Home Blog Page 388

कोकेन,गांजा,दारू व बियरच्या बॉटल, हुक्का प्लेवर…गाजणाऱ्या रेव्ह पार्टीत ५ पुरुष अन २ महिला, ४१ लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे- बहुधा रेव्ह पार्टी म्हटले कि अनेकांच्या डोळ्यापुढे तरुणाईची गर्दी अंमली पदार्थांचा सुळसुळाट, दारूच्या विदेशी बाटल्यांचा खणखणाट, अन DJ चा हैदोस असे काहीसे चित्र येते पण खराडीतील staybird azure suite hotel kharadi pune येथील रूम नंबर १०२ मध्ये झालेली रेव्ह पार्टी जी गाजते आहे. त्या पार्टीत अवघे ७ जण होते , त्यात अवघ्या २ महिला … अर्थात पार्टीच रूम मध्ये होती ना… हॉटेलच्या एका रूम मध्ये .. पण हि पार्टी गाजते आहे ती माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई या पार्टीत पकडले गेल्यामुळे… जे महिला नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत .आणि त्यांनी सरकारवर गेली काही महिने टीकेची झोड उठविली आहे . यामुळे या पार्टीला रंगारंग महत्व आले आहे. या पार्टीत कोकेन,गांजा,दारू व बियरच्या बॉटल, हुक्का प्लेवर असे सारे काही होते …गाजणाऱ्या या रेव्ह पार्टीत पोलिसांनी तब्बल ४१ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आणि १) प्रांजल मनिष खेवलकर, वय ४१ वर्षे, रा. प्लॉट नं. ५७,५८ इंद्रप्रस्त सोसायटी, हडपसर पुणे, २) निखिल जेठानंद पोपटाणी, वय ३५ वर्षे, रा. सी १०५, डीएसके सुंदरबन, अॅमनोरा पार्क टाउनचे मागे, माळवाडी रोड, पुणे, ३) समीर फकीर महमंद सय्यद, वय-४१ वर्षे, रा. २०५, हेरीटेज, पॅलेस ओरचड सोसायटी, एनआयबीएम रोड, पुणे. ४) सचिन सोनाजी भोंबे, वय- ४२ वर्षे, रा. प्लॉट नं. ५१, द्वारका नगर, डायमंड वॉटर पार्क रोड, वाघोली पुणे. ५) श्रीपाद मोहन यादव, वय २७ वर्षे, रा. आनंदी सुंदर निवास बंगला, साई होमसच्या पाठिमागे, पंचतारा नगर, पांडरकर वरती, आकुर्डी, पुणे तसेच महिला नामे १) ईशा देवज्योत सिंग, वय २२ वर्षे, रा. ए ६, २०३ कुमार बिर्ला सोसायटी वॉर्ड नंबर ८, नागरस रोड, औध पुणे २) प्राची गोपाल शर्मा वय २३ रा. गोदरेज ग्रिन को. म्हाळुंगे पुणे यांना अटक केली.

पोलिसांनी सविस्तर सांगितलेली हकीकत अशी ,….२७/०७/२०२५ रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवित असताना पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा राजेन्द्र मुळीक, पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस निरीक्षक संखे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक वासनिक, महिला पोलीस उपनिरीक्षक लाड गुन्हे शाखा पुणे शहर असे खराडी पोलीस स्टेशन हद्दीत मिळालेल्या गोपनिय माहितीच्या अनुषंगाने दि.२७/०७/२०२५ रोजी पहाटे ०३/२० वा चे सुमा. रूम नंबर १०२, स्टेबर्ड अझुर सुट, हॉटेल, खराडी staybird azure suite hotel kharadi pune पुणे याठिकाणी छापा कारवाई केली असता काही इसम हे हुक्का आणि ड्रग्स पार्टी करत असताना मिळुन आले. सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांना नाव पत्ता विचारता त्यांनी आपली नावे १) प्रांजल मनिष खेवलकर, वय ४१ वर्षे, रा. प्लॉट नं. ५७,५८ इंद्रप्रस्त सोसायटी, हडपसर पुणे, २) निखिल जेठानंद पोपटाणी, वय ३५ वर्षे, रा. सी १०५, डीएसके सुंदरबन, अॅमनोरा पार्क टाउनचे मागे, माळवाडी रोड, पुणे, ३) समीर फकीर महमंद सय्यद, वय-४१ वर्षे, रा. २०५, हेरीटेज, पॅलेस ओरचड सोसायटी, एनआयबीएम रोड, पुणे. ४) सचिन सोनाजी भोंबे, वय- ४२ वर्षे, रा. प्लॉट नं. ५१, द्वारका नगर, डायमंड वॉटर पार्क रोड, वाघोली पुणे. ५) श्रीपाद मोहन यादव, वय २७ वर्षे, रा. आनंदी सुंदर निवास बंगला, साई होमसच्या पाठिमागे, पंचतारा नगर, पांडरकर वरती, आकुर्डी, पुणे तसेच महिला नामे १) ईशा देवज्योत सिंग, वय २२ वर्षे, रा. ए ६, २०३ कुमार बिर्ला सोसायटी वॉर्ड नंबर ८, नागरस रोड, औध पुणे २) प्राची गोपाल शर्मा वय २३ रा. गोदरेज ग्रिन को. म्हाळुंगे पुणे असे सांगितले. त्यांचे ताब्यात २.७० ग्रॅम कोकेन सदृश अमली पदार्थ, ७० ग्रॅम गांजा सदृश अमली पदार्थ, एकुण १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट सेट, दारू व बियरच्या बॉटल, हुक्का प्लेवर असा असा एकुण ४१,३५,४००/- रू.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत खराडी पोलीस स्टेशन गु.र.नं.१५४/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) (।।) अ, २१ (ब), २७कोटपा ७ (२),२० (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस निरीक्षक संखे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक वासनिक, सहा. पो. निरी. राजेश माळेगावे, सहा.पो.निरी. नितिनकुमार नाईक, महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व पोलीस अंमलदार गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली आहे.

रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?
जर आपण रेव्हचा अर्थ पाहिला तर केंब्रिज विद्यापीठाच्या वेबसाइटनुसार, जेव्हा कोणी कोणत्याही नियंत्रणाशिवाय बोलतो तेव्हा त्याला रेव्ह म्हणतात. अशा परिस्थितीत, बरेच लोक त्याचा संबंध अनियंत्रिततेशी जोडतात. त्याच वेळी, पार्टी म्हणजे एक सामाजिक कार्यक्रम ज्यामध्ये काही लोक एकाच ठिकाणी भेटतात आणि खातात, पितात, नाचतात आणि आनंद घेतात. अशा परिस्थितीत, ज्या पार्ट्यांमध्ये लोक कोणत्याही निर्बंधाशिवाय मजा करतात त्यांना रेव्ह पार्ट्या म्हणता येईल. तसेच यात मोठ्या प्रमाणात संगीत वाजवले जाते.

सिक्रेट पार्टी म्हणजे काय? सिक्रेट पार्टी म्हणजे अशी पार्टी ज्याचे तपशील, विशेषतः स्थान, सार्वजनिकरित्या जाहीर केले जात नाही किंवा व्यापकपणे ज्ञात नाही. हे कार्यक्रम बहुतेकदा तोंडी किंवा आमंत्रण पद्धतींवर अवलंबून असतात. जेणेकरून उपस्थिती विशिष्ट लोकांच्या गटापुरती मर्यादित राहते. गुप्त पार्टी घनिष्ठ मेळाव्यांपासून मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांपर्यंत असू शकतात. या अतिशय गुप्त पद्धतीने साजऱ्या करण्यात येतात. यामुळे खराडी येथील छाप्याला रेव्ह पार्टी म्हणायचे की सिक्रेट पार्टी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

भरपावसात दीड किलोमीटर विजेचा खांब वाहून नेत सुरळीत केला वीजपुरवठा

पुणे, दि. २७ जुलै २०२५:- पिकांचे नुकसान टाळत भरपावसामध्ये दीड किलोमीटर अंतरावर विजेचा लोखंडी खांब कामगारांनी वाहून नेत पाच दिवसांपासून खंडित असलेला वीजपुरवठा रविवारी दुपारी सुरळीत केला आहे. 

राजगड (वेल्हे) तालुक्यातील वेल्हा बुद्रुक या गावातील ५५ ग्राहकांचा वीजपुरवठा खांब तुटल्यामुळे खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी स्थानिक ग्राहकांसह नेतेमंडळीचा पाठपुरावा सातत्याने सुरू होता. परंतु काम अवघड होते. त्यामुळे मे. अग्रवाल या ठेकेदार एजन्सीची मदत घेण्यात आली. संततधार पाऊस व जोराच्या वाऱ्यामुळे काम करणे अवघड जात होते. मात्र कामगारांनी लोखंडी खांब अंगाखांद्यावर वाहून नेला. तसेच तो उभा करताना भात पिकांचे नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली. खांब उभा करून तारा ओढून घेतल्यावर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी महावितरण व ठेकेदार कामगारांचे कौतुक केले.

तसेच महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता युवराज जरग, मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता देविदास बैकर, नसरापूरचे उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनसळे यांनीही वेल्हा शाखा अभियंता सचिन कुलकर्णी, वीज कर्मचारी व ठेकेदार मे. अग्रवाल इलेक्ट्रिकल्स यांचे कौतुक केले आहे.

केवळ मुस्लीम म्हणून हिंदुत्ववाद्यांकडून भारतीय सैन्य दलात माजी सैनिक असणाऱ्या मुस्लिम कुटुंबीयांवर दहशत माजवण्याचा प्रयत्न

पुणे : चंदननगर येथील भारतीय सैन्य दलात माजी सैनिक असणाऱ्या मुस्लिम कुटुंबीयांवर स्वतःला हिंदुत्ववादी बनवणाऱ्या 70 ते 80 समाजकंटकांनी रात्री बारा वाजता घरात घुसून महिला व लहान मुलांवर दहशत पसरवण्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे. यासंदर्भामध्ये पोलीस स्टेशनला माहिती देवुन सुद्धा त्यांनी गुन्हा दाखल न करता समाजकंटकांच्या दबावाखाली कोणतीच कारवाई केली नसल्याचा प्रकार अत्यंत निंदव्य जनक असल्याने याप्रकरणी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा अशी मागणी परिमंडल क्रमांक चार चे पोलीस उपयुक्त सोमय्या मुंडे यांच्याकडे नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने करण्यात आलेली आहे. अशी माहिती येथे राहुल डंबाळे यांनी दिली .

ते म्हणाले,’चंदननगर येथील शमशाद अली शेख कुटुंबीयांचे आजोबा व चुलते भारतीय सैन्य दलामध्ये आपली सेवा बजावत निवृत्त झालेले आहेत. त्यांना भारतीय सैन्यामध्ये चांगली सेवा केल्याबद्दल अनेक पदके देखील मिळालेले आहेत. हे कुटुंबीय सुमारे 55 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून चंदननगर भागामध्ये राहत असून त्यांच्याच कुटुंबीयांना हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या समाजकंटकांच्या टोळक्याने दिनांक 26 जुलै रोजी रात्री बारा वाजता घरात घुसून गोंधळ घालून रोहिंग्या , लांडे इत्यादी आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून तुम्ही इथून निघून जा अशा प्रकारचा दबाव निर्माण केला होता.या संपुर्ण घटनेवेळी त्यांच्या समवेत पोलीस देखील उपस्थित होते व ते हा संपूर्ण प्रकार केवळ मूकपणे पाहत होते ही गंभीर बाब समोर आलेली आहे. रात्री साडेतीन वाजेपर्यंत समाजकंटकांच्या दबावामुळे सैन्य दलातील कुटुंबीयांना पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आले होते. यामध्ये वयोवृद्ध महिला , जेष्ठ नागरिक यांच्यासह तेरा व बारा वर्षाच्या लहान मुलांचा देखील समावेश आहे.

“ अलीकडच्या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या घटना शहरांमध्ये वाढत असल्याने या घटनांना वेळीच आवर घालावा अशी विनंती मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात येणार असून आजच पोलीस उपायुक्त सोमय्या मुंडे यांच्याशी फोन द्वारे चर्चा झाली असून त्यांना लेखी निवेदनाद्वारे पत्र देखील पाठवण्यात आले “ असल्याचे नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी यावेळी कळविले आहे.

दरम्यान सदर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी गुरुवार दिनांक ३१ जुलै रोजी येरवडा येथिल पोलिस उपायुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.असेही राहुल डंबाळे यांनी सांगितले .

जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर ‘नाफा जीवन गौरव – २०२५ पुरस्कारने सन्मानित!

“भविष्यात ‘नाफा’च्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्नं पूर्ण होतील”-जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर
मधुर भांडारकर यांच्यासह डॉ. मोहन आगाशे, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी यांचाही ‘नाफा फिल्म अवार्ड नाईट’मध्ये विशेष गौरव!

सॅन होजे : ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोशिएशन’च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘नाफा जीवन गौरव पुरस्काराने’ यंदा जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांना गौरवण्यात आले. हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, मल्याळम भाषांतील चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार आणि परिपक्व अभिनयाने रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अमोल पालकरांच्या कार्याचा सन्मान अमेरिकेतील तमाम मराठी प्रेक्षकांच्या उपस्थिती सॅन होजेतील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये २५ जुलै रोजी संपन्न झालेल्या ‘नाफा ग्लॅमरस फिल्म अवार्ड नाईट’ या भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार आणि नाफाचे संस्थापक अभिजीत घोलप यांसह मराठी चित्रपटक्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंत, प्रेक्षक उपस्थित होते. “भविष्यात ‘नाफा’च्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्नं पूर्ण होतील” असे गौरवोद्गार अभिनेते अमोल पालेकरांनी हा पुरस्कार स्वीकारताना काढले.

या सोहळ्यात पुढे बोलताना सन्मानीय अमोल पालेकर म्हणाले, “माझा हा सन्मान केलात, गौरव केला याबद्दल नाफाचे, अभिजीत घोलप आणि तुम्हा सर्व रसिकप्रेक्षकांचे मनापासून आभार. काही वर्षांपूर्वी गौरी देशपांडेंच्या कथेवर बेतलेला सिनेमा करण्याची तयारी मी सुरु केली होती. त्या सिनेमामध्ये निकोल किडमन आणि अमिताभ बच्चन या दोघांना घेऊन मराठी सिनेमा बनविण्याचे माझे स्वप्न होते. आम्ही निकोल पर्यंत पोहचलो, त्याला ती पटकथा आवडली आणि त्याने तात्काळ होकारही दिला. मात्र हॉलिवूड मधील कोणत्याही एका स्टुडिओला सोबत घेण्याची अट घातली. या किचकट गोष्टीची कल्पना असल्याने तो विचार मी सोडून दिला. पण त्यावेळेला जर NAFA सारखी संस्था, असे कार्यकर्ते आणि अभिजित सारखी व्यक्ती असती तर तो प्रकल्प पुढे नेता आला असता. पण आता, NAFAच्या माध्यमातून अशी स्वप्नं पूर्ण होतील, अशी मला आशा आहे.”

जेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांना हा पुरस्कार प्रदान करतेवेळी नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले, “यंदाचा नाफा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होत आहे. पालेकरांच्या हळुवार, खुसखुशीत रोमँटिक भूमिकांनी आणि त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने तमाम भारतीय प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान आहे. जुबिलीस्टार अशीही त्यांची ओळख भारतीय चित्रपटसृष्टीत आहे, अश्या महान कलावंताचा हा सन्मान अमेरिकेतील तमाम मराठी रसिकांच्या हृदयातून, आपलेपणाने केला जात आहे. पालेकरांनी हा सन्मान स्वीकारून ‘नाफा’चाच सन्मान वाढविला आहे.

अमोल पालेकर हे प्रसिद्ध भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत मोलाची भर घातली आहे. ते एक उत्कृष्ट अभिनेते म्हणून ओळखले जातात, तसेच त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी ललित कलांमध्ये शिक्षण घेतले आणि ‘सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’ मधून पदवी मिळवली. त्यांनी सुरुवातीला चित्रकार म्हणून काम केले, पण नंतर अभिनयात पदार्पण केले. पालेकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘शांतता! कोर्ट चालू आहे!’, ‘गोलमाल’, ‘बातों बातों में’, ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘चित्तचोर’, ‘घरौंदा’, ‘मेरी बीवीकी शादी’, ‘नरम-गरम’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘आक्रीत’, ‘बनगरवाडी’, ‘ध्यासपर्व’, ‘कैरी’, ‘अनाहत’, ‘धूसर’, ‘थोडासा रूमानी हो जाय’, ‘पहेली’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी अभिनय केलेल्या सर्वच चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या आहेत.

नाफाच्या फिल्म अवार्ड नाईटची सुरुवात झाली ती ‘रेड कार्पेटवरील एन्ट्रीने. सर्वप्रथम स्वप्नील जोशी एका नव्या लूकमध्ये रेड कार्पेटवर अवतरला. त्याला पाहून प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवून त्याचे स्वागत केले. त्यानंतर वैदेही परशुरामी, आदिनाथ कोठारे, अमोल पालेकर आणि संध्या गोखले, सोनाली कुलकर्णी तिच्या मुलीसह, अश्विनी भावे, सचिन खेडेकर, गजेंद्र अहिरे, महेश कोठारे, डॉ. मोहन आगाशे आणि मधुर भांडारकर यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची एंट्री झाली. या सोहळ्यातील मनोरंजनपर कार्यक्रमात मराठी लोकनृत्याचे सादरीकरण पाहायला मिळाले आणि त्यानंतर कलाकारांना सन्मानचिन्हं देण्यात आली. अवधूत गुप्ते यांना प्रेक्षकांनी ‘बाई बाई मनमोराचा’ आणि ‘आयुष्य हे’ या गाण्यांची फर्माइश केली.

“देवेंद्र फडणवीस हे चारित्र्यसंपन्न, नम्र आणि दूरदृष्टीचे लोकनेते” – मंत्री चंद्रकांतदादा पाटील.

देवेंद्र फडणविसांच्या वाढदिवसानिमित्त मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे आरोग्य किट व इतर वस्तू वाटप – संदीप खर्डेकर.

पुणे- देवेंद्र फडणवीस हे चारित्र्यसंपन्न,नम्र आणि दूरदृष्टी असलेले लोकनेते आहेत असे गौरवोदगार उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. त्यांचे कार्य हे लोकाभिमुख आहे म्हणूनच त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फ्लेक्सबाजी न करता रक्तदान किंवा अन्य सेवाकार्य करण्याचे आवाहन केले आणि त्याचे कार्यकर्त्यांनी तंतोतंत पालन केल्यामुळे विक्रमी रक्त संकलन पार पडले असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.त्यालाच अनुसरून क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन तर्फे 50 संस्थांना आरोग्य किट व इतर उपयुक्त वस्तू भेट देण्यात येत आहे हे कौतुकास्पद असल्याचेही चंद्रकांतदादा म्हणाले. सर्वांनी आपले वाढदिवस अश्या उपक्रमांनी साजरे केले तर त्याचा समाजातील गरजुंना लाभ होईल व त्यांना अधिक सेवाकार्य करता येईल असेही ते म्हणाले.
मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने CM देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा सप्ताहांतर्गत विविध संस्थांना आरोग्य किट, स्वामी आंगण वृद्धाश्रमास टी व्ही, वामन निवास ज्येष्ठ नागरिक संघास कपाट,तर बाल नवयुग मित्र मंडळ मॉडर्न कॉलोनी,आझाद मित्र मंडळ प्रभात रस्ता,ह्या मंडळाना स्पीकर सेट भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी, प्रदीप चांदेरे,माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या सौ.कल्याणी खर्डेकर, स्वामी आंगण वृद्धाश्रम च्या संचालिका आनंदी जोशी, वामननिवास ज्येष्ठ नागरिक संघाचे सुरेश थिटे, तसेच सनी लांडे, आशिष मोहळ ,सागर थरकुडे ,अजिंक्य बोत्रे,प्रथमेश वरघडे,कुणाल जोगवडे,सचिन पवार,निखिल शिंदे,विशाल गायकवाड
व इतर मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन ने लोकोपोयोगी साहित्य वाटप करण्याचे ठरविले असे संदीप खर्डेकर म्हणाले.सध्या आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यात ही बीपी व डायबेटीस चे प्रमाण वाढत आहे त्यामुळे 50 संस्थांना आरोग्य किट भेट देण्याचे ठरविले व त्यानुसार ब्लडप्रेशर तपासणी यंत्र, रक्तशर्करा तपासणी यंत्र आणि प्रथमोपचार पेटी भेट देण्यात येत आहे असेही संदीप खर्डेकर म्हणाले.आमच्याकडे विविध कारणांसाठी मदत मागणारे येतात, विविध सण, उत्सव येवढेच नव्हे तर अगदी “आखाड” करायचाय म्हणून आर्थिक मदत मागणारेही येतात, मात्र यापुढे आर्थिक मदत न करता मंडळाच्या परिसरातील नागरिकांना गरजेची असणारी “वस्तुरूपी” मदत करण्याचे आम्ही ठरविले असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.
ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः वृद्धाश्रमातील नागरिकांना टीव्ही आणि उपयुक्त असे कपाट भेट देताना आनंद होतं असल्याचे मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी म्हणाले, तसेच येणाऱ्या काळात ही अश्याच पद्धतीने गरजुंना वस्तुरूपी मदत करण्यात येणार असल्याचेही श्री. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे संयोजन सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी केले.

बाणेर बालेवाडी मिसिंग लिंक आणि वाहतूक कोंडी प्रश्न:जमीन अधिग्रहणाच्या समस्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार

ना. चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

पुणे-कोथरुड मतदारसंघातील बाणेर-बालेवाडी-पाषाण- सोमेश्वरवाडी- सुतारवाडी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मिसिंग लिंक पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, यातील अनेक विषय जमीन अधिग्रहणाअभावी प्रलंबित पडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे, ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यास महापालिकेला अपयश येत असल्याबद्दल तीव्र नाराजी ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बाणेर-बालेवाडी-पाषाण- सोमेश्वरवाडी- सुतारवाडी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी आढावा बैठक झाली. या बैठकीला वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, महापालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, उपअभियंता दिलीप काळे, कनिष्ठ अभियंता शिवानंद पाटील, भाजपा सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, भाजप नेते प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, सचिन पाषाणकर, उमाताई गाडगीळ, उत्तर मंडल सरचिटणीस अस्मिता करंदीकर, सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर आदी उपस्थित होते.

सुरुवातीला मागील बैठकीतील इतिवृत्तानुसार काय कार्यवाही झाली याची माहिती ना. पाटील यांनी घेतली. यात प्रामुख्याने बाणेर-पाषाण लिंक रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे दोन महिन्यांत संपादन करून जमीन ताब्यात आल्यानंतर चार महिन्यांच्या कालावधीत हा रस्ता पूर्ण करावा,’ असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला दिले असतानाही अद्याप सदर विषयावर कार्यवाही झाली नाही, त्यावर ना. पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर मधील लक्ष्मीमाता मंदिर येथील रस्ता रुंदीतरण यांसह वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे, खड्डेमय रस्ते, नादुरुस्त पदपथ आदींवर चर्चा झाली. त्यासोबतच मिसिंग लिंकची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण होत नसल्याने त्यावर ही नापसंती व्यक्त केली.

त्यामुळे सदर प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, वाहतूककोंडीस कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

माझ्या जावयाला रेव्ह पार्टीत अडकवले हा कटाचा भाग, कधी तरी कट होणार हे ठाऊक होतेच – एकनाथ खडसे

जळगाव – खराडी परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर रंगेहाथ पकडले गेले . गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खडसे यांच्या जावयाची अटक झाल्याने चर्चेला आणखी उधाण आले आहे. हे होणारच होते, मला आधीच माहीत होते. अनेक दिवसांपासून विरोधात बोलणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हा देखील त्याचाच एक भाग असू शकतो, असा संशय एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

खराडीमधील उच्चभ्रू वसाहतीतील एका महागड्या फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. ऑनलाईन बुकिंगद्वारे घेण्यात आलेल्या या ठिकाणी दारू, हुक्का आणि अमली पदार्थ आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या पार्टीत सहभागी असलेल्या पाच जणांना अटक केली असून, त्यात तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यात प्रांजल खेवलकर यांचे नाव असल्याने प्रकरण अधिक गाजू लागले आहे.

या घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आपल्या पहिल्या प्रतिक्रिया दिल्या. “यासंदर्भातील माहिती मला तुमच्याकडूनच मिळते आहे आणि हे होणारच होते, हे मला आधीच माहीत होते,” असे सांगत खडसे यांनी या कारवाईमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “अनेक दिवसांपासून विरोधात बोलणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हा देखील त्याचाच एक भाग असू शकतो.”

एकनाथ खडसे यांनी याप्रकरणात स्थानिक पोलिस तपास करणार नसल्याचा संशयही व्यक्त केला. “स्थानिक पोलिस दबावाखाली असू शकतात. दोषी असेल तर शिक्षा झालीच पाहिजे, पण मला संपूर्ण माहिती मिळाल्यावरच स्पष्टपणे बोलणे शक्य आहे,” असे ते म्हणाले. “जो दोषी आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे, पण जर हे षड्यंत्र असेल, तर तेही समोर आले पाहिजे,” असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पुण्यातील खराडी भागातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली. या रेव्ह पार्टीत अंमली पदार्थ, दारूचे व्यसन केले जात होते. पोलिसांनी कारवाई करून एकूण 5 जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांनी आमदार एकनाथ खडसे यांचे आमदार आणि रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेतले आहे. प्रांजल खेवलकर यांचा 1 मित्र आणि 2 महिलांचा या रेव्ह पार्टीत सहभाग होता.

राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर..ठाकरे समर्थकांत राजकीय उत्साह शिगेला

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे फारच क्वचित प्रसंगी मातोश्रीवर गेले होते. मात्र, आज ते कोणतेही राजकीय किंवा कौटुंबिक बंधन न ठेवता स्वखुशीने उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी साडे अकरा वाजता दादर येथील आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानातून मातोश्रीकडे रवाना झाले आणि साधारणतः बारा वाजता ते मातोश्रीवर पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी खास उद्धव ठाकरे आणि संजय राऊत स्वतः बाहेर आले होते. राज ठाकरे यांचे स्वागत करताना दोघांच्याही चेहऱ्यावर सौहार्दपूर्ण स्मितहास्य झळकत होते.यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना आपल्या सोबत घेऊन मातोश्रीबाहेर उभारलेल्या व्यासपीठावर आणले. तेव्हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लाल गुलाबांचा पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांनी एकत्र फोटोसेशन केले. यावेळी त्यांच्यातील भावनिक स्नेह स्पष्टपणे जाणवत होता. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना काही वेळ थांबण्याची विनंती केली आणि मग ते राज ठाकरे यांना घेऊन घरात गेले.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मातोश्री निवासस्थानी जल्लोषाचे वातावरण आहे. मातोश्रीबाहेर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून, ठिकठिकाणी शुभेच्छा देणारे बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल झाले असून, आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

याआधी अमितच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवरराज ठाकरे यांचे मातोश्रीवर आगमन हे अनेक दृष्टीने ऐतिहासिक ठरत आहे. शिवसेना पक्षातून बाहेर पडल्यापासून त्यांनी मातोश्रीला भेट देण्याचे प्रसंग अत्यंत मर्यादित ठेवले होते. जेव्हा कधी ते गेले, तेव्हा कोणतेतरी विशेष, अपरिहार्य कारणच त्यामागे होते. यापूर्वी ते अमित ठाकरेंच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी गेले होते. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. राज ठाकरे हे पहिल्यांदाच पूर्णपणे स्वेच्छेने मातोश्रीवर पोहोचले आहेत. त्यामुळे ही भेट केवळ एक साधा स्नेहविनिमय नसून, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नव्या समीकरणांची नांदी ठरू शकते, अशी चर्चा सध्या रंगत आहे.

अलीकडेच पार पडलेल्या मराठी मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये आलेली जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. परंतु त्यानंतर कोणतीही ठोस युतीसदृष चर्चा झाली नाही. त्यामुळे मनसे-ठाकरे गटाची युती बारगळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आता राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर गेले असल्याने, दोन्ही बंधूंच्या राजकीय एकत्र येण्याची शक्यता पुन्हा बळावली आहे.

विशेषतः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांची युती झाल्यास ती सत्ताधारी भाजपसाठी मोठे आव्हान ठरू शकते. त्यामुळे राज ठाकरे यांची मातोश्री भेट केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छांपुरती मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाची नांदी ठरेल, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पुण्यात हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा खडसेंच्या जावयाला म्हणजेच रोहिणी खडसेंच्या पतीला अटक

पुणे-शहरातील खराडी परिसरात एका उच्चभ्रू गेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत पाच जणांना अटक केली आहे. ‘स्टे बर्ड’ नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या या पार्टीदरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्के जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिला, तीन पुरुषांचा समावेश असून, एकनाथ खडसेंच्या जावयाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. रॅडीसन हॉटेलच्या मागे असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बनसोडे नावाच्या व्यक्तीच्या मालकीच्या या गेस्ट हाऊसवर पोलिसांनी छापेमारी केली. त्यावेळी मोठ्या आवाजात संगीत सुरू होते आणि उपस्थित लोक अंमली पदार्थांचे सेवन करत होते. पोलिसांनी सर्वांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्के जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा स्रोत आणि पुरवठादार यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

या पार्टीत सहभागी झालेल्यांमध्ये एका महिला आमदाराच्या पतीचा आणि एकनाथ खडसेंच्या जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल केवळकर यांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच, प्रसिद्ध बुकी निखिल पोपटानी याचेही नाव यात जोडले जात आहे, त्यामुळे या कारवाईने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २५० मिलिमीटर पाऊस


पुणे: पुण्यासह कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. शनिवारी सकाळी ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २५० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.पश्चिम महाराष्ट्रातील चासकमान, वरसगाव, पवना, कासारसाई, मुळशी, राधानगरी, वारणा, दारणा, वालदेवी व वाकी अशा अनेक धरणांतील पाणीपातळीत वाढ होत असून हळूहळू विसर्गामध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गनगरी, ठाणे, पालघर जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी-वाऱ्यांसह पाऊस सुरू असून, समुद्राच्या मोठ्या लाटा किनाऱ्यांवर धडकत आहे. हवामान विभागाने ४.८ मीटर उंचीच्या लाटांचा इशारा दिल्याने प्रशासनाकडून मच्छीमारांना दक्षतेचा इशारा दिला आहे

मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. दारणा धरणातून सर्वाधिक ५,१९८ क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने, पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी दरवाजे उघडण्यात आले. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग ३२२० क्युसेकने वाढवून तो १० हजार २६० क्युसेक इतका केला आहे.

सातारा जिल्ह्यात कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटाने उचलून १६,५६५ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या धरणातच्या पायथा व दरवाज्यातून एकूण १८,६६५ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू केला.

जाहिरात कमानी ठरताहेत रस्त्यांवर वाहतुकीला मोठा अडथळा

पुणे : गणेशोत्सवासाठीच्या जाहिरात कमानी उभारण्यासाठी सुरु झालेली घाईगडबडीमुळे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये शनिवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दुपारच्या सुमारास झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले.सुट्टीचा दिवस असल्याने शनिवारी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत येतात. पार्किंग नसलेल्या ठिकाणी, अरुंद व रहदारी असलेल्या रस्त्यांवरच वाहने पार्किंग करण्यात आल्याने शनिवारी दुपारी बारा वाजल्यापासूनच वाहतूक कोंडी सुरू झाली होती.

त्यातच गणेशोत्सवातील जाहिरातींच्या कमानी उभारण्यासाठी शनिवारी दुपारपासून बांबू, लोखंडी सापळे भरलेली वाहने मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर उभी राहीली. या वाहनांमधून जाहिरात कमानी उभारण्यासाठी लागणारे बांबू, लोखंडी सापळे उतरविली जाऊ लागल्याने रस्ता आणखीनच अरुंद होऊन वाहतूक कोंडी झाली.

मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यासह कुमठेकर, केळकर या रस्त्यांवरही वाहतूक ठप्प झाली होती. मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीचा परिणाम कर्वे रस्ता, लालबहादूर शास्त्री रस्त्यासह अन्य रस्त्यांवरही झाला.

अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवरही वाहतूक संथगतीने सुरू होती. वाहतूक कोंडीमध्ये बराचवेळ गेल्याने वाहनचालक त्रस्त झाले होते. दरम्यान, वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

पोलिसांच्या ट्रॅफिक क्रेनवरील मुजोरीने दुचाकीस्वाराच्या डोळ्याला जबरदस्त जखम

0

पुणे पोलिसांच्या ट्रॅफिक क्रेनच्या हूकने दुचाकी स्वार तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. शुभम बिरादार असं तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील चहोली फाटा, आळंदी-पुणे रोड येथे 25 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला. 28 वर्षीय शुभम मगरध्वज बिरादार यांच्या उजव्या डोळ्याला ट्रॅफिक पोलिसांच्या क्रेनच्या हूकमुळे गंभीर दुखापत झाली. शुभम जे पांडवनगर येथे राहतात आणि स्वतःचा ‘शुभम मेडिकल’ नावाचा व्यवसाय चालवतात. यांनी आपली होंडा अॅक्टीवा दुचाकी HDFC बँकेसमोर पार्क केली होती.

बँकेत काम आटोपून बाहेर आल्यानंतर त्यांना समजले की, नो-पार्किंग झोनमधील गाड्या उचलण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांचे क्रेन कार्यरत आहे. शुभम यांनी सांगितले की, त्यांनी आपली दुचाकी उचलली जाऊ नये म्हणून क्रेनजवळ जाऊन हँडल पकडले आणि आपण आल्याचे सांगितले. मात्र, क्रेन चालकाने कोणतीही सूचना न देता हूक हलवला. जो थेट शुभम यांच्या उजव्या डोळ्याला लागला. यामुळे त्यांच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले.

तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. जिथे प्राथमिक उपचारानंतर दुखापतीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांना मेरीकव्हर हॉस्पिटल, इंद्रायणीनगर येथे दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर पाचव्या मजल्यावरील रूम क्रमांक 511 मध्ये उपचार सुरू असून त्यांचा MLC क्रमांक 713/2025 आहे. या घटनेने दिघी-आळंदी वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शुभम यांनी सांगितले की, क्रेन चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कोणतीही ओळख किंवा माहिती दिली नाही. स्थानिक नागरिकांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. नो-पार्किंग क्षेत्रात गाड्या उचलताना योग्य सूचना देणे आणि क्रेन चालकांना प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी दिघी-आळंदी वाहतूक विभागाकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

पुण्यातील वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. स्थानिकांनी मागणी केली आहे की, वाहतूक पोलिसांनी अधिक जबाबदारीने काम करावे आणि अशा घटना टाळण्यासाठी कठोर नियमावली लागू करावी. तसेच क्रेन चालकांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे. जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील. शुभम यांच्या कुटुंबीयांनीही या प्रकरणी कायदेशीर कारवाईचा विचार सुरू केला आहे.

पुणे शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि त्याची अंमलबजावणी यावरून अनेकदा वाद निर्माण होतात. या घटनेने वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तज्ज्ञांच्या मते, नो-पार्किंग क्षेत्रात गाड्या उचलण्यापूर्वी स्पष्ट सूचना देणे आणि नागरिकांना माहिती देणे आवश्यक आहे. यामुळे अशा अपघातांना आळा बसू शकतो. ही घटना पुण्यातील वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटी दर्शवते. शुभम बिरादार यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, या घटनेने वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी अन मंत्र्यांमधील वॉर थंडावले ….

0

मुंबई-
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात लेटर वॉर सुरू झाले होते. या पार्श्वभूमीवर माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. या भेटीन मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचे कौतुक केले, सोबतच समन्वयातून काम करण्याच्या सूचनाही दिल्या.

शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात विभागीय बैठकीवरून थेट मानापमान नाट्य रंगले आहे. माधुरी मिसाळ यांनी नुकतीच सामाजिक न्याय विभागाशी संबंधित विभागीय बैठक घेतली होती. या बैठकीवर नाराजी व्यक्त करत मंत्री संजय शिरसाट यांनी मिसाळ यांना पत्र लिहित, तुम्ही माझ्याकडील विषयावर बैठक घेतलीत, पुढे अशा बैठका माझ्या अध्यक्षतेखाली घेतल्या जाव्यात, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यानंतर माधुरी मिसाळ यांनीही मी बैठक घेण्यासाठी अधिकृतपणे पात्र आहे, असे प्रत्युत्तर संजय शिरसाटांच्या पत्राला पत्रानेच दिले.

या सर्व घडोमोडींनंतर सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचे कौतुक केले. तसेच समन्ववायातून उत्तम करावे, अशा सूचनाही देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. या भेटीमुळे संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ वादावा अखेर पडदा पडल्याची चर्चा आहे.

शिरसाट-मिसाळ यांच्या वादाचे मूळ 11 मार्च 2025 च्या शासन निर्णयात आहे. यानुसार सामाजिक न्याय विभागातील विषयांचे वाटप मंत्री शिरसाट आणि राज्यमंत्री मिसाळ यांच्यात विभागण्यात आले आहे. याच आदेशाचा आधार घेत शिरसाट यांनी बैठकीच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, मिसाळ यांनी केवळ शिरसाट यांच्या पत्राला उत्तर दिले नाही, तर त्यांनी तो वादग्रस्त मुद्दा थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला आहे. आपल्या अधिकारांचा वापर करताना काही चुकीचे होत असेल, तर मुख्यमंत्री कार्यालय निर्णय देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मिसाळ यांच्या पत्रावर शिरसाटांची प्रतिक्रिया

माधुरी मिसाळ यांच्या पत्रानंतर संजय शिरसाट म्हणाले की, माधुरी मिसाळ यांना पत्र लिहण्याचा माझा स्पष्ट उद्देश होता की काही विषय असतात की ज्यामध्ये राज्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही. पुढे ते म्हणाले, मिसाळ चांगले काम करत आहेत. त्या काही मला आव्हान देत नाहीत. माधुरी मिसळ यांना मी जे पत्र लिहले ते केवळ सहकारी म्हणून त्यांना सूचना देण्यासाठी मी पत्र लिहले आहे. महायुतीमध्ये काही वाद आहे असा त्यांचा अर्थ नाही.

अमित साळुंके यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे,तपास यंत्रणांनी त्यांना गोवले- सुमीत फॅसिलिटीजचा दावा

पुणे- सुमीत फॅसिलिटीज लि.ने पाठविलेल्या प्रसिद्धी पत्रकातून झारखंडमधील अबकारी धोरणाबाबत श्री. अमित साळुंके यांच्यावर करण्यात आलेले आरोप देखील खोटे आहेत. तपास यंत्रणांनी श्री. साळुंके यांना यात गोवले आहे,असे म्हटले आहे . या प्रकरणाचा खासदार श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक असल्याचे दर्शवून संबध लावण्यात आल्याने या बातम्यांना मोठी प्रसिद्धी मिळते आहे या राजकीय चर्चेच्या पार्शवभूमीवर आणि प्रसारित होणाऱ्या बातम्या संदर्भात सुमीत फॅसिलिटीज लि.ने हे स्पष्टीकरण माध्यमांना पाठविले आहे .

यात असे म्हटले आहेकी,’मद्यसंबंधी प्रकरणात आमचे संचालक, अमित साळुंके यांच्या कथित सहभागाबद्दल केलेल्या आरोपांचा आम्ही अत्यंत स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो. हे निराधार आरोप म्हणजे सुमीत फॅसिलिटीज लि. आणि त्यांच्या नेतृत्वाची प्रतिमा मलीन करण्याचा एक प्रयत्न आहे.
आमची कंपनी, आमचे संचालक किंवा त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणाचेही कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकीय व्यक्तीशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे संबंध नाहीत. असे संबंध असल्याची किंवा यासंदर्भात अन्य कोणतीही माहिती असल्यास ती चुकीची आहे तसेच त्याकडे दुर्लक्ष केले जावे.
रुग्णवाहिका प्रकल्प ‘108’ संदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका (पीआयएल) माननीय मुंबई उच्च न्यायालयाने 8 एप्रिल 2025 रोजी फेटाळली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने राबवलेली निविदा प्रक्रिया ही पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. खर्च वाढण्यासंबंधीचे सर्व आरोप हे निराधार असल्याचेही न्यायालयाने सांगितले आहे.
2022 मध्ये झारखंडमधील अबकारी धोरणाबाबत श्री. अमित साळुंके यांच्यावर करण्यात आलेले आरोप देखील खोटे आहेत. तपास यंत्रणांनी श्री. साळुंके यांना यात गोवले आहे. यासंबंधातील अनेक खटले रांचीमधील न्यायालयांमध्ये सुरू आहेत. भारताच्या न्यायव्यवस्थेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि लवकरच सत्य सर्वांसमोर येईल याची आम्हाला खात्री आहे.
सचोटी, प्रामाणिकपणा आणि कायदेशीर वर्तनासाठी सुमीत फॅसिलिटीज लिमिटेड वचनबद्ध आहे.

अहो आपले वाटोळे झाले!:हिंजवडीचा IT पार्क पुणे महाराष्ट्रातून बाहेर जात आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा VIDEO व्हायरल

पुणे-हिंजवडी परिसरात विविध विकास कामाची पाहणी करत असताना अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेले, हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना खडेबोल सुनावले आहेत. या परिसरात विकास कामात मुळे बाधित होणाऱ्या मंदिरा संदर्भातला प्रश्न सरपंच गणेश जांभूळकर यांनी उपस्थित केला. यावर अजित पवार यांनी सर्वांसमोर सरपंचाला खडे बोल सुनावले.
धरण करताना मंदिरे जात नाहीत का? मात्र, तुम्हाला जे सांगायचे तुम्ही सांगा, मी ऐकून घेतो. मात्र, मला जे करायचे ते मी करेलच. अहो आपले वाटोळ होत आहे. हिंजवडीचे सर्व आयटी पार्क बाहेर चालले आहेत. माझ्या पुण्यातून आपल्या महाराष्ट्रातून ते बाहेर जात आहेत. बेंगलोरला, हैदराबादला जात आहेत. तुम्हाला इकडे काय पडले? असा प्रति प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. मी सकाळी सहा वाजता पाहणी करायला कशासाठी आलो. मला कळते, ती माझी देखील माणसे आहेत. मात्र हे काम केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

आज पहाटेपासून, पुण्यातील राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी येथील विविध स्थानिक समस्या, पुणे मेट्रो लाईन 3 प्रकल्पाची स्थळ पाहणी आणि प्रशासनाकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी अजित पवार यांनी केली. या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना देखील केल्या.मुख्यमंत्री अजित पवार पहाटेच कामाला लागतात. त्यांची ही खाती सर्व दूर पसरली आहे. आज देखील त्यांनी सकाळी सहा वाजताच हिंजवडी परिसरातील कामाची पाहणी केली. तसेच प्रशासनाला विविध विकास कामांचे आदेश दिले. हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात आहेत. या माध्यमातून कामामध्ये अडथळा आणणाऱ्या व्यक्तीवर 353 कलम लावा, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.