अपघातातील जखमींवर तातडीने उपचार सुरु; मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत
मुंबई, दि. 11 :- पुणे जिल्ह्यातील पाईट (ता. खेड) येथे श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात असताना महिलांना घेऊन जाणारी पिकअप गाडी खोल दरीत कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत, तसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या माता-भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करत, या कठीण प्रसंगात शासन त्यांच्या सोबत ठामपणे उभे असल्याचा विश्वास, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
आपल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, पाईट येथे झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासन, पोलीस व आरोग्य विभागाने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत व उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत व बचावकार्य वेगाने पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्य शासन या संकटाच्या काळात अपघातग्रस्त नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार दिली आहे.
पुणे- जिल्ह्यातल्या कुंडेश्वर येथे महादेवाच्या दर्शनाला जाणारी पिकअप व्हॅन उलटून 9 महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या अपघातामध्ये जवळपास 35 भाविक जखमी झाल्याचे समजते.पुणे जिल्ह्यातल्या राजगुरूनगर तालुक्यात पाईट येथील कुंडेश्वर येथे महादेवाचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. श्रावणी सोमवारनिमित्त येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. या भाविकांच्या व्हॅनचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
पुणे जिल्ह्यात पाईट नावाचे गाव आहे. येथील कुंडेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. पुण्यापासून साधारणतः दीड तासाच्या अंतरावर निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर असून, येथे भाविकांची मोठी गर्दी असते. श्रावणी सोमवारचे निमित्त साधून आज सकाळी अकराच्या सुमारास भाविकांची एक व्हॅन कुंडेश्वर येथे निघाली होती. मात्र, चालकाचे भरधाव वेगात असलेल्या वाहनावरील नियंत्रण सुटून ते दरीत कोसळले. वाहनाने तब्बल पाच-सहा पलट्या खाल्ल्या. रस्त्यावर रहदारी असल्याने तातडीने स्थानिक लोकांनी खासगी वाहने व 10 हून अधिक ॲब्युलेन्सद्वारे अपघातग्रस्त महिलांना रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच 7 महिलांचा जागीच मृत्यु झाला , तर दोन जणींचा रुग्णालयात नेले असताना वाटेतच मृत्यू झाला. सध्या 35 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.घाट चढताना अचानक व्हॅन मागे आली. त्यामुळे ही घटना घडल्याचे समजते. अपघातामधील मृत आणि जखमी भाविक पापळवाडी येथील असल्याचे समजते. यातील जखमींवर सध्या पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मदतीसाठी स्थानिकांनी धाव घेतली. त्यामुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळाले. अपघाताच्या घटनेचा खेड पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
इंडिया आघाडीच्या वतीने मतदान चोरीचा आरोप करत संसद ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये असंख्य खासदार सहभागी झाले असून, महाराष्ट्रातील काही खासदारांचा समावेश आहे. या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांसह अनेकांना अटक करण्यात आली. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून विरोधकांची मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
आमची ही लढाई शांततेच्या मार्गाने सुरू राहील, असे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. तर आम्ही मोर्चावर ठाम असून, आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे खासदार नीलेश लंके म्हणाले. दरम्यान, या मोर्चावरून भाजप नेते राम कदम यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
बिहारमध्ये होणाऱ्या निवडणूक याद्यांच्या विशेष सघन सुधारणा (SIR) आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत “मतदार फसवणूक” झाल्याच्या आरोपांविरुद्ध निषेध करण्यासाठी संसदेपासून भारतीय निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सुमारे 300 खासदार सहभागी झाले आहेत. सध्या मोर्चा पोलिसांनी अडवला असून आंदोलकांना संसद पोलिस ठाण्यात नेले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक नेते सामील झाले आहेत.
#WATCH | Delhi: NCP SCP MP Supriya Sule says, "We are protesting peacefully. We consider Mahatma Gandhi as our ideal…"
Delhi Police detained INDIA bloc MPs, including Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra, Sanjay Raut, and Sagarika Ghose, among others, who were protesting… pic.twitter.com/tv6R2KgKEM
मोर्चात सहभागी झालेल्या सुप्रिया सुळे यांनी वृत्त संस्थेशी बोलताना म्हटले की, आमची लढाई ही शांतीच्या मार्गाने सुरू राहील. तसेच आम्ही महात्मा गांधींना आदर्श मानतो. त्यामुळे त्यांच्या तत्त्वानुसार आम्ही पुढील लढाई लढणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.खासदार नीलेश लंके म्हणाले की, आम्ही मोर्चावर ठाम आहोत. लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार आहे. प्रत्येक खासदार हा लोकशाही पद्धतीने निवडून आलेला आहे. त्यामुळे खासदाराला निवडणूक आयोगात नेऊन त्याची भेट घडवून दिली पाहिजे. राहुल गांधी, प्रियांका गांधींसह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस अटक करणार असले, तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत, असेही त्यांनी म्हटले.
#WATCH | Delhi: Shiv Sena (UBT) MP Priyanka Chaturvedi says, "The Election Commission of India is worried. They cannot meet with elected representatives because they lack answers to our questions… Are we thieves? Are we talking against the interest of the country?…" pic.twitter.com/9wIovXIOPo
खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “भारतीय निवडणूक आयोग घाबरलेला आहे. ते निवडून आलेल्या प्रतिनिधींना भेटू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे आमच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. आम्ही मतचोरी प्रकरणी अनेक प्रश्न मुद्देसूद उपस्थित केले आहे. भाजपच्या निर्देशानुसार, मतांची हेराफेरी आणि चोरी होत आहे. त्यावर आम्ही प्रश्न विचारत आहोत. आम्ही चोर आहोत का? आम्ही देशाच्या हिताच्या विरोधात बोलत आहोत का?…”
महावितरण मोबाईल ॲप व संकेतस्थळावर ऑनलाईन सेवा उपलब्ध
पुणे, दि. ११ ऑगस्ट २०२५ – खरेदी-विक्री, बक्षीस पत्र, मृत्यू, वारसा आदी कारणांमुळे मिळकतीच्या मालकी हक्कात/नावात बदल होत असतो. तसाच बदल वीजग्राहकाला त्याच्या वीजबिलावरील नावातही करावा लागतो. ‘नावात बदल’ करण्यासाठी वीजग्राहकांना आता घरबसल्या व ऑनलाईन अर्ज करता येतो. त्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. महावितरणच्या मोबाईल ॲपवर व wss पोर्टलवर ही सुविधा २४ तास उपलब्ध आहे.
महावितरणच्या बहुतांश ग्राहक सेवा मोबाईल ॲप व संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ग्राहकाला स्वत:चा ‘युजर नेम’ आयडी तयार करुन घरबसल्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेता येतो. नवीन कनेक्शनसाठी अर्ज करणे, वीजबिल पाहणे, भरणे, तक्रारी नोंदवणे, त्याचा पाठपुरावा करणे, रिडींग नोंदवणे, वीजबिल भार कमी/जास्त करणे, जुन्या बिलांचा इतिहास, बिल कॅलक्युलेटर यांसह नावात बदल करणे ही प्रमुख सुविधा देखील मोबाईल ॲप तसेच https://wss.mahadiscom.in/wss/wss या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत.
महावितरणचे राज्यभरात सुमारे तीन कोटींहून अधिक ग्राहक आहेत. तसेच दरवर्षी काही लाख ग्राहकांची भर त्यात पडते. खरेदी-विक्री, बक्षीस पत्र, मृत्यू, वारसा, विभक्त कुटुंब पध्दती आदींमुळे मिळकतीचे नावे बदल असतात. मालकी हक्कात नाव बदलल्यास इतर विभागाप्रमाणे वीजबिलाच्या नावात बदल करणेही गरजेचे असते. त्यासाठी पूर्वी कार्यालयात जाणे अपरिहार्य होते. विविध अर्जासोबत ‘प्रपत्र उ’ भरावे लागे. तर पुराव्यासाठी बरीच कागदपत्रे जोडावी लागायची. ‘प्रपत्र उ’ मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. मिळकतीचे नाव बदलल्याचा पुरावा व सुरक्षा ठेव नवीन ग्राहकांच्या नावे करण्यासाठी ‘Form X’ याचा फोटो काढून अपलोड केला की नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होते. येणाऱ्या बिलामध्ये नाव बदलून येते.
ॲप नोंदणी कशी कराल…
महावितरण ॲप इन्स्टॉल केल्यास सर्वप्रथम भाषा निवडावी नोंदणी करण्यासाठी सदस्य बना/ Don’t have account sign up वर क्लिक करावे. त्यानंतर 12 अंकी वीजग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल, प्रवेशाचे नाव (Login ID) व पासवर्ड टाकून नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर login केल्यास सर्व परवानग्या (permissions) स्विकाराव्यात म्हणजे आपले ॲप विनासायस काम करु शकेल.
नावात बदल करण्यासाठी…
ॲपच्या डाव्या कोपऱ्यात सेवांची लिंक दिली आहे. त्यात बरेच पर्याय आहेत. पैकी ‘नाव बदलाची मागणी’ पर्याय निवडावा. ग्राहक क्रमांक निवडल्यास ‘प्रपत्र उ’ येते. बदल करावयाची किंवा नविन मालकाची माहिती भरावी. बदलाचे कारण निवडून अटी मान्य कराव्यात व पुढे जाऊन मिळकतीचा पुरावा व Form x चा फोटो काढून अपलोड करावा. माहिती अपलोड होताच नोंदणी क्रमांक मिळतो.
मोबाईल ॲप व संकेतस्थळाच्या माध्यमातून महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. वीजग्राहकांनी घरबसल्या या सेवांचा लाभ घेऊन आपले श्रम व वेळ वाचवावा.
पुणे, 11 ऑगस्ट 2025: सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या कै. विनायक निम्हण स्मृती करंडक ५९व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात प्रशांत मोरे याने तर, महिला गटात केशर निर्गुण यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
गोविंदा गार्डन मंगल कार्यालय, सोमेश्वर कॉर्नर, बाणेर, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात अंतिम फेरीत दोन वेळच्या जागतिक विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेने मुंबईच्या विकास धारियाचा 24-10, 25-00 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 3ऱ्या व 4थ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या जाईद फारुकीने रत्नागिरीच्या रियाज अलीचा 24-11, 23-20 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
महिला गटात अंतिम फेरीत सिंधुदुर्गच्या केशर निर्गुण हिने ठाण्याच्या समृद्धी घडीगावकरचा 22-17, 24-14 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. 3ऱ्या व 4थ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या सोनाली कुमारीने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरचा 00-25, 22-17, 20-15 असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले.
यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव म्हणाले की, कॅरम खेळताना चौकस बुद्धी, एकाग्रता खूप महत्वाची असते. दिवसेंदिवस या खेळाचा प्रसार वाढत चालला असून या खेळाची लोकप्रियता देखील अशा स्पर्धांमुळे वाढत चालली आहे.
सनी निम्हण म्हणाले की, भविष्यात देखील कॅरमच्या स्पर्धा आम्ही सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने सातत्याने आयोजित करण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहू.
मिलिंद दिक्षित म्हणाले की, कॅरम खेळाशी कोणत्या ना कोणत्या गोष्टीने मी नेहमीच जोडला गेलेलो आहे. कॅरमला आता स्पर्धात्मक स्वरूप तर प्राप्त झाले आहेच. पण व्यावसायिकता देखील यामध्ये आली आहे. सनी निम्हण यांच्या पुढाकाराने अशा स्पर्धेमुळे आणखी गुणवान खेळाडू घडतील आणि जागतिक स्तरावर आणखी आपले नाव उंचावतील याची मला नक्कीच खात्री आहे.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व माजी नगरसेवक सनी निम्हण, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्याचे सहाय्यक आयुक्त मिलिंद दिक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीएचे चेअरमन भरत देसलडा, उपाध्यक्ष धनंजय साठे, मानद सचिव अरुण केदार, केतन चिखले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया कुणाल यांनी केले.
सध्या सर्वत्र चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांच्या प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट लवकरच म्हणजेच १२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या भव्य चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांचा अप्रतिम अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टर आणि टीझरने प्रेक्षकांमध्ये आधीच प्रचंड उत्सुकता निर्माण केली असतानाच, आता या चित्रपटातील पहिलं गाणं ‘आवशीचो घो’ नुकतंच प्रदर्शित झालं असून या आगळ्यावेगळ्या गाण्याने कोकणच्या मातीचा गंध सोबत आणला आहे. अनेकांना शिवी वाटणारा हा शब्द खरंतर लाडाने वापरला जाणारा शब्द आहे. मालवणी भाषेत आईला प्रेमाने आवशी आणि नवऱ्याला घो असं म्हणतात. म्हणूनच आईच्या नवऱ्याला म्हणजेच वडीलांना प्रेमाने ‘आवशीचो घो’ म्हणायची पद्धत आहे. दशावतार चित्रपटातलं हे गाणं सुद्धा बाप आणि मुलाच्या अनोख्या नात्याबद्दल आहे.
दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं, वडील आणि मुलामधील नात्याचं एक अजब रसायन दाखवणारं आहे. हे गाणं वर वर पाहता मिश्किल किंवा गंमतीशीर वाटत असलं तरी ते गाणं बाप – मुलाच्या नात्याचं सारच मांडतं. विशेष म्हणजे यात कधी कधी मुलगा वडिलांची जबाबदारी घेणारा ‘वडील’ बनतो आणि वडील त्याचे ‘मूल‘ होतात. बाप मुलाच्या नात्याचं हळूवारपण उलगडणारं हे गाणं गुरु ठाकूरच्या समृद्ध लेखणीतून उतरलं असून, संगीत दिग्दर्शक ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर ओंकारस्वरुप याने ते गायलं आहे.
या गीताबद्दल गीतकार गुरु ठाकूर म्हणतात की, ‘’बाप आणि मुलगा यांच्यातील मैत्रीचं नातं मिश्किल आणि खट्याळ अंदाजात सादर करणारं गाणं आजवर कधीच झालं नव्हतं. ‘आवशीचो घो’ या गाण्यामुळे ते लिहिण्याची संधी मला मिळाली. मालवणी बोलीतील शब्दांचा गोडवा, ए. व्ही. यांच्या संगीताची जादू आणि पडद्यावर दिलीपजी आणि सिद्धार्थ यांचा अफलातून परफॉर्मन्स यांनी या गाण्याला वेगळं परिमाण दिलं आहे.’’
चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणतात, ” आवशीचो घो’ हे गाणं वडील-मुलामधील नात्याची वीण अत्यंत लोभसपणे अधोरेखित करतं. हे गाणं प्रत्येकाला आपल्या वडिलांच्या जवळ नेणारं, आणि हसताहसताही प्रत्येकाच्या मनाला भिडणारं असं हे गाणं आहे. वडील मुलाच्या नात्यातील प्रेम, ताण, समज-गैरसमज आणि काळानुसार बदलणारी जबाबदारी हे सगळं या एका गाण्यातून सहजतेने दाखवणं हे मोठं आव्हान होतं. परंतु गुरु ठाकूर, ए व्ही प्रफुल्लचंद्र आणि गायक ओंकार स्वरूप या सगळ्या टीमने ते उत्तमरित्या पार पाडलं. पडद्यावरही ते नातं सिद्धार्थ मेनन आणि दिलीप प्रभावळकर यांच्या केमिस्ट्रीतून कमाल उतरलंय!”
झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले, ” ‘दशावतार’मध्ये प्रेक्षकांना भावनिक आणि कलात्मक अशा विविध थरांवरचा अनुभव मिळणार आहे. ‘आवशीचो घो’ हे गाणं या प्रवासातील एक भावपूर्ण वळण आहे. संगीत, शब्द आणि अभिनयाचं कमाल सादरीकरण यामुळे हे गाणं सर्व वयोगटांसाठी रिलेटेबल ठरणारं आहे.”
निर्माते सुजय हांडे म्हणतात, ”जेव्हा आम्ही हे गाणं प्लॅन केलं, तेव्हा आमचा उद्देश फक्त धमाल गाणं देणं हा नव्हता तर नात्यांची गुंतागुंत आणि सहजता दाखवणं होता. दिलीपजी आणि सिद्धार्थ यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांनी याला वेगळ्या उंचीवर नेलं आहे.”
‘दशावतार’चा टीझर पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आता ‘आवशीचो घो’ गाण्याने या चित्रपटातील भावनिक बाजूही उलगडायला सुरुवात झाली आहे. धमाल आणि हृदयस्पर्शी भावनांचं हे सुंदर मिश्रण प्रेक्षकांना नक्की भावेल, अशी आशा आहे.
पुणे- शहरातील कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या कंत्राटदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चंदर पिराजी मोहिते (वय 56) या कंत्राटदाराने मध्यरात्री कात्रज घाटातील अन्विषा लॉजमागील झाडाला गळफास घेऊन जीव दिला.
मोहिते यांच्या पत्नी शकुंतला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यावसायिक संतोष चोरगे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
चंदर मोहिते हे गृहप्रकल्पातील रंगकामाचे कंत्राट घेत असत. चोरगे यांनी त्यांना तीन गृहप्रकल्पात रंगकाम करण्याचे काम दिले होते. या कामाच्या बदल्यात चोरगे यांनी मोहिते यांना एक सदनिका आणि साडेदहा लाख रुपये देण्याचे मान्य केले होते.
मोहिते यांनी परिचितांकडून हातउसने पैसे घेऊन तीनही गृहप्रकल्पांचे रंगकाम पूर्ण केले. मात्र, व्यवहारात ठरल्यानुसार चोरगे यांनी मोहिते यांना पैसे आणि सदनिका दिली नाही. मोहिते यांनी रंगकामाचे पैसे मागितले असता चोरगे यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.
शिवीगाळ आणि आर्थिक फसवणुकीमुळे मानसिक तणावात असलेल्या मोहिते यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नीने फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस. आवारे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
राज्यात भाजपा महायुतीचे लुटेरे सरकार; ४० टक्क्यांने वसुली सुरु: विजय वडेट्टीवार
केंद्रात व राज्यात काँग्रेस व राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू: बाळासाहेब थोरात.
पुणे दि. ११ ऑगस्ट २०२५ काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून काँग्रेस विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. काँग्रेसकडे सक्षम व समर्थ नेतृत्व व कार्यकर्ते आहेत. तर भाजपा दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते खाणारी चेटकीण आहे. मुख्यमंत्र्याच्या आजूबाजूला व मंत्रीमंडळाकडे पाहिले तर काँग्रेसचेच लोक दिसतात. एक कोटी सदस्य व मोदींसारखे नेतृत्व आहे म्हणतात पण ते नेतृत्व सक्षम नसून पोकळ आहे म्हणूनच त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घ्यावे लागत असून ही शोकांतिका आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे खडकवासला येथे उद्घाटन झाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार,विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, यू बी. व्यंकटेश, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेबद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली असून प्रत्येक कार्यकर्ता प्रशिक्षित असावा हा त्यामागचा उद्देश आहे. यात orientation, introduction, आणि interaction ही त्रिसुत्री असणार आहे. दोन दिवस वरिष्ठ नेते व विविध विषयातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत आगामी काळातील कार्यक्रमांची रुपरेषा ठरवली जाईल व कृती कार्यक्रम आखण्यात येणार आहे. निवडणुकीपुरते जागे व्हायचे आणि निवडणुकीनंतर सर्व संपले असा काँग्रेसचा विचार नसून काँग्रेस हा नितंरत चालणारा व स्वराज्याच्या दिशेने कुच करणार पक्ष आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, आपल्या समोर आव्हाने खूप आहेत, काँग्रेसने सत्ता सर्वोच्च कधीच मानली नाही, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाज घटकांना नजरेसमोर ठेवून काम केले पण भाजपा मात्र फक्त दोन उद्योगपतींसाठी सरकार चालवत आहे. सत्ता ही सामान्य माणसांसाठी असली पाहिजे. लोकांना जोडण्याचे काम करा, तुमची ओळख कामाने, कर्तृत्वाने निर्माण करा. घराघरात जा व लोकांच्या अडचणी, समस्या, प्रश्न जाणून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित नेहरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन काम करा. राज्यात भाजपा युतीचे लुटेरे सरकार आहे. भाजपाकडे प्रचंड सत्ता, ईडी व सीबीआय आहे. प्रचंड लुट सुरु असून ४० टक्क्यांचे कमिशन लाटले जात आहे .
ज्येष्ठ नेते व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महात्मा गांधी, पंडित नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे आपण वारस आहोत. काँग्रेसला बलिदानाचा इतिहास आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. काँग्रेस पक्षाने कठीण काळ पाहिलेला आहे व पराभवही पाहिलेला आहे पण यातूनही काँग्रेस पक्षाने उभारी घेतली व पुन्हा विजय संपादन केला. राज्यातील सरकारचा कारभार भयानक आहे, विधान भवनात घुसुन मारहाण होते, कँटिनमध्ये आमदार मारामारी करतो तर कोण गोळीबार करतो, भ्रष्टाचार बोकाळला आहे. पण आपल्याला जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घ्यावे लागतील. बँकिंगचे विषय आहेत, शेतकऱ्यांचे विषय आहेत. नाफेडमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हे मुद्दे घेऊन आपल्याला काम करावे लागणार आहे. जनता आपल्याबरोबर आहे, त्यांची कामे करा व काँग्रेस विचाराचे, राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनीही मार्गदर्शन केले.
पहिल्या दिवसाची सुरुवात सकाळच्या सामुहिक प्रार्थनेने करण्यात आली, त्यानंतर झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होऊन सहा महिने झाले, या सहा महिन्यातील कार्य अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे व एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांचा सत्कार करण्यात आला.
मुंबई-ठाणे-घोडबंदर महामार्गावर सुरू असलेल्या खड्डे दुरुस्तीमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीने आणखी एका महिलेचा बळी घेतला. पालघर जिल्ह्यातील सफाळे (मधुकर नगर) येथील छाया कौशिक पुरव यांना घेऊन जाणारी ॲम्ब्युलन्स मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरार-वसई ते घोडबंदरपर्यंतच्या प्रचंड वाहतूक कोंडीत अडकली. यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
छाया पुरव या मूळच्या पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील होत्या, पण मुंबईतील माहीम कोळीवाडा येथे राहत होत्या. ३० जुलै रोजी सुट्टीसाठी त्या आपल्या गावी आल्या होत्या. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ झाडांच्या फांद्या कापण्याचे काम सुरू असताना अचानक एक झाड कोसळले आणि त्या गंभीर जखमी झाल्या. सुरुवातीला त्यांना पालघरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक गंभीर झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.
मुंबईकडे जात असताना घोडबंदर महामार्गावर दुरुस्ती कामांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे ॲम्ब्युलन्सला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तात्काळ मिरा रोड येथील ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
जर ॲम्ब्युलन्स वेळेत पोहोचली असती, तर छाया पुरव यांचे प्राण वाचले असते, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये तीव्र संताप असून, महामार्गावरील दुरुस्तीच्या कामांचे नियोजन आणि वाहतूक व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विक्रोळी येथील पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. निखिल चोरगे असे या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. निखिलला ताप आल्याने रुग्णालयातून औषध दिल्यानंतर त्याला उलट्या झाल्या. त्याला पुन्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकारामुळे रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झाली असून, नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
नवी दिल्ली-दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ३०० खासदाराना आता सोडून दिले आहे.
सोमवारी, मतदार पडताळणी आणि निवडणुकीत मत चोरीच्या आरोपांवरून संसदेतून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत ३०० विरोधी खासदारांनी मोर्चा काढला. यादरम्यान, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांना संसद मार्ग पोलिस ठाण्यात नेले, तेथून त्यांना २ तासांनंतर सोडण्यात आले.निषेधादरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिताली बाग यांची प्रकृती बिघडली आणि त्या बेशुद्ध पडल्या. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर खासदारांनी मदत केली. यापूर्वी, या मुद्द्यावर दोन्ही सभागृहात प्रचंड गोंधळ झाला आणि कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. जे दुपारी २ वाजता पुन्हा सुरू झाले.संसदेच्या मकर द्वार येथून मोर्चा सुरू झाला. खासदारांच्या हातात ‘सेव्ह व्होट’चे बॅनर होते. तथापि, दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की इंडिया ब्लॉकने मोर्चासाठी कोणतीही परवानगी मागितली नव्हती, म्हणून निवडणूक आयोगाकडे जाण्यापूर्वी, वाहतूक भवनाजवळ बॅरिकेड्स लावून मोर्चा थांबवण्यात आला.नंतर अखिलेश यांनी बॅरिकेड्स ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा खासदारांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली नाही तेव्हा ते जमिनीवर बसले. प्रियंका, डिंपल यांच्यासह अनेक खासदार ‘वोट चोर गड्डी छोड’च्या घोषणा देत असल्याचे दिसून आले.
पुणे : पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या ‘हर घर तिरंगा’या उपक्रमाअंतर्गत तसेच महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त शौर्य गाजविणाऱ्या माजी सैनिकांचा बुधवारी गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रम बुधवार, दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. माजी सैनिकांचा गौरव महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते करण्यात येणार असून अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., एम. जे. प्रदीपचंद्रन, ओमप्रकाश दिवटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या निमित्ताने देशभक्तीपर हिंदी, मराठी गीतांचा ‘माँ तुझे सलाम’हा विशेष कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची असून सूत्रधार निकिता मोघे आहेत तर केतकी महाजन-बोरकर संयोजन करीत आहेत. जितेंद्र भुरुक, गणेश मोरे, अश्विनी खुरपे, आकाश सोळंकी गीते सादर करणार असून रशिद शेख, सुनील जाधव, बाबा खान, रोहित जाधव, सोमनाथ फाटक, सुनील साळवी साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागातर्फे आयोजित करण्यात आला आहे. पुणेकर रसिकांसाठी कार्यक्रम विनामूल्य आयोजित करण्यात आला असून रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ आणि प्रशासन अधिकारी राजेश कामठे यांनी दिली.
· आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सर्वसमावेशक राउंड-ट्रिप भाडे 12,310 रुपयांपासून
· सवलत मूल्याची सवलत 15 ऑगस्टपर्यंत
· थेट ऑनलाइन बुकिंग केल्यास कोणतेही सुविधा शुल्क नाही आणि अतिरिक्त सवलती
गुरुग्राम, 10 ऑगस्ट 2025: एअर इंडियाने ‘नमस्ते वर्ल्ड’ प्रमोशनल सेल सुरू केला आहे. या अंतर्गत एअरलाइनच्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर तिकिटाचे सर्वसमावेशक आकर्षक दर उपलब्ध आहेत. या विशेष ऑफरचा भाग म्हणून, देशांतर्गत एकेरी प्रवासासाठी 1,499 रुपयांपासून तिकीट दर सुरू होतात तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी दुहेरी प्रवासाचे तिकीट दर 12,310 रुपयांपासून सुरू होतात.
दरातील ही सवलत 15 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 23:59 वाजेपर्यंत लागू असेल. या सवलत मूल्यांतर्गत बूक केलेल्या तिकिटांवर 31 मार्च 2026 पर्यंत प्रवास करता येईल. इंटरनॅशनल सेल पॉईंट्सवरही ही तिकिटे बूक करता येतील. तेथे संबंधित देशाचे तिकीट दर स्थानिक चलनांमध्ये दिलेले आहे.
पहिल्या दिवशी वेब-एक्सक्लुझिव्ह
‘नमस्ते वर्ल्ड’ सेल हा 10 ऑगस्ट 2025 रोजी केवळ एअर इंडियाच्या वेबसाइट आणि मोबाइल ऍपवर उपलब्ध असेल. त्यानंतर, या सेल अंतर्गत तिकिटांचे बुकिंग एअर इंडिया वेबसाइट, मोबाइल ऍप, विमानतळावरील तिकीट खिडक्या, ग्राहक संपर्क केंद्र आणि ट्रॅव्हल एजंट यासह अन्य सर्व चॅनेलवर उपलब्ध असेल.
थेट बुकिंगचे फायदे
एअर इंडियाची वेबसाइट आणि मोबाईल ऍपवरून तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांना हा सेल सुरू असतानाच्या काळात कोणतेही सुविधा शुल्क भरावे लागणार नाही. याव्यतिरिक्त, FLYAI हा प्रोमो कोड वापरून प्रवासी प्रति व्यक्ती INR 1,000 पर्यंत बचत करू शकतात, तसेच VISAFLY या प्रोमो कोडचा वापर करून व्हिसा कार्डद्वारे पेमेंट केल्यास प्रति प्रवासी ₹2,500 पर्यंत सूट मिळू शकते.
व्हिसा कार्डवरील ऑफर्स
प्रवास
सवलत
प्रोमो कोड
देशांतर्गत (एकेरी)
थेट INR 250 ची सवलत
VISAFLY
देशांतर्गत (दुहेरी)
INR 500 ची सवलत
आंतरराष्ट्रीय (एकेरी)
INR 1,500 पर्यंत सवलत
आंतरराष्ट्रीय (दुहेरी)
INR 2,500 पर्यंत सवलत
विशेष सहाय्यक ऑफर्ससह प्रवासाचा उत्तम अनुभव
‘नमस्ते वर्ल्ड’ सेलला पूरक म्हणून, लोकप्रिय सहाय्यक सेवांवर एअर इंडिया विशेष डील देखील देत आहे. यामुळे प्रवाशांना अनोख्या किमतीत अनेक सुविधांसह प्रवासाचा आनंद घेता येईल. एअर इंडियाने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना प्रीपेड बॅगेजवर 60% पर्यंत सूट मिळेल तर पसंतीच्या आणि अतिरिक्त लेगरूमच्या सीट निवडीवर 15% पर्यंत सूट मिळू शकेल. एअर इंडियाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष चॅनेलच्या माध्यमातून बुकिंगवर या ऑफर मिळतील. यामुळे सवलत मूल्यात अधिक आराम आणि सुविधा मिळतील.
आंतरराष्ट्रीय मार्गांवरील दुहेरी प्रवास, तिकीट दरांचा अंदाज
(भारतातून बाहेर प्रवास, नमुनादाखल यादी)
सेक्टर
चलन
इकॉनॉमी
प्रीमियम इकॉनॉमी
बिझनेस
भारत-यूके
INR
44,500
95,000
1,43,000
भारत-युरोप
INR
44,000
75,531
1,30,000
भारत-कॅनडा
INR
62,199
NA
1,77,399
भारत-ऑस्ट्रेलिया
INR
51,317
NA
1,63,291
भारत-यूएसए
INR
49,635
1,05,666
1,90,666
भारत-श्रीलंका
INR
12,310
23,130
22,050
भारत-यूएई
INR
18,060
22,300
58,650
भारत-सिंगापूर
INR
14,020
23,760
43,260
भारत-थायलंड
INR
21,030
24,370
62,350
भारत-इंडोनेशिया
INR
46,910
69,570
1,58,980
भारत-मलेशिया
INR
22,180
25,720
62,640
भारत-जपान
INR
38,070
NA
1,56,970
आंतरराष्ट्रीय मार्गांवरील सर्वसमावेशक दुहेरी तिकिटांच्या दराचा अंदाज
(भारतातील प्रवास, नमुनादाखल यादी)
सेक्टर
चलन
इकॉनॉमी
प्रीमियम इकॉनॉमी
बिझनेस
यूके – भारत
GBP
440
685
1,530
युरोप-भारत
EUR
423
708
1,350
कॅनडा- भारत
CAD
1,059
NA
2,879
ऑस्ट्रेलिया- भारत
AUD
830
NA
3,898
यूएसए-भारत
USD
541
1,122
2,847
यूएई-भारत
AED
730
810
2,350
सिंगापूर -भारत
SGD
212
358
716
थायलंड-भारत
THB
7,780
8,580
26,880
इंडोनेशिया-इंडिया
IDR
86,85,000
1,47,98,000
2,97,01,000
मलेशिया-भारत
MYR
1,180
1,280
3,130
जपान-इंडिया
JPY
70,100
2,10,800
2,81,400
या सेलमध्ये मर्यादित जागा आहेत आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्या उपलब्ध आहेत. याशिवाय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील निवडक मार्गांसाठी हा सेल असेल. तसेच विनिमय दर आणि करांमुळे वेगवेगळ्या शहरांमधील तिकिटाच्या दरात किरकोळ बदल होऊ शकतो.
पुणे : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलीस खात्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) पद निर्माण करून सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक सरकारने करणे गरजेचे आहे. पण, ती नेमणूक करण्यासाठी मुख्य मंत्री साहेब मुहूर्त कधी लागणार? अशी विचारणा माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (रविवारी) पत्रकाद्वारे केली आहे.
पुण्याच्या वाहतुकी संदर्भात मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे भेटीत बैठक घेऊन घोषणा केल्या. या घोषणांची पूर्तता होण्यासाठी आणखी पंचवीस, तीस वर्षे लागणार आहेत. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी तातडीने दिलासा देण्याची गरज आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
मुंबईच्या धर्तीवर पुण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) नेमावे, या पदावरील व्यक्तीला प्रशासकीय अधिकारी अधिक असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने उपाययोजनांची अंमलबजावणी करता येते. याकरिता तीन वर्षांपासून काँग्रेस पक्ष मुख्य मंत्री आणि पालकमंत्र्यांकडे मागणी करीत आहे. ही मागणी मान्य करून कार्यवाही करावी, असे आवाहन मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केले आहे. वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका व्हावी या विषयाला काँग्रेस पक्षाने प्राधान्य दिले आहे. मेट्रो रेल योजना काँग्रेसने आणली, बीआरटी मार्ग चालू केले. बीआरटी मार्गाची गरज मुख्य मंत्र्यांना आता वाटू लागली पण त्यांच्याच भाजपने विरोध करून योजना हाणून पाडायचा प्रयत्न केला. मेट्रो कामाला तीन वर्षांचा विलंब भाजप नेत्यांमधील वादामुळे झाला, असेही मोहन जोशी यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मसुदा अधिसूचनेमुळे देशभरातील कोट्यवधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अधिसूचनेत ट्रॅक्टरसाठी जीपीएस ब्लॅक बॉक्ससारखी उपकरणे सक्तीने बसवण्याची तरतूद आहे. ही अधिसूचना म्हणजे थेट शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा असल्याचा आरोप काँग्रेसचे विधनपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केला.
या नव्या नियमांमुळे ट्रॅक्टर मालकांवर ३०,००० रुपयांहून अधिकचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार असून, ग्रामीण भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसाठी ही तांत्रिक साधने पूर्णतः अनावश्यक आहेत. या मसुदा अधिसूचनेत ‘हॉलेज ट्रॅक्टर’साठी
जिपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस, प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये एआयएस-140 प्रमाणित लोकेशन ट्रॅकर बसवणे बंधनकारक केले आहे. ब्लॅक बॉक्स, अपघाताची नोंद ठेवण्यासाठी ‘इव्हेंट डेटा रेकॉर्डर’ अनिवार्य केले आहे. ट्रॉलीसाठी नवे महागडे मेकॅनिकल कपलिंग व इलेक्ट्रिकल कनेक्टर बंधनकारक. केले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
“शेती करणाऱ्या ट्रॅक्टरवर हवाई प्रवासासारखी तंत्रज्ञाने कशाला?”
“शेतीमध्ये फक्त १०-१५ किमी वेगाने वापरला जाणारा ट्रॅक्टर कुठल्या अपघाताचे रेकॉर्ड ठेवणार? शहरात बसलेले अधिकारी हे नियम तयार करताना शेतकऱ्याचे वास्तव विसरतात,” असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला.
शेतकऱ्यांना हरकती नोंदवण्याचे आवाहन
सरकारने १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत या अधिसूचनेवर हरकती नोंदवण्याची मुदत दिली असून, आमदार पाटील यांनी सर्व शेतकरी, ट्रॅक्टर मालक आणि शेतकरी संघटनांना खालील ई-मेलवर हरकती पाठवण्याचे आवाहन केले.
“सरकारने ‘हॉलेज ट्रॅक्टर’ची व्याख्या स्पष्ट करून शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरना या नियमांतून वगळावे किंवा ही अधिसूचना तात्काळ रद्द करावी,” अशी मागणी त्यांनी केली.शेतकऱ्यांना आधीच महागाई, निसर्गाचा लहरीपणा आणि उत्पादन खर्चात वाढ यांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी हे नवे नियम त्यांना आणखी अडचणीत टाकणारे ठरणार असल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.
स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून करण्यात येणारा पाठपुरावा, त्याला मिळणारी लोकप्रतिनिधींची साथ, मंत्री व खुद्द मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आबेडकर हॉकी स्टेडीयम चिखलवाडी, बोपोडी येथे समान पाणी पुरवठा प्रकल्पा अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या ३० लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवण टाकीचे उद्घाटन आज (दि. १०) आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या च्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, माजी नगरसेका सनी निम्हण , रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे , शिवाजीराव मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम , माजी नगरसेवक आनंद छाजेड, दलीत पँथर चे अध्यक्ष यशवंत नडगम , खडकी बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अभय सावंत, सामजिक कार्यकर्ते बाळासाहेब रांनवडे , बी एल येडे , ॲड सुनील जपे ॲड रीटा उपाध्याय , शहाबुद्दीन काजी, राजेश अग्रवाल, खडकीचे पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम, श्याम काची, योगेश करनूर, अमित मोहिते, अप्पासाहेब वाडेकर, अनिल जोशी, सादिक शेख यांच्यासह परिसरातील विविध सोसायट्यांचे अध्यक्ष, प्रतिनिधी उपस्थित होते.
पुढे बोलताना शिरोळे म्हणाले, विकासाची ही गती यापुढेही कायम ठेवली जाणार असून बोपोडी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम साठी राज्य शासन आणि महापालिकेकडून निधी उपलब्ध करून देऊन खेळाडूंसाठी अध्ययवत सुविधा उभारल्या जातील. त्याचप्रमाणे या परिसरातील रुग्णालयांना अत्याधुनिक स्वरूप प्राप्त करून देऊन नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्याचा संकल्प असल्याचे शिरोळे यांनी यावेळी सांगितले.
या परिसराच्या विकासात रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे संघटक सचिव परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीताबाई वाडेकर यांचे मोठे योगदान असल्याचा उल्लेखही शिरोळे यांनी आवर्जून केला. विशेषतः जनसेवेसाठी सुनीताताई यांची जिद्द आणि आत्मीयता प्रभावित करणारी ठरली, असेही त्यांनी नमूद केले.
महायुती सरकारच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या साथीने स्थानिक पातळीपासून राज्य पातळीपर्यंत विकास आणि वेग घेतला असून विरोधक दीर्घकाळ विरोधातच राहतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रास्ताविक करताना परशुराम वाडेकर म्हणाले, लोकप्रतिनिधी असून देखील गेली आठ वर्ष आमच्या घरात टँकर चे पाणी येत आहे. त्यामुळे पाण्याची या भागात किती गरज आहे याची जाणीव झाली. त्यामुळे वैयक्तिकरीत्या पाठपुरावा करून बोपोडी भागातील पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न केले. या कामात येथील सर्वपक्षीय नगरसेवकांची मदत झाली. असे सांगत या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, त्याप्रमाणेच येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम हे देखील आमच्या जिव्हाळ्याचे आहे. त्याचा प्रश्नही सोडवावा ही विनंती शिरोळे यांना वाडेकर यांनी यावेळी केली.
सनी निम्हण म्हणाले, गेली आठ, नऊ वर्ष वाडेकर यांच्या कडून चिकाटीने बोपोडी भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आज राखीपोर्णिमेच्या निमित्ताने पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून येथील महिला भगिनींना ओवाळणी मिळाल्याचा आनंद आहे.
आनंद छाजेड म्हणाले, सुरवातीला बोपोडी भागात 24 तास पाणी येत होते. पण कालांतराने लोकसंख्या वाढली. अन् पाणी हळू हळूहळू कमी येऊ लागलं. मात्र आता या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून येथील रहिवाश्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
सूत्रसंचालन ॲड. ज्ञानेश्र्वर जावीर यांनी केले, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.