आकर्षक हलते देखावे, मनोवेधक सजावट, जिवंत देखाव्यांसाठी पुण्यातील गणेशोत्सव सुप्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाचा १० वा दिवस आणि रविवार असे औचित्य साधून पुण्यात भाविकांचा महापूर लोटला होता. गर्दीने फुललेले रस्ते, खाद्यपदार्थांचा दरवळ, देखावे बघणारे अबालवृद्धांचे उत्सुक चेहरे यामुळे सर्वत्र चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले होते. फर्ग्युसन कॉलेज रोड जवळील उदय तरुण मंडळाने उभारलेला ‘म्हैसूर पॅलेस’ हा देखावा बघण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली असतानाच अचानक सिनेसृष्टीतील काही प्रसिद्ध चेहरे तिथे उपस्थित असल्याचे लक्षात आले. प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शित आणि पुनित बालन निर्मित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील एका दृश्याचे वास्तववादी चित्रण करण्यासाठी तेथे उपेंद्र लिमये, मिलिंद दास्ताने, सुरेश विश्वकर्मा, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, क्षितीश दाते, शरद जाधव, श्रीपाद चव्हाण, महेश लिमये आणि प्रवीण तरडे हे कलाकार उपस्थित होते. राजकारणी, पोलीस, गुन्हेगारांच्या वेशभूषेतील या कलाकारांना बघून उपस्थितांमध्ये खूप उत्सुकता पसरली होती. आणि त्यामुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि पोलिसांच्या वेशातील कलाकार स्वतः रस्त्यावर उतरले व तेथील स्वयंसेवकांना मदत करू लागले. पोलिसांच्या वेशातील आपल्या लाडक्या कलाकारांना गर्दी नियंत्रित करताना बघून पुणेकरदेखील सुखावले.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत
मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘संकल्प स्वच्छतेचा-स्वच्छ महाराष्ट्राचा’ या विषयावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून दि. ६ आणि ७ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.
राज्यात दिनांक २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोंबर २०१७ या कालावधीत ‘संकल्प स्वच्छतेचा – स्वच्छ महाराष्ट्राचा’ हे अभियान राबविण्यात येत आहे, या अभियानाचा उद्देश, अभियानाचे वेगळेपण, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि लोकांचा या अभियानात मिळत असलेला सहभाग, गाव ते राज्यस्तरापर्यंत स्वच्छतेच्या उपक्रमात असलेला कामाचा उत्साह अभियानाला मिळत असलेले अभुतपूर्व यश आणि शासन करत असलेला प्रयत्न या सर्व विषयावर सविस्तर माहिती श्री. लोणीकर यांनी ‘दिलखुलास‘ कार्यक्रमातून दिली आहे. ही मुलाखत निवेदक संजय भुस्कूटे यांनी घेतली आहे.
लोकशाही दिन अधिक कार्यक्षम करण्यासाठी कार्यपद्धतीत सुधारणा करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 4 : राज्यस्तरीय लोकशाही दिनातून जनतेच्या आतापर्यंत 99 टक्क्याहून अधिक तक्रारी दूर करण्याचे उत्कृष्ट काम शासनाने केले आहे. आगामी काळात लोकशाही दिन अधिक कार्यक्षम करण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
मंत्रालयात आज झालेल्या 100 व्या ऑनलाईन लोकशाही दिनात सामान्य प्रशासन विभाग, महसूल विभाग, गृह विभाग,नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग, उद्योग विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वन विभाग आदी विभागांशी संबंधित 18 तक्रारींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ निर्णय घेतले.
यापूर्वी राज्यस्तरीय लोकशाही दिनात अर्ज केलेल्या व्यक्तीस लोकशाही दिनी मंत्रालयात उपस्थित रहावे लागत होते. मात्र, राज्य शासनाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकशाही दिनाची सुनावणी सुरु केल्यामुळे अर्जदार आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपले म्हणने मांडू शकतो. यामुळे अर्जदाराचा अमूल्य वेळ आणि पैसा वाचतो. लोकशाही दिन अधिक प्रभावी होण्यासाठी कार्यपद्धतीत काही बदल करण्याचे विचाराधीन आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या लोकशाही दिनात बीड, जळगाव, नागपूर, पुणे, नाशिक, लातूर, ठाणे, कोल्हापूर, अकोला, लातूर, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील तक्रारींचा समावेश होता.
जालना जिल्ह्यातील पानेवाडी (ता. घनसांगवी) येथील माणिकराव विनायकराव अवघड यांच्या शेततळ्याचे अनुदान मिळाले नसल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ चौकशी करुन जबाबदारी निश्चित करावी तसेच याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
आजपर्यंतच्या लोकशाही दिनात 1390 तक्रारींपैकी 1383 तक्रारींवर निर्णय घेण्यात आला आहे.
या लोकशाही दिनास सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, पोलिस महासंचालक सतीश माथूर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव एस. जे. कुंटे, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास (1) प्रधान सचिव नितीन करीर, नगरविकास (2) प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, गृह विभागाचे प्रधान सचिव रजनीश सेठ, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय सेठी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
‘सुखकर्ता २०१७’ च्या मैफीलीमध्ये रसिक मंत्रमुग्ध
गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने आयोजन, रसिकांचा भरभरून प्रतिसाद
पुणे :- अगो बाई ढगो बाई…च्या ठेक्यावर आबालवृद्धांनी धरलेला ताल…इवली इवली पाठ आणि लट लटणारे पाय … या गाण्यांवर झालेला
भावनांचा कल्लोळ एका माकडाने काढले दुकान… या गाण्यावर रसिकांचा पिकलेला हशा अशा आल्हाददायी
वातावरणात पुणेकरांची रविवारची संध्याकाळ रंगली. निमित्त होते गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने आयोजित आर्या आंबेकर व संगीतकार डॉ. सलिल
कुलकर्णी यांच्या ‘सुखकर्ता २०१७’च्या कार्यक्रमाचे. सिंहगड जवळील गंगा भाग्योदय टॉवर्स येथे काल हा कार्यक्रम पार पडला.दरवर्षी या कार्यक्रमाच्या निमित्त्याने गोयल गंगा परिवाराचे सर्व सदस्य एकत्र येऊन हा आनंदोत्सव साजरा करतात.
यावेळी गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त अतुल गोयल, सीईओ किरण कुमार देवी उपस्थित होते.तीन तासांहून अधिक वेळ रसिक या सांगीतिक आविष्कारात हरवून गेले होते.
नाचे माझा सखा पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा या भक्तिगीतांनी मैफिल रंगून गेली होती.ऐरणीच्या देवा तुला, राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय… या गाण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
तर आर्या आंबेकरच्या अस्सल रागदारीतील आयटम साँग ‘अर्ध्या रात्री सोडून जायचं नाय’ या गाण्याने प्रेक्षकांना
थिरकावयाला लावले.
आदित्य ठाकरे (तबला) ,राजेंद्र दूरकर (ढोलकी), दर्शना जोग(किबोर्ड) यांनी सुरेख साथ दिली.
खासदार अमर साबळे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा पुणे शहर पोलीस आयुक्तांना भीम आर्मीच्या वतीने पत्र
पुणे-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बोलाविलेल्या खासदारांच्या बैठकीत खासदार अमर साबळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात आंबेडकरी संघटनांना नक्षलवादी मदत करीत असून आंबेडकरी चळवळीतील एक नेते यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असून ते सतत भाजप विरोधात प्रचार करतात अशा प्रकारचे बेजबाबदार व बेताल वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण आंबेडकरी चळवळीत त्यांच्याबद्दल चीड व असंतोष निर्माण झाला आहे .
वास्तविक खासदार अमर साबळे हे दलित जरी असले त्यांचा सामाजिक जन्मच मुळात संघ शाखेच्या विचारधारेत झाला असल्याने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ , आंदोलने आणि समाजाचे प्रश्न याबाबदल ते अज्ञभिज्ञ आहेत . जात्यांध धर्माद व संविधान विरोधी विचार प्रवाहाचा पगडा त्यांच्यावर असल्याने अशा प्रकारचे बेअक्क्ल विधान तेच करू शकतात .
त्यांच्या अशा आरोपांच्या प्रकारच्या आरोपामुळे बाबासाहेबांचा स्वातंत्र्य , समता व बंधुतेचा विचार पुढे घेउन जाणाऱ्या समस्त आंबेडकरी चळवळीचा अपमान झाला असून त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी या विषयी पुरावे द्यावेत अन्यथा त्यांना आंबेडकरी तरुणाच्या रोषाचा सामना करावा लागेल .
बाबासाहेबांची चळवळ बदनाम करून दलित तरुणांना नक्षलवादी ठरवून त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याची भाजप , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सारख्या संघटनाची नियोजनबध्द योजना आहे . त्याचाच एक भाग म्हणून अमर साबळे यांच्या सारखा प्रामाणिक स्वयंसेवक अशा प्रकारची विधाने करीत आहे . त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तांना भीम आर्मीच्या पुणे शहर जिल्हा शाखेच्यावतीने लेखी तक्रार देण्यात आली .
भीम आर्मी त्यांच्या या विधानाचा तीव्र निषेध करीत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास समविचारी पक्ष संघटनांना घेऊन प्रचंड आंदोलन उभे केले जाईल . असे पत्र भीम आर्मीच्या पुणे शहर जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांनी दिले आहे .
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न
पुणे, दि. 04 : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.
या बैठकीस अशासकीय सदस्य अरुण वाघमारे, श्रीमती विद्या म्हात्रे, तुषार झेंडे, प्रमोद जाधव,रमेश फोंडगे, अशोक अग्रवाल, सर्जेराव जाधव, बाळासाहेब औटी आदि उपस्थित होते. या बैठकीत अशासकीय सदस्यांनी ग्राहकांच्या वतीने त्यांच्या समस्या मांडल्या. संबंधित विभागांनी त्यावर तात्काळ कार्यवाही करावी असे आदेश श्री. भालेदार यांनी संबंधित अधिका ऱ्यांना दिले.
बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी , प्रतिनिधी उपस्थित होते
निरा डावा कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न
पुणे, दि. 04 : निरा 2017-18 च्या खरीप हंगामासाठी निरा डावा कालवा सल्लागार समितीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात जलसंपदा राज्यमंत्री श्री.विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीस आ. अजित पवार, आ.दत्तात्रय भरणे, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक आर.बी.घोटे,मुख्य अभियंता ता.ना.मंढे आदि उपस्थित होते.
जलसंपदा राज्यमंत्री श्री.शिवतारे यांनी यावेळी, पुरंदर व जानाई उपसा सिंचन योजनेच्या विद्युत देयकांचे योग्य नियोजन करावे असे निर्देश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. खरीप हंगामासाठी प्रस्तावित पाणी वापर, खरीप हंगामातील प्रत्यक्ष पाणी वापर, शेटफळ व वरकुटे फिडींगचे नियोजन करण्याच्या सूचनासुध्दा यावेळी मंत्रीमहोदयांनी केल्या.
बैठकीला जलसंपदा विभागाचे संचालक,अधिकारी उपस्थित होते.
पीएमडीटीएच्या अध्यक्षपदी किशोर पाटील यांची नियुक्ती
श्रीमंत दगडूशेठ चा कळस काढताना एक कामगार कोसळला (व्हिडीओ)
पुणे-विसर्जन मिरवणुकीसाठी तयारी सुरु आहे. हीच तयारी करत असताना परवा पहाटे तीन वाजता दगडूशेठ गणेश मंडळाच्या मंडपाचा कळस काढत असताना एक कामगार खाली कोसळून गंभीर जखमी झाला.
राम जाधव (वय.22) असे कामगाराचे नाव असून तो क्रेन कामगार म्हणून क्रेनवर काम करतो. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या सर्व उपचाराचा खर्च दगडूशेट गणेश मंडळाकडून करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
दगडूशेठ गणपतीच्या मुख्य उत्सव मंडपाच्या देखाव्यात तीन कळस आहे.त्यातील दत्त मंदिरच्या बाजूस असलेला कळस क्रेनच्या साहायाने काढण्याचे काम सुरु होते. त्यावेळी राम जाधव हा कळसाजवळ उभा होता. मंडपाचा कळस काढत असताना दोरी पायात अडकल्याने त्याचा तोल गेल्याने कळसावरुन खाली पडून गंभीर जखमी झाला.
विसर्जन मिरवणूकीसाठी आता मंडळे मंडप काढून मिरवणुक रथांची तयारी करत आहेत. त्या प्रमाणे कालपासूनच दगडूशेट हलवाई गणपतीचाही मंडप काढण्यात येत आहे. यावेळी क्रेनच्या सहाय्याने मंडपाचा कळस उचलला असता तेथे काम करणा-या कामगाराचा तोल गेला व मंडपाच्या छतावरुन थेट खाली कोसळला. यावेळी त्याने हेल्मेट किंवा इतर कोणतेच सुरक्षा साधने न घातल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेचा व्हिडीओ आज सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी फरसखाना पोलीस तपास करीत आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळ -पहा कोणाकडे कोणते खाते
नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्बो मंत्रिमंडळात आज फेरबदल करण्यात आला.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये 9 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती देण्यात आली आहे. आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले आहे.
सुरेश प्रभूंकडे वाणिज्य, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालय, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालयासोबत कौशल विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच स्मृती इराणींकडे माहिती प्रसारण मंत्रालयासोबत वस्रोद्योग मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याबरोबरच राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे क्रीडा आणि युवाक-कल्याण खात्याचा स्वतंत्र प्रभार सोपवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या नितीन गडकरीं यांच्याकडे गंगा आणि जलसंसाधन मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
2019साली होणारी लोकसभा निवडणूक अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आज मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेल्या मंत्र्यांच्या कामगिरीकडे यापुढील काळात सातत्याने सर्वांचे लक्ष राहील
फेरबदल कॅबिनेट मंत्री
निर्मला सीतारामन – संरक्षणमंत्री
नितीन गडकरी – दळणवळण, शिपिंग, जलसंपदा, नदीविकास, गंगा स्वच्छता
धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलियम, कौशल्य विकास मंत्रालय
पियुष गोयल – रेल्वे आणि कोळसा मंत्रालय
स्मृती इराणी – माहिती, प्रसारण, वस्त्रोद्योग खातं
मुक्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्याक मंत्री
उमा भारती – पेयजल आणि स्वच्छता मंत्री
सुरेश प्रभू – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
फेरबदल राज्यमंत्री
डॉ.वीरेंद्र कुमार – महिला, बालविकास, अल्पसंख्याक राज्यमंत्री
अनंतकुमार हेगडे – कौशल्य विकास राज्यमंत्री
विजय गोयल – संसदीय कार्य राज्यमंत्री
अश्विनीकुमार चौबे – आरोग्य, कुटुंबकल्याण राज्यमंत्री
अल्फोन्स कन्नथानम – पर्यटन, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री
महेश शर्मा – पर्यावरण, सांस्कृतिक राज्यमंत्री
सत्यपाल सिंह – मनुष्यबळ विकास राज्यमंत्री
शिवप्रतापसिंह शुक्ल – अर्थ राज्यमंत्री
आर.के. सिंह – ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
गजेंद्र शेखावत – कृषी राज्यमंत्री
अशी ही आहे मंत्री बनलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांची – पार्श्वभूमी
पुणे : सुमारे 26 वर्षापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बिहारमध्ये अटक करणारे तत्कालिन अधिकारी आर के सिंह (आयएएस) हे केंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्री बनले आहे.तर तत्कालीन गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्याशी वाद घालून त्यांचे राजकीय खच्चीकरण करू पहाणारे, पुण्याचे माजी पोलीस आयुक्त, सत्यप्रकाश सिंग देखील केंद्रात मंत्री बनले आहेत .एकंदरी देशात आयपी एस आणि आय ए एस अधिकाऱ्यांमध्ये अनेक राजकारण्यांचे ‘दूत’असल्याचे नेहमी बोलले जाते . जसे प्रकार अनेक हिंदी सिनेमातून दिसत आले आहेत .
ऑक्टोबर 1990 मध्ये अडवाणी यांनी गुजरात ते उत्तरप्रदेश अशी रथ यात्रा काढली होती. या यात्रेची देशभर चर्चा सुरू होती. धर्मनिरपेक्ष नेत्यांनी या यात्रेला विरोध केला होता. 26 वर्षापूर्वी बिहारमध्ये लालूप्रसाद मुख्यमंत्री होते आणि आर. के. सिंह हे बिहार सरकारचे सेक्रटरी होते. त्यावेळी मुख्यमंत्री लालूप्रसाद यांनी अडवाणी यांना अटक करण्याचा आदेश दिला होता. त्यावेळी सिंह यांनी अडवाणींना अटक केल्याने हिंदुत्त्वादी संघटनांनी टीका करीत देशभर निदर्शने आणि आंदोलनेही केली होती.
सत्यपाल सिंग यांनी पुण्यात पोलीस आयुक्त असताना तत्कालीन गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा पासपोर्ट अडवून सुरक्षा व्यवस्था हि काढून घेतली होती .बागवे यांच्यावर त्यावेळी ज्या 3 राजकीय स्वरूपाच्या केसेस पेंडिंग होत्या . . त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक सुदर्शन यांच्या विरोधातील घेराव , भाजपचे पूर्वीचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी लाच घेतल्याचे प्रकरण गाजले होते, तेंव्हा त्याविरोधात काँग्रेसच्या वतीने निदर्शने केली होती. आणि तिसरी केस सोनिया गांधी यांच्या विरोधात विदेशी नागरित्वाच्या मुद्याच्या निमित्ताने भाजपने जे राजकारण सुरू केले होते, त्याविरोधात डेक्कनला झालेल्या रास्ता रोको आंदोलनाची केस होती. याचा आधार घेत सत्यपाल सिंग यांनी गृहराज्यमंत्री असलेल्या बागवेंना शह देण्याचे काम केले होते .
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विचारमंथन बैठक संपन्न
105 लोकांचे जीव घेतलेल्या नोटाबंदीने अखेर देशाला काय मिळाले?
सातारा : 105 लोकांचे जीव घेतलेल्या नोटाबंदीने अखेर देशाला काय मिळाले?असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नोटाबंदी पहिल्या दिवसांपासूनच अपयशी ठरली आहे. ना काळा पैसा बाहेर आला, ना आतंकवाद थांबला. रिझर्व्ह बॅंकेचे तीन हजार कोटींचे नुकसान झाले. सर्वसामान्य जनतेला त्रास देऊन सरकारला काय मिळाले, असाही सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
मोदींच्या नोटाबंदीबाबत रिझर्व्ह बॅंकेने अहवाल प्रसिध्द केला. यामध्ये 99 टक्के नोटा परत जमा झाल्या. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी पहिल्या दिवसांपासून सांगत होतो. मोदींचा नोटाबंदीचा निर्णय अपयशी होणार. हे विधानसभेतील भाषणातही सांगितले होते. यातून देशाचा विकासाचा दरही घटणार असे सांगितले होते. नऊ महिने मोदींनी प्रयत्न केला. नोटा बंदीनंतर काळा पैसा बाहेर येणार, आतंकवाद कमी होईल, सर्व पैसा शंभर टक्के परत येणार असे सांगितले जात होते. पण मोदींच्या या निर्णयाने धड काळा पैसा बाहेर आला नाही, ना आतंकवाद कमी झाला. उलट तीन हजार कोटी फटका रिझर्व्ह बॅंकेला बसला. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बॅंकेत रांगेला उभ्या असलेल्या 105 लोकांना जीव गमवावा लागला. सर्वसामान्य जनतेला त्रास देऊन सरकारला काय मिळाले, असा प्रश्न श्री. चव्हाण यांनी उपस्थित केला.
‘डर्ट ट्रॅक रेसिंग’मध्ये पुणेकरांनी अनुभवला रेसर बाईकचा थरार
पुणे(प्रतिनिधी)—पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग अँड सोशल अॅक्टीव्हीटीज’ (परासा) आणि
‘वी रबर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ या स्पर्धेमध्ये रेसर बाईकचा थरार
अनुभवण्याची संधी पुणेकरांना रविवारी मिळाली.
पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग अँड सोशल अॅक्टीव्हीटीज’ (परासा) आणि ‘वी रबर’ यांच्या
संयुक्त विद्यमाने बिबवेवाडी गंगाधाम चौकातील सुयोग ग्रुप मैदानावर या स्पर्धांचे रविवारी आयोजन
करण्यात आले होते. पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते पांढरा झेंडा दाखवून या स्पर्धेला
प्रारंभ झाला. पुणे फेस्टिवलच्या क्रीडा स्पर्धांचे संयोजक प्रसन्न गोखले, पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग अँड
सोशल अॅक्टीव्हीटीज’च्या (परासा) उपाध्यक्ष रेश्मा लालवाणी, सुयोग ग्रुपचे नितीन शहा, निलेश शहा व
राहुल लुनिया, नॅशनल रायडर अन्वर शेख आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
तरुणांना रायडिंग या प्रकाराची रूची वाढावी या हेतूने ही स्पर्धा भरवण्यात आली होती. राज्याच्या विविध
भागातून सुमारे १५० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. १२ व १५ वर्षाखालील मुलांपासून, महिला,
युवक आणि ४० वर्षांवरील रायडरने डर्ट ट्रॅक रेसिंगमध्ये माती ट्रॅकवर मोटारसायकल चालवण्याचे कौशल्य
पणाला लावले. तरुणांमध्ये रायडिंगची रूची वाढत आहे. विविध प्रकारच्या मोटारसायकली वापरण्याचे
प्रमाणही वाढले आहे. वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेणारे आणि रायडिंगचे विक्रम करणारे अनेक तरुण
राज्याच्या विविध भागात आहेत. त्यामुळे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. विशेषत: हा
साहसी क्रीडाप्रकार वाढीस लागावा हा त्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे असे रेश्मा ललवाणी यांनी
सांगितले.
वाहनांच्या इंजिन क्षमतेनुसार १२ गटांमध्ये या स्पर्धा पार पडल्या. ‘व्हेटर्न क्लास’ ( ५०० सी. सी.
पर्यंतच्या २ आणि ४ स्ट्रोक मोटरसायकल), ‘ओपन क्लास’(२६० सीसी पर्यंतच्या २ आणि ४ स्ट्रोक
मोटरसायकल), ‘इंडियन नोव्हाईस क्लास’ (२६० सीसी पर्यंतच्या २ आणि ४ स्ट्रोक मोटरसायकल), ‘इंडियन
नोव्हाईस क्लास’ – कॉलेज क्लास (२६० सीसी पर्यंतच्या २ आणि ४ स्ट्रोक मोटरसायकल), बुलेट क्लास(
५०० सीसी पर्यंतच्या मोटरसायकल), ‘स्कुटर क्लास ( २१० सीसी पर्यंतच्या २ आणि ४ स्ट्रोक स्कुटर),
‘इम्पल्स क्लास’ ( २५० सीसी पर्यंतच्या ४ स्ट्रोक मोटरसायकल), ‘लेडीज क्लास’ ( २१० सीसी पर्यंतच्या २
आणि ४ स्ट्रोक स्कुटर), ‘किड्स क्लास’ ( १२ वर्षाखालील वयोगट –१३० सीसी पर्यंतच्या २ आणि ४ स्ट्रोक
मोटर सायकल ), ‘किड्स क्लास’ ( १५ वर्षाखालील वयोगट –२६० सीसी पर्यंतच्या २ आणि ४ स्ट्रोक मोटर
सायकल ), ‘एॅप्रिलिआ क्लास ग्रूप’ ( २०० सीसी पर्यंतच्या ४ स्ट्रोक दुचाकी) आणि ‘केटीम/बजाज क्लास’ (
४०० सीसी पर्यंतच्या ४ स्ट्रोक मोटरसायकल) अशा १२ गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. २०० मीटर डर्ट
ट्रॅकमध्ये तीन लॅप्स यानुसार प्रत्येक प्रकारात स्पर्धा फेरी झाल्या. या प्रत्येक गटात प्रथम क्रमांक
विजेत्यास बक्षिसे देण्यात आली.
नृत्य स्पर्धा-खेळ पैठणीचा-दोनशे महिला स्पर्धकांनी घेतला भाग
पुणे – पारंपारीक नृत्यापासून ते अगदी अलिकडच्या बॉलिवूडच्या नृत्यापर्यंत अनेक नृत्यप्रकार आज
मुली…..महिलांनी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. २९ व्या पुणे फेस्टिव्हलमधील महिला महोत्सवातील
नृत्य स्पर्धा आणि त्या पाठोपाठ खेळ पैठणीचा यशवंतराव चव्हाण नाट्यागृहात रंगला. या दिवसभर
चाललेल्या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून स्पर्धकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नृत्य स्पर्धा
आणि खेळ पैठणीचा या दोन्ही कार्यक्रमात प्रत्येकी दोनशे महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. या दोन्ही
कार्यकमांचे संयोजन संयोगिता कुदळे आणि दिपाली पांढरे यांनी केले होते.
वयवर्षे २० ते ३५ आणि ३६ ते ५५ अशा दोन गटात वैयक्तीक नृत्यस्पर्धा झाली तर ग्रूप डान्ससाठी ११ टीमने
सहभाग घेतला होता. ग्रूप डान्समध्ये प्रत्येक ग्रपमध्ये सरासरी १० जणींचा समावेश होता. वैयक्तीक नृत्यासाठी
३ मिनिटे तर ग्रूप डान्ससाठी ५ मिनिटांचा वेळ सादरीकरणासाठी देण्यात आला होता. ट्रॅकवरील शास्त्रिय
संगीत, चित्रपट गीते, पाश्चिमात्य संगीत यावर महिलानी नृत्ये सादर केली. या स्पर्धेवेळी पुणे फेस्टीव्हलचे
मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख मोहन टिल्लू, रवींद्र दुर्वे, अतुल गोंजारी, विनेश
परदेशी, नरेंद्र काते, विश्वास पांढरे, आदी उपस्थित होते. नृत्यस्पर्धेसाठी आयसीसी केबलच्या शीतल अरपल
आणि डान्स अकॅडमीचे सतीश पवार यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. प्रसिद्ध कथ्थक नर्तक फिरोजभाई
मुजावर यांनी नृत्याची प्रात्यक्षिके सादर केली.
सर्वच स्पर्धक पुरसे तयारीनिशी आलेले होते. त्यांनी डान्ससाठी निवडलेले गाणे आणि त्याला अनुरूप ड्रेपरी
घालून सर्वजण स्पर्धेत उतरले होते. यात पारंपारिक लोकगीतांसह हिंदी, मराठी चित्रपटातील गाण्यांवर एक से
बढकर एक परफॉर्मन्स सादर होत होते आणि त्याला नृत्य प्रेमीही भरभरून दाद देत होते. प्रत्येक गटात पहिल्या
तीन परफॉर्मन्सना प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके प्रसिद्ध निवेदक वंदना धर्माधिकारी
यांच्याहस्ते वस्तू आणि गिफ्ट व्हॉवचर स्वरूपात देण्यात आली.
खेळ पैठणीचा नंतर पुढे रंगला. पैठणी जिंकण्याच्या उद्ददेशाने प्रेक्षकांमधील २०० अधिक महिलांनी सहभाग
घेतला. हा खेळ त्यातील मजेदार खेळांबरोबरच बाळकृष्ण नेहारकर यांनी खुमासदार निवेदनाने रंगवत पुढे
नेत, पहिल्या फेरीत ६० जणींची निवड केली. त्यातून अंतिम फेरीसाठी ९ जणींची निवड केली. त्यातून प्रथम,
व्दितीय आणि तृतीय क्रमांकासाठी तिघींची निवड कऱण्यात आली. त्यांना पैठणी देऊन गौरविण्यात आले.
निवेदक वंदना धर्माधिकारांसह मर्दस रेसिपीचे मार्केटिंगचे प्रमुख अमीत कुलकर्णी, पल्लवीज स्पायसेसचे प्रसाद
रसाळ, डिवाईन लव्हचे सिंम खिरीड, एलिगन्स वेलनेसचे शाहीन यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात
आली. सूत्रसंचलन शोभा कुलकर्णी यांनी केले. नृत्यस्पर्धा आणि पैठणीच्या खेळाचे मर्दस रेसिपी, पल्लवीज
स्पायसेस, डिवाईन लव्ह, एलिगन्स वेलनेस, कलाक्षेत्रम सिल्क अँण्ड सारीज आणि नॅचरल अनारकली हर्बल टी
हे प्रायोजक होते.






