Home Blog Page 412

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना धमकी देणाऱ्या कीर्तनकारावर कारवाई करा-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या कीर्तनकारावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

“आम्ही नथुराम होऊ” अशी भाषा थोरातांना उद्देशून त्या कीर्तनकाराने करणं म्हणजे त्यात थेट महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचा गौरव आहेच आणि त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची सरळसरळ धमकी देण्याचा हा प्रकार आहे. ह.भ.प.म्हणवणाऱ्या कीर्तनकाराने जीवे मारण्याच्या धमक्या देणे परंपरेला शोभणारे नाही. वारकरी संप्रदायाची परंपरा ही संत, भक्ती, समता आणि अहिंसेवर आधारलेली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या शिकवणुकीतून ही परंपरा उभी राहिली. पण, आज त्याच वारकरी परंपरेत काही विखारी प्रवृत्ती घुसवून द्वेष, हिंसा आणि दहशतीचं विष पेरलं जातंय. अध्यात्माच्या नावाखाली लोकांच्या मनात हत्या व दहशतवादाचं समर्थन पेरलं जातंय हे वारकरी परंपरेच्या आत्म्यालाच कलंक लावणारं आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

हिंसा पसरवणाऱ्या, धमक्या देणाऱ्या आणि गांधी हत्येचे समर्थन करणाऱ्या या प्रवृत्तीचे त्वरीत सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर रित्या निर्मुलन झालेच पाहिजे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

महाराष्ट्र शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची भूमी आहे. महाराष्ट्र संत, वारकरी व भक्तीच्या समतेच्या परंपरेचा आहे. नथुरामाचा गौरव करणाऱ्यांना या भूमीत स्थान नाही, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले असून कीर्तनकारावर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा फडणवीस सरकार आणि भाजप अशा प्रवृत्तींचे समर्थन करीत आहेत, असेच समजले जाईल, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

खडकवासल्यातून 35 हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरु, मुठा नदी किनारी सावधानतेचा इशारा

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 29084
क्युसेक वाढवून सायंकाळी 7.00 वा.35310 क्यूसेक करण्यात आला आहे.

पुणे- आज सकाळपासून दुपार पर्यंत झालेल्या जोरदार मुसळधार पावसाने धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ होत असून पवना नदी बरोबर आता मुठा नदी किनारी देखील सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. सायंकाळी ५ वाजता मुठेत खडकवासल्यातून २९ हजार क्युसेक्स चा विसर्ग सुरुकरण्यात आला आहे. त्यापूर्वी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 24827क्युसेक चा विसर्ग होत होता तो वाढविला गेला आहे.

आज दिनांक-१९/०८/२०२५ रोजी पावसाचे प्रमाण व खडकवासला धरणामध्ये पावसाचे येवा पाहता खडकवासला धरणातून २९०८४ क्युसेक्स वरुन सायंकाळी-०७.०० वाजता ३५५७४ क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे.
खालील प्रमाणे तीनही धरणातील सद्यःस्थिती व चालू विसर्ग :

१)वरसगाव-९७.९७% भरले
१२०००विसर्ग (क्युसेक्स)
२)पानशेत ९८.२४%भरले
१२०००विसर्ग (क्युसेक्स)
३)खडकवासला ८६.९९%भरले
२९०८४विसर्ग (क्युसेक्स)
४)पवना ९९.७०%भरले
१२०००विसर्ग (क्युसेक्स)

मुठा नदी
६०,०००इशारा पातळी (विसर्ग क्यू.) आणि १,००,००० क्युसेक्स विसर्ग हि धोका पातळी

अशा पार्श्वभूमीवर हि माहिती योग्य कार्यवाही साठी जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका यांनी मुळा मुठा नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये (ब्लू लाईन एरिया) नागरिकांनी उतरू नये सदर ठिकाणी पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये टप्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रात काही तत्सम साहित्य, वाहने अथवा जनावर असल्यास तात्काळ हलविण्यात यावी. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
तथापि आपले स्तरावरुन संबंधित अधिकारी व विभागांना तात्काळ वार्ता देण्यात यावी व सर्व प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
असे संनियंत्रण अधिकारी मध्यवर्ती पुरनियंत्रण कक्षअधिकारी श्वेता यो. कु-हाडे यांनी ,आपत्ती निवारण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय,
आपत्ती निवारण कक्ष, पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिका, (पवना व मुळशी करिता),विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे ,
पोलीस आयुक्त, आयुक्त कार्यालय (पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर / ग्रामीण), PMRDA मुख्यालय कंट्रोल रुम, पुणे
MSEB मुख्यालय रास्तापेठ, पुणे यांना लेखी कळविले आहे.

पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना बोनस मिळणार

इगल या सुरक्षारक्षक कंपनी काळ्या यादीत,पुन्हा त्यांना काम देणार नाही

पुणे l महापालिकेमध्ये सुमारे साडेदहा हजार कंत्राटी कामगार विविध खात्यांमध्ये अनेक वर्षांपासून काम करीत असून या सर्वांना बोनस ऍक्ट प्रमाणे बोनस मिळावा,पगारी रजा मिळाव्यात,15 ऑगस्ट,26 जानेवारी,1 मे आणि 2 ऑक्टोबर या राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या कायद्याप्रमाणे याचा लाभ मिळावा अशा मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या.राष्ट्रीय मजदूर संघाकडून या सर्व कर्मचाऱ्यांना संघटित करून गेली 6 वर्ष वेळो वेळी विविध प्रकारची आंदलने महापालिकेच्या गेटवर करण्यात आलेली होती.परंतु फक्त आश्वासनावरच मनपा अधिकाऱ्यांनी बोळवण करून हे सर्व प्रश्न प्रलंबित ठेवले होते.या सर्व प्रश्नांच्या संदर्भामध्ये मागील आठवड्यामध्ये संघटनेतर्फे कंत्राटी कामगारांचा मोर्चा स्वारगेट येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून ते पुणे महानगरपालिकेच्या गेट पर्यंत काढण्यात आला होता.त्यावेळेला महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना राष्ट्रीय मजदूर संघटनेकडून निवेदन देऊन बैठक आयोजन करण्याबाबत विनंती करण्यात आली होती.त्याप्रमाणे आज दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी पावणेअकरा वाजता महापालिकेच्या सभागृहात महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली.या बैठकीसाठी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिवटे,कामगार सल्लागार नितीन केंजळे,सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा नाईक,उद्यान विभागाचे अधिकारी अशोक घोरपडे व इतरही विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त गजानन शिंदे हे उपस्थित होते.राष्ट्रीय मजूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे,उपाध्यक्ष सिताराम चव्हाण,संघटक विशाल बागुल,प्रतिनिधी बाबा कांबळे,विजय पांडव,अरविंद आगम,संदीप पाटोळे, उज्वल साने,लक्ष्मण मासाळ हे कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीमध्ये आयुक्तांसमोर कंत्राटी कामगारांना कायदा प्रमाणे बोनस देय असून महापालिका मात्र कंत्राटदारांना बोनसचे पैसे देत नसल्यामुळे कंत्राटदार बोनस देत नाही अशा प्रकारची मागणी संघटनेतर्फे मांडण्यात आली.त्यास सहाय्यक कामगार अधिकारी गजानन शिंदे यांनी कंत्राटी कामगारांना कायद्याप्रमाणे बोनस देय असून त्यांना बोनस दिला पाहिजे अशी बाजू मांडली.त्याचबरोबर या सर्व कामगारांना राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या यादेखील कायद्याप्रमाणे देय असून त्याचा कायद्याप्रमाणे लाभ या कंत्राटी कामगारांना दिला गेला पाहिजे व वार्षिक रजा ही पगारी राजा कामगारांना दिल्या पाहिजेत अशी कामगारांची बाजू व सरकारची कामगार विभागाची बाजू या बैठकीत मांडली.

त्यानुसार आजच्या बैठकीमध्ये खालील प्रमाणे निर्णय झाले.यावर्षीपासून दिवाळीपूर्वीया सर्व कामगारांना पगाराच्या 8.33% म्हणजे जवळजवळ एक पगार दरवर्षी बोनस देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या चा लाभ कायद्याप्रमाणे देण्याचा निर्णयही झाला व वार्षिक पगारी रजा देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला ठेकेदार बदलला तरी कामगार बदलू नये अशी संघटनेच्या भूमिकेला आयुक्तांनी तत्वतः मान्यता दिली व त्यामध्ये होत असलेल्या हेराफेरीलाही पायबंध घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले. काही सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी सलग पाच महिने काम करूनही पगार दिला गेलेला नव्हता अशा सर्व कर्मचाऱ्यांचे फाईल तपासून त्यांना तात्काळ पगार देण्याबाबतचे आदेश काढण्यात येतील असेही सांगितले.सर्व कर्मचाऱ्यांना महिन्याला पगार स्लिप देण्याबाबत व सर्व कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार देण्याबाबत योग्य उचित आदेश आयुक्तांनी दिले.इएसआयसी कार्ड ज्या ज्या कामगारांना आवश्यक आहे त्या सर्व कामगारांना देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला.त्याचबरोबर कंत्राटी कामगारांच्या पगारातून विनाकारण कपात करण्यात येते अशी कोणतीही बेकायदेशीर कपात करण्यात येऊ नयेत अशा सक्त सूचना या बैठकीत आयुक्तांनी दिल्या.कंत्राटी  कामगारांना वेळोवेळी विविध विभागात काम करत असताना सुरक्षा विषय कोणती साधने देण्यात येत नाहीत या गोष्टीकडे कामगार नेते सुनील शिंदे  यांनी लक्ष वेधले असता या सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते सर्व सुरक्षा साधने देण्याबाबतचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.राष्ट्रीय स्वास्थ अभियान अंतर्गत काम करणारे नर्सेस, डॉक्टर्स,डेटा एन्ट्री ऑपरेटर्स व इतर कर्मचारी यांचे वेतन शासनाकडून येण्यास बऱ्याचदा विलंब होतो अशाप्रसंगी कोणताही विलंब न करता महानगरपालिकेच्या कोषातून या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार करण्याबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील असे त्यांनी सांगितले.त्याचबरोबर राष्ट्रीय स्वास्थ अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिलेल्या परिपत्रकाप्रमाणे रजा वेतन अनुषंगित सर्व फायदे देण्याबाबतचे परिपत्रक तात्काळ काढण्यात येईल व त्यांनाही त्याचे फायदे देण्यात येतील त्याचप्रमाणे कंत्राटी कामगारांना वेळवर पगार न देणारे इगल या सुरक्षारक्षक कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येईल व यापुढे कोणतेही काम देण्यात येणार नाही असा निर्णय या बैठकीत झाला अशा प्रकारचे निर्णय या बैठकीत झाले आहेत.या सर्व कंत्राटी कामगारांना कायद्याप्रमाणे बोनस देण्याचा निर्णय झाल्याबद्दल संघटनेतर्फे सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आयुक्त नवल किशोर राम यांचे आभार मानले.

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व संबधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. 19: जिल्ह्यात धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे बाधित होणारे पुरग्रस्त भाग तसेच दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थालंतर करावे, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व संबधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, पुणे महानगरपालिका, प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम मंडळ जलसंपदा, आरोग्य, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, सैन्यदल, नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आदी सर्व संबधित विभागाचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, भारतीय हवामान खात्याने आज (दि.19 ऑगस्ट) आणि उद्या (दि. 20 ऑगस्ट) रोजी घाटमाथा परिसरात रेड अलर्ट तर शहर आणि ग्रामीण भागात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जी धरणे भरली आहेत त्या ठिकाणी जलसंपदा व शासकीय यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. जलसंपदा विभागाने पाऊसाचा अंदाज आणि त्यांनी धरणातील आवक लक्षात घेता विसर्गाबाबत नियोजन करावे. याबाबत किमान दोन तास अगोदर जिल्हा नियंत्रण कक्षास कळवावे.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, सैन्यदलानी आपली पथके सुसज्ज साहित्यासह दक्ष ठेवावे. नदीकाठच्या लोकांना ज्या ठिकाणी धोका पोहोचण्याची शक्यता आहे, त्यांना सावध करण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत संदेश पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना खबरदारी घ्यावी, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले.

यावेळी सर्व संबंधित यंत्रणेने मान्सूनच्या अनुषंगाने पुर्वतयारी व करीत असलेली कार्यवाहीबाबत माहिती दिली.
0000

हिंदू संस्कृतीत दुसऱ्याबद्दल सकारात्मक विचार करण्याचं तत्त्वज्ञान-ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त धान्य महोत्सवाचे आयोजन

पुणे -हिंदू संस्कृतीत दुसऱ्याबद्दल सकारात्मक विचार करण्याचं तत्त्वज्ञान मांडलं गेलं आहे. त्यामुळे समुत्कर्षच्या नावातच सर्वांचा उत्कर्ष दडलेला आहे, अशी भावना ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड मध्ये सुरु झालेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त
धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ना. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, कोथरुड दक्षिण मंडल कुलदीप सावळेकर, भाजप उत्तर मंडल माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वनिता काळे, शशिकला मेंगडे, कल्पना पुरंदरे, मधुरा वैशंपायन, धनंजय रसाळ, पार्थ मटकरी यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, हिंदू संस्कृतीत दुसऱ्याबद्दल सकारात्मक विचार करण्याचं तत्त्वज्ञान मांडलं गेलं आहे. त्यामुळे समुत्कर्षच्या नावातच सर्वांचा उत्कर्ष दडलेला आहे. समाजातील प्रत्येकालाच उत्कर्ष व्हावा, या उद्देशाने समुत्कर्ष ग्राहक पेठ ही चळवळ सुरु झाली आहे. गेल्या वर्षभरात कोथरुड मधील असंख्य नागरिकांना याचा लाभ झाला आहे. जवळपास ११००० पेक्षा जास्त कलाकार, दिव्यांगजन, आर्थिक दुर्बल कुटुंब या सर्वांनाच या उपक्रमाच्या माध्यमातून स्वस्त आणि दर्जेदार धान्य सवलतीच्या दरात मिळू शकले. त्यामुळे या उपक्रमाचा उद्देश यशस्वी होत आहे.

ते पुढे म्हणाले की, आगामी काळंही सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे प्रत्येकजण मोठ्या प्रमाणात खरेदी करेल. त्यामुळे या काळात अशा पद्धतीने पुन्हा धान्य महोत्सवाचे आयोजन केल्यास, सर्वसामान्यांना याचा मोठा लाभ होईल, अशी भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, दोन दिवसांच्या या धान्य महोत्सवात समुत्कर्ष कार्डधारकांना ३० टक्के आणि सर्वसामान्य ग्राहकांना १५ टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यासोबतच महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी; यासाठी प्रदर्शन आणि विक्री व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्याचाही नागरिकांनी लाभ घेऊन महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ना. पाटील यांनी यावेळी केले.

विस्कटलेल्या कुटुंबाची घडी बसविणारी पुणे पोलिसांची दामिनी

पुणे- पोलीस म्हटले कि त्याबद्दल समाजात काय काय समज आहेत यावर बोलायला नकोच . अर्थात पोलीस आणि जनता यांच्यातील नाते संबध अजूनही फारसे दुरावलेले नाहीत . सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या प्रवृत्ती पोलीसदलात काही स्वरुपात असतीलही आणि अशा प्रवृत्तीवर कायम मोठा प्रकाश झोत देखील टाकला जातो ..पण हि कथा अगदीच वेगळी आहे. पोलीसातला माणूस , आणि जनतेला कुटुंब मानून काळजी घेणारी पोलिसांची ‘दामिनी या कथेतून प्रत्यक्षात साकार झाली आहे. हि कुठल्या सिनेमाची कथा नाही तर पुण्यात प्रत्यक्षात घडलेली कथा आहे .पुणे पोलिसांची मान या कथेने निश्चित उंचावणार तर आहे पण मनामनात घर देखील करणार आहे.

शाळेत 10 वी इयत्तेत topper असलेली विद्यार्थिनी तिच्या आई वडिलांच्या कौटुंबिक जीवनाचे पडसाद तिच्या आयुष्यावर कसे पडलेले असतात आणि त्या नैराश्यातून ती घर सोडून जाण्याच्या मनस्थितीत कशी पोहोचते.. आणि त्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दामिनी मार्शल कशी या कुटुंबातील पेच , गुंतागुंत सोडवून पुन्हा एका हसत्या खेळत्या जीवन मार्गावर या कुटुंबाला कशी वळविते त्याची हि कहाणी आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल दि.१८.०८.२०२५ रोजी वेळ १०.ते १०.१५ वाजताचे दरम्यान दामिनी मार्शल हिंगे – 10920 यांचे मोबाईलवर एका अनोळखी नंबर वरुन कॉल आला.. , दामिनी दीदी तुझ्या मदतीची मला गरज आहे. प्लीज मला मदत कर. तू आमच्या शाळेत आली होती तेव्हा तू तुझा मोबाईल नंबर मुलीना दिला होता आणि बोलली होतीस की तुमच्या संकट समयी मला कधीही कॉल करा…. मी तुमच्या मदतीला येईल….
“यावेळेस त्या मुलीने सांगितले की दीदी मी घर सोडून चालली आहे. मला खूप टेन्शन आहे” सदर वेळेस दामिनी मार्शल हिंगे यांनी आधाराचे बोल बोलून थांबण्यास सांगून तात्काळ या मुलीची समक्ष भेट घेतली . तिच्याशी आपुलीकी साधली त्यावेळेस कळले कि सदर मुलगी हि इ 10 वि कक्षेमध्ये शाळेमध्ये टॉपर आहे तिचे आई बाबा एकत्र राहत नाहीत. त्यांची घटस्फोट केस कोर्टात चालू आहे. ते सतत भांडत असतात तिचा अभ्यास होत नाही तिचे कुठेही लक्ष लागत नाही.ती दामिनीला सांगत होती, दीदी मला जगावस वाटत नाही. मी खूप टेन्शन मधे आहे.
या मुलीचा विश्वास संपादन करून तिचे मनपरिवर्तन करून मुलीच्या शाळेत जाऊन प्रिंसिपल मॅडम ची भेट दामिनीने घेतली. मुलीच्या आई वडिलांना शाळेत बोलावून घेऊन त्यांना त्यांच्या मुलीच्या संदर्भात चर्चा करून त्यांना पटवून दिले ,‘ तुमची मुलगीच तुमच भवितव्य आहे. अशा कोवळ्या जीवास जपा.’ आई वडिलांच्या आयुष्याचे ध्येय मुलांना सावरणे ,योग्य मार्गावर नेणे त्यांची काळजी घेणे असले पाहिजे, कुटुंबाच्या आनंदी जीवनाला हवे तरी काय असते ? या मुलीच्या आई वडिलांचेही मनपरिवर्तन करून त्यांनी आपल्या मुळे आपल्या मुलीचे हाल करायचे नाही असे ठरवले व त्यांनी घटस्फोट बाबत केस मागे घेण्याचे ठरवले आणि आम्ही एक आनंदी कुटुंब म्हणून राहण्याचा निर्णय घेतला .हि मुलगी आता तिच्या आई बाबां सोबत एकत्र राहण्यास मिळत आहे म्हणून खूप खुश आहे . या मुलीने,प्रिन्सिपल मॅडम आणि सदर मुलीच्या पालकांनी दामिनी मार्शल व पोलीस प्रशासन यांचे खूप मनापासून आभार मानले आहेत.

पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे २० ऑगस्ट रोजी लोकार्पण

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील राजभवन ते आरबीआय गणेशखिंड रस्ता या मार्गावरील उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक २० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कळविले आहे.

हा उड्डाणपूल झाल्याने विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

श्रावण महोत्सवानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन; महिलांच्या कल्पकलतेला उद्योजकतेची नवी दिशा — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे-
श्रावण महोत्सवानिमित्त मिती ग्रुप आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भव्य पाककला स्पर्धा’ आज टिळक वाडा, लोकमान्य सभागृह, पुणे येथे उत्साहात पार पडली. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष सहकार्याने ही स्पर्धा रंगली असून, पुणेकर महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विविध स्वादिष्ट आणि आकर्षक पदार्थांची मेजवानी सादर केली.

या वेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “श्रावण महोत्सव हा स्त्रियांच्या आनंद, एकोपा आणि सर्जनशीलतेचा सोहळा आहे. पाककला स्पर्धा ही केवळ चव आणि परंपरेचा उत्सव नसून महिलांना आत्मविश्वास, संधी आणि उद्योजकतेकडे नेणारे व्यासपीठ आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, महिलांनी घरगुती स्वयंपाकघरातून उद्योगजगताकडे टाकलेले पाऊल हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. “भारतात महिलांनी घेतलेल्या कर्जाची ९९ टक्के परतफेड केली जाते, हा विक्रम देशाच्या प्रगतीचा द्योतक आहे. त्यामुळे बँकाही महिलांना उद्योग उभारण्यासाठी उत्साहाने कर्ज देत आहेत,” असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

सोमवारचा उपवास असूनही महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून समाधान व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “या स्पर्धेमुळे महिलांच्या कलागुणांना छंदापुरते न राहता रोजगार आणि उद्योजकतेचे नवे दालन खुले होणार आहे.”

या कार्यक्रमासाठी कुणाल टिळक यांचे विशेष सहकार्य लाभले. मिती ग्रुप आणि स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यांनी व उत्तरा मोने यांनी उत्कृष्ट संयोजन करून स्पर्धेला संस्मरणीय रूप दिले.

पुण्यात मुंबई-बंगळुरू मार्गावर बसला भीषण आग; 30 वर प्रवासी सुखरूप

पुणे- मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसला भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. बसमधील ३० वर सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बाह्यवळण मार्गावरून सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास प्रवासी बस जात होती. नऱ्हे परिसरातील श्री स्वामी नारायण मंदिराजवळ धावत्या बसमधून अचानक मोठ्या प्रमाणात धूर येण्यास सुुरुवात झाली. बसचालकाच्या निदर्शनास हा प्रकार वेळीच आला. बसमधील वाहकाने त्वरित गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना जागे केले. बसमधील प्रवासी त्वरित गडबडीत बसमधून बाहेर पडल्याने गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्राचे प्रमुख प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून आग थोड्याच वेळात आटोक्यात आणली. आगीत बस पूर्णपणे जळाली, तसेच घटनास्थळी मोठा धूर झाला होता. बसमधील प्रवासी त्वरित बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर यांनी दिली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. बसमधील तांत्रिक बिघाड किंवा शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यभर मुसळधार पावसाचा कहर :५१,२०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात

५१,२०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ६ फुटांवरून ८ फुटापर्यंत उघडून ५१,२०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ५३,३०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

मुंबईतील सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयांसह शाळा, कॉलेज बंद
मुंबई-भारतीय हवामान खात्याने आज मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अति मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतेक भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसामुळे मुंबईची परिस्थिती बिकट आहे. मुंबईकरांना कोणताही दिलासा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. आजही सततचा मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी रात्रीपासून मुंबईत पाऊस पडत आहे. मंगळवारी सकाळपासून पाऊस आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे. हवामान खात्याने मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात रेड अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले की, राज्यातील अनेक भागात सततच्या पावसामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, नांदेड जिल्ह्यात 200 हून अधिक ग्रामस्थ अडकले आहेत, ज्यामुळे बचाव आणि मदत कार्यासाठी सैन्य तैनात करण्यात आले आहे. कोकणातील काही नद्यांची पाण्याची पातळी धोकादायक पातळी गाठली आहे आणि जळगावमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
विक्रोळीत सर्वाधिक 255.5 मिमी पावसाची नोंद
18 ऑगस्ट 2025 सकाळी 08:30 पासून 19 ऑगस्ट 2025 सकाळी 08:30 पर्यंत (मिमी मध्ये)

​विक्रोळी: 255.5 मिमी
​भायखळा: 241.0 मिमी
​सांताक्रूझ: 238.2 मिमी
​जुहू: 221.5 मिमी
​वांद्रे: 211.0 मिमी
​कुलाबा: 110.4 मिमी
​महालक्ष्मी: 72.5 मिमी

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीतील पाणी पातळी वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर कोयना धरणाची पाहणी केली. कोयना धरणात सद्यस्थितीला ९२.१७ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातून ५६००० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. आजपर्यंत महाबळेश्वर व नवजा येथे अनुक्रमे ५६०० व ६२०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरला १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘बेस्ट अॅक्ट्रेस’चा विशेष ज्युरी पुरस्कार!

मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर काही काळ ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करत चर्चेत आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात (२०२२–२३) तिच्या मोग या कोंकणी चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट अॅक्ट्रेस’चा विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला.

जोजो डिसुझा दिग्दर्शित मोग ही प्रेम, संघर्ष आणि मानवी नात्यांची कहाणी सांगणारी फिल्म आहे. यात नक्षत्राने साकारलेली सेलिना ही साधी पण भावनिक गुंतागुंतीत सापडलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. मराठी पार्श्वभूमी असूनही तिने या भूमिकेसाठी शून्यापासून कोंकणी भाषा शिकली, गोव्यातील घराघरांत बोलली जाणारी कोंकणी–मराठी मिसळलेली बोली आत्मसात केली आणि स्थानिक उच्चारांवर मेहनत घेतली. तिच्या या प्रामाणिक तयारीमुळे सेलिनाला वास्तवाचा स्पर्श मिळाला आणि ज्युरींनी तिच्या अभिनयाला विशेष दाद दिली. सेलिना ही भूमिका केवळ नायिकेची नाही, तर संपूर्ण कथानकाचा भावनिक आधारस्तंभ ठरते.

या महोत्सवात मोगला एकूण ८ पुरस्कार मिळाले, ज्यात सर्वोत्कृष्ट कोंकणी चित्रपट हाही मानाचा समावेश आहे. गोवा राज्य सरकारतर्फे आयोजित या फेस्टिव्हलचा समारोप पणजीतील कला अकादमी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. गोवा राज्य चित्रपट महोत्सव हा स्थानिक चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा सोहळा मानला जातो, आणि या व्यासपीठावर मिळालेला पुरस्कार नक्षत्राच्या कारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

नक्षत्राचा प्रवास मालिकांपासून मोठ्या पडद्यापर्यंत गेला आहे. माझीया माहेरा मधील पल्लवी, लेक माझी लाडकी मधील सानिका, सुर राहू दे मधील आरोही आणि चंद्र आहे साक्षीला मधील सुमन काळे या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. तर फत्तेशिकस्तमधील बहू बेगम, प्रीतममधील सुवर्ण, तसेच सापळा, मुक्ताई आणि अलीकडील ऑल इज वेलमधील तिच्या मुख्य भूमिकांनी तिला चित्रपटसृष्टीत वेगळं स्थान मिळवलं.

पुरस्कार स्वीकारताना नक्षत्रा म्हणाली :
“हा सन्मान माझ्यासाठी फक्त पुरस्कार नाही, तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे. मोगसाठी मी भाषा शिकण्यापासून व्यक्तिरेखेचं वास्तव पकडण्यापर्यंत मेहनत घेतली आणि त्या प्रयत्नाची दखल घेतल्याचा मला आनंद आहे. हा पुरस्कार मला आणखी जबाबदारी देतो — दर्जेदार, प्रामाणिक आणि प्रेक्षकांच्या मनात ठसतील अशा भूमिका साकारत राहण्याची. मग ते टीव्ही असो, वेब सिरीज असो किंवा चित्रपट — मी प्रत्येक माध्यमासाठी तयार आहे.”

या सन्मानामुळे नक्षत्रा मेढेकरचं पुनरागमन अधिक प्रभावी झालं असून प्रेक्षक आणि रसिक तिच्या पुढील कामाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन

सार्वजनिक आरोग्य सेवांवर होणार परिणाम

पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत १५ ते २० वर्षांपासून कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून (दि.१९) बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती, महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध आरोग्य कामगार संघटना प्रथमच एकत्र येऊन यामध्ये सक्रिय सहभागी झाल्या आहेत. अत्यावश्यक सेवेसह प्रसूती, नवजात कक्ष, अतिदक्षता विभाग, लसीकरण, औषध, वितरण यांसह तांत्रिक व अतांत्रिक विभागात कार्यरत असणारे राज्यभरातील १० हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याने सार्वजनिक आरोग्य सेवांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

१० वर्षांपेक्षा अधिक काळ सेवेत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ६९ संवर्गानुसार, नियमित समायोजन तात्काळ करावे. असा शासन निर्णय १४ मार्च २०२४ रोजी झाला होता. तसेच २०२२ साली मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने NHM मधील १० वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि समकक्ष पदांवर थेट शासन सेवेत समायोजनाचे आदेश दिले होते. महामहीम राज्यपाल यांनी देखील आपल्या अभिभाषणात या शासन निर्णयाचा उल्लेख करत याविषयी अनुकूलता व्यक्त केली होती.
नंतर राज्यभर ३७ दिवसांचे संप आंदोलन झाल्यावर शासनाने १४ मार्च २०२४ ला ३०% मंजूर पदांवर समायोजनाचा निर्णय घेतला. पण दीड वर्षाहून अधिक काळ लोटूनही हा निर्णय अंमलात आला नाही. त्यामुळे १४ मार्च २०२४ चे शासन आदेश त्वरित लागू करणे आणि उर्वरित ६९ संवर्गांचे नियमित समायोजनकरणे ही प्रमुख मागणी आंदोलकांची आहे.

त्यासह १५% मानधन वाढ तात्काळ लागू करणे, बदली धोरण, EPF व इन्शुरन्स योजना, शैक्षणिक पात्रता व कामाच्या जबाबदारीनुसार वेतन सुसूत्रीकरण, सेवेत असताना मृत्यू झाल्यास ५० लाख व अपंगत्व आल्यास २५ लाख सानुग्रह अनुदान, आदी १८ प्रमुख मागण्या लेखी दिलेल्या कालबद्ध आश्वासनासह मान्य कराव्यात, अशी आंदोलकांची प्रमुख अपेक्षा आहे.

याआधी ८ जुलै २०२५ रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य विभागाचे सचिव यांची बैठक लवकरच घेतली जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. तसेच आझाद मैदान येथे झालेल्या लक्षवेधी आंदोलनाची दखल नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात घेण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, सामंजस्याची भूमिका घेत २१ जुलै २०२५ पासून होणारे आंदोलन कर्मचाऱ्यांनी स्थगित केले होते. परंतु, त्यानंतरही कोणतीही ठोस पावले उचलली न गेल्याने आता कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामार्फत राजकीय पातळीवर सकारात्मक वातावरण असले तरी केवळ प्रशासकीय दिरंगाई आणि उदासीनतेमुळे आज राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग ठप्प होण्याची वेळ आली आहे.
……………………….

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण शिल्पकार राम सुतार यांचा भव्य सन्मान

१०१ वर्षांच्या वयातही प्रेरणादायी कलाविष्कार घडवणारे राम सुतार हे भारताच्या सांस्कृतिक वारशाचे खरे संवाहक” — डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, — जगभर भारताचा मान उंचावणारे, १०१ वर्षीय ऋषीतुल्य शिल्पकार राम सुतार यांचा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सुप्रसिद्ध शिल्पकारांचे सुपुत्र अनिल सुतारही उपस्थित होते.

राम सुतार यांच्या कलाकृती ही केवळ शिल्प नसून इतिहासाची जिवंत साक्ष आहेत. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सारखा भव्य प्रकल्प, संसद भवनातील महात्मा गांधींची प्रतिमा, तसेच सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत यांसह अनेक महापुरुषांच्या मूर्ती त्यांनी साकारल्या. पन्नासहून अधिक भव्य शिल्पांची निर्मिती करणाऱ्या सुतार यांच्या कलेत वास्तवदर्शी तपशील, मानवी भावना आणि अप्रतिम कलावैभवाचा संगम दिसतो.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गौरव करताना सांगितले,“राम सुतार हे फक्त शिल्पकार नाहीत, तर भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे जिवंत प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या शिल्पांमधून देशभक्ती, एकात्मता आणि मानवी मूल्यांचा प्रभावी संदेश दिला आहे. १०१ वर्षांच्या वयातही त्यांचा उत्साह आणि कलाविष्कार पाहून प्रेरणा मिळते, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.”आपल्या अविस्मरणीय योगदानासाठी राम सुतार यांना यापूर्वी पद्मश्री (१९९९), पद्मभूषण (२०१६), टागोर पुरस्कार (२०१६) यांसह असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत

राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समाधानी, आनंदी होऊ दे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना

पुणे दि. १८ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे, राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे. चांगले पीक येऊ दे; राज्यातील सर्व जनतेच्या जीवनात सुख, समाधान, आनंदाचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना भीमाशंकराकडे केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

पुजेनंतर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, तहसीलदार तथा देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त प्रशांत बेडसे, गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, दत्तात्रय कौदरे, रत्नाकर कोडीलकर, सरपंच दत्तात्रय हिले आदी उपस्थित होते.

भीमाशंकराचे दर्शन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यातून, देशभरातून लाखो शिवभक्त येथे श्रावणातील सोमवारी दर्शनासाठी येतात. आपणही त्यातील एक शिवभक्त असून दरवर्षीप्रमाणेच श्रावणातील दर्शनासाठी आलो आहे. हे प्राचीन देवस्थान असून दर्शन घेऊन समाधान, आनंद लाभतो.

श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकास आराखडा २८० कोटी रुपयांचा तयार केलेला असून येथे येण्यासाठीचा रस्ता चांगला करण्यासह येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे श्री. शिंदे माध्यमांशी संवाद साधताना यावेळी म्हणाले.
0000

देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे दि. १८ : शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२५-२६’ योजना राबविण्यात येत असून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी लॉटरीसाठी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ६ वा मजला, डीटीसी सेंटर, म्हात्रे पूल, एरंडवने येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९० शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नेदरलँड, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, इस्राएल, जपान, मलेशिया, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, चीन, दक्षिण कोरिया या देशांमधील शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, विविध पिकांची उत्पादकता, कृषी उत्पादनांचे बाजार व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, कृषी प्रक्रियेतील अद्ययावत पद्धती आदींची माहिती मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली आहे.
0000