे वातावरण दंगून गेले.
यावेळी अभिनेता व दिगदर्शक प्रविण तरडे, अभिनेता हार्दिक जोशी, मराठी बिग बॉस फेम ईरिना यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी या उत्सवाला हजेरी लावली. यावेळी दहिहंडीच्या सलामी करीता वंदे मातरम दहिहंडी संघ, नटराज संघ, म्हसोबा संघ, भोईराज संघ, गणेश मित्रमंडळ संघ, गणेश महिला गोविंदा पथक, गणेश तोफखाना दहीहंडी संघ, नवज्योत ग्रुप संघ, इंद्रेश्वर संघ (इंदापूर),  शिवकन्या गोविंदा पथक (चेंबुर-मुंबई), शिवतेज ग्रुप, दहिहंडी संघ यांसारख्या अनेक गोविंदा पथकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. रात्री पावणे दहा वाजता राधेकृष्ण ग्रुपने सात थर रचत ही ऐतिहासिक दहीहडी फोडण्याचा मान मिळविला.

या वर्षीचे दहीहंडी उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे उज्जैन येथील पारंपारिक ‘शिव महाकाल’ पथक होते, या पथकाच्या तालावर नाचत तरुणाईने जल्लोष केला. 

 
पुणेकरांनी डीजे मुक्त दहीहंडी ला उस्फूर्त प्रतिसाद देत हा उत्सव यशस्वी केल्याबदल मी मनापासून आभार व्यक्त करतो. गतवर्षी आम्ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी सार्वजनिक मंडळांची संयुक्त दहीहंडी उत्सव सुरू केला होता. यंदाच्या वर्षी डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प केला असून, त्याच भूमिकेतून दहीहंडीमध्ये डीजेचा वापर टाळण्यात आला. त्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी झाले आणि पारंपारिक वाद्यवादकांनाही रोजगार मिळाला.

  • पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप/ विश्वस्त, उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

ज्ञानेश्वरीतील विश्वात्मक विचार जगाला मार्गदर्शक-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सुवर्ण कलशाचे पूजन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे. ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे मूळ असून तो जगाला मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती दिनानिमित्त आयोजित संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, ह.भ.प. मारुती महाराज कुरेकर, ह.भ.प. नारायण महाराज जाधव, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, बापूसाहेब पठारे, महेश लांडगे, बाबाजी काळे,देवेंद्र पोटे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आपल्या संस्कृतीतील प्राचीन मूल्ये जपाण्याचे श्रेय वारकरी संप्रदायला आहे. ही मूल्य विचारांची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नेल्याने आम्ही परकीय आक्रमण होत असतांना राजकीय गुलामगिरी स्वीकारली, पण वैचारिक गुलामगिरी स्वीकारली नाही. वारकरी परंपरेने आणि संतांनी जात, धर्म भेदामुळे गुलामगिरीत जाणाऱ्या समाजात ऐक्य निर्माण करण्याचे कार्य केले. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हीच शिकवण दिली आहे, २१ वर्षाच्या जीवनात त्यांनी दिलेला विचार आपल्याला शतकानुशतके मार्ग दाखविणारा आहे. म्हणूनच समाधी मंदिरात आल्यावर मिळणारी ऊर्जा चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते, असे त्यांनी सांगितले. विचार आणि तत्वज्ञानाचा निर्मळ प्रवाह असलेली भारतीय सभ्यता सर्वात जुनी सभ्यता आहे हे जगाने मान्य केले असल्याचेही ते म्हणाले.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, अर्जुनाला कर्म मार्ग दाखविण्यासाठी भगवान योगेश्वराने गीता सांगितली, गितेचे मराठीत विवेचन करणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कळस आजच्या दिवशी चढविला जाणे हा एक सुवर्णयोग आहे. भक्तांनी दान नव्हे तर समर्पण केल्याने हा सुवर्ण कलश चढविला गेला. सुवर्ण कलशासोबत महादजी शिंदे यांनी उभारलेल्या महाद्वाराचा जीर्णोद्धार केल्याने त्याला मूळ स्वरूप प्राप्त होईल आणि मंदिर परिसराच्या पावित्र्यात भर पडेल.

भगवद्गीतेतील तत्वज्ञान हे जगातले सर्वोत्तम तत्वज्ञान असून ते जगात स्वीकारले जात आहे. माऊलींनी ९ हजार ओव्याच्या माध्यमातून मांडलेले हे ज्ञान ऑडिओ बुकच्या माध्यमातून सर्व भाषेत उपलब्ध होणार असल्याने ते जगभरात पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

लहान ऑडिओ क्लिपद्वारे ज्ञानेश्वरीचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवा-एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मंदिराच्या महाद्वारातून भक्त माऊलीचा गजर करीत पुढे जातात. ही वारकरी परंपरा फार मोठी आहे आणि ती पुढे नेत असताना समाधी मंदिरावर सुवर्ण कलश चढविला जाणे ही महत्वची घटना आहे. भाविकांच्या योगदानामुळे या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य सर्वांनाच मिळाले. वारकऱ्यांसाठी ज्ञानोबा हा श्वास आणि आळंदी ही काशी आहे, अलंकापुरी म्हणून परिचित असलेली आळंदी मराठीसाठी आणि भागवत धर्मासाठी महत्वाचे स्थान आहे. आज नव्या संकेतस्थळाच्या माध्यमातून भागवत धर्मातील विचार प्रसाराची ही परंपरा पुढे नेण्यासाठी ज्ञानेश्वरी ऑडिओ बुकचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या दोन ते तीन मिनिटांच्या ऑडिओ क्लिप तयार करून पुढच्या पिढीपर्यंत हा विचार अधिक प्रभाविपणे पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. शिंदे म्हणाले, देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. वारकरी संप्रदाय समाजाला सन्मार्ग दाखविणारी मोठी शक्ती आहे. त्यामुळे आपली संस्कृती कोणीही नष्ट करू शकला नाही. संत महात्मे अशावेळी सुविचार समाजात रुजवीत होते. संत ज्ञानेश्वरांनी कर्म, ज्ञान, सदाचार, नीती, भक्तीची शिकवण दिली, त्यातून समाजाला विशालदृष्टी मिळाली. शेकडो वर्षानंतर आजही माऊली अखंड आणि पवित्र अग्निहोत्राप्रमाणे जगाला उर्जा आणि प्रेरणा देत आहेत. त्यामुळे या महाद्वारातून प्रवेश करतांना मीपण, अहंकार गळून पडेल सात्विकतेचा अनुभव भक्तांना मिळेल, असे त्यांनी सांगितले. आळंदी विकास आराखड्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

योगी निरंजननाथ यांनी प्रस्ताविकात सोहळ्याची माहिती दिली. श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात सौर ऊर्जेचा उपयोग सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णकलश पूजन आणि श्री ज्ञानेश्वरी(सार्थ) ऑडिओ बुक विविध भाषेत उपलब्ध असलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या संकेतस्थळाचे विमोचन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थित भाविकांच्या वर्गणीतून तयार करण्यात आलेला हा २२ किलोचा सुवर्ण कलश समाधी मंदिरावर चढविण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महाद्वार जीर्णोद्धार कार्यारंभ पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सुवर्णकलश आणि महाद्वारासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथ, ॲड. रोहणी पवार, चैतन्य कबीर, पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

मद्यधुंद चालकाच्या कारची वाहतूक पोलिस उपायुक्तांच्या गाडीला धडक:दोन पोलिस कर्मचारी जखमी


पुणे-मुंढवा परिसरात गणपती उत्सवानिमित्त खरेदी निमित्त होत असलेली वाहनांची गर्दी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने वाहतुक पोलिस आयुक्त व त्यांच्यासोबत दोन पोलिस कर्मचारी चालले असताना समोरून भरधाव वेगात असलेल्या मद्यधुंद कार चालकाने जोरदार धडक दिली. धडकेत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. यामध्ये वाहतुक पोलिस उपायुक्त हिमंत जाधव यांना सुदैवाने इजा झाली नाही. याप्रकरणी धडक देणार्‍या चालकासह दोघांना मुंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

याप्रकरणी समदिप मनमोहन सिंग (३०, रा. शुभ इवान, मिडोरी वाईन्स जवळ, केशवनगर, मुंढवा मुळ रा. हरीयाना) याला याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. याबाबत पोलिस नाईक शरद अर्जुन पवार (३८, रा. हिंद कॉलनी, भेकराईनगर, पुणे) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रादार शरद पवार हे पोलिस मुख्यालयात २०२२ पासून नेमणुकीस आहे. सध्या ते वाहतुक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडे शासकीय वाहनावर ऑपरेटर म्हणुन कार्यरत आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी पवार हे कामावर आले असताना सोबत चालक पोलिस हवालदार तानाजी कोंढाळकर हे देखील होते. कोंढाळकर हे गाडी चालवत असताना पवार त्यांच्या शेजारील सीटवर बसले होते. तर पोलिस उपायुक्त हिंमत जाधव गाडीच्या मागील सिटवर बसलेले होते.

मुंढवा येथील कुंभारवाडा येथे गणेशमूर्ती विकत घेण्याकरता नागरिकांची व वाहनांची गर्दी होत असल्याने केशवनगर कुंभारवाडा या भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. पाहणी करून झाल्यावर सव्वा दहा ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास कुंभारवाडा येथून मुंढवा चौकाकडे परत जात असताना रोडला नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे कोंढाळकर हे कार हळू चालवत होते. पोलिस उपायुक्त बसलेली गाडी मुंढव्यातील केशवलीला अपार्टमेंट येथे आली असताना मुंढवा चौकाकडून केशवनगरकडे जाणार्‍या भरधाव कारने पोलिस उपायुक्तांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात पोलिस नाईक पवार यांच्या ओठाला व दाताला दुखापत झाली. तर चालक कोंढाळकर यांचे डाके दरवाज्यावर आपटल्याने त्यांच्या डोक्याला मुकामार लागला.

या अपघातनंतर पोलिस उपायुक्त व पवार यांनी गाडीतून उतरून पाहिले असता उजव्या बाजूने गाडीची पूर्ण बॉडी डॅमेज होऊन चाक मागील बाजूस सरकले होते. धडक देणार्‍या गाडीची पाहणी केली असता, ती कार संदीप सिंग चालवत असल्याचे समजले. त्याच्यासोबत मनीषकुमार सुमानकुमार सिंग (२८, रा. शुभ शगुन सोसायटी, जुना मुंढवा रोड, खराडी) असल्याचे समजले. पोलिस उपायुक्तांनी लागलीच स्थानिक मुंढवा पोलिसांना बोलवून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोघांना पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी पुढील तपास मुंढवा पोलिस करत आहेत.

टीपी स्कीमच्या माध्यमातून सुनियोजित शहर उभे करणार

शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन झाल्याशिवाय पीएमआरडीए पुढील प्रक्रिया करणार नाही

पिंपरी (दि.१४) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील ६५.०० मी. रुंद बाह्यवळण रस्त्यांचे क्षेत्र मिळण्यासाठी नव्याने नगर रचना योजना कार्यान्वित करण्यासाठी मान्यता द‍िली आहे. त्यानुसार धामणे, गोदुंबरे, दारूंबरे, साळुंब्रे, सांगवडे या गावांमधील प्रस्तावित नगर रचना योजनेबाबतच्या तरतुदींची माहिती देणे, धोरणात्मक बाबी समजावून सांगणे, नगर रचना योजनेच्या इराद्याबाबत, क्षेत्राबाबत व नकाशाबाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी (दि.१४) प्राधिकरण कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या योजनेमध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचे भूसंपादन करण्यापूर्वी त्यांच्या शंकांचे निरसन आणि समन्वयातूनच पुढील प्रक्रिया राबवणार असल्याची ग्वाही महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. नव्याने मंजूर झालेल्या टीपी स्कीमच्या अंमलबजावणीसंदर्भात आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली, यावेळी महानगर आयुक्त बोलत होते.

वाहतूक कोंडी सोडवण्याच्या अनुषंगाने शासनाकडून टप्याटप्याने टीपी स्कीम मंजूर होत आहे. याची अंमलबजावणी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असून मावळ तालुक्यातील धामणे, गोदुंबरे, दारुंबरे/ साळुंब्रे, दारुंबरे/ साळुंब्रे, सांगवडे, नेरे आदी गाव परिसरात या योजनेची आखणी करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन त्यांच्या संमतीशिवाय करणार नाही. यासह त्यांच्या शंकांचे निरसन झाल्याशिवाय तसेच समन्वयाशिवाय कुठलाही शेतकऱ्यांचे जमिनीचे भूसंपादन करणार असल्याचे यावेळी महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी स्पष्ट केले. बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची संमती घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या टीपी स्कीमच्या माध्यमातून सुनियोजित शहर उभे करणार असल्याने याचा सर्वांना लाभ होणार असून अपेक्ष‍ित सोयीसुव‍िधा उभारण्यात येणार असल्याचे डॉ. म्हसे यांनी स्पष्ट केले.

आमदार सुनील शेळके यांनी संबंध‍ित टीपी स्कीम राबवताना कुठल्याही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी सूचना केली. याशिवाय समन्वय आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतरच भूसंपादन प्रक्रियेसाठी पुढे यावे. या टीपी स्कीम योजनेची आखणी निर्धारित वेळेत कसे करता येईल, शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला देण्यासंदर्भात तातडीने शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

या बैठकीत नगररचना विभागाच्या सह महानगर नियोजनकार श्वेता पाटील यांनी सादरीकरणाद्वारे शेतकऱ्यांना टीपी स्कीमबद्दल माहिती दिली. यासह योजनेची रूपरेषा आणि योजनेची अंमलबजावणी कशी करणार, याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल, याबाबत सविस्तर माहिती दिली. या बैठकीला आमदार सुनील शेळके, एमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, विकास परवानगी आणि नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.

प्राचीन काळातील प्रकाशित नसलेले ज्ञान,संदर्भ नागरिकांसमोर आणण्याची गरज-राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

पुणे, दि.१४: प्राचीन काळातील प्रकाशित नसलेले ज्ञान, संदर्भ नागरिकांसमोर आणून त्याचे जतन व संवर्धन डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेने करावे, अशी सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केली.

डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथे आयोजित भारतीय ज्ञान प्रणाली-दृश्यश्रव्य कक्ष आणि ‘पुनः’ छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु सुरेश गोसावी, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ) कुलगुरु डॉ. प्रसाद जोशी, राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, डॉ.सोनल कुलकर्णी -जोशी, प्रा. शाहिदा अन्सारी, डॉ. बन्सी लव्हाळे, सुहाणा उद्योग समूहाचे आनंद चोरडिया आदी उपस्थित होते.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमार्फत प्राचीन वारसा, संस्कृती, परंपरा जतन व संवर्धनाबाबत सुरू असलेले कार्य तसेच मंदीर, जुनी नाणी, हस्तलेख, संस्कृत शब्दकोश प्रकल्पाबाबत करण्यात येत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. पुरातत्व विभागाच्यावतीने मराठा इतिहास आणि पुरातत्व संग्रहालयाच्या संगणकीकरण प्रकल्पाकरिता प्रस्ताव सादर करण्याची सूचना करुन या प्रकल्पास सहकार्य करण्यात येईल, असेही राज्यपाल म्हणाले.

कार्यक्रमापूर्वी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे विद्यार्थी असतांना वास्तव्य करीत असलेल्या कक्षाला भेट देवून माहिती घेतली.

यावेळी कुलगुरु डॉ. जोशी यांनी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या संस्कृत कोशप्रणाली आणि मराठी बोली भाषेबाबत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. तसेच भारतीय ज्ञान प्रणाली-दृश्यश्रव्य कक्षाचे कामकाज स्वामी विवेकानंद संशोधन फाऊंडेशच्या सहकार्याने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. अन्सारी यांनी पुरातत्व विभागाच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. विभागामार्फत संशोधन आणि मंदिराचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. येत्या काळात विभागाच्यावतीने मराठा इतिहास आणि पुरातत्व संग्रहालयाचे संगणकीकरण करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

आदी चोरडिया यांनी ‘पुनः’ या ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, प्राचीन, धार्मिक वारसा दर्शविणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाबाबत माहिती दिली.

जम्मूच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, 42 जणांचा मृत्यू:चशोटी गावात धार्मिक यात्रेसाठी जमलेले अनेकजण वाहून गेले; 65 जणांचा वाचवले

नवी दिल्ली-गुरुवारी दुपारी १२:३० वाजता जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात ढगफुटी झाली. डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा आणि ढिगाऱ्याचा अनेक लोकांवर परिणाम झाला. या अपघातात ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. २८ जणांचे मृतदेहही सापडले आहेत. आतापर्यंत ६५ जणांना वाचवण्यात आले आहे. सुमारे २०० लोक बेपत्ता आहेत.

हजारो भाविक मचैल मातेच्या यात्रेसाठी चशोटी गावात पोहोचले होते, तेव्हा हा अपघात झाला. यात्रेचा हा पहिला थांबा आहे. यात्रा जिथून सुरू होणार होती तिथेच ढगफुटी झाली. येथे बसेस, तंबू, लंगर आणि भाविकांची अनेक दुकाने होती. सर्व पुराच्या पाण्यात वाहून गेले.

मचैल मातेची यात्रा दरवर्षी ऑगस्टमध्ये होते. हजारो भाविक तिथे येतात. हा मार्ग २५ जुलै ते ५ सप्टेंबर पर्यंत चालेल. हा मार्ग जम्मू ते किश्तवाड २१० किमी लांबीचा आहे आणि वाहने पद्दार ते चशोटी १९.५ किमी रस्त्यावरून जाऊ शकतात. त्यानंतर मचैलपर्यंत ८.५ किमीचा ट्रेक आहे.

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनी चहापान आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केलेकिश्तवाडमध्ये ढगफुटीत झालेल्या जीवितहानीनंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यादरम्यान नियोजित घरी चहापान आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत. या घटनेत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

https://twitter.com/PTI_News/status/1955937080418427290

रुग्णसेवेत शासनासोबत खाजगी संस्थांचाही सहभाग- उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती संभाजीनगर, दि.१४-रुग्णांना उपचार सुविधा देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे शासनाचे धोरण आहे. रुग्णांना उपचार सुविधा देण्यात शासनासोबतच खाजगी संस्थांचाही सहभाग आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

येथील कर्नावट कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे,आ. अब्दुल सत्तार, डॉ. विनय कर्नावट, डॉ. मधुबाला कर्नावट, डॉ.आनंद, डॉ. सोहम आणि डॉ. खुशबु कर्नावट यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, कर्करोग या आजाराचे वेळीच निदान आणि लगेच उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा कर्करोग रुग्णालयांचा मुंबई पुणे सोडून अन्य शहरात उपयोग होतो. चांगले दर्जेदार उपचार दिले जातात. युवकांनी व्यसनांपासून दुर रहावे. म्हणजे कॅन्सर सारखा आजारही आपल्यापासून दुर राहतो. कॅन्सरवरील उपचारांबाबत संशोधन होत असतांना कॅन्सर होऊ नये यासाठी आपण सगळ्यांची काळजी घेणे आपल्या दैनंदिन जीवनमानात, आहारात बदल करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हिंदू समाजानेच आम्हाला सत्तेत बसवले:दुसऱ्या धर्मियांनी नाही, त्यामुळे हिंदूंचे संरक्षण आमची जबाबदारी – नीतेश राणे

रत्नागिरी-राज्यातील महायुतीचे सरकार हिंदू समाजाच्या पाठिंब्यामुळेच सत्तेत आले आहे. अन्य धर्मियांनी आम्हाला मतदान केले नाही, असे विधान मत्स्य आणि बंदरे खात्याचे मंत्री नीतेश राणे यांनी केले आहे. महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात आहे. त्यामुळे हिंदू समाजाचे रक्षण करणे, आमचे कर्तव्य असल्याचे राणे म्हणाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे रक्षाबंधनानिमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात संवाद साधताना नीतेश राणे उपरोक्त विधान केले. ते म्हणाले, राज्यातील महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात आहे. इतर धर्मियांनी मतदान केले नाही. तुम्ही मोहल्लात फिरलात पण तुम्हाला त्यांचे मतदान झाले नाही. हिंदू समाजानेच आम्हाला सत्तेत बसवले, त्यामुळे हिंदू समाजाची सेवा करणे, त्यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे.

नीतेश राणे म्हणाले, केवळ विकास साधून उपयोग नाही, जर आपल्या राज्यातील महिला सुरक्षित नसतील, तर त्या विकासाला अर्थ नाही. अवतीभवती पाहत असताना लव्ह जिहाद सारखे प्रकरणे दिसतात तेव्हा हिंदुत्ववादी सरकार का असावे यांची जाणीव होते. लव्ह जिहादसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी हिंदुत्ववादी सरकार असणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले.

राखी संकलन कार्यक्रमाचा उल्लेख करत नितेश राणे म्हणाले की, राज्यात जिहादच्या निमित्ताने वाकड्या नजरेने आपल्या माता-भगिणींकडे पाहिले जाते. त्याला राखी संकलन हे उत्तर आहे. आज 14 हजार राख्या जमा केल्या असून, त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवल्या. या उपक्रमामुळे हिंदुत्व अधिक भक्कम होईल.

मंत्री नितेश राणे म्हणाले की, “लव्ह जिहाद सारखी प्रकरणे गावागावात होत आहेत. रत्नागिरीत असे अनेक प्रकरणे होत आहेत. याला एकच सक्षम उत्तर आहे की आपण हिंदू म्हणून खांद्याला खांदा लावून काम करायला पाहिजे. आमच्या आया बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याला जाग्यावर ठेवणार नाही ही भावना प्रत्येकाची असायला पाहिजे.”

नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत असताना, आपला एक भाऊ ही जबाबदारी पार पाडत असल्याची राज्यातील महिलांची भावना आहे. मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयांमुळे राज्यात कोणीही आमच्या महिला भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, लव्ह जिहाद सारखे विषय करू शकत नाही, अशी भावना प्रत्येक बहिणीच्या मनात आहे, असे नीतेश राणे म्हणालेत.

सरकार आणणे हे कार्यकर्त्याचे काम आहे. त्यामुळे सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. कार्यकर्त्यांमुळेच आपल्याला पदे मिळाली आहेत आणि त्यांचा उपयोग कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी केला जाईल, असे नीतेश राणे यांनी म्हटले.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला कॉंग्रेसचा ‘व्होट चोर ,गद्दी छोड ‘ घोषणा देत मशाल मोर्चा

पुणेकाँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे उजेडात आणले आहेत. निवडणूक आयोगावर दबाव टाकून मतदार यादीमध्ये घोटाळे करून मतांची चोरी करून गैर मार्गाने भाजपाने सत्ता मिळवली आहे. याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गोपाळकृष्ण गोखले पुतळा, गुडलक चौक ते ऐतिहासिक फर्ग्युसन कॉलेजचा मुख्य दरवाजा पर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडून देशात एकच खळबळ उडवून दिली. राहुल गांधी यांनी अत्यंत तर्कसंगत मांडणी करून मतदानातील मोठा घोटाळा उघड केला, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कसे सुरु आहे? हे दाखवून दिले. निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने राजधर्म पाळत एखादी एसआयटी गठीत करायला हवी होती अथवा सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तींकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे होती. पण राहुल गांधी यांनी पुरावे देत तथ्य मांडूनही ना केंद्र सरकारने चौकशी करण्याची धमक दाखवली ना निवडणूक आयोगाने काही खुलासा केला.  निवडणूक आयोगाच्या १९६० च्या नियमावलीनुसार, जर अशा प्रकारे कोणी हरकत घेतली वा आक्षेप नोंदवला तर नियम १७/१८/१९ नुसार ताबडतोब चौकशी करावी, असे कायदाच सांगत आहे, मग चौकशी का केली जात नाही? लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी या मशाल मोर्चाद्वारे आम्ही करीत आहोत.’’

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, भीमराव पाटोळे, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, सुजाता शेट्टी,  लता राजगुरू, मेहबुब नदाफ, राज अंबिके, प्राची दुधाणे, राजेंद्र भुतडा, प्रदीप परदेशी, नितीन परतानी, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, राजेंद्र मोहिते, द. स. पोळेकर, इम्रान शेख, रवि ननावरे, अनिता धिमधिमे, अर्चना शहा, शारदा वीर, स्वाती शिंदे, उषा राजगुरू, कांचन बालनायक, माया डुरे, ब्लॉक अध्यक्ष रविंद्र माझीरे, अजित जाधव, रमेश सोनकांबळे, दिलप तुपे, दिपक ओव्‍हाळ, विनोद रणपिसे, गुलाम हुसेन खान रवि आरडे, विकार शेख, हर्षद हांडे, सुरेश चौधरी, मुन्ना खंडेलवाल, चेतन पडवळ, आदी उपस्थित होते. 

जनसुरक्षा कायद्याविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन करून होळी केली.

मुंबई, दि. १४ ऑगस्ट २०२५
देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा नावाने आणलेला कायदा हा लोकशाही असुरक्षा कायदा आहे. महाराष्ट्राच्या या चिप मिनिस्टरला आता दिल्लीत जाऊन पंतप्रधान बनण्याचे स्वप्न दिवसाढवळ्या पडू लागले आहे आणि त्यासाठीच गोलवकर यांच्या बंच ऑफ थॉटला अभिप्रेत भारत करण्यासाठी फडणवीस यांच्याकडून ही सर्व खटाटोप केलेला आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने निर्धार परिषद आयोजित केली होती. या परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा. सुप्रिया सुळे, खा. अनिल देसाई, आमदार विनोद निकोले, अजित नवले, भारत पाटणकर, प्रकाश रेड्डी, उल्का महाजन, भालचंद्र कांगो, उदय भट, कमी. प्रकाश रेड्डी, राजेंद्र कोरडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, मोदीनंतर पंतप्रधानपदासाठी उत्तरतील एक बाबा पुढे आहे आणि तो पुढे गेला तर आपले अवघड आहे हे पाहून मायबोलीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे कामही फडणवीस यांनी केले आहे. सत्तापिपासू वृत्ती व बंच ऑफ थॉय साठी हा कायदा आणला आहे. पण सर्व संविधानवादी लोकांनी याचा विचार केला पाहिजे. डावे उजवे असा वाद लोकशाहीसाठी चांगला असला तरी एकत्र येऊन लढले पाहिजे. इंग्रजांनी जेल, मेल व रेल सुत्र वापरून राज्य चालवले होते आणि आत्ताचे सत्ताधारी सुद्धा तेच सुत्र वापरत आहेत.
दळवळणासाठी पत्र वापरले इंटरनेटच्या जमान्यात मेल झाले त्याचा कंट्रोल त्यांच्या हाती आहे. युनिव्हर्सीटींची अवस्था अत्यंत वाईट आहे पण हॉट्स ऍप युनिव्हर्सिटी जोरात आहे. आणि जेल म्हणजे जो सरकार विरोधात बोलेल त्याला जेलमध्ये टाकले जाईल. सरकारकडे पगार करण्यास पैसे नाहीत पण शक्तीपीठ महामार्गासाठी ८८ हजार कोटी रुपये आहेत हा महामार्ग एका उद्योगपतीसाठी बनवला जात आहे. आणि मुंबईतील जमीन दुसऱ्या उद्योगपतीला दिली आहे.
सरकार जवळ बुलडोझर आहे आणि सरकार तो लोकशाहीवरही चालवू शकते. या सरकारकडे कान डोळे तर नाहीतच पण अक्कलही नाही अशा सरकारविरोधात लढण्यासाठी लढण्याची पद्धतही बदलावी लागले. काँग्रेस पक्षाने जनसुरक्षा कायद्याला तीव्र विरोध केलेला आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या कायद्याची होळी केली, मशाल यात्रा काढली आहे. यापुढेही या कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोधच राहिल असेही सपकाळ यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले की, आम्ही निवडणूक वेगवेगळ्या लढलो असलो तरी पण आज राष्ट्रीय गरज म्हणून एक आहोत. लोकशाहीच्या मुल्यावर संकट आले आहे, संस्थांवर हल्ला सुरू आहे. न्यायसंस्थेतही घुसखोरी झाली आहे. एका पक्षाचे काम केलेली व्यक्तीला न्यायाधीशपदी नियुक्त केले आहे. जनसुरक्षा कायद्याने विचार व मूलभूत अधिकारावर केला हल्ला आहे. आता या सरकारला जागा दाखवण्याची गरज आहे त्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे शरद पवार म्हणाले.
माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, डावे उजवे असा कोणताही भेदभाव न करता लोकशाहीवरचे हे संकट होणून पाडण्यासाठी सर्व जण एकत्र आले आहेत. या सरकारने आणलेला हा कायदा रद्द करण्यासाठी तीव्र लढा देऊ असे ठाकरे म्हणाले.

” श्रीउवसग्गहरंस्तोत्र” च्या सामूहिक पठणाचे भव्य आयोजन”

पुणे-

“श्री उवसग्गहरं स्तोत्राच्या नियमित स्मरणामुळे दृष्टग्रह,रोगपिडा,शत्रु आदि सांसारिक दुःखपिडा दुर होतात व मनुष्य प्राणीमात्रामधे सुख समृद्धी प्राप्त होते अशी धारणा आहे,याच अनुषंगाने   जैन धर्मियांमध्ये  महामंगलकारी समजल्या जाणाऱ्या श्री. उवसग्गहरं स्तोत्राच्या    सामुहिक पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन  दरवर्षी रसिकलाल एम धारीवाल फाऊंडेशन तर्फे केले जाते. सध्या अशा उपक्रमांची गरज आहे ज्याच्यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते . यावर्षी स्तोत्र पठणाचे नववे  वर्ष असून  प्रथम कार्यक्रम २०१७ मध्ये  दानशूर आदरणीय श्री. रसिकलालजी धारीवाल  यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संत व साध्वी म . सा . यांच्या सानिध्यात  संपन्न झाला होता .

          याही वर्षी ,आर.एम.धारीवाल फाउंडेशन च्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल  बालन व उपाध्यक्षा शोभा रसिकलाल धारीवाल यांच्याद्वारे   दिनांक  १७ ऑगस्ट २०२५  रविवार रोजी सायंकाळी  4 वाजता  आचार्य पद्मश्री चंदनाजी  म . सा . , पू .श्री  मुकेश मुनिश्री म . सा .  आणि पू . श्री जयप्रभ विजयजी गुरुदेव  म . सा . , पू .श्री आगमचंद्रजी स्वामी म . सा . यांच्या उपस्थितीत   ” उवसग्गहरं स्तोत्र ‘सामूहिक पठणाचे   आयोजन श्रीमान रसिकलालजी एम धारीवाल  स्थानक भवन यश लॉन्स , बिबवेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

कार्यक्रम वेळेवर ठीक ४ वाजता सुरु होईल.   दिलेल्या नियोजित  वेळेत लहान -थोर , जैन – अजैन या सर्वांनी  सहपरिवार या महामंगलकारी स्तोत्रात  सहभागी होऊन लाभ घ्यावा . सहभागी होणाऱ्या पुरुषांनी शुभ्र तर महिलांनी केशरी अथवा पिवळे वस्त्र परिधान करणे अनिवार्य आहे तसेच कार्यक्रमानंतर लगेच चौविहारची( जेवण ) सुद्धा व्यवस्था करण्यात आल्याची माहिती  फाऊंडेशनच्या शोभा रसिकलालजी धारिवाल यांनी दिली आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची यंदाही अभिषेक सेवा:अभिषेकासाठी नाव नोंदणीस सुरवात

पुणे : – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या श्री गणेश अभिषेक सेवेला गेल्यावर्षी मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे यंदाही हा उपक्रम सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार भाविकांना ऐच्छिक देणगीच्या माध्यमातून ही सेवा मिळणार असून त्यासाठी नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

गेल्या १३४ वर्षांपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचा उत्सव साजरा होतो. त्यानिमित्ताने ट्रस्टकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मात्र, उत्सवात श्री गणेशाची अभिषेक सेवा अद्यापपर्यंत सुरु करण्यात आली नव्हती. मात्र, गेल्या दोन तीन वर्षापासून भाविकांकडून अभिषेक सेवा सुरु करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात सुरु होती. भाविकांच्या या मागणीचा मान राखत अखेर ट्रस्टने गतवर्षीपासून अभिषेक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि हिच परंपरा यंदाही पुढे सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार दहा दिवसांच्या उत्सव कालावधीत पहाटे ५ ते ११ या वेळेत भाविकांना बाप्पाचा अभिषेक करता येणार आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे या श्री. गणेश अभिषेकासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क निश्चित करण्यात आलेले नसून भाविकांना त्यांच्या इच्छेनुसार देणगी देऊन अभिषेक करता येणार असल्याची माहिती उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी दिली. त्यासाठी आधीच नाव नोंदणी करुन वेळ निश्चित करता येणार आहे.

ऐच्छिक अभिषेक करण्यासाठी भाविकांना http://bit.ly/abhishek2025 या लिंकवर जाऊन नाव नोंदणी करता येणार असून नाव नोंदणीसाठी काही अडचण असल्यास ९०४९२३३०२९ किंवा ९८९०९९४१८२ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय नाव नोंदणी करू न शकलेल्या भाविकांनाही अभिषेक करावयाचा असेल तर थेट उत्सव मंडपात नाव नोंदणी केलेल्या भाविकांचा अभिषेक झाल्यानंतर उपलब्ध वेळेनुसार अभिषेक करता येणार आहे. त्यासाठी इच्छुक भाविकांनी सोबत दिलेल्या लिंकवर आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून करण्यात आले आहे.


‘‘भाविकांच्या मागणीनुसार गतवर्षीपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची अभिषेक सेवा सुरु केली आणि या सेवेला गणेश भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदाही ही ‘ऐच्छिक अभिषेक सेवा’ सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. यंदाही भाविकांकडून या सेवेचं स्वागत केलं जाईल आणि सेवेचा लाभही घेतला जाईल, असा विश्वास आहे.’’

  • पुनीत बालन
    उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती.