Home Blog Page 371

रस्ते दुरूस्तीच्या कामातील मलिदा नेमकं खातंय तरी कोण?

रस्त्याच्या कामाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची ‘आपले पुणे, आपला परिसर’ची पथविभागप्रमुख पावसकरांकडे मागणी

पुणे : पुणे शहरात रस्त्यांवर खड्ड्यांमुळे पुणेकर त्रासले आहेत. दररोज मोठ्या खड्ड्यांमधून जीव घेणा प्रवास वाहन चालकांना करावा लागत आहे. अवघ्या अर्धा इंचाच्या खड्ड्यामुळे वाहन चालकाला जीव गमवावा लागला आहे. परंतु त्यानंतरही पुणे महापालिकेला जाग येत नसल्याचे चित्र आहे. सातत्याने रस्त्याची कामे काढली जावून पुणेकरांचे कररुपी पैसे खर्च केले जात आहे. त्यामुळे पुणे शहरातील रस्ते कामांबाबत गेल्या काही वर्षांपासून एक गंभीर प्रश्न नागरिकांसमोर आहे. नागरिकांच्या करातून कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही रस्ते प्रश्न सुटण्याऐवजी तिच तिच कामे नावे बदलून पुन्हा केली जात आहेत, असल्याचा आरोप ‘आपला परिसर’ संस्थेने केला आहे.

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची महती राष्ट्रपती कार्यालयापर्यंत पोहचली आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून नाराजी व्यक्त केल्यानंतर महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यानंतर रस्त्यांवर करण्यात आलेल्या पॅच वर्कमुळे वाहन चालकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॅच वर्क काढून सरसकट रस्ते तयार करण्यासाठी अधिक आर्थिक तरतूद करण्याचे आदेश दिले होत. त्यानंतर महापालिकेने आर्थिक तरतूद करुन आदर्श रस्त्यासह खड्डे मुक्त रस्ते तयार करण्याचे काम हाती घेतले होते. परंतु आदर्श असलेले खड्डे मुक्त रस्ते आहेत तरी कुठे असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

सार्वजनिक पैशांचा अपव्यय थांबवण्यासाठी व पारदर्शक कारभार महापालिकेच्या पथ विभागाने करावा, तसेच प्रशासकराज असताना पथ विभागाने जी कुठली काम केली त्या सर्व कामांची एक “श्वेतपत्रिका” तयार करावी अशी मागणी आपले पुणे आणि आपला परिसरचे आणि माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे. यासोबतच या “स्पर्धेच्या” मार्गावर “दुचाकी” वरून फिरून काय वस्तुस्थिती आहे हे पाहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

संस्थेने उपस्थित केलेले मुद्दे…..

१. वारंवार दुरुस्ती व प्रकल्पांची नावे बदलणे : २०२२-२३ मध्ये २५० कोटींच्या पॅकेज कामांतून रस्ते दुरुस्ती झाली. २०२३-२४ मध्ये जी-२० परिषद निमित्ताने शहरातील प्रमुख रस्ते दुरुस्त करण्यात आले. २०२४-२५ व २०२५-२६ मध्ये ‘आदर्श रस्ते प्रकल्प’ या नावाखाली दोन वर्षांपासून प्रमुख १५ रस्त्यावर रोड फर्निचर व इतर कामे केली जात आहेत. याशिवाय दरवर्षी मोबाईल व्हॅनद्वारे रिस्टेटमेंट व रोड मेंटेनन्ससाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा खर्च केला जातो. प्रश्न असा की, नावे बदलून तीच तीच कामे का केली जात आहेत? नागरिकांच्या पैशांचा अपव्यय थांबवणे आवश्यक आहे.

२. डांबर प्लांटचा उपयोग : महापालिकेचा स्वतःचा डांबर प्लांट वर्षभर चालू आहे, अगदी पावसाळ्यात सुद्धा केला जातो. रोज सुमारे ४५० टन माल तयार होतो. हा माल १५ वॉर्ड ऑफिसमध्ये किती प्रमाणात दिला जातो व कोणत्या रस्त्यांवर वापरला जातो, याची माहिती आजपर्यंत पारदर्शकपणे देण्यात आलेली नाही.

३. पालिकेची यंत्रणा व कर्मचारी : महापालिकेच्या पथ कोठ्यांमध्ये आधीपासूनच कायम सेवक, बिगारी, शेवाळेवाले, रोलर, डंपर, पेव्हर उपलब्ध आहेत. मग अशी पूर्ण यंत्रणा असूनही पुन्हा पुन्हा बाहेरून ठेकेदारांना कामे देण्यासाठी नवीन टेंडर काढायची गरज का भासते? हे नागरिकांसाठी मोठे कोडे आहे.

संस्थेच्या मागण्या….

१) २०२२ पासून आजवर झालेल्या रस्ते दुरुस्ती, रिस्टेटमेंट व आदर्श रस्ते प्रकल्पांतर्गत झालेल्या सर्व कामांची वर्षनिहाय व रस्त्यानिहाय सविस्तर माहिती प्रसिद्ध करावी.
२) डांबर प्लांटमधून रोज किती उत्पादन होते, ते किती व कुठे वापरले जाते, याची पारदर्शक नोंद व तपशील जाहीर करावा.
३) पथ कोठ्यांतील कर्मचारी व यंत्रणा प्रत्यक्षात किती काम करत आहेत, याचा ऑडिट अहवाल सादर करावा.
४) पुन्हा पुन्हा टेंडर काढून निधी खर्च करण्यामागे ठेकेदारधार्जिणी हेतू आहे का? याची चौकशी करून सत्य नागरिकांसमोर आणावे.
५) कुठल्या सल्लागाराने १४५ कोटी रुपयांचे इस्टिमेट तयार केले त्या सल्लागाराचे असे नाव.
६) ज्या अधिकाऱ्यांनी तयार केलेले इस्टिमेट तपासले त्या अधिकाऱ्याचे नाव.
७) सल्लागाराने सुचवलेले काम प्रत्यक्ष जागेवर काय परिस्थिती आहे हे बघितले असेल तर त्या अधिकाऱ्याचे नाव.
८) जी २०, अडीचशे कोटी रुपयाचे टेंडर यात या स्पर्धेच्या रस्त्याची किती कामे झाली आहेत हे तपासले आहे का.
९)प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी ठेवलेला निधी प्रत्यक्षात टेंडर मुख्य खाते काढते, त्या त्यात गेल्या तीन वर्षात केलेली कामे कोणती आहे त्याची यादी.
१०) पुणे ग्रँड सायकल स्पर्धा ही अतिशय महत्त्वाची पुणे शहराचं नाव मोठं करणारी स्पर्धा आहे यात दुमत नाही. परंतु या स्पर्धेच्या नावावर सार्वजनिक निधीचा अपव्यय होणार नाही याची खाते प्रमुख म्हणून खात्री करणे आवश्यक आहे.

पुणे ग्रॅंड सायकल टूर हा उपक्रम सुमारे ६८९ किलोमीटर अंतरावर पुणे जिल्ह्यात पार पडणार आहे. यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि नऊ तालुक्यांचा समावेश आहे. नेमका मार्ग अद्याप निश्चित झालेला नसला तरी हा उपक्रम शहरी, ग्रामीण तसेच डोंगराळ अशा विविध भूप्रदेशांमधून जाणार आहे.

या कार्यक्रमातील काही महत्त्वाचे तपशील:

अंतर : ६८९ किलोमीटर, चार स्पर्धात्मक टप्प्यांमध्ये विभागलेले

भूप्रदेश : शहरी, ग्रामीण आणि डोंगराळ भाग

ठिकाणे : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच नऊ तालुके — यामध्ये बारामती, मुळशी, मावळ, भोर आणि वेल्हे यांचा समावेश

अद्याप रूट फायनल नाही मग तरीही पुणे महापालिकेकडून या सायकलिंग मार्गावरील शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण व दुरुस्ती करण्यासाठी ₹१४५.७५ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. हा काय प्रकार आहे ? हा प्रकल्प नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

पुणे विमानतळावर सव्वा पाच किलो ड्रग्ज जप्त; एक अटकेत

पुणे-पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंटेलिजन्स विभागाने मोठी कारवाई करत सव्वा पाच किलो ड्रग्ज जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोन कोटी एकसष्ठ लाख रुपये इतकी आहे. मॅथा केलॉन नावाचे हे अमली पदार्थ परदेशातून पुण्यामध्ये आणले जात होते. इंटेलिजन्सच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.

अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे शोधण्यासाठी तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत. पुणे विमानतळावर झालेली ही कारवाई अमली पदार्थ विरोधी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमुळे आंतरराष्ट्रीय तस्करीच्या शक्यतांवरही तपास केला जात आहे. या घटनेमुळे अमली पदार्थ विरोधी पथकाची सतर्कता पुन्हा एकदा समोर आली आहे.एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी 18 सप्टेंबर 2025 रोजी बँकॉकहून एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट क्रमांक IX-241 वरून येणाऱ्या एका प्रवाशाची चेक-इन लगेज बॅगची बारकाईने तपासणी केली असता अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली. प्रवाशाच्या बॅगमध्ये पावडर आणि क्रिस्टल स्वरूपात एकूण 5 किलो 234 ग्रॅम वजनाचा पांढरा पदार्थ आढळून आला.
फील्ड टेस्टिंग करण्यात आले असता हा पदार्थ मेथाकॅलोन असल्याचे निश्चित झाले.याची किंमत अंदाजे 2 कोटी 61 लाख रुपये इतकी आहे. एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ या प्रकरणाची नोंद घेतली आणि नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायदा, 1985 अंतर्गत प्रवाशाला अटक केली.

पत्नीच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या:लग्नानंतर सहा महिन्यांतच उचलले पाऊल; पत्नीसह तिच्या आईविरोधात गुन्हा

पुणे -लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच पत्नीच्या सततच्या त्रासामुळे तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली. पोलिसांनी याबाबत तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नीसह तिच्या आईविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय विजय साळवे (वय २६, रा. गणेशनगर, येरवडा,पुणे) असे आत्महत्या केलेल्या मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी दीपाली अक्षय साळवे (वय २४), तिची आई संगीता अशोक अडागळे (रा. भगवाननगर, गेवराई, जि. बीड) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मयत अक्षय याची आई लक्ष्मी विजय साळवे (वय ५२) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयचा दीपालीशी सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. विवाहानंतर दीपाली आणि तिची आई संगीता यांनी अक्षयला आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास वेळोवेळी सांगितले. त्याने वेगळे राहण्यासाठी त्याच्यावर सतत दबाब आणला. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात तक्रारी देखील दिल्या. पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे अक्षयने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे मुलगा अक्षयने आत्महत्या केल्याचे त्याची आई लक्ष्मी साळवे यांनी फिर्यादीत सांगितले आहे. पोलीस उपनिरीक्षक एस दळवी पुढील तपास करत आहेत.

बेवारस आत्म्यांनाही मिळाली मुक्ती…

बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत विसर्जन :  राष्ट्रीय कलाकादमी तर्फे आयोजन

पुणे : हिंदू परंपरेनुसार मृत्यूनंतर अस्थी विसर्जन ही आत्म्याच्या शांतीची शेवटची पायरी मानली जाते. परंतु अनेकदा अपघात अथवा इतर कारणांनी रस्त्यावर मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या देहाची ओळख पटत नाही. अशा मृतदेहांना कुणीही वारस नसल्याने ते बेवारस अवस्थेतच राहतात. अशा बेवारस आत्म्यांना सन्मानाने निरोप मिळावा, या हेतूने राष्ट्रीय कला अकादमीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वपित्री अमावास्येनिमित्त बेवारस अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठण, मंत्रोच्चारात अस्थी विसर्जन विधी पार पडला.

आरटीओ जवळील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर विधिवत पूजन करून अस्थींचे विसर्जन करण्यात आले. या उपक्रमासाठी पुणे महानगरपालिका ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे विशेष सहकार्य मिळाले. यावेळी नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पराग ठाकूर, डॉ. मिलिंद भोई, विनायक घाटे, राजेंद्र बलकवडे, शिरीष मोहिते, नितीन पंडित, पियुष शहा, आशिष जराड, राजाभाऊ कदम, दिलीप काळोखे, लता राजगुरू, पुणे महानगरपालिका परिमंडळ एक उपायुक्त माधव जगताप, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त भास्कर महाडिक, आरोग्य निरीक्षक विक्रम सरवदे, मुकादम नागेश बाराथे, नागेश लांडगे आणि सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन अकादमीचे मंदार रांजेकर, रोमा लांडे, अमर लांडे, सदाशिव कुंदेन, अतुल सोनवणे, सुनील सोनटक्के, सचिन देसाई, बाला शुक्ला, किरण फाळके, राजेश निकम, सुप्रिया दळवी, प्रिया भोंडवे, मनोज गवळी यांनी केले.

माधुरी मिसाळ म्हणाल्या, सर्वपित्री अमावस्येला आपल्या पूर्वजांना आपण स्मरतो, पण बेवारस आत्म्यांनाही शांती लाभावी ही भावना मनात ठेवून राबविलेला हा उपक्रम म्हणजे  खरी माणुसकी आहे. धर्म-जात न पाहता अस्थींचे विधिवत पूजन आणि विसर्जन करणे या माध्यमातून एकतेचा संदेश राष्ट्रीय कला अकादमीच्या माध्यमातून समाजात जात आहे.

राष्ट्रीय कला अकादमीचे अध्यक्ष मंदार रांजेकर म्हणाले, बेवारस मृतांना कोणी नसते, त्यामुळे त्यांचे शेवटचे संस्कार होणे कठीण होते. गेली १५ वर्षे आम्ही हा उपक्रम राबवतो आहोत. कोणताही धार्मिक अडसर न ठेवता केवळ माणुसकीच्या भावनेतून हा उपक्रम अकादमीच्या वतीने केला जातो.

स्वच्छतोत्सव २०२५ अंतर्गत जागतिक स्वच्छता दिनानिमित्त बोपोडीत स्वच्छता व जनजागृती उपक्रम

पुणे : स्वच्छतोत्सव २०२५ (१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर) निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण (PARMM) प्रकल्पांतर्गत बोपोडी आरोग्य कोठी ते महादेव घाट नदीपात्र या परिसरात श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आला आणि पथनाट्य, गाणी या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाकडून जॉईंट सेक्रेटरी करण सिंग शास्त्रज्ञ श्री.अंजनी प्रसाद सिंग, सहाय्यक विभाग ऑफिसर वसीम अहमद आणि.पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.पृथ्वीराज बी.पी. (आय.ए.एस.), प्रकल्प व्यवस्थापक व मुख्य अभियंता जगदीश खानोरे, कैलास काराळे श्री.भूषण सोनवणे.व NJS -FP कडून सुयोग साळुंखे हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शेल्टर असोसिएट्सच्या सहाय्यक कार्यकारी संचालक सौ. धनश्री गुरव, प्रकल्प व्यवस्थापक डॉ. नीलिमा गावडे, टीम लीडर सौ. सुबोधिनी कांबळे ,राहुल राठोड आणि इकोसन फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक अजय रामाणे टीम लीडर सुभाष लाटे, राम साठे ,मुनकीन मुजावर, संदीप एडकेवार व प्रतिनिधी तसेच औंध-बाणेर विभागाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर, आरोग्य निरीक्षक विनायक चोपडे, मुकादम संतोष शेलार, सफाई कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

स्वच्छता उपक्रमासोबतच आकांक्षा फाउंडेशन व स्व. अनंतराव पवार मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, कचरा वर्गीकरणावर आधारित खेळ खेळले आणि विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी सौ. धनश्री गुरव यांनी विद्यार्थ्यांना जागतिक स्वच्छता दिनाचे महत्त्व पटवून दिले.

विद्यार्थी, शिक्षक, पालक, स्थानिक नागरिक आणि महापालिकेचे कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागामुळे उपक्रम उत्साहात पार पडला. हा संपूर्ण कार्यक्रम पुणे महानगरपालिका मलनिःसारण विभाग आणि NJS-FP सल्लागार संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

संदेश :
“स्वच्छता हीच सेवा – चला, एकत्र येऊन स्वच्छ व निरोगी परिसर घडवूया!”

गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून किडनी प्रत्यारोपणासाठी ५१ हजार रुपयांची मदत

प्रथम दगडूशेठ गणपतीची मूर्ती असणाऱ्या अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार
पुणे : गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते केवळ उत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा करत नाहीत तर किडनी प्रत्यारोपण सारख्या शस्त्रक्रियेसाठी देखील कार्यकर्ते एकत्र येऊन मदत
 गोळा करतात आणि उत्सवाच्या आनंदासोबतच समाजसेवा देखील तितक्याच तत्परतेने करतात. असाच एक आदर्श शुक्रवार पेठेतील अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी निर्माण केला आहे. मयूर येनपुरे या रुग्णाच्या किडनी प्रत्यारोपणासाठी मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेश भक्त मित्र परिवाराने ५१ हजार रुपयांची मदत जमा केली आहे.

प्रथम दगडूशेठ गणपतीची मूर्ती असणाऱ्या अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनानंतर ही रक्कम जमा करण्यात आली. मयूर येनपुरे याला किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेची गरज असून त्याच्या आईनेच आपली किडनी देण्याचा संकल्प केला असून सर्व टेस्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर लवकरच भारती हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी ६ लाख रुपयांची गरज होती. या पार्श्वभूमीवर मंडळाचे कार्यकर्ते व गणेश भक्त मित्र परिवार यांनी एकत्रितपणे ५१ हजार रोख मदत या कुटुंबाकडे सुपूर्द केली.  या कार्यक्रमाला अॅड. प्रताप परदेशी, किरण सोनीवाल, सुधीर ढमाले, डॉ. विजय पोटफोडे, राजाभाऊ कदम, दिलीप पवार, दिलीप काळोखे, मंडळाचे अध्यक्ष रवी मोरे, कार्याध्यक्ष विनायक घाटे आदी मान्यवर तसेच मंडळाचे कार्यकर्ते निखिल घुमे, प्रथमेश घाटे, संकेत जाधव, अभिषेक थिटे, सागर गोरड, चंदू वर्डेकर उपस्थित होते.

विनायक घाटे म्हणाले, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते हे फक्त उत्सव साजरा करण्यापुरते मर्यादित नसून वर्षभर विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय राहून गरजूंना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात.

साहित्यिक डॉ. अविनाश सांगोलकर यांच्या 

‘विश्वबंधुतेची प्रकाशवाट’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे: ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अविनाश सांगोळेकर लिखित आणि बंधुता प्रकाशन प्रकाशित ‘विश्वबंधुतेची प्रकाशवाट’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आयोजिला आहे. गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात हा प्रकाशन सोहळा होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते, तर ज्येष्ठ समाजनिष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमावेळी स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्रा. शंकर आथरे, संगीता झिंजुरके यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती प्रकाशक मंदाकिनी रोकडे यांनी दिली.
बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी पाच दशकांहून अधिक काळ बंधुता, राष्ट्रबंधुता आणि विश्वबंधुता या तीन टप्प्यांवर केलेल्या यशदायी आणि प्रेरणादायी कार्याचे दस्तावेजीकरण म्हणजे हे पुस्तक आहे. डॉ. सांगोलेकर यांच्यासह प्राचार्य राम शेवाळकर, डॉ. निर्मलकुमार फडकुले, डॉ. रावसाहेब कसबे फादर फ्रान्सिस दिब्रिटो, अॅड. भास्करराव आव्हाड, डॉ. अश्विनी धोंगडे, पत्रकार जीवराज चोले, प्रा. शंकर आथरे, नानासाहेब लडकत आणि बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या लेखनाचा यामध्ये अंतर्भाव असल्याचे मंदाकिनी रोकडे यांनी नमूद केले.

सोशल मीडिया व मोबाईल व्यसनावरबापू ट्रस्टतर्फे पथनाट्याचे सादरीकरण

पुणे: एकटेपणा, नैराश्य, भीती, चिंता, मानसिक भावनिक आघात अशा व मानसिक समस्यांवर  बापू ट्रस्ट फॉर रिसर्च ऑन माइंड अँड डिस्कोर्स संस्था वस्ती पातळीवर  काम करीत आहे, संस्थेच्या वतीने या सर्व मानसिक समस्यांवर जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बापू ट्रस्टकडून ‘सोशल मीडिया व मोबाईल व्यसन’ या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले. या सादरीकरणाने प्रेक्षकांना स्वतःच्या सवयींकडे नव्या नजरेने पाहण्याची आणि संतुलित जीवनशैली अंगीकारण्याची प्रेरणा दिली. यलो रिबन फेअरमध्ये बापू ट्रस्टच्या वतीने मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.

याबाबत बोलताना बापू ट्रस्टच्या ट्रस्टी सौ. सुमंगला कुमार म्हणाल्या, “एकट्या महिला, किशोरवयीन मुले-मुली, गर्भवती महिला, घरगुती हिंसाचाराचे बळी ठरलेल्या व्यक्ती, आणि मानसिक आघातातून गेलेल्या लोकांना बापू ट्रस्टचा मोठा आधार मिळाला आहे. ‘सेहर’ हा पर्वती व गोखलेनगर वस्त्यांमध्ये कार्यरत असलेल्या उपक्रमातून रोजच्या एकटेपणा, बहिष्कार आणि ताणतणावासारख्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. मानसिक आरोग्यसेवा म्हणजे केवळ औषधोपचार नसून नातेसंबंध जपत स्वतःची काळजी घेणे, समाजात सहभागी होणे, आणि व्यक्तींची सर्वसमावेशकता वाढवणे महत्वाचे आहे.”

“आज एकटेपणा सर्वत्र पसरलेली गंभीर समस्या आहे. सोशल मीडिया आणि मोबाईल व्यसनाचे मूळ कारण एकटेपणा असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. विशेषतः तरुणांमध्ये त्यामुळे नैराश्य व आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. तंत्रज्ञानामुळे आभासी नाती जोडणी वाढली असली तरी प्रत्यक्ष मानवी नात्यांची खोली आणि विश्वास कमी झाले आहेत. यावर उपाय करण्यासाठी केवळ वैद्यकीय किंवा मानसोपचार सेवा पुरेशा नाहीत. लोकांना पुन्हा जोडण्यासाठी आणि आपलेपणाची भावना परत मिळवण्यासाठी मजबूत मनोसामाजिक आधार यंत्रणा आवश्यक आहे,” असेही त्यांनी सांगितले.

गेल्या दशकापासून बापू ट्रस्ट यलो रिबन फेअरमधून मध्यमवर्गीय समाजापर्यंत पोहोचत आहे. या व्यासपीठावरून आम्ही खेळ, उपक्रम, पुस्तके, संवाद आणि प्रकाशनांद्वारे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवतो, कलंकाला आव्हान देतो आणि खुलेपणाला प्रोत्साहन देतो. अधिक माहितीसाठी https://baputrust.com/ या वेबसाईट वर भेट द्या व मानसिक आधारासाठी bt.admfin09@gmail.com, 87679 73272 यावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

‘आर्टी’ तर्फ ‘अभियंता-उद्योजक कार्यशाळा’ मोठ्या उत्साहात संपन्न

0

“उद्योजक घडवणं ही फक्त्त चळवळ नाही, प्रेरणा देण्याची प्रक्रिया आहे”बार्टीचे महासंचालक सुनील वारे

पुणे, : “उद्योजक बनवणं ही काही फक्त्त चळवळ नसून त्यासाठी प्रेरणा द्यावी लागते आणि ती प्रेरणा अशा कार्यशाळांमधून मिळते. त्यामुळे अभियंता-उद्योजक कार्यशाळा महत्त्वाची भूमिका बजावतात. पिंपरी-चिंचवड येथील नोव्हेल संस्थेत मातंग समाजाची अभियंता कार्यशाळा घेण्यात आली होती, त्याचाच पुढील टप्पा म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, दरवर्षी याचे आयोजन केले जाणार आहे,” असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे चे महासंचालक तथा अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले.
अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) आणि सीओईपी अभियांत्रिकी विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील सीओईपी सभागृहात शनिवारी (दि. २०) ‘अभियंता-उद्योजक कार्यशाळा’ मोठ्या उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक डॉ. प्रकाश धोका, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ (एमसीईडी) चे कार्यकारी संचालक विक्रांत बगाडे, दत्तनाथ इलेक्ट्रिक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुरलीधर झोंबाडे, उद्योजक अनिल सौंदाडे, राजेंद्र साळवे, महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रदीप देशमुख, आमदार अमित गोरखे, माजी आयुक्त मधुकर गायकवाड, राजेंद्र दणके, आनंद कांबळे, पुंडलीक थोटवे, प्रा. डॉ. योगेश साठे, संतोष अवचरे आदी मान्यवर उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रातील वरिष्ठ संशोधक डॉ. अशोक नगरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेत उद्योग उभारणीपासून विक्रीपर्यंतच्या प्रवासावर मार्गदर्शन करण्यात आले.

मातंग समाजातील अभियंते व नवउद्योजकांनी या वेळी परिचय करून देत विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना मातंग बिझनेस असोसिएशनच्या तज्ज्ञ उद्योजकांनी उत्तरे देत सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.

मान्यवरांचे स्वागत अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची प्रतिमा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. निबंधक इंदिरा अस्वार यांनी प्रास्ताविक तर महासंचालक सुनील वारे यांनी आभारप्रदर्शन केले.

उद्योगरत्न पुरस्कार प्रदान
स्वतःच्या कष्टाने उद्योग उभारून हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या उद्योजकांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. उद्योजक आनंद कांबळे, अनिल व निलेश सौंदाडे बंधू, निर्मला ग्लोबल इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र साळवे, संतोष कवळे, ग्लोबॅक एपीसी प्रोजेक्ट्सचे अध्यक्ष महेंद्र तुपसुंदर, उद्योजक प्रदीप देशमुख, स्पाईस इव्हेंट्सचे संस्थापक प्रसाद कांबळे, ए. एस. सर्व्हिसेस कंपनीचे स्थापक अध्यक्ष सतिष कसबे, पुणेरी गोल्ड आटा कंपनीचे संस्थापक विनायक मोहिते, विजय गायकवाड, उद्योजिका डॉ. भक्ती वारे, अश्विनी गोठे, क्रांतीचंद्र भावे, लोकटाईम्स मिडिया हाऊसचे स्थापक राजेंद्र दणके यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

नवीन GST दर लागू, पहा काय,किती मिळेल स्वस्त…

0

मुंबई:, २२ सप्टेंबरपासून, जीवनावश्यक वस्तूंवर आता दोन जीएसटी स्लॅब लागू होतील: ५% किंवा १८%. करप्रणाली सोपी करण्यासाठी सरकारने हे केले आहे. यामुळे पनीर, तूप, साबण आणि शाम्पू, तसेच एसी आणि कार यासारख्या सामान्य गरजा स्वस्त होतील.

जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ३ सप्टेंबर रोजी याची घोषणा केली . आम्ही ९ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये या बदलाशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती देत ​​आहोत…

१: जीएसटी दरात काय बदल झाले आहेत?

: सरकारने ३ सप्टेंबर रोजी घोषणा केली की त्यांनी जीएसटी स्लॅब ५%, १२%, १८% आणि २८% वरून दोन केले आहेत. आता, फक्त ५% आणि १८% स्लॅब असतील.

याशिवाय, तंबाखू, पान मसाला, कार्बोनेटेड पेये आणि मोठ्या कार, जहाज आणि वैयक्तिक वापरासाठी विमाने यासारख्या लक्झरी वस्तूंवर ४०% विशेष कर आकारला जाईल.

पनीर, रोटी, चपाती आणि पराठा यासारख्या काही वस्तूंवर आता कर आकारला जाणार नाही. उद्या, २२ सप्टेंबरपासून तंबाखू वगळता सर्व वस्तूंवर नवीन दर लागू होतील.

२: कर स्लॅब बदलणे फायदेशीर ठरेल की हानिकारक?

: या बदलामुळे साबण आणि शाम्पू, अन्न, इलेक्ट्रॉनिक्स आणि कार यासारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील. जीवन आणि आरोग्य विम्यावरील १८% कर देखील शून्य करण्यात आला आहे. याचा अर्थ एक फायदा होईल. या वस्तूंव्यतिरिक्त…

सिमेंटवरील कर २८% वरून १८% पर्यंत कमी केला, यामुळे घर बांधण्याचा किंवा दुरुस्तीचा खर्च कमी होईल.
टीव्ही आणि एसी सारख्या वस्तूंवरील कर २८% वरून १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे ते स्वस्त झाले आहेत.
३३ आवश्यक औषधांवर, विशेषतः कर्करोग आणि गंभीर आजारांसाठी असलेल्या औषधांवर कोणताही कर नाही.
३५० सीसी पर्यंतच्या छोट्या कार आणि मोटारसायकलींवर आता २८% ऐवजी १८% कर आकारला जाईल.
ऑटो पार्ट्स आणि तीन चाकी वाहनांवरील कर देखील २८% वरून १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे ते स्वस्त झाले आहेत.

बदलापूर्वी: समजा केसांच्या तेलाच्या बाटलीची किंमत १०० रुपये होती आणि त्यावर १८% जीएसटी आकारला जात होता, तर गणना अशी असेल…

जीएसटी = ₹१०० × १८% = ₹१८

एकूण किंमत = ₹१०० + ₹१८ = ₹११८

बदलानंतर: नवीन जीएसटी ५% आहे.

जीएसटी = ₹१०० × ५% = ₹५

एकूण किंमत = ₹१०० + ₹५ = ₹१०५

फायदा: पूर्वी ११८ रुपयांना मिळणारी बाटली आता १०५ रुपयांना मिळेल. याचा अर्थ १३ रुपयांचा नफा होईल.

३: जुन्या स्टॉकवर एमआरपी जास्त असेल, हे देखील स्वस्त दरात उपलब्ध होईल का

: सरकारने असे म्हटले आहे की जुन्या स्टॉकवरील एमआरपी जास्त असली तरीही, या वस्तू नवीन दरांवर उपलब्ध असतील. कमी केलेल्या जीएसटी दरांचा फायदा ग्राहकांना देणे आवश्यक असेल.

दरम्यान, राष्ट्रीय औषधनिर्माण किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) १२ आणि १३ सप्टेंबर रोजी औषधांसाठी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की-

औषधे तयार करणाऱ्या आणि विकणाऱ्या सर्व कंपन्यांना औषधे, फॉर्म्युलेशन आणि वैद्यकीय उपकरणांचे एमआरपी अपडेट करावे लागेल.
जीएसटी बदलानंतर, सुधारित किंमत यादी डीलर, किरकोळ विक्रेता, राज्य औषध नियंत्रक आणि सरकारला द्यावी लागेल, जेणेकरून ती ग्राहकांना दाखवता येईल.
४: जर दुकानदाराने जीएसटी कपातीचा लाभ दिला नाही तर काय करावे?

: जर दुकानदाराने कमी केलेली किंमत ग्राहकांना दिली नाही, तर तुम्ही तक्रार करू शकता. दोषी दुकानदारांना दंड किंवा तुरुंगवास देखील होऊ शकतो.

तुम्ही राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर १८००-११-४००० वर तक्रार करू शकता.
तुम्ही CBIC च्या GST हेल्पलाइनला १८००-१२००-२३२ वर देखील कॉल करू शकता.
तुम्ही राष्ट्रीय नफाविरोधी प्राधिकरणाच्या वेबसाइटवर तक्रार करू शकता.
वेबसाइटवरील तक्रारीत बिलाची प्रत, दुकानदाराचे नाव आणि पत्ता द्यावा लागेल.
५: जीवन आणि आरोग्य विम्याचे प्रीमियम कमी होतील का?

: हो, सरकारने जीवन आणि आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील जीएसटी १८% वरून शून्य केला आहे. २२ सप्टेंबर नंतर भरलेल्या नूतनीकरण प्रीमियमना देखील जीएसटीमधून सूट मिळेल. प्रीमियममध्ये किती कपात होईल हे उदाहरणासह समजून घेऊया.

समजा, ५०,००० रुपयांच्या प्रीमियमसह कुटुंब आरोग्य विमा पॉलिसी आहे:

बेस प्रीमियम: ५०,००० रुपये

१८% GST सह प्रीमियम: ₹५९,०००

०% जीएसटीसह प्रीमियम: ₹५०,०००

लाभ: ९,००० रुपये

टीप: हे आकडे केवळ उदाहरणासाठी आहेत. प्रत्यक्ष प्रीमियम वेगवेगळे असू शकतात.

६: जीएसटी बदलांमुळे काही वस्तू महाग होतील का?

हो, चैनीच्या वस्तूंसाठी ४०% चा नवीन स्लॅब तयार करण्यात आला आहे. यामध्ये पान मसाला आणि तंबाखू सारख्या उत्पादनांचा समावेश आहे.

याशिवाय, काही कार आणि बाईकवरही ४०% कर आकारला जाईल. तथापि, ही वाहने अधिक महाग होणार नाहीत. पूर्वी, त्यांच्यावर २८% जीएसटी आणि १७% उपकर आकारला जात होता. याचा अर्थ एकूण कर ४५% होता, जो आता ४०% पर्यंत कमी करण्यात आला आहे.

१२०० सीसी आणि ४ मीटरपेक्षा जास्त लांबीच्या पेट्रोल वाहनांवर ४०% कर आकारला जाईल.
१५०० सीसी आणि ४ मीटरपेक्षा जास्त लांबीच्या डिझेल वाहनांवरही ४०% कर आकारला जाईल.
३५० सीसी पेक्षा जास्त विस्थापन असलेल्या मोटारसायकलींवरही हा कर लागू होईल.
७: असे काही पदार्थ आहेत का ज्यांच्या किमती बदलणार नाहीत?

हो, GST २.० मध्ये जवळजवळ ९०% वस्तूंच्या किमती बदलल्या आहेत, परंतु काही वस्तू अशा आहेत ज्यांचे GST दर बदललेले नाहीत.

०% स्लॅब: ताजी फळे आणि भाज्या, दूध, सैल पीठ, ब्रेड, रोटी, पराठा. हे आधीच शून्य-रेटेड होते आणि अजूनही आहेत.
५% स्लॅब: इलेक्ट्रिक वाहने (EVs) जसे की इलेक्ट्रिक कार. यावर पूर्वी ५% GST लागत होता आणि तो तसाच राहील.
३% स्लॅब: सोने, चांदी, हिरे आणि मौल्यवान दगड. पूर्वी, जीएसटी दर ३% होता आणि तो ३% आहे. हा एक विशेष स्लॅब आहे.
१८% स्लॅब – बहुतेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जे आधीच १८% मध्ये होते जसे की मोबाईल फोन, लॅपटॉप आणि संगणक.
पाप आणि चैनीच्या वस्तू – सिगारेट, तंबाखू उत्पादने (जसे की गुटखा, बिडी, पान मसाला) – भरपाई कर्जे मंजूर होईपर्यंत २८% + भरपाई उपकर राहील. त्यानंतर ते ४०% पर्यंत हलवले जातील.
८: हॉटेल बुकिंग, विमान तिकिटे, सिनेमा तिकिटे देखील स्वस्त होतील का?

: हॉटेल रूम बुकिंग, सौंदर्य आणि आरोग्य सेवांवरील जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे. १०० रुपयांपर्यंतच्या सिनेमा तिकिटांवर ५% कर आकारला जाईल, जो पूर्वी १२% होता. १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तिकिटांवर आता १८% कर आकारला जाईल.

१,००० रुपयांपेक्षा कमी भाडे असलेल्या हॉटेल खोल्या अजूनही करमुक्त राहतील.
१००० ते ७५०० रुपयांच्या हॉटेल खोल्यांवर जीएसटी १२% वरून ५% करण्यात आला आहे.
७,५०० रुपयांपेक्षा जास्त भाडे असलेल्या प्रीमियम हॉटेल्सवर १८% जीएसटी आकारला जाईल.
समजा एका हॉटेल रूमची किंमत ₹५,००० आहे. पूर्वी त्यावर १२% जीएसटी लागत होता. आता तो ५% आहे, म्हणजे गणना अशी असेल…

२२ सप्टेंबरपूर्वी
जीएसटी = ₹५००० × १२% = ₹६००

एकूण किंमत = ₹५००० + ₹६०० = ₹५६००

२२ सप्टेंबर नंतर:
जीएसटी = ₹५००० × % = ₹२५०

एकूण किंमत = ₹५००० + ₹२५० = ₹५२५०

बचत: ३५० रुपये ; पूर्वी ५६०० रुपयांना मिळणारा हॉटेल रूम आता ५२५० रुपयांना उपलब्ध होईल.

इकॉनॉमी क्लासचे भाडे स्वस्त होतील आणि बिझनेस क्लासचे भाडे महाग होईल. प्रथम श्रेणीचे भाडे कायम राहतील. पूर्वी इकॉनॉमी क्लासच्या भाड्यावर १२% जीएसटी लागत होता, जो आता ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे. बिझनेस क्लासचा जीएसटी १२% वरून १८% पर्यंत वाढवण्यात आला आहे.

९: नवीन जीएसटीचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल?

: सरकारचा दावा आहे की, जीएसटी २.० मुळे सामान्य माणसाला दिलासा मिळेल, व्यवसाय सुलभ होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

पंतप्रधानांनी आठ वर्ष वाढीव दराने केलेल्या लुटीची जबाबदारी घ्यावी: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई दि. २१ सप्टेंबर २०२५

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पुन्हा एकदा आपल्या सवयीप्रमाणे GST दर कपातीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. २०१७ मध्ये मोदीजींनीच स्वतः प्रचंड वाढीव दराने GST आणून देशातील उद्योग, व्यापारी आणि सामान्य नागरिक यांना त्रस्त केले, त्यांची प्रचंड आर्थिक लूट केली. तेच मोदीजी आज GST दर कमी केले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. गेल्या आठ वर्षांत GST संकलन दुप्पट वाढून २२ लाख कोटींवर गेले आहे आणि याचा सर्वाधिक फटका ग्राहक व छोट्या व्यवसायांना बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर कमी करण्याचे श्रेय घेताना आठ वर्ष वाढीव दराने केलेल्या लुटीची जबाबदारी ही घेतली पाहिजे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राहुल गांधी यांनी खूप आधीच सांगितले होते की मोदींजींनी GST ला गब्बर सिंग टॅक्स मध्ये परिवर्तित केले आहे. दर कमी करून जनतेची लूट थांबवा अशी मागणीही त्यांनी सातत्याने केली होती. त्यावर निर्णय घ्यायला मोदींनी काही वर्ष उशीर केला. पेट्रोल-डिझेलच्या दरांवर मात्र मोदीजी गप्प आहेत. जनतेला स्वदेशीचा उपदेश करणारे पंतप्रधान स्वतः परदेशी गाड्या, घड्याळे, पेन व फोन वापरतात. ‘आत्मनिर्भरते’ची शिकवण देताना स्वतः मात्र ऐषआरामी जीवनशैलीत गुंतलेले आहेत. त्यांनी आज सांगितले की हा बचत महोत्सव आहे मग गेली आठ वर्ष काय लूट महोत्सव सुरु होता का ? हे ही त्यांनी सांगावे.

त्यांच्या आजच्या भाषणात उत्साह आणि आत्मविश्वासाची कमी होती. कदाचित देशभर घुमणारे “वोट चोर, गद्दी छोड”चे नारे आणि जनतेत वाढत चाललेली नाराजी याचेच ते प्रतिबिंब असावे. पंतप्रधानांनी लोकांची दिशाभूल करणाऱ्या भाषणांपेक्षा महागाई, बेरोजगारी, शेती व शेतक-यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा प्रस्ताव मंजूर


पुण्याच्या शैक्षणिक ओळखीला मिळणार नवा आयाम

पुणे :
पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून शैक्षणिक नगरी पुण्यात नवे शैक्षणिक द्वार खुले होत आहे. देशातील नामांकित व्यवस्थापन शिक्षणसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात सुरु होत आहे. केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला संस्थेच्या डीन कमिटी आणि त्यानंतर Academic Council ने मान्यता दिल्यानंतर हा निर्णय अधिकृत झाला आहे.

आयआयएम मुंबईचे केंद्र पुण्यात व्हावे, यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रस्ताव दिला होता. त्यावर निर्णय होत पुणे केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे केंद्राची स्थापना ही केवळ पुण्याच्या नव्हे, तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि औद्योगिक परंपरेतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. पुणे हे देशातील अग्रगण्य तंत्रज्ञान व औद्योगिक केंद्र म्हणून जलद गतीने विकसित होत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे, अत्याधुनिक संशोधन-विकास केंद्रे, वाढती स्टार्टअप संस्कृती आणि Oxford of the East अशी मिळालेली शैक्षणिक ओळख या सर्व पार्श्वभूमीवर आयआयएम मुंबईचा कॅम्पस शहरासाठी केवळ नैसर्गिक पूरकच ठरणार नाही, तर जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षणाला इथल्या विद्यार्थ्यांना थेट दाराशी आणून देणार आहे.

या कॅम्पसच्या माध्यमातून उद्योजकतेला नवा उन्मेष मिळेल, व्यवस्थापन कौशल्यांचा वापर करून नाविन्यपूर्ण कल्पनांचे यशस्वी व्यवसायांत रूपांतर साधता येईल. हा उपक्रम स्वावलंबी भारताच्या संकल्पनेशी सुसंगत असून विकसित भारत २०४७ या राष्ट्रीय दृष्टिकोनाला बळकटी देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

याबाबत माहिती देताना आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी म्हणाले, ‘आमचा प्रयत्न राहील की शैक्षणिक वर्ष २०२६ पासून प्रस्तावित पुणे केंद्रात क्षमता विकास कार्यक्रम तसेच अल्पावधी कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करता यावेत. ही महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. यामुळे आयआयएम मुंबईला विकसित भारत २०४७ या ध्येयाच्या दिशेने मोलाचे योगदान देता येईल.’
मुंबई-पुण्यामध्ये ‘नॉलेज कॉरिडॉर’ तयार होईल : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
‘पुण्यात आयआयएम मुंबईचे केंद्र स्थापन होणे ही अभिमानाची बाब आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आणि पुणे हे तंत्रज्ञान व शिक्षणाचे केंद्र आहे. या दोन्ही शहरांमध्ये निर्माण होणारा ‘Knowledge Corridor’ ही देशाच्या औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रासाठी नवी पर्वणी ठरेल. या निर्णयामुळे महाराष्ट्राला जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षणाची नवी ऊर्जा मिळेल आणि नव्या पिढीसमोर संधींचे विस्तीर्ण क्षितिज खुले होईल. पुणे अनेक दशकांपासून देशाचे प्रमुख शैक्षणिक केंद्र राहिले आहे आणि आता ते तंत्रज्ञान, उत्पादन तसेच आयटीचे बळकट हब म्हणूनही उदयास आले आहे. याच वैशिष्ट्यांचा विचार करून आयआयएम मुंबई आपला नवा कॅम्पस पुण्यात स्थापन करीत आहे.

संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करु! चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्वासन

संशोधक समन्वय कृती समितीच्या शिष्ठमंडळने घेतली ना. पाटील यांची भेट

ना. पाटील यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

पुणे:

संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीच्या मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करु, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले. संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीच्या शिष्टमंडळाने आज ना. पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. ना. पाटील यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला.

सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, आर्टी आदी संस्थांच्या शिष्यवृत्तीसाठी संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीच्या वतीने डेक्कन चौकात आंदोलन सुरु असून; त्यावर मार्ग काढण्यासाठी समितीच्या शिष्टमंडाळाने आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत सविस्तर चर्चा होऊन अतिशय सकारात्मक चर्चा झाली.

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये विद्यार्थी संख्या, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती यांची संख्या ठरविणे, शिष्यवृत्तीसाठी जाहिरात काढणे आणि गुणवत्ता वाढ यासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे. त्या संदर्भात मंत्रालय स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी आश्वस्त केले.

तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून मंत्रालयात मुख्य सचिवांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याबाबत चर्चा केली. ना. पाटील यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला.

यावेळी युवासेना नेते किरण साळी,नितीन आंधळे, पूजा झोळे, विद्यार्थी भारत पवार, अंकुश चौगुले, परिमल कुंभार, अभाविपचे राधेय बाहेगव्हाणकर, अलोक पवार, सई थोपटे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

आता जीएसटी बचत महोत्सव, फक्त तेच खरेदी करा ज्यामध्ये देशाचे परिश्रम आहेत

0


नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाला संबोधित केले. ते म्हणाले, “२२ सप्टेंबर रोजी सूर्योदयासह जीएसटी बचत महोत्सव सुरू होईल. समाजातील सर्व घटकांना याचा फायदा होईल.” पंतप्रधानांनी जनतेला फक्त देशवासीयांच्या कठोर परिश्रमातून बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले.
२० मिनिटांच्या आपल्या भाषणात पंतप्रधानांनी जीएसटी सुधारणा, स्वावलंबी भारत आणि स्वदेशी यावर भर दिला. त्यांनी राज्य सरकारांना स्वदेशी मोहिमेसह उत्पादनाला गती देण्याचे आणि गुंतवणुकीसाठी वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले. केंद्र आणि राज्ये एकत्र पुढे गेली, तरच हे स्वप्न पूर्ण होईल.

पंतप्रधान मोदींचे भाषण: ५ महत्त्वाचे मुद्दे

नेक्स्ट जनरेशन जीएसटीवर: नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देश आत्मनिर्भर भारत मोहिमेकडे एक मोठे पाऊल टाकत आहे. उद्या, २२ सप्टेंबर रोजी सूर्योदयाच्या वेळी पुढील पिढीचा जीएसटी लागू केला जाईल. एक प्रकारे, उद्या देशभरात जीएसटी बचत महोत्सवाची सुरुवात आहे. या जीएसटी महोत्सवादरम्यान तुमची बचत वाढेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार वस्तू खरेदी करता येतील.

एक राष्ट्र, एक कर: २०१४ मध्ये जेव्हा देशाने मला पंतप्रधान म्हणून निवडले, तेव्हा विविध करांच्या चक्रव्यूहामुळे लाखो कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागला. एका शहरातून दुसऱ्या शहरात वस्तूंच्या वाहतुकीच्या वाढत्या खर्चाचा भार गरिबांवर पडला. देशाला या परिस्थितीतून बाहेर काढणे आवश्यक होते. २०१४ मध्ये तुम्ही आम्हाला संधी दिली, तेव्हा आम्ही जीएसटीला प्राधान्य दिले. आम्ही भागधारक आणि राज्यांशी बोललो. आम्हाला प्रत्येक समस्येवर उपाय सापडले. एक राष्ट्र, एक कर हे स्वप्न सत्यात उतरले.

गरीब आणि मध्यमवर्गीय: गेल्या ११ वर्षांत देशातील २५ कोटी लोकांनी गरिबीवर मात केली आहे. हे लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत आणि नवीन मध्यमवर्गीय म्हणून त्यांची भूमिका बजावत आहेत. या वर्षी सरकारने १२ लाख रुपयांची आयकर सवलत दिली आहे. मध्यमवर्गीयांच्या जीवनात किती बदल झाला आहे याची कल्पना करा. आता गरिबांचीही वेळ आहे. त्यांना दुहेरी वरदान मिळत आहे. जीएसटीमध्ये कपात झाल्यामुळे त्यांना घरे, टीव्ही, रेफ्रिजरेटर, बाईक आणि स्कूटर घेण्यावर कमी खर्च करावा लागेल. प्रवास देखील स्वस्त होईल.

सूक्ष्म आणि लघु उद्योगांवर: विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी सूक्ष्म आणि लघु उद्योगांनी स्वावलंबी बनले पाहिजे. भारताला स्वावलंबी बनवण्यात एमएसएमईचीही मोठी जबाबदारी आहे. देशाला जे काही आवश्यक आहे, जे काही देशांतर्गत उत्पादित करता येते ते आपण देशांतर्गत उत्पादित केले पाहिजे. जीएसटी दरांमध्ये कपात आणि नियम आणि प्रक्रिया सुलभ केल्याने एमएसएमईंना मोठा फायदा होईल.

त्यांची विक्री वाढेल आणि त्यांना कमी कर भरावा लागेल. त्यांना दुप्पट फायदा देखील होईल. एमएसएमईकडून मला खूप अपेक्षा आहेत. जेव्हा भारत प्रगतीच्या शिखरावर होता, तेव्हा एमएसएमई हा त्याचा पाया होता. भारतात उत्पादित होणाऱ्या वस्तूंचा दर्जा हा एकेकाळी उत्कृष्ट असायचा. आपल्याला तो अभिमान परत मिळवायचा आहे. आपली उत्पादने जगातील सर्वोत्तम असली पाहिजेत.

स्वदेशी – स्वावलंबी भारतावर: मी सर्व राज्य सरकारांना स्वदेशी मोहिमेसह उत्पादनाला गती देण्याचे आवाहन करतो. गुंतवणुकीसाठी वातावरण निर्माण करा. केंद्र आणि राज्ये एकत्र येऊन पुढे जातील तेव्हाच हे स्वप्न पूर्ण होईल. आपण जे काही उत्पादन करतो ते जगातील सर्वोत्तम असले पाहिजे आणि उत्पादनाच्या गुणवत्तेने जगात भारताचा अभिमान वाढवला पाहिजे. ज्याप्रमाणे देशाचे स्वातंत्र्य स्वदेशीच्या मंत्राने बळकट झाले, त्याचप्रमाणे स्वदेशी देशाच्या समृद्धीला बळ देईल.

दररोजच्या वस्तू परदेशी आहेत; आपण त्यापासून स्वतःला मुक्त केले पाहिजे. आपण मेड इन इंडिया वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. आपण प्रत्येक घराला स्वदेशीचे प्रतीक बनवले पाहिजे. प्रत्येक दुकान स्वदेशीने सजवले पाहिजे. अभिमानाने म्हणा की ही स्वदेशी आहे. अभिमानाने म्हणा की मी स्वदेशी खरेदी करतो आणि विकतो. ही प्रत्येक भारतीयाची वृत्ती बनली पाहिजे.

नाटक, लावणी, गाण्यांनी उद्यापासून रंगणार “कोथरूड नवरात्र महोत्सव” – संदीप खर्डेकर व विशाल भेलके यांची माहिती.

पुणे: सकाळी कोथरूड च्या डी पी रस्त्यावर भेलकेवाडी, श्री.गणेशकृपा सोसायटी समोर, डि.पी रोड परांजपे शाळेजवळ कोथरूड येथे वाघजाई देवीच्या घटस्थापनेने कोथरूड नवरात्र महोत्सव सुरु होणार असून याही वर्षी उत्तमोत्तम कार्यक्रमांच्या सादरीकरणाने या महोत्सवाची रंगत वाढणार असल्याचे नवरात्र उत्सवाचे संयोजक क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके आणि उमेश भेलके यांनी सांगितले.
यावर्षीच्या सांस्कृतिक महोत्सवात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शुक्रवार 26 सप्टेंबर रात्रौ 9 वाजता जितेंद्र भुरूक यांचे हिट्स ऑफ आर डी बर्मन हा कार्यक्रम सादर होणार असून
शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी लोकप्रिय कलावंत प्रशांत दामले यांचे “शिकायलो गेलो एक” हे नाटक सादर होणार आहे तर रविवारी दुपारी 12 वाजता पूनम कुडाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे “तुमच्यासाठी काय पण” हा दर्जेदार लावण्यांचा कार्यक्रम सादर होणार असल्याचे सांस्कृतिक महोत्सवाच्या प्रमुख संयोजिका व मा. नगरसेविका सौ.मंजुश्री खर्डेकर आणि सौ. श्वेताली भेलके यांनी दिली.
तसेच हा उत्सव कोजागिरी पर्यंत साजरा केला जाणार असून यात विविध संस्थांना आवश्यक साहित्याची भेट, रास दांडिया, बाल जत्रा असे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे ही मंजुश्री खर्डेकर व श्वेताली भेलके यांनी सांगितले.
देवी पुढे ढोल पथकाचे स्थिर वादन होणार असून महिलांची महा आरती वा भोंडला देखील होणार असल्याचे उमेश भेलके व सौ.अक्षदा भेलके यांनी सांगितले.
या महोत्सवात सादर होणारे सर्व कार्यक्रम मोफत असून मोफत प्रवेशिकांसाठी संदीप खर्डेकर यांच्याशी 9850999995,
विशाल भेलके यांना 9011023023 तर उमेश भेलके यांना 9890154050 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.