पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण झाले. भाविकांच्या वर्गणीतून तयार केलेला हा अद्वितीय २२ किलोचा सुवर्ण कलश पुण्यातील श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सने साकारला आहे. अपार श्रद्धा आणि उत्तम कामगिरीचा आशीर्वाद म्हणून आळंदी देवस्थान संस्थानाने नगरकर परिवाराला मिळाल्याची भावना आहे. कलशाचे विधिवत पूजन करून, नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर हा कलश नगरकर परिवाराने देवस्थान समितीकडे सुपूर्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, बापूसाहेब पाठारे, महेश लांडगे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, यांच्यासह संत परंपरेतील मान्यवर व देवस्थान समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात नगरकर ज्वेलर्सचे वसंत नगरकर, प्रसाद नगरकर व पुष्कर नगरकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या संमतीने नगरकर ज्वेलर्सला हे पवित्र कार्य करण्याची संधी मिळाली. ८ ऑगस्टला कलश निर्मितीची सूचना आल्यानंतर वरचा कळस आणि खाली कुंभ असे दोन भागात काम सुरु झाले. चोख २२ किलो सोन्याच्या वापर करीत सलग सहा दिवस २२ ते २५ कारागिरांनी भक्तीभाव, निष्ठा व सर्जनशील कौशल्यातून हा कलश साकारला. हा सुवर्ण कलश केवळ वास्तूशोभा नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेला दिलेला तेजोमय मुकुट आहे, अशी भावना वसंत नगरकर यांनी व्यक्त केली.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त मंदिरावर प्रतिष्ठापित झालेला सुवर्णकलश बनविण्याचा क्षण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाचे प्रतीक आहे. नगरकर ज्वेलर्ससाठी हा क्षण म्हणजे भक्तिभाव, समर्पण आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठीचा सुवर्ण वारसा आहे. नगरकर ज्वेलर्सना लाभलेला हा ऐतिहासिक मान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला समृद्ध करणारा ठरला, असे प्रसाद नगरकर म्हणाले.
पुणे, दि. १८ ऑगस्ट २०२५ — शिवसेना पुणे शहराच्या श्रावण महोत्सवानिमित्त द्वारका गार्डन, सुनिता नगर, वडगावशेरी येथे भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषद उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे संयोजन हेमंत बत्ते यांनी केले होते. मनोज अष्टेकर, गौरव कश्यप, उदय खांडके, प्रणव जोशी, दिनेश मुकुलकड, उत्तम नार्वेकर, श्रीकांत अप्पा कुलकर्णी, तुषार टाकळकर, रोहन साळवी आदींनी स्पर्धेचे आयोजन यशस्वी केले.
या प्रसंगी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “आज श्रावणी सोमवार असून महिलांच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम हा खरोखरच प्रेरणादायी आहे. महिलांच्या आवाजातली भक्ती ऐकताना संत जनाबाईंची आठवण होते. घरची जबाबदारी सांभाळून जेव्हा महिला अशा पवित्र कार्यात सहभागी होतात तेव्हा त्या संपूर्ण समाजाला नवा आत्मविश्वास देतात.”
तसेच महिलांच्या विकासाबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “महायुती सरकारने स्त्रियांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सुविधा दिल्यामुळे एसटी महामंडळ पुन्हा नफ्यात आले आहे. हजारो महिला एसटीने प्रवास करू लागल्याने एसटीच्या अर्थचक्राला गती मिळाली आहे. तसेच महिलांचे बचत गट, उद्योजकता यामुळे ग्रामीण व शहरी भागात आर्थिक चक्राला बळकटी मिळत आहे. महिलांना दिलेली कर्ज ९९% परतफेडीचा विक्रम करतात हीच त्यांची विश्वासार्हता आहे. महिलांनी घेतलेले कर्ज फक्त परतफेडच नव्हे तर अनेक ठिकाणी रोजगारनिर्मिती आणि कुटुंबाच्या स्थैर्याला बळ देण्यासाठीही मोलाचे ठरले आहे.”
या कार्यक्रमाला शिवसेना पुणे शहर संघटक आनंद गोयल, दिलीप देवकर, विनोद गलांडे, अनिता परदेशी, पद्मा शेळके, चेतन गलांडे, लक्ष्मण सावंत, धनंजय शिंदे, मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुणे-पृथ्वी वाचवायची असेल तर पर्यावरण वाचविणे काळाची गरज आहे ,वृक्षतोडीवर वृक्षारोपण हा पर्याय नसून वृक्षपुनर्रोपण हा जास्त प्रभावी उपाय असे प्रतिपादन येथे शोभाताई आर धारीवाल यांनी केले आहे .दरवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रविवार रोजी सायंकाळी 4 वाजता पद्मश्री आचार्य चंदनाजी , मुकेश मुनिजी , जयप्रभ विजयजी ,आगमचंद्रजी स्वामी यांच्या उपस्थितीत ” उवसग्गहरं स्तोत्र ‘सामूहिक जपाचे आयोजन श्रीमान रसिकलालजी एम धारीवाल स्थानक बिबवेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आलेले होते .यावेळी त्या बोलत होत्या .या कार्यक्रमासाठी पुनीत बालन ,पोपटशेठ ओसवाल, वालचंदजी संचेती , विजयकांतजी कोठारी ,अचल जैन, विविध जैन संस्थांचे पदाधिकारी,नामवंत उद्योजक, तसेच शोभाताई आर धारीवाल वसतिगृह एफसी रोड, शोभाबेन आर धारिवाल छात्रालय डेक्कन व शोभाताई आर धारीवाल वसतिगृह चिंचवड येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी , विविध गणेश मंडळे , आळंदी येथील वारकरी संप्रदायाचे भाविक तसेच जैन- अजैन बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते.
शोभाताई धारिवाल म्हणाल्या,’ जैन धर्मामध्ये संस्कार आणि मूल्य यांची परंपरा हजारो वर्षांपासून चालू आहे , धर्मात अनेक मंत्र सांगितलेली आहे त्यापैकी उवसग्गहरं मंत्र संकटावर मात करणारा असून याच मंत्राने श्रीमान रसिकशेठ धारीवाल साहेब रुग्णालयात व्हेंटिलेटर असतांना वैद्यकीय सेवेसोबतच रोजच्या जापणे सकारात्मक ऊर्जा तयार होऊन प्राण वाचू शकले अशी माझी धारणा आहे ,म्ह्णूनच मी रसिकलाल एम धारीवाल फाऊंडेशन द्वारा दरवर्षी सामूहिक स्तोत्र पठण जाप आयोजीत करते जेणेकरून समाजामध्ये सकारात्मक भावना निर्माण होईल आणि अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे ही सामाजिक गरज आहे , यात फक्त जैन समाज सामील होत नसून इतर समाजही मोठ्या प्रमाणात स्तोत्र पठणाचा लाभ घेतो, यावर्षीचे आयोजनाचे हे नववे वर्ष आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वतःहून या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वांचे स्वागत करते असे प्रतिपादन शोभाताई आर धारिवाल यांनी वावेळी व्यक्त केले ,आर एम डी फाऊंडेशन द्वारा आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात भारत भर कार्य केले जाते ,गरजू व हुशार विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्वारे उच्चशिक्षणासाठी मदत केली जाते, अत्यवस्थ शाकाहारी रुगांना आर्थिक मदत केली जाते , आज बांधकाम किंवा रस्ते विस्तारण्यासाठी मोठ्या मोठ्या झाडांना तोडल्या जाते , वृक्षतोडीवर वृक्षारोपण हा पर्याय नसून वृक्षपुनर्रोपण हा जास्त प्रभावी उपाय आहे अशा वेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांच्या द्वारे ५० ते १०० वर्षे वयाची मोठी वृक्ष वाचविण्याची मोठी मोहीम हाती घेतलेली असून आतापर्यंत २१०० पेक्षा जास्त वृक्षांना वाचविण्यात यश आले आहे, पृथ्वीला वाचविण्यासाठी पर्यावरण वाचविणे गरजेचे आहे आवाहनही यावेळी शोभाताई यांनी उपस्थितांना केले . त्याच वेळी त्यांनी यावर्षी डीजे मुक्त दहीहंडी उत्सव साजरा करणारे बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांची स्तुतीही केली आणि एकप्रकारे पृथ्वीला आणि पर्यावरणाला वाचविण्याची धुराच जान्हवी धारिवाल बालन आणि पुनीत बालन यांनी खांद्यावर घेतली आहे यासाठी त्यांनी दोघांचेही अभिनंदन केले .
लहानवयातच जान्हवी यांनी बिहारमधील विरायतन संस्थेच्या कार्यात खूप मोठं सहकार्य केले आहे आज विरायतन संस्थेच्या द्वारे सुरु असलेली रुग्णसेवा,शिक्षण कार्य यामध्येही त्यांचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे मी त्यांना खूप आशीर्वाद देते असे मत आचार्य पद्मश्री चंदनाजी यांनी व्यक्त केले . पू . श्री जयप्रभ विजयजी यांनी उवसग्गहरं स्तोत्र चे महत्व श्रावकांना समजावून सांगितले, तर पू .श्री आगमचंद्रजी स्वामी यांनी अशा प्रकारचे उपक्रम स्तुत्य असून त्याचा लाभ सर्वांना व्हावा , मुकेश मुनिजी यांनी अशा प्रकारचे सामूहिक स्तोत्र जपाचे लोकांसाठी लाभदायक आहेत असे असे आशीर्वाद दिले . स्तोत्र पठणानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता .
पुणे: “जीवनात यशस्वी होण्यासाठी कल्पक, ध्येयवादी व प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. आयुष्यात यश साध्य करायचे असेल, तर फक्त स्वप्न पाहू नका; ती स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत राहा,” असा सल्ला सनराईज कँडल्स अँड ओशोनिक व्हिजन फॉर ब्लाइंड वेलफेयर सोसायटीचे संस्थापक डॉ. भावेश भाटिया यांनी विद्यार्थ्यांना दिला.
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात डॉ. भावेश भाटिया प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समितीच्या मुलींचे नवीन वसतिगृहात झालेल्या कार्यक्रमावेळी भाटिया यांची पत्नी नीता, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड, पद्माकर जोगदंड, दिनकर वैद्य, चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओंकार शिंदे, मानसी जाधव यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आले. डॉ. आपटे वसतिगृहात कर्नल दीनानाथ सिंग, सुमित्रा सदनमध्ये विनया ठोंबरे, लजपत भवनमध्ये श्रीधर कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
कार्यक्रमाची सुरवात देशभक्तीपर गीते आणि ऑपरेशन सिंदूर वरील ऍक्ट सादर करून झाली. संघर्षपूर्ण वाटचाल करत यशस्वी उद्योजक बनलेल्या दृष्टीहीन डॉ. भावेश भाटिया यांनी आपला प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. यशस्वी उद्योजकासोबतच गिर्यारोहक, क्रीडापटू, सायकलपटू अशी भाटिया यांची उल्लेखनीय कामगिरी ऐकून उपस्थित प्रभावित झाले. या प्रवासात पत्नी नीता हिची मोलाची साथ लाभल्याचे सांगून समिती आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहे, तेही एक प्रकारे देशसेवेचेच कार्य आहे, अशा शब्दांत समितीच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
डॉ. भाटिया म्हणाले, “घरची परिस्थिती बिकट असताना, आईच्या आजारपणात नातेवाईकांची साथ लाभली नाही. अशावेळी महाबळेश्वर येथे मसाजचा व्यवसाय करत यशस्वी होण्याचे ध्येय उराशी बाळगून ५००० रु पासून सनराईज मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. कोणतीही वस्तू बनवण्यापेक्षा ती विकणे कठीण असते. मात्र, नफ्याचा विचार न करता ग्राहकांसोबत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करत व्यवसाय केला. हा व्यवसाय करताना माणसे जोडली. रेल्वे प्लॅटफॉर्म, बस स्टॅन्डवर अनेक दिव्यांग, दृष्टिहीन बांधव भीक मागण्याचे काम करतात. त्यांना रोजगार उपलब्ध करून दृष्टीहीन, तसेच दिव्यांगांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही भाटिया यांनी नमूद केले.
तुषार रंजनकर यांनी प्रास्ताविकात समितीच्या कार्याबद्दल माहिती दिली. समिती हे युवा परिवर्तनाचे केंद्र बनले असून, विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्याचा दृष्टीने काम केले जात आहे. दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले जाते. यावेळी समितीचे हितचिंतक असलेल्या पद्माकर जावडेकर यांच्या परिवाराकडून दोन विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समितीतील विद्यार्थ्यांनी देणगी स्वरूपात काही रक्कम गोळा करून ती डॉ. भाटिया यांच्या संस्थेला दिली. ओंकार शिंदे व पर्णवी म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. सानिका खामणकर हिने आभार मानले.
माजी आमदार मोहन जोशी यांचे महापालिका आयुक्तांना पत्र
पुणे : वाहतूक कोंडी सुटण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक आणि सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी तातडीने खुले करावेत, भाजपच्या ‘इव्हेंट’ची वाट पाहात बसू नका, अशा मागणीचे पत्र माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिले आहे.
मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ मिळत नसल्याने या दोन पुलांचे उदघाटन थांबले आहे, अशी माहिती मिळते. हा प्रकार पुणेकरांचा मनःस्ताप वाढविणारा आहे. सिंहगड रस्त्यावरील गंगा भाग्योदय चौक ते विठ्ठलवाडी या मार्गांवर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे कामही पूर्ण झालेले असल्याने हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी तातडीने खुले करून वाहनचालकांची कोंडीतून मुक्तता करून, त्यांना दिलासा द्यायला हवा, असे मोहन जोशी यांनी पत्रात म्हटले आहे.
या दोन्ही ठिकाणी नागरी वस्ती वाढली आहे. त्यामुळे रहदारीही वाढली आहे. या दोन्ही ठिकाणांवरून दिवसभरात अक्षरशः हजारो वाहने येत जात असतात. गर्दीच्या वेळी तीन-तीन तास वाहतूक कोंडी होते. आता गणेशोत्सव काळात वाहतुकीत अजून भरच पडेल. मग, पुणेकरांची कोंडी कशासाठी करत आहात? असा सवाल मोहन जोशी यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.
सत्ताधाऱ्यांना उदघाटनाच्या निमित्ताने एक ‘इव्हेंट’ करून निवडणुकीत राजकारण साधायचे आहे. या वृत्तीला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. प्रशासनाने हे पूल वाहतुकीसाठी खुले करावेत, अन्यथा काँग्रेस आंदोलन करेल, असा इशारा मोहन जोशी यांनी पत्रात दिला आहे.
पुणे -महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दोन तीन दिवसात प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. दरम्यान मतपत्रिकेवर मतदान घ्यावे आणि एक वार्ड एक नगरसेवक एक मतदार एक मतदान या जुन्याच पद्धतीने लोकाना आजही मतदान पद्धतीवर गाढ विश्वास आहे.EVM आणि प्रभाग पद्धतीला मतदारांचा विरोध होऊ लागला आहे असे असताना निवडणूक आयोग मात्र मनमानी कारभार करत असल्याचा आरोप होत असताना महापालिकेची निवडणूक होणार आहे.
या संदर्भात उज्वल केसकर,सुहास कुलकर्णी,प्रशांत बधे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे कि,’या दोन-तीन दिवसात प्रभाग रचना जाहीर होणार आहे या विषयात आम्ही थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला त्यानुसार आमच्या मते जुने जे प्रभाग आहेत ते साधारणपणे तसेच राहत आहेत फक्त त्यातील काही भाग वाढेल व कमी होईल साधारणपणे सर्व प्रभागांमध्ये 90 ते 95 हजार मतदार असतील असे गृहीत धरल्यास आत्ताच्या असलेल्या प्रभागात 12 15 याद्या वाढवाव्या लागतात त्या प्रशासनाच्या सोयीनुसार ते वाढवतील असे वाटते तसेच काही ठिकाणी नाला ही हद्द धरल्यामुळे काही प्रभागाचे मात्र दोन भाग होतील त्यातील एक भाग शेजारच्या प्रभागाला जोडला जाईल तर दुसऱ्या भागामध्ये चार चा प्रभाग करताना नवीन मोठा भाग जोडला जाईल अशी अशी प्रभाग रचना साधारणपणे आहे जुन्या पुण्यातील प्रभाग मध्ये मतदार संख्या साधारणपणे 90000 ते 95 हजार असु शकते तर खडकवासला पासून केशवनगर पर्यंत नवीन आलेली सर्व गावे ही आत्ता असलेल्या प्रभागांना जोडू शकतात यामध्ये उदाहरण म्हणून जुना धायरी चा प्रभाग त्याला उर्वरित धायरी व खडकवासला नांदेड नांदोशी किरकटवाडी हा भाग जोडला जाऊ शकतो फक्त वाघोली लोहगाव मध्ये एखाद्या वेळेला स्वतंत्र प्रभाग होऊ शकतो असा आमचा अंदाज आहे हे आम्ही वेळोवेळी वर्तमानपत्राच्या द्वारे जी माहिती येत होती व लोकसंख्येची 2००7 परिस्थिती या आधारे अभ्यास करून केला आहे बघू आमच्या अभ्यासाला कितपत यश मिळते ते 22 तारखेला समजेल आयुक्त साहेबांनी ऐकले सर्वांचे आणि केले मनाचे…अर्थात मार्गदर्शक तत्त्वा नुसार …अशी माहिती आहे,खरे खोटे प्रभाग जाहीर झाल्यावर कळेल.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट
बुलढाणा/ मुंबई दि. १८ ॲागस्ट २०२५
बुलढाण्याच्या जळगाव-जामोद तालुक्यातील आडोळ डॅम परिसरातील गावठाण रस्त्याच्या मागणीसाठी गौलखेड येथील तरुण विनोद पवार यांचा जलसमाधी आंदोलनात मृत्यू झाला, हा सरकारी अनास्थेने घेतलेला बळी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज गौलखेड येथे पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामविजय बुरुंगले, स्वातीताई वाकेकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की स्वातंत्र्यदिनी आपल्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना एखाद्या शेतकऱ्याचा जीव जावा, ही आपल्या लोकशाहीला कलंक लावणारी बाब असून शासन-प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे निदर्शक आहे. या दुर्देवी घटनेनंतर जिल्हाधिका-यांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन हलगर्जीपणा बद्दल माफी मागितली पाहिजे होती व ते मुजोरी दाखवत आहेत.
सततच्या संघर्षानंतरही शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही. एखाद्या शेतकऱ्याला आपला जीव देऊन मागण्या मांडाव्या लागतात, हे कोणत्याही जबाबदार शासनासाठी लज्जास्पद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व मागण्यांची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी तसेच पवार यांच्या कुटुंबियांना भरघोस मदत करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
मुंबई दि. १८ ॲागस्ट २०२५ पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार तरुणींनी केली होती. त्यांच्या तक्रारीची साधी दखलही पोलिसांनी घेतली नाही. १२ तासांहून अधिक काळ पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन करूनही दोषी पोलिसांवर गुन्हा नोंद केला नाही. ऊलट त्या तीन तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींऐवजी पीडितांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रताप पुणे पोलिसांनी केला आहे. हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
१ ऑगस्ट रोजी कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करणा-या पोलिसांवर तात्काळ ॲट्रॅासिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला पाहिजे होता पण पोलिसांनी त्यांची साधी तक्रारही घेतली नाही. म्हणून या पीडित मुलींनी पोलीस आयुक्तांलयात दाद मागितली पण प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तिथेच ठिय्या आंदोलन केले. पण पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, उलट या प्रकरणी गुन्हा दाखल करता येणार नाही असे पत्र देऊन पीडितांना पाठवून दिले. याप्रकरणी पुणे पोलिसांविरोधात जनमानसातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असणारे पोलीसच जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करत आहेत, आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत, हे पुण्यात पोलिसांचे जंगलराज आल्याचे निदर्शक आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
मुंबई, मराठवाड्यासह थेट विदर्भापर्यंत रविवारी रात्रीपासून पावसाने धूमशान घातले.सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत, रायगड येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला.
तालुकानिहाय पर्जन्यमान, दि. १८ ऑगस्ट (मि.मी.)संध्या. 5:30 वा. अलिबाग – 135 मुरुड – 47 पेण –142 पनवेल – 134.6 उरण –56 कर्जत – 47 खालापूर –85 माथेरान –147 रोहा –160 सुधागड 84 माणगाव – 142 तळा –134 महाड –93 पोळाडपूर –106 श्रीवर्धन –140 म्हसळा –143 एकूण –1795.6 सरासरी –112.23
आता उद्या मंगळवार, 19 ऑगस्ट रोजीही मुंबई पुण्यासह एकूण सात जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केलाय. तर विदर्भातल्या गडचिरोलीसह चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्रातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. तूर्तास तरी पूरस्थिती आटोक्यात असून, जवळपास एक हजार हेक्टरवरील शेतपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला.
पुढील 3-4 तासांत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, जळगाव, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वारे मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली असून, राज्यात उद्याही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.हवामान विभागाने जवळपास 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केलाय. त्यात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळचा समावेश आहे. या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो. या काळात वाऱ्याचा वेग साधारणतः 30-40 किमी प्रतितास राहील.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गेल्या आठवड्यात अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल त्यांना सांगितले.
मोदींनी युक्रेन युद्धावर संवादाद्वारे शांततापूर्ण तोडगा काढण्याबद्दल बोलले. ते म्हणाले की, भारत या संदर्भातील सर्व प्रयत्नांना पाठिंबा देतो.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यावरही चर्चा केली.शुक्रवारी रात्री उशिरा अलास्कामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट झाली. युक्रेन युद्ध संपवण्याबाबत त्यांची सुमारे ३ तास बैठक झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी फक्त १२ मिनिटे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
पत्रकार परिषदेदरम्यान ट्रम्प म्हणाले की, आमची बैठक खूप सकारात्मक होती. आम्ही अनेक मुद्द्यांवर सहमत झालो, पण कोणताही करार झाला नाही. जेव्हा तो अंतिम होईल तेव्हाच करार होईल.
ट्रम्प यांनी या बैठकीला १० पैकी १० गुण दिले. दुसरीकडे, पुतिन म्हणाले की रशियाची सुरक्षा त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. त्यांनी पुढील बैठक मॉस्कोमध्ये आयोजित करण्याचा सल्ला दिला. आपापली बाजू सांगितल्यानंतर दोन्ही नेते लगेचच व्यासपीठावरून निघून गेले.
त्याच वेळी, झेलेन्स्की यांनी एक्स वर पोस्ट केले की त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दीड तास चर्चा केली. झेलेन्स्की १८ ऑगस्ट रोजी वॉशिंग्टन डीसीला जातील आणि ट्रम्प यांना भेटतील. त्यांनी सांगितले की, युक्रेन पूर्ण ताकदीने शांतता प्रस्थापित करण्यास तयार आहे. भारत हा रशियन तेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे
भारत हा चीननंतर रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. युक्रेन युद्धापूर्वी, भारत रशियाकडून फक्त ०.२% (प्रतिदिन ६८ हजार बॅरल) तेल आयात करत असे. मे २०२३ पर्यंत ते ४५% (प्रतिदिन २० लाख बॅरल) पर्यंत वाढले, तर २०२५ मध्ये, जानेवारी ते जुलै या काळात, भारत दररोज रशियाकडून १७.८ लाख बॅरल तेल खरेदी करत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून, भारत दरवर्षी १३० अब्ज डॉलर्स (११.३३ लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीचे रशियन तेल खरेदी करत आहे.
पुणे : हिंदू समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि संघटनबांधणीसाठी अखंड कार्यरत असलेल्या हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी पुण्याचे कोहिनूर, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ही निवड समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत करण्यात आली. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास समितीचे अखिल भारतीय संयोजक गुणवंतसिंग कोठारी आणि पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
महामंत्री किशोर येनपुरे यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. त्यानुसार –
उपाध्यक्ष: पंडित शिवकुमार शास्त्री
संयोजक: किशोर येनपुरे
सहसंयोजक: अॅड. संदीप सारडा
मठ-मंदिर उपाध्यक्ष: संजय भोसले
प्रशासकीय संस्था उपाध्यक्ष: सीए राधेश्याम अगरवाल, चरणजीतसिंग सहानी
महिला सहभागाला प्राधान्य देत मातृशक्ती विभागाची जबाबदारी अॅड. कीर्ती कोल्हटकर, अनुपमा दरक, विद्या घाणेकर यांच्याकडे देण्यात आली आहे. तर मार्गदर्शक मंडळात महेश सूर्यवंशी, राजेंद्र भाटिया, सुभाष परमार, सुनंदा राठी यांची निवड झाली आहे.
एकूण ७० पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या नव्या कार्यकारिणीमुळे समितीच्या कार्याला नवी दिशा आणि ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सबसे कातील गौतमी पाटील हिच पिवोट म्युझिक प्रस्तुत “राणी एक नंबर” हे भन्नाट गाणं नुकतच प्रदर्शित झाल आहे. विशेष म्हणजे हे गाण बॉलिवूड स्टाईल आणि ग्राफ़िक्सचा वापर करून बनवलेलं आहे. तसेच गायिका सोनाली सोनवणे हिने या गाण्याला स्वरसाज दिला आहे. रोहन साखरे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर कैलाश पवार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार मोहन उपासनी यांनी संगीत दिलं आहे. संगीत नियोजन मोहन उपासनी आणि संकेत गुरव यांनी केले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी गोपी बैरागी आणि निलेश भोर यांनी केले आहे. तसेच या गाण्याची प्रोजेक्ट हेड विनया सावंत आहे. तर गाण्याच्या पब्लिसिटी फॉरेवर पीआर ही कंपनी करत आहे.
गौतमी पाटील “राणी एक नंबर” गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, “या गाण्याच्या नावातच “राणी एक नंबर” आहे. त्यामुळे तुम्हाला कळालचं असेल गाणं एक नंबरच असेल. खरच गाणं खूप सुंदर झालं आहे. मला या गाण्याच्या शूटला खूप मज्जा आली. मला खात्री आहे की तुम्हालाही हे गाणं खूप आवडेल. तुम्ही नक्कीच या गाण्यावर थिरकणार आहात. तसेच मी पिवोट म्यूजिकचे आणि संगीतकार मोहन उपासनी यांचे आभार मानते की त्यांनी मला या गाण्यात संधी दिली. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की जस तुम्ही माझ्या इतर गाण्याला भरभरून प्रेम दिल तसच प्रेम “राणी एक नंबर” या गाण्याला द्या. राणी एक नंबर या गाण्यावर तुमचे सुंदर रील व्हिडिओ बनवा. आणि मला जरूर टॅग करा. तुम्हाला हे गाण कस वाटल हे आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा.”
गायिका सोनाली सोनवणे “राणी एक नंबर” गाण्याच्या रेकॉर्डिंग विषयी सांगते, राणी एक नंबर हे गाणं कम्प्लीटली फीमेल सेंट्रिक गाणं आहे. एक मुलगी जेव्हा सेल्फ ऑब्सेसड आणि कॉन्फिडेंट आहे तर ती काय बोलेल याचा अभ्यास मी केला. आणि तशाच हरकती मी या गाण्यात घेतल्या आहेत. गाण्याची संपूर्ण टीम म्यूजिक स्टूडियोमध्ये उपस्थित होती. सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिल. हे गाणं डान्सिकल आहे. त्यामुळे मी ते संपूर्ण एनर्जीने गाणं गायल आहे. मला गाणं गाताना खूप मज्जा आली. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय ते पाहून फार आनंद होत आहे.”
संगीतकार मोहन उपासनी गाण्याविषयी सांगतात,” एक नंबर हा शब्द माझ्या डोक्यात घोळत होता. त्या शब्दाला घेवून हे गाण करायचं मी ठरवल. आणि मी जेव्हा कंपोझिशन करायला बसलो. तेव्हा हे कॉम्बिनेशन जुळून येत होत. अशी ही सर्व गाण्याची सुरुवातीची प्रोसेस होती. या गाण्याला अप्रतिम प्रतिसाद मिळतोय. पिवोट म्यूजिक सर्व प्रेक्षकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम गाणी घेवून आणण्याचा प्रयत्न करेल. राणी एक नंबर हे गाणं सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगवर आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे.”
पुणे- महाबळेश्वर ग्रामपंचायत हद्दीमध्ये जो टोल वसुली करत आहात तो महाबळेश्वर नगरपालिकेने त्वरित थांबवावा असा इशारा श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीने दिला आहे . याबाबतचे पत्र महाबळेश्वर नगरपालिका मुख्याधिकारी यांना ग्रामपंचायत सरपंच यांनी दिले आहे . जोपर्यंत डचेस रस्ता वाहतुकीसाठी योग्य होत नाही तोपर्यंत नगरपालिकेच्या माध्यमातून होत असलेली श्रीक्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील टोल वसुली थांबवावी अन्यथा आंदोलनाला तोंड देण्याची तयारी ठेवावी असे सरपंच यांनी म्हटले आहे
या पत्रात त्यांनी असेही म्हटले आहे कि गेली एक वर्ष रस्त्याची काम करत आहात त्यासाठी तो रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला. एवढा प्रदीर्घ काळ आपण हा रस्ता बंद ठेवला परंतु अद्यापही वाहतूक सुरळीत होत नाही. रस्ता अरुंद केला आहे व साईट पट्ट्या भरल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे महाबळेश्वर पर्यटनाचे नाव आपल्या डीसाळ कारभारामुळे खराब होत आहे. त्यामुळेच या परिसरातील व्यवसाय करणाऱ्यांबरोबरच पर्यटकांना प्रचंड मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान होत आहे. याआधीही आपल्याला विविध माध्यमांच्याद्वारे, लोकप्रतिनिधींच्या द्वारे, आमदार, मंत्री महोदय यांच्यामार्फत अनेकदा विनवण्या करूनही आपण या रस्त्याच्या बाबत उदासीन भूमिकेत आहात. आपल्याला अतिशय नम्रपणे कळविण्यात येते की जोपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी अनुकूल होत नाही. तोपर्यंत आपण श्रीक्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायत हद्दीमध्ये जो टोल वसुली करत आहात. तो त्वरित थांबवावा नाहीतर आम्हाला पुढील कार्यवाहीसाठी कायदेशीर मार्गाने तसेच आंदोलनातून विरोधातील भूमिका घेण्यास प्रवृत्त करु नये.
पुणे : मुधमती संगीत विद्यालयाचे संचालक नचिकेत अनंत मेहेंदळे यांनी लिहिलेल्या ‘चक्रधार’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी भावे हायस्कूल येथील प्र. ल. गावडे सभागृहात डॉ. माधुरी डोंगरे, पं. आनंद गोडसे, पं. रामदास पळसुले आणि पं. विजय दास्ताने, डॉ. दयानंद घोटकर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाची सुरुवात शिवस्तवनाने झाली. तन्मयी मेहेंदळे-कुलकर्णी यांनी शिवस्तवन सादर केले. नचिकेत मेहेंदळे यांचे शिष्य सिद्धार्थ कुंभोजकर, ओंकार जोशी यांनी चक्रधारवादन केले. साहिल पुंडलिक यांनी लेहऱ्याची पेटीवर साथ केली.सर्व मान्यवरांचा सत्कार नचिकेत मेहेंदळे व निवेदिता मेहेंदळे यांनी केला. अध्यक्षीय भाषण करतांना डॉ. माधुरी डोंगरे म्हणाल्या, नचिकेत मेहेंदळे यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. यांच्यासारखी विद्यार्थी घडविणारे शिक्षकांची पिढी तयार व्हावी. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंच्या ज्ञानाचा पुरेपुर वापर करुन आपल्या पुढील पिढीला घडविण्यासाठी शिकले पाहिजे, असेही यावेळी त्या म्हणाल्या. तसेच पं. रामदास पळसुले यांनी चक्रधार आणि तबला यातील महत्व आपल्या मानतोगतातून व्यक्त केले आणि त्यांचे परममित्र नचिकेत मेहेंदळे यांच्याविषयी हृद्य भावना व्यक्त केल्या. पं. आनंद गोडसे म्हणाले, तबल्याचे शिक्षण देणारे पुस्तक बाजारपेठेत उपलब्ध नाही. मेहेंदळे यांनी संगीताचा पूर्ण अभ्यास करुन चक्रधार पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या कलेत नक्कीच भर टाकरणारे राहिल. मेहेंदळे सरांची शिकविण्याची पद्धत खुप सुंदर आहे. कोणताही ताल शिकविण्याबरोबरच आमच्यात मोठा आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला. तबल्याच्या शिक्षणापासून ते मराठी भाषा शिकविण्याचे काम त्यांनी केले असल्याचे यावेळी त्यांच्या शिष्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यावाचस्पती डॉ. दयानंद घोटकर म्हणाले, तबल्यामधील काव्य, शब्द, साहित्य विविध प्रकारे मांडता येतात. तबल्याचा सूर आणि ताल एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नचिकेत मेहेंदळे यांनी चक्रधार पुस्तकातून तबला वादनातील सौंदर्य उलगडले आहेत. यात तबला वादनात आपल्या कौशल्याचा शोध घेतला आहे. प्रस्ताविक नचिकेत मेहेंदळे यांनी केले. त्यांनी ‘चक्रधार’ पुस्तकाविषयी माहिती दिली. हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल. मुद्रक प्रसन्न परांजपे, टंकलेखक सिद्धेश साठे व तेजस जोशी, देवेश कलंत्री, वांगमय गोडबोले,यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन व प्रस्तुती अनिकेत कुलकर्णी आणि निवेदिता मेहेंदळे यांची लाभली. या कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रससंचालन व आभारप्रदर्शन सौ.तन्मयी मेहेंदळे-कुलकर्णी यांनी केले .यावेळी डॉ विद्या कुलकर्णी, कीर्तनकार ह भ प नंदकुमार मेहेंदळे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटले आपल्या स्तरावरून यापूर्वी देण्यात आलेली परवानगी स्थगित करावी
“कोणी नवीन घर देत का घर” अशी लोकमान्यनगरवासीयांची अवस्था
स्वतःच हक्काचं, स्वप्नातलं घरं लवकर मिळावं म्हणून लोकमान्यनगरवासियांचा संताप
पुणे – आमदार हेमंत रासनेंच्या अनागोंदी कारभारामुळे “कोणी नवीन घर देत का घर” अशी लोकमान्यनगरवासीयांची अवस्था झाली आहे. पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने लोकमान्यनगर येथील रहिवासी एकत्र येवून लोकमान्यनगर बचावासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी लोकमान्यनगर येथील सर्व कुटुंबासहित शेकडो रहिवाशांनी उपस्थित होते. गेली अनेक वर्षं चर्चेत असलेला लोकमान्यनगर पुनर्विकास सुरळीतपणे होऊ लागलेला असतानाच पुनर्विकास प्रक्रियेला स्थानिक आमदाराने हस्तक्षेप करून तात्पुरती स्थगिती मिळविल्याने त्यामुळे लोकमान्य नगरमधील ८०३ घरात राहणाऱ्या लोकांचा स्वप्नभंग झाला. सदरील लोक शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यावेळी स्थानिक लोकांनी म्हाडाच्या, शासनाच्या आणि आमदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सध्या या ठिकाणी अनियमित पाणीपुरवठा, मोडकळीस आलेलं बांधकाम, ड्रेंनेजची झालेली दुरवस्था अशा अनेक अडचणींचा सामना दैनंदिन जीवनात करावा लागत आहे. त्यात पुन्हा पुनर्विकासाला स्थगिती मिळाल्याने “घरचं झालं थोडं व्याही यांनी धाडलं घोडं” अशी अवस्था लोकमान्यनगरची झाली आहे. लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने म्हाडाचे संबंधित अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय यांच्याशी संपर्क साधत आहे.
लोकमान्यनगर येथे काही सोसायट्यांनी स्वतःचा विकसक नेमला, इमारती तयार झाल्या लवकरच रहिवासी रहावयास जाणार आहेत. यामध्ये मित्तल बिल्डर्सचे डॉ. नरेश मित्तल यांनी ४२, ४३, ४४, ४५ सदरील चारही मिळून सोसायटी झाली म्हाडाने करोडो रुपये घेवून परवानगी दिली. तरी देखील स्थगिती दिली आहे. त्याच बरोबर देशपांडे बिल्डर्स हे इमारत क्रमांक ३६, ३७, ३९ तसेच मानव बिल्डर्स इमारत क्रमांक ३४, ३५ जोगळे बिल्डर्स इमारत क्रमांक ११, ११ अ, १२ गौतम ढवळे आयकॉन डेव्हपर्स यांच्याकडे इमारत क्रमांक १,२,३,४ म्हाडाकडे परवानगीसाठी कायदेशीर कागदपत्रे देवून देखील म्हाडाने कामाला खीळ बसवली आहे. इमारत क्रमांक १५ व ५३ श्रीकांत उणेचा बिल्डर्स यांच्या म्हाडाकडे परवानगीसाठी अंतिम टप्प्यात आहे. तसेच इतर सोसायट्या देखील विविध बिल्डर बरोबर पुनर्विकासाठी चर्चा व प्रयत्नशील आहेत.
लोकमान्यनगर येथे सन १९६० ते १९६४ या चार वर्षात ५३ इमारती उभ्या राहिल्या आहेत. सध्या याठिकाणी ८०३ फ्लॅट धारक आहेत. त्याकाळात या सर्व इमारती लोड बेरिंगच्या करण्यात आल्या होत्या. सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाल्या आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी सिमेंट प्लास्टर पडले असून भिंतींमध्ये झाडे उगवली आहेत. स्लॅब पडले असून काही स्लॅब गळत आहेत. तर भिंतीना चिरा पडल्या आहेत. काही इमारती तिरक्या झाल्या आहेत. अशा नरक यातना सोसत येथील रहिवाशी जीव मुठीत घेवून राहत आहेत. येथील सर्व इमारती कॉपरेटिव सोसायटी रजिस्टर झाल्या आहेत. त्यांचे प्रॉपर्टी कार्ड व नोंदणी झाली आहे. सेल डीड, लीस डीड, कन्व्हेन्स डिड झाले असून देखील म्हाडाच्या भोंगळ कारभारामुळे येथील नागरिक हवालदिल झाले आहेत.
शासनाकडून त्वरित दखल जो पर्यंत घेतली जात नाही. तो पर्यंत हा लढा चालूच राहणार असून हा लढा भविष्यात तीव्र होणार असल्याचे पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी लोकमान्यनगर येथील अनेक रहिवाशी कुटुंबासहित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काय म्हटले आहे रासने यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात वाचा जसेच्या तसे
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई, ३२ मुख्यमंत्री सचिवालय दिनांक 15/5/25 मुख्यमंत्री ई. ऑफिस क्र. 834/828 महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई विषयः लोकमान्य नगर, पुणे येथील म्हाडा प्रकल्पाच्या एकात्मिक विकासास मान्यता देऊन, यापूर्वी दिलेल्या पुनर्विकास मंजुरीस स्थगिती देण्याबाबत. महोदय, सादर विनंती अशी की, पुणे शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि घनदाट लोकवस्ती असलेला लोकमान्य नगर परिसर म्हाडा प्रकल्प अंतर्गत येतो. सदर ठिकाणी सुमारे १६.५ एकर क्षेत्र असून, सध्या या ठिकाणी एकसंध नियोजनाअभावी तुकड्यांमध्ये पुनर्विकासाची प्रक्रिया सुरु आहे. यामुळे संपूर्ण परिसराचा विकास अर्धवट राहिला असून, नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा, सुरक्षित व सुसज्ज निवास, तसेच चांगल्या दर्जाचा सामाजिक व पर्यावरणपूरक परिसर मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. याअगोदर संबंधित प्रकल्पासाठी स्वतंत्रपणे पुनर्विकासास मान्यता देण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीत ही परवानगी संपूर्ण क्षेत्राच्या समन्वयित विकासास अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे याआधी दिलेली मान्यता रद्द करून तीव्र परिणामकारकता साधण्यासाठी संपूर्ण प्रकल्पाचा एकात्मिक, समग्र व नियोजनबद्ध पद्धतीने विकास करणे आवश्यक आहे.एकात्मिक विकास आराखडा लागू केल्यास नागरिकांना वेळेत दर्जेदार घरे, प्रशस्त परिसर, आवश्यक नागरी सुविधा, तसेच शाळा, आरोग्य केंद्रे, उद्याने, वाहतूक व पार्किंग व्यवस्था एकत्रितपणे मिळणे शक्य होईल. यामुळे केवळ रहिवाशांनाच नव्हे तर संपूर्ण पुणे शहरालाही भविष्यातील शहरी विकासाच्या दृष्टीने मोठा फायदा होईल. त्यामुळे आपणास विनम्र विनंती आहे की, तरी आपल्या स्तरावरून यापूर्वी दिलेल्या परवानगीस तत्काळ स्थगिती देण्यासाठी अमूस गृहनिर्माण यांना आदेशित करावे. आपला विश्वासू, हेमंत नारायण रासने आमदार, २१५ कसबा विधानसभा मतदारसंघ