Home Blog Page 3262

आपत्ती निवारण जनजागृती चित्ररथास प्रारंभ

0

पुणे, दि. 10 : दैनंदिन जीवन जगताना अनेक प्रकारच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. मानवी चुकांमुळे घडणारे अपघात तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात वेगवेगळ्या आव्हानांना नागरिकांना सामोरे जावे लागते. या आव्हानांचा सामना करताना अंमलात आणावयाच्या उपाययोजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाला आज जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी झेंडा दाखवून मार्गस्थ केले. नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भारतकुमार बावीस्कर, आपत्ती निवारण व्यवस्थापन विशेषज्ञ रिया सहा, जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते.

आपत्ती निवारण कार्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी यासाठी, या चित्ररथाद्वारे जिल्हयात जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथासोबत रुक्मिणी कदम, शामा जळगांवकर, मंगला हरिभक्त, अंजू परदेशी, चंद्रकला पाचकर, सीमा पवार, मीना शहा या प्रशिक्षीत कार्यकर्त्यांचे पथक सहभागी झाले आहे.

नैसर्गिक आपत्ती मग ती कोणतीही असो, टाळता येत नसली तरी अशा संभाव्य आपत्तींना सामोरे जाण्याची नागरिकांची पूर्वतयारी असावी यासाठी या चित्ररथाद्वारे जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले. या चित्ररथाद्वारे करण्यात येणाऱ्या जनजागृती अभियानाचा नागरिकांनी लाभ घेऊन आपत्ती निवारणासाठी सक्षम करावे, असे आवाहन केले.

 

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ..

0

 जिल्हाधिकारी कार्यालयाची अत्याधुनिक इमारत !

‘जिल्हाधिकारी’ तथा ‘जिल्हा दंडाधिकारी’ म्हणजे जिल्हयाचे प्रशासकीय प्रमुख!  जिल्हयाचा प्रशासकीय कारभार चालवायचा तर ते कार्यालयही तसंच दिमाखदार हवं!  पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत अत्याधुनिक आणि सुसज्ज असून ही इमारत पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणावी अशी तयार झाली आहे.  या भव्यदिव्य अशा नूतन  इमारतीचं उद्घाटन दि. 7 ऑक्टोबर 2017 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष बापट, महापौर, लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झालं.  जुन्या वास्तूचे नव्या वास्तूत रुपांतर होतानाच्या घडामोडी आणि हा दिमाखदार लोकार्पण सोहळा पाहण्याचा योग मला आला, ही भाग्याचीच गोष्ट… या वास्तूविषयी थोडसं…

जिल्हाधिकारी कार्यालयाची पर्यावरणपूरक ही नवीन भव्यदिव्य इमारत पाहताना जुनी इमारत डोळयांसमोर आली. जुनी इमारत सुमारे 125 वर्षांपुर्वीची कौलारु इमारत होती. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वेळोवेळी होणारी बांधकामं, वाढणारं कामकाज, अभिलेखांची संख्या, नागरिकांची वाढणारी गर्दी तसंच वाहनांच्या पार्किंगची गंभीर समस्या यामुळं ही इमारत नव्यानं बांधणं गरजेचं होतं. तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी आवारातील सर्व कार्यालयं एकाच छताखाली आणण्याच्या हेतुनं नविन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. या प्रस्तावास शासनाने सन 2009 मध्ये 42 कोटी 13 लाख रुपयांच्या खर्चाची प्रशासकीय मान्यता दिली.  1880 साली बांधण्यात आलेल्या हेरिटेज दर्जा दोनमध्ये समाविष्ठ असलेली इमारत धोकादायक झाली असल्याने हेरिटेज कमिटीमार्फत ती पाडण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र जुन्या इमारतीची स्मृती राहील, या दृष्टीनं चौमुखी राजमुद्रा असणारं बांधकाम नविन इमारतीच्या रचनेत  तसंच ठेवण्यात आलं. सन 2014 मध्ये या नियोजित प्रकल्पाचं भूमीपुजन तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. त्यानंतर या जागेतील कार्यालयांचे स्थलांतर करुन मार्च 2014 मध्ये शुभम सिव्हिल प्रोजेक्टस् या कंत्राटदाराकडून प्रत्यक्ष बांधकामास सुरुवातही झाली.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अस्तित्वात असलेल्या 197 झाडांपैकी कमीत कमी झाडे बाधित होतील, याप्रमाणं इमारतीची संकल्पना करण्यात आली.    तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, विकास देशमुख यांच्यासह सध्या कार्यरत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळं  ही भव्य व देखणी इमारत तीन वर्षातच उभी राहिली. या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे  एकुण बांधकाम क्षेत्र 18 हजार 445 चौरस मीटर असुन, मुख्य इमारत  ए व बी विंग जी +4 मजले व सी विंग केवळ 5 वा मजला अशी  तब्बल 10 हजार 214 चौरस मीटर चटई क्षेत्राची आहे.  तर केवळ पार्कींग करीता जी+3 मजल्यांची 7 हजार 766 चौ. मी. क्षेत्रफळाची स्वतंत्र इमारत बांधण्यात आली आहे. या    बांधकामाचा नकाशा हरित इमारत संकल्पनेवर आधारीत आहे. हे बांधकाम केंद्र सरकारच्या गृह (GRIHA) संस्थेच्या हरित इमारतीसाठीच्या चार तारांकीत मानांकनाकरीता नोंदणीकृत आहे. बांधकामामध्ये पर्यावरण पुरक बांधकाम साहित्यांचाही वापर करण्यात आला आहे.

या इमारतीसाठी 66 कोटी 30 लाख रुपये खर्च झाला असुन, त्यातील 47 कोटी 50 लाख रुपये स्थापत्य कामासाठी तर अन्य रक्कमेत विद्युत सुविधा, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, अंतर्गत सुशोभिकरण व इतर सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.   इमारतीमध्ये 213 क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह, 109 आसन क्षमतेचे बैठक सभागृह तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सींग सभागृहाचाही समावेश आहे. याबरोबरच अंतर्गत पाणी साठवण, अग्निरोधक यंत्रणा, लिफ्ट ची सोय करण्यात आलेली आहे.  200 चारचाकी व 1 हजार 96  दुचाकी गाड्यांच्या पार्कींगची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी यांच्यासह साधारणपणे 500  अधिकारी व कर्मचारी बसतील अशी व्यवस्था या इमारतीत करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिने 94 सीसीटिव्ही कॅमेरे इमारतीच्या अंतर्गत व बाह्य भागात बसविण्यात आलेले आहे.

नवीन इमारतीमध्ये जाणे हे प्रगतीचे लक्षण आहे. या नव्या सुसज्य इमारतीमध्ये लोकाभिमूख आणि गतीमान पध्दतीने काम व्हावे, तसेच सामान्य नागरिकांबद्दल संवेदनशीलता जपून  नवी कार्यसंस्कृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केली. राज्याच्या मुख्यमंत्री यांनी व्यक्त केलेली ही अपेक्षा आणि नागरिकांप्रती असलेली लोकाभिमुख प्रशासनाची बांधिलकी जपण्यासाठी जिल्हा प्रशासन निश्चितच प्रयत्नशील राहील…..

  -वृषाली पाटील (माहिती अधिकारी)

                                                                                                                             जिल्हा माहिती कार्यालय,  पुणे

वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या मागण्या केल्या मान्य

0
​पुणे : ​
“शासकीय आदिवासी वसतीगृह हडपसर पुणे” येथे दि. ७पासून वसतीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थीनी विविध मागण्यांसाठी अमरण उपोषणास बसले होते याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेस चे पदाधिकारी साई होळकर, निखिल शिंदे व राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसच्या पदाधिकारी अबोली घुले यांनी देखील उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवत त्यांच्या मागण्यांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. अखेर काल विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश आले.

​ ​आंदोलनांच्या सगळ्या मागण्या पुर्णपणे प्रशासनातील संबंधित आधिकारी यांनी मान्य केल्या .
​पुणे शहर विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष ऋषी परदेशी,

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विद्यार्थी व युवती पदाधिका​ऱ्यांनीशासकीय अधिका​ऱ्यांनाविद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठीचे लेखी निवेदन दिले. तसेच विरोधी पक्ष नेते चेतन तुपे,नगरसेवक योगेश ससाणे,नगरसेवक निलेश मगर,नगरसेवक बंडू गायकवाड यांनी देखील विद्यार्थ्यांच्या ह्या आंदोलनाला समर्थन दिले.

विकास आणि प्रकाश दोन्ही केले गायब ….

0
भार नियमनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चे पुण्यात ‘मोबाईल टॉर्च ‘ आंदोलन !
ढिसाळ कारभाराबद्दल राज्य सरकारचा निषेध

पुणे :राज्यातील भार नियमनाच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस ने रास्ता पेठयेथील महा वितरण कार्यालयासमोर ‘मोबाईल टॉर्च ‘लावून निदर्शने केली . पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली .
यावेळी पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे ,नगरसेवक सुभाष जगताप ,माजी आमदार कमल ढोले -पाटील ,रवींद्र माळवदकर ,नगरसेविका नंदा लोणकर ,गफूर शेख , अनीस सुंडके ,महिला आघाडी अध्यक्ष रूपाली चाकणकर ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष राकेश कामठे , राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहराध्यक्ष मनाली भिलारे ,शहर उपाध्यक्ष अशोक राठी ,मिलिंद वालवाडकर ,निलेश नवलखा आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे सणासुदीच्या दिवसात नागरिकांना ,विद्यार्थ्यांना ,शेतकऱ्यांना ,रुग्णालयांना भार नियमनामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध करण्यात आला . महा वितरण चे मुख्य अभियंता एम  जी शिंदे ,अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांना  यावेळी निवेदन देण्यात आले . भार नियमन रद्द करण्याची मागणी करण्यात आली .
‘विकास बरोबर प्रकाश गायब ‘,’भारनियमन करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो ‘,’भोंगळ कारभाराचा धिक्कार असो ‘ असे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते . कोळशाची टोपली देखील आंदोलकांनी बरोबर आणली होती
खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या ,’  पुण्यासह राज्यातील वीज पुरवठा गेल्या काही महिन्यांपासून वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तर 10-12 तास नागरिकांना लोड शेडींगला सामोरे जावे लागत आहे. शहरी भागातही आता दररोज तास न तास लोड शेडींग होत आहे. त्याची पूर्व कल्पना नागरिकांना मिळत नसल्यामुळे दैनंदिन जीवनात त्यांना अडचणी भेडसवत आहेत.
खंडित वीज पुरवठ्याबाबत चौकशी केल्यावर, चंद्रपूरच्या औष्णिक वीज केंद्रात वीज निर्मितीसाठी कोळसा अपुरा पडत असल्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे समजले. त्यामुळेच राज्यभर लोड शेडींग होत आहे. मुळात राज्यात दररोज किती वीज पुरवठा करावा लागतो, दसरा- दिवाळी या सणांच्या कालावधीत वीज पुरवठ्याची मागणी वाढते, हे लक्षात घेऊन या पूर्वीच कोळसा पुरेसा साठवून का ठेवता आला नाही ? या बाबत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि तसेच या महत्त्वाच्या घटनेकडे दुर्लक्ष करणारया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निषेध करण्यात येत आहे.

उत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपणे महत्वाचे – सदानंद देशपांडे.

0
पुणे-क्रिएटीव्ह फाउंडेशन च्या वतीने नवरात्र महोत्सव साजरा करतानाच सामाजिक बांधिलकीची जपणूक करण्यात येते हे कौतुकास्पद असून कोणताही उत्सव उत्साहात साजरा करत असताना त्यासोबत समाजोपयोगी उपक्रम राबविले पाहिजेत असे मत मल्टी प्रोफेशनल ट्रैनिंग अकादमी आणि कर्वे समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष सदानंद देशपांडे यांनी व्यक्त केले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन नवरात्र उत्सव समितीच्या वतीने भोर येथील वाघजाई मंदिरास २०० ताटे ४०० वाट्या व चमचे भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी क्रिएटिव्ह चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,उत्सव प्रमुख विशाल भेलके,वाघजाई देवस्थान चे प्रमुख जगन्नाथशेठ भेलके,दत्ताभाऊ राऊत,नगरसेवक यशवंत डाळ,रमेशशेठ ओसवाल इ मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
वाघजाई मंदिराच्या आवारात बांधलेल्या सभागृहात गरीबांची आणि सामान्य कुटुंबातील लग्न समारंभ व अन्य कार्यक्रम होत असतात,येथे भोजनासाठी पत्रावळी किंवा थर्मोकोलच्या डिशेसचा वापर केला जातो,याचा कचरा मंदिरपरिसरात पडतो आणि त्याचा पर्यावरणावर तसेच स्वच्छतेवर,आरोग्यावर दुष्परिणाम होतो ही गरज लक्षात घेऊन ट्रस्ट च्या वतीने देवस्थानास ही भेट देण्यात आल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.तसेच सांस्कृतिक कार्यक्रम,नाट्य महोत्सव,दांडिया व इतर कार्यक्रम करत असताना मंडळांनी काही वाटा सामाजिक उपक्रमांसाठी राखून ठेवावा असे ही खर्डेकर म्हणाले.
यावेळी देवस्थानला केलेल्या उपयुक्त मदतीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सदानंद देशपांडे,संदीप खर्डेकर व विशाल भेलके यांचा सत्कार करण्यात आला.जगन्नाथ शेठ भेलके यांनी स्वागत केले,यशवंत डाळ यांनी प्रास्ताविक तर दत्ता राऊत यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

‘तसेच घुमते शुभ्र कबूतर’ : विंदांच्या कवितांचा कलात्मक अनुभव …

0

पुणे-
‘सेतू अभिवाचन मंच’, पुणे या संस्थेने ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविवर्य ‘विंदा करंदीकर’ यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘तसेच घुमते शुभ्र कबूतर’ या काव्य-मैफलीतून त्यांच्या कवितांचे अभिवाचन शनिवारी संध्याकाळी पत्रकार भवनात केले. ‘गीतांजलि जोशी’, ‘श्रुति विश्वकर्मा’ ‘मुकुंद दातार’ आणि दीपाली दातार यांनी यावेळी विंदांच्या ‘एक परी फूलवेडी’, ‘पत्ता’ यासारख्या बालकविता, ‘माझ्या मना बन दगड’, ‘ती जनता अमर आहे’ यासारख्या सामाजिक कविता, ‘प्रेम करावे असे परंतु’, ‘थोडी सुखी थोडी कष्टी’, ‘माझे मला आठवले’ अशा प्रेमकविता, ‘उपयोग काय त्याचा’, ‘साठीचा गझल’, ‘तेच ते’ यासारख्या मिश्किल कविता, ‘ऊन हिवाळ्यातील शिरशिरता’ सारख्या निसर्ग कविता, ‘झपताल’, ‘बंदिश- एक स्वरचित्र’ तसेच ‘सावल्या’, ‘कसा मी कळेना’ या सारख्या चिंतनशील कवितांचे सादरीकरण केले.
‘तसेच घुमते शुभ्र कबूतर’, ‘पवित्र मजला’, ‘ओंजळीत स्वर तुझेच’, ‘माथेरान एक भास’, ‘जन्मा आधी जन्मे’ आणि ‘कसा मी कळेना’ या कवितांना ‘श्रुति विश्वकर्मा’ यांनी अर्थवाही चाली दिल्या होत्या. केवळ तानापुर्‍याच्या स्वरांवर श्रुतिने सादर केलेल्या या कवितांच्या गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. नीता तोरगट्टी यांनी काढलेले विंदाचे व्यक्तिचित्र आणि सत्यश्री मांडके यांनी काढलेले ‘तसेच घुमते शुभ्र कबूतर’ ह्या कवितेवरील चित्र यामुळे कार्यक्रमात वेगळीच रंगत आली. या कार्यक्रमाची संहिता दीपाली दातार यांनी लिहिली होती. गीतांजलि जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विंदाच्या कन्या ‘जयश्री काळे’, जावई ‘विश्वास काळे’ तसेच चिरंजीव ‘आनंद करंदीकर’ आणि स्नुषा ‘सरिता’ करंदीकर’ यावेळी उपस्थित होते. .

डॉ. रमेश मूर्ती यांना ‘डॉ व्ही. के. चिटणीस’ पारितोषिक

0
पुणे :
‘महाराष्ट्र ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी’चा ‘डॉ व्ही. के. चिटणीस पुरस्कार’ पुण्यातील नेत्रतज्ञ् डॉ. रमेश मूर्ती यांना जाहीर झाला आहे. नवीन उपचार पद्धती, आधुनिक शस्त्रक्रिया आणि नवीन तंत्रज्ञान वापरून नेत्रसेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार आहे.
‘महाराष्ट्र ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी’च्या पुण्यातील वार्षिक परिषदेत शुक्रवारी, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता हॉटेल जे. एम. मेरिट, पुणे येथे हा पुरस्कार दिला जाणार आहे.
‘महाराष्ट्र ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे, सचिव धर्मेंद्र पाटील, आणि सोसायटीच्या ‘सायंटिफिक समिती’चे अध्यक्ष डॉ. परीक्षित गोगटे यांनी ही माहिती दिली.

ओला रिक्षाचालकांना या सणासुदीच्या हंगामात रोख दोन कोटी जिंकण्याची संधी

0
  • ‘हर दिन लखपती’ योजनेमुळे बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई, पुणे आणि हैद्राबाद येथील ओला ऑटो रिक्षाचालक भागिदारांना दर पाच राइड्समागे व्हर्च्युअल कूपन मिळणार
  • १७ सप्टेंबर २०१७ पासून सहा राज्यांतील भाग्यवान ऑटो चालक भागिदारांना रोख एक लाख रुपये जिंकणार

पुणे : वाहतुकीसाठी भारतातील सर्वात लोकप्रिय असलेल्या ओला या अपने ‘हर दिन लखपती’ – व्हर्च्युअल लकी ड्रॉ योजना लाँच केली आहे. या योजनेचा बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई, पुणे आणि हैद्राबाद अशा सहा शहरांतील ऑटो चालक भागिदारांना लाभ घेता येणार आहे. प्रत्येक ऑटो चालक भागिदाराला दर पाच राइड्सनंतर कूपन मिळणार असून ते दिवसाच्या अखेरीस काढल्या जाणाऱ्या लकी ड्रॉसाठी पात्र असतील. या शहरांतील लकी ड्रॉमधील विजेत्यांना दररोज रोख एक लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. चेन्नई शहरात जो चालक भागिदार संध्याकाळच्या वेळेस सगळ्यात जास्त बुकिंग पूर्ण करेल तो जिंकणआर आहे. लखपती विजेत्याशिवाय प्रत्येक शहरातील तीन चालक भागिदारांना दररोज दहा हजार रुपये जिंकण्याची संधी मिळेल.

 या उपक्रमामध्ये ओला रिक्षा चालक भागिदारांना सहभागी करून त्यांना ओला व्यासपीठाद्वारे जास्तीत जास्त राइड्स पूर्ण करून नेहमीपेक्षा जास्त कमाई करण्याची संधी देण्याचे उद्दिष्ट आहे. इतक्या वर्षांत ओलाने आपल्या रिक्षा चालक भागिदारांसाठी विविध उपक्रम लाँच केले असून त्याद्वारे हजारोंना ओला ऑटो व्यासपीठावर लघुउद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. ओला ऑटोमुळे चालक भागिदारांच्या कामाविना नुसतं बसून राहाण्याच्या वेळेत ३५ टक्के घट झाली आहे, तर ग्राहकांना शोधत फिरण्यामुळे होणाऱ्या इंधन खर्चात २२ टक्के घट झाली आहे. रिक्षा चालक भागिदार आता त्यांच्या कामापैकी ९० टक्के राइड्स ओलाद्वारे आरक्षित करत असून यामुळे त्यांच्या मासिक उत्पन्नात ४२ टक्के वाढ झाली आहे.

या अभियानाविषयी सिद्धार्थ अगरवाल, वरिष्ठ संचालक आणि विभाग प्रमुख – ऑटो म्हणाले, ‘ऑटो रिक्षासारख्या प्रवासाच्या पारंपरिक साधनांची ओलाने आपल्या तंत्रज्ञानावर आधारित सुसज्ज व्यासपीठाशी सांगड घालत तसेच त्यात सातत्याने नाविन्य आणत लाखो भारतीयांच्या वाहतुकविषयक गरजा पूर्ण केल्या आहेत. यामुळे हजारो रिक्षा चालक भागिदारांच्या आयुष्यात मोठा बदल घडून आला आहे. ओला ऑटो कार्यरत असलेल्या ७३ शहरांत कमी अंतराच्या प्रवासासाठी त्यालाच प्राधान्य दिले जात आहे. मात्र, अजूनही या क्षेत्रात विकासाची भरपूर क्षमता असून ओला प्लॅटफॉर्मच्या मदतीने भागिदारांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या मुबलक संधी आहेत. अशाप्रकारच्या उपक्रमांद्वारे आही आमच्या चालक भागिदारांना उद्योजक म्हणून आपली खरी क्षमता ओळखून विकासाच्या संधी पुरवण्यासाठी उत्सुक आहोत.’

कथिरवेल जे, विजेते, हर दिन लखपती योजना, चेन्नई म्हणाले, ‘ओलामध्ये रूजू झाल्यापासून उत्पन्नात नियमित वाढ झाली आहे आणि यामुळे माझे व माझ्या कुटुंबियांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. ओलाच्या इतर मोठ्या योजनांप्रमाणेच ही योजनाही शहरातील चालक भागिदारांच्या चर्चेचा विषय झाली आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘गेल्या आठवड्यात मी लखपती बनण्याइतका भाग्यवान ठरलो. मी अतिशय भारावून गेलो आहे आणि माझे मेहनती सहकारीही या योजनेद्वारे लखपती बनले आहेत.’

ओलाने आपल्या चालक भागिदारांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत, ज्याचा त्यांना चांगली कमाई करण्यासाठी आणि लघुउद्योजकतेस प्रोत्साहन देण्यासाठी फायदा होता. ओलाने वेळोवेळी चालक भागिदारांना सहभागी होण्याची संधी देणाऱ्या ओला पार्टनर्स लीग (ओपीएल), क्रिकेट अकादमींबरोबर भागिदारी करून त्याद्वारे चालक भागिदारांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे, चालक भागिदारांना त्यांचे प्राप्तीकर परतावे भरण्यास मदत करणे अशा योजना लाँच केल्या आहेत. अशाप्रकारचे उपक्रम आणि कौशल्य उपक्रमांमुळे ओला कंपनीला हजारो चालक भागिदारांना आपले व कुटुंबाचे जीवनमान उंचावणे शक्य झाले. देशभरात आयोजित करण्यात आलेल्या ओला चालक भागिदार मेळाव्यासारख्या उपक्रमांत संभाव्य ओला रिक्षाचालक भागिदारांनी लक्षणीय उपस्थिती नोंदवली व या उपक्रमामुळे हजारो उभरत्या रिक्षाचालक भागिदारांनी उद्योजकतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.

ओला ऑटोबद्दल

२०१४ मध्ये लाँच झालेल्या ओलाच्या व्यासपीठावर ७३ शहरांत मिळून १,२०,००० रिक्षांची नोंदणी झालेली आहे व येत्या काही महिन्यांत ही सेवा आणखी शहरांत लाँच करण्याचा विचार आहे. चालक भागिरादांसाठीचे ओला अप नऊ भारतीय भाषांत उपलब्ध असून त्यात इंग्रजी, बंगाली, हिंदी, कन्नड, मराठी, तमिळ व तेलुगु या भाषांचा समावेश आहे. ओल अपवरील प्रत्येत ऑटो चालक भागिदारास ग्राहकाला विनाअडथळा सेवा देता यावी यासाठी केवायसी पडताळणी पूर्ण करावी लागते तसेच वागण्याबोलण्याच्या पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर आदींचे प्रशिक्षण घ्यावे लागते.

ओलाबद्दल

आआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी भाविश अगरवाल आणि अंकित भक्ती यांनी जानेवारी २०११ मध्ये ओला (पूर्वीचे ओलाकॅब्ज) या वैयक्तिक वाहतुकीच्या बाबतीत भारतातील सर्वात लोकप्रिय अपची स्थापना केली होती. ओलाने पारदर्शक, जलद सेवा देण्यासाठी ग्राहक व चालक भागिदारांसाठीच्या शहरी वाहतूक सेवेचा मोबाइल तंत्रज्ञान प्लॅटफॉर्ममध्ये समावेश केला आहे. अब्जावधी लोकांसाठी वाहतुकीची सोय उपलब्ध करून देण्यासाठी ओला बांधील आहे. ओला मोबाइल अप वापरून युजर्स ११० शहरांतील ७,००,००० कॅब्ज आणि ऑटो रिक्षा व टॅक्सींची नोंदणी करू शकतात. ओलाने आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रवास आणि राइड शेअरिंगसाठी अनुक्रमे ओला शटल व ओला शेअर या सेवा उपलब्ध केल्या आहेत. हे अप विंडोज, अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या –

www.olacabs.com आणि  www.olacabs.com/media

पुण्यात साकारला देशातील पहिला ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प व्याप्ती वाढल्यास ५ टीएमसी पिण्याच्या पाण्याची बचत सहजशक्य-आबा बागुल

0
  •   पहिल्या टप्प्यात प्रतिदिन ५ लाख लिटर सांडपाणी होणार शुद्ध 
  •  ‘टायगर बायो फिल्टर ‘ या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर 
  •  शुद्ध झालेल्या पाण्याचा पुनर्वापर   उद्याने , स्वच्छतागृहे, नवीन बांधकामांवर होणार 
  •  एका प्रकल्पामुळे ३६५ एमएलडी पिण्याचे  पाणी  प्रति वर्ष वाचणार 
  • प्रति लिटर नाममात्र खर्च 
 
पुणे –दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि निसर्गाचा लहरीपणा … भूगर्भात आटत चाललेला पाणीसाठा या पार्श्वभूमीवर भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. मात्र पाणीबचतीसाठी शाश्वत आणि ठोस पर्याय ठरणारा  देशातील पहिला  ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प  पुण्यात साकारला आहे. लवकरच हा प्रकल्प  कार्यान्वित होणार  असून संपूर्ण शहरात असे प्रकल्प उभारल्यास सुमारे ५ टीएमसी पिण्याच्या पाण्याची बचत सहजशक्य असल्याची   माहिती माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सहकारनगर येथील कै. वसंतराव बागुल उद्यानात माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिकेतर्फे स्वयंपाकासाठी तसेच अंघोळीसाठी वापरले जाणारे पाणी शुद्ध करून पुन्हा वापरात आणण्यासाठी महत्वपूर्ण असणारा   देशातील पहिला  ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे.
 याबाबत अधिक माहिती देताना आबा बागुल म्हणाले की, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या मापदंडानुसार या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. सांडपाणी शुद्ध करण्यासाठीची प्रक्रिया नाममात्र असून या प्रक्रियेत पाण्याचा रंग, चव व वास नष्ट केला जातो. तसेच पाण्यातील जंतू व अन्य गोष्टी नष्ट केल्या जातात. या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये म्हणजे ‘टायगर बायो फिल्टर ‘ या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ग्रे वॉटर स्क्रिनींग नंतर पंपाद्वारे बायो मिडिया फिल्टर बेडवर सोडण्यात येते. रसायनांचा वापर या प्रकल्पामध्ये नाही.  पहिल्या टप्प्यात प्रतिदिन ५ लाख लिटर सांडपाणी शुद्ध होणार आहे .दुसऱ्या टप्प्यात १० लाख लिटर सांडपाण्यावर पाण्यावर दररोज प्रक्रिया  होणार आहे आणि शुद्ध झालेल्या पाण्याचा पुनर्वापर  हे उद्याने , स्वच्छतागृहे, नवीन बांधकामांवर होणार आहे.  या प्रकल्पामुळे सुरुवातीला १८२. ५ दशलक्ष लिटर आणि नंतर १० लाख लिटर क्षमता झाल्यावर ३६५ एमएलडी पिण्याचे  पाणी  प्रति वर्ष वाचणार आहे. प्रक्रियेसाठी प्रति लिटर ५ पैशापेक्षाही कमी म्हणजे थोडक्यात  नाममात्र खर्च येणार आहे.गेली ७ वर्षे या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरु होता .  दोन वर्षांपूर्वी माझ्या  प्रभागात ग्रे वॉटरचा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, काही हितचिंतकांनी  विरोध केला  होता. हा प्रकल्प राबविण्यासाठी सुमारे दीड हजार इमारतींमधील अंघोळीचे आणि स्वयंपाकाचे पाणी रोज एकत्र केले जाणार आहे. त्यासाठी २.५ किमीची पाईपलाईन टाकण्यात आली आहे.  त्या पाण्यावर प्रक्रिया होऊन  ते उद्याने, स्वच्छतागृहे, नव्या बांधकामांसाठी  वापरता येणार आहे. परिणामी पाणी बचतीला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले तसेच   या प्रकल्पासाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार तसेच हेमंत देवधर,श्री. खानोरे व पालिकेचे अधिकारीवर्ग  आणि प्रायमूव्ह कन्स्लटंटसचे सहकार्य लाभले,असेही सांगितले.   
समान पाणीपुरवठा  योजनेपेक्षा पाणी पुनर्वापराला चालना हवी 
या प्रकल्पासाठी १ कोटी ५७ लाख रुपये खर्च  आला असून समानपाणीपुरवठा  योजनेपेक्षा सर्व प्रथम असे प्रकल्प शहराच्या सर्वच भागात  उभारणे गरजेचे आहे. पाण्याची उपलब्धता नसेल तर समान पाणीपुरवठा योजना कशी मार्गी लागणार. त्यातही नवीन धरणे बांधणे शक्य नाही त्यामुळे पाणीबचतीला चालना देणारे आणि पाण्याच्या पुनर्वापराला महत्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पाची व्याप्ती वाढणे हे शहराच्या हिताचे ठरणार आहे याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधताना पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी सर्वच प्रभागात आयुक्त कुणाल कुमार यांनी हा प्रकल्प राबवावा असे आवाहनही केले. 

संजय टकलेला रॅली स्कूल कार्यशाळेत मातब्बर गौरव गीलचे मार्गदर्शन

0

पुणे- संजय टकले गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर रॅली करतो आहे. त्याने साधलेली प्रगती पाहून मी प्रभावित झालो आहे. त्याची शिकण्याची वृत्ती सुद्धा कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रीया भारताला अव्वल रॅली ड्रायव्हर गौरव गील याने व्यक्त केली.

गौरव कोईमतूरमधील खास ट्रॅकवर रॅलीचे प्रशिक्षण देतो. संजयने गेल्या शनिवारी-रविवारी दोन दिवसांची रॅली स्कूल कार्यशाळा पूर्ण केली. त्यानिमित्त संपर्क साधला असता गौरव म्हणाला की, संजयने माझ्या रॅली स्कूलमध्ये येणे फार चांगली गोष्ट आहे. त्याने अलिकडेच स्वतःच्या मालकीची मित्सुबिशी मिराज आर5 कार खरेदी केली आहे. कारकिर्दीला प्रारंभ केला तेव्हाच्या तुलनेत संजयने मोठी मजल मारली आहे.

प्रशिक्षणामागील उद्देशांविषयी गौरवने सांगितले की, संजयने आणखी वरची पातळी गाठावी म्हणून पुढील वर्षभरात त्याला आणखी वेगवान रॅली ड्रायव्हर बनविण्याचा प्रयत्न राहील.

संजयचे कौशल्य आणि दृष्टिकोनाविषयी तो म्हणाला की, अ दर्जाचा रॅली ड्रायव्हर बनता यावे म्हणून संजयकडे शिकण्याची वृत्ती आहे. माझ्या ज्ञानाचा फायदा व्हावा म्हणून मी नेहमीच खुला दृष्टिकोन ठेवतो. भारतीय रॅली ड्रायव्हरनी एपीआरसीपर्यंत मजल मारावी असे मला वाटते.

रॅली ट्रॅकविषयी त्याने सांगितले की, ट्रॅक फार तांत्रिक आहे. वेगवान आणि संथ वळणे आहेत. रॅली ड्रायव्हिंगचे सर्व पैलू येथे आत्मसात करता येतात.

भारताचे महत्त्वाचे रेसिंग सेंटर मानल्या जाणाऱ्या कोईमतूरमधील प्रसिद्ध पवनचक्क्यांच्या परिसरात हा ट्रॅक आहे. सहा किलोमीटर अंतराची एक रॅली स्टेजच तेथे तयार करण्यात आली आहे. त्यात हेअरपीन, वळणावळणांचा मार्ग, डावी अन्् उजवी वळणे, जम्प, खोलगट भाग, खडकाळ भाग, वाळुचा भाग असे विविध प्रकारचे अडथळे आहेत. एक सरळ मार्गही आहे. त्यावर ताशी दिडशे किलोमीटर वेग राखता येतो. दोन्ही बाजूंना झुडपे आहेत. भारतीय राष्ट्रीय रेसिंग मालिकेची (आयएनआरसी) एक फेरी कोईमतूरला होते, तेव्हा या परिसरात स्टेज होतात.

संजयने अधिक माहिती देताना सांगितले की, चेट्टीनाड रेसिंगचे प्रमुख तसेच मुख्य ट्यूनर त्यागराजन यांनी कार्यशाळेसाठी दोन पोलो रेस कार दिल्या होत्या. दोन्ही दिवस दोन सत्र झाली. शनिवारी सकाळी 10.30 ते 1 आणि दुपारी 2 ते 5, तर रविवारी सकाळी 9.30 ते 12.30 आणि दुपारी 1.30 ते 4 अशी सत्र झाली. गौरवने आधी मला दोन फेऱ्या मारायला सांगितले. तेव्हा कारमध्ये कुणी नॅव्हीगेटर नव्हता. नंतर तो स्वतः बसला. मी दोन लॅप मारले. त्याने माझ्या तंत्राचा अंदाज घेतला. मी काय सरस करू शकतो हे सांगितले. मग त्याने स्वतः दोन फेऱ्या मारल्या. मग त्याच्या सल्यानुसार काही बाबींचा अवलंब करीत मी फेऱ्या मारल्या. सुरवातीला एक कार पंक्चर झाली. आम्ही दुसरी कार वापरली. त्यात वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाला. तोपर्यंत आधीची कार सज्ज करण्यात आली होती. एकूण कार्यशाळ

कोणत्या तांत्रिक बाबी शिकता आल्या, या प्रश्नावर संजय म्हणाला की, वळणावर कारची स्थिती (कार पोझीशनिंग) कशी ठेवायची, ब्रेक कोणत्या ठिकाणी मारायचा (ब्रेकींग पॉइंट), टायरच्या खुणांच्या भागात कार कशी ठेवायची (रट् लाईन्स) असे मुद्द महत्त्वाचे असतात. ड्रायव्हिंगच्या वेळी त्यात अचूकता साधल्यास वेग वाढतो. रॅलीमध्ये ग्रीप महत्त्वाची असते. त्यासाठी तीन घटक महत्त्वाचे असतात. टायर, सस्पेन्शन आणि मागील चाकांना जोडणाऱ्या दांड्याची रचना (डीफ सेटींग) यावर हे अवलंबून असते. कोणत्या प्रकारच्या मार्गावर डीफ सेटींग कसे ठेवायचे याविषयी त्याने माहिती दिली.

गौरव हा आदर्श प्रशिक्षक असल्याची भावपूर्ण प्रतिक्रिया संजयने व्यक्त केली. तो म्हणाला की, त्याचे बारीकसारीक गोष्टींकडे बारकाईने लक्ष असते. स्टीअरिंगवरील हाताची स्थिती (हँड पोझीशनिंग) घड्याळ्यात तीन किंवा नऊ वाजताना काट्यांची स्थिती कशी असते त्यानुसार असावी. त्यामुळे हात अडकत (लाॅकींग ऑफ हँड््स) नाहीत. ही सवय व्हावी म्हणून त्याने रस्त्यावर साधी कार चालविताना पण हातांची स्थिती अशीच ठेवायला सांगितले.

संजयने यापूर्वी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये ब्रिटनच्या अॅलिस्टर मॅकरे यांचे मार्गदर्शन घेतले होते. अॅलिस्टरला जागतिक रॅली मालिकेचा अनुभव आहे. त्यानंतर संजयने 2015 मध्ये स्वीडनमधील कार्लस्टड येथे ब्रिटनच्या ग्रॅहॅम मिडीलटन यांच्याकडून बर्फाळ भागात ड्रायव्हिंगचे धडे घेतले होते. सध्या मिडीलटन त्याचे एम्पार्ट संघातील प्रशिक्षक आहेत. या कार्यशाळांशी तुलना करताना संजय म्हणाला की, युरोपीय लोकांचा सिस्टीमवर भर असतो. गौरवने माझ्या मानसिक दृष्टिकोनाचा विचार केला. तो एक भारतीय आहे. त्यामुळे भारतीय कसा विचार करतात याचा त्याला अंदाज आहे. साहजिकच त्याच्याकडून बरेच बारकावे आत्मसात करता आले. भविष्यातील रॅलींमध्ये त्याचा अवलंब करून सरस कामगिरी करेन असा विश्वास वाटतो.

कॅशलेस इंडियासाठी या दुग्ध व्यवसायातून क्रांती घडणार-पालकमंत्री

0

       पुणे-देशी फार्मस दुग्ध व्यवसाय आधुनिक पध्दतीने करत असल्याने कॅशलेस इंडियासाठी या दुग्ध व्यवसायातून क्रांती घडणार असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले . सोमवार पेठ येथील कमला हाईटसमध्ये  देशी फार्मसचे शाखेचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले .

     त्यांनी सांगितले कि , देशी फार्मस हा आपला दुग्ध व्यवसाय आधुनिक पध्दतीने करत आहे . ग्राहकांचे पैसे हे ऑनलाईन पद्धतीने देशी फार्मसच्या खात्यावर जमा होणार आहेत . तसेच दूध न दिल्यास तशी नोंद देखील ऑनलाईन पध्दतीने होणार आहे . त्यामुळे ग्राहकास आणि दूध विक्रेता डिजिटल पध्दतीने व्यवहार होत आहे . त्यामुळे कॅशलेस इंडियासाठी या दुग्ध व्यवसायातून क्रांती घडणार आहे .

या उदघाटन सोहळ्यास शिवसेना पुणे शहर संघटक अजय भोसले , क्रीडा समिती अध्यक्ष व नगरसेवक सम्राट अभय थोरात , देशी फार्मसचे संचालक अलोक पवार , प्रतिक गुप्ता ,  देशी फार्मसचे सोमवार पेठ शाखेच्या संचालिका ऐश्वर्या सम्राट थोरात , हिराबाग मंडळाचे अध्यक्ष अभय थोरात ,शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रविण गायकवाड  नगरसेविका आरती कोंढरे , नगरसेवक अजय कोंढरे , नगरसेवक योगेश समेळ व अन्य मान्यवर उपस्थित होते .

     गीर गाय पासून उत्पादन खाद्य पदार्थ देशी फार्मसची पुण्यात सातवी ब्रँच हे सोमवार पेठेत चालू करण्यात आली . अशी माहिती देशी फार्मसचे संचालक अलोक पवार यांनी दिली .

शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध

0

राहुल देशपांडे यांच्या गायकीचा घेतला आस्वाद

पुणे – भय इथले संपत नाही,बगळ्यांची माळ फुले यासारख्या सुरेल संगीत रचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.  अशा चैतन्यमय वातावरणात पुणेकरांची रविवारची संध्याकाळ

रंगली. निमित्त होते सुरेखा कम्युनिकेशन्स प्रा. लि आयोजित‘राहुल देशपांडे लाईव्ह’ या कार्यक्रमाचे.

महालक्ष्मी लॉन्स येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, रांका ज्वेलर्सचे फतेचंद रांका, निरामय वेलनेस सेंटरच्या अमृता चांदोरकर, व्हीजीए डिजीटल प्रिंटर्सचे व्यंकटेश मांडके,सुरेखा कम्युनिकेशन्स प्रा. लिचे सचिन पाटील आणि अजय मोरे यावेळी उपस्थित होते.

राहुल यांनी सादर केलेली ‘सहेला रे …’ ही चीज तर खास गानसरस्वती किशोरी

आमोणकरांची आठवण ताजी करणारी होती. हर्ष, क्रोध, लोभ,मोह,मत्सर या भावनांच्या यांच्या परे घेवून जाणारे शास्त्रीय संगीत असते. अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

‘सुर निरागस हो’ या गाण्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेत वन्स मोर मिळवला. ‘घेई छंद मकरंद’ सादर करताच रसिकांनी उस्फूर्त दाद देत या स्वरमैफिलीत खऱ्या अर्थाने रंग भरले.

यावेळी निखिल फाटक यांनी तबल्यावर सुरेख ठेका धरत रसिकांची वाहवा मिळवली.

निखिल फाटक (तबला),भूषण माटे (गिटार), आदित्य जोग (सहयोगी संगीतकार),अभिजित भदे (रिदमिस्ट), अनय गाडगीळ (कीबोर्ड) यांनी सुरेख साथसंगत केली. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे रंगतदार आणि माहितीपूर्ण निवेदन केले.

मराठी चित्रपट करायला आवडेल – डेज़ी शाह

0

‘जय हो’ या चित्रपटात सलमान खान बरोबर झळकलेली अभिनेत्री ‘डेजी शहा’ हीला मराठीत काम करायचे आहे. नुकतीच तीच्या आगामी प्रदर्शित होणाऱ्या ‘राम रतन’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ती पुण्यात आली असताना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ती बोलत होती. “सब स्टार मूवीज़”ची निर्मिती असलेल्या “राम रतन” हा चित्रपट  २७  ऑक्टोबर  २०१७ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

दिग्दर्शक  गोविन्द सकारिया, निर्माता संजय पटेल, आश्विन पटेल व भरत डोडिया हैं, सह-निर्माता कौशिक पटेल व पंकज डोडिया,कथा पटकथा प्रफुल पारेख, संवाद अनवरशाह, संगीत – बप्पी लाहिड़ी, छायाचित्रण – अरविन्द सिंह पूवर, नृत्यसंयोजन लॉलीपॉप, मुदस्सर आणि  शबीना खान, संपादक अशोक रुमाडे व आर्टप्रदीप सिंह यांचे आहे.

या चित्रपटात कलाकार डेज़ी शाह, ऋषि भूटानी, महेश ठाकुर, सुधा चंद्रन, राजपाल यादव, सुमित वत्स, प्रशांत राजपूत आणि सतीश कौशिक हे  कलाकार आहेत.

महिला आघाडी अध्यक्षपदी लक्ष्मीताई बाळासाहेब घोडके

0

पुणे – भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील महिला आघाडी अध्यक्षपदी लक्ष्मीताई बाळासाहेब घोडके  यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याहस्ते देण्यात आले .

      लक्ष्मीताई बाळासाहेब घोडके या पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत , त्यांनी प्रभाग समिती अध्यक्ष , महिला बाल कल्याण समिती उपाध्यक्ष आदी पदावर काम केले असून मंगळवार पेठयेथील नरपतगीर चौकातील जय जगदंबा महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष आहेत .

वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात हे नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी भाजप पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले , महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे ,खासदार अनिल शिरोळे , खासदार संजय काकडे , सभागृह नेते श्रीनाथ भिमाले , नगरसेवक सुनिल कांबळे ,   भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश पुरोहित , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष संतोष इंदूरकर आदी मान्यवर उपस्थित होते . 

राष्ट्रीय रुरबन अभियानाच्या नियामक समितीची बैठक संपन्न

0

पुणे, दि. 9 : ग्रामिण भागाचा विकास करुन खेडेगांव स्मार्ट करण्याच्या उद्देशाने श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान राबविण्यात येते. या अभियानाच्या नियामक समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीला आमदार बाबुराव पाचरणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, ग्रामीण भागातील पदाधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके उपस्थित होते.

या बैठकीत राष्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत जिल्हयातील कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.  लोणी काळभोर गांव समुहाअंतर्गत झालेल्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. विविध विकास कामांना यावेळी मान्यता देण्यात आली., या अभियानात करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या योजनांचा सविस्तर प्रकल्प अहवाल, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, निधीची उपलब्धता, कामांची अंदाजपत्रके, वडगांव, ता.मावळ येथील एकात्मिक गावसमुह आराखडा यांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. आमदार बाबुराव पाचरणे यांनी या अभियानातील विकास कामांसंदर्भात अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत मंजूर विकास कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबविण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली. या बैठकीला लोकप्रतिनिधी, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.