Home Blog Page 413

विरोधकांनी सत्तेसाठी औरंगजेबी विचार स्वीकारले, DCM एकनाथ शिंदे विधान परिषदेत प्रचंड आक्रमक

ये शेर का बच्चा है. …

एकनाथ शिंदे यावेळी ठाकरे गटावर अक्षरशः तुटून पडले. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी काही दिवसांवर एकनाथ शिंदे यांच्यावर केंद्राच्या नोटीसीला घाबरून भाजपसोबत पळून गेल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाचा धागा पकडत शिंदे म्हणाले, या लोकांनी सत्तेसाठी औरंगजेबी विचार स्वीकारले. पण आम्ही तुमचा टांगा पलटून टाकला. हे करायला वाघाचे काळीज लागते. लांडगा वाघाचे कातडे पांघरून वाघ होत नाही. तो लांडगाच राहतो. त्यासाठी वाघाचे काळीज लागते.एकनाथ शिंदे म्हणाले, ये शेर का बच्चा है. आम्ही 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. आम्ही लढून जिंकू किंवा लढून शहीद होऊ या निर्धाराने निवडणूक लढली. अनिल परब तुमच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. कोण नोटिसीला घाबरून कुठे गेले हे मला माहिती आहे. मी कमरेखाली वार करत नाही. तुम्हाला नोटिस आल्यानंतर तुम्ही कुठे गेला होता हे ही मला माहिती आहे. मला जोपर्यंत कुणी डिवचत नाही, तोपर्यंत मी कुणाची कळ काढत नाही. सचिन अहिर तुम्हाला बरेच काही माहिती आहे. मी खुर्चीसाठी काहीच केले नाही. मी स्वतः अमित शहा आणि नरेंद्र मोदींना फोन करून सांगितले तुम्ही सांगाल तो निर्णय मला मान्य असेल.

मुंबई-नागपूर येथे घडलेल्या हिंसाचाराबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत निवेदन दिले. नागपूरमध्ये सोमवारी नेमके काय घडले? याची माहिती देत असताना त्यांनी अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानाचा उल्लेख करत त्यांच्यावरही टीका केली. तसेच विधानपरिषदेतील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. यानंतर त्यांनी आक्रमक होत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर जोरदार टीका केली. “२०२२ साली मी लपूनछपून काहीही केले नाही, जे केले ते निधड्या छातीने केले. पण तुमचे नेते (ठाकरे गट) लपूनछपून भाजपा श्रेष्ठींना भेटून आले. युती करू असे म्हणाले. पण पुन्हा पलटले”, असी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

शिवसेनेचे (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वीच विधानपरिषदेत बोलत असताना माझा छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच छळ झाला होता, असे म्हटले होते. पक्ष बदलण्यासाठी माझा छळ झाला. पण जसे छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही, तसा मी पक्ष बदलला नाही, असे ते म्हणाले होते. याचा संदर्भ देत एकनाथ शिंदे म्हणाले, “तुमचा काय छळ झाला होता? तुमच्यावर कारवाई झाल्यानंतर तुम्हीही लोटांगण घातले होते, ही मला माहीत आहे. पण प्रकरणातून सुटका झाल्यानंतर तुम्ही तुमच्या नेत्यांप्रमाणेच पलटी मारली.”एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटले, “छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल हाल करून मारले. त्यांचे डोळे काढले, जीभ हासडली, कातडी सोलली, त्यावर मिठ चोळले, अशाप्रकारचे तुमच्यावर (विरोधक) अत्याचार झाले का? तुम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करली. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी युती तोडली. तसेच महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपाच्या चार नेत्यांना तुरुंगात टाकून त्यांचे आमदार फोडण्याचा तुमचा कट होता. पण मी युतीधर्मासाठी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी तुमचा टांगा पलटी केला. मी जे केले, ते उघडपणे केले. ज्याची जगातील ३३ देशांनी दखल घेतली. एकनाथ शिंदे कोण आहे, हे ३३ देशांमध्ये सर्च केले गेले.”दरम्यान नागपूर दंगलीबाबत बोलत असताना त्यांनी विधानसभेत दिलेली माहितीच पुन्हा दिली. ही दंगल पूर्वनियोजित होती, असे प्रत्यक्षदर्शींकडून पुरावे मिळत असल्याचे ते म्हणाले. दंगल झालेल्या भागात एकेठिकाणी दररोज १००-१५० दुचाकी उभ्या असतात. मात्र दंगलखोरांची एकही दुचाकी काल त्याठिकाणी नव्हती. पेट्रोल बॉम्ब, लाठ्या, तलवारी इतक्या मोठ्या प्रमाणात अचानक कशा काय जमवल्या? यासाठी आधीच नियोजन केले गेले असावे, असा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली
एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असताना या लोकांनी देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचा कट रचला होता. यांनी औरंग्याचे विचार घेतले, मात्र मी बाळासाहेबांना सोडले नाही. त्यामुळे माझ्यासोबत 60 लोक आले. मी हिंदुत्वाचे सरकार आणले. तुम्हाला फक्त 20 लोक निवडून आणता आले. यावरून जनतेचा कौलही आमच्याच बाजूने असल्याचे स्पष्ट होते.
एक अंदर की बात सांगतो ह्यांचे प्रमुख मोदींना भेटायला गेले आणि मला वाचवा म्हणून माफी मागू लागले. अनिल परब तुम्ही देखील दिल्लीला गेला होतात आणि तिथे जावून माफी मागितली. त्यानंतर राज्यात माघारी येऊन पलटी मारली.

‘छावा’ चित्रपटामुळे लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या.. नागपूर दंगलीवर मुख्यमंत्र्यांचे निवेदन,धार्मिक मजकूर जाळल्याच्या अफवेने हिंसाचार झाला(व्हिडीओ)

प्रतीकात्मक कबरीच्या दहनावेळी धार्मिक मजकूर जाळल्याची अफवा-3 डीसीपींसह 33 पोलिस जखमी-सायंकाळी जाणिवपूर्वक हिंसाचार झाला

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत नागपूर दंगलीवर विस्तृत भाष्य केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी छावा चित्रपटामुळे जनतेच्या भावना प्रज्वलित झाल्याचाही दावा केला. आज महाराष्ट्रात छावा या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेपुढे आणला. पण त्यानंतर राज्यात लोकांच्या भावना देखील एकप्रकारे प्रज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाविषयीचा राग मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याठिकाणी असल्या तरी मला असे वाटते की, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे. महाराष्ट्र एक प्रगतीशील राज्य आहे. या राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. येथील सामाजिक घडी योग्य प्रकारे राहिली तर आपण आज ज्या दिशेने जात आहोत, त्या दिशेने जाण्यास आपल्याला मदत होईल. आणि म्हणून निश्चितपणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता राखण्याचे मी आवाहन करतो.कुणीही या प्रकरणी दंगल करण्याचा प्रकार केला, तर त्याचा जात, धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल. विशेषतः पोलिसांवर कुणी हल्ला केला तर त्याला सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वा. नागपुरातील महाल परिसरात विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘औरंगजेबाची कबर हटाव’ असे आंदोलन केले. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी हा गुन्हा दाखल झाला.

त्यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की, सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. यामुळे अत्तररोडमधील नमाज आटोपून 200 ते 250 चा जमाव त्या ठिकाणी जमला. हा जमाव नारेबाजी करू लागला. याच लोकांनी आग लावून टाकू, असे हिंसक बोलण्यास सुरूवात केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार द्यायची आहे, अशी मागणी केल्याने त्यांना गणेशपेठ पोलिस ठाण्यात निमंत्रित करण्यात आले.

एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागात 200- 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले. या घटनेत काही लोकांवर घातक शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. तिसरी घटना भालदारपुरा सायंकाळी 7.30 वा. झाली. तिथे 80 ते 100 लोकांचा जमाव होता. त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामु्ळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेत 1 क्रेन, 2 जेसीबी व काही चारचाकी वाहने जाळण्यात आली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, या संपूर्ण घटनेत 33 पोलिस जखमी झालेत. त्यात 3 उपायुक्त दर्जाचे पोलिस अधिकारी आहेत. त्यापैकी एका पोलिस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. एकूण 5 नागरीक जखमी झालेत. तिघांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 2 रुग्णालयात आहेत. एक आयसीयूत आहेत. एकूण 3 गुन्हे गणेशपेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेत. तहसील पोलिस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे एकूण 5 गुन्हे आहेत.11 पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एन्ट्री पॉइंटवर नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. यात तहसील, गणेशपेठ, कोतवाली, पाचपावली, लकडगंज, शांतीगंज, सकरदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर, कपील नगर या ठाण्यांचा समावेश आहे. एसआरपीच्या 5 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सर्वच सीपी, एसपी यांची व्हिसी घेऊन राज्यभर कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिलेत.एकूणच यामध्ये आपण पाहिले तर दिसते की, सकाळी एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळात शांतता होती. पण त्यानंतर सायंकाळी काही लोकांनी जाणिवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे, घटनास्थळी एक ट्रॉलीभरून दगड आढळलेत. काही लोकांनी आपल्या घरावर दगड जमा करून ठेवले होते. या प्रकरणी शस्त्रही मोठ्या प्रमाणात आढळले. ते जप्त करण्यात आलेत. वाहनांची जाळपोळ झाली.ते पुढे म्हणाले, समाजकंटकांनी ठरवून काही ठराविक घरांना, काही ठराविक आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलेत. 3 डीसीपी लेव्हलचे अधिकारी या प्रकरणी जखमी झालेत. यातील एका डीसीपीवर थेट कुऱ्हाडीने वार करण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितपणे यामध्ये एक सूनियोजित कट दिसून येत आहे. अशा लोकांवर कारवाई केली जाईल. कुठल्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था हाती घेण्याची कुणालाही परवानगी देण्यात येणार नाही. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना काहीही झाले तरी सोडले जाणार नाही हे मी स्पष्ट करतो. पोलिसांवरील हल्ला सहन केला जाणार नाही. पोलिस शांतता प्रस्थापित करत होते. अशावेळी पोलिसांवर केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे.खरे म्हणजे, महाराष्ट्रात कायदा सु्व्यवस्था राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. मी नागपूरसह सर्वच जनतेला विनंती करतो की, सर्वच समाजाचे धार्मिक सण, हे या कालावधीत सुरू आहेत. अशा या परिस्थितीत सर्वांनी संयम बाळगावा. कुणीही संयम सोडू नये. आपल्याला कायदा व सुव्यवस्था कशी राखता येईल, एकमेकांप्रती आदरभाव कसा राखता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न सर्वांनी करावा असे मी आवाहन करतो.

सेवाव्रती महिलांचा राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरव

महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने आयोजन

पुणे : कर्तृत्वाने स्त्री आपल्या सामर्थ्याची साक्ष देत असते. शिक्षण, विज्ञान, व्यवसाय, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत आजच्या स्त्रिया आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने करण्यात आला. समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ सेवाव्रती महिलांना ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार ‘ देऊन गौरव करण्यात आला.

माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, मॉडेल कॉलनी येथे झालेल्या कार्यक्रमात स्वाती शेखर मुंदडा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक व महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा उपस्थित होते. यावेळी महा एनजीओ फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे, संचालक योगेश बजाज,  विजय वरूडकर, अपूर्वा करवा व कोमल गांधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सागर पाटील, चेतन मराठे, चेतन शर्मा आणि रविंद्र चव्हाण यांनी विशेष योगदान दिले.

या सोहळ्यात किशोरी गद्रे, मनिषा सोनवणे, अलका गुजनाल, स्मिता गायकवाड, प्रीती मराठे, वैष्णवी पाटील, आदिती देवधर, सीमा सपकाळ, अनुराधा टल्लू, शिल्पा भट्टड, स्नेहल जगताप, सिद्धी क्षीरसागर, मीरा वानखेडे, चंद्रकला गावित, किरण माशाळकर, अनिता टापरे, डॉ. सोनाली शिंदे, डॉ. विनिता आपटे, डॉ. जान्हवी हासे, स्नेहा देव,  छाया अबक, सोनल डुंगरवाल, शीतल पाटील, अर्चना गुंडारे आणि अनुराधा भाटकर यांना सन्मानित करण्यात आले.

विजय वरूडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मुकुंद शिंदे यांनी स्वागत आणि आभार मानले.

सहकारी गृहरचना संस्था आणि अपार्टमेंट्साठी महाअधिवेशन पुण्यात 

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त दि. २२ व २३ मार्च रोजी आयोजन

पुणे : पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ, सहकारी पतसंस्था महासंघ, सहकारी बँक महासंघ यांच्यावतीने महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्था आणि  अपार्टमेंट्स यांना मार्गदर्शन व सहकार्य मिळावे, यासाठी पुण्यात महाअधिवेशन आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २२ आणि रविवार दिनांक २३ मार्च रोजी सकाळी १० ते ८ यावेळेत स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सहकार मंत्रालय केंद्र आणि राज्य, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ, पतसंस्था, बँका महासंघ, म्हाडा सिडको, रोटरी,लायन्स, एनएससीसी, अटल, पुणे पत्रकार संघ, क्रेडाई मेट्रो, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे, हास्य क्लब विविध शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि इतर समविचारी संघटनांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी पुर्नविकसन, स्वयं-पुर्नविकसन, घनकचरा, ओलासुका कचरा व्यवस्थापन, ई-चार्जिंग सुविधा, अपारंपरिक ऊर्जा सौर ऊर्जा  सोसायट्यांच्या खरेदी खत, मानीव हस्तांतरण, निवडणुका, तंटामुक्त सोसायटी, टँकर मुक्त संस्था,सहकार मित्र, सहकार संवाद आॅनलाईन पोर्टल,बिगर शेती कर, सायबर क्राईम,  सीसीटिव्ही, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, सदनिका खरेदी, विक्री, भाड्याने देणे, संस्थांमधील पाळीव प्राणी,सहकारातील असहकार, उदासीनता  इत्यादि विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तसेच, ग्रीन सोसायटी पुरस्कार आणि स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. म्हाडा ,सिडको प्राधिकरण संबंधित सहकारी संस्थांच्या समस्यांवर विशेष सत्र घेतले जाणार आहे.

दिनांक २२ मार्च हा जागतिक जलदिन आणि २३ मार्च हा जागतिक हवामान दिन, शहीद दिन आहे. या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून अनेक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. या वेळी एनसीयुआय दिल्ली आणि सहकार विभाग केंद्र, राज्य यांचे साहाय्यानेई गर्व्हनस, आॅनलाईन टेÑनिंग, इलेक्शन अ‍ॅप, डिम्ड कव्हेयन्स, सेल्फ रिडेव्हलपमेंट पुस्तकांचे अनावरण करण्यात येणार आहे.

पुणे आणि महाराष्ट्रातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, सोसायटीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी  तसेच समाजातील विविध घटकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अशा प्रकारे गृह संस्था अप्पर्टमेंट्स विषयीच्या सर्व घटकांना एकत्र आणणारे संपूर्ण महाराष्ट्र किंवा देशातील नव्हे तर जगातील पहिले महा अधिवेशन आहे.

महाअधिवेशनाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा ,केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार रोहित पवार, केंद्रीय सहकार सचिव नॅशनल को आॅपेरेटिव्ह युनियन आॅफ इंडियाचे अध्यक्ष दिलीप सिंघानिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर महाजन, सावित्री सिंघ, डॉ. सागर वाडकर, राष्ट्रीय सरकारी संघ , नवी दिल्ली, नॅशनल कोआॅपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आमदार बीजय कुमार सिंग, कार्यकारी अध्यक्ष एन.एस.मेहरा, विद्याधर अनास्कर,  डॉ. नीलम गो-हे ,खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार वंदना चव्हाण, माधुरी मिसाळ, अदिती तट करे, अतुल सावे, पंकजा मुंडे, उदय सामंत, प्रवीण दराडे, दीपक तावरे, डॉ. राजेंद्र भोसले, डॉ. योगेश म्हसे, डॉ.सुहास दिवसे, शेखर सिंग, पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे, संदीप सिंग गिल, लाच लुचपत पोलीस आयुक्त संजीव कुमार सिंघल, काका कोयटे अ‍ॅड. सुभाष मोहिते, महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ, वैकुंठ भाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवसस्थापन संस्थेच्या संचालिका डॉ. हेमा यादव ,डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकार प्रशिक्षण संस्थाचे पदाधिकारी, यशदा चे सह संचालक शेखर गायकवाड , कर्नल शशिकांत दळवी तसेच महाराष्ट्रातील सर्व आजी माजी खासदार, आमदार, पुण्यातील माजी महापौर, नगरसेवक इत्यादींना  निमंत्रित केले आहे. परदेशातील अनेक विद्यार्थी,तज्ञ व्यक्ती यांचाही या सर्व कार्यक्रमात आणि परिसंवादात सहभाग होणार आहे.    

अल्पवयीन मुलाने केल्या चार वाहनचोऱ्या अन एक घरफोडी

0

पुणे- एका अल्पवयीन मुलाने केलेल्या चार वाहनचोऱ्या अन एक घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला असून त्याच्याकडून चोरीची चार दुचाकी वाहने व एक घरफोडीतला ऐवज असा १,९२,०००/- रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’काळेपडळ पोलीस ठाणे कडील गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांनी यांची हिरो होंडा पॅशन प्रो ही मोटारसायकल दिनांक १४/०३/२०२५ रोजी कडनगर, उंड्री या ठिकाणी पार्क केली होती, दिनांक १५/०३/२०२५ रोजी फिर्यादी यांना त्यांची मोटारसायकल सदर ठिकाणी मिळुन आली नाही म्हणून काळेपडळ पोलीस ठाणे येथे त्यांची गाडी चोरी झाल्याची तक्रार देण्याकरीता आले होते. दरम्यान काळेपडळ पोलीस ठाणेकडील पेट्रोलिग कर्तव्य करीता नेमण्यात आलेले पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे व विशाल ठोंबरे नमुद अंमलदार हे पहाटे ०४/३० ते ०५/०० वा. सुमारास कडनगर चौक भागात पेट्रोलिंग करीत असताना एक इसम दुचाकी वाहन ढकलुन घेवून जाताना दिसला म्हणुन बिट मार्शल अंमलदार यांना संशय आल्याने त्यांनी त्यास विचारपुस करीत असताना तो पळून जावु लागला असता बिट मार्शल अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करुन शिताफिने त्यास पकडून वाहनासह पोलीस ठाणे येथे घेवून आले.
पोलीस ठाणे हद्दीत रात्रपाळी कर्तव्यावर नेमण्यात आलेले सहा पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड यांनी त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता एक विधीसंघर्षित बालक वय १६ वर्षे याने सदरचे वाहन चोरी करुन घेवून जात असल्याचे सांगितले. तसेच त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांने वेगवेगळ्या तीन ठिकाणी वाहन चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
१) काळेपडळपोलीस ठाणे गु.र.नं.७१/२०२५भा.न्या. सं ३०३ (२) मधील हिरो होंडा पेंशन प्रो
२) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं. २६६/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) मधील होंडा सीबी शाईन
३) वानवडी पोलीस ठाणे गु.रं.नं. ७१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) मधीलकेटीएम २०० डयुकी
४) कोंढवा पोलीस ठाणे गु.रं.नं. ०७/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) मधील होंडा अॅक्टिवा ११०
५) काळेपडळ पोलीस ठाणे गु.रं.नं. २२/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१ (४), ३०५ एकुण ९,०००/- रु रोख रक्कम असा एकुण १,९२,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या विधीसंघर्षीत बालकाकडून वरील चारही वाहने व रोख रक्कम लपवुन ठेवलेल्या ठिकाणी जावुन ताब्यात घेण्यात आली आहेत. आरोपी विधीसंघर्षीत बालक हा चोरी केलेली वाहने घरफोडी व मौजमजा करण्यासाठी वापरत होता. पुढील अधिक तपास पोलीस अंमलदार प्रविण काळभोर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन,मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, सहा पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, पंधरकर, सद्दाम तांबोळी, दाऊद सय्यद, शाहिद शेख यांनी करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

पिस्टल, काडतुसे बाळगणा-या अल्पवयीन मुलाला पकडले

पुणे-पिस्टल, काडतुसे बाळगणा-या अल्पवयीन मुलाला पुणे पोलिसांनी दारूवाला पुलाजवळ पकडले आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दि.१६/०३/२०२५ रोजी एक विधीसंघर्षीत बालक वय १७ वर्षे हा दारुवालापुल चौकाजवळील नागझरी नाल्याजवळ संशयास्पद स्थितीत फिरत असुन त्यांचेकडे पिस्टलसारखे हत्यार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाली असता वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक जालिंदर फडतरे, व स्टाफ यांनी दारुवाला पुल चौकाजवळ नागझरीनाला येथे सापळा लावला होता.
त्यानुसार रात्रौ टिळक आयुवैदीक विद्यालयाचे पाठीमागील बाजुस नागझरी नाल्याजवळ आडोशाला संशयीत विधीसंघर्षीत बालक थांबल्याचे दिसल्यावरुन त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांने नाव सांगुन त्यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याचेकडे ५०,०००/- रु. किं. चा एक सिल्वर रंगाचा मॅग्झीन असलेला गावठी कट्टा व १०००/- रु. किं.चे दोन जिवंत काडतुसे मिळुन आल्याने सदर विधीसंघर्षीत बालकाविरुद्ध समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५१/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील अधिक तपास करीत आहोत.
सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परि.१, संदीपसिंह गिल, सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, श्रीमती अनुजा देशमाने, समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, रहीम शेख, अमोल गावडे, शिवा कांबळे, कल्याण बोराडे, भाग्येश यादव यांनी केली.

मॉर्फीग केलेले न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून खंडणी मागणा-या १९ वर्षीय बिहारी तरुणाला अटक

पुणे- इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावर मॉर्फीग केलेले न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून खंडणी मागणा-या १९ वर्षीय बिहारी तरुणाला अ वानवडी पोलीसांनी अटक केली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’पिडीत महिला यांचे अनोळखी इसमाने त्यांचे फोटो व नाव वापरुन इन्स्टाग्राम आयडी तयार करून त्याने फोटो व इन्स्टाग्राम आयडी डिलीट करण्यासाठी २,०००/-रु.ची मागणी केली. पैसे दिले नाहीतर फोटो मॉर्फीग केलेले न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. परंतु त्यास पैसे न दिल्याने त्याने फिर्यादी यांचे भावाचे इन्स्टा आयडीवर मॉर्फीग केलेले फिर्यादी यांचे न्युड फोटो पाठविले व आणखी फोटो पाठवयाचे नसेल तर इन्स्टाग्रामवर मॅसेस करुन पैशाची वारंवार मागणी केली म्हणून अनोळखी इसमांविरुध्द वानवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १०४/२०२५, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ७७,७८,७९,३०८(२), आय.टी अॅक्ट ६६ (सी), ६७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने तपास करुन वानवडी पोलीस ठाणे कडील सायबर टिम मधील पो.हवा. अमोल पिलाणे व अतुल गायकवाड यांनी त्याबाबत सोशल मिडीयावरुन माहिती प्राप्त करुन निष्पन्न आरोपी रघुवर बलराम चौधरी, वय. १९ वर्षे, रा. अंबिका जनरल स्टोअर्स बाजूला, शिंदेवस्ती, हडपसर, पुणे, मूळ बिहार यास निष्पन्न केले. त्याचा शोध घेऊन त्यास सोबतच्या स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याचेकडे अधिक चौकशी करता तसेच त्याचे ताब्यातील मोबाईलची पाहणी करता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दि.१३/०३/२०२५ रोजी अटक करण्यात आलेली असून त्याची दि. १७/०३/२०२५ पर्यंत पोलीस कस्टडीचे रिमांड मंजूर आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गोविंद जाधव हे करीत आहे.
सदरची कारवाई ही पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर श्री. धन्यकुमार गोडसे, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो.स्टे. पुणे शहर श्री. सत्यजित आदमाणे, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गोविंद जाधव, पोलीस उप-निरीक्षक आशिष जाधव व पोलीस अंमलदार अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, सोमनाथ कांबळे व सुजाता फुलसुंदर या विशेष पथकाने केली आहे.

भव्य व दिमाखदार मिरवणुकीद्वारे शिवरायांना नमन-

गुरुवार पेठेत प्रभात मित्र मंडळतर्फे शिवजयंती उत्सव ; शिवभक्तांनी व महिलांनी केली सामुहिक शिवआरती
पुणे : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती असलेल्या दिमाखदार रथावर विराजमान झालेली छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधिष्ठीत मूर्ती… रांगोळीच्या पायघडया व फुलांची उधळण…पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला… ढोल-ताशांचा गजर आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण… अशा शिवमय झालेल्या वातावरणात शहराच्या पूर्व भागातील सर्वात मोठा शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला. गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळातर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात मुख्य अयोध्या रथ हे यंदाचे मुख्य आकर्षण ठरले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुणेचे उपसभापती दत्तात्रय पायगुडे, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र हेजीब, राजर्षी शाहू सहकारी बँकेचे अध्यक्ष शांताराम धनकवडे, भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर, खजिनदार सचिन भोसले, उत्सव प्रमुख नितीन घोगरे, अमोल व्यवहारे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. शिवजयंती उत्सवाचे यंदा ४१ वे वर्ष आहे.

मुख्य रथावरील शिवप्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर फुलांची उधळण करीत स्थानिक महिला व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत केले. यावेळी विनोद आढाव यांच्या कसबा पेठेतील त्र्यंबकेश्वर मर्दानी आखाडामधील कलाकारांनी सादर केलेले मर्दानी खेळ पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. तसेच श्री गजलक्ष्मी ढोल-ताशा पथक व सोलापूर टेंभूर्णी येथील ओम श्री हलगी पथकाच्या तालावर उपस्थितांनी ठेका धरला. यावेळी केरळ येथील चेंदा मेलम वाद्यपथक हे उपस्थितांसाठी विशेष आकर्षक ठरले. यावेळी शिवभक्तांनी व महिलांनी सामुहिक शिवआरती देखील केली.

मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण म्हणाले, सार्वजनिक स्वरुपात शिवजयंती उत्साहात साजरी व्हायलाच हवी. मात्र, घराघरात शिवजयंती साजरी व्हावी, याकरीता मंडळ प्रयत्न करीत आहे. प्रत्यक्ष शिवजयंतीच्या दिवशी पारंपारिक पध्दतीने शिवजयंती साजरी होईल व घरोघरी शिवचरित्राचे वाचन होईल यासाठी मंडळाच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. याशिवाय परिसरातील नागरिकांकरिता व लहान मुलांकरिता देखील विविध स्पर्धांसारखे उपक्रम राबविण्यात आले आहेत.

शहरांच्या सीसीटीव्ही यंत्रणेसाठी सर्वसमावेशक पॉलिसी करण्याचे आश्वासन

आ. शिरोळे यांच्या लक्ष्यवेधीवर गृह राज्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : राज्यातील शहरी भागांतील सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसंदर्भात सर्वसमावेशक धोरण विकसित केले जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिले.आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते.

पुणे शहरात सुमारे दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यात पोलीस विभाग, जिल्हा नियोजन, महापालिका, मेट्रो , एसटी, आणि इतर संस्था सीसीटीव्ही कॅमेरे बसवतात. मात्र, यापैकी अनेक कॅमेरे बिघडलेले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखभाल करणार कोण , याबाबत टाळाटाळ केली जाते. यातून सुरक्षिततेचे गंभीर विषय निर्माण होउ शकतात, याकडे आमदार शिरोळे यांनी लक्ष्यवेधी मांडताना लक्ष वेधले.

सर्व सीसीटीव्ही कॅमेर्यांची जबाबदारी पोलीस खात्याकडे सोपविली पाहिजेत आणि त्याच्या देखभालीसाठी एक सर्वसमावेशक धोरण असले पाहिजे अशी मागणी शिरोळे यांनी केली. रात्रीच्या वेळीही निगराणी राखता येईल असे उच्च तंत्रज्ञान वापरले जावे तसेच सॉफ्टवेअरमध्ये आर्टीफिशिअल इंटेलिंजन्सचा वापर कसा करता येईल, यासाठीही धोरण आखले जावे, अशीही सूचना शिरोळे यांनी केली. वाढते शहरीकरण लक्षात घेता पुण्या मध्ये अजून दहा हजार कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी शिरोळे यांनी केली. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सकारात्मक भूमिका मांडली. सीसीटीव्ही बसवण्याबाबत एस ओ पी करण्यात येतील आणि पुणे शहरात ए आय युक्त कॅमेरे बसवण्यात येतील असेही आश्वासन त्यांनी दिले.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, पण तिच्यात दुरुस्ती होणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

विकसित भारताच्या निर्माणासाठी विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप ठरविणारा अर्थसंकल्प

मुंबई, दि. 17: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला 2047 पर्यंत विकसित देशांच्या पंक्तीत नेऊन बसविण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी महाराष्ट्रानेही कंबर कसली आहे. त्याचे प्रतिबिंब राज्याच्या अर्थसंकल्पात निश्चित दिसून येत आहे. विकसित भारताच्या निर्माणासाठी विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप ठरविणारा हा अर्थसंकल्प असून महाराष्ट्राचा संतुलित विकास करण्याची क्षमता अर्थसंकल्पात असल्याचा विश्वास आज सन 2025- 26 च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरात व्यक्त केला.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्राचा देशाच्या प्रगतीत पूर्वीपासून सिंहाचा वाटा राहिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशासाठी निश्चित केलेले लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाहीही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र सर्वांपेक्षा जास्त योगदान देईल, हे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्यामुळेच “विकसित भारत, विकसित महाराष्ट्र” हा या अर्थसंकल्पाचा मूळ गाभा असल्याचेही त्यांनी सांगितले.

मागील काळातील योजनांबाबत
उपमुख्यमंत्री म्हणाले, सर्वच योजनांचे वेळोवेळी पुनर्विलोकन होत असते. ज्या योजना कालबाह्य ठरतात, त्या बंद कराव्या लागतात. कोविडमध्ये आपण काही योजना, सवलती सुरु केल्या. त्या कोविड संपल्यावर बंद कराव्या लागल्या. काही वेळा केंद्र शासनाकडून राज्याकडील योजनेप्रमाणेच लाभ देणारी नवीन योजना येते. योजनेची द्विरुक्ती नको व्हायला आणि राज्याचा खर्च वाचावा म्हणून आपली योजना आपण बंद करतो.

राज्याचा प्राधान्यक्रम
राज्याच्या खर्चाचा प्राधान्यक्रम गरजेनुसार बदलत असतो. यावेळी विकसित देश आणि विकसित महाराष्ट्रासाठी शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार आणि समाजातील सर्व घटकांसाठी विकासात्मक योजना या पाच प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य देण्याची आवश्यकता होती. या क्षेत्रांवर विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केलेला आहे. राज्याच्या दळणवळणाच्या सुविधांकडे सरकार विशेष लक्ष देत आहे आणि यापुढेही देणार आहे.
रस्त्याचे जाळे वाढले तर कंपन्यांच्या उत्पादकतेत वाढ होते, शेतकऱ्यांचा वाहतुकीवरचा खर्च कमी होतो, इंधनावरील राज्याच्या, देशाच्या परकीय चलनात बचत होते आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ होते. यासाठी अर्थसंकल्पात रस्ते बांधणीसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047, ज्याचा उल्लेख याच विचारावर आधारीत आहे.

कृषी विकास दर
कृषीचा 2023-24 चा विकास दर 3.3 टक्के होता. सरकारने शेतक-यांना आर्थिक ताकद दिली, त्यामुळे 2024-25 चा कृषीचा विकास दर 8.7 टक्क्यांवर गेला.कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञान, जलयुक्त शिवार, एक तालुका एक बाजारपेठ, सिंचनासाठी नदीजोड प्रकल्प, महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम, बांबू लागवड, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मराठवाडा वॉटर ग्रीड यासारख्या कार्यक्रमांसाठी तरतुदी केलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे. पण ही सुविधा निर्माण करुन देण्याची जबाबदारी सरकारची आहे.
म्हणूनच पीक नियोजनाचा सल्ला देण्यासाठी आणि त्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देणार आहोत.
येत्या दोन वर्षात 500 कोटी निधी आपण यासाठी खर्च करणार आहोत. एआय तंत्रज्ञान (कृत्रीम बुदधीमत्तेचा वापर) येणाऱ्या काळात कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देईल आणि त्यातून महाराष्ट्रातला शेतकरी समृध्द होईल.
राज्यात 45 लाख कृषीपंपांसाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. कोरोनात सर्वच क्षेत्रांची कामगिरी ढासळली होती. फक्त कृषी क्षेत्राने राज्याला तारलं होते. शेती हा राज्यसरकारच्या प्राधान्यक्रमातील महत्वाचा घटक आहे. म्हणूनच या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी 9 हजार 700 कोटीची भरीव तरतूद केली आहे.

विक्रमी सोयाबीन खरेदी व शेतकऱ्यांसाठी केलेली तरतूद

देशात सर्वाधिक विक्रमी 11.21 लक्ष मे. टन खरेदी करण्यात आली आहे. यासाठी नाफेड, एनसीसीएफ द्वारे 5092 कोटी वितरीत करण्यात आली आहे.
राज्यात धान खरेदी बोनससाठी 1380 कोटी रुपये, कांदा खरेदी अनुदान 348 कोटी, दूध अनुदानासाठी 982 कोटी, कापूस व सोयाबीन अनुदान 3000 कोटी, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना 5911 कोटी मदत, मोफत वीजसाठी 17,800 कोटी, नमो शेतकरी सन्मान योजनेकरीता 6,060 कोटी, कुसुम योजना, मागेल त्याला सोलारपंप 150 कोटी, पोकरा 2.0 साठी 350 कोटी, स्मार्ट योजनेकरीता 310 कोटी, मॅग्नेटसाठी 260 कोटी, पंजाबराव देशमुख्य व्याज सवलत 300 कोटी तरतूद करण्यात आली आहे.

उद्योग वाढीसाठी..
राज्यात गुंतवणुकीला पोषक वातावरण आहेच. आज थेट विदेशी गुंतवणूकीच्या बाबतीत देशात राज्य अव्वल आहे.
दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारातून महाराष्ट्रात येत्या काळात 15 लाख 72 हजार 654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. 16 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. “मेक इन महाराष्ट्र” च्या माध्यमातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी शासन नवीन औद्योगीक धोरण आणणार आहे . गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्याराज्यांत मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आधुनिकतेची कास धरून अनेक गोष्टींचा समावेश या औद्योगिक धोरणात असणार आहे.

त्यामुळे पुढील पाच वर्षात ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणुक आणि ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नवउद्यमीची (स्टार्ट अप) संख्या राज्यात मोठी आहे. केंद्र आणि राज्याकडून त्यांनाही बळ देण्याचा प्रयत्न आहे.

1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी
महाराष्ट्राचा जीएसडीपी (सकल राज्य उत्पादन) वाढीचा दर सरासरी बारा टक्क्यांच्या आसपास आहे. मागील पाच वर्षात यामध्ये 23 लाख कोटींनी वाढ झालेली आहे. म्हणजे, पाच वर्षात जीएसडीपी जवळपास दुप्पट झाला. राज्याचा जीएसडीपी साधारणपणे दरवर्षी सुमारे 10 टक्क्यांनी वाढतो आहे. आता ग्रोथ रेट 14 ते 15 टक्के करण्याचा प्रयत्न करत आहे.
महाराष्ट्राच्या जलद आर्थिक विकास आपल्याला करायचा आहे. त्यासाठी जिल्हा हा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यांची भूमिका आर्थिक विकासाला गती देण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेमध्ये मोठी वाढ झाल्यावर (GSDP) जीएसडीपीमध्ये आणखी वाढ होईल.
वाढवण बंदरासारख्या महाकाय प्रकल्पासाठी राज्याने कंबर कसलेली आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक या माध्यमातून महाराष्ट्रात होईल, लाखो रोजगार मिळतील, अँक्सीलरी व्यवसाय त्या माध्यमातनू उभे राहतील.
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु होण्यासाठी काही दिवसांचाच कालावधी राहिलेला आहे. राज्याच्या महानगरात मेट्रोचं जाळ तयार होतं आहे. उद्योगांचे वेगवेगळे क्लस्टर्स तयार होत आहेत. या प्रयत्नांमुळे राज्याची अर्थव्यवस्था 1 हजार अमेरिकन डॉलरची होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

सामाजिक न्यायासाठी..
आपण सर्वांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने करीत आहे. कारण, जोपर्यंत मागे राहिलेल्या समाजघटकांना संधी आणि बळ सरकारकडून मिळणार नाही तोपर्यंत विकसित महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होणार नाही.
त्यामुळेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उपयोजनांसाठी 40 टक्क्यांची वाढ प्रस्तावित केलेली आहे. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील समाज, धनगर, अपंग यांच्यासाठी देखील भरीव तरतुदी केलेल्या आहेत.धनगर, गोवारी समाजाला
आदिवासी उपयोजनांच्या धर्तीवर 22 योजना राबविण्यात येतील.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना
या योजनेसाठी पुरेसा निधी निश्चितपणे देऊ, हा विश्वास बहिणींना देत असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. योजनेतून दरमहा १५०० रुपयांची थेट रोख रक्कम महिलांना मिळत आहे. महिला सक्षमीकरणाचं एक मोठ पाऊल शासनाने उचलले आहे.
लाडकी बहिण योजनेच खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक १० ते २५ हजारापर्यंतची कर्ज देणार आहे. राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिल्हा सहकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत.

ज्या महिलांना छोटा, मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी लाडकी बहिण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढावी.म्हणजे, ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाउल पुढे टाकण्याचे आवाहन त्यांनी केले. सुमारे 45 हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून महिला सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटं, मोठं योगदान मिळेल.

महसुली तूट
आकडेवारी बघितली तर सातत्याने महसुली उत्पन्न वाढलेले दिसेल. जीएसटी आल्यापासून करदाते वाढले आहे. येणाऱ्या वर्ष-दोन वर्षांच्या काळात आणखी करदाते वाढतील आणि त्यामधून कर उत्पन्नात भर पडेल. 2024-25 या वर्षात 3 लक्ष 28 हजार कोटी एवढा जीएसटी (SGST+CGST+IGST) जमा केला गेला. मागील वर्षाच्या तुलनेत 12.3 टक्के एवढी वाढ आहे.
महाराष्ट्रात जमा होणारा देशपातळीवरील जीएसटीचा वाटाही वाढतो आहे. यंदा तो 16.31 टक्के आहे. 2024-25 मध्ये 95.20 टक्के महसुल जमा झाला, तर 2025-26 मध्ये सुद्धा 100 टक्के महसूल जमा होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.

राजकोषीय तूट
राज्याची राजकोषीय तूट एफआरबीएम (FRBM) नॉर्म्सच्या मर्यादेत आहे. कुठेही नॉर्म्स मोडलेले नाहीत. 2025-26 मध्ये अंदाजित राजकोषीय तूट 1 लाख 36 हजार 235 कोटी आहे. ती 2.76 टक्के म्हणजे 3 टक्क्याच्या मर्यादेत आहे.
मागील काही वर्षाची स्थिती बघितली तर अर्थसंकल्प हा दरवर्षी तूटीचा असतो. परंतु, महाराष्ट्राची आर्थिक शिस्त पाळण्याची परंपरा आहे. त्यामुळे वित्तीय वर्ष संपल्यानंतर प्रत्यक्ष खर्च विचारात घेतला तर, त्या वेळेस अशी तूट मोठ्या प्रमाणावर कमी झालेली असते किंवा तूटीच्या ऐवजी अधिक्य आल्याचे स्पष्ट होते.
या अर्थसंकल्पात 45000 कोटीची तूट दाखवलेली आहे. मागील आर्थिक वर्षात सरकारने नवीन योजना, संकल्प हाती घेतले आणि पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून तरतुदी करुन ते पूर्ण केले जातात, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

‘एमपीएससी’च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करण्यासाठी अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

‘एमपीएससी’च्या रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने केल्यास
परीक्षा, मुलाखतींची प्रक्रिया गतिमान होऊन विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना न्याय देण्यासाठी ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त सदस्यपदांवरील नियुक्ती तातडीने करण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. ही नियुक्ती तातडीने झाल्यास परीक्षा, मुलाखती, निकालाची प्रक्रिया गतिमान होऊन स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

‘एमपीएससी’द्वारे उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस निरिक्षक, प्राध्यापक अशा राज्यसेवेतील महत्वाच्या पदांवरील नियुक्त्या करण्यात येतात. त्यासाठी ‘एमपीएससी’मध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्यांची पदे मंजूर आहेत. मंजूर पाच पदांपैकी अध्यक्ष आणि दोन सदस्यांची पदे भरलेली आहेत, तर सदस्यांची तीन पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे आयोगाच्या कामकाजावर विपरित परिणाम होत असून परीक्षांना विलंब होत आहे. मुलाखती, निकालाची प्रक्रिया रखडत आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरावीत अशी मागणी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध संघटनांकडून निवेदनांद्वारे केली जात आहे. या मागण्यांची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून ‘एमपीएससी’तील तीन सदस्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी विनंती केली आहे.

भारती प्रतापराव पवार यांचे निधन

पुणे- सौ भारती प्रतापराव पवार(वय ७७ ) यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले.सकाळ चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत . खासदार सुप्रिया सुळे यांच्या काकी होत .त्यांच्या मागे मुलगा अभिजित पवार ( सकाळ चे व्यास्थाप्कीय संचालक )मुलगी अश्विनी, सून नातवंडे असा परिवार आहे. उद्या मंगळवारी नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमी येथे भारती पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे ३५ वर्षे सक्रिय होत्या. तेथे त्या विश्वस्तही होत्या. बालकल्याण संस्थेतील प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत. अनेक मुला-मुलींना त्यांनी तेथे चित्रकलेचे धडे दिले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच ‘सकाळ’ संचलित कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळेतही त्या विश्वस्त होत्या. तेथील अनेक उपक्रमांत त्या सहभागी होत.मूळच्या मुंबईतील असलेल्या भारती (अर्थात भारती श्रीपतराव पाटील) यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण तेथील बालमोहन विद्या मंदिरात झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. चित्रकलेत त्यांचा हातखंडा असल्यामुळे पुढे त्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर १९७० मध्ये त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह झाला.सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यात आल्यावर ‘सकाळ’च्या माध्यमातून त्या अनेक उपक्रमांत सहभागी होत.

दीपक मानकर विविध मागण्यांसाठी महापालिका आयुक्तांच्या भेटीला

पुणे-विविध मागण्यांसाठी महपालिका आयुक्तांच्या भेटीला आज महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक मानकर आले होते. पुणे शहरातील सध्यस्थितीत सुरु असलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करणे, प्रभागातील मुलभूत सुविधा जसे पाणी पुरवठा, सार्वजनिक शौचालय,ड्रेनेज, पावसाळी लाईन दुरुस्ती करणे, नागरिकांचे विविध प्रश्न या संदर्भात आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेत विस्तृत चर्चा करत निवेदन दिले. याप्रसंगी आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबधित विभाग प्रमुखांना कामे मार्गी लावण्याबाबत सूचना केल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले .

पीएम-किसान योजनेच्या अनुषंगाने फसवणूक टाळण्यासाठी अज्ञात एपीके फाईल किंवा लिंक डाऊनलोड न करण्याचे आवाहन

पुणे, दि. 17: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर PM Kisan list. APK किंवा PM Kisan APK या संदेशाची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होते, अशी माहिती मिळाली असून शेतकऱ्यांनी अज्ञात एपीके फाईल किंवा लिंक डाऊनलोड करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांच्या प्रतिबंधक उपाययोजनांसाठी शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळ आणि अॅपचाच वापर करावा. कोणतीही अज्ञात APK फाईल किंवा लिंक डाउनलोड करू नये. संशयास्पद लिंक आणि संदेशापासून सावध रहावे. कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेला पीएम- किसान संबंधित लिंक असलेला संदेश उघडू नये. कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलवर बँक खाते किंवा आधार क्रमांक सांगू नये. फसवणूक झाल्यास सायबर गुन्हे तक्रार संकेतस्थळ https://cybercrime.gov.in वर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

गुलटेकडीत दोन गटांमध्ये हाणामारी

पुणे -गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली अाहे. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीनुसार खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोनजणांना अटक करण्यात आली असून या मारहाणीत तीनजण जखमी झाले असून, पसार आरोपींचा शोध पाेलीसांकडून घेण्यात येत आहे.

याबाबत केशव अनिल शिवशरण (वय २०, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहित सिंग, दर्शन सुतार, संकेत यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राेहित सिंग याला अटक करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध यापूर्वी गु्न्हे दाखल झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी केलेल्या मारहाणीत शिवशरण, राहुल ढोणे, अक्षय कांबळे हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार शिवशरण हे मीनाताई ठाकरे वसाहतीत राहायला आहेत. शिवशरण याने आरोपी सिंग याला दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. या घटनेनंतर सिंग, सुतार आणि साथीदार तेथे आले. त्यांच्याकडे कोयते, बांबू होते. कोयते उगारून आरोपींनी दहशत माजविली. आरोपींनी शिवशरण, ढोणे, कांबळे यांना मारहाण केली. मारहाणीत तिघे जखमी झाले. सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर तपास करत आहेत.

दरम्यान, रोहित सिंग (वय २८, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) याने परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुुसार, अभय शेखापुरे, सचिन खुडे, सागर कदम, संतोष कांबळे यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी सागर कदम याला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी केलेल्या मारहाणीत दर्शन सुतार, संदेश मेश्राम जखमी झाले आहेत. सचिन माने याच्याबरोबर का फिरतो, अशी विचारणा करुन आरोपींनी मारहाण केली. आरोपींनी बांबू आणि फरशीच्या तुकड्याने मारहाण केली. मारहाणीचा प्रकार सुरू असताना भाचा दर्शन सुतार, संदेश मेश्राम तेथे आले. तेव्हा आरोपींनी त्यांना मारहाण केल्याचे सिंग याने फिर्यादीत सांगितले आहे.

मीनाताई ठाकरे वसाहतीत दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती मिळताच परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या दोन्ही गटातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.