पुणे-– घरगुती वादातून पत्नीचा धारधार चाकूने गळा कापून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (रविवारी) पुण्याजवळील रहाटणी गावातील राम मंदिराजवळ सकाळी सहाच्या सुमारास घडली.
संतोष दत्तात्रय थोपटे (वय ३४, रा. राम मंदिराजवळ, रहाटणी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून साधना संतोष थोपटे (वय ३०, राम मंदिराजवळ, रहाटणी) असे दुर्दैवी पत्नीचे नाव आहे. आई, वडील, लहान भाऊ आणि एक सहा वर्षाची मुलगी असा संतोषचा परिवार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष व साधना यांमध्ये नेहमी वाद होत असे, आज सकाळी सहाच्या सुमारास वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात संतोषने त्याची पत्नी साधना हीचा चाकूने गळा कापला व स्वतः बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
दरम्यान संतोषने मरण्यापूर्वी चिट्ठी लिहली असून “या सर्वाला मी जबाबदार आहे, माझ्या मरणानंतर कोणालाही त्रास होऊ नये” असे त्यात लिहिले आहे. जखमी साधनावर थेरगाव मधील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. संतोषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमृत मराठे अधिक तपास करत आहेत.

पत्नीचा गळा कापून पतीची आत्महत्या
काहींच्या ज्येष्ठतेचा मोदी -शहांना अडसर ? विदर्भातील ४० आमदारांना हवेत गडकरी-मुख्यमंत्री
मुंबई -गडकरींनी केंद्रात राहाण्यालाच पसंती दिली असली तरी, विदर्भातील अनेक आमदारांनी त्यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे.विदर्भातून भाजपचे ४५आमदार आहेत. त्यातील४०जणांनी गडकरींना मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन दिले आहे. त्याच बरोबर पाच आमदारांनी त्यांच्यासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.दरम्यान गडकरी यांची पक्षातील ज्येष्ठता मुख्यमंत्रीपदासाठी आडवी येत असल्याचे बोलले जाते , मोदी आणि शहा यांना या ज्येष्ठतेचाच आक्षेप असावा असेही बोलले जाते .
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे २७ऑक्टोबरला निश्चित होण्याची शक्यता आहे.वृत्तसंस्थाच्या बातमीनुसार भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ नेत्याची निवड झाल्यानंतर२८ऑक्टोबरला शपथविधी सोहळा होणार आहे. दिवाळीचे चार दिवस झाल्यानंतर२७ तारखेला नेता निवडीची औपचारिकता पारपाडली जाईल. विधिमंडळ पक्षाचा नेता हा नागपूरमधील आणि ब्राम्हण समाजाचाच असेल हे निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र, हा नेता प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस असेल की केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी याला अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान नितीन गडकरी म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस माझे सहकारी आहेत. आम्ही दोघे एकाच पक्षाचे आणि शहराचे आहोत. आमच्या दोघांमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. माध्यमांमध्ये ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत, त्या चुकीच्या आहेत. मी आधीच स्पष्ट केले आहे, की मी दिल्लीत आनंदी आहे, मला महाराष्ट्रात परतण्याची इच्छा नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत आमच्या पक्षाची संसदीय समिती, पंतप्रधान आणि पक्षाचे अध्यक्ष त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतील. राहिला प्रश्न माझा, तर मी कोणत्याच स्पर्धेत नाही. आमच्या पक्षाच्या काही लोकांची इच्छा आहे, की या पदावर माझी वर्णी लागावी, पण मी पक्षाच्या आदेशाचे पालन करेल.
दरम्यान, दुसरीकडे राज्यात भाजप शिवसेनेच्या पाठिंब्यावरच सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेनेचे अनिल देसाई आणि सुभाष देसाई हे दिल्लीहून रिकाम्या हाताने परतले होते अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात मात्र दिल्लीतील नेत्यांशी सकारात्मक चर्चा झाली होती, अशी माहिती स्वतः सुभाष देसाई यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. एवढेच नव्हे तर, सत्ता स्थापन झाल्यानंतर राज्यातील मंत्रिपदांबाबतही प्राथमिक पातळीवर चर्चा झाली होती, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले आहे. तसेच शिवसेनेने कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पाथर्डी हत्याकांडाचा तीव्र निषेध
पुणे-
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा गावात मागासवर्गीय वस्ती असलेल्या जाधव वस्ती येथे दलितांच्या वस्तीवर अमानुषरित्या घाला घालून तीन दलितांची हत्या करण्याच्या कृतीचा जाहीर निषेध मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे . या ठिकाणी राहणाऱ्या जाधव कुटुंबीय केवळ दलित आहे म्हणून त्यांची निर्घुण हत्या होणे म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारी हि घटना आहे .
या हत्येचा जाहीर निषेध मातंग एकता आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष , राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे , कार्याध्यक्ष अविनाश बागवे , समन्वयक विठ्ठल थोरात , उपाध्यक्ष अशोक कांबळे , सचिव आप्पासाहेब उकरंडे , सहसचिव चंद्रकांत काळोखे , पुणे शहर अध्यक्ष सुरेश अवचिते , सातारा जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब मांढरे , अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष सतीश बागवे , पुणे शहर उपाध्यक्ष दयानंद अडागळे यांनी केला आहे .
फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांच्या विचारधारा असलेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देशाला स्वांतत्र्य मिळून साठ वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी या राज्यात दलित मागासवर्गीय अल्पसंख्यांक अजूनही सुरक्षित नाही . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे दलित प्रतिबंधक कायदा असून सुद्धा बाबासाहेबांचे अनुयायी याला बळी पडतात जातीवादीचा विचार घेऊन वावरणाऱ्या प्रवृतीना येथून पुढच्या काळामध्ये ठेचून काढण्याचे काम केले , तरच या राज्याच्या कायदा सुविधा प्रश्न टिकून राहील . अहमदनगरच्या मोठ्या जिल्हा जातीवादीय केंद्रबिंदू कायम स्वरूपी राहील . मातंग एकता आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष , राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर या हत्येचा विरोध म्हणून लोकशाहीच्या मार्गाने निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे . या हत्येमधील आरोपींना लवकरात – लवकर पकडून त्यांच्यावर कडक कारवाई नाही झाल्यास मातंग एकता आंदोलन राज्यभर उग्र आंदोलन करतील . असा इशारा देण्यात येत आहे .
बाळासाहेबांना विसरले गुजराती … एमआयएम हा हिरवा विषारी साप विधानसभेत घुसला:रोखठोक -संजय राऊत


मुंबई-पंतप्रधान व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष गुजरातचे असल्यामुळे ही मते बहुसंख्येने भाजपकडे वळली हे खरे मानले तर बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांच्यावर केलेले उपकार हे लोक सहज विसरले, असे ‘रोखठोक’ मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
दै. सामनात संजय राऊत यांनी ‘… तरीही महाराष्ट्र अधांतरीच!’ या मथळ्याखाली विधानसभा निवडणुकीतील जय-पराजय, महायुतीमधील फुट, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर गुजराती समाज राहतो व ही मते निर्णायक ठरत आहेत. हा गुजराती समाज बाळासाहेबांचे उपकार विसरला असल्याची टिका करत गुजराती समाजाला थेट लक्ष्य केले आहे. पण असे मत मांडत असतानाच शिवसेनेने गुजरातीविरोधात भूमिका घेतलेली नाही, असेही स्पष्ट केले आहे.
तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाविषयी लिहताना आता महाराष्ट्राचे नेतृत्व विदर्भ करील, असेही स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचे खापर मतदारांवर फोडले आहे.
काय म्हटले आहे दै. सामनात?
वाचकांसाठी संजय राऊत यांचा लेख जसाच्या तसा …
विधानसभा निवडणुकांनंतरही महाराष्ट्राचे भवितव्य अधांतरीच राहिले. राज्यात सत्तांतर झाले हे खरे, पण निर्विवाद कौल कुणाच्याच पारड्यात न टाकता मतदारांनी सगळ्यांनाच लटकवले आहे. भारतीय जनता पक्षाला १२१ व शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या. कॉंग्रेस व राष्ट्रवादीस प्रत्येकी पन्नास जागाही मिळू शकल्या नाहीत. भाजपबरोबर गेलेल्या मित्रपक्षांचा साफ खुर्दा उडाला व मनसेसारखे पक्ष केजरीवालप्रमाणे अस्तित्वहीन झाले. हे सर्व खरे असले तरी महाराष्ट्र आजही खर्या उद्धारकर्त्याच्या प्रतीक्षेत उभा आहे. कॉंग्रेसची राजवट गेली तरी नवा मुख्यमंत्री दिल्लीतूनच ठरविला जाणार आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्य महाराष्ट्रावर येत आहे व विदर्भातला मुख्यमंत्री नक्की झालाच आहे, असे मानायला हरकत नाही. या सर्व घडामोडीत महाराष्ट्राच्या नशिबी काय आले? निवडणुका होऊनही अखंड महाराष्ट्रावरील टांगती तलवार कायम आहे व मुंबईच्या अस्तित्वावरही संकटाचे ढग भविष्यात अधिक गडद होऊ शकतात, पण करायचे काय?
कमी का पडले?
शिवसेना-भारतीय जनता पक्ष एकत्रित लढले असते तर दोघांना मिळून २०० च्या वर जागा मिळाल्या असत्या. तसे झाले नाही व शेवटी निवडणुकांनंतर मतदारांनी दोघांनाही अशा वळणावर आणून ठेवले की, आता तरी एकत्र या व सत्ता स्थापन करा. भारतीय जनता पक्षाला शंभरावर जागा मिळाल्या हे खरे, पण अखंड महाराष्ट्राचा मुद्दा घेऊन रणात एकाकी लढणार्या शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या हेदेखील मोठे यश मानावे लागेल. शिवसेनेचे १७ उमेदवार हे फक्त ४९ ते १५०० च्या फरकाने पराभूत झाले. पैसा व सत्तेच्या वापरापुढे ते कमी पडले. हे १७ उमेदवार विजयी झाले असते तर शिवसेना ८० च्या पुढे गेली असती. मुंबई-ठाणे-पुण्यातील काही उमेदवार ‘मनसे’ने मते खेचल्यामुळे पडले व त्याचा लाभ पुणे व कल्याण-डोंबिवलीतील भाजपास झाला. याचा अर्थ इतकाच की, शिवसेनेच्या नशिबी जन्मापासून संघर्ष आहे. सहज किंवा नशिबाने शिवसेनेला कधीच काही मिळाले नाही. झगडे करून व हक्कांसाठी लढून शिवसेनेला आपला न्याय्य वाटा मिळाला. यात शेवटी नुकसान महाराष्ट्राचेच होत असते.
गुजराती समाज कुठे?
मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर गुजराती समाज राहतो व ही मते निर्णायक ठरत आहेत. पंतप्रधान व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष गुजरातचे असल्यामुळे ही मते बहुसंख्येने भाजपकडे वळली हे खरे मानले तर बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांच्यावर केेलेले उपकार हे लोक सहज विसरले व महाराष्ट्रात राहूनही त्यांच्या जात-प्रांतासाठी ते एकत्र आले आणि त्यांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान केले, हे परखड मत मांडल्याने शिवसेनेने गुजरातीविरोधात भूमिका घेतली असे कुणाला समजण्याचे कारण नाही. प्रचंड काम करूनही मुंबईतील दहिसर व गोरेगावात विनोद घोसाळकर व सुभाष देसाईंचा पराभव होतो. कुलाब्यात चांगले काम करणार्या पांडुरंग सपकाळांना पराभूत व्हावे लागते हे कसले लक्षण? महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोदी यांच्या नावाने मतदान झाले व त्यामुळेच भाजपला मोठे यश मिळाले हे मान्य करावे लागेल.
फायदा व तोटा
शिवसेना-भाजपची युती तुटल्याने कुणाचा किती फायदा-तोटा झाला याचे हिशेब नंतर करू, पण मुंबई-संभाजीनगरसारख्या शहरात ‘हिरवा’ रंग बेभानपणे उधळला गेला व ‘एमआयएम’ या धर्मांध विखारी संघटनेचे दोन आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले. हिंदूंवर सरळ फूत्कार सोडणार्या व २० कोटी मुसलमानांचे आव्हान देणार्या ओवेसीचे दोन आमदार फक्त शिवसेना-भाजप मतविभागणीमुळे निवडून आले व महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांत त्यांना पाय रोवता आले. हे विष महाराष्ट्रात आणखी पसरले तर नव्या सरकारची डोकेदुखी वाढेल. ‘एमआयएम’ने कॉंग्रेसची मते घेतल्याचा फायदा भाजपास झाला असेलही; पण त्या फायदेबाजीत हिरवा विषारी साप विधानसभेत घुसला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणातून तूर्त तरी ‘मनसे’चा अस्त व ‘एमआयएम’चा उदय झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातले हे विष राजकीय फायद्या-तोट्याचा विचार न करता खतम केले पाहिजे. ‘एमआयएम’ची भूमिका संयमाची व धर्मनिरपेक्ष असल्याची कोणी म्हणत असेल तर ते स्वत:बरोबर देशाची फसवणूक करीत आहेत.
मुख्यमंत्री कोण?
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री भाजपचा होईल. नितीन गडकरी की फडणवीस हे दिल्ली ठरवेल. कॉंग्रेस राजवटीत राज्याचे मुख्यमंत्री दिल्ली ठरवते असे सांगून त्यावर टीका होत असे, पण राष्ट्रीय तसेच सत्ताधारी पक्षांची सूत्रे देशाच्या राजधानीतून हलतात व दिल्लीच्या इच्छेपुढे सर्वांना झुकावे लागते. शिवसेनेला संपूर्ण बहुमत महाराष्ट्राने दिले असते तर हे दिल्लीपुढे झुकणे व वाकणे थांबले असते. प. बंगाल, तामीळनाडू, ओडिशा राज्यांचे मुख्यमंत्री स्वबळावर जिंकतात व स्वत:च्या राज्यांचे निर्णय स्वत: घेतात. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिल्लीची पत्रास बाळगली नाही व स्वयंप्रेरणेने सर्व निर्णय घेतले. महाराष्ट्राने पुन्हा एकदा ही संधी गमावली आहे.
विदर्भ पुढे!
महाराष्ट्रात सत्ता कोणाची? याचा निर्णय शेवटी विदर्भाने घेतला. विदर्भात सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे भाजपास एकहाती सत्ता मिळाली. त्यामुळे राज्याचे नेतृत्व आता विदर्भाकडेच येईल. विदर्भाचा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. विदर्भाला पुढे नेत महाराष्ट्राला शक्ती देईल.
श्री. फडणवीस किंवा श्री. गडकरी हे तर नक्कीच, पण आज तरी श्री. देवेंद्र फडणवीस यांचा रथ सगळ्यात पुढे चालत आहे. फडणवीस विदर्भाचा मुख्यमंत्री झाल्याने राज्य अखंड राहील. विकास व मागासलेपणाच्या बोंबा मारण्याचे उद्योग थांबतील. शेवटी शिवरायांचे हे राज्य टिकावे हीच इच्छा!
संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजयराव कुलकर्णी यांचे निधन
पुणे-संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सहकार भारतीचे प्रदेश उपाध्यक्ष, जनसेवा सहकारी बँक पुणेचे माजी संचालक श्री. विजयराव कुलकर्णी (वय ७९) यांचे आज दुपारी १ च्या सुमारास ह्रदयाच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. उद्या सोमवारी दि.२७ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी १० वा. वैकुंठ स्मशानभूमी , पुणे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
विजयराव मूळचे वर्ध्याचे असून सैन्यदलातील नोकरीतुन ते निवृत्त झाले होते. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरु केला होता. बालपणापासून रा.स्व. संघाचे स्वयंसेवक असलेल्या विजयरावांनी पुण्याच्या पूर्व भागात संघाचे कार्य उभे केले. हडपसरच्या जनसेवा सहकारी बँकेच्या प्रगतिमध्यॆ विजयरावांचा मोठा वाटा होता. जनसेवा बँकेचे ते १५ वर्षे संचालक म्हणून कार्यरत होते. विविध सामाजिक संस्थांचे वाढीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. हडपसर येथील जनसेवा न्यासाचे ते संस्थापक होते. रमा श्रीधर स्मृती न्यासाचे ते कार्यकारी विश्वस्त होते. तळेगांव दाभाडे येथील वनवासी वसतिगृह – गोपाळ नवजीवन केंद्राचे विश्वस्त होते. कँपमधील स्व. श्रीकांत लिंगायत स्मृती समितीचे तेे सदस्य होते. दूरदर्शन वरील वीर सावरकर मलिकेच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोठा सहभाग होता.
आता हमालही साधणार इंग्रजीमध्ये संवाद

पुणे- पुणे रेल्वेस्थानक लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्थानक होणार आहे आणि आंतरराष्ट्री दर्जाच्या सुविधांबरोबरच ग्राहकांशी होणारा हमालांचा संवादही आता इंग्रजीमध्ये होणार आहे. हो हे शक्य आहे ! सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या वतीने पुणे रेल्वेस्थानकावरील हमालांसाठी प्राथमिक इंग्रजी शिक्षणाच्या अनोख्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.
सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे अद्यक्ष डॉ. संजय चोरडिया व सुषमा चोरडिया यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला आज विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात सुरुवात झाली. याप्रसंगी पुणे रेल्वे स्थानकाचे उपव्यवस्थापक बी. व्ही. पाटील, सुमीत काथने, नगरसेवक रवींद्र माळवदकर, प्रा. ए. सी. सेठीया, प्रा. शिला ओक आदि उपस्थित होते.
समाजातील आर्थिक विषमता दूर करणसाठी ‘शिक्षण सर्वांकरिता‘ ही संकल्पना घेऊन सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट गेली १० ते १२ वर्षे काम करित आहे, यापूर्वी रिक्षा चालक, कागद गोळा करणा-या कर्मचा-यांना संस्थेच वतीने प्राथमिक शिक्षण व इंग्रजीचे ज्ञान देण्याचा उपक्रम राबविला आहे. आता हमालांना इंग्रजीचे ज्ञान दिले जाणार आहे.
शिला ओक यांनी पुणे रेल्वेस्थानकावर हमालांचा इंग्रजीचा तास घेतला. “गुड मॉर्निंग, माय नेम इज…”, “माय बॅच नंबर इज…”, “वेलकम टू पुणे”, “मे आय हेल्प यू?” आदि वाक्ये त्यांनी हमालांना शिकवली आणि विशेष म्हणजे हमालांनाही या बिनभिंतीच्या शाळेत शिकताना खूप मज्जा येत होती. याप्रसंगी सर्व हमालांनी इंग्रजी शिकण्याची व बोलण्याची शपथ घेतली.
पुणे विमानतळावर सोने पकडले
पुणे : लोहगाव विमानतळावर तब्बल २ किलो १११ ग्रॅम सोने विमानतळ प्राधिकरणाच्या एअर इंटेलिजेन्स युनिटने पकडले. याप्रकरणी मोहम्मद मोहसीन मोबीन शेख (रा. मुंबई) व प्राधिकरणच्या स्वच्छता विभागाचा सिनीअर अटेंडंट बशीर शेख यांना अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी एअर इंडीयाचे विमान दुबईहून आले. त्या विमानामधून मोहम्मद हा उतरला. त्याच्याशी बशीर हा बोलत असताना एआययुच्या अधिका:यांना संशय आला. बशीरच्या मागोमाग मोहम्मद विमानतळावरील इमिग्रेशन काऊंटरजवळील वॉशरुममध्ये या दोघांनाही पकडण्यात आले.
औरंगाबादजवळ धावत्या पॅसेंजर रेल्वेला आग
औरंगाबाद – नांदेड- मनमाड धावत्या पॅसेंजर रेल्वेगाडीला औरंगाबाद – दौलताबाद रेल्वेस्थानकांदरम्यान आग लागली. अचानक लागलेल्या आगीने खळबळ उडाली. अग्निशामक दलाची मदत तातडीने पोचल्याने आग विझवण्यात यश आले, यात एक डबा जळून खाक झाला. एक जोडपे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली.
प्राथमिक माहितीनुसार असे समजते कि , नांदेड मनमाड पॅसेंजर रेल्वेगाडी (गाडी क्र. 57542) ही रविवारी पहाटे दीडच्या सुमारास औरंगाबाद रेल्वेस्थानकात आली. पाच मिनिटे स्थानकात थांबून ती मनमाडच्या दिशेने रवाना झाली, त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत मिटमिटा गावानजिक आगीची ही दुर्घटना घडली. गाडीने वेग घेतलेला असतानाच पाठीमागून तिसऱ्या क्रमांकाच्या डब्यात, दोन डब्यांच्या जोडामधून खालच्या बाजूने धूर निघत असल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले. त्यानंतर लगेचच खिडकीच्या बाजूने आगीचे लोळ दिसू लागल्याने प्रवाशांनी साखळी ओढली, त्यानंतर जवळपास एक किलोमीटर अंतरावर रेल्वेगाडी थांबली. आग लागल्याचे समजल्यानंतर प्रवाशांत खळबळ उडाली, प्रवाशांचा आरडाओरडा सुरु झाला, गाडीचा वेग कमी होताच अनेक प्रवाशांनी उड्या घेतल्या.
गाडी थांबल्यानंतर मध्यरात्रीचा अंधार आणि रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूने झाडी, यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. महिला व लहान मुले जिवाच्या आकांताने ओरडत होती. त्यावेळी काही प्रवाशांनी महिला व मुलांना हाताला धरुन ओढत बाहेर काढले. गाडीला आग लागल्याची माहिती चालकाने औरंगाबाद नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर औरंगाबादचे स्टेशमास्तर डी. पी. मीना यांच्यामार्फत अग्निशामक दल व पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती पोचविण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परतेने पोचून तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. अग्निशामक दल वेळेवर दलाच्या तत्परतेने दुसऱ्या डब्याला आगीपासून वाचवण्यात यश आले. गाडी नंतर दौलताबाद रेल्वेस्थानकात नेण्यात आली.
EVM मशीनवर कॉंग्रेसचा संशय
नागपूर
विधानसभेतील भाजपच्या विजयामागे मोदी लाट नसून ‘इव्हीएम इफेक्ट’ आहे. मशीनमध्ये गडबड झाल्याची शंका अनेक ठिकाणचे उमेदवार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे संशयास वाव असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. ‘या प्रकाराची पक्ष म्हणून आम्ही तक्रार करणार नसलो तरी, निवडणूक आयोगाने स्वतःहून चौकशी करावी,’ अशी मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले, ‘काँग्रेसला ज्या बुथवर किमान ४०० मते मिळण्याची हमखास खात्री होती, त्या बुथवर केवळ ३०-४० मते मिळाली. असे अनेक बुथ आहेत. याप्रकारे मतदान झाल्याने निवडणुकीचे समीकरण बदलले आहे.
अशाप्रकारे झालेले मतदान शंका घेण्यासारखे आहे. संबंध राज्यातून या प्रकारच्या तक्रारी पुढे येत आहे. त्यामुळे स्वत: उमेदवारांनी याबाबत आयोगाकडे तक्रार करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.’
काँग्रेसप्रमाणेच इतर पक्षांकडूनही ईव्हीएममध्ये गडबड केल्याच्या तक्रारी पुढे येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ज्या बुथवर हमखास ९० टक्के मते मिळण्याची खात्री असते, तिथे ३ ते ४ टक्के मते मिळणे पटण्यासारखे नाही. त्यामुळे अशा ठिकाणी इव्हीएममध्ये गडबड झाल्यास वाव आहे. निवडणूक आयोगाने याप्रकारच्या तक्रारी येण्याची प्रतीक्षा न करता, चौकशी सुरू करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत ठाकरे यांनी व्यक्त केले.
नरेंद्र मोदींची पत्रकारांना दिवाळी भेट-स्नेहभोजन-कौतुकाचा वर्षाव
नवी दिल्ली :भाजपचा पदाधिकारी असताना पत्रकार परिषद होण्यापूर्वी तुमच्यासाठी खुर्च्या लावत होतो. मला जुने दिवस आठवतात. आज पंतप्रधान या नात्याने तुम्हाला भेटत असल्याने आनंद होत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांनी लेखणीलाच झाडू बनवून आपल्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा प्रचार आणि प्रसार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी माध्यमांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. यापुढे पत्रकारांसोबत प्रत्यक्ष संपर्क साधत गहन व व्यापक चर्चा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित ‘दिवाळी मिलन’ या कार्यक्रमाद्वारे स्नेहभोजनासाठी बोलावलेल्या सुमारे ५००संपादक-पत्रकारांसोबत मोदींनी थेट भेटीगाठी घेऊन संवाद साधला.ज्यामध्ये यावेळी अनेक वृत्तपत्रे, वाहिन्यांचे मालक, संपादक, प्रमुख पत्रकार उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मोहिमेबद्दल जनजागृती करण्यासाठी प्रसारमाध्यमांचे आभार मानले. या मोहिमेची माध्यमांमधून व्यापक चर्चा होत आहे; परंतु पंतप्रधानांनी हाती झाडू घेतल्याने भागणार नव्हते. मात्र, तुम्ही तुमच्या लेखणीलाच झाडू बनवल्याने देशाची फार मोठी सेवा केली आहे, असे मोदी म्हणाले. स्वच्छता मोहिमेवर माध्यमांमधील८० टक्के बातम्यांमधून सरकारवर टीका करण्यात आली. मात्र टीका करत असतानाही माध्यमांनी हा विषय लावून धरला आणि त्यामुळे आज अनेक राज्य सरकारे जागी झाली आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात सर्व काही सरकारच करेल, अशी भावना निर्माण झाली होती; परंतु आपल्याला मिळून बदल घडवावा लागेल, ही जाणीव माध्यमांनी जनतेच्या मनात निर्माण केली. देश बदलण्यासाठी माध्यमांचे हे मोठे योगदान आहे, अशा शब्दांत त्यांनी इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला.
पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच पत्रकारांशी संवाद साधणार्या मोदींनी भाजप मुख्यालयातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कधीकाळी मी येथे तुमच्यासाठी खुच्र्या लावत होतो. तेव्हा तुमच्याशी अधिक जवळीक होती. मोकळय़ा वातावरणात चर्चा व्हायची. ते संबंध वेगळे होते आणि मला त्याचा गुजरातमध्येही लाभ झाला. प्रसारमाध्यमांशी पुन्हा जुने नाते प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. पत्रकारांशी चर्चा केल्यानंतर अनेक गोष्टी नव्याने समजतात. केवळ माहितीच नाही तर नवी दृष्टीही मिळते आणि ते फार महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. भाषणानंतर मोदी व्यासपीठावरून खाली उतरले आणि त्यानंतर त्यांनी उपस्थित सर्व पत्रकारांशी हस्तांदोलन केले. यावेळी अनेक वृत्तपत्रे, वाहिन्यांचे मालक, संपादक, पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते.आजच्या स्नेहमिलन कार्यक्रमाला जवळपास 500 पत्रकारांना निमंत्रण देण्यात आले होते. पंतप्रधान मोदी हे दुपारी 12 वाजता येणार होते; परंतु सुरक्षेसाठी पत्रकारांना शामियान्यात प्रवेश करण्याची वेळ ही सकाळी 10 ची देण्यात आली होती.
शिवसेनेला वैफल्यग्रस्त करण्याची भाजप ची खेळी
मुंबई-राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक, १२२ जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची, पर्यायाने नव्या मुख्यमंत्र्याची निवड सोमवारी, २७ ऑक्टोबर रोजी होणार असून, प्रारंभी शिवसेनेविनाच सरकार स्थापण्याची तयारी भाजपने केली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला डिवचणाऱ्या सेनेला वैफल्यग्रस्त करून नंतर त्यांना सत्तेत सहभागी करून घ्यायचे, अशी रणनीती भाजपच्या धुरिणांनी आखली आहे.
सर्वाधिक जागा मिळवूनही विधिमंडळात बहुमताप्रत भाजप पोहोचू शकलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सरकारस्थापनेसाठी विनाअट पाठिंबा देऊ केला असला, तरी त्यावर भाजपतर्फे भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. शिवसेनेबाबतही भाजपने आपली भूमिका अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट केलेली नाही. राज्यपालांकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण आल्यानंतर ठराविक मुदतीत विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यास सांगितले जाते. परंतु सरकारला कुणाचा पाठिंबा आहे, याबाबतचे पत्र प्रारंभी देण्याची गरज पडत नाही. त्यामुळे स्वतःहून सरकार स्थापनेचा दावा करण्यापेक्षा राज्यपालांकडून निमंत्रण येण्याची भाजप वाट बघेल.
भाजपच्या विधिमंडळ नेतानिवडीसाठी उद्या, सोमवारी विधानभवनात आमदारांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड होईल. फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंजुरी दिली आहे. राज्यपालांकडून सरकार स्थापनेसाठी निमंत्रण आल्यानंतर गुरुवारी, ३० ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा पालवे या प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीतील पाच प्रमुख नेत्यांचा शपथविधी होईल. शपथविधीसाठी भाजपने वानखेडे स्टेडियम आणि बीकेसी ही दोन्ही ठिकाणे आरक्षित केली आहेत. स्थळाबाबत अंतिम निर्णय सोमवारी होईल.
शिवसेनेला सरकारमध्ये सामील करून घ्यावे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मत आहे. तर भाजपमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेत्यांचा शिवसेनेला विरोध आहे.
सरकारच्या पहिल्या शपथविधीत शिवसेनेचा कोणीही मंत्री नसेल. सेनेच्या समावेशाबाबत चर्चा पुढील आठवड्यापासून सुरू होईल. सेना सामील झाली तरी त्यांना उपमुख्यमंत्रिपद द्यायचे नाही. हे पदच नव्या सरकारमध्ये ठेवायचे नाही, अशी भाजपच्या धुरिणांची रणनीती आहे.
सन १९९५ मधील फॉर्म्युल्याप्रमाणे गृह, पाटबंधारे, अर्थ, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य अशी महत्त्वाची खाती तेव्हा भाजपकडे होती. भूमिकांच्या अदलाबदलीमुळे या खात्यांवर आता शिवसेना दावा करू शकते. मात्र, यातील गृह, अर्थ, पाटबंधारे अशी महत्त्वाची खाती सोडण्यास भाजपने नकार दिलेला आहे. १४पेक्षा जास्त खाती न देण्याचीही भाजपची भूमिका आहे. त्यामुळे भाजपच्या अटीवर सेनेला सरकारमध्ये यावे लागेल, असे भाजपचे नेते सांगत आहेत.
सव्वाशे वर्षाचा ” सगर ” उत्सव उत्साहात साजरा
दिवाळी पाड्व्यानिमित पुणे कॅम्प भागातील गवळी वाडा भागातील वीरशैव लिंगायत गवळी समाज पुणे लष्कर विभाग वतीने सालाबादप्रमाणे पारंपारिकपद्धतीने सवाशे वर्षाचा ” सगर ” उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला . या उत्सवामध्ये १४ रेडे आणि ४ म्हशी सहभागी झाल्या होत्या . गवळी समाजाचा पारंपारिक व्यवसाय दुग्धव्यवसाय असल्याने गवळी समाज बांधव आपल्या जनावरांची सजावट करतात . जनावरांच्या शिंगाना रंगवतात , मोरपिसे , पायात घुंगरू , कवड्याची माळ घालतात . तसेच , हार , गजरे घालतात . वर्षभर जनावरे उत्पन्न मिळवून देत असतात त्यातून गवळी समाज बांधव आपला उदरनिर्वाह करतात त्यामुळे सगर उत्सवाला महत्व आहे , अशी माहिती वीरशैव लिंगायत गवळी समाज पुणे लष्कर विभागाचे अध्यक्ष शैलेन्द्र बिडकर यांनी दिली .
यावेळी किसन जानुबस , मानकप्पा आतरंगे , वन्नाप्पा पैलवान , लक्ष्मण बिडकर , अनंता बिडकर , तुकाराम किर्लोस्कर आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी उपस्
बंगाली गोल्डस्मिथ कल्चरल असोसिएशनच्यावतीने ” श्री श्यामा काली पूजा ” उत्सहात संपन्न
बंगाली गोल्डस्मिथ कल्चरल असोसिएशनच्यावतीने पुणे कॅम्पमधील सिनेगॉग स्ट्रीट वरील आशीर्वाद हॉलमध्ये ” श्री श्री श्यामा काली पूजा ” उत्सहात संपन्न झाली . पूजेनंतर महाप्रसाद सांस्कृतिक कार्यक्रम झाले . यामध्ये बंगाली बांधव सहभागी झाले होते .
या कार्यक्रमाचे आयोजन tगोल्डस्मिथ कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष तपन मोंडल , उपाध्यक्ष समसुंदर कोले , राजकुमार दास , प्रशांतो घोष , सचिव नरेन मलिक , सहाय्यक सचिव मिथुन राणा , बिश्वंथ अडोक , बिश्वनाथ मोंडल , खजिनदार सुसांता दास , सहाय्यक खजिनदार श्यामल मोंडल , हिरू मोंडल , पन्नालाल पोल्लेय , रोखपाल गोविन्दो हल्दर , सहाय्यक रोखपाल गौतम मन्ना , नन्दो पंडित , दिलीप सामान्तो आदीनी आयोजन केले होते .
चतु:शृंगी मंदिरात दीपोत्सव
राष्ट्रीय कला अकादमी आणि चतु:शृंगी देवस्थान ट्रस्टच्या वतीने पाडव्यानिमित्त चतु:शृंगी मंदिर परिसरात दीपोत्सवाचे आयोजन केले होते. आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परिसरात रंगावली रेखाटन करण्यात आले होते. पाच हजार पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. देवस्थानचे विश्वस्त नंदकुमार अनगळ, अकादमीचे अध्यक्ष मंदार रांजेकर, विद्या बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांची उपस्थिती होती. अनुराधा काडे, योगिनी बागडे, प्रतिक आठणे, श्रेयस उंबरकर, सागर कुलकर्णी यांनी संयोजन केले.
सर्व धर्मीयांची दिवाळी पहाट ” सजली
फटाक्यांचा आवाज , थंडीची हूडहूड व सुगंधांचा घमघमाट सोबतीला सुनिता गोकर्ण यांच्या बहारदार गायनाने पुण्याच्या पुणे कॅम्प पूर्व भागातील सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालयच्यावतीने आयोजित सर्व धर्मीयांची दिवाळी पहाट सजली .
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली . या कार्यक्रमास नवनिर्वाचित आमदार दिलीप कांबळे , कैलासमामा कोद्रे , बाळासाहेब शिवरकर, बापूसाहेब गानला , नितीन जाधव , दिलीप भिकुले , रेहाना शेख , मनजितसिंग विरदी , मानसी काळे , दिलीप गिरमकर , सुशील खंडेलवाल , विजयकुमार मेहता , नयन सामल , बाळासाहेब बरके , पोपट गायकवाड , विकास भांबुरे , प्रदीप खोले , सुबोध भावकर , गंगाधर आंबेडकर , विश्वनाथ सातपुते , अच्युत निखळ आदी मान्यवर आणि पुणे कॅम्प व शहरातील संगीतप्रेमी उपस्थित होते .
पुणे कॅम्प भागातील राणी लक्ष्मीबाई उद्यानात सुनिता गोकर्ण , श्रीकांत कुलकर्णी व नरेंद्र डोळे यांच्या बहारदार गायनाने यादगार मैफिल केली . या मैफिलीचा आरंभ तू सुखकर्ता , तू दुखहर्ता या भक्ती गीताने झाली . त्यानंतर नाम घेता…. , यातुझे गोविंदा … , देव देव्हाऱ्यात नाही …. , माझे राणी माझे मोगा … , दिस चार झाले मन …. , संधीकाली या आशा … , टिक टिक वाजते डोक्यात … , हि चाल तुरु तुरु … , धीरे धीरे मचल ,,,, , रातकली एक ख्वाब … , चलो सजना जहा तक . . . , तुम गगन के चंद्रमा .. . , दिल कि नजर से . . . , भैया न धरो . . . . ,अवघे घर्जे पंढरपूर . . . , तुझे जीवन कि डोरसे . . . , ठंडी हवा काली घटा . . , रेशमी सलवार कुडता . . , नैन मिले चैन कहा . . . , ख्वाब हो तुम या . . . , अपलम चपलम . . ,अशा एका पाठोपाठ भाव व भक्ती गीतांचे सादरीकरण करण्यात आले . याला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली . या मैफिलीची सांगता धन्य भाग . . या भैरवीने केली . या मैफिलीला मिहिर भडकमकर , आदित्य आपटे , रेवती समुद्र , अभिजित जायदे , सारंग भांडवलकर या वादकांनी साथ लाभली .
कार्यक्रमाचे निवेदन ज्योती घोडके यांनी केले . तर उपस्थितांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालयाचे ग्रंथपाल दिलीप भिकुले यांनी केले तर आभार सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला यांनी मानले . यानिमिताने राणी लक्ष्मीबाई उद्यान रंगीबेरबी विद्युत रोषणाई व रांगोळीने खास सुशोभित करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गायकांचा सत्कार करण्यात आला . शेवटी उपस्थितांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला . यावेळी दिवाळी अंक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते .





