Home Blog Page 3592

मंडई गणपतीच्या दागिण्यांची पहाटे चोरी – पुण्यातला धक्कादायक प्रकार

पुणे- पुण्यातील  प्रसिद्ध अशा अखिल मंडई गणपती मंडळाच्या  शारदा गणपती मंदिरात आज पहाटे पाचच्या सुमारास अज्ञात एका चोरट्याने प्रवेश करीत मंदिरातील गणपतीचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायी प्रकार सकाळी उघडकीस आला . काहींच्या मते हि चोरी ३६ लाखाची तर काहींच्या मते ५० ते ५५ लाखांची असे सांगितले जात आहे . दरम्यान पहाटे पाच वाजून तीन  मिनिटे झाली असताना एक इसम मंदिरात प्रवेश करताना सीसीटीव्हीत आढळून आला आहे. त्यानेच हि चोरी केली आहे असे निष्पन्न होते आहे . सी सी टीव्ही फुटेज वरून आता पोलीस त्याचा तपास करीत आहेत चोरट्याने मंदिरातील गणपतीच्या मूर्तीवरील सुमारे 50 तोळ्यांपेक्षा अधिक वजनाचे दागिने, हि-याचा महागडा नेकलेस चोरून नेला आहे

हल्ली पुणे असुरक्षित बनत चालले कि काय अशी दाट शंका यावी असे प्रकार पुण्यात घडत आहेत .सिंहगड रस्त्यावरील  वाहनांच्या जाळपोळीच्या घटनेनंतर काळ सांयकाळी पर्वती परिसरात 2 गटात झालेली हाणामारी आज पहाटे झालेली हि चोरी  या घटना पुणे असुरक्षित बनल्याची चाहूल देणाऱ्या ठरत आहेत . कोणताही मोठ्ठा गुन्हा घडो अथवा ना घडो पुण्यात पोलिसांची कडक नाकेबंदी असते तिचा मात्र आम माणसाला , दुचाकीस्वरांनाच सामना करावा लागतो. चोर- गुन्हेगार आपापली कृत्ये करून जातात आणि सामान्य माणसाला चौकाचौकात नाकेबंदीचा नाहक सामना करावा लागतो असे आजवर चित्र राहिले आहे  खरे तर पुण्यातला मंडई हा भाग संवेदनशील भाग म्हणून रात्रभर येथे पोलिसांची गस्त असते या परिसरातील अनेक नानाविध धंद्यामुळे येथे पोलीस सतर्क असताना पहाटे चोरट्याने  चोरी केल्याने खळबळ उडाली आहे . पुणे पोलिसांपुढे आता हि चोरी एक मोठ्ठे आव्हान बनले आहे .

 

 

दोन गटात हाणामारी – पुणे पर्वती परिसरात हवेत गोळीबार .. आज शांतता

पुणे- सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या झालेल्या जाळपोळीनंतर काल मंगळवारी सायंकाळी  पर्वती परिसरातील  दोन गटात झालेल्या वादाचे रूपांतर तुफान हाणामारी व चाकू हल्ल्यात झाले. यात असंख्य  दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाल्याचे समजते  आहे. दोन्हीही गट माघार घेत नसल्याने व राडेबाजी वाढत चालल्याने पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला.
मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी पर्वतीतील स्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. आज तेथे शांततेचे वातावरण आहे. या राडेबाजीत  एक राजकीय कार्यकर्ता आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.

एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना फौजदाराला अटक

पुणेः देहुरोड पोलिस ठाण्यातील फौजदाराला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. देहुरोड परिसरातील एका मोक्याच्या भुखंडाला रस्ता काढून देण्यासाठी त्याने पंधरा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापोटी एक लाख रुपयांची ‘टोकन’ रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. नानासाहेब मारुती तेली (वय ५६) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी भोसरी येथील व्यावसायिक शब्बीर इब्राहीम पटेल (वय ४६) यांनी तक्रार दाखल केली होती. पटेल यांचा देहुरोड परिसरात प्लॉट आहे. या प्लॉटचा अॅप्रोच रोड नाही. त्यासाठी त्यांनी आपल्या आजूबाजूच्या प्लॉटधारकांशी बोलणी करून रस्ता मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. या दरम्यान त्यांचे एका प्लॉटधारकाशी वाद झाले होते.

पहा ‘तू हि रे ‘ मराठी सिनेमाचा ट्रेलर

मालाड येथील इनॉबिर्ट मॉलमध्ये  संजयजाधव यांच्या आगामी ‘तू ही रे ‘सिनेमाचं ट्रेलर लॉच करण्यात आला. स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार,गिरीश ओक अशी  स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात प्रेक्षकांना पुन्हा एकदा लव्ह स्टोरी एका वेगळ्यारुपात पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील  गाणी गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. पंकज पडघन आणि अमितराज, शशांक पोवार या तिघांनी मिळून सिनेमाला संगीत दिल आहे. आदर्श शिंदे, अमितराज, वैशाली सामंत, उर्मिला धनगर यांनी सिनेमाची गाणी तर गायली आहेत. सिनेमाची कथा अरविंद जगताप यांनी लिहिली आहे.प्रसाद भेंडे यांचे छायाचित्रण या  सिनेमात दिसणार आहे. करण एंटरटेनमेंटचे मृदुलापडवळ- ओझा, शीतल कुंमार-मानेरे, इंडियन फिल्म्स स्टूडिओचे आशिष वाघ आणि उत्पल आचार्य तसेच ड्रिमिंग ट्वेंटी फोर सेवेनचे दिपक राणे यांच्यासह संजय घोडावत हे सहनिर्माते या सिनेमासाठी  एकत्र आले आहेत. तू हि रे हा सिनेमा ४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे

0

अभिनेता  अभिजित खांडकेकर  ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छ्या …

“मनातल्या उन्हात” २४ जुलैपासून सिनेमागृहात!!

mail.google.com

मराठी सिनेमांचा ओघ हा पूर्वीपेक्षा काही प्रमाणात वाढला असून नवनवीन निर्माते, दिग्दर्शक, कलाकार ह्यांची संख्या ही त्याचप्रमाणे वाढत आहे. अभिनेता बनण्याचे स्वप्न हे प्रत्येकाचेच असते. परंतु मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जर अधिक मेहनत घेतली तर आपल्याला यशापासून नक्कीच कोणी लांब ठेवू शकत नाही याचा खराखुरा प्रत्यय आला आहे तो अभिनेता कैलास वाघमारेला.आनंद सागर प्रॉडक्शनच्या विजयश्री पाटील यांची पहिली सिनेनिर्मिती असलेला, पांडुरंग जाधव यांचे दिग्दर्शन असलेल्या आगामी “मनातल्या उन्हात” सिनेमात जालना जिल्ह्यातील चांदई या छोट्याश्या गावात जन्मलेला कैलास वाघमारे आता अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे.
आपल्या मुलांच्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडील धडपडत असतात. मुले ही सुद्धा आपलीच स्वप्ने  पूर्ण करण्यासाठी पाठीमागे धावतात. आपल्या आई-वडिलांच्या इच्छेचा आणि त्यांच्या आकांक्षांचा ते विचार करतात का? त्यांची काही स्वप्ने आहेत का?  याची जाणीव या मुलांना असते का? अशा काही मुद्द्यांभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आली असून प्रत्येकाला आपलीशी वाटणारी अशी या सिनेमाची कथा असल्याचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी सांगितले.
“मनातल्या उन्हात” सिनेमातील माझी भूमिका ही अत्यंत आव्हानात्मक असून वय वर्ष २० ते ६५ वर्षापर्यंतची व्यक्तिरेखा मी या सिनेमात साकारली आहे. सिनेमातील भाषेचा लहेजाही पूर्णपणे वेगळा असल्याने मी त्यासाठी वेगळी मेहनत घेतली. एका सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात अशा काही घटना या सातत्याने घडत जातात आणि त्या परिस्थितीशी तो कसा समोर जातो याचे उत्तम चित्रण “मनातल्या उन्हात” या सिनेमात तुम्हाला पाहता येईल.या सिनेमातील भूमिकेसाठी दिग्दर्शक पांडुरंग सरांनी माझी निवड केली त्यासाठी मी त्यांचा आभारी असल्याचे अभिनेता कैलास वाघमारे यांने सांगितले.
“मनातल्या उन्हात” या सिनेमाची कथा आयएएफ अधिकारी संजय पाटील यांची असून पटकथा विद्यासागर अध्यापक, पांडुरंग जाधव यांनी एकत्रितपणे लिहिली आहे तर  संवाद विद्यासागर अध्यापक यांचे आहेत. या सिनेमात अभिनेते किशोर कदम, समीर धर्माधिकारी, नागेश भोसले, रुचिता जाधव, छाया कदम, मिताली जगताप, बालकलाकार हंसराज जगताप, मंथन पाटील आणि ओविशिखा पाटील यांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहता येणार आहेत.या सिनेमात केवळ एक गाणे असून हे गीत विश्वराज जोशी यांनी लिहिले आहे. या गीताला राहुल मिश्रा यांचे सुमधुर संगीत लाभले असून सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि गायिका रंजना जाधव- माने यांच्या सुमधुर आवाजात ते रेकॉर्ड करण्यात आली आहे,  तर पार्श्वसंगीत अश्विन श्रीनिवासन यांचे लाभले आहे.नागराज दिवाकर यांनी या सिनेमाचे उत्तम छायांकन केले असून निलेश नवनाथ गावंड यांनी संकलन केले आहे.
बॉलीवूडमधील अनेक दिग्गज मंडळीनी या सिनेमाचा ट्रेलर पाहून सिनेमाला सोशल साईट्सवर भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.
तर असा हा मनातील स्वप्नांचा “मनातल्या उन्हात” सिनेमा येत्या २४ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

दहा हजार कोटी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले असते तर सर्वच प्रश्न सुटले असते -अजित पवार यांचा मोदींना टोला

सोलापूर – नेपाळ ला दहा हजार कोटी दिले देवू द्यात पण असेच दहा हजार कोटी येथील  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले असते तर इथले सारे प्रश्नच सुटले नसते काय ? असा सवाल करीत अगोदर आपल्या घरात काय जळत आहे ते पहा, ते पाहूनच शेजारधर्म हि पाळा असा सल्ला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला येथून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिला

सोलापूर येथील जिल्हा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते . ते म्हणाले , ‘’नेपाळमध्ये भूकंप आल्यावर केंद्र सरकारने त्यांना दहा हजार कोटी रुपये दिले. शेजारच्या देशांना मदत जरूर करावी. परंतु आमच्या येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे काय? त्यांना वाऱ्यावर सोडून नेपाळला दहा हजार कोटी दिले. ऊस उत्पादकांसाठी दहा हजार कोटी दिले असते, तर येथील सर्वच प्रश्नच सुटले असते.
राज्यात आणि देशातही सत्तेत असलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेच सांगत आहेत की, सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलेला दिसतो आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी म्हणतात की, देशात आणीबाणीसारखी स्थिती आहे. या सरकारची लक्षणे काही ठीक दिसत नाहीत.
शिक्षणमंत्री विनोद तावडे इंजिनिअर असल्याचे सांगायचे. आता त्यांची डिग्रीच बोगस आहे. राज्याचे शिक्षणमंत्रीच जर बोगस डिग्री घेऊन फिरत असतील, तर आमच्या गोर-गरीबांच्या पोरांनी कुणाकडं बघावे. दिल्लीत मंत्र्याला बोगस डिग्रीमुळे शिक्षा होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही? काही मंत्री तर इनशर्ट करतात आणि कमरेला पिस्तुल असल्याचे दाखवत फिरतात. मंत्री झाल्यावर पोलिस बंदोबस्त असतो, हे त्यांना बहुधा माहितीच नसावे.
देवेंद्र फडणवीस स्वत: नागपूरचे आहेत. नितीन गडकरीही नागपूरचे आहेत, ते तिकडे दिल्लीत बसलेत. गिरीश बापट पुण्याचे आहेत. तसे प्रकाश जावडेकर पण पुण्याचे आहेत. पण ग्रामीण भागाचा चेहरा असलेला नेताच यांच्याकडे नाही. एकनाथ खडसे ग्रामीण भागाचे नेते होते. पण तेही मंत्री झाल्यापासून काहीही बोलायला लागलेत. अरे विरोधी पक्षनेते असताना कसे बोलत होते आणि आता का असं वंगाळ वागायला लागलात? बाबांनो यांना ग्रामीण भागाशी काहीही देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याची दानतच या युती सरकारमध्ये नाही.’’ असा आरोप हि यावेळी अजित पवार यांनी केला

अण्णा हजारे यांच्यावर एम ए रंगूनवाला दंत महाविद्यालयात दंतोपचार

 
अण्णांनी भावी डेन्टीस्ट  डॉक्टर्स शी साधला संवाद :जीवनात सेवेची संधी घ्या 
पुणे :
प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज सकाळी  (मंगळवारी ) महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एजुकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला दंत महाविद्यालयात दंतोपचार (रूट कॅनाल ट्रीटमेंट )  घेतले . याआधी त्यांनी महाविद्यालयाच्या बी डी एस आणि एम डी एस विद्यार्थ्यांशी संवाद साधला . संस्थेच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार ,दंत महाविद्यालयाचे प्राचार्य रमणदीप दुग्गल ,उप प्राचार्य  डॉ . विवेक हेगडे ,सचिव आर ए शेख यांनी स्वागत केले .
डॉ विवेक हेगडे यांच्या टीमने  ७८ वर्षीय  अण्णांच्या दाताची तपासणी केली,क्ष -किरण तपासणी केली  आणि रूट कॅनाल उपचार केले
त्याआधी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अण्णा हजारे म्हणाले ,’ जीवन हे सेवेसाठी आहे . डॉक्टरांनी सेवेचे पैसे घ्यावेत पण फक्त पैशासाठी जगू नये . जीवनात पैसा हे सर्वस्व मानून कोणीही काम करू नये .  डॉक्टरांना सर्वांच्या सेवेची संधी मिळत असल्याने त्यांनी ऐहिक आनंदापेक्षा सेवेच्या आनंदाला प्राधान्य द्यावे .
युवाशक्ती जागृत झाली तर देश बदलेल यावर आपला विश्वास आहे असे सांगून  ते म्हणाले  ‘जनलोकपाल साठी पुन्हा आंदोलन करण्याचे नियोजन आहे ‘
संस्थेच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार यांनी शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देवून अण्णा हजारे यांचा सत्कार केला . प्रदीप मुनोत ,पठारे ,डॉ अन्वर शेख उपस्थित होते

संकष्टी चतुर्थी आणि रमजानचा उपवास एकत्रितपणे सोडला –

पुण्यातील अभिनव उपक्रम

पुणे- संकष्टी चतुर्थी आणि रमजानचा पवित्र उपवासनिमित्ताने पुणे मिडिया वॉच व सिद्धार्थ वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ” सर्व धर्मीय रोजा इफ्तार कार्यक्रमात सर्व धर्मियांच्या धर्मगुरुनी एकमेकांना मोदक खजूर देऊन उपवास सोडविला . “ आपण सर्व एकच आहोत  “ या राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून दिला .

   पुणे  कॅम्पमधील छत्रपती शिवाजी मार्केट मागील  सिद्धार्थ वाचनालय व ग्रंथालयाच्या आवारात कार्यक्रम झाला . या कार्यक्रमात हिंदू समाजातून  देवीप्रसाद जोशी , मुस्लिम समाजातून  मौलाना काझमी , ख्रिस्त समाजातून  फादर माल्कम  सिक्वेरा , शीख समाजातून भोलासिंग अरोरा , बौध्द समाजातून बाप्पूसाहेब भोसले , जैन समाजातून विनोद सोलंकी ,  लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीषक बरकत मुजावर , सिद्धार्थ वाचनालय व ग्रंथालयचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला ,  पुणे मिडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर ,ग्रंथपाल दिलीप भिकुले , विकास भांबुरे , कवी बादशहा सय्यद , हाजी रशीद खिजर ,  इकबाल शेख , मनजितसिंग विरदी ,  रे फर्नाडिस , सुनील माने , मनोज पिल्ले , बबलू नाईकनवरे , विनय भगत , अच्युत निखळ , रणजित परदेशी , नितीन डिसोझा , राकेश छाजेड , गौसिया खान , भारती अंकलेल्लू , छाया जाधव , सरदार खान , दत्ता बोबडे , निलेश कणसे , अयुब खान , अक्रम शेख ,  युसुफ बागवान , वाहिद बियाबानी , प्रविण जाधव , चेतन मोरे , सुरेंद्र  परदेशी , राजेंद्र घोलप , महेंद्र गायकवाड , सुहास पवार , मनोज निकाळजे आदी मान्यवर  होते .

     यावेळी संकष्टी चतुर्थीचे महत्व देवीप्रसाद जोशी यांनी पटवून दिले , तर  रमजानचा पवित्र उपवासचे महत्व मौलानाकाझमी यांनी सांगितले . यावेळी वाहिद बियाबानी यांनी दुवाचे वाचन केले .

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत पुणे मिडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर यांनी केले तर सूत्रसंचालन विकास भांबुरे यांनी केले तर आभार दिलीप भिकुले यांनी मानले .

एफटीआयआयचा तिढा – अभिनेत्री पल्लवी जोशीनं सरकारची ऑफर नाकारली …

0

पुणे-सरकार एफटीआयआय चे भगवेकरण करीत आहे असा आरोप तीव्र होत असताना   ‘एफटीआयआयच्या नियामक परिषदेचे सदस्य होण्यात मला रस नाही,’ असं सांगत अभिनेत्री पल्लवी जोशीनं सरकारची ऑफर नाकारली आहे तसं पत्रच तिनं माहिती व प्रसारण खात्याला लिहिलं आहे.एफटीआयआयच्या Society Members पैकी राहुल सोलापूरकर , अनघा घैसास यांच्यासह काही नावांनाही विद्यार्थ्यांचा विरोध आहे तर दुसरीकडे आता अध्यक्ष पदासाठी अभिनेत्री विद्या बालन चा पर्याय सरकार विचारात घेण्याची शक्यता आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे
दरम्यान पल्लवी जोशी हिने  म्हटले आहे कि , ‘एफटीआयआयचा भाग होणं मला निश्चितच आवडलं असतं. मात्र, सध्याच्या नकारात्मक वातावरणात ते योग्य वाटत नाही. राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही. संस्थेत कोणाची निवड केली जावी किंवा नको याबद्दल मला काहीही म्हणायचं नाही. माझ्या निर्णयाचा कोणाच्याही नियुक्तीशी संबंध नाही. प्रश्न विद्यार्थ्यांच्या समाधानाचा आहे. तेच खूष नसतील तर संस्थेत येण्याचा उपयोगच काय? कोणतीही कला नकारात्मक वातावरणात बहरू शकत नाही. तीन दिवसांपूर्वीच मी तसं संबंधितांना कळवलं आहे.’
एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र सिंह यांच्या नियुक्तीबरोबरच अन्य १२ कलाकारांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. पल्लवी जोशी हिचाही त्यात समावेश होता. पण, गजेंद्र सिंह यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळं संस्थेत वादाचा अंक सुरू झाला आहे. सिंह यांच्या नियुक्तीला एफटीआयआयमधील डाव्या विचारांच्या व भाजपविरोधी विद्यार्थी संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. एफटीआयआयचे भगवेकरण करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करत सिंह यांची निवड रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. चित्रपट क्षेत्रातील काही मंडळींचाही या मागणीला पाठिंबा आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर एफटीआयआय व संस्थेच्या नियामक परिषदेचे सदस्य म्हणून निवड करण्यात आलेल्या अनेक नामवंत कलाकारांनी एफटीआयआयशी फारकत घेणं सुरू केलं आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते जानू बरुआ, सिनेमॅटोग्राफर संतोष सिवान यांनी नुकताच एफटीआयआयच्या सदस्त्वापासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता पल्लवी जोशी हिनंही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवलं आहे.

‘ वंदना चव्हाण : अनरेवेलिंग द ट्रू स्टेट्समनशिप ‘ या फोटो बुक चे महापौरांच्या हस्ते प्रकाशन

 पुणे
 पुण्याच्या पर्यावरण प्रेमी राज्यसभा सदस्य  एड . वंदना चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वावरील ‘प्रबोधन माध्यम प्रकाशन ‘ निर्मित  ‘ वंदना चव्हाण : अनरेवेलिंग द ट्रू स्टेट्समनशिप ‘   या  ‘फोटो बुक’ चे प्रकाशन आज महापौर दत्ता धनकवडे ,खा . वंदना चव्हाण ,’प्रबोधन माध्यम प्रकाशन ‘ च्या संचालक गौरी बिडकर यांच्या हस्ते  आणि श्री हेमंत चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले .
 वंदना चव्हाण यांच्या वाढ दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज सकाळी राष्ट्रवादी शहर कार्यालयात या फोटो बुक चे प्रकाशन करण्यात आले .
 राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहराध्यक्ष म्हणून केलेली कामगिरी ,राज्यसभा सदस्य या नात्याने केलेले अभ्यासदौरे ,पर्यावरण स्नेही उपक्रम ,महिला सक्षमीकरणाचे उपक्रम ,शहर विकास प्रश्नावर केलेले काम याचा मागोवा या ‘ कॉफी टेबल बुक ‘ प्रकारातील पुस्तकात घेण्यात आला आहे .
या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे .
‘प्रबोधन माध्यम  ‘ प्रकाशनाचे  चे गौरी बिडकर , महेश कुलकर्णी ,सारिका रोजेकर ,सचिन सूर्यवंशी ,श्रीकांत वाघ यांनी  आज खासदार वंदना चव्हाण यांना ही वाढ दिवसाची भेट दिली !
 विविध उपक्रमांनी वाढदिवस साजराखासदार वंदना चव्हाण यांचा वाढदिवस शहरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वंदना चव्हाण यांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती करण्यात आली. मनाली भिलारे यांनी वेबसाईट तयार केली. श्वेता होनराव यांनी शांततेचे प्रतिक म्हणून कबुतरे उडवली. पक्ष कार्यालयात वंदना चव्हाण यांच्या हस्ते दहा वाजून दहा मिनिटांनी केक कापण्यात आला. यावेळी महापौर दत्ता धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, माजी महापौर चंचला कोद्रे, नगरसेवक विशाल तांबे, अप्पा रेणूसे, विकास दांगट, महेंद्र पठारे, संजिला पठारे, सुमन पठारे, कमल ढोले-पाटील, दीलीप बराटे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नितीन उर्फ बबलू जाधव, राकेश कामटे, अशोक राठी यांनी वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन केले.

mail.google.com2mail.google.com1mail.google.com

 

रशिया आणि भारताच्या मैत्रीत बाधा ?

0
नवी दिल्‍ली –पाक ची निंदा करणण्याच्या भारताच्या प्रस्तावाला न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया नंतर आता चक्क रशियानेही विरोध केल्याने भारताच्या जागतिक स्तरावरील प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे . दरम्यान रशियातच ८ जुलै ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाक चे नवाज शरीफ यांची भेट होत असल्याचे वृत्त आहे . आज पासून नरेंद्र मोदी हे सहा देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत
दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थसाह्यासंदर्भात अलीकडेच ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी, दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतानं रोखठोक भूमिका मांडली. जमात-उद-दावा आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांवर कुठलीही कारवाई न करणाऱ्या पाकला बड्या देशांकडून चपराक बसावी, या उद्देशानं भारतानं निंदाप्रस्ताव सादर केला होता. त्याला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियानं विरोध केलाच; पण भारताशी चांगले संबंध असलेल्या रशियानंही त्या विरोधात भूमिका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना धक्का दिला आहे. वास्तविक, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काश्मीर मुद्द्यावर रशियानं कायमच भारताला साथ दिली आहे. त्यामुळे आता अचानक तसे का झाले यावर राजकीय समीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवार) रशिया आणि मध्‍य आशियातील पाच देशांच्‍या सात दिवशीय दौ-यावर आहेत. यामध्‍ये कजाकिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उज्बेकिस्तान या देशांचा समावेश आहे. उज्बेकिस्तानपासून त्‍यांचा दौ-याची सुरुवात होणार आहे. दरम्‍यान, ब्रिक्स आणि शंघाई शिखर संमेलनामध्‍ये भाग घेणार आहेत. या ठिकाणी त्‍यांची पाक चे  पंतप्रधान नवाज शरीफ यांच्‍यासोबत भेटहोणार असल्याचे वृत्त आहे .
पंतप्रधान कार्यालयाच्‍या माहिनुसार, ‘ताशकंदमध्‍ये आपले लोकप्रिय पंतप्रधान लालबादूर शास्‍त्री यांचे निधन झाले होते. त्‍या ठिकाणी जावून नरेंद्र मोदी भेट देणार  आहेत. शिवाय उज्बेकिस्तान आणि भारतामध्‍ये व्‍यापार वाढावा यासाठी अनेक महत्‍त्‍वाच्‍या करारावर स्‍वाक्षरी केली जाणार आहे’,  त्‍यानंतर 7 ते 8 जुलैला पंतप्रधान किर्गिस्तानला जातील. 8 जुलैच्‍या रात्री ते रशियाला पोहोचतील. तिथून सरळ तुर्कमेनिस्तानला रवाना होतील. 12 जुलैला किर्गिस्तान पोहोचतील. तजाकिस्तानमध्‍ये त्‍यांच्‍या दौ-याचा समारोप होणार आहे.
ब्रिक्स राष्ट्रांच्या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करणार आहेत. आयसिसचा धोका आणि दहशतवादाविरोधातील रणनीती, हाच या परिषदेचा अंजेडा असल्यानं तिथे रशियाची नेमकी भूमिका कळू शकेल

आता प्रतीक्षा ‘भय ‘ ची …

अभिजीत खांडकेकर आता मराठी रसिकांच्या पहिल्या सातातील एक असा लोकप्रिय अभिनेता म्हणून गणला जाऊ लागला आहे त्यात सतीश राज्वादेंचे नाव आणि पप्पी मागणाऱ्या पारूची हि दखल अशा विविध कारणाने पोस्टर  मुळे ‘ या चित्रपटाची अनेकांना प्रतीक्षा आहे माणसाच्या मनातल्या भीतीवर भाष्य करणाऱ्या ‘भय’ या आगामी मराठी सिनेमाची पहिली झलक सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीतीत नुकतीच दाखवण्यात आली. दमदार कथानक,  युवा कलाकार, श्रवणीय संगीत आणि त्याला कल्पक दिग्दर्शनाची जोड यामुळे ‘भय’ हा चित्रपट रसिकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. भय चित्रपटाचं पोस्टर उत्सुकता वाढवणार ठरलं आहे.निर्माते सचिन कटारनवरे व सहनिर्माते अजय जोशी, अनिल साबळे यांनी नाविन्यपूर्ण आशयाच्या ‘भय’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर वेगळ्या धाटणीच्या या सिनेमाच्या दिग्दर्शनाची आणि संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे. कथा, पटकथा, संवाद नितीन सुपेकर यांचे असून शेखर अस्तित्व यांनी गीते लिहिली आहेत. या गीतांना अजित समीर यांचा संगीतसाज आहे. कलादिग्दर्शन प्रशांत राणे याचं आहे. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी आशिष चव्हाण यांनी सांभाळली आहे. ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत या चित्रपटात अभिजीत खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, विनीत शर्मा, संस्कृती बालगुडे, सिद्धार्थ बोडके यांचा अभिनय प्रेक्षकांना पहायला मिळेल. माणसाचे मन ही मोठी अजब गोष्ट आहे. मनाचे भाव, भावना आणि माणसाचे वर्तन यातल्या फार कमी गोष्टींचा विज्ञानाला उलगडा झाला आहे. भीती ही प्रत्येकाच्या मनात असते. ही भीती कशाचीही असू शकते. उंचीची, गर्दीची, एकटेपणाची अगदी कशाचीही भीती एखाद्याला सतावत असते. काही लोकांच्या मनात ही भीती वाढते हे पॅरानॉईड स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. या आजाराने ग्रस्त व्यक्तींना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर ते कशाप्रकारे मात करू शकतात या विषयावर ‘भय’ हा चित्रपट भाष्य करतो. भीती मनात ठेऊन जगणाऱ्या व्यक्तींना काय अडचणींना तोंड द्यावे लागते याचा गुंगवून टाकणारा प्रवास म्हणजे…‘भय’ हा चित्रपट.

1

माझी मुले निवडणूक नाही लढणार तर काय म्हशी चारणार ? लालूंचा चा सवाल

पाटणा -माझा मुलगा निवडणूक लढणार नाही तर काय करणार; म्हशी चारणार, असा सवाल  करीत ‘तेजप्रतापच नव्हे तर धाकटा पोरगा तेजस्वी आणि मुलगी मीसा यादव हीसुद्धा विधानसभा लढेल,’ असंही राष्ट्रीय जनता दलाचे नेते व बिहारचे दिग्गज नेते लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रीय जनता दलाच्या १९व्या वर्धापनदिनानिमित्त वैशाली येथे झालेल्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात लालूंचा मुलगा तेजप्रताप यादव याने महुआ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. महुआ विधानसभा मतदारसंघात आरजेडीचे यापूर्वीचे उमेदवार असलेले जागेश्वर राय हे तेजप्रतापच्या घोषणेमुळं काहीसे नाराज आहेत . राय यांनीही मग लगेचच लालूप्रसाद यांनी आदेश दिला तरच आपण पुढची निवडणूक लढू, असं उपरोधिकपणं तिथंच सांगून टाकलं. त्यामुळं राय यांच्या समर्थकांनी सभेत जोरदार घोषणाबाजी व गदारोळ सुरू केला. त्यावर स्वत: लालू यांनी सभेचा ताबा घेतला आणि तेजप्रताप निवडणूक लढेल असं सांगून टाकलं. ‘आमचं कुटुंब निवडणुकीच्या राजकारणाला अपवाद नाही. माझा मुलगा निवडणूक लढणार नाही तर काय करणार; म्हशी चारणार, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. ‘तेजप्रतापच नव्हे तर धाकटा पोरगा तेजस्वी आणि मुलगी मीसा यादव हीसुद्धा विधानसभा लढेल,’ असंही लालूंनी स्पष्ट केलं.

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजसह देशभरातील १९ महाविद्यालयांना ‘हेरिटेज’चा दर्जा!

0

मुंबई-‌शेकडो वर्षांपासूनच्या  शिक्षणसंस्थांचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी अशा कॉलेजांना ‘हेरिटेज’ दर्जा देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला असून, मुंबईतील सेंट झेवियर्स, पुण्यातील फर्ग्युसन आणि नागपूरमधील हिस्लॉप या ऐतिहासिक कॉलेजांचा समावेश आहे. यूजीसीने देशभरातील १९ हेरिटेज कॉलेजांची यादी रविवारी जाहीर केली. त्यात राज्यातील या तीन कॉलेजांना मानाचे स्थान मिळाले आहे.
या ‘हेरिटेज’ कॉलेजांना यूजीसीकडून विशेष आर्थिक मदत दिली जाणार असून, कॉलेज कॅम्पसचे नूतनीकरण किंवा ‘हेरिटेज’संदर्भात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ती वापरण्यात येईल. सेंट झेवियर्सला १ कोटी ५३ लाख तर, फर्ग्युसन आणि हिस्लॉप कॉलेजला प्रत्येकी २० लाखांचे अनुदान देण्यात आले आहे.
झेवियर्स कॉलेज – स्थापना सन १८६९ मध्ये. सुरुवातीला केवळ आर्टसचे श‌क्षिण देणाऱ्या या कॉलेजमध्ये सन १९२० पासून सायन्स विभागाचाही समावेश. इंड‌ो-गॉथ‌कि शैलीतील बांधकाम असलेली ही वास्तू मुंबईतील देखण्या इमारतींपैकी एक आहे.
फर्ग्युसन कॉलेज – डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे सन १८८५ मध्ये स्थापना झाली. कॉलेजच्या उभारणीसाठी १२०० रुपयांची देणगी देणारे मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांचे नाव कॉलेजला देण्यात आले.
हिस्लॉप कॉलेज – रेव्ह. स्टिफन हिस्लॉप यांच्या नावाने ओळखली जाणारी ही संस्था सन १८८३ मध्ये सुरू झाली. तेव्हापासून आजतागायत या संस्थेने समाजातील विविध घटकांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
देशभरातील शेकडो वर्षे जुन्या कॉलेजांना हेरिटेजचा दर्जा देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे अशा कॉलेजांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार ६० कॉलेजांनी अर्ज केले. त्यांच्यात राजधानी दिल्लीतील एकाही कॉलेजचा समावेश नव्हता. अर्ज प्राप्त झालेल्या ६० कॉलेजांपैकी १९ कॉलेजांना हेरिटेजचा दर्जा देण्यात आला आहे